-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे
॥१॥
वारकरी पंथात
गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मानला
जातो. गुरु शिवाय साधकाला ईश प्राप्ती होऊच शकत नाही, अशी संप्रदायाची
धारणा आहे.
ज्ञानदेवांची गुरुपरंपरा आदिनाथ शंकरापासुन सुरु होते.
मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर अशी ही परंपरा
आहे. या परंपरेचे मुळ शिवोपासक नाथपंथात आहे. बारकाईने विचार केला तर
ज्ञानदेवादी भावंडे संन्यास, भ्रमण, उपासना ई. नाथपंथीय नियम काटेकोरपणे
पाळताना दिसतात. अगदी समाधी घेताना सुद्धा ज्ञानेश्वरीत ज्ञानदेवांनी
वर्णिल्याप्रमाणे निगुढ मठ वा शिवालयाजवळच या चारही भावंडांनी समाधी घेतली
आहे.
तुकोबांची गुरुपरंपरा निळोबांनी एका अभंगात वर्णन केली आहे.
"मुख्य महाविष्णु चैतन्याचे मुळ । संप्रदाय सकळ तेथोनिया।।". या
अभंगाप्रमाणे पुढील परंपरा आहे.
१. महाविष्णु
२. ब्रम्हा
३. नारद
४. व्यास
५. राघवचैतन्य
६. केशव चैतन्य
७. बाबाजी चैतन्य (बाबाजी व केशव एकच असाही एक मतप्रवाह आहे.)
८. तुकोबाराय तथा तुकोचैतन्य
९. निळोबा पिंपळनेरकर
पुढे
ही परंपरा बहिणाबाई, शंकरस्वामी, मल्लप्पा वासकर अशी दिसते. पैकी वासकर फड
परंपरेत तुकोबांना गुरुस्थानी मानून त्यांच्या कीर्तनात अनेकदा
तुकारामांचा भजन व घोषाद्वारे जयघोष करतात.
तुकोबांना वयाच्या
२४व्या वर्षी म्हणजे इ.स. १६३२ मध्ये गुरुपदेश झाला. गुरुपदेश कोठे झाला व
कोणाकडुन झाला याविषयी महाराष्ट्रातील विचारवंतांमध्ये अनेक मतमतांतरे
आहेत. स्वतः तुकोबा, निळोबा, महिपती, बहिणाबाई, कृष्णदास बैरागी
(धर्माधिकारी), बहिणाबाई शिष्य आदींच्या वाङ्मयावरून निष्कर्षाप्रत जावे
लागते.
सत्य गुरुराये कृपा मज केली। परि नाही घडली सेवा काही ।।१॥
सापडविले वाटे जाता गंगास्नाना। मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥२॥ भोजना मागती
तूप पावशेर। पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥ काय कळे उपजला अंतराय। म्हणोनिया
काय त्वरा झाली ॥४॥ राघव चैतन्य केशव चैतन्य। सांगितली खुण मालिकेची ॥५॥
बाबाजी आपुले सांगितले नाम। मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥६॥ माहो शुद्ध दशमी
पाहूनि गुरुवार। केला अंगिकार तुका म्हणे ॥७॥
या अभंगात तुकोबांनी
आपली गुरुपरंपरा व गुरुपदेश याविषयी भूमिका मांडली आहे. वरील अभंगात
स्वप्नात गुरुपदेश झाल्याचे सांगतात. अन्यत्रही एके ठिकाणी 'मानियेला
स्वप्नी गुरुचा उपदेश। * असाच भाव व्यक्त करतात. यावरुन त्यांना गुरुंनी
स्वप्नात येऊन अनुग्रह दिला. रामकृष्णहरि या मंत्राचा उपदेश केला. आपली
परंपराही त्यांनी सांगितली आहे. अलिकडील विद्वानांना प्रश्न पडेल की,
तुकोबांना स्वप्नात कसा काय उपदेश होऊ शकतो? एवढ्या सगळ्या गोष्टी स्वप्नात
कशा घडु शकतात? याचे उत्तर असे की, स्वप्न ही एक मनोवैज्ञानिक अवस्था आहे.
"तुकोबांच्या अभंगांची मानसशास्त्रीय चिकित्सा या विषयावर
मुंबईविद्यापीठात पीएच. डी. साठी संशोधन झाले आहे. "सिध्दांतबिंदू" या
ग्रंथातही जागृती, स्वप्न, सुषुप्ती असे तीन प्रमुख प्रकार वर्णन केले
आहेत. पैकी,
१. जागृती जागृती
२. जागृती स्वप्न
३. जागृती सुषुप्ती
४. स्वप्न स्वप्न
५. स्वप्न जागृती
६. स्वप्न सुषुप्ती
७. सुषुप्ती स्वप्न
८. सुषुप्ती जागृती
९. सुषुप्ती सुषुप्ती
असे
नऊ प्रकार सिद्धांतबिंदू ग्रंथात वर्णन केले आहेत. यापैकी स्वप्नजागृती या
अवस्थेत तुकोबांना अनुग्रह झाला आहे. राजा हरिश्चंद्र, मंदोदरी, विठ्ठलपंत
आर्दीच्या स्वप्नकथा या देशात प्रिय आहेत. यांची स्वप्न खरी झाल्याचे
लोककथा वा ग्रंथात दाखले आहेत. तुकोबा निद्रेत असताना लिंगदेहाने गुरु येऊन
उपदेश करुन गेले, याचे काही पुरावे पाहू या.
१. भोजना मागती तुप पवशेर। पडीला विसर स्वप्नामाजी।।३॥ (तु.म)
२. बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला। अनुग्रह दिला निजप्रीति ॥ ७ ॥ (निळोबाराय)
३. मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश। धरिला विश्वास दृढनामी ।। (तु.म.)
वरील अभंगांवरुन हेच सिद्ध होते की, महाराजांना स्वप्नात गुरुपदेश झाला आहे.
गुरुपदेश ओतुरास की भंडाऱ्यावर?
तुकोबांना
स्वप्नात गुरुपदेश झाला हे मान्य पण गुरुभेट कोठे झाली? याविषयी धांडोळा
घ्यावा लागेल. तुकोबांना भंडाऱ्या डोंगरावर स्वप्न जागृती अवस्थेत उपदेश
झाला. अनूग्रहानंतर तुकोबा उत्तमापुर म्हणजे आजचे ओतुरला येऊन गेले. कारण
प्रस्तुत सत्यगुरुराये कृपा मज केली।' हा अभंग गुरुभेटीनंतर स्फुरला असे
म्हणावयासही वाव आहे. गुरुपदेशानंतर मला कवित्व स्फुरले हे तुकोबा एका
आत्मनिवेदनपर अभंगात वर्णन करताना म्हणतात की,
मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश। धरिला विश्वास दृढ नामी ॥१४॥
यावरी झाली कवित्वाची स्फुर्ति। पाय धरिले चिती विठोबाचे ॥ १५॥ (तु.गा.)
या
चरणातील 'यावरी' हा शब्द महत्वाचा आहे. गुरुपदेश झाल्यावर तुकोबा
प्रत्यक्ष गुरुभेटीसाठी उत्तमापुरला (ओतुर) आले. याचे पुरावे या गावातच
सापडतात.
पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात ओतुर हे गाव आहे. ओतुरला
तुकोबा देहून चाकणमार्गे आले असावे. कारण पुर्वाश्रमी ते व्यापार करायचे
तेव्हा मीठ नेण्यासाठी जुन्नर या व्यापारी पेठेत येऊन गेल्याचे पुरावे
सापडतात. मांडवी व पुष्पावती नदीकाठी चैतन्य परंपरेचे साधनास्थळ असल्याने
ते उत्तमापुरी आले. पायी प्रवास असल्याने पोहचायला उशीर झाला. गावात पोहचले
तेव्हा अंधार झाला होता. म्हणुन ते जानु तेल्याकडे विचारपुस करु लागले की,
इथे चैतन्यांचा आश्रम कोठे आहे. तेव्हा गावातील लोकांनी त्यांना सांगितले
की गावापासुन सुमारे मैलभर दूर कपर्दिकेश्वराजवळील मठात एक साधू राहतात, पण
पुढे निर्जन, घनदाट आरण्य आहे त्यामुळे आपणाह श्वापदांपासुन धोका आहे. तरी
आपण रात्रीचा मुक्काम गावातच करा व पहाटे उठुन साधूना भेटायला जा. म्हणून
तुकोबा रात्री गावातच जानु तेल्याच्या घरी थांबले. प्रश्न असा की, जानु
तेल्याकडंच का थांबले? कारण तुकोबांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक संताजी
महाराज जगनाडे हे सदुंबऱ्याचे होते. संताजीमहारांजे व्याही हे जानु तेली
होते. या ओळखीने ते पेठेतील तेल्याच्या घरात मुक्कामी राहिले. (यास पुरावा
म्हणजे आजही जानुतेल्याची पडक्या घराची बखळ ओतुरमध्ये आहे. तिचा ताबा
पुर्वी उल्हास शंकर डुंबरे यांच्याकडे होता आता ती बखळ पांडुरंगबोवा
घाटकरांच्या मुलाच्या ताब्यात आहे. आजही तिथं तुकोबांच्या पादुका आहेत.
तेथे नित्यनेमाने तेली मंडळी दिवाबत्ती, पूजा करतात. चैतन्यांची पालखी
पंढरीकडे प्रस्थान ठेवताना या ठिकाणी थांबते व संतपर अभंग घेऊन महाराजांना
वंदन केल जाते.)
पहाटे तुकोबा उठुन चैतन्यांच्या भेटीसाठी गावच्या
उत्तर दिशेला मठाकडे निघुन गेले. "सापडविले वाटे जाता गंगास्नाना। मस्तकी
तो जाणा ठेविला कर ॥" मला वाटतं संपुर्ण अभंगाकडे एककालिक, व एकस्थल घटीत
घटना म्हणुन पाहू नये. तुकोबा स्नानाला पहाटे ऋषिमुहूर्तावर चालले होते.
स्नान केल्याशिवाय गुरुंना कसे भेटतील? म्हणुन स्नानाला चाललो असताना मला
गंगावाटेवर त्यांनी सापडविले, ही घटना ओतुरची वाटते. कारण कपर्दिकेश्वराकडे
वाटेत गंगावाट म्हणुन एक मांडवी नदीकडे जाणारी खोलवाट आहे. (सध्याच्या
गाडगे म. विद्यालयाशेजारील वाट. या वाटेवर चैतन्य महाराजांनी तुकोबांना
सापडविले व प्रत्यक्ष अनुग्रह दिला. कारण याच ठिकाणी पुढे तुकोबांचे एक
मंदीर बांधले, ते जीर्ण मंदीर या गंगावाटेवर आजही आहे. तुकोबा ओतुरला येऊन
गेल्याचे 'तुकारामांची गुरुपरंपरा' या ग्रंथात वा. सी. बेंद्रे हेही मान्य
करतात. चैतन्यांनी स्वप्नात जे पावशेर तुप मागितले होते, त्याचा स्वप्नात
विसर पडल्याची हळहळ तुकोबा व्यक्त करतात. हे पावशेर तूप घेऊन गुरुभेटीला
ओतुरास आले म्हणजे काय?' अध्यात्मशास्रात तूप म्हणजे स्नेहयुक्त अंतःकरण
असं नथुसिंगबोवा रजपुत यांनी आपल्या कीर्तनमाला या ग्रंथात सविस्तर नमुद
केले आहे. तुकोबा अंतःकरणाला तुपाची उपमा देतात. त्या अंतःकरणाचे मन,
बुद्धी, चित्त आणि अहंकार असे चार विभाग मानले जातात. पैकी पावभाग म्हणजे
चित्त होय. शिष्याच्या वित्ताचे अपहरण करणारे गुरु या जगात भरपुर आहेत, पण
चित्ताचं अपहरण करणारे सद्गुरु दुर्लभ आहेत. म्हणुन चैतन्यांना आपले चित्त
गुरुपदेशानंतर तुकोबांनी अर्पण केल्याचे अभंगांत ते वर्णनही करतात.
॥२॥ तुकोबांचे गुरु कोण?
वारकरी पंथात सर्वात कळीचा व संवेदनशील असा हा मुद्दा आहे.
राघव चैतन्य केशव चैतन्य। सांगितली खुण माळिकेची ॥ ५ ॥
बाबाजी आपुले सांगितले नाम। मंत्र दिला रामकृष्णहरि ॥ ६ ॥
या
कडव्यांमधुन तुकोबांनी आपली गुरुपरंपरा सांगितली आहे. वै. नथुसिंग बाबा
राजपुतांपासुन ते ल.रा. पांगारकर व्हाया वा. सी. बेंद्रे या सर्वांचे मते
राघवचैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य ही तीन भिन्न व्यक्तिमत्वे आहेत.
मात्र कृष्णदास बैरागी (जुन्नर), निरंजन स्वामी, आर्दीच्या मते बाबाजी
चैतन्य व केशवचैतन्य एकच आहे. प्रथमतः राघव चैतन्य चरित्र पाहू.
राघव चैतन्य चरित्र :-
सह्याद्री
पर्वतरांगेत मांडवी व पुष्पावती नद्या वाहतात. मांडव्य ऋषिंनी जेथे साधना
केली त्या मांडवे गावाच्या परिसरात या नदीचा उगम होतो. पराशरांची तपोभूमी
असलेल्या याच भूमीत पुष्पावती तथा कुसुमावती नदी वाहते. या दोन्ही नद्या
ओतुर पासुन अगदी चार एक कि.मी.च्या अंतरात एकमेकींना मिळतात. या संगम
परिसरात राघवचैतन्यांनी साधना केली. निरंजनबोवा नाशिककर यांच्या 'चैतन्य
विजय ग्रंथात राघवचैतन्य चरित्र आले आहे. निरंजन बोवांनी कृष्णदास बैरागी
(धर्माधिकारी) यांच्या 'चैतन्यकथा कल्पतरु'यांच्या ग्रंथाधारे शके १७०९
प्लवंग संवत्सर, कार्तिक शु. एकादशीला 'चैतन्य विजय' ग्रंथ लिहिला आहे.
मात्र कृष्णदास बैरार्गीच्या चैतन्य कथाकल्पतरु आधारे आपण लेखन केलेय, हेही
ते नमुद करतात.
कृष्णदास बैरागी परमभक्त। तेणे वर्णीला हा वृत्तांत। शके पंधराशे शहाण्णवात। ग्रंथपूर्ण पै जाला ।।१४१ ॥ (चैतन्य विजय) :-
याचा
अर्थ कृष्णदास बैरागींचा ग्रंथ इ.स. १६७४ व निरंजन बोवांचा ग्रंथ इ.स.
१७८७ चा होय. शंभरएक वर्षात अशी काय आपत्ती आली की, मुळ ग्रंथ नष्ट
झाल्याने दुसरा ग्रंथ लिहावा लागावा? याविषयी नंतर सविस्तर चर्चा करु.
निरंजन बोवांचा चैतन्यविजय हा अगदी छोटेखानी ग्रंथ फक्त सहा अध्याय व ७६०
ओव्यांचा आहे. त्यात त्यांनी चैतन्य संप्रदायाची जी गुरुपरंपरा दिली आहे
त्यात राघव चैतन्य, केशव चैतन्य या दोघांचे चरित्र देऊन 'तुकोबा चैतन्य'
असे तुकोबांना संबोधिले आहे. या निसर्गरम्य परिसरात राघव चैतन्यांनी अतिशय
दृढ साधना केली. साधनेत देहाकडे त्यांचे भान राहिले नाही. सर्व आत्मभान
साधनेत रमल्यामुळे देह शुष्क झाला.
जाल्या नखांच्या चुंबळी । अंगावरी वाढली धुळी । जटा लोंबती भूतळी । देह शुष्क जाहला ।। :-
राघव
चैतन्यांची तपःश्चर्या पाहून व्यास मुनी त्यांना प्रसन्न झाले व ओतुर,
उदापुर या परिसरातच त्यांना अनुग्रह दिला. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय । 'हा
द्वादश अक्षरी मंत्र राघव चैतन्यांना व्यासांनी दिला. चंद्रासमसुंदर वदन।
जटा शोभती हेमवर्ण। सर्वांगी भस्म विराजमान। दिगंबर मूर्ति नेटकी ।।" असं
देखणं व भारदस्त रुप त्यांचं असल्याचं चैतन्यविजयात वर्णन आहे. पुढे याच
परिसरात त्यांनी साधना सुरु ठेवली. वै. नथुसिंगबाबा राजपुतही राघव
चैतन्यांना ओतुरासच अनुग्रह झाल्याचे नोंदवितात.
केशवचैतन्य :-
कर्नाटकातील तृणामल्ल (तिनेवल्ली) येथील नृसिंहभटांना तीन मुले-
१. त्र्यंबक
२. विश्वनाथ
३. बापू
यवनांच्या
स्वारीनंतर या तीन मुलांना व पत्नी आनंदीबाईंना घेऊन नृसिंहभट पुनवडी
म्हणजे आजच्या पुण्यात आले. तृणामल्लला हे कुटुंब प्राचीन शिवालयात शिवाची
पुजाअर्चा करुन चरितार्थ चालवायचे. कुळात शिवोपासना असल्याने ज्योतिर्लिंग
क्षेत्री यांचा संचार असे.
पुढे या तीनही मुलांची लग्न झाल्यावर
नृसिंहभट निवर्तले. त्यानंतर या तिनही पुत्रांमध्ये कलह सुरु झाले. त्यातील
विश्वनाथ हे खुपच धार्मिक व श्रध्दाळु होते. तुलनेत इतर दोघे व्यवहारी
होते. कुटुंब कलहामुळे विश्वनाथांनी घर सोडले व पत्नी गिरीजाबाई सोबत
तीर्थयात्रेला निघाले. नाशिक त्र्यंबकेश्वरी जात असताना ते एके दिवशी वाटेत
उत्तमापुर (ओतुर) येथे पोहचले. त्यांच्या सात्विक वृत्तीबद्दल निरंजनबोवा
लिहितात की,
बाबांची वृत्ती उदासीन। त्रिकाळ करावे संध्यास्नान। धर्मालागी उदारपूर्ण। गृहकृत्य काही करु नये ।।
योगायोगाने
राघवचैतन्यांची व विश्वनाथ बाबांची ओतुरास कपर्दिकेश्वरी भेट झाली.
राघवचैतन्यांच्या सेवेत ते रमु लागले. पुढे कालांतराने विश्वनाथ बाबांस
पुत्र झाला व तिथुन पुढे ते अधिकच विरक्त होत गेले. "वैराग्यचित्त शुद्ध
झाले। स्त्रीचे रिणही फिटले।" त्यामुळे एकेदिवशी सन्यासदीक्षा व अनुग्रह
देण्याची विनंती विश्वनाथ बाबांनी राघव चैतन्यांकडे व्यक्त केली. त्यानुसार
मांडवीकाठी ओतुरासच राघव चैतन्यांनी विश्वनाथ बाबांस उपदेश केला. विश्वनाथ
बाबांच्या दारिद्र्यामुळेही त्यांना वैराग्य आले असावे. संसारतापाने ते
त्रस्त होते. "कानी नाही बाळीबुगडी । मिळाली नाही लेणी लुगडी । सुख नाहीच
अर्धघडी । झाले याचे संगतीने ।" असं निरंजनबोवा नोंदवितात. शरण आलेल्या
विश्वनाथ बाबांना राघवचैतन्यांनी अनुग्रह दिल्यानंतर ते मांडवी,
पुष्पावतीकाठच्या जंगलात फिरत राहिले. नंतर हे गुरुशिष्य उत्तरेत
तीर्थयात्रेला निघुन गेले. व्दारका, काशी, प्रयाग, जगन्नाथपुरी आदि तीर्थे
करीत ते कर्नाटकातील गुलबर्गाला पोहचले. मुसळधार पाऊस सुरु झाल्याने ते एका
मशीदीत थांबले. आपले खडाव मशिदीच्या निजामस्थानी ठेवल्या. हे पाहून तेथे
आलेला मुल्ला चिडला. त्याने धर्म बाटवला म्हणुन या साधूची बादशहाकडे तक्रार
केली. बादशहाने त्यांना जाब विचारला असता, मशिदच आपल्याकडे आल्याचे
राघवचैतन्यांनी सांगितले. लोककथा अशी सांगितली जाते की, राघवचैतन्यांच्या
आदेशाने ती मशीद उडुन दीड कोसावर गावाबाहेर उभी राहिली. हे दोघे पीर पैगंबर
असावेत म्हणून बादशहाने आळंद गुंजोटीस चैतन्यद्वयींची भेट घेतली व शरणागती
पत्करली. पुढे हे दोघेही तेथेच बराच काळ थांबले. त्यांच्या स्मरणार्थ
बादशहाने दोन दर्गे बांधले त्यांना 'राघवदराज व केशवदराज' असे नाव दिले. या
दोघांनी काशीच्या विव्दानांनाही शास्त्रार्थात हरविले. म्हणुन त्यांच्या
स्मरणार्थ काशीच्या पंडीतांनी चैतन्यमठ स्थापन करुन यांच्या नावाने दोन
शिवलिंगे स्थापन केली होती. (या घटनेचे स्मरण म्हणुन आजही ओतुरहून
चैतन्यांचा पालखी सोहळा दरवर्षी महाशिवरात्रीस काशीला जातो.) पुर्वी
साधुच्या सन्मानार्थ शिवलिंग स्थापन करणे, दर्गे बांधणे या प्रथा होत्या हे
यावरुन सिध्द होते. आळंद गुंजोटीस पुढे राघव चैतन्यांनी समाधी घेतली. नंतर
तेथुन जवळच असलेल्या मान्यहळ या गावी केशवचैतन्यांनी मठ बांधला व ते तेथे
राहू लागले. काही दिवसांनी केशव चैतन्यांनी ओतुरकडे प्रस्थान ठेवले. नंतर
शिष्यांनी मान्यहळला त्यांच्या पादुका स्थापन केल्या असं चैतन्यविजय
ग्रंथात वर्णन आहे. राघव चैतन्यांची कृष्णावर अपार श्रध्दा होती म्हणुन
त्यांनी विश्वनाथ बाबांचे सन्यासग्रहणानंतर 'केशवचैतन्य' हे नाव ठेवले.
चैतन्यविजयात केशव चैतन्य व बाबाजी चैतन्य एकच आहे असं तिसऱ्या अध्यायात
वर्णन आहे.
'सर्वजन म्हणती केशव चैतन्य। भाविक म्हणती बाबाचैतन्य।
दोन्ही नामे एकचि जाण। अत्यादरे बोलती।। केशवचैतन्यांनी ओतुर येथे शके १४९३
प्रजापती संवत्सरी वैशाख व. व्दादशीस समाधी घेतल्याचे निरंजनबोवा
नोंदवितात. या चर्चेतुन काही निष्कर्ष व प्रश्न पुढे येतात.
१. व्यासांनी ओतुरासच राघवचैतन्यांना अनुग्रह दिला
२. राघवचैतन्यांनी केशवचैतन्यांनाही ओतुरास अनुग्रह दिला
३. तुकोबांनाही प्रत्यक्ष गुरुभेट ओतुरलाच घडली.
मग
प्रश्न असा पडतो की! बाबाजी चैतन्य हे तिसरे मानले तर ते कुठुन आले? केशव
चैतन्यांनी बाबाजींना कोठे उपदेश केला? याबाबत पांगारकर, वा. सी. बेंद्रे,
यांपासुन ते वै. नथुसिंगबोवा राजपुतांपर्यंत कोणीच स्पष्ट मत मांडत नाही.
दुसरा प्रश्न असा की, मान्यहाळ येथे केशव चैतन्यांच्या भक्तांनी मठात
पादुका ठेवुन सेवा सुरु केली. मग मान्यहाळची समाधी केशव चैतन्यांची का
नसावी? कारण त्या नंतर खुप वर्षांनी तुकोबांना अनुग्रह झालाय. आजही
मान्यहाळ वरुन पंढरपुरला दरवर्षी चैतन्यांची पालखी येते. अपल्याकडे साधुना
बाबा म्हणतात. अमराठी प्रांतात 'जी' हे प्रत्यय लावतात. म्हणुन कर्नाटकात
केशव चैतन्यांना आदरार्थी 'बाबाजी चैतन्य' असे का संबोधित केले नसेल? कारण
त्यावेळी तेथे मुस्लिम राजवट होती. हिंदी, उर्दूचा प्रभाव असल्याने त्यांना
बाबाजी का संबोधले नसेल? हाही प्रश्न अनुत्तरीतच राहतो. शाहू कालिन
कालखंडात चैतन्यांच्या समाधी मंदीराच्या बाजुस ओतुरला पाणभिंत मांडवी
किनारी बांधली आहे. तत्कालिन कागदपत्रातही" संन्याशाच्या समाधीस धक्का लावु
नये" असा आदेश देऊन छ. शाहूंनी या स्थळावर खर्च केल्याचे गॅझेटमध्ये
पुरावे उपलब्ध आहेत.
तुकोबांनीच आपली अध्यात्मिक वाटचाल कशी होत
गेली? हे एका अभंगात नोंदवलंय..., शिष्याची पृष्ठभूमी अशी तयार व्हावी
लागते. ऊदा. आरंभी कीर्तन करी एकादशी। देवाचे देऊळ होते जे भंगले। काही पाठ
केली संतांची उत्तरे। आदी प्रमाणे पहावित.
'काय मी उद्धार पावेन । काय कृपा करीन नारायण। ऐसे तुम्ही सांगा संतजन । करा समाधान चित माझे।"
अशी जिज्ञासा निर्माण झाली की सद्गुरु स्वतः येऊन शिष्याचा अंगिकार करतात.
शिष्याला
लुबाडणाऱ्या तथाकथित गुरुंचा तुकोबांनी ठायी ठायी समाचार घेतलाय.
शिष्याच्या विताचं अपहरण करणारे गुरु खुप आहेत पण शिष्याच्या चिताचं अपहरण
करणारे सद्गुरु दुर्मिळ आहेत.
वाट पहावी लागत नाही. आंबा पाडाला
लागल्यावर पोपटाला निमंत्रण देत नाही. उलट पोपटच शोधत येतो. तसं शिष्याची
योग्य अवस्था झाली की गुरु स्वतःहून येतात. तुकोबा गुरुंना शोधायला निघाले
नाही. ते म्हणतात मी गंगास्नानाला निघालो असता ते मला वाटेत शोधत आले.
"सापडविले वाटे...., "असा शब्दप्रयोग आहे.
‘सत्यगुरुराये कृपा मज केली’ याचा तीन प्रकारे अर्थ लावावा लागेल
१. गुरुंनी माझ्यावर कृपा केली हे सत्य
२. माझ्यावर जी कृपा केली ती सत्य
३. सत्य हे विशेषण मानुन.... माझ्यावर कृपा केली ते सत्य गुरुराज होय
कृपा ही,
१. संकल्पकृपा
२. नेत्रकृपा
३. स्पर्श कृपा
४. मंत्रकृपा
या प्रकारांनी सद्गुरु शिष्याला अनुग्रह देतात. उदा.
१. कृपा कटाक्ष न्याहळिले। आपुले पदी मग बैसविले ।....
२. लावोनिया हात कुरवाळीला माथा -स्पर्शकृपा आहे
३. आवडीचा मंत्र सांगितला सोपा। सांगितले चिंता न करावी । -मंत्रकृपा
४. माझिये मनिचा जाणोनिया भाव। तो करी उपाव गुरुरावो।। -सकल्पकृपा
वरील चारही प्रकार तुकोबांना अनुभवायला मिळाले. शक्तिपातातही हिच चार माध्यमे वापरुन दिक्षा दिली जाते.
हरि शब्दात हृ हा धातु आहे. हृ हरति । म्हणजे भक्ताच्या ठिकाणचे पाप तो हरण करतो..... तोच कृष्ण होय.
राम शब्द उच्चारताना उच्छवास = रा
म = ओष्ठ्य व्यंजन
बाहेर टाकलेले पाप परत आत येऊ देत नाही.. राम उच्चार
रामाचा आचार
कृष्णाचा विचार
आणि हरिचा उच्चार
‘रामकृष्णहरि’
राम रमयंती । कृष्ण कर्षती । हरि हरती ।।
सद्गुरुकडे
जायचे तर विकार, मल घेउन कसे जाऊ शकतो? गुरुभेटीला जाण्यापुर्वी आमच्या
अंतरंगातील मळ ज्ञानगंगेत स्नान करून धुवुन टाकला तरच सद्गुरु स्वकारतील.
अंतरंगात षडविकारांची दुर्गंधी असेल तर गुरुकडे कसं पोहचु शकतो. "जो
आत्मतीर्थे न्हाणिला।... "या आशयाची एक ओवी ज्ञानेश्वरीत आहे. आत्मतीर्थात
स्नान म्हणजे गंगास्नान....या प्रयत्नात असताना मला स्वतः सद्गुरु शोधित
आले व अनुग्रह देऊन माझा उद्धार केला.
भोजना मागती तूप पावशेर। पडिला विसर स्वप्नामाजी।
चैतन्य
महाराजांना काय कमी होतं? ते शिष्याकडं पहिल्या भेटीतच तूप मागतात? आपण
"मन चंगा तो कठौतीमें गंगा।" म्हण वापरतो ना? मन गंगाजळासरखं निर्मल असंल
तर कशाला हवंय लौकिक गंगास्नान? तुकोबा संतांचं वर्णन करताना म्हणतात,
सर्वांग निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ।।
अशा
संतांच्या केवळ दर्शनाने त्रिविध ताप नष्ट होतात. (तु.म.) अंतःकरण हे
स्नेहयुक्त आहे. याचे चार भाग आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार यापैकी
पावभाग म्हणजे "चित्त" मागितले. कारण, शरीरात - पित्त, संसारात - वित्त,
परमार्थात - चित्त हवे असते. म्हणुन चैतन्यांनी भोजनासाठी चित्त मागितले पण
तुकोबा म्हणतात मला स्वप्नात विसर पडला. महाराज म्हणतात की, काय अंतराय
उत्पन्न झाला कोणास ठाऊक? त्यांनी जाण्याची घाई केली. मात्र आपली
गुररुपरंरा सांगितली की, राघवचैतन्य, केशवचैतन्य ही आपली मालिका असुन माझे
नाव बाबाजी आहे.
त्यांनी मला "रामकृष्ण हरि" हा मंत्र दिला. तो दिवस माघ शु. १० गुरुवार पर्वकाळ होता. माघ या शब्दाचा अर्थ होतो,
मा+अघ = माघ
माझे
अघ म्हणजे पाप नाहिसे करणारा म्हणजे माघ होय. दशमी याचा अर्थ डॉ. मोहरीर
सरांनी सांगितल्याप्रमाणे ‘पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये’ ही शुध्द
फक्त गुरुकृपेनेच होतात म्हणुन "पाहोनि गुरुवार" अशा पर्वकाळी महाराजांचा
अंगिकार चैतन्यांनी केला. यासाठी हे बोलणी । अनुभवामृतपणी। स्वानुभुतीची
मेजवानी। आत्मानुभव जनी केली ।। अ.
॥३॥ अनुभव
गुरुपरंपरेविषयी विवाद्य स्थळे :-
तुकोबांच्या गुरुपरंपरेविषयी प्रमुख चार विवाद्य विषय चर्चिले जातात.
१. तुकाराम महाराजांचे गुरु केशव चैतन्य की बाबाजी चैतन्य?
२. बाबाजी व केशव चैतन्य एकच की भिन्न व्यक्ती?३. ओतुरला जी समाधी आहे, ती केशव चैतन्यांची की बाबाजी चैतन्यांची?
४. बंगालच्या कृष्णचैतन्यांनी तुकोबांना बाबाजींच्या रुपाने अनुग्रह दिला काय?
वरील
वादासंबंधी वै. नथुसिंग भीमसिंग राजपुत यांनी सविस्तर मीमांसा ‘कीर्तनमाला
भाग ३’मध्ये केली आहे. याशिवाय वा. सी. बेंद्रे यांनी 'तुकारामांची
गुरुपरंपरा' यविषयी स्वतंत्र ग्रंथाव्दारे भूमिका मांडली आहे. ठाणे जिल्हा
न्यायालयात डी. के. राजर्षि विरुध्द वा. सी. बेंद्रे या खटल्यातही वा. सी.
बेंद्रे यांच्याबाजूने कोर्टाने निर्णय दिलेला आहे. निळोबाराय पिंपळनेरकर,
बहिणाबाई, बहिणाबाईंचे शिष्य दिनकर कवी, रंगनाथ स्वामी, महिपती, तसेच देहू
येथील बाड या सर्वांचा धांडोळा घ्यावा लागतो. ल. रा. पांगारकर, केळुसकर,
डॉ. सदानंद मोरे, डॉ. किशोर सानप यांनीही याविषयी ओघात मतं मांडली आहेत.
जुन्नरचे कृष्णदास बैरागी (धर्माधिकारी) यांनी सन १६७४मध्ये 'चैतन्य
कथाकल्पतरु' नामक ग्रंथ लिहीला होता. या ग्रंथाची एक प्रत त्यांनी इ.स.
१६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक समयी भेट दिली. पुढे
औरंगजेबाच्या हल्ल्यात रायगडावरील दफ्तरखाना नष्ट झाला. त्यात हा ग्रंथ
नष्ट झाला असावा. परंतु याची दुसरी प्रत कृष्णदास बैरागींच्या नंतर उपलब्ध
झाली नाही. नाशिकचे निरंजन स्वामी यांनी याच ग्रंथाधारे 'चैतन्य विजय' नामक
ग्रंथ लिहीला आहे. तो फारच अलिकडील आहे. नव्वदोत्तर कालखंडात ओतुरचे प्रा.
वामनराव ओतुरकर यांनी 'चैतन्य महाराज चरित्र हा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला
आहे. याशिवाय कै.रं.वा.टण्णु यांच्या 'वैभवशाली जुन्नर तालुका'या ग्रंथातील
भूमिका, 'बाबाजी चैतन्य पालखी सोहळा स्मरणिका'या ग्रंथातही याविषयी चिंतन
सापडते. याशिवाय पुणे विद्यापीठात " जुन्नर तालुक्यातील वारकरी संत परंपराः
चिकित्सक अभ्यास या विषयावर डॉ. द.प्र डुंबरे यांनी जे संशोधन केले आहे,
त्यातही याविषयी माहिती मिळते. या सर्वाच्या भूमिकेची मीमांसा करुन या
वादावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करु या.
१. नथुसिंग महाराज राजपुत :-
वै.
नथुसिंग महाराज राजपुत हे वारकरी पंथात मोठेबाबा म्हणुन ओळखले जायचे.
नथुसिंग महाराज हे वै. विष्णुबोवा जोग, मारुतीबोवा ठोंबरे, शं. वा.
दांडेकर, मारुतीबोवा गुरव, लक्ष्मणबोबा ईगतपुरीकर, बंकटस्वामी यांच्याच
वारकरी शिक्षण संस्थेचे विचार पुढे नेणारे पंथिय प्रचारक जरी असले तरी
त्यांचा व्यासंग व एकुणच अभ्यास विलक्षण होता. म्हणुन 'कीर्तनमाला भाग ३'
मधिल नथुसिंग म.च्या विचारांची प्रथम दखल घ्यावी लागते.
नथुसिंग
महाराज निरंजन स्वामींच्या चैतन्य कथाकल्पतरु या ग्रंथाचा आधार घेऊन
राघवचैतन्य व केशवचैतन्य चरित्र स्पष्ट करतात. राघव चैतन्य, केशवचैतन्य
दोघांचीही अनुग्रहभूमी ओतुर आहे, यास त्यांचा विरोध नाही. पण चैतन्यविजय
ग्रंथातील "केशवचैतन्य हेच बाबाजी चैतन्य होत. "या निरंजन स्वामींच्या
भूमिकेला ते विरोध करतात. "सर्वजन म्हणती केशवचैतन्य। भाविक म्हणती
बाबाचैतन्य। दोन्ही नामे एकचि जाण। अत्यादरे बोलती ॥१॥ " या विधानाला
नथुसिंग म. विरोध करतात. त्यासाठी त्यांनी काही दाखले दिले आहेत. त्याची
मीमांसा करु या.
१. आपण साधारणतः दोन वंश सांगतो. पहिला मांस वंश व
दुसरा विद्यावंश. विद्यावंशात परंपरा सांगताना गुरु, गुरुणां गुरु,
परात्पर गुरु अशी म्हटली तर बाबाजी, केशव, राघव अशी परंपरा सांगावी लागते.
बालयोगी तथा स्वामी नारायणानंद या प्रकारची परंपरा अमान्य करीत. मी, माझे
वडील, माझे आजोबा अशी त्रयी ते मांडत. या न्यायाने तुकोबा, बाबाजी उर्फ
केशव, राघव अशी परंपरा बालयोगी मानतात. बेंद्रे मात्र बाबाजी, केशव व राघव
अशी त्रयी मानतात.
२. तुकोबांच्या वह्यांमध्ये ( देहूस त्यांच्या
वंशजांकडे जे बाड आहे) नथुसिंग राजपुतांना गाथेत जे नमन सापडले त्यात
नमनातच श्री राघवचैतन्य, श्री केशवचैतन्य, श्रीबाबाजी चैतन्य असाच उल्लेख
आहे. इंदूप्रकाश गाथेतही आरंभी या तिघांना नमन आढळते.
३.
गुरुपरंपरेच्या अभंगांत 'मुख्य महाविष्णु चैतन्याचे मुळ । 'हा निळोबाराय
पिंपळनेरकरांचा प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगात पुढील प्रमाणे निळोबाराय आपली
गुरुपरंपरा सांगतात.
"राघवचैतन्य केले अनुष्ठान। त्यासी व्दैपायाने कृपा केली।।४॥
राघवा चरणी केशव शरण। बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची ॥५॥"
या अभंगात राघव, केशव, बाबाजी अशी परंपरा दिसुन येते.
४.
तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई शिऊरकर यांच्या अभंगात पुढील चरण
सापडते, ".....। तेणे राघवी विचार ठेविलासे ॥७॥ केशव चैतन्य बाबाजी चैतन्य।
झालेसे प्रसन्न तुकोबाशी ॥ ८ ॥" नथुसिंगबोवांच्या मते केशव व बाबाजी एकच
असते तर दोन्ही नावांपुढे चैतन्य हे पद आले नसते. हा युक्तीवाद पटण्यासारखा
आहे कारण बहिणाबाई 'देवासी भांडण' यावरील २४व्या अभंगात म्हणतात की,
बाबाजीचे हाते तुकोबाचे ऋण । फेडविले जाण येणे खरे ॥
यावरुन बाबाजी हे परंपरेत तिसरे आहेत, हे सिद्ध होते.
५.
महिपती भक्तीलिलामृतच्या पाचव्या अध्यायातील २९७ व्या ओवीत म्हणतात की,
'राघवचैतन्य जगविख्यात । केशवचैतन्य महाभक्त । बाबाचैतन्य प्रसिध्द संत ।
ज्यांनी भक्तीपंथ स्थापिला ॥
महिपती सुध्दा तीन नामांचा उल्लेख
करतात. केशव हेच बाबाजी असा उल्लेख करत नाहीत. यावरुन महिपतींच्या मते
राघवचैतन्य, केशवचैतन्य, बाबाजी चैतन्य हे तिघेही भिन्न असावेत असा
निष्कर्ष निघतो.
६. बहिणाबाईंचे शिष्य दिनकवींचा दाखला नथुसिंगबोवा
राजपुत देतात. ती ओवी अशी, "राघो चैतन्यभरी । केसोचैतन्य पूर्ण लहरी। बाबा
चैतन्यापरी। तेचि ते लाधली ॥ २८ ॥" दिनकर कवीही तीन गुरुशिष्यांची परंपरा
सांगतात.
७. निरंजन स्वामी दोघांची परंपरा सांगतात, पण रंगनाथ
स्वामी तिघांचा उल्लेख करतात. त्यांनी संत मालिकेत राघवचैतन्य, केशवचैतन्य,
बाबाजीचैतन्य, तुकोबाचैतन्य अशी संतमालिका वर्णिली आहे.
८.
नथुसिंगबोवांनी देहकरांकडे ज्या जुन्या पोथ्यांचा शोध घेतला त्यातही राघव,
केशव, बाबाजी, तुकोबा अशीच परंपरा त्यांना दिसुन आली. विशेष म्हणजे ही बाडे
हस्तलिखीत असून महाराजांच्या वंशजांकडे बोवांना मिळालीत, त्यामुळे बोवांचे
मत नाकारता येत नाही.
९. वा. सी. बेंद्रे यांनी 'तुकारामांची
गुरुपरंरा' या विषयावर स्वतंत्र ग्रंथाद्वारे चर्चा मांडली आहे.
तुकारामांचे गुरु बाबाजी चैतन्यच आहेत, पण बाबाजी व केशव हे दोघे भिन्न
पुरुष असल्याचे बेंद्रे नोंदवितात. याशिवाय तुकोबांच्या अनुग्रहापुर्वी
सुमारे शंभरएक वर्षे पुर्वीच केशव चैतन्य समाधिस्त झाल्यामुळे तुकोबांना
नंतर फक्त स्वप्नात गुरुपदेश झाल्याचे बेंद्रे नाकारतात. कारण तुकोबा
स्वप्नउपदेशानंतर ओतुरला गुरुभेटीला येऊन गेल्याचे बेंद्रेही मान्य करतात.
याचा अर्थ ते तुकोबांना बाबाजींनीच अनुग्रह दिला व बाबाजी व केशव भिन्न
पुरुष असल्याचे बेंद्रेही मानतात.
१०. ओतुरचे कै. डी. के. राजर्षि
हे आमदार होते. हे राजर्षि कुटुंब अलिकडील शतकात पुण्याहून ओतुरला स्थायिक
झाले आहे. ते स्वतः चैतन्यांचे वंशज असल्याचे सांगतात. त्यांनी वा. सी.
बेंद्रे यांच्याविरुद्ध ठाणे येथील न्यायालयात दावा दाखल केला होता. केशव व
बाबाजी चैतन्य एकच आहेत असा राजर्षिचा दावा वा. सी. बेंद्रे यांनी कसा
चुकिचा आहे, हे सिद्ध करुन दाखविले आहे. राजर्षि केस हरले आहेत, म्हणुन तर
त्यांनी स्वतः ट्रस्टी असलेल्या ओतुरच्या मंदिरात 'केशव चैतन्य समाधी
मंदीर' असा फलक लावला आहे. वा. सी. बेंद्रे यांनी राजर्षिचा ब्राम्हणी
बुरखा फाडुन खरि चेहरा जगा समोर आणला. दुर्दैवाने त्याच कालखंडात ओतुरचे
मा.आ. कै. श्रीकृष्ण तांबे निवर्तले. नंतरच्या कालखंडात राजर्षिना जाब
विचारणारे ओतुरमध्ये नेतृत्व उदयास आले नाही.
११. ओतुरचे सुमंत
महाराज नलावडे हे महाराष्ट्रातील ख्यातकिर्त किर्तनकार होय. ते ही
निरंजनबोबांच्या 'चैतन्य विजय मधील आक्षेपार्ह लिखाणाबद्दल शंका घेतात.
१२. डॉ. सदानंद मोरेही तुकोबांचे गुरु बाबाजी चैतन्यच असल्याचे नोंदवितात.
१३.
अलिकडील कालखंडात तुकोबांवर अभ्यासपूर्ण मांडणीतून समग्र तुकाराम दर्शन
घडविणारे डॉ. किशोर सानपही बाबाजी, केशव, राघवचैतन्य अशी परंपरा मानुन
बाबाजी हेच तुकोबांचे गुरु असल्याचे नोंदवितात.
१४. ओतुर परिसरातील लोककथांवरुन ओतुर येथे बाबाजी चैतन्यांची समाधी असल्याचे दिसते. लोकगीतांतही तसे दाखले दिसुन येतात.
१५.
प्रा. वामनराव ओतुरकरांचा चैतन्यांवर स्वतंत्र ग्रंथ आहे. त्यात त्यांनी
गॅझेट मधील पुरावे देऊन ओतुरला बाबाजी चैतन्यांचीच समाधी असल्याचे मत
नोंदविण्याचा प्रयत्न केला आहे.
२. निरंजनस्वार्मीचा चैतन्यविजय प्रमाण मानावा का?
चैतन्य
परंपरेवर मुळ लेखन जुन्नरच्या कृष्णदास बैरागींनी केले होते. परंतु
त्यांचा ग्रंथ नष्ट केला की झाला हा संशोधनाचा विषय आहे. कारण जुन्नरला
शंकराचार्यासहित सर्वांनाच वादविवादात हरविणाऱ्या शूद्रवंशी शाहिर गोविंद
भागवतांचा 'गोविंदरावी' हा ग्रंथ जुन्नरच्या ब्राम्हणांनी जाळुन टाकला.
कारण काय तर शूद्रांना संस्कृत वेदांतावर भाष्य करण्याचा अधिकार नाही.
(जाणकारांनी रं.वा.टण्णू यांचे लेखन मुळातुन वाचावे.) या पार्श्वभूमीवरच
"चैतन्यविजय'चे नाट्य घडतेय. त्यामुळे चैतन्य समाधी मंदीराला स्थानिक
ओतुरकर शेतकऱ्यांनी दान दिलेली जमीन व मालमत्ता हडप करण्यासाठी राजर्षिनी
निरंजनबोवांकडुन जे चरित्र लेखन घडवुन आणले त्यात काही घटना कावेबाज व
धूर्तपणे घुसडल्यात हे वा. सी. बेंदेंनी सिध्द करुन दाखविले आहे. एखादा संत
जगन्मान्य झाल्यावर त्या संत पुरुषाच्या नावावर दान मिळणारी मालमत्ता
कुटुंबाची वैयक्तिक मालकी कशी होऊ शकते? राजर्षिनी तर हव्यासापोटी
स्वतःच्या कुटुंबियांच्या नावे ट्रस्ट स्थापन करुन देवस्थानच्या
कोट्यावधीच्या मालमत्तेवर कब्जा मिळवला आहे. त्यामुळे बेंद्रेच्या
म्हणण्याची सत्यता पटते की, चैतन्यविजय हा ग्रंथ विवाद्य आहे.
३. राजर्षिचा अहंकार :-
ओतुरचे
समाधी मंदीर हे दगडी चौथऱ्याची समाधी नाही. ते समाधीवर वाढलेले मातीचे
वारुळ आहे. सन २०१५ पर्यंत या समाधी मंदीरात सर्वांना मुक्त प्रवेश व
स्पर्श दर्शन खुले होते. अलिकडे राजर्षिच्या मनात उच्चनीचतेचा प्रभाव
वाढला. त्यांनी समाधीपुढे एक लोखंडी गेट बसवून फक्त दुरुन दर्शन प्रथा सुरु
केली. फक्त त्यांच्या संमतीने त्यांचेच ठराविक लोक समाधीजवळ जाऊ शकतात.
अत्यंत चीड आणणाऱ्या या कृतीचा ओतुरकरांकडून साधा निषेधही झाला नाही,
यापेक्षा शरमेची बाब काय असू शकते? दुसरे असे की, केशवचैतन्यांनी आपला
पुर्वाश्रमीचा नातू यांसही अनेक चमत्कार दाखवल्याचे निरंजनबोवा नोंदवितात.
पण पुढे त्याचा वंशवृक्ष विस्तारल्याचे ते जर सांगत नाहीत, तर विद्यमान
राजर्षि आले कोठुन !
४. सदानंद मोरे यांचे मतः-
डाॅ. सदानंद
मोरे यांनी नुकताच एक लेख लिहून तुकोबांच्या गुरुपरंपरेचा संबंध थेट नाथ
परंपरेशी जोडला आहे. त्यांनी त्यासाठी गाथेतील मंगलचरण व प्रारंभिक
नामनिर्देशाकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते तुकोबांनी गुरुपरंपरेत ज्या
विश्वंभर बाबांचा उल्लेख केलाय, ते विश्वंभर बाबा म्हणजे तुकोबांचे आजोबा
विश्वंभर बाबा असावेत. डाॅ. मोरे यांच्या मते मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ,
गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर याच परंपरेची एक शिवोपासक शाखा म्हणजे
तुकोबांची गुरुपरंपरा होय. परंतू त्यांच्या विवेचनावर शंका घेण्यास पुढील
दोन कारणे आहेत.
१) चैतन्य परंपरेत ज्या विश्वंभर बाबांचे नाव मोरे
यांनी अभ्यासाअंती निश्चित केलंय, ते विश्वंभर बाबा मोरे कुळातीलच असावे
असे त्यांचे मत आहे. परंतू ओतूरास जी चैतन्यांची समाधी आहे, तिथून तीन
कि.मी. अंतरावर एका विश्वंभर बाबा नामक साधूची प्राचीन समाधी आहे. याच
परिसरात राघव, केशव चैतन्यांचा वास होता, त्याच परंपरेतील हे साधू असावेत.
म्हणून या समाधीस्थळाचे संशोधन होऊन देहूकरांच्या गाथेत व इतर जे विश्वंभर
बाबांचे संदर्भ आहेत, ते विश्वंभर बाबा म्हणजेच ओतूरजवळ डोंगर पायथ्याशी
असलेली विश्वंभर बाबाची समाधी असावी हा तुलनेत भक्कम पुरावा ठरतो.
२)
डाॅ. सदानंद मोरे ज्या नाथ परंपरेशी तुकोबांची गुरुपरंपरा जोडण्याचा क्लू
दर्शवितात, तो सत्य मानला तर, ‘मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळ । संप्रदाय
सकळ येथोनिया ॥ १ ॥’ हा निळोबांचा अभंग फोल ठरतो. याशिवाय तुकाराम शिष्या
बहिणाबाई शिऊरकरांनी मांडलेली गुरुपरंपरेची मांडणीही मिथ्या ठरते. म्हणून
या प्रकरणाच्या मुळाशी संशोधकांनी जाऊन नवीन काही तथ्ये हाती सापडतात का?
हे पाहणे गरजेचे झाले आहे.
५. राघवचैतन्यांची समाधी निश्चित कोठे? :-
१)
राघव चैतन्यांच्या समाधीबाबतही चैतन्यविजय ग्रंथात बहुतांश असंबध्द मांडणी
आहे. गुलबर्गा येथे राघव दराज जे आहे, ते या गुरुशिष्यांच्या स्मरणार्थ
बांधलेले दर्गे आहेत.
२) राहिला प्रश्न काशी येथील चैतन्य
धर्मशाळेचा. तेथील राघवेश्वर व केशवेश्वर ही शिवलिंगे काशीतील विव्दानांना
धर्मसभेत हरविले म्हणून तेथील जनतेने सन्मान म्हणून स्थापन केलेली आहेत.
३)
सध्या अवघा महाराष्ट्र ज्यांच्याकडे प्रतितुकाराम म्हणून श्रध्देने पाहतो,
ते ह.भ.प. भोसले बाबा. ते वै. कोंडाजीबाबांचे शिष्य आहेत. वर्षभर हे
गृहस्थ पायी वारीत असतात. त्यांनी राघवचैतन्यांची समाधी शोधून काढली आहे.
त्यांच्या मते कर्नाटकच्या सीमारेषेजवळ जे आळंद जवळ गुंजोटी गाव आहे, तेथे
देशपांडेंच्या वाड्यात एका साधूची जिवंत समाधी आहे. ती समाधी म्हणजे
राघवचैतन्यांची समाधी होय.
भोसले बाबांचे हे मत प्रमाण मानले तर
गुंजोटीला राघवचैतन्य, मान्यहळला केशव चैतन्य व ओतूरास बाबाजी चैतन्य समाधी
अशी नवी दिशा दिसू लागते. म्हणून मूळ चैतन्यविजय ग्रंथ हाती लागणे जरुरी
आहे
सारांश :-
तुकोबांच्या गुरुपरंपरेचा अभ्यास करताना पुढील काही सूत्रे हाती लागतात.
१. राघवचैतन्यांना व्यासांनी ओतुरला मांडवी, पुष्पावती तीरी उपदेश केला आहे.
२. केशवचैतन्यांना ओतुर येथेच राघवचैतन्यांनी अनु ग्रह दिला.
३. तुकोबांची प्रत्यक्ष गुरुभेट ओतुरला गंगावाटेवर झाली आहे.
४. राघवचैतन्य, केशवचैतन्य, बाबाजी चैतन्य हे तीन भिन्न पुरुष आहेत.
५. तुकोबांच्या जन्मापुर्वी सुमारे पाऊणशे वर्षे समाधिस्त होणारे केशव चैतन्य कसा उपदेश करु शकतात?
६. बाबाजीचैतन्यांनीच तुकोबांना गुरुपदेश केला आहे.
७.
मान्यहळ येथील समाधि केशव चैतन्यांची गृहित धरली, तर अमराठी प्रांतात
साधूना नावाऐवजी बाबाजी म्हणतात. म्हणुन मान्यहळ येथील मठात
राघवचैतन्यांच्या समाधीनंतर केशवचैतन्य काही वर्षे राहिले व त्यांनी तेथेच
समाधी घेतली असावी का? या अंगाने विचार व्हावा.
८. बाबाजी चैतन्यांचे मूळ, अनुग्रह स्थल याविषयी सशोधन होणे गरजेचे आहे.
९.
केशवचैतन्यांशी संबंध प्रस्थापित करुन नविन चैतन्यविजय लिह्न घेणाऱ्या
प्रवृत्तींनी बाबाजी हे व्यक्तिमत्व झाकुन तर ठेवले नाही ना? कदाचित ओतुरची
समाधी बाबाजी चैतन्यांची असु शकते.
१०. कृष्णदास बैरागींच्या मुळ चैतन्य कथाकल्पतरुची प्रत शिवकालीन बाडात सापडली तर हे सर्वच प्रश्न सुटतील.
(लेखक हे छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभाग व भाषा संशोधन केंद्राचे प्रमुख आहेत.)
*** *** ***
संदर्भ सूचि :-
१) समग्र तुकाराम दर्शन-डा. किशोर सानप. विजय प्रकाशन, नागपूर. प्र.आ. २००८
२) संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रृति-गं. बा. सरदार, श्रीविद्या प्रकाशन पुणे१९८२
३) तुकाराम दर्शन-गं. बा. सरदार, माडर्न बुक डेपो, पुणे. १९६८
४) जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अभंग गाथा-संपा. सदानंद मोरे व दिलीप धोंडगे. श्री विठोबा रखुमाई देवस्थान देहू. २०००
५) तुकाराम महाराज यांची गुरुपरंपरा-वा. सी. बेंद्रे. मौज प्रकाशन गृह, मुंबई १९६३
६) श्री तुकाराम गाथा-बाबुराव हरि देवडीकर. श्री ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ, सोलापूर १९९२
७) भक्तविजय-महिपती ताहराबादकर, निर्णयसागर, मुंबई, १९५०
८) चैतन्यविजय-निरंजनबोवा नाशिककर, प्रकाशक-राजर्षि बंधू, ओतूर.
९) जोग महाराज वारकरी कीर्तन माला-नथूसिंग डोंगरसिंग रजपूत, आळंदी देवाची
१०) विद्रोही तुकाराम-आ.ह.साळुंके, पुणे १९९७
११) डाॅ. सदानंद मोरे यांचा नोव्हेंबर २०१८ मधील फेसबुक वरील लेख -"तुकारामांच्या गुरुपरंपरेचे संशोधन-काही क्लू"
मुलाखत-
१)
ह.भ.प. सुमंत महाराज नलावडे, ओतूर, ता. जुन्नर जि.पुणे. २)
ह.भ.प.निवृत्तीबोवा डुंबरे, मु.पो. ओतूर. ता. जुन्नर जि.पुणे. ३) कै.रं
वा.टण्णू गुरुजी, जुन्नर जि. पुणे ४) ह.भ.प. भोसले बाबा, कोंडाजीबाबा डेरे
पालखी सोहळा, पारुंडे. जि. पुणे.