Saturday, 3 May 2025

१६. देवाशीं सलगीचे अभंग

 श्री तुकोबाराय यांनी आपल्या मनातील भावना मैत्रभावाने देवाजवळ व्यक्त केल्या, त्याविषयीचे अभंग.

देवाशीं सलगीचे अभंग (अभंग संख्या २०६)

८६०. नमो विश्वरूपा विष्णु मायबापा । अपारा अमुपा पांडुरंगा ॥ १ ॥ विनविताें रंक दास मी सेवक । वचन ते एक आइकावें ॥ २ ॥ तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥ ३ ॥ ऋषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥ ४ ॥ तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ति देवा ॥ ५ ॥

८६१. तुज ऐसा कोणी न देखे उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥ १ ॥ शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ देसी ॥ २ ॥ धांवसी आडणी ऐकोनियां धांवा । कइवारें देवा भक्तांचिया ॥ ३ ॥ दोष त्यांचे जाळी कल्पकोटिवरी । नामासाटीं हरि आपुलिया ॥ ४ ॥ तुका म्हणे तुज वाणूं कैशा परी । एक मुख हरी आयुष्य थोडें ॥ ५ ॥

८६२. उदार कृपाळ अनाथांचा नाथ । ऐकसी मात शरणागतां ॥ १ ॥ सर्व भार माथां चालविसी त्यांचा । अनुसरले वाचा काया मनें ॥ २ ॥ पाचारितां उभा राहासी जवळी । पाहिजे तें काळीं पुरवावें ॥ ३ ॥ चालतांही पंथ सांभाळीसी वाटे । वारिसील कांटे खडे हातें ॥ ४ ॥ तुका म्हणे चिंता नाहीं तुझ्या दासां । तूं त्यांचा कोंवसा सर्वभावें ॥ ५ ॥

८६३. यथार्थवादें तुज न वर्णवे कदा । बोलतों ते निंदा करितों तुझी ॥ १ ॥ वेदश्रुति तुज नेणती कोणी । चोवीस ठेंगणीं धांडोळिता ॥ २ ॥ आतां मज क्षमा करावें तें देवा । सलगी ते केशवा बोलियेलों ॥ धृ. ॥ सगुण कीं साकार निर्गुण कीं निराकार । न कळे हा पार वेदश्रुतीं ॥ ४ ॥ तो आम्हीं भावें केलासी लहान । ठेवोनियां नांवें पाचारितों ॥ ५ ॥ सहस्त्रमुखें शेष सीणला स्तवितां । पार न कळतां ब्रह्मा ठेला ॥ ६ ॥ तेथें माझी देहबुद्धि ते काई । थोर मी अन्यायी तुका म्हणे ॥ ७ ॥

८६४. अनंताचे मुखीं होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुम्हां ॥ १ ॥ माझें कोठें आलें होईल विचारा । तरीच अव्हेरा योग्य झालों ॥ २ ॥ सर्व काळ तुम्ही असा जी संपन्न । चतुरा नारायण शिरोमणि ॥ ३ ॥ तुका म्हणे असें कलियुगींचे जीव । तरी नये कींव बहुपापी ॥ ४ ॥

८६५. उदारा कृपाळा पतितपावना । ब्रिदें नारायणा साच तुझीं ॥ १ ॥ वर्णिलासी जैसा जाणतां नेणतां । तैसा तूं अनंता साच होसी ॥ २ ॥ दैत्यां काळ भक्ता मेघश्याममूर्ति । चतुर्भुज हातीं शंख चक्र ॥ ३ ॥ काम इच्छा तया तैसा होसी रानीं । यशोदेच्या स्तनीं पान करी ॥ ४ ॥ होऊनि सकळ कांहींच न होसी । तुका म्हणे यासी वेद ग्वाही ॥ ५ ॥

८६६. जन हें सुखाचे दिल्याघेतल्याचें। अंत हें काळींचें नाहीं कोणी ॥ धृ. ॥ जाल्या हीन शक्ति नाकडोळे गळती । सांडोनियां पळती रांडापोरें ॥ २ ॥ बाइल म्हणे खर मरता तरी बरें । नासिलें हें घर थुंकोनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे माझीं नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनियां ॥ ४ ॥

८६७. मी तों बहु सुखी आनंदभरित । आहें साधुसंतां मेळींकारी ॥ धृ. ॥ कांहीं व्हावें ऐसें नाहीं माझ्या जीवा । आणीक केशवा तुजविण ॥ २ ॥ नलगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता । सुख वाटे घेतां जन्म ऐसे ॥ ३ ॥ मृत्युलोकीं कोण धरिल वासना । पावावया जनासवें दुःख ॥ ४ ॥ तुका म्हणे तुझा दास ऐसें लोका । कांहीं सकळिका कळों यावें ॥ ५ ॥

८६८. आपुले गांवींचें न देखेसें जालें । परदेसी एकलें किती कंठूं ॥ १ ॥ म्हणउनि पाहें मूळ येतां वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥ २ ॥ पाहतां अवघ्या दिसतील दिशा । सकळही वोसा दृष्टीपुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे कोणी न सांगे वारता । तुझी वाटे चिंता पांडुरंगा ॥ ४ ॥

८६९. आवडी धरूनि करूं गेलों लाड । भक्ति प्रेमकोड न पुरेचि ॥ १ ॥ म्हणऊनि जीव ठेला आसावोनि । खेद होतो मनी बहुसाल ॥ २ ॥ वेठी ऐसें वाटे निर्फळ कारण । शीतळ होऊन खोडावलों ॥ ३ ॥ तुका म्हणे सरतें नव्हेंचि पायांपें । बळ केलें पापें नव्हे भेटी ॥ ४ ॥

८७०. लागों नेदी बोल पायां तुझ्या हरी । जीव जावो परि न करीं आन ॥ १ ॥ परनारी मज रखुमाईसमान । वमनाहूनि धन नीच मानीं ॥ २ ॥ तुका म्हणे याची लाज असे कोणा । सहाकारी दीना ज्याची तया ॥ ३ ॥ (धृ. नाही)

८७१. पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । कांहीं देहाकडे नावलोकी ॥ १ ॥ म्हणउनि मागें कंठीचा सौरस । पावतील नाश विघ्नें पुढें ॥ २ ॥ कृपेच्या कटाक्षे न भें कळिकाळा । येतां येत बळा शक्ती पुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे गुढी आणीन पायापें । होइल तें सोपे नाम तुझें ॥ ४ ॥

८७२. बोलिलेंचि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका ॥ १ ॥ बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥ २ ॥ बहुतांच्या भावें वांटिसी भातुकें । बहु कवतुकें खेळविसी ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसें जाणतसों वर्म । करणें तो श्रम न वजे वायां ॥ ४ ॥

८७३. मज त्याची भीड नुल्लंघवे देवा । जो म्हणे केशवा दास तुझा ॥ १ ॥ मज आवडती बहु तैसे जन । करिती कीर्तन कथा तुझी ॥ २ ॥ सांडूनिया लाज नाचेन त्यापुढें । आइकती कोडें नाम तुझें ॥ ३ ॥ नलगे उपचार होईन भिकारी । वैष्णवांच्या घरीं उष्टावळी ॥ ४ ॥ तुका म्हणे जाणों उचित अनुचित । विचारूनि हित तेंचि करूं ॥ ५ ॥

८७४. तरी भलें वायां गेलों । जन्मा आलों मागुता ॥ १ ॥ म्हणऊनि ठेलों दास । सावकास निर्भय ॥ २ ॥ उणें पुरें काय माझें । त्याचें ओझें तुम्हासी ॥ ३ ॥ सांभाळावें तें म्यां काई । अवो आई विठ्ठले ॥ ४ ॥ भोग जया जाइन स्थळा । तुज गोपाळा विसरेना ॥ ५ ॥ आपलें म्यां एकसरें । करूनि बरें घेतलें ॥ ६ ॥ तुका म्हणे नारायणा । आतां जाणा आपुलें ॥ ७ ॥

८७५. आहे तें सकळ प्रारब्धाचे हातीं । यावें काकुलती यासी आतां ॥ १ ॥ ऐसा माझ्या मनें सांगितला भाव । तोंवरीच देव दुजा नाहीं ॥ २ ॥ अवघियांची जेव्हां सारावी करकर । भावबळें थार धरूं येसी ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज ठेवावें पूजून । आणीक तो गुण नाहीं येथे ॥ ४ ॥

८७६. आडलिया जना होसी साहाकारी । अंधळिया करीं काठी तूंचि ॥ १ ॥ आडले गांजिले पीडिले संसारीं । त्यांचा तूं कैवारी नारायणा ॥ २ ॥ प्रल्हाद महासंकटीं रक्षिला । तुम्ही आपंगिला नानापरी ॥ ३ ॥ आपुलेंचि अंग तुम्ही वोडविलें । त्याचें निवारलें महा दुःख ॥ ४ ॥ तुका म्हणे तुझे कृपे पार नाहीं । माझे विठाबाई जननीये ॥ ५ ॥

८७७. कवण जन्मता कवण जन्मविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥ १ ॥ कवण हा दाता कवण हा मागता । न कळे कृपावंता माव तुझी ॥ २ ॥ कवण भोगिता कवण भोगविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥ ३ ॥ कवण ते रूपता कवण ते अरूपता । न कळे कृपावंता माव तुझी ॥ ४ ॥ सर्वां ठायीं तूंचि सर्वही जालासी । तुका म्हणे यासी दुजें नाहीं ॥ ५ ॥ (धृ. नाही)

८७८. जन मानवलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥ १ ॥ म्हणउनी पंढरिनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ २ ॥ संतां ब्रह्मरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥ ३ ॥ तुका म्हणे मी तों आपणासी ठावा। आहे बरा देवा जैसा तैसा ॥ ४ ॥ (धृ. नाही)

८७९. चोरटें सुने मारिलें टाळें । केऊं करी परि न संडी चाळे ॥ १ ॥ ऐसे एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ २ ॥ नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥ ३ ॥ तुका म्हणे कर्म बळिवंत गाढें । नेदी तया पुढे मागें सरों ॥ ४ ॥

८८०. आम्हांसी आपुलें नावडे संचित । चरफडे चित्त कळवळ्यानें ॥ १ ॥ न कळतां जाला खोळंबा मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ २ ॥ कळों आलें बरे उघडले डोळे । कर्णधार मिळे तरि बरें ॥ ३ ॥ तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥ ४ ॥

८८१. म्हणवितों दास न करितां सेवा । लंडपणें देवा पोट भरी ॥ १ ॥ खोटें कोठें सरे तुझे पायांपाशीं । अंतर जाणसी पांडुरंगा ॥ २ ॥ आचरण खोटें आपणासी ठावें । लटिकें बोलावें दुसरें तें ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा आहे अपराधी । असो कृपानिधि तुम्हां ठावा ॥ ४ ॥

८८२. जेथें पाहें तेथें कांडिती भूस। चिपाडें चोखूनि पाहाती रस ॥ १ ॥ काय सांगूं देवा भुलले जीव । बहु यांची येतसे किंव ॥ २ ॥ वैकुंठींचें मोटळें लटिकेंची फुगे । पेणिया जाऊनि भिक्षा मांगे ॥ ३ ॥ तुका म्हणे कां उगेचिं खोल । जवळी दाखवी आपणा वोल ॥ ४ ॥

८८३. जन तरी देखें गुंतले प्रपंचें । स्मरण तें त्यांचें त्यांसी नाहीं ॥ १ ॥ म्हणउनि मागें परतलें मन । घालणीचें रान देखोनियां ॥ २ ॥ इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठायीं । फोडीतसे डोई अहंकार ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा वासनेच्या आटें । केलीं तळपटें बहुतांचीं ॥ ४ ॥

८८४. काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगों मी या जगामाजी आतां ॥ १ ॥ जतन हें माझें करूनि संचित । दिलें अवचित आणूनियां ॥ २ ॥ घडल्या दोषांचें न घलींच भरी । आली यास थोरी कृपा देवा ॥ ३ ॥ नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं । न मागतां पाहीं दान दिलें ॥ ४ ॥ तुका म्हणे याच्या उपकारासाठीं । नाहीं माझे गांठीं कांहीं एक ॥ ५ ॥

८८५. पाखांड्यांनीं पाठीं पुरविला दुमाला । तेथें मी विठ्ठला काय बोलों ॥ धृ. ॥ कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपण भिकारी अर्थ नेणे ॥ २ ॥ न कळे तें मज पुसती छळूनी । लागतां चरणीं न सोडिती ॥ ३ ॥ तुझ्या पायांविण दुजें नेणें कांहीं । तूंचि सर्वांठायीं एक मज ॥ ४ ॥ तुका म्हणे खीळ पडो त्याच्या तोंडा । किती बोलों भांडा वादकांसी ॥ ५ ॥

८८६. कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देइल धीर माझ्या जीवा ॥ १ ॥ शास्त्रज्ञ पंडित नव्हे मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥ २ ॥ कलियुगीं बहु कुशळ हे जन । छळितील गुण तुझे गातां ॥ ३ ॥ मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥ ५ ॥

८८७. तुजविण वाणीं आणिकाची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥ १ ॥ तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हे मस्तक भंगो माझे ॥ २ ॥ नेत्रीं आणिकासी पाहीन आवडी । जातु तेचि घडी चांडाळ हे ॥ ३ ॥ कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥ ४ ॥ तुका म्हणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥ ५ ॥

८८८. द्रव्य घेऊनिया कथा जरी करी । तरी भंगो हरी देह माझा ॥ १ ॥ माझी कथा करा ऐसें म्हणे कोणा । तरी नारायणा जिव्हा झडो ॥ २ ॥ साह्य तूं झालासी काय उणें तुपें । आणिक भूतांपें काय मागे ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्व सिद्धि तुझे पायीं । तूं माझा गोसावी पांडुरंगा ॥ ४ ॥ ( धृ. नाही )

८८९. कासयासी व्हावें आम्ही जीवन्मुक्त । सांडुनियां थीत प्रेमसुख ॥ १ ॥ वैष्णवांचा दास झाला नारायण । काय त्या मिळोन असों सुखी ॥ २ ॥ काय त्या गांठींचें पडलें सुटोन । उगेचि बैसोन धीर धरूं ॥ ३ ॥ सुख आम्हांसाठीं केलें हें निर्माण । निर्दैव तो कोण हाणे लाता ॥ ४ ॥ तुका म्हणे मज नलगे सायुज्यता । राहेन या संता समागमे ॥ ५ ॥

८९०. जन्ममरणाची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया ॥ १ ॥ वदनीं तुझें नाम अमृतसंजीवनी । असतां चक्रपाणी भय काय ॥ २ ॥ हृदयीं तुझें रूप बिंबलें साकार । तेथें कोण पार संसाराचा ॥ ३ ॥ तुका म्हणे तुझ्या नामाची पाखर । असतां कळिकाळ पायांतळीं ॥ ४ ॥

८९१. आमुचें उचित हेचि उपकार । आपुलाचि भार घालूं तुज ॥ १ ॥ भूक लागलिया भोजनाची आळी । पांघुरण काळीं शीताचिये ॥ २ ॥ जेणें काळीं उठी मनाची आवडी । तेचि मागों घडी आवडे तें ॥ ३ ॥ दुःख येवो नेदी आमचिया घरा । चक्र करी फेरा भोंवताला ॥ ४ ॥ तुका म्हणे नाहीं मुक्तीसवें चाड । हेंचि आम्हा गोड जन्म घेतां ॥ ५॥

८९२. दिली हाक मनें नव्हतें जतन । वेगळाल्या गुण धाव घेती ॥ १ ॥ काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा हिंसा फार माया तृष्णा ॥ २ ॥ इंद्रियांचे भार फिरतील चोर । खाणें घ्यावया घर फोडूं पाहे ॥ ३ ॥ माझा येथें कांहीं न चले पराक्रम । आहे त्याचें वर्म तुझे हातीं ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां करितों उपाय । जेणें तुझे पाय आतुडती ॥ ५ ॥

८९३. दुखवलें चित्त आजिच्या प्रसंगें । बहु पीडा जगे केली देवा ॥ १ ॥ कधीं हा संबंध तोडिसी तें नेणें । आठवूनि मनें पाय असें ॥ २ ॥ आणिकांचीं येती अंतरा अंतरें । सुखदुःख बरेवाईट तें ॥ ३ ॥ तुका म्हणे घडे एकांताचा वास । तरिच या नास संबंधाचा ॥ ४ ॥

८९४. खेळतां निजभावें समर्थाचें बाळ । तयाच्या सकळ सत्तेखालीं ॥ १ ॥ तरी लेवविला शोभे अळंकार । नाहीं तरी भार मानाविण ॥ २ ॥ अवघीच दिशा असावी मोकळी । मायबाप बळी म्हणऊनि ॥ ३ ॥ तुका म्हणे माझें ऐसें आहे देवा । म्हणऊनि सेवा समर्पिली ॥ ४ ॥

८९५. कळों आला भाव माझा मज देवा । वांयांविण जीवा आट केली ॥ १ ॥ जोडूनि अक्षरें केली तोंडपिटी । नलगे शेवटीं हातीं कांहीं ॥ २ ॥ देव जोडे म्हणोन सांगतसे लोकां । माझा मीच देखा दुःख पावें ॥ ३ ॥ तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥ ४ ॥

८९६. बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । आम्हीं अविश्वासी सर्वभावें ॥ १ ॥ दंभे करूं भक्ति सोंग दावूं जना । अंतरीं भावना वेगळिया ॥ २ ॥ चित्ताचा तूं साक्षी तुज कळे सर्व । किती करूं गर्व आतां पुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा तूं काय करिसी । कर्मा दुस्तरासी आमुचिया ॥ ४ ॥

८९७. कासया वांचोनि झालों भूमिभार । तुझ्या पायीं थार नाहीं तरी ॥ १ ॥ जातां भलें काय डोळियांचे काम । जंव पुरुषोत्तम न देखती ॥ २ ॥ काय मुख पेंव श्वापदांची धांव । नित्य तुझें नांव नुच्चारितां ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां पांडुरंगाविण । न वांचतां क्षण जीव भला ॥ ४ ॥

८९८. समर्थासी लाज आपुल्या नामाची । शरण आल्याची लागे चिंता ॥ १ ॥ न पाहे तयाचे गुण दोष अन्याय । सुख देउनि साहे दुःख त्याचें ॥ २ ॥ मान भलेपण नाहीं फुकासाठीं । जयावरि गांठी झीज साहे ॥ ३ ॥ तुका म्हणे हे तूं सर्वही जाणसी । मज अधिरासी धीर नाहीं ॥ ४ ॥

८९९. माझे तों स्वभाव मज अनावर । तुजही देतां भार कांहीं नव्हे ॥ १ ॥ ऐसें कळों आलें मज नारायणा । जागृती स्वपना ताळ नाहीं ॥ २ ॥ संपादितों तो हा अवघा बाह्य रंग । तुझा नाहीं संग अभ्यंतरीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सत्या नाहीं पाठी पोट । असतें निघोट एकी जाती ॥ ४ ॥

९००. आवडी धरोनी आलेती आकारा । केला हा पसारा याजसाठीं ॥ १ ॥ तें मी तुझें नाम गाईन आवडी । क्षण एक घडी विसंबेना ॥ २ ॥ वर्म जाणावें हा मुख्य धर्मसार । अवघे प्रकार तया पोटीं ॥ ३ ॥ वेगळ्या विचारें वेगळाले भाव । धरायासी ठाव बहु नाहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे घालूं इच्छेचिये पोटीं । कवळुनी धाकुटी मुर्ती जीवें ॥ ५ ॥ 

९०१. फिरविलें देऊळ जगामाजी ख्याती । नामदेवा हातीं दूध प्याला ॥ १ ॥ भरियेली हुंडी नरसी मेहत्याची । धनाजी जाटाची सेतें पेरी ॥ २ ॥ मिराबाईसाटीं घेतो विषप्याला । दामाजीचा जाला पाढेवार ॥ ३ ॥ आवडीने मळा खुरपी सावत्याचा । लाख्या कोलाट्याचा ढोल पिटी ॥ ४ ॥ चोखाेबाची ढोरे ओढीतो कृपाळू । जनाईशी दळू लागे प्रेमे ॥ ५ ॥ कबिराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥ ६ ॥ आतां तुम्ही दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां वेळोवेळां ॥ ७ ॥ (धृ. नाही)

९०२. कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दज्ञानें देवा नाश केला ॥ १ ॥ आतां तुझें वर्म न कळे अनंता । तुज न सांगतां बुडूं पाहे ॥ २ ॥ संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापाशीं म्हणती एक ॥ ३ ॥ बुडविली भक्ति म्हणती ते पाषाण । पिंडाचें पाळण स्थापुनियां ॥ ४ ॥ न करावी कथा म्हणती एकादशी । भजनासी नासी मांडियेली ॥ ५ ॥ न जावें देउळा म्हणती देव घरीं । बुडविलें या परी तुका म्हणे ॥ ६ ॥

९०३. कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावी मज याचकासी ॥ १ ॥ कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥ २ ॥ कैसी कीर्ति वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवणू कैसा तुज ॥ ३ ॥ कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी स्थिती मती दावीं मज ॥ ४ ॥ तुका म्हणे जैसे दास केलें देवा । ऐसें हें अनुभवा आणीं मज ॥ ५ ॥

९०४. वाट दावी त्याचें गेलें काय । नागवला जो वारितां जाय ॥ १ ॥ ऐसीं मागें ठकलीं किती । सांगतां खाती विषगोळा ॥ २ ॥ विचारोनि पाहे त्यास । न वजे जीवा नव्हे नास ॥ ३ ॥ तुका म्हणे जो रुसला जीवा । तयासी केशवा काय चाले ॥ ४ ॥

९०५. मिळे हरिदासांसी दाटी । रीघ न होय शेवटीं ॥ १ ॥ तेथें काय म्यां करावें । माझें कोणें आइकावें ॥ २ ॥ कैसें तुज लाजवावें । भक्त म्हणोनियां भावें ॥ ३ ॥ नाचतां नये तालीं । वाजवितां नये टाळी ॥ ४ ॥ अति मंडित भूषणें । शरीर माझें दैन्यवाणें ॥ ५ ॥ तुका म्हणे कमळापति । मज द्यावें त्यांचे हातीं ॥ ६ ॥

९०६. न बोलावें ऐसें जनासी उत्तर । करितों विचार बहु वेळां ॥ १ ॥ कोण पाप आड ठाकतें येऊन । पालटीत गुण अंतरींचा ॥ २ ॥ संसारा हातीं सोडविला गळा । कां हे अवकळा येती पुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे सेवे घडे अंतराय । यासी करूं काय पांडुरंगा ॥ ४ ॥

९०७. आतां हें उचित माझी जनाहातीं । पाहिजे फजिती केली कांहीं ॥ १ ॥ मग मी तुमचे न सोडीं चरण । त्रासोनियां मन येईल ठाया ॥ २ ॥ वाउगे वाणीचा न धरीं कांटाळा । ऐसी कां चांडाळा बुद्धि मज ॥ ३ ॥ तुका म्हणे जरि माथां बैसे घाव । तरि मग वाव नेघे पुढें ॥ ४ ॥

९०८. त्रासला हा जीव संसारीच्या सुखा । तुजविण सखा नाहीं कोणी ॥ १ ॥ ऐसें माझे मनीं वाटे नारायणा । घालावी चरणावरी मिठी ॥ २ ॥ कइं तें सुंदर देखेन रूपडें । आवडीच्या कोडें आळंगीन ॥ ३ ॥ नाहीं पूर्वपुण्य मज पामरासी । म्हणोनि पायांसी अंतरलों ॥ ४ ॥ अलभ्य लाभ कैंचा संचितावेगळा । विनवी गोपाळा दास तुका ॥ ५ ॥

९०९. करूनि चिंतन खेळें भोवतालें । चित्त येथें आलें पायांपाशीं ॥ १ ॥ येथें नाहीं खोटा चालत परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥ २ ॥ सुख दुःख तुज देऊनि सकळ । नाहीं ऐसा काळ केला आम्ही ॥ ३ ॥ तुका म्हणे जाला देहाचा विसर । आतां आपपर नाहीं कोणी ॥ ४ ॥

९१०. सुराणीचीं झालों लाडिकीं एकलीं । वडील धाकुलीं आम्ही देवा ॥ १ ॥ म्हणुऊनि कांहीं न घडे अव्हेर । गोमटें उत्तर भातुकेंही ॥ २ ॥ कांहीं एक नाहीं वंचिलें वेगळें । मुळींचिया मुळें स्थिरावलें ॥ ३ ॥ लेवविलीं अंगीं आपुलीं भूषणें । अळंकार लेणें सकळही ॥ ४ ॥ सारितां न सरे अमुप भांडार । धना अंतपार नाहीं लेखा ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्ही आळवूं आवडी । म्हणऊनी जोडी दाखविली ॥ ६ ॥

९११. आलों उल्लंघुनि दुःखाचे पर्वत । पायापाशीं हित तुमच्या तरी ॥ १ ॥ न देखेची लासा दुःखी होतें मन । कठिणें कठिण वाटतसे ॥ २ ॥ नव्हे सांडी परि वाटतें निरास । न ये माझ्या दिस संकल्पाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही सदैव जी देवा । माझ्या हाचि जीवा एक ठाव ॥ ४ ॥ 

९१२. नामाचा महिमा बोलिलों उत्कर्ष । अंगीं कांहीं रस न येचि तो ॥ १ ॥ कैसें समाधान राहे पांडुरंगा । नलगेचि अंगा आणी कांहीं ॥ २ ॥ लाभाचिये अंगीं सोस कवतुकें । फिक्याचे ते फिके वेवसाव ॥ ३ ॥ तुका म्हणे करा आपुला महिमा । नका जाऊं धर्मावरी माझ्या ॥ ४ ॥

९१३. वैराग्याचा अंगीं झालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया ॥ १ ॥ कां जी माझें करूं नये समाधान । वियोगानें मन सिणतसे ॥ २ ॥ न येचि न्यावया पंढरीचें मूळ । न देवेचि माळ कंठींचीही ॥ ३ ॥ तुका म्हणे झाले अप्रीतीचें जिणें । लाजिर हें वाणें सेवा करी ॥ ४ ॥

९१४. म्हणउनि काय जीऊं भक्तपणें । जायाचीं भूषणें अळंकार ॥ १ ॥ आपुल्या कष्टाची करोनियां जोडी । मिरवीन उघडी इच्छावसें ॥ २ ॥ तुके तरी तुके खऱ्याचें उत्तम । मुलाम्याचा भ्रम कोठवरी ॥ ३ ॥ तुका म्हणे पुढें आणि मागें फांस । पावें ऐसा नास न करी देवा ॥ ४ ॥

९१५. सोंवळा होऊं तों वोंवळें जडलें । सांडीमांडी बोले तोंडीं बीजीं ॥ १ ॥ एकसरीं केली कलेवरें साटी । आतां नका तुटी पायांसवें ॥ २ ॥ संकल्पीं विकल्प पापाचा सुकाळ । रज्जुसर्प मुळ मरणाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे हें तूं ब्रह्मांड चाळिता । मी कां करूं चिंता पांडुरंगा ॥ ४ ॥ 

९१६. कोणी एकाचिया पोरें केली आळी । ठावे नाहीं पोळी मागे देखी ॥ १ ॥ बुझाविलें हातीं देउनी खापर । छंद करकर वारियेली ॥ २ ॥ तैसें नको करूं मज कृपावंता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मायबापाचें उचित । करावें स्वहित बाळकाचें ॥ ४ ॥ (धृ. नाही)

९१७. निष्ठुर यासाठीं करितों भाषण । आहेसी सर्वज्ञ जाणता तूं ॥ १ ॥ ऐसें दुःख कोण आहे निवारिता । तो मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ २ ॥ बैसलासी केणे करूनि एके घरीं । नाहीं येथ उरी दुसऱ्याची ॥ ३ ॥ तुका म्हणे आलें अवघेंच पायापें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥ ४ ॥ (धृ. नाही)

९१८. न कळसी ज्ञाना न कळसी ध्याना । न कळसी दर्शना धांडोळितां ॥ १ ॥ न कळसी आगमा न कळसी निगमा । न बोलवे सीमा ब्रह्मादिकां ॥ २ ॥ तुका म्हणे तुझा नाहीं अंतपार । म्हणोनि विचार पडिला मज ॥ ३ ॥ (धृ. नाही)

९१९. माउलीसी सांगे कोण । प्रेमें वाढवी तान्हें ॥ १ ॥ अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ २ ॥ मायबापांची उपमा । तुज देऊं पुरुषोत्तमा ॥ ३ ॥ तेही साजेना पाहातां । जीवलगा पंढरीनाथा ॥ ४ ॥ माय पाळी संसारीं । परलोकीं राहे दूरी ॥ ५ ॥ तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥ ६ ॥ तुका म्हणे नारायणा । तुज बहुत करुणा ॥ ७ ॥

९२०. धर्म रक्षावया अवतार घेसी । आपुल्या पाळिसी भक्तजना ॥ धृ. ॥ अंबऋषीसाठीं जन्म सोशियेले । दुष्ट निर्दाळिले किती एक ॥ २ ॥ धन्य तुज कृपासिंधु म्हणतील । आपुला तूं बोल साच करी ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज वर्णिती पुराणें । होय नारायण दयासिंधु ॥ ४ ॥

९२१. अजामीळ अंत मरणासी आला । तोवरि स्मरला नाहीं तुज ॥ १ ॥ प्राण जातेवेळे म्हणे नारायण । त्यासाठी विमान पाठविलें ॥ २ ॥ बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥ ३ ॥ तुका म्हणे भक्तकाज तूं कैवारी । तुज साही चारी वर्णिताती ॥ ४ ॥ (धृ. नाही)

९२२. मी त्यांसी अनन्य तीं कोणा असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥ १ ॥ आहे तो विचार आपणयापाशीं । कळा बिंबाऐसी प्रतिबिंबीं ॥ २ ॥ शुभ शकुन तो शुभ लाभे फळे । पुढील तें कळे अनुभवें ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा असेल आठव । तैसा माझा भाव तुझ्या पायीं ॥ ४ ॥

९२३. रडे अळंकार दैन्याचिये कांती । उत्तमा विपत्तिसंग घडे ॥ १ ॥ एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ २ ॥ रांधूं नेणें तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वायां जाय ॥ ३ ॥ तुका म्हणे चिंतामणि शेळी गळां । पावे अवकळा म्हणउनि ॥ ४ ॥

९२४. वदे वाणी परि दुर्लभ अनुभवो । चालीचाची वाहो बहुतेक ॥ १ ॥ आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलागा काळ जिंकितसे ॥ २ ॥ वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥ ३ ॥ तुका म्हणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभय करें ॥ ४ ॥

९२५. आइकें नारायणा वचन माझें खरें । सांगतों निर्धारें तुजपासीं ॥ १ ॥ नाहीं भाव मज पडिली लोकलाज । राहिलेंसे काज तुझे पायीं ॥ २ ॥ वरदळ भक्ति करितों मी नित्य । परि नाहीं चित्त तुझे पाईं ॥ ३ ॥ जरि तुज कांहीं करणें उचित । तारी तूं पतित तुका म्हणे ॥ ४ ॥ 

९२६. दुःख वाटे ऐसी ऐकोनियां गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥ १ ॥ येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥ २ ॥ काय करूं देवा ऐसी नाहीं शक्ति । दंडुनि पुढती वाटे लावूं ॥ ३ ॥ तुका म्हणे मज दावूं नको ऐसे । दृष्टीपुढें पिसे पांडुरंगा ॥ ४ ॥

९२७. तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेंचि देसी पद दासा ॥ १ ॥ शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥ २ ॥ भावें हें कदान्न खासी त्याचे घरीं । अभक्ताच्या परी नावडती ॥ ३ ॥ नवजासी जेथें दुरी दवडितां । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥ ५ ॥

९२८. तुम्ही साच नुपेक्षाल हा भरंवसा । मज जाणतसां अधीरसें ॥ १ ॥ कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ २ ॥ सुटों नये ऐसें कळलें निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवूनि ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही सभाग्य जी देवा । माझा तुम्हा केवा काय आला ॥ ४ ॥

९२९. काय आम्ही आतां पोटचि भरावें । जग चाळवावें भक्त म्हूण ॥ १ ॥ ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ २ ॥ काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥ ३ ॥ तुका म्हणे काय गुंफोनि दुकाना । राहो नारायणा करूनी घात ॥ ४ ॥

९३०. जनीं जनार्दन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हां ॥ धृ. ॥ जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ २ ॥ पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणें । हीं कोणा कारणें कवणें केलीं ॥ ३ ॥ आम्हां मरण नाश तूं तव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥ ४ ॥ तुका म्हणे तूंचि निवडी हें गुढार । दाखवी साचार तेचि मज ॥ ५ ॥

९३१. आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचें । कैचें दिलें साचें करोनियां ॥ १ ॥ दुजियासी तव अकळ हा भाव । करावा तो जीव साक्षी येथें ॥ २ ॥ एकीं अनेकत्व अनेकीं एकत्व । प्रकृतिस्वभावत्व प्रमाणेंचि ॥ ३ ॥ तुका म्हणे करूं उगवूं जाणसी । कुशळ येविशीं तुम्ही देवा ॥ ४ ॥

९३२. पापपुण्यसुखदुःखाची मंडळें । एक एका बळें धांव घेती ॥ १ ॥ कवतुक डोळां पाहिलें सकळ । नाचवितो काळ जीवांसी तो ॥ २ ॥ स्वर्गाचिया भोगें सरतां नरक । मागें पुढें एक एक दोन्ही ॥ ३ ॥ तुका म्हणे भय उपजलें मना । घेईं नारायणा कडिये मज ॥ ४ ॥

९३३. तोंडें बोलावें तें तरी वाटे खरें । जीवें येरयेरें वंचिजे ना ॥ १ ॥ हें तुम्हां सांगणें काय उगवूनि । जावें समजोनि पांडुरंगा ॥ २ ॥ जेवित्याची खूण वाढित्या अंतरीं । प्रीतीनें हे धरी चाली तेथें ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु परीचे आदर । अत्यंत वेव्हारसंपादणी ॥ ४ ॥

९३४. खुंटोनियां दोरी आपणियापाशीं । वावडी आकाशीं मोकलिली ॥ १ ॥ आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचें तें ऋण बुडों नेणें ॥ २ ॥ बीज नेलें तेथें येईल अंकुर । जतन तें सार करायाची ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी निश्चिंतीची सेवा । वेगळें नाहीं हेवा उरों दिलें ॥ ४ ॥

९३५. कोणतें कारण राहिलें यामुळें । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥ धृ. ॥ नाहीं जात जीव होत नाहीं हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ २ ॥ नाहीं कांहीं चिंता मरत उपवासी । अथवा त्या म्हैसी गाई व्हाव्या ॥ ३ ॥ हें तों तुज कळों येतसे अंतरीं । लापणीक बरी साच भाव ॥ ४ ॥ तुका म्हणे देवा नाशिवंतासाठीं । पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥ ५ ॥ 

९३६. मनवाचातीत तुझें हें स्वरूप । म्हणोनियां माप भक्ति केलें ॥ १ ॥ भक्तीचिया मापें मोजितों अनंता । इतरानें तत्त्वता न मोजवें ॥ २ ॥ योग याग तपें देहाचिया योगें । ज्ञानाचिया लागें न सांपडसी ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही भोळ्या भावें सेवा । घ्यावी जी केशवा करितों ऐसी ॥ ४ ॥

९३७. कायावाचामन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥ १ ॥ अवघें आलें आंत पोटा पडिलें थीत । सारूनि निश्चिंत जालो देवा ॥ २ ॥ द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मवेशा तुज ठावीं ॥ ३ ॥ तुझ्या रिणें गेले बहुते बांधोनि । जाले मजहूनि थोर थोर ॥ ४ ॥ तुका म्हणे तुझे खतीं जें गुंतलें । करूनी आपुलें घेईं देवा ॥ ५ ॥

९३८. न गमेसी जाली दिवसरजनी । राहिलों लाजोनी न बोलावे ॥ १ ॥ रुचिविण काय शब्द वाऱ्या माप । अनादरें कोप येत असें ॥ २॥ आपुलिया रडे आपुलेंचि मन । दाटे समाधान पावतसें ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही असां जी जाणते । काय करूं रिते वादावाद ॥ ४ ॥

९३९. दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी ॥ १ ॥ तैसी परि मज झाली नारायणा। योगक्षेम जाणां तुम्ही आतां ॥ २ ॥ खातां लेतां नये मिरवितां वरि । राजा दंड करी जन राग ॥ ३ ॥ तुका म्हणे मग तळमळ उरे । देखिलें तें झुरे पाहावया ॥ ४ ॥

९४०. लोक फार वाखा अमंगळ झाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा ॥ १ ॥ विषयीं चेवलों मीपणा मुकलों । शरण तुज आलों पांडुरंगा ॥ २ ॥ घर दार अवघीं त्यजिलीं नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥ ३ ॥ तुका म्हणे पडिलों पुंडलिकापाशीं । धांव ऋषीकेशी आळिंगीं मज ॥ ४ ॥

९४१. तुज करितां होय ऐसें काय नाहीं । डोंगराची राई रंक राणा ॥ १ ॥ अशुभाचें शुभ करितां तुज काहीं । अवघड नाहीं पांडुरंगा ॥ २ ॥ सोळा सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा । निराहारी दुर्वासा नवल नव्हे ॥ ३ ॥ पंच भ्रतार द्रौपदी ते सती । करितां पितृशांती पुण्य धर्मा ॥ ४ ॥ दशरथ पातकी ब्रह्महत्यारासी । नवल त्याचें कुशी जन्म तुझा ॥ ५ ॥ मुनेश्वरा नाहीं दोष अणुमात्र । भांडवितां सूत्र वध होती ॥ ६ ॥ तुका म्हणे माझे दोष ते कायी । सरतां तुझें पायीं झालों देवा ॥ ७ ॥

९४२. सत्यत्वेशीं घेणें भक्तीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसे ॥ १ ॥ मग तें अवीट न भंगे साचार । पावलें विस्तार फिरों नेणे ॥ २ ॥ वाणी वदे त्याचा कोणासी विश्वास । अभयकरें दास सत्य तईं ॥ ३ ॥ तुका म्हणे आधीं न करी तांतडी । पायीं झाली जोडी तेणें शुद्ध ॥ ४ ॥

९४३. समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥ १ ॥ फावलें घेईन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं जाऊं ॥ २ ॥ नलगे पाहावी उचिताची वेळ । अयाचित काळ साधला तो ॥ ३ ॥ तुका म्हणे पोट धालिया उपरी । गौरवा उत्तरी पूजूं देवा ॥ ४ ॥

९४४. घ्यावी तरी घ्यावी उदंडचि सेवा । द्यावें तरी देवा उदंडचि ॥ १ ॥ ऐसीं कैचीं आम्ही पुरतीं भांडवलें । आल्या करी बोलें समाधान ॥ २ ॥ व्हावें तरी व्हावें बहुतची दुरी । आलिया अंतरीं वसवावें ॥ ३ ॥ तुका म्हणे तुझें सख्यत्व आपणीं । अससील ऋणी आवडीचा ॥ ४ ॥

९४५. नाहीं होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळही ॥ १ ॥ ऐसा नाहीं मज एकाचा अनुभव । धरिला तो भाव उद्धरिले ॥ २ ॥ उतावीळ असे शरणागत काजें । धांवा केशीराजे आइकतां ॥ ३ ॥ तुका म्हणे हितचिंतनीं भरंवसा । नेदी गर्भवासा येऊं देऊं ॥ ४ ॥

९४६. उद्वेगासी बहु फांकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥ १ ॥ आतां कोण यासी करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ २ ॥ मज तो अत्यंत दर्शनाची आस । जाला तरी हो नाश जीवित्वाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे आहे वचनाची उरी। करितों तोंवरि विज्ञापना ॥ ४ ॥

९४७. काय मी अन्यायी तें घाला पालवीं । आणीक वाट दावीं चालावया ॥ १ ॥ माग पाहोनियां जातों तेच सोयी । नवजावें कायी कोणी सांगा ॥ २ ॥ धोपट मारग लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुम्ही ॥ ३ ॥ वारिताही भय कोण धरी धाक । परी तुम्हां एक सांगतों मी ॥ ४ ॥ तुका म्हणे शूर दोहीं पक्षीं भला । मरतां मुक्त जाला मान पावें ॥ ५ ॥

९४८. माझी आतां लोक सुखें निंदा करूं । म्हणती विचारू सांडियेला ॥ १ ॥ कारण होय तो करीन विचार । काय भीड भार करूं देवा ॥ २ ॥ तुका म्हणे काय करूं लापणिक । जनाचार सुख नाशिवंत ॥ ३ ॥

९४९. लाजोनि या काळें राहिलें लिखित । नेदितांही चित्त समाधान ॥ १ ॥ कैसें सुख वाटें वचनांचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥ २ ॥ एकाचिये भेटी एकाचा कोंपर । मायेचा पदर कळों येतो ॥ ३ ॥ होत्या आपल्या त्या वेचूनियां शक्ति । पुढें झालों युक्तिकळाहिन ॥ ४ ॥ तुका म्हणे तुम्ही समर्थ जी देवा । दुर्बळाची सेवा कोठें पावें ॥ ५ ॥

९५०. शेवट तो होतो तुझियानें गोड । म्हणऊनि चाड धरीतसों ॥ १ ॥ देऊ भोगा भोग कलिवराचा भार । साहों तुज थार त्याजमधीं ॥ २ ॥ तुझ्या बळें कांहीं खटपट काम । वाढवावा श्रम नलगे तो ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हीं चेपलों या भारें । तुमचें तें खरें देवपण ॥ ४ ॥ 

९५१. आवडी न पुरे मायबापापासीं । घडों का येविसीं सकईल ॥ १ ॥ होईल नेमिलें आपुलिया काळें । आलियाचें बळें आग्रहो उरे ॥ २ ॥ जाणविलें तेथें थोडें एक वेळा । सकळ ही कळा सर्वोत्तमीं ॥ ३ ॥ तुका म्हणे निवेदिलें गुह्य गुज । आतां तुझी तुज सर्व चिंता ॥ ४ ॥

९५२. तुम्हांसी न कळे सांगा काय एक । कासया संकल्प वागवू मी ॥ १ ॥ आहे तेथें सत्ता ठेविलों स्थापूनी । प्रमाणेंचि वाणी वदे आज्ञा ॥ २ ॥ कृपा झाली मग नलगे अंगसंग । निजध्यासें रंग चढताहे ॥ ३ ॥ तुका म्हणे मागें बोलिलों तें वाव । आतां हाचि भाव दृढ झाला ॥ ४ ॥

९५३. काय उरली ते करूं विनवणी । वेंचलों वचनीं पांडुरंगा ॥ १ ॥ अव्हेरलों आतां कैचें नामरूप । आदर निरोप तरि तो नाहीं ॥ २ ॥ माझा मायबाप ये गेलों सलगी । तों हे तुम्ही जगीं सोयरिका ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां जोडोनियां हात । करी दंडवत ठायींचा ठायीं ॥ ४ ॥

९५४. भांडवल माझें लटिक्याचे गांठी । उदीमासी तुटी यावी हेचि ॥ १ ॥ कैसी तुझी वाट पाहों कोण्या तोंडें । भोवताले भांडे गर्भवास ॥ २ ॥ बहु खाणीचिया रंगलोंसें रंगें । सुष्ट दुष्ट अंगें धरूनियां ॥ ३ ॥ बहुतांचे बहु पालटलों साळे । बहु आला काळें रंग अंगा ॥ ४ ॥ उकलूनि नये दावितां अंतर । घडीचा पदर सारूनीयां ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां करीं गोळ्यासाठी । आपणा पालटी संगें देवा ॥ ६ ॥

९५५. माझे विषयीं तुज पडतो विसर । नको धरूं दूर पांडुरंगा ॥ १ ॥ तुझा म्हणवितों हेचि लाज तुला । आतां झणीं मला विसरसी ॥ २ ॥ तुका म्हणे तुझी माझीं नाहीं उरी । आतां केली खरी देवराया ॥ ३ ॥

९५६. मज कांहीं सीण न व्हावा यासाठीं । कृपा तुम्हा पोटीं उपजली ॥ १ ॥ होतें तैसें केलें आपलें उचित । शिकविलें हित बहु बरें ॥ २ ॥ आम्हीं न मनावी कोणाची आशंका । तुम्हां भय लोकां आहे मनी ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां संचिताचा ठेवा । वोढवला घ्यावा जैसा तैसा ॥ ४ ॥

९५७. लेखिलें कवित्व माझे सहज बोल । न लगेचि ओल जिव्हाळ्याची ॥ १ ॥ नयेचि उत्तर कांहीं परतोनि । झालों नारायणी न सरतें ॥ २ ॥ लाजिरवाणीं का वदली हे वाचा । नव्हेचि ठायींचा मननशीळ ॥ ३ ॥ तुका म्हणे फळ नयेचि सायासा । पंढरीनिवासा काय झालें ॥ ४ ॥

९५८. आतां सोडवणें न या नारायणा । तरि मी वाचेना काळाहातीं ॥ १ ॥ ऐसें सांगोनिया झालों उतराई । आणिक तें काई माझे हातीं ॥ २ ॥ केलियाचें माप न ये शेवटाशीं । करितील नासि अंतराय ॥ ३ ॥ तुका म्हणे भय वाटतसे जीवा । धांवणिया धांवा लवकरी ॥ ४ ॥

९५९. ऐक पांडुरंगा वचन माझें एक । झालों मी सेवक दास तुझा ॥ १ ॥ कळे तैसा आतां करावा उद्धार । खुंटला विचार माझा पुढें ॥ २ ॥ दंभ मान माझा करूं पाहे घात । झालियाही थीत कारणाचा ॥ ३ ॥ हीन बुद्धि माझी अधम हे याती । अहंकार चित्तीं वसों पाहें ॥ ४ ॥ तुका म्हणे मज विघडतां क्षण । नलगे जतन करीं देवा ॥ ५ ॥

९६०. कवतुकवाणी बोलतसें लाडें । आरुष वांकडें करूनी मुख ॥ १ ॥ दुजेपणीं भाव नाहीं हे आशंका । जननीबाळकामध्ये भेद ॥ २ ॥ सलगी दुरूनि जवळी पाचारूं । धांवोनियां करूं अंगसंग ॥ ३ ॥ धरूनि पालव मागतों भातुकें । आवडीचें निकें प्रेमसुख ॥ ४ ॥ तुका म्हणे तुज आमचीच गोडी । ऐसी हे आवडी कळों आली ॥ ५ ॥

९६१. बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें ॥ १ ॥ कवतुक तुझें नकळे यापरी । घेसील तें शिरीं काय नव्हे ॥ २ ॥ नाहीं मिळों येत संताचिया मता । पुराणीं पाहतां अघटित ॥ ३ ॥ तुका म्हणे पायीं निरोपिला भाव । न्याल तैसा जावो सिद्धि देवा ॥ ४ ॥

९६२. ठेवूनि इमान राहिलों चरणीं । म्हणऊनि धनी कृपा करी ॥ १ ॥ आम्हांसी भांडार करणें जतन । आला गेला कोण उंच नीच ॥ २ ॥ करूनी सांभाळीं राहिलो निराळा । एक एक वेळा आज्ञा केली ॥ ३ ॥ तुका म्हणे योग्यायोग्य हे विनीत । देवा नाहीं चित्त तेथें देणें ॥ ४ ॥

९६३. अनुतापयुक्त गेलिया अभिमान । विसरू वचन मागिलांचें ॥ १ ॥ त्याचे पाय माझे लागोत कपाळीं । भोगे उष्टावळी धन्यकाळ ॥ २ ॥ षड्उर्मी जिहीं हाणितल्या लाता । शरण या संता आल्या वेगीं ॥ ३ ॥ तुका म्हणे जाती वोळे लवकरी । ठायीचि अंतरी शुद्ध होती ॥ ४ ॥

९६४. वाढवावा पुढे आणीक प्रकार । एकचि तें फार रुचि नेदी ॥ १ ॥ निचे नवें लेणें देह हा पवाडा । पालट रोकडा वरावरी ॥ २ ॥ दिसे शोभिवंत सेवेने सेवक । स्वामीची ते लोकत्रयीं कीर्ति ॥ ३ ॥ तुका म्हणे आजी पाववा संतोष । करूनि कीर्तिघोष नाचईन ॥ ४ ॥

९६५. मागील विसर होईल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥ १ ॥ दोहींचें ऐक्य घालीं गडसंदी । स्थिरावली बुद्धि पायापाशीं ॥ २ ॥ आहाच या केलों देहपरिचारें । तुमचें तें खरें वाटो नये ॥ ३ ॥ तुका म्हणे व्हावे लवकरी उदार । मी आहे सादर प्रतिग्रहा ॥ ४ ॥

९६६. पाहिजे तें आतां प्रमाण प्रत्यक्ष । आलियानें साक्ष खरें खोटें ॥ १ ॥ काय त्या दिवस उचिताचा आला । मागील जो केला श्रम होता ॥ २ ॥ ठेवियली खूण करोनि संकेत । तयापाशीं चित्त लागलेंसे ॥ ३ ॥ जाणसी गे माते लेंकराचा लाड । नये पडो आड निष्ठुरता ॥ ४ ॥ तुका म्हणे आम्ही करावें वचन । तुम्हांसी जतन करणें तें ॥ ५ ॥

९६७. पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचितें ॥ १ ॥ एक नाहीं एकाऐसे । दावी कैसें शुद्ध हीन ॥ २ ॥ पंचभूतें एकी राशी । सूत्रे कैसीं ओळखावीं ॥ ३ ॥ तुका म्हणे जो जे जाती । त्याची स्थिती तैशी तें ॥ ४ ॥

९६८. बरवी नामावळी । तुझी महादोषां होळी ॥ १ ॥ जालें आम्हांसि जीवन । धणीवरी हें सेवन ॥ २ ॥ सोपे आणि गोड । किती अमृताही वाढ ॥ ३ ॥ तुका म्हणे अच्युता । आमुचा कल्पतरु दाता ॥ ४ ॥

९६९. आगी लागो तया सुखा । जेणें हरी नये मुखा ॥ १ ॥ मज होत कां विपत्ति । पांडुरंग राहो चित्तीं ॥ २ ॥ जळो तें समूळ । धन संपत्ती उत्तम कुळ ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । जेणें घडे तुझी सेवा ॥ ४ ॥

९७०. पुरुषाहातीं कंकणचुडा । नवल दोडा वृत्ति या ॥ १ ॥ पाहा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥ २ ॥ जळो ऐसी ब्रीदावळी । भाटवोळीपणाची ॥ ३ ॥ तुका म्हणे पाहों डोळां । अवकळा नये ॥ ४ ॥ 

९७१. काय लवणकणिकेविण । एके क्षीण सागर ॥ १ ॥ मा हे येवढी अडचणी । नारायणीं मजविण ॥ २ ॥ कुबेरा अट्टाहासें जोडी । काय कवडी कारणें ॥ ३ ॥ तुका म्हणे काचमणी । कोण गणी भांडारी ॥ ४ ॥

९७२. चरणाचा महिमा । हा तो तुझ्या पुरुषोत्तमा ॥ धृ. ॥ अंध पारिखी माणिकें । बोलविशी स्पष्ट मुकें ॥ २ ॥ काय नाहीं सत्ता । हातीं तुझ्या पंढरीनाथा ॥ ३ ॥ तुका म्हणे मूढा । मज चेष्टविलें जडा ॥ ४ ॥

९७३. पावतों ताडन । जरी हें मोकलितें जन ॥ १ ॥ मग मी आठवितों दुःखें । देवा सावकाश मुखें ॥ २ ॥ होती अप्रतिष्ठा । होतों वरपडा कष्टा ॥ ३ ॥ तुका म्हणे मान । होतां उत्तम खंडन ॥ ४ ॥

९७४. माझे माथां तुझा हात । तुझे पायीं माझें चित्त ॥ १ ॥ ऐसी पडियेली गांठी । शरीरसंबंधाची मिठी ॥ २ ॥ येरयेरांपाशीं । सांपडोन गेलों ऐसी ॥ ३ ॥ तुका म्हणे सेवा । माझी कृपा तुझी देवा ॥ ४ ॥

९७५. मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचूं ॥ १ ॥ लटकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ २ ॥ हिशोबें तें आलें घ्यावें । तें तों ठावें सकळांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥ ४ ॥

९७६. आम्ही बोलों तें तुज कळे । एक दोहीं ठायीं खेळे ॥ १ ॥ काय परिहाराचें काम । जाणे अंतरींचें राम ॥ २ ॥ कळोनियां काय चाड । माझी लोकांसी बडबड ॥ ३ ॥ कारण सवें एका । अवघें आहे म्हणे तुका ॥ ४ ॥

९७७. कौतुकाची सृष्टी । कौतुकेंचि केलें कष्टी ॥ १ ॥ मोडे तरी भले खेळ । फांके फांकिल्या कोल्हाळ ॥ २ ॥ जाणणियासाठीं । भय सामावलें पोटीं ॥ ३ ॥ तुका म्हणे चेता । होणें तें तूंच आयता ॥ ४ ॥

९७८. मूळ कारण सत्ता । नाहीं मिळत उचिता ॥ १ ॥ घडे कासयानें सेवा । सांग ब्रह्मांडाच्या जीवा ॥ २ ॥ सागर सागरीं । सामावेसी कैंची थोरी ॥ ३ ॥ तुका म्हणे भावें । शरण म्हणवितां बरवें ॥ ४ ॥

९७९. मोहरोनी चित्ता । आणूं हळूचि वरि हिता ॥ १ ॥ तों हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥ २ ॥ संसारा भेणें । कांहीं उसंतीतो पेणें ॥ ३ ॥ एखादिया भावें । तुका म्हणे जवळी यावें ॥ ४ ॥

९८०. कोण आमचीं योगतपें । करूं बापें जाणावीं ॥ १ ॥ गीत संतसंगें गाऊं । उभी ठाऊं जागरणीं ॥ २ ॥ आमुचा तो नव्हे लाग । करूं त्याग जावया ॥ ३ ॥ तुका म्हणे इंद्रियांसी । येचि रसीं रंगवूं ॥ ४ ॥

९८१. आम्हां हें सकळ । तुझ्या पायांचेंचि बळ ॥ १ ॥ करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ २ ॥ जयाचा जो भोग । सुख दुःख पीडा रोग ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । तुझे पायीं माझा हेवा ॥ ४ ॥

९८२. जाणतों समय । परिमित कामा नये ॥ १ ॥ तुम्हीं सांगावें तें बरें । देवा सकळ विचारें ॥ २ ॥ फुकाचिये पुसी । चिंता नाहीं होते ऐसी ॥ ३ ॥ तुका म्हणे आहे । धर पाय मज साहे ॥ ४ ॥

९८३. बैसलों तों कडियेवरी । नव्हें दुरी वेगळा ॥ १ ॥ घडलें हें बहुता दिसां । आतां इच्छा पुरवीन ॥ २ ॥ बहु होता जाला सीण । नाहीं क्षण विसांवा ॥ ३ ॥ दुःखी केलें मीतूंपणें । जवळी नेणें होतें तें ॥ ४ ॥ पाहात जे होतों वास । तेचि आस पुरविली ॥ ५ ॥ तुका म्हणे मायबापा । झणी कोपा विठ्ठला ॥ ६ ॥

९८४. तुज पाहतां सामोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥ १ ॥ माझे चित्त तुझ्या पायां । मिठी पडली पंढरिराया ॥ २ ॥ नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥ ३ ॥ तुका म्हणे बळी । जीव दिला पायांतळीं ॥ ४ ॥

९८५. ठाव तुम्हांपाशीं । झाला आतां हृषीकेशी ॥ १ ॥ नलगे जागावें सतत । येथें स्वभावें हे नीत ॥ २॥ चोरट्यासी थारा । येथें कैंचा जी दातारा ॥ ३ ॥ तुका म्हणे मन । आतां झालें समाधान ॥ ४ ॥

९८६. बोलविसी तरी । तुझ्या येईन उत्तरीं ॥ १ ॥ कांहीं कोड कवतुकें । हातीं द्यावया भातुकें ॥ २ ॥ बोलविसी तैसें । करीन सेवन सरिसें ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । माझें चळण तुजसवा ॥ ४ ॥

९८७. प्रीती करी सत्ता । बाळा भिती माता पिता ॥ १ ॥ काय चाले त्याशीं बळ । आळी करितां कोल्हाळ ॥ २ ॥ पदरीं घाली मिठी । खेदी मागें पुढें लोटी ॥ ३ ॥ बोले मना आलें । तुका साहिलें विठ्ठलें ॥ ४ ॥

९८८. मागें चिंता होती आस । केला नास या काळे ॥ १ ॥ तुम्ही आम्हां उदासीन । भिन्नाभिन्न वारिलें ॥ २ ॥ मोहजाळें दुःख वाढे। ओढे ओढे त्यास तें ॥ ३ ॥ तुका म्हणे कोण देवा । आतां हेवा वाढवी ॥ ४ ॥

९८९. आपणचि व्हाल साहे । कार्य आहे निर्वाणीचें ॥ १ ॥ भाकिली ते उरली कींव । आहे जीव जीवपणें ॥ २ ॥ आहाच कैंचा बीजामोड । प्रीति कोड वांचूनि ॥ ३ ॥ तुका म्हणे दंडीन काया । याल तया धांवणिया ॥ ४ ॥

९९०. राहे उभा वादावादीं । तरी फंदीं सांपडे ॥ १ ॥ लव्हाळ्यासी कोठें बळ । करिल जळ आपुलें ॥ २ ॥ कठिणासी बळजोडा । नम्र पीडा देखेना ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्वरसी । मिळे त्यासी गोत तें ॥ ४ ॥

९९१. असाल ते तुम्ही असा । आम्ही सहसा निवडों ना ॥ १ ॥ अनुसरलों एका चित्तें । हातों हातें गिंवसीत ॥ २ ॥ गुणदोष काशासाटी । तुमचे पोटीं वागवूं ॥ ३ ॥ तुका म्हणे दुजें आतां । कोठें चित्ता आतळों ॥ ४ ॥

९९२. तूं माझा कोंवसा । परी न कळे या धसां ॥ १ ॥ कूट खाती मागें पुढें । जाती निरयगांवा पुढें ॥ २ ॥ मज म्हणताती कवी । निषेधुनि पापी जेवीं ॥ ३ ॥ तुका म्हणे पांडुरंगा । आतां कोण लेखी जगा ॥ ४ ॥

९९३. कोठें देवा बोलो । तुम्हां भीड घालूं गेलों ॥ १ ॥ करावया सत्वहाणी । भांडवलाची टांचणी ॥ २ ॥ दुर्बळा मागतां । त्याच्या प्रवर्तला घाता ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं । मज कळलें ऐसें कांहीं ॥ ४ ॥

९९४. वांयां जाय ऐसा । आतां उगवावा फांसा ॥ १ ॥ माझें परिसावें गाऱ्हाणें । सुखदुःखांचीं वचनें ॥ २ ॥ हाचि आम्हां ठाव । पायीं निरोपाया भाव ॥ ३ ॥ तुका म्हणे जार । तुझा तुज देवा भार ॥ ४ ॥

९९५. विनविजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरि ॥ १ ॥ आतां असो पंढरीनाथा । पायीं माथां तुमचिये ॥ २ ॥ मागें सारियेली युक्ती । कांहीं होती जवळी ते ॥ ३ ॥ निराशेची न करी आस । तुका दास माघारी ॥ ४ ॥ 

९९६. हा तो नव्हता दीन । टाळायाचा ऐसा क्षण ॥ १ ॥ कां जी नेणों राखा हात । कैसें देखावें रडत ॥ २ ॥ दावूनियां आस । दूर पळवितां काशास ॥ ३ ॥ तुका म्हणे धांव । घेतां न पुरेचि हाव ॥ ४ ॥

९९७. तुम्हां उद्धरणें फार । मज दुसरी नाहीं थार ॥ १ ॥ आतां जैसे तैसें सोसा । काय करणें हृषीकेशा ॥ २ ॥ बरें न दिसेल ओळी । एका अन्न एका गाळी ॥ ३ ॥ लावितो आभार । तुका विसरलेती फार ॥ ४ ॥

९९८. हेचि वादकाची कळा । नाहीं येऊं देत बळा ॥ १ ॥ धीर करावा करावा । तरी तो आहे आम्हां देवा ॥ २ ॥ रिघावें पोटांत । पायां पडोन घ्यावा अंत ॥ ३ ॥ तुका म्हणे वरी । गोडा आणावा उत्तरीं ॥ ४ ॥

९९९. द्याल ऐसें दिसे । तुमचें साचपण इच्छे ॥ १ ॥ म्हणऊनि न भंगे निर्धार । केले लोचन सादर ॥ २ ॥ मुखाचीच वास । पुरला पाहे अवकाश ॥ ३ ॥ तुका म्हणे कळे । काय लाभ कोणे वेळे ॥ ४ ॥

१०००. लावूनि कोलित । माझा करितील घात ॥ १ ॥ ऐसे बहुतांचे संधी । सांपडलों खोळेमधीं ॥ २ ॥ पाहातील उणें । तेथें देती अनुमोदनें ॥ ३ ॥ तुका म्हणे रिघ । पुढें नाहीं झालें धींद ॥ ४ ॥

१००१. आम्हा लडिवाळांचे बोल । करा कवतुकें नवल ॥ १ ॥ करूं स्तुती तरि ते निंदा। तुम्ही जाणा हे गोविंदा ॥ २ ॥ बोबड्या उत्तरीं । तुम्हां रंजवितों हरी ॥ ३॥ मागतों भातुकें । तुका म्हणे कवतुकें ॥ ४ ॥

१००२. हा गे आतां हाचि लाहो । माझा अहो विठ्ठला ॥ १ ॥ दंडवत दंडवत । वेगळी मात न बोलें ॥ २ ॥ वेगळाल्या कोठें भागे । लाग लागे लावावा ॥ ३ ॥ तुका म्हणे केल्या जमा । वृत्तिक्षमा भाजूनी ॥ ४ ॥

१००३. तुझें मजपाशीं मन । माझी तेथें भूक तहान ॥ १ ॥ जिव्हा रते एके ठायीं । दुजें बोलायाचें काई ॥ २ ॥ माझिया कवतुकें । उभा पाहासी भातुकें ॥ ३ ॥ तुका म्हणे साचें । तेथें मागील कईचें ॥ ४ ॥

१००४. तुम्हां आम्हां सरी । येथें कईच्या या परी ॥ १ ॥ स्वामिसेवा अळंकार । नाहीं आवडिये थार ॥ २ ॥ खुंटलिया वाचा । मग हा आनंद कइचा ॥ ३ ॥ तुका म्हणे कोडें । आम्ही नाचों तुजपुढें ॥ ४ ॥

१००५. आवडी कां ठेवूं । बैसोनियां संगें जेवूं ॥ १ ॥ मागें नको ठेवूं उरी । माझी आण तुजवरी ॥ २ ॥ देखिले प्रकार । त्याचे पाहेन साचार ॥ ३ ॥ तुका म्हणे बाळीं । केली चाहाडी सकळीं ॥ ४ ॥

१००६. देवो कपाट । कोण काळ राखों वाट ॥ १ ॥ काय येईल तें शिरीं । आज्ञा धरोनियां करीं ॥ २ ॥ करूं कळे ऐसी मात । किंवा राखावा एकांत ॥ ३ ॥ तुका म्हणे जागों । किंवा कोणा नेदूं वागों ॥ ४ ॥

१००७. वांयां ऐसा जन्म गेला । हें विठ्ठला दुःख वाटे ॥ १ ॥ नाहीं सरता झालों पायीं । तुम्ही जईं न पुसा ॥ २ ॥ कां मी जितों संवसारीं । अद्यापवरी भूमिभार ॥ ३ ॥ तुका म्हणे पंढरिनाथा । सबळ व्यथा भवरोग ॥ ४ ॥

१००८. कार्यचि कारण । तृष्णा पावविते शीण ॥ १ ॥ काय करूनि ऐसा संग । सोसें चिंतूं पांडुरंग ॥ २ ॥ रूपीं नाहीं गोडी । हांवे हांवे ऊर फोडी ॥ ३ ॥ तुका म्हणे पडे भरी । ऐशा वरदळाचे थोरी ॥ ४ ॥

१००९. ज्यावें हीनपणें । कासयाच्या प्रयोजनें ॥ १ ॥ प्रारब्धीं संसार । बरी हिमातीची थार ॥ २ ॥ होणार तें कांहीं । येथें अवकळा नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवें । कृपा केलिया बरवें ॥ ४ ॥

१०१०. पाठी लागे तया दवडी दुरी । घालीं बाहेरी संवसारा ॥ १ ॥ येऊनि दडें तुमच्या पायीं । धांवें तईं छो म्हणा ॥ २ ॥ पारखियाचा वास पडे । खडबडे उठी तें ॥ ३ ॥ तुका म्हणे लाविला धाक । नेदी ताक खाऊं कोणा ॥ ४ ॥

१०११. सोळा सहस्र होऊं येतें । भरलें रितें आम्हांपें ॥ १ ॥ ऐसे तुम्हां ठायाठाव । देव म्हूण संपादे ॥ २ ॥ कैंचीं चिरामध्यें चिरें । मना बरें आलें तैं ॥ ३ ॥ तुका म्हणे पांडुरंगा। अंगसंगा भिन्न करा ॥ ४ ॥

१०१२. लागों दिलें अंगा । ऐसें कां गा सन्निध ॥ १ ॥ कोण्या पापें उदय केला। तो देखिला प्रळय ॥ २ ॥ न देखवे पिडला सर्प । दया दर्प विषाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे भलें । मज तों न बजे साहिलें ॥ ४ ॥

१०१३. नवजावा तो काळ वांयां । मुख्य दया हे देवा ॥ १ ॥ म्हणऊनि जैसें तैसें । रहणी असें पायांचे ॥ २ ॥ मोकळें हें मन कष्ट । करीं नष्ट दुर्जन ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं नेणे । नवजें येणेंपरी वांयां ॥ ४ ॥

१०१४. आइकिली मात । पुरविले मनोरथ ॥ १ ॥ प्रेम वाढविलें देवा । बरवी घेऊनियां सेवा ॥ २ ॥ केली विनवणी । तैसी पुरविली धणी ॥ ३ ॥ तुका म्हणे काया । रसा कुरोंडी वरोनियां ॥ ४ ॥

१०१५. निघालें तें आगीहुनी । आतां झणी आतळे ॥ १ ॥ पळवा परपरतें दूरी । आतां हरी येथूनि ॥ २ ॥ धरिलें तैसें श्रुत करा हो । येथें आहो प्रपंचीं ॥ ३ ॥ अबोल्यानें ठेला तुका । भेउनि लोकां निराळा ॥ ४ ॥

१०१६. भाग सीण गेला । माझा सकळ विठ्ठला ॥ १ ॥ तुझा म्हणवितों दास । केली उच्छिष्टाची आस ॥ २ ॥ राहिली तळमळ । तईं पासोनि सकळ ॥ ३ ॥ तुका म्हणे धालें । पोट ऐसें कळों आले ॥ ४ ॥

१०१७. तुम्ही आम्ही भले आतां । जालों चिंता काशाची ॥ १ ॥ आपुलाले आलों स्थळीं । मौन कळी वाढेना ॥ २ ॥ सहज जें मनी होतें । तें उचितें उघडलें ॥ ३ ॥ तुका म्हणे नसतें अंगा । येत संगा सारिखे ॥ ४ ॥

१०१८. बहु देवा बरें जालें । नसतें गेलें सोंवळें ॥ १ ॥ धोवटाशीं पडिली गांठी । जगजेठीप्रसादे ॥ २ ॥ गादल्याचा जाला झाडा । गेली पीडा विकल्प ॥ ३ ॥ तुका म्हणे वरावरी । निर्मळ करी निर्मळा ॥ ४ ॥

१०१९. सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥ १ ॥ दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ २ ॥ बहु जालों खेदक्षीण । येणें शीण तो नासे ॥ ३ ॥ तुका म्हणे गंगे वास । बहु त्या आस स्थळाची ॥ ४ ॥

१०२०. फावलें तें तुम्हां मागें । नवतों लागें पावलों ॥ १ ॥ आलों आतां उभा राहें । जवळी पाहें सन्मुख ॥ २ ॥ घरीं होती गोंवी जाली । कामें बोली न घडेचि ॥ ३ ॥ तुका म्हणे धडफुडा । जालों झाडा देईं देवा ॥ ४ ॥

१०२१. मी तें मी तूं तें तूं । कुकुड हें लाडसी ॥ १ ॥ वचनासी पडो तुटी । पोटींचें पोटीं राखावें ॥ २ ॥ तेथील तेथें येथील येथें । वेगळ्या कुंथें कोण भारें ॥ ३ ॥ याचें यास त्याचें त्यास । तुक्यानें कास घातली ॥ ४ ॥

१०२२. तुझा संग पुरे संग पुरे । संगति पुरे विठोबा ॥ धृ. ॥ आपल्यासारिखें करिसी दासां । भिकारिसा जग जाणे ॥ २ ॥ रूपा नाहीं ठाव नांवा । तैसें आमुचें करिसी देवा ॥ ३ ॥ तुका म्हणे तोयें आपुलें भेंडोळें । करिसी वाटोळें माझें तैसें ॥ ४ ॥

१०२३. नको दुष्टसंग । पडे भजनामधीं भंग ॥ १ ॥ काय विचार देखिला । सांग माझा तो विठ्ठला ॥ २ ॥ तुज निषेधितां । मज न साहे सर्वथा ॥ ३ ॥ एका माझ्या जीवें । वाद करूं कोणासवें ॥ ४ ॥ तुझे वर्णं गुण । कीं हे राखों दुष्टजन ॥ ५ ॥ काय करूं एका । मुखें सांग म्हणे तुका ॥ ६ ॥

१०२४. न वजतां घरा । आम्ही कोणाच्या दातारा ॥ १ ॥ कां हे छळूं येती लोक । दाट बळेंचि कंटक ॥ २ ॥ नाहीं आम्ही खात । कांहीं कोणाचें लागत ॥ ३ ॥ कळे तैसी सेवा । तुका म्हणे करूं देवा ॥ ४ ॥

१०२५. होऊनि कृपाळ । भार घेतला सकळ ॥ १ ॥ तूंचि चालविसी माझें । भार सकळही ओझें ॥ २ ॥ देह तुझ्या पायीं । ठेवुनि झालों उतराई ॥ ३ ॥ कायावाचामनें । तुका म्हणे दुजें नेणें ॥ ४ ॥

१०२६. भला म्हणे जन । परि नाहीं समाधान ॥ १ ॥ माझें तळमळी चित्त । अंतरलें दिसे हित ॥ २ ॥ कृपेचा आधार । नाहीं दंभ जाला फार ॥ ३ ॥ तुका म्हणे कृपे । अंतराय कोण्या पापें ॥ ४ ॥

१०२७. शिकविलों ते बोल । बोले तैसी नाहीं ओल ॥ १ ॥ आतां देवा संदेह नाहीं । वांयां गेलों यासी कांहीं ॥ २ ॥ एकांताचा वास । नाहीं संकल्पाचा नास ॥ ३ ॥ बुद्धि नाहीं स्थिर । तुका म्हणे शब्दा धीर ॥ ४ ॥

१०२८. काळावरी सत्ता । ऐशा करितो वारता ॥ १ ॥ मी तो हीनाहूनि सांडें । देव दुऱ्हें काळतोंडें ॥ २ ॥ मानूनी भरंवसा । होतों दास म्हणत ऐसा ॥ ३ ॥ तुका म्हणे मान । गेलों वाढवूं थोरपण ॥ ४ ॥

१०२९. कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवे भ्रमाचे ॥ १ ॥ जाणतांचि होतो घात । परिसा मात देवा हे ॥ २ ॥ आंविसासाठीं फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥ ३ ॥ तुका म्हणे होणार खोटें । कर्म मोठें बळिवंत ॥ ४ ॥

१०३०. विश्वव्यापी माया । तिणें झाकुळिली छाया ॥ १ ॥ सत्य गेलें भोळ्यावारी । अविद्येची चाली थोरी ॥ २ ॥ आपुलेंचि मन । करी आपणा बंधन ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । तुम्ही कोडीं हीं उगवा ॥ ४

१०३१. एक नेणतां नाडलीं । एका जाणिवेची भुली ॥ १ ॥ बोलों नेणें मुकें । वेडे वाचाळ काय निकें ॥ २ ॥ दोहींसवा नाड । विहीर एकीकडे आड ॥ ३ ॥ तुका म्हणे कर्म । तुझें कळों नेदी वर्म ॥ ४ ॥

१०३२. आम्ही देव तुम्ही देव । मध्यें भेव अधीक ॥ १ ॥ कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें विठ्ठले ॥ २ ॥ भेडसाविलें हाकें नादें । वोळखी भेदें मोडिली ॥ ३ ॥ तुका म्हणे उभा राहे । मागें पाहे परतोनि ॥ ४ ॥

१०३३. काय माता विसरे बाळा । कळवळा प्रीतीचा ॥ १ ॥ आवडीनें गळां मिठी । घाली उठी बैसवी ॥ २ ॥ लावूं धांवे मुख स्तना । नये मना निराळें ॥ ३ ॥ भावंडाचें भातें दावी । आपुलें लावी त्यास जी ॥ ४ ॥ माझें थोडें त्याचें फार । उत्तर हें वाढवी ॥ ५ ॥ तुका म्हणे नारायणा । तुम्ही जाणा बुझावूं ॥ ६ ॥

१०३४. आळविती बाळें । मातें तें सुख आगळें ॥ १ ॥ द्यावें आवडी भातुकें । पाहे निवे कवतुकें ॥ २ ॥ लेववूनि अळंकार । दृष्टी करावी सादर ॥ ३ ॥ आपुलिये पदीं । बैसवूनि कोडें वंदी ॥ ४ ॥ नेदी लागों दिठी । उचलोनि लावी कंठीं ॥ ५ ॥ तुका म्हणे लाभा । वारी घ्या वो पद्मनाभा ॥ ६ ॥ (धृ. नाही)

१०३५. अवघ्या उपचारा । एक मनचि दातारा ॥ १ ॥ घ्यावी घ्यावी माझी सेवा । दीन दुर्बळाची देवा ॥ २ ॥ अवघियाचा ठाव । पायांवरि जीवभाव ॥ ३ ॥ चित्ताचें आसन । तुका करितो कीर्तन ॥ ४ ॥

१०३६. नीचपण बरें देवा । न चले कोणाचाही दावा ॥ धृ. ॥ महापुरें झाडें जातीं । तेथें लव्हाळे राहती ॥ २ ॥ येतां सिंधुच्या लहरी । नम्र होतां जाती वरी ॥ ३ ॥ तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥ ४॥

१०३७. आहे तरि सत्ता । ऐशा करितों वारता ॥ १ ॥ अंगसंगांची उत्तरें । सलगीसेवनें लेकुरें ॥ २ ॥ तरी निकटवासे । असो आशंकेच्या नासें ॥ ३ ॥ तुका म्हणे रुची । येथें भिन्नता कैंची ॥ ४ ॥

१०३८. वर्म तरी आम्हां दावा । काय देवा जाणें मी ॥ १ ॥ बहुतां रंगी हीन जालों । तरि आलों शरण ॥ २ ॥ द्याल जरि तुम्ही धीर । होईल स्थिर मन ठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सत्ताबळें । लडिवाळें राखावी ॥ ४ ॥

१०३९. अनाथाची तुम्हां दया । पंढरीराया येतसे ॥ १ ॥ ऐसी ऐकोनियां कीर्ति । बहु विश्रांति पावलों ॥ २ ॥ अनाथाच्या धांव घरा । नामें करा कुडावा ॥ ३ ॥ तुका म्हणे सवघड हित । ठेवूं चित्त पायांपे ॥ ४ ॥

१०४०. लोह चुंबकाच्या बळें । उभें राहिलें निराळें ॥ १ ॥ तैसा तूंचि आम्हाठायीं । खेळतोसी अंतर्बाहीं ॥ २ ॥ भक्ष अग्नीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥ ३ ॥ तुका म्हणे अधीलपणें । नेली लांकडें चंदनें ॥ ४ ॥

१०४१. नाहीं दुकळलों अन्ना । परि या मान जनार्दना ॥ १ ॥ देव केला सकळसाक्षी । काळीं आणि शुद्धपक्षीं ॥ २ ॥ भोगी भोगविता । बाळासवें तोचि पिता ॥ ३ ॥ कर्म अकर्म जळालें। प्रौढ तुका तें उरलें ॥ ४ ॥

१०४२. जें जें मना वाटे गोड । तें तें कोड पुरविसी ॥ १ ॥ आंत तूंचि बाह्यात्कारीं । अवघ्यापरीं जालासी ॥ २ ॥ नाहीं सायासाचें काम । घेतां नाम आवडी ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्व सांगे । पांडुरंगे दयाळे ॥ ४ ॥

१०४३. न खंडी अवगुण । वर्मे मानीतसे शीण ॥ १ ॥ भोग देतां करिती काई । फुटतां यमदंडे डोई ॥ २ ॥ पापपुण्याझाडा । देतां तेथें मोठी पीडा ॥ ३ ॥ तुका म्हणे बोला । माझ्या शिणती विठ्ठला ॥ ४ ॥

१०४४. आम्हां केलें गुणवंत । तें उचित राखावें ॥ १ ॥ तुम्हांसी तो चाड नाहीं । आणिकां कांही सुखदुःखा ॥ २ ॥ दासांचें तो देखों नये । उणें काय होईल तें ॥ ३ ॥ तुका म्हणे विश्वंभरा । दृष्टि करा सामोरी ॥ ४ ॥

१०४५. माता कापी गळा । तेथें कोण राखी बाळा ॥ १ ॥ हें कां नेणां नारायणा । मज चाळवितां दीना ॥ २ ॥ नागवी धांवणें । तेथें साह्य व्हावें कोणें ॥ ३ ॥ राजा सर्व हरी । तेथें दुजा कोण वारी ॥ ४ ॥ तुझ्या केल्याविण । स्थिर वश नव्हे मन ॥ ५ ॥ तुका म्हणे हरी । सूत्र तुझ्या हातीं दोरी ॥ ६ ॥

१०४६. भागल्यांचा तूं विसांवा । करीन नांवा निंबलोण ॥ धृ. ॥ परमानंदा पुरुषोत्तमा । हरी या श्रमापासोनि ॥ २ ॥ अनाथांचा अंगीकार । करितां भार न मानिसी ॥ ३ ॥ तुका म्हणे इच्छा पुरे । ऐसी धुरे हे विठ्ठले ॥ ४॥

१०४७. म्हणवितों दास । मज एवढीच आस ॥ १ ॥ परी तें अंगीं नाहीं वर्म । करीं आपला तूं धर्म ॥ २ ॥ बडबडितो तोंडें । रितें भावेविण धेंडें ॥ ३ ॥ तुका म्हणे बरा । दावूं जाणतों पसारा ॥ ४ ॥

१०४८. उरलें तें भक्तिसुख । डोळां मुख पाहावें ॥ १ ॥ अंतरींचें कां हो नेणां । नारायणा माझिया ॥ २ ॥ पुरवा तैसी केली आळी । बळी जगदानिया ॥ ३ ॥ हातीं घेउनि चोरां भातें । दावा रितें बाळका ॥ ४ ॥ साजत हें थोरपण । नाहीं दीनवत्सला ॥ ५ ॥ शाहणें तरी लाड दावी । बाळ जेवीं मातेसी ॥ ६ ॥ तुका म्हणे पांडुरंगा । ऐसें पैगा आहे हें ॥ ७ ॥

१०४९. प्रीतीच्या भांडणा नाहीं शिरपाव । वचनाचेचि भाव निष्ठुरता ॥ १ ॥ जीणें तरि एका जीवें उभयतां । पुत्राचिया पिता दुखवे दुःखें ॥ २ ॥ काय जाणे तुटों मायेचें लिगाड । विषम तें आड उरों नेणें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज करुणा उत्तरें । करितां विश्वंभरें दाविजेल ॥ ४ ॥

१०५०. नव्हों सभाधीट । समोर बोलायाचें नीट । एकलीं एकट । दुजें नाहीं देखिलें ॥ १ ॥ आतां अवघें तुम्ही जाणां । तुमचें माझें नारायणा । येईल करुणा । तेचि पहा तुम्हांसी ॥ २ ॥ ताळ नाहीं माझें बुद्धी । धरली न धरवें शुद्धी । आतां बळ कधीं । कोण्या जन्में निवाड ॥ ३ ॥ आतां शेवटीचें। उत्तर हेंचि साचें । शरण आलें त्याचें । तुका म्हणे सांभाळा ॥ ४ ॥

१०५१. नमो नमो तुज माझें हें करणें । काय झालें उणें करितां स्नान ॥ १ ॥ संताचा मारग चालतों झाडूनि । हो कां लाभ हानि कांहीं तरी ॥ २ ॥ न करिसी तरी हेंचि कोडें मज । भक्ति गोड काज आन नाहीं ॥ ३ ॥ करीं सेवा कथा नाचेन रंगणीं । प्रेमसुख धणी पुरेल तों ॥ ४ ॥ महाद्वारीं सुख वैष्णवांचें मेळीं । वैकुंठ जवळीं वसे तेथें ॥ ५ ॥ तुका म्हणे नाहीं मुक्तिसवें चाड । हेंचि जन्म गोड घेतां मज ॥ ६ ॥

१०५२. भेद तुटलियावरी । आम्ही तुमचींच हो हरी ॥ १ ॥ आतां पाळावे पाळावे । आम्हां लडिवाळांचे लळे ॥ २ ॥ आणिकांची देवा । नाहीं जाणतचि सेवा ॥ ३ ॥ तुका म्हणे हेवा । माझा हेत पायीं देवा ॥ ४ ॥

१०५३. वर्णूं महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥ १ ॥ ठायींची ही काया ठेविली चरणीं । आतां ओंवाळुनि काय सांडूं ॥ २ ॥ नाहीं भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तोही तुझा ॥ ३ ॥ मज माझें कांहीं न दिसे पाहतां । जें तुज अनंता समर्पावें ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥ ५ ॥ 

१०५४. देवा हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥ १ ॥ याचा धरीन अभिमान । करीन आपुले जतन ॥ २ ॥ देऊनियां जीव । वडिलीं साधियेला हा ठाव ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । जुनाट हे माझी सेवा ॥ ४ ॥

१०५५. दीनानाथा तुझीं ब्रीदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥ १ ॥ पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ २ ॥ आपुल्या दासाचें न साहासी उणें । उभा त्या कारणें राहिलासी ॥ ३ ॥ चक्र गदा हातीं आयुधें अपार । न्यून तेथें पुरें करूं धांवें ॥ ४ ॥ तुका म्हणे तुज भक्तीचें कारण । करावया पूर्ण अवतार ॥ ५ ॥

१०५६. तुम्हां ठावा होता देवा । माझे अंतरींचा हेवा ॥ १ ॥ होती कशानें सुटका । तरी हे वैकुंठनायका ॥ २ ॥ नसतें सांभाळिलें । जरि तुम्हीं आश्वासिलें ॥ ३ ॥ तुका म्हणे कृपाळुवा । बरवा केला सांवाधांवा ॥ ४ ॥

१०५७. कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥ १ ॥ आतां माझा श्रोता वक्ता तूंचि देवा । करावी ते सेवा तुझीच म्यां ॥ २ ॥ कुशळ चतुर येथें न पवती । करितील रिती तर्क मतें ॥ ३ ॥ तुका म्हणे केणें जालें एके घरीं । मज आणि हरी तुम्हां गांठी ॥ ४ ॥

१०५८. करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न म्हणे संत ॥ धृ. ॥ जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ २ ॥ जग देव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भारवाही ॥ ३ ॥ तुका म्हणे भय न धरी मानसीं । ऐसियाचें विशीं करितां दंड ॥ ४ ॥

१०५९. दीप घेऊनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥ १ ॥ विष्णुदास आम्ही न भिओं कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ २ ॥ उधळीतां माती रविकळा मळे । हें कैसे न कळे भाग्यहीना ॥ ३ ॥ तुका म्हणे तृणें झांके हुताशन । हें तंव वचन वाउगेचि ॥ ४ ॥

१०६०. दिने दिने शंका वाढे। आयुष्य नेणवतां गाढें ॥ १ ॥ कैसीं भुललीं बापुडीं । दंभविषयाचें सांकडीं ॥ २ ॥ विसरलीं मरण । त्याची नाहीं आठवण ॥ ३ ॥ देखत देखत पाहीं । तुका म्हणे आठव नाहीं ॥ ४ ॥

१०६१. आमुचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीन देखोवेखीं ॥ १ ॥ न कळे सतत हिताचा विचार । तेही दारोदार खाति फेरे ॥ २ ॥ वंदिले वंदावे निंदिले निंदावे । एक गेलें जावें त्याचि वाटा ॥ ३ ॥ तुका म्हणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥ ४ ॥

१०६२. अहो उभया विटेवरी । भरोवरी चुकविली ॥ १ ॥ निवारलें येणें जाणें । कोणा कोणें रुसावें ॥ २ ॥ संकल्पासी वेचे बळ । भारे फळ निर्माण ॥ ३ ॥ तुका म्हणे उभयतां । भेटी सत्ता लोभाची ॥ ४ ॥

१०६३. कां रे माझा तुज नये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥ १ ॥ अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ २ ॥ कां हें चित्त नाहीं पावत विश्रांती । इंद्रियांची गति खुंटेचि ना ॥ ३ ॥ तुका म्हणे कां हो धरियला कोप । सरलें नेणों पाप पांडुरंगा ॥ ४ ॥

१०६४. विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥ १ ॥ विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारु भवनदीचा ॥ २ ॥ विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ॥ ३ ॥ विठ्ठल हें जन विठ्ठल माझें मन । सोइरा सज्जन विठ्ठल माझा ॥ ४ ॥ तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । नस्वरित गांवा जाइन त्याच्या ॥ ५ ॥

१०६५. देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥ १ ॥ पाहातां काशा तूं सारिखा । तिहीं लोकांच्या जनका ॥ २ ॥ आरुष हे वाणी । गोड करूनि घेतां कानीं ॥ ३ ॥ आवडीनें खेळे । तुका पुरवावे सोहळे ॥ ४ ॥

 

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...