पुराणांतील विविध देवता व प्रसंग यांविषयीचे अभंग
शिव वर्णन (अभंग संख्या ३)
३७५. काय धर्म नीत । तुम्हां शिकवावे हित ॥ १ ॥ अवघें रचियेलें हेळा । लीळा ब्रह्मांड सकळा ॥ २ ॥ नाम महादेव । येथे निवडला भाव ॥ ३ ॥ तुका म्हणे वेळे । माझें तुम्हां का न कळे ॥ ४ ॥
३७६. भांडावें तें गोड । पुरे सकळही कोड ॥ १ ॥ ऐसा घरिचिया मोळा । ठावा निकटां जवळां ॥ २ ॥ हांक देतां दारी । येती जवळी सामोरी ॥ ३ ॥ तुका म्हणे शिवें । मागितले हाती द्यावें ॥ ४ ॥
३७७. देवें केलें कैसें कैसें । उद्धरिले अनायासे ॥ १ ॥ ऐका नवलयाची ठेव । नेणतांही भक्तिभाव ॥ २ ॥ कैलासासी नेला । भिल्ल पानेडीं बैसला ॥ ३ ॥ पांखांच्या फडत्कारीं । उद्धरुनी नेली घारी ॥ ४ ॥ चोरें पिंडी दिली पाव । त्या पूजनें धाय देव ॥ ५ ॥ तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हा कोंवळा ॥ ६ ॥
श्रीराम वर्णन (अभंग संख्या १४)
३७८. रामा वनवास । तेणें वसे (वोस) सर्व देश ॥ १ ॥ केलें नामाचे जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ २ ॥ वनांतरी रडे । ऐसे पुराणी पवाडे ॥ ३ ॥ तुका म्हणे ऋषिनेम । ऐसा कळोनी कां भ्रम ॥ ४ ॥
३७९. राम म्हणे वाट चाली । यज्ञ पाउलापाउलीं ॥ १ ॥ धन्य धन्य तें शरीर । तीर्थव्रतांचे माहेर ॥ २ ॥ राम म्हणे करितां धंदा । सुख समाधि त्या सदा ॥ ३ ॥ राम म्हणे ग्रासोग्रासीं । तोचि जेविला उपवासी ॥ ४ ॥ राम म्हणें भोगीं त्यागीं । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥ ५ ॥ ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे तो जीवन्मुक्त ॥ ६ ॥
३८०. तारी ऐसे जड । उदकावरी तो दगड ॥ १ ॥ तो हा न करी तें काई । कां रे लीन व्हाना पायीं ॥ २ ॥ शिळा मनुष्य झाली । ज्याच्या चरणाचे चाली ॥ ३ ॥ वानरां हाती लंका । घेवविली म्हणे तुका ॥ ४ ॥
३८१. राम म्हणतां रामचि होइजे । पदी बैसोन पदवी घेइजे ॥ १ ॥ ऐसें सुख वचनी आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ २ ॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥ ३ ॥ तुका म्हणे चाखोनी सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥ ४ ॥
३८२. रामराम उत्तम अक्षरें । कंठी धरिली आपण शंकरें ॥ १ ॥ कैसी तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥ २ ॥ हाचि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भांधयोनि ॥ ३ ॥ जुनाट नागर नीच नवें । तुका म्हणे म्यां धरिलें जीवें भावें ॥ ४ ॥
३८३. राम म्हणतां तरे जाणता नेणता । हो कां याति भलता कुळहीन ॥ १ ॥ राम म्हणतां न लगे आणीक सायास । केले महादोष तेही जळती ॥ २ ॥ राम म्हणे तया नये जवळी भूत । कैंचा यमदूत म्हणतां राम ॥ ३ ॥ राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके येरझार म्हणतां राम ॥ ४ ॥ तुका म्हणे हेंचि सुखाचे साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥ ५ ॥
३८४. पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥ १ ॥ अवघे लंकेमाजी झाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥ २ ॥ अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होईं शरणागत किंवा युद्धासी सादर ॥ ३ ॥ तुका म्हणे एक्या भावें रामासी भेटी । करूनी घेई आतां या संबंधेंशी तुटी ॥ ४ ॥
३८५. समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥ १ ॥ कैसे भिडतील दोन्ही । नांव सारूनियां रणीं ॥ २ ॥ प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥ ३ ॥ तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥ ४ ॥
३८६. केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥ १ ॥ लंकाराज्य बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ २ ॥ औदार्याची सीमा । काय वर्णूं रघुरामा ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥ ४ ॥
३८७. रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥ १ ॥ राम राहिला मानसीं । ध्यानी चिंतनीं जयासी । राम होय त्यासी । संदेह नाहीं भरंवसा ॥ २ ॥ अयोध्येचे लोक । राम झाले सकळीक ॥ ३ ॥ स्मरतां जानकी । रामरूप झाले कपि ॥ ४ ॥ रावणेंशी लंका । राम आपण झाला देखा ॥ ५ ॥ ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥ ६ ॥
३८८. आनंद झाला अयोध्येसी आला रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत ॥ १ ॥ आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ॥ २ ॥ करिती अक्षयवाणे ओवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥ ३ ॥ झालें रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गाईवत्सें नरनारी बाळें ॥ ४ ॥
३८९. झालें रामराज्य काय उणे आम्हांसी । धरणी धरी पीक गाई वोळल्या म्हैसी ॥ १ ॥ राम वेळोवेळा आम्हीं गाऊं ओविये । दळितां कांडितां जेवितां गे बाइये ॥ २ ॥ स्वप्नींहि दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटले कळिकाळा ॥ ३ ॥ तुका म्हण रामें सुख दिलें आपलें । तयां गर्भवासी येणे जाणे खुंटलें ॥ ४ ॥
३९०. अहिल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥ १ ॥ रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ २ ॥ कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपे अविनाश भवानी ॥ ३ ॥ तारक मंत्र श्रवण काशी । नाम जपतां वाल्मिक ऋषि ॥ ४ ॥ नामजप बीजमंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥ ५ ॥ नामजप जीवन मुनिजना । तुकयास्वामी रघुनंदना ॥ ६ ॥
३९१. मी तों अल्प मतिहीन । काय वर्णूं तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥ १ ॥ नाम चांगलें चांगलें । माझे कंठी राहों भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केलें राक्षसां ॥ २ ॥ द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याती । भरत भेटी समयीं ॥ ३ ॥ शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ति वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंतें काशानें ॥ ४ ॥ राम जानकी जीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥ ५ ॥
सीता शोक (अभंग संख्या १)
३९२. वासुगीच्या बनीं सीता शोक करी । कांहो अंतरले रघुनाथ दुरी । येऊनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिलें अवघड लंकापुरी ॥ १ ॥ सांग वो त्रीजटे सखिये ऐसी मात । देईल कां नेदी भेटी रघुनाथ । मन उताविळ जाला दुरी पंथ । राहों न सके प्राण माझा कुडी आंत ॥ २ ॥ काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें । तीर्थ व्रत होतें कवणाचे भंगिलें । गाईवत्सा पत्नीपुरुषा विघडिलें । न कळे वो संचित चरण अंतरले ॥ ३ ॥ नाडियेलें आशा मृगकांतिसोनें । धाडिलें रघुनाथा पाठिलागें तेणें । उल्लंघिली आज्ञा माव काय मी जाणें । देखुनी सुनाट घेऊनि आलें सुनें ॥ ४ ॥ नाहीं मूळ मारग लागे आणीक सोय । एकाविण नामें रघुनाथाच्या माय । उपटी पक्षिया एक देऊनि पाय । उदकवेढ्यामध्यें तेथें चाले काय ॥ ५ ॥ जनकाची नंदिनी दुःखे ग्लांती थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी । संबोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । घेईल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥ ६ ॥
हनुमंत वर्णन (अभंग संख्या ४)
३९३. केली सीता शुद्धि । मूळ रामायणा आधीं ॥ १ ॥ ऐसा प्रतापी गहन । सकळ भक्तांचे भूषण ॥ २ ॥ जाऊनी पाताळा । केली देवीची अवकळा ॥ ३ ॥ राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥ ४ ॥ जोडूनियां कर । उभा सन्मुख समोर ॥ ५ ॥ तुका म्हणे जपें । वायुसुता जातीं पापें ॥ ६ ॥
३९४. काम बांदवडी । काळ घातला तोडरीं ॥ १ ॥ तया माझे दंडवत । कपिकुळी हनुमंत ॥ २ ॥ शरीर वज्रा ऐसे । कवळीं ब्रह्मांड जो पुच्छें ॥ ३ ॥ रामाच्या सेवका । शरण आलो म्हणे तुका ॥ ४ ॥
३९५. हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥ १ ॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ २ ॥ करोनी उड्डाण । केलें लंकेचे शोधन ॥ ३ ॥ जाळियली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥ ४ ॥
३९६. शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥ १ ॥ काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ २ ॥ शूर आणि धीर। स्वामिकाजी तूं सादर ॥ ३ ॥ तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥ ४ ॥
गजेंद्र वर्णन (अभंग संख्या २)
३९७. गजेंद्र तो हस्ती सहस्रवरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासें ॥ १ ॥ सुहृदीं सांडिलें कोणी नाहीं साहे । अंती वाट पाहे विठो तुझी ॥ २ ॥ कृपेच्या सागरा माझ्या नारायणा । तयां दोघां जणां तारियेलें ॥ ३ ॥ तुका म्हणे नेले वाहूनीं विमानीं । मीही आइकोनी विश्वासलों ॥ ४ ॥ (धृ. नाही)
३९८. गजेंद्र पशु आप्तें मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा ॥ १ ॥ त्यासाठी गरुड सांडूनि धांवसी । माया झळंबसी दीनानाथा ॥ २ ॥ धेनु वत्सावरी झेप घाली जैसी । तैसें गजेंद्रासी सोडविले ॥ ३ ॥ तुका म्हणे ब्रीद बांधला यासाठी । भक्तांसी संकटी रक्षावया ॥ ४ ॥ (धृ. नाही)
गणिका वर्णन (अभंग संख्या १)
३९९. व्यभिचारिणी गणिका असतां कुंटणी । विश्वास तिचे मनीं राघोबाचा ॥ १ ॥ ऐसीही पापिणी वाहिली विमानीं । अचळ भुवनीं ठेवियेली ॥ २ ॥ पतितपावन तिहीं लोकी ठसा । कृपाळू कोंवसा अनाथांचा ॥ ३ ॥ तुका म्हणे धरा विठोबाची सोय। आणिक उपाय नेणों किती ॥ ४ ॥ (धृ. नाही
No comments:
Post a Comment