Saturday, 3 May 2025

२३. कीर्तनमर्यादा अभंग

श्री तुकोबाराय यांनी कीर्तनासाठी नीतीनियम घालून दिले तसेच कीर्तन माहात्म्य वर्णिले, तेविषयीचे अभंग. 

कीर्तनविषयक अभंग (अभंग संख्या ४७)

२४०२. अमंगळ वाणी । नये आइकों ते कानीं ॥ १ ॥ जो हे दूषी हरीची कथा । त्यासी क्षयरोगव्यथा ॥ २ ॥ याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥ ३ ॥ तुका म्हणे पाप । माय न आवडे ज्या बाप ॥ ४ ॥

२४०३. अवीट हे क्षीर हरिकथा माउली । सेवितां सेविली वैष्णवजनीं ॥ १ ॥ अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरें ब्रह्मानंदें ॥ २ ॥ पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवा ऐसे ॥ ३ ॥ सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥ ४ ॥ निर्गुण हें सोंग धरिलें गुणवंत । धरूनियां प्रीत गायनाची ॥ ५ ॥ तुका म्हणे केली साधना गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनि ठेला ॥ ६ ॥

२४०४. आणीक नका करूं चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी ॥ १ ॥ सुखें करा हरिकथा । सर्वथा हे तारील ॥ २ ॥ अनाथाचा नाथ देव । अनुभव सत्य हा ॥ ३ ॥ तुका म्हणे बहुतां रीती । धरा चित्तीं सकळ ॥ ४ ॥

२४०५. आनंदें कीर्तन कथा करी घोष । आवडीचा रस प्रेमसुख ॥ १ ॥ मज या आवडे वैष्णवांचा संग । येथें नाहीं लाग कळिकाळाचा ॥ २ ॥ स्वल्प मंत्र वाचे बैसलासे निका । रामकृष्ण सखा नारायण ॥ ३ ॥ उच्चारितां दुजे वाटे मज लाज । उपदेश काज आन नाहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे मन रंगलेसें ठायीं । माझे तुझ्या पायीं पांडुरंगा ॥ ५ ॥ 

२४०६. कथा करोनियां द्रव्य देती घेती । तयां अधोगति नरकवास ॥ १ ॥ रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥ २ ॥ असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥ ३ ॥ तुका म्हणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ॥ ४ ॥

२४०७. कथा करोनियां मोल ज्यापें घेती । तेही दोघे जाती नरकामध्यें ॥ १ ॥ ब्रह्म पूर्ण करा ब्रह्म पूर्ण करा । अखंड स्मरा रामराम ॥ २ ॥ मधुरवाणीच्या नका पडों भरी । जाल यमपुरी भोगावया ॥ ३ ॥ तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणें । हात पसरी जिणें धिग त्याचें ॥ ४ ॥

२४०८. कथाकाळींची मर्यादा । सांगतों ते भावें वंदा । प्रीतीनें गोविंदा । हेंचि एक आवडे ॥ १ ॥ टाळ वाद्य गीत नृत्य । अंत:करण प्रेमभरित । वाणिता तो कीर्त । तद्भावने लेखावा ॥ २ ॥ नये आळसें मोडूं अंग । कथे कानवडे ढुंग । हेळणेचा रंग । दावील तो चांडाळ ॥ ३ ॥ तोंडीं विडा माने ताठा । थोरपणें घाली गेंठा । चित्त नेदी नामपाठा । गोष्टी लावी तो चांडाळ ॥ ४ ॥ कथे इच्छी मान । दावूनियां थोरपण । रजा संकोचून । लुगडीं सांवरी तो चांडाळ ॥ ५ ॥ आपण बैसे बाजेवरी । सामान्य हरीच्या दासां धरी । तरि तो सुळावरी । वाहिजेल निश्चयें ॥ ६ ॥ येतां न करी नमस्कार । कर जोडोनियां नम्र । न म्हणतां थोर । आणिकां खेटी तो चांडाळ ॥ ७ ॥ तुका विनवी जना । कथे नाणावें अवगुणा । करा नारायणा । ऋणी समर्पक भावें ॥ ८ ॥

२४०९. कथा देवाचें ध्यान । कथा साधना मंडण । कथेऐसें पुण्य । आणिक नाहीं सर्वथा ॥ १ ॥ ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥ २ ॥ मंत्र स्वल्प जना । उच्चारितां वाचे मना । म्हणतां नारायणा । क्षणें जळती महादोष ॥ ३ ॥ भावें करितां कीर्तन । तरे तारी आणिक जन । भेटे नारायण । संदेह नाहीं म्हणे तुका ॥ ४ ॥

२४१०. कथा सुख करी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची ॥ १ ॥ कथा पाप नासी उद्धरिलें दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥ २ ॥ कथा तप ध्यान कथा अनुष्ठान । अमृत हे पान हरिकथा ॥ ३ ॥ कथा मंत्रजप कथा हरी ताप । कथाकाळीं कांप कळिकाळासी ॥ ४ ॥ तुका म्हणे कथा देवाचेंही ध्यान । समाधि लागोन उभा कथे ॥ ५ ॥

२४११. कथेचा उल्लंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥ १ ॥ कासया जीऊन जाला भूमीभार । अनउपकार माते कुशीं ॥ २ ॥ निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥ ३ ॥ तुका म्हणे दोन्हीं बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥ ४ ॥

२४१२. कथे बैसोनि सादरे । सुखचर्चा परस्परें । नवल काय तो उद्धरे । आणिक तरे सुगंधें ॥ १ ॥ पुण्य घ्यावें रे फुकाचें । पाप दुष्ट वासनेचें । पेरिल्या बीजाचें । फळ घेईं शेवटीं ॥ २ ॥ कथा विरस पाडी आळसें । छळण करूनि मोडवी रसें । बुडवीं आपणासरिसें । विटाळसी नावेसी ॥ ३ ॥ सज्जन चंदनाचिये परी । दुर्जन देशत्यागें दुरी । राहो म्हणे हरी । विनंती करी तुका हे ॥ ४ ॥

२४१३. करावें कीर्तन । मुखें गावे हरीचे गुण ॥ १ ॥ मग कांहीं नव्हे बाधा । काम दुर्जनाची क्रोधा ॥ २ ॥ शांतिखड्ग हातीं । काळासी ते नागवती ॥ ३ ॥ तुका म्हणे दाता सखा । ऐसा अनंतासारिखा ॥ ४ ॥

२४१४. कथा त्रिवेणीसंगम । देव भक्त आणि नाम । तेथींचें उत्तम । चरणरज वंदितां ॥ १ ॥ जळती दोषांचे डोंगर । शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर । जे पवित्र हरिकथा ॥ २ ॥ तीर्थें तया ठाया । येती पुनीत व्हावया । पर्व काळ पायां । तळीं वसे वैष्णवां ॥ ३ ॥ अनुपम्य हा महिमा । नाहीं द्यावया उपमा । तुका म्हणे ब्रह्मा । नेणें वर्णूं या सुखा ॥ ४ ॥

२४१५. कथा हें भूषण जनामध्यें सार । तरले अपार बहु येणें ॥ १ ॥ नीचिये कुळींचा उंचा वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥ २ ॥ देव त्याची माथां वंदी पायधुळी । दीप जाला कुळीं वंशाचिये ॥ ३ ॥ त्याची निंदा करी त्याची कुष्ट वाणी । मुख संवदणी रजकाची ॥ ४ ॥ तुका म्हणे नाहीं चोरीचा व्यापार । विठ्ठलाचें सार नाम घ्यावें ॥ ५ ॥

२४१६. कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ॥ १ ॥ प्रेमें छंदें नाचे डोले । हारपले देहभाव ॥ २ ॥ एकदेशीं जीवकळा । हा सकळां सोयरा ॥ ३ ॥ तुका म्हणे उरला देव । गेला भेव त्या काळें ॥ ४ ॥

२४१७. कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगी असें ॥ धृ. ॥ भक्त जाय सदा हरिकीर्ति गात । त्यासवें अनंत हिंडतसे ॥ २ ॥ त्रैलोक्यभ्रमण करीत नारद । त्यासवें गोविंद फिरतसे ॥ ३ ॥ नारद मंजूळ सुस्वरें गीत गाय । मार्गीं चालताहे संगें हरि ॥ ४ ॥ तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची । नाहीं आणिकांची प्रीति ऐसी ॥ ५ ॥

२४१८. खोंकरी आधण होय पाकसिद्धि । हें तों घडों कधीं शकेचि ना ॥ १ ॥ खापराचे अंगीं घासितां परिस । न पालटे कीस काढिलिया ॥ २ ॥ पालथे घागरी रिचवितां जळ । तुका म्हणे खळ तैसे कथे ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२४१९. गायत्री विकोनी पोट जे जाळिती । तयां होय गती यमलोकीं ॥ १ ॥ कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥ २ ॥ नाम गाऊनियां द्रव्य जे मागती । नेणों तयां गति कैसी होय ॥ ३ ॥ कैसी होय गती तेच हो जाणती । आम्हासी संगति नलगे त्यांची ॥ ४ ॥ आमुचा सांगाती आहे तो श्रीहरि । नलगे दुराचारी तुका म्हणे ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२४२०. जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥ १ ॥ बुका लावू नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ २ ॥ तट्टावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥ ३ ॥ तुका म्हणे द्रव्य घेती । देती तेही नरका जाती ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२४२१. जळती कीर्तनें । दोष पळतील विघ्नें ॥ १ ॥ हेंचि बळिवंत गाढें । आनंद करूं दिंडींपुढें ॥ २ ॥ कलि पापाची हे मूर्ति ।  नामखड्ग घेऊं हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे जाऊं । बळें दमामेही लावूं ॥ ४ ॥

२४२२. टाळघोळ सुख नामाचा गजर । घोष जयजयकार ब्रह्मानंदु ॥ १ ॥ गरुडटके दिंडीं पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिकां ॥ २ ॥ आनंदें वैष्णव जाती लोटांगणीं । एक एकाहून भद्रजाति ॥ ३ ॥ तेणें सुखें सुटे पाषाणा पाझर । नष्ट खळ नर लुब्ध होती ॥ ४ ॥ तुका म्हणे सोपें वैकुंठासी जातां । रामकृष्ण कथा हेचि वाट ॥ ५ ॥

२४२३. त्या हरिदासांची भेटी घेतां । नरका उभयतांसी जाणें ॥ १ ॥ माते परीस थोर कथा । भाड घेतां न लाजे ॥ २ ॥ देतां घेतां नरकवासी । उभयतांसी रवरव ॥ ३ ॥ तुका म्हणे नरकगांवा । जाती हांवा धरोनि ॥ ४ ॥

२४२४. दया क्षमा शांती । तेथें देवाची वसति ॥ १ ॥ पावें धांवोनियां घरा । राहे धरोनियां थारा ॥ २ ॥ कीर्तनाचे वाटे । बराडिया ऐसा लोटे ॥ ३ ॥ तुका म्हणे घडे । पूजा नामें देव जोडे ॥ ४ ॥

२४२५. दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरिकथा ॥ १ ॥ तारूं भवसागरींचें । उंचनीच अधिकारी ॥ २ ॥ चरित्र तें उच्चारावें । केलें देवें गोकुळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आवडी धरीं । कृपा करी म्हणऊनि ॥ ४ ॥

२४२६. धीर तो कारण । साह्य होतो नारायण । नेदी होऊं शीण । वाहूं चिंता दासांसी ॥ १ ॥ सुखें करावें कीर्तन । हर्षें गावे हरीचे गुण । वारी सुदर्शन । आपणचि कळिकाळा ॥ २ ॥ जीव वेची माता । बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता । प्राकृतां यांसारिखा ॥ ३ ॥ हें तों माझ्या अनुभवें । अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें । आहाच नये कारणा ॥ ४ ॥

२४२७. न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागर त्रिपुटीं । जाय तेथे दाटी । वैष्णवांची धांवोनि ॥ १ ॥ भाविक गे माये भोळें गुणाचें । आवडे तयाचें नाम घेतां तयासी ॥ २ ॥ जो नातुडे कवणिये परी । तपें दानें व्रतें थोरी । म्हणतां वाचे हरी । राम कृष्ण गोविंदा ॥ ३ ॥ चौदा भुवनें जया पोटीं । तो राहे भक्तांचिये कंठीं । करूनियां साटी । चित्त प्रेम दोहींची ॥ ४ ॥ जया रूप ना आकार । धरी नाना अवतार । घेतलीं हजार । नांवें ठेवूनि आपणां ॥ ५ ॥ ऐसा भक्तांचा हा ऋणी । पाहतां आगमी पुराणीं । नाहीं तुका म्हणे ध्यानीं । तो कीर्तनीं नाचतसे ॥ ६ ॥

२४२८. न लाहिजे जपें न लाहिजे तपें । आम्हासी हें सोपें गीतीं गातां ॥ १ ॥ न करितां ध्यान न करितां धारणा । तो नाचे कीर्तनामाजी हरी ॥ २ ॥ जयासी नाहीं रूप आणि आकार । तोचि कटीं कर उभा विटे ॥ ३ ॥ अनंत ब्रह्मांडें जयाचिया पोटीं । तो आम्हां संपुष्टीं भक्तिभावें ॥ ४ ॥ तुका म्हणे वर्म जाणती लडिवाळें । जीं होतीं निर्मळ अंतर्बाहीं ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२४२९. न वजे वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां वांयां न वजे ॥ १ ॥ न वजे वांयां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ २ ॥ न वजे वांयां कांहीं केलिया तीर्थ । अथवा कां व्रत वांयां न वजे ॥ ३ ॥ न वजे वांयां झालें संतांचें दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥ ४ ॥ तुका म्हणे भाव असतां नसतां । सायास करितां वांयां न वजे ॥ ५ ॥ धृ. नाही)

२४३०. नामाचें चिंतन प्रगट पसारा । असाल ते करा जेथें तेथें ॥ १ ॥ सोडवील माझा स्वामी निश्चयेसीं । प्रतिज्ञा हे दासीं केली आम्हीं ॥ २ ॥ गुण दोष नाहीं पाहात कीर्तनीं । प्रेमें चक्रपाणी वश्य होय ॥ ३ ॥ तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥ ४ ॥ 

२४३१. पानें जो खाईल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ते ॥ १ ॥ तमाखू ओढोनि काढील जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥ २ ॥ कीर्तनीं बडबड करील जो कोणी । बेडुक होऊनि येईल जन्मा ॥ ३ ॥ जयाचिये मनीं कथेचा कांटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥ ४ ॥ जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचें काळें तोंड तुका म्हणे ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२४३२. बरवें माझ्या केलें मनें । पंथें येणें निघालें ॥ १ ॥ अभयाचे जावें ठाया । देवराया प्रतापें ॥ २ ॥ साधनाचा नलगे पांग । अवघें सांग कीर्तनें ॥ ३ ॥ तुका म्हणे सत्ता थोरी । कोण करी खोळंबा ॥ ४ ॥

२४३३. बोलाचें गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥ १ ॥ माझी हरिकथा माउली । नव्हे आणिकांसी पांगिली ॥ २ ॥ व्याली वाढविलें । निजपदीं निजविलें ॥ ३ ॥ दाटली वोरसें । त्रिभुवन विठूरसें ॥ ४ ॥ विष्णु जोडी कर । माथां रज वंदी हर ॥ ५ ॥ तुका म्हणे बळ । तोडरीं हा कळिकाळ ॥ ६ ॥

२४३४. भूमीवरी कोण ऐसा । गांजूं शके हरीच्या दासा ॥ १ ॥ सुखें नाचा हो कीर्तनी । जयजयकारें गर्जा वाणी ॥ २ ॥ काळा सुटे पळ । जाती दुरितें सकळ ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्तीं । साच माना हे निश्चिंती ॥ ४ ॥

२४३५. मुंगिचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥ १ ॥ याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ २ ॥ उदक अन्न काय म्हणे मज खावें । भुकेला तो जाय चोजवीत ॥ ३ ॥ व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा । दुःखाच्या परिहारा आपुलिया ॥ ४ ॥ तुका म्हणे जया आपुलें स्वहित । करणें ताेचि प्रीत धरी कथे ॥ ५ ॥ (धृ. नाही) 

२४३६. यमधर्म सांगे दूतां । तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय हरिकथा । सदा घोष नामाचा ॥ १ ॥ नका जाऊं तया गांवां । नामधारकाच्या शिवां । सुदर्शन यावा । घरटी फिरे भोंवतीं ॥ २ ॥ चक्र गदा घेऊनि हरि । उभा असे त्यांचे द्वारीं । लक्ष्मी कामारी । रिद्धिसिद्धिसहित ॥ ३ ॥ ते बळियाशिरोमणी । हरिभक्त ये मेदिनी । तुका म्हणे कानीं । यम सांगे दूतांचे ॥ ४ ॥

२४३७. या रे नाचों अवघे जण । भावें आनंदें करून ॥ १ ॥ गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊं संतजना ॥ २ ॥ सुख फुकासाठीं । साधे हरिनाम बोभाटी ॥ ३ ॥ प्रेम वांटितो उदार । देतां नाहीं सान थोर ॥ ४ ॥ पापें पळालीं बापुडीं । काळ झाला देशधडी ॥ ५ ॥ तुका म्हणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥ ६ ॥

२४३८. लटिकें तें ज्ञान लटिकें तें ध्यान । जरि हरिकीर्तन प्रिय नाहीं ॥ १ ॥ लटिकाचि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाठीं ॥ २ ॥ लटिकेंचि केलें वेदपारायण । जरि नाहीं स्फुंदन प्रेम कथे ॥ ३ ॥ लटिकें तें तप लटिका तो जप । आळस निद्रा झोप कथाकाळीं ॥ ४ ॥ नाम नावडे तो करील बोहरी । नाहीं त्याची खरी चित्तशुद्धि ॥ ५ ॥ तुका म्हणे ऐसी गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिलाही ॥ ६ ॥ (धृ. नाही)

२४३९. लावूनियां पुष्टी पोरें । आणि करकर कथेमाजी ॥ १ ॥ पडा पायां करा विनंती । दवडा हातीं धरोनियां ॥ २ ॥ कुर्वाळूनि बैसे मोहें । प्रेम कां हें नाशीतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे वाटे चित्त । करा फजित म्हणऊनि ॥ ४ ॥

२४४०. विठ्ठल मुक्तिदाता । नव्हे मरो हें बोलतां ॥ १ ॥ मज न साहावे कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ २ ॥ हरिकथेतें धिक्कारी । शत्रु माझा तोचि वैरी ॥ ३ ॥ सुना काळतोंडा । जो या देवा म्हणे धोंडा ॥ ४ ॥ अहं म्हणे ब्रह्म । नेणे भक्तीचें तें वर्म ॥ ५ ॥ तुका म्हणे क्षण । नको तयाचें दर्शन ॥ ६ ॥

२४४१. साता दिवसांचा जरी झाला उपवासी । तरी कीर्तनासी टाकूं नये ॥ १ ॥ फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । परी नामाचा गजर सोडूं नये ॥ २ ॥ शरीराचे होत दोनी तेही भाग । परि कीर्तनाचा रंग सांडो नये ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा नामीं ज्या निर्धार । तेथें निरंतर देव वसे ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२४४२. कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥ १ ॥ कोणी व्हारे अधिकारी । त्यासी हरी देईल ॥ २ ॥ अंगीं वैराग्याचें बळ । साही खळ जिणावे ॥ ३ ॥ उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥ ४ ॥

२४४३. सांगतां दुर्लभ ज्ञानाचिया गोष्टी । अनुभव तो पोटीं कैंचा घडे ॥ १ ॥ भजनाचे सोई जगा परिहार । नेणत्या सादर चित्त कथे ॥ २ ॥ नाइकवे कानीं साधन उपाय । ऐके तो गाय हरुषें गीत ॥ ३ ॥ नव्हे आराणूक जावयासी वना । वेध कामी मना हरिकथेचा ॥ ४ ॥ काळाच्या साधना कोणा अंगीं बळ । चिंतना मंगळ अष्ट प्रहर ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्ही खेळों भातुकुलें । विभागासी मुलें भोळी येथें ॥ ६ ॥

२४४४. सांडूनि कीर्तन न करी आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगीं ॥ १ ॥ आवडीचें आर्त पुरवी पंढरिराया । शरण तुझ्या पायां याचि लागीं ॥ २ ॥ टाळी वाहूनियां विठ्ठल म्हणेन । तेणें निवारीन भवश्रम ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा नुपेक्षावे आम्हां । न्यावें निजधामा आपुलिया ॥ ४ ॥

२४४५. सोपें वर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेऊनि नाचा ॥ १ ॥ समाधीचें सुख सांडा ओवाळूनी । ऐसा या कीर्तनीं विठुरस ॥ २ ॥ पुढती घडे चढतें सेवन आगळें। भक्तिभाग्य बळें निर्भरता ॥ ३ ॥ उपजोंचि नये संदेह चित्तासी । मुक्ति चारी दासी हरिदासांच्या ॥ ४ ॥ तुका म्हणे मन पावोनि विश्रांती । त्रिविध नासती ताप क्षणें ॥ ५ ॥

२४४६. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हां ॥ १ ॥ नारायणनामें होऊं जीवन्मुक्त । कीर्तनीं अनंत गाऊं गीतीं ॥ २ ॥ वैकुंठींचें जन सदा इच्छिताती । कईं येथें येती हरिचे दास ॥ ३ ॥ यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनियां कर तिष्ठतसे ॥ ४ ॥ तुका म्हणे पावावया पैल पार । नाममंत्र सार भाविकासी ॥ ५ ॥

२४४७. हरिकथेची आवडी देवा । करीतो सेवा दासांची ॥ १ ॥ म्हणोनि हिंडे मागें मागें । घरटी जागे घालितसे ॥ २ ॥ निर्लज्ज भोजें नाचें रंगीं । भरतें अंगीं प्रेमाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे विकलें देवें । आपणा भावें संवसाटी ॥ ४ ॥

२४४८. जप तप ध्यान नलगे धारणा । विठ्ठल कीर्तनामाजी उभा ॥ १ ॥ राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥ २ ॥ कीर्तनीं समाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे मुक्ति हरिदासांच्या घरीं । ओळगती चारी रिद्धिसिद्धि ॥ ४ ॥


No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...