Saturday, 3 May 2025

२६. उपदेशपर अभंग-१

श्री तुकोबाराय यांनी सत्य-असत्याचा निवाडा करून लोकांना हिताचा मार्ग दाखवला, त्याविषयीचे अभंग.  

उपदेशपर अभंग-१ (तीन भाग मिळून अभंग संख्या १०८५)

२६५२. जोडोनिया धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥ १ ॥ उत्तमचि गति तो एक पावेल । उत्तम भोगील जीवखाणी ॥ २ ॥ परउपकारी नेणें परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥ ३ ॥ भूतदया गाई पशूचें पाळण । तान्हेल्या जीवन वनामाजीं ॥ ४ ॥ शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचें ॥ ५ ॥ तुका म्हणे हेंचि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥ ६ ॥

२६५३. पराविया नारी माउली समान । मानिलिया धन काय वेचे ॥ १ ॥ न करितां परनिंदा परद्रव्य अभिलास । काय तुमचे यास वेचे सांगा ॥ २ ॥ बैसलिये ठायीं म्हणता रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥ ३ ॥ संतांचें वचनीं मानिता विश्वास । काय तुमचें यांस वेचे सांगा ॥ ४ ॥ खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसे सांगा ॥ ५ ॥ तुका म्हणे देव जोडे याचसाठीं । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥ ६ ॥ (धृ. नाही)

२६५४. आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥ धृ. ॥ देह हें काळाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ २ ॥ देता देवविता नेता नेवविता । येथें याची सत्ता काय आहे ॥ ३ ॥ निमित्याचा धनी केला असे प्राणी । तुका म्हणे म्हणोनि व्यर्थ गेला ॥ ४ ॥

२६५५. सांगतों तुम्हांसी भजा रे विठ्ठला । नाहीं तरी गेला जन्म वांयां ॥ १ ॥ करिता भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरीं वाहावसी ॥ २ ॥ कांहीं नलगे एक भावचि कारण । तुका म्हणे आण विठ्ठलाची ॥ ३ ॥

२६५६. आतां जागा रे भाई जागा रे । चोर निजल्या नाडूनि भागा रे ॥ धृ. ॥ कैसें असोनि ठाऊकें नेणां । दुःख पावाल पुढिले पेणा ॥ २ ॥ आतां नका रे भाई नका रे । आहे गांठीं तें लुटवू लोकां रे ॥ ३ ॥ तुका म्हणे एकाच्या घायें । कां रे जाणोनि न धरा भय ॥ ४ ॥

२६५७. अरे गिळिलेहो संसारें । कांहीं तरी राखा खरें । दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग ॥ १ ॥ येथें न घलीं न घलीं आड । संचितसा शब्द नाड । उठाउठीं गोड । बीजे बीज वाढवी ॥ २ ॥ केलें तें क्रियमाण । झालें तें संचित म्हण । प्रारब्ध जाण । उर उरित उरलें तें ॥ ३ ॥ चित्त खोटें चालीवरी । रोग भोगाचे अंतरीं । रसना अनावरी । तुका म्हणे ढुंग वाहे ॥ ४ ॥

२६५८. मोलाचें आयुष्य वेचूनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा ॥ १ ॥ अनंत जन्माचा शेवट पाहतां । नरदेह हातां आला तुझ्या ॥ २ ॥ कराल ते जोडी येईल कार्यासी । ध्यावें विठ्ठलासी सुखालागीं ॥ ३ ॥ सांचलिया धन होईल ठेवणें । तैसी नारायण जोडी करा ॥ ४ ॥ करा हरिभक्ति परलोकीं ये कामा । सोडविल यमा पासोनियां ॥ ५ ॥ तुका म्हणे करा आयुष्याचें मोल । नका वेंचू बोल नामेंविण ॥ ६ ॥

२६५९. लाभ जाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी । मनुष्यदेहा ऐसी । उत्तम जोडी जोडिली ॥ १ ॥ घेईं हरिनाम सादरें । भरा सुखाचीं भांडारें । झालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा ॥ २ ॥ घेऊनि माप हातीं । काळ मोजी दिवस राती । चोर लाग घेती । पुढे तैसें पळावें ॥ ३ ॥ हित सावकासें । म्हणे करीन तें पिसें । हातीं काय ऐसें । तुका म्हणे नेणसी ॥ ४ ॥

२६६०. बहुत सोसिले मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावें ॥ १ ॥ एकाचें अंगीं हें ठेवावें लावून । नये भिन्नाभिन्न चांचपडों ॥ २ ॥ कोण होईल तो ब्रह्मांडचाळक । आपणचि हाक देईल हाके ॥ ३ ॥ तुका म्हणे दिलीं चेतवूनि सुनीं । कौतुकावांचुनि नाहीं छळ ॥ ४ ॥

२६६१. आतां उघडी डोळें । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिया खोळे । दगड आला पोटासी ॥ १ ॥ मनुष्यदेह ऐसा निध । साधील ते साधे सिद्ध । करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ २ ॥ नाव चंद्रभागें तीरीं । उभी पुंडलिकाचे द्वारीं । कट धरूनियां करीं । उभाउभीं पालवी ॥ ३ ॥ तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातलिया मिठी । होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥ ४ ॥

२६६२. येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळेंचि अंधळे होती लोक ॥ १ ॥ उजाडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ २ ॥ बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढें नाहीं ऐसा लाभ मग ॥ ३ ॥ तुका म्हणे जाऊं सादावीत वाटे । भेटे तरी भेटे कोणी तरी ॥ ४ ॥

२६६३. विषयाचें सुख येथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥ १ ॥ मारिती तोडिती झोडिती निष्ठूर । यमाचे किंकर बहुसाल ॥ २ ॥ असिपत्र तरुवर खैराचे इंगळ । निघतील ज्वाळ तैलपाकीं ॥ ३ ॥ तप्तभूमीवरी चालविती पायीं । अग्निस्तंभ बाहीं कवटाळविती ॥ ४ ॥ म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे यातायाती गर्भवास ॥ ५ ॥

२६६४. देह मृत्याचे भातुकें । कळों आले कवतुकें ॥ १ ॥ काय मानियेलें सार । हेंचि वाटतें आश्चर्य ॥ २ ॥ नानाभोगांची संचितें । करूनि ठेविलें आइतें ॥ ३ ॥ तुका म्हणे कोडीं । उगवूं न शकती बापुडीं ॥ ४ ॥

२६६५. कां रें तुम्ही निर्मळ हरिगुण गाना । नाचत आनंदरूप वैकुंठासी जाना ॥ धृ. ॥ काय गणिकेचा याती अधिकार मोठा । पापी अजामेळ ऐसा नेला वैकुंठा ॥ २ ॥ ऐसे मागें नेणों किती अनंत अपार । पंचमहादोषी त्यांच्या पातकां नाहीं पार ॥ ३ ॥ पुत्राचिया लोभें नष्ट म्हणे नारायण । कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचें पुण्य ॥ ४ ॥

२६६६. कां रे न भजसी हरी । तुज कोण अंगीकारी । होईल यमपुरीं । यमदंड यातना ॥ धृ. ॥ कोण झाली लगबग । काय करिसी तेथें मग ॥ २ ॥ कां रे भरला ताठा । करितीं वोज नेता वाटा ॥ ३ ॥ तोंडा पडली खिळणी । जिव्हा पिटिती वोढूनि ॥ ४ ॥ कां रे पडिली जनलाज । कोण सोडवील तुज ॥ ५ ॥ लाज धरीं म्हणे तुका । नको वांयां जाऊं फुका ॥ ६ ॥

२६६७. कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥ धृ. ॥ बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥ २ ॥ फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥ ३ ॥ तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥ ४ ॥ तुका म्हणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करीं ॥ ५ ॥

२६६८. देवाचें भजन कां रे न करीसी तैसें । अखंड हव्यासें पीडतोसी ॥ १ ॥ देवासी शरण कां रे नवजासी तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागीं ॥ २ ॥ देवाचा विश्वास कां रे नाहीं तैसा । पुत्रस्नेहे जैसा गुंतलासी ॥ ३ ॥ कां रे नाहीं तैसी देवाची ते गोडी । नागवूनि सोडी पत्नी जैसी ॥ ४ ॥ कां रे नाहीं तैसे देवाचे उपकार । माया मिथ्या भार पितृपूजन ॥ ५ ॥ कां रे भय वाहासी लोकांचा तो धाक । विसरूनिया एक नारायण ॥ ६ ॥ तुका म्हणे कां रे घातलेंसे वांयां । अवघें आयुष्य जाया भक्तिवीण ॥ ७ ॥ (धृ. नाही)

२६६९. बहुतां जन्मांअंतीं । जोडी लागली हे हातीं ॥ धृ. ॥ मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरीं पांडुरंगीं भाव ॥ २ ॥ बहु केला फेरा । येथें सांपडला थारा ॥ ३ ॥ तुका म्हणे जाणे । ऐसे दुर्लभ ते शाहाणे ॥ ४ ॥

२६७०. भवसागर तरतां । कां रे करीतसा चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवूनियां ॥ १ ॥ त्याचें पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एकासाठीं । खांदा वाहे आपुल्या ॥ २ ॥ सुखें करावा संसार । न संडावें दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥ ३ ॥ भुक्तिमुक्तीची चिंता । दैन्य नाहीं दरिद्रता । तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥ ४ ॥

२६७१. कोणें तुझा सांग केला अंगीकार । निश्चिंती त्वां थोर मानियेली ॥ १ ॥ कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ २ ॥ तेव्हां तुज कोण घालील पाठीसी । घांसील भूमीसी वदन यम ॥ ३ ॥ कां रे नागविसी आयुष्य खातो काळ । दिवसें दिवस बळ क्षीण होतें ॥ ४ ॥ तुका म्हणे यासी सांगा कोणी तरी । विसरला हरि मायबाप ॥ ५ ॥ (धृ. नाही) 

२६७२. हरीच्या जागरणा । जातां कां रे न ये मना ॥ १ ॥ कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेंचे फुकासाठीं ॥ २ ॥ ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥ ४ ॥

२६७३. दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥ १ ॥ कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ २ ॥ भोगें कळों येती मागील ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें झांकितील डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥ ४ ॥

२६७४. बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता हा नाहीं मनुष्यदेह ॥ १ ॥ आपुल्या हिताचे न होती सायास । गृहदारा आस धनवित्त ॥ २ ॥ अवचित निधान लागलें हें हातीं । भोगावी विपत्ति गर्भवास ॥ ३ ॥ यावें जावें पुढें ऐसेंचि कारण । भोगावें पतन नरकवास ॥ ४ ॥ तुका म्हणे धरीं आठव या देहीं । नाही तरी कांहीं बरे नव्हे ॥ ५ ॥

२६७५. म्हणवितां हरिदास कां रे नाहीं लाज । दीनासी महाराज म्हणसी हीना ॥ १ ॥ काय ऐसें पोट न भरेसें जालें । हालविसी कुले सभेमाजी ॥ २ ॥ तुका म्हणे पोटें केली विटंबना । दीन जाला जना कींव भाकी ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२६७६. म्हणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥ १ ॥ लाहो घेईं हरिनामाचा । जन्म जाऊं नेदी साचा । गळा पडेल यमफासा । मग कैंचा हरि म्हणसी ॥ २ ॥ पुरलासाठीं देहाडा । ऐसें न म्हणें न म्हणें मूढा ॥ ३ ॥ नरदेह दुबळा । ऐसें न म्हणे रे चांडाळा ॥ ४ ॥ तुका म्हणे सांगों किती । सेखीं तोंडीं पडेल माती ॥ ५ ॥

२६७७. ऐसे सांडुनियां धुरे । केविलवाणी दिसां कां रे । कामें उर भरे । हातीं नुरे मृत्तिका ॥ १ ॥ उदार हा जगदानी । पांडुरंग अभिमानी । तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥ २ ॥ नलगे पुसावी चाकरी । कोणी वकील ये घरीं । त्याचा तोचि करी । पारपत्य सकळां ॥ ३ ॥ नाहीं आडकाटी । तुका म्हणे जातां भेटीं । न बोलतां मिठी । उगीच पायीं घालावी ॥ ४ ॥

२६७८. कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥ धृ. ॥ मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरीं । मसक भरल्यावरीं स्वाद नेणें ॥ २ ॥ आणीकही भोग आणिकां इंद्रियांचे । नाहीं ऐसें साचे जवळी कांहीं ॥ ३ ॥ रूप दृष्टि धाय पाहतां पाहतां । न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥ ४ ॥ तुका म्हणे कां रे नाशिवंतासाठीं । देवासवें तुटी करितोसी ॥ ५ ॥

२६७९. गेले पळाले दिवस रोज । काय म्हणतोसि माझें माझें ॥ १ ॥ सळें धरोनि बैसला काळ । फांकों नेदी घटका पळ ॥ २ ॥ कां रे अद्यापि न कळे । केश फिरले कान डोळे ॥ ३ ॥ हित कळोनि असतां हातीं । तोंडीं पाडोनि घेसी माती ॥ ४ ॥ तुज ठाऊकें मी जाणार । पाया शोधोनि बांधिसी घर ॥ ५ ॥ तुका म्हणे वेगें । पंढरीराया शरण रिघें ॥ ६ ॥

२६८०. करूनि जतन । कोणा कामा आलें धन ॥ १ ॥ ऐसें जाणत जाणतां । कां रे होतोसी नेणता ॥ २ ॥ प्रिया पुत्र बंधु । नाहीं तुज याशीं संबंधु ॥ ३ ॥ तुका म्हणे एका । हरीविण नाहीं सखा ॥ ४ ॥

२६८१. कां रे माझी पोरें म्हणसील ढोरें । मायबाप खरें काय एक ॥ १ ॥ कां रे गेलें म्हणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ गेलियाचा ॥ २ ॥ कां रे माझें माझें म्हणसील गोत । न सोडविती दूत यमाहातीं ॥ ३ ॥ कां रे मी बळिया म्हणविसी ऐसा । सरणापाशीं कैसा उचलविसी ॥ ४ ॥ तुका म्हणे न धरीं भरंवसा कांहीं । वेगीं शरण जाईं पांडुरंगा ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२६८२. धन मेळवूनि कोटी । सवें न ये रे लंगोटी ॥ १ ॥ पाने खाशील उदंड । अंतीं जासी सुकल्या तोंड ॥ २ ॥ पलंग न्याहाल्या सुपती । शेवटीं गोवऱ्या सांगाती ॥ ३ ॥ तुका म्हणे राम । एक विसरतां श्रम ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२६८३. नित्य उठोनियां खावयाची चिंता । आपुल्या तूं हिता नाठवीसी ॥ धृ. ॥ जननीचे पोटीं उपजलासी जेव्हां । चिंता तुझी तेव्हां केली तेणें ॥ २ ॥ चातकांलागूनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवीं ॥ ३ ॥ पक्षी वनचरें आहेत भूमीवरी । तयांलागीं हरि उपेक्षीना ॥ ४ ॥ तुका म्हणे भाव धरुन राहे चित्तीं । तरी तो श्रीपति उपेक्षीना ॥ ५ ॥

२६८४. आतां तळमळ । केली पाहिजे शीतळ ॥ १ ॥ पहा करील तें देव । पायीं ठेवूनियां भाव ॥ २ ॥ तोचि अन्नदाता । नाहीं आणिकांची सत्ता ॥ ३ ॥ तुका म्हणे दासा । नुपेक्षील हा भरंवसा ॥ ४ ॥

२६८५. एक शेर अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥ १ ॥ कां रे तृष्णा वाढविसी । बांधवोनि मोहपाशीं ॥ २ ॥ औट हात तुझा जागा । येर सिणसी वाउगा ॥ ३ ॥ तुका म्हणे श्रम । एक विसरता राम ॥ ४ ॥

२६८६. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येईल कैसें ॥ १ ॥ म्हणउनि दृढ धरीं पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ २ ॥ आणिका संकल्पा नको गोऊं मन । तरीच कारण साध्य होय ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसें जाणावें उचित । तरी सहज स्थित येईल कळों ॥ ४ ॥

२६८७. मैत्र केला महाबळी । कामा न ये अंतकाळीं ॥ १ ॥ आधीं घे रे रामनाम । सामा भरीं हा उत्तम । नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥ २ ॥ धन मिळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥ ३ ॥ कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥ ४ ॥ तंववरी तुमचें बळ । जंव आला नाहीं काळ ॥ ५ ॥ तुका म्हणे बापा । चुकवी चौऱ्याशींच्या खेपा ॥ ६ ॥

२६८८. आलें भरा येच पेठें । पुढें मागुतें न भेटे ॥ १ ॥ नाहीं कोणाचा सांगात । दुःख भोगितां आघात ॥ २ ॥ होसी फजीती वरपडा । लक्ष चौऱ्यासीचे वेढा ॥ ३ ॥ एका पाउलाची वाट । कोणा सांगावा बोभाट ॥ ४ ॥ जुंतिजेसी घाणां । नाहीं मारित्या करुणा ॥ ५ ॥ तुका म्हणे हित पाहे । जोंवरी हें हातीं आहे ॥ ६ ॥

२६८९. देवाचिया चाडे प्रमाण उचित । नये वाटू चित्त निषेधासी ॥ १ ॥ नये राहों उभें कसमळापाशीं । भुंकतील तैसीं सांडावीं तीं ॥ २ ॥ तुका म्हणे क्षमा सुखाची हे रासी । सांडुनि कां ऐसी दुःखी व्हावें ॥ ३ ॥

२६९०. भक्तिभावें करीं बैसोनि निश्चित । नको गोवूं चित्त प्रपंचासी ॥ १ ॥ एक दृढ करी पंढरीचा राव । मग तुज उपाव पुढिल सुचे ॥ २ ॥ नको करूं कांहीं देवतापूजन । जप तप ध्यान तेंही नको ॥ ३ ॥ मानिसिल झणीं आपलिक कांहीं । येरझार पाहीं न चुके कदा ॥ ४ ॥ ऐसे जन्म किती पावलासी देहीं । अझुनि कां नाहीं कळली सोय ॥ ५ ॥ सोय धरीं आतां होय पां सावध । अनुभव आनंद आहे कैसा ॥ ६ ॥ सहज कैसें आहे तेथींचें तें गुज । अनुभवें निज पाहे तुकीं ॥ ७ ॥ तुका म्हणे आतां होईं तूं सावध । तोडीं भवबंध एका जन्में ॥ ८ ॥

२६९१. सोसें बहु गर्भवासी । मेलों असों उपवासीं । नाहीं सखीं ऐसीं । येथें कोण भेटलीं ॥ १ ॥ करीं करीं रे स्वहित । देह तंव हे अनित्य । नाहीं दिलें चित्त । सोडवूं मोहापासोनि ॥ २ ॥ पाळी तोंडींचिया घांसें । तेचि होय अनारिसे । ज्या नव्हे ऐसें । खेदी परी सोडवीना ॥ ३ ॥ तुका म्हणे धनमानें । माझ्या बाटलों मीपणें । नाहीं दिला मनें । देखों लाभें हा लाभ ॥ ४ ॥

२६९२. काळ जवळिच उभा नेणां । घाली झांपडी खुंटी कानां ॥ १ ॥ कैसा हुशार सावध राहीं । आपुला तूं आपुले ठायीं ॥ २ ॥ काळ जवळिच उभा पाहीं । नेदी कोणासी देऊं कांहीं ॥ ३ ॥ काळें पुरविली पाठी । वरुषें जालीं तरी साठी ॥ ४ ॥ काळ भोंवताला भोंवें । राम येऊं नेदी जिव्हे ॥ ५ ॥ तुका म्हणे काळा । कर्म मिळतें तें जाळा ॥ ६ ॥

२६९३. दिकची या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥ १ ॥ तांतडी ते करीं म्हणऊनि तांतडी । साधिली ती घडी सोनियाची ॥ २ ॥ संकल्पाच्या बीजें इंद्रियांची चाली । प्रारब्ध तें घाली गर्भवासीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बीजें जाळुनी सकळ । करावें गोपाळें आपुले भाट ॥ ४ ॥

२६९४. मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥ १ ॥ जाणोनि कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ २ ॥ संचित सांगातीं बोळवण सवें । आचारलें द्यावें फळ तेणें ॥ ३ ॥ तुका म्हणे शेखीं स्मशान तें वरी । संबंध गोवरी आगीसवें ॥ ४ ॥

२६९५. आठवे देव तो करावा उपाव । येर त्यजीं वाव खटपट ॥ १ ॥ होईं बा जागा होईं बा जागा । वाउगा कां गा शिणसील ॥ २ ॥ जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तो कईं निघसि ना ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥ ४ ॥

२६९६. सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया ॥ १ ॥ मुखीं वाणी कानीं कीर्ति । डोळे मूर्ति देखावया ॥ २ ॥ अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळ ॥ ३ ॥ घरा आगी लावुनि जागा । न पळे तो गा वांचेना ॥ ४ ॥ तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥ ५ ॥

२६९७. आपुलिया अंगें तोडी मायाजाळ । ऐसें नाहीं बळ कोणापाशीं ॥ १ ॥ रांडापोरे त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥ २ ॥ मुक्त जालों ऐसें बोलों जाय मुखें । तुका म्हणे दुःखें बांधला तो ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२६९८. काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हितें जालें जनामध्यें शूर ॥ १ ॥ कां रे तुम्ही नेणां कां रे तुम्ही नेणां । अल्पसुखासाठीं पडशी विपत्तीचे घाणां ॥ २ ॥ नाहीं ऐसी लाज काय तयापें आगळें । काय नव्हे केलें आपुलिया बळें ॥ ३ ॥ तुका म्हणे तरी सुख अवघेंचि बरें । जतन करूं हीं आपुलालीं ढोरें ॥ ४ ॥

२६९९. नलगे द्यावा जीव सहजचि जाणार । आहे तो विचार जाणा कांहीं ॥ १ ॥ मरण जो मागें गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥ २ ॥ तुका म्हणे कांहीं होईल स्वहित । निधान जो थीत टाकूं पाहे ॥ ३ ॥

२७००. वाटां घेईं लवकरी । मागें अंतरसी दूरी । केली भरोवरी । सार नेती आणीक ॥ १ ॥ ऐसी भांबावलीं किती । काय जाणों नेणों किती । समय नेणती । माथां भार वाहोनी ॥ २ ॥ नाहीं सरलें तोवरीं । धांव घेईं वेग करीं । घेतलें पदरीं । फावलें तें आपुलें ॥ ३ ॥ फटलंडी म्हणे तुका । एक न साहावे धक्का । तरिच या सुखा । मग कैसा पावसी ॥ ४ ॥

२७०१. देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥ १ ॥ आता येरा जना म्हणावें तें काईं । जया भार डोई संसाराचा ॥ २ ॥ त्यजुनी संसार अभिमान सांटा । जुलूम हा मोठा दिसतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे आळस करूनियां साहे । बळें कैसें पाहे वांयां जाती ॥ ४ ॥

२७०२. काय एकां जालें तें का नाहीं ठावें । काय हें सांगावें काय म्हूण ॥ १ ॥ देखतील डोळां ऐकतील कानीं । बोलिलें पुराणीं तेंही ठावें ॥ २ ॥ काय हें शरीर साच कीं जाणार । सकळ विचार जाणती हा ॥ ३ ॥ कां हें कळों नये आपुलें आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥ ४ ॥ कां हें आवडलें प्रियापुत्रधन । काय कामा कोण कोणा आलें ॥ ५ ॥ कां हें जन्म वांयां घातलें उत्तम । कां हें रामराम न म्हणती ॥ ६ ॥ काय भुली यांसी पडली जाणतां । देखतीं मरतां आणिकांसी ॥ ७ ॥ काय करिती हे बांधलिया काळें । तुका म्हणे बळें वज्रपाशीं ॥ ८ ॥

२७०३. वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा ॥ १ ॥ कोण दम ऐसा आहे यांचे पोटीं । येईल शेवटीं कोण कामा ॥ २ ॥ काय मानुनियां राहिले निश्चिंती । काय जाब देती यमदूतां ॥ ३ ॥ कां हीं विसरली मरण बापुडीं । काय यांसी गोडी लागलीसे ॥ ४ ॥ काय हातीं नाहीं करील तयासी । काय जालें यांसी काय जाणों ॥ ५ ॥ कां हीं नाठविती देवकीनंदना । सुटाया बंधनापासूनियां ॥ ६ ॥ काय मोल यासी लागे धन वित्त । कां हें यांचें चित्त घेत नाहीं ॥ ७ ॥ तुका म्हणे कां हीं भोगीतील खाणी । कां त्या चक्रपाणी विसरलीं ॥ ८ ॥

२७०४. पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य म्हूण ॥ १ ॥ मरणाची कां रे नाहीं आठवण । संचिताचें धन लाभ हेवा ॥ २ ॥ देहाचें भय तें काळाचें भातुकें । ग्रासूनि तें एकें ठेविलेंसे ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं उघडा रे डोळे । जाणोनि अंधळे होऊं नका ॥ ४ ॥

२७०५. म्हणसी होऊनी निश्चिंता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता । भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठीं । तेणे जीवा साटी होईल तुझ्या ॥ १ ॥ सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें तूं अवघा नाडसील । मागुता पडशील भवडोहीं ॥ २ ॥ शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाहीं कदा आराणूक । करिती तडातोडी अंतर्बाह्यात्कारीं । ऐसें जाती चारीं दिवस वेगीं ॥ ३ ॥ मोलाची घडी जाते वांयाविण । न मिळे मोल धन देतां कोडी । जागा होईं करीं हिताचा उपाय । तुका म्हणे हाय करिसी मग ॥ ४ ॥

२७०६. इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥ १ ॥ याचा विश्वास तो काई । ऐसें विचारूनि पाहीं ॥ २ ॥ सुगंध अभ्यंगें पाळितां । केश फिरले जाणतां ॥ ३ ॥ पिंड पाळितां ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥ ४ ॥ करितां उपचार । कोणा नाहीं उपकार ॥ ५ ॥ अल्प जीवन करीं । तुका म्हणे साधी हरि ॥ ६ ॥

२७०७. एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥ १ ॥ मारा हाक देवा भय अट्टाहासें । जंव काळा ऐसें जालें नाहीं ॥ २ ॥ मरणाची तंव गाठोडी पदरीं । जिणें तोचिवरी माप भरे ॥ ३ ॥ तुका म्हणे धिग वाहती मारग । अंगा आले मग हालोंनेदी ॥ ४ ॥

२७०८. हरि हरि तुम्हीं म्हणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटईल ॥ १ ॥ आणिक नका कांहीं गाबाळाचें भरी । पडों येते थोरी नागवण ॥ २ ॥ भावें तुळसीदळ पाणी जोडा हात । म्हणावें पतित वेळोवेळां ॥ ३ ॥ तुका म्हणे हा तंव कृपेचा सागर । नामासाठीं पार पाववील ॥ ४ ॥

२७०९. कैं वाहावें जीवन । कैं पलंगीं शयन ॥ १ ॥ जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥ २ ॥ कैं भोज्य नानापरी । कैं कोरड्या भाकरी ॥ ३ ॥ कैं बैसावें वहनीं । कैं पायीं अनवाणी ॥ ४ ॥ कैं उत्तम प्रावर्णें । कैं वसनें तीं जीर्णें ॥ ५ ॥ कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥ ६ ॥ कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥ ७ ॥ तुका म्हणे जाण । सुख दुःख तें समान ॥ ८ ॥

२७१०. सकळांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसे ॥ १ ॥ अहो श्रोते वक्ते सकळही जन । बरें पारखून बांधा गांठी ॥ २ ॥ फोडिलें भांडार धन्याचा हा माल । तेथें मी हमाल भारवाही ॥ ३ ॥ तुका म्हणे चाली जाली चहूं देशीं । उतरला कसीं खरा माल ॥ ४ ॥

२७११. अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥ १ ॥ मग कैचें हरीचें नाम । निजलीया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिलें ॥ २ ॥ विषयसुखाचा लंपट । दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥ ३ ॥ आणिक एक कोड । नरका जावयाची चाड । तरी संतनिंदा गोड । करी कवतुकें सदा ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसें । मना लावी रामपिसें । नाहीं तरी आलिया सायासें । फुकट जासी ठकोनि ॥ ५ ॥

२७१२. नका घालूं दूध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥ १ ॥ नेदा तरी हें हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥ २ ॥ तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२७१३. आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥ १ ॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ २ ॥ हित तें करावें देवाचें चिंतन । करूनिया मन एकविध ॥ ३ ॥ तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥ ४ ॥

२७१४. ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥ १ ॥ मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु वो जाण । येचि तीरीं सरेल ॥ २ ॥ दास्य करील कळिकाळ । बंध तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धिसिद्धि म्हणियाऱ्या ॥ ३ ॥ सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥ ४ ॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । चांडाळांही अधिकार । बाळें नारीनर । आदिकरोनि वेश्याही ॥ ५ ॥ तुका म्हणे अनुभवें । आम्हीं पाडियलें ठावें । आणीकही दैवें । सुख घेती भाविकें ॥ ६ ॥

२७१५. न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥ १ ॥ अविनाश सुख देईल निर्वाणी । चुकतील खाणी चौऱ्यांशीच्या ॥ २ ॥ आणिकिया जीवा होईल उद्धार । तेही उपकार घडती कोटि ॥ ३ ॥ आहिक्यपरत्रीं होसील सरता । वाचे उच्चारितां रामराम ॥ ४ ॥ तुका म्हणे सांडी संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥ ५ ॥

२७१६. साधकाची दशा उदास असावी । उपाधी नसावी अंतर्बाही ॥ धृ. ॥ लोलुप्यता काय निद्रेतें जिणावें । भोजन करावें परमित ॥ २ ॥ एकांतीं लोकांतीं स्त्रियांशीं भाषण । प्राण गेल्या जाण बोलों न ये ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐशा साधनीं जो राहे । तोचि ज्ञान लाहे गुरुकृपा ॥ ४ ॥

२७१७. निर्वाहापुरतें अन्नआच्छादन । आश्रमासी स्थान कोपी गुहा ॥ १ ॥ कोठेंही चित्तासी नसावें बंधन । हृदयीं नारायण सांठवावा ॥ २ ॥ नये बोलों फार बैसो जनामधीं । सावधान बुद्धि इंद्रियदमीं ॥ ३ ॥ तुका म्हणे घडी घडीने साधावी । त्रिगुणांची गाेवी उगवूनि ॥ ४ ॥
 

२७१८. सर्वस्वासी मुकावें तेणें हरिसी जिंकावें । अर्थप्राणजीवें देहत्याग ॥ धृ. ॥ मोह ममता माया चाड चिंता । विषयकंदुवेथा जाळूनियां ॥ २ ॥ लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशधडी ॥ ३ ॥ शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणि धाडी त्यांसी ॥ ४ ॥ तुका म्हणे यातीअक्षरें अभिमान । सांडोनियां शरण रिघें संतां ॥ ५ ॥

२७१९. आशा हे समूळ खाणोनि काढावी । तेव्हांचि गोसावी व्हावें तेणें ॥ १ ॥ नाहीं तरि सुखें असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये ॥ २ ॥ आशा मारोनिया जयवंत व्हावें । तेव्हांचि निघावें सर्वांतून ॥ ३ ॥ तुका म्हणे जरी योगाची तांतडी । आशेची बीबुडी करीं आधीं ॥ ४ ॥

२७२०. हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्तशुद्धि सेवा देवाची हे ॥ १ ॥ आवडी विठ्ठल गाइजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ २ ॥ आणिकां अंतरीं न द्यावी वसती । करावी हे शांती वासनेची ॥ ३ ॥ तुका म्हणे बाण हाचि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥ ४ ॥

२७२१. करूनिया शुद्ध मन । नारायण स्मरावा ॥ १ ॥ तरीच हा तरिजे सिंधु । भवबंधु तोडोनियां ॥ २ ॥ येथें सरे शुद्ध साचें । अंतरींचें बीज तें ॥ ३ ॥ तुका म्हणे लवणकळी । पडतां जळीं तें होय ॥ ४ ॥

२७२२. बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥ १ ॥ येऊनि अंतरीं राहिल गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ २ ॥ राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसें देईन मी दिव्य । जरी होईल भाव एकविध ॥ ४ ॥ 

२७२३. नयें वांटूं मन । कांहीं न देखावें भिन्न ॥ १ ॥ पाय विठोबाचे चित्तीं । असों द्यावे दिवस राती ॥ २ ॥ नये काकुळती । कोणा यावे हरिभक्ति ॥ ३ ॥ तुका म्हणे साई । करील कृपेची विठाई ॥ ४ ॥

२७२४. नलगे देशकाळ । मंत्रविधान सकळ । मनचि निश्चळ । करूनि करुणा भाकावी ॥ १ ॥ येतो बैसलिया ठाया । आसनें व्यापी देवराया । निर्मळ ते काया । अधिष्ठान तयाचें ॥ २ ॥ कल्पनेचा साक्षी । तरी आदरेंचि लक्षी । आवडीनें भक्षी । कोरडें धान्य मटमटां ॥ ३ ॥ घेणें तरी भाव । लक्षी दासाचा उपाव । तुका म्हणे जीव । जीवीं मेळवील अनंत ॥ ४ ॥

२७२५. सत्य आठवितां देव । जातें भेव पळोनि ॥ १ ॥ नलगे कांहीं करणें चिंता । धरी सत्ता सर्व तो ॥ २ ॥ भावें भाव राहे पायीं । देव तैं संनिध ॥ ३॥ तुका म्हणे कृष्णनामें । शीतळ प्रेमें सर्वांसी ॥ ४ ॥

२७२६. कायावाचामनें झाला विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना ॥ १ ॥ विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥ २ ॥ तुका म्हणे चित्त करावें निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथें ॥ ३ ॥

२७२७. तेचि करीं मात । जेणें होईल तुझें हित । काय बडबड निमित्य । सुख जिव्हारी शिणविसी ॥ धृ. ॥ जो मूळव्याधि पीडिला । त्यासी देखोनि हांसे खरजुला ॥ २ ॥ आराध करी सोसी । त्यासी हांसे तो आळसी ॥ ३ ॥ क्षयरोगी म्हणे परता । सर रोगिया कुष्टता ॥ ४ ॥ वडस दोहीं डोळां वाढले । आणिकां कानें कोचें बोले ॥ ५ ॥ तुका लागे पायां । शुद्ध करा आपणियां ॥ ६ ॥

२७२८. थोडें परी निरें । अविट तें घ्यावें खरें ॥ १ ॥ घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढें बिजा पोटीं ॥ २ ॥ चित्त ठेवीं ग्वाही । उपचारें चाड नाहीं ॥ ३ ॥ आपुलें तें हित फार । तुका म्हणे खरें सार ॥ ४ ॥

२७२९. नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥ १ ॥ हेंचि शूरत्वाचें अंग । हारि आणिला श्रीरंग ॥ २ ॥ अवघा जाला पण । लवण सकळां कारण ॥ ३ ॥ तुका म्हणे पाणी । पातळपणें तळा आणी ॥ ४ ॥

२७३०. ऐका गा हे अवघे जन । शुद्ध मन तें हित ॥ १ ॥ अवघा काळ नये जरी । समयावरी जाणावे ॥ २ ॥ नाहीं कोणी सवें येतां । संचिता या वेगळा ॥ ३ ॥ बरवा अवकाश आहे । करा साहे इंद्रियें ॥ ४ ॥ कर्मभूमी ऐसा ठाव । वेवसाव जाणावा ॥ ५ ॥ तुका म्हणे उत्तम जोडी । जाती घडी नरदेह ॥ ६ ॥

२७३१. कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरीचें चांग ॥ १ ॥ तैसा करी कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥ २ ॥ वरी कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥ ३ ॥ मिठें रुचविलें अन्न । नये सतत कारण ॥ ४ ॥ ऊस बाहेरी दिसे काळा । आंत रसाचा आगळा ॥ ५ ॥ तुका म्हणे मोल गोडी । काय चाड वरिल्या खोडी ॥ ६ ॥

२७३२. चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळां ॥ १ ॥ तैसें जागें करीं चित्ता । कांहीं आपुलिया हिता ॥ २ ॥ विक्षेपिलें धन । तेथें गुंतलेंसें मन ॥ ३ ॥ नाशिवंतासाठीं । तुका म्हणे करिसी आटी ॥ ४ ॥

२७३३. उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्त शुद्ध बुद्धी ठायीं स्थीर ॥ १ ॥ न घालावी धांव मनाचिये ओढी । वचनीं आवडी संताचिये ॥ २ ॥ अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न लगे उपदेश तुका म्हणे ॥ ३ ॥

२७३४. संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥ १ ॥ भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावें ॥ २ ॥ भिक्षा आणि वेवसाव । काला करी तो गाढव ॥ ३ ॥ करूनि वस्ती बाजारीं । म्हणवी कासया निस्पृही ॥ ४ ॥ प्रसादा आडुनि कवी । केलें तूप पाणी तेवीं ॥ ५ ॥ तुका म्हणे होईं शूर । किंवा निसूर मजूर ॥ ६ ॥ 

२७३५. कंथा प्रावर्ण । नव्हे भिक्षेचें तें अन्न ॥ १ ॥ करीं यापरी स्वहित । विचारूनि धर्म नीत ॥ २ ॥ देऊळ नव्हे घर । प्रपंच परउपकार ॥ ३ ॥ विधिसेवन काम । नव्हे शब्द रामराम ॥ ४ ॥ हत्या क्षात्रधर्म । नव्हे निष्काम तें कर्म ॥ ५ ॥ तुका म्हणे संतीं । करून ठेविली आइती ॥ ६ ॥

२७३६. डोळ्यामध्यें जैसें कणु । अणु तेंहि न समाये ॥ १ ॥ तैसें शुद्ध करा हित । नका चित्त बाटवूं ॥ २ ॥ आपुल्याचा कळवळा । आणिका बाळावरी न ये ॥ ३ ॥ तुका म्हणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या ॥ ४ ॥

२७३७. करणें तें हेचि करा । नरका घोरा कां जातां ॥ १ ॥ जयामध्यें नारायण । शुद्ध पुण्य तें एक ॥ २ ॥ शरणागतां देव राखे । येरा वाखे विघ्नांचे ॥ ३ ॥ तुका म्हणे लीन व्हावें । कळे भावें वर्म हें ॥ ४ ॥

२७३८. किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस झालेती ॥ १ ॥ माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासिया जवळी ॥ २ ॥ कांहीं न मागतां भले । होईल तेचीं काम केलें । नसावें आधिलें । कांहीं एका संकल्पें ॥ ३ ॥ तुका म्हणे भाव । पाववील ठायाठाव । एकविध जीव । ठेविलिया सेवेसी ॥

२७३९. सत्य आम्हां मनीं । नव्हें गाबाळाचे धनी ॥ १ ॥ ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टाका मळ ॥ २ ॥ देतों तीक्ष्ण उत्तरें पुढें व्हावयासी बरें ॥ ३ ॥ तुका म्हणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें ॥ ४ ॥

२७४०. काय धोविलें बाहेरी । मन मळलें अंतरीं । गादलें जन्मवरी । असत्यकाटें काटलें ॥ १ ॥ सांडी व्यापार दंभाचा । शुद्ध करी रे मन वाचा । तुझिया चित्ताचा । तूंच ग्वाही आपुला ॥ २ ॥ पापपुण्य विटाळ देहीं । करितां न विचारीसी कांहीं । काय चाचपसी मही । जी अखंड सोंवळी ॥ ३ ॥ कामक्रोध वेगळा । ऐसा होईं का रे सोंवळा । तुका म्हणे कळा । गुंडून ठेवीं या कुसरी ॥ ४ ॥

२७४१. निवडावे खडे । तरी दळण वोज घडे ॥ १ ॥ नाहीं तरी नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥ २ ॥ निवडावें तन । शेतीं करावें राखण ॥ ३ ॥ तुका म्हणे नीत । न विचारितां नव्हे हित ॥ ४ ॥ 

२७४२. भय नाहीं भेव । अनुतापी नव्हता जीव ॥ १ ॥ जेथें देवाची तळमळ । तेथें काशाचा विटाळ ॥ २ ॥ उच्चारितां दोष । नाहीं उरों देत लेश ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्त । होय आवडी मिश्रित ॥ ४ ॥ 

२७४३. काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावे ॥ १ ॥ निघोनि आयुष्य जातें हातोहात । विचारीं पां हित लवलाहीं ॥ २ ॥ तुका म्हणे भावभक्ति हे कारण । नागवी भूषण दंभ तोचि ॥ ३ ॥

२७४४. जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बापमाय वर्जावीं तीं ॥ धृ. ॥ येर प्रियापुत्रधना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रू ॥ २ ॥ प्रल्हादे जनक विभिषणे बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥ ४ ॥

२७४५. न मनावें तैसें गुरुचें वचन । जेणें नारायण अंतरे तें । आड आला म्हणुनी फोडियेला डोळा । बळीने आंधळा शुक्र केला ॥ १ ॥ करी देव तरी काय नव्हे एक । कां तुम्ही पृथक शिणा वांयां ॥ २ ॥ उल्लंघुनीयां भ्रताराची आज्ञा । अन्न ऋषिपत्न्या घेउनि गेल्या । अवघेंचि त्यांचें देवें केलें काज । धर्म आणि लाज राखियेली ॥ ३ ॥ पितयासी पुत्रे केला वैराकार । प्रल्हादें असुर मारवीला । बहुत विघ्नें केलीं तया आड । परी नाहीं कैवाड सांडियेला ॥ ४ ॥ गौळणी करिती देवाशीं व्यभिचार । सांडुनि आचार भ्रष्ट होती । तयां दिलें तें कवणासी नाहीं । अवघा अंतर्बाही तोचि जाला ॥ ५ ॥ देव जोडे तरी करावा अधर्म । अंतरे तें कर्म नाचरावें । तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा । म्हणोनी अजामेळा उद्धरिलें ॥ ६ ॥

२७४६. हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥ १ ॥ कळों आलें खट्याळसें । शिवों नये लिंपों दोषें ॥ २ ॥ फोडावें मडकें । मेले लेखीं घायें एके ॥ ३ ॥ तुका म्हणे त्यागें । विण चुकीजेना भोगें ॥ ४ ॥

२७४७. आली सिंहस्थ पर्वणी । न्हाव्या भटा झाली धणी ॥ १ ॥ अंतरीं पापाच्या कोडी । वरि वरि बोडी डोई दाढी ॥ २ ॥ बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग वहिलें ॥ ३ ॥ पाप गेल्याची काय खूण । नाहीं पालटले अवगुण ॥ ४ ॥ भक्तिभावेंविण । तुका म्हणे अवघा शीण ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२७४८. निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीं मांडीं ॥ १ ॥ नाहीं चालों येत सोंगसंपादणी । निवडे अवसानीं शुद्धाशुद्ध ॥ २ ॥ त्याग नांव तरी निर्विषय वासना । कार्याकारणापुरते विधि ॥ ३ ॥ तुका म्हणे राहे चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंसीं ॥ ४ ॥

२७४९. नव्हे खळवादी मताचि पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥ १ ॥ साक्षत्वेंसि मना आणावीं उत्तरें । परिपाकीं खरें खोटें कळे ॥ २ ॥ नव्हे एकदेशी शब्द हा उखता । ब्रह्मांडापुरता घेईल त्यासी ॥ ३ ॥ तुका विनवणी करी जाणतियां । बहुमतें वांयां श्रमों नये ॥ ४ ॥

२७५०. पात्र शुद्ध चित्त ग्वाही । नलगे कांहीं सांगणें ॥ १ ॥ शूर तरी सत्य व्हावें । साटी जीवें करूनि ॥ २ ॥ अमुपचि सुखमान । स्वामी जन मानवे ॥ ३ ॥ तुका म्हणे जैसी वाणी । तैसा मनीं परिपाक ॥ ४ ॥

२७५१. साजे अळंकार । तरी भोगितां भ्रतार ॥ १ ॥ व्यभिचारीचा टाकमटिका । उपहास होती लोकां ॥ २ ॥ शूरत्वाची वाणी । रूप मिरवे मंडणीं ॥ ३ ॥ तुका म्हणे जिणें । शर्तीविण लाजिरवाणें ॥ ४ ॥

२७५२. शिष्याची जो नेघे सेवा । मानी देवासारिखें ॥ १ ॥ त्याचा फळे उपदेश । आणिकां दोष उफराटे ॥ २ ॥ त्याचें खरें ब्रह्मज्ञान । उदासीन देहभावीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सत्य सांगें । येवोत रागें येतील ते ॥ ४ ॥

२७५३. न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित । ऐसें परीचे एकएका भावें ॥ १ ॥ धातू पोसोनियां आणिकां उपदेश । अंतरीं तो लेश प्रेम नाहीं ॥ २ ॥ न मनी ते योगी न मनी ते हरिदास । दर्शनें बहुवस बहुतां परीचीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तया नमन बाह्यात्कारी । आवडती परी चित्तशुद्धी ॥ ४ ॥

२७५४. नाहीं पाक होत उफराटे चाली । बोलिली ते केली व्हावी नीत ॥ १ ॥ नाहीं मानूं येत वांजटाचे बोल । कोरडेच फोल चवी नाहीं ॥ २ ॥ तरुवरा आधीं कोठें आहे फळ । चावटा बरळ म्हणा त्यासी ॥ ३ ॥ तुका म्हणे किती ठकलीं तातडी । गव्हीं नाहीं गोडी मांडे पुऱ्या ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२७५५. करावी ते पूजा मनेंचि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥ १ ॥ कळावें तयासी कळे अंतरींचें । कारण तें साचें साच अंगीं ॥ २ ॥ अतिशयाअंती लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजाऐसें ॥ ३ ॥ तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥ ४ ॥

२७५६. मनोमय पूजा । हेचि पढियें केशीराजा ॥ १ ॥ घेतो कल्पनेचे भोग । न मानती बाह्य रंग ॥ २ ॥ अंतरींचे जाणे । आदिवर्तमान खुणें ॥ ३ ॥ तुका म्हणे कुडें । कोठें सरे त्याच्या पुढें ॥ ४ ॥

२७५७. साहोनि टांकीघाये । पाषाण देवचि जाला पाहें ॥ १ ॥ तया रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥ २ ॥ बाण शस्त्र साहोनि गोळी । शूरा ठाव उंच स्थळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सती । अग्न न देखे ज्या रीती ॥ ४ ॥

२७५८. फळाची तो पोटीं । घडे वियोगेंही भेटी ॥ १ ॥ करावें चिंतन । सार तेंचि आठवण ॥ २ ॥ चित्त चित्ता ग्वाही । उपचारें चाड नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । पावें अंतरींची सेवा ॥ ४ ॥

२७५९. खरें बोले तरी । फुकासाठीं जोडे हरि ॥ १ ॥ ऐसे फुकाचे उपाय । सांडोनियां वांयां जाय ॥ २ ॥ परउपकार । एका वचनाचा फार ॥ ३ ॥ तुका म्हणे मळ । मनें सांडिता शीतळ ॥ ४ ॥

२७६०. वेदविहित तुम्ही आइका हो कर्मे । बोलतों तीं वर्में संतांपुढें ॥ १ ॥ चारी वर्ण झाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागी विभागिले ॥ २ ॥ प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥ ३ ॥ आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणीं भिन्न अग्नि एक ॥ ४ ॥ तुका म्हणे मन उन्मन जो होय । तोंवरी हे सोय विधि पाळीं ॥ ५ ॥

२७६१. जुंझायाच्या गोष्टी ऐकतांचि सुख । करितां देहदुःख थोर आहे ॥ १ ॥ तैसी हरिभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥ २ ॥ पिंड पोसिलिया विषयांचा पाइक । वैकुंठनायक कैचा तेथें ॥ ३ ॥ तुका म्हणे व्हावें देहासी उदार । रखुमादेवीवर जोडावया ॥ ४ ॥

२७६२. चित्तीं नाहीं तें जवळी असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥ १ ॥ प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥ २ ॥ तुका म्हणे अवघें फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२७६३. यज्ञनिमित्त शरीरासी बंधन । कां रे तृष्णा वांयांविण वाढविली ॥ १ ॥ नव्हे ते भक्ति परलोकसाधन । विषयांनी बंधन केलें तुज ॥ २ ॥ आशा धरूनि फळाची । तीर्थीं व्रतीं मुक्ती कैंची ॥ ३ ॥ तुका म्हणे शिणसी वांयां । शरण न वजतां पंढरीराया ॥ ४ ॥

२७६४. परद्रव्य परनारीचा अभिळास । तेथोनि हरास सर्व भाग्या ॥ १ ॥ घटिका दिवस मास वर्षें लागे तीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ २ ॥ पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥ ३ ॥ तुका म्हणे एका थडताथवड । काळ लागे नाड परी खरा ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२७६५. आर्तभूतां द्यावें दान । खरें पुण्य त्या नांवें ॥ १ ॥ होणार तें सुखें घडो । लाभ जोडो महाबुद्धि ॥ २ ॥ सत्य संकल्पाचे साटीं । उजळा पोटीं रविबिंब ॥ ३ ॥ तुका म्हणे मनीं वाव । शुद्ध भाव राखावा ॥ ४ ॥

२७६६. पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणिक नाहीं जोडा दुजा यासी ॥ १ ॥ सत्य तोचि धर्म असत्य तें कर्म । आणिक हें वर्म नाहीं दुजें ॥ २ ॥ गति तेचि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखता ॥ ३ ॥ संतांचा संग तोचि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥ ४ ॥ तुका म्हणे उघडे आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२७६७. कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्में निधान हाता चढे ॥ १ ॥ कुळधर्म भक्ति कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांती पाववील ॥ २ ॥ कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनाचे ॥ ३ ॥ कुळधर्म महत्व कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकींचें ॥ ४ ॥ तुका म्हणे कुळधर्म दावी देवीं देव । यथाविध भाव जरी होय ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२७६८. जेणें वाढे अपकीर्ति । सर्वार्थीं तें वर्जावें ॥ १ ॥ सत्य रुचे भलेपण । वचन तें जगासी ॥ २ ॥ होईजेतें शूर त्यागें । वाउगें तें सारावें ॥ ३ ॥ तुका म्हणे खोटें वर्म । निंद्यकर्म काळिमा ॥ ४ ॥

२७६९. भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥ १ ॥ धांवे जाती पाशीं जाती । खुण येरयेरा चित्तीं ॥ २ ॥ हिरा हिरकणी । काढा आतुनि आइरणीं ॥ ३ ॥ तुका म्हणे केलें । मन शुद्ध हें चांगलें ॥ ४ ॥

२७७०. शाहाणिया पुरे एकचि वचन । विशारती खूण तेचि त्यासी ॥ १ ॥ उपदेश असे बहुतांकारणें । घेतला तो मनें पाहिजे हा ॥ २ ॥ फांसावेना तरी दुःख घेतें वाव । मग होतो जीव कासावीस ॥ ३ ॥ तुका म्हणे नको राग धरूं झोंडा । नुघडितां पीडा होईल डोळे ॥ ४ ॥ 

२७७१. नाहीं सुगंधाची लागत लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥ १ ॥ वाऱ्याहातीं माप चाले सज्जनाचें । कीर्ति मुख त्याचें नारायण ॥ २ ॥ प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥ ३ ॥ तुका म्हणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हां ॥ ४ ॥

२७७२. अनुतापें दोष । जाय न लगतां निमिष ॥ १ ॥ परी तो राहे विसावला । आदीं आवसानीं भला ॥ २ ॥ हेंचि प्रायश्चित्त । अनुतापीं न्हाय चित्त ॥ ३ ॥ तुका म्हणे पापा । शिवों नये अनुतापा ॥ ४ ॥ 

२७७३. ढेकरें जेवण दिसें साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंधी ॥ १ ॥ हेही बोल तेही बोल । कोरडें फोल रुचीविण ॥ २ ॥ गव्हांचिया होती परी । फकेवरी खाऊं नये ॥ ३ ॥ तुका म्हणे असे हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥ ४ ॥

२७७४. केलें नाहीं मनीं तया घडें त्याग । उबग उद्वेग नाहीं चित्तीं ॥ १ ॥ देवचि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाह्य रंग ॥ २ ॥ त्यागिल्याचें ध्यान राहिलें अंतरीं । अवघी ते परी विटंबना ॥ ३ ॥ तुका म्हणे आपआपणां विचारा । कोण हा दुसरा सांगे तुम्हां ॥ ४ ॥

२७७५. अन्यायासी राजा न करिता दंड । बहुत ते लंड पीडिती जना ॥ १ ॥ न करितां निगा न काढितां तन । कैंचे येती कण हातासी ते ॥ २ ॥ तुका म्हणे संतां करूं नये अनृत । पाप नाहीं नीत विचारीतां ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२७७६. ऐसी एका अटी । रितीं शिणती करंटी ॥ १ ॥ साच आपुल्या पुरते । करूनि न घेती कांहीं हितें ॥ २ ॥ कां हीं वेचितील वाणी । निरर्थकचि कारणीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । कांहीं समर्पनि सेवा ॥ ४ ॥

२७७७. जळो तें बाह्य सोंग । पडिलिया अंतर व्यंग ॥ १ ॥ कारण तें अंतरलें । म्हणवितां वाईट भलें ॥ २ ॥ तांतडीनें नाशी । तांतडीनेंचि संतोषी ॥ ३ ॥ तुका म्हणे धीर । नाहीं बुद्धि एकी स्थिर ॥ ४ ॥

२७७८. निष्ठुर तो दिसे निराकारपणें । कोंवळा सगुणें प्रतिपाळीं ॥ १ ॥ केलाच करावा केला कइवाड । होईल तें गोड न परते ॥ २ ॥ मथिलिया लागे नवनीत हातां । नासे वितुळतां आहाच तें ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां मनाशीं विचार । करावा तो सार एकचित्तें ॥ ४ ॥

२७७९. भोजन पा शांतीचें । उंच नीच उसाळी ॥ १ ॥ जैशी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिताचा ॥ २ ॥ कल्पना ते देवाविण । न करी भिन्न इतरीं ॥ ३ ॥ तुका म्हणे पावे भूतीं । तें निश्चिती मापली ॥ ४ ॥

२७८०. जीवित्व तें किती । हेंचि धरितां बरें चित्तीं ॥ १ ॥ संत सुमनें उत्तरें । मृदु रसाळ मधुरें ॥ २ ॥ विसांवतां कानीं । परिपाक घडे मनीं ॥ ३ ॥ तुका म्हणे जोडी । होय जतन रोकडी ॥ ४ ॥

२७८१. मायबापें जरी सर्पीण कीं बोका । त्यांचें संगें सुखा नपवे बाळ ॥ १ ॥ चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥ २ ॥ तुका म्हणे नरकीं घाली अभिमान । जरी होय ज्ञानगर्व ताठा ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२७८२. सत्या माप वाढे । गाबाळाची चाली खोडे ॥ १ ॥ उतरे तें कळे कसीं । विखरोन सर्वदेशीं ॥ २ ॥ घरामध्यें राजा । नोहे व्हावी पट्टपूजा ॥ ३ ॥ तुका म्हणे साचें । रूप तें दर्पणींचें ॥ ४ ॥

२७८३. मंगळाचा मंगळ सांठा । विट तोटा नेणें तें ॥ १ ॥ हें भरा सातें आलें । भलें भलें म्हणवावें ॥ २ ॥ जनीं जनार्दन वसे । येथें दिसे तें शुद्ध ॥ ३ ॥ तुका म्हणे बहुतां मुखें । खरें सुखें ठेवावें ॥ ४ ॥

२७८४. वंदिलें वंदावें जीवाचियेसाठीं । किंवा बरी तुटी आरंभीच ॥ १ ॥ स्वहिताची चाड ते ऐका हे बोल । अवघेंचि मोल धीरा अंगीं ॥ २ ॥ शिंपलें तें रोप वरीवरी बरें । वाळलिया पुरे कोंभ नये ॥ ३ ॥ तुका म्हणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥ ४ ॥

२७८५. पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ॥ १ ॥ आपणां आपण हेचि कसवटी । हर्षामर्ष पोटीं विरों द्यावे ॥ २ ॥ नवनीत तोंवरी कडकडी लोणी । निश्चळ होऊनि राहे मग ॥ ३ ॥ तुका म्हणे जरी जगे टाकीघाया । त्याच्या पडे पायां जन मग ॥ ४ ॥

२७८६. एका बोटाची निशाणी । परीपाक नाहीं मनीं ॥ १ ॥ तरी तें संपादिलें सोंग । कारणावांचूनियां व्यंग ॥ २ ॥ वैष्णवांचा धर्म । जग विष्णु नेणें वर्म ॥ ३ ॥ अतिशयें पाप । तुका सत्य करी माप ॥ ४ ॥

२७८७. एका बीजा केला नास । मग भोगिलें कणीस ॥ १ ॥ कळे सकळां हा भाव । लहान थोरांवरी जीव ॥ २ ॥ लाभ नाहीं फुकासाठीं । केल्याविण जीवासाठीं ॥ ३ ॥ तुका म्हणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥ ४ ॥

२७८८. सकळ देवांचें दैवत । उभें असें या रंगांत ॥ १ ॥ रंग लुटा माझे बाप । शुद्ध भावें खरें माप ॥ २ ॥ रंग लुटिला बहुतीं । शुक नारदादि संतीं ॥ ३ ॥ तुका लुटिताहे रंग । साह्य झाला पांडुरंग ॥ ४ ॥

२७८९. सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचेसाठीं विकूं पाहे ॥ १ ॥ पारखी तो जाणें तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ २ ॥ क्षीरा नीरा कैसें होय एक पण । स्वादी तोचि भिन्न भिन्न काढी ॥ ३ ॥ तुका म्हणे थीता आपणचि खोटा । अपमान मोठा पावईल ॥ ४ ॥

२७९०. समर्धासी नाहीं वर्णावर्ण भेद । सामुग्री ते सिद्ध सर्व घरीं ॥ १ ॥ आदराचे ठायीं बहुच आदर । मागीतले फार ते ते वाढी ॥ २ ॥ न म्हणे सुहृद सोयरा अवश्यक । राजा आणि रंक सारिखेची ॥ ३ ॥ भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळेंची ॥ ४ ॥ कोणा न विसंबे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥ ५ ॥ तुका म्हणे पोट भरूनि उरवी । आलें ऐसें दावी अनुभवा ॥ ६ ॥

२७९१. शंख करिशी ज्याच्या नांवें । त्याचें तुज नाहीं ठावें । ऐक सांगतों एका भावें । सांपडे तें घरीं जीवऊनि खावें रे विठ्ठल ॥ १ ॥ टिळे माळा करंडी सोंग । धरूनि चाळविलें जग । पसरी हात नाहीं त्याग । दाविती दगड पुजीती भगल रे विठ्ठल ॥ २ ॥ राख लावुनि अंग मळी । वांयां टोके मी एक बळी । वासने हातीं बांधवी नळी । त्यासी येऊनी काळ गिळी उगळी रे विठ्ठल ॥ ३ ॥ कोण तें राहडीचें सुख । वरते पाय आरतें मुख । करवी पीडा भोगवी दुःख । पडे नरकीं परि न वळेचि मूर्ख रे विठ्ठल ॥ ४ ॥ शिकला फाग मारी हाका । रांडा पोरें मेळवी लोकां । विटंबी शरीर मागें रुका । केलें तें गेलें अवघें फुका रे विठ्ठल ॥ ५ ॥ कळावें जनां मी एक बळी । उभा राहोनी मांडी फळी । फोडोनी गुडघे कोंपर चोळी । आपला घात करोनी आपणचि तळमळी रे विठ्ठल ॥ ६ ॥ फुकट खेळे ठकलीं वांयां । धरूनि सोंगें बोडक्या डोया । शिवों नये ती अंतरीं माया । संपादणीविण विटंबिली काया रे विठ्ठल ॥ ७ ॥ धुळी माती कांहीं खेळोंच नका । जवादी चंदन घ्यावा बुका । आपणा परिमळ आणिकां लोकां । मोलाचा महिमा फजिती ते फुका रे विठ्ठल ॥ ८ ॥ बहुत दुःखी झालियां खेळें । अंगीं बुद्धि नाहीं बळ । पाठीवरी तोबा तोंड काळें । रसना द्रव्य उपस्थाच्या मुळें रे विठ्ठल ॥ ९ ॥ काय सांगतो तें ऐका तुका । मोडा खेळ कांहीं अवगोंच नका । चला जेवूं आधीं पोटीं लागल्या भुका । धाल्यावरी मग बरा टाकमटिका रे विठ्ठल ॥ १० ॥ (धृ. नाही)

२७९२. विषयांचें लोलिंगत । ते फजीत होतील ॥ १ ॥ न सरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळ बीज व्हावें ॥ २ ॥ शिखासूत्र सोंग वरी । दुराचारी दंड पावे ॥ ३ ॥ तुका म्हणे अभिमान । नारायणा न सोसे ॥ ४ ॥

२७९३. ध्याईं अंतरीच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥ १ ॥ विधिनिषेध ऊर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ २ ॥ वाढे तळमळ उभयतां । नाहीं देखिलें अनुभवितां ॥ ३ ॥ आपुलाल्या मतें पिसें । परी तें आहे जैसें तैसें ॥ ४ ॥ साधनाची सिद्धि । मौन करा स्थिर बुद्धि ॥ ५ ॥ तुका म्हणे वादें । वांयां गेलीं ब्रह्मवृंदें ॥ ६ ॥

 २७९४. संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥ धृ. ॥ हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ २ ॥ ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥ ३ ॥ तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला शेटीं विचार त्या ॥ ४ ॥

२७९५. नव्हे ब्रह्मचर्य बाइलेच्या त्यागें । वैराग्य वाउगें देशत्यागें ॥ १ ॥ काम वाढे भय वासनेच्या द्वारें । सांडावें तें धीरें आचावाचा ॥ २ ॥ कांपवूनि टिरी शूरत्वाची मात । केलें वाताहात उचित काळें ॥ ३ ॥ तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मूळ स्तुति होतां ॥ ४ ॥

२७९६. उदंड शाहाणे होती तर्कवंत । परी नेणवेचि अंत विठोबाचा ॥ १ ॥ उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परी नेणवेचि थोरी विठोबाची ॥ २ ॥ तुका म्हणे नाहीं भोळेपणाविण । जाणीव ते शीण रितें माप ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२७९७. नाना मतांतरें शब्दाची व्युत्पत्ति । पाठांतरें होती वाचाळ ते ॥ १ ॥ माझ्या विठोबाचें वर्म आहे दुरी । कैंचि तेथें उरी देहभावा ॥ २ ॥ यज्ञ याग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान आलीकडे ॥ ३ ॥ तुका म्हणे होय उपरति चित्ता । अंगीं सप्रेमता येणें लागे ॥ ४ ॥

२७९८. नाहीं सरों येत जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥ १ ॥ सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येते ॥ २ ॥ काय आगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कसापाशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें करावा उकल । लागेचि ना बोल वाढवूनि ॥ ४ ॥

२७९९. येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥ १ ॥ विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे मग ॥ २ ॥ वाहोनियां भार कुंथसील ओझें । नव्हें तेंचि माझें थीता त्याग ॥ ३ ॥ तुका म्हणे कैसी नाहीं त्याची लाज । संती केशीराज साधियेला ॥ ४ ॥

२८००. लय लक्षूनियां झालों म्हणती देव । तोही नव्हे भाव सत्य जाणा ॥ १ ॥ झालों बहुश्रुत नलगे आतां कांहीं । नको राहूं तेही निश्चिंतीनें ॥ २ ॥ तपें दानें काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढें ॥ ३ ॥ कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथें ॥ ४ ॥ तुका म्हणे जरी होईल निष्काम । तरिच होय राम देखें डोळां ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२८०१. घरोघरीं अवघें झालें ब्रह्मज्ञान । परी मेळवण बहु माजी ॥ १ ॥ निरें कोणापाशीं होय एक रज । तरी द्या रे मज दुर्बळासी ॥ २ ॥ आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दुरोनि दिसतसे ॥ ३ ॥ काम क्रोध लोभ शिणवी बहुत । मेळवूनि आंत काळकूट ॥ ४ ॥ निंदा अहंकार द्वेष बहु फार । माजी वरी धूर सारीयला ॥ ५ ॥ तुका म्हणे तेथें कांहीं हातां नये । आयुष्य मोलें जाय वांयाविण ॥ ६ ॥

२८०२. देखीचें तें ज्ञान करावें तें काई । अनुभव नाहीं आपणासी ॥ १ ॥ इंद्रियांचे गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥ २ ॥ युक्तीचा आहार नीतीचा वेव्हार । वैराग्य तें सार तरावया ॥ ३ ॥ नाव नावलीतां घाला घाली वारा । तैसा तो पसारा अहंतेचा ॥ ४ ॥ तुका म्हणे बुद्धी आपुलें आधीन । करी नारायण आतुडे तों ॥ ५ ॥

२८०३. नव्हे ब्रह्मज्ञान बोलतां हें सिद्ध । जंव हा आत्मबोध नाहीं चित्तीं ॥ १ ॥ काय करिसी वायां लटिकाची पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥ २ ॥ मीच देव ऐसें सांगसी या लोकां । विषयांच्या सुखा टोकोनियां ॥ ३ ॥ अमृताची गोडी पुढिला सांगसी । आपण उपवासी मरोनियां ॥ ४ ॥ तुका म्हणे जरी राहील तळमळ । ब्रह्म तें केवळ सदोदित ॥ ५ ॥

२८०४. ब्रह्मज्ञान जरी एके दिवशीं कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥ १ ॥ अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासें उफराटी दृष्टी केली ॥ २ ॥ जनक भेटीसी पाठविला तेणें । अभिमाननाणें खोटें केलें ॥ ३ ॥ खोटें करूनियां लाविला अभ्यासीं । मेरुशिखरासी शुक गेला ॥ ४ ॥ जाऊनियां तेणें साधिली समाधी । तुका म्हणे तधीं होतों आम्हीं ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२८०५. त्रिपुटीच्या योगें । कांहीं नव्हे कोणाजोगें । एक जातां लागे । एक पाठीं लागतें ॥ १ ॥ मागें पुढें अवघा काळ । पळों नये न चले बळ । करितां कोल्हाळ । कृपे खांदा हरि वाहे ॥ २ ॥ पाप पुण्यात्म्याच्या शक्ती । असती योजिल्या श्रीपती । यावें काकुलती । तेथें सत्तानायका ॥ ३ ॥ तुका उभा पैल थडी । तरि हे प्रकार निवडी । घातल्या सांगडी । ताफे पेटे हाकारी ॥ ४ ॥

२८०६. लापणिकशब्दें नातुडे हा देव । मनींचा गुह्य भाव शुद्ध बोला ॥ १ ॥ अंतरींचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥ २ ॥ तुका म्हणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चित्त शुद्ध भावें ॥ ३ ॥

२८०७. आम्हां हें कौतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥ १ ॥ कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥ २ ॥ अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्ण नाम ऐसे बाण ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें खऱ्याचा विकरा । न सरती येरा खोट्या परी ॥ ४ ॥

२८०८. नका धरूं कोणी । राग वचनाचा मनीं ॥ १ ॥ येथें बहुतांचें हित । शुद्ध करोनि राखा चित्त ॥ २ ॥ नाहीं केली निंदा । आम्हीं दूषिलेंसे भेदा ॥ ३ ॥ तुका म्हणे मज । येणेंविण काय काज ॥ ४ ॥

२८०९. सेवितों हा रस वांटितों आणिकां । घ्यारें होऊं नका रानभरी ॥ १ ॥ विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तोचि एक दानशूर दाता ॥ २ ॥ मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धि याचे पायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥ ४ ॥

२८१०. कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु झाले ॥ १ ॥ द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडेंचि ॥ २ ॥ दंभ करी सोंग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥ ३ ॥ वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । न होती अलिप्त देहाहुनी ॥ ४ ॥ तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२८११. साधक झाले कळी। गुरगुडीची लांब नळी ॥ १ ॥ पचीं पडे मद्यपान । भांगभुर्का हें साधन ॥ २ ॥ अभेदाचें पाठांतर । अति विषयीं पडिभर ॥ ३ ॥ चेल्यांचा सुकाळ । पिंडदंड भगपाळ ॥ ४ ॥ सेवा मानधन । बरें इच्छेनें संपन्न ॥ ५ ॥ सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनियां सोडी ॥ ६ ॥

२८१२. गाजराची पुंगी । तैसें नवे झाले जोगी ॥ १ ॥ काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥ २ ॥ अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान ॥ ३ ॥ तुका म्हणे लंड । त्याचें हाणोनि फोडा तोंड ॥ ४ ॥

२८१३. घालूनियां मध्यवर्ती । दाटुनि उपदेश देती ॥ १ ॥ ऐसे पोटभरे संत । तया कैंचा भगवंत ॥ २ ॥ रांडापोरांते गोविती । वर्षासनें ते लाविती ॥ ३ ॥ जैसे बोलती निरोपणीं । तैसी न करिती करणी ॥ ४ ॥ तुका म्हणे तयां । तमोगुणियांची क्रिया ॥ ५ ॥ 

२८१४. परद्रव्य परनारी । अभिळासुनि नाक धरीं ॥ १ ॥ जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥ २ ॥ सोंवळ्याची स्फीति । क्रोधें विटाळला चित्तीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥ ४ ॥

२८१५. भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥ १ ॥ मनुष्याचे परी बोल रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें ॥ २ ॥ तिमयाचे बैल करी शिकविलें । चित्रींचें बाहुलें गोष्टी सांगे ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा जळो हे महंती । लाज नाहीं चित्तीं निसुगातें ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२८१६. पुराणिक म्हणविती । जाणोनि कांदे ते भक्षिती ॥ १ ॥ आगस्तीचें मूत्र मळ । लावुनि म्हणती कृष्णावळ ॥ २ ॥ श्रेष्ठ वर्ण ब्राह्मणाचा । संग न सुटे शूद्रीचा ॥ ३ ॥ बदराईच्या पाडी दाढा । लागे तुकयाचा हुंदाडा ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२८१७. डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥ १ ॥ तरी ते नव्हती संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ २ ॥ मेळवूनि नरनारी । शकुन सांगे नानापरी ॥ ३ ॥ तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२८१८. कथा करोनियां दावी प्रेमकळा । अंतरीं जिव्हाळा कुकर्माचा ॥ १ ॥ तुळसी खोवी कानीं दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥ २ ॥ टिळे टोपी माळा देवाचें गवाळें । वागवी ओंगळ पोटासाठीं ॥ ३ ॥ गोसाव्याच्या रूपें हेरी परनारी । तयाचे अंतरीं काम लोभ ॥ ४ ॥ कीर्तनाचे वेळीं रडे पडे लोळे । प्रेमेविण डोळे गळताती ॥ ५ ॥ तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । न्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥ ६ ॥ (धृ. नाही)

२८१९. होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥ १ ॥ निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पाहाताती मान  आदराचा ॥ २ ॥ तुका म्हणे ऐसें दांभिक भजन । तया जनार्दन भेटें केवीं ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२८२०. लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोठा करिताती ॥ १ ॥ सर्वांगा करिती विभूती लेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥ २ ॥ तुका म्हणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्या वाद ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२८२१. कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥ १ ॥ घालोनिया फेरा मागती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखती ॥ २ ॥ पोट भरावया शिकती उपाय । तुका म्हणे जाय नरकलोका ॥ ३ ॥ (धृ. नाही )

२८२२. लावूनिया मुद्रा बांधोनियां कंठी । हिंडे पोटासाठीं देशोदेशीं ॥ १ ॥ नेसोनि कोपीन शुभ्रवस्त्र जाण । पाहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥ २ ॥ तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२८२३. होऊनि जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥ १ ॥ शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥ ॥ तुका म्हणे त्यांसी नाहीं शिवभक्ति । व्यापार करिती संसाराचा ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२८२४. टिळा टोपी ऊंच दावी । जगीं मी एक गोसावी ॥ १ ॥ अवघा वरपंग सारा । पोटीं विषयांचा थारा ॥ २ ॥ मुद्रा लाविती कोरोनी । मान व्हावयासी जनीं ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसे किती । नरका गेले पुढें जाती ॥ ४ ॥

२८२५. लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥ १ ॥ खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥ २ ॥ सेवी भांग अफू तंबाखू उदंड । परी तो अखंड भ्रांतीमाजी ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा सर्वस्वें बुडाला । त्यासी अंतरला पांडुरंग ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२८२६. संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥ १ ॥ पडिले दुःखाचे सागरीं । वहावलें भवपुरीं ॥ २ ॥ कामक्रोधलोभ चित्तीं । वरी दाविती विरक्ती ॥ ३ ॥ आशापाशीं बांधोनि चित्त । म्हणती झालों आम्ही मुक्त ॥ ४ ॥ त्यांचे लागले संगती । झाली त्यांसी तेचि गति ॥ ५ ॥ तुका म्हणे शब्दज्ञानें । जग नाडियेलें तेणें ॥ ६ ॥

२८२७. ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधु ॥ १ ॥ अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनि करिती पाप ॥ २ ॥ दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा ॥ ३ ॥ तुका म्हणे सांगों किती । जळो तयांची संगती ॥ ४ ॥

२८२८. कौडीकौडीसाठीं फोडिताती शिर । काढूनि रुधीर मलंग ते ॥ १ ॥ पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्य बळें ॥ २ ॥ तुका म्हणे त्यांचा नव्हेचि स्वधर्म । न कळें तें वर्म गोविंदाचें ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२८२९. ऐसे संत झाले कळीं । तोंडीं तंमाखूची नळी ॥ धृ. ॥ स्नानसंध्या बुडविली । पुढें भांग वोढवली ॥ २ ॥ भांगभुर्का हें साधन । पची पडे मद्यपान ॥ ३ ॥ तुका म्हणे अवघें सोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥ ४ ॥

२८३०. ऐसे नाना भेष घेउनी हिंडती । पोटासाठीं घेती प्रतिग्रह ॥ १ ॥ परमार्थासी कोण त्यजी संसार । सांगा पां साचार नांव त्याचें ॥ २ ॥ जन्मतां संसार त्यजियेला शुकें । तोचि निष्कळंक तुका म्हणे ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२८३१. एक करिती गुरु गुरु । भोंवता भारु शिष्यांचा ॥ १ ॥ पुंस नाहीं पाय चारी । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ २ ॥ परस्त्री मद्यपान । पेंडखाण माजविलें ॥ ३ ॥ तुका म्हणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥ ४ ॥

२८३२. देखोवेखीं करिती गुरु । नाहीं टाउका विचारु ॥ १ ॥ वर्म तें न पडे ठायीं । पांडुरंगाविण कांहीं ॥ २ ॥ शिकों कळा शिकों येती । प्रेम नाहीं कोणा हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सार । भक्ति नेणती गव्हार ॥ ४ ॥

२८३३. तक्र शिष्या मान । दुधा म्हणे नारायण ॥ १ ॥ ऐशीं ज्ञानाचीं डोंबडें । आशा विटंबिलीं मूढें ॥ २ ॥ उपदेश तो जगा । आपण सोंवळा इतका मांगा ॥ ३ ॥ रसनाशिश्नाचे अंकित । तुका म्हणे वरदळ स्फीत ॥ ४ ॥

२८३४. अंगीं घेऊनियां वारें दया देती । तया भक्तां हातीं चोट आहे ॥ १ ॥ देव्हारा बैसोनि हालविती सुपें । ऐसीं पापी पापें लिंपती तीं ॥ २ ॥ एकीबेकीन्यायें होतसे प्रचित । तेणें लोक समस्त भुलताती ॥ ३ ॥ तयांचे स्वाधीन दैवतें असती । तरी कां मरती त्यांचीं पोरें ॥ ४ ॥ तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा । भक्त कान्होबाचा तोहि नव्हे ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२८३५. जगीं कीर्ति व्हावी । म्हणोनि झालासी गोसावी ॥ १ ॥ बहुत केलें पाठांतर । वर्म राहिलें तें दूर ॥ २ ॥ चित्तीं नाहीं अनुताप । लटिकें भगवें स्वरूप ॥ ३ ॥ तुका म्हणे शिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ॥ ४ ॥

२८३६. काहे लकड़ा घांस कटावे । खोद हि जुमीन मठ बनावे ॥ १ ॥ देवलवासी तरुवरछाया । घरघर माई खपरि सबमाया ॥ २ ॥ कां छांडियें भार फेर सीर मागें । मायाको दुःख मिटलिये अंगें ॥ ३ ॥ कहे तुका तुम सुनो हो सिद्धा । रामबिन और झुटा कछु धंदा ॥ ४ ॥ (धृ. नाही) 

२८३७. न कळे ब्रह्मज्ञान आचार विचार । लटिका वेव्हार करितसे ॥ १ ॥ विश्वामित्री पोटीं तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचें ॥ २ ॥ द्रव्यइच्छेसाठीं करितसे कथा । काय त्या पापिष्टा न मिळे खाया ॥ ३ ॥ पोट पोसावया तोंडें बडबडी । नाहीं धडफुडी एक गोष्टी ॥ ४ ॥ तुका म्हणे तया काय व्याली रांड । येउनियां भांड जनामध्यें ॥ ५ ॥ (धृ. नाही )

२८३८. ब्रह्मज्ञान भरोवरी । सांगे आपण न करी ॥ १ ॥ थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ शिणविली वैखरी ॥ २ ॥ कथा करी वरी वरी । प्रेम नसेचि अंतरीं ॥ ३ ॥ तुका म्हणे कवित्व करी । मान लोभ हे अंतरीं ॥ ४ ॥

२८३९. मुखें बोले ब्रह्मज्ञान । मनीं धन आणि मान ॥ १ ॥ ऐशियाची करितां सेवा । काय सुख होय जीवा ॥ २ ॥ पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥ ३ ॥ विरळा ऐसा कोणी । तुका त्यासी लोटांगणी ॥ ४ ॥

२८४०. माया ब्रह्म ऐसें म्हणती धर्मठक । आपणासरीसे लोक नागविले ॥ १ ॥ विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होऊनि फिरें ॥ २ ॥ करूनि खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दुःख पावे ॥ ३ ॥ औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढें ॥ ४ ॥ तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांजट बोलणीं वारा त्याचीं ॥ ५ ॥ तुका म्हणे जयां पिंडाचें पाळण । न घडे नारायण भेटे तयां ॥ ६ ॥ (धृ. नाही)

२८४१. अवघें ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥ १ ॥ नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुलाल्या मती पाषांडिया ॥ २ ॥ जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥ ३ ॥ तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥ ४ ॥

२८४२. जीव तोचि देव भोजन ते भक्ति । मरण तेचि मुक्ति पाषांड्याची ॥ १ ॥ पिंडाच्या पोषकें नागविले जन । लटिकें पुराण केले वेद ॥ २ ॥ मना आला तैसा करिती विचार । म्हणती संसार नाहीं पुन्हां ॥ ३ ॥ तुका म्हणे पाठीं उडती यमदंड । पापपुण्य लंड न विचारिती ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२८४३. शब्दज्ञानी येऊं नेदी दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्त ते ॥ १ ॥ जळो ते जाणीव जळो त्यांचें बंड । जळो तया तोंड दुर्जनाचें ॥ २ ॥ तुका म्हणे येती दाटूनि छळाया । त्यांच्या बोडूं डोया न धरूं भीड ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२८४४. अज्ञानाची भक्ति इच्छिती संपत्ती । तयाचिये चित्तीं बोध कैंचा ॥ १ ॥ अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्यानादेव कैंचा ॥ २ ॥ अज्ञानाचे कर्म फळीं ठेवी मन । निष्काम साधन तया कैंचें ॥ ३ ॥ अज्ञानाचें ज्ञान विषयांवरी ध्यान । ब्रह्म सनातन तया कैंचें ॥ ४ ॥ तुका म्हणे जळो ऐसियांचें तोंड । अज्ञानाचें बंड वाढविती ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२८४५. शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥ १ ॥ पंडित हें ज्ञानी करितील कथा । न मिळती अर्था निजसुखा ॥ २ ॥ तुका म्हणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे ठावी नाहीं वस्तु ॥ ३ ॥

२८४६. उचित न कळे इंद्रियांचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥ १ ॥ आपण जाऊन न्यावें नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ २ ॥ अबोलणें बोले डोळे झांकुनियां । बडबडी वांयां दंभासाठीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणों खरें ॥ ४ ॥

२८४७. पिंडपोषकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥ १ ॥ नाहीं संतचिन्हें उमटलीं अंगीं । उपदेशा लागीं पात्र झाला ॥ २ ॥ पोहों नये कासे लावितो आणिका । म्हणावें त्या मूर्खा काय आतां ॥ ३ ॥ शिणलें तें गेलें शिणलियापासीं । झाली त्या दोघांसी एक गति ॥ ४ ॥ तुका म्हणे अहो देवा दीनानाथा । दरुषण आतां नको त्याचें ॥ ५ ॥

२८४८. कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकारी ज्ञान ॥ १ ॥ त्यासी आतां रिझे कोण । जवळीं जातां चिळसवाणें ॥ २ ॥ प्रेत देह गौरविलें । तैसें विटंबवाणें झालें ॥ ३ ॥ तुका म्हणे खाणें विष्ठा । तैशा देहबुद्धिचेष्टा ॥ ४ ॥

२८४९. घेऊं नये तैसें दान । ज्याचें धन अभिलाषी ॥ १ ॥ तो येथें कामा नये । नरका जाय म्हणोनि ॥ २ ॥ विकी स्नानसंध्या जप । करी तप पुढिलांचें ॥ ३ ॥ तुका म्हणे दांभिक तो । नरका जातो स्वइच्छा ॥ ४ ॥

२८५०. तांतडीची धांव आंगा आणी भाग । खोळंबा तो मग निश्चिंतीचा ॥ १ ॥ म्हणऊनि बरी विचाराची चाली । उरीची ते बोली कामा येते ॥ २ ॥ कोरडें वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगींचें तें ॥ ३ ॥ तुका म्हणे बरी झऱ्याची ते चाली । सांठवण्या खोली कासयाची ॥ ४ ॥

२८५१. लटिक्याचे आवतणें जेविलीया साचे । काय त्या विश्वास तोचि खरा ॥ १ ॥ कोल्हाटिणी लागे आकाशीं खेळत । ते काय पावत अमरपद ॥ २ ॥ जळमंडप्याचे घोडे राउत नाचती । ते काय तगती युद्धालागीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तैसें मतवादीचें जिणें । दिसे लाजिरवाणें बोलतांचि ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२८५२. भगवें तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथें अनुभवाचा काय पंथ ॥ १ ॥ वाढवुनि जटा फिरे दाही दिशा । तरी जंबु वेषा सहज स्थिति ॥ २ ॥ कोरोनिया भूमी करी मध्यें वास । तरी उंदिरास काय वाणी ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसें कासया करावें । देहासी दंडावें वाउगेंचि ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२८५३. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं ॥ १ ॥ बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणे भेटी आपोआप ॥ २ ॥ शिकविलें तैसें नाचावें माकडें । न चले त्यापुढें युक्ति कांहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे करी लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥ ४ ॥

२८५४. जातीचें तें चढें प्रेम । पक्षी स्मरे रामराम ॥ १ ॥ ते काय गुण लागती येरां । कागा न शोभे पिंजरा ॥ २ ॥ शिकविलें तें सुजात सोसी । मग मोल चढे त्यासी ॥ ३ ॥ तुका म्हणे वेषधारी । हिजड्या नव्हती त्या नारी ॥ ४ ॥

२८५५. तांबियाचें नाणे न चलें खऱ्या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं ॥ १ ॥ करणीचें कांहीं न मनें सज्जना । यावे लागे मना वृद्धांचिया ॥ २ ॥ हिरियासारिखा दिसे शिरगोळा । पारखी ते डोळां न पाहाती ॥ ३ ॥ देऊनिया भिंग कमाविलें मोतीं । पारखिया हातीं घेतां नये ॥ ४ ॥ तुका म्हणे काय नटोनियां व्यर्थ । आपुलें हें चित्त आपणा ग्वाही ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२८५६. दुधाचे घागरीं मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥ १ ॥ तैसें खळामुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ २ ॥ काय करावीं तीं बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां गेली ॥ ३ ॥ तुका म्हणे अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैसी संसर्गें ॥ ४ ॥

२८५७. वरी वरी बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाहीं झाली ॥ १ ॥ पराव्याचे भार पाहुनिया दृष्टी । कांपतसें पोटीं थरथरां ॥ २ ॥ मनाचा उदार रायाचा जुंझार । फिरंगीचा मार मारितसे ॥ ३ ॥ धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगीं अनुताप हरिनामें ॥ ४ ॥ तुका म्हणे साधु बोले खर्गधार । खोंचतें अंतर दुर्जनाचें ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२८५८. लटिकी ग्वाही सभेआंत । देतां पतित आगळा ॥ १ ॥ कुंभपाकीं वस्ती करूं । होय धुरु कुळेंसी ॥ २ ॥ रजस्वला रुधिर स्रवे । तेंचि द्यावें तृषेसी ॥ ३ ॥ तुका म्हणे जन्मा आला । काळ झाला कुळासी ॥ ४ ॥

२८५९. चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥ १ ॥ शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें तिच्या ऐसें ॥ २ ॥ तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२८६०. एकाचिये सोई कवित्वाचे बांधे । बांधिलिया साधे काय तेथें ॥ १ ॥ काय हातीं लागे भुसाचे कांडणीं । सत्यासी दाटणी करूनि काय ॥ २ ॥ कवित्वाचे रूढी पायां पडे जग । सुखावोनि मग नरका जाय ॥ ३ ॥ तुका म्हणे देव केल्याविण साहे । फजिती ते आहे लटिक्या अंगीं ॥ ४ ॥

२८६१. कानीं धरी बोल बहुतांचीं मतें । चाट त्यापरतें आणिक नाहीं ॥ १ ॥ पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतांचें ॥ २ ॥ शब्दज्ञानी एक आपुलाल्या मतें । सांगती वेदांत भिन्नभावें ॥ ३ ॥ तुका म्हणे एक भाव न धरिती । पडिली हे माती त्यांचे तोंडीं ॥ ४ ॥

२८६२. भजन हें नासिलें हेंडी । दंभा लंडी आवडी ॥ १ ॥ जेवीत ना आइता पाक । नासी ताक घुसळूनि ॥ २ ॥ एकाएकीं इच्छी पाट । नेणे चाट काउळें ॥ ३॥ तुका म्हणे मुलाम्याचें । बंधन साचें शेवटीं ॥ ४ ॥ 

२८६३. तरी कां वोळगणें । राजद्वारीं होती सुने ॥ १ ॥ अंगीं दावूनि निष्कामता । पोकळ पोकळी ते वृथा ॥ २ ॥ कासया मोकळ । भोंवतें शिष्यांचें गाबाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे ढाळे । बाहेर मुदे तें निराळें ॥ ४ ॥

२८६४. इंद्रियांसी नेम नाहीं । मुखीं राम म्हणोनी काई ॥ १ ॥ जेवी मासीसंगें अन्न । सुख नेदी तें भोजन ॥ २ ॥ कीर्तन करावें । तैसें करूनि दावावें ॥ ३ ॥ हे तों अंगीं नाहीं चिन्हें । गाईलें वेश्येच्या ढव्यानें ॥ ४ ॥ तुका म्हणे रागा । संत शिवूं नेदिती अंगा ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२८६५. गुळें माखोनियां दगड ठेविला । वरी दिसे भला लोकाचारीं ॥ १ ॥ अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसे । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ॥ २ ॥ ऐसिया दांभिकां कैंचि हरिसेवा । नेणेचि सद्भावा कोणे काळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे येणें कैसा होय संत । विटाळलें चित्त कामक्रोधें ॥ ४ ॥

२८६६. चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । गरभार बोभाट जनामध्यें ॥ १ ॥ लटकेची डोहळे दाखवी प्रकार । दूध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥ २ ॥ तुका म्हणे अंतीं वांज तेचि खरी । फजिती दुसरी जनामध्यें ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२८६७. वांझेनें दाविलें गऱ्हवार लक्षण । चिरगुटें घालून वाथयाला ॥ १ ॥ तेवी शब्दज्ञानी करिती चावटी । ज्ञान पोटासाटीं विकूनियां ॥ २ ॥ बोलाचीच कढी बोलाचाची भात । जेवूनियां तृप्त कोण झाला ॥ ३ ॥ कागदीं लिहितां नामाची साखर । चाटितां मधुर गोडी नेदी ॥ ४ ॥ तुका म्हणे जळो जळो ते महंती । नाहीं लाज चित्तीं निसुगाला ॥ ५ ॥

२८६८. व्याल्याविण करी शोभन तांतडी । चार ते गधडी करीतसे ॥ १ ॥ कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसी ॥ २ ॥ कुंथाच्या ढेंकरें न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मळिण वरी ॥ ३ ॥ तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वांव घेऊं ॥ ४ ॥

२८६९. तरलों म्हणुनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फांटा ॥ १ ॥ वांयांविण तुटें दोड । मान सुख इच्छी भांड ॥ २ ॥ गवाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसीं किती । नरका गेलीं अधोगती ॥ ४ ॥

२८७०. जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥ १ ॥ मैथुनाचें सुख सांगितल्या खूण । अनुभवाविण कळों नये ॥ २ ॥ तुका म्हणे जळो शाब्दिक हें ज्ञान । विठोबाची खूण विरळा जाणे ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२८७१. जपाचें निमित्त झोपेचा पसर । देहाचा विसर पाडूनियां ॥ १ ॥ ऐसें तें भजन अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥ २ ॥ सेवेसी विकीलें देहाचिया आसे । तया कोठें असे उरला देव ॥ ३ ॥ तुका म्हणे मानदंभ जया चित्तीं । तयाची फजिती करूं आम्ही ॥ ४ ॥

२८७२. माझी पाठ करा कवी । उठ लावी दारोदार ॥ १ ॥ तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ॥ २ ॥ उष्टावळी करूनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥ ३ ॥ तुका म्हणे बाहेरमुदी । आहाच गोविंदीं न सरती ॥ ४ ॥

२८७३. न मनी नाम नमनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥ १ ॥ भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानीं ॥ २ ॥ नाहीं चाड देवाची कांहीं । छळण टोकें तस्करघाई ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥ ४ ॥

२८७४. मोलें घातलें रडाया । नाहीं असूं आणि माया ॥ १ ॥ तैसा भक्तिवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ २ ॥ वेठी धरिल्या दावी भाव । मागें पळायाचा पाव ॥ ३ ॥ काजव्याच्या ज्योती । तुका म्हणे नलगे वाती ॥ ४ ॥ 

२८७५. उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरीनाथा ॥ १ ॥ अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥ २ ॥ लावी अनुसंधान । कांहीं देईल म्हणवून ॥ ३ ॥ काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ॥ ४ ॥

२८७६. वरि वरि बोला रस । कथी ज्ञाना माजी फोस ॥ १ ॥ ऐसे लटिके जे ठक । तयां इह ना परलोक ॥ २ ॥ परिसे एक सांगे । अंगा धुळीही न लगे ॥ ३ ॥ तुका म्हणे हाडें । कुतऱ्या लाविले झगडे ॥ ४ ॥

२८७७. गांठोळीस धन भाकावी करुणा । दावूनि सज्जना कींव पीडी ॥ १ ॥ नाठेळाची भक्ति कुचराचें बळ । कोरडें वोंगळ मार खाय ॥ २ ॥ सांडोव्यासी घाली देवाची करंडी । विल्हाळ त्या धोंडी पूजा दावी ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसे माकडाचे छंद । अवघे धिंदधिंद शिंदळीचे ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२८७८. मोल देऊनियां सांठवावे दोष । नटाचे ते वेष पाहोनियां ॥ १ ॥ हरिदासां मुखें हरिकथाकीर्तन । तेथें पुण्यापुण्य विशेषता ॥ २ ॥ हरितील वस्त्रे गोपिकांच्या वेषें । पाप त्या सरिसें मात्रागमन ॥ ३ ॥ तुका म्हणे पाहा ऐसे झाले जन । सेवाभक्तिहीन रसीं गोडी ॥ ४ ॥

२८७९. उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥ १ ॥ ऐसे जे पातकी ते नरकीं पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥ २ ॥ तुका म्हणे एका नारायणा ध्याईं । वरकडा वाही शोक असे ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२८८०. पुण्यविकरा तें मातेचें गमन । भाडी ऐसें धन विटाळ तो ॥ १ ॥ आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावें तें नाभी करवी दंड ॥ २ ॥ नागवला अल्प लोभाचिये साठीं । घेऊनि कांचवटि परिस दिला ॥ ३ ॥ तुका म्हणे हात झाडिलें परत्रीं । श्रम तोचि श्रोतीं ठेवी केली ॥ ४ ॥

२८८१. पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणीं विषयांचे ॥ १ ॥ ठेवूनियां लोभीं लोभ । झाला क्षोभ आत्मत्वीं ॥ २ ॥ केला आणिकां वाढी पाक । खाणें ताक मूर्खासी ॥ ३ ॥ तुका म्हणे मोठा घात । वाताहात हा देह ॥ ४ ॥

२८८२. आशाबद्ध वक्ता । भय श्रोतयाच्या चित्ता ॥ १ ॥ गातो तेंचि नाहीं ठावें । तोंड वासी कांहीं द्यावें ॥ २ ॥ झालें लोभाचें मांजर । पोट भरी दारोदार ॥ ३ ॥ वायां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥ ४ ॥ बहिरमुख एके ठायीं । तैसें झालें तया दोहीं ॥ ५ ॥ माप आणि गोणी । तुका म्हणे रितीं दोन्हीं ॥ ६ ॥

२८८३. नाइकावे कानीं तयाचे ते बोल । भक्तीविण फोल ज्ञान सांगे ॥ १ ॥ वाखाणी अद्वैत भक्तिभावेंविण । दुःख पावे शीण श्रोता वक्ता ॥ २ ॥ अहं ब्रह्म म्हणोनि पाळीतसे पिंडा । न बोलावें भांडा तयासवें ॥ ३ ॥ वेदबाह्य लंड बोले जो पाषांड । त्याचें काळें तोंड संतांमध्यें ॥ ४ ॥ तुका म्हणे खंडी देवभक्तपण । वरिष्ठ त्याहून श्वपच तो ॥ ५ ॥

२८८४. पंडित म्हणतां थोर सुख । परी तो पाहतां अवघा मूर्ख ॥ १ ॥ काय करावें घोकिलें । वेदपठण वांयां गेले ॥ २ ॥ वेदीं सांगितलें न करी । सम ब्रह्म नेणे दुराचारी ॥ ३ ॥ हा वेदींचा अनुभव । तुका देखे जीव शिव ॥ ४ ॥

२८८५. जैसें दावी तैसा राहे । तरी कां देव दुरी आहे ॥ १ ॥ दुःख पावायाचें मूळ । राहाणी ठाव नाहीं ताळ ॥ २ ॥ माळामुद्रांवरी । कैंचा सोंगें जोडे हरि ॥ ३ ॥ तुका म्हणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥ ४ ॥

२८८६. वसणें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥ १ ॥ नाहीं देखिला ना ठावा । तोंडपिटीं करी हांवा ॥ २ ॥ फुगतें काउळें । म्हणे मी राजहंसा आगळें ॥ ३ ॥ गजाहूनि खर । म्हणे चांगला मी फार ॥ ४ ॥ मुलाम्याचें नाणें । तुका म्हणे नव्हे सोनें ॥ ५ ॥

२८८७. कोरड्या गोष्टी चावट्या बोल । शिकल्या सांगे नाहीं ओल ॥ १ ॥ कोण याचें मना आणी । ऐकों कानीं नाइकोनि ॥ २ ॥ घरोघरीं सांगती ज्ञान । भूस शीण कांडती ॥ ३ ॥ तुका म्हणे आपुल्या मति । काय रितीं पोकळ ॥ ४ ॥

२८८८. निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट ॥ १ ॥ जटा राख विटंबना । धीर नाहीं क्षमा मना ॥ २ ॥ शृंगारिलें मढें । जीवेंवीण जैसें कुडें ॥ ३ ॥ तुका म्हणे रागे । भलतें चावळें वाउगें ॥ ४ ॥

२८८९. भक्त म्हणवूनि वंचावें तें जीवें । तेणें शेण खावें कशासाठीं ॥ धृ. ॥ नासिलें अडबंद कौपिन माळा । अडचण राउळामाजी केली ॥ २ ॥ अंगीकारिले सेवे घडे अंतराय । तया जाला न्याय खापराचा ॥ ३ ॥ तुका म्हणे कोठें तगों येती घाणी । आहाच ही मनीं अधीरता ॥ ४ ॥

२८९०. कथे उभा अंग राखेल जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥ १ ॥ येथें तो पातकी न येताच भला । रणीं कुचराला काय चाले ॥ २ ॥ कथे बैसोनी आणीक चर्चा । धिग त्याची वाचा कुंभपाक ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐलपैल ते थडीचे । बुडतील साच मध्यभागीं ॥ ४ ॥

२८९१. नावडे ज्यां कथा उठोनियां जाती । ते यमा फावती बरे वोजा ॥ १ ॥ तो असे जवळी गोंचिडाच्यान्यायें । देशत्यागें ठाय तया दुरी ॥ २ ॥ नव्हे भला कोणी नावडे दुसरा । पाहुणा किंकरा यमा होय ॥ ३ ॥ तुका म्हणे तया करावें तें काई । पाषाण कां नाहीं जळामध्यें ॥ ४ ॥

२८९२. जवळीं नाहीं चित्त । काय मांडियेलें प्रेत ॥ १ ॥ कैसा पाहे चंद्रीदृष्टी । दीप स्नेहाच्या शेवटीं ॥ २ ॥ कांतेलेंसे श्वान । तैसें दिशा हिंडे मन ॥ ३ ॥ त्याचे कानीं हाणे । कोण बोंब तुका म्हणे ॥ ४ ॥

२८९३. काय देवापाशीं उणें । हिंडे दारोदारीं सुनें ॥ धृ. ॥ करी अक्षरांची आटी । एके कवडीचेसाठीं ॥ २ ॥ निंदी कोणी स्तवी । चिंतातुर सदा जीवीं ॥ ३ ॥ तुका म्हणे भांड । जळो जळो त्याचें तोंड ॥ ४ ॥

२८९४. ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धि । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥ १ ॥ जयासी नावडे हरिनाम कीर्तन । आणीक नर्तन वैष्णवांचें ॥ २ ॥ सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें कुष्ठ होय ॥ ४ ॥

२८९५. आमुची गोसावी अयाचित वृत्ती । करवी शिष्या हातीं उपदेश ॥ १ ॥ दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥ २ ॥ तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनीं । सोंगसंपादणी करिती परी ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२८९६. भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरी ॥ १ ॥ धिग त्याचें साधुपण । विटाळूनि वर्ते मन ॥ २ ॥ नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जीवीं आस ॥ ३ ॥ हें ना तैसें झालें । तुका म्हणे वांयां गेलें ॥ ४ ॥

२८९७. घरोघरीं झाले कवी । नेणे प्रसादाची चवी ॥ १ ॥ लंडा भूषणांची चाड । पुढें न विचारी नाड ॥ २ ॥ काढावें आइतें । तेंचि जोडावें स्वहितें ॥ ३ ॥ तुका म्हणे कळे । आहाच झांकतील डोळे ॥ ४ ॥

२८९८. कवीश्वरांचा तो आम्हांसी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥ १ ॥ दंभाची आवडी बहिरट अंधळे । शेवटासी काळें होईल तोंड ॥ २ ॥ सोन्याशेजारीं तों लाखेची जतन । सतत ते गुण जैसेतैसे ॥ ३ ॥ सेव्यसेवकता न पडतां ठावी । तुका म्हणे गोवी पावती हीं ॥ ४ ॥

२८९९. जळो तैसा प्रेमरंग । जाय भुलोनि पतंग ॥ धृ. ॥ सासुसाठीं रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ २ ॥ मैंद मुखींचा कोंवळा । भाव अंतरीं निराळा ॥ ३ ॥ जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं नये हातीं ॥ ४ ॥ बक ध्यान धरी । दावी सोंग मत्स्य मारी ॥ ५ ॥ तुका म्हणे सर्प डुले । तैसा कथेमाजी खुले ॥ ६ ॥

२९००. संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥ १ ॥ किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणें हित जवळी तें ॥ २ ॥ माजल्या न कळे उचित तें काय । न द्यावें तें खाय द्यावें सांडी ॥ ३ ॥ तुका म्हणे घेती भिंतीसवें डोकें । वावसी तें एकें अंधारली ॥ ४ ॥

२९०१. अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार ॥ १ ॥ काय करावें तें मौन । दाही दिशा हिंडें मन ॥ २ ॥ बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥ ३ ॥ नाहीं इंद्रियां दमन । काय मांडिला दुकान ॥ ४ ॥ सारविलें निकें । वरि माजी अवघें फिकें ॥ ५ ॥ तुका म्हणे अंतीं । कांहीं नलगेचि हातीं ॥ ६ ॥

२९०२. काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बकाचें ॥ १ ॥ अंतरींची बुद्धि खोटी । भरलें पोटीं वाईट ॥ २ ॥ काय उंदीर नाहीं धांवीं । राख न लावी गाढव ॥ ३ ॥ तुका म्हणे सुसर जळीं । काउळीं कां न न्हाती ॥ ४ ॥ 

२९०३. काय धोविलें कातडें । काळकूट भीतरी कुडें ॥ १ ॥ उगा राहें लोकभांडा । चाळविल्या पोरें रांडा ॥ २ ॥ घेसी बुंथी पानवथां । उगाच हालविसी माथा ॥ ३ ॥ लावूनि बैसे टाळी । मन इंद्रिये मोकळीं ॥ ४ ॥ हालवीत बैसे माळा । विषय जप वेळोवेळां ॥ ५ ॥ तुका म्हणे हा व्यापार । नाम विठोबाचें सार ॥ ६ ॥

२९०४. काय काशी करिती गंगा । भीतरीं चांगा नाहीं तो ॥ १ ॥ अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासी ॥ २ ॥ काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥ ३ ॥ तुका म्हणे प्रेमेंविण । बोले भुंके अवघा शीण ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२९०५. काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥ १ ॥ जया न फळे उपदेश । धस ऐसें त्या नांव ॥ २ ॥ काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥ ३ ॥ तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा डेंग हा ॥ ४ ॥

२९०६. नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥ १ ॥ तैसें चित्त शुद्ध नाहीं । तेथें बोध करील काई ॥ २ ॥ वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंत काळ ॥ ३ ॥ वांझा न होती लेकुरें । काय करावें भ्रतारें ॥ ४ ॥ नपुंसका पुरुषासी । काय करील बाईल त्यासी ॥ ५ ॥ प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥ ६ ॥ तुका म्हणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥ ७ ॥

२९०७. काय दरा करील वन । समाधान नाहीं जंव ॥ १ ॥ तरी काय तेथें असतीं थोडीं । काय जोडी तयांसी ॥ २ ॥ रिघतां धांवा पेंवामधीं । जोडे सिद्धि ते ठायीं ॥ ३ ॥ काय भस्म करील राख । अंतर पाख नाहीं तों ॥ ४ ॥ वर्णआश्रमाचे धर्म । जाती श्रम झालिया ॥ ५ ॥ तुका म्हणे सोंगपाश । निरसे आस तें हित ॥ ६ ॥

२९०८. भोरप्यानें सोंग पालटिलें वरी । बक ध्यान धरी मत्स्या जैसें ॥ १ ॥ टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदी जगीं फासे जैसे ॥ २ ॥ ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फांसा कळों नेदी ॥ ३ ॥ खाटिक हा स्नेहवादें पशू पाळी । कापावया नळी तयासाठीं ॥ ४ ॥ तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परि तूं कृपावंत पांडुरंगा ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२९०९. मांडे पुऱ्या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥ १ ॥ ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ २ ॥ बोलो जाणे अंगीं नाहीं शूरपण । काय तें वचन जाळावें तें ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु तोंडें जे वाचाळ । तें गे तेंचि मूळ लटिक्याचें ॥ ४ ॥

२९१०. आवडीच्या मतें करिती भोजना । भोग नारायणा म्हणती केला ॥ १ ॥ अवघा देव म्हणे वेगळें तें काई । अर्थासाठी डोई फोडूं पाहे ॥ २ ॥ लाजे कमंडलु धरितां भोपळा । आणीक थीगळा प्रावरणासी ॥ ३ ॥ शाला गडवे धातुद्रव्यइच्छा चित्तीं । नैश्वर्य बोलती अवघें मुखें ॥ ४ ॥ तुका म्हणे त्यास देवा नाहीं भेटी । ऐसे कल्पकोटी जन्म घेतां ॥ ५ ॥

२९११. भिक्षापात्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऐसियासी नारायणें । उपेक्षिजे सर्वथा ॥ १ ॥ देवा पायीं नाहीं भाव । भक्ति वरी वरी वाव । समर्पिला जीव । नाहीं तों हा व्यभिचार ॥ २ ॥ जगा घालावे सांकडें । दीन होऊनि बापुडें । हेंचि अभाग्य रोकडें । मूळ आणि अविश्वास ॥ ३ ॥ काय न करी विश्वंभर । सत्य करितां निर्धार । तुका म्हणे सार । दृढ पाय धरावे ॥ ४ ॥

२९१२. आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥ १ ॥ करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ २ ॥ भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥ ३ ॥ तुका म्हणे विषें । अन्न नाशियेलें जैसें ॥ ४ ॥ 

२९१३. वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चिती देव नाहीं ॥ १ ॥ भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ २ ॥ देवपुजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥ ३ ॥ तुका म्हणे फळ चिंतिती आदर । लाघव हे चार शिंदळीचे ॥ ४ ॥

२९१४. तीळ जाळिलें तांदुळ । काम क्रोध तैसेचि खळ ॥ १ ॥ कांरे शिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ २ ॥ मानदंभ पोटासाठीं । केली अक्षरांची अटी ॥ ३ ॥ तप करूनि तीर्थाटण । वाढविला अभिमान ॥ ४ ॥ वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥ ५ ॥ तुका म्हणे चुकलें वर्म । केला अवघाचि अधर्म ॥ ६ ॥

२९१५. वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड ॥ १ ॥ राग आळवितो नाना । गातो काय तें कळेना ॥ २ ॥ आशा धरोनि मनीं । कांहीं देईल म्हणऊनि ॥ ३ ॥ पोटा एका साठीं । तुका म्हणे झाले कष्टी ॥ ४ ॥

२९१६. कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥ १ ॥ कैसीं ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ २ ॥ भूस उपणुनि केलें काय । हारपलें दोन्ही ठाय ॥ ३ ॥ तुका म्हणे लागे हातां । काय मथिलें घुसळितां ॥ ४ ॥

२९१७. काळतोंडा सुना । भलतें चोरुनि करी जना ॥ १ ॥ धिग त्याचें साधुपण । विटाळुनि वर्ते मन ॥ २ ॥ मंत्र ऐसे घोकी । वश व्हावें जेणें लोकीं ॥ ३ ॥ तुका म्हणे थीत । नागवला नव्हे हित ॥ ४ ॥

२९१८. विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड जैसा ॥ १ ॥ वादावाद करणें त्यासी तोंचि वरी । गुखाडीची चाड सरे तोंच बाहेरी ॥ २ ॥ सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठा । चिकरूनि सांडी पायां लागली ते विष्ठा ॥ ३ ॥ नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥ ४ ॥ 

२९१९. एक म्हणती आम्ही देवची पैं झालों । ऐसें नका बोलों पडाल पतनीं ॥ १ ॥ एक म्हणती आम्ही देवाचीं पैं रूपें । तुमचिया बापें न चुके जन्म ॥ २ ॥ देवें उचलीली स्वसुखें मेदिनी । तुमचेनी गोणी नुचलवे ॥ ३ ॥ देवें मारियलें दैत्य दानव मोठे । तुमचेनी न तुटे तृणमात्र ॥ ४ ॥ राया विठोबाचें पद जो अभिळासी । पातकाची राशी तुका म्हणे ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२९२०. गासी तरी एक विठ्ठलची गाईं । नाहीं तरी ठायीं राहें उगा ॥ १ ॥ अद्वैतीं तों नाहीं बोलाचें कारण । जाणीवेचा शीण करिसी वांयां ॥ २ ॥ तुका म्हणे किती करावी फजिती । लाज नाहीं चित्तीं निलाजिरा ॥ ३ ॥

२९२१. मुकें होतां काय पदरींचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण ॥ १ ॥ आपुलिये घरीं मैंद होऊनि बैसे । कोणासीही ऐसे बोलों नको ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्हां सांगतों मी खूण । देवासी तें ध्यान लावुनि बैसा ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२९२२. देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥ १ ॥ तया बरें फावे देवा चुकवितां । संचिताची सत्ता अंतराय ॥ २ ॥ शुद्धाशुद्ध ठाव पापपुण्यबीज । पाववील दुजे फळभोग ॥ ३ ॥ तुका म्हणे विश्वंभरा ऐसें वर्म । चुकलिया धर्म अवघे मिथ्या ॥ ४ ॥

२९२३. जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिलें वरी वरी ॥ १ ॥ अंतरींचें शुद्ध कासयानें झालें । भूषण तों केलें आपणया ॥ २ ॥ वृंदावन फळ घोळिलें साकरा । भीतरील थारा मोडेचि ना ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कासया स्फुंदा तुम्ही ॥ ४ ॥

२९२४. आधारावांचुनि । काय सांगशील काहाणी ॥ १ ॥ ठावा नाहीं पंढरीराव । तोंवरी अवघेंचि वाव ॥ २ ॥ मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रह्मज्ञान ॥ ३ ॥ तुका म्हणे ठेवा । जाणपण एक सवा ॥ ४ ॥

२९२५. काय तीं करावी मोलाचीं माकडें । नाचतातीं पुढें संसाराच्या ॥ १ ॥ झाडा देते वेळे विचकिती दांत । घेती यमदूत दंड वरी ॥ २ ॥ हात दांत कान हलविती मान । दाखविती जन मानावया ॥ ३ ॥ तुका म्हणे किती झालीं हीं फजित । मागें नाहीं मित भार वाही ॥ ४ ॥

२९२६. चोरटे काचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥ १ ॥ नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ २ ॥ बुद्धिहीन नये कांहींचि कारणा । तयासवें जाणा तेंचि सुख ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी तें कर्म वोढवलें ॥ ४ ॥ 

२९२७. सोंगें छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥ १ ॥ सारा अवघें गाबाळ । डोळ्याआडील पडळ ॥ २ ॥ शुद्ध भावावीण । जो जो केला तो तो शीण ॥ ३ ॥ तुका म्हणे कळे । परि होताती अंधळे ॥ ४ ॥

२९२८. असंत लक्षण भूतांचा मत्सर । मनासी निष्ठुर अतिवादी ॥ १ ॥ अंतरींचा रंग उमटे बाहेरी । वोळखे यापरी आपेंआप ॥ २ ॥ संत ते समय वोळखती वेळ । संतुष्ट निर्मळ चित्त सदा ॥ ३ ॥ तुका म्हणे हित उचित अनुचित । मज लागे नित्य विचारावें ॥ ४ ॥ 

२९२९. खोल ओली पडे तें पीक उत्तम । उथळाचा श्रम वायां जाय ॥ १ ॥ लटिक्याचे आम्ही नव्हों सांटेकरी । थीतें घाली भरी पदरींचें ॥ २ ॥ कोण इहलोकीं पाहिजे पसारा । दंभ पोट भरायाचे चाडे ॥ ३ ॥ तुका म्हणे कसीं अगी जे उतरे । तेंचि येथें सरे जाति शुद्ध ॥ ४ ॥

२९३०. अनुभवावांचून सोंग संपादणें । नव्हें हें करणें स्वहिताचें ॥ १ ॥ तैसा नको भुलों बाहिरल्या रंगें । स्वहित तेंचि वेगें करूनि घेईं ॥ २ ॥ बहुरूपी रूपें नटला नारायण । सोंग संपादून जैसा तैसा ॥ ३ ॥ कनक झाड म्हूण वंदियेलें माथां । परि तेहि अर्था न मिळे माजी ॥ ४ ॥ पाषाणाचें नांव ठेवियलें देव । आणिका तारी भाव परि तो तैसा ॥ ५ ॥ तुका म्हणे त्याचा भाव तारी त्यास । अहंभावी नास तोचि पावे ॥ ६ ॥

२९३१. नव्हती हे उसणे बोल । आहाच फोल रंजवण ॥ १ ॥ अनुभव तो वरावरी । नाहीं दुरी वेगळा ॥ २ ॥ पाहिजे तें आलें रुची । काचाकुची काशाची ॥ ३ ॥ तुका म्हणे लाजे आड । त्याची चाड कोणासी ॥ ४ ॥

२९३२. न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरी कळवळ ॥ १ ॥ तों हे चावटीचे बोल । जन रंजवणें फोल ॥ २ ॥ न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥ ३ ॥ तुका म्हणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥ ४ ॥

२९३३. आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा तें समान ॥ १ ॥ काय तया एका साठीं । कामें केलीं अवघीं खोटीं ॥ २ ॥ दर्पण नलगे एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥ ३ ॥ तुका म्हणे खळा । उपदेशाचा कंटाळा ॥ ४ ॥

२९३४. तोचि लटिक्यामाजी भला । म्हणे देव म्यां देखीला ॥ १ ॥ ऐशियाच्या उपदेशें । भवबंधन कैसें नासे । बुडवी आपणासरिसे अभिमानें आणिकांस ॥ २ ॥ आणिक नाहीं जोडा । देव म्हणवी तया मूढा ॥ ३ ॥ आणिकांचें न मनीं साचें । तुका म्हणे या श्रेष्ठांचें ॥ ४ ॥

२९३५. कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥ १ ॥ तेंचि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ २ ॥ तप व्रत करितां लागती सायास । पाळितां पिंडास गोड वाटे ॥ ३ ॥ देव म्हणऊनी न येती देऊळा । संसार वेगळा तरी कां नव्हे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज धरितां गुमान । ऐसें कोणी जन नरका जाती ॥ ५ ॥

२९३६. मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥ धृ. ॥ आचारभ्रष्ट होती लोक कली । पुण्य क्षीण बळी झालें पाप ॥ २ ॥ वर्णधर्म कोणी न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥ ३ ॥ वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांडण ॥ ४ ॥ तुका म्हणे किती करावे फजित । तेचि छंद नित्य बहु होती ॥ ५ ॥

२९३७. उपदेश तो भलत्या हातीं । झाला चित्तीं धरावा ॥ १ ॥ नये जाऊं पात्रावरी । कवटी सार नारळी ॥ २ ॥ स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥ ३ ॥ तुका म्हणे रत्नसार । परी उपकार चिंधीचे ॥ ४ ॥

२९३८. उपकारासाठी केले हे उपाय । येणेंविण काय चाड आम्हां ॥ १ ॥ बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥ २ ॥ तुका म्हणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥ ३ ॥

२९३९. बोलिलों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥ १ ॥ वाट दावी तया नलगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ २ ॥ निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोंभाळितां वरी आंत चरे ॥ ३ ॥ तुका म्हणे हित देखण्यासी कळे । पडती आंधळे कूपामाजी ॥ ४ ॥

२९४०. आतां माझे नका वाणूं गुणदोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥ १ ॥ मानदंभासाठीं छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ॥ २ ॥ तुका म्हणे हें तों ठावें पांडुरंगा । काय कळे जगा अंतरींचें ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२९४१. जन्मा येऊन उदार झाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ति भोगितसे ॥ धृ. ॥ नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां ऐके कानीं ।  बांधे निजोनि डोकियासी ॥ २ ॥ घरा व्याही पाहुणा आला । म्हणे त्याला बरें नाहीं । तुमचे गांवीं वैद्य आहे । बैसोनि काय प्रयोजन ॥ ३ ॥ उजवूं किती होतील पोरें । मरतां बरें म्हणे यांसी । म्हणऊनि देवा नवस करी । दावी घरींहुनि बोनें ॥ ४ ॥ पर्वकाळीं भट घरासी आला । बोंब घाला म्हणे पोरां । तुमचा उणा होईल वांटा । काळ पिठासी पैं आला ॥ ५ ॥ दाढी करितां अडका गेला । घरांत आला बाईलेपें । म्हणे आतां उगवीं मोडी । डोई बोडीं आपुली ॥ ६ ॥ तीर्थ स्वप्नीं नेणें गंगा । पूजन लिंगा गांवीं चिया । आडकुनि दार बैसे दारीं । आल्या घर म्हणे ओस ॥ ७ ॥ माझ्या भय वाटे चित्तीं । नरका जाती म्हणोनि । तुका म्हणे ऐसे आहेत गा हरि । याही तारी जीवांसी ॥ ८ ॥

२९४२. सोयरिया करी पाहुणेरु बरा । कांडितो ठोमरा संतालागीं ॥ १ ॥ गाईसी देखोनी बदबदा मारी । घोड्याची चाकरी गोड लागे ॥ २ ॥ फुलेंपानें वेश्येसी नेतसे उदंड । देऊं नेदी खांड सज्जनासी ॥ ३ ॥ बाइलेच्या गोता आवडीनें पोसी । मातापितयांसी दवडुनी ॥ ४ ॥ तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२९४३. साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥ १ ॥ वेश्या दासी मुरळी जगाची वोवळी । ते तुज सोंवळी वाटे कैसी ॥ २ ॥ तुका म्हणे आता लाज धरीं बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२९४४. क्षुधा तृषा कांहीं सर्वथा नाठवे । पहावया धांवें कोल्हांटासी ॥ १ ॥ कथेसी साक्षेपें पाचारिलें जरी । म्हणे माझ्या घरीं कोणी नाहीं ॥ २ ॥ बलात्कारें जरी आणिला कथेसी । निद्रा घे लोडासी टेंकूनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२९४५. देवाचिया वस्त्रा स्वप्नींही नाठवी । स्त्रियेसी पाठवी उंच साडी ॥ १ ॥ गाईचे पाळण नयेचि विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥ २ ॥ लेंकराची गांड स्वये धावे क्षाळूं । न म्हणे प्रक्षाळूं संतपाय ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याच्या ताेंडावरी थुंका । जाता यमलोका भोगावया ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२९४६. उरा लावी ऊर आळंगितां कांता । संतांसी भेटतां अंग चोरी ॥ १ ॥ अतीत देखीनि होय पाठिमाेरा । व्याह्यासी सामोरा जाय वेगीं ॥ २ ॥ संता नमस्कारा मनीं भाव कैंचा। तुर्कांचे दासीचा लेंक होय ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणी ॥ ४ ॥ ( धृ. नाही)

२९४७. बाइल तरी ऐसी व्हावी । नरकीं गाेवी अनिवार ॥ १ ॥ घडों नेदी तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥ २ ॥ आपुलीच करवी सेवा । पुजवी देवासारिखें ॥ ३ ॥ तुका म्हणे गाढव पशु । केला नाशु आयुष्याचा ॥ ४ ॥

२९४८. बाइले आधीन होय ज्यांचे जिणें । तयाच्या अवलोकनें पडिजे द्वाड ॥ १ ॥ कासया ते जंत जिताती संसारीं । माकडाच्या परी गारोड्यांच्या ॥ २ ॥ बाइलेच्या मना येईल तें खरें । अभागी तें पुरें बाइलेचें ॥ ३ ॥ तुका म्हणे मेंग्या गाढवाचें जिणें । कुतऱ्याचें खाणे लगबगा ॥ ४॥

२९४९. धिग जिणें तो बाईले आधीन । परलोक मान नाहीं दोन्ही ॥ १ ॥ धिग जिणें ज्याचें लोभावरी मन । अतीतपूजन घडेचिना ॥ २ ॥ धिग जिणें आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥ ३ ॥ धिग जिणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणां ॥ ४॥ तुका म्हणे धिग ऐसे झाले लोक । निंदक वादक नरका जातो ॥ ५ ॥ (धृ. नाही) 

२९५०. सुखें वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥ १ ॥ आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा म्हणे भिडा ॥ २ ॥ अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तूप पथ्या ॥ ३ ॥ दो प्रहरा मज लहरी येती । शुद्ध नाहीं पडे सुपती ॥ ४ ॥ नीज नये खालीं घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥ ५ ॥ अंगीं चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥ ६ ॥ निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥ ७ ॥ गेलें वारीं तुम्ही आणिली साकर । सात दिवस गेली साडेदहा शेर ॥ ८ ॥ हाड गळोनि आलें मांस । माझें दुःख तुम्हां नेणवे कैसें ॥ ९ ॥ तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरी नरका नेला ॥ १० ॥

२९५१. भ्रतारासी भार्या बोले गुजगोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥ धृ. ॥ अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ २ ॥ जोडीतसां तुम्ही खाती येरचोरें । माझीं तंव पोरें हळहळती ॥ ३ ॥ तुमची व्याली माझे डाईं हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥ ४ ॥ दुष्टवृत्ति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥ ५ ॥ भावा दीर कांहीं धड हा न बोले । नांदों कोणा खालें कैसी आतां ॥ ६ ॥ माझ्या अंगसंगें तुम्हांसी विश्रांती । मग धड गति नाहीं तुमची ॥ ७ ॥ ठाकतें ठुमकतें जीव मुठी धरूनि । परि तुम्ही अजूनि न धरा लाज ॥ ८ ॥ वेगळें निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥ ९ ॥ तुका म्हणे झाला कामाचा अंकित । सांगे मनोगत तैसा वर्ते ॥ १० ॥

२९५२. कामाचा अंकित कांतेतें प्रार्थित । तूं कां हो दुश्चित निरंतर ॥ धृ. ॥ माझीं मायबापें बंधु हो बहिणी । तुज करिती शीण त्यागीन मी ॥ २ ॥ त्यांचें जरी तोंड पाहेन मागुता । तरी मज हत्या घडो तुझी ॥ ३ ॥ सकाळीं उठोन वेगळा निघेन । वाहातों तुझी आण निश्चयेंसि ॥ ४ ॥ वेगळे निघता घडीन दोरे चुडा । तूं तंव माझा जोडा जन्माचा कीं ॥ ५ ॥ ताईत सांखळी गळाची दुलडी । बाजूबंदजोडी हातसर ॥ ६ ॥ वेणीचे जे नग सर्वही करीन । नको धरूं सीण मनीं कांहीं ॥ ७ ॥ नेसावया साडी सेलारी चुनडी । अंगींची कांचोळी जाळिया फुलें ॥ ८ ॥ तुका म्हणे केला रांडेनें गाढव । मनासवें धांव घेतलीसे ॥ ९ ॥

२९५३. एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥ १ ॥ पाप नलगे धुंडावें । लागेल तेणें तेथें जावें ॥ धृ. ॥ कांहीं दुसरा विचार । नलगे करावाची फार ॥ ३ ॥ असत्य जे वाणी । तेथें पापाचीच खाणी ॥ ४ ॥ सत्य बोलें मुखें । तेथें उचंबळती सुखें ॥ ५ ॥ तुका म्हणे दोन्ही । जवळीच लाभहानी ॥ ६ ॥ ( या अभंगातील ५ व ६ चरणांना धृ. नाही )

२९५४. बाईल सवासीण आई । आपण पितरांचे ठायीं ॥ १ ॥ थोर वेच झाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ २ ॥ विषयांचे चर्वणीं । केली आयुष्याची गाळणी ॥ ३ ॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥ ४ ॥

२९५५. दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नर्कद्वारीं ॥ १ ॥ ऐसें सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥ २ ॥ बरें विचारूनी पाहें । तुज अंतीं कोण आहे ॥ ३ ॥ तुका म्हणे रांडलेंका । अंतीं जासी यमलोकां ॥ ४ ॥

२९५६. परिसें गें सुनेबाई । नको वेचूं दूध दहीं ॥ १ ॥ आवा चालिली पंढरपुरा । वेशीपासुनि आली घरा ॥ २ ॥ ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटकें पाळें ॥ ३ ॥ माझे हातींचा कलवडू । मजवांचूनि नको फोडूं ॥ ४ ॥ वळवटक्षिरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ॥ ५ ॥ उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ॥ ६ ॥ भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ॥ ७ ॥ भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरूं सारूं ॥ ८ ॥ सून म्हणे बहुत निकें । तुम्हीं यात्रेसी जावें सुखें ॥ ९ ॥ सासूबाई स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ॥ १० ॥ सूनमुखींचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं ॥ ११ ॥ सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेंसें इला वाटे ॥ १२ ॥ आतां कासया यात्रे जाऊं । काय जाउनि तेथे पाहूं ॥ १३ ॥ मुलें लेंकरें घरदार । माझें येथेंचि पंढरपूर ॥ १४ ॥ तुका म्हणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ॥ १५ ॥

२९५७. पतिव्रतेची कीर्ति वाखाणितां । शिंदळीच्या माथां तिडिक उठे ॥ १ ॥ आमुचें तों आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केंलें कोणीं ॥ २ ॥ अंगें उणें बैसे त्याच्या टाळक्यांत । तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हीं काय करणें त्यासी । धका खवंदासी लागतसे ॥ ४ ॥

२९५८. जातीची शिंदळी । तिला कोण कैसा बळी ॥ १ ॥ आपघर ना बापघर । चिंती मनीं व्यभिचार ॥ २ ॥ शेजे असोनिया धणी । परद्वार मना आणी ॥ ३ ॥ तुका म्हणे अस्सल जाती । जातीसाठीं खाती माती ॥ ४ ॥

२९५९. पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारी ते ॥ १ ॥ भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं मन संभ्रम तो ॥ २ ॥ तुका म्हणे तिच्या दोषा नाहीं पार । भोगील अघोर कुंभपाक ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२९६०. सिंदळीस नाहीं पोराची पैं आस । राहे बीज त्यास काय करी ॥ १ ॥ अथवा शेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देईल कोण काका त्याचा ॥ २ ॥ तुका म्हणे नाहीं राखायाची चाड । तरी कां लिगाड करूनि घेतो ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२९६१. शिंदळीचें चित्त परपुरुषावरी । पति चुरमुरी रात्रंदिवस ॥ १ ॥ ऐसी तें वोंगळी जाय हो नरका । तिच्या दोषे देखा पति जाय ॥ २ ॥ आपण बुडती पति बुडविती । दोन्ही कुळ नेती अध:पाता ॥ ३ ॥ तुका म्हणे तिची न करावी संगती । होईल फजिती मागें पुढें ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२९६२. संत मागे पाणी नेदी एक चूळी । दासीस आंघोळी ठेवी पाणी ॥ १ ॥ संतांसी देखोनी होय पाठीमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ २ ॥ संतांसी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२९६३. दगडाच्या देवा बगाडी नवंस । बाईल कथेस जाऊं नेदी ॥ १ ॥ वेची धनराशी बांधिलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी ॥ २ ॥ चोरें नागविला न करी त्याची खंती । परी साधू हातीं नेदी रुका ॥ ३ ॥ करी पाहुणेर व्याह्याजांवयासी । आल्या अतीतासी पाठीमोरा ॥ ४ ॥ तुका म्हणे जळो धिग त्याचें जिणें । भार वाही शीण धरातळीं ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२९६४. गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा ॥ १ ॥ कैंचें पुण्य तिये गांठीं । व्रतें वेची लोभासाठीं ॥ २ ॥ वाढावें संतान । गृहीं व्हावें धनधान्य ॥ ३ ॥ मागे गारगोटी । परिमाचीये साटोवाटी ॥ ४ ॥ तुका म्हणे मोल । देऊन घेतला सोमल ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२९६५. गर्भाचें धारण । तिनें वागविला शीण ॥ १ ॥ व्याली कुऱ्हाडीचा दांडा । वर न घलीच तोंडा ॥ २ ॥ उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जाये । नरका अभक्ताची माय ॥ ४ ॥

२९६६. देखोनि हरखलीं अंड । पुत्र झाला म्हणे रांड । तंव तो झाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥ १ ॥ जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुंका । थोर झाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ २ ॥ भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाची शरीरें । बोले निष्ठुर उत्तरें । पापदृष्टि मळिण चित्त ॥ ३ ॥ दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ । तुका म्हणे खळ । म्हणोनियां निषिद्ध तो ॥ ४ ॥

२९६७. पुत्र झाला चोर । मायबापां हर्ष थोर ॥ १ ॥ आतां काशासाठीं जोडी । हाट धांटे गुंडगे घडी ॥ २ ॥ आइते अपहार । आणूनियां भरी घर ॥ ३ ॥ मानिली निश्चिंती । नरका जावया उभयतीं ॥ ४ ॥ झोंडा झोंडगीचे पोटीं । फळें विजाती करंटीं ॥ ५ ॥ तुका म्हणे बेट्या । भांडवल नलगे खट्या ॥ ६ ॥

२९६८. ऐसे कुळीं पुत्र होती । बुडविती पूर्वजां ॥ १ ॥ चाहाडी चोरी भांडवला । वांटा आला भागासी ॥ २ ॥ त्याचियानें दुःखी मही । भार तेही न साहे ॥ ३ ॥ तुका म्हणे ग्रामपशु । केला नाशु आयुष्या ॥ ४ ॥

२९६९. आहाकटा त्याचें करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र झाला ॥ १ ॥ गळेचिना गर्भ नव्हेचि कां वांज । माता त्याची लाज लावा पापी ॥ २ ॥ परपीडे परद्वारीं सावधान । सादरचि मन अभाग्याचें ॥ ३ ॥ न मिळतां निंदा चाहडी उपवास । संग्रहावे दोष सकळही ॥ ४ ॥ परउपकार पुण्य त्या वावडें । विषाचें तें किडें दुग्धीं मरे ॥ ५ ॥ तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥ ६ ॥

२९७०. जळो तिचे तोंड । ऐसी कां तें व्याली रांड ॥ १ ॥ सदा भोंवयासी गांठी । क्रोध धडधडीत पोटीं ॥ २ ॥ फोडिली गोंवरी । ऐसी दिसे तोंडावरी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥ ४ ॥

२९७१. देवें दिला देह भजना गोमटा । तो या झाला फांटा बाधिकेचा ॥ धृ. ॥ ताठोनियां मान राहिली वरती । अहंकारा हातीं लवों नेदी ॥ २ ॥ दास म्हणावया न वळे रसना । सइर वचना वासगळे ॥ ३ ॥ तुका म्हणे कोठें ठेवावा विटाळ । स्नानेंचि निर्मळ व्हावयासी ॥ ४ ॥

२९७२. मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां ॥ १ ॥ नको जाऊं देउळासी । नेतो बागुल लोकांसी ॥ २ ॥ वैष्णवांसंगती । हातीं पडलीं नेणों किती ॥ ३ ॥ कर्णद्वारें पुराणिक । भुलवी शब्दें लावी भीक ॥ ४ ॥ आम्हां कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥ ५ ॥ तुका म्हणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥ ६ ॥

२९७३. काय करूं पोरा लागली चट । धरी वाट देउळाची ॥ १ ॥ सांगितलें नेघे कानीं । दुजें मनीं विठ्ठल ॥ २ ॥ काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुश्चित ॥ ३ ॥ आमचें कुळीं नव्हतें ऐसें । हेंच पिसें निवडलें ॥ ४ ॥ लौकिकाची नाहीं लाज । माझे मज पारिखें ॥ ५ ॥ तुका म्हणे नरका जाणें । या वचनें दुष्टांचीं ॥ ६ ॥ (धृ. नाही)

२९७४. कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥ १ ॥ गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥ २ ॥ आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ॥ ३ ॥

२९७५. साळंकृत कन्यादान । पृथ्वीदानाच्या समान ॥ १ ॥ परि तें न कळे या मूढा । येईल कळों भोग पुढां ॥ २ ॥ आचरतां कर्म । भरे पोट राहे धर्म ॥ ३ ॥ सत्या देव साहे । ऐसें करूनियां पाहें ॥ ४ ॥ अन्न मान धन । हें तों प्रारब्धाआधीन ॥ ५ ॥ तुका म्हणे सोसे । सुख आतां पुढें नासें ॥ ६ ॥

२९७६. ब्रह्महत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केलें ॥ १ ॥ ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुण्याचे ॥ २ ॥ नरमांस खादली भाडी । हाका हाडी म्हणोनी ॥ ३ ॥ अवघें पाप केलें तेणें । जेणें सोनें अभिळासिलें ॥ ४ ॥ उच्चारितां मज तें पाप । जिव्हें कांप सुटतसे ॥ ५ ॥ तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागेना कां ॥ ६ ॥

२९७७. हातीं होन दाविती बेणा । करिती लेकींची धारणा ॥ १ ॥ ऐसे धर्म झाले कलीं । पुण्य रंक पाप बळी ॥ २ ॥ सांडिले आचार । द्विज चाहाड झाले चोर ॥ ३ ॥ टिळे लपविती पातडी । लेती विजार कातडीं ॥ ४ ॥ बैसोनियां तक्तां । अन्योविण पिडिती लोका ॥ ५ ॥ मुदबख लिहिणें । तेल तूप साबण केणें ॥ ६ ॥ नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥ ७ ॥ राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥ ८ ॥ वैश्यक्षूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥ ९ ॥ अवघे बाह्य रंग । आंत हिरवें वरी साेंग ॥ १० ॥ तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥ ११ ॥

२९७८. एक ब्रह्मचारी गाढवा झोंबतां । हाणोनियां लाता पळालें तें ॥ १ ॥ गाढवही गेलें ब्रह्मचर्य गेलें । तोंड काळें झालें जगामाजी ॥ २ ॥ हें ना तैसें झालें हें ना तैसें झालें । तुका म्हणे गेलें वांयांचि तें॥ ३ ॥ (धृ. नाही)

२९७९. कुंकवाची ठेवाठेवी । बोडक्या देवी कशाला ॥ १ ॥ दिवस गमा भरा पोट । कां गे नट नटावा ॥ २ ॥ दिमाख हा कोणां दावा । लटकी जीवा चरफड ॥ ३ ॥ तुका म्हणे झोंडगी हो । फुंदा कां हो कोरडी ॥ ४ ॥

२९८०. हरीचे नाम कदा काळीं कां रे नये वाचे । म्हणतां राम राम तुझ्या बाचे काय वेचे ॥ ६ ॥ पोटासाठीं खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणता तुझी बसली दांतखीळ ॥ २ ॥ द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जातां तुझी जड झाली माती ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐशा जीवा काय करूं आतां । राम राम न म्हणे त्याचा गाढव मातापिता ॥ ४ ॥ 

२९८१. देह जाईल जाईल । यासी काळ बा खाईल ॥ १ ॥ कां रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥ २ ॥ लाेडें बालिस्तें सुपती । जरा आलिया फजिती ॥ ३ ॥ शरीरसंबंधाचे नातें । भोरड्या बुडविती शेतातें ॥ ४ ॥ अझुनि तरी होईं जागा । तुका म्हणे पुढें दगा ॥ ५ ॥

२९८२. आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारीं संसाराच्या ॥ १ ॥ नेईल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुश्चिता हरिविण ॥ २ ॥ कठिण हें दुःख यम जाचतील । कोण सोडवील तया ठायीं ॥ ३ ॥ राहतील दुरी सज्जन सोयरीं । आठवी श्रीहरी लवलाहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे किती करिसी लंडायी । होईल भंडाई पुढें थोर ॥ ५ ॥

२९८३. जन्मा येऊनि काय केलें । तुवां मुद्दल गमाविलें ॥ कां रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखाेरा ॥ २ ॥ केली गाठोळीची नासी । पुढें भीकचि मागसी ॥ ३ ॥ तुका म्हणे ठाया । जाई आपुल्या आलिया ॥ ४ ॥

२९८४. रंगी रंगेरें श्रीरंगें । काय भुललासी पतंगें ॥ १ ॥ शरीर जायाचें ठेवणें । धरिसी अभिळास झणें ॥ २ ॥ नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥ ३ ॥ अंतकाळींचा साईरा । तुका म्हणे विठो धरा ।।४।।

२९८५. नको बोलों भांडा । खीळ घालून बैसे ताेंडा ॥ २ ॥ ऐकें विठोबाचे गुण । करीं सादर श्रवण ॥ २ ॥ प्रेमसुखा आड । काय वाजतें चाभाड ॥ ३ ॥ तुका म्हणे हिता । कां रे नागविसी थीता ॥ ४ ॥

२९८६. पंधरा दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥ धृ. ॥ काय तुझा जीव जाताे एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ २ ॥ स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचें ॥ ३ ॥ थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥ ४ ॥ तुका म्हणे कां रे सुकुमार झालासी । काय जाब देसी यमदूतां ॥ ५ ॥

२९८७. एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥ १ ॥ काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ २ ॥ हरिहरासी नाहीं बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होईल नेणों ॥ ४ ॥

२९८८. धर्म तो न कळे । काय झांकियले डोळे ॥ १ ॥ जीव भ्रमले या कामें । कैसीं कळो येती वर्मे ॥ २ ॥ विषयांचा माज । कांहीं धरूं नेदी लाज ॥ ३ ॥ तुका म्हणे लांसी । माया नाचविते कैसी ॥ ४ ॥

२९८९. किती वेळां खादला दगा । अझून कां गा जागसी ना ॥ १ ॥ लाज नाहीं हिंडतां गांवें । दुःख नवें नित्य नित्य ॥ २ ॥ सव चोरा हातीं फांसे । देखतां कैसे न देखसी ॥ ३ ॥ तुका म्हणे सांडिती वाट । तळपट करावया ॥ ४ ॥

२९९०. पैल घरीं झाली चोरी । देहा करी बोंब ॥ १ ॥ हांवा हांवा करिसी काय । फिराऊनि नेट्यां वाय ॥ २ ॥ सांडुनियां शुद्धी । निजलासी गेली बुद्धि ॥ ३ ॥ चोरीं तुझा काढिला बुर । वेगळें भावा घातला दूर ॥ ४ ॥ भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥ ५ ॥ तुका म्हणे अजुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥ ६ ॥

२९९१. वितीयेवढेंसें पोट । केवढा बोभाट तयाचा ॥ १ ॥ जळो त्याची विटंबना । भूक जना नाचवी ॥ २ ॥ अभिमाना शिरीं भार । झाले खर तृष्णेचे ॥ ३ ॥ तुका म्हणे नरका जावें । हाचि जीवें व्यापार ॥ ४ ॥

२९९२. शूरां साजती हतियारें । गांढ्यां हांसतील पोरें ॥ १ ॥ काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ २ ॥ पतिव्रते रूप साजे । शिंदळ काजळ लेतां लाजे ॥ ३ ॥ दासी पत्नी सुता । नव्हे सरी एकचि पिता ॥ ४ ॥ मान बुद्धिमंतां । थोर न मानिती पिता ॥ ५ ॥ तुका म्हणे तरी । आंत शुद्ध दंडे वरी ॥ ६ ॥

२९९३. अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुद्धि ॥ १ ॥ काय म्हणावें तयासी । तो केवळ पापरासी ॥ २ ॥ जो स्मरे रामनामा । त्यासी म्हणती रिकामा ॥ ३ ॥ तीर्थव्रत करी । यासी म्हणताती भिकारी ॥ ४ ॥ तुका म्हणे विंचाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं ॥ ५ ॥

२९९४. जयासी नावडे वैष्णवांचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरीचा ॥ १ ॥ अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाहीं जया ॥ २ ॥ मंजुळवदनीं बचनागाची कांडी । शेवटी विघडी जीवप्राणा ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्याचा पिता नाहीं शुद्ध । तयासी गोविंद अंतरला ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२९९५. पापिया चांडाळा हरिकथा नावडे । विषयी आवडे गाणें त्याला ॥ १ ॥ साधूसंता भोजना देतां रडे रुका । विषयालागीं फुका लुटी धन ॥ २ ॥ वीतभरि लंगोटी नेदी अतिताला । भोरप्यासी शाला वांटीतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२९९६. कांडिल्या कुटिल्या होतो मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥ १ ॥ राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ २ ॥ तरटापुढें बरें नाचे । सुतें काचें मुसळ ॥ ३ ॥ तुका म्हणे काठी सार । करी फार शाहाणें ॥ ४ ॥

२९९७. देवाचें चरित्र नाठवे सर्वथा । विनोदाची कथा गोड वाटे ॥ १ ॥ हातावरी हात हासोनि आफळी । वाजवितां टाळी लाज वाटे ॥ २ ॥ तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२९९८. भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥ धृ. ॥ करितां नव्हे नीट श्वानाचे हे पुंस । खापरा परीस काय करी ॥ २ ॥ निंबाचिया झाडा साखरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ॥ ३ ॥ तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥ ४ ॥

२९९९. एवढी अपकीर्ति । ऐकोनियां फजिती ॥ १ ॥ जरि दाविल वदन । थुंका थुंका तो देखोन ॥ २ ॥ काळिमेचें जिणें । जीवोनियां राहे सुनें ॥ ३ ॥ तुका म्हणे गुण । दरुषणें अपशकून ॥ ४ ॥

३०००. सूकरासी विष्ठा माने सावकाश । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥ १ ॥ तेवीं अभक्तासी आवडे पाखांड । न लगे त्या गोड परमार्थ ॥ २ ॥ श्वानासी भोजन दिलें पंचामृत । तरी त्याचें चित्त हाडावरी ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्पा पाजिलीया क्षीर । वमितां विखार विष जालें ॥ ४ ॥

३००१. आपुलें वेचूनि खोडा घाली पाव । ऐसा तो हा जीव हीनबुद्धि ॥ १ ॥ विषयांच्या संगे आयुष्याचा नाश । पडियलें ओस स्वहिताचें ॥ २ ॥ भूलल्याचे अंग आपणा पारिखें । छंदाच सारिखें वर्ततसे ॥ ३ ॥ तुका म्हणे दुःख उमटे परिणामी । लंपटासी कामीं रतलिया ॥ ४ ॥

३००२. आंधळ्यांसि जन अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥ १ ॥ रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । ताेंडासि कारण चवी नाहीं ॥ २ ॥ तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन सर्व खोटे ॥ ३ ॥ (धृ. नाही)

३००३. शब्दां नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥ १ ॥ त्याचें न व्हावें दर्शन । खळा पंगती भोजन ॥ २ ॥ संतांसी जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥ ३ ॥ तुका म्हणे पोटीं । भाव आणीक जया ओंठीं ॥ ४ ॥

३००४. अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥ १ ॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मनी जाे ॥ २ ॥ तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥ ३ ॥

३००५. नव्हे आराणूक संसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥ १ ॥ देवधर्म सांदीं पडिले सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ २ ॥ रात्रंदिवस न पुरे कुटुंबीं समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥ ३ ॥ तुका म्हणे आत्महत्यारे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥ ४ ॥

३००६. किती सांगों तरी नाइकती बटकीचे । पुढें सिंदळीचे रडतील ॥ १ ॥ नका नका करूं रांडेची संगती । नेईल अधोगती घाली यम ॥ २ ॥ तुका म्हणे जरी देवीं नाहीं चाड । हाणोनि थोबाड फोडी काळ ॥ ३ ॥ (धृ. नाही)

३००७. उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥ १ ॥ शुद्ध कां वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणें ॥ २ ॥ नाहीं भाव मनीं नाइके वचन । आपल्या आपण नाडियेलें ॥ ३ ॥ तुका म्हणे त्यासी काय व्याली रांड । करी बडबड रात्रंदिवस ॥ ४ ॥

३००८. गातां आइकतां कंटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकी ॥ १ ॥ रागें यमधर्म जाचवितो तया । तुज दिलें कासया मुख कान ॥ २ ॥ विषयांच्या सुखें अखंड जागसी । न वजे एकादशी जागरणा ॥ ३ ॥ वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥ ४ ॥ तीर्थाटण नाहीं केले उपकार । पाळिलें शरीर पुष्ट लोभें ॥ ५ ॥ तुका म्हणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥ ६ ॥

३००९. जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥ १ ॥ कैसा जालासे बेश्रम । लाज नाहीं न म्हणे राम ॥ २ ॥ पाहे वैरियाकडे । डोळे वासुनियां रडे ॥ ३ ॥ बांधुनियां यमा हातीं । दिला नाहीं त्याची खंतीं ॥ ४ ॥ नाहीं यांपें काम । ऐसें जाणे तो अधम ॥ ५ ॥ अझुन तरी मुका । कां रे जालासि म्हणे तुका ॥ ६ ॥

३०१०. बुद्धिमंदा शिरीं । भार फजिती पदरीं ॥ १ ॥ जाय तेथें अपमान । पावे हानि थुंके जन ॥ २ ॥ खरियाचा पाड । मागें लावावें लिगाड ॥ ३ ॥ तुका म्हणे करी । वर्म नेणें भरोवरी ॥ ४ ॥

३०११. साकरेची गोणी बैलाचिये पाठीं । तयासी शेवटीं करबाडें ॥ १ ॥ मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥ २ ॥ वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती यमाहातीं ॥ ३ ॥ ज्यासी असे लाभ तोचि जाणे गोडी । येर तीं बापुडीं शिणलीं वांयां ॥ ४ ॥ तुका म्हणे शहाणा होईं रे गव्हारा । चौऱ्यांशीचा फेरा फिरों नको ॥ ५ ॥ (धृ. नाही)

३०१२. जेणें नाहीं केलें आपुलें स्वहित । पुढिलांचा घात इच्छीतसे ॥ १ ॥ संचितासी जाय मिळोनियां खोडी । पतनांचे जोडी वरी हांव ॥ २ ॥ बांधलें गांठीं तें लागतें भोगावें । ऐसियासी देवें काय कीजे ॥ ३ ॥ तुका म्हणे जया गांवां जाणें जया । पुसोनियां तया वाट चाले ॥ ४ ॥

३०१३. स्तवूनियां नरा । केला आयुष्याचा मातेरा ॥ १ ॥ नारायणाचिया लोपें । घडलीं अवघींच पापें ॥ २ ॥ जीव ज्याचें दान । त्याचा खंडूनियां मान ॥ ३ ॥ तुका म्हणे वाणी । आइके त्या दोष कानीं ॥ ४ ॥

३०१४. ढालतरवारें गुंतले हे कर । म्हणे मी झुंजार कैसा झुंजों ॥ १ ॥ पाटी पडदाळे सिले टोप ओझें । हें तों झालें दुजें मरणमूळ ॥ २ ॥ बैसविलें मला येणें अश्वावरी । धांवूं पळू तरी कैसा आतां ॥ ३ ॥ असोनि उपाय म्हणे हे अपाय । म्हणे हायहाय काय करूं ॥ ४ ॥ तुका म्हणे हा तों स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥ ५ ॥ (धृ. नाही)

३०१५. जया नाहीं नेम एकादशी व्रत । जाणावें तें प्रेत सर्व लोकीं ॥ १ ॥ त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दांत खाय करकरा ॥ २ ॥ जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणा ॥ ३ ॥ जये कुळीं नाहीं एकही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीताफा ॥ ४ ॥ विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥ ५ ॥ तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया ॥ ६ ॥

३०१६. किती सोसिती करंटी । नेणों संसाराची आटी । सर्वकाळ पोटीं । चिंतेची हळहळ ॥ १ ॥ रिकामिया तोंडें राम । काय उच्चारितां श्रम । उफराटा भ्रम । गोवी विषय माजिरा ॥ २ ॥ कळतां न कळे । उघडे झांकियेले डोळे । भरले त्याचे चाळे । अंगीं वारें मायेचें ॥ ३ ॥ तुका म्हणे जन । ऐसें नांवबुद्धिहीन । बहुरंगें भिन्न । एकीं एक न मिळे ॥ ४ ॥

३०१७. झालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें ॥ १ ॥ शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेंसि चाखतां न कळे कैसें ॥ २ ॥ तापलिया तेला बावन चंदन । बुंदें एक क्षण शीतळ करी ॥ ३ ॥ पारखी तो जाणे अंतरींचा भेद । मूढ जना छंद लावण्याचा ॥ ४ ॥ तुका म्हणे कसीं निवडे आपण । शुद्ध मंद हीन जैसे तैसें ॥ ५ ॥ (धृ. नाही) 

३०१८. लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत ॥ १ ॥ त्याच्या पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥ २ ॥ कोटीगोहत्यापातक । त्यासी घडेल निष्टंक ॥ ३ ॥ मासां स्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरां ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥ ५ ॥

३०१९. राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेंशीं ॥ १ ॥ न करी स्नान संध्या न म्हणे रामराम । गुडगुडीचें प्रेम अहर्निशीं ॥ २ ॥ संतसज्जनांसी जाईना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥ ३ ॥ सुगंध चंदन सांडोनियां माशी । बैसे दुर्गंधीशीं अत्यादरें ॥ ४ ॥ तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥ ५ ॥ (धृ. नाही)

३०२०. संतांच्या हेळणें बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥ १ ॥ भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥ २ ॥ संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विटाळ बहु त्याचा ॥ ३ ॥ तुका म्हणे केली प्रतिज्ञा याचसाठीं । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥ ४ ॥

३०२१. हरिची हरिकथा नावडे जया । अधम म्हणतां तया वेळ लागे । मनुष्यदेहीं तया नाट पैं लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥ १ ॥ कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं । उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परि न धरी लंड लाज कांहीं ॥ २ ॥ ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी । देवधर्माविण तो हा चांडाळ । न साहे भूमिभार क्षणभरी ॥ ३ ॥ राम म्हणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी । जन्मोजन्मींचा होईल नरकीं । तुका म्हणे चुकी जरी यासी ॥ ४ ॥

३०२२. कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान । वायां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥ १ ॥ त्याचा होय भूमी भार । नेणे उपकार आचार । झाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसी ॥ २ ॥ अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं । पापी तयाहुनी । नाहीं आणीक दुसरा ॥ ३ ॥ पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला । पाठीं लागे आल्या । अतिताचे द्वारेशीं ॥ ४ ॥ कांहीं संतांचें पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण । यमाचा आंदण । शीण थोर पावेल ॥ ५ ॥ तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हाणी । देवा विसरूनि । गेली म्हणती मी माझें ॥ ६ ॥

३०२३. भक्ति ज्याची थोडी । पूर्ण विषयाची गोडी ॥ १ ॥ तो नरचि नव्हे पाहीं । खर जाणावा तो देहीं ॥ २ ॥ भजन पूजनही नेणे । काय स्वरूपासी जाणे ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याला । भोवंडून बाहेर घाला ॥ ४ ॥

३०२४. देव अवघें प्रतिपादी । वंदी सकळां एका निंदी ॥ १ ॥ तेथें अवघें गेलें वांयां । विष घास एके ठायां ॥ २ ॥ सर्वांग कुरवाळी । उपटी एक रोमावळी ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्त । नाहीं जयाचें अंकित ॥ ४ ॥

३०२५. कविलवाणा झाला आतां । दोष करितां न विचारी ॥ १ ॥ अभिलाषी नारी धन । झकवी जन लटिकेंचि ॥ २ ॥ विश्वासिया करितां घात । न धरी चित्त कांटाळा ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं आला । वृथा गेला जन्मासी ॥ ४ ॥

३०२६. जेणें मुखें स्तवी । तेंचि निंदेपाठीं लावीं ॥ १ ॥ ऐसी अधमाची याती । लोपी सोनें खाय माती ॥ २ ॥ गुदद्वारावाटे । मिष्टान्नाचा नरक लोटे ॥ ३ ॥ विंचु लाभेविण । तुका म्हणे वाहे शीण ॥ ४ ॥ 

३०२७. दुर्बळ हे अवघे जन । नारायणीं विन्मुख ॥ १ ॥ झाडोनियां हात जाती । पात्र होती दंडासी ॥ २ ॥ शिदोरी तें पाप पुण्य । सवें सिण भिकेचा ॥ ३ ॥ तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥ ४ ॥

३०२८. द्रव्य असतां धर्म न करी । नागवला राजद्वारीं ॥ १ ॥ माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां ॥ २ ॥ कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥ ३ ॥ भोग स्त्रियेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेऊनि निजे ॥ ४ ॥ तुका म्हणे जाण । नर गाढवाहुनी हीन ॥ ५ ॥

३०२९. सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥ १ ॥ एक गुण तो केलासे दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ २ ॥ भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥ ३ ॥ परउपकार घडे तोचि भला । नाठ्याळ तयाला दया नाहीं ॥ ४ ॥ जातीवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा ॥ ५ ॥ हित तें अनहित केलें कैसें । तुका म्हणे पिसें लागलें यासीं ॥ ६ ॥

३०३०. आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठुर अतिवादी ॥ १ ॥ याति कुळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ २ ॥ काळेंकुट पितळ सोनें शुद्ध रंग । अंगाचेंच अंग साक्षी देतें ॥ ३ ॥ तुका म्हणे बरी जातीसवें भेटी । नवनीत पोटीं सांठविलें ॥ ४ ॥

३०३१. तोंडें खाय फार । पादे बोचा करी मार ॥ १ ॥ एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन तें नेणे ॥ २ ॥ कुले घालूनि उघडे । रागे पाहे लोकांकडे ॥ ३ ॥ खेळे द्यूतकर्म । मग बोंबली जुलूम ॥ ४ ॥ निजतां आला मोहो । वीतां म्हणे मेला गोहो ॥ ५ ॥ तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥ ६ ॥

३०३२. गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥ १ ॥ मस्तक सांडुनि सिसफुल गुडघां । चार तो अवघा बावळ्याचा ॥ २ ॥ अंगभूत म्हणू पूजितो वाहाणा । म्हणतां शहाणा येईल कैसा ॥ ३ ॥ तुका म्हणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनीं भाव तैसा ॥ ४ ॥ (धृ. नाही)

३०३३. यमपुरी त्यांनी वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥ १ ॥ अवघड कोणी न करी सांगतां । सुलभ बहुतां गोड वाटे ॥ २ ॥ काय ते नेणते होते मागें ऋषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥ ३ ॥ द्रव्य दारा कोणें स्थापियलें धन । पिंडाचें पाळण विषय भोग ॥ ४ ॥ तुका म्हणे दोहीं ठायीं हा फजित । पावे यमदूत जना हातीं ॥ ५ ॥

३०३४. अगत्य ज्या नरका जाणें । वीट मानणें कीर्तनीं ॥ १ ॥ नावडेसा झाला बाप । आलें पाप वस्तीसी ॥ २ ॥ नारायण नाहीं वाचे । ते यमाचें अंदणे ॥ ३ ॥ तुका म्हणे अभक्तासी । माता दासी जगझोडी ॥ ४ ॥

३०३५. नेदावी सलगी न करावा संग । करी चित्ता भंग वेळोवेळां ॥ १ ॥ सर्प शांतिरूप न म्हणावा भला । झोंबे खवळीला तात्काळ तो ॥ २ ॥ तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन । करावें वचन न घडे तें ॥ ३ ॥ (धृ. नाही)

३०३६. याचा कोणी करी पक्ष । तोही त्याशीं समतुल्य ॥ १ ॥ फुकासाठी पावे दुःखाचा विभाग । पूर्वजाशीं लाग निरयदंडीं ॥ २ ॥ ऐके राजा न करी दंड । जरि या लंड दुष्टासी ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याचें अन्न । मद्यपानाचे समान ॥ ४ ॥

३०३७. दानें कांपे हात । नावडे तेविशीं मात ॥ १ ॥ कधी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ २ ॥ नव जाती पाय । तीर्था म्हणे वेचूं काय ॥ ३ ॥ तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥ ४ ॥

३०३८. चाहाडाची माता । व्यभिचारीण तत्त्वता ॥ १ ॥ पाहे संतांचें उणें । छिद्र छळावया सुनें ॥ २ ॥ जाणों त्याच्या बाचें । कांहीं सोडिलें गांठीचें ॥ ३ ॥ तुका म्हणे घात । व्हावा ऐसी जोडी मात ॥ ४ ॥

३०३९. तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसां ऐसे ॥ १ ॥ वांझेच्या मैथुनापरी गेलें वांयां । बांडेल्याचें जायां जालें पीक ॥ २ ॥ अभाविक सदा सुतकी चांडाळ । सदा तळमळ चुकेचि ना ॥ ३ ॥ तुका म्हणे वरदळी ज्याची दृष्टि । देहबुद्धि कष्टी सदा दुःखी ॥ ४ ॥ (धृ. नाही)

३०४०. संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥ १ ॥ त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ २ ॥ संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिताची नर्कवासी ॥ ३ ॥ तुका म्हणे नष्ट । जाणा गाढव तो स्पष्ट ॥ ४ ॥

३०४१. संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥ १ ॥ वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ २ ॥ कथेमाजी नीज वाढे नित्यक्षणीं । स्त्रियेचे कीर्तनीं प्रेमें जागे ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हीं क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥ ४ ॥ (धृ. नाही)

३०४२. विद्या अल्प परी गर्वशिरोमणि । मजहुनी ज्ञानी कोण आहे ॥ १ ॥ अंगीं भरला ताठा कोणातें मानीना । साधूची छळणा स्वयें करी ॥ २ ॥ साधूचे देहाचा मानी जो विटाळ । त्रिलोकीं चांडाळ तोचि एक ॥ ३ ॥ संतांची जो निंदा करी मुखें जपे । खतेला सकळ पापें तोचि एक ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥ ५ ॥ (धृ. नाही

३०४३. आणिकांच्या कापिती माना । निष्ठुरपणा पार नाहीं ॥ १ ॥ करिती बेटे उसणवारी । यमपुरीं भाेगावया ॥ २ ॥ सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाचतीं पोरें । खोडितां येरें अंग दुःखे ॥ ४ ॥

३०४४. कावळिया नाहीं दया उपकार । काळिमें अंतर विटाळतें ॥ १ ॥ तैसें कुजनाचें जिणें अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥ २ ॥ कडु भोंपळ्याचा उपचारें पाक । सेविल्या तिडीक कपाळासी ॥ ३ ॥ तुका म्हणे विष सांडूं नेणे साप । आदरें तें पाप त्याचे ठायीं ॥ ४ ॥

३०४५. माकडें मुठीसी धरिले फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥ १ ॥ काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ २ ॥ शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥ ३ ॥ तुका म्हणे एक ऐसे पशु जीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥ ४ ॥

३०४६. सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वानालागीं ॥ १ ॥ मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ २ ॥ वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयासी ते खूण काय जाणे ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्याचे तोचि एक जाणे । भक्तिचें महिमान साधु जाणे ॥ ४ ॥ (धृ. नाही)

३०४७. शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥ १ ॥ निरयगांवीं भोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥ २ ॥ अवगुणांचा सांटा करी । तेचि धरी जीवासी ॥ ३ ॥ तुका म्हणे जडबुद्धि । कर्म शुद्धि सांडवी ॥ ४ ॥

३०४८. विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळासी सखें वाेंगळचि ॥ १ ॥ नये पाहों कांहीं गोऱ्हवाडीचा अंत । झणीं ठाका संत दुर्जनापें ॥ २ ॥ भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी शीण दरुषणें ॥ ३ ॥ तुका म्हणे छीथू जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥ ४ ॥

३०४९. दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती ॥ १ ॥ त्याची बुद्धि त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥ २ ॥ पाहें संतांकडे । दोषदृष्टी सांडी भिडे ॥ ३ ॥ उंच नीच नाहीं । तुका म्हणे खळा कांहीं ॥ ४ ॥

३०५०. नागलें देखोनि चांगलें बोले । आपुलें वेचूनि त्यापुढें खुले ॥ १ ॥ अधमाचे ओंगळ गुण । उचित नेणें तो धर्म कोण ॥ २ ॥ आर्तभूता न घली पाण्याची चुळ । न मगे त्यासी घाली साकरगुळ ॥ ३ ॥ एकासी धड न बोले वाचा । एकासी म्हणे मी तुझे बांदीचा ॥ ४ ॥ एका देखोनि लपवी भाकरी । एकासी आड पडोनि हो करी ॥ ५ ॥ तुका म्हणे ते गाढवपशु । लाभेंविण केला आयुष्याचा नाशु ॥ ६ ॥

३०५१. गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें ॥ १ ॥ त्याचें भुंकणें न राहे । स्वभावासी करील काय ॥ २ ॥ श्वान शिबिके बैसविलें । भुंकता न राहे उगलें ॥ ३ ॥ तुका म्हणे स्वभावकर्म । कांहीं केल्या न सुटे धर्म ॥ ४ ॥

३०५२. सेट्या ना चौधरी । पांडेपण वाहे शिरीं ॥ १ ॥ जकातिचा धंदा । तेथें पाप वसे सदा ॥ २ ॥ गाई म्हैसी हेड । तूप विकी महाद्वाड ॥ ३ ॥ तुका म्हणे पाहीं । तेथें पुण्या रिघ नाहीं ॥ ४ ॥ (धृ. नाही)

३०५३. संता नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥ १ ॥ ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ २ ॥ घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥ ३ ॥ तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम ॥ ४ ॥

३०५४. अंगीं ब्रह्मक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळांचे ॥ १ ॥ अंत्यजाची खिचडी घेताती मागून । गाळियाप्रदान मायबहिणी ॥ २ ॥ उत्तमकुळीं जन्म क्रिया अमंगळ । बुडविलें कुळ उभयतां ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसी कलियुगाची चाली । स्वार्थें बुडविली आचरणें ॥ ४ ॥ (धृ. नाही)

३०५५. खिस्तीचा उदीम उदिमांत हीन । करिती ब्राह्मण कलियुगीं ॥ १ ॥ वेवसाव करी पर्वत मांगापासीं । ते पै विटाळासी न मानिती ॥ २ ॥ मांगिणीशीं नित्य करीतसे लेखा । तोंडावरी थुंका पडतसे ॥ ३ ॥ आशा माया रांड नांव हें कागदीं । आठवीना कधीं नारायण ॥ ४ ॥ तुका म्हणे देह झाले पराधीन । पांडुरंगाविण गति नाहीं ॥ ५ ॥ (धृ. नाही)

३०५६. बीजीं फळाचा भरंवसा । जतन सिंचनासरिसा । चालविलिया आशा । काकुलती ते नाड ॥ १ ॥ हा तों गढसंधीचा ठाव । पिके पिकविला भाव । संकोचोनि जीव । दशा केली जतन ॥ २ ॥ माती घाली धनावरी । रांडा रोटा वरीवरी । सुखाचे शेजारीं । दुःख भ्रमें भोगितसे ॥ ३ ॥ तुका म्हणे दिशाभुली । झाल्या उफराटी चाली । निवाड्याची बोली । अनुभवें साक्षीसी ॥ ४ ॥

३०५७. कथा पुराण ऐकतां । झोपें नाथिलें तत्त्वता । खाटेवरी पडतां । व्यापी चिंता तळमळ ॥ १ ॥ ऐसी गहन कर्मगति । काय तयासी रडती । झाले जाणते जे चित्तीं । कांहीं नेघे आपुल्या ॥ २ ॥ उदक लावितां न धरे । चिंता करी केव्हां सरे । जाऊं नका धीरें । म्हणे करितां ढवाळ्या ॥ ३ ॥ जवळी गोंचिड क्षीरा । जैसी कमळणी दर्दुरा । तुका म्हणे दुरा । देशत्यागें तयासी ॥ ४ ॥

३०५८. कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥ १ ॥ हो कां नर अथवा नारी । रांड तयें नांवें खरीं ॥ २ ॥ नाहीं हातीं दान । शूरपणाचें कांकण ॥ ३ ॥ वाळियेलीं संतीं । केली बोडोनी फजिती ॥ ४ ॥ तुका म्हणे ताळा । नाहीं त्याची अवकळा ॥ ५ ॥ 

३०५९. बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ ॥ १ ॥ तया मूर्ख म्हणावें वेडे । कैसें तुटेल सांकडें ॥ २ ॥ दावितिया वाट । वेठी धरूं पाहे चाट ॥ ३ ॥ पुढिल्या उपाया । तुका म्हणे राखे काया ॥ ४ ॥

३०६०. खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां ॥ १ ॥ आपल्या आपण नाहीं शोभों येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥ २ ॥ खाणार ताकाचें असे तें मांजर । आपणचि अधीर कळों येतें ॥ ३ ॥ तुका म्हणे जळो मैंदाची मवाळी । दावूनियां नळी कापी सुखें ॥ ४ ॥

३०६१. अभक्ताचे गांवीं साधु म्हणजे काय । व्याघ्रवाडां गाय सांपडली ॥ १ ॥ कसाबाचे आळी मांडीलें प्रमाण । बस्वण्णाची आण तया काई ॥ २ ॥ मोतीयाची गोणी माळेवोळी नेली । पुसती केवढ्या केली पासरी हे ॥ ३ ॥ केळी आणि बोरी वसती शेजारीं । संवाद कोणे परी घडे येथें ॥ ४ ॥ तुका म्हणे खीर केली काऱ्हेळ्याची । शुद्ध गोडी कैंची वसे तेथें ॥ ५ ॥ (धृ. नाही)

३०६२. नाहीं देवाचा विश्वास । करी संतांचा उपहास ॥ १ ॥ त्याचे तोंडीं पडे माती । हीन शूकराची जाती ॥ २ ॥ घोकुनी अक्षरें । वाद छळणा करीत फिरे ॥ ३ ॥ म्हणे देवासी पाषाण । तुका म्हणे भावहीन ॥ ४ ॥

३०६३. जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरेचि ना ॥ १ ॥ किती याचे बोल ऐकों कानीं । मारिलें घाणीं नाळेकरी ॥ २ ॥ मिठेंविण काय आळणी हे बोल । कोरडीच फोल घसघस ॥ ३ ॥ तुका म्हणे डेंगा न कळे हित । किती फजित करूं तरी ॥ ४ ॥

शूरपणाचें कांकण ॥ ३ ॥ वाळियेलीं संतीं । केली बोडोनी फजिती ॥ ४ ॥ तुका म्हणे ताळा । नाहीं त्याची अवकळा ॥ ५ ॥

३०५९. बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ ॥ १ ॥ तया मूर्ख म्हणावें वेडे । कैसें तुटेल सांकडें ॥ २ ॥ दावितिया वाट । वेठी धरूं पाहे चाट ॥ ३ ॥ पुढिल्या उपाया । तुका म्हणे राखे काया ॥ ४ ॥

३०६०. खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां ॥ १ ॥ आपल्या आपण नाहीं शोभों येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥ २ ॥ खाणार ताकाचें असे तें मांजर । आपणचि अधीर कळों येतें ॥ ३ ॥ तुका म्हणे जळो मैंदाची मवाळी । दावूनियां नळी कापी सुखें ॥ ४ ॥

३०६१. अभक्ताचे गांवीं साधु म्हणजे काय । व्याघ्रवाडां गाय सांपडली ॥ १ ॥ कसाबाचे आळी मांडीलें प्रमाण । बस्वण्णाची आण तया काई ॥ २ ॥ मोतीयाची गोणी माळेवोळी नेली । पुसती केवढ्या केली पासरी हे ॥ ३ ॥ केळी आणि बोरी वसती शेजारीं । संवाद कोणे परी घडे येथें ॥ ४ ॥ तुका म्हणे खीर केली काऱ्हेळ्याची । शुद्ध गोडी कैंची वसे तेथें ॥ ५ ॥ (धृ. नाही)

३०६२. नाहीं देवाचा विश्वास । करी संतांचा उपहास ॥ १ ॥ त्याचे तोंडीं पडे माती । हीन शूकराची जाती ॥ २ ॥ घोकुनी अक्षरें । वाद छळणा करीत फिरे ॥ ३ ॥ म्हणे देवासी पाषाण । तुका म्हणे भावहीन ॥ ४ ॥

३०६३. जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरेचि ना ॥ १ ॥ किती याचे बोल ऐकों कानीं । मारिलें घाणीं नाळेकरी ॥ २ ॥ मिठेंविण काय आळणी हे बोल । कोरडीच फोल घसघस ॥ ३ ॥ तुका म्हणे डेंगा न कळे हित । किती फजित करूं तरी ॥ ४ ॥


३०६४. माकडा दिसती कंवटी नारळे । भोक्ता तो निराळे वरील सारी ॥ १ ॥ एका रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥ २ ॥ सुनियासी क्षीर चारिल्या ओकवी । भोक्ता तो सेवी धणीवरी ॥ ३ ॥ तुका म्हणे मूर्ख वागविती भार । नेतील तें सार परीक्षक ॥ ४ ॥

३०६५. मांस खातां हाउस करी । जोडोनि वैरी ठेवियेला ॥ १ ॥ कोण त्याची करील कींव । जीवें जीव नेणती ॥ २ ॥ पुढिलांसाठीं पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ॥ ३ ॥ तुका म्हणे कुटिती हाडें । आपुल्या नाडें रडतील ॥ ४ ॥

३०६६. सिंदळीचे सोइरे चोराचिया दया । तेही जाणा तया संवसर्गी ॥ १ ॥ फुकासाठीं भोगे दुःखाचा तो वांटा । उभारोनि कांटा वाटेवरी ॥ २ ॥ सर्प पोसूनियां दुधाचाही नाश । केलें थीता विष अमृताचें ॥ ३ ॥ तुका म्हणे त्यासी न करितां दंडन । पुढिल्या खंडन नव्हे दोषा ॥ ४ ॥

३०६७. काय वृंदावन माखियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥ १ ॥ तैसी अधमाची जातीच अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ २ ॥ न कळे विंचासी कुरवाळिलें अंग । आपले ते रंग दावीतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे न ये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥ ४ ॥

३०६८. सुगरणीबाई थिता नास केला । गूळ तो घातला भाजीमध्यें ॥ १ ॥ क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । थितेंचि वोंगळ नाश केला ॥ २ ॥ हिरयाचे पेटे आणियेल्या गारा । खांदीं शिरीं भारा व्यर्थ वाहे ॥ ३ ॥ दळण दळोनि भरीयेली पाळी । भरडोनि वोंगळी नास केला ॥ ४ ॥ कापुराचे सांतें आणिला लसण । वागवितां शीण दुःख होय ॥ ५ ॥ रत्नाचा जोहरी रत्नचि पारखी । येर देखोवेखीं हातीं घेती ॥ ६ ॥ तुका म्हणे जरी योग घडे निका । न घडतां थुंका तोंडावरी ॥ ७ ॥ (धृ. नाही )

३०६९. कावळ्याच्या गळां मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥ १ ॥ गजालागीं केला कस्तुरीचा लेप । तिचें तों स्वरूप काय जाणे ॥ २ ॥ बकापुढें सांगे भावार्थ वचन । वाउगाची शीण होय त्यासी ॥ ३ ॥ तुका म्हणे तैसे अभाविक जन । त्यांसी वांयां शीण करूं नये ॥ ४ ॥ (धृ. नाही)

३०७०. कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥ १ ॥ कैंचा राम अभागिया । करी वटवट वांयां ॥ २ ॥ स्मरणाचा राग । क्रोधे विटाळलें अंग ॥ ३ ॥ तुका म्हणे जडा । काय चाले या दगडा ॥ ४ ॥

३०७१. लटिक्याची वाणी चवीना संवाद । नाहीं कोणां वाद रुचों येत ॥ १ ॥ अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळां न साधिली ॥ २ ॥ अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तातडीनें मन लाहो साधी ॥ ३ ॥ तुका म्हणे दोष आणि अवकळा । न पडतां ताळा घडतसे ॥ ४ ॥

३०७२. दर्पणासी नकटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥ १ ॥ ऐसें अवगुणांचें बाधें । दिसे सुधे विपरीत ॥ २ ॥ अंधळ्यासी काय हिरा । गाराचि तो सारिखा ॥ ३ ॥ तुका म्हणे भुंके सुणें । ठाया नेणे ठाव तो ॥ ४ ॥

३०७३. संसाराचे धांवें वेठी । आवडी पोटीं केवढी ॥ १ ॥ हागों जातां दगड सांची । अंतरीं हे संकल्प ॥ २ ॥ लाज तेवढी नारायणीं । वांकडी वाणी पोरांपें ॥ ३ ॥ तुका म्हणे बेशरमा । वरी श्रमा पडिभरू ॥ ४ ॥

३०७४. कैसा शिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥ १ ॥ वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ २ ॥ कैसा निरयगांवा । जाऊन पवे विसांवा ॥ ३ ॥ तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥ ४ ॥

३०७५. जन्मांतरीचा परिट न्हावी । जात ठावी त्यानें ते ॥ १ ॥ वाखर जैसां चरचरी । तोंड करी संवदणी ॥ २ ॥ पूर्व जन्मीं शिखासूत्र । मळ मूत्र अंतरीं ॥ ३ ॥ तुका म्हणे करिती निंदा । धुवटधंदा पुढिलांचा ॥ ४ ॥

३०७६. माहार मातेचे पणी भरे । न कळे खरें पुढील ॥ १ ॥ वोंगळ अधमाचे गुण । जातां घडी नलगेचि ॥ २ ॥ श्वान झोळी स्वामिसत्ता । कोप येतां उतरे ॥ ३ ॥ तुका म्हणे गुमान कां । सांगों लोकां अधमासी ॥ ४ ॥

३०७७. ऐसें ठावें नाहीं मूढा । सोस काकुलती पुढां ॥ १ ॥ माझी नका जाळूं भांडीं । पोटीं भय सोस तोंडीं ॥ २ ॥ पातलिया काळ । तेव्हां काय चाले बळ ॥ ३ ॥ संचित तें करी । नरका जाया मेल्यावरी ॥ ४ ॥ परउपकार । न घडावा हा विचार ॥ ५ ॥ तुका म्हणे लांसी । आतां भेटों नये ऐसी ॥ ६ ॥

३०७८. कुतऱ्याऐसें ज्याचें जिणें । संग कोणें न करिजे ॥ १ ॥ जाय तिकडे हाडहाडी । गोऱ्हवाडीच सोयरीं ॥ २ ॥ अवगुणांचा त्याग नाहीं । खवळें पाहीं उपदेशें ॥ ३ ॥ तुका म्हणे कैंचि लवी । ठेंग्या केवीं अंकुर ॥ ४ ॥

३०७९. वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका ॥ १ ॥ तार्किकाचें अंग आपणा पारिखें । माजिऱ्यासारिखे वाईचाळे ॥ २ ॥ माता निंदी तया कोण तो आधार । भंगलें खापर याच नांवें ॥ ३ ॥ तुका म्हणे आडरानें ज्याची चाली । तयाची ते बोली मिठेविण ॥ ४ ॥

३०८०. दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोंडी ॥ १ ॥ पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥ २ ॥ न म्हणे रामराम । मनें वाचें हेचि काम ॥ ३ ॥ तुका म्हणे भागा । आली निंदा करी मागा ॥ ४ ॥

३०८१. दुर्जनासी करी साहे । तोही लाहे दंड हे ॥ १ ॥ शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ २ ॥ येर येरा कांचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥ ३ ॥ तुका म्हणे कापूं नाकें । पुढें आणिकें शिकविती ॥ ४ ॥

३०८२. दुर्जनाचें अंग अवघेंचि सरळ । नर्काचा कोथळ सांठवला ॥ १ ॥ खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥ २ ॥ सर्पा मंत्र चाले धरावया हातीं । खळाची ते जाती निखळची ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं न साहे उपमा । आणीक अधमा वोखट्यासी ॥ ४ ॥

३०८३. दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥ १ ॥ लाता हाणोनिया वारी । गुंडा वाट शुद्ध करी ॥ २ ॥ बहुतां पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे नखें । काढुनि टाकिजेती सुखें ॥ ४ ॥

३०८४. सापें ज्यासी खावें । तेणें प्राणासी मुकावें ॥ १ ॥ काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंके जन ॥ २ ॥ विंचु हाणी नांगी । अग्न लावी आणिकां अंगीं ॥ ३ ॥ तुका म्हणे जाती । नरका पाउलीं चालती ॥ ४ ॥

३०८५. काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरासी लेपन चंदनाचें ॥ १ ॥ नको नको देवा खळाची संगती । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥ २ ॥ काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करूनि टाकी ॥ ३ ॥ तुका म्हणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥ ४ ॥

३०८६. दुष्टाचें चिंतन भिन्न अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला । पालथें घागरी घातलें जीवन । न धरीच जाण तेंही त्याला ॥ १ ॥ जन्मा येऊनि तेणें पतनचि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा । जळो जळो हे त्याचें ज्यालेपण । कासया हें आलें संवसारा ॥ २ ॥ पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो । मग कुचर मुग नयेचि पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥ ३ ॥ तुका म्हणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रयत्न कांहीं । म्हणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥ ४ ॥

३०८७. दिवट्या वाद्य लावूनि खाणे । करूनि मंडण दिली हातीं ॥ १ ॥ नवरा नेईल नोवरी घरां । पूजन वरा पाद्याचें ॥ २ ॥ गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं ठेवूं नका ॥ ३ ॥ करूं द्यावें व्हावें बरें । ठायींचें कांरे न कळेचि ॥ ४ ॥ वऱ्हाडियांचे लागे पाठीं । जैसी उटी कातेली ॥ ५ ॥ तुका म्हणे जोडिला थुंका । पुढें नरका सामग्री ॥ ६ ॥ (धृ. नाही)

३०८८. दुर्जनाची गंधी विष्ठेचिये परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥ १ ॥ आइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलो ॥ २ ॥ दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैसी ॥ ३ ॥ दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळल्यावरी धांवे श्वान ॥ ४ ॥ दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्या ॥ ५ ॥ तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंगकुंभीपाक दुर्जनाचें ॥ ६ ॥

३०८९. नये पाहों मुख मात्रागमन्याचें । तैसें अभक्ताचें गुरुपुत्रा ॥ १ ॥ म्हणऊनि बरें धरितां एकांत । तेणें नव्हे घात भजनासी ॥ २ ॥ नये होऊं कदा निंदकाची भेटी । जया द्वैत पोटीं चांडाळाच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे नका बोलों त्यासी गोष्टी । जयाचिया दृष्टी पाप वाढें ॥ ४ ॥

३०९०. हुंदकी पिसवि हालविता दाढी । माळेमणी ओढी निंदेचे ते ॥ १ ॥ त्याचें फळ पाकीं यमाचे ते दंड । घर केले कुंड कुंभपाकीं ॥ २ ॥ क्रोध पोटीं मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥ ३ ॥ तुका म्हणे स्नान केलें मळमुत्रें । जेविलीं पितरें अमंगळें ॥ ४ ॥

३०९१. देखोनि पुराणिकाची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥ १ ॥ प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ २ ॥ आवरितां नावरे । खूर आठवी नेवरे ॥ ३ ॥ बोलों नये मुखां वाटां । म्हणे होता ब्याचा तोटा ॥ ४ ॥ दोन्ही शिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥ ५ ॥ मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥ ६ ॥ होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥ ७ ॥ तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥ ८ ॥

३०९२. आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥ १ ॥ ऐसे दुर्जन संगती । बहुतांचे घात होती ॥ २ ॥ एक पडे माशी । तरी ते बहु अन्न नाशी ॥ ३ ॥ तुका म्हणे रांड । ऐसी का ते व्याली भांड ॥ ४ ॥

३०९३. दोराच्या आधारें पर्वत चढला । पाउलासी केला अपघात ॥ १ ॥ अष्टोतरशें व्याधि वैद्यें दवडुनि । तो वैद्य मारूनि उत्तीर्णता ॥ २ ॥ नव मास माया वाहिलें उदरीं । ते माता चौबारीं नग्न केली ॥ ३ ॥ गायत्रीचें क्षीर पिळुनि घेऊनि । उपवासी बांधोन ताडीतसे ॥ ४ ॥ तुका म्हणे गुरुनिंदकाचें तोंड । पाहातां नरककुंड पूर्वजांसी ॥ ५ ॥ (धृ. नाही)

३०९४. दुर्बळें सदैवा । म्हणे नागवेल केव्हां ॥ १ ॥ आपणा ऐसें करूं पाहे । स्वभावासी करिल काय ॥ २ ॥ मूढ सभे आंत । इच्छी पंडिताचा घात ॥ ३ ॥ गांढ्या देखुनि शूर । उगीच करी बुरबुर ॥ ४ ॥ आणिकांचा हेवा । न करीं शरण जाईं देवा ॥ ५ ॥ तुका म्हणे किती । करूं दुष्टाची फजिती ॥ ६ ॥

३०९५. निंबाचिया झाडा साकरेचें आळें । आपुलीं तीं फळें न संडीच ॥ १ ॥ तैसें अधमाचें अमंगळ चित्त । वमन तें हित करूनि सांडी ॥ २ ॥ परिसाचें अंगीं लाविलें खापर । पालट अंतर नेघे त्याचें ॥ ३ ॥ तुका म्हणे वेळू चंदना संगतीं । काय ते असती जवळिकें ॥ ४ ॥

३०९६. न विचारतां ठायाठाव । काय भुंके तो गाढव ॥ १ ॥ केला तैसा लाहे दंड । खळ अविचारी लंड ॥ २ ॥ करावें लाताळें । ऐसें नेणे कोण्या काळें ॥ ३ ॥ न कळे उचित । तुका म्हणे नीत हित ॥ ४ ॥

३०९७. महाराशी शिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥ १ ॥ तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ २ ॥ नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥ ३ ॥ ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो ते याती ॥ ४ ॥

३०९८. अभक्त ब्राह्मण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥ १ ॥ वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ २ ॥ ऐसा हा निवाडा झालासे पुराणीं । नव्हे माझी वाणी पदरींची ॥ ३ ॥ तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टि त्या दुर्जना न पडो माझी ॥ ४ ॥

३०९९. मुद्दल जतन जालें । मग लाभाचें काय आलें ॥ १ ॥ घरीं देउनि अंतर गांठी । राखा पारख्या न सुटे मिठी ॥ २ ॥ घाला पडे थोडेंच वाटे । काम मैंदाचें चपेटे ॥ ३ ॥ तुका म्हणे वरदळ खोटें । फांसे अंतरींच्या कपटें ॥ ४ ॥

३१००. गाढवाचें तानें । पालटतें क्षणक्षणें ॥ १ ॥ तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ २ ॥ उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥ ३ ॥ तुका म्हणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥ ४ ॥


No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...