Saturday, 3 May 2025

२४. नाममाहात्म्य वर्णन

श्री तुकोबाराय यांनी नामस्मरणाचे माहात्म्य वर्णन केले, त्याविषयीचे अभंग.

नाममाहात्म्य वर्णन (अभंग संख्या १०६)

२४४९. नामसंकीर्तन साधन पै सोपें । जळतील पापें जन्मांतरीची ॥ १ ॥ न लगती सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥ २ ॥ ठायींच बैसोन करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥ ३ ॥ रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥ ४ ॥ याविण आणीक असतां साधन । वाहातसें आण विठोबाची ॥ ५ ॥ तुका म्हणे सोपें आहे सर्वाहूनि । शहाणा तो धणी घेतो येथें ॥ ६ ॥

२४५०. नाम उच्चारितां कंठीं । पुढें उभा जगजेठीं ॥ १ ॥ ऐसें धरोनियां ध्यान । मनें करावें चिंतन ॥ २ ॥ ब्रह्मादिकां ध्याना नये । तो हा कीर्तनाचे साेये ॥ ३ ॥ तुका म्हणे सार घ्यावें । मनें हरिरूप पहावें॥ ४ ॥

२४५१. नाम घेतां उठाउठीं । होय संसारासी तुटी ॥ १ ॥ ऐसा लाभ बांधा गांठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ॥ २ ॥ नामापरितें साधन नाहीं । जें तूं करिसी आणिक कांहीं ॥ ३ ॥ हाकाराेनि सांगे तुका । नाम घेतां राहों नका ॥ ४ ॥

२४५२. नाम घेतां नलगे मोल । नाममंत्र नाहीं खोल ॥ १ ॥ दाेंचि अक्षरांचे काम । उच्चारावें राम राम ॥ २ ॥ नाहीं वर्णधर्मयाती । नामीं अवघींचि सरती ॥ ३ ॥ तुका म्हणे नाम । चैतन्य हें निजधाम ॥ ४ ॥

२४५३. नामें स्नानसंध्या केलें क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ॥ १ ॥ आणिकें दुरावली करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥ २ ॥ रामनामीं जिहीं धरिला विश्वास । तिहीं भवपाश तोडियेले ॥ ३ ॥ तुका म्हणे केलें कळिकाळ ठेंगणे । नामसंकीर्तनें भाविकांनी ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२४५४. हरि म्हणतां गति पातकें नासती । कळिकाळ कांपती हरि म्हणतां ॥ १ ॥ हरि म्हणतां भुक्ति हरि म्हणतां मुक्ति । चुके यातायाती हरि म्हणतां ॥ २ ॥ तपें अनुष्टानें न लगती साधनें । तुटती बंधनें हरि म्हणतां ॥ ३ ॥ तुका म्हणे भावें जपा हरिचें नाम । मग काळयम शरण तुम्हां ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२४५५. लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥ १ ॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गीं नाहीं ॥ २ ॥ कृष्ण विष्णु हरि गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठींचा ॥ ३ ॥ सकळांसी येथें आहे अधिकार । कलियुगीं उद्धार हरिनामें ॥ ४ ॥ तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ति । ऐसें बहुतां ग्रंथीं बोलियेलें ॥ ५ ॥

२४५६. यालागीं आवडी म्हणा रामकृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥ १ ॥ सोपें हें साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरि ॥ २ ॥ न लागती कष्ट नलगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥ ३ ॥ नलगे तप तीर्थ करणें महादान । केल्या एक मन जोडे हरि ॥ ४ ॥ तुका म्हणे कांहीं न वेचितां धन । जोडे नारायण नामासाठीं ॥ ५ ॥

२४५७. नाम घेतां वांयां गेला । ऐसा कोणें आईकिला ॥ १ ॥ सांगा विनवितों तुम्हांसी । संत महंत सिद्ध ऋषी ॥ २ ॥ नामें तरला नाहीं कोण । ऐसा द्यावा निवडून ॥ ३ ॥ सलगीच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ॥ ४ ॥

२४५८. सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें ॥ १ ॥ तयाच्या चिंतनें निरसेल संकट । तराल दुर्घट भवसिंधु ॥ २ ॥ जन्मोनियां कुळीं वाचे स्मरे राम । धरी हाचि नेम अहर्निशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे कोटी कुळें तीं पुनीत । भावें गातां गीत विठोबाचें ॥ ४ ॥

२४५९. कामामध्यें काम । काहीं म्हणा रामराम । जाईल भवश्रम । सुख होईल दुःखाचें ॥ १ ॥ कळों येईल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ २ ॥ जीतां जीसी जैसा तैसा । पुढें आहे रे वोळसा । उगवुनि फांसा । काय करणें तें करी ॥ ३ ॥ केलें होतें याचि जन्में । अवघें विठोबाच्या नामें । तुका म्हणे वर्में । जाणोनियां तरती ॥ ४ ॥

२४६०. कळे न कळे ज्या धर्म । ऐका सांगतो रे वर्म । माझ्या विठोबाचें नाम । अट्टाहासे उच्चारा ॥ १ ॥ तो या दाखवील वाटा । जया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोठा । पाहिजे तो कळवळा ॥ २ ॥ पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा । मोडों नेदी कांटा । घेऊ सांटा चोरासी ॥ ३ ॥ तुका म्हणे मोल । नलगे द्यावें वेचा बोल । विठ्ठल विठ्ठल । ऐसा छंद मनासी ॥ ४ ॥

२४६१. विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । विठुवानंदे गर्जावें ॥ १ ॥ वाये टाळ टाळ्या टाळी । होईल होळी विघ्नांची ॥ २ ॥ विठ्ठल आदि अवसानीं । विठ्ठल मनीं स्मरावा ॥ ३ ॥ तुका म्हणे विठ्ठल वाणीं । वदा कानीं आईका ॥ ४ ॥

२४६२. ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥ १ ॥ म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ २ ॥ संचित प्रारब्ध गाढें । धांवें पुढें क्रियमाण ॥ ३ ॥ तुका म्हणे घुबडा ऐसें । जन्म सरिसें शुकराचें ॥ ४ ॥

२४६३. तया घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम ॥ १ ॥ कांहीं नलगे शिणावें । आणिक वेगळाल्या भावें । वाचे उच्चारावें । रामकृष्णगोविंदा ॥ २ ॥ फळ पावाल अवलिळा । भोग वैकुंठ सोहळा ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याच्या नांवें । तोचि होईजे स्वभावें ॥ ४ ॥

२४६४. पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥ १ ॥ मग तो होऊं नेदी शीण । आड घाली सुदर्शन ॥ २ ॥ नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळती विघ्नें ॥ ३ ॥ तुका म्हणे प्राण । करा देवासी अर्पण ॥ ४ ॥

२४६५. जन्मा येऊनि कां रे निदसुरा । जाय भेटी वरा रखुमाईच्या ॥ १ ॥ पाप ताप दैन्य जाईल सकळ । पावसी अढळ उत्तम तें ॥ २ ॥ संतमहंतसिद्ध हरिदासदाटणी । फिटती पारणीं इंद्रियांचीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तेथें नामाचा गजर । फुकाची अपार लुटी घेई ॥ ४ ॥

२४६६. उभाउभी फळ । अंगीं मंत्राचिया बळ ॥ १ ॥ म्हणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥ २ ॥ कळिकाळाची बाधा । नव्हे उच्चारितां सदा ॥ ३ ॥ तुका म्हणे रोग । वारे भवाऐसा भाेग ॥ ४ ॥

२४६७. विठुरस घेईं काढा । जेणे पीडा वारेल ॥ १ ॥ पथ्य नाम विठोबाचें । आणीक वाचे न सेवी ॥ २ ॥ भवरोगा ऐसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥ ३ ॥ तुका म्हणे नव्हे बाधा । आणीक कदा भूतांची ॥ ४ ॥

२४६८. भक्तिभाव आम्ही बांधिलासे गांठी । सादावितों हाटीं घ्या रे कोणी ॥ १ ॥ सुखाचिया पेठे घातला दुकान । मांडियेले वान रामनाम ॥ २ ॥ सुखाचें फुकाचें सकळांचें सार । तरावया पार भवसिंधु ॥ ३ ॥ मागें भाग्यवंत झाले थोर थोर । तिहीं केला फार हाचि सांटा ॥ ४ ॥ खोटें कुडें तेथें नाहीं घातपात । तुका म्हणे चित्त शुद्ध करीं ॥ ५ ॥

२४६९. स्वल्प वाटे चला जाऊं । वाचे गाऊं विठ्ठल ॥ १ ॥ तुम्ही आम्ही खेळीमेळीं । गदारोळी आनंदें ॥ २ ॥ ध्वजा कुंचे गरुडटके । शृंगार निके करोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे हेचि नीट । जवळी वाट वैकुंठा ॥ ४ ॥

२४७०. संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें जोडे नाम उच्चारितां । न वेचे मोल कांहीं न लागती सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥ १ ॥ ऐसें हें सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया ॥ २ ॥ पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा । अनाथांच्या नाथे घातला विमानीं । नेला उचलोनी परलोकां ॥ ३ ॥ अंतकाळीं गणिका पक्षियाच्या छंदे । रामराम पद उच्चारिलें । तंव त्या दीनानाथा कृपा आली कैसी । त्याने तियेसी वैकुंठासी नेलें ॥ ४ ॥ अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्तीं जवळी असे । तुका म्हणे भावें स्मरतां रामराम । कोण जाणें तये दशे ॥ ५ ॥ 

२४७१. सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरि बा गोविंदा रामकृष्ण ॥ १ ॥ पुण्य पर्वकाळ तीर्थेंही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ २ ॥ अवघेचि लाभ बैसलिया घरा । येती भाव धरा एके ठायीं ॥ ३ ॥ शेळ्या मेंढ्या गाई सेवा घेतो म्हैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥ ४ ॥ तुका म्हणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणता सुलभचि ॥ ५ ॥

२४७२. ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥ १ ॥ नाशिवंत आटी प्रियापुत्रधन । बीज ज्याचा शीण तेंचि फळ ॥ २ ॥ नाव धड करा सहस्र नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥ ३ ॥ तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरिरामवाणीं ॥ ४ ॥

२४७३ सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेद काम निवारूनि ॥ १ ॥ नलगे हालावें चालावे बाहेरी । अवघेंचि घरीं बैसलिया ॥ २ ॥ देवाचींच नामें देवाचियें शिरीं । सर्व अळंकारीं समार्पावीं ॥ ३ ॥ तुका म्हणे होय भावेंचि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥ ४ ॥

२४७४. रामकृष्ण नाम मांडी पां वोळी । तेणे होईल होळी पापा धुनी ॥ १ ॥ ऐसा मना छंद लावी रे अभ्यास । जया नाहीं नाश विठुरसा ॥ २ ॥ जाेडी तरी ऐसी करावी न सरे । पुढें आस उरे मागुताली ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसें धरा कांहीं मनीं । यातायाती खाणीं चुकतील ॥ ४ ॥

२४७५. गाय नाचें वाहें टाळी । साधन कळी उत्तम हें ॥ १ ॥ काय जाणाेंं तरले किती । नाव आइती या बैसा ॥ २ ॥ सायासाचे नाहीं काम । घेतां नाम विठोबाचे ॥ ३ ॥ तुका म्हणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥ ४ ॥

२४७६. नाशिवंत देह नासेल हा जाणा । का रे उच्चाराना वाचे नाम ॥ १ ॥ नामेंचि तारिले कोट्यान हे कोटी । नामें हे वैकुंठीं बैसविले ॥ २ ॥ नामापरतें सार नाहीं त्रिभुवनीं । तें कां तुम्हीं मनीं आठवाना ॥ ३ ॥ तुका म्हणे नाम वेदांसी आगळें । तें दिलें गोपाळे फुकासाठीं ॥ ४ ॥

२४७७. अग्नि तापलिया कायाचि होमे । तापत्रयें संतप्त होती । संचित क्रियमाण प्रारब्ध तेथें । न चुके संसार स्थिति । राहाट घटिका जैसी फिरतांचि राहिली । भरली झाली होती एके रितीं । साधीं हा प्रपंच पंचाय अग्न । तेणें पावशी निज शांती रे ॥ १ ॥ नारायण नाम नारायण नाम । नित्य करीं काम जिव्हा मुखें । जन्म जराव्याधि पापपुण्य तेथें । नासती सकळही दुःखें रे ॥ २ ॥ शीत उष्ण वन सेवितां कपाट । आसन समाधी साधी । तप तीर्थ दान व्रत आचरण । यज्ञ नाना मन बुद्धी । भोगाभोग तेथें न चुकती प्रकार । जन्मजरादुःखव्याधि । साहोनि काम क्रोध अहंकार । आश्रमीं अविनाश साधी रे ॥ ३ ॥ घोकितां अक्षरें अभिमानविधी । निषेध लागला पाठी । वाद करितां निंदा घडती दोष । होय वज्रलेपो भविष्यति । दूषणाचें मूळ भूषण तुका म्हणे । सांडीं मिथ्या खंतीं । रिघोनि संतां शरण सर्वभावें । राहें भलतिया स्थिती रे ॥ ४ ॥

२४७८. जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहर्निशीं ॥ १ ॥ भवनिर्दाळण नाम । विठ्ठल विठ्ठल नाशी काम ॥ २ ॥ सुखाचें शेजार । करूं कां नावडे घर ॥ ३ ॥ तुका म्हणे ठेवा । कां हा न करीच बरवा ॥ ४ ॥

२४७९. काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठले ॥ १ ॥ सर्व साधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ २ ॥ योगयागतपें । केलीं तयानें अमुपें ॥ ३ ॥ तुका म्हणे जपा । मंत्र त्रिअक्षरी सोपा ॥ ४ ॥ 

२४८०. चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळाेवेळां ॥ १ ॥ तुज पापचि नाहीं ऐसे । नाम घेतां जवळी वसे ॥ २ ॥ पंच पातकांच्या कोडी । नामें जळतां नलगे घडी ॥ ३ ॥ केलीं मागें नको पाहों । तुज जमान आम्ही आहों ॥ ४ ॥ करीं तुजसी करवती । आणिक नामें घेऊं किती ॥ ५ ॥ तुका म्हणे काळा । रीघ नाहीं निघती ज्वाळा ॥ ६ ॥

२४८१. युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥ १ ॥ कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देईल भेटी ॥ २ ॥ न लगे लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥ ३ ॥ तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसती ते वाव नामेंविण ॥ ४ ॥

२४८२. फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥ १ ॥ नाहीं गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषांचे ॥ २ ॥ उदंड भावें उदंड घ्यावें । नाम गावें आवडी ॥ ३ ॥ तुका म्हणे घरींच्या घरीं । देशाउरीं न शीणीजे ॥ ४ ॥

२४८३. चारी वेद जयासाठीं । त्याचें नाम धरा कंठीं ॥ १ ॥ न करीं आणिक साधन । कष्टसी कां वांयांविण ॥ २ ॥ अठरा पुराणांचें पोटीं । नामाविण नाहीं गोठीं ॥ ३ ॥ गीता जेणें उपदेशिलीं । ते ही विटेवरी माउली ॥ ४ ॥ तुका म्हणे सार धरीं । वाचे हरिनाम उच्चारी ॥ ५ ॥

२४८४. फलकट तो संसार । येथें सार भगवंत ॥ १ ॥ ऐसे जागवितों मना । सरसें जनासहित ॥ २ ॥ अवघे निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे देवाविण । केला शीण तो मिथ्या ॥ ४ ॥

२४८५. न कळे तें कळों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ १ ॥ न दिसे तें दिसों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ २ ॥ न बोलों ते बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ ३ ॥ न भेटें ते भेटों येईल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥ ४ ॥ अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर म्हणतां वाचे ॥ ५ ॥ तुका म्हणे जीव आसक्त सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥ ६ ॥ (धृ. नाही)
 

२४८६. गर्जत जावी नामावळी । प्रेमें टाळी वाहोनि ॥ १ ॥ येणें सुखें पुढती धांवे । भेटी सवें गोपाळ ॥ २ ॥ लोटांगण घाला तळीं । वंदा धुळी संतांची ॥ ३ ॥ तुका म्हणे विठ्ठल लाहो । ऐसा बाहो उभारा ॥ ४ ॥

२४८७. उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥ १ ॥ बरें सेवन उपकारा । द्यावें घ्यावें या उत्तरा ॥ २ ॥ सरळ आणि मृद । कथा पाववीते उर्ध्व ॥ ३ ॥ गात जात तुका । हाचि उपदेश आइका ॥ ४ ॥

२४८८. समुद्रवलयांकित पृथ्वीचें दान । करितां समान नये नामा ॥ १ ॥ म्हणऊनि कोणी न करावा आळस । म्हणा रात्रंदिवस रामराम ॥ २ ॥ सकळही शास्त्रे पठण करितां वेद । सरी नये गोविंदनामें एके ॥ ३ ॥ सकळही तीर्थें प्रयागादि काशी । करितां नामाशीं तुळति ना ॥ ४ ॥ कर्वती कर्मरी देहासी दंडण । करितां समान नये नामा ॥ ५ ॥ तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । नाम हेंचि सार विठोबाचें ॥ ६ ॥

२४८९. हित तेंचि एक राम कंठीं राहे । नाठविती देहभाव देहीं ॥ १ ॥ हाचि एक धर्म निज बीज वर्म । हेंचि जाळी कर्में केलीं महा ॥ २ ॥ चित्त राहे पायीं रूप से डोळां । जिवें कळवळा आवडीचा ॥ ३ ॥ अखंड न खंडे अभंग न भंगें । तुका म्हणे गंगे मिळणी सिंधु ॥ ४ ॥

२४९०. न पालटे एक । भक्त भोळाचि भाविक ॥ १ ॥ येरां नाश आहे पुढें । पुण्य सरतां उघडें ॥ २ ॥ नेणें गर्भवास । एक विष्णूचाचि दास ॥ ३ ॥ तुका म्हणे खरें । नाम विठोबाचें बरें ॥ ४ ॥

२४९१. काय देवें खातां घेतलें हातींचें । आलें हें तयाचें थोर भय ॥ १ ॥ म्हणतां गजरें राम एकसरें । जळती पापें थोरें भयधाकें ॥ २ ॥ काय खोळंबले हात पाय अंग । नाशिलें हें सांग रूप काय ॥ ३ ॥ कोण लोकीं सांग घातला बाहेरी । म्हणताे हरि हरि तुका म्हणे ॥ ४ ॥

२४९२. अनेक दोषांचे काट । जे जे गादलें निघोंट । होती हरिनामें चोखट । क्षण एक न लगतां ॥ १ ॥ तुम्ही हरि म्हणा हरि म्हणा । महादोषांचे छेदना ॥ धृ. ॥ अतिप्रीतीचा बांधला । नष्ट चांडाळीं रतला । क्षण न लागतां नेला । वैकुंठासी हरि म्हणतां ॥ २ ॥ अमित दोषांचे मूळ । झालें वाल्मीकासी सबळ । झाला हरिनामें निर्मळ । गंगाजळ पै जैसा ॥ ३ ॥ हरि म्हणता तरले । महादोषी उद्धरिले । पहा गणिकेसी नेलें । वैकुंठासी हरि म्हणतां ॥ ४ ॥ हरिविण जन्म नको वांयां । जैसी दर्पणींची छाया । म्हणोनि तुका लागे पायां । शरण तया हरीसी ॥ ५ ॥

२४९३. न धरी प्रतिष्ठा कोणाचीही यम । म्हणतां का रे राम लाजा झणी ॥ १ ॥ सांपडे हातींचें सोडवील काळा । तो कां वेळोवेळां नये वाचे ॥ २ ॥ कोण लोक जो हा सुटला तो एक । गेले कुंभपाक रवरवांत ॥ ३ ॥ तुका म्हणे हित तों हा म्हणा विठ्ठल । न म्हणे तो भोगील कळेल ते ॥ ४ ॥

२४९४. झाडें वोरपोनि खाऊनियां पाला । आठवी विठ्ठला वेळोवेळां ॥ १ ॥ वल्कले नेसुनि ढुंगा गुंडाळून । सांडी देहभान जवळूनीं ॥ २ ॥ लोकमान वमनासमान मानणे । एकांतीं राहणे विठाेसाठीं ॥ ३ ॥ सहसा करूं नये प्रपंचीं सौजन्य । सेवावे अरण्य एकांतवास ॥ ४ ॥ ऐसा हा निर्धार करी जो मनाचा । तुका म्हणे त्याचा पांग फिटे ॥ ५ ॥ (धृ. नाही) 

२४९५. नेत्र झांकोनियां काय जपताेसी । जंव नाहीं मानसीं प्रेमभाव ॥ १ ॥ उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा । तुटती यातना गर्भवास ॥ २ ॥ मंत्र यंत्र कांहीं करिसी बुट बुटी । तेणें भूतसृष्टी पावशील ॥ ३ ॥ सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधु तारक रामकृष्ण ॥ ४ ॥

२४९६. काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरीनाथा कष्ट नाहीं ॥ १ ॥ सर्वकाळ वाचे उच्चारितां हरि । तया सुखा सरी पार नाहीं ॥ २ ॥ रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृतउकळी नाम तुझें ॥ ३ ॥ तुका म्हणे धन्य तयाचें वदन । जया नारायण ध्यानीं मननीं ॥ ४ ॥

२४९७. विठोबाचें नाम ज्याचें मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरती ॥ १ ॥ विठ्ठल विठ्ठल भावें म्हणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंची ॥ २ ॥ बहुत तारिले सांगों किती आतां । ऐसा कोणी दाता दुजा नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे म्यां ही ऐकोनियां कीर्ति । धरिला एकांती हृदयामाजी ॥ ४ ॥

२४९८. विचा केला ठोबा । म्हणोनि नांव तो विठोबा ॥ १ ॥ कां रे नेणां त्याचें नांव । काय वेदासि नाहीं ठावें ॥ २ ॥ शेष स्तुति प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग झाला ॥ ३ ॥ तुका म्हणे सत्ता । ज्याची काळाचिये मांथां॥ ४ ॥

२४९९. तरी कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शक्तिहीन ॥ १ ॥ कीर्तिविण नाहीं नामाचा डांगोरा । येर का इतरां वाणीतना ॥ २ ॥ तरीच म्हणताें आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखीं गुणे ॥ ३ ॥ चांगलेंपण हें निरुपमता अंगीं । बाणलें श्रीरंगीं म्हणऊनी ॥ ४ ॥ तरीच हा थोर सांगितलें करी । अभिमान हरीपांशीं नाहीं ॥ ५ ॥ तुका म्हणे तरी करिती याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥ ६ ॥

२५००. जन्मा येणें घडे पातकाचें मूळ । संचिताचें फळ आपुलिया ॥ १ ॥ मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनिया काय देवावरी ॥ २ ॥ ठाउकाचि आहे संसार दुःखाचा । चित्तीं शीण त्याचा वाहों नये ॥ ३ ॥ तुका म्हणे नाम त्याचे आठवावें । तेणें विसरावें जन्मदु:ख ॥ ४ ॥

२५०१. नाम न वदे ज्याची वाचा । तो लेंक दो बापांचा ॥ १ ॥ हेंचि ओळखीं तयांची । खूण जाणा अभक्ताची ॥ २ ॥ ठावा नाहीं पांडुरंग । जाणा जातीचा तो मांग ॥ ३ ॥ ज्यासी विठ्ठल नाहीं ठावा । त्याचा संग न करावा ॥ ४ ॥ नाम न म्हणे ज्याचें तोंड । तेंचि चर्मकाचे कुंड ॥ ५ ॥ तुका म्हणे त्याचे दिवशीं । रांड गेली महारापाशीं ॥ ६ ॥

२५०२. नामाविण काय वाउगी चावट । वायां वटवट हरीविण ॥ १ ॥ फुकटची सांगे लोकाचिया गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥ २ ॥ मेळवूनी चाट करी सुरापान । विषयांच्या गुणें मातलासे ॥ ३ ॥ बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥ ४ ॥ बळें यम दांत खाय तयावरी । जंव भरे दोरी आयुष्याची ॥ ५ ॥ तुका म्हणे तुला सोडवील कोण । नाहीं नारायण आठविला ॥ ६ ॥

२५०३. नाम दूषी त्याचें नको दरुपण । विष तें वचन वाटे मज ॥ १ ॥ अमंगळ वाणी नाइकावी कानीं । निंदेची पाेहणी उठे तेथे ॥ २ ॥ काय साच लभ्य त्याचिये वचनीं । कोणत्या पुराणीं दिली ग्वाही ॥ ३ ॥ काय आड लावूं त्याचिया तोंडासी । आतां या जिभेसी काय करूं ॥ ४ ॥ तुका म्हणे संत न मानिती त्यास । घेऊं पाहे ग्रास यमदूत ॥ ५ ॥

२५०४. म्हणवितां हरी न म्हणे तयाला । दरवडा पडिला देहामाजी ॥ १ ॥ आयुष्यधन त्याचें नेलें यमदूतीं । भुलविला निश्चिती कामरंगें ॥ २ ॥ नावडे ती कथा देउळासी जातां । प्रियधनसुता लक्ष तेथें ॥ ३ ॥ कोण नेतो तयां घटिका दिवसा एका । कां रे म्हणे तुका नागविसी ॥ ४ ॥

२५०५. सांडुनि सुखाचा वांटा। मुक्ति मागे तो करंटा ॥ १ ॥ कां रे न घ्यावे हे जन्म । काय वैकुंठा जाऊन ॥ २ ॥ येथें मिळतो दहीं भात । नाहीं वैकुंठीं ते मात ॥ ३ ॥ तुका म्हणे मुक्ति नलगे । राहेन संताचिये संगें ॥ ४ ॥

२५०६. मंत्र चळे पिसें लागतें सत्वर । अबद्ध ते फार तरले नामें ॥ १ ॥ अशाैच तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ॥ २ ॥ रागज्ञानघात चुकतां होय वेळ । नाम सर्वकाळ शुभदायक ॥ ३ ॥ आणिकां भजना विधि बोलिला निषेध । नाम तें अभेद सकळां मुखीं ॥ ४ ॥ तुका म्हणे तपें घालिती घालणी । वेश्या उद्धरूनि नेली नामें ॥ ५ ॥

२५०७. वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येरा ॥ १ ॥ विठोबाचें नाम सुलभ सोपारें । तारी एकसरें भवसिंधु ॥ २ ॥ जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । यर तो सकळ मूढ लोक ॥ ३ ॥ तुका म्हणे विधिनिषेध लोपला । उच्छेद या झाला मारगाचा ॥ ४ ॥

२५०८. वाचे विठ्ठल नाहीं । तोचि प्रेतरूप पाहीं ॥ १ ॥ धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥ २ ॥ न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥ ३ ॥ जातां कांटाळे देउळा । तोचि सुना मुखकाळा ॥ ४ ॥ हरिभक्तीविण । जळो त्याचें शहाणपण ॥ ५ ॥ तुका म्हणे तेणें । वंशा आणियलें उणें ॥ ६ ॥

२५०९. विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥ १ ॥ तयासी बोलतां होईल विटाळ । नवजाय ताे जळस्नान करितां ॥ २ ॥ विठ्ठलनामाची नाहीं ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥ ३ ॥ तुका म्हणे मज विठोबाची आण । जरी प्रतिवचन करिन त्यासी ॥ ४ ॥

२५१०. नव्हे गुरुदास्य संसारिया । वैराग्य तरी भेणें कांपे विषयां । तैसे नाम नव्हे पंढरीराया । जया सायास न लगती ॥ १ ॥ म्हणोनि गोड सर्वभावें । आंघोळी न लगे तोंड धुवावें । आर्तचाड जीवें । नलगे भ्यावे संसारा ॥ २ ॥ कर्म तंव न पुरे संसारिक । धर्म तंव फळदायक । नाम विठ्ठलाचें एक । नाशी दुःख भवाचें ॥ ३ ॥ न लगे सांडणें मांडणें । आगमनिगमाचें देखणें । अवघें तुका म्हणे । विठ्ठलनामें आटलें ॥ ४ ॥

२५११. कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगें पतन ॥ १ ॥ भलत्या काळीं नामावळी । सुलभ भोळी भाविका ॥ २ ॥ प्रायश्चित्तें पडती पायां । गाती तयां वैष्णवां ॥ ३ ॥ तुका म्हणे नुपजे दोष । करा घोष आनंदें ॥ ४ ॥

२५१२. अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं । राम नाही तोंडी कैसा तरे ॥ धृ. ॥ सकळां जीवामाजि देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे ॥ २ ॥ ज्ञान सकळांमाजी आहे हें साच । भक्तीविण तेंच ब्रह्म नव्हे ॥ ३ ॥ काय मुद्रा कळल्या कराव्या सांगतां । दीप न लागतां उन्मनीचा ॥ ४ ॥ तुका म्हणे नका पिंडाचें पाळण । स्थापूं नारायण आतुडेना ॥ ५ ॥

२५१३. नाम म्हणतां मोक्ष नाहीं । ऐसा उपदेश करितील कांहीं । बधिर व्हावें त्याचे ठायीं । दुष्ट वचन वाक्य तें ॥ १ ॥ जयाचें राहिले मानसीं । तेचि पावले तयासी । चाचपडतां मेलीं पिसीं । भलतैसीं वाचाळें ॥ २ ॥ नवविधीचा निषेध । जेणें मुखें करिती वाद । जन्मा आले निंद्य । शूकरयाती संसारा ॥ ३ ॥ काय सांगों वेळोवेळां । आठव नाहीं त्या चांडाळा । नामासाठीं बाळा । क्षीरसागरीं कोंडिलें ॥ ४ ॥ आपुलिया नामासाठीं । लागे शंखासुरापाठीं । फोडोनिया पोटीं । वेद चारी काढिले ॥ ५ ॥ जगीं प्रसिद्ध हे बोली । नामें गणिका तारिली । आणिकेंही उद्धरिली । पातकी महादोषी ॥ ६ ॥ जे हे पवाडे गर्जती । नाम प्रल्हादाच्या चित्तीं । जळतां बुडतां घातीं । राखे हातीं विषाचे ॥ ७ ॥ काय सांगों ऐशी कीर्ति । तुका म्हणे नामख्याती । नरकाप्रती जाती । निषेधिती तीं एकें ॥ ८ ॥

२५१४. हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥ १ ॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ २ ॥ करितां आठव । धांवोनिया घाली कव ॥ ३ ॥ तुका म्हणे गीतीं गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥ ४ ॥

२५१५. नाम साराचेंही सार । शरणागत यमकिंकर ॥ १ ॥ उत्तमा उत्तम । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ २ ॥ नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हाकोळी ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्णूं काय । तारक विठोबाचे पाय ॥ ४ ॥

२५१६. नामाचे पवाडे बोलती पुराणें । होऊनि कीर्तनें ताेंचि ठेला ॥ धृ. ॥ आदिनाथा कंठीं आगळा हा मंत्र । आवडीचें स्तोत्र सदा घोकी ॥ २ ॥ आगळें हें सार उत्तमा उत्तम । ब्रह्मकर्मा नाम एक तुझें ॥ ३ ॥ तिहीं त्रिभुवनीं गमन नारदा । हातीं विणा सदा नाम मुखी ॥ ४ ॥ परिक्षिती मृत्यु सातां दिवसांचा । मुक्त झाला वाचा उच्चारितां ॥ ५ ॥ कोळियाची कीर्ति वाढली गहन । केलें रामायण रामाआधीं ॥ ६ ॥ सगुण निर्गुण तुज म्हणे वेद । तुका म्हणे भेद नाहीं नामीं ॥ ७ ॥

२५१७ पुराणप्रसिद्ध सीमा । नामतारक महिमा ॥ १ ॥ मागें जाळी महा दोष । पुढें नाहीं गर्भवास ॥ २ ॥ जें निंदिले शास्त्रें । वंद्य झालें नाममात्रे ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं नामठसा ॥ ४ ॥

२५१८. तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां ॥ धृ. ॥ नेणतां सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाठीं ॥ २ ॥ जन्म नाम धरी भक्तीच्या पाळणा । आकार कारणा याचसाठीं ॥ ३ ॥ असुरीं दाटली पाप होतां फार । मग फेडी भार पृथिवीचा ॥ ४ ॥ तुका म्हणे देवभक्तपण सार । कवतुक वेव्हार तयासाठीं ॥ ५ ॥ 

२५१९. गोड झालें पोट धालें । अवचिता वाचे आलें । म्हणतां पाप गेलें । विठ्ठलसे वाचेसी ॥ १ ॥ सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । महापातकी चांडाळ । नामासाठीं आपुलिया ॥ २ ॥ चित्त पावलें आनंदा । सुखसमाधीतें सदा । म्हणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥ ३ ॥ हें जाणती अनुभवी । जया चाड तो चोजवी । तुका म्हणे दावी । रूप तेंचि अरूप ॥ ४ ॥

२५२०. तुज न भें मी कळिकाळा । मज नामाचा जिव्हाळा ॥ १ ॥ माझा बळिया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ २ ॥ शंख वधिला सागरीं । वेद घेउनि आला चारी ॥ ३ ॥ कूर्में दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटीं ॥ ४ ॥ वाराहरूप धरिलें गाढें । धरा प्रतापें धरिली दाढे ॥ ५ ॥ हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रक्षिला ॥ ६ ॥ वामन झाला दीनानाथ । बळी पाताळीं घातला दैत्य ॥ ७ ॥ छेदुनियां सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥ ८ ॥ शिळा प्रतापें सागरीं तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥ ९ ॥ मारोनिया कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥ १० ॥ पांचाळीसी गांजितां वैरी । वस्त्रे आपण झाला हरी ॥ ११ ॥ गजेंद्र स्मरे राम राम । त्यासी पाववी वैकुंठधाम ॥ १२ ॥ तुका म्हणे हरिरूप झाले । पुन्हा जन्मा नाहीं आले ॥ १३ ॥

२५२१. भक्तकरुणा बहुत तुझिया अंतरा । मज विश्वंभरा कळों आलें ॥ धृ. ॥ पक्षीयासी तुझें नाम जें ठेविलें । तयें उद्धरिलें गणिकेसी ॥ २ ॥ कुंटिणी ते दोष बहु आचरली । नाम घेतां आली करुणा तुज ॥ ३५ ॥ हृदय कोमळ तुझें नारायणा । ऐसें बहुतां जना तारियलें ॥ ४ ॥ तुका म्हणे सीमा नाहीं तुझे दये । कोमल हृदय पांडुरंगा ॥ ५ ॥

२५२२. सर्वसुखा अधिकारी । मुखें उच्चारी हरिनाम ॥ १ ॥ सर्वांगीं तो सर्वोत्तम । मुखीं नाम हरीचें ॥ २ ॥ ऐशी उभविली बाहे । वेदीं पाहें पुराणीं ॥ ३ ॥ तुका म्हणे येथे कांहीं । संदेह नाहीं भरंवसा ॥ ४ ॥

२५२३. धन्य दिवस आजि डोळियां लाधला । आनंद देखिला धणीवरी ॥ १ ॥ धन्य झालें मुख निवाली रसना । नाम नारायणा घोष करी ॥ २ ॥ धन्य हें मस्तक सर्वांगा शोभलें । संतांची पाउलें लागताती ॥ ३ ॥ धन्य आजि पंथे चालती पाउलें । टाळिया शोभले कर दोन्ही ॥ ४ ॥ धन्य तुका म्हणे आम्हांसी फावलें । पावलों पाउलें विठोबाचीं ॥ ५ ॥

२५२४. काय करितील केलीं नित्य पापें । वसे नाम ज्यापें विठोबाचें ॥ १ ॥ तृणीं हुताशन लागतां ते रासी । जळतील तैसीं क्षणमात्रें ॥ २ ॥ विष्णुमूर्तिपाद पाहतां चरण । तेथें कर्म कोण राहूं शंके ॥ ३ ॥ तुका म्हणे नाम जाळी महादोष । जेथें होय घोष कीर्तनाचा ॥ ४ ॥

२५२५. फोडिलीं भांडारें । माप घेऊनियां खरें ॥ १ ॥ केली हरिनामाची वरी । मागील तें आतां सरी ॥ २ ॥ देशांत सुकाळ । झाला हारपला काळ ॥ ३ ॥ घ्यावें धणीवरी । तुका म्हणे लहान थोरीं ॥ ४ ॥

२५२६. लागलें भरतें । विठुवानंदाही वरते ॥ १ ॥ झाला हरिनामाचा तारा । शीड लागलें फरारा ॥ २ ॥ बैसोनि सकळ । बाळ चालिले गोपाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे वाट । बरवी सांपडली नीट ॥ ४ ॥ 

२५२७. सत्य साच खरें । नाम विठोबाचें बरें ॥ १ ॥ येणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीर्ति जेणें ॥ २ ॥ भाव ज्याचे गांठी । न्यासी लाभ उठाउठी ॥ ३ ॥ तुका म्हणे भोळा । जिंकू जाणे कळिकाळा ॥ ४ ॥

२५२८. तुटे भवरोग । संचितक्रियमाणभाेग ॥ १ ॥ ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ २ ॥ बसों न शके पाप । जाय विविध तो ताप ॥ ३ ॥ तुका म्हणे माया । होय दासी लागे पायां ॥ ४ ॥

२५२९. नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥ १ ॥ रसना येरा रसां विटें । घेतां घोटें अधिक हें ॥ २ ॥ आणिकां रसें मरण गांठी । येणें तुटी संसारे ॥ ३ ॥ तुका म्हणे आहार जाला । हा विठ्ठल आम्हांसी ॥ ४ ॥

२५३०. निजल्यानें गातां उभा नारायण । बैसल्या कीर्तन करितां डोले ॥ १ ॥ उभा राहोनियां मुखीं नाम वदे । नाचे हा गोविंद नाना छंदें ॥ २ ॥ मारगीं चालतां मुखीं नाम वाणी । उभा चक्रपाणी मागें पुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमें घाली उडी नामासाठीं ॥ ४ ॥

२५३१. करील तें काय नव्हे विश्वंभर । सेवकां दरिद्र लाज नाहीं ॥ १ ॥ मजपासूनि हें पडिले अंतर । काय तों अव्हेर करूं जाणे ॥ २ ॥ नामाच्या चिंतनें नाशी गर्भवास । नेदी करू आस आणिकांची ॥ ३ ॥ तुका म्हणे नेणाें किती वायां गेले । तयां उद्धरिले पांडुरंगें ॥ ४ ॥

२५३२. ज्याचे गर्जता पवाडे । कळिकाळ पायां पडे ॥ १ ॥ तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौं अठरा जणां ॥ २ ॥ चिंतितां जयासी । भुक्तिमुक्ति कामारी दासी ॥ ३ ॥ वैकुंठासी जावें । तुका म्हणे ज्याच्या नांवें ॥ ४ ॥

२५३३. नाम घेतां कंठ शीतळ शरीर । इंद्रियां व्यापार नाठवती ॥ १ ॥ गोड हें गोमटें अमृतासी वाड । केला कईवाड माझ्या चित्तें ॥ २ ॥ प्रेमरसें झाली पुष्ट अंगकांति । त्रिविध नासती ताप क्षणें ॥ ३ ॥ तुका म्हणे तेथें विकाराची मात । बोलों नये हित सकळांचें ॥ ४ ॥

२५३४. मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांची ॥ १ ॥ वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥ २ ॥ भस्म दंड नलगे काठी । तीर्थां आटी भ्रमण ॥ ३ ॥ तुका म्हणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥ ४ ॥

२५३५. विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साठीं वाचा ॥ १ ॥ कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ २ ॥ न पाहे शिदोरी । जाती कुळ न विचारी ॥ ३ ॥ तुका म्हणे भेटी । हाक देतां उठाउठी ॥ ४ ॥

२५३६. हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥ १ ॥ त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ २ ॥ नसो भाव चित्तीं । हरीचे गुण गातां गीतीं ॥ ३ ॥ करी अनाचार । वाचे हरिनामउच्चार ॥ ४ ॥ हो कां भलतें कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥ ५ ॥ म्हणवी हरीचा दास । तुका म्हणे धन्य त्यास ॥ ६ ॥

२५३७. भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवां रे आतां नारायण ॥ १ ॥ येणें एक केलें अवघें होय सांग । अच्युताचा योग नाम छंदें ॥ २ ॥ भोवरें खळाळ चोर वाटा घेती । पावलें मारिती सिंवेपाशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें भावेंविण पार । नपविजे सार हेंचि आहे ॥ ४ ॥

२५३८. जेथें आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥ १ ॥ रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चित्त ते ते घडी ॥ २ ॥ धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहातां संकल्प गोविंदाचे ॥ ३ ॥ तुका म्हणे लाभकाळ तेंचि जिणे । भाग्य नारायण उत्तम ते ॥ ४ ॥

२५३९. कस्तुरीचें रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया ॥ १ ॥ आणीकही तैसी चंदनाचीं झाडें । परिमळें वाढे मोल तयां ॥ २ ॥ काय रूपें असे परीस चांगला । धातु केली मोला वाढ तेणें ॥ ३ ॥ फिरंगी आटितां नये बारा रूके । गुणें माेलें विके सहस्रवरी ॥ ४ ॥ तुका म्हणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तोचि धन्य ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२५४०. कंठीं नामशिक्का । आतां कळिकाळासी धक्का ॥ १ ॥ रोखा माना कीं शिक्का माना । रोखा शिक्का तत्समाना ॥ २ ॥ रोखा न मना शिक्का न मना । जतन करा नाककाना ॥ ३ ॥ शिक्का न मनी रावण । त्याचें केलें निसंतान ॥ ४ ॥ शिक्का मानी हळाहळ । झाले सर्वांग शीतळ ॥ ५ ॥ तुका म्हणे नाम शिक्का । पटीं बैसविलों निजसुखा ॥ ६ ॥

२५४१. न करा टांचणी । येथें कांहीं आडचणी ॥ १ ॥ जिव्हा अमुप करी माप । विठ्ठल पिकला माझा बाप ॥ २ ॥ आठही प्रहर । बारा मास निरंतर ॥ ३ ॥ तुका म्हणे वाणी । वर्जेना हे घेतां धणी* ॥ ४ ॥

२५४२. भोळे भक्त भाव धरिती मानसीं । त्यांसी हृषीकेशी जवळीच ॥ १ ॥ भाव नाहीं मनीं अभाविक सदा । त्याचिया खेदा काय सांगो ॥ २ ॥ गणिकेसारिखीं नामें उद्धरिलीं । सज्ञानें पडिलीं खटाटोपीं ॥ ३ ॥ तुका म्हणे काय शुद्ध माझी याती । थोर केली ख्याती हरिनामें ॥ ४ ॥

२५४३. आविसाचिये आशा गळ गिळी मासा । फुटाेनिया घसा मरण पावें ॥ १ ॥ मरणाचं वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥ २ ॥ अंतकाळीं ज्याच्या नाम आलें मुखा । तुका म्हणे सुखा पार नाहीं ॥ ३ ॥ (धृ. नाही) 

२५४४. पवित्र तें अन्न । हरिचिंतनीं भोजन ॥ १ ॥ येर वेठ्या पोट भरी । चाम मसकाचे परी ॥ २ ॥ जेऊनियां ताेचि धाला । हरिचिंतनीं केला काला ॥ ३ ॥ तुका म्हणे चवी आलें । जें कां मिश्रित विठ्ठलें ॥ ४ ॥

२५४५. लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें ॥ १ ॥ हें तों असाध्य जी सर्वत्र या जना । भलें नारायणा आळवितां ॥ २ ॥ कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्व विषयजात ॥ ३ ॥ कर्म उसंतावें चालतां पाउलीं । होय जो राहिली देहबुद्धि ॥ ४ ॥ भक्ती तें नमावे जीवजंतुभूत । शांतवूनि ऊत कामक्रोध ॥ ५ ॥ तुका म्हणे साध्य साधन अवघड । देतां हें सांकडे देह बळी ॥ ६ ॥

२५४६. देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ति । तया इच्छा गति । हेंचि सुख आगळें ॥ १ ॥ या या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धिसिद्धि द्वारीं । कर जोडुनि तिष्ठती ॥ २ ॥ नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा नास । अद्भुत हा रस । कथाकाळीं नामाचा ॥ ३ ॥ तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळें मेघश्यामा । तुका म्हणे आम्हां । जन्म गोड यासाठीं ॥ ४ ॥

२५४७. पुढे गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥ १ ॥ वंदु चरणरज सेऊं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करूनियां ॥ २ ॥ अमुप हें गांठी बांधू भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हा जोगा ॥ ३ ॥ अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥ ४ ॥ जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥ ५ ॥ तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥ ६ ॥ 

२५४८. नामाची आवडी ताेचि जाणा देव । न धरीं संदेह कांहीं मनीं ॥ १ ॥ ऐसें मी हें नाहीं बोलत नेणतां । आणोनि संमता संतांचिया ॥ २ ॥ नाम म्हणे तया आणीक साधन । ऐसें हें वचन बोलों नये ॥ ३ ॥ तुका म्हणे सुख पावे या वचनीं । ज्याचीं शुद्ध दोन्ही मायबापें ॥ ४ ॥ 

२५४९. आलें फळ तेव्हां राहिले पिकाेन । जरी तें जतन होय देंठीं ॥ १ ॥ नामेंचि सिद्धि नामेंचि सिद्धि । व्यभिचारबुद्धि न पवतां ॥ २ ॥ चालिला पंथ तो पाववील ठाया । जरी आड तया नये कांहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हानि लाभ ॥ ४ ॥

२५५०. प्रेम तेथें वास करी । मुखीं उच्चारितां हरि ॥ धृ. ॥ प्रेमें यावें तया गांवा । चाेजवीत या वैष्णवां ॥ २ ॥ प्रेम पाठीं लागें बळें । भक्त देखोनियां भाेळे ॥ ३ ॥ प्रेम नवजे दवडितां । शिरे बळें जेथें कथा ॥ ४ ॥ तुका म्हणे थोर आशा । प्रेमा घरीं विष्णुदासां ॥ ५ ॥

२५५१. अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हें पाक घरोघरीं ॥ १ ॥ आपुलालें तुम्ही करारे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ २ ॥ देखोनि जीवन जरि जाय तहान । तरि कां सांठवण घरोघरीं ॥ ३ ॥ देखोनियां छाया सुख न पवीजे । जंव न बैसीजे तया तळीं ॥ ४ ॥ हित तरी होय गातां आइकतां । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥ ५ ॥ तुका म्हणे होसी भावेंचि तूं मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची ॥ ६ ॥

२५५२. हेंचि माझें तप हेंचि माझें दान । हेंचि अनुष्ठान नाम तुझें ॥ १ ॥ हेंचि माझें तीर्थ हेंचि माझें व्रत । सत्य हें सुकृत नाम तुझें ॥ २ ॥ हेंचि माझें कर्म हाचि माझा धर्म । हाचि नित्यनेम नाम तुझें ॥ ३ ॥ हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ । हेंचि तप ध्यान नाम तुझें ॥ ४ ॥ हाचि कुळाचार हाचि कुळधर्म । हाचि नित्यनेम नाम तुझें ॥ ५ ॥ हा माझा आचार हा माझा विचार । हा माझा निर्धार नाम तुझें ॥ ६ ॥ तुका म्हणे दुजे सांगायासी नाहीं । नामेंविण कांहीं धनवित्त ॥ ७ ॥ (धृ. नाही )

२५५३. विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे म्हणती ॥ १ ॥ तेंचि सुकृताचें फंळ । वाचा रामनामें निखळ ॥ २ ॥ बैसाेनी हरिकथेसी । होय सावध चित्तासी ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याचा जन्म । सुफळ झाला भवश्रम ॥ ४ ॥

२५५४. प्राणिया एक बीजमंत्र उच्चारी । प्रतिदिनीं रामकृष्ण म्हण कां मुरारी ॥ १ ॥ हेंचि साधन रे तुज सर्व सिद्धींचें । नाम उच्चारी रे गोपाळाचें वाचें ॥ २ ॥ उपास पारणें न लगे वनसेवन । नलगे धुम्रपान पंचाग्नितापणें ॥ ३ ॥ सुखाचें फुकाचें कांहीं न वेचे भांडार । कोटियज्ञांपरिस तुका म्हणे हें सार ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...