Saturday, 3 May 2025

१४. एकविध अभंग

एकमेव विठ्ठलाचीच भक्ती दर्शविणारे अभंग

एकविध अभंग (अभंग संख्या ८४)

७३७. भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी न विसंबे ॥ १ ॥ विटेवरी समचरण । संतीं खूण सांगितली ॥ २ ॥ अवघें आतां काम सारूं । हाचि करूं कैवाड ॥ ३ ॥ तुका म्हणे खंडूं खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥ ४ ॥

७३८. आमुच्या हें आलें भागा । जिव्हार या जगाचें ॥ १ ॥ धरूनियां ठेलों जीवें । बळकट भावें एकविध ॥ २ ॥ आणूनियां केला रूपा । उभा सोपा जवळी ॥ ३ ॥ तुका म्हणे अंकित केला । खालीं आला वचनें ॥ ४ ॥

७३९. येथें आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हेंचि झाले ॥ १ ॥ गाऊं नाचूं टाळी वाहूं गीत छंदें । डोलवूं विनोदें अंग तेणें ॥ २ ॥ मथुनियां सार काढिलें बाहेरी । उपाधि त्या येरी निवडिल्या ॥ ३ ॥ तुका म्हणे जना लाविली शिराणी । सेवितां हे धणी होत नाहीं ॥ ४ ॥

७४०. जैसा तैसा आतां । मज प्रमाण अनंता ॥ १ ॥ पायां पडणें न सोडीं । पोटीं तेंच वर तोंडीं ॥ २ ॥ एका भावें चाड । आदि तेंचि अंतीं गोड ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां । टळणेंचि नाहीं नेमा ॥ ४ ॥

७४१. आम्ही पहा कैसीं एकतत्त्वी झालों । राखणे लागलों वासनेसी ॥ १ ॥ तुम्हांविण कांहीं नावडे या जीवा । केला तोचि देवा दृढ पण ॥ २ ॥ वर्म नेणों परि वृत्ति भंगों नेदूं । वंदिलेचि वंदूं आवडीनें ॥ ३ ॥ तुका म्हणे केलें नामाचें जीवन । वारताही भिन्न नेणों आतां ॥ ४ ॥

७४२. गोपीचंदन मुद्रा धरणें । आम्हां लेणें वैष्णवा ॥ १ ॥ मिरवूं अळंकार लेणें । हीं भूषणें स्वामीची ॥ २ ॥ विकलों ते सेवा जीवें । एक्या भावें एकविध ॥ ३ ॥ तुका म्हणे शूर झालों । बाहेर आलों संसारा ॥ ४ ॥

७४३. माझी भक्ती भोळी । एकविध भावबळी ॥ १ ॥ मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ २ ॥ आतां अनारिसा । येथें न व्हावें सहसा ॥ ३ ॥ तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहे ॥ ४ ॥

७४४. आम्हां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरों शकेचि ना ॥ १ ॥ जाणे माउली त्या खुणा । क्षोभ उपजो नेदी मना । शांतवूनि स्तना । लावीं अहो कृपाळें ॥ २ ॥ तुज अवघे होऊं येतें । परि मज बाटों नये चित्तें । उपासने परतें । नये कांहीं आवडो ॥ ३ ॥ करूं रूपाची कल्पना । मुखीं नाम नारायणा । तुका म्हणे जना । जळस्थळ देखतां ॥ ४ ॥

७४५. आम्हां एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणकमळ स्वामीचे ते ॥ १ ॥ चित्ताचे संकल्प राहिलें चळण । आज्ञा ते प्रमाण करूनी असों ॥ २ ॥ दुजिया पासाव परतलें मन । केलें घ्यावें दान होईल तें ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां पुरला नवस । एकाविण ओस सकळही ॥ ४ ॥

७४६. एकविध आम्ही न धरूं पालट । न संडूं हे वाट सांपडली ॥ १ ॥ म्हणवूनि केला पाहिजे सांभाळ । माझें बुद्धीबळ पाय तुझें ॥ २ ॥ बहुत न कळे बोलतां प्रकार । अंतरा अंतर साक्ष असे ॥ ३ ॥ तुका म्हणे अगा जीवींच्या जीवना । तूंचि नारायणा साक्षी माझा ॥ ४ ॥

७४७. नाहीं वागवीत जाणिवेचें ओझें । स्वामिसेवा काजें निर्धारु हा ॥ १ ॥ आज्ञा ते प्रमाण हा मनीं निर्धार । येणें फिटे भार निश्चयेंसी ॥ २ ॥ आळीकर आम्हीं एकविध चित्तें । तैसें होऊं येतें मायबापें ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी ये जातीची सेवा । घातलासे देवावरी भार ॥ ४ ॥

७४८. परपीडक तो आम्हां दावेदार । विश्वी विश्वंभर म्हणऊनि ॥ १ ॥ दंडू त्यागूं बळे नावलोकूं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा दुरी ॥ २ ॥ अनाचार कांहीं न साहे अवगुण । बहु होय मन कासावीस ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी एकविध सेवा । विमुख ते देवा वाळीं चित्तें ॥ ४ ॥

७४९. लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥ १ ॥ म्हणऊनि करीं पायांसवे आळीं । आणीक वेगळी नेणें परी ॥ २ ॥ एकविध आम्ही स्वामिसेवेसाठी । वरी तोचि पोटीं एकभाव ॥ ३ ॥ तुका म्हणे करीं सांगितलें काम । तुम्हां धर्माधर्म ठावे देवा ॥ ४ ॥

७५०. धीर तो कारण एकविध भाव । पतिव्रते नाहो सर्वभावें ॥ धृ. ॥ चातक हे जळ न पाहती दृष्टी । वाट पाहे कंठीं प्राण मेघा ॥ २ ॥ सूर्यविकासिनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्त उदयाची ॥ ३ ॥ धेनु येऊं नेदी जवळी आणिका । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥ ४ ॥ तुका म्हणे नेम प्राणासंवसाटीं । तरीच या गोष्टी विठोबाची ॥ ५ ॥ 

७५१. पतिव्रता नेणें आणिकांची स्तुति । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥ १ ॥ तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलें विणें दुजें ॥ २ ॥ सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेसी ॥ ३ ॥ तुका म्हणे बाळ मातेपुढें नाचे । बोल आणिकाचे नावडती ॥ ४ ॥

७५२. आणिकांची स्तुति आम्हां ब्रह्महत्या । एकावांचुनि त्या पांडुरंगा ॥ १ ॥ आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणों या देव आणिकासी ॥ २ ॥ शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥ ३ ॥ तुका म्हणे मज आणिका संकल्पें । अवघींच पापें घडतील ॥ ४ ॥

७५३. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हां नारायण तैशापरी ॥ १ ॥ सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आम्हां नारायण तैशापरी ॥ २ ॥ तुका म्हणे एकविध जालें मन । विठ्ठलावांचून नेणें दुजें ॥ ३ ॥ (धृ. नाही)

७५४. काय करूं आन दैवतें । एकाविण पंढरीनाथें ॥ १ ॥ सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवा कैची उरी ॥ २ ॥ अनेक दीपिका प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥ ३ ॥ तुका म्हणे नेणें दुजें । एकाविण पंढरीराजे ॥ ४ ॥

७५५. माझी आतां सत्ता आहे । तुम्हां पायां हे वरती ॥ १ ॥ एकाविण नेणें दुजा । पंढरीराजा सर्वांगें ॥ २ ॥ पुरवावी केली आळी । जे जे काळीं मागेन तें ॥ ३ ॥ तुका म्हणे सुटसी कैसा । धरूनि दिशा राहिलों ॥ ४ ॥

७५६. आणीक दुसरे मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां ॥ १ ॥ पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं । जागृतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ २ ॥ पडिलें वळण इंद्रियां सकळां । भाव तो निराळा नाहीं दुजा ॥ ३ ॥ तुका म्हणे नेत्रीं केली ओळखण । तटस्थ हें ध्यान विटेवरी ॥ ४ ॥

७५७. न पूजीं आणिकां देवा न करी त्यांची सेवा । न मनीं या केशवाविण दुजें ॥ १ ॥ काय उणें जालें मज तयां पायीं । ते मी मागों काई कवणासी ॥ २ ॥ आणिकांची कीर्ति नाइकें न बोलें । चाड या विठ्ठलेंविण नाहीं ॥ ३ ॥ न पाहें लोचनीं श्रीमुखावांचूनि । पंढरी सांडूनि नवजें कोठें ॥ ४ ॥ न करीं कांहीं आस मुक्तीचे सायास । न भें संसारास येतां जातां ॥ ५ ॥ तुका म्हणे कांहीं व्हावें ऐसें जीवा । नाहीं या केशवाविण दुजें ॥ ६ ॥

७५८. कोणाचिया न पडों छंदा । गोविंदासी आळवूं ॥ १ ॥ बहुतांचीं बहु मतें । अवघे रिते पोकळ ॥ २ ॥ घटापटा डहुळी मन । होय सीण न करूं तें ॥ ३ ॥ तुका म्हणे पांडुरंग । भरूं भाग आला तो ॥ ४ ॥

७५९. न करीं पठन घोष अक्षरांचा । बीजमंत्र आमुचा पांडुरंग ॥ १ ॥ सर्वकाळ नामचिंतन मानसीं । समाधान मनासीं समाधि हे ॥ २ ॥ न करीं भ्रमण न रिघें कपाटीं । जाईन तेथें दाटी वैष्णवांची ॥ ३ ॥ आन नेणें कांहीं नवजें तपासी । नाचे दिंडीपाशीं जागरणीं ॥ ४ ॥ उपवास व्रत न करीं पारणें । रामकृष्ण म्हणें नारायण ॥ ५ ॥ आणिकांची स्तुती सेवा नेणें वाणूं । तुका म्हणे आनु दुजें कांहीं ॥ ६ ॥

७६०. आणोनियां मना । अवघ्या धांडोळिल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥ १ ॥ यासी अनुसरल्या काय । घडे ऐसें वायां जाय । देखिले ते पाय । सम जीवीं राहती ॥ २ ॥ तो देखावा हा विध । चिंतनेंचि कार्य सिद्ध । आणिकां संबंध । नाहीं पर्वकाळासी ॥ ३ ॥ तुका म्हणे खळ । होती क्षणेचि निर्मळ । जाऊनियां मळ । वाळवंटीं नाचती ॥ ४ ॥

७६१. तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूंचि माझें हितकरिता देवा ॥ १ ॥ तूंचि माझा देव तूंचि माझा जीव । तूंचि माझा भाव पांडुरंगा ॥ २ ॥ तूं माझा आचार तूं माझा विचार । तूंचि सर्व भार चालविसी ॥ ३ ॥ सर्वभावें मज तूं होसी प्रमाण । ऐसी तुझी आण वाहतसें ॥ ४ ॥ तुका म्हणे तुज विकला जीवभाव । कळेल तो उपाव करीं आतां ॥ ५ ॥

७६२. तूं आम्हां सोयरा सज्जन सांगाती । तुजमज प्रीति चालाें सदा ॥ १ ॥ तूं माझा जिव्हाळा जीवाचा जीवलग । होसी अंतरंग अंतरींचा ॥ २ ॥ गण गोत मित्र तूं माझें जीवन । अनन्य शरण तुझ्या पायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्वगुणें तुझा दास । आवडे अभ्यास सदा तुझा ॥ ४ ॥

७६३. असोत हे बोल । अवघें तूंचि भांडवल ॥ १ ॥ माझा मायबाप देवा । सज्जन सोयरा केशवा ॥ २ ॥ गाळियेला भेद । सारियेले वादावाद ॥ ३ ॥ तुका म्हणे मधीं । आतां न पडे उपाधि ॥ ४ ॥

७६४. आमुची विश्रांति । तुमचे चरण कमळापती ॥ १ ॥ हेंचि एक जाणें । कायावाचा आणि मनें ॥ २ ॥ पुढती पुढती नमन । घालूनियां लोटांगण ॥ ३ ॥ नीच जनालोकां । तळिल पायरीस तुका ॥ ४ ॥

७६५. विश्वासिया नाहीं लागत सायास । अनायासे रंग अंगा येतो ॥ धृ. ॥ लेंकराच्या हातें घांस मागे माता। वोरसोनि चित्ता सुख पावे ॥ २ ॥ गौरव तो मानी आरुषा वचनीं । भूषण ते वाणी मिरवावी ॥ ३ ॥ तुका म्हणे आहे सकळही साक्षी । माझा तो कइपक्षी पांडुरंग ॥ ४ ॥

७६६. बहुत असती मागें सुखी केलीं । अनाथा माउली जिवांची तूं ॥ १ ॥ माझिया संकटा न धरीं आळस । लावूनियां कासे पार पावीं ॥ २ ॥ कृपावंता करा ज्याचा अंगीकार । तया संवसार नाहीं पुन्हा ॥ ३ ॥ विचारितां नाहीं दुजा बळिवंत । ऐसा सर्वगत व्यापी कोणी ॥ ४ ॥ म्हणउनि दिला मुळीं जीवभाव । देह केला वाव समाधिस्थ ॥ ५ ॥ तुका म्हणे नाहीं जाणत आणीक । तुजविण एक पांडुरंगा ॥ ६ ॥

७६७. रवीचा प्रकाश । तोचि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥ १ ॥ आतां हाचि वसों जीवीं । माझे अंतरीं गोसावी । होऊं येतीं ठायीं । काय वर्मे त्याच्यानें ॥ २ ॥ सवें असतां धनी । आड येऊं न सके कोणी । नलगे विनवणी । पृथकाची करावी ॥ ३ ॥ जन्माचिया गति । येणें अवघ्या खुंटती । कारण ते प्रीती । तुका म्हणे जवळी ॥ ४ ॥

७६८. न कळे जी भक्ती काय करूं सेवा । संकोचोनि देवा राहिलोंसें ॥ १ ॥ जोडोनियां कर राहिलों निवांत । पायांपाशीं चित्त ठेवूनियां ॥ २ ॥ दिशाभुली करीं स्थळीं प्रदक्षणा । भ्रमें नारायणा कष्टविलें ॥ ३ ॥ तुका म्हणे झालों आज्ञेचा पाळक । जीवनासी एक ठाव केला ॥ ४ ॥

७६९. मी दास तयाचा जया चाड नाहीं । सुख दुःख दोहींविरहित जो ॥ १ ॥ राहिलासे उभा भींवरेचे तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ २ ॥ नवल काय तरी पाचारितां पावे । न संवरित धांवे भक्तिकाजें ॥ ३ ॥ सर्व भार माझा त्यासी आहे चिंता । तोचि माझा दाता स्वहिताचा ॥ ४ ॥ तुका म्हणे त्यास गाईन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥ ५ ॥

७७०. खरें भांडवल सांपडलें गांठीं । जेणें नये तुटी उदिमासी ॥ १ ॥ सवंगाचें केणें सांपडलें घरीं । भरूनि वैखरी सांठविलें ॥ २ ॥ घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदैवां दुर्बळा भाव तैसा ॥ ३ ॥ फडा आलिया तो न वजे निरास । जरि कांहीं त्यास न कळतां ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां जालीसे निश्चिंती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥ ५ ॥

७७१. ध्याइन तुझें रूप गाइन तुझें नाम । आन न करी काम जिव्हामुखें ॥ १ ॥ पाहीन तुझे पाय ठेवीन मी डोई । पृथक ते काहीं न करीं आन ॥ २ ॥ तुझेचि गुणवाद आइकेन कांनीं । आणिकांची वाणी पुरे आतां ॥ ३ ॥ करीन सेवा करें चालेन मी पायीं । आणीक न वजे ठायीं तुजविण ॥ ४ ॥ तुका म्हणे जीव ठेवीन मी पायीं । आणीक ते कांहीं देऊं कवणा ॥ ५ ॥

७७२. तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥ १ ॥ आणीक नेणें कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा ॥ २ ॥ हेंचि माझें गाणें । तुझें नामसंकीर्तन ॥ ३ ॥ तुझ्या नामाचीं भूषणें । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥ ४ ॥

७७३. तुझ्या नामाची आवडी । आम्ही विठो तुझीं वेडीं ॥ १ ॥ आतां न वजों आणिकां ठाया । गाऊं गीत लागों पायां ॥ २ ॥ काय वैकुंठ बापुडें । तुझ्या प्रेमसुखापुढें ॥ ३ ॥ संतसमागममेळे । प्रेमसुखाचा सुकाळ ॥ ४॥ तुका म्हणे तुझ्या पायीं । जन्ममरणा ठाव नाहीं ॥ ५ ॥

७७४. काय ते विरक्ती न कळेचि आम्हां । जाणो एका नामा विठोबाच्या ॥ १ ॥ नाचेन मी सुखें वैष्णवांचे मेळीं । दिंडी टाळघोळी आनंदें या ॥ २ ॥ शांति क्षमा दया ते मी काय जाणे । विठ्ठलकीर्तनें वांचूनियां ॥ ३ ॥ कासया एकांत सेवूं तया वना । आनंदें या जनामाजी असो ॥ ४ ॥ कासया उदास होऊं देहावरी । अमृतसागरीं बुडोनियां ॥ ५ ॥ तुका म्हणे मज असे हा भरंवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥ ६ ॥

७७५. मायेविण बाळ क्षणभरि न राहे । न देखतां होय कासावीस ॥ १ ॥ आणिक उदंड बुजाविती तरी । छंद त्या अंतरीं माउलीचा ॥ २ ॥ नावडती तया बोल आणिकाचे । देखोनियां नाचे माय दृष्टी ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥ ४ ॥ (॥धृ. नाही) 

७७६. पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥ १ ॥ होईल तें हो या विठोबाच्या नांवें । अर्जिलें तें भावें जीवीं धरूं ॥ २ ॥ एखादा अंगाशीं येईल प्रकार । विचारितां फार युक्ति वाढे ॥ ३ ॥ तुका म्हणे आळी करितां गोमटी। मायबापा पोटीं येते दया ॥ ४ ॥

७७७. सिद्धीचा दास नव्हे श्रुतीचा अंकिला । होईन विठ्ठला दास तुझा ॥ १ ॥ सर्व सुख असे माझिये मानसीं । राहिलें तयासी नाश नाहीं ॥ २ ॥ तेणें पुण्य पाप न देखें लोचनीं । आणिकां वांचूनि पांडुरंगा ॥ ३ ॥ न करीं मी आस साधनीं सायास । भक्तिप्रेमरस वांचुनियां ॥ ४ ॥ गर्भवासीं दुःख नाहीं येतां जातां । हृदयीं असतां नाम तुझें ॥ ५ ॥ तुका म्हणे तुझा होईन अंकिला । न भें मी विठ्ठला कळिकाळासी ॥ ६ ॥

७७८. म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हें । त्याचे बोल नाइकावे ॥ १ ॥ मग तो हो कां कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ २ ॥ नाहीं विठ्ठल जया ठावा । तोही डोळां न पहावा ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं । त्याची भीड मज कांहीं ॥ ४ ॥

७७९. जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ॥ १ ॥ शत्रु तो म्यां केला न म्हणे आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावें ॥ २ ॥ जयासी नावडे विठोबाचें नाम । तो जाणा अधम तुका म्हणे ॥ ३ ॥

७८०. विठ्ठलावांचूनि ब्रह्म जें बोलती । वचन तें संतीं मानूं नये ॥ १ ॥ विठ्ठलावांचूनि ज्या ज्या उपासना । अवघाचि जाणा श्रमचि तो ॥ २ ॥ विठ्ठलावांचूनि सांगतील गोष्टी । वांयां ते हिंपुटी होती जाणा ॥ ३ ॥ विठ्ठलावांचूनि जें कांहीं जाणती । तितुल्या वित्पति वाउगीं या ॥ ४ ॥ तुका म्हणे एक विठ्ठलचि खरा । येर तो पसारा वाउगाचि ॥ ५ ॥ (धृ. नाही) 

७८१. येथें बोलोनियां काय । व्हावा गुरु तरि जाय ॥ १ ॥ मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ २ ॥ ऐकोनि मरसी वृथा । जंव आहेसी तूं जीता ॥ ३ ॥ हुरमतीची चाड । तेणें न करावी बडबड ॥ ४ ॥ पुसेल कोणी त्यास । जा रे करीं उपदेश ॥ ५ ॥ आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडूं कळिकाळाचें शीर ॥ ६ ॥ घेऊं पुढती जन्म । वाणूं कीर्ती मुखें नाम ॥ ७ ॥ तुका म्हणे मुक्ती । नाहीं आसचि ये चित्तीं ॥ ८ ॥

७८२. हेंचि सर्वसुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वांयां ॥ १ ॥ हेंचि एक सर्व साधनांचें मूळ । आतुडे गोपाळ येणें पंथें ॥ २ ॥ न लगती कांहीं तपाचिया राशी । करणें वाराणशी नाना तीर्थे ॥ ३ ॥ कल्पना हे तिळ देहीं अभिमान । नये नारायण जवळी त्याच्या ॥ ४ ॥ तुका म्हणे देव नामीं नेदी भेटी । म्हणे त्याचे होंटीं कुष्ट होय ॥ ५ ॥

७८३. आणिक कोणाचा न करीं मी संग । जेणे होय भंग माझ्या चित्ता ॥ १ ॥ विठ्ठलावांचूनि आणीक जे वाणी । नाइकें मी कानीं आपुलिया ॥ २ ॥ समाधानासाठीं बोलावी हे मात । परि माझें चित्त नाहीं कोठें ॥ ३ ॥ जिवाहूनि मज तेचि आवडती । आवडे ज्या चित्तीं पांडुरंग ॥ ४ ॥ तुका म्हणे माझें तोचि जाणे हित । आणिकांच्या चित्त नेदीं बोला ॥ ५ ॥

७८४. नव्हे जाखाई जोखाई । मायराणी मेसाबाई ॥ १ ॥ बळिया माझा पंढरीराव । जो ह्या देवांचाही देव ॥ २ ॥ रंडी चंडी शक्ती । मद्यमांस भक्षिती ॥ ३ ॥ बहिरव खंडेराव । रोटी सुटीसाठीं देव ॥ ४ ॥ गणोबा विक्राळ । लाडुमोदकांचा काळ ॥ ५ ॥ मुंजा म्हैसासुरे। हे तो कोण लेखी पोरें ॥ ६ ॥ वेताळें फेताळें । जळो त्यांचे तोंड काळे ॥ ७ ॥ तुका म्हणे चित्तीं । धरा रखुमाईचा पती ॥ ८ ॥

७८५. माझे अंतरींचें तोचि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥ १ ॥ जीव भाव त्याचे ठेवियेला पायीं । मज चिंता नाहीं कवणेविशीं ॥ २ ॥ सुखसमारंभें संतसमागम । गाऊं वाचे नाम विठोबाचें ॥ ३ ॥ गातां पुण्य होय आइकतां लाभ । संवसारबंद तुटतील ॥ ४ ॥ तुका म्हणे जीव तयासी विकिला । आणीक विठ्ठलाविण नेणें ॥ ५ ॥

 

७८६. आणीक मज कांहीं नावडती मात । एका पंढरीनाथावांचूनियां ॥ १ ॥ त्याचीच कथा आवडे कीर्तन । तें मज श्रवण गोड लागे ॥ २ ॥ तुका म्हणे संत म्हणोत भलतें । विठ्ठलापरतें न मनीं कांहीं ॥ ३ ॥

७८७. कोण वेचीं वाणी । आतां क्षुल्लका कारणीं ॥ १ ॥ आतां हेंचि माप करूं । विठ्ठल हृदयांत धरूं ॥ २ ॥ नेंदाविया वृत्ति । आतां उठोंचि बहुती ॥ ३ ॥ उपदेश लोकां । करुनी वेडा होतो तुका ॥ ४ ॥

७८८. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मुळ ॥ १ ॥ भाग्यवंता छंद मनीं । कोड कानीं ऐकती ॥ २ ॥ विठ्ठल हें दैवत भोळें । चाड काळें न धरावी ॥ ३ ॥ तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्तीं तो धन्य ॥ ४ ॥

७८९. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ १ ॥ विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ २ ॥ विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥ ३ ॥ विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥ ४ ॥

७९०. विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥ १ ॥ आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपुळिया धन ॥ २ ॥ विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजीवनी ॥ ३ ॥ रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगें ॥ ४ ॥

७९१. विठ्ठल आमुचा निजाचा । सज्जन सोयरा जीवाचा ॥ १ ॥ माय बाप चुलता बंधु । अवघा तुजशीं संबंधु ॥ २ ॥ उभय कुळीं साक्ष । तूंचि माझा मातुळपक्ष ॥ ३ ॥ समर्पिली काया । तुका म्हणे पंढरीराया ॥ ४ ॥

७९२. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥ १ ॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ २ ॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥ ३ ॥ सकळां इंद्रियां मन हें प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥ ४ ॥ तुका म्हणे या हो विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥ ५ ॥

 

७९३. विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥ १ ॥ अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ २ ॥ तोचि शरणागतां विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥ ३ ॥ विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धि । लागली समाधि विठ्ठल नामें ॥ ४ ॥ विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख । गोडावलें मुख तुका म्हणे ॥ ५ ॥

७९४. विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥ १ ॥ विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ २ ॥ विठ्ठल जागृति स्वप्नसुषुप्ती । आन दुजें नेणती विठ्ठलाविण ॥ ३ ॥ भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठलीं निर्धार जयां नरां ॥ ४ ॥ तुका म्हणे तेही विठ्ठलचि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥ ५ ॥

७९५. जिवींचा जिव्हाळा । पाहों आपुलियां डोळां ॥ १ ॥ आम्हां विठ्ठल एक देव । येर अवघेचि वाव ॥ २ ॥ पुंडलिकाचे पाठीं । उभा हात ठेवुनि कटीं ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्तीं । वाहूं रखुमाईचा पती ॥ ४ ॥

७९६. एक धरिला चित्तीं । आम्हीं रखुमाईचा पती ॥ १ ॥ तेणें जालें अवघें काम । निवारला भवभ्रम ॥ २ ॥ परद्रव्य परनारी । जाली विषाचिये परि ॥ ३ ॥ तुका म्हणे फार । नाहीं लागत व्यवहार ॥ ४ ॥

७९७. आम्हां अवघें भांडवल । एक विठ्ठल एकला ॥ १ ॥ कायावाचामनोभावें । येथें जीवें वेंचलों ॥ २ ॥ परतें कांहीं नेणें दुजें । तत्त्वबीज पाऊलें ॥ ३ ॥ तुका म्हणे संतसंगें । रंगें येणें रंगलों ॥ ४ ॥

७९८. आम्हां हेंचि भांडवल । म्हणों विठ्ठल विठ्ठल ॥ १ ॥ सुखें तरों भवनदी । संगें वैष्णवांची मांदी ॥ २ ॥ बाखराचें वाण । सांडु हें जेवूं जेवण ॥ ३ ॥ नलगे वारंवार । तुका म्हणे वेरझार ॥ ४ ॥

७९९. आणीक मात माझ्या नावडे जीवासी । काय करूं यासी पांडुरंगा ॥ १ ॥ मुखा तेंचि गोडी श्रवणीं आवडी । चित्त माझें ओढी तुझे पायीं ॥ २ ॥ जये पदीं नाहीं विठ्ठलाचें नाम । मज होती श्रम आइकतां ॥ ३ ॥ आणिकाचें मज म्हणवितां लाज । वाटे हें सहज न बोलावें ॥ ४ ॥ तुका म्हणे मज तूंचि आवडसी । सर्वभावेविसीं पांडुरंगा ॥ ५ ॥

८००. आम्ही नामाचें धारक । नेणों प्रकार आणीक । सर्व भावें एक । विठ्ठलचि प्रमाण ॥ १ ॥ नलगे जाणावें नेणावें । गावें आनंदें नाचावें । प्रेमसुख घ्यावें । वैष्णवांचें संगती ॥ २ ॥ भावबळें घालूं कास । लज्जा चिंता दवडूं आस । पायीं निजध्यास । म्हणवूं दास विष्णूचे ॥ ३ ॥ भय नाहीं जन्म घेतां । मोक्षसुखा हाणों लाता । तुका म्हणे सत्ता । करूं निकट सेवेची ॥ ४ ॥

८०१. एक गावें आम्ही विठोबाचें नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥ १ ॥ मोडूनियां वाटा सूक्षम दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ २ ॥ लावूनि मृदंग श्रुतिटाळघोष । सेवूं विठूरस आवडीनें ॥ ३ ॥ तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियाचे हित हेळा मात्रें ॥ ४ ॥

८०२. आम्हांसी तों नाहीं आणीक प्रमाण । नामासी कारण विठोबाच्या ॥ १ ॥ घालूनियां कास करितो कैवाड । वागों नेदीं आड कळिकाळासी ॥ २ ॥ अबद्ध वाकुडें जैशातैशापरी । वाचे हरि हरि उच्चारावें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां सांपडलें निज । सकळ हें बीज पुराणाचें ॥ ४ ॥

८०३. माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायाशीं न विसंबें ॥ १ ॥ विसरेना रूप क्षण एक चित्तीं । जिवलग मूर्ति सांवळी ते ॥ २ ॥ विसरतां हरी क्षणएक घडी । अंतरेल जोडी लक्षलाभ ॥ ३ ॥ तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाय । संजीवनी आहे हृदयामाजी ॥ ४ ॥

८०४. जतन करीन जीवें । शुद्ध भावें करूनी ॥ १ ॥ विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ॥ २ ॥ वर्दळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥ ३ ॥ तुका म्हणे हृदय पेटीं । ये संपुटीं सांठवूं ॥ ४ ॥

८०५. यथाविधि पुजा करी । सामोग्री तो वरी हे नाहीं ॥ १ ॥ आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविता ॥ २ ॥ मंगळ तें तुम्हीं जाणा । नारायणा काय तें ॥ ३ ॥ तुका म्हणे समर्पिला । तुज विठ्ठला देहभाव ॥ ४ ॥

८०६. सुखाची वस्ती झाली माझे जीवीं । तुमच्या गोसावी कृपादानें ॥ १ ॥ रूप वेळोवेळां आठवीं अंतरीं । बैसोनि जिव्हारीं राहिलें तें ॥ २ ॥ विसावलें मन विटलें प्रपंचा । गोडावली वाचा येणें रसें ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं नाठवेसें झालें । दुसरे विठ्ठलें मज आतां ॥ ४ ॥

८०७. काम क्रोध आम्हीं वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥ १ ॥ आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ २ ॥ रिद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलों ग्रास ब्रह्मांडाचा ॥ ४ ॥

८०८. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरु ॥ १ ॥ पढियें देहभाव पुरवी वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ २ ॥ मागें पुढे उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥ ३ ॥ योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥ ४ ॥ तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥ ५ ॥

८०९. काय उणें आम्हां विठोबाचे पायीं । नाहीं ऐसें काई येथें एक ॥ १ ॥ तें हें भोंवताले ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ २ ॥ कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥ ३ ॥ तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गांवीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥ ४ ॥

८१०. पाहोनि अधिकार । तैसें बोलावें उत्तर ॥ १ ॥ काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥ २ ॥ आम्ही जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥ ३ ॥ तुका म्हणे भावें । माझें पुढें पडेल ठावें ॥ ४ ॥

८११. आम्हां विष्णुदासां हेंचि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥ १ ॥ वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें । करोनियां चित्तें समाधान २ ॥ तुका म्हणे द्रव्य मेळविलें मागें । हें तों कोणासंगे आलें नाहीं ॥ ३ ॥

८१२. आम्ही विठ्ठलाचे दास झालो आतां । न चलेचि सत्ता आणिकांची ॥ १ ॥ नावरे तयासी ऐसें नाहीं दुजें । करितां पंढरिराजें काय नव्हे ॥ २ ॥ कोठें तुज ठाव घ्यावयासी धांवा । मना तूं विसावा घेई आतां ॥ ३ ॥ इंद्रियांची वोढी मोडिला व्यापार । ज्या अंगे संचार चाली तुज ॥ ४ ॥ तुका म्हणे आम्ही जिंकोनियां काळ । बैसलों निश्चळ होऊनियां ॥ ५ ॥

८१३. सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक तें वर्म नेणें कांहीं ॥ १ ॥ काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥ २ ॥ तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळों यावा ॥ ३ ॥

८१४. माझे आराधन । पंढरपुरीचें निधान ॥ १ ॥ तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ २ ॥ दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥ ४ ॥

८१५. माझी विठ्ठल माउली । प्रेमपान्हा पान्हाइली ॥ १ ॥ कुर्वाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ २ ॥ केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोंवळी ॥ ३ ॥ तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥ ४ ॥

८१६. सुख वाटे परी वर्म । धर्माधर्म न कळे ॥ १ ॥ गायें नाचें एवढें जाणें । विठ्ठल म्हणे निर्लज्ज ॥ २ ॥ अवघें माझें एवढें धन । साधनही सकळ ॥ ३ ॥ तुका म्हणे पायां पडे । तुमच्या कोडें संतांच्या ॥ ४ ॥

८१७. येउनि संसारीं । मी तों एक जाणें हरी ॥ १ ॥ नेणें आणिक कांहीं धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥ २ ॥ कामक्रोधलोभ स्वार्थ । अवघा माझा पंढरिनाथ ॥ ३ ॥ तुका म्हणे एक । धनी विठ्ठल मी सेवक ॥ ४ ॥

८१८. रुची रुची घेऊं गोडी । प्रेम सुख जाली जोडी ॥ १ ॥ काळ जाऊं नेदूं वांयां । चिंतूं विठोबाच्या पायां ॥ २ ॥ करूं भजन भोजन । धणी घेऊं नारायण ॥ ३ ॥ तुका म्हणे जीव धाला । होय तुझ्यानें विठ्ठला ॥ ४ ॥

८१९. आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचें ॥ १ ॥ ते हे समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरीं विठ्ठलरूप ॥ २ ॥ पुराणासी वाड श्रुति नेणती पार । तें झालें साकार पुंडलिका ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्यातें सनकादिक ध्यात । तें आमुचें कुळदैवत पांडुरंग ॥ ४ ॥

८२०. वाट पाहे बाहे निढळीं ठेवूनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टि लागलेंसें चित्त ॥ १ ॥ कईं येता देखेन माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ २ ॥ डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहे । मन उताविळ भाव सांडूनियां देहे ॥ ३ ॥ सुखसेज गोड चित्तीं न लगे आणीक । नाठवे घरदार तहान पळाली भूक ॥ ४ ॥ तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोण । पंढरीचें वाटे येतां मूळ देखेन ॥ ५ ॥

 

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...