Friday, 9 May 2025

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे

॥१॥

वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मानला जातो. गुरु शिवाय साधकाला ईश प्राप्ती होऊच शकत नाही, अशी संप्रदायाची धारणा आहे.

ज्ञानदेवांची गुरुपरंपरा आदिनाथ शंकरापासुन सुरु होते. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर अशी ही परंपरा आहे. या परंपरेचे मुळ शिवोपासक नाथपंथात आहे. बारकाईने विचार केला तर ज्ञानदेवादी भावंडे संन्यास, भ्रमण, उपासना ई. नाथपंथीय नियम काटेकोरपणे पाळताना दिसतात. अगदी समाधी घेताना सुद्धा ज्ञानेश्वरीत ज्ञानदेवांनी वर्णिल्याप्रमाणे निगुढ मठ वा शिवालयाजवळच या चारही भावंडांनी समाधी घेतली आहे.

तुकोबांची गुरुपरंपरा निळोबांनी एका अभंगात वर्णन केली आहे. "मुख्य महाविष्णु चैतन्याचे मुळ । संप्रदाय सकळ तेथोनिया।।". या अभंगाप्रमाणे पुढील परंपरा आहे.

१. महाविष्णु
२. ब्रम्हा
३. नारद
४. व्यास
५. राघवचैतन्य
६. केशव चैतन्य
७. बाबाजी चैतन्य (बाबाजी व केशव एकच असाही एक मतप्रवाह आहे.)
८. तुकोबाराय तथा तुकोचैतन्य
९. निळोबा पिंपळनेरकर

पुढे ही परंपरा बहिणाबाई, शंकरस्वामी, मल्लप्पा वासकर अशी दिसते. पैकी वासकर फड परंपरेत तुकोबांना गुरुस्थानी मानून त्यांच्या कीर्तनात अनेकदा तुकारामांचा भजन व घोषाद्वारे जयघोष करतात.

तुकोबांना वयाच्या २४व्या वर्षी म्हणजे इ.स. १६३२ मध्ये गुरुपदेश झाला. गुरुपदेश कोठे झाला व कोणाकडुन झाला याविषयी महाराष्ट्रातील विचारवंतांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. स्वतः तुकोबा, निळोबा, महिपती, बहिणाबाई, कृष्णदास बैरागी (धर्माधिकारी), बहिणाबाई शिष्य आदींच्या वाङ्मयावरून निष्कर्षाप्रत जावे लागते.

सत्य गुरुराये कृपा मज केली। परि नाही घडली सेवा काही ।।१॥ सापडविले वाटे जाता गंगास्नाना। मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥२॥ भोजना मागती तूप पावशेर। पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥ काय कळे उपजला अंतराय। म्हणोनिया काय त्वरा झाली ॥४॥ राघव चैतन्य केशव चैतन्य। सांगितली खुण मालिकेची ॥५॥ बाबाजी आपुले सांगितले नाम। मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥६॥ माहो शुद्ध दशमी पाहूनि गुरुवार। केला अंगिकार तुका म्हणे ॥७॥

या अभंगात तुकोबांनी आपली गुरुपरंपरा व गुरुपदेश याविषयी भूमिका मांडली आहे. वरील अभंगात स्वप्नात गुरुपदेश झाल्याचे सांगतात. अन्यत्रही एके ठिकाणी 'मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश। * असाच भाव व्यक्त करतात. यावरुन त्यांना गुरुंनी स्वप्नात येऊन अनुग्रह दिला. रामकृष्णहरि या मंत्राचा उपदेश केला. आपली परंपराही त्यांनी सांगितली आहे. अलिकडील विद्वानांना प्रश्न पडेल की, तुकोबांना स्वप्नात कसा काय उपदेश होऊ शकतो? एवढ्या सगळ्या गोष्टी स्वप्नात कशा घडु शकतात? याचे उत्तर असे की, स्वप्न ही एक मनोवैज्ञानिक अवस्था आहे. "तुकोबांच्या अभंगांची मानसशास्त्रीय चिकित्सा या विषयावर मुंबईवि‌द्यापीठात पीएच. डी. साठी संशोधन झाले आहे. "सिध्दांतबिंदू" या ग्रंथातही जागृती, स्वप्न, सुषुप्ती असे तीन प्रमुख प्रकार वर्णन केले आहेत. पैकी,

१. जागृती जागृती
२. जागृती स्वप्न
३. जागृती सुषुप्ती
४. स्वप्न स्वप्न
५. स्वप्न जागृती
६. स्वप्न सुषुप्ती
७. सुषुप्ती स्वप्न
८. सुषुप्ती जागृती
९. सुषुप्ती सुषुप्ती

असे नऊ प्रकार सिद्धांतबिंदू ग्रंथात वर्णन केले आहेत. यापैकी स्वप्नजागृती या अवस्थेत तुकोबांना अनुग्रह झाला आहे. राजा हरिश्चंद्र, मंदोदरी, विठ्ठलपंत आर्दीच्या स्वप्नकथा या देशात प्रिय आहेत. यांची स्वप्न खरी झाल्याचे लोककथा वा ग्रंथात दाखले आहेत. तुकोबा निद्रेत असताना लिंगदेहाने गुरु येऊन उपदेश करुन गेले, याचे काही पुरावे पाहू या.

१. भोजना मागती तुप पवशेर। पडीला विसर स्वप्नामाजी।।३॥ (तु.म) 
२. बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला। अनुग्रह दिला निजप्रीति ॥ ७ ॥ (निळोबाराय) 
३. मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश। धरिला विश्वास दृढनामी ।। (तु.म.)

वरील अभंगांवरुन हेच सिद्ध होते की, महाराजांना स्वप्नात गुरुपदेश झाला आहे.

गुरुपदेश ओतुरास की भंडाऱ्यावर?

तुकोबांना स्वप्नात गुरुपदेश झाला हे मान्य पण गुरुभेट कोठे झाली? याविषयी धांडोळा घ्यावा लागेल. तुकोबांना भंडाऱ्या डोंगरावर स्वप्न जागृती अवस्थेत उपदेश झाला. अनूग्रहानंतर तुकोबा उत्तमापुर म्हणजे आजचे ओतुरला येऊन गेले. कारण प्रस्तुत सत्यगुरुराये कृपा मज केली।' हा अभंग गुरुभेटीनंतर स्फुरला असे म्हणावयासही वाव आहे. गुरुपदेशानंतर मला कवित्व स्फुरले हे तुकोबा एका आत्मनिवेदनपर अभंगात वर्णन करताना म्हणतात की,

मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश। धरिला विश्वास दृढ नामी ॥१४॥
यावरी झाली कवित्वाची स्फुर्ति। पाय धरिले चिती विठोबाचे ॥ १५॥ (तु.गा.)

या चरणातील 'यावरी' हा शब्द महत्वाचा आहे. गुरुपदेश झाल्यावर तुकोबा प्रत्यक्ष गुरुभेटीसाठी उत्तमापुरला (ओतुर) आले. याचे पुरावे या गावातच सापडतात.

पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात ओतुर हे गाव आहे. ओतुरला तुकोबा देहून चाकणमार्गे आले असावे. कारण पुर्वाश्रमी ते व्यापार करायचे तेव्हा मीठ नेण्यासाठी जुन्नर या व्यापारी पेठेत येऊन गेल्याचे पुरावे सापडतात. मांडवी व पुष्पावती नदीकाठी चैतन्य परंपरेचे साधनास्थळ असल्याने ते उत्तमापुरी आले. पायी प्रवास असल्याने पोहचायला उशीर झाला. गावात पोहचले तेव्हा अंधार झाला होता. म्हणुन ते जानु तेल्याकडे विचारपुस करु लागले की, इथे चैतन्यांचा आश्रम कोठे आहे. तेव्हा गावातील लोकांनी त्यांना सांगितले की गावापासुन सुमारे मैलभर दूर कपर्दिकेश्वराजवळील मठात एक साधू राहतात, पण पुढे निर्जन, घनदाट आरण्य आहे त्यामुळे आपणाह श्वापदांपासुन धोका आहे. तरी आपण रात्रीचा मुक्काम गावातच करा व पहाटे उठुन साधूना भेटायला जा. म्हणून तुकोबा रात्री गावातच जानु तेल्याच्या घरी थांबले. प्रश्न असा की, जानु तेल्याकडंच का थांबले? कारण तुकोबांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक संताजी महाराज जगनाडे हे सदुंबऱ्याचे होते. संताजीमहारांजे व्याही हे जानु तेली होते. या ओळखीने ते पेठेतील तेल्याच्या घरात मुक्कामी राहिले. (यास पुरावा म्हणजे आजही जानुतेल्याची पडक्या घराची बखळ ओतुरमध्ये आहे. तिचा ताबा पुर्वी उल्हास शंकर डुंबरे यांच्याकडे होता आता ती बखळ पांडुरंगबोवा घाटकरांच्या मुलाच्या ताब्यात आहे. आजही तिथं तुकोबांच्या पादुका आहेत. तेथे नित्यनेमाने तेली मंडळी दिवाबत्ती, पूजा करतात. चैतन्यांची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवताना या ठिकाणी थांबते व संतपर अभंग घेऊन महाराजांना वंदन केल जाते.)

पहाटे तुकोबा उठुन चैतन्यांच्या भेटीसाठी गावच्या उत्तर दिशेला मठाकडे निघुन गेले. "सापडविले वाटे जाता गंगास्नाना। मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥" मला वाटतं संपुर्ण अभंगाकडे एककालिक, व एकस्थल घटीत घटना म्हणुन पाहू नये. तुकोबा स्नानाला पहाटे ऋषिमुहूर्तावर चालले होते. स्नान केल्याशिवाय गुरुंना कसे भेटतील? म्हणुन स्नानाला चाललो असताना मला गंगावाटेवर त्यांनी सापडविले, ही घटना ओतुरची वाटते. कारण कपर्दिकेश्वराकडे वाटेत गंगावाट म्हणुन एक मांडवी नदीकडे जाणारी खोलवाट आहे. (सध्याच्या गाडगे म. विद्यालयाशेजारील वाट. या वाटेवर चैतन्य महाराजांनी तुकोबांना सापडविले व प्रत्यक्ष अनुग्रह दिला. कारण याच ठिकाणी पुढे तुकोबांचे एक मंदीर बांधले, ते जीर्ण मंदीर या गंगावाटेवर आजही आहे. तुकोबा ओतुरला येऊन गेल्याचे 'तुकारामांची गुरुपरंपरा' या ग्रंथात वा. सी. बेंद्रे हेही मान्य करतात. चैतन्यांनी स्वप्नात जे पावशेर तुप मागितले होते, त्याचा स्वप्नात विसर पडल्याची हळहळ तुकोबा व्यक्त करतात. हे पावशेर तूप घेऊन गुरुभेटीला ओतुरास आले म्हणजे काय?' अध्यात्मशास्रात तूप म्हणजे स्नेहयुक्त अंतःकरण असं नथुसिंगबोवा रजपुत यांनी आपल्या कीर्तनमाला या ग्रंथात सविस्तर नमुद केले आहे. तुकोबा अंतःकरणाला तुपाची उपमा देतात. त्या अंतःकरणाचे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे चार विभाग मानले जातात. पैकी पावभाग म्हणजे चित्त होय. शिष्याच्या वित्ताचे अपहरण करणारे गुरु या जगात भरपुर आहेत, पण चित्ताचं अपहरण करणारे सद्‌गुरु दुर्लभ आहेत. म्हणुन चैतन्यांना आपले चित्त गुरुपदेशानंतर तुकोबांनी अर्पण केल्याचे अभंगांत ते वर्णनही करतात.

 

॥२॥ तुकोबांचे गुरु कोण?

वारकरी पंथात सर्वात कळीचा व संवेदनशील असा हा मुद्दा आहे.

राघव चैतन्य केशव चैतन्य। सांगितली खुण माळिकेची ॥ ५ ॥ 
बाबाजी आपुले सांगितले नाम। मंत्र दिला रामकृष्णहरि ॥ ६ ॥

या कडव्यांमधुन तुकोबांनी आपली गुरुपरंपरा सांगितली आहे. वै. नथुसिंग बाबा राजपुतांपासुन ते ल.रा. पांगारकर व्हाया वा. सी. बेंद्रे या सर्वांचे मते राघवचैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य ही तीन भिन्न व्यक्तिमत्वे आहेत. मात्र कृष्णदास बैरागी (जुन्नर), निरंजन स्वामी, आर्दीच्या मते बाबाजी चैतन्य व केशवचैतन्य एकच आहे. प्रथमतः राघव चैतन्य चरित्र पाहू.

राघव चैतन्य चरित्र :-

सह्याद्री पर्वतरांगेत मांडवी व पुष्पावती न‌द्या वाहतात. मांडव्य ऋषिंनी जेथे साधना केली त्या मांडवे गावाच्या परिसरात या नदीचा उगम होतो. पराशरांची तपोभूमी असलेल्या याच भूमीत पुष्पावती तथा कुसुमावती नदी वाहते. या दोन्ही नद्या ओतुर पासुन अगदी चार एक कि.मी.च्या अंतरात एकमेकींना मिळतात. या संगम परिसरात राघवचैतन्यांनी साधना केली. निरंजनबोवा नाशिककर यांच्या 'चैतन्य विजय ग्रंथात राघवचैतन्य चरित्र आले आहे. निरंजन बोवांनी कृष्णदास बैरागी (धर्माधिकारी) यांच्या 'चैतन्यकथा कल्पतरु'यांच्या ग्रंथाधारे शके १७०९ प्लवंग संवत्सर, कार्तिक शु. एकादशीला 'चैतन्य विजय' ग्रंथ लिहिला आहे. मात्र कृष्णदास बैरार्गीच्या चैतन्य कथाकल्पतरु आधारे आपण लेखन केलेय, हेही ते नमुद करतात.

कृष्णदास बैरागी परमभक्त। तेणे वर्णीला हा वृत्तांत। शके पंधराशे शहाण्णवात। ग्रंथपूर्ण पै जाला ।।१४१ ॥ (चैतन्य विजय) :-

याचा अर्थ कृष्णदास बैरागींचा ग्रंथ इ.स. १६७४ व निरंजन बोवांचा ग्रंथ इ.स. १७८७ चा होय. शंभरएक वर्षात अशी काय आपत्ती आली की, मुळ ग्रंथ नष्ट झाल्याने दुसरा ग्रंथ लिहावा लागावा? याविषयी नंतर सविस्तर चर्चा करु. निरंजन बोवांचा चैतन्यविजय हा अगदी छोटेखानी ग्रंथ फक्त सहा अध्याय व ७६० ओव्यांचा आहे. त्यात त्यांनी चैतन्य संप्रदायाची जी गुरुपरंपरा दिली आहे त्यात राघव चैतन्य, केशव चैतन्य या दोघांचे चरित्र देऊन 'तुकोबा चैतन्य' असे तुकोबांना संबोधिले आहे. या निसर्गरम्य परिसरात राघव चैतन्यांनी अतिशय दृढ साधना केली. साधनेत देहाकडे त्यांचे भान राहिले नाही. सर्व आत्मभान साधनेत रमल्यामुळे देह शुष्क झाला.

जाल्या नखांच्या चुंबळी । अंगावरी वाढली धुळी । जटा लोंबती भूतळी । देह शुष्क जाहला ।। :-

राघव चैतन्यांची तपःश्चर्या पाहून व्यास मुनी त्यांना प्रसन्न झाले व ओतुर, उदापुर या परिसरातच त्यांना अनुग्रह दिला. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय । 'हा द्वादश अक्षरी मंत्र राघव चैतन्यांना व्यासांनी दिला. चंद्रासमसुंदर वदन। जटा शोभती हेमवर्ण। सर्वांगी भस्म विराजमान। दिगंबर मूर्ति नेटकी ।।" असं देखणं व भारदस्त रुप त्यांचं असल्याचं चैतन्यविजयात वर्णन आहे. पुढे याच परिसरात त्यांनी साधना सुरु ठेवली. वै. नथुसिंगबाबा राजपुतही राघव चैतन्यांना ओतुरासच अनुग्रह झाल्याचे नोंदवितात.

केशवचैतन्य :-

कर्नाटकातील तृणामल्ल (तिनेवल्ली) येथील नृसिंहभटांना तीन मुले-

१. त्र्यंबक
२. विश्वनाथ
३. बापू

यवनांच्या स्वारीनंतर या तीन मुलांना व पत्नी आनंदीबाईंना घेऊन नृसिंहभट पुनवडी म्हणजे आजच्या पुण्यात आले. तृणामल्लला हे कुटुंब प्राचीन शिवालयात शिवाची पुजाअर्चा करुन चरितार्थ चालवायचे. कुळात शिवोपासना असल्याने ज्योतिर्लिंग क्षेत्री यांचा संचार असे.

पुढे या तीनही मुलांची लग्न झाल्यावर नृसिंहभट निवर्तले. त्यानंतर या तिनही पुत्रांमध्ये कलह सुरु झाले. त्यातील विश्वनाथ हे खुपच धार्मिक व श्रध्दाळु होते. तुलनेत इतर दोघे व्यवहारी होते. कुटुंब कलहामुळे विश्वनाथांनी घर सोडले व पत्नी गिरीजाबाई सोबत तीर्थयात्रेला निघाले. नाशिक त्र्यंबकेश्वरी जात असताना ते एके दिवशी वाटेत उत्तमापुर (ओतुर) येथे पोहचले. त्यांच्या सात्विक वृत्तीब‌द्दल निरंजनबोवा लिहितात की,

बाबांची वृत्ती उदासीन। त्रिकाळ करावे संध्यास्नान। धर्मालागी उदारपूर्ण। गृहकृत्य काही करु नये ।।

योगायोगाने राघवचैतन्यांची व विश्वनाथ बाबांची ओतुरास कपर्दिकेश्वरी भेट झाली. राघवचैतन्यांच्या सेवेत ते रमु लागले. पुढे कालांतराने विश्वनाथ बाबांस पुत्र झाला व तिथुन पुढे ते अधिकच विरक्त होत गेले. "वैराग्यचित्त शुद्ध झाले। स्त्रीचे रिणही फिटले।" त्यामुळे एकेदिवशी सन्यासदीक्षा व अनुग्रह देण्याची विनंती विश्वनाथ बाबांनी राघव चैतन्यांकडे व्यक्त केली. त्यानुसार मांडवीकाठी ओतुरासच राघव चैतन्यांनी विश्वनाथ बाबांस उपदेश केला. विश्वनाथ बाबांच्या दारिद्र्‌यामुळेही त्यांना वैराग्य आले असावे. संसारतापाने ते त्रस्त होते. "कानी नाही बाळीबुगडी । मिळाली नाही लेणी लुगडी । सुख नाहीच अर्धघडी । झाले याचे संगतीने ।" असं निरंजनबोवा नोंदवितात. शरण आलेल्या विश्वनाथ बाबांना राघवचैतन्यांनी अनुग्रह दिल्यानंतर ते मांडवी, पुष्पावतीकाठच्या जंगलात फिरत राहिले. नंतर हे गुरुशिष्य उत्तरेत तीर्थयात्रेला निघुन गेले. व्दारका, काशी, प्रयाग, जगन्नाथपुरी आदि तीर्थे करीत ते कर्नाटकातील गुलबर्गाला पोहचले. मुसळधार पाऊस सुरु झाल्याने ते एका मशीदीत थांबले. आपले खडाव मशिदीच्या निजामस्थानी ठेवल्या. हे पाहून तेथे आलेला मुल्ला चिडला. त्याने धर्म बाटवला म्हणुन या साधूची बादशहाकडे तक्रार केली. बादशहाने त्यांना जाब विचारला असता, मशिदच आपल्याकडे आल्याचे राघवचैतन्यांनी सांगितले. लोककथा अशी सांगितली जाते की, राघवचैतन्यांच्या आदेशाने ती मशीद उडुन दीड कोसावर गावाबाहेर उभी राहिली. हे दोघे पीर पैगंबर असावेत म्हणून बादशहाने आळंद गुंजोटीस चैतन्यद्वयींची भेट घेतली व शरणागती पत्करली. पुढे हे दोघेही तेथेच बराच काळ थांबले. त्यांच्या स्मरणार्थ बादशहाने दोन दर्गे बांधले त्यांना 'राघवदराज व केशवदराज' असे नाव दिले. या दोघांनी काशीच्या विव्दानांनाही शास्त्रार्थात हरविले. म्हणुन त्यांच्या स्मरणार्थ काशीच्या पंडीतांनी चैतन्यमठ स्थापन करुन यांच्या नावाने दोन शिवलिंगे स्थापन केली होती. (या घटनेचे स्मरण म्हणुन आजही ओतुरहून चैतन्यांचा पालखी सोहळा दरवर्षी महाशिवरात्रीस काशीला जातो.) पुर्वी साधुच्या सन्मानार्थ शिवलिंग स्थापन करणे, दर्गे बांधणे या प्रथा होत्या हे यावरुन सिध्द होते. आळंद गुंजोटीस पुढे राघव चैतन्यांनी समाधी घेतली. नंतर तेथुन जवळच असलेल्या मान्यहळ या गावी केशवचैतन्यांनी मठ बांधला व ते तेथे राहू लागले. काही दिवसांनी केशव चैतन्यांनी ओतुरकडे प्रस्थान ठेवले. नंतर शिष्यांनी मान्यहळला त्यांच्या पादुका स्थापन केल्या असं चैतन्यविजय ग्रंथात वर्णन आहे. राघव चैतन्यांची कृष्णावर अपार श्रध्दा होती म्हणुन त्यांनी विश्वनाथ बाबांचे सन्यासग्रहणानंतर 'केशवचैतन्य' हे नाव ठेवले. चैतन्यविजयात केशव चैतन्य व बाबाजी चैतन्य एकच आहे असं तिसऱ्या अध्यायात वर्णन आहे.

'सर्वजन म्हणती केशव चैतन्य। भाविक म्हणती बाबाचैतन्य। दोन्ही नामे एकचि जाण। अत्यादरे बोलती।। केशवचैतन्यांनी ओतुर येथे शके १४९३ प्रजापती संवत्सरी वैशाख व. व्दादशीस समाधी घेतल्याचे निरंजनबोवा नोंदवितात. या चर्चेतुन काही निष्कर्ष व प्रश्न पुढे येतात.

१. व्यासांनी ओतुरासच राघवचैतन्यांना अनुग्रह दिला
२. राघवचैतन्यांनी केशवचैतन्यांनाही ओतुरास अनुग्रह दिला
३. तुकोबांनाही प्रत्यक्ष गुरुभेट ओतुरलाच घडली.

मग प्रश्न असा पडतो की! बाबाजी चैतन्य हे तिसरे मानले तर ते कुठुन आले? केशव चैतन्यांनी बाबाजींना कोठे उपदेश केला? याबाबत पांगारकर, वा. सी. बेंद्रे, यांपासुन ते वै. नथुसिंगबोवा राजपुतांपर्यंत कोणीच स्पष्ट मत मांडत नाही. दुसरा प्रश्न असा की, मान्यहाळ येथे केशव चैतन्यांच्या भक्तांनी मठात पादुका ठेवुन सेवा सुरु केली. मग मान्यहाळची समाधी केशव चैतन्यांची का नसावी? कारण त्या नंतर खुप वर्षांनी तुकोबांना अनुग्रह झालाय. आजही मान्यहाळ वरुन पंढरपुरला दरवर्षी चैतन्यांची पालखी येते. अपल्याकडे साधुना बाबा म्हणतात. अमराठी प्रांतात 'जी' हे प्रत्यय लावतात. म्हणुन कर्नाटकात केशव चैतन्यांना आदरार्थी 'बाबाजी चैतन्य' असे का संबोधित केले नसेल? कारण त्यावेळी तेथे मुस्लिम राजवट होती. हिंदी, उर्दूचा प्रभाव असल्याने त्यांना बाबाजी का संबोधले नसेल? हाही प्रश्न अनुत्तरीतच राहतो. शाहू कालिन कालखंडात चैतन्यांच्या समाधी मंदीराच्या बाजुस ओतुरला पाणभिंत मांडवी किनारी बांधली आहे. तत्कालिन कागदपत्रातही" संन्याशाच्या समाधीस धक्का लावु नये" असा आदेश देऊन छ. शाहूंनी या स्थळावर खर्च केल्याचे गॅझेटमध्ये पुरावे उपलब्ध आहेत.

तुकोबांनीच आपली अध्यात्मिक वाटचाल कशी होत गेली? हे एका अभंगात नोंदवलंय..., शिष्याची पृष्ठभूमी अशी तयार व्हावी लागते. ऊदा. आरंभी कीर्तन करी एकादशी। देवाचे देऊळ होते जे भंगले। काही पाठ केली संतांची उत्तरे। आदी प्रमाणे पहावित.

'काय मी उद्धार पावेन । काय कृपा करीन नारायण। ऐसे तुम्ही सांगा संतजन । करा समाधान चित माझे।"

अशी जिज्ञासा निर्माण झाली की सद्‌गुरु स्वतः येऊन शिष्याचा अंगिकार करतात.

शिष्याला लुबाडणाऱ्या तथाकथित गुरुंचा तुकोबांनी ठायी ठायी समाचार घेतलाय. शिष्याच्या विताचं अपहरण करणारे गुरु खुप आहेत पण शिष्याच्या चिताचं अपहरण करणारे सद्‌गुरु दुर्मिळ आहेत.

वाट पहावी लागत नाही. आंबा पाडाला लागल्यावर पोपटाला निमंत्रण देत नाही. उलट पोपटच शोधत येतो. तसं शिष्याची योग्य अवस्था झाली की गुरु स्वतःहून येतात. तुकोबा गुरुंना शोधायला निघाले नाही. ते म्हणतात मी गंगास्नानाला निघालो असता ते मला वाटेत शोधत आले. "सापडविले वाटे...., "असा शब्दप्रयोग आहे.

‘सत्यगुरुराये कृपा मज केली’ याचा तीन प्रकारे अर्थ लावावा लागेल

१. गुरुंनी माझ्यावर कृपा केली हे सत्य
२. माझ्यावर जी कृपा केली ती सत्य
३. सत्य हे विशेषण मानुन.... माझ्यावर कृपा केली ते सत्य गुरुराज होय

कृपा ही,

१. संकल्पकृपा
२. नेत्रकृपा
३. स्पर्श कृपा
४. मंत्रकृपा

या प्रकारांनी सद्‌गुरु शिष्याला अनुग्रह देतात. उदा.

१. कृपा कटाक्ष न्याहळिले। आपुले पदी मग बैसविले ।....
२. लावोनिया हात कुरवाळीला माथा -स्पर्शकृपा आहे
३. आवडीचा मंत्र सांगितला सोपा। सांगितले चिंता न करावी । -मंत्रकृपा
४. माझिये मनिचा जाणोनिया भाव। तो करी उपाव गुरुरावो।। -सकल्पकृपा

वरील चारही प्रकार तुकोबांना अनुभवायला मिळाले. शक्तिपातातही हिच चार माध्यमे वापरुन दिक्षा दिली जाते.

हरि शब्दात हृ हा धातु आहे. हृ हरति । म्हणजे भक्ताच्या ठिकाणचे पाप तो हरण करतो..... तोच कृष्ण होय.

राम शब्द उच्चारताना उच्छवास = रा 
म = ओष्ठ्य व्यंजन
बाहेर टाकलेले पाप परत आत येऊ देत नाही.. राम उच्चार

रामाचा आचार 
कृष्णाचा विचार 
आणि हरिचा उच्चार
‘रामकृष्णहरि’
राम रमयंती । कृष्ण कर्षती । हरि हरती ।।

सद्‌गुरुकडे जायचे तर विकार, मल घेउन कसे जाऊ शकतो? गुरुभेटीला जाण्यापुर्वी आमच्या अंतरंगातील मळ ज्ञानगंगेत स्नान करून धुवुन टाकला तरच सद्‌गुरु स्वकारतील. अंतरंगात षडविकारांची दुर्गंधी असेल तर गुरुकडे कसं पोहचु शकतो. "जो आत्मतीर्थे न्हाणिला।... "या आशयाची एक ओवी ज्ञानेश्वरीत आहे. आत्मतीर्थात स्नान म्हणजे गंगास्नान....या प्रयत्नात असताना मला स्वतः सद्‌गुरु शोधित आले व अनुग्रह देऊन माझा उद्धार केला.

भोजना मागती तूप पावशेर। पडिला विसर स्वप्नामाजी।

चैतन्य महाराजांना काय कमी होतं? ते शिष्याकडं पहिल्या भेटीतच तूप मागतात? आपण "मन चंगा तो कठौतीमें गंगा।" म्हण वापरतो ना? मन गंगाजळासरखं निर्मल असंल तर कशाला हवंय लौकिक गंगास्नान? तुकोबा संतांचं वर्णन करताना म्हणतात,

सर्वांग निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ।।

अशा संतांच्या केवळ दर्शनाने त्रिविध ताप नष्ट होतात. (तु.म.) अंतःकरण हे स्नेहयुक्त आहे. याचे चार भाग आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार यापैकी पावभाग म्हणजे "चित्त" मागितले. कारण, शरीरात - पित्त, संसारात - वित्त, परमार्थात - चित्त हवे असते. म्हणुन चैतन्यांनी भोजनासाठी चित्त मागितले पण तुकोबा म्हणतात मला स्वप्नात विसर पडला. महाराज म्हणतात की, काय अंतराय उत्पन्न झाला कोणास ठाऊक? त्यांनी जाण्याची घाई केली. मात्र आपली गुररुपरंरा सांगितली की, राघवचैतन्य, केशवचैतन्य ही आपली मालिका असुन माझे नाव बाबाजी आहे.

त्यांनी मला "रामकृष्ण हरि" हा मंत्र दिला. तो दिवस माघ शु. १० गुरुवार पर्वकाळ होता. माघ या शब्दाचा अर्थ होतो, 

मा+अघ = माघ

माझे अघ म्हणजे पाप नाहिसे करणारा म्हणजे माघ होय. दशमी याचा अर्थ डॉ. मोहरीर सरांनी सांगितल्याप्रमाणे ‘पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये’ ही शुध्द फक्त गुरुकृपेनेच होतात म्हणुन "पाहोनि गुरुवार" अशा पर्वकाळी महाराजांचा अंगिकार चैतन्यांनी केला. यासाठी हे बोलणी । अनुभवामृतपणी। स्वानुभुतीची मेजवानी। आत्मानुभव जनी केली ।। अ. 

 

॥३॥ अनुभव

गुरुपरंपरेविषयी विवाद्य स्थळे :-

तुकोबांच्या गुरुपरंपरेविषयी प्रमुख चार विवाद्य विषय चर्चिले जातात.

१. तुकाराम महाराजांचे गुरु केशव चैतन्य की बाबाजी चैतन्य?
२. बाबाजी व केशव चैतन्य एकच की भिन्न व्यक्ती?३. ओतुरला जी समाधी आहे, ती केशव चैतन्यांची की बाबाजी चैतन्यांची?
४. बंगालच्या कृष्णचैतन्यांनी तुकोबांना बाबाजींच्या रुपाने अनुग्रह दिला काय?

वरील वादासंबंधी वै. नथुसिंग भीमसिंग राजपुत यांनी सविस्तर मीमांसा ‘कीर्तनमाला भाग ३’मध्ये केली आहे. याशिवाय वा. सी. बेंद्रे यांनी 'तुकारामांची गुरुपरंपरा' यविषयी स्वतंत्र ग्रंथाव्दारे भूमिका मांडली आहे. ठाणे जिल्हा न्यायालयात डी. के. राजर्षि विरुध्द वा. सी. बेंद्रे या खटल्यातही वा. सी. बेंद्रे यांच्याबाजूने कोर्टाने निर्णय दिलेला आहे. निळोबाराय पिंपळनेरकर, बहिणाबाई, बहिणाबाईंचे शिष्य दिनकर कवी, रंगनाथ स्वामी, महिपती, तसेच देहू येथील बाड या सर्वांचा धांडोळा घ्यावा लागतो. ल. रा. पांगारकर, केळुसकर, डॉ. सदानंद मोरे, डॉ. किशोर सानप यांनीही याविषयी ओघात मतं मांडली आहेत. जुन्नरचे कृष्णदास बैरागी (धर्माधिकारी) यांनी सन १६७४मध्ये 'चैतन्य कथाकल्पतरु' नामक ग्रंथ लिहीला होता. या ग्रंथाची एक प्रत त्यांनी इ.स. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक समयी भेट दिली. पुढे औरंगजेबाच्या हल्ल्यात रायगडावरील दफ्तरखाना नष्ट झाला. त्यात हा ग्रंथ नष्ट झाला असावा. परंतु याची दुसरी प्रत कृष्णदास बैरागींच्या नंतर उपलब्ध झाली नाही. नाशिकचे निरंजन स्वामी यांनी याच ग्रंथाधारे 'चैतन्य विजय' नामक ग्रंथ लिहीला आहे. तो फारच अलिकडील आहे. नव्वदोत्तर कालखंडात ओतुरचे प्रा. वामनराव ओतुरकर यांनी 'चैतन्य महाराज चरित्र हा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला आहे. याशिवाय कै.रं.वा.टण्णु यांच्या 'वैभवशाली जुन्नर तालुका'या ग्रंथातील भूमिका, 'बाबाजी चैतन्य पालखी सोहळा स्मरणिका'या ग्रंथातही याविषयी चिंतन सापडते. याशिवाय पुणे विद्यापीठात " जुन्नर तालुक्यातील वारकरी संत परंपराः चिकित्सक अभ्यास या विषयावर डॉ. द.प्र डुंबरे यांनी जे संशोधन केले आहे, त्यातही याविषयी माहिती मिळते. या सर्वाच्या भूमिकेची मीमांसा करुन या वादावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करु या.

१. नथुसिंग महाराज राजपुत :-

वै. नथुसिंग महाराज राजपुत हे वारकरी पंथात मोठेबाबा म्हणुन ओळखले जायचे. नथुसिंग महाराज हे वै. विष्णुबोवा जोग, मारुतीबोवा ठोंबरे, शं. वा. दांडेकर, मारुतीबोवा गुरव, लक्ष्मणबोबा ईगतपुरीकर, बंकटस्वामी यांच्याच वारकरी शिक्षण संस्थेचे विचार पुढे नेणारे पंथिय प्रचारक जरी असले तरी त्यांचा व्यासंग व एकुणच अभ्यास विलक्षण होता. म्हणुन 'कीर्तनमाला भाग ३' मधिल नथुसिंग म.च्या विचारांची प्रथम दखल घ्यावी लागते.

नथुसिंग महाराज निरंजन स्वामींच्या चैतन्य कथाकल्पतरु या ग्रंथाचा आधार घेऊन राघवचैतन्य व केशवचैतन्य चरित्र स्पष्ट करतात. राघव चैतन्य, केशवचैतन्य दोघांचीही अनुग्रहभूमी ओतुर आहे, यास त्यांचा विरोध नाही. पण चैतन्यविजय ग्रंथातील "केशवचैतन्य हेच बाबाजी चैतन्य होत. "या निरंजन स्वामींच्या भूमिकेला ते विरोध करतात. "सर्वजन म्हणती केशवचैतन्य। भाविक म्हणती बाबाचैतन्य। दोन्ही नामे एकचि जाण। अत्यादरे बोलती ॥१॥ " या विधानाला नथुसिंग म. विरोध करतात. त्यासाठी त्यांनी काही दाखले दिले आहेत. त्याची मीमांसा करु या.

१. आपण साधारणतः दोन वंश सांगतो. पहिला मांस वंश व दुसरा विद्यावंश. वि‌द्यावंशात परंपरा सांगताना गुरु, गुरुणां गुरु, परात्पर गुरु अशी म्हटली तर बाबाजी, केशव, राघव अशी परंपरा सांगावी लागते. बालयोगी तथा स्वामी नारायणानंद या प्रकारची परंपरा अमान्य करीत. मी, माझे वडील, माझे आजोबा अशी त्रयी ते मांडत. या न्यायाने तुकोबा, बाबाजी उर्फ केशव, राघव अशी परंपरा बालयोगी मानतात. बेंद्रे मात्र बाबाजी, केशव व राघव अशी त्रयी मानतात.

२. तुकोबांच्या वह्यांमध्ये ( देहूस त्यांच्या वंशजांकडे जे बाड आहे) नथुसिंग राजपुतांना गाथेत जे नमन सापडले त्यात नमनातच श्री राघवचैतन्य, श्री केशवचैतन्य, श्रीबाबाजी चैतन्य असाच उल्लेख आहे. इंदूप्रकाश गाथेतही आरंभी या तिघांना नमन आढळते.

३. गुरुपरंपरेच्या अभंगांत 'मुख्य महाविष्णु चैतन्याचे मुळ । 'हा निळोबाराय पिंपळनेरकरांचा प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगात पुढील प्रमाणे निळोबाराय आपली गुरुपरंपरा सांगतात.

"राघवचैतन्य केले अनुष्ठान। त्यासी व्दैपायाने कृपा केली।।४॥ 
राघवा चरणी केशव शरण। बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची ॥५॥" 

या अभंगात राघव, केशव, बाबाजी अशी परंपरा दिसुन येते. 

४. तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई शिऊरकर यांच्या अभंगात पुढील चरण सापडते, ".....। तेणे राघवी विचार ठेविलासे ॥७॥ केशव चैतन्य बाबाजी चैतन्य। झालेसे प्रसन्न तुकोबाशी ॥ ८ ॥" नथुसिंगबोवांच्या मते केशव व बाबाजी एकच असते तर दोन्ही नावांपुढे चैतन्य हे पद आले नसते. हा युक्तीवाद पटण्यासारखा आहे कारण बहिणाबाई 'देवासी भांडण' यावरील २४व्या अभंगात म्हणतात की, 

बाबाजीचे हाते तुकोबाचे ऋण । फेडविले जाण येणे खरे ॥

यावरुन बाबाजी हे परंपरेत तिसरे आहेत, हे सिद्ध होते.
५. महिपती भक्तीलिलामृतच्या पाचव्या अध्यायातील २९७ व्या ओवीत म्हणतात की, 'राघवचैतन्य जगविख्यात । केशवचैतन्य महाभक्त । बाबाचैतन्य प्रसिध्द संत । ज्यांनी भक्तीपंथ स्थापिला ॥

महिपती सुध्दा तीन नामांचा उल्लेख करतात. केशव हेच बाबाजी असा उल्लेख करत नाहीत. यावरुन महिपतींच्या मते राघवचैतन्य, केशवचैतन्य, बाबाजी चैतन्य हे तिघेही भिन्न असावेत असा निष्कर्ष निघतो.

६. बहिणाबाईंचे शिष्य दिनकवींचा दाखला नथुसिंगबोवा राजपुत देतात. ती ओवी अशी, "राघो चैतन्यभरी । केसोचैतन्य पूर्ण लहरी। बाबा चैतन्यापरी। तेचि ते लाधली ॥ २८ ॥" दिनकर कवीही तीन गुरुशिष्यांची परंपरा सांगतात.

७. निरंजन स्वामी दोघांची परंपरा सांगतात, पण रंगनाथ स्वामी तिघांचा उल्लेख करतात. त्यांनी संत मालिकेत राघवचैतन्य, केशवचैतन्य, बाबाजीचैतन्य, तुकोबाचैतन्य अशी संतमालिका वर्णिली आहे.

८. नथुसिंगबोवांनी देहकरांकडे ज्या जुन्या पोथ्यांचा शोध घेतला त्यातही राघव, केशव, बाबाजी, तुकोबा अशीच परंपरा त्यांना दिसुन आली. विशेष म्हणजे ही बाडे हस्तलिखीत असून महाराजांच्या वंशजांकडे बोवांना मिळालीत, त्यामुळे बोवांचे मत नाकारता येत नाही.

९. वा. सी. बेंद्रे यांनी 'तुकारामांची गुरुपरंरा' या विषयावर स्वतंत्र ग्रंथाद्वारे चर्चा मांडली आहे. तुकारामांचे गुरु बाबाजी चैतन्यच आहेत, पण बाबाजी व केशव हे दोघे भिन्न पुरुष असल्याचे बेंद्रे नोंदवितात. याशिवाय तुकोबांच्या अनुग्रहापुर्वी सुमारे शंभरएक वर्षे पुर्वीच केशव चैतन्य समाधिस्त झाल्यामुळे तुकोबांना नंतर फक्त स्वप्नात गुरुपदेश झाल्याचे बेंद्रे नाकारतात. कारण तुकोबा स्वप्नउपदेशानंतर ओतुरला गुरुभेटीला येऊन गेल्याचे बेंद्रेही मान्य करतात. याचा अर्थ ते तुकोबांना बाबाजींनीच अनुग्रह दिला व बाबाजी व केशव भिन्न पुरुष असल्याचे बेंद्रेही मानतात.

१०. ओतुरचे कै. डी. के. राजर्षि हे आमदार होते. हे राजर्षि कुटुंब अलिकडील शतकात पुण्याहून ओतुरला स्थायिक झाले आहे. ते स्वतः चैतन्यांचे वंशज असल्याचे सांगतात. त्यांनी वा. सी. बेंद्रे यांच्याविरुद्ध ठाणे येथील न्यायालयात दावा दाखल केला होता. केशव व बाबाजी चैतन्य एकच आहेत असा राजर्षिचा दावा वा. सी. बेंद्रे यांनी कसा चुकिचा आहे, हे सिद्ध करुन दाखविले आहे. राजर्षि केस हरले आहेत, म्हणुन तर त्यांनी स्वतः ट्रस्टी असलेल्या ओतुरच्या मंदिरात 'केशव चैतन्य समाधी मंदीर' असा फलक लावला आहे. वा. सी. बेंद्रे यांनी राजर्षिचा ब्राम्हणी बुरखा फाडुन खरि चेहरा जगा समोर आणला. दुर्दैवाने त्याच कालखंडात ओतुरचे मा.आ. कै. श्रीकृष्ण तांबे निवर्तले. नंतरच्या कालखंडात राजर्षिना जाब विचारणारे ओतुरमध्ये नेतृत्व उदयास आले नाही.

११. ओतुरचे सुमंत महाराज नलावडे हे महाराष्ट्रातील ख्यातकिर्त किर्तनकार होय. ते ही निरंजनबोबांच्या 'चैतन्य विजय मधील आक्षेपार्ह लिखाणाबद्दल शंका घेतात.

१२. डॉ. सदानंद मोरेही तुकोबांचे गुरु बाबाजी चैतन्यच असल्याचे नोंदवितात.

१३. अलिकडील कालखंडात तुकोबांवर अभ्यासपूर्ण मांडणीतून समग्र तुकाराम दर्शन घडविणारे डॉ. किशोर सानपही बाबाजी, केशव, राघवचैतन्य अशी परंपरा मानुन बाबाजी हेच तुकोबांचे गुरु असल्याचे नोंदवितात.

१४. ओतुर परिसरातील लोककथांवरुन ओतुर येथे बाबाजी चैतन्यांची समाधी असल्याचे दिसते. लोकगीतांतही तसे दाखले दिसुन येतात.

१५. प्रा. वामनराव ओतुरकरांचा चैतन्यांवर स्वतंत्र ग्रंथ आहे. त्यात त्यांनी गॅझेट मधील पुरावे देऊन ओतुरला बाबाजी चैतन्यांचीच समाधी असल्याचे मत नोंदविण्याचा प्रयत्न केला आहे.

२. निरंजनस्वार्मीचा चैतन्यविजय प्रमाण मानावा का?

चैतन्य परंपरेवर मुळ लेखन जुन्नरच्या कृष्णदास बैरागींनी केले होते. परंतु त्यांचा ग्रंथ नष्ट केला की झाला हा संशोधनाचा विषय आहे. कारण जुन्नरला शंकराचार्यासहित सर्वांनाच वादविवादात हरविणाऱ्या शूद्रवंशी शाहिर गोविंद भागवतांचा 'गोविंदरावी' हा ग्रंथ जुन्नरच्या ब्राम्हणांनी जाळुन टाकला. कारण काय तर शूद्रांना संस्कृत वेदांतावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. (जाणकारांनी रं.वा.टण्णू यांचे लेखन मुळातुन वाचावे.) या पार्श्वभूमीवरच "चैतन्यविजय'चे नाट्य घडतेय. त्यामुळे चैतन्य समाधी मंदीराला स्थानिक ओतुरकर शेतकऱ्यांनी दान दिलेली जमीन व मालमत्ता हडप करण्यासाठी राजर्षिनी निरंजनबोवांकडुन जे चरित्र लेखन घडवुन आणले त्यात काही घटना कावेबाज व धूर्तपणे घुसडल्यात हे वा. सी. बेंदेंनी सिध्द करुन दाखविले आहे. एखादा संत जगन्मान्य झाल्यावर त्या संत पुरुषाच्या नावावर दान मिळणारी मालमत्ता कुटुंबाची वैयक्तिक मालकी कशी होऊ शकते? राजर्षिनी तर हव्यासापोटी स्वतःच्या कुटुंबियांच्या नावे ट्रस्ट स्थापन करुन देवस्थानच्या कोट्यावधीच्या मालमत्तेवर कब्जा मिळवला आहे. त्यामुळे बेंद्रेच्या म्हणण्याची सत्यता पटते की, चैतन्यविजय हा ग्रंथ विवाद्य आहे.

३. राजर्षिचा अहंकार :-

ओतुरचे समाधी मंदीर हे दगडी चौथऱ्याची समाधी नाही. ते समाधीवर वाढलेले मातीचे वारुळ आहे. सन २०१५ पर्यंत या समाधी मंदीरात सर्वांना मुक्त प्रवेश व स्पर्श दर्शन खुले होते. अलिकडे राजर्षिच्या मनात उच्चनीचतेचा प्रभाव वाढला. त्यांनी समाधीपुढे एक लोखंडी गेट बसवून फक्त दुरुन दर्शन प्रथा सुरु केली. फक्त त्यांच्या संमतीने त्यांचेच ठराविक लोक समाधीजवळ जाऊ शकतात. अत्यंत चीड आणणाऱ्या या कृतीचा ओतुरकरांकडून साधा निषेधही झाला नाही, यापेक्षा शरमेची बाब काय असू शकते? दुसरे असे की, केशवचैतन्यांनी आपला पुर्वाश्रमीचा नातू यांसही अनेक चमत्कार दाखवल्याचे निरंजनबोवा नोंदवितात. पण पुढे त्याचा वंशवृक्ष विस्तारल्याचे ते जर सांगत नाहीत, तर विद्यमान राजर्षि आले कोठुन !

४. सदानंद मोरे यांचे मतः-

डाॅ. सदानंद मोरे यांनी नुकताच एक लेख लिहून तुकोबांच्या गुरुपरंपरेचा संबंध थेट नाथ परंपरेशी जोडला आहे. त्यांनी त्यासाठी गाथेतील मंगलचरण व प्रारंभिक नामनिर्देशाकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते तुकोबांनी गुरुपरंपरेत ज्या विश्वंभर बाबांचा उल्लेख केलाय, ते विश्वंभर बाबा म्हणजे तुकोबांचे आजोबा विश्वंभर बाबा असावेत. डाॅ. मोरे यांच्या मते मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर याच परंपरेची एक शिवोपासक शाखा म्हणजे तुकोबांची गुरुपरंपरा होय. परंतू त्यांच्या विवेचनावर शंका घेण्यास पुढील दोन कारणे आहेत.

१) चैतन्य परंपरेत ज्या विश्वंभर बाबांचे नाव मोरे यांनी अभ्यासाअंती निश्चित केलंय, ते विश्वंभर बाबा मोरे कुळातीलच असावे असे त्यांचे मत आहे. परंतू ओतूरास जी चैतन्यांची समाधी आहे, तिथून तीन कि.मी. अंतरावर एका विश्वंभर बाबा नामक साधूची प्राचीन समाधी आहे. याच परिसरात राघव, केशव चैतन्यांचा वास होता, त्याच परंपरेतील हे साधू असावेत. म्हणून या समाधीस्थळाचे संशोधन होऊन देहूकरांच्या गाथेत व इतर जे विश्वंभर बाबांचे संदर्भ आहेत, ते विश्वंभर बाबा म्हणजेच ओतूरजवळ डोंगर पायथ्याशी असलेली विश्वंभर बाबाची समाधी असावी हा तुलनेत भक्कम पुरावा ठरतो.

२) डाॅ. सदानंद मोरे ज्या नाथ परंपरेशी तुकोबांची गुरुपरंपरा जोडण्याचा क्लू दर्शवितात, तो सत्य मानला तर, ‘मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळ । संप्रदाय सकळ येथोनिया ॥ १ ॥’ हा निळोबांचा अभंग फोल ठरतो. याशिवाय तुकाराम शिष्या बहिणाबाई शिऊरकरांनी मांडलेली गुरुपरंपरेची मांडणीही मिथ्या ठरते. म्हणून या प्रकरणाच्या मुळाशी संशोधकांनी जाऊन नवीन काही तथ्ये हाती सापडतात का? हे पाहणे गरजेचे झाले आहे.

५. राघवचैतन्यांची समाधी निश्चित कोठे? :-

१) राघव चैतन्यांच्या समाधीबाबतही चैतन्यविजय ग्रंथात बहुतांश असंबध्द मांडणी आहे. गुलबर्गा येथे राघव दराज जे आहे, ते या गुरुशिष्यांच्या स्मरणार्थ बांधलेले दर्गे आहेत. 

२) राहिला प्रश्न काशी येथील चैतन्य धर्मशाळेचा. तेथील राघवेश्वर व केशवेश्वर ही शिवलिंगे काशीतील विव्दानांना धर्मसभेत हरविले म्हणून तेथील जनतेने सन्मान म्हणून स्थापन केलेली आहेत.

३) सध्या अवघा महाराष्ट्र ज्यांच्याकडे प्रतितुकाराम म्हणून श्रध्देने पाहतो, ते ह.भ.प. भोसले बाबा. ते वै. कोंडाजीबाबांचे शिष्य आहेत. वर्षभर हे गृहस्थ पायी वारीत असतात. त्यांनी राघवचैतन्यांची समाधी शोधून काढली आहे. त्यांच्या मते कर्नाटकच्या सीमारेषेजवळ जे आळंद जवळ गुंजोटी गाव आहे, तेथे देशपांडेंच्या वाड्यात एका साधूची जिवंत समाधी आहे. ती समाधी म्हणजे राघवचैतन्यांची समाधी होय.

भोसले बाबांचे हे मत प्रमाण मानले तर गुंजोटीला राघवचैतन्य, मान्यहळला केशव चैतन्य व ओतूरास बाबाजी चैतन्य समाधी अशी नवी दिशा दिसू लागते. म्हणून मूळ चैतन्यविजय ग्रंथ हाती लागणे जरुरी आहे

सारांश :-

तुकोबांच्या गुरुपरंपरेचा अभ्यास करताना पुढील काही सूत्रे हाती लागतात.

१. राघवचैतन्यांना व्यासांनी ओतुरला मांडवी, पुष्पावती तीरी उपदेश केला आहे.

२. केशवचैतन्यांना ओतुर येथेच राघवचैतन्यांनी अनु ग्रह दिला.

३. तुकोबांची प्रत्यक्ष गुरुभेट ओतुरला गंगावाटेवर झाली आहे.

४. राघवचैतन्य, केशवचैतन्य, बाबाजी चैतन्य हे तीन भिन्न पुरुष आहेत.

५. तुकोबांच्या जन्मापुर्वी सुमारे पाऊणशे वर्षे समाधिस्त होणारे केशव चैतन्य कसा उपदेश करु शकतात?

६. बाबाजीचैतन्यांनीच तुकोबांना गुरुपदेश केला आहे.

७. मान्यहळ येथील समाधि केशव चैतन्यांची गृहित धरली, तर अमराठी प्रांतात साधूना नावाऐवजी बाबाजी म्हणतात. म्हणुन मान्यहळ येथील मठात राघवचैतन्यांच्या समाधीनंतर केशवचैतन्य काही वर्षे राहिले व त्यांनी तेथेच समाधी घेतली असावी का? या अंगाने विचार व्हावा.

८. बाबाजी चैतन्यांचे मूळ, अनुग्रह स्थल याविषयी सशोधन होणे गरजेचे आहे.

९. केशवचैतन्यांशी संबंध प्रस्थापित करुन नविन चैतन्यविजय लिह्न घेणाऱ्या प्रवृत्तींनी बाबाजी हे व्यक्तिमत्व झाकुन तर ठेवले नाही ना? कदाचित ओतुरची समाधी बाबाजी चैतन्यांची असु शकते.

१०. कृष्णदास बैरागींच्या मुळ चैतन्य कथाकल्पतरुची प्रत शिवकालीन बाडात सापडली तर हे सर्वच प्रश्न सुटतील.

 

(लेखक हे छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभाग व भाषा संशोधन केंद्राचे प्रमुख आहेत.)
***   ***   *** 

 

संदर्भ सूचि :-

१) समग्र तुकाराम दर्शन-डा. किशोर सानप. विजय प्रकाशन, नागपूर. प्र.आ. २००८

२) संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रृति-गं. बा. सरदार, श्रीविद्या प्रकाशन पुणे१९८२

३) तुकाराम दर्शन-गं. बा. सरदार, माडर्न बुक डेपो, पुणे. १९६८

४) जगद्‌गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अभंग गाथा-संपा. सदानंद मोरे व दिलीप धोंडगे. श्री विठोबा रखुमाई देवस्थान देहू. २०००

५) तुकाराम महाराज यांची गुरुपरंपरा-वा. सी. बेंद्रे. मौज प्रकाशन गृह, मुंबई १९६३

६) श्री तुकाराम गाथा-बाबुराव हरि देवडीकर. श्री ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ, सोलापूर १९९२

७) भक्तविजय-महिपती ताहराबादकर, निर्णयसागर, मुंबई, १९५०

८) चैतन्यविजय-निरंजनबोवा नाशिककर, प्रकाशक-राजर्षि बंधू, ओतूर.

९) जोग महाराज वारकरी कीर्तन माला-नथूसिंग डोंगरसिंग रजपूत, आळंदी देवाची

१०) विद्रोही तुकाराम-आ.ह.साळुंके, पुणे १९९७

११) डाॅ. सदानंद मोरे यांचा नोव्हेंबर २०१८ मधील फेसबुक वरील लेख -"तुकारामांच्या गुरुपरंपरेचे संशोधन-काही क्लू"

मुलाखत-

१) ह.भ.प. सुमंत महाराज नलावडे, ओतूर, ता. जुन्नर जि.पुणे. २) ह.भ.प.निवृत्तीबोवा डुंबरे, मु.पो. ओतूर. ता. जुन्नर जि.पुणे. ३) कै.रं वा.टण्णू गुरुजी, जुन्नर जि. पुणे ४) ह.भ.प. भोसले बाबा, कोंडाजीबाबा डेरे पालखी सोहळा, पारुंडे. जि. पुणे. 

 

लेख-११. सांगून उरतो तुकाराम (कविता)

-दासू वैद्य

१. तुकाराम

जगण्याचा पाया
चालण्याचे बळ
विचाराची कळ
तुकाराम

शब्दांचे इमान
अक्षरांचे रान
अभंगाचे पान
तुकाराम

माणसाची जात
पेटलेली वात
कष्टणारा हात
तुकाराम

भेदणारे मूळ
आशयाचे कूळ
भाषेचा कल्लोळ
तुकाराम

पुन्हा उगवतो
खोल पसरतो
सांगून उरतो
तुकाराम

 

('तत्पूर्वी'मधून साभार)

 

२. तुकोबा

फक्त तुझ्या नामघोषाचे प्रवाह शब्दाकडे वळवून
कवितेचं बारमाही भरघोस पीक घेण्याचा आमचा इरादा, 
आमच्या शब्दांचं अवकाश भरण्यासाठी 
तुझ्या नावाचा वापर कवितेमधून

एक खाजगी विचारू तुकोबा, 
सगळ्याच विद्यापीठातून 
तुझे अभंग अभ्यासक्रमाला असतात 
यासाठी तू काही विशेष प्रयत्न करतोस का? 
नाही कवी म्हणून हे सर्व माहीत असायला हवं बाबा

नाकातोंडात पाणी जाईपर्यंत 
पंडितांनी तुझ्या शब्दांना इंद्रायणीत बुडवलं, 
तुझी कविता म्हणजे कातडीसारखी जगण्याला चिकटलेली, 
आम्ही तयार करतो वाफे 
त्यात काही तुझ्यासारखं पेरावं म्हणून 

पण महापुरात आमचे शब्द 
मातीला घट्ट धरू नाही शकत, 
जगण्याचा अंतःप्रवाह
कवितेकडे वळवता आला पाहिजे,
आमची श्वासाची लय कवितेत उतरत नाही 
नुसतेच भजनात मृदंगासारखे वाजत राहतो, 
आता आम्हाला कळायला हवं 
नुसतं तुझं नाव घेऊन कविता मोठी होत नसते

त्याकरिता 
जगण्याशी सम साधायला 
शिकलं पाहिजे.

 

(महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व गीतकार असलेले दासू वैद्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.)

 

लेख-१०. सायनासंगीत तुकोबा (कविता)

-इंद्रजित भालेराव

खरं सांग तुकया । तुझा अनुभव
तुला कधी देव । भेटला का?

निश्चयाच्या बळा । मानिलेस फळ
निश्चयाचा तळ । गाठलास

पांडुरंग तुझा । झाला का आधार
तुझा त्याने भार । वाहिला का?

तुझ्यासाठी होते । पंढरिचे टोक
त्याच्यासाठी नेक । राहिलास

प्रवासात कधी । मिळाले का सुख
तुझी रुखरुख । थांबली का?

मला सोबतीला । नाही मागेपुढे
कुणाभोती येढे । घालू सांग?

किती आर्त तुझ्या । गळ्यातला स्वर
किती ताणू तार । विणेची या?

काळ गेला पुढे । हा न माझा गुन्हा
जरी पुन्हा पुन्हा । बोललो मी

मंबाजी आहेत । नाही इंद्रायणी
गंगा मैली कुणी । केली तुकया?

तोच तोच भाव । पुन्हा तीच स्थिती
वक्राकार गती । येत आहे

तोच पांडुरंग । तीच रखुमाई
तेच भक्त पायी । लागतात

त्याच बडव्यांचा । तोच अवतार
चोखा खाई मार । पुन्हा पुन्हा

३ 

तुका नव्हे टाळ । तुका ना चिपळी
निर्वाणीची टाळी । तुकाराम

तुका नव्हे भाळ । तुका नव्हे टिळा
चैतन्याची कळा । तुकाराम

देठाविना तुका । आकाशिचे फळ
भुईतली कळ । तुकाराम

तुका ना बाहेरी । तुका नाही आत
तापलेला शांत । तुकाराम

गाण्या गाण्यातले ठेके
झाले काळजाचे ठोके

जनी पाणियाशी गेली
माझी कूस ओली झाली

माझा आवाका केवढा?
तुका आकाशा एवढा

निळा आकाशी घुमट
तशी तुझी सुरावट

तुझा आलाप दिगंत
माझी पाखराची गत

तुका असून तू ताठ
दिली प्रवाहाला पाठ

धीट केलीस उत्तरे
प्रश्न विचारून नवे

तुझा संघर्ष तू केला
त्याचा इतिहास झाला

अजूनही तुझा गाथा
सावरितो तोल जाता 

तुकया तुझे युद्ध । अधुरे अपुरे
शाबूत खपुरे । पितृत्वाचे

जगला वाचला । असतास तरी
मग मजा खरी । येत होती

पुत्राच्या हातात । देव देतो छिन्नी
सैरभैरपणी । बाप होतो

घाईत गेलास । सुटलास बापा
बापपण तापा । आले नाही

सायनासंगीत तुकोबा
तुम्ही उभे राहता डोळ्यासमोर

अंधारातून एकटच चालताना
वाटतं समोरून तुम्ही याल

तुमच्या लीळा वाचताना वाटतं
आपणच की तुकाराम म्हणजे

तुम्हाला बुडावं लागलं डोहात
म्हणून आम्हाला तरणं समजलं

तुमच्या प्रायश्चित्तानं आमच्यासाठी
सुटकेचा मार्ग मोकळा केला

तुम्ही महादुष्काळ साहिला
म्हणून आम्ही सुकाळ पाहिला

इतके जुळले आपले ऋणानुबंध
की तुमच्या डोहाचे आम्ही तरंग

तुमच्या राहिलेल्या अपूर्ण प्रतिज्ञा 
स्वप्नात येऊन निःसंकोच करावी आज्ञा

 

(इंद्रजित भालेराव हे मराठीतील प्रसिद्ध कवी व गीतकार असून मराठीचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)

 

लेख-९. तुकोबांच्या भेटी शेक्स्पीअर आला (कविता)

- विंदा करंदीकर

तुकोबांच्या भेटी शेक्स्पीअर आला ।
तो झाला सोहळा दुकानात ॥

जाहली दोघांची उराउरी भेट ।
उरातले थेट उरामध्ये ॥

तुका म्हणे "विल्या, तुझे कर्म थोर ।
अवघाची संसार उभा केला" ॥

शेक्स्पीअर म्हणे, "एक ते राहिले ।
तुवा जे पाहिले विटेवरी" ॥

तुका म्हणे, "बाबा, ते त्वा बरे केले ।
त्याने तडे गेले संसाराला ॥

विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी ।
माझी पाटी कोरी लिहोनिया" ॥

शेक्स्पीअर म्हणे, "तुझ्या शब्दांमुळे ।
मातीत खेळले शब्दातीत" ॥

तुका म्हणे, "गड्या, वृथा शब्दपीट ।
प्रत्येकाची वाट वेगळाली ॥

वेगळीये वाटे वेगळाले काटे ।
काट्यासंगे भेटे पुन्हा तोच ॥

ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी ।
कजागीण घरी वाट पाहे" ॥

दोघे निघोनिया गेले दोन दिशा ।
कवतिक आकाशा आवरेना ॥

 

(विंदा करंदीकर हे मराठी भाषेला समृद्धी देणारे कवी असून त्यांना भारत सरकारने ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे.)

 

लेख-८. समाजसुधारक संत तुकाराम

- श्यामसुंदर महाराज सोन्नर

संत म्हणून तुकाराम महाराज यांचे कार्य जितके श्रेष्ठ आहे, तितकेच समाजसुधारक म्हणूनही तुकाराम महाराज यांच्या कार्याचा आवाका मोठा आहे. लहानातल्या लहान विषयापासून ते समाजातील मोठ्यातल्या मोठ्या समस्येवर तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांतून उपाय सुचविलेले आहेत. त्यावर भाष्य केलेले आहे. म्हणूनच तुकाराम महाराज यांचे वर्णन करताना ‘अणुरेणुया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥’ असे केले जाते. कारण तुकाराम महाराज यांचे सामाजिक कार्यही देदीप्यमान अशा प्रकारचे आहे. म्हणूनच मी तुकाराम महाराज यांची ओळख सांगत असताना, ‘समाजसुधारक तुकाराम महाराज’ अशी सांगितलेली आहे.

तुकाराम महाराज यांचा उल्लेख ‘समाजसुधारक’ असा आतापर्यंत कोणीही केलेला नसताना तुम्ही तुकाराम महाराज यांना समाज सुधारक अशा प्रकारचे विशेषण का लावले आहे, असा आपला प्रश्न असेल; तर त्याचे उत्तर देण्यासाठी पुन्हा आपल्याला सुधारकाची व्याख्या करावी लागेल. समाजसुधारक कुणाला म्हणावे? शेतकरी कुणाला म्हणावे? उत्तर सोपं आहे. जो शेती विकतो, त्याचे आलेले पैसे दारू-जुगारावर घालवतो, त्याला शेतकरी म्हणावे. बरोबर का?

नाही! 

मग?

आपण शेतकरी आहो, असे प्रमाणपत्र मिळवितो, सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जागा विकत घेतो आणि त्यांवर फार्म हाऊस किंवा बिल्डिंगचे प्रकल्प उभारतो त्याला शेतकरी म्हणावे. बरोबर का?

अजिबात नाही. मग शेतकरी कुणाला म्हणावे?जो शेती करतो, त्याला शेतकरी म्हणावे.

मग सुधारक कुणाला म्हणावे? जो सुधारणा करतो त्याला सुधारक असे म्हणावे. बरोबर की नाही ?

बरं सुधारणा कोणत्या गोष्टीची केली जाते? जी बिघडली आहे, तिचीच सुधारणा केली जाते. जी चांगली आहे, तिला सुधारण्याची काय आवश्यकता आहे. मग तुमचा प्रश्न असा असेल की, तुकाराम महाराज यांच्या काळात नेमके काय बिघडले होते, जे तुकाराम महाराज यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला. म्हणून महाराजांना तुम्ही समाजसुधारक तुकाराम महाराज म्हणता ?

त्याचे उत्तर असे आहे की, तुकाराम महाराजांच्या काळातही बिघडलेले होते आणि आजही फार सुधारलेले आहे, असे समजण्याचे कारण नाही.

समाज अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला होता. वेगवेगळ्या कर्मकांडांत अडकलेला होता. काही समस्या आली तर त्यावर योग्य उपाय शोधण्याऐवजी एखाद्या बुवा-बाबाकडे जात होता. आजारी पडला तरीही एखाद्या बुवा- बाबाकडे जात होता. अशा वेळी तुकाराम महाराज यांनी समाजाला अंधश्रद्धेपासून वाचविण्यासाठी फार मोठी समाजजागृती करणारे साहित्य अर्थात अभंग लिहिले. इतकेच नव्हे तर अभंगांच्या माध्यमातूनही त्यांनी मोठ्या प्रमाणात जागृती केली. माणसं आजारी पडली तर एखाद्या बुवा-बाबाकडे जायची. तेव्हा तो बाबा रानातल्या म्हसोबाला, अप्सरा (जलदेवता), भुताला, डाकिणीला बळी देण्यास सांगायचा. गोरगरिबांनी वर्षभर राब राब राबावे, त्यातून मिळालेल्या पैशातून एखादं बकरं घ्यावं, मेंढी घ्यावी आणि ती देवाच्या समोर कापावी. त्या जाणत्याला त्या वेळी बोलवावे. त्याला दक्षिणा द्यावी. अशा प्रकारचे शोषण चालत होते. तेव्हा तुकाराम महाराज यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, बाबांनो, अशा शेंदरी हेंदरी देवांच्या मागे लागू नका.

महाराज म्हणतात-

शेंदरी हेंदरी दैवते । कोण ती पूजी भूते खेते ॥ 
आपुल्या पोटा जी रडते । मागते शिते अवधान ॥
आपुल्या इच्छे आणिका पिडी । काय ती देईल बराडी ॥
कळो ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धी अधिरा ॥

तुकाराम महाराज म्हणतात जे देव स्वतः उपाशी आहेत, ते तुम्हांला काय देणार आहेत? जर मला २५ हजारांची गरज असेल, तर मी कुणाकडे मागितले पाहिजेत? ज्याच्या घरावर कर्ज न फेडल्याने बँकेची जप्ती आली आहे, त्याच्याकडे! बरोबर आहे का? नाही. कारण त्याच्याकडे पैसे असते तर त्याच्या घरावर बँकेची जप्ती आली असती का? तसे तुकाराम महाराज म्हणतात, जर तेच देव उपाशी असतील तर त्यांनी तुमच्याकडे काही मागितले असते का? म्हणून अशा देवांच्या नादाला लागू नका. महाराज तर पुढे जाऊन सांगतात की, बाबांनो, नवस तर अजिबात करू नका. नवस करून कुणालाही लेकरं-बाळं होत नाहीत. हे आम्हांला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पहिल्यांदा नाही सांगितले, तर पावणेचारशे वर्षांपूर्वी तुकाराम महाराज यांनी आपल्याला सांगितले की, नवस करून लेकरं होत नाहीत.

महाराज म्हणतात,
नवसे कन्या-पुत्र होती । तरी का करणे लागे पती ॥

इतक्या स्पष्ट शब्दांत अंधश्रद्धेवर प्रहार करणारे तुकाराम महाराज होते. साधुत्वाचे सोंग घेऊन समाजाचे शोषण करणाऱ्यांविरोधात तर तुकाराम महाराज यांनी अत्यंत कठोर शब्दांत प्रहार केलेले आपल्याला पाहायला मिळतात.

तुकाराम महाराज म्हणतात-

ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू ॥
अंगा लावोनिया राख । डोळे झाकोनी करिती पाप ॥
दावोनी वैराग्याची कळा । विषय भोगिती सोहळा ॥
तुका म्हणजे सांगो किती । जळो तयाची संगती ॥

किंवा

दंड, मुंडन करणाऱ्यांना तुकाराम महाराज सोप्या भाषेत सांगतात, तुम्ही वारकरी झालात ना, मग आता तुम्हांला दंड-मुंडन करण्याची गरज नाही.

न लगे दंडणे हिंडणे ते काही । साधनांची नाही आटाआटी ॥

असे अनेक अभंग आहेत की, ज्या माध्यमातून तुकाराम महाराज यांनी अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. म्हणून तुकाराम महाराज यांची ओळख करून देताना मी समाजसुधारक तुकाराम महाराज अशी करून दिलेली आहे.

महाराज, आम्हांला उच्च विचारवंत तुकाराम महाराज पटले, समाजसुधारक तुकाराम महाराजही आम्ही पटवून घेतले. परंतु वेदशास्त्र पंडित तुकाराम महाराज हे विशेषण काही आम्हांला पटत नाही.

वेदशास्त्र पंडित तुकाराम हे का बरं पटत नाही?

कारण वेद वाचण्याचा अधिकार हा शूद्रांना नाही. तुकाराम महाराज तर स्वतःला कुणबी म्हणवितात. कुणबी म्हणजे शूद्र. मग तुकाराम महाराज जर शूद्र असतील, तर मग त्यांना वेद वाचण्याचा अधिकार नसेल. जर वेद वाचण्याचाच अधिकार नसेल तर मग तुम्ही तुकाराम महाराज यांना वेदशास्त्र पंडित कसे काय म्हणता, असा तुमचा प्रश्न असू शकतो. मात्र त्याचे उत्तर तुकाराम महाराज यांनीच दिलेले आहे.

तुकाराम महाराजांच्या काळात हाच प्रश्न त्या वेळच्या काही कर्मठ लोकांनी त्यांना जाऊन विचारला होता. तुकाराम महाराज यांच्या अभंगांतील तत्त्वज्ञान हे वेदापेक्षाही सर्वसामान्यांच्या हिताचे आहे, असे लोकांना वाटत होते. वेदामध्ये तत्त्वज्ञान सांगितलेले असले तरी समाजातल्या सर्व घटकांना वेद समान वागणूक देत नाही. अर्थात हे मी म्हणत नाही. स्वतः ज्ञानेश्वर महाराज यांनी ‘ज्ञानेश्वरी’ मध्ये वेद हा पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. ज्ञानेश्वर महाराज लिहितात -

वेद ऐश्वर्यवंत होय ठायी । परी कृपणू ऐसा आण नाही । जो लागला कानी तिही । वर्णांचाची ॥

ज्ञानेश्वर महाराज सांगतात, वेद ऐश्वर्यवंत आहे. विचारवंत आहे. पण तो फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांच्याच हिताचा विचार करतो. तो स्त्री आणि शूद्राला जवळ घेत नाही. अन्य एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज त्या बाबतीत अधिक स्पष्टता व्यक्त करतात आणि थेट वेदाला कृपण ठरवतात. ते म्हणतात -

वेद बहू कृपण झाला । तो तिही वर्णाचे कानी लागला । स्त्री शूद्राशी अबोला । धरिला तेणे ॥

वेद हा कृपण आहे आणि तो तीन वर्णांच्या कानी लागला आहे. म्हणजे त्यापुरताच विचार करतो. मूळ वेद तीन वर्गांचा विचार करतो. मात्र तुकाराम महाराज यांची गाथा समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देते. प्रत्येकाच्या

हिताचा उपदेश करते. किंबहुना तुकाराम महाराज आपल्या साहित्यलेखनाचा आणि कीर्तनाचा उद्देश सांगतानाच म्हणतात की,

उपकारा लागी बोलो हे उपाय । तयाविण काय आम्हां चाड ॥ 
बुडते हें जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनियां ॥

केवळ सामान्यजनाला मार्गदर्शनासाठीच तुकाराम महाराज यांनी अभंगांचे लेखन केले. त्यातून शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यापासून ते सिंहासनावर बसलेल्या राज्यकर्त्यांपर्यंत आणि जात्यावर दळणाऱ्या स्त्रीपासून ते अंतराळात झेप घेणाऱ्या आधुनिक तरुणीपर्यंत तुकाराम महाराज यांचे विचार हे सर्वसमावेशक आहेत. तुकाराम महाराज यांच्या गाथांतील तत्त्वज्ञान हे समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे असल्यामुळेच त्यांच्या गाथांना लोक पाचवा वेद म्हणू लागले. जेव्हा तुकाराम महाराज यांच्या गाथांना लोक पाचवा वेद म्हणून लागले, तेव्हा काही कर्मठ लोकांनी जाऊन तुकाराम महाराज यांना त्याबद्दल विचारले, ‘तुकाराम, तुम्ही काही संस्कृत पंडित नाही. त्यामुळे वेदांमधील तत्त्वज्ञान तुम्हांला कळत नसेल. तरीही लोक तुमच्या गाथांना पाचवा वेद का म्हणतात?’

त्यावर तुकाराम महाराज यांनी दिलेले उत्तर फार महत्त्वाचे आहे. तुकाराम महाराज म्हणाले, ‘तुम्ही वेदाचे पठण केले असेल, वेदाचे पूजन केले असेल, वेदाचे पारायण केले असेल, मात्र वेदाचा खरा अर्थ मी समजून घेतला आहे.’

महाराज लिहितात -

वेदाचा अर्थ आम्हाशीच ठावा । ऐरानी वाहावा भार माथा ॥
खादल्याची गोडी देखिल्यासी नाही । भार धन वाही मजुरीचे ॥

तुकाराम महाराज सांगतात की, वेदाला खरे मीच समजून घेतले आहे. तुम्ही नुसत्या मिरवणुका काढल्या असतील. ओझे वागविण्याशिवाय तुमच्या पदरात काहीच पडलेले नाही. किंबहुना अर्थ न समजून घेता केलेले पाठांतर किंवा पूजन असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, एखादा पदार्थ खाल्ल्याशिवाय जशी त्याची चव कळत नाही, तसेच जोपर्यंत अर्थ कळत नाही, तोपर्यंत त्या पाठांतराला काही अर्थ नसतो.

यासाठी तुकाराम महाराज दृष्टान्त देतात. एखाद्या माणसाकडे असलेले धन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तो एखाद्या मजुराच्या डोक्यावर ते धन देतो. ते धन जरी मजुराच्या डोक्यावर असले तरी त्याचा लाभ त्या मजुराला होत नाही. तसे वेदाचे पाठांतर करणे म्हणजे केवळ हमालाप्रमाणे ओझे वागविण्यासारखे आहे.

तुकाराम महाराज म्हणतात, मी वेदाचे नुसते पाठांतर केले नाही, त्याचा अर्थ समजून घेतला आहे. अर्थ समजला पाहिजे... नाहीतर आपणही जन्मभर भजन करतो. अभंगही भजनात, कीर्तनात म्हणतो, पण कित्येकदा आपण त्याचा अर्थ समजून घेत नाही. आमच्या गावात एक बाबा भजनाला यायचे. त्यांना अभंग म्हणा म्हटले की, आपला एकच ठरलेला अभंग म्हणायचे... तोही सरळ नाही...

धन्य आजी दिन संत दर्शनाचा । अनंत जन्मीचा सीण गेला ॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्याचे ॥

अभंगाचा शेवटचा चरण काय आहे?

एका जनार्दनी घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग जन्मोजन्मी ॥

पण आमचे बाबा शेवटपर्यंत कधीच आहे तसे चरण म्हणाले नाहीत... बाबा म्हणायचे-

एका जनार्दनी घडो त्यांचा संग । न यावा योग जन्मोजन्मी ॥

अर्थात अभंगाच्या गायनातही आपल्याला खूप वेळा शब्दांची मोडतोड केलेली पाहायला मिळते. त्यामुळे अनेकदा मूळ अर्थाला धक्का लागतो. परंतु अर्थापेक्षाही अनेक गायक मंडळींना त्यांचा राग आणि ताल महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे अनेकदा कीर्तनात चाल म्हणताना अभंगाची मोडतोड केली जाते.

परवाच मी एका कीर्तनाला अभंग घेतला होता -

तुम्ही संत माय-बाप कृपावंत । काय मी पतित कीर्ति वाणू ॥
अवतार तुम्हा धराया कारण । उद्धराया जन जड जीव ॥

दोन गायक आले. त्यांनी चाल म्हणायला सुरुवात केली. अर्थातच गायक हे खूप चांगले होते. त्यांनी ठायीची चाल काढली... आता आपल्याला माहीत आहे की, ठायीची चाल ही झटके दिल्याशिवाय म्हणता येत नाही... ते म्हणू लागले...

तुम्ही संत मा... यबाप कृपा वंत ।

चांगला राग काढला होता, त्यांचा तालही चांगला होता, मात्र त्या गाण्याच्या मात्रांमध्ये त्यांना माय आणि बाप स्वतंत्र शब्द बसविता येत नव्हते. त्यामुळे ‘तुम्ही संत मा... यबाप’ असा त्याचा उच्चार होत होता. तेव्हा मी त्यांना मध्येच थांबविले आणि म्हणालो की, ‘बाबांनो, तुमचा आवाज खूप गोड आहे. रागही चांगला काढला आहे. पण पूर्ण ‘माय’ म्हणा आणि पूर्ण ‘बाप’ म्हणा..."

त्यावर ते गायक म्हणाले, ‘महाराज, तसं जमणार नाही.’

मी म्हणालो, ‘का जमणार नाही?’

तर ते म्हणाले, ‘माय तालात बसत नाही आणि बाप टाळीत बसत नाही!’

मग मला सांगा, असे किती दिवस अभंग गायन केले म्हणजे त्याचे परिणाम दिसू लागतील?

तुकाराम महाराज म्हणतात, मी वेदाचे केवळ पाठांतर केलेले नाही. वेदाचे केवळ पूजन केले नाही. तर त्याचा अर्थ समजून घेतला. तुकाराम महाराजांनी वेद समजून घेतला. त्यात सर्व समाजघटकांना सामावून न घेण्याचे जे उणेपण होते ते दूर केले आणि सर्व समाजाला उपयुक्त ठरेल अशा गाथांची निर्मिती केली. म्हणून त्यांच्या गाथांना पाचवा वेद म्हणतात. तुकाराम महाराज यांनी सर्वसामान्य माणसाला जगण्याचे बळ देणारा ‘पाचवा वेद’ निर्माण केला, म्हणूनच मी त्यांना ‘वेदशास्त्र पंडित’ अशा प्रकारचे संबोधन वापरले आहे. 

 

(लेखक हे प्रसिद्ध कीर्तनकार असून त्यांच्या ‘उजळावया आलो वाटा’ या कीर्तनसंग्रहातून हा लेख घेतला आहे.)

 

लेख-७. गांधीजींचा जीवनविचार घडवणारे तीन ग्रंथ

-सूर्यकांत पळसकर

सत्य, अहिंसा आणि सर्वोदय (सर्वांचे कल्याण) हे महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचे सार आहे. महात्मा गांधी यांचे संपूर्ण वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवन या तीन शब्दांत सामावलेले आहे. महात्मा गांधी यांनी हे शब्द आणि विचार तीन वेगवेगळ्या ग्रंथांमधून घेतले आहेत. भगवान श्रीकृष्णाची ‘श्रीमद्भगवद्गीता’, व्हिक्टोरियन काळातील ब्रिटिश विचारवंत जॉन रस्कीन याचे ‘अन्टू धिस लास्ट’ आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‘अभंग गाथा’ हे ते तीन ग्रंथ होत.  गीतेमधून गांधीजींनी सत्य घेतले, जॉन रस्कीनच्या पुस्तकातून सर्वोदयाचा विचार घेतला; तर तुकोबांच्या गाथेमधून अहिंसा घेतली. ही ढोबळ विभागणी आहे; कारण वेगवेगळ्या दिसणाऱ्या या तिन्ही विचारांत अद्वैैताचे नाते आहे. गांधीजींचे जीवनाकाश केवळ या तीनच ग्रंथांनी व्यापले आहे, असे मात्र नव्हे. इतरही अनेक ग्रंथांनी तसेच व्यक्तींनी गांधीजींच्या जीवनविचारावर प्रभाव टाकलेला आहे. वरील तीन ग्रंथांचे महत्त्व एवढ्याचसाठी आहे, की हे ग्रंथ बापूंच्या जीवनविचारांचा मुख्य प्रवाह आहेत. या प्रवाहाला अनेक उपप्रवाह येऊन मिळतात, अनेकदा हे उपप्रवाह मुख्य प्रवाहाएवढे मोठेही दिसतात, तरीही ते मुख्य प्रवाहाची जागा घेऊ शकत नाहीत.

लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेत असताना बापूंचा गीतेसोबतचा पहिला परिचय झाला. मात्र, मूळ गीतेने नव्हे, तर भाषांतराने! सर एडविन अरनॉल्ड यांनी ‘द साँग सिलेस्टिअल’ या नावाने गीतेचा इंग्रजी अनुवाद केला होता. हे पुस्तक तेव्हा ब्रिटनमध्ये गाजत होते. बापूंच्या परिचयातील दोन थिऑसॉफिस्ट भावांनी त्यांना हे भाषांतर भेट दिले. गांधीजींचे लंडनमधील ते दुसरे वर्ष होते. या कोवळ्या वयात गांधीजींना या पुस्तकाने झपाटून टाकले. ‘सत्याचे ज्ञान देणारे अद्वितीय पुस्तक’ अशा शब्दांत त्यांनी या पुस्तकाचे वर्णन केले आहे. नंतरच्या काळात ‘गीता’ हे पुस्तक आणि ‘सत्य’ हा विचार गांधीजींनी आयुष्यभरासाठी स्वतःशी जोडून घेतला.

गीता मूळ संस्कृतातून अथवा किमान मायबोली गुजरातीतून वाचण्याऐवजी इंग्रजीतून वाचावी लागत असल्याबद्दल मात्र गांधीजींना तेव्हा वाईट वाटले होते. देशी भाषांविषयीचा हाच स्वाभिमान गांधीजींनी आयुष्यभर जपला. देशी भाषांचे महत्त्व विशद करताना गांधीजी तुकोबांच्या अभंगांचे उदाहरण नेहमी देत. २० ऑक्टोबर १९१७ साली भडोच येथे भरलेल्या दुसऱ्या गुजरात शिक्षण परिषदेत गांधीजी म्हणाले होते की, ‘तुकारामांनी मराठी भाषेला जे वैभव प्राप्त करून दिले आहे, त्याच्याशी इंग्रजीला काहीही देणे-घेणे नाही.’

जॉन रस्कीन यांचे ‘अन्टू धिस लास्ट’ हे पुस्तकही गांधीजींना असेच योगायोगाने वाचायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजी एकदा जोहान्सबर्ग ते नाताळ असा प्रवास करीत होते. त्यांचे एक मित्र पोलक यांनी त्यांना रेल्वे स्थानकावर ‘अन्टू धिस लास्ट’ हे पुस्तक वाचायला दिले. २४ तासांच्या प्रवासात गांधीजींनी हे पुस्तक झपाटल्यासारखे वाचून काढले. या पुस्तकाचा नंतर गांधीजींनी ‘सर्वोदय’ या नावाने अनुवाद केला. या अनुवादाने एक नवी विचारधाराच भारताला दिली. त्यालाच ‘सर्वोदयवाद’ असे म्हणतात. या पुस्तकाचा गाभा गांधीजींनी तीन वाक्यांत सांगितला आहे. ही वाक्ये अशी :

१. सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे.
२. वकील काय किंवा केस कापणारा सलूनवाला काय, सर्वांच्या कामाची किंमत सारखीच आहे.
३. साधे अंगमेहनतीचे शेतकऱ्याचे जीवन हेच खरे जीवन आहे.

हा विचार खरोखरच क्रांतिकारक होता; पण नवा नव्हता! रस्कीनचे हे पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या २०० वर्षे आधी तुकोबांनी हा विचार भारतीय समाजाला देऊन ठेवला होता. रस्कीनची वाक्ये तुकोबांच्या अभंगांचा अनुवादच वाटतात. ‘तुका म्हणे सुख पराविया सुखे । अमृत हे मुखे स्रवतसे ॥' हे तुकोबांचे वचन आणि ‘सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे,' हे रस्कीनचे वचन यात शब्दाचाही फरक नाही. रस्कीनला वकील आणि सलूनवाला यांच्या कामाची किंमत सारखीच वाटते. तुकोबांना स्वतःचा पुत्र आणि नोकर यांची माणूस म्हणून असलेली किंमत सारखीच वाटते.  म्हणूनच ते ‘दया करणे जे पुत्राशी । तेचि दासा आणि दासी ॥', असे वचन लिहून जातात.

तुकोबांच्या अभंगांतून व्यक्त झालेल्या विचारांची वैश्विकता बघून गांधीजी भारावून गेले. त्यामुळेच गांधीजींनी तुकोबांच्या १६ अभंगांचा इंग्रजीत अनुवाद केला. हे १६ अभंग निवडताना सर्वोदयाचा विचारच गांधीजींनी केंद्रस्थानी ठेवला.

‘गीता’ आणि ‘अन्टू धिस लास्ट’ या पुस्तकांतून गांधीजींनी आपल्या जीवनाचा सैद्धांतिक आधार शोधला. तुकोबांच्या अभंगांतून मात्र त्यांनी जीवनाचे प्रात्यक्षिक घेतले. तुकोबांचा विचार गांधीजी साक्षात जगले. दुर्दैवाने गांधीजी आणि तुकोबांचे हे अद्वैताचे नाते, समाजासमोर आलेच नाही. ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका’ असा संदेश देणारी गांधीजींची तीन माकडे सर्वांना माहीत असतात. मात्र, ही माकडे गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली आहेत, हे कोणालाच माहिती नसते. तुकोबांच्या खालील अभंगांतून गांधीजींनी तीन माकडांची ही कल्पना उचलली आहे :

पापाची वासना नको दावू डोळा । त्याहुनि आंधळा बराच मी ॥ १ ॥
निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधिर करोनि ठेवी देवा ॥ २ ॥
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥ ३ ॥...

गांधीजींनी अनुवादित केलेल्या १६ अभंगांत या अभंगाचाही समावेश आहे. अनुवादात हा अभंग दुसऱ्याच क्रमांकावर आहे, यावरून गांधीजींची त्यावरील श्रद्धा लक्षात यावी.

(लेखक लोकमतच्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीत उपवृत्तसंपादक असून हा लेख २ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीनिमित्त लोकमतध्ये प्रथम प्रसिद्ध झालेला आहे. )

 

लेख-६. स्वराज्य निर्मितीत तुकोबांचे योगदान

- डॉ. बालाजी जाधव

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य संस्थापक म्हणायचे असेल तर माँ साहेब जिजाऊ आणि राजे शहाजी यांना स्वराज्यसंकल्पक म्हणावे लागते. कारण बंगलोर येथे सुमारे दोन वर्षे राजमाता जिजाऊ व राजे शहाजी यांच्या मार्गदर्शनाखाली बाल शिवबांवर स्वराज्य स्थापनेचे संस्कार झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी शहाजी राजांनी शिवरायांस माँ साहेबांसोबत भगवा झेंडा आणि संस्कृत भाषेतील राजमुद्रा देऊन पुणे येथील जहागिरीत स्वराज्य संस्थापनेसाठी पाठवले. सोबत थोडेच पण निवडक आणि विश्वासू अधिकारीही दिले. परिसरात आल्यानंतर बालशिवबा माँ साहेबांच्या देखरेखीखाली स्वराज्य निर्मितीच्या कार्याला लागले. ज्या ज्या मातब्बर मराठा घराण्यावर शहाजी राजांचे वजन होते त्या त्या लोकांनी शिवरायांना स्वराज्य उभारणीत मोलाची मदत केली. तुकोबांचे देहू हे गाव प्रत्यक्ष शिवरायांच्या जहागिरीत मोडत होते. त्याकाळी पुणे परिसरात निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगल यांचा सत्ता संघर्ष चालू होता. तेव्हा त्या परिसरात लुटमार, जाळपोळ, आक्रमण हे कायम ठरलेलेच असायचे. त्यामुळे लोकांचा आकांत, त्यांचे दुःख तुकोबांसारख्या संवेदनशील संताला अस्वस्थ करून गेले. या परकीय आक्रमणाबद्दल भालचंद्र नेमाडे लिहितात- ‘मोगलांच्या उत्तरेकडील स्वाऱ्यांनी आणि बहामनी राज्यांच्या परस्परांतील लढायांनी तीनशे वर्ष सबंध दख्खन म्हणजे रणभुमी करून टाकली होती. तुकाराम जन्मला त्या सुमारास मोगलांनी उत्तरेकडील तापीपर्यंत आपले साम्राज्य वाढवत आणले होते आणि दक्षिणेतील आदिलशाही, निजामशाही व कुतुबशाही यांच्याशी सतत युद्धे होतच असत. या वर्षानुवर्षांच्या धुमश्चक्रीत तुकारामाचा भीमा आणि नीरा नद्यांमधला भूप्रदेश नेहमीच भरडला जात होता.’

या धुमश्चक्रीचा अनुभव तुकोबा सुद्धा घेत होते. कित्येकदा त्यांच्या कीर्तनात यामुळे व्यत्यय आलेला होता. एका अभंगात तर त्यांनी या धामधूमीबद्दल स्पष्टपणे म्हटले, 

न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होते ॥ 
काय तुम्ही येथे नसालसे जाले । आम्ही न देखिले पाहिजे हे ॥
परचक्र कोठे हरिदासाच्या वासे । न देखिजेत देशे राहतिया ॥

हे पांडुरंगा आता माझ्या डोळ्यांना सामान्य जनांचा हा आकांत पाहवत नाही, त्यांना परकीयांकडून होणाऱ्या पिडेने माझे चित्त दुःखी होत आहे. मला तर वाटते की येथे तुझा वासच नाही. कारण तसे असते तर हे परचक्र आले असते का? पांडुरंगा येथे तुझे भक्त नांदत असताना हे परचक्र येतेच कसे? खरे तर हा परचक्राचा फेरा तू आमच्या मागे लावून मी तुझी आजपर्यंत केलेली सेवा लाजवलेली आहेस. यामुळे माझे जगणे हीन झालेले आहे. जेथे प्रत्यक्ष हरीचे दास वास करतात तेथे सुद्धा हा परचक्राचा त्रास व्हावा काय? आणि मग असे असेल तर देव आहे तरी कुठे? असा खडा सवाल तुकोबांनी पांडुरंगाला केलेला आहे. अजून एका अभंगात ते म्हणतात

काय म्यां मानावे हरिकथेचे फळ । तरिजे सकळ जनी ऐसे ॥ १ ॥ 
उच्छेद तो असे हा गें आरंभला । रोकडे विठ्ठला परचक्र ॥ २ ॥
पापाविण नाही पाप येत पुढे । साक्षीसी रोकडे साक्ष आले ॥ ३ ॥
तुका म्हणे जेथे वसतील दास । तेथे तुझा वास कैसा आता ॥ ४ ॥
(अ.क्र.५५८)

बा विठ्ठला परचक्रामुळे, परकियांच्या आक्रमणामुळे जणू काही जीवनाच्या उच्छेदाला सुरुवात झाली आहे, परचक्राच्या रूपाने पापच पुढे येत आहे. मी आजपर्यंत केलेल्या हरिकथेचे फळ मला अशा स्वरूपात मिळालेले आहे; तेव्हा जेथे हरीचे दास, हरीचे भक्त वास करत असतात तेथे तुझा वास असतो असे मी कसे समजू? परकीय आक्रमणाने भरडून निघालेला समाज पाहून तुकोबांनी देवाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

अशा विपरीत परिस्थितीत शिवरायांसारखा एक एतद्देशीय व्यक्ती आपल्या लोकांचे राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न करतो याचे तुकोबांना निश्चितच कौतुक वाटले आणि शिवराय जर हे परकीय आक्रमकांचे चक्र परतवून लावून स्वकियांचे राज्य निर्माण करत असतील तर मग त्यांच्या या कार्याला समाजातून हातभार लागलाच पाहिजे अशी तुकोबांसारख्या डोळस व्यक्तीची भावना होणे साहजिकच होते. मग त्यासाठी सामान्य समाजातून लढवय्ये लोक निर्माण झाले पाहिजेत, त्यांनी शिवरायांच्या सैन्यात भरती झाले पाहिजे आणि भरती झालेल्या लोकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वराज्य निर्मितीच्या कार्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे, असे तुकोबांना वाटू लागले.

 

तुकोबा शिवराय भेट 

तुकाबांचे देहू गाव हे शिवरायांच्या जहागिरीत असल्यामुळे तुकोबांची किर्ती शिवरायांच्या कानावर पडत होती. माँ जिजाऊ तुकोबांची कीर्तने ऐकून शिवरायांना मार्गदर्शन करत होत्या. त्यामुळे शिवरायांना तुकोबांचे विचार ऐकण्याची ओढ निर्माण झाली. 

तुकोबा आणि शिवरायांच्या भेटीबद्दल तुकोबांचे वर्तमान वारस सदानंद मोरे लिहितात, ‘देहू हे शिवरायांच्या जहागिरीत प्रत्यक्षपणे मोडणारे गाव असल्याने पुणे आणि देहू यांचा नित्याचा संबंध होता. अशा परिस्थितीत शिवाजी राजांचे बालपणापासून देहूला जाणे-येणे असल्यास आश्चर्य काहीच नाही. तसेच त्यांनी तुकाराम महाराजांची कीर्तने ऐकणे त्यांना सन्मानाचे प्रतिक म्हणून दिवट्या, छत्री, घोडे देऊ करणे हेही शिवाजीच्या मनातील सत्पुरुषाबद्दल वसत असणाऱ्या आदरभावनेशी व भोसले घराण्याच्या पंरपरेशी सुसंगतच म्हटले पाहिजे.’ (तुकाराम दर्शन, पृ.६४, ६५) 

मोरे यांच्या म्हणण्यानुसार संतांचा सन्मान करणे ही भोसले घराण्याची परंपराच होती आणि या परंपरेला जागत शिवाजी राजांनी तुकोबांना नजराणा म्हणून दिवट्या, छत्री, घोडे हे पाठवले होते. परंतु ‘नाही मठपती । नाही चाहुराची वृत्ती ॥’ अशी अंगभूत वृत्ती आणि ‘जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ॥’ असा रोकडा बाणा असणाऱ्या तुकोबांनी हा नजराणा नम्रपणे नाकारला. वरून त्यांनी शिवाजी राजांना उपदेशपर असे काही अभंग ऐकवले. तुकोबांच्याच एका अभंगातून हे स्पष्ट होईल -

दिवट्या छत्री घोडे । हे तो बऱ्यात न पडे ॥ 
आता मज कासया । यात गोविसी पंढरीराया ॥ 
मान दंभ चेष्टा । हे तो सुकराची विष्ठा ॥
तुका म्हणे देवा । माझे सोडवणे धावा ॥
(अ.क्र. १८७८) 

शिवरायांनी पाठविलेला नजराणा पाहून तुकोबा म्हणतात की ‘दिवट्या, छत्री, घोडे, या बाबी आमच्यासारख्या संतांसाठी काही बऱ्या नाहीत. आमचा मार्ग वेगळा असताना आम्ही या लौकिक गोष्टींमध्ये का बरे गुंतून पडावे? पांडूरंगा, आता तूच मला यातून सोडव रे बाबा. मान, दंभ, लोकांनी दिलेले दान हे आम्हा संतांसाठी डुकराच्या विष्ठेप्रमाणे नकोसे आहेत.’

अन्य एका अभंगात तुकोबा म्हणतात की, ‘सोने आणि माती । आम्हा समानची चित्ती ॥ परक्यांचे धन हे संतांसाठी गोमांसासमान असते अशी तुकोबांची समजूत होती. कारण संतांसाठी मुंगी आणि राव हे सारखेच जीव असतात. म्हणून शिवरायांनी देऊ केलेला नजराणा तुकोबांनी अत्यंत नम्रपणे नाकारला. या संदर्भात ‘श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू’ या संस्थानने प्रकाशित केलेल्या गाथेत ‘शिवाजी राजे यांनी स्वामीस अबदागिरी घोडा कारकून असे न्यावयास पाठवले ते अभंग’ या मथळ्याखाली एकूण नऊ अभंग दिलेले आहेत. उपरोक्त अभंग हा त्यापैकीच एक आहे. बाकीच्या आठ अभंगाची चर्चा पुढे करण्यात आलेली आहे.

तुकोबा आणि शिवराय यांच्या भेटी संदर्भात महाराष्ट्रात एक कथा फार प्रसिद्ध आहे- ‘एकदा लोहगाव येथे तुकोबा कीर्तन करत असता शिवाजीराजेही तुकोबांच्या कीर्तनाला हजर होते. शिवरायांच्या या उपस्थितीची बातमी चाकणच्या तत्कालीन सुभेदाराला लागली आणि त्याने हजारभर सैनिक शिवरायांना पकडण्यासाठी पाठवले. सैनिकांनी जेथे कीर्तन चालू होते त्या ठिकाणाला वेढा घातला. सैनिक शिवाजी राजांना शोधू लागले. इकडे तुकोबाराय कीर्तनात दंग तर शिवराय किर्तन ऐकण्यात दंग. आणि काय आश्चर्य सैनिकांना प्रत्येक वारकरी हा शिवाजी राजांसारखाच दिसू लागला. सैनिक भांबावून गेले की नेमके पकडायचे कोणाला? आणि खरा शिवाजी आहे तरी कोणता? अर्थात त्यांची ही संमोहित अवस्था पाहून खरे शिवराय सुखरूप पसार झाले आणि इकडे चाकणच्या सुभेदाराचे सैन्य हात हलवत परत गेले.’ 

याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये फार सुंदर उल्लेख केलेला आहे- ‘आपले वारकरी भाविक। तेचि वारकर्ते पाईक। करोनी दुष्टांसी लाविला धाक । शिवाजीच जणू सर्वही ॥’

खरे पाहता या कथेमध्ये चमत्कार भरलेला आहे आणि खुद्द तुकोबांनाही चमत्कार मान्य नव्हते. ‘दाऊ नेणे जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥’ असे सांगून त्यांनी चमत्काराला उडवून लावलेले आहे. परंतू चमत्काराचा भाग जरी सोडला तरी वरील कथेतून एका गोष्टीला मात्र पुष्टी मिळते ती म्हणजे शिवाजी महाराज तुकोबांची कीर्तने ऐकायला जात होते.

तुकोबा आणि शिवराय यांच्या भेटीबद्दल भाऊ राहीरकर यांनी काढलेले पुढील उद्‌गार हे यथोचितच आहेत. ते लिहितात, ‘महाराष्ट्राच्या या दोन परमोच्च विभूतींची भेट हा सूर्यचंद्र, गंगायमुना, मेरूमंदार यांच्या मीलनाचा, श्रेष्ठ तत्वांचा संगम होता.’ 

 

तुकोबा शिवराय भेटीचा काळ 

तुकोबांचा जन्म इ.स. १६०८ मध्ये झाला. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. याचाच अर्थ असा की तुकोबा हे शिवाजी महाराजांपेक्षा २०-२१ वर्षांनी मोठे होते. म्हणून तुकोबांच्या निर्याणावेळी म्हणजे इ.स. १६४९-५० मध्ये शिवाजी महाराज हे नुकतेच विशीत प्रवेश करते झाले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी केवळ तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचे पहिले पाऊल उचलले होते. 

या संबंधी ल. रा. पांगरकर लिहितात, ‘शिवछत्रपतींचा जन्म शक १५४९ मध्ये झाला अशी आजवर समजूत होती, पण इतिहास संशोधनाच्या नवीन प्रकारामुळे तो शके १५५१ च्या फाल्गुनात म्हणजे तुकोबांच्या वयाच्या २१ वे वर्षी जो घोर दुष्काळ पडला त्या दुष्काळाचे वर्षी झाला असे ठरत आहे. शिवाजी राजे यांनी आपल्या वयाच्या १७ वे वर्षी तोरणा किल्ला घेऊन त्यावर स्वराज्याचे तोरण बांधले व यानंतर तीनच वर्षांनी (शक १५७१) तुकोबांचे प्रयाण झाले, म्हणजे शिवराय २० वर्षांचे असताच तुकोबांचे प्रयाण झाले...’

यावरून ल. रा. पांगारकर असा निष्कर्ष काढतात की, तुकोबा आणि शिवाजी महाराजांची भेट ही शेवटच्या तीन वर्षांत झालेली असावी आणि शिवरायांनी तुकोबांची कीर्तनेही याच तीन वर्षात ऐकलेली असावीत. ल.रा. पांगारकर यांच्याप्रमाणे भाऊ राहिरकर यांचेही मत शिवाजी व तुकोबा यांची भेट साधारणतः शके १५६५ ते १५७०-७१ याच दरम्यान झाली असल्याचे आहे. अर्थात शिवरायांचा जन्म सन १६३० चा असल्यामुळे तुकोबांच्या निर्याणप्रसंगी शिवाजी महाराज हे फक्त एकोणीस ते वीस वर्षाचे होते हे स्पष्ट आहे. पुढे भाऊ राहिरकर लिहितात, ‘तेव्हा तुकोबांची व शिवरायांची भेट, वह्या तरल्यानंतर जी तुकोबांची प्रसिध्दी झाली त्या सुमारास व शिवराय स्वराज्याकरिता चळवळ करू लागले त्या त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षानंतर झाली आहे.’ यावरून आपल्या असे लक्षात येते की शिवरायांनी स्वराज्य निर्मितीच्या हालचाली केल्यानंतर तुकोबांची आणि शिवरायांची भेट झाली. यावेळी तुकोबाही प्रसिद्धीच्या ऐन शिखरावर होते. एवढे की बहीणाबाई पाठक यांनी तुकोबांची महती ही जयरामस्वामी वडगावकर यांचेकडून कोल्हापूर येथे ऐकली. स्वराज्यनिर्मितीसाठी साधुसंतांचा आशीर्वाद घेणे हे भोसले घराण्याच्या परंपरेला अनुसरूनच होते. म्हणून स्वराज्य निर्मितीसाठी मुस्लिम फकिरांकडूनही आशीर्वाद घेणाऱ्या शिवरायांनी तुकोबांकडून आशीर्वाद घेतलेच असणार यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. 

 

तुकोबांचा शिवरायांवरील प्रभाव 

खरे तर तुकोबांना गुरु शिष्य परंपराच मान्य नव्हती. उभ्या आयुष्यात त्यांनी कुणालाही आपला शिष्य म्हणून कसली दिक्षा दिलेली नाही. किंबहुना गुरु-शिष्य नातेसंबंधावर तुकोबांनी जीवनभर अतिशय कठोर प्रहार केलेले आहेत. तुकोबांची उपदेश करण्याची पद्धती ही ‘नाही विचारीत । मेघ हागणदारी सेत ॥ अशी मेघवृष्टी सारखी होती. म्हणून ते म्हणतात, ‘मेघवृष्टीने करावा उपदेश । परी गुरुने न करावा शिष्य ॥ अर्थात ज्याला गुरु-शिष्य असे आज स्वरूप आलेले आहे तसे तुकोबा आणि शिवराय यांचे संबंध नव्हते. परंतु तुकोबांच्या विचारांचा आणि त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा फार मोठा प्रभाव छ. शिवाजी महाराजांवर पडलेला होता. तुकोबांच्या कीर्तनाला हजेरी लावता लावता आणि त्यांच्या अभंगांची अवीट गोडी अनुभवताना शिवरायांची अवस्था ही बहिणाबाई सारखीच ‘तुकोबांची पदे अद्वैत प्रसिद्ध । तयाचा अनुवाद चित्त झुरवी ॥’ अशी होऊन गेली. आणि मग शिवरायांनाही तुकोबांसारखे जनप्रबोधन करावेसे वाटू लागले. तुकोबांच्या सान्निध्यात राहून शिवाजी महाराजांनाही अभंग स्फुरु लागले. शिवरायांचा असाच एक अभंग तंजावर येथील सरस्वती महाल येथे उपलब्ध असल्याचे मत आनंद घोरपडे यांनी त्यांच्या ‘शिवछत्रपती समज अपसमज’ या ग्रंथात नोंदवलेले आहे. (पृ.८१) विशेष बाब म्हणजे हा अभंग खुद्द शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातला असून घोरपडे यांनी तो पूर्ण अभंगच वाचकांना उपलब्ध करून दिलेला आहे. शिवरायांच्या हस्ताक्षरातील तो अभंग असा :

नाशिवंत सुखासाठी । अंतरला जगजेठी ॥
नाही नाही यात गोडी । लक्ष चौऱ्यांशीची जोडी ॥
मनुष्य जन्म गेल्यावारे । काय करशील बा रे ॥
शिवराजे सांगे जना । म्या तो सोडिली वासना ॥

आनंद घोरपडे यांनी या अभंगाचा दिलेला भावार्थ असा - ‘या नाशवंत सुखाच्या मागे लागून आपण जगजेठीला मात्र अंतरले जातो. खरे पाहिले तर या सुखात गोडी नाही. कारण सुखाच्या भोगानंतर पुन्हा चौऱ्यांशी लक्ष फेरे घ्यावेच लागतात. बा मनुष्या, आता तरी तू जागा हो. कारण एकदाच मिळालेला हा मनुष्यजन्म गेल्यावर तू काय करशील ? म्हणून शिवाजी राजे लोकांना उद्देशून सांगतात की नाशवंत सुखासाठी कारणीभूत ठरलेल्या वासनांचा मी त्याग केला आहे.’ (शिवछत्रपती समज अपसमज पृ. ८). 

तुकोबांच्या अभंगांच्या शेवटी जशी ‘तुका म्हणे’ अशी नाममुद्रा असते तशी शिवरायांनी सुद्धा आपल्या अभंगाच्या शेवटी आपल्या नावाची ‘शिवराजे सांगे जना’ अशी नाममुद्राही वापरलेली आहे. वरील अभंगाचे अवलोकन केले असता आपल्या लक्षात येते की, शिवाजी महाराजांवर तुकोबांच्या विचारांचा किती पगडा बसला होता. तुकोबांच्या कार्याने शिवराय एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी आपला स्वराज्य निर्मितीचा उद्योग आवरून कीर्तन प्रबोधनात मन घातल्याचे उल्लेखही इतिहासात आलेले आहेत. शिवरायांना तुकोबांचा मार्ग अनुसरण्याची तीव्र इच्छा होऊ लागली. परंतु माँ जिजाऊंनी शिवरायांना वेळीच तुकोबांकडे नेऊन योग्य मार्गदर्शन घडवून आणले. या कथेसंदर्भात डॉ. किशोर सानप लिहितात, ‘निवृत्तीमार्गाकडे त्यांचा कल पाहून आणि स्वराज्यकार्याकडे होणारे दुर्लक्ष बघून जिजामातेनेही देहूला जाऊन तुकोबांची भेट घेतली आणि शिवाजींना राजकार्याला प्रवृत्त करण्याबाबत विनंती केली. तुकोबांनी जिजामातेच्या विनंतीला मान देऊन शिवरायांना पुन्हा राज्यकारभार करण्यासाठी प्रवृत्त केले. स्वराज्यस्थापनेसाठी प्रवृत्त केले. क्षात्रधर्माची जाणीव करून दिली आणि आपला स्वधर्म सोडून कार्य करू नये असे सांगितले. शिवाजींनी तुकोबांचा उपदेश ग्रहण करून पुन्हा जोमाने स्वराज्यनिर्मितीचे कार्य सुरु केले. अशी एक कथा प्रचलित आहे.’ (समग्र तुकाराम दर्शन, पृ. ३६८) तुकोबांचा जीवन मार्ग पाहून छत्रपती शिवराय किती प्रभावित झाले होते हे सांगताना वृंदावन दास आपल्या तुकाराम चरित्राच्या प्रस्तावनेत लिहितात, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजही तुकारामांची विठ्ठलभक्ती आणि वैराग्य पाहून प्रभावित झाले आणि त्यांनी स्वतः राज्यकारभार सोडून वैरागी जीवन जगण्याचा निश्चयही केला होता. पण तुकारामांनी त्यांना ‘आम्ही जगाला उपदेश करावा । तुम्ही क्षात्रधर्म सांभाळावा ॥’ असे समजावून हिंदवी स्वराज्य स्थापना करण्याची प्रेरणा दिली. पण क्षात्रधर्माचे पालन करताना ‘कंठी मिरवा तुळशी । व्रत करा एकादशी ॥ म्हणवा हरीचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥’ हा भगवद्प्राप्तीचा मार्गही सांगितला” (प्रस्तावना, संत तुकाराम : हरिभक्तीपरायण जीवन चरित्र)

यावरून शिवरायांवर तुकोबांचा किती प्रभाव होता आणि त्यांचे संबंध किती घनिष्ठ होते हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. 

 

तुकोबांच्या घराण्याचा लढाऊ बाणा

जगतगुरु तुकोबांचे अवघे आयुष्य म्हणजे एकप्रकारचे युद्ध होते. ‘रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥’ अशा शब्दांमध्ये तुकोबांनी ते स्पष्टही केले आहे. धर्माच्या क्षेत्रात शोषित आणि वंचितांना न्याय मिळवून देणारे तुकोबा हे शब्दांचे बाण हाती घेऊन फिरणारे ‘विठ्ठलाचे वीर’ होते. ‘आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडू कळीकाळाचे शीर’ असा त्यांचा लढवय्या बाणा होता. समाजातील चुकीच्या बाबींवर प्रहार करणारे, तीक्ष्ण शब्दबाण हाती घेऊन फिरणारे ते एक समाजयोद्धे होते. ‘होता पहिला अभ्यास । समयी घालावया कास ॥’ अशी त्यांच्या मनाची तयारी होती. त्यांचा हा लढवय्या बाणा जसा अनुभवाने विकसित झाला होता. तसाच या क्षात्रवृत्तीचा वारसा त्यांना घरातूनही लाभलेला होता. तुकोबांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा आणि त्यांची पत्नी आमाबाई यांना हरी आणि मुकुंदा अशी दोन मुले होती. या दोन भावांनी आपल्या घराण्यातील विठ्ठल भक्तीच्या परंपरेचा अभिमान बाळगत वेगळा मार्ग चोखाळला. त्यांनी देवगिरीच्या यादव राजाच्या पदरी सैनिक म्हणून राहणे पसंत केले. पुढे देवगिरीचे यादव आणि परकिय आक्रमक यांच्यात झालेल्या लढाईत विश्वंभरबुवांचे हे दोन्ही पुत्र रणांगणावर लढता लढता धारातीर्थी पडले. विश्वंभरबुवांचा ज्येष्ठ पुत्र हरी यांची बायको यावेळी गरोदर होती. तिचा सांभाळ आमाबाईंनी मोठ्या लाडाने केला. हरीच्या बायकोला पुढे एक गोंडस बाळ झाले. त्याचे नाव आमाबाई यांनी आपल्या घराण्यातील विठ्ठल परंपरेला अनुसरून विठोबा असे ठेवले. पुढे या विठोबाला जो मुलगा झाला त्याचे नाव पदाजी असे ठेवण्यात आले. पदाजीला पुढे शंकर नावाचा मुलगा झाला. मग शंकरला कान्होबा, कान्होबाला बोल्होबा आणि बोल्होबाच्या पोटी तुकोबांचा जन्म झाला. अशा प्रकारे तुकोबांच्या अंगात मातृभुमीसाठी प्राण गमावणाऱ्या वीरांचे रक्त खेळत होते आणि वेळप्रसंगी हे रक्त त्यांच्या धमन्यांतून उसळ्याही मारत होते. तुकोबांच्या रक्तातील कठीण वज्राला भेदणारी वीरवृत्ती वेळोवेळी उफाळूनही येत होती.

अशा वीरवृत्तीच्या तुकोबांच्या हातून लोकांना शिपाईगिरीची शिकवण देणाऱ्या पाइकीच्या अभंगांची निर्मिती होणे साहजिक आणि नैसर्गिकच आहे. फरक फक्त एवढाच की, तुकोबांच्या पूर्वजांनी हातात खरोखरीची शस्त्रे धारण करून रणमैदान गाजवले होते तर तुकोबांनी अतिशय प्रयत्नपुर्वक ‘शब्दांचीच शस्त्रे’ करून इथल्या व्यवस्थेवर कठोर आघात केले होते. 

या संदर्भात प्रा. किशोर सानप लिहितात, ‘तुकोबांच्या वंशजांच्या क्षात्रतेजाचा वारसा परंपरेने तुकोबांनीही लाक्षणिक अर्थाने पार पाडला होता. त्यांनीही पाइकीचे अभंग लिहून आणि शिवाजीला राजकारणाची दीक्षा देऊन मुसलमानी राजवटीचा कर्दनकाळ ठरलेला मराठा राजा निर्माण केला. तुकोबा क्षत्रियांची पिढी निर्माण करणारे क्षात्र पुरुष होते, हा इतिहासही आता नाकारता येणार नाही.’ (समग्र तुकाराम दर्शन, पृ.७६) 

याचाच अर्थ क्षात्रवृत्ती ही तुकोबांच्या घराण्यात पूर्वापार चालत आलेली होती म्हणूनच सदानंद मोरे म्हणतात त्याप्रमाणे, ‘तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून ज्याप्रमाणे व्यापार, सावकारी, शेतकी या व्यवहारांमधील बारकावे येतात तसेच लढाई आणि रणमैदान यांचे बारीकसारीक तपशीलही भरपूर सापडतात. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग असे म्हणणाऱ्या तुकोबांचे जीवन हीच एक युद्धभुमी झालेली होती.’ (तुकाराम दर्शन, पृ.७२) तेव्हा तुकोबांनी शिवरायांना गनिमी काव्यासंदर्भात जे काही मार्गदर्शन केलेले आहे ते त्यांच्या ‘अनुभवेविण बोलो नये’ या वृत्तीला अनुसरूनच होते.

तुकोबांनी बऱ्याच अभंगात काही पारमार्थिक उपदेश करण्यासाठी युद्ध विषयक आणि युद्धाला लागणाऱ्या शस्त्रास्त्रांची जी वर्णने केलेली आहेत ती सुद्धा त्यांच्या घराण्यातील क्षात्रवृत्तीला साजेशीच आहेत. रणांगणात जीव गेल्यानंतर दुहेरी लाभ होतो अशा आशयाचा तुकोबांचा एक अभंग प्रसिद्धच आहे. तुकोबा लिहितात -

एका बिजा केला नास । मग भोगिले कणीस ॥ १ ॥ 
कळे सकळा हा भाव । लहान थोरांवरी जीव ॥ २ ॥ 
लाभ नाही फुकासाठी । केल्याविण जीवासाठी ॥ ३ ॥ 
तुका म्हणे रणी । जीव देता लाभ दुणी ॥ ४ ॥
(अ.क्र.७६१)

आपण जेव्हा शेतामध्ये एखादे बीज टाकतो तेव्हा एका अर्थाने त्या बीजाचा नाश होतो. कारण जेव्हा त्या बीजातून अंकुर बाहेर येतो तेव्हा आपल्याला ते मूळ बीज पुन्हा सापडत नाही. ते स्वतःचे अस्तित्व गमावून बसते. परंतु त्याच्या या नाश पावण्याने, स्वतःचे अस्तित्व गमावण्याने आपल्याला हजारो दाणे अर्थात बीज असलेले कणीस भोगायला मिळते. म्हणजे एका बीजाचा नाश केल्याशिवाय आपल्याला कणीस मिळू शकत नाही हा निसर्ग नियम आहे. हा निसर्ग नियम सर्वांनाच लागू असतो. सहजासहजी आणि फुकटात कोणत्याही गोष्टीची प्राप्ती होत नाही. त्यासाठी आपल्याला सर्व काही झोकून देऊन कार्य करावे लागते. प्रयत्न करावे लागतात. प्रसंगी बरेच काही गमवावेही लागते. युद्धात नाही का जीव दिल्याशिवाय कीर्ती प्राप्त होत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात : ‘शूर मिरवे रणांगणी । मरणीच संतोष॥’ रणांगणात जर लढता लढता जीव गेला तर त्या योद्ध्याला दुहेरी असा लाभ होतो. फुकटात कोणतीही गोष्ट मिळत नाही हे पटवून देण्यासाठी तुकोबांनी वापरलेले रणांगणातील जीव देण्याचे उदाहरण हे त्यांच्या घराण्यातील क्षात्रवृत्तीला अनुसरूनच आहे. हरी आणि मुकुंदा यांना रणांगणात आलेले मरण हे निश्चितच तुकोबांच्या अभिमानाला पात्र ठरले असेल. 

 

वर्णाश्रमाद्वारे येणारे क्षत्रियत्व अमान्य 

वर्णाश्रमधर्माप्रमाणे येणारे क्षत्रियत्व तुकोबांना मान्य नव्हते. नव्हे तुकोबांना ही वर्णव्यवस्थाच मान्य नव्हती. वर्ण आणि जातीपेक्षा तुकोबा गुणांना महत्व देणारे होते. म्हणूनच ते कर्मभ्रष्ट आणि अभक्त अशा ब्राह्मणालाही ब्राह्मण मानायला तयार नव्हते. याउलट वैष्णव असणाऱ्या चांभाराला मात्र ते शुद्ध यातीचा असे म्हणत. याच्याही पुढे जाऊन तुकोबांनी ‘वर्ण अभिमानाने कोण जाला पावन । ऐसे द्या सांगून मजपाशी ॥’ असा रोकडा सवालच विचारलेला आहे. म्हणून वर्ण आणि जातीपेक्षा गुणांना महत्व देणाऱ्या तुकोबांनी ज्याच्याकडे शूरपणा आहे तोच खरा शिपाई आहे असे सांगायला सुरुवात केली. तुकोबा म्हणतात, ‘युद्ध करावया सामार्थ्य आणावे । तरीच म्हणावे क्षत्रीय त्यासी ॥’ ज्याच्या अंगात युद्ध करण्याचे सामर्थ्य आहे असा जो कोणीही असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही वर्णाचा असो तो खरा क्षत्रिय आहे. भलेही मग धर्मग्रंथांच्या म्हणण्यानुसार तो शूद्र जातीचा असला तरी चालेल. 

 

शिपाईगिरीचा उपदेश 

युद्ध करण्याचे सामर्थ्य नसताना एखाद्याने आपल्या हातात शस्त्रे धारण केली तर केवळ एवढ्याने ती व्यक्ती शिपाई होत नाही. ती शस्त्रे कशी चालवायची, कोणत्या वेळी कोणत्या शस्त्राचा वापर करायचा, शत्रूला कसे चकवायचे, आपले व आपल्या राजाचे प्राण वाचवून शत्रूला कशी धूळ चारावयाची याची शास्त्रशुद्ध माहिती ज्याला असते त्यालाच सैनिक म्हटले पाहिजे. ‘शूरपणा नाही । कैचा तो शिपाई?’ असे तुकोबांनी म्हटले आहे. म्हणजेच हातातील शस्त्रांसोबतच ज्याच्याकडे शूरपणा आहे, युद्ध करण्याचे सामर्थ्य आहे तोच खरा शिपाई. पुर्वज्ञानाशिवाय आणि पूर्व तयारीशिवाय कसलेही डावपेच माहित नसताना जर एखाद्याने शस्त्रे उचलली तर त्याची अवस्था कशी होते हे तुकोबांनी त्यांच्या पुढील अभंगात सांगितलेले आहे -

ढालतलवारें गुंतले हे कर । म्हणे मी झुंजार कैसा झुंजो ॥ १ ॥ 
पेटी पडदळे सिले टोप ओझे । हे तो जाले दुजे मरणमूळ ॥ २॥
बैसविले मला येणे अश्वावरी । धावू पळू तरी कैसा आता ॥ ३ ॥
असोनि उपाय म्हणे हे अपाय । म्हणे हाय हाय काय करू ॥ ५ ॥ 
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म । मुर्ख नेणे वर्म संतचरण ॥ ५ ॥
(अ.क्र.४३२५)

कसल्याही पूर्वानुभवाशिवाय आणि शूरपणाशिवाय जर एखादा सैनिक शस्त्रे धारण करेल आणि रणांगणात उतरेल तर त्याला त्याच्याकडील असणारे उपाय हे अपायासारखे वाटतील. त्याच्या हातात लढण्यासाठी उपयुक्त अशी जी ढाल तलवार असते, त्याचे रक्षण करण्यासाठी पेटी, पडदळे, सिले, टोप असते, वेगवान हालचाली करण्यासाठी अश्व असतो; पण त्याला या सर्व गोष्टी म्हणजे लढण्यांच्या कामी असणारे अडथळे वाटतात. युद्धासाठी मारक वाटतात. कारण ही शस्त्रे हाताळण्याचे त्याच्याजवळ नसलेले सामर्थ्य, त्याच्या अंगी नसलेला शूरपणा. युद्धासाठी उपयुक्त अशी सर्व सामग्री असूनही त्या व्यक्तीला ती कशी वापरायची याचे ज्ञान नसेल आणि त्याच्याकडे तेवढे सामर्थ्यही नसेल तर ती उपयुक्त साधने त्याला आपल्या यशाच्या मार्गातील अडथळे वाटू लागतात. घोड्यावर बसणे म्हणजे त्याला वेगाने पळण्यातला अडथळा वाटतो. म्हणून सैनिकाला (तुकोबांच्या शब्दांत पाईकाला) युद्धातले सर्व खाचखळगे माहित असले पाहिजेत असे तुकोबांना वाटत होते. नाहीतर ‘शूरा साजती हथीयारे । गांढ्या हसतील पोरे ॥’ अशी त्याची अवस्था झाल्यावाचून राहणार नाही.

पण हाती शस्त्रे आले, ते चालवण्याचे सामर्थ्यही आले म्हणून एखाद्या सैनिकाने ते कुठेही चालवण्याची गरज नाही हे सुद्धा तुकोबा सांगायला विसरत नाहीत. जे काम सुईने होऊ शकते तिथे तलवार वापरण्याची गरज नाही असे तुकोबांना वाटते. तलवार ही रणांगणात चालवायची असते. उठसुठ कुणाबरोबरही तिचा वापर करावयाचा नसतो हे तुकोबांनी खालील अभंगात सांगितलेले आहे,

वाखर घेऊनि आले । त्यासी तलवारेने हाले ॥ १ ॥
नव्हे आपुले उचित । करूनि टाकावे फजित ॥ धृ ॥ 
अंगुळीया मोडी । त्यासी काय सिले घोडी ॥ २ ॥ 
नपुंसकासाठी । तुका म्हणे न लगे जेठी ॥ ३ ॥
(अ.क्र.७७५)

एखादी व्यक्ती जर वाखर (वस्तरा) घेऊन आपल्या अंगावर घावून आली तर तिचा बंदोबस्त करण्यासाठी तलवार उपसणे उचित नसते. अशावेळी आपल्याला आपले युद्धातील सामर्थ्य वापरण्याची गरज नसते. केवळ त्याची फजिती जरी केली तरी तेवढ्याने तो खजील होऊन जाऊ शकतो. आपल्या नावाने जर कुणी हिम्मत नसल्यामुळे दुरुनच बोटे मोडत असेल तर तिथे शिपाई, घोडे इत्यादी लवाजमा घेऊन जायची गरज काय? हिम्मत नसणाऱ्या नपुंसक अशा व्यक्तीसाठी फार जास्त काही आटापिटा करण्याची गरज नाही. त्याला थोडे जरी दरडावले तरी तो गर्भगळीत होऊन जाऊ शकतो असे तुकोबा म्हणतात. थोडक्यात काय तर शिपायाने सदसद्विवेकबुद्धीचा वापर करूनच लढाई करावी. थातुरमातुर लोकांसाठी आपल्या अंगचे शौर्य पणाला लावण्याची गरज नाही असे तुकोबा सांगतात.

म्हणून तुकोबांनी मावळ खोऱ्यातील लोकांना शिपाईगिरी करण्यासाठी, त्यांना उच्चकोटीचे सैनिक बनविण्यासाठी आपल्या काही अभंगातून मार्गदर्शन केलेले आहे. सैनिकालाच पाईक असेही म्हटले जाते. म्हणून तुकोबांच्या या अभंगाला पाइकीचे अभंग असे म्हणतात. 

प्रसिद्ध इतिहासकार चंद्रशेखर शिखरे लिहितात, ‘छत्रपतींवरील तुकोबांचा प्रभाव फक्त व्यक्तिगत संबंधापुरताच मर्यादित नाही तर तुकारामांच्या गाथेमधील जे पाइकीचे अभंग आहेत ते सर्व शिपाईगिरी करण्यासाठीचे आहेत. याशिवाय वीरवृत्ती धारण करण्याचा उपदेशही अनेक अभंगांमधून त्यांनी दिलेला आहे. या अभंगांमधून प्रेरित होऊन हजारो वारकरी तरुण शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या चळवळीत मावळे म्हणून लढले. हे तुकारामांचे कर्तृत्व खरोखरच उल्लेखनीय आहे.’ (प्रतिइतिहास, पृ. ९०) 

छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोहगाव आणि परिसरातील लोकांचा भरणा होता. याचे कारण स्पष्ट करताना बा.र. सुंठणकर लिहितात, ‘तुकारामांनी लोहगाव हेच आपले प्रचाराचे केंद्र केले होते. तेथे नेहमी त्यांच्या कीर्तनांच्या आणि भजनांच्या फैरी झडत असत आणि गावोगावचे लोक त्यांना हजर राहत असत. याच लोहगावच्या आसपासच्या प्रदेशातून शिवाजीच्या सैन्यात मावळ्यांची भरती झाली होती.’

विशेष बाब म्हणजे लोहगाव हे तुकोबांचे आजोळही होते. इतर कोणत्याही संताने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेला प्रेरणा दिली असे म्हणण्यापेक्षा तुकोबारायांनी शिवरायांच्या कार्याची वाट तयार करून ठेवल्याचे सांगताना बां.र. सुंठणकर लिहितात... ‘कारण संतसंप्रदायाचा कळस चढवीत असतानाच तुकारामांनी समाजातील जी धर्मजागृतीची लाट उसळून दिली तिचा उपयोग शिवाजीला आपल्या कार्याकडे करून घेता आला. जमिनीत मिळणारा ऐहिक मोक्ष आणि भक्तीने मिळणारा परमार्थिक मोक्ष ही शिवकालीन शेतकऱ्यांपुढे दोन उद्दिष्टे होती. पारमार्थिक मोक्षाच्या जोडीला ऐहिक मोक्षाचे साधन शिवाजीने शेतकऱ्यांपुढे ठेवले हेच त्याचे कौशल्य. त्यामुळे मराठा मुलुखातला सारा मावळा त्याच्या झेंड्याखाली गोळा झाला. या मावळ्यांच्या जोरावर वर्षानुवर्ष निरनिराळ्या शत्रूशी टक्कर देऊन त्याला आपली सत्ता प्रस्थापित करता आली.’

या संदर्भात जागतिक पातळीचे प्राच्यविद्या संशोधक कॉ. शरद पाटील यांनीही ‘शिवाजीने गनिमी काव्याने स्वराज्य मिळवावे असा उपदेश तुकोबा पाइकीच्या अभंगांमध्ये करतात.’ असे आपले मत मांडले आहे.

म्हणजेच तुकोबांनी पाइकीच्या अभंगातून एक प्रकारे शिवरायांना आणि तत्कालीन मावळ्यांना गनिमी काव्याची शिकवण दिली होती हे स्पष्ट होते. तुकोबांच्या या शिकवणुकीचा शिवरायांना नेमका कोणता आणि कसा फायदा झाला हे विषद करताना गं. बा. सरदार आपल्या ‘संत वाङमयाची सामाजिक फलश्रुती’ या ग्रंथात लिहितात, ‘शिवाजीराजांपाशी संख्याबळ आणि शस्त्रबळ खूपच कमी होते; तरीही त्यांच्या सैनिकांनी अद्भुत पराक्रम गाजविला, कारण ते जातिवंत पाईक होते; भाडोत्री नोकर नव्हे. त्यांच्यापाशी इमान होते, सत्यप्रियता होती धर्मनिष्ठा होती. तानाजी, बाजीप्रभू, जिऊ महाला यांच्या कर्तृत्वात जिवंत प्रेरणेचा नैतिक बळाचाच अविष्कार अधिक आहे. तुकोबांचे पाईकीचे अभंग पाहिले म्हणजे मध्ययुगीन नैतिक मुल्यांची बरोबर कल्पना येते.’ 

 

पाईकीचे अभंग 

कलियुगात फक्त ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण शिल्लक आहेत असा अपप्रचार केल्यामुळे या देशातील लोकांची क्षात्रवृत्ती लोप पावली होती. एखाद्या परकीय शक्तीचे आक्रमण झाले की हाती शस्त्रे घेऊन लढण्यापेक्षा आपल्या मदतीला देव येईल असे म्हणून देव पाण्यात घालून बसणाऱ्यांचीच संख्या वाढली होती. म्हणूनच मध्ययुगीन कालखंडात परकीय आक्रमणाला छेद देण्यासाठी काळाला आणि देशाला शिवाजी महाराजांची वाट पहावी लागली.

शहाजी राजे आणि जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे सुरु केलेले कार्य पाहून तुकोबा भारावून गेले आणि त्यांनी या मातीतील लोकांना त्यांच्यातील क्षात्रवृत्तीची जाणीव करून देणारी अभंग रचना केली. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबा वारकऱ्यांना सांगू लागले की ज्याच्यात युद्ध करावयाचे सामर्थ्य आहे असा कोणत्याही जातीचा व्यक्ती क्षत्रिय आहे. तुमचे कूळ कोणते आणि तुमची जात कोणती याला काडीचीही किंमत नाही. तुमच्याकडे लढण्याचे सामर्थ्य आहे ना? बस्स मग तुम्ही क्षत्रिय. तुकोबांच्या या आवाहनाने इथल्या अठरा पगड जातीतील लोकांना प्रेरणा मिळाली आणि धर्माच्या नावाखाली झाकून ठेवलेले त्यांचे क्षत्रियत्व उसळ्या मारु लागले. किर्तनात जे हात टाळ, चिपळ्या आणि वीणा घ्यायचे तेच हात ढाल-तलवार हाती घेऊन रणमैदान मारण्यासाठी फुरफुरु लागले. वेगवेगळ्या जातीधर्मातील लोक शिवरायांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात सामील होऊ लागले. ज्यांच्या हाती इथल्या व्यवस्थेने केवळ पाणी आणि वस्तरा दिला होता अशा नाभिक बांधवांच्या हाती सुद्धा शिवरायांनी या व्यवस्थेला लाथाडून ढाल-तलवार दिली. ज्यांचे हात केवळ दगड फोडण्यासाठी घण घालायचे अशा वडारांच्या हाती शिवरायांनी शस्त्र दिले. ज्याच्या कपाळी हाती घुंगराची काठी घेऊन येसकरकी लिहिली होती त्यांनाही शिवरायांनी आपल्या सैन्यात सामावून घेतले. तुकोबांच्या मार्गदर्शनामुळे शिवरायांनी शास्त्राला लाथाडून शस्त्रांची पुजा केली आणि आपल्या रक्ताचे पाणी करून स्वकीयांचे राज्य उभे केले. 

ज्या अभंगातून तुकोबांनी शिपाईगिरीचा उपदेश केला त्या अभंगांना पाईकीचे अभंग असे म्हणतात. पाईकीचे अभंग नेमके कसे तयार झाले हे सांगताना बा.ग. परांजपे लिहितात, ‘अगदी बालपणातच शिवछत्रपती त्यांच्या वक्तृत्वाच्या प्रभावांत सापडले. त्यांनी इतर उपदेशकांनी सांगितल्याप्रमाणे सर्वसंग परित्याग करून भजन पूजन कीर्तनांत आयुष्य वेचावें असें मनांत आणलें व तसा क्रम सुरु केला. तुकोबांस ही गोष्ट कळली तेव्हां तुम्ही स्वराज्यस्थापनेच्या कामावर रहा आम्ही भजन कीर्तन द्वारां लोकांची अवनत स्थिती सुधारण्याच्या, त्यांच्या अंतरांत रवीचा प्रकाश पाडण्याच्या, त्यांच्या हातून पाप कृत्य होणार नाहीं, अशा तऱ्हेने त्यांच्या विचारांची दिशा बदलविण्याच्या कामावर राहू. असे आपण एकमेकांस सहाय्य करूं व सर्व जण सुपंथ धरतील असें वागू असें म्हणून तुमच्या कार्याच्या पाठींशी मी आहें याची खूण म्हणून तुमच्या सहकाऱ्यांना प्रसाद म्हणून अभंग देतों, असे हे पाइकीचे अभंग आहेत.’

तुकोबांचे पाईकीचे अभंग हे विरवृत्तीची जोपासना करण्यासाठी लिहिलेले आहेत असे सांगताना प्रसिद्ध विचारवंत प्रा. अशोक राणा लिहितात, ‘अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्याची तयारी तुकारामांची आहे. त्याचप्रमाणे जे या बाबत अग्रेसर आहेत त्यांच्याप्रती आदर व्यक्त करून ते वीरवृत्तीची जोपासना करण्याचा उपदेश करतात. छत्रपती शिवरायांच्या सैनिकांमध्ये बहुतांश लोक शेतकरी होते. त्याचप्रमाणे ते तुकोबारायांचेही अनुयायी होते. त्यांना सैनिकांच्या कर्तव्याप्रती जागरूक करण्यासाठी जे अभंग तुकोबांनी लिहिले त्यांना पाईकीचे अभंग म्हणतात.’

तर अशा या पाइकीच्या अभंगांची एकूण संख्या अकरा अशी आहे. देहू संस्थानच्या गाथ्यात हे अभंग १०५६ ते १०६६ या क्रमाने दिलेले आहेत. आपण एका क्रमाने त्या त्या अभंगाचे विश्लेषण पाहूया.

पाइकपणे जोतिला सिद्धांत । शूर धरी मात वचन चित्ती ॥ 
पाइकावाचून नव्हे कधी सुख । प्रजांमध्ये दुःख न सरे पिडा ॥ धृ ॥ 
तरि व्हावे पाईक जीवाचे उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥
पाईकीचे सुख जया नाही ठावे । धिग त्यांनी ज्यावे वायांविण ॥
तुका म्हणे एक क्षणाचा करार । पाईक अपार सुख भोगी ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०५६, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३६४)

तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून पाइकीचे काही सिद्धांत सांगत आहेत. पण हे सिद्धांत ढाल तलवार हातात असूनही मी कसा लढू? असे विचारणाऱ्या गांढ्या व्यक्तीसाठी नसून जो शूर वीर असा पाईक आहे त्यालाच हे पाइकीचे सिद्धांत समजू शकतील.

त्यालाच तुकोबांच्या या सिद्धांताचे महत्व पटू शकेल. अशा शूर वीर पाइकाशिवाय प्रजेला, जनतेला किंवा रयतेला कधीही सुख लाभू शकत नाही. सामान्य रयतेचे कधीही दुःख निवारण होऊ शकणार नाही असे तुकोबा म्हणतात. प्रसंगी जे लोक आपल्या जीवावर उदार होतात तेच खरे पाईक होऊ शकतात आणि अशा जीवावर उदार होणाऱ्या पाइकाचा सर्व भार त्याचा स्वामी म्हणजेच ‘राजा’ उचलतो. ज्या लोकांना पाईक होण्याचे सुख माहित नाही अशा लोकांचे जगणे व्यर्थ असते. खरे तर पाईक होणे हा एका क्षणाचा करार असतो परंतु पाइकी पत्करल्यानंतर मिळणारे सुख मात्र अपार असते. त्याला आपण केलेल्या कर्तव्यप्राप्तीमुळे प्रचंड समाधान लाभते.

छत्रपती शिवरायांच्या सैन्यात जे लोक होते त्यांनी सुद्धा आपल्या जीवावर उदार होऊन हा सैनिकी पेशा पत्करलेला होता आणि याच लोकांनी तुकोबांना अभिप्रेत असणारे खरे अपार सुख भोगलेले आहे याला इतिहास साक्षी आहे.

पाईकीचें सुख पाईकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटी ॥ १ ॥ 
येतां गोळ्या बाण साहिले भडिमार । वर्षतां अपार वृष्टि वरी ॥ २ ॥ 
स्वामीपुढे व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडण शोभा दावी ॥ ३ ॥ 
पाईकांनी सुख भोगिलें अपार । शूर आणि धीर अंतर्बाहीं ॥ ४ ॥ 
तुका म्हणे याही सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शहाणा करी तो भोगी ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. .१०५७, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३६५)

पाइकीचे, सैनिकी पेशाचे, युद्धावर रणांगणात लढण्याचे सुख काय असते हे पाइकालाच माहित असते. म्हणूनच ते आपल्या पाइकीचा धर्म रक्षण्यासाठी स्वतःचे प्राणही पणाला लावतात. या अपार सुखासाठी ते शत्रूकडून होणारा तोफगोळ्यांचा, बाणांचा अथवा कोणत्याही शस्त्रांचा भडीमार एकदम निडरपणे सहन करतात. खरा पाईक हा आपल्या स्वामीवर, राजावर संकट कोसळले असता, त्यांच्यावर हल्ला झाला असता मध्ये पडून ते संकट आपल्या अंगावर घेतो आणि आपल्या राजाचे रक्षण करतो, प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदानही देतो परंतु आपल्या राजाला साधे खरचटू देखील देत नाही अशा पाइकाचा जगामध्ये लौकिक होतो. तो शूरवीर म्हणून नावाजला जातो. अशा धैर्यवान आणि खऱ्या पाइकांनी अपार सुख भोगलेले असते. जो कोणी पाईक वर सांगितलेले सिद्धांत जाणतो तो खऱ्या अर्थाने शहाणा असतो आणि जो वर सांगितल्या प्रमाणे प्रत्यक्ष आचरण करतो त्यालाच हे अपार सुख भोगावयास मिळते.

छत्रपती शिवरायांच्या सैनिकांमध्ये कितीतरी सैनिक असे होते की जे शिवरायांच्या प्राण रक्षणासाठी सदैव तत्पर असायचे. ज्या लोकांसाठी शिवरायांनी घाम गाळला त्या लोकांनी प्रसंगी शिवरायांसाठी आपले रक्त सांडल्याचा इतिहास आहे. उदा. जिवाजी महाले. अफझलखान जेव्हा शिवरायांची भेट घेण्यास आला होता तेव्हा भेट घेणे हे नाटक असून त्याचा मूळ हेतू हा शिवरायांना काहीही करून संपवणे हाच होता. म्हणून यावेळी शिवरायांनी अत्यंत विश्वासू आणि जीवास जीव देणारे लोक सोबत घेतले होते. त्यापैकी एक म्हणजे जीवाजी महाले. भेटीच्या वेळेस शिवरायांनी खानाला जखमी केल्यानंतर खान शामियान्यातून पळाला. शिवरायांनी जखमी केलेल्या खानाचे संभाजी कावजी कोंढाळकरांनी डोके धडावेगळे केले. तेवढ्यात दांडपट्टा चालविण्यात पटाईत असणारा सैय्यद बंडा शिवरायांवर वार करण्यासाठी धावून आला. सैय्यद बंडाने केलेले चार वार शिवरायांनी चुकविले; परंतु बंडाचा पाचवा वार शिवरायांना मर्मभेदक होणार असे दिसताच जिवाजी महाले यांनी सैय्यद बंडावर वार करून त्याचा हात हत्यारासमवेत खांद्यापासून वेगळा केला. तुकोबांनी सांगितले होते ‘स्वामीपुढे व्हावे पडता भांडण । मग त्या मंडण शोभा दावी ॥’. अशा रीतीने जिवाजी महाले यांनी आपल्या प्राणाची बाजी लाऊन शिवरायांचे प्राण रक्षण केल्यामुळे ‘होते जिवाजी म्हणून, वाचले शिवाजी’ ही म्हण इतिहासात रूढ झाली. असे कितीतरी मावळे शिवरायांसाठी आपल्या प्राणाचे बलिदान द्यायला सदैव तयार होते.

१६८२ च्या डिसेंबर महिन्यात मोगलांनी जेव्हा स्वराज्यावर हल्ला चढवला तेव्हा एकीकडे बोलणी करण्याचे नाटक करत दुसरीकडे पोर्तुगीजांनी मोगलांना मराठ्यांवर हल्ला करण्यासाठी आपल्या प्रदेशातून वाट दिली. याचा बदला घेण्यासाठी संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांवर हल्ला चढविला. जुवे बेटावर लढत असताना मराठ्यांनी पोर्तुगीजांवर असा काही हल्ला चढविला की व्हॉईसरायसह सर्वांनी धूम ठोकली. व्हॉईसरायचा पाठलाग करताना संभाजी राजेंनी अगदी बेभानपणे आपला घोडा भर खाडीत घातला. समुद्राला भरती असल्यामुळे राजांचा घोडा पोहणीला लागला होता. बाका प्रसंग लक्षात घेऊन खंडो बल्लाळ पुढे गेले त्यांनी उडी टाकून घोड्याची लगाम धरून राजेंना परिस्थितीची जाणीव करून दिली.

जिवाजी महाले, खंडो बल्लाळ हे तुकोबांना अभिप्रेत असणारे शहाणे पाईक होत.

पाईक तो जाणे पाईकीचा भाव । लगबग ठाव चोरवाट ॥ १ ॥ 
आपणां राखोनी ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हिरूनियां ॥ २ ॥ 
येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाईका त्या जग स्वामी मानी ॥ ३ ॥ 
ऐसें जन केले पाईकें पाईक । जया कोणी भीक न घालिती ॥ ४ ॥ 
तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक । बळिया तो नाईक त्रैलोकींचा ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०५८, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३६६)

खरा पाईकच पाईकीचे रहस्य जाणून असतो. उदाहरणार्थ त्याला सगळ्या चोरवाटा ठाऊक असतात. शत्रूचा माग कसा काढायचा हे ही माहित असते. परंतु हे सर्व करत असताना तो आपला माग मात्र कुणालाही लागू देत नाही. स्वतःचे रक्षण करत करत तो शत्रूला ठकवण्यात आणि त्याचे सर्वस्व हरण करून घेण्यात अत्यंत पटाईत असतो. जो पाईक आपल्या मनातील मनसुब्यांचा कसलाही माग शत्रूला लागू देत नाही, स्वतःचाही माग इतरांना लागू देत नाही अशा पाईकाला त्याचा राजाच काय त्याला सर्व जग मानते. साऱ्या जगात त्याची वाहवा होते. अशा शूर आणि धाडसी पाइकापासून प्रेरणा घेऊन ज्यांना कोणी भीकही घालत नाही असे लोक म्हणजेच सामान्य लोक सुद्धा पाईक होतात आणि असे पाईक ज्या नेत्याच्या अथवा राजाच्या पदरी असतात असा राजा तिन्ही लोकांचा बलवान स्वामी होऊ शकतो. जिवाजी महाले, बाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंह जाधव, मानाजी मोरे, शिवा काशीद, मदारी मेहतर आदी शूर व धाडसी मावळ्यांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात सामान्य शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी इ. सामान्य वर्गातून असामान्य पराक्रम गाजवणारे वीर तयार झाले.

छत्रपती शिवरायांचा आणि त्यांच्या युद्धनीतीचा जो जगभर बोलबाला झालेला आहे त्याला तुकोबांनी वर्णिलेले असे पाईकच कारणीभूत आहेत.

पाईकांनी पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांठा माेडोनियां ॥ १ ॥ 
पारखिये ठायीं घेऊनियां खाण । आपलें तें जन राखियेलें ॥ २ ॥ 
आधारेंविण जे बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥ ३ ॥ 
सांडितां मारग मारिती पाईक । आणिकांसी शीक लागावया ॥ ४ ॥ 
तुका म्हणे विश्वा घेऊनी विश्वास । पाईक तयास सुख देती ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०५९, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३६७)

पारखे म्हणजे परके अर्थात शत्रू. खरा पाईक हा शत्रूनी साठविलेला खजिना शोधून काढून तो लुटून घेतो. शत्रूच्या प्रदेशात खणती लावून ते आपल्या लोकांचे रक्षण करतात. पाईकांना सदैव डोळ्यात तेल घालून जागरूक राहावे लागते. अन्यथा शत्रूकडून घातपात होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा शत्रूकडील लोक मित्रत्वाचे सोंग घेऊन आपल्यात मिसळतात आणि आपल्याला दगा फटका करण्यासाठी प्रयत्न करतात. खरा पाईक हा अशा लोकांना त्यांच्या बोलण्यावरून ओळखतो. त्याच्यात आपले लोक कोण आणि परके लोक कोण यात फरक करण्याची बुद्धी असते. आपल्या पक्षातील लोक सुद्धा जर स्वतःचा मार्ग सोडून वागायला लागले तर असा पाईक हा स्वकीयांना सुद्धा बिनदिक्कतपणे मारतो. ज्यामुळे इतरांना असे मार्ग सोडून वागण्याचे धैर्य होणार नाही. त्यांना समजून येते की आपण जर काही भलते सलते आचरण केले तर आपली गत सुद्धा अशीच होऊ शकते. अवघ्या विश्वाला विश्वासात घेऊन सुखी करणे हेच पाईकाचे ध्येय असते.

पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥ १ ॥ 
तो एक पाईक पाईकां नाईक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ २ ॥ 
तृणवत तनु साेनें ज्या पाषाण । पाईका त्या भित्र नाहीं स्वामी ॥ ३ ॥ 
विश्वासावांचूनी पाईकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोललिया ॥ ४ ॥ 
तुका म्हण नये स्वामी उणेपण । पाईक जतन करी त्यासी ॥ ५ ॥ 
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६०, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३६८)

पारखे म्हणजे परके हे आपण पूर्वी पहिलेच आहे. तुकोबा म्हणतात खरा पाईक तो आहे जो परकीयांचा, शत्रूचा समूळ नाश करतो आणि आपल्या प्रजेचे, कुळाचे रक्षण करतो. ज्या पाइकाचा सर्व भाव आपल्या स्वामीवर, राजावर असतो, जो पाईक आपल्या राजाशी एकनिष्ठ असतो त्याला आपोआप नाईक पदी बढती मिळते. पाईक हा साधा सैनिक होय तर नाईक म्हणजे त्यांचा नेता होय येथे हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. अर्थात तुकोबा येथे पाइकाच्या बढतीचे सूत्र सांगत आहेत. अशा पाइकाला आपले शरीरच काय पण आपले जीवनसुद्धा तृणवत वाटते. गवताप्रमाणे तुच्छ वाटते. सोने सुद्धा त्याला पाषाणासारखे वाटते. म्हणजे तो कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडून स्वामी निष्ठा सोडत नाही. फितूर होत नाही. पाईक हा आपल्या कृतीने स्वामीच्या मनात विश्वासपात्र बनत असतो. विश्वासाशिवाय पाईकाला कसलेच मोल नसते, त्याची कवडीचीही किंमत नसते. खऱ्या पाईकाने कधीही आपल्या स्वामीला उणेपण येणार नाही असेच वागावे. स्वामीच्या कीर्तीला आणि पाईकावरील विश्वासाला कधीही धक्का पोचणार नाही याची काळजी पाईकाने सदैव बाळगली पाहिजे. तरच तो विश्वासपात्र बनतो. म्हणजेच तुकोबांनी पाईकाने आपल्या स्वामीशी कसे वागावे याची नीतीच सांगितली आहे. अर्थातच स्वामीने सुद्धा पाईकाशी कसे वागावे याचेही संकेत तुकोबांनी आपल्या अभंगातून सांगितलेले आहेत.

छ. शिवरायांच्या जीवन कार्याकडे पाहत असताना आपल्याला शत्रूच्या प्रलोभनाला बळी न पडणारे मुरारबाजी आणि येसाजी कंक आठवल्याशिवाय राहत नाहीत. एप्रिल १६६५ मध्ये दिलेरखान याने पाच हजार सैन्यासह पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळी केवळ ७०० मावळे दिमतीला घेऊन मुरारबाजी मोठ्या हिम्मतीने किल्ल्याबाहेर पडले. शत्रूच्या सैन्याच्या संख्येला न घाबरता मुरारबाजींनी आपला मोर्चा थेट दिलेरखानाकडे वळवला. चौथीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात या प्रसंगाचे वर्णन पुढील प्रमाणे आलेले आहे, ‘दिलेरखानाला बघून मुरारबाजी चवताळला. 'कापा, तोडा, मुडदे पाडा’ असे ओरडून तो शत्रूवर धावला. त्याची समशेर जोराने फिरू लागली. जो आड आला, तो ठार झाला. या एकट्या विराला मुघलांनी चोहोकडून घेरले. इतक्यात दिलेरखान अंबारीतून ओरडला, ‘थांबा!’ मुघल थांबले. क्षणभर मागे सरले. खान मुरारबाजीला म्हणाला, ‘मुरारबाजी तुझ्यासारखा समशेरबहाद्दर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे, बादशहा तुला सरदार करतील. जहागिरी देतील, बक्षीस देतील.’ मुरारबाजीने दिलेरखानाचे शब्द ऐकले. रागाने त्याचे डोळे लाल झाले. तो चवताळून म्हणाला, ‘अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे! तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला?’ मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला. दिलेरखानाने अंबारीतून बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. तो जमिनीवर कोसळला..” खरे तर मुरारबाजींचे शौर्य पाहून खान प्रभावित झाला होता. खानाने मुरारबाजींना बादशहाची चाकरी स्वीकारण्याची विनंती केली होती. मुरारबाजींनी खानाचे म्हणणे ऐकले असते तर त्यांना जीवनदान तर मिळालेच असते परंतु त्यांना सरदारकी देण्याचेही दिलेरखानाने सांगितले होते. पण स्वाभिमानी मुरारबाजींनी मरण पत्करले पण दिलेरखानासारख्या शत्रूची बक्षिसी स्वीकारली नाही. 

दक्षिण दिग्विजायावर असताना शिवाजी राजे भागानगर येथील बादशहास भेटावयास गेले. शिवरायांसारखा राजा आपल्या भेटीला आलेला पाहून बादशाहाने त्यांचे फार मोठे आदारतिथ्य केले. एके दिवशी हत्तींची झुंज चालू असताना बादशहाने शिवरायांना स्वराज्यात किती हत्ती आहेत? अशी विचारणा केली. अर्थात डोंगरदऱ्या, कड्याकपारींमध्ये हत्तीसारख्या प्राण्याचे काम नसते. पण हजरजबाबी शिवरायांनी ‘माझ्याकडे हत्ती नाहीत पण हत्तीशी झुंजणारे पराक्रमी मावळे आहेत’ असे उत्तर दिले. तेव्हा बादशहाने ‘तुमचा एखादा मावळा हत्तीशी झुंजेल काय?’ अशी विचारणा केली. तेव्हा येसाजी कंक क्षणाचाही विलंब न लावता मैदानात उतरले. मदाने उन्मत्त झालेल्या हत्तीला येसाजींनी अवघ्या काही क्षणातच लोळविले. येसाजींचा हा पराक्रम पाहून बादशहा आनंदित झाला आणि त्याने येसाजींना इनाम जाहीर केले. पण स्वाभिमानी असणाऱ्या येसाजींनी आमचे राजे आम्हाला बक्षिसी द्यायला समर्थ आहेत असे म्हणत नम्रपणे बादशहाची बक्षिसी नाकारली. खरे तर भागानगरचा बादशहा आणि शिवाजी राजे यांचे संबंध मैत्रीचे होते तरीही येसाजींनी त्यांची बक्षिसी नाकारून ते हाडाचे पाईक आहेत हेच सिद्ध केले.

शिवरायांनी अशा पद्धतीचे अत्यंत विश्वासू मावळे आपल्या पदरी बाळगले होते. म्हणूनच त्यांचा त्रैलोक्यात गाजावाजा झाला. 

धनी ज्या पाईका मानितो आपण । तया भितें जन सकळिक ॥ १ ॥ 
जिवाचे उदार शोभती पाईक । मिरवती नाईक मुगुटमणी ॥ २ ॥ 
आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळसुख ॥ ३ ॥ 
कमाईचीं हीणें पडिली उदंड । नाहीं तया खंड येती जाती ॥ ४ ॥ 
तुका म्हणे तरी पाईकीच भली । थोडीबहु केली स्वामिसेवा ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६१, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३६९)

ज्या पाइकांना स्वतः स्वामी मानतो, आपल्या पाइकावर विश्वास ठेऊन त्यांचा यथायोग्य सन्मान करून त्यांना योग्य ती जबाबदारी देतो अशा पाइकांना सगळे लोक भितात. ते सुद्धा त्या पाइकांशी आदराने वागतात. आपल्या जीवावर उदार होऊन लढा देणाऱ्या पाइकांना त्यांचे नाईक त्यांना आपल्या मुकुटातील मण्यासारखे जपतात. वेळोवेळी त्यांचा गौरव करतात. त्यांच्या वाट्याला सर्व प्रकारचे वैभव येते. पोटभरण्यासाठी या राजाकडून त्या राजाकडे आणि त्या राजाकडून या राजाकडे सतत ये जा करणारे पाईकही असतात. या विष्ठेवरून त्या विष्ठेवर जाऊन बसणाऱ्या माशीपेक्षाही चटकन आपली निष्ठा बदलणारे पोटभरू पाईक आपल्याला ढीगभर भेटतात. पण असली पाइकी काय कामाची? पाईक होऊन थोडी बहुत का होईना स्वामिसेवा करणे केव्हाही चांगले. या संदर्भात सदानंद मोरे म्हणतात, ‘तुकोबांना अभिप्रेत असणारा पाईक केवळ उदरनिर्वाहासाठी सैनिकी पेश पत्करलेला भाडोत्री सैनिक नाही. असे भाडोत्री सैनिक उदंड आहेत, ते येतात आणि जातात. आज ते एका स्वामीच्या पदरी असतील तर उद्या त्याच्यापेक्षाही अधिक वेतन देणाऱ्या दुसऱ्या कोणाच्या चाकरीत.’

केवळ पोट भरण्यासाठी पाइकी स्वीकारणे हे तुकोबांना मान्य नव्हते. तर वेळ प्रसंगी स्वतःचे पोट फेकून देणारे पाइकच खरे पाईक होत.

पाईकपणें खरा मुशारा । पाईक तो खरा पाईकीनें ॥ १ ॥ 
पाईक तों जाणे मारितें अंग । पाईकासी भंग नाहीं तया ॥ २ ॥ 
एके दाेहीं घरीं घेतली खाणें । पाईक तो पणें निवडला ॥ ३ ॥ 
करूनी कारण स्वामी यश द्यावें । पाईका त्या नांवें खरेपण ॥ ४ ॥ 
तुका म्हणे ठाव पाईका निराळा । नाहीं स्वामिस्थळा गेल्याविण ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६२, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३७०)

या अभंगाचा अर्थ विषद करताना सदानंद मोरे लिहितात, ‘स्वतःचा बचाव करणे ही आवश्यक बाब खरीच; परंतु पाइकाला चढाईही करता आली पाहिजे. किंबहुना पुष्कळ वेळा हल्ला हाच बचावाचा श्रेष्ठ मार्ग ठरतो. ज्या पाइकाला युद्धशास्त्रातील मारण्याचे अंग, चढाईचा मार्ग अवगत असतो त्याचा पराभव होत नाही. जोपर्यंत स्वामी सुरक्षित नियोजित ठिकाणी पोहचत नाही तोपर्यंत पाईक आपली जागा सोडत नाही. तसेच पाय रोवून तो शत्रूची वाट रोखतो.’ अर्थात सर्वच पाईक सारख्याच प्रतीचे नसतात व त्यामुळे स्वामीला त्यांच्यात श्रेष्ठ कनिष्ठ ठरवावे लागते. या वस्तुस्थितीचेही तुकोबांना भान आहे.

जेव्हा शत्रूच्या प्रदेशात खणती लागायचा प्रसंग येतो तेव्हा पाइकाचा कस लागतो. अशावेळी पण करून पुढे येतो तो खरा पाईक. खरा पाईक स्वामीसाठी लढून जिंकून स्वामीला यशस्वी करतो. स्वामी सुरक्षित ठिकाणी पोचल्याशिवाय पाईक जागा सोडत नाही.

या प्रसंगी आपणास बाजीप्रभू देशपांडे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. इ.स. १६३० मध्ये सिद्दी जोहर आणि अफझल खानाचा मुलगा फाजल खान यांनी प्रचंड फौजफाटा घेऊन पन्हाळगडास वेढा घातला. शिवरायांचा अंदाज होता की काही काळ गेल्यानंतर वेढा सैल होईल आणि आपल्याला येथून निसटता येईल. परंतु पावसाळा सुरु झाला तरी वेढ्यात थोडीशीही ढील पडली नाही. हा वेढा उठवण्यासाठी प्रती शिवाजी म्हणून नावलौकिक असणारे नेताजी पालकर यांनी सिद्दी हिलालच्या मदतीने हल्ला केला होता; परंतु त्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळाल्यामुळे ते अपयशी ठरले. तेव्हा शिवरायांनी स्वतःच एक गुप्त बेत आखला आणि विशाळगडाकडे पळून जाण्याची योजना बनवली. याच गुप्त योजनेचा एक भाग म्हणून शिवा काशीद यांना खोटे शिवाजी महाराज बनवून बोलणी करण्यासाठी सिद्दीकडे पाठवण्यात आले आणि निवडक मावळे घेऊन शिवाजी महाराज वेगाने विशाळगडाकडे निघाले; परंतु ही बातमी सिद्दीला समजली आणि तो वाऱ्याच्या वेगाने महाराजांचा पाठलाग करू लागला. वाटेत घोडखिंड होती. या खिंडीत सिद्दीच्या सैन्याने मावळ्यांना गाठले. तेव्हा खिंडीमध्ये बाजीप्रभू यांच्या सोबत निवडक मावळे ठेऊन शिवाजी महाराज स्वतः विशाळगडावर चढू लागले. जोपर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोचल्याची खूण होणार नाही तोपर्यंत बाजी प्रभू आणि मावळ्यांनी आपल्या प्राणांची शिकस्त केली आणि शत्रूला खिंडीतच थोपवून धरले. काही वेळाने महाराज गडावर पोचले. त्यांच्या पोचल्याची खूण म्हणून तोफांचे आवाज काढण्यात आले आणि इकडे बाजीप्रभू आणि पुष्कळ मावळ्यांनी आपला प्राण सोडला. 

प्रसिद्ध इतिहासकार गोविंद पानसरे लिहितात, ‘बाजीप्रभू अन ते बेनाम मुठभर मावळे का लढले? पुन्हा तीच भावना आपण मेलो तरी चालेल पण जे कार्य आरंभले होते ते पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा. ते कार्य पूर्ण व्हायला हवे. ज्याच्यासाठी हसत हसत मरण पत्करावे असे ते कार्य होते. अशीच त्यांची भावना होती.’

तुकोबांनी सांगितले होते की, ‘तुका म्हणे ठाव पाईका निराळा । नाहीं स्वामिस्थळा गेल्याविण ॥’ म्हणजे जोपर्यंत आपला राजा सुरक्षितपणे नियोजित ठिकाणी पोहचत नाही तोपर्यंत हाडाचा पाईक हा आपली जागा सोडत नाही. बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी सुद्धा जोपर्यंत शिवाजी राजे विशाळगडावर पोचत नाहीत तोपर्यंत घोडखिंडीमध्ये आपल्या प्राणाची बाजी लाऊन शत्रूशी मुकाबला केला आणि जेव्हा तोफांची इशारत झाली, राजे गडावर पोचले तेव्हाच त्यांनी आपल्या शरीरातील प्राणाला मोकळी वाट करून दिली.

उंच नीच कैसी पाईकाची ओळी । कोण गांढ्या बळी निवडला ॥ १ ॥ 
स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ २ ॥ 
प्रसंगावांचूनी आणिती आविर्भाव । पाईक तो नांव मिरवी बायां ॥ ३ ॥ 
गणतीचे एक उंच नीच फार । तयांमध्ये शूर विरळा थाेडा ॥ ४ ॥ 
तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाइक पाहोन मोल करी ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६३, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३७१)

पाईक हे अनेक प्रकारचे असतात. कोणी त्याच्या कर्तृत्वामुळे उच्च असतात तर कोणी कर्तृत्वहीन असल्यामुळे नीच असतात. पण स्वामी मात्र योग्य पाईक बरोबर निवडतो. कोण गांढ्या आहे, कोण बलवान आहे हे स्वामीला बरोबर समजते. कारण बलवान आणि शूर अशा पाइकाच्या हातातच शस्त्रांची आभूषणे शोभून दिसतात. गांढ्या लोकांच्या हातातील शस्त्रे तर निव्वळ पोरासोरांचे करमणूक करण्याचे साधनच असते हे स्वामीला ठाऊक असते. म्हणून पाइकांची निवड करताना स्वामीने खूप सजग असले पाहिजे. जागरूक असले पाहिजे. काही पाईक हे स्वामीची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतात, त्यांना या बदल्यात कोणत्याच मोबदल्याची अपेक्षा नसते. पण काही बोलघेवडे लोक सुद्धा मनामध्ये कसल्यातरी लोभाची अपेक्षा ठेऊन स्वामीच्या पुढेपुढे करण्यात पटाईत असतात. असे लोक भाटगिरी करून आपल्याला अपेक्षित लाभ आपल्या पदरात पाडून घेण्याच्या खटपटीत असतात. खरे तर लाभासाठी पाईक झालेले पाईक हे पाइकाच्या नावाला कलंक आहेत असे तुकोबांना वाटते. उच्च नीच असे गणतीचे बरेच पाईक स्वामीच्या हाताखाली कार्यरत असतात पण त्यामध्ये शूर वीर असणारे पाईक कोणते, सामान्य पाईक कोणते हे स्वामीला बरोबर माहित असते. आणि ज्या स्वामीला हा फरक माहिती असतो त्याची निवड कधीच चुकत नाही. असा स्वामी योग्य प्रसंगी योग्य पाइकाची निवड करू शकतो आणि त्यांचा योग्य तो मानसन्मानही करतो.

शिवरायांच्या समग्र जीवनचरित्रावरून नजर फिरवली की आपल्याला शिवरायांना माणसे निवडीचे किती अचूक आकलन होते हे पाहून आपण अचंबित झाल्याशिवाय राहत नाही. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील काही प्रसंगी त्यांनी निवडलेली माणसे पाहिली, त्यांच्यावर सोपलेली जबाबदारी पाहिली आणि त्यांनी अचूकपणे यशस्वी केलेली कामगिरी पाहिली की त्या त्या प्रसंगासाठीच त्यांचा जन्म झाला होता की काय असे आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. अर्थातच शिवराय हे तुकोबांना अभिप्रेत असणारे स्वामी आहेत यात वाद नाही.

एकाच स्वामीचे पाईक सकळ । जैसें तैसें बळ मोल तया ॥ ४ ॥ 
स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळी जवळी दुरी ॥ २ ॥ 
हीन कमाईचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥ ३ ॥ 
पाईकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढ्या वाव ॥ ४ ॥ 
तुका म्हणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६४, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३७२)

स्वामीच्या हाताखाली बरेच पाईक असतात. परंतु जसे ज्याचे बळ असते, जसे त्याचे कर्तृत्व असते त्या पद्धतीनेच स्वामी त्या सर्वांचे मोल करत असतो. त्यांची योग्यता पाहून कुणाला स्वामी उच्च पद देतो तर कुणाला सामान्य पदावर ठेवतो. कुणाला जवळ करतो तर कुणाला दूर लोटतो. अर्थात स्वामी हा भेद का करतो? तर जे कर्तृत्वहीन लोक आहेत त्यांना त्यांच्या योग्यतेचेच पद मिळणार आणि कर्तृत्व गाजवणाऱ्या, उच्च गुणवत्ता असणाऱ्याला त्याच्या गुणवत्तेप्रमाणेच उच्च असे पद मिळणार. येथे तुकोबांच्या ‘अधिकार तैसा । करू उपदेश ॥’ या वचनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पोटासाठी पाईकी करणाऱ्याला केवळ पोटापुरतेच पद मिळते. अशा पाईकांना जास्त विश्वासाची कामगिरी सोपवता येत नाही. त्यांना जबाबदारीची कामे देता येत नाहीत. कारण जर एखाद्याने जास्त मोबदला दिला तर असे पोटार्थी पाईक ऐन वेळी बदलू शकतात. म्हणून अशा पाईकांना त्यांच्या योग्यतेची कामगिरी दिली जाते. पाईक असणे म्हणजेच आपापल्या योग्यतेची पदे मिळविण्याची संधी प्राप्त होणे होय. म्हणून चांगल्या पाईकाला वरची तर दुर्बल पाईकाला खालची जागा प्राप्त होते. तुकोबा म्हणतात, अहो मृत्यु कोणाला चुकलाय? जन्माला आला तो आज ना उद्या मरणारच ना? पण जो मरणाला न घाबरता पाईकी स्वीकारतो त्याचेच जगात मोल होते, त्याचीच जगात वाहवा होते आणि जे मरणाला घाबरतात त्यांची अवकळा होते, फजिती होते. तुकोबांनी एके ठिकाणी सांगितलेलेच आहे ‘तुका म्हणे रणी । जीव देता लाभ दुणी ॥’ रणांगणात लढत लढत जे मरतात त्यांची कीर्ती होते, त्यांना दुहेरी लाभ मिळतो. जे मरणाला घाबरून रणांगणाला पाठ दाखवतात त्यांच्या अवकळेला मात्र तोड नसते.

प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाठीं एक जैसें तैसें ॥ १ ॥ 
आगळे पाऊल आणिकासी तारी । पळतीं माघारीं तोडिजेती ॥ २ ॥ 
पाठीवरी घाय म्हणती फट मर । निधडा अंगें शूर मान पावे ॥ ३ ॥ 
घेईल दरवडा देहा तो पाईक । मारी सकळिक सर्व हरी ॥ ४ ॥ 
तुका म्हणे नव्हे बोलाचें कारण । कमाईचा पण सिद्धी पावे ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६५, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३७३)

प्रजेमधून पाईकी करणारी बरीच मंडळी ही केवळ पोटासाठी हा पेशा स्वीकारतात. असे लोक कधीच उच्च पद बळकाऊ शकत नाहीत. खरा पाईक हा आपल्या शौर्याने बढती मिळवून नाईक म्हणजे नेता होतो. युद्धप्रसंगी एखा‌द्या पाइकाचे आगळे पाऊल पडले आणि तो रणांगण सोडून पळायला लागला तर खरा पाईक हा अशा मरणाला घाबरणाऱ्या गांढ्या व्यक्तीचे पाय तोडून टाकतो. अशा पळकाढू गांढ्या पाईकामुळे इतर पाईकांचे सुद्धा मनोधैर्य खच्ची होऊ शकते. म्हणून अशांचे पाय तोडून त्यांना माघार घेणे अशक्य करणेच योग्य असते. जो पाईक पाठ दाखवून पळतो आणि शत्रूचे वार आपल्या छाताडावर न घेता तो पाठमोऱ्या पाठीवर झेलतो तो पाईक भित्रा असतो. त्याची जगात छी थू होते. त्याच्या अवकळेला मर्यादा नसते. पण जो पाईक स्वतः सुरक्षित राहून शत्रूचे सर्वस्व हरण करतो, शत्रूचा समूळ नायनाट करतो त्याचा मात्र अंगाने खरा शूर वीर असल्याचा सर्वत्र बोलबाला होतो. पाईकी म्हणजे केवळ ‘बोलाचा भात अन बोलाचिच कढी’ नव्हे, तर आपल्या कृतीतून त्याला त्याच्या पाईकीचा पण सिद्धीस न्यावा लागतो. अन्यथा ‘बोल बोलता वाटे सोपे । करणी करिता टीर कापे ॥’ अशी त्याची अवस्था होऊन जाते.

कोंढाणा किल्ला घेण्याप्रसंगी सूर्याजी मालुसरे यांनी परतीचे दोर कसे कापून टाकले होते याची येथे आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोंढाण्याच्या पश्चिमेला असणाऱ्या कड्यावर पहारा नसल्यामुळे तानाजींनी निवडक तीनशे मावळ्यांसह गड चढून जाण्याचा आणि गडावर पोचून दरवाजे उघडण्याचा निर्धार केला. दुसऱ्या बाजूने तानाजी मालुसरे यांचे भाऊ सूर्याजी पाचशे मावळ्यांसह गडाच्या दरवाज्या जवळ जाऊन गडाचे दार उघडण्याची वाट पाहत थांबले. तानाजी मालुसरे आणि त्यांचे सोबती एका दोराच्या साहाय्याने कोंढाणा गड चढण्यात यशस्वी झाले. गडाचे दरवाजेही उघडण्यात आले. पण उदयभानूला तानाजींच्या आगमनाची खबर लागली आणि युद्धाला सुरुवात झाली. मावळे त्वेषाने लढत होते. उदयभानूने थेट तानाजींशीच लढायला सुरुवात केली. कुणीही माघार घेईना. कारण दोघेही शूर होते. परंतु अचानक तानाजींची ढाल तुटली. तानाजींनी न डगमगता आपला शेला हाताला गुंडाळला आणि शेल्याची ढाल करून ते उदयभानाशी लढू लागले. या लढाईत तानाजींना प्रचंड जखमा झाल्या होत्या. शेवटी तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. सिंहासारखा लढणारा तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मावळ्यांचा धीर खचला आणि काही मावळ्यांचे आगळे पाऊल पडून ते पळायला लागले. इतक्यात तानाजीचे बंधू सूर्याजी आपल्या मावळ्यांसह दरवाज्यातून आत आले. आपला भाऊ युद्धात कामी आलेला असून मावळे मात्र रणांगणातून पळ काढत आहेत हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा सूर्याजी मालुसरे या हतवीर्य मावळ्यांना सामोरे गेले आणि त्यांनी सांगितले की मी परतून जाण्याचे दोर केव्हाच कापून टाकलेले आहेत. एक तर गडावरून उड्या टाकून मरा किंवा शत्रूशी लढत लढत मरा. सूर्याजींच्या या आवेशपूर्ण बोलण्याने पळणारे सैनिक मागे फिरले आणि ते शत्रूवर सर्व ताकतीनिशी तुटून पडले. शेवटी कोंढाणा किल्ला हा स्वराज्यात सामील झाला.

येथे सूर्याजींनी पळणाऱ्या सैनिकांचे प्रत्यक्ष पाय जरी कापून टाकले नसले तरी त्यांनी पळणाऱ्या सैनिकांचे गडावरून सुरक्षित उतरण्याचे सर्व मार्गच बंद करून टाकले. त्यांच्या समोर गडावरून उड्या मारून मरण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच सुर्याजींनी शिल्लक ठेवला नाही. तेव्हा या सैन्यासमोर शत्रूशी लढण्याशिवाय पर्याय राहिला नाही. स्वतः सुरक्षित राहून शत्रूचे सर्वस्व हरण करत, शत्रूचा समूळ नायनाट करत जिवंत राहणे एवढेच त्यांच्या हाती राहिले आणि पळणाऱ्या मावळ्यांनी हा पर्याय निवडत कोंढाणा किल्ला जिंकून दिला. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे लग्न होते. पण ते बाजूला सारून ते कोंढाण्याच्या मोहिमेवर गेले आणि शिवरायांना कोंढाणा जिंकून दिला. याला जातीचा पाईक म्हणतात.

जातीचा पाईक ओळखे पाईका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥ १ ॥ 
धरितील पोटासाठी हतियारें । कळती ती खरें वेठीचींसीं ॥ २ ॥
जातीचें तें असें खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥ ३ ॥ 
तुका म्हणे नमूं देव म्हूण जना । झालियांच्या खुणा जाणतसों ॥ ४ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६६, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३७४)

राजाच्या हाताखाली काम करत असताना राजाला जशी योग्य पाईकांची कदर असते तशीच खऱ्या पाईकाला सुद्धा आपल्या सारख्याच गुणवान आणि शौर्यवान पाईकांची कदर असते. तो अशा पाईकाला बरोबर ओळखतो. त्याचा योग्य असा मान सन्मानही ठेवतो. कारण त्याला त्याची पाईक म्हणून असलेली गुणवत्ता माहित असते. पोटासाठी हथियार धरणारे मतलबी आणि स्वार्थी लोकही खऱ्या पाईकाला तेव्हाच लक्षात येतात. पोटासाठी हातात शस्त्रे घेणारे पाईक जातिवंत शूराला परिचयाचे असतात. जातिवंत शूराला खऱ्या पाइकाचे घाव आणि डाव माहित असतात. म्हणून त्यांच्यापुढे खरे शूर तेवढेच टिकतात आणि बाकीच्यांचा टिकाव लागत नाही. जातीच्या पाईकाच्या खऱ्या खाणाखुणा पारखी नजर असणाऱ्या पाईकापासून लपत नाहीत. तुकोबा म्हणतात की आम्ही सर्व लोकांनाच देव मानून नमन करतो पण त्यांच्यातही खरे पाईक कोण आहेत हे आम्ही बरोबर जाणतो. अर्थात अशा पाईकांचा सुद्धा आम्ही आदरच करतो. 

 

समारोप 

तुकोबा आणि शिवाजी महाराज हे नुसते समकालीनच नव्हते तर त्यांचे कार्य हे एकमेकांना पूरक होते. तुकोबासुद्धा एका अर्थाने योद्धेच होते फरक एवढाच की त्यांनी शब्दांची शस्त्रे आपल्या हाती धारण केलेली होती. पण दोघांचाही उद्देश मात्र एकच होता तो म्हणजे ‘कंटकाचे निर्दाळन’ तुकोबा-शिवराय संबंध हा केवळ या दोघांपुरताच मर्यादित राहिला नाही; तर शिवरायांच्या पुढील वारसदारांनीही तुकोबांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. या दोन्ही घराण्याचे संबंध पुढे चालतच राहिले. तुकोबारायांचे अचानक हे जग सोडून जाणे शिवरायांना धक्का देणारे ठरले. याबद्दल सदानंद मोरे लिहितात, ‘देहुकरांचा एका घराण्यात असलेल्या फारकतनाम्यानुसार तुकाराम महाराज वैकुंठाला गेले हे वर्तमान ऐकून शिवाजीराजे विस्मय पावले. त्यांनी हुद्देदार जानोजी भोसले यांजकडे महाराजांच्या कुटुंबियाची विचारपूस केली व तुकोबांचे चिरंजीव महादेवबुवा यांना भेटीस घेऊन येण्याची आज्ञा केली. भेटीनंतर वर्षासन, एक खंडी धान्य व एक होनाची मोईन करून दिली. शिवाजी राजांच्या पश्चात छत्रपती संभाजी राजे यांनी हे वर्षासन पुढे चालू ठेवले.’

यावरून स्पष्ट दिसते की शिवाजी राजे यांना तुकोबांची काळजी होती. तुकोबांचे वय हे काही असे अचानक निर्याण होण्यासारखे नसल्यामुळे त्यांच्या जाण्याने शिवाजी राजे यांना आश्चर्य वाटले. तुकोबांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची वाताहत होऊ नये म्हणून त्यांनी महादेवबुवा यांना बोलावून एक खंडी धान्य व एक होणाची मोईन करून दिली. शिवाजी महाराजांनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे छत्रपती झाले. ‘आबासाहेबांचे जे संकल्पित तैसे चालवावे’ हा त्यांचा निश्चयच असल्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांनी तुकोबांच्या कुटुंबियांना सुरु केलेली मोईन पुढे तशीच चालू ठेवली. 

(लेखक हे प्रसिद्ध कीर्तनकार, वक्ते, इतिहास संशोधक व प्रकाशक आहेत.)

 

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...