- श्यामसुंदर महाराज सोन्नर
संत म्हणून तुकाराम महाराज यांचे कार्य जितके श्रेष्ठ आहे, तितकेच
समाजसुधारक म्हणूनही तुकाराम महाराज यांच्या कार्याचा आवाका मोठा आहे.
लहानातल्या लहान विषयापासून ते समाजातील मोठ्यातल्या मोठ्या समस्येवर
तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांतून उपाय सुचविलेले आहेत. त्यावर भाष्य
केलेले आहे. म्हणूनच तुकाराम महाराज यांचे वर्णन करताना ‘अणुरेणुया थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥’ असे केले जाते. कारण तुकाराम महाराज यांचे सामाजिक
कार्यही देदीप्यमान अशा प्रकारचे आहे. म्हणूनच मी तुकाराम महाराज यांची ओळख
सांगत असताना, ‘समाजसुधारक तुकाराम महाराज’ अशी सांगितलेली आहे.
तुकाराम
महाराज यांचा उल्लेख ‘समाजसुधारक’ असा आतापर्यंत कोणीही केलेला नसताना
तुम्ही तुकाराम महाराज यांना समाज सुधारक अशा प्रकारचे विशेषण का लावले
आहे, असा आपला प्रश्न असेल; तर त्याचे उत्तर देण्यासाठी पुन्हा आपल्याला
सुधारकाची व्याख्या करावी लागेल. समाजसुधारक कुणाला म्हणावे? शेतकरी कुणाला
म्हणावे? उत्तर सोपं आहे. जो शेती विकतो, त्याचे आलेले पैसे दारू-जुगारावर
घालवतो, त्याला शेतकरी म्हणावे. बरोबर का?
नाही!
मग?
आपण शेतकरी आहो, असे प्रमाणपत्र मिळवितो, सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जागा विकत घेतो आणि त्यांवर फार्म हाऊस किंवा बिल्डिंगचे प्रकल्प उभारतो त्याला शेतकरी म्हणावे. बरोबर का?
अजिबात नाही. मग शेतकरी कुणाला म्हणावे?जो शेती करतो, त्याला शेतकरी म्हणावे.
मग सुधारक कुणाला म्हणावे? जो सुधारणा करतो त्याला सुधारक असे म्हणावे. बरोबर की नाही ?
बरं
सुधारणा कोणत्या गोष्टीची केली जाते? जी बिघडली आहे, तिचीच सुधारणा केली
जाते. जी चांगली आहे, तिला सुधारण्याची काय आवश्यकता आहे. मग तुमचा प्रश्न
असा असेल की, तुकाराम महाराज यांच्या काळात नेमके काय बिघडले होते, जे
तुकाराम महाराज यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला. म्हणून महाराजांना तुम्ही
समाजसुधारक तुकाराम महाराज म्हणता ?
त्याचे उत्तर असे आहे की, तुकाराम महाराजांच्या काळातही बिघडलेले होते आणि आजही फार सुधारलेले आहे, असे समजण्याचे कारण नाही.
समाज
अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला होता. वेगवेगळ्या कर्मकांडांत अडकलेला होता.
काही समस्या आली तर त्यावर योग्य उपाय शोधण्याऐवजी एखाद्या बुवा-बाबाकडे
जात होता. आजारी पडला तरीही एखाद्या बुवा- बाबाकडे जात होता. अशा वेळी
तुकाराम महाराज यांनी समाजाला अंधश्रद्धेपासून वाचविण्यासाठी फार मोठी
समाजजागृती करणारे साहित्य अर्थात अभंग लिहिले. इतकेच नव्हे तर अभंगांच्या
माध्यमातूनही त्यांनी मोठ्या प्रमाणात जागृती केली. माणसं आजारी पडली तर
एखाद्या बुवा-बाबाकडे जायची. तेव्हा तो बाबा रानातल्या म्हसोबाला, अप्सरा
(जलदेवता), भुताला, डाकिणीला बळी देण्यास सांगायचा. गोरगरिबांनी वर्षभर राब
राब राबावे, त्यातून मिळालेल्या पैशातून एखादं बकरं घ्यावं, मेंढी घ्यावी
आणि ती देवाच्या समोर कापावी. त्या जाणत्याला त्या वेळी बोलवावे. त्याला
दक्षिणा द्यावी. अशा प्रकारचे शोषण चालत होते. तेव्हा तुकाराम महाराज यांनी
स्पष्ट शब्दांत सांगितले की, बाबांनो, अशा शेंदरी हेंदरी देवांच्या मागे
लागू नका.
महाराज म्हणतात-
शेंदरी हेंदरी दैवते । कोण ती पूजी भूते खेते ॥
आपुल्या पोटा जी रडते । मागते शिते अवधान ॥
आपुल्या इच्छे आणिका पिडी । काय ती देईल बराडी ॥
कळो ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धी अधिरा ॥
तुकाराम
महाराज म्हणतात जे देव स्वतः उपाशी आहेत, ते तुम्हांला काय देणार आहेत? जर
मला २५ हजारांची गरज असेल, तर मी कुणाकडे मागितले पाहिजेत? ज्याच्या घरावर
कर्ज न फेडल्याने बँकेची जप्ती आली आहे, त्याच्याकडे! बरोबर आहे का? नाही.
कारण त्याच्याकडे पैसे असते तर त्याच्या घरावर बँकेची जप्ती आली असती का?
तसे तुकाराम महाराज म्हणतात, जर तेच देव उपाशी असतील तर त्यांनी तुमच्याकडे
काही मागितले असते का? म्हणून अशा देवांच्या नादाला लागू नका. महाराज तर
पुढे जाऊन सांगतात की, बाबांनो, नवस तर अजिबात करू नका. नवस करून कुणालाही
लेकरं-बाळं होत नाहीत. हे आम्हांला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पहिल्यांदा
नाही सांगितले, तर पावणेचारशे वर्षांपूर्वी तुकाराम महाराज यांनी आपल्याला
सांगितले की, नवस करून लेकरं होत नाहीत.
महाराज म्हणतात,
नवसे कन्या-पुत्र होती । तरी का करणे लागे पती ॥
इतक्या
स्पष्ट शब्दांत अंधश्रद्धेवर प्रहार करणारे तुकाराम महाराज होते.
साधुत्वाचे सोंग घेऊन समाजाचे शोषण करणाऱ्यांविरोधात तर तुकाराम महाराज
यांनी अत्यंत कठोर शब्दांत प्रहार केलेले आपल्याला पाहायला मिळतात.
तुकाराम महाराज म्हणतात-
ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू ॥
अंगा लावोनिया राख । डोळे झाकोनी करिती पाप ॥
दावोनी वैराग्याची कळा । विषय भोगिती सोहळा ॥
तुका म्हणजे सांगो किती । जळो तयाची संगती ॥
किंवा
दंड,
मुंडन करणाऱ्यांना तुकाराम महाराज सोप्या भाषेत सांगतात, तुम्ही वारकरी
झालात ना, मग आता तुम्हांला दंड-मुंडन करण्याची गरज नाही.
न लगे दंडणे हिंडणे ते काही । साधनांची नाही आटाआटी ॥
असे
अनेक अभंग आहेत की, ज्या माध्यमातून तुकाराम महाराज यांनी अंधश्रद्धेवर
जोरदार प्रहार केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. म्हणून तुकाराम महाराज
यांची ओळख करून देताना मी समाजसुधारक तुकाराम महाराज अशी करून दिलेली आहे.
महाराज,
आम्हांला उच्च विचारवंत तुकाराम महाराज पटले, समाजसुधारक तुकाराम महाराजही
आम्ही पटवून घेतले. परंतु वेदशास्त्र पंडित तुकाराम महाराज हे विशेषण काही
आम्हांला पटत नाही.
वेदशास्त्र पंडित तुकाराम हे का बरं पटत नाही?
कारण
वेद वाचण्याचा अधिकार हा शूद्रांना नाही. तुकाराम महाराज तर स्वतःला कुणबी
म्हणवितात. कुणबी म्हणजे शूद्र. मग तुकाराम महाराज जर शूद्र असतील, तर मग
त्यांना वेद वाचण्याचा अधिकार नसेल. जर वेद वाचण्याचाच अधिकार नसेल तर मग
तुम्ही तुकाराम महाराज यांना वेदशास्त्र पंडित कसे काय म्हणता, असा तुमचा
प्रश्न असू शकतो. मात्र त्याचे उत्तर तुकाराम महाराज यांनीच दिलेले आहे.
तुकाराम
महाराजांच्या काळात हाच प्रश्न त्या वेळच्या काही कर्मठ लोकांनी त्यांना
जाऊन विचारला होता. तुकाराम महाराज यांच्या अभंगांतील तत्त्वज्ञान हे
वेदापेक्षाही सर्वसामान्यांच्या हिताचे आहे, असे लोकांना वाटत होते.
वेदामध्ये तत्त्वज्ञान सांगितलेले असले तरी समाजातल्या सर्व घटकांना वेद
समान वागणूक देत नाही. अर्थात हे मी म्हणत नाही. स्वतः ज्ञानेश्वर महाराज
यांनी ‘ज्ञानेश्वरी’ मध्ये वेद हा पक्षपाती असल्याचे म्हटले आहे.
ज्ञानेश्वर महाराज लिहितात -
वेद ऐश्वर्यवंत होय ठायी । परी कृपणू ऐसा आण नाही । जो लागला कानी तिही । वर्णांचाची ॥
ज्ञानेश्वर
महाराज सांगतात, वेद ऐश्वर्यवंत आहे. विचारवंत आहे. पण तो फक्त ब्राह्मण,
क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांच्याच हिताचा विचार करतो. तो स्त्री आणि
शूद्राला जवळ घेत नाही. अन्य एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज त्या बाबतीत
अधिक स्पष्टता व्यक्त करतात आणि थेट वेदाला कृपण ठरवतात. ते म्हणतात -
वेद बहू कृपण झाला । तो तिही वर्णाचे कानी लागला । स्त्री शूद्राशी अबोला । धरिला तेणे ॥
वेद
हा कृपण आहे आणि तो तीन वर्णांच्या कानी लागला आहे. म्हणजे त्यापुरताच
विचार करतो. मूळ वेद तीन वर्गांचा विचार करतो. मात्र तुकाराम महाराज यांची
गाथा समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देते. प्रत्येकाच्या
हिताचा उपदेश करते. किंबहुना तुकाराम महाराज आपल्या साहित्यलेखनाचा आणि कीर्तनाचा उद्देश सांगतानाच म्हणतात की,
उपकारा लागी बोलो हे उपाय । तयाविण काय आम्हां चाड ॥
बुडते हें जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनियां ॥
केवळ
सामान्यजनाला मार्गदर्शनासाठीच तुकाराम महाराज यांनी अभंगांचे लेखन केले.
त्यातून शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यापासून ते सिंहासनावर बसलेल्या
राज्यकर्त्यांपर्यंत आणि जात्यावर दळणाऱ्या स्त्रीपासून ते अंतराळात झेप
घेणाऱ्या आधुनिक तरुणीपर्यंत तुकाराम महाराज यांचे विचार हे सर्वसमावेशक
आहेत. तुकाराम महाराज यांच्या गाथांतील तत्त्वज्ञान हे समाजातील सर्व
घटकांना न्याय देणारे असल्यामुळेच त्यांच्या गाथांना लोक पाचवा वेद म्हणू
लागले. जेव्हा तुकाराम महाराज यांच्या गाथांना लोक पाचवा वेद म्हणून लागले,
तेव्हा काही कर्मठ लोकांनी जाऊन तुकाराम महाराज यांना त्याबद्दल विचारले,
‘तुकाराम, तुम्ही काही संस्कृत पंडित नाही. त्यामुळे वेदांमधील तत्त्वज्ञान
तुम्हांला कळत नसेल. तरीही लोक तुमच्या गाथांना पाचवा वेद का म्हणतात?’
त्यावर
तुकाराम महाराज यांनी दिलेले उत्तर फार महत्त्वाचे आहे. तुकाराम महाराज
म्हणाले, ‘तुम्ही वेदाचे पठण केले असेल, वेदाचे पूजन केले असेल, वेदाचे
पारायण केले असेल, मात्र वेदाचा खरा अर्थ मी समजून घेतला आहे.’
महाराज लिहितात -
वेदाचा अर्थ आम्हाशीच ठावा । ऐरानी वाहावा भार माथा ॥
खादल्याची गोडी देखिल्यासी नाही । भार धन वाही मजुरीचे ॥
तुकाराम
महाराज सांगतात की, वेदाला खरे मीच समजून घेतले आहे. तुम्ही नुसत्या
मिरवणुका काढल्या असतील. ओझे वागविण्याशिवाय तुमच्या पदरात काहीच पडलेले
नाही. किंबहुना अर्थ न समजून घेता केलेले पाठांतर किंवा पूजन असेल तर
तुकाराम महाराज म्हणतात, एखादा पदार्थ खाल्ल्याशिवाय जशी त्याची चव कळत
नाही, तसेच जोपर्यंत अर्थ कळत नाही, तोपर्यंत त्या पाठांतराला काही अर्थ
नसतो.
यासाठी तुकाराम महाराज दृष्टान्त देतात. एखाद्या माणसाकडे
असलेले धन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तो एखाद्या
मजुराच्या डोक्यावर ते धन देतो. ते धन जरी मजुराच्या डोक्यावर असले तरी
त्याचा लाभ त्या मजुराला होत नाही. तसे वेदाचे पाठांतर करणे म्हणजे केवळ
हमालाप्रमाणे ओझे वागविण्यासारखे आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, मी
वेदाचे नुसते पाठांतर केले नाही, त्याचा अर्थ समजून घेतला आहे. अर्थ समजला
पाहिजे... नाहीतर आपणही जन्मभर भजन करतो. अभंगही भजनात, कीर्तनात म्हणतो,
पण कित्येकदा आपण त्याचा अर्थ समजून घेत नाही. आमच्या गावात एक बाबा भजनाला
यायचे. त्यांना अभंग म्हणा म्हटले की, आपला एकच ठरलेला अभंग म्हणायचे...
तोही सरळ नाही...
धन्य आजी दिन संत दर्शनाचा । अनंत जन्मीचा सीण गेला ॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्याचे ॥
अभंगाचा शेवटचा चरण काय आहे?
एका जनार्दनी घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग जन्मोजन्मी ॥
पण आमचे बाबा शेवटपर्यंत कधीच आहे तसे चरण म्हणाले नाहीत... बाबा म्हणायचे-
एका जनार्दनी घडो त्यांचा संग । न यावा योग जन्मोजन्मी ॥
अर्थात
अभंगाच्या गायनातही आपल्याला खूप वेळा शब्दांची मोडतोड केलेली पाहायला
मिळते. त्यामुळे अनेकदा मूळ अर्थाला धक्का लागतो. परंतु अर्थापेक्षाही अनेक
गायक मंडळींना त्यांचा राग आणि ताल महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे अनेकदा
कीर्तनात चाल म्हणताना अभंगाची मोडतोड केली जाते.
परवाच मी एका कीर्तनाला अभंग घेतला होता -
तुम्ही संत माय-बाप कृपावंत । काय मी पतित कीर्ति वाणू ॥
अवतार तुम्हा धराया कारण । उद्धराया जन जड जीव ॥
दोन
गायक आले. त्यांनी चाल म्हणायला सुरुवात केली. अर्थातच गायक हे खूप चांगले
होते. त्यांनी ठायीची चाल काढली... आता आपल्याला माहीत आहे की, ठायीची चाल
ही झटके दिल्याशिवाय म्हणता येत नाही... ते म्हणू लागले...
तुम्ही संत मा... यबाप कृपा वंत ।
चांगला
राग काढला होता, त्यांचा तालही चांगला होता, मात्र त्या गाण्याच्या
मात्रांमध्ये त्यांना माय आणि बाप स्वतंत्र शब्द बसविता येत नव्हते.
त्यामुळे ‘तुम्ही संत मा... यबाप’ असा त्याचा उच्चार होत होता. तेव्हा मी
त्यांना मध्येच थांबविले आणि म्हणालो की, ‘बाबांनो, तुमचा आवाज खूप गोड
आहे. रागही चांगला काढला आहे. पण पूर्ण ‘माय’ म्हणा आणि पूर्ण ‘बाप’
म्हणा..."
त्यावर ते गायक म्हणाले, ‘महाराज, तसं जमणार नाही.’
मी म्हणालो, ‘का जमणार नाही?’
तर ते म्हणाले, ‘माय तालात बसत नाही आणि बाप टाळीत बसत नाही!’
मग मला सांगा, असे किती दिवस अभंग गायन केले म्हणजे त्याचे परिणाम दिसू लागतील?
तुकाराम
महाराज म्हणतात, मी वेदाचे केवळ पाठांतर केलेले नाही. वेदाचे केवळ पूजन
केले नाही. तर त्याचा अर्थ समजून घेतला. तुकाराम महाराजांनी वेद समजून
घेतला. त्यात सर्व समाजघटकांना सामावून न घेण्याचे जे उणेपण होते ते दूर
केले आणि सर्व समाजाला उपयुक्त ठरेल अशा गाथांची निर्मिती केली. म्हणून
त्यांच्या गाथांना पाचवा वेद म्हणतात. तुकाराम महाराज यांनी सर्वसामान्य
माणसाला जगण्याचे बळ देणारा ‘पाचवा वेद’ निर्माण केला, म्हणूनच मी त्यांना
‘वेदशास्त्र पंडित’ अशा प्रकारचे संबोधन वापरले आहे.
(लेखक हे प्रसिद्ध कीर्तनकार असून त्यांच्या ‘उजळावया आलो वाटा’ या कीर्तनसंग्रहातून हा लेख घेतला आहे.)
No comments:
Post a Comment