Saturday, 3 May 2025

२५. पंढरी-महिमा

श्री तुकोबाराय यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर आणि तीर्थोत्तमी नदी चंद्रभागा हिची महती गायली, ते अभंग. 

पंढरी-महिमा (अभंग संख्या ९७)

२५५५. नको आतां पुसों कांहीं । लवलाहीं उसंतो ॥ १ ॥ जाय वेगीं पंढरपूरा । तो सायरा दीनांचा ॥ २ ॥ वचनाचा न करीं गोवा । रिघें देवा शरण ॥ ३ ॥ तुका म्हणे कृपावंता । बहु चिंता दीनाची ॥ ४ ॥

२५५६. करा करा लागपाठ । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ॥ १ ॥ दुजा ऐसा नाहीं कोणी । जाे या काढी भयांतूनि । करा म्हणऊनि । हा विचार ठायींचा ॥ २ ॥ होती गात्रे बेंबळीं । दिवस अस्तमान काळीं । हाते वाहे टाळी । जंव मोकळी आहेती ॥ ३ ॥ कां रे घेतलासी साेसे । तुज वाटताहे कैसें । तुका म्हणे ऐसें । कैं लाहासी ॥ ४ ॥ 

२५५७. जाय जाय तूं पंढरी । होय होय वारकरी ॥ १ ॥ सांडोनियां वाळवंट । काय इच्छिसी वैकुंठ ॥ २ ॥ खांद्या पताकांचे भार । तुळसीमाळा आणि अबीर ॥ ३ ॥ साधुसंतांच्या दाटणी । तुका जाय लोटांगणीं ॥ ४ ॥

२५५८. जा रे तुम्ही पंढरपूरा । तो साेयरा दीनांचा ॥ १ ॥ गुणदोष नाणी मना । करी आपणासारिखे ॥ २ ॥ उभारोनि उभा कर । भवपार उतराया ॥ ३ ॥ तुका म्हणे तांतड मोठी । झाली भेटी उदंड ॥ ४ ॥ 

२५५९. पंढरीसी जा रे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥ १ ॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तातडी उतावीळ ॥ २ ॥ मागील परिहार पुढें नाहीं शीण । झालिया दर्शन एकवेळ ॥ ३ ॥ तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्तीं निवडेना ॥ ४ ॥

२५६०. होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥ १ ॥ काय करावीं साधनें । फळ अवघेंचि येणें ॥ २ ॥ अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥ ३ ॥ तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥ ४ ॥

२५६१. पुण्य उभें राहों आतां । संतांचें याकारणें ॥ १ ॥ पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥ २ ॥ संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥ ३ ॥ तुका म्हणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥ ४ ॥

२५६२. बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तो साेइरा करीं आतां ॥ १ ॥ करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं आतां ॥ २ ॥ सांडी आतां कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥ ३ ॥ पंढरीसी जावें सर्व सुख घ्यावें । रूप तें पहावें विटेवरी ॥ ४ ॥ विटेवरी नीट आनंदाचा कंद । तुका नाचे छंदें नामघोषें ॥ ५ ॥

२५६३. नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होईल त्या साहे पांडुरंग ॥ १ ॥ पंढरीसी जावें उद्वेग मानसी । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ २ ॥नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाको नको ॥ ३ ॥ तुका म्हणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणे याजसाठीं ॥ ४ ॥

२५६४. जाती पंढरीस । म्हणे जाईन तयांस ॥ ६ ॥ तया आहे संवसार । ऐसें बोले तो महार ॥ २ ॥ असो नसाे भाव । जो हा देखे पंढरीराव ॥ ३ ॥ चंद्रभागे न्हाती । तुका म्हणे भलते याती ॥ ४ ॥

२५६५. चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥ १ ॥ डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ २ ॥ संता महंता होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटी ॥ ३ ॥ ते तीर्थाचें माहेर । सर्व सुखाच भांडार ॥ ४ ॥ जन्म नाहीं रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥ ५ ॥

२५६६. आमुची मिरासी पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥ १ ॥ पांडुरंग आमुचा पिता । रखुमाई आमुची माता ॥ २ ॥ भाऊ पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥ ३ ॥ तुका जुनाट मिराशी । ठाव दिला पायांपाशीं ॥ ४ ॥

२५६७. आता जावे पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥ १ ॥ चंद्रभागेचिया तिरी । आम्ही नाचों पंढरपुरी ॥ २ ॥ जेथे संतांची दाटणी । त्यांचे घेऊ पायवणी ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही बळी । जीव दिला पायां तळी ॥ ४ ॥

२५६८. पंढरीची वारी आहे माझे घरीं। आणीक न करीं तीर्थव्रत ॥ १ ॥ व्रत एकादशी करीन उपवाशी । गाईन अहर्निशी मुखीं नाम ॥ २ ॥ नाम विठोबाचें घेईन मी वाचें । बीज कल्पांतीचे तुका म्हणे ॥ ३ ॥

२५६९. पावलों पंढरी वैकुंठभुवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥ धृ. ॥ पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरे शंखभेरी ॥ २ ॥ पावलों पंढरी क्षेम आळिंगनीं । संत या सज्जनीं निवविलों ॥ ३ ॥ पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥ ४ ॥ पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥ ५ ॥ पावलों पंढरी आपुलें माहेर । नाहीं संवसार तुका म्हणे ॥ ६ ॥

२०७०. आम्ही ज्याचे दांस । त्याचा पंढरीये वास ॥ १ ॥ तो हा देवाचाही देव । काय कळिकाळाचा भेव ॥ २ ॥ वेद जया गाती । श्रुति म्हणती नेतिनेति ॥ ३ ॥ तुका म्हणे निज । रुपडें हें तत्त्वबीज ॥ ४ ॥

२५७१. आम्हां सुकाळ सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामें वैष्णव ॥ १ ॥ घ्यारे आपुलाल्या परी । नका ठेऊं कांहीं उरी । ओसरतां भरी । तोंडवरी अंबर ॥ २ ॥ बाहे बंदर द्वारका । खेप आली पुंडलिका । उभेचि विकिलें एका । सनकादिकां सांपडलें॥ ३ ॥ धन्य धन्य हे भूमंडळीं । प्रगटली नामावळी । घेंती जीं दुबळीं । तीं आगळीं सदैव ॥ ४ ॥ माप आपुलेनि हातें । कोणी नाहीं निवारितें । पैस करूनि चित्तें । घ्यावे हिते आपुलिया ॥ ५ ॥ नाहीं वांटितां सरलें । आहे तैसेंचि भरलें । तुका म्हणे गेलें । वांयांविण न घेतां ॥ ६ ॥

२५७२. सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगासारिखें तें ॥ १ ॥ नलगे हिंडणे मु़डंणें तें कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी ॥ २ ॥ चंद्रभागे स्नान विध तो हरिकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे काला वैकुंठीं दुर्लभ । विशेष हा लाभ संतसंगें ॥ ४ ॥

२५७३. पंढरीये माझें माहेर साजणी । ओविया कांडणी गाऊं गीती ॥ धृ. ॥ राही रखुमाई सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥ २ ॥ उद्धव अंक्रुर व्यास अंबऋषि । भाई नारदासी गौरवीन ॥ ३ ॥ गरुड बंधू लडिबाळ पुंडलिक । यांचें कवतुक वाटे मज ॥ ४ ॥ मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥ ५ ॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥ ६ ॥ नागो जगमित्रा नरहरी सोनारा । रोहिदास कबिरा सोईरिया ॥ ७ ॥ परिसा भागवता सुरदास सांवता । गाईन नेणतां सकळिकांसी ॥ ८ ॥ चोखामेळा संत जिवाचे सोईरे । न पडे विसर यांचा घडी ॥ ९ ॥ जीवींच्या जीवना एका जनार्दना । पाठक हा कान्हा मिराबाई ॥ १० ॥ आणिकही संत महानुभव मुनि । सकळां चरणीं जीव माझा ॥ ११ ॥ आनंदें ओविया गाईन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥ १२ ॥ तुका म्हणे माझा बळिया बापमाय । हर्षें नांदे सये घराचारी ॥ १३ ॥

२५७४. कोण येथें रिता गेला । जो जो आला या ठाया ॥ १ ॥ तातडी ते काय आतां । ज्याची चिंता तयासी ॥ २ ॥ नांवासाठीं नेघें भार । नलगे फार वित्पत्ति ॥ ३ ॥ तुका म्हणे नलगे जावें । कोठें देवें सुचेना ॥ ४ ॥

२५७५. सिंचन करितां मूळ । वृक्ष ओलावे सकळ ॥ १ ॥ नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ २ ॥ पाणचोऱ्याचें दार । वरिल दाटावें तें थोर ॥ ३ ॥ वश झाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥ ४ ॥ एक आतुडे चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥ ५ ॥ तुका म्हणे धांवा । आहे पंढरी विसावा ॥ ६ ॥

२५७६. सुख पंढरीये आलें । पुंडलिकें सांठविलें ॥ घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेऊनि खरें माप । करा एक खेप ॥ मग नलगे हिंडणें ॥ २ ॥ विषय गुंडोनी पसारा । धांव घाला पंढरपुरा ॥ ३ ॥ आयुष्य वेंच जंव आहे । तोचि धांवोनियां जाये ॥ ४ ॥ आळस न करी या लाभाचा । तुका विनवो कुणबियाचा ॥ ५ ॥

२५७७. पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥ १ ॥ नव्हती हे आहाच बोल । मोकळे फोल कवित्व ॥ २ ॥ भावें घ्या रे भावें घ्या रे । एकदां जा रे पंढरीये ॥ धृ. ॥ भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥ ४ ॥ पापपुण्या करिल झाडा । जाइल पीडा जन्माची ॥ ५ ॥ घ्यावी हातीं टाळदिंडी । गावें तोंडीं गुणवाद ॥ ६ ॥ तुका म्हणे घटापटा । नलगे वाटा शोधाव्या ॥ ७ ॥

२५७८. धरितां पंढरीची वाट । नाहीं संकट मुक्तीचें ॥ १ ॥ वंदू येती देव पदें । त्या आनंदें उत्साहें ॥ २ ॥ नृत्यछंदें उडती रज । जे सहज चालतां ॥ ३ ॥ तुका म्हणे गरुडटके । वैष्णव निके संभ्रम ॥ ४ ॥

२५७९. तिळ एक अर्ध राई । सीतबिंदु पावे काई । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां ॥ १ ॥ म्हणउनी करा लाहो । नका मागें पुढें पाहों । अवध्यामध्ये आहों । अवघे सावचित्त तों ॥ २ ॥ तीर्थें न येती तुळणी । आजि या सुखा धणी । काशी गयेहुनी । जीं आगळीं असती ॥ ३ ॥ येथें धरी लाज । वर्णा अभिमान काज । नाडला सहज । तुका म्हणे तो येथें ॥ ४ ॥

२५८०. तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥ १ ॥ लुटा लुटा संतजन । अमुप हें राशी धन ॥ २ ॥ झाला हरिनामाचा तारा । शीड लागलें फरारा ॥ ३ ॥ तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥ ४ ॥

२५८१. आषाढी निकट । आला कार्तिकीचा हाट ॥ १ ॥ पुरे दोन्हीच बाजार । नलगे आणीक व्यापार ॥ २ ॥ तेंचि घ्यावें तेंचि द्यावें । कैवल्याच्या राशी भावें ॥ ३ ॥ कांहीं कोणा नेणे । विठोबावांचुनि तुका म्हणे ॥ ४ ॥

२५८२. न सरे लुटितां मागे बहुतां जनीं । जुनाट हे खाणी उघडिली ॥ धृ ॥ सिद्ध महामुनि साधक संपन्न । तीहीं हें जतन केलें होतें ॥ २ ॥ पायाळाच्या गुणें पडिलें ठाऊकें । जगा पुंडलिकें दाखविलें ॥ ३ ॥ तुका म्हणे तेथें होतो मी दुबळा । आलें या कपाळा थोडें बहु ॥ ४ ॥

२५८३. जया दोषां परिहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । ते हरती अपार । पंढरपूर देखिलिया ॥ १ ॥ धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मतीर्थीं विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनाद ॥ २ ॥ सकळ तीर्थांचे माहेर । भूवैकुंठ निर्विकार । होतो नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥ ३ ॥ नाहीं उपमा द्यावया । सम तुल्य आणिका ठाया । धन्य भाग्य जया । जे पंढरपूर देखती ॥ ४ ॥ उपजोनी संसारीं । एक वेळ पाहें पां पंढरी । महा दोषां कैंची उरी । देवभक्त देखिलिया ॥ ५ ॥ ऐसी विष्णुची नगरी । चतुर्भुज नर नारी । सुदर्शन घरटी करी । रीघ न पुरे कळिकाळा ॥ ६ ॥ तें सुख वर्णावया गति । एवढी कैंची मज मति । जे पंढरपुरा जाती । ते पावती वैकुंठ ॥ ७ ॥ तुका म्हणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा । तो अधम जन्मांतरींचा । जया पंढरी नावडे ॥ ८ ॥

२५८४. आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पुंडलीक ॥ १ ॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरविती ॥ २ ॥ तुका म्हणे जीवा थोर झालें सुख । नाठवे हे भूक तहान कांहीं ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२५८५. पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥ १ ॥ पुंडलिका दिला वर । करुणाकरें विठ्ठलें ॥ २ ॥ मूढ पापी जैसे तैसे । उत्तरी कासे लावूनि ॥ ३ ॥ तुका म्हणे खरे जालें । एका बोलें संतांच्या ॥ ४ ॥

२५८६. आलें भरा केणें । येरझार चुके जेणें ॥ १ ॥ उभें केलें विटेवरी । पेठ इनाम पंढरी ॥ २ ॥ वाहाती मारग । अवघें मोहारलें जग ॥ ३ ॥ तुका म्हणे माप । खरे आणा माझे बाप ॥ ४ ॥

२५८७. उठाउठी अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण ॥ १ ॥ तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥ २ ॥ नेत्रीं अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥ ३ ॥ तुका म्हणे काला । कोठे अभेद देखिला ॥ ४ ॥

२५८८. अवघें जेणें पाप नासे । तें हें असे पंढरीसी ॥ १ ॥ गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥ २ ॥ अवघी सुखाचीच राशी । पुंडलिकाशी वोळली ॥ ३ ॥ तुका म्हणे जवळी आलें । उभे ठेले समचरणीं ॥ ४ ॥

२५८९. अवघींच तीर्थें घडलीं एक वेळां । चंद्रभागा डोळा देखिलिया ॥ १ ॥ अवघींच पापें गेली दिगांतरीं । वैकुंठ पंढरी देखिलिया ॥ २ ॥ अवघिया संता एक वेळां भेटी । पुंडलिक दृष्टि देखिलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे जन्मा आल्याचें सार्थक । विठ्ठलची एक देखिलिया ॥ ४ ॥

२५९०. उदार चक्रवर्ती । वैकुंठीचा भूपति । पुंडलिकाचिया प्रीति । विटे उभा राहिला ॥ १ ॥ सर्वसिद्धींचा दातार । सवें आणिला परिवार । भक्ता अभयकर । घ्या घ्या ऐसें म्हणतसे ॥ २ ॥ जेणें हें विश्व निर्मिलें । महर्षी देवां संस्थापिलें । एकवीस स्वर्गांतें धरिलें । सत्तामात्रें आपुलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे कृपावंत । इच्छिलें पुरवी मनोरथ । रिद्धिसिद्धि मोक्ष देत । शेखीं संग आपुला ॥ ४ ॥

२०९१. भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां । कोण्या काळें सुखा । ऐशा कोण पावत ॥ १ ॥ नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥ २ ॥ अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥ ३ ॥ तुका म्हणे धन्य झालें । भूमी वैकुंठ आणिलें ॥ ४ ॥

२५९२. धन्य पुंडलिका बहु बरे केले । निधान आणिलें पंढरीये ॥ १ ॥ न करीं आळस आलिया संसारीं । पाहें पा पंढरी भूवैकुंठ ॥ २ ॥ न पविजे केल्या तपांचिया राशी । तें जनलोकांसी दाखविलें ॥ ३ ॥ सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनीं हा भाव निवडिला ॥ ४ ॥ विष्णुपद गया रामधाम काशी । अवघी पायांपाशीं विठोबाच्या ॥ ५ ॥ तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ हा नास अहंकाराचा ॥ ६ ॥

२५९३. कां रे प्रेमें मातलासी । उभें केलें विठ्ठलासी ॥ १ ॥ ऐसा कैसा रे तूं धीट । मागें भिरकाविली वीट ॥ २ ॥ युगें झालीं अठ्ठावीस । अजुनी न म्हणसी बैस ॥ ३ ॥ भाव देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥ ४ ॥ तुका म्हणे पुंडलिका । तूंचि भक्त बळिया निका ॥ ५ ॥

२५९४. पुंडलिक भक्तराज । तेणें साधियलें काज । वैकुंठीचे निज । परब्रह्म आणिलें ॥ १ ॥ पांडुरंग बाळमूर्ति । गाईगोपाळ सांगाती । येऊनिया प्रीति । उभें समचि राहिलें ॥ २ ॥ एका आगळें अक्षरें । भूवैकुंठचि दुसरें । म्हणविती येरें । परी तीं ऐसीं नव्हेती ॥ ३ ॥ पाप पंचक्रोशीमधीं । येऊं न शकेचि कधीं । कैंची तेथे विधी - । निषेधाची वसति ॥ ४ ॥ पुराणें बोलती ऐसें । चतुर्भुज तीं माणसें । सुदर्शनावरी वसे । न बुडे हे कल्पांतीं ॥ ५ ॥ अनुपम्य इची थोरी । महाक्षेत्र महीवरी । धन्य धन्य वारकरी । तुका म्हणे येथींचे ॥ ६ ॥

२५९५. वैकुंठा जावया तपाचे सायास । लागे जीवा नाश करणें बहु ॥ १ ॥ तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथ्वीचा ॥ २ ॥ तुका म्हणे केली सोपी पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥ ३ ॥

२५९६. वैकुंठीचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलिक ॥ धृ. ॥ धारिष्ट धैर्याचा वरिष्ठ भक्तांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥ २ ॥ पितृसेवापुण्यें लाधला निधान । विठु सनातन अंगसंगें ॥ ३ ॥ अंगसंगे रंग क्रीडा करी जाणा । ज्या घरीं पाहुणा वैकुंठींचा ॥ ४ ॥ धन्य त्याची शक्ति भक्तीची हे ख्याती । तुका म्हणे मुक्ति पायीं लोळें ॥ ५ ॥

२५९७. पंढरीचें भूत मोठें । आल्या गेल्या झडपी वाटे ॥ १ ॥ बहु खेचरीचें रान । जातां वेडें होय मन ॥ २ ॥ तेथें जाऊं नका कोणी । गेले नाहीं आले परतोनि ॥ ३ ॥ तुका पंढरीसी गेला । पुन्हां जन्मा नाहीं आला ॥ ४ ॥

२५९८. मैंद आला पंढरीस । हातीं घेऊनि प्रेमपाश ॥ १ ॥ पुढे नाडियलें जग । नेतो लागों नेदीं माग ॥ २ ॥ उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधिताहे ॥ ३ ॥ वैकुंठाहुनि पेणें । केलें पंढरीकारणें ॥ ४ ॥ पुंडलिकें थारा । देउनि आणिलें या चोरा ॥ ५ ॥ तुका म्हणे चला । तुम्ही आम्ही धरूं त्याला ॥ ६ ॥

२५९९. पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥ १ ॥ ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभीं भेंटें ॥ २ ॥ आहेति सकळ । तीर्थें काळें देती फळ ॥ ३ ॥ तुका म्हणे पेठ । भूमीवरी हें वैकुंठ ॥ ४ ॥

२६००. पंढरी पंढरी । म्हणतां पापाची बोहरी ॥ १ ॥ धन्य धन्य जगीं ठाव । होतों नामाचा उत्साव ॥ २ ॥ रिद्धिसिद्धि लोटांगणीं । प्रेमसुखाचिया खाणी ॥ ३ ॥ अधिक अक्षरानें एका । भूवैकुंठ म्हणे तुका ॥ ४ ॥

२६०१. पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥ १ ॥ अवघा होय पांडुरंग । राहें धरूनियां अंग ॥ २ ॥ न लगे धन मान । देह भावें उदासीन ॥ ३ ॥ तुका म्हणे मळ । नाशी तात्काळ तें स्थळ ॥ ४ ॥

२६०२. पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥ १ ॥ पुंडलिकें हाट भरियेली पेठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ २ ॥ उदिमासी तुटी नाहीं कोणा हानी । घेऊनियां धणी लाभ घेती ॥ ३ ॥ पुरलें देशासी भरले शीगेसी । अवघीं पंचक्रोशी दुमदुमीत ॥ ४ ॥ तुका म्हणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥ ५ ॥

२६०३. पंढरीचा वास धन्य तेचि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देह ॥ १ ॥ मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरीं दयारूप ॥ २ ॥ शांति क्षमा अंगीं विरक्ति सकळ । नैराश्य निर्मळ नारी नर ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं वर्णअभिमान । अवघेंचि जीवन्मुक्त लोक ॥ ४ ॥

२६०४. धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥ १ ॥ धन्य तोही लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥ २ ॥ धन्य तेही भूमी धन्य तरुवर । धन्य तें सरोवर तीर्थरूप ॥ ३ ॥ धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भुवन गर्जतसे ॥ ४ ॥ धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरलासे ॥ ५ ॥ तुका म्हणे धन्य संसारा तीं आली । हरिरंगी रंगलीं सर्वभावें ॥ ६ ॥

२६०५. धन्य तोचि ग्राम जेथें हरीचे दास । धन्य तोचि वंश भक्तिभाग्यें ॥ १ ॥ ब्रह्मज्ञान तेथें असे घरोघरीं । धन्य नरनारी चतुर्भुज ॥ २ ॥ नाहीं पापा रिघ काळाचे खंडण । हरिनामकीर्तन घरोघरीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तिहीं तारिलें सकळां । आपल्या कोटिकुळासहित पैं ॥ ४ ॥

२६०६. धन्य धन्य ज्यांस पंढरीचा वास । धन्य ते जन्मास प्राणी आले ॥ धृ. ॥ चहुं खाणींमध्ये होत कोणी एक । त्रिगुण कीटक पक्षिराज ॥ २ ॥ उत्तम चांडाळ नर नारी बाळ । अवघेचि सकळ चतुर्भुज ॥ ३ ॥ अवघा विठ्ठल तेथें दुजें नाहीं । भरला अंतर्बाही सदोदीत ॥ ४ ॥ तुका म्हणे तेथें होऊनि राहेन । सांडोवा पाषाण पंढरीचा ॥ ५ ॥

२६०७. सुरवर येती तीर्थें नित्यकाळ । पेठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥ १ ॥ साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ २ ॥ पंचक्रोशीमाजी रीघ नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥ ३ ॥ निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं विठुवानंदु ॥ ४ ॥ तुका म्हणे ज्यापें नाहीं पुण्यलेश । जारे पंढरीस घेई कोटी ॥ ५ ॥

२६०८. वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥ १ ॥ पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेकां ॥ २ ॥ तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम नये ॥ ३ ॥

२६०९. जंववरी नाहीं देखिली पंढरी । वर्णिसील थोरी वैकुंठींची ॥ १ ॥ मोक्षसिद्धि तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीनरूप ॥ २ ॥ वृंदावन सडे चौक रंगमाळा । अभिनव सोहळा घरोघरीं ॥ ३ ॥ नामघोष कथापुराणकीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंगा ॥ ४ ॥ सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । विठु तो केवळ नांदतसे ॥ ५ ॥ तुका म्हणे जें न साधे सायासें । प्रत्यक्ष तें दिसे विटेवरी ॥ ६ ॥

२६१०. तीर्थें केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥ १ ॥ जळो त्याचें ज्यालेपण । न देखेचि समचरण ॥ २ ॥ योग याग अनंत केले । नाहीं समचरण देखिले ॥ ३ ॥ तुका म्हणे विठ्ठलपायीं । अनंत तीर्थें घडलीं पाहीं ॥ ४ ॥

२६११. जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मनी तो ॥ १ ॥ सुलभ माय पंढरीराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ॥ २ ॥ जन्मांतरींच्या पुण्यरासी । वारी त्यासी पंढरीची ॥ ३ ॥ बाहेर येतां प्राण फुटे । रडें दाटे गहिंवरे ॥ ४ ॥ दधिमंगळ भोजन सारा । म्हणती करा मुरडींव ॥ ५ ॥ मागुता हा पाहो ठाव । पंढरीराव दर्शनें ॥ ६ ॥ तुका म्हणे भूवैकुंठ । वाळुवंट भीवरा ॥ ७ ॥ 

२६१२. आणीक ऐसें कोठें सांगा । पांडुरंगासारिखें ॥ १ ॥ दैवत ये भूमंडळीं । उद्धार कलीं पाववितें ॥ २ ॥ कोठें कांहीं कोठें कांहीं । शोध ठायीं स्थळासी ॥ धृ. ॥ अन्यत्रींचें तीर्थीं नासे । तीर्थी वसे वज्रलेप ॥ ४ ॥ पांडुरंगींचें पांडुरंगी । पाप अंगीं राहेना ॥ ५ ॥ ऐसें हरें गिरिजेप्रति । गुह्य स्थिति सांगितली ॥ ६ ॥ तुका म्हणे तीर्थ क्षेत्र । सर्वत्र हें दैवत ॥ ७ ॥

२६१३. करोत तपादि साधनें । कोणी साधोत गोरांजनें ॥ १ ॥ आम्ही न वजों तया वाटा । नाचूं पंढरीचोहटां ॥ २ ॥ पावोत आत्मस्थिति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥ ३ ॥ तुका म्हणे छंद । आम्हा हरीच्या दासां निंद्य ॥ ४ ॥

२६१४. कासया करावे तपाचे डोंगर । आणिक अपार दुःखराशी ॥ १ ॥ कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढें लाभ ॥ २ ॥ कासया पुजावीं अनेक दैवतें । पोटभरे तेथें लाभ नाहीं ॥ ३ ॥ कासया करावे मुक्तीचे सायास । मिळे पंढरीस फुकासाठीं ॥ ४ ॥ तुका म्हणे करीं कीर्तन पसारा । लाभ येईल घरा पाहिजे तो ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२६१५. मानी भक्तांचे उपकार । ऋणीया म्हणवी निरंतर । केला निर्गुणीं आकार । कीर्ति मुखें वर्णितां ॥ १ ॥ म्हणोनि जया जे वासना । ते पुरवितो पंढरीराणा । झाला भक्तांचा आंदणा । ते उपकार फेडावया ॥ २ ॥ अंबऋषीकारणें । जन्म घेतले नारायणें । एवढें भक्तीचें लाहाणें । दास्य करी दासाचें ॥ ३ ॥ म्हणियें करिता शंका न धरी । रक्षपाळ बळीच्या द्वारीं । भक्तीचा आभारी । रीघ न पुरे जावया ॥ ४ ॥ अर्जुनाचे रथवारु । ते वागवी सर्वेश्वरु । एवढे भक्तीचे उपकारु । मागें मागें हिंडतसे ॥ ५ ॥ पुंडलिकाचे द्वारीं । सम पाउलें विटेवरी । न वजे कट करीं । धरूनि तेथें राहिला ॥ ६ ॥ भावभक्तीचा अंकित । नाम साजे दीनानाथ । म्हणोनि राहिला निवांत । तुका चरण धरोनि ॥ ७ ॥

२६१६. पंढरीसी जावें ऐसें माझे मनीं । विठाई जननी भेटे केव्हां ॥ १ ॥ नलगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥ २ ॥ तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥ ३ ॥

२६१७. पंढरीस जाते निरोप आईका । वैकुंठनायका क्षेम सांगा ॥ १ ॥ अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवें नको दीन गांजों देऊं ॥ २ ॥ ग्रासिलों भुजंगें सर्पें महाकाळें । न दिसे हें जाळें उगवतां ॥ ३ ॥ कामक्रोधसुनीं श्वापदें बहुतीं । वेढलों आवर्ती मायेचिये ॥ ४ ॥ मृगजळनदी बुडवी ना तारी । आणूनियां वरी तळा नेते ॥ ५ ॥ तुका म्हणे तुवां धरिलें उदास । तरी पाहों वास कवणाची ॥ ६ ॥

२६१८. संपदा सोहळा नावडे मनाला । करीतें टकळा पंढरीचा ॥ १ ॥ जावें पंढरीसी आवडी मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥ २ ॥ तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणि वाट पाहे ॥ ३ ॥

२६१९. साधन संपत्ति हेंचि माझें धन । सकळ चरण विठोबाचें ॥ १ ॥ शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळीच नीट सुखरूप ॥ २ ॥ वैष्णवांचा संग रामनाम गाणें । मंडित भूषणें अळंकार ॥ ३ ॥ भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडीच चाली जावें पायीं ॥ ४ ॥ मायबाप दोघें पाहातील वाट । ठेवुनियां कटीं कर उभीं ॥ ५ ॥ तुका म्हणे केव्हां देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥ ६ ॥

२६२०. सुखें घेऊं जन्मांतरें । एक बरें इहलोकीं ॥ १ ॥ पंढरीचे वारकरी । होतां थोरी जोडीं हे ॥ २ ॥ हें तों आलें अनुभवा । पाहावें जीवावरूनि ॥ ३ ॥ तुका म्हणे केला त्याग । सर्वसंग म्हणऊनि ॥ ४ ॥

२६२१. संतोषे माउली आरुषा वचनीं । वोरसोनि स्तनीं लावी बाळा ॥ १ ॥ तैसें प्रेमळाचें अवघेंचि गोड । पुरवितो कोड पांडुरंग ॥ २ ॥ सेवा करी साहे निष्ठुर उत्तरें । त्याचे वाहे बरें तेंची मनीं ॥ ३ ॥ तुका म्हणे इच्छावशें खेळे खेळ । चिंता ते सकळ कांहीं नेणें ॥ ४ ॥

२६२२. सांवळें रूपडें चोरटें चित्ताचें । उभें पंढरीचे विटेवरी ॥ १ ॥ डोळियांची धणी पाहतां न पुरे । तयालागीं झुरे मन माझें ॥ २ ॥ प्राण रिघों पाहे कुडीये सांडुनि । श्रीमुख नयनीं न देखतां ॥ ३ ॥ चित्त मोहियेलें नंदाच्या नंदनें । तुका म्हणे येणें गरुडध्वजें ॥ ४ ॥

२६२३. इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥ १ ॥ अवघेचि येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥ २ ॥ अडचणी केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे जोडी झाली । ते आपुली आपणा ॥ ४ ॥

२६२४. पृथक मी सांगों किती । धर्मनीति सकळां ॥ १ ॥ अवघियांचा एक ठाव । शुद्ध भाव विठ्ठलीं ॥ २ ॥ क्षराअक्षराचा भाग । करा लाग पंढरीये ॥ ३ ॥ तुका म्हणे आगमींचें । मथिलें साचें नवनीत ॥ ४ ॥

२६२५. द्वारकेचे केणें आलें याचि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥ १ ॥ गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ २ ॥ वैष्णव मापारी नाहीं जाली सळें । पुढेंहि न कळे पार त्याचा ॥ ३ ॥ लाभ झाला त्यांनीं धरिला तो विचार । आहिक्य परत्र सांठविलें ॥ ४ ॥ तुका म्हणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं संतांचिया ॥ ५ ॥

२६२६. दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साठीं । भक्तिकाजें विठ्ठला ॥ १ ॥ भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आम्हालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ २ ॥ होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं । म्हणोनियां घरीं । गौळियाचे अवतार ॥ ३ ॥ केला पुंडलिकें गोवा । तुज पंढरीसि देवा । तुका म्हणे भावा- । साठीं हातीं सांपडसी ॥ ४ ॥

२६२७. दुःखाचिये साटीं तेथें मिळें सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥ १ ॥ उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥ २ ॥ जाणतियाहूनि नेणत्याची गोडी । आलिंगी आवडी करूनियां ॥ ३ ॥ शीण घेऊनियां प्रेम देतो साटी । न विचारी तुटी लाभ कांहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे असों अनाथ दुबळीं । आम्हांसी तो पाळी पांडुरंग ॥ ५ ॥

२६२८. धरियेली सोंगें । येणें अवघीं पांडुरंगें ॥ १ ॥ तें हें ब्रह्म विटेवरी । उभें चंद्रभागेतिरीं ॥ २ ॥ अंतर्व्यापी बाही । धांडोळितां कोठें नाहीं ॥ ३ ॥ योगयागतपें । ज्याकारणें दानजपें ॥ ४ ॥ दिलें नेदीजती । भोग सकळ ज्या होती ॥ ५ ॥ अवघी लीला पाहे । तुका म्हणे दासां साहे ॥ ६ ॥

२६२९. जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥ १ ॥ हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें । भवसिंधु सुखें । उतरी कासे लावूनि ॥ २ ॥ थोर भक्ताची आस । पाहे भोंवताली वास ॥ ३ ॥ तुका म्हणे कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥ ४ ॥

२६३०. तिन्ही लोक ऋणें बांधिले जयानें । सर्वसिद्धि केणें तया घरीं ॥ १ ॥ पंढरी चोहोटां घातला दुकान । मांडियेलें वाण आवडीचे ॥ २ ॥ आषाढी कार्तिकी भरियेले हाट । इनाम हे पेंठ घेतां देतां ॥ ३ ॥ मुक्ति तेथें कोणी हातीं नेघें फुका । लुटितील सुखा प्रेमाचिया ॥ ४ ॥ तुका म्हणे संतसज्जन भाग्याचे । अनंता जन्मींचे सांटेकरी ॥ ५ ॥

२६३१. तीर्थांचें जें मूळ व्रतांचें जें फळ । ब्रह्म तें केवळ पंढरीये ॥ १ ॥ तें आम्ही देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणीं डोळियांचीं ॥ २ ॥ जीवांचें जीवन सुखाचें शेजार । उभें कटीं कर ठेवूनियां ॥ ३ ॥ जगाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभ पर दुष्टां काळ ॥ ४ ॥ सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तोचि असे ॥ ५ ॥ तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें । आम्हां सांपडलें गीतीं गातां ॥ ६ ॥

२६३२. नागर गोडें बाळरूप । तें स्वरूप काळीचें ॥ १ ॥ गाईगोपाळांच्या संगें । आलें लागें पुंडलिका ॥ २ ॥ तें हें ध्यान दिगंबर । कटीं कर मिरवती ॥ धृ. ॥ नेणपणें उगेंचि उभें । भक्तिलोभें राहिलें ॥ ४ ॥ नेणे वरदळाचा मान । विटे चरण सम उभें ॥ ५ ॥ सहज कटावरी हात । दहीं भात शिदोरी ॥ ६ ॥ मोहरी पांवा गांजिवा पाठीं । धरिली काठी ज्याकाळें ॥ ७ ॥ रम्य स्थळ चंद्रभागा । पांडुरंगा क्रीडेसी ॥ ८ ॥ भीमा दक्षिणमुख वाहे । दृष्टी पाहे समोर ॥ ९ ॥ तारावेसे मूढ लोक । दिली भाक पुंडलिका ॥ १० ॥ तुका म्हणे वैकुंठवासी । भक्तांपाशीं राहिला ॥ ११ ॥

२६३३. आइत्या भाग्या धणी व्हावें । केणें घ्यावें न सरे तें ॥ १ ॥ केणें आहे पंढरपुरीं । उधारीचें लाभिक ॥ २ ॥ बाखराची करूनि रितीं । भरा पोतीं सकळ ॥ ३ ॥ तुका म्हणे संतांपाडें । करा पुढें वाखती ॥ ४ ॥

२६३४. आणिकाची सेवा करावी शरीरें । तीं येथें उत्तरें कोरडींच ॥ १ ॥ ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा याचकाच्या ॥ २ ॥ आणिकांचें देणें काळीं पोट भरे । येथील न सरे कल्पांतींही ॥ ३ ॥ आणिकांचें भेटी आडकाठी पडे । येथें तें न घडे वचनही ॥ ४ ॥ आणिकें दंडिती चुकलिया सेवा । येथें सोस हेवा नाहीं दोन्हीं ॥ ५ ॥ तुका म्हणे करी आपणासारिखें । उद्धरी पारिखें उंच नीच ॥ ६ ॥

२६३५. आपुलिया लाजा । धांवे भक्ताचिया काजा ॥ १ ॥ नाम धरिलें दीनानाथ । सत्य करावया व्रत ॥ २ ॥ घातआघात निवारी । छाया पीतांबरें करी ॥ ३ ॥ उभा कर कटीं । तुका म्हणे याजसाठीं ॥ ४ ॥

२६३६. आम्हीं आळीकरें । प्रेमसुखाचीं लेंकरें ॥ १ ॥ पायीं गोविली वासना । तुच्छ केलें ब्रह्मज्ञाना ॥ २ ॥ येतां पाहें मुळा । वास पंढरीच्या डोळां ॥ ३ ॥ तुका म्हणे स्थळ । मग मी पाहेन सकळ ॥ ४ ॥

२६३७. इंद्रियांचें पुरे कोड । तेंचि गोड पुढतीही ॥ १ ॥ जावें म्हणती पंढरपुरा । हाचि बरा संसार ॥ २ ॥ बैसलें तें मनामुळीं । सुख डोळीं देखिलें ॥ ३ ॥ तुका म्हणे देती कान । वाणावाण निवडुनी ॥ ४ ॥

२६३८. केली प्रतिज्ञा मनाशीं । तईं मी दान सत्यत्वेशीं । नेईन पायापाशीं । स्वामी मूळ पंढरीये ॥ १ ॥ तोंवरीं हें भरीं पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाहीं सांपडली वाट । सइराट फिरतसें ॥ २ ॥ ज्यावें आदराचें जिणें । स्वामी कृपा करी तेणें । पाळिल्या वचनें । सख्यत्वाचा अनुभव ॥ ३ ॥ घडे तैसें घडो आतां । मायबापाची सत्ता । तुका म्हणे चिंता । काय पाहें मारगा ॥ ४ ॥

२६३९. झाली हरिकथा रंग वोसरला । उचितासी आला पांडुरंग ॥ १ ॥ वांटितो हें प्रेम उचिताचा दाता । घेईं रे तूं आतां धणीवरी ॥ २ ॥ प्रेम देऊनियां अवघीं सुखी केलीं । जीं होतीं रंगलीं विठ्ठलीं तीं ॥ ३ ॥ तुकें हें दुर्बळ देखियलें संतीं । म्हणऊनि पुढती आणियेलें ॥ ४ ॥

२६४०. पांडुरंगा सारिखा सांडुनि वेव्हारा । आणिकांची करा आस वायां ॥ १ ॥ बहुतां दिधला उद्धार उदारें । निवडीना खरें खोटें कांहीं ॥ २ ॥ याचिया अंकिता वैकुंठ बंदर । आणीक वेव्हार चालतीना ॥ ३ ॥ तुका म्हणे माझे हातींचें वजन । यासी बोल कोण ठेवूं शके ॥ ४ ॥

२६४१. पुंडलिकाचे निकटसेवे । कैसा धांवे बराडी ॥ १ ॥ आपुलें तें थोरपण । नारायण विसरला ॥ २ ॥ उभा कटीं ठेवुनि कर । न म्हणे पर बैससें ॥ ३ ॥ तुका म्हणे जगदीशा । करणें आशा भक्तांची ॥ ४ ॥

२६४२. माझा बाप दीनानाथ । वाट भक्तांची पहात ॥ १ ॥ कर ठेवूनियां कटीं । उभा चंद्रभागेतटीं ॥ २ ॥ गळां वैजयंती माळा । रूप डोळस सांवळां ॥ ३ ॥ तुका म्हणे भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ॥ ४ ॥

२६४३. ब्रीद ज्याचें जगदानी । तोचि मनीं स्मरावा ॥ १ ॥ सम पाय कर कटीं । उभा तटीं भीवरेच्या ॥ २ ॥ पाहिलिया वेध लावी । बैसे जीवीं जडोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे भक्तिकाजा । धांवे लाजा लवलाहें ॥ ४ ॥

२६४४. भक्तवत्सल दीनानाथ । तिहीं लोकीं ज्याची मात ॥ १ ॥ तो हा पुंडलिकासाठीं । आला उभा वाळवंटीं ॥ २ ॥ गर्भवास धरी । अंबऋषीचा कैवारी ॥ ३ ॥ सकळां देवां अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ॥ ४ ॥ तुका म्हणे ध्यानीं । ज्यासि ध्यातो शूळपाणी ॥ ५ ॥

२६४५. लाघवी सूत्रधारी । दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संहारी । नानापरीचें लाघव ॥ १ ॥ पुरोनि पंढरीये उरलें । भक्तिसुखें लांचावलें । उभें नीटचि राहिलें । कर कटी न बैसे ॥ २ ॥ बहु काळें ना सांवळें । बहु कठिण ना कोंवळें । गुणत्रया वेगळें । बहुबळें आथीलें ॥ ३ ॥ असोनि नसे सकळामधीं । मना अगोचर बुद्धी । स्वामी माझा कृपानिधी । तुका म्हणे श्रीविठ्ठल ॥ ४ ॥

२६४६. लाभ खरा नये तुटी । नाहीं आडखळा भेटी ॥ १ ॥ जाय अवघिया देशा । येथें संचलासी तैसा ॥ २ ॥ मग नलगे पारखी । अवघीं सकट सारखीं ॥ ३ ॥ तुका म्हणे वोळे । रूपें भुलविले डोळे ॥ ४ ॥

२६४७. वाचेचिया आळा कवळिलें ब्रह्म । चुकविला श्रम पृथक तो ॥ १ ॥ सुलभ तें झालें सुलभ तें झालें । जवळीच आलें पंढरीये ॥ २ ॥ नामरूपाचे बांधलें मोटळें । एक एका वेळे सारियेलें ॥ ३ ॥ तुका म्हणे वाटे चुकली वसती । उधार तो हातीं आणियेला ॥ ४ ॥

२६४८. साधावया भक्तिकाज । नाहीं लाज धरीत ॥ १ ॥ ऐसियासी शरण जावें । शक्तीजीवें न वंची ॥ २ ॥ भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ॥ ३ ॥ तुका म्हणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥ ४ ॥

२६४९. पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥ १ ॥ दुराचाऱ्या मोक्षसुखाची वसति । भोळी बाळमूर्ति पांडुरंग ॥ २ ॥ कालियापें भेद मानितां निवडे । श्रोत्रियांसी जोडे अंत्यजता ॥ ३ ॥ माहेरीं सलज्ज ते जाणा सिंदळी । काळिमा काजळी पावविते ॥ ४ ॥ केला न सहावे तीर्थ उपवास । कथेविण दोष साधन तें ॥ ५ ॥ तुका म्हणे तेथें विश्वास जतन । पुरे भीमास्नान समपाय ॥ ६ ॥

२६५०. कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहुं डोळां । आलें वैकुंठ जवळां । सन्निध पंढरीये ॥ १ ॥ पीक पिकले घुमरीं । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरी सुकाळ ॥ २ ॥ चालती स्थिर स्थिर । गरुडटकयांचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥ ३ ॥ मिळालिया भद्रजाती । कैशा आनंदे डुल्लती । शूर उठावती । एक एक आगळे ॥ ४ ॥ नामामृत कल्लोळ । वृंदे कोंदली सकळ । आलें वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ॥ ५ ॥ आस करिती ब्रह्मादिक । देखोनि वाळवंटीचें सुख । धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचा कैसा ॥ ६ ॥ मरण मुक्ति वाराणसी । पितृऋण गया नासी । उधार नाहीं पंढरीसी । पायापाशीं विठोबाच्या ॥ ७ ॥ तुका म्हणे आतां । काय करणें आम्हां चिंता । सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥ ८ ॥

२६५१. उदंड पाहिलें उदंड ऐकिलें । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ॥ १ ॥ ऐसी चंद्रभागा ऐसें भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठें ॥ २ ॥ ऐसे संतजन ऐसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां अनाथाकारणें । पंढरी निर्माण केली देवें ॥ ४ ॥


No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...