Saturday, 3 May 2025

२२. संतमहिमा वर्णन

श्री तुकोबाराय यांनी संतांच्या अकृत्रिम प्रेमाचे वर्णन केले तसेच संतमहिमा गायिला, त्याविषयीचे अभंग. 

संतमहिमा वर्णन (अभंग संख्या २२८) 

२१७४. श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करी दंडवत ॥ १ ॥ विश्रांती पावलों सांभाळा उत्तरीं । वाढले अंतरीं प्रेमसुख ॥ २ ॥ डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥ ३ ॥ तुका म्हणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा वोढवला ॥ ४ ॥ 

२१७५. अर्भकाचे साठीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥ १ ॥ तैसे संत जगीं । क्रिया करूनि दाविती अंगीं ॥ २ ॥ बाळकाचे चाली । माता जाणुनि पाऊल घाली ॥ ३ ॥ तुका म्हणे नांव । जनासाठीं उदकीं ठाव ॥ ४ ॥

२१७६. अवघा तो शकुन । हृदयीं देवाचें चिंतन ॥ १ ॥ येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ २ ॥ छंद हरीच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे हरीच्या दासां । शुभ काळ अवघ्या दिशा ॥ ४ ॥

२१७७. आम्हां सोयरे हरिजन । जनीं भाग्य निकिंचन ॥ १ ॥ ज्यांच्या धैर्या नाहीं भंग । भाव एकविध रंग ॥ २ ॥ भूकें तहानें चित्तीं । सदा देव आठविती ॥ ३ ॥ तुका म्हणे धन । ज्यांचें निज नारायण ॥ ४ ॥

२१७८. अंगें अनुभव जाला मज । संतरजचरणांचा ॥ १ ॥ सुखी जालों या सेवनें । दुःख नेणें यावरी ॥ २ ॥ निर्माल्याचें तुळसीदळ । विष्णुजळ चरणींचें ॥ ३ ॥ तुका म्हणे भावसार । करूनि फार मिश्रित ॥ ४ ॥

२१७९. आले संत पाय ठेविती मस्तकीं । इहीं उभयलोकीं सरता केलों ॥ १ ॥ वंदीन पाउलें लोळेन चरणीं । आजि इच्छाधणीं फिटईल ॥ २ ॥ अवघीं पूर्व पुण्यें जालीं सानुकूळ । अवघेंचि मंगळ संतभेटी ॥ ३ ॥ तुका म्हणे कृतकृत्य जालों देवा । नेणें परी सेवा डोळां देखें ॥ ४ ॥

२१८०. आम्हीं नाचों तेणें सुखें । वाहूं टाळी गातों मुखें ॥ १ ॥ देव कृपेचा कोंवळा । शरणागता पाळी लळा ॥ २ ॥ आम्हां जाला हा निर्धार । मागें तारिलें अपार ॥ ३ ॥ तुका म्हणे संतीं । वर्म दिलें आम्हां हातीं ॥ ४ ॥

२१८१. आलिंगन घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥ १ ॥ ऐसा संतांचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ २ ॥ तीर्थें पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥ ४ ॥

२१८२. आजिचें हें मज तुम्हीं कृपादान । दिले संतजन मायबापीं ॥ १ ॥ आलीं मुखावाटे अमृतवचनें । उत्तीर्णता येणें नव्हे जन्में ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्हीं उदार कृपाळ । शृंगारिलें बाळ कवतुकें ॥ ३ ॥

२१८३. आवडीची न पुरे धणी । प्रीत मनीं बैसलीं ॥ १ ॥ नित्य नवा कळवळा । मायबाळामध्यें तो ॥ २ ॥ सुख सुखा भेटों आलें । होय वाल्हें पोटींचें ॥ ३ ॥ तुका म्हणे ब्रह्मानंदें । संतवृंदें चरणापें ॥ ४ ॥

२१८४. अग्निमाजी गेलें । अग्नि होऊन तेंच ठेलें ॥ १ ॥ काय उरलें तया पण । मागील तें नाम गुण ॥ २ ॥ लोह लागे परिसा अंगीं । तोही भूषण जाला जगीं ॥ ३ ॥ सरिता ओहळा ओघा । गंगें मिळोनि जाल्या गंगा ॥ ४ ॥ चंदनाच्या वासें । तरु चंदन जाले स्पर्शें ॥ ५ ॥ तुका जवळा संतां पायीं । दुजेपणा ठाव नाहीं ॥ ६ ॥

२१८५. ऐशा भाग्यें ज्यालों । तरी धन्य जन्मा आलों ॥ १ ॥ रुळें तळील पायरी । संत पाय देती वरी ॥ २ ॥ प्रेमामृतपान । होईल चरणरजें स्नान ॥ ३ ॥ तुका म्हणे सुखें । तयां हरतील दुःखें ॥ ४ ॥

२१८६. एका हातीं टाळ एका हातीं चिपळिया । घालिती हुंबरी एक वाहाताती टाळिया ॥ १ ॥ मातले वैष्णव नटती नाना छंदें । नाहीं मोक्षपदीं चाड भजनीं आवडी ॥ २ ॥ हाका आरोळिया गीत वाद्य सुखसोहळे । जाय ते न कळे केव्हां रजनीं दिवस ॥ ३ ॥ तीर्थीं नाहीं चाड नलगे जावे वनांतरा । तुका म्हणे हरिहरात्मकचि पृथिवी ॥ ४ ॥

२१८७. ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शनें तुटे भवबंधु । जे कां सच्चिदानंदी नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थवंद्यु रे ॥ धृ. ॥ भाव सर्व कारण मूळ बंदु । सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु । भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र समकरी बंधु रे ॥ २ ॥ मन बुद्धि काया वाचा शुद्ध करी । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं । लघुत्व सर्व भावें अंगीकारीं । सांडी मांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥ ३ ॥ अर्थकामचाड नाहीं चित्ता । मानामान मोह माया मिथ्या । वर्तें समाधानी जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥ ४ ॥ मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥ ५ ॥

२१८८. ऐसा ज्याचा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥ १ ॥ देव तयां जवळी असे । पाप नासे दर्शनें ॥ २ ॥ कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥ ३ ॥ तुका म्हणे भेदाभेद । गेला वाद खंडोनि ॥ ४ ॥

२१८९. उदकीं कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयानें ॥ १ ॥ उद्धारासी ठाव नाहीं भाग्यहीना । विन्मुख चरणा संतांचिया ॥ २ ॥ दुखवी तो बुडे सांगडीचा तापा । अतित्याई पापाचीच मूर्ति ॥ ३ ॥ तुका म्हणे जेव्हां फिरतें कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥ ४ ॥

२१९०. उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥ १ ॥ संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ २ ॥ संपुष्ट हें हृदयपेटी । करूनि पोटीं सांठवूं ॥ ३ ॥ तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥ ४ ॥

२१९१. करणें तें देवा । हेचि एक पावे सेवा ॥ १ ॥ अवघें घडे येणें सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ २ ॥ हेंचि एक वर्म । काय बोलिलों तो धर्म ॥ ३ ॥ तुका म्हणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥ ४ ॥ 

२१९२. करितां या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥ १ ॥ माथां पडती संतपाय । सुख कैवल्य तें काय ॥ २ ॥ ऐसा लाभ नाहीं । दुजा विचारितां कांहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे गोड । तेथें पुरे माझें कोड ॥ ४ ॥

२१९३. कां नवजावें बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥ १ ॥ म्हणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥ २ ॥ कथे कांहीं अणुमात्र । न बोलावा हा वृत्तांत । देवभक्तां चित्त । समरसीं खंडणा ॥ ३ ॥ कां वैष्णव पूजावे । ऐका घेईल जो भावें । चरणरजा शिवें । वोढविला मस्तक ॥ ४ ॥ ऐसें जाणा हो निभ्रांत । देव वैष्णवांचा अंकित । अलिप्त अतीत । परमित त्यासाठीं ॥ ५ ॥ घालोनि लोळणी । तुका आला लोटांगणीं । वंदी पायवणी । संतचरणींचें माथां ॥ ६ ॥

२१९४. काय माझी संत पाहती जाणीव । सर्व माझा भाव त्यांचे पायीं ॥ १ ॥ कारण सरतें करा पांडुरंगीं । भूषणाची जगीं काय चाड ॥ २ ॥ बोबड्या उत्तरीं म्हणे हरिहरि । आणीक भिकारी नेणें दुजें ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हीं विठ्ठलाचे दास । करितों मी आस उच्छिष्टाची ॥ ४ ॥

२१९५. काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसे ॥ धृ. ॥ थोरीव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ २ ॥ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती परोपकारें ॥ ३ ॥ भूतांची दया हें भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें स्रवतसे ॥ ५ ॥

२१९६. काय सांगों आतां संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥ १ ॥ काय द्यावें त्यांसी व्हावें उतराई । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ २ ॥ सहज बोलणें हित उपदेश । करूनि सायास शिकविती ॥ ३ ॥ तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत ॥ ४ ॥

२१९७. कुळींची हे कुळदेवी । केली ठावी संतांनीं ॥ १ ॥ बरवें जाले शरण गेलों । उगविलों संकटीं ॥ २ ॥ आणिला ही रूपा बळें । करूनि खळें हरिदासीं ॥ ३ ॥ तुका म्हणे समागमें । नाचों प्रेमें लागलों ॥ ४ ॥

२१९८. केला कईवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥ १ ॥ काय जीवित्वाची धरूनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणें ॥ २ ॥ अबाळीनें जावें निश्चिंतीच्या ठायां । रांडा रोटा वांयां करूं नये ॥ ३ ॥ तुका म्हणे बळी देतां तें निधान । भिकेसाठी कोण राज्य देतो ॥ ४ ॥

२१९९. कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥ १ ॥ अणुरेणु सूक्ष्मस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्याही खुंटलिया ॥ २ ॥ फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तरुवरास अनेक किती ॥ ३ ॥ दाविले अनंतें अर्जुनासि पोटीं । आणीक त्या सृष्टि कृष्ण लोक ॥ ४ ॥ तुका म्हणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥ ५ ॥

२२००. कोणा पुण्या फळ आलें । आजि देखिलीं पाउलें ॥ १ ॥ ऐसें नेणों नारायणा । संतीं सांभाळिलें दीना ॥ २ ॥ कोण लाभ काळ । दिन आजिचा मंगळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जाला । एवढा लाभ का विठ्ठला ॥ ४ ॥

२२०१. कोण पुण्ये यांचा होईन सेवक । जीहीं द्वंद्वादिक दुराविलें ॥ १ ॥ ऐसीं वर्में मज दावीं नारायणा । अंतरींच्या खुणा प्रकटोनि ॥ २ ॥ बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥ ३ ॥ तुका म्हणे मग नये वृत्तीवरी । सुखाचे शेजारीं पहुडईन ॥ ४ ॥ 

२२०२. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हेंचि कृपादान तुमचें मज ॥ १ ॥ आठवण तुम्हीं द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ २ ॥ अनाथ अपराधी पतित आगळा । परी पायांवेगळा नका करूं ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी । मग मज हरि उपेक्षीना ॥ ४ ॥

२२०३. खळा सदा क्षुद्र दृष्टी । करी कष्टी सज्जना ॥ १ ॥ करिती आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥ २ ॥ दया संता भांडवल । वेची बोल उपकार ॥ ३ ॥ तुका म्हणे आपुलालें । उसंतिलें ज्यांनी तें ॥ ४ ॥

२२०४. गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥ १ ॥ रवि दीप काळिमा काय जाणे हिरा । आणिकां तिमिरा नाश तेणें ॥ २ ॥ कर्पूरकांडणी काय कोंडा कणी । सिंधू मेळवणी काय चाले ॥ ३ ॥ परिस चिंतामणि आणिकाचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥ ४ ॥ तुका म्हणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२२०५. चिंतनें सरे तो धन्य धन्य काळ । सकळ मंगळ मंगळाचें ॥ १ ॥ संवसारसिंधु नाहीं हरिदासां । गर्भवास कैसा नेणती ते ॥ २ ॥ जनवन ऐसें कृपेच्या सागरें । दाटला आभारें पांडुरंग ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा भक्तांचें बंधन । दाखविलें भिन्न परी एक ॥ ४ ॥

२२०६. चिंता नाहीं गांवीं विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा ॥ १ ॥ नारायण घरीं सांठविलें धन । अवघेचि वाण तया पोटीं ॥ २ ॥ सवंग सकळां पुरे धणीवरी । सेवावया नारी नर बाळा ॥ ३ ॥ तुका म्हणे येणें आनंदी आनंदु । गोविंदें गोविंदु पिकविला ॥ ४ ॥

२२०७. जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥ १ ॥ तुम्हीं सांभाळिलें संतीं । भय निरसली खंतीं ॥ २ ॥ कृतकृत्य जालों । इच्छा केली ते पावलों ॥ ३ ॥ तुका म्हणे काळ । आतां करूं न शके बळ ॥ ४ ॥

२२०८. जिचें पीडे बाळ । प्राण तियेचा विकळ ॥ १ ॥ ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥ २ ॥ सुखाची विश्रांती । उमटे मातेचिये चित्तीं ॥ ३ ॥ तुका म्हणे संत । तुम्ही बहु कृपावंत ॥ ४ ॥

२२०९. जुंझार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्या ॥ १ ॥ गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनीं बैसलासे ॥ २ ॥ उर्ध्वपुंड्र भाळ कंठीं शोभे माळ । कांपिजे कळिकाळ तया भेणें ॥ ३ ॥ तुका म्हणे शंखचक्रांचे शृंगार । नामामृत सार मुखामाजी ॥ ४ ॥

२२१०. जे कां रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ॥ १ ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥ २ ॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनांचें चित्त ॥ ३ ॥ ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि धरी जो हृदयीं ॥ ४ ॥ दया करणें जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥ ५ ॥ तुका म्हणे सांगूं किती । तोचि भगवंताची मूर्ति ॥ ६ ॥

२२११. जें ज्यांचें जेवण । तेंचि याचकांसी दान ॥ १ ॥ आतां जाऊं चोजवीत । जेथें वसतील संत ॥ २ ॥ होतीं धालीं पोटें । मागें उरलीं उच्छिष्टें ॥ ३ ॥ तुका म्हणे धांव । पुढें खुंटईल हांव ॥ ४ ॥

२२१२. तीर्थाटणे एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥ १ ॥ तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ २ ॥ अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा तें गौरव पूज्य व्हावें ॥ ३ ॥ तुका म्हणे विधिनिषेधाचे डोहीं । पडलें त्यां नाहीं देव कधीं ॥ ४ ॥

२२१३. तुम्हीं पाय संतीं । माझे ठेवियले चित्तीं ॥ १ ॥ आतां बाधूं न शके काळ । जाली विषमें शीतळ ॥ २ ॥ भय नाहीं मनीं । देव वसे घरीं रानीं ॥ ३ ॥ तुका म्हणे भय । आम्हां स्वप्नीं तेंही नये ॥ ४ ॥

२२१४. तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ति वाणूं ॥ १ ॥ अवतार तुम्हां धराया कारण । उद्धरावे जन जड जीव ॥ २ ॥ वाढावया सुख भक्ति भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे गुण चंदनाचें अंगीं । तैसे तुम्ही जगीं संतजन ॥ ४ ॥

२२१५. तेंच किती वारंवार । बोलों फार बोलिलें ॥ १ ॥ आतां माझे दंडवत । तुमच्या संत चरणांसी ॥ २ ॥ आवडी तें नीच नवी । जाली जीवीं वसती ॥ ३ ॥ तुका म्हणे बरवें जालें । घरा आलें बंदरीचें ॥ ४ ॥

२२१६. ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥ १ ॥ येरा मान विधिपाळणापुरते । देवाचीं तीं भुतें म्हणोनियां ॥ २ ॥ सर्वभावें जालों वैष्णवांचा दास । करीन त्यांची आस उच्छिष्टाची ॥ ३ ॥ तुका म्हणे जैसे आवडती हरिदास । तैसी नाहीं आस आणिकांची ॥ ४ ॥

२२१७. तृषाकाळीं उदक भेटी । पडे मिठी आवडीची ॥ १ ॥ ऐसियाचा हो कां संग । जिवलग संतांचा ॥ २ ॥ मिष्टान्नाचा योग भुके । म्हणतां चुके पुरेसें ॥ ३ ॥ तुका म्हणे माते बाळा । कळवळा भेटीचा ॥ ४ ॥

२२१८. दसरा दिवाळी तोचि माझा सण । सखे हरिजन भेटतील ॥ १ ॥ अमुप जोडिल्या पुण्याचिया राशी । पार त्या सुखासी नाहीं लेखा ॥ २ ॥ धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥ ३ ॥ तुका म्हणे काय होऊं उतराई । जीव ठेवूं पायीं संतांचिये ॥ ४ ॥

२२१९. दास जालों हरिदासांचा । बुद्धिकायामनें वाचा ॥ १ ॥ तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंगकल्लोळ । नासे दुष्टबुद्धि सकळ । समाधि हरिकीर्तनीं ॥ २ ॥ ऐकतां हरिकथा । भक्ति लागे त्या अभक्तां ॥ ३ ॥ देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ॥ ४ ॥ हें सुख ब्रह्मांदिका । नाहीं नाहीं म्हणे तुका ॥ ५ ॥

२२२०. दासां सर्वकाळ । तेथें सुखाचा कल्लोळ ॥ १ ॥ जेथें वसती हरीचे दास । पुण्य पिके पापा नास ॥ २ ॥ फिरे सुदर्शन । घेऊनियां नारायण ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं । होय म्हणियारा कामारी ॥ ४ ॥

२२२१. देवाचा भक्त तो देवासीच गोड । आणिकांसी चाड नाहीं त्याची ॥ धृ. ॥ कवणाचा सोइरा नव्हेच सांगाती । अवघियां हातीं अंतरला ॥ २ ॥ निष्काम वेडें म्हणती बापुडें । अवघियां सांकडें जाला कैसा ॥ ३ ॥ माझें ऐसें तया न म्हणती कोणी । असे रानीं वनीं भलते ठायीं ॥ ४ ॥ प्रातः स्नान करी विभूतिचर्चन । देखोनियां जन निंदा करी ॥ ५ ॥ कंठीं तुळसीमाळा बैसोनि निराळा । म्हणती या चांडाळा काय जालें ॥ ६ ॥ गातां शंका नाहीं बैसे भलतें ठायीं । शिव्या देती आईबाप भाऊ ॥ ७ ॥ घरीं बाइल म्हणे कोठें व्याली रांड । बरें होतें षंढ मरता तरी ॥ ८ ॥ जन्मोनि जाला अवघियां वेगळा । म्हणोनि गोपाळा दुर्लभ तो ॥ ९ ॥ तुका म्हणे जो संसारा रुसला । तेणेंचि ठाकिला सिद्धपंथ ॥ १० ॥

२२२२. देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥ १ ॥ भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ २ ॥ देवें भक्तां रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥ ३ ॥ एका अंगीं दोन्ही झालीं हे निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥ ४ ॥ तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तोचि देव देव भक्त ॥ ५ ॥

२२२३. धन्य काळ संतभेटी । पायीं मिठी पडली तो ॥ १ ॥ संदेहाची सुटली गाठी । जालों पोटीं शीतळ ॥ २ ॥ भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥ ३ ॥ तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहुनि ॥ ४ ॥

२२२४. धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥ १ ॥ येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठीं ॥ २ ॥ लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥ ३ ॥ मधुरा वाणी होटीं । तुका म्हणे वाव पोटीं ॥ ४ ॥

२२२५. धरावा तो बरा । ठाव वसतीचा थारा ॥ १ ॥ निजलिया जागविती । निज पुरवूनि देती ॥ २ ॥ एक वेवसाव । त्याचा संग त्यांचा जीव ॥ ३ ॥ हितें कळे हित । ग्वाही एक एकां चित्त ॥ ४॥ विषमाचें कांहीं । आड तया एक नाहीं ॥ ५ ॥ तुका म्हणे बरीं । घरा येतील त्यापरी ॥ ६ ॥

२२२६. न करावी स्तुति माझी संतजनीं । होईल या वचनीं अभिमान ॥ १ ॥ भारें भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥ २ ॥ तुका म्हणे गर्व पुरवील पाठी । होईल माझ्या तुटी विठोबाची ॥ ३ ॥

२२२७. नमावे पाय हें माझें उचित । आशीर्वादें हित तुमचिया ॥ १ ॥ कृपेचा वोरस न समाये पोटीं । म्हणोनि उफराटीं वचनें हीं ॥ २ ॥ तुमची उष्टावळी तें माझें भोजन । झाडावें अंगण केरपुंजे ॥ ३ ॥ परि ऐसें पुण्य नाहीं माझें गांठीं । जेणें पडे मिठी पायांसवें ॥ ४ ॥ तुका म्हणे राहे आठवण चित्तीं । ऐसी कृपा संतीं केली तुम्हीं ॥ ५ ॥ 

२२२८. न लगे चंदना पुसावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारूनि ॥ १ ॥ अंतरींचें धांवे स्वभावे बाहेरी । धरितांही परी आवरेना ॥ २ ॥ सूर्य नाहीं जागे करीत या जना । प्रकाशकिरणा कर म्हूण ॥ ३ ॥ तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥ ४ ॥

२२२९. नाचे टाळी पिटी । प्रेमें अंग धरणीं लोटी ॥ १ ॥ माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरिजन ॥ २ ॥ न धरिती लाज । नाहीं जनासवें काज ॥ ३ ॥ तुका म्हणे दाटे । कंठ नेत्रीं जळ लोटे ॥ ४ ॥

२२३०. नाहीं संतपण मिळत हें हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥ १ ॥ नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥ २ ॥ तुका म्हणे मिळे जिवाचिये साठीं । नाहीं तरी गोष्टी सांगों नये ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२२३१. नाहीं साजत हा मोठा । मज अळंकार खोटा ॥ १ ॥ असें तुमचा रजरेण । संतपायींची वाहाण ॥ २ ॥ नाहीं स्वरूपीं ओळखीं । भक्तिभाव करीं देखीं ॥ ३ ॥ नाहीं शून्याकारीं । क्षर ओळखी अक्षरीं ॥ ४ ॥ नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा तें काई ॥ ५ ॥ कांहीं नव्हे तुका । पायां पडेन हें ऐका ॥ ६ ॥

२२३२. परमेष्ठिपदा । तुच्छ मानिती सर्वदा ॥ १ ॥ हेंचि ज्यांचें धन । सदा हरीचें चिंतन ॥ २ ॥ इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥ ३ ॥ सार्वभौमराज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ॥ ४ ॥ पाताळींचे आधिपत्य । तें तों मानिती विपत्य ॥ ५ ॥ योगसिद्धिसार । त्यांसि वाटे तें असार ॥ ६ ॥ मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे तेंचि दुःख ॥ ७ ॥ तुका म्हणे हरीविण । त्यांसि वाटे अवघा शीण ॥ ८ ॥

२२३३. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्वकाळ ॥ १ ॥ तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील राशी‍ पातकांच्या ॥ २ ॥ देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥ ३ ॥ काय त्यां उरले वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥ ४ ॥ तुका म्हणे देवभक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥ ५ ॥

२२३४. पाप ताप दैन्य जाय उठाउठी । जालिया या भेटी हरिदासांची ॥ १ ॥ ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तप तीर्थ जगीं दान व्रत ॥ २ ॥ चरणींचें रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथीं ॥ ३ ॥ भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेदी पाव हात कांहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे मना जालें समाधान । देखिल्या चरण वैष्णवांचे ॥ ५ ॥

२२३५. पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । झालों सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों ॥ १ ॥ आजि फिटलें माझें कोडें । भवदुःखाचें सांकडें । कोंदाटलें पुढें । परब्रह्म सांवळें ॥ २ ॥ आलिंगनें संतांचिया । दिव्य झाली माझी काया । मस्तक हें पायां- । वरी त्यांच्या ठेवितां ॥ ३ ॥ तुका म्हणे धन्य झालों । सुखें संतांचिया धालों । लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥ ४ ॥

२२३६. पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांचीं नांवें ॥ १ ॥ नेघे माझी वाचा तुटी । महालाभ फुकासाठीं ॥ २ ॥ विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥ ३ ॥ तुका म्हणे पापें । जाती संतांचिया जपें ॥ ४ ॥

२२३७. पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥ १ ॥ कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें । शुभ होऊनियां ठाके ॥ २ ॥ प्रेमसुखाचिया राशी । पाप नाहीं ओखदासी ॥ ३ ॥ तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥ ४ ॥

२२३८. पूजा समाधान । अतिशय वाढे शीण ॥ १ ॥ हें तो जाणां तुम्ही संत । आहे बोलिली ती नीत ॥ २ ॥ पाहिजे तें केलें । सहज प्रसंगी घडलें ॥ ३ ॥ तुका म्हणे माथां । पायीं माझा तुम्हां संतां ॥ ४ ॥

२२३९. पूज्या पूज्यमान । कथे उभे हरिजन ॥ १ ॥ ज्याची कीर्ति वाखाणिती । तेथें ओतली ते मूर्ति ॥ २ ॥ देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥ ३ ॥ गेला अभिमान । लाज बोळविला मान ॥ ४ ॥ शोक मोह चिंता । यांची नेणती ते वार्ता ॥ ५ ॥ तुका म्हणे सखे । विठोबाचि ते सारिखे ॥ ६ ॥

२२४०. प्रमाण त्याच्या बोला। देव भक्ताचा अंकिला ॥ १ ॥ न पुसतां जातां नये । खालीं बैसतांही भिये । अवघा त्याचा होय । जीव भावासहित ॥ २ ॥ वदे उपचारें वाणी । कांहीं माग म्हणऊनि ॥ ३ ॥ उदासीनाच्या लागें । तुका म्हणे धांवें मागें ॥ ४ ॥

२२४१. प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धी देशकाळाची ॥ १ ॥ मुक्त लज्जाविरहित । भाग्यवंत हरिभक्त । जाले वोसंडत । नामकीर्ति पवाडे ॥ २ ॥ जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरीचे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस ॥ ३ ॥ हेचि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका म्हणे पाप । गांवीं नाहीं हरिजना ॥ ४ ॥

२२४२. बरवें देशाउर जालों । काय बोलें बोलावें ॥ १ ॥ लाभें लाभ दुणावला । जीव धाला दर्शनें ॥ २ ॥ भाग्यें जाली संतभेटी । आवडी पोटीं होती ते ॥ ३ ॥ तुका म्हणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥ ४ ॥

२२४३. बोलिलों जैसे बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ ॥ १ ॥ करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरी ॥ २ ॥ वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे पुढें अपराध नेणतां । द्यावा मज आतां ठाव पायीं ॥ ४ ॥

२२४४. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी । तरि कां हिंपुटीं वेदशास्त्रें ॥ धृ. ॥ शास्त्रांचें भांडण तप तीर्थाटन । पूर्वीचें भ्रमण याजसाठीं ॥ २ ॥ याजसाठीं जप याजसाठीं तप । व्यासेंही अमुप ग्रंथ केले ॥ ३ ॥ याजसाठीं संतपाय हे सेवावे । तरिच तरावें तुका म्हणे ॥ ४ ॥

२२४५. भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेलें आशापाश निवारूनि ॥ १ ॥ विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे जन धन माता पिता ॥ २ ॥ निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें । कांहींच सांकडें पडों नेदी ॥ ३ ॥ तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य । घातलिया भय नर्का जाणें ॥ ४ ॥

२२४६. भक्ताचा महिमा भक्तचि जाणती । दुर्लभ या गति आणिकांसी ॥ १ ॥ जाणोनि नेणते जाले तेणें सुखें । न बोलोनि मुखें बोलताती ॥ २ ॥ अभेदूनि भेद राखियेला अंगीं । वाढावया जगीं प्रेमसुख ॥ ३ ॥ टाळघोळ कथा प्रेमाचा सुकाळ । मूढ लोकपाळ तरावया ॥ ४ ॥ तुका म्हणे हें तों आहे तयांठावें । तिहीं एक्याभावें जाणीतला ॥ ५ ॥

२२४७. भक्तिसुखें जे मातले । ते कळिकाळा शूर जाले ॥ १ ॥ हातीं बाण हरिनामाचे । वीर गर्जति विठ्ठलाचे ॥ २ ॥ महा दोषां आला त्रास । जन्ममरणां केला नास ॥ ३ ॥ सहस्रनामाची आरोळी । एक एकाहुनि बळी ॥ ४ ॥ नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचें अंकित त्यावांचून ॥ ५ ॥ तुका म्हणे त्यांच्या घरीं । मोक्षसिद्धी या कामारी ॥ ६ ॥

२२४८. भाग्यवंता हेंचि जोडी । परवडी संतांची ॥ १ ॥ धन घरीं पांडुरंग । अभंग जें सरेना ॥ २ ॥ जनाविरहित हा लाभ । टांचें नभ सांठवणें ॥ ३ ॥ तुका म्हणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी ॥ ४ ॥ 

२२४९. भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥ १ ॥ आले आले वैष्णववीर । काळ कांपती असुर ॥ २ ॥ गरुडटकयाच्या भारें । भूमी गर्जे जयजयकारें ॥ ३ ॥ तुका म्हणे काळ । पळे देखोनियां बळ ॥ ४ ॥

२२५०. भावबळें विष्णुदास । नाहीं नाश पावत ॥ १ ॥ योगभाग्यें घरा येती । सर्व शक्ति चालत ॥ २ ॥ पित्याचें जें काय धन । पुत्रा कोण वंचील ॥ ३ ॥ तुका म्हणे कडे बैसों । तेणें असों निर्भर ॥ ४ ॥

२२५१. मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥ १ ॥ जातीचें तें झुरे येरयेरासाठीं । वियोगेंही तुटी नेघे कधीं ॥ २ ॥ भेटीची अपेक्षा वारता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥ ३ ॥ तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । सोईरे हरिजन प्राणसखे ॥ ४ ॥

२२५२. माउलीची चाली लेंकराचे ओढी । तयालागीं काढी प्राण प्रीति ॥ १ ॥ ऐसी बळिवंत आवडी जी देवा । संतमहानुभावा विनवितों ॥ २ ॥ मोहें मोहियेलें सर्वकाळ चित्त । विसरु तो घेत नाहीं क्षण ॥ ३ ॥ तुका म्हणे दिला प्रेमाचा वोरस । सांभाळिले दास आपुले ते ॥ ४ ॥

२२५३. माझिये जातीचें मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥ १ ॥ आवडे ज्या हरि अंतरापासूनि । ऐसियांचे मनीं आर्त माझे ॥ २ ॥ तयालागीं जीव होतो कासावीस । पाहातील वास नयन हे ॥ ३ ॥ सुफळ हा जन्म होईल तेथून । देतां आलिंगन वैष्णवांसीं ॥ ४ ॥ तुका म्हणे तोचि सुदिन सोहळा । गाऊं या गोपाळा धणीवरी ॥ ५ ॥

२२५४. मातेचिये चित्तीं । अवघी बाळकाची व्याप्ति ॥ १ ॥ देह विसरे आपुला । जवळी घेतां सीण गेला ॥ २ ॥ दावी प्रेमभातें । आणि अंगावरी चढतें ॥ ३ ॥ तुका संतांपुढें । पायीं झोंबे लाडें कोडें ॥ ४ ॥

२२५५. माझीया मीपणावरी पडो पाषाण । जळो हें भूषण नाम माझें । पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥ १ ॥ काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख । नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती डोळां माझें मुख ॥ २ ॥ काया वाचा मनें अघटित करणें । चर्म चक्षु हात पाय । निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणिक सांगों किती काय ॥ ३ ॥ लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदाभेद । पितृवचनीं घडली अवज्ञा अविचार । कुटिळ कुचरवादी निंद्य ॥ ४ ॥ आणीक किती सांगों तें अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन । भूतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट शब्दहीन ॥ ५ ॥ संत महानुभाव ऐका हें उत्तर । अवगुण अविचार वृद्धि पापा । तुका म्हणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ॥ ६ ॥

२२५६. मायेवरी सत्ता आवडीची बाळा । संकोचोनि लळा प्रतिपाळी ॥ १ ॥ अपराध माझे न मनावें मनीं । तुम्ही संतजनीं मायबापीं ॥ २ ॥ आरुषावचनी लेंकुराची आळी । साहोनि कवळी मागुताली ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगीं काय नाहीं सत्ता । परी निष्ठुरता उपजेना ॥ ४ ॥

२२५७. मुक्तिपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥ १ ॥ बैसला गोविंद जडोनियां चित्तीं । आदि तेचि अंतीं अवसानीं ॥ २ ॥ भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तोचि गाती ॥ ३ ॥ बळ बुद्धि त्यांची उपकारासाठीं । अमृत तें पोटीं सांठविलें ॥ ४ ॥ दयावंत तरी देवाच सारखीं । आपली पारखीं नोळखती ॥ ५ ॥ तुका म्हणे त्यांचा जीव तोचि देव । वैकुंठ तो ठाव वसती ते ॥ ६ ॥

२२५८. मोकळे मन रसाळ वाणी । याचि गुणीं संपन्न ॥ १ ॥ लक्ष्मी ते ऐशा नांवें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ २ ॥ नमन ते नम्रता अंगीं । नेघे रंगीं पालट ॥ ३ ॥ तुका म्हणे त्यांची नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥ ४ ॥

२२५९. युक्ति तंव जाल्या कुंठित सकळां । उरली हे कळा जीवनाची ॥ १॥ संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें ॥ २ ॥ जाणपणे नेणें कांहींच प्रकार । साक्षीतें अंतर अंतरासी ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही केलें अभयदान । तेणें समाधान राहिलोंसें ॥ ४ ॥

२२६०. लवविलें तयासवें लवे जाती । अभिमाना हातीं सांपडेना ॥ १ ॥ भोळिवेचें लेणें विष्णुदासां साजे । तेथें भाव दुजे हारपती ॥ २ ॥ अर्चन वंदन नवविधा भक्ति । दया क्षमा शांति तये ठायीं ॥ ३ ॥ तये गांवीं नाहीं दुःखाची वसति । अवघाचि भूतीं नारायण ॥ ४ ॥ अवघेचि जालें सोंवळें ब्रह्मांड । विटाळाचे तोंड न देखती ॥ ५ ॥ तुका म्हणे गाजे वैकुंठीं सोहळा । याही भूमंडळामाजी कीर्ति ॥ ६ ॥

२२६१. लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी ॥ १ ॥ कृपेचें पोसणें तुमचें मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ २ ॥ आरुषा उत्तरीं संतोषे माउली । कवळुनि घाली हृदयांत ॥ ३ ॥ पोटा आले त्याचे नेणे गुणदोष । कल्याणचि आस असावी हे ॥ ४ ॥ मनाची ते चाली मोहाचिये सोई । ओघ गंगा काई परतों जाणें ॥ ५ ॥ तुका म्हणे कोठें उदार मेघां शक्ति । माझी तृषा किती चातकाची ॥ ६॥

२२६२. लेंकुराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥ १ ॥ ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥ २ ॥ पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्वही साहे ॥ ३ ॥ तुका म्हणे माझें । तुम्हां संतांवरी ओझें ॥ ४ ॥

२२६३. वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति झाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥ १ ॥ शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ २ ॥ पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी । प्रमाण सकळीं । ते मर्यादा करावी ॥ ३ ॥ वरासनीं पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणें । सोनियाचीं परी नीच ॥ ४ ॥ सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचें कारण । तया ठायीं अळंकार ॥ ५ ॥ सेवका स्वामीसाठीं मान । त्यांचें नाम त्यांचें धन । तुका म्हणे जाण । तुम्ही संत यदर्थी ॥ ६ ॥

२२६४. वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥ १ ॥ धन्य धन्य हरीचे दास । तयां सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थे वास भेटीची ॥ २ ॥ कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रंदिवस । वाट कर जोडोनि ॥ ३ ॥ रिद्धिसिद्धि न पाचारितां । त्या धुंडिती हरिभक्ता । मोक्षसायुज्यता । वाट पाहे भक्तांची ॥ ४ ॥ असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीकही उद्धरिलें । महादोषी चांडाळ ॥ ५ ॥ सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्य भाग्य त्यांस । तुका म्हणे दर्शनें ॥ ६ ॥

२२६५. वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥ १ ॥ गायें नाचें उड़ें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें ॥ २ ॥ लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरतें ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां आपुल्या सायासें । आम्हां जगदीशें सांभाळावें ॥ ४ ॥

२२६६. वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥ १ ॥ नाहीं आणीक प्रमाण । तन धन तृण जन ॥ २ ॥ पडतां जडभारी । नेमा न टळे निर्धारीं ॥ ३ ॥ तुका म्हणे याती । हो कां तयाची भलती ॥ ४ ॥

२२६७. शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥ १ ॥ मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणीं ॥ २ ॥ सर्वांग निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांति ॥ ४ ॥

२२६८. हींच त्यांची पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥ १ ॥ कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ २ ॥ हाच काळ वर्तमान । समाधान ही संपत्ती ॥ ३ ॥ तुका म्हणे दिवसरातीं । हेंचि खाती अन्न ते ॥ ४ ॥

२२६९. सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार समूळ आशा । निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥ १ ॥ मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें । तीर्थांसी तीर्थ जाला तोचि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥ २ ॥ मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळां भूषणांसी । हरीच्या गुणें गर्जताति सदा । आनंद तया मानसीं ॥ ३ ॥ तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची । तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची ॥ ४ ॥

२२७०. संसारसोहळे भोगिती सकळ । भक्तां त्याचें बळ विठोबाचें ॥ १ ॥ भय चिंता धाक न मनिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥ २ ॥ पाप पुण्य त्यांचें धरूं न शके अंग । भक्तांसी श्रीरंग सर्वभावें ॥ ३ ॥ नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव त्यांचा भार सर्व वाहे ॥ ४ ॥ तुका म्हणे देव भक्तां वेळाईत । भक्त ते निश्चिंत त्याचियानें ॥ ५ ॥

२२७१. संतांच्या पादुका घेईन मोचे खांदीं । हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें ॥ १ ॥ भजनविधि नेणें साधन उपाय । सकळ सिद्धि पाय हरिदासांचे ॥ २ ॥ ध्यान गति मति आसन समाधि । हरिनाम गोविंदीं प्रेमसुख ॥ ३ ॥ नेणतां निर्लज्ज नेणें नादभेद । सुखें हा गोविंद गाऊं गीतीं ॥ ४ ॥ सर्व जोडी मज गोत आणि वित्त । तुका म्हणे संतमहंतपाय ॥ ५ ॥

२२७२. संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोनि जाय ॥ १ ॥ मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥ २ ॥ कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप ॥ ३ ॥ तुका म्हणे साधन सुलभ गोमटे । परि उपतिष्ठें पूर्वपुण्यें ॥ ४ ॥

२२७३. संतांनीं सरता केलों तैशापरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली ॥ १ ॥ गुण दोष याती न विचारी कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥ २ ॥ तुका म्हणे आलें समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥ ३ ॥

२२७४ संकोचित जीव महत्त्वाच्या भारें । दासत्वचि बरें बहु वाटे ॥ १ ॥ कळावी जी माझी आवडी हे संतां । देणें तरि आतां हेंचि द्यावें ॥ २ ॥ तुमचे चरण पावविलों सेवा । म्हणऊनि हेवा हाचि करीं ॥ ३ ॥ विनवुनी तुका वंदितो चरण । लेखा रजरेण चरणींचा ॥ ४ ॥

२२७५. संत पाउलें साजिरीं । गंगा आली आम्हांवरी ॥ १ ॥ जेथे पडे रजधुळी । तेथें करावी आंघोळी ॥ २ ॥ सेतुबंध वाराणसी । अवघी तीर्थे तयापासीं ॥ ३ ॥ तुका म्हणे धन्य झालों । संत सागरी मिळालों ॥ ४ ॥

२२७६. संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥ १ ॥ कासयानें पूजा करूं । चरण हृदयींच धरूं ॥ २ ॥ काया कुरवंडी । करून ओंवाळून सांडी ॥ ३ ॥ तुका म्हणे भावें । हात जोडीं असो ठावें ॥ ४ ॥ 

२२७७. संत मारगी चालती । त्यांची लागो मज माती ॥ १ ॥ काय करावी साधनें । काय एक नव्हे तेणें ॥ २ ॥ शेष घेईन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥ ३ ॥ तुका म्हणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ ४ ॥

२२७८. संत गातीं हरिकीर्तनीं । त्यांचें घेइन पायवणी ॥ १ ॥ हेंचि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ २ ॥ काया कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥ ३ ॥ संत महंत माझी पूजा । आन भाव नाहीं दुजा ॥ ४ ॥ तुका म्हणे नेणें कांहीं । अवघे आहे संतांपायीं ॥ ५ ॥

२२७९. संतसेवेसी अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥ १ ॥ ऐसियासी व्याली रांड । जळो जळो तिचें तोंड ॥ २ ॥ संतचरणीं ठेवितां भाव । आपेंआप भेंटें देव ॥ ३ ॥ तुका म्हणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२२८०. संतांसी क्षोभवी कोण्याही प्रकारें । त्याचें नव्हे बरें उभयलोकीं ॥ १ ॥ देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वीही थार नेदी तया ॥ २ ॥ संतांपाशी ज्याचा नुरेचि विश्वास । त्याचें जाले दोष बळिवंत ॥ ३ ॥ तुका म्हणे क्षीर वासराच्या अंगें । किंवा धावें लागे विषमें मारूं ॥ ४ ॥

२२८१. संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तिमंत ॥ १ ॥ घालूनिया काळ अवघा बाहेरी । त्यासीच अंतरीं वास दिला ॥ २ ॥ आपुलेसें जिहीं नाहीं उरों दिलें । चोजवितां भले ऐसीं स्थळें ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं झाकत परिमळ । चंदनाचे स्थळ चंदनचि ॥ ४ ॥

२२८२. संतांचिया पायीं हा माझा विश्वास । सर्वभावें दास झालों त्यांचा ॥ १ ॥ तेंचि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ २ ॥ भागलिया मज वाहतील कडे । त्यांचेयानें जोडे सर्व सुख ॥ ३ ॥ तुका म्हणे शेष घेईन आवडी । वचन न मोडी बोलिलें तें ॥ ४ ॥

२२८३. संतांचें घरींचा दास मी कामारी । दारीं परिवरीं लोळतसें ॥ १ ॥ चरणींचें रज लागती अंगांस । तेणें बेताळीस उद्धरती ॥ २ ॥ उच्छिष्ट हें जमा करूनि पत्रावळी । घालीन कवळी मुखामाजी ॥ ३ ॥ तुका म्हणे मी आणीक विचार । नेणें हेंचि सार मानीतसें ॥ ४ ॥

२२८४. संतासी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरी तो ॥ १ ॥ म्हणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ २ ॥ भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥ ३ ॥ तुका म्हणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणें अनुचित ॥ ४ ॥

२२८५. संतांच्या धिक्कारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु तेणें सांडी परी ॥ १ ॥ कुळ आणि रूप वायां संवसार । गेला भरतार मोकलितां ॥ २ ॥ मूळ राखे तया फळा काय उणें । चतुर लक्षणें राखों जाणे ॥ ३ ॥ तुका म्हणे सायास तो एके ठायीं । दीप हातीं तईं अवघें बरें ॥ ४ ॥

२२८६. संता आवडे तो काळाचाही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ ॥ १ ॥ परी सत्ता तेथें नाहीं एकेविणें । मोहें न पवे सीण ऐसें राखे ॥ २ ॥ केले अन्याय ते सांडवी उपचारें । न देखें दुसरें नाशा मूळ ॥ ३ ॥ तुका म्हणे मुख्य कल्पतरुछाया । काय नाहीं दया तये ठायीं ॥ ४ ॥

२२८७. संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥ १ ॥ तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ २ ॥ निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥ ३ ॥ तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥ ४ ॥ अष्ट महासिद्धींचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥ ५ ॥ तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिले चरणीं निकटवासें ॥ ६ ॥

२२८८. संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःख लेश ॥ १ ॥ तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक तेचि मज ॥ २ ॥ संतांचिये गांवीं वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥ ३ ॥ संतांचें भोजन अमृताचे पान । करीती कीर्तन सर्वकाळ ॥ ४ ॥ संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेम सुख साठीं घेती देती ॥ ५ ॥ तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परी । म्हणोनि भिकारी झालों त्यांचा ॥ ६ ॥

२२८९. संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचें काम नाहीं येथें ॥ धृ. ॥ बहु दुधड जरी जाली म्हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२ ॥ तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरीच महिमान येईल कळों ॥ ३ ॥

२२९०. सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडूं एक ॥ १ ॥ संसाराची मज न साहेचि वार्ता । आणीक म्हणतां माझे कोणी ॥ २ ॥ देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंध वाटे ॥ ३ ॥ उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥ ४ ॥ तुका म्हणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवाचे ॥ ५ ॥

२२९१. सर्व सुखें आजी येथेंचि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥ १ ॥ सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥ २ ॥ तुका म्हणे वाचा राहिली कुंठित । पुढें जालें चित्त समाधान ॥ ३ ॥

२२९२. सर्व भाग्यहीन । असे सांभाळिलों दीन ॥ १ ॥ पायीं संतांचें मस्तक । असों जोडोनि हस्तक ॥ २ ॥ जाणें तरी सेवा । दीन दुर्बळाची देवा ॥ ३ ॥ तुका म्हणे जीव । समर्पून भाकीं कींव ॥ ४ ॥

२२९३. सांगतां हें नये सुख । कीर्ति मुख न पुरे ॥ १ ॥ आवडीनें सेवन करूं । जीवींचें धरूं जीवींच ॥ २ ॥ उपमा या देतां लाभा । काशा शोभा सारिखी ॥ ३ ॥ तुका म्हणे नुचलीं डोई । ठेविली पायीं संतांचे ॥ ४ ॥

२२९४. सुख वाटे येचि ठायीं । बहु पायीं संतांचें ॥ म्हणऊनि केला वास । नाहीं नाश ये ठायीं ॥ २ ॥ न करवे हाली चाली । निवारली चिंता हे ॥ ३ ॥ तुका म्हणे निवे तनु । रजकणु लागतां ॥ ४ ॥

२२९५. स्तुति करिजेसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥ १ ॥ तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखापायीं ॥ २ ॥ राम कृष्ण हरि मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे तुमचें सेवितों उच्छिष्ट । क्षमा करा धीट होऊनियां ॥ ४ ॥

२२९६. सोलीव जें सुख अतिसुखाहुनी । उभें तें अंगणीं वैष्णवांच्या ॥ १ ॥ वृंदावन सडे चौक रंगमाळा । नाचें तो सोहळा देखोनिया ॥ २ ॥ भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळशी कंठीं ॥ ३ ॥ नामवोघ मुखीं अमृताचें सार । मस्तक पवित्र सहित रजें ॥ ४ ॥ तुका म्हणे मोक्ष भक्ताचिया मना । नये हा वासना त्यांची करी ॥ ५ ॥

२२९७. हरिजनां प्राण विकली हे काया । अंकित मी तया घरीं झालों ॥ १ ॥ म्हणियें सत्वर करीन सांगतां । घेईन मी देतां शेष त्यांचें ॥ २ ॥ आस करूनियां राहेन अंगणीं । उच्छिष्टाची धणी घ्यावयासी ॥ ३ ॥ चालतां तें मार्गीं चरणींचें रज । उडती सहज घेईन आतां ॥ ४ ॥ दुरी त्यांपासूनि न वजें दवडितां । तुका म्हणे लाता घेईन अंगें ॥ ५ ॥ 

२२९८. हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥ १ ॥ तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ २ ॥ मोहरा तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ॥ ३ ॥ तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥ ४ ॥

२२९९. हें तों एक संतांठायीं । लाभ पायीं उत्तम ॥ १ ॥ म्हणवितां त्यांचे दास । पुढें आस उरेना ॥ २ ॥ कृपादान केलें संतीं । कल्पांतींही सरेना ॥ ३ ॥ तुका म्हणे संतसेवा । हेचि देवा उत्तम ॥ ४ ॥

२३००. शेवटींची विनवणी । संतजनीं परिसावी ॥ १ ॥ विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥ २ ॥ पुढें फार बोलों कायी । अवघे पायीं विदित ॥ ३ ॥ तुका म्हणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥ ४ ॥

२३०१. नव्हती ते संत करितां कवित्व । संतांचे ते आप्त नव्हती संत ॥ १ ॥ येथें नाहीं वेश सरत आडनांव । निवडे घावडाव व्हावा अंगीं ॥ २ ॥ नव्हती ते संत धरितां भोपळा । करितां वाकळा प्रावरणासी ॥ ३ ॥ नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराणें नव्हती संत ॥ ४ ॥ नव्हती ते संत वेदाच्या पठणें । कर्म आचरणें नव्हती संत ॥ ५ ॥ नव्हती ते संत करितां तप तीर्थाटन । सेविलिया वन नव्हती संत ॥ ६ ॥ नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणें । भस्म उधळणें नव्हती संत ॥ ७ ॥ तुका म्हणे नाहीं निरसला देह । तोंवरी आघवे संसारिक ॥ ८ ॥

२३०२. तरिच शोभे वेडी । नग्न होय धड फाडी ॥ १ ॥ काय बोलाचें गौरव । आंत वरी दोन भाव ॥ २ ॥ मृगजळ न्याहाळितां । ताहान न वजे सेवितां ॥ ३ ॥ न पाहे आणिकांची वास। शूर बोलिजे तयास ॥ ४ ॥ तुका म्हणे या लक्षणें । संत अळंकार लेणें ॥ ५ ॥

२३०३. वेश वंदाया पुरते । कोण ब्राह्मण निरुते ॥ १ ॥ ऐसें सांगा मजपाशीं । संतां निरवितो येविशीं ॥ २ ॥ असां जी प्रवीण । ग्रंथीं कळे शुद्ध हीन ॥ ३ ॥ तुका म्हणे लोपें । सत्याचिया घडती पापें ॥ ४ ॥

२३०४. करावा संकोच चित्ताचि भोवता । होय तें बहुतां सुख कीजे ॥ १ ॥ देवाची पूजा हे भूतांचें पाळण । मत्सर तो शीण बहुतांचा ॥ २ ॥ रुसावें फुगावें आपुलिया वरी । उरला तो हरि सकळही ॥ ३ ॥ तुका म्हणे संतपण याचि नांव । जरी होय जीव सकळांचा ॥ ४ ॥

२३०५. जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥ १ ॥ आणिक नये माझ्या मना । हो कां पंडित शाहाणा ॥ २ ॥ नामरूपीं जडलें चित्त । त्याचा दास मी अंकित ॥ ३ ॥ तुका म्हणे नवविध । भक्ति जाणे तोचि शुद्ध ॥ ४ ॥

२३०६. हरीच्या दासां भय । ऐसें बोलों तेंही नये ॥ १ ॥ राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ २ ॥ हरीच्या दासां चिंता । अघटित हे वार्ता ॥ ३ ॥ खावें ल्यावें द्यावें । तुका म्हणे पुरवावें ॥ ४ ॥

२३०७. वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पायां पडे ॥ १ ॥ करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ॥ २ ॥ क्षमा दया शांति । बाण अभंग हे हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बळी । तेचि एक भूमंडळीं ॥ ४ ॥

२३०८. उदासीनाचा देह ब्रह्मरूप । नाहीं पुण्य पाप लागत त्या ॥ १ ॥ अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझों येत ॥ २ ॥ दोष ऐशा नांवें देहाचा आदर । विटाळलें अंतर अहंभावें ॥ ३ ॥ तुका म्हणे जाय नासोनियां खंती । तंवचि हे चित्तीं बद्धता ते ॥ ४ ॥

२३०९. भाग्यवंतां हेचि काम । मापी नाम वैखरी ॥ १ ॥ आनंदाची पुष्टि अंगीं । श्रोते संगीं उद्धरती ॥ २ ॥ पिकलें तया खाणें किती । पंगतीस सुकाळ ॥ ३ ॥ तुका करी प्रणिपात । दंडवत आचारियां ॥ ४ ॥

२३१०. तरी सदा निर्भर दास । चिंता आस विरहित ॥ १ ॥ अवघाच एक ठाव । सर्व भाव विठ्ठलीं ॥ २ ॥ निरविलें तेव्हां त्यांस । जाला वास त्यांमाजी ॥ ३ ॥ तुका म्हणे रूप ध्यावें । नाहीं ठावे गुणदोष ॥ ४ ॥

२३११. उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥ १ ॥ नाहीं दुजा ठाव । कांहीं उत्तम मध्यम भाव ॥ २ ॥ उमटती ठसे । ब्रह्मप्राप्ति अंगीं दिसे ॥ ३ ॥ भाविक विश्वासी । तुका म्हणे नमन त्यांसी ॥ ४ ॥

२३१२. धन वित्त कुळें । अवघियानें ते आगळें ॥ १ ॥ ज्यांचे नारायण गांठीं । भरला हृदय संपुटीं ॥ २ ॥ अवघेंचि गोड । त्यांचें पुरे सर्व कोड ॥ ३ ॥ तुका म्हणे अस्त । उदयो त्यांच्या तेजानास्त ॥ ४ ॥

२३१३. पवित्र सोंवळीं । एक तींच भूमंडळीं ॥ १ ॥ ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ २ ॥ तींच भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥ ४ ॥

२३१४. ज्यासी आवडी हरिनामाची । तोचि एक बहु शुचि ॥ १ ॥ जपे हरिनाम बीज । तोचि वर्णामाजी द्विज ॥ २ ॥ तुका म्हणे वर्णधर्म । अवघे आहे सम ब्रह्म ॥ ३ ॥

२३१५. कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इच्छितिया ॥ १ ॥ उदंड त्या गाई म्हैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥ २ ॥ तुका म्हणे देव दाखविल दृष्टी । तयासवें भेटी थोर पुण्य ॥ ३ ॥ (धृ. नाही) 

२३१६. कोण पुण्य कोणा गांठीं । ज्यासी ऐसियांची भेटी ॥ १ ॥ जिहीं हरी धरिला मनीं । दिलें संसारासी पाणी ॥ २ ॥ कोण हा भाग्याचा । ऐसियासी बोले वाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याचे भेटी । होय संसारासी तुटी ॥ ४ ॥

२३१७. आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥ १ ॥ कुळीं कन्यापुत्र होती जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ २ ॥ गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥ ४ ॥

२३१८. त्यांचिया चरणा माझे दंडवत । ज्यांचें धनवित्त पांडुरंग ॥ १ ॥ तेथें माझा जीव पावला विसांवा । म्हणऊनि हांवा भरलोंसे ॥ २ ॥ चरणींचे रज लावीन कपाळा । जीं पदें राउळासोई जाती ॥ ३ ॥ आणिक तीं भाग्यें येथें कुरवंडी । करूनियां सांडीं इंद्राऐसी ॥ ४ ॥ वैष्णवांचे घरीं देवाची वसति । विश्वास हा चित्तीं सर्वभावें ॥ ५ ॥ तुका म्हणे सखे हरीचे जे दास । आतां पुढें आस दुजी नाहीं ॥ ६ ॥

२३१९. बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥ १ ॥ नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वाटे खरें ॥ २ ॥ विष खावें ग्रासोग्रासीं । धन्य तोचि एक सोसी ॥ ३ ॥ तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥ ४ ॥

२३२०. वैष्णवांची कीर्ति गाइली पुराणीं । साही अठरा जणीं चहूं वेदीं ॥ १ ॥ ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धार्मिक पुण्यशील ॥ २ ॥ आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर । शुका ऐसा थोर आणिक नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मुगुटमणी हरि भक्ति । आणीक विश्रांति आरतिया ॥ ४ ॥

२३२१. नेणो काय नाड । आला उचित काळ आड ॥ १ ॥ नाहीं जाली संतभेटी । येवढी हानी काय मोठी ॥ २ ॥ सहज पायांपाशीं । जवळी पावलिया ऐसी ॥ ३ ॥ चुकी जाली आतां काय । तुका म्हणे उरली हाय ॥ ४ ॥

२३२२. बहु भितो जाणपणा । आड न यो नारायणा । घेईन प्रेमपान्हा । भक्तिसुख निवाडें ॥ १ ॥ यासी तुळे ऐसें कांहीं । दुजें त्रिभुवनीं नाहीं । काला भात दहीं । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ २ ॥ निमिषार्ध संतसंगती । वास वैकुंठीं कल्पांतीं । मोक्षपदें येती । ते विश्रांती बापुडी ॥ ३ ॥ तुका म्हणे हेंचि देईं । मीतूंपणा खंड नाहीं । बोलिले त्या नाहीं । अभेदाची आवडी ॥ ४ ॥

२३२३. बोलिलों ते धर्म अनुभव अंगें । काय पांडुरंगें उणें केलें ॥ १ ॥ सर्व सिद्धि पायीं वोळगती दासी । इच्छा नाहीं ऐसी व्हावें कांहीं ॥ २ ॥ संतसमागमें अळंकारूं वाणी । करूं हे पेरणी शुद्ध बीजे ॥ ३ ॥ तुका म्हणे रामकृष्णनामें गोड । आवडीचें कोड माळ ओऊं ॥ ४ ॥

२३२४. वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्पें संतां समर्पीशी ॥ १ ॥ सर्व संकटांचा तुम्हां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥२ ॥ एकसरें चित्त ठेवूनियां पायीं । जालों उतराई होतो तेणें ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें जालें अवसान । काया वाचा मन वेचूनियां ॥ ४ ॥

२३२५. रवि दीप हिरा दाविती देखणें । अदृश्य दर्शनें संतांचिया ॥ १ ॥ त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर । न कळे तो साचार ब्रह्मादिकां ॥ २ ॥ तापली चंदन निववितो कुडी । त्रिगुण तो काढी संतसंग ॥ ३ ॥ मायबापें पिंड पाळियेला माया । जन्ममरण जाया संतसंग ॥ ४ ॥ संतांचें वचन वारी जन्मदुःख । मिष्टान्न तें भूकनिवारण ॥ ५ ॥ तुका म्हणे जवळी न पाचारितां जावें । संत चरणीं भावें रिघावया ॥ ६ ॥

२३२६. पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरीचे दास जन्म घेती ॥ १ ॥ कर्मधर्म त्यांचा झाला नारायण । त्यांचेनि पावन तिन्ही लोक ॥ २ ॥ वर्णअभिमानें कोण झाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥ ३ ॥ अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयांचीं पुराणं भाट झालीं ॥ ४ ॥ वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥ ५ ॥ कबीर मोमीन लतिफ मुसलमान । सेना न्हावी जाण विष्णुदास ॥ ६ ॥ कान्होपात्रा खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदु हरीचे पायीं ॥ ७ ॥ चोखामेळा वंका जातीचे महार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥ ८ ॥ नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥ ९ ॥ मैराळ जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगो ॥ १० ॥ यातायातीधर्म नाहीं विष्णुदासां । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥ ११ ॥ तुका म्हणे तुम्हीं विचारावें ग्रंथ । तारिलें पतित नेणों किती ॥ १२ ॥

२३२७. घातला दुकान । देती आलियासी दान ॥ १ ॥ संत उदार उदार । भरलें अनंत भांडार ॥ २ ॥ मागत्याची पुरे । धणी आणिकांसी उरे ॥ ३ ॥ तुका म्हणे पोतें । देवें भरिलें नव्हें रितें ॥ ४ ॥

२३२८. हरिचिया भक्ता नाहीं भयचिंता । दुःख निवारिता नारायण ॥ १ ॥ नलगे वाहणें संसार उद्वेग । जडों नेदी पांग देवराव ॥ २ ॥ असो द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळीच ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा सखा पांडुरंग । व्यापियलें जग तेणें एकें ॥ ४ ॥

२३२९. प्रारब्ध क्रियमाण । भक्तां संचित नाहीं जाण ॥ १ ॥ अवघा देवचि झाला पाहीं । भरोनियां अंतर्बाहीं ॥ २ ॥सत्वरजतमबाधा । नव्हे हरिभक्तांसी कदा ॥ ३ ॥ देवभक्तपण । तुका म्हणे नाहीं भिन्न ॥ ४ ॥

२३३०. ध्यानीं योगीराज बैसले कपाटीं । लागे पाटोवाटीं तयांचिया ॥ १ ॥ ताहान भूक त्यांचें राखे शीत उष्ण । जाले उदासीन देहभावें ॥ २ ॥ कोण सखें तयां आणीक सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥ ३ ॥ कोण सुख त्यांच्या जीवासी आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥ ४ ॥ तुका म्हणे विष अमृतासमान । कृपा नारायण करितां होय ॥ ५ ॥

२३३१. जन्मा येऊनि तया लाभ झाला । बिडवई भेटला पांडुरंग । संसारदुःखें नासियेली तेणें । उत्तम हें केणें नामघोष ॥ १ ॥ धन्य तेचि संत सिद्ध महानुभाव । पंढरीचा ठाव ठाकियेला । प्रेमदाते तेच पतितपावन । धन्य दरुषण होय त्याला ॥ धृ. ॥ पावटणी पंथे झालिया सिद्धी । वोळगे समाधि सायुज्यता । प्रेम अराणूक नाहीं भय धाक । मज तेणें सुख काय चिंता ॥ ३ ॥ ते दुर्लभ संसारासी । जडजीवउद्धारलोकासी । तुका म्हणे त्यासी । धन्य भाग्य दरुषणें ॥ ४ ॥

२३३२. भक्तसमागमें सर्व भावें हरी । सर्व काम करी न सांगतां ॥ १ सांठवला राहे हृदयसंपुष्टीं । बाहेर धाकुटी मूर्ति उभा ॥ २ ॥ मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥ ३ ॥ तुका म्हणे जीव भाव देवापायीं । ठेवूनि ते कांहीं न मागती ॥ ४ ॥

२३३३. जेथे वैष्णवाचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥ १ ॥ दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ २ ॥ गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जयजयकारें ॥ ३ ॥ सहज तया जना छंद । वाचे गोविंद गोविंद ॥ ४ ॥ तुळसीवने रंगमाळा । अवघा वैकुंठ सोहळा ॥ ५ ॥ तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें रानें ॥ ६ ॥

२३३४. तेथें सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । दिंड्या पताका झळकती । जे गर्जति हरिनामें ॥ १ ॥ दोषा झाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारीं । नाहीं उरी परताया ॥ २ ॥ विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रूप धरिलें गोजिरें ॥ ३ ॥ पोट सेवितां न धाये । भूक भुकेलीच राहे । तुका म्हणे पाहे । कोण वास मुक्तीची ॥ ४ ॥

४२३३५. चंदनाचे हात पायही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥ १ ॥ दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगीं साकर अवघी गोड ॥ २ ॥ तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळेचि ना ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२३३६. वैराग्याचें भाग्य । संतसंग हाचि लाग ॥ १ ॥ संतकृपेचे हे दीप । करी साधका निष्पाप ॥ २ ॥ तोचि देवभक्त । भेदाभेद नाहीं ज्यांत ॥ ३ ॥ तुका प्रेमें नाचे गाय । गाणियांत विरोन जाय ॥ ४ ॥

२३३७. संतसमागम एखादिये परी । व्हावें त्यांचे द्वारीं श्वानयाती ॥ १ ॥ तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ २ ॥ कामारी बटीक सेवेचा सेवक । दीनपणें रंक तेथें भले ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संतांचिया ॥ ४ ॥

२३३८. सदैव हे वारकरी । जे पंढरी देखती ॥ १ ॥ पदोपदीं विठ्ठल वाचा । तया कैंचा संसार ॥ २ ॥ दोष पळाले पळाले । पैल आले हरिदास ॥ ३ ॥ प्रेमभातें भरलें अंगीं । निर्लज्ज रंगी नाचती ॥ ४ ॥ गोपीचंदनाची उटी । तुळसी कंठीं मिरवती ॥ ५ ॥ दुर्बळा या शक्तिहीना । त्याही जना पुरता ॥ ६ ॥ तुका म्हणे देव चित्तीं । मोक्ष हातीं रोकडा ॥ ७ ॥

२३३९. ब्रह्मज्ञान दारीं येतें काकुलती । अव्हेरिलें संतीं विष्णुदासीं ॥ १ ॥ रिघों पाहे माजी बळेंचि त्यांचें घर । दवडिती दूर म्हणोनियां ॥ २ ॥ तुका म्हणे येथें न चाले सायास । पडिलें उदास त्यांच्या गळां ॥ ३ ॥

२३४०. वैष्णव चोरटीं । आली घरासी करंटीं ॥ १ ॥ आजि आपुलें जतन । करा भांडें पांघरूण ॥ २ ॥ ज्याचे घरीं खावें । त्याचें सर्वस्वहि न्यावें ॥ ३ ॥ तुका म्हणे माग । नाहीं लागों देत लाग ॥ ४ ॥

२३४१. भक्तांहूनि देवा आवडतें काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें ॥ धृ. ॥ नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा ॥ २ ॥ सर्वभावें त्यांचें सर्वस्वही गोड । तुळसीदळ कोड करूनि घ्यावें ॥ ३ ॥ सर्वस्वही त्यांचा म्हणवी विकिला । चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥ ४ ॥ तुका म्हणे भक्तिसुखाचा बांधला । आणीक विठ्ठला धर्म नाहीं ॥ ५ ॥

२३४२. धन्य दिवस आजी दर्शन संतांचें । नांदें तया घरीं दैवत पंढरीचें ॥ १ ॥ धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार । देव आणि भक्त दुजा नाहीं विचार ॥ २ ॥ धन्य पूर्व पुण्य वोढवलें निरुतें । संतांचें दर्शन झालें भाग्यें बहुतें ॥ ३ ॥ तुका म्हणे धन्य आम्हां जोडिली जोडी । संतांचें चरण आतां जीवें न सोडीं ॥ ४ ॥

२३४३. मायवणीं धाल्या धाय । गर्भ आंवतणें न पाहे ॥ १ ॥ तैसे पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ २ ॥ पुत्राच्या विजयें । पिता सुखावत जाये ॥ ३ ॥ तुका म्हणे अमृतसिद्धि । हरे तृषा आणि व्याधि ॥ ४ ॥

२३४४. धन्य आजि दिन । जालें संताचें दर्शन ॥ १ ॥ जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ २ ॥ जालें समाधान । पायीं विसावलें मन ॥ ३ ॥ तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळीदसरा ॥ ४ ॥

२३४५. शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥ १ ॥ स्तुति न पुरे हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ २ ॥ देह न सांभाळून । पायांवरी लोटांगण ॥ ३ ॥ विनवी तुका संतां दीन । नोहे गौरवीं उत्तीर्ण ॥ ४ ॥

२३४६. सोनियाचा कळस । माजी भरिला सुरारस ॥ १ ॥ काय करावें प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ २ ॥ मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांठ ॥ ३ ॥ तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥ ४ ॥

२३४७. पाळितों वचन । परी बहु भीतें मन ॥ १ ॥ करितों पायांशी सलगी । नये बैसों अंगसंगीं ॥ २ ॥ जोडोनियां कर । उभें असावें समोर ॥ ३ ॥ तुका म्हणे संत । तुम्ही मी बहु पतित ॥ ४ ॥

२३४८. जडलों तों आतां पायीं । होऊं काई वेगळा ॥ १ ॥ तुम्हीं संतीं कृपा केली । गंगे चाली ओघाची ॥ २ ॥ सांभाळिलों मायबापा । केलों तापावेगळा ॥ ३ ॥ वोरसें या जीव धाला । तुका ठेला मौन्यचि ॥ ४ ॥

२३४९. मागें पुढें झालों लाठा । अवघा मोठा सरळ ॥ १ ॥ नाहीं कोठें रितें अंग । नित्य रंग नवाचि ॥ २ ॥ पोसिंद्याचे पडिलों हातीं । ओझें माती चुकली ॥ ३ ॥ जोगावलों पोटीं खर । पाठी भार वरी नाहीं ॥ ४ ॥ अवघिया मोकळ्या दिशा । नाहीं वोळसा कामाचा ॥ ५ ॥ संताचिये लोळे द्वारीं । पळती दुरी गोमाशा ॥ ६ ॥ पहातो गे महाद्वारीं । वरी झूली वाकळा ॥ ७ ॥ कांहीं न साहेसा झाला । तुका नेला समर्थें ॥ ८ ॥

२३५०. भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥ १ ॥ परी आम्ही असों एकाचिये हातीं । नाचविताे चित्तीं त्याचें तैसें ॥ २ ॥ वाट सांगे त्याच्या पुण्या नाहीं पार । होती उपकार अगणित ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही बहु कृपावंत । आपुलें उचित केलें संतीं ॥ ४ ॥

२३५१. अवघे चुकविले सायास । तप रासी जीवा नास ॥ १ ॥ जीव देऊनियां बळी । अवघीं तारिलीं दुबळीं । केला भूमंडळीं । माजी थोर पवाडा ॥ २ ॥ कांहीं न मगे याची गती । लुटवितो जगा हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे भक्तराजा । कोण वर्णी पार तुझा ॥ ४ ॥

२३५२. हा गे आलों कोणी म्हणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे ॥ १ ॥ तुम्हीं तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों बाळ अभयकरें ॥ २ ॥ भुकेलिया आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ॥ ३ ॥ तुका म्हणे दिली चिंतामणीसाठीं । उचित काचवटी दंडवत ॥ ४ ॥

२३५३. पाठीवरी भार । जातो वाहूनियां खर ॥ १ ॥ संत नेतील त्या ठाया । माझी आधीन त्यां काया ॥ २ ॥ मोठें चौफळ । अंगीं उच्छिष्टाचें बळ ॥ ३ ॥ न संडी मारग । येथें न चोरूनि अंग ॥ ४ ॥ आपुलिया सत्ता । चालविलें नाहीं चिंता ॥ ५ ॥ कळवळिला तुका । जनाचार येथें नका ॥ ६ ॥

२३५४. त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविले ॥ १ ॥ आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख तो गौरव संतां अंगीं ॥ २ ॥ हिशेबें आलें तें सकळांसी प्रमाण । तेथें नाहीं आन चालों येत ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं पापपुण्य खंतीं । झाड्याची हुजुती हातां आली ॥ ४ ॥

२३५५. आज्ञा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं ॥ १ ॥ भागवूनि देह ठेवियेला पायीं । चरणावरी डोई येथूनचि ॥ २ ॥ येणे जाणें हें तो उपाधीचें मूळ । पूजा ते सकळ अकर्तव्य ॥ ३ ॥ तुका म्हणे असें चरणींचा रज । पदींच सहज जेथें तेथें ॥ ४ ॥ 

२३५६. तुमचिये दासीचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥ १ ॥ नवविधा काय बोलिली जे भक्ती । द्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥ २ ॥ तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें । उतरेन खरें भवनदी ॥ ३ ॥

२३५७. आतां तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ॥ १ ॥ गोमटें तें करा माझें । भार ओझें तुम्हांसी ॥ २ ॥ वंचिलें तें पायापाशीं । नाहीं यासी वेगळें ॥ ३ ॥ तुका म्हणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायांसी ॥ ४ ॥

२३५८. पायां पडावें हें माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं ॥ १ ॥ तरी हे सलगी कवतुक केलें । लडिवाळ धाकुलें असें बाळ ॥ २ ॥ काय उणें तुम्हां संतांचिये घरीं । विदित या परी सकळही ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी उचित हे सेवा । नये करूं ठेवाठेवीं कांहीं ॥ ४ ॥

२३५९. गंगा आली आम्हांवरी । संतपाउलें साजिरीं ॥ १ ॥ तेथें करीन अंघोळी । उडे चरणरजधुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥ २ ॥ पाप पळालें जळालें । भवदुःख दुरावलें ॥ ३ ॥ तुका म्हणे धन्य जालों । संतसागरीं न्हालों ॥ ४ ॥

२३६०. भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥ १ ॥ येथूनियां नुठवूं माथा । मरणावांचूनि सर्वथा ॥ २ ॥ होईं बळकट । माझ्या मना तूं रे धीट ॥ ३ ॥ तुका आला लोटांगणीं । भक्तिभाग्या जाली धणी ॥ ४ ॥

२३६१. जग ऐसें बहुनांवें । बहुभावें भावना ॥ १ ॥ पाहों बोलों बहु नये । सत्य काय सांभाळा ॥ २ ॥ कारियासी जें कारण । तें जतन करावें ॥ ३ ॥ तुका म्हणे संतजनीं । हेंचि मनीं धरावें ॥ ४ ॥

२३६२. अभिनव सुख तरी या विचारें । विचारावें बरें संतजनीं ॥ १ ॥ रूपाच्या आठवें दोन्हीही आपण । वियोग तो क्षण होत नाहीं ॥ २ ॥ पूजा तरि चित्तें कल्पावें ब्रह्मांड । अहाच तो खंड एकदेशी ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा अनुभव यापरी । डोई पायांवरी ठेवीतसें ॥ ४ ॥
 

२३६३. ऐका हें वचन माझें संतजन । विनवितों जोडुन कर तुम्हां ॥ धृ. ॥ तर्क करूनियां आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥ २ ॥ आमुच्या जीवींचा तोचि जाणे भाव । रखुमाईचा नाहो पांडुरंग ॥ ३ ॥ चित्त माझें त्याचे गुंतलेसें पायीं । म्हणऊनि कांहीं नावडे त्या ॥ ४ ॥ तुका म्हणे मज न साहे मीनती । खेद होय चित्तीं भंग मना ॥ ५ ॥

२३६४. नव्हे हें गुरुत्व मेघवृष्टि वाणी । ऐकावी कानीं संतजनीं ॥ १ ॥ आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ २ ॥ देहपिंड दान दिला एकसरें । मुळींचें तें खरें टांकसाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥ ४ ॥

२३६५. न मनावी चिंता तुम्ही संतजनीं । हिरा स्फटिकमणी केंवि होय ॥ १ ॥ पडिला प्रसंग स्थळां त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ २ ॥ बहुतांसी भय एकाचिया दंडें । बहुत या तोंडें वचनासी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं वैखरी बासर । करावया चार वेडे वेडे ॥ ४ ॥

२३६६. ऐका जी संतजन । सादर मन करूनि ॥ १ ॥ सकळांचें सार एक । कंटक ते त्यजावे ॥ २ ॥ विशेषता कांद्याहुनी । सेवित्या घाणी आगळी ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्याची जोडी । ते परवडी बैसीजे ॥ ४ ॥

२३६७. जैसें तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द गोड ॥ १ ॥ आपुलें आवडी लेववी खाववी । पाहोनियां जीवीं सुख वाटे ॥ २ ॥ तुका म्हणे काय देऊं परिहार । काय तें साचार जाणा संत ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२३६८. आरुष माझी वाणी बोबडीं उत्तरें । केली ते लेंकुरें सलगी पायीं ॥ १ ॥ करावें कवतुक संतीं मायबापीं । जीवन देऊनि रोपीं विस्तारिजे ॥ २ ॥ आधारें वदली प्रसादाची वाणी । उच्छिष्ट सेवनीं तुमचिया ॥ ३ ॥ तुका म्हणे हेचि करितों विनंती । मागेन पुढती सेवादान ॥ ४ ॥

२३६९. हरिभक्त माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउलें धरीन त्यांचीं ॥ १ ॥ अंत:काळीं येती माझ्या सोडवणें । मस्तक बैसणें देईन त्यांसी ॥ २ ॥ आणिक सोइरे सज्जन वो कोणी । वैष्णवांवांचोनि नाहीं मज ॥ ३ ॥ देईन आळिंगण धरीन चरण । संवसारसीण नासे तेणें ॥ ४ ॥ कंठीं तुळशीमाळा नामाचे धारक । ते माझे तारक भवनदीचे ॥ ५ ॥ तयांचे चरणीं घालीन मी मिठी । चाड ही वैकुंठीं नाहीं मज ॥ ६ ॥ आळसें दंभें भावें हरीचें नाम गाती । ते माझे सांगाती परलोकींचे ॥ ७ ॥ कायावाचामनें देईन क्षेम त्यासी । चाड जीवित्वासी नाहीं मज ॥ ८ ॥ हरीचें नाम मज म्हणविती कोणी । तया सुखा धणी धणीवरी ॥ ९ ॥ तुका म्हणे तया उपकारें बांधलों । म्हणऊनि आलों शरण संतां ॥ १० ॥

२३७०. घेसी तरी घेईं संतांची हे भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥ १ ॥ सर्वभावें त्यांचें देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ २ ॥ करिसील तो करी संतांचा सांगात । आणीक ते मात नको मना ॥ ३ ॥ बैससील तरी बैस संतांमधीं । आणिक ते बुद्धी नको मना ॥ ४ ॥ जासी तरी जाई संतांचिया गांवा । होईल विसावा तेथें मना ॥ ५ ॥ तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेईं ॥ ६ ॥ 

२३७१. बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य झाली बुद्धि संचितासी ॥ १ ॥ येणें पंथें माझी चालिलीं पाउलें । दरुषण झालें संतांपायीं ॥ २ ॥ त्रासिलें दरिद्रें दोषा झाला खंड । त्याचि काळें पिंड पुनीत झाला ॥ ३ ॥ तुका म्हणे झाला अवघा व्यापार । आली वेरझार फळासी हे ॥ ४ ॥

२३७२. डौरलों भक्तिसुखें । सेवूं अमृत हें मुखें ॥ १ ॥ संतसंगें सारूं काळ । प्रेमसुखाचा कल्लोळ ॥ २ ॥ ब्रह्मादिकांसी शिराणी । तो हा आनंद मेदिनी ॥ ३ ॥ नाहीं वैकुंठींचा पांग । धांवे कथे पांडुरंग ॥ ४ ॥ मुक्त व्हावें काशासाठीं । कैची येणें रसें तुटी ॥ ५ ॥ तुका म्हणे गोड । हेंचि पुरें माझें कोड ॥ ६ ॥

२३७३. गुणांचाचि सांठा । करूं न वजों आणिका वाटा ॥ १ ॥ करिती छंद नानापरी । भरोनि शिणती आडभरी ॥ २ ॥ नेमिली पंगती । आम्हां संताची संगती ॥ ३ ॥ तुका म्हणे लीळा । येर कवतुक पाहों डोळां ॥ ४ ॥

२३७४. काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥ १ ॥ काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें ॥ २ ॥ अमंगळपणें कंटाळा न धरी । उचलोनि करीं कंठीं लावी ॥ ३ ॥ लेववीं आपुले अंगें अळंकार । संतोषा ये फार देखोनियां ॥ ४ ॥ तुका म्हणे स्तुति योग्य नाहीं परी । तुम्हां लाज थोरी अंकिताची ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२३७५. नव्हती माझे बोल जाणा हा निर्धार । मी आहें मजूर विठोबाचा ॥ १ ॥ निर्धारा वचन सोडविलें माझ्या । कृपाळूवें लज्जा राखियेली ॥ २ ॥ निर्भर मानसीं जालों आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषें ॥ ३ ॥ आतां भय माझें नासलें संसारीं । जालोंसें यावरी गगनाचा ॥ ४ ॥ तुका म्हणे हा तों संतांचा प्रसाद । लाधलों आनंद प्रेमसुख ॥ ५ ॥

२३७६. हरीच्या दासां सोपें वर्म । सर्व धर्म पाउलें ॥ १ ॥ कडिये देव वाहे खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥ २ ॥ सरती येणें आटाआटी । नाहीं तुटी लाभाची ॥ ३ ॥ तुका म्हणे समाधान । सदा मन आमुचें ॥ ४ ॥

२३७७. जायाचें शरीर जाईल क्षणांत । कां हा गोपीनाथ पावेचि ना ॥ १ ॥ तुम्ही संत सारे कृपेचे सागर । निरोप हा फार सांगा देवा ॥ २ ॥ अनाथ अज्ञान कोणी नाहीं त्याला । पायापें विठ्ठला ठेवीं मज ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसी करा निरवण । मग तो रक्षण करील माझें ॥ ४ ॥

२३७८. येथींचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥ १ ॥ वैकुंठींच्या लावू वाटा । सर्व सांठा ते ठायीं ॥ २ ॥ येथींचिया नाशिवंतें । काय रितें चाळवूं ॥ ३ ॥ तुका म्हणे वैष्णवजन । माझे गण समुदाय ॥ ४ ॥

२३७९. सर्वपक्षीं हरि साहे सखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥ १ ॥ सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणीसमान होती गोटे ॥ २ ॥ तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२३८०. पायांच्या प्रसादें । कांहीं बोलिलों विनोदें ॥ १ ॥ मज क्षमा करणें संतीं । नव्हे अंगभूत युक्ति ॥ २ ॥ नव्हे हा उपदेश । तुमचे बडबडिलों शेष ॥ ३ ॥ तुमचे कृपेचें पोसणें । जन्मोजन्मीं तुका म्हणे ॥ ४ ॥

२३८१. कळेल हे खुण । तरि दावी नारायण ॥ १ ॥ सत्य संतांपाशीं राहे । येरां भय आड आहे ॥ २ ॥ अणुचिया ऐसें । असे भरलें प्रकाशें ॥ ३ ॥ इंद्रियांचे धनी । ते हे जाती समजूनि ॥ ४ ॥ तर्क कुतर्क वाटा । नागवण घटापटा ॥ ५ ॥ तुका म्हणे ल्यावें । डोळां अंजन बरवें ॥ ६ ॥ 

२३८२. विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वहावें भार माथां ॥ १ ॥ साधनें संकटें सर्वांलागीं शीण । व्हावा लागे क्षीण अहंभाव ॥ २ ॥ भाव हा कठिण वज्र हे भेदवे । परी न छेदवे मायाजाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्म भजनेंचि सांपडे । येरासी तों पडे वोस दिशा ॥ ४ ॥

२३८३. सकळ पूजा स्तुति । करावी ते व्हावी याती ॥ १ ॥ म्हणऊनि वारा जन । संत पूजा नारायण ॥ २ ॥ सेवावें तें बरी । दावी उमटूनि ढेंकरीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सुरा । दुधा म्हणतां केवीं बरा ॥ ४ ॥

२३८४. पडोनियां राहीं । उगाच संतांचिये पायीं ॥ १ ॥ नलगे पुसणें सांगावें । चित्त शुद्ध करीं भावें ॥ २ ॥ सहज ते स्फीती । उपदेश पर युक्ति ॥ ३ ॥ तुका म्हणे भाव । जवळी धरूनि आणी देव ॥ ४ ॥

२३८५. जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥ १ ॥ पूर्वपुण्यें जरी होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ २ ॥ भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे हेचि करावी मिरासी । बळी संतापाशीं द्यावा जीव ॥ ४ ॥

२३८६. बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरीचि होय हरिभक्त । कृपावंत मानसीं ॥ १ ॥ म्हणवी म्हणियारा तयाचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरलें वाचा । काया मनें विठ्ठलीं ॥ २ ॥ असे भूतदया मानसीं । अवघा देखें हृषीकेशी । जीवें न विसंबें त्यासी । मागें मागें हिंडतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे निर्विकार । शरणागतां वज्रपंजर । जे जे अनुसरलें नर । तयां जन्म चुकलें ॥ ४ ॥

२३८७. शुद्धचर्या हें संतांचें पूजन । लागतचि धन नाहीं वित्त ॥ १ ॥ सगुणाचे सोई सगुण विश्रांति । आपणचि येती चोजवीत ॥ २ ॥ कीर्तनींच वोळे कृपेचा वोरस । दुरीपणें वास सन्निधता ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्म सांगतों सवेगें । मन लावा लागे स्वहिताच्या ॥ ४ ॥

२३८८. भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारीं सर्वभावें ॥ १ ॥ शिकल्या बोलाचा धरिशील ताठा । तरी जासी वाटा यमपंथें ॥ २ ॥ हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परी जन संतां तैसी ॥ ३ ॥ सरिता वोहोळ गंगा सागरा समान । लेखी तयाहून अधम नाहीं ॥ ४ ॥ आणीक अमूप होती तारांगणें । रवीसी समान लेखूं नये ॥ ५ ॥ तुका म्हणे नाहीं नम्रता अंगीं । नव्हे ते फिरंगी कठिण लोह ॥ ६ ॥

२३८९. हरिजनाची कोणा न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥ १ ॥ रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तां अभयकर खळां कष्ट ॥ २ ॥ दुर्वास हा छळूं आला अंबऋषी । सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥ ३ ॥ द्रौपदीच्या क्षोभे कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साह्य केली ॥ ४ ॥ न साहेचि बब्रु पांडवां पारिखा । दुराविला सखा बळिभद्र ॥ ५ ॥ तुका म्हणे अंगीं राखिली दुर्गंधी । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥ ६ ॥

२३९०. उपकारी असे आरोनी उरला । आपुलें तयाला पर नाहीं ॥ १ ॥ लाभावरी घ्यावें सांपडलें काम । आपला तो श्रम न विचारी ॥ २ ॥ जीवा ऐसें देखें आणिकां जीवांसी । निखळचि रासि गुणांचीच ॥ ३ ॥ तुका म्हणे देव तयाचा पांगिला । न भंगें संचला धीर सदा ॥ ४ ॥

२३९१. चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेसीं खापर काय होय ॥ १ ॥ दुधाचे आधणीं वैरिले पाषाण । कदा काळीं जाण पाक नव्हे ॥ २ ॥ तुका म्हणे जरी पूर्वपुण्यें सिद्धि । तरिच राहे बुद्धि संतसंगीं ॥ ३ ॥ (धृ. नाही) 

२३९२. संतांचें गुणदोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥ १ ॥ पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ २ ॥ तुका म्हणे गंगे अग्नीसी विटाळ । लावी तो चांडाळ दुःख पावे ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२३९३. संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उरफोडी ॥ १ ॥ बासर तो भुंके गाढवाचे परी । उडे पाठीवरीं यमदंड ॥ २ ॥ समयो नेणें तें वेडें चाहाटळ । अवगुणाचा ओंगळ मान पावे ॥ ३ ॥ तुका म्हणे काय वांया चाळवणी । पिट पिट घाणी हागवणीची ॥ ४ ॥

२३९४. संतांचा अतिक्रम । देव पूजा तो अधर्म ॥ १ ॥ येती दगड तैसे वरी । मंत्रपुष्प देवाशिरीं ॥ २ ॥ अतीतासी गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । ताडण भेदकाची सेवा ॥ ४ ॥

२३९५. अवघा भार वाटे देवा । संतसेवा न करितां ॥ १ ॥ कसोटी हे असे हातीं । सत्य भूतीं भगवंत ॥ २ ॥ चुकलोंसा दिसे पंथ । गेलें संत तो ऐसा ॥ ३ ॥ तुका म्हणे सोंग वांयां । कारण या अनुभवें ॥ ४ ॥

२३९६. दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें ॥ १ ॥ धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकां वारि ॥ २ ॥ मळ खाये संवदणी । करी आणिकांची उजळणी ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याचा । प्रीति आदर करा साचा ॥ ४ ॥

२३९७. झविली महारें । त्याची व्याली असे पोरें ॥ १ ॥ करी संतांचा मत्सर । कोपे उभारोनि कर ॥ २ ॥ बीज तैसें फळ । वरी आलें अमंगळ ॥ ३ ॥ तुका म्हणे ठावें । ऐसें झालें अनुभवें ॥ ४ ॥ 

२३९८. भुंकुनियां सुनें लागे हत्तीपाठीं । होऊनि हिंपुटी दुःख पावे ॥ १ ॥ काय त्या मशकें तयासी करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे ॥ २ ॥ मातले माकड विटवी पंचानना । घेतलें मरणा धरणें तेणें ॥ ३ ॥ तुका म्हणे संतां पीडितील खळ । घेती तोंड काळें करूनियां ॥ ४ ॥

२३९९. संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसें कीजे ॥ १ ॥ संकल्प ते सदा स्वामिचेचि चित्तीं । फांको नये वृत्ती अखंडित ॥ २ ॥ दास्यत्व तें असे एकविध नांवें । उरों नये जीवें भिन्नत्वेंसी ॥ ३ ॥ निज बीजा येथें तुका अधिकारी । पाहिजे ते पेरी तये वेळीं ॥ ४ ॥

२४००. कासयासी व्हावें आम्ही जीवन्मुक्त । सांडूनियां थीत प्रेमसुख ॥ १ ॥ वैष्णवांचा दास झाला नारायण । काय त्या मिळोन असों सुखी ॥ २ ॥ काय त्या गाठींचें पडलें सुटोन । उगेचि बैसोन धीर धरूं ॥ ३ ॥ सुख आम्हांसाठीं केलें हें निर्माण । निर्दैव तो कोण हाणे लाता ॥ ४ ॥ तुका म्हणे मज नलगे सायुज्यता । राहेन त्या संतां समागमें ॥ ५ ॥

२४०१. देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥ १ ॥ मी तो सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥ २ ॥ निराकारी ओस दिशा । येथें इच्छा पुरतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे रोकडें केणें । सेवितां येणें पोट धाय ॥ ४ ॥


No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...