Saturday, 3 May 2025

१५. भेटीचे अभंग

 श्री तुकोबाराय यांना विठ्ठल भेटीची तीव्र आस लागलेली असताना झालेली भावदशा व्यक्त करणारे अभंग.

भेटीचे अभंग (अभंग संख्या ३९)

८२१. कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥ १ ॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरीं । ऐसें रूप हरी दावीं डोळा ॥ २ ॥ कटीं पितांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥ ३ ॥ गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवे मानसीं तेंचि रूप ॥ ४ ॥ झुरोनि पांझरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥ ५ ॥ तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंति उदास करूं नये ॥ ६ ॥

८२२. वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउले कैं वो डोळा ॥ १ ॥ तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी ॥ २ ॥ कां बा मोकलिलें कोणा निरविलें । कठिण कैसें झालें हृदय तुझें ॥ ३ ॥ तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥ ४ ॥

८२३. भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥ १ ॥ पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणे काय करूं ॥ २ ॥ तुका म्हणे माझें जाळुनि संचित । करीं वो उचित भेट देई ॥ ३ ॥

८२४. तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगा ॥ १ ॥ लागलीसे आस पहातुसें वास । रात्रीं वो दिवस लेखीं बोटीं ॥ २ ॥ काम गोड मज नलगे हा धंदा । तुका म्हणे सदा हेंचि ध्यान ॥ ३ ॥

८२५. न लगे हें मज तुझें ब्रह्मज्ञान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥ १ ॥ लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या ॥ २ ॥ जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं हें ॥ ३ ॥ तुका म्हणे नको रागेजूं विठ्ठला । उठीं देईं मला भेटी आतां ॥ ४ ॥ 

८२६. धांव घालीं आई । आतां पाहातीस काई ॥ १ ॥ धीर नाहीं माझे पोटी । जालों वियोगें हिंपुटीं ॥ २ ॥ करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥ ३ ॥ तुका म्हणे डोई। कई ठेवीन हे पायीं ॥ ४ ॥

८२७. दर्शनाची आस । आतां न साहे उदास ॥ १ ॥ जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेसीं ॥ २ ॥ कांहींच नाठवे । ठायीं बैसलें नुठवे ॥ ३ ॥ जीव असतां पायीं । तुका ठकावला ठायीं ॥ ४ ॥ 

८२८. कान्हया रे जगजेठी । देई भेटी एक वेळे ॥ धृ. ॥ काय मोकलिलें वनीं । सावजांनीं वेढिलें ॥ २ ॥ येथवरी होता संग । अंगें अंग लपविलें ॥ ३ ॥ तुका म्हणे पाहिलें मागें । एवढ्या वेगें अंतरला ॥ ४ ॥

८२९. जये ठायीं आवडी ठेली । मज ते बोली न संडे ॥ १ ॥ पुरवावें जीवींचें कोड । भेटी गोड तुज मज ॥ २ ॥ आणियलें येथवरी । रूप दुरी न करावें ॥ ३ ॥ तुका म्हणे नारायणा । सेवाहीना धिग् वृत्ति ॥ ४ ॥

८३०. आर्त माझ्या बहु पोटीं । व्हावी भेटी पायांची ॥ १ ॥ यासी तुम्ही कृपावंता । माझी चिंता असों द्या ॥ २ ॥ तळमळ करी चित्त । अखंडित वियोगें ॥ ३ ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । जाणे व्यथा अंतरिंची ॥ ४ ॥

८३१. भेटीची आवडी उताविळ मन । लागलेंसें ध्यान जीवीं जीवा ॥ १ ॥ आतां आवडीचा पुरवा सोहळा । येऊनी गोपाळा क्षेम देई ॥ २ ॥ नेत्र उन्मळित राहिले ताटस्थी । गंगा अश्रुपाती बहावली ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही करा साचपणा । मुळींच्या वचना आपुलिया ॥ ४ ॥

८३२. मी तंव बैसलो धरुनियां आस । न करीं उदास पांडुरंगा ॥ १ ॥ नको आतां मज दवडूं श्रीहरी । मागाया भिकारी झालों दास ॥ २ ॥ भुकेलों कृपेच्या वचनाकारणें । आशा नारायणें पुरवावी ॥ ३ ॥ तुका म्हणे येऊनियां देईं भेटी । कुरवाळुनि पोटीं धरीं मज ॥ ४ ॥

८३३. धरूनि हें आलों जीवीं । भेटी व्हावी विठोसी ॥ १ ॥ संकल्प तो नाहीं दुजा । महाराजाविण तो ॥ २ ॥ पायांवरि ठेविन भाळ । येणें समूळ पावलों ॥ ३ ॥ तुका म्हणे डोळेभरी । पाहिन हरी श्रीमुख ॥ ४ ॥

८३४. भेटीलागीं पंढरिनाथा । जीवा लागली तळमळ व्यथा ॥ १ ॥ कधीं कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ २ ॥ सीणले माझें मन । वाट पाहातां लोचन ॥ ३ ॥ तुका म्हणे भूक । तुझें पहावया मुख ॥ ४ ॥

८३५. भेटीवांचोनियां दुजें नाहीं चित्तीं । येणें काकुलती याजसाठीं ॥ १ ॥ भेटोनियां बोलें आवडीचें गुज । आनंदाच्या भोजे जेवूं संगें ॥ २ ॥ मायलेकरासी नाहीं दुजी परि । जेवूं बरोबरी बैसोनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसें अंतरीचें आर्त । यावें जी त्वरित नारायणा ॥ ४ ॥

८३६. कन्या सासुऱ्यासी जाये । मागें परतोनि पाहे ॥ १ ॥ तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ २ ॥ चुकलिया माय । बाळा हुरूहुरू पाहे ॥ ३ ॥ जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ॥ ४ ॥

८३७. कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥ १ ॥ उदित हें भाग्य होइल कोणे काळीं । चित्त तळमळी म्हणऊनि ॥ २ ॥ उतावीळ बाह्या भेटिलागीं दंड । लोटांगणीं धड जावयासी ॥ ३ ॥ तुका म्हणे माथा ठेवीन चरणीं । होतील पारणीं इंद्रियांचीं ॥ ४ ॥

८३८. कां जो एथें काळ आला आम्हां आड । तुम्हांपाशीं नाड करावया ॥ १ ॥ कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें कोडें उपजलें ॥ २ ॥ कां हो उपजेना द्यावी ऐसी भेटी । काय द्वैत पोटीं धरिलें देवा ॥ ३ ॥ पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाहीं आतां ॥ ४ ॥ काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ऋणेंपायीं ॥ ५ ॥ तुका म्हणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडुनी ॥ ६॥

८३९. पंढरीची वाट पाहें निरंतर । निढळावरी कर ठेवूनियां ॥ १ ॥ जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ २ ॥ पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें । विठ्ठलासारिकें चतुर्भुज ॥ ३ ॥ तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा ॥ ४ ॥

८४०. काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥ धृ. ॥ काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ २ ॥ काय तुझें आम्हां करावें वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ॥ ३ ॥ तुका म्हणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥ ४ ॥ 

८४१. वाट पाहे हरि कां नये अझुनि । निष्ठुर कां मनीं धरियेलें ॥ १ ॥ काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥ २ ॥ नाहीं माझा धांवा पडियेला कानीं । कोठें चक्रपाणी गुंतलेती ॥ ३ ॥ नाहीं कळो आले अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतों ॥ ४ ॥ बहुतां दिसांचें राहिलें भातुकें । नाहीं कवतुकें कुरवाळिलें ॥ ५ ॥ तुका म्हणे देईं एकवेळां भेटी । शीतळ हे पोटीं होईल मग ॥ ६ ॥

८४२. नाहीं बळ योगअभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥ १ ॥ तुझिये भेटीचें प्रेम अंतरंगीं । नाहीं बळ अंगी भजनाचें ॥ २ ॥ काय पांडुरंगा करूं बा विचार । झुरतें अंतर भेटावया ॥ ३ ॥ तुका म्हणे सांगा वडिलपणें बुद्धी । तुजविण दयानिधी पुसों कोणा ॥४॥

८४३. न लगती मज शब्दब्रह्मज्ञान । तुझिया दर्शना वांचूनियां ॥ १ ॥ म्हणऊनि तुझें करितों चिंतन । नावडे वचन आणिकांचें ॥ २ ॥ काय तीं महत्त्वें करावी मान्यता । तुज न देखतां पांडुरंगा ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज भेटल्यावांचून । न राहें त्याहून होइन वेडा ॥ ४ ॥

८४४. हाचि माझा नेम धरिला हा धंदा । यावरि गोविंदा भेटी द्यावी ॥ १ ॥ हाचि माझा ध्यास सदा सर्व काळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ २ ॥ डोळियांची भूक पाहतां श्रीमुख। आलिंगनें सुख निवती भुजा ॥ ३ ॥ बहु चित्त ओढे तयाचिये सोई । पुरेल हा कई नवस नेणों ॥ ४ ॥ बहुबहु काळ झालों कासावीस । वाहिलें बहुवस कलेवर ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां पडावें हें ओझें । पांडुरंगा माझे इयावरी ॥ ६ ॥

८४५. स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचें । काय त्या प्रेमाचें सुख मज ॥ १ ॥ दुखवीना चित्त तुझें नारायणा । कांहींच मागेना तुजपासीं ॥ २ ॥ रिद्धिसिद्धि मोक्ष संपत्ति विलास । सोडियेली आस यांची जीवें ॥ ३ ॥ तुका म्हणे एक वेळ देई भेटी । वोरसोनि पोटीं आळिंगावें ॥ ४ ॥

८४६. नेणपणे केला नाहीं हा बोभाट । आतां आली वाट कळों खरी ॥ १ ॥ आतां बहु शीघ्र यावें लवकरी । वाट पाहें हरी भेटी देई ॥ २ ॥ समर्थाच्या बाळा करुणेचें भाषण । तरी त्याची कोण नांदणूक ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु बोलिले बडिवार । पडिलें अंतर लौकिकीं तें ॥ ४ ॥

८४७. भेटीलागी जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥ धृ. ॥ पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ २ ॥ दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतीसे वाटुली पंढरीची ॥ ३ ॥ भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥ ४ ॥ तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥ ५ ॥

८४८. आमुचीं जिवलगें सज्जन सोयरीं । नांदतील तीरीं भिवरेच्या ॥ १ ॥ तींच माझ्या चित्तीं वसती दिवसराती । भेटावया खंती वाटतसे ॥ २ ॥ संपदा सोहळे सर्व सुख वसे । वैकुंठीं जें नसे सुखरासी ॥ ३ ॥ ज्याच्या नामें पाप दुःख नासे भय । विठ्ठल बाप माय रखुमाई ॥ ४ ॥ माझा जीव जीतो अमृत ते कळा । कंठीं वेळोवेळा ध्यात असे ॥ ५ ॥ तुका म्हणे वाट पाहातां शिणले । त्या पंथ डोळुले पंढरीच्या ॥ ६ ॥

८४९. लोकमान देहसुख । संपत्तिउपभोग अनेक । विटंबना दुःख । तुझिया भेटी वांचूनि ॥ १ ॥ तरि मज ये भेट । काय ठाकलासी नीट। थोर पुण्यें वीट । तुज दैवेंचि लाधली ॥ २ ॥ काय ब्रह्मज्ञान करूं कोरडें । रितें मायेचें मापाडें । भेटीविण कुडें । तुझिया अवघें मज वाटे ॥ ३ ॥ आत्मस्थितीचा विचार । काय करूं हा उद्धार । न देखतां धीर । चतुर्भुज मज नाहीं ॥ ४ ॥ रिद्धिसिद्धी काय करूं । अथवा आगम विचारु । भेटीविण भारु । तुझिया वाटे मज यांचा ॥ ५ ॥ तुजवांचूनि कांहीं व्हावें । ऐसें नको माझिया जीवें । तुका म्हणे द्यावें । दरुषण पायांचें ॥ ६ ॥

८५०. मातेविण बाळा । आणीक न माने सोहळा ॥ १ ॥ तैसें जालें माझ्या चित्ता । तुजविण पंढरीनाथा ॥ २ ॥ वाट पाहे मेघा बिंदु । नेघे चातक सरिता सिंधू ॥ ३ ॥ सारसाशीं निशीं । ध्यान रवीच्या प्रकाशीं ॥ ४ ॥ जीवनावीण मत्स्य । जैसें धेनूलागीं वत्स ॥ ५ ॥ पतिव्रते जिणें । भ्रताराच्या वर्तमानें ॥ ६ ॥ कृपणाचें धन । लोभ्यालागीं जैसें मन ॥ ७ ॥ तुका म्हणे काय । तुजविण प्राण राहे ॥ ८ ॥

८५१. सर्वभावें आलों तुजचि शरण । कायावाचामनसहित देवा ॥ १ ॥ आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ २ ॥ माझिये जीवींचें कांहीं जडभारी । तुजविण वारी कोण दुजें ॥ ३ ॥ तुझे आम्ही दास आमुचा तूं ऋणी । चालत दुरूनी आलें मागें ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां घेतलें धरणें । हिशोबाकारणें भेटी देई ॥ ५ ॥

८५२. दंभे कीर्ति पोट भरे मानी जन । स्वहितकारण नव्हे कांहीं ॥ १ ॥ अंतरतीं तुझे पाय मज दुरी । धरितां हे थोरी जाणिवेची ॥ २ ॥ पिंडाच्या पाळणें धांवती विकार । आहे दावेदार मजमाजी ॥ ३ ॥ कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥ ४ ॥ तुका म्हणे मज दावीं तो सोहळा । देखें पाय डोळां तुझे देवा ॥ ५ ॥

८५३. डोळियां पाझर कंठ माझा दाटी । येई वो देई भेटी पांडुरंगे ॥ १ ॥ बहु दिस टाकिलें निरास कां केलें । कोठे वो गुंतलें चित्त तुझें ॥ २ ॥ बहु धंदा तुज नाहीं वो आठव । राहिलासे जीव माझा कंठीं ॥ ३ ॥ पंढरीस जाती वारकरी संतां । निरोप बहुतां हातीं धाडी ॥ ४ ॥ तुजविण कोण सांवाधांवा करी । येईं वो झडकरी पांडुरंगे ॥ ५ ॥ काय तुझी वाट पाहों कोठवरी । कृपाळुवा परी विसरलासी ॥ ६ ॥ एक वेळे माझा धरूनि आठव । तुका म्हणे येवो न्यावयासी ॥ ७ ॥

८५४. कोण्या काळें येईल मना । नारायणा तुमचिया ॥ १ ॥ माझा करणें अंगीकार । सर्व भार फेडूनी ॥ २ ॥ लागली ये तळमळ चित्ता । तरी दुश्चिता संसारीं ॥ ३ ॥ मुखाचीच पाहे वास । मागें दास सांभाळी ॥ ४ ॥ इच्छा पूर्ण जाल्याविण । कैसा सीण वारेल ॥ ५ ॥ लाहो काया मनें वाचा । दिवसाच्या भेटीचा ॥ ६ ॥ कांटाळा तो न धरावा । तुम्ही देवा दासाचा ॥ ७ ॥ तुका म्हणे माझे वेळे । न कळे कां हें उफराटे ॥ ८ ॥

८५५. बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंग हे पितळ न देखतां ॥ १ ॥ माझें चित्त मज जवळीच ग्वाही । तुज मज नाहीं भेटी ऐसें ॥ २ ॥ दासीसुता नाहीं पितियाचा ठाव । अवघेंचि वाव सोंग त्याचें ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी केली विटंबना । अनुभवें जना येईल कळों ॥ ४ ॥ 

८५६. तुमची तों भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडीच बोली ब्रह्मज्ञान ॥ १ ॥ आतां न बोलावें ऐसें वाटे देवा । संग न करावा कोणासवें ॥ २ ॥ तुम्हां निमित्यासी सांपडलें अंग । नेदावा हा संग विचारिलें ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी राहिली वासना । आवडी दर्शनाचीच होती ॥ ४ ॥

८५७. तुझा म्हणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें ॥ १ ॥ तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ २ ॥ काय शब्दचि ऐकिला । भेटी नव्हतां गा विठ्ठला ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । अभय देई पंढरिनाथा ॥ ४ ॥

८५८. उद्भवअक्रूरासी । आणीक व्यासअंबऋषी । रुक्मांगदा प्रल्हादासी । दाविलें तें दाखवी ॥ १ ॥ तरि मी पाहेन पाहेन । तुझे श्रीमुखचरण । उताविळ मन । तयाकारणें तेथें ॥ २ ॥ जनका श्रुतदेवा करीं । कैसा शोभलासी हरी । विदुराच्या घरीं । कण्या धरी कवतुकें ॥ ३ ॥ पांडवां अकांतीं । तेथे पावसी स्मरती । घातलें द्रौपदी । लागीं बिरडें चोळीचें ॥ ४ ॥ करी गोपींचें कवतुक । गाईगोपाळांसी सुख । दावीं तेंचि मुख । दृष्टी माझ्या आपुलें ॥ ५ ॥ तरि तूं अनाथाचा दाता । मागतियां शरणागतां । तुका म्हणे आतां । कोड पुरवी हें माझें ॥ ६ ॥

८५९. मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ॥ १ ॥ मज भक्तीची आवडी । नाहीं अंतरी ते गोडी ॥ २ ॥ आपल्या प्रकारा । करा जतन दातारा ॥ ३ ॥ तुका म्हणे भेटी । पुरे एकचि शेवटीं ॥ ४ ॥

 

 

 

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...