श्री तुकोबाराय यांनी सत्य-असत्याचा निवाडा करून लोकांना हिताचा मार्ग दाखवला, त्याविषयीचे अभंग.
उपदेशपर अभंग-३ (तीन भाग मिळून अभंग संख्या १०८५)
३४०१.
निरोप सांगतां । न धरीं भय न करीं चिंता ॥ १ ॥ असो ज्याचे त्याचे माथां ।
आपण करावी ते कथा ॥ २ ॥ उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥ ३ ॥ तुका
म्हणे वाहे धाक । तया इह ना परलोक ॥ ४ ॥
३४०२. निगमाचें वन । नका
शोधूं करूं शीण ॥ १ ॥ या रे गौळियांचे घरीं । बांधलें तें दावेंवरी ॥ २ ॥
पीडलेती भ्रमें । वाटा नकळतां वर्में ॥ ३ ॥ तुका म्हणे भार । माथां टाका
अहंकार ॥ ४ ॥
३४०३. चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितें दूर
तेचि भलें ॥ १ ॥ ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥ २ ॥ हो
कां पिता पुत्र बंधु कोणी तेही । विजाति संग्रहीं धरूं नये ॥ ३ ॥ तुका
म्हणे सत्य पाळावें वचन । अन्यथा आपण करूं नये ॥ ४ ॥
३४०४. भक्ति तो
कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥ १ ॥ जेथें पाहें तेथें
देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ २ ॥ कामावलें तरि पाका ओज घडे ।
रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥ ३ ॥ तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा
दिस जागृतीचा ॥ ४ ॥
३४०५. सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥ १ ॥
आला डोळ्यांसि कवळ । तेणें मळलें उजळ ॥ २ ॥ अंगाचे भोवंडी । भाेय झाडें
फिरती धोंडी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाड । पाप ठाके हिताआड ॥ ४ ॥
३४०६.
यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥ १ ॥ चोरा धरितां सांगे
कुठाऱ्याचें नांव । दोघांचेहि पाव हात जाती ॥ २ ॥ तुका म्हणे असे पुराणीं
निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३४०७. एक तटस्थ
मानसीं । एक सहजचि आळसी ॥ १ ॥ दोन्ही दिसती सारखीं । वर्म जाणे तो पारखी ॥
२ ॥ एक ध्यानीं करिती जप । एक बैसुनि घेती झोंप ॥ ३ ॥ एका सर्वस्वाचा
त्याग । एका पोटासाठीं जोग ॥ ४ ॥ एका भक्ति पोटासाठीं । एका देवासवें गांठी
॥ ५ ॥ वर्म पोटीं एका । फळें दोन सांगे तुका ॥ ६ ॥
३४०८. चित्त
समाधान । तरी विष वाटे सोनें ॥ १ ॥ बहु खोटा अतिशय । जाणा भले सांगों काय ॥
२ ॥ मनाच्या तळमळें । चंदनेंही अंग पोळे ॥ ३ ॥ तुका म्हणे दुजा । उपचार
पीडा पूजा ॥ ४ ॥
३४०९. भूतीं भगवंत । हा तों जाणतों संकेत ॥ १ ॥
भारी मोकलितो बाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ २ ॥ करावा उपदेश । निवडोनि तरि
दोष ॥ ३ ॥ तुका म्हणे वाटे । चुकतां आडरानें कांटे ॥ ४ ॥
३४१०.
हेंहि ऐसें तेंही तैसें । उभय पिसें अविचार ॥ १ ॥ अभिमानाचे ठेलाठेलीं ।
मधीं झालीं हिंपुटी ॥ २ ॥ धीरा शांती ठाव नुरे । हाचि उरे आबाळ्या ॥ ३ ॥
कौतुक हें पाहे तुका । कढतां लोकां अधणीं ॥ ४ ॥
३४११. निंदावें हें
जग । ऐसा भागा आला भाग ॥ १ ॥ होतें तैसें आलें फळ । गेलें निवडूनि सकळ ॥ २ ॥
दुसऱ्याच्या मता । मिळेनासें झालें चित्ता ॥ ३ ॥ तुका झाला सांडा ।
विटंबिती पोरें रांडा ॥ ४ ॥
३४१२. हित सांगे तेणें दिलें जीवदान ।
घातकी तो जाण मनामागें ॥ १ ॥ बळें हे वारावे अधर्म करितां । अंधळें चालतां
आडरानें ॥ २ ॥ द्रव्य देऊनियां धाडावें तीर्थासी । नेदावें चोरासी चंद्रबळ ॥
३ ॥ तुका म्हणे ऐसें आहे हें पुराणीं । नाहीं माझी वाणी पदरींची ॥ ४ ॥
३४१३.
आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीनें भूषण अधिक पुटा ॥ १ ॥ नाहीं
कोणासवें बोलणें लागत । निश्चिंतीनें चित्त समाधान ॥ २ ॥ लपविलें तेंही
ढेकरें उमटे । खोटियाचें खोटें उर फोडी ॥ ३ ॥ तुका म्हणे निंदा स्तुति
दोन्ही वाव । आपुलाला भाव फळा येतो ॥ ४ ॥
३४१४. अनुभवें आलें अंगा ।
तें या जगां देतसें ॥ १ ॥ नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरींची ॥ २ ॥
उतरूनि दिलें कशी । शुद्धरसीं सरतें ॥ ३ ॥ तुका म्हणे दुसरें नाहीं । ऐसी
ग्वाही गुजरली ॥ ४ ॥
३४१५. क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट
तयाप्रति काय करी ॥ १ ॥ तृण नाहीं तेथें पडिलां दावाग्नि । जाय तो विझोनि
आपसया ॥ २ ॥ तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥ ३ ॥
(धृ. नाही)
३४१६. ज्याची जया आस । तया जवळी त्याचा वास ॥ १ ॥ येर
जवळी तें दुरी । वत्स सांडी धेनु घरीं ॥ २ ॥ गोडी प्रियापाशीं । सुख उपजे
येरासी ॥ ३ ॥ तुका म्हणे वोल । घडे तया ठायीं मोल ॥ ४ ॥
३४१७.
संतसंगतीं न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥ १ ॥ मग तया दोषा नाहीं
परिहार । होय अपहार सुकृताचा ॥ २ ॥ तुका म्हणे नमस्कारावे दुरून । अंतरीं
धरून राहें रूप ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३४१८. एका म्हणतां भलें । आणिका
सहजचि निंदिलें ॥ १ ॥ कांहीं न करितां सायास । सहज घडले ते दोष ॥ २ ॥ बरे
वाईटाचें । नाहीं मज कांहीं साचें ॥ ३ ॥ तुका म्हणे वाणी । खंडोनि राहावें
चिंतनीं ॥ ४ ॥
३४१९. करी आणिकांचा अपमान । खळ छळवादी ब्राह्मण । तया
देतां दान । नरका जाती उभयतां ॥ १ ॥ तैसें झालें दोघांजणां । मागतिया
यजमाना । जाळियलें वना । आपणासहित कांचणी ॥ २ ॥ घडतां दगडाची नाव । मोल
क्लेश गेले वाव । तरता नाहीं ठाव । बुडवी तारूं तरतिया ॥ ३ ॥ चोरा दिधला
साटां । तेणें मारियेल्या वाटा । तुका म्हणे ताठा । हें तव दोघें नाडती ॥ ४
॥
३४२०. सतीचें तें घेतां वाण । बहु कठीण परिणामीं ॥ १ ॥ जिवासाठीं
गौरव वाढे । आहाच जोडे तें नव्हे ॥ २ ॥ जरि होय उघडी दृष्टी । तरिच गोष्टी
युद्धाच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची ॥ ४ ॥
३४२१.
न म्हणे सान थोर । दुष्ट पापी अथवा चोर ॥ १ ॥ सकळा द्यावी एक चवी । तहान
हरूनि निववी ॥ २ ॥ न म्हणे दिवस राती । सर्व काळ सर्वांभूतीं ॥ ३ ॥ तुका
म्हणे झारी । घेता तांब्यानें खापरी ॥ ४ ॥
३४२२. योगाचें तें भाग्य
क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥ १ ॥ अवघीं भाग्यें येतीं घरा । देव सोयरा
झालिया ॥ २ ॥ मिरासीचें म्हूण शेत । नाहीं देत पीक उगें ॥ ३ ॥ तुका म्हणे
उचित जाणा । उगीं शिणा काशाला ॥ ४ ॥
३४२३. द्रव्याचिया मागें
कळिकाळाचा लाग । म्हणोनियां संग खोटा त्याचा ॥ १ ॥ निरयाचें मूळ घालुनियां
मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ २ ॥ आजिच्या प्रसंगें हाचि लाभ
घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥ ३ ॥ प्रारब्ध कांहीं न पालटे सोसें ।
तृष्णेचें हें पिसें वांयांविण ॥ ४ ॥ तुका म्हणे घेईं राहे ऐसें धन । सादर
श्रवण करोनियां ॥ ५ ॥
३४२४. जीवन्मुक्त ज्ञानी जरि झाले पावन ।
त्यजावा दुर्जन संग तिहीं ॥ धृ. ॥ बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघेंचि
तेणें विष होय ॥ २ ॥ तुका म्हणे जेणें आपुले स्वहित । तैसी करा नीत
विचारूनि ॥ ३ ॥
३४२५. विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥ १ ॥
मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसानीं अंतीं ॥ २ ॥ बहु अतिशय खोटा । तर्कें
होती बहु वाटा ॥ ३ ॥ तुका म्हणे भावें । कृपा करिजेते देवें ॥ ४ ॥
३४२६.
चालिले साेबती । काय मानिली निश्चिंती ॥ १ ॥ काय करिसी एकला । काळ सन्निध
पातला ॥ २ ॥ कांहीं सावध तों बरवा । करीं आपुला काढावा ॥ ३ ॥ चालिले अगळे ।
हळूच कान केश डोळे ॥ ४ ॥ वोसरले दांत । दाढा गडबडल्या आंत ॥ ५ ॥ एकली
तळमळे । जिव्हां भलतेचि चावळे ॥ ६ ॥ तुका म्हणे यांनीं । तुझी मांडिली
घालणी ॥ ७ ॥
३४२७. आशा तृष्णा माया अपमानाचें बीज । नासिलिया पूज्य
होईजेतें ॥ १ ॥ अधीरासी नाहीं चालों जातां मान । दुर्लभ दर्शन धीर त्याचें ॥
२ ॥ तुका म्हणे नाहीं आणिकासी बोल । वांयां जाय मोल बुद्धिपाशीं ॥ ३ ॥
३४२८.
शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥ १ ॥ येथें केलें नव्हे काई । लंडीपण
खोटें भाई ॥ २ ॥ करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥ ३ ॥ तुका म्हणे
घडी । साधिलिया एक थोडी ॥ ४ ॥
३४२९. दया तिचें नांव भूतांचें पाळण ।
आणिक निर्दळण कंटकाचें ॥ १ ॥ धर्मनीतीचा हा ऐकावा वेव्हार । निवडिलें सार
असार तें ॥ २ ॥ पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतेंचिं उन्मत्त करी
सदा ॥ ३ ॥ तुका म्हणे धर्म रक्षावयासाठीं । देवासही आटी जन्म घेणें ॥ ४ ॥
३४३०.
मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दुःखे तरी लव धडधडी ॥ १ ॥ न लभे हा काळ न
सुटे हातींचा । न बोलवे वाचा वेडावली ॥ २ ॥ न पवे धांवणें न पवेचि लाग । न
लगेचि माग धरावया ॥ ३ ॥ भेणें तरी अंगा लावियेल्या राखा । तरी त्यासी वाखा
करीतसे ॥ ४ ॥ तुका म्हणे हाका मारूं नेदी देवा । लोकांपाठी हेवा लागलासे ॥
५ ॥
३४३१. नको होऊं देऊं भावीं अभावना । याचि नांवें जाणा बहु दोष ॥
१ ॥ मेघवृष्टि येथें होते अनिवार । जिव्हाळ्या उखर लाभ नाड ॥ २ ॥ उत्तम
विभागे कनिष्ठाची इच्छा । कल्पतरू तैसा फळे त्यासी ॥ ३ ॥ तुका म्हणे जिणें
बहु थाेडे आहे । आपुलिया पाहें पुढें बरें ॥ ४ ॥
३४३२. पूर आला
आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥ १ ॥ बांधूं विठ्ठलसांगडी । पोहोनि जाऊ
पैल । थडी अवघे जन गडी । घाला उडी भाईनो ॥ २ ॥ हें तों नाहीं सर्वकाळ ।
अमुप आनंदाचें जळ ॥ ३ ॥ तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥ ४ ॥
३४३३.
विट नेघे ऐसें रांधा । जेणें बाधा उपजे ना ॥ १ ॥ तरीच तें गोड राहे ।
निरें पाहे स्वयंभ ॥ २ ॥ आणिकां गुणां पोटीं वाव । दावी भाव आपुला ॥ ३ ॥
तुका म्हणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥ ४ ॥
३४३४. पूज्या
एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें ॥ १ ॥ सांगतों ते धर्म नीतीचा
संकेत । सावधान हित व्हावें तरी ॥ २ ॥ संता ठाया ठाव पूजनाची इच्छा ।
जीवनींच वळसा सांपडला ॥ ३ ॥ तुका म्हणे एकाएकीं वरासन । दुजें तेथें भिन्न
अशोभ तें ॥ ४ ॥
३४३५. मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों
सीमा करूनियां ॥ धृ. ॥ परनारीचें जया घडेल गमन । दावी तो वदन जननीरत ॥ २ ॥
उपदेशावरी मन नाहीं हातीं । तो आम्हां पुढती पाहूं नये ॥ ३ ॥ तुका म्हणे
साक्षी असों द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥ ४ ॥
३४३६.
रत्नाच्या ओवणी कांचे ऐशा धरी । आव्हेरूनि दुरी अधिकारें ॥ १ ॥ जातीचा
स्वभाव आला डोळ्यां आड । तया घडे नाड न कळतां ॥ २ ॥ कामधेनु देखे जैशा गाई
म्हैसी । आणिका त्या ऐसी करोनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे काय बोलोनियां फार ।
जयाचा वेव्हार तया साजे ॥ ४ ॥
३४३७. भोग तो न घडे संचितावांचूनि ।
करावें तें मनीं समाधान ॥ १ ॥ म्हणऊनि मनीं मानूं नये खेदू । म्हणावा
गोविंदू वेळोवेळां ॥ २ ॥ आणिकां रुसावें नलगे बहुतां । आपुल्या
संचितावांचूनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे भार घातलियावरी । होईल कैवारी नारायण ॥ ४
॥
३४३८. मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठावा
॥ १ ॥ भाग्यवंत घेती वेचूनियां मोल । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ २ ॥
चंद्रामृतें तृप्ति पारणें चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥ ३ ॥ अधिकारी
येथें घेती हातवटी । परीक्षवंता दृष्टी रत्न जैसें ॥ ४ ॥ तुका म्हणे काय
अंधळिया हातीं । दिलें जैसें मोतीं वांयां जाय ॥ ५ ॥
३४३९. विषम
वाटे दुरवरी । चालूनि परती धरी । मागील ते उरी । उरली नाहीं भयाची ॥ १ ॥
मुख्य न व्हावा तो नाड । शेवटाचें हातीं गोड । सरलिया चाड । मग कैंचे
उद्वेग ॥ २ ॥ होता पहिला अभ्यास । समयीं घालावया कास । तेव्हां लटिके दोष ।
योगें अनुतापाच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे आहे । बुद्धि केलीयानें साहे । जवळीच
पाहें । देव वाट स्मरणाची ॥ ४ ॥
३४४०. वत्स पळे धेनु धांवे पाठी
लागे । प्रीतीचा तो अंगें आविर्भाव ॥ १ ॥ शिकविलें काय येईल कारणा । सूत्र
ओढी मना आणिकाच्या ॥ २ ॥ सांडिलें तें नाहीं घेत मेळवितां । म्हणऊनि लाता
मागें सारी ॥ ३ ॥ तुका म्हणे आग्रह करावा न लगे । सांगतसे हा गे अनुभव ॥ ४ ॥
३४४१.
भांडवी माउली कवतुकें बाळा । आपणा सकळां साक्षित्वेसीं ॥ १ ॥ माझी माझी
म्हणे एकएका मारी । हें तों नाहीं दुरी उभयतां ॥ २ ॥ तुझें थोडें भातें
माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥ ३ ॥ तुका म्हणे एके ठायीं आहे वर्म ।
हेंचि होय श्रम निवारितें ॥ ४ ॥
३४४२. बहुत प्रकार गव्हांचे ।
जिव्हा नाचे आवडी ॥ १ ॥ सरले परि आवडी नवी । सिंधु दावी तरंग ॥ २ ॥ घेतले
घ्यावें वेळोवेळां । माय बाळा न विसंबे ॥ ३ ॥ तुका म्हणे रस वचनीं ।
पडताळूनि तोचि सेवी ॥ ४ ॥
३४४३. शक्ती द्याव्या देवा । नाहा
पार्थिवाची सेवा ॥ १ ॥ मुख्य आहे ऐसा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥ २ ॥ मना
पोटीं देव । जाणा जैसा तैसा भाव ॥ ३ ॥ तुका म्हणे सोसें । लागे लाविल्याचें
पिसें ॥ ४ ॥
३४४४. साधनाचे कष्ट मोठे । भय वाटे थोर हें ॥ १ ॥
मुखें गावें भावें गीत । सर्व हित बैसलिया ॥ २ ॥ दासा नव्हे कर्म दान । तन
मन निश्चळ ॥ ३ ॥ तुका म्हणे आत्मनिष्ठा । भोग चेष्टा मनाची ॥ ४ ॥
३४४५.
करावें चिंतन । तेंचि बरें न भेटून ॥ १ ॥ बरवा अंगीं राहे भाव । तंग तोचि
जाणा देव ॥ २ ॥ दर्शनाची उरी । अवस्थाचि अंग धरी ॥ ३ ॥ तुका म्हणे मन ।
तेथें सकळ कारण ॥ ४ ॥
३४४६. पाहतां ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥ १
॥ नये वाटों गुणदोषीं । मना जतन येविशीं ॥ २ ॥ त्रिविधदेह परिचारा । जनीं
जनार्दन खरा ॥ ३ ॥ तुका म्हणे धीरें । विण कैसें होतें बरें ॥ ४ ॥
३४४७.
परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥ धृ. ॥ थोडाचि
स्फुलिंग बहुत दावाग्नि । वाढतां इंधनीं वाढविला ॥ २ ॥ पितियानें तैसा
वंदावा कुमर । जयाचें अंतर देव वसे ॥ ३ ॥ तुका म्हणे शिरीं वाहावें खापर ।
माजी असे सार नवनीत ॥ ४ ॥
३४४८. सारावीं लिगाडें धरावा सुपंथ ।
जावें उसंतीत हळूहळू ॥ १ ॥ पुढें जातियाचे उमटले माग । भांबावलें जग
आडरानें ॥ २ ॥ वेचल्याचा पाहे वरावरी झाडा । बळाचा निधडा पुढिलिया ॥ ३ ॥
तुका म्हणे जैशी दाखवावी वाणी । ते द्यावी भरोनी शेवट तों ॥ ४ ॥
३४४९.
आदि मध्य अंत दाखविलें दीपें । हा तों आपणापें यत्न बरा ॥ १ ॥ दास्यत्वें
दाविलें धन्याचें भांडार । तों तों नव्हे सार येथुनियां ॥ २ ॥ उपायानें सोस
नासला सकळ । सत्तेसत्ताबळ अंगा आलें ॥ ३ ॥ तुका म्हणे दृष्टी सकळांचें
शिरीं । वचनेंचि करी बैसोनियां ॥ ४ ॥
३४५०. गौरव गौरवापुरतें । फळ
सत्याचे संकल्पें ॥ १ ॥ कठिण योगाहुनी क्षेम । वोकलिया होतो श्रम ॥ २ ॥
पावलें मरे शिवेपाशीं । क्लेश उतरत क्लेशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु आणी ।
कठिण निघालिया रणीं ॥ ४ ॥
३४५१. आपल्याच फुंदें । जेथें तेथें घेती
छंदे ॥ १ ॥ पडिला सत्याचा दुष्काळ । बहु फार झाली घोळ ॥ २ ॥ विश्वासाचे माठ
। त्याचे कपाळीं तें नाट ॥ ३ ॥ तुका म्हणे घाणा । मूढा तीर्थीं प्रदक्षिणा
॥ ४ ॥
३४५२. भोग द्यावे देवा । त्याग भोगींच बरवा ॥ १ ॥ आपण
व्हावें एकीकडे । देव कळेवरी जोडे ॥ २ ॥ योजे यथाकाळें । उत्तम पाला कंद
मुळें ॥ ३ ॥ वंचकासी दोष । तुका म्हणे मिथ्या सोस ॥ ४ ॥
३४५३. देव
होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया ॥ १ ॥ दोहींकडे दोन्ही वाहातील
वाटा । करितील सांठा आपुलाला ॥ २ ॥ दाखविले परी नाहीं वर्जिजेता । आला तोचि
चित्ता भाग वरी ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळ बीजपात्र ॥
४ ॥
३४५४. पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा ॥ १ ॥
सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥ २ ॥ ऐंशी सहस्र
ज्या सुंदरा कामिनी । माजी मुखरणी मंदोदरी ॥ ३ ॥ पुत्रपौत्रांचा लेखा कोण
करी । मुख्य पुत्र हरी इंद्रा आणी ॥ ४ ॥ चौदा चौकडिया आयुष्यगणना ।
बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण ॥ ५ ॥ तुका म्हणे ज्याचे देव बांदवडी । सांगातें
कवडी गेली नाहीं ॥ ६ ॥ (धृ. नाही)
३४५५. आवडी येते गुणें । कळों
चिन्हें उमटती ॥ १ ॥ पोटीचें ओठीं उभें राहे । चित्त साहे मनासी ॥ २ ॥
डोहोळियाची भूक गर्भा । ताटीं प्रभा प्रतिबिंब ॥ ३ ॥ तुका म्हणे मागून
घ्यावें । मना खावें वाटे तें ॥ ४ ॥
३४५६. लांब धांवे पाय चोरी ।
भरोवरी जनाच्या ॥ १ ॥ आतां कैसे होय याचें । शिजतां काचें राहिलें ॥ २ ॥
खाय ओकी वेळोवेळां । कैसी कळा राहेल ॥ ३ ॥ तुका म्हणे भावहीन । त्याचा शीण
पावावा ॥ ४ ॥
३४५७. काय दिस गेले अवघेचि वराडें । तें आलें सांकडें
कथेमाजी ॥ १ ॥ क्षण एके ठायीं मन स्थिर नाहीं । अराणूक कईं होईल पुढें ॥ २ ॥
कथेचा विसर दोषामुळें होय । तरणोपाय कैंचा मग ॥ ३ ॥ काय सांचवुनि उरलें
हें मागें । घटिका एक संगें काय गेली ॥ ४ ॥ तेचि वाणी येथें करा उजळणी ।
काढावीं मथूनि शब्दरत्नें ॥ ५ ॥ तुका म्हणे हेंचि बोलावया चाड । नाम घेतां
गोड हित असे ॥ ६ ॥
३४५८. केला मातीचा पशुपति । परि मातीसी काय महती ।
शिवपूजा शिवासि पावे । माती मातीमाजी सामावे ॥ १ ॥ तैसे पूजिती आम्हां संत
। पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संत पदवी नको आम्हांस ॥ २ ॥
केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु । विष्णुपूजा विष्णुसि
अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपें ॥ ३ ॥ केली कांशाची जगदंबा । परि कांसें
नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणें । कांसें राहे कांसेंपणें ॥ ४ ॥
ब्रह्मानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केली कांजी । ज्याची पूजा तेणेंचि
घेणें । आम्हां पाषाणरूप राहणें ॥ ५ ॥
३४५९. जातिविजातीची व्हावयासि
भेटी । संकल्प तो पोटीं वाहों नये ॥ १ ॥ होणार तें घडो होणाराच्या गुणें ।
होईल नारायणें निर्मिलें तें ॥ २ ॥ व्याघ्राचिये भुके वधावी ते गाय ।
याचें नांव काय पुण्य असे ॥ ३ ॥ तुका म्हणे न करी विचार पुरता । गरज्याची
माता पिता खर ॥ ४ ॥
३४६०. आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशीं ॥ १ ॥
आतां सोडोनि भोजन । भिके जावें वेडेपण ॥ २ ॥ उसंतिली वाट । मागें परतावें
फुकट ॥ ३ ॥ तुका म्हणे वाणी । वेचों बैसोन ठाकणीं ॥ ४ ॥
३४६१.
मुळाचिया मुळें । दुःखें वाढती सकळें ॥ १ ॥ ऐसा योगियांचा धर्म । नव्हें
वाढवावा श्रम ॥ २ ॥ न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥ ३ ॥ तुका म्हणे थीतें ।
दुःख पाववावें चित्तें ॥ ४ ॥
३४६२. एकल्या नव्हे खेळ चांग । धरिला
संग म्हणऊनि ॥ १ ॥ उमटे तेव्हां कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥ २ ॥ दुसऱ्या
परी एक ऐसा । न वजे रिसा निकुरेंही ॥ ३ ॥ तुका म्हणे कळत्यां कळे । येर
खेळे खेळ म्हणो ॥ ४ ॥
३४६३. लोह कफ गार सिद्ध हे सामुग्री । अग्नि
टणत्कारी दिसों येतो ॥ १ ॥ सांगावें तें काई सांगावें तें काई । चित्ता होय
ठायीं अनुभव तो ॥ २ ॥ अन्नें सांगों येतो तृप्तीचा अनुभव । करूनि उपाय
घेऊं हेवा ॥ ३ ॥ तुका म्हणे मिळे जीवनीं जीवन । तेथें कोणा कोण नांव ठेवी ॥
४ ॥
३४६४. निवडोनि वाण काढिले निराळे । प्रमाण डोहळे यावरी ते ॥ १ ॥
जयाचा विभाग तयासीच फळे । देखणें निराळें कौतुकासी ॥ २ ॥ शूर तो ओळखे
घायडायहात । येरां होईल मात सांगायाची ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी केळवते वाणी ।
केला निजस्थानीं जानवसा ॥ ४ ॥
३४६५. एकीं असे एक हेवा । येर अनावडी
जीवां ॥ १ ॥ देवें केल्या भिन्न जाती । उत्तम कनिष्ठ मध्यस्ती ॥ २ ॥
प्रीतीसाठीं भेद । कोणी पूज्य कोणी निंद्य ॥ ३ ॥ तुका म्हणे लळा । त्याचा
जाणे हा कळवळा ॥ ४ ॥
३४६६. अनुभवें वदे वाणी । अंतर ध्यानीं आपुलें ॥
१ ॥ कैंची चिका दुधचवी । जरी दावी पांढरे ॥ २ ॥ जातीऐसा दावी रंग । बहु जग
या नांव ॥ ३ ॥ तुका म्हणे खद्योत तें । ढुंगाभोंवतें आपुलिया ॥ ४ ॥
३४६७.
न सरे भांडार । भरलें वेचितां अपार ॥ १ ॥ मवित्याचें पोट भरें । पुढिलासी
पुढें उरे ॥ २ ॥ कारणापुरता । लाहो आपुलाल्या हिता ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा ।
पुढें केला चाले हेवा ॥ ४ ॥
३४६८. निवडुनि दिलें नवनीत । संचित ते
भोगीते ॥ १ ॥ आतां पुढें भाव सार । जीवना थोर पाहावया ॥ २ ॥ पारखियाचे
पडिलें हातीं । चांचपती आंधळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सेवन घडे । त्यासी जोडे
लाभ हा ॥ ४॥
३४६९. वाखर घेउनि आले । त्यासी तरवारेनें हाले ॥ १ ॥
नव्हे आपुलें उचित । करूनि टाकावे फजित ॥ २ ॥ अंगुळिया मोडी । त्यासी काय
सिलें घोडीं ॥ ३ ॥ नपुंसकासाठीं । तुका म्हणे नलगे जेठी ॥ ४ ॥
३४७०.
शिळें खातां आला वीट । सुने धीट पाय धरी ॥ १ ॥ कान्होबा ते जाणे खूण । उन
उन घास घाली ॥ २ ॥ आपुले ठायींचें घ्यावें । लाड भावें पाळावा ॥ ३ ॥ तुका
म्हणे मी जुनाट सुनें । मोहो तेणें परतला ॥ ४ ॥
३४७१. आम्हां कांहीं
आम्हां कांहीं । आतां नाहीं या बोलें ॥ १ ॥ मोल सांगा मोल सांगा । घेणें
तिहीं गा पुसावें ॥ २ ॥ कैसें घडें कैसें घडें । बडबड तुज मज ॥ ३ ॥
मुद्दलें साठीं मुद्दलें साठीं । लाभ पोटीं त्यामधीं ॥ ४ ॥ तुका म्हणे
साठवूं घरीं । आडल्या काळें पुसती तरी ॥ ५ ॥
३४७२. मोटळें हाटीं
सोडिल्या गांठी । विकऱ्या घातले कण । ज्याचे भाग त्यासी देऊनि निवारिलें ।
सारूनि लिगाड दान । खरें माप हातीं बैसलों । मानिती तेचि चौघे जण । खरें
वित्त तेथें आलें चोजवीत । गिऱ्हाईक संतजन ॥ १ ॥ झाडिला पालव केला हाट वेच ।
झाली सकळींच आराणूक । याल तरी तुम्हीं करा लगबग । आमचे ते कोणी लोक ॥ २ ॥
एक ते उत्तम मध्यम कनिष्ठ । वित्ताचे प्रकार तीन । बहुतां जनांचे बहुत
प्रकार । वेगळाले वाण । लाभ हाणि कोणा मुद्दल झालें । कोणासी पडिलें खाण ।
अर्धमर्ध कोणी गुंतोनि राहिली । थोडे तैसे बहु जन ॥ ३ ॥ एक सांते आले एके
गांवींहून । येकामेचि नव्हे जाणें । येतां जातां रुजू नाहीं दिवाणा ।
काळतोंडीं एकी तेणें । लाग भाग एकी एकानीं गोविली । मागील पुढिलां ऋणें ।
तुका म्हणे आतां पाहूं नये वास । साधावें आपुलें घेणें ॥ ४ ॥
३४७३.
नारायण ऐसा । सेवूं नेणतील रसा ॥ १ ॥ जेणें भवव्याध तुटे । दुःख मागुतें न
भेटे ॥ २ ॥ नलगे कांहीं आटी । बाधा राहों न शके पोटीं ॥ ३ ॥ कैवल्य तें
जोडे । कृपा लवकरी घडे ॥ ४ ॥ जन्ममरण दुःख अटें । जाळें अवघेंचि तुटें ॥ ५ ॥
तुका म्हणे झाला । याचा गुण बहुतांला ॥ ६ ॥
३४७४. मान इच्छी तो
अपमान पावे । अमंगळ सवें अभाग्याची ॥ १ ॥ एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा
पुढें नाश सिद्ध करी ॥ २ ॥ आधीक फळासी कोठें पावों शके । वासनेची भिकेवरी
चाली ॥ ३ ॥ तुका म्हणे राजहंस ढोरा नांवें । काय तया घ्यावें अळंकाराचें ॥ ४
॥
३४७५. करूनि कडविड । जमा घडिली लगड ॥ १ ॥ होतें तेचि झालें । नाम
ठायींचें पडिलें ॥ २ ॥ उतरलें डाईं । उत्तम ते सुलाखताई ॥ ३ ॥ हिंडवितां
देशोदेश । तुका म्हणे नाहीं नाश ॥ ४ ॥
३४७६. एक परि बहिरे बरे । परी
तीं ढोरें ग्यानगंडें ॥ १ ॥ कपाळासी लागली आगी । अभागी कां जीतसे ॥ २ ॥ एक
परि बरें वेडें । तर्की कुडें जळो तें ॥ ३ ॥ तुका म्हणे खातडवासी ।
अमृतासी नोळखे ॥ ४ ॥
३४७७. तरीच हीं केलीं । दानें वाईट चांगलीं ॥ १
॥ एक एका शोभवावें । केलें कवतुक देवें ॥ २ ॥ काय त्याची सत्ता । सूत्र
आणिक चाळिता ॥ ३ ॥ तुका म्हणे धुरें । डोळे भरिले परि खरे ॥ ४ ॥
३४७८.
तीर्थीं धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥ १ ॥ मिळालिया संतसंग ।
समर्पितां भलें अंग ॥ २ ॥ तीर्थीं भाव फळे । येथें अनाड तें वळे ॥ ३ ॥ तुका
म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥ ४ ॥
३४७९. हा रस आनंदाचा । घोष
करा हरिनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥ १ ॥ पुण्य पाहिजे बहुत ।
जन्मांतरींचें संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥ २ ॥ काय पाहातां हे
भाई । हरुषें नाचा धरा घाई । पोटभरी कांहीं । घेतां उरी न ठेवा ॥ ३ ॥ जें
सुख दृष्टी आहे । तेंच अंतरीं जो लाहे । तुका म्हणे काय । कळिकाळ तें
बापुडें ॥ ४ ॥
३४८०. देखण्याच्या तीन जाती । वेठी वार्ता अत्यंतीं ॥
१ ॥ जैसा भाव तैसें फळ । स्वातीतोय एक जळ ॥ २ ॥ पाहे सांगे आणि जेवी ।
अंतर महदंतर तेवीं ॥ ३ ॥ तुका म्हणे हिरा । पारखियां मूढां गारा ॥ ४ ॥
३४८१.
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥ १ ॥ आणिकांची कां लाज नाहीं ।
आळसा जिहीं जिंतिलें ॥ २ ॥ एके सांते सारिखीं वित्तें । हानि हिते वेगळालीं
॥ ३ ॥ तुका म्हणे हित धरा । नोहे पुरा गांवढळ ॥ ४ ॥
३४८२. देती
घेती परज गेली । घर खालीं करोनियां ॥ १ ॥ धांवणियाचे न पडे हातीं । खादली
राती काळोखी ॥ २ ॥ अवघियांचें अवघें नेलें । कांहीं ठेविलें नाहीं मागें ॥ ३
॥ सोंगें संपादुनि दाविला भाव । गेला आधीं माव वरि होती ॥ ४ ॥ घराकडे
पाहूं नयेसेंचि झालें । अमानत केलें दिवाणांत ॥ ५ ॥ आतां तुका कोणा न लगेचि
हातीं । झाली ते निश्चिंती बोलों नये ॥ ६ ॥
३४८३. गोदे काठीं होता
आड । करूनि कोड कवतुकें ॥ १ ॥ देखण्यांनीं एक केलें । आइत्या नेलें
जिवनापें ॥ २ ॥ राखोनियां होतों ठाव । अल्प जीव लावूनि ॥ ३ ॥ तुका म्हणे
फिटे धणी । हे सज्जनीं विश्रांति ॥ ४ ॥
३४८४. काळें खादला हा अवघा
आकार । उत्पत्ति संहार घडमोडी ॥ १ ॥ बीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता
शेवटीं एकाचिया ॥ २ ॥ तुका म्हणे शब्दें व्यापिलें आकाश । गुढार हें तैसें
कळों नये ॥ ३ ॥
३४८५. सत्य त्यागाचि समान । नलगे वेचावें वचन ॥ १ ॥
नारायणा ऐसे दास । येरयेरांचीच आस ॥ २ ॥ मळ नाहीं चित्ता । तेथें देवाचीच
सत्ता ॥ ३ ॥ तुका म्हणे जाण । तेंच भल्याचें वचन ॥ ४ ॥
३४८६.
आनंदाचा थारा । सुखें मोहरला झरा ॥ १ ॥ ऐसी प्रभुची ज्या कळा । त्याच्या
कोण पाहे बळा ॥ २ ॥ अंकिता ऐसिया । होईल पावविलें ठाया ॥ ३ ॥ तुका म्हणे
ऐसें । दिलें आभंड प्रकाशें ॥ ४ ॥
३४८७. आवडीचे भेटी निवे । चित्त
पावे विश्रांती ॥ १ ॥ बरवियाचा छंद मना । नारायणा अवीट ॥ २ ॥ तुळणें कांहीं
साम्या पुरे । हें तों नुरे ये रुचि ॥ ३ ॥ तुका म्हणे बरवें झालें ।
फावलें हें कळे त्या ॥ ४ ॥
३४८८. ज्याचे माथां जो जो भार । तोचि फार
तयासी ॥ १ ॥ मागें पुढें अवघें रितें । कळों येतें अनुभवें ॥ २ ॥ परिसा
अंगीं अमुप सोनें । पोटीं हीन धातुचें ॥ ३ ॥ आपुला तो करी धर्म । जाणे वर्म
तुका तें ॥ ४ ॥
३४८९. साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जीं वचनें
बोलियेले ॥ १ ॥ साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेदें नीत सांगितली ॥ २
॥ तुका म्हणे घेती साच साच भावें । लटिकें वर्म ठावें नाहीं त्यांसी ॥ ३ ॥
(धृ. नाही)
३४९०. ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढा नारायण
स्मरवितो ॥ १ ॥ भवव्याधि येणें तुटेल रोकडा । करूनियां झाडा निश्चयेसी ॥ २ ॥
आणिकां उपायां अनुपान कठिण । भोगे बरें शीण शीघ्रवत ॥ ३ ॥ तुका म्हणे केला
उघडा पसारा । भाग्य आलें घरा दारावरी ॥ ४ ॥
३४९१. जग अमंगळ । लागे
देखतां विटाळ ॥ १ ॥ धर्म भूतांची ते दया । संत कारण ऐसीया ॥ २ ॥ नव्हे
माझें मत । साक्षी करूनि सांगे संत ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवें । दावी उमटूनि
अनुभवें ॥ ४ ॥
३४९२. करितां तडातोडी । वत्स माते सोई ओढी ॥ १ ॥
करित्याचा आग्रह उरे । एक एकासाठीं झुरे ॥ २ ॥ भुके इच्छी अन्न । तेंही
त्यासाठीं निर्माण ॥ ३ ॥ तुका म्हणे जाती । एक एकाचिये चित्तीं ॥ ४ ॥
३४९३.
दिली मान तरी नेघावी शत्रुसी । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥ १ ॥ समर्थांसी
असे विचाराची आण । भलीं पाप पुण्य विचारावें ॥ २ ॥ काकुळतीसाठीं सत्याचा
विसर । पडिले अंतर न पाहिजे ॥ ३ ॥ तुका म्हणे यश कीर्ति आणि मान । करितां
जतन देव जोडे ॥ ४ ॥
३४९४. वाईटानें भलें । हीनें दाविलें चांगलें ॥ १
॥ एकाविण एका । कैंचें मोल होतें फुका ॥ २ ॥ विषें दाविलें अमृत । कडू गोड
घातें हित ॥ ३ ॥ काळिमेनें ज्योती । दिवसें कळों आली राती ॥ ४ ॥ उंच नीच
गारा । हिरा परिस मोहरा ॥ ५ ॥ तुका म्हणे भले । ऐसे नष्टांनीं कळलें ॥ ६ ॥
३४९५.
आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥ १ ॥ आहे तें अधीन आपुले
हातीं । आणिकां ठेविती काय बोल ॥ २ ॥ जाणतियां पाठीं लागला उपाध । नेणता तो
सिद्ध भोजनासी ॥ ३ ॥ तुका म्हणे भय बांधलें गांठीं । चोर लागे पाठी दुम
तया ॥ ४ ॥
३४९६. केलें पाप जेणें दिलें अनुमोदन । दोघांसि पतन
सारिखेंचि ॥ १ ॥ विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥
२ ॥ देखिलें ओढाळ निघालिया शेता । टाळावें निमित्ता थैक म्हूण ॥ ३ ॥ तुका
म्हणे जोडे केल्याविण कर्म । देखतां तो श्रम न मानितां ॥ ४ ॥
३४९७.
पतनासि नेती । तिचा खोटा स्नेह प्रीति ॥ १ ॥ विधिपुरतें कारण । बहू वारावें
वचन ॥ २ ॥ सर्वस्वासी नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥ ३ ॥ तुका म्हणे दुरीं ।
राखतां हे तेचि बरी ॥ ४ ॥
३४९८. मागील ते आटी येणें घडे सांग ।
सुतविलें अंग एका सूत्रे ॥ १ ॥ पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरतें । तेथूनि आरते
उपचार ते ॥ २ ॥ आवश्यक तेथें आगळा आदर । चाली थोडे फार संपादते ॥ ३ ॥ तुका
म्हणे ऋण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हातां आल्या ॥ ४ ॥
३४९९.
संचितांवांचून । पंथ न चलवे कारण ॥ १ ॥ कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ
घोटी ॥ २ ॥ धनवित्तें जोडे । देव ऐसें तों न घडे ॥ ३ ॥ तुका म्हणे आड ।
स्वहितासी बहु नाड ॥ ४ ॥
३५००. आडवा तो उभा । असे दाटोनिया प्रभा ॥
१ ॥ देव नाहीं एकविध । एक भाव असे शुद्ध ॥ २ ॥ भेदाभेद आटी । नाहीं फार
कोठें तुटी ॥ ३ ॥ तुका म्हणे गोवा । उगवा वेव्हाराचा हेवा ॥ ४ ॥
३५०१.
अवघ्या वाटा झाल्या क्षीण । कळी न घडे साधन । उचित विधी विधान । न कळे न
घडे सर्वथा ॥ १ ॥ भक्तिपंथ बहु सोपा । पुण्य नांगवे या पापा । येणें जाणें
खेपा । येणेंचि एके खंडती ॥ २ ॥ उभारोनि बाहे । विठो पालवीत आहे । दासां
मीचि साहे । मुखें बोले आपुल्या ॥ ३ ॥ भाविक विश्वासी । पार उतरिलें त्यासी
। तुका म्हणे नासी । कुतर्क्याचे कपाळीं ॥ ४ ॥
३५०२. करितां होय
होय चित्तची नाहीं । घटापटा कांहीं करूं नये ॥ १ ॥ मग हालतचि नाहीं जवळून ।
करावा तो शीण शीणवितो ॥ २ ॥ साहतचि नाहीं कांहीं पाकुळलें । उगल्या उगलें
ढळत आहे ॥ ३ ॥ तुका म्हणे तरी बोलावे झांकून । येथें खुणें खुण पुरतेंचि ॥ ४
॥
३५०३. मथनें भोगे सार । ताकें घडे उपकार ॥ १ ॥ बरवी सायासाची
जोडी । अनुभविया ठावी गोडी ॥ २ ॥ पाक आणि रुचि । जेथें तेथें ते कइंची ॥ ३ ॥
वाढितो पंगती । तुका आवडी संगती ॥ ४ ॥
३५०४. जग तरि आम्हां देव ।
परि हे निंदितों स्वभाव ॥ १ ॥ येतो हिताचा कळवळा । पडती हातीं म्हणुनी काळा
॥ २ ॥ नाहीं कोणी सखा । आम्हां निपराध पारिखा ॥ ३ ॥ उपक्रमें वदे । तुका
वर्मासी तें भेदे ॥ ४ ॥
३५०५. ऐकतों दाट । आले एकाचे बोभाट ॥ १ ॥
नका विश्वासों यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥ २ ॥ हेचि यांची जोडी । सदां
बोडकीं उघडीं ॥ ३ ॥ तुका म्हणे न्यावें । ज्याचें त्यासी नाहीं ठावें ॥ ४ ॥
३५०६.
चंदन तो चंदनपणें । सहज गुणें संपन्न ॥ १ ॥ वेधलिया धन्य जाती । भाग्यें
होती सन्मुख ॥ २ ॥ परिसा अंगीं परिसपण । बाणोनि तें राहिलें ॥ ३ ॥ तुका
म्हणे कैंची खंती । सुजाती ते टाकणी ॥ ४ ॥
३५०७. सोसें वाढे दोष ।
झाला न पालटे कस ॥ १ ॥ ऐसें बरवें वचन । करिता तो नारायण ॥ २ ॥ असे
प्रारब्ध नेमें । श्रमचि उरे श्रमें ॥ ३ ॥ सुख देते शांती । तुका म्हणे
धरितां चित्तीं ॥ ४ ॥
३५०८. वैरागरापाशीं रत्नाचिया खाणी । हेचि
घ्यावी धणी फावेल तों ॥ १ ॥ येथें नाहीं तर्कवितर्काची चाड । होतसे निवाड
खऱ्याखोट्या ॥ २ ॥ उगाच सारावा वाढिला तो ठाव । वाढितिया भाव कळतसे ॥ ३ ॥
तुका म्हणे नव्हे टांचणीचें पाणी । येथें झरवणी जैशा तैसें ॥ ४ ॥
३५०९.
कौलें भरियेली पेंठ । निग्रहाचें खोटे तंट ॥ १ ॥ ऐसें माता जाणे वर्म ।
बाळा वाढवितां धर्म ॥ २ ॥ कामवितां लोहो कसे । तांतडीनें काम नासे ॥ ३ ॥
तुका म्हणे खडे । देतां अक्षर तें जोडे ॥ ४ ॥
३५१०. नाहीं कोणी दिस
जात वांयांविण । साध्य नाहीं शीण लटिकाची ॥ १ ॥ एकाचिये माथां असावें
निमित्त । नसों नाहीं हित कपाळीं तें ॥ २ ॥ कांहीं एक तरी बोलायाचा जागा ।
नेदिती वाउगा उभा ठाकों ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्म कळों येतें कांहीं । ओळखी जे
ठायीं होईल ते ॥ ४ ॥
३५११. चहूं आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे
कर्म ॥ १ ॥ तैसी नव्हे भोळी सेवा । एक भावचि कारण देवा ॥ २ ॥ तपें
इंद्रियां आघात । क्षण एक वाताहात ॥ ३ ॥ मंत्र चळे थोडा । तरि धडचि होय
वेडा ॥ ४ ॥ व्रत करितां सांग । तरी एक चुकतां भंग ॥ ५ ॥ धर्मधर्मा सत्वचि
कारण । नाहीं तरी केला सीण ॥ ६ ॥ भूतदयेसि आघात । उंचनीच पाहे चित्त ॥ ७ ॥
तुका म्हणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥ ८ ॥
३५१२. ज्याची खरी सेवा
। त्याच्या भय काय जीवा ॥ १ ॥ करितां स्वामीसवे वाद । अधिक अधिक आनंद ॥ २ ॥
असावा तो धर्म । मग साहों जातें वर्म ॥ ३ ॥ वदे वाग्देवी । तुका विठ्ठलीं
गौरवी ॥ ४ ॥
३५१३. करावें गोमटें । बाळा माते तें उमटें ॥ १ ॥
आपुलिया जीवाहुनी । असे वाल्हें तें जननी ॥ २ ॥ वियोग तो तिस । त्याच्या
उपचारें विष ॥ ३ ॥ तुका म्हणे पाय । डोळा सुखावे त्या न्यायें ॥ ४ ॥
३५१४.
अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझे त्यास तेंचि द्यावें ॥ १ ॥ मुंगीवरी
भार गजाचें पालाण । घालितां ते कोण कार्यसिद्धि ॥ २ ॥ तुका म्हणे फांसे
वाघुरा कुऱ्हाडी । प्रसंगी ते काढी पारधी तो ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३५१५.
आम्हांपाशीं सरे एक शुद्ध भाव । चतुराई जाणीव नलगे कळा ॥ १ ॥ सर्व जाण
माझा स्वामी पांडुरंग । तया अंगसंग गोपाळासी ॥ २ ॥ तुका म्हणे कर्में
धर्में नये हातां । तयावरी सत्ता भाविकांची ॥ ३ ॥
३५१६. नव्हों
वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी ॥ १ ॥ कुपथ्य
करूनि विटंबावे रोगी । काय हे सलगी भीड त्यांची ॥ २ ॥ तुका म्हणे लासूं
फासूं देऊं डाव । सुखाचा उपाव पुढें आहे ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३५१७.
ज्यानें ज्यानें जैसें ध्यावें । तैसें व्हावें कृपाळें ॥ १ ॥
सगुणनिर्गुणांचा ठाव । विटे पाव धरियेले ॥ २ ॥ अवघें साकरेचें अंग । नये
व्यंग निवडितां ॥ ३ ॥ तुका म्हणे जें जें करी । तें तें हरी भोगिता ॥ ४ ॥
३५१८.
अभिमानाची स्वामिनी शांति । महत्त्व येती सकळ ॥ १ ॥ कळोनिही न कळे वर्म ।
तरि श्रम पावती ॥ २ ॥ सर्व सत्ता धरितां धीर । वीर्यां वीर आगळा ॥ ३ ॥ तुका
म्हणे तिखट तिखें । मृद सखे आवडी ॥ ४ ॥
३५१९. गंगा न देखे विटाळ ।
तेंचि रांजणी ही जळ ॥ १ ॥ अल्प महदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ २ ॥
काय खंडिली भूमिका । वर्णा पायरी कां लोकां ॥ ३ ॥ तुका म्हणे आगीविण । बीज
वेगळें तों भिन्न ॥ ४ ॥
३५२०. गंधर्वनगरीं क्षण एक न राहावें ।
तेंचि करावें मूळक्षेत्र ॥ १ ॥ खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा ।
लक्ष्मीनारायणा तोषवावें ॥ २ ॥ वंध्यापुत्राच्या लग्नाचा सोहळा । आपुलियां
डोळां पाहा वेगीं ॥ ३ ॥ मृगजळीं पोहे घालूनि सज्ञाना । तापलिया जना
तोषवावें ॥ ४ ॥ तुका म्हणे मिथ्या देहेंद्रियकर्म । ब्रह्मार्पण ब्रह्म होय
बापा ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३५२१. पोटीं जन्मती रोग । तरि कां म्हणावें
आप्तवर्ग ॥ १ ॥ रानीं वसती औषधी । तरि कां म्हणाव्या निपराधी ॥ २ ॥ तैसें
शरीराचें नातें । तुका म्हणे सर्व आप्तें ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३५२२.
ज्याचे गांवीं केला वास । त्यासी नसावें उदास ॥ १ ॥ तरीच जोडिलें तें भोगे ।
कांहीं आघात नलगे ॥ २ ॥ वाढवावी थोरी । मुखें म्हणे तुझे हरी ॥ ३ ॥ तुका
म्हणे हे गोमटी । दासा न घालावी तुटी ॥ ४ ॥
३५२३. नव्हती माझे बोल ।
अवघें करितो विठ्ठल ॥ १ ॥ कांहीं न धरावी खंती । हित होईल धरा चित्तीं ॥ २
॥ खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥ ३ ॥ ज्याचें तोचि जाणे । मी
मापाडें तुका म्हणे ॥ ४ ॥
३५२४. जैसें तैसें राहे देवाचें हें देणें
। यत्न करितां तेणें काय नव्हे ॥ १ ॥ दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा ।
अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥ २ ॥ मागों नेणे परी माय जाणें वर्म । बाळा
नेदी श्रम पावों कांहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मज अनुभव अंगें । वचन वाउगें
मानेना हें ॥ ४ ॥
३५२५. अवगुणांचे हातीं । आहे अवघीच फजिती ॥ १ ॥
नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ २ ॥ विष तांब्या वाटी ।
भरली लाऊं नये होटीं ॥ ३ ॥ तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥ ४ ॥
३५२६.
वळितें जें गाई । त्यासी फार लागे काई ॥ १ ॥ निवे भावाचे उत्तरीं । भलते
एके धणी वरी ॥ २ ॥ न लगती प्रकार । कांहीं मानाचा आदर ॥ ३ ॥ सांडी थोरपणा ।
तुका म्हणे सवे दीना ॥ ४ ॥
३५२७. भाव देवाचें उचित । भाव तोचि
भगवंत ॥ १ ॥ धन्य धन्य शुद्ध जाती । संदेह कैंचा तेथें चित्तीं ॥ २ ॥ बहुत
बराडी । देवावरी ते आवडी ॥ ३ ॥ तुका म्हणे हे रोकडे । लाभ अधिकारी चोखडे ॥ ४
॥
३५२८. नये जरी कांहीं । तरी भलतेंचि वाहीं ॥ १ ॥ म्हणविल्या दास ।
कोणी न धरी वेठीस ॥ २ ॥ समर्थाच्या नांवें । भलतैसें विकावें ॥ ३ ॥ तुका
म्हणे सत्ता । वरी असे त्या बहुतां ॥ ४ ॥
३५२९. पाठीं पोटीं देव ।
कैंचा हरिदासां भेव ॥ १ ॥ करा आनंदें कीर्तन । नका आशंकित मन ॥ २ ॥ एथें
कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥ ३ ॥ तुका म्हणे धनी । सपुरता काय वाणी ॥ ४
॥
३५३०. लागलिया मुख स्तना । घाली पान्हा माउली ॥ १ ॥ उभयतां आवडी
लाड । कोडें कोड पुरतसे ॥ २ ॥ मेळवितां अंगें अंग । प्रेमरंग वाढतो ॥ ३ ॥
तुका म्हणे जड भारी । अवघें शिरीं जननीचे ॥ ४ ॥
३५३१. चिंतिलें तें
मनिंचें जाणे । पुरवी खुणे अंतरींचें ॥ १ ॥ रात्री न कळे दिवस न कळे ।
अंगीं खेळे दैवत हें ॥ २ ॥ नवसियाचे पुरवी नवस । भोगी त्यासी भिन्न नाहीं ॥
३ ॥ तुका म्हणे समचि देणें । समचरणीं उभा असे ॥ ४ ॥
३५३२. गंगेचिया
अंतेविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥ १ ॥ विठ्ठल हे मूर्ति
साजिरी सुंदर । घालूं निरंतर हृदयपुटीं ॥ २ ॥ कारण तें असे नवनीतापाशीं ।
गबाळ तें सोसी येर कोण ॥ ३ ॥ बाळाचे सोईतें घांस घाली माता । अट्टाहास
चिंता नाहीं तया ॥ ४ ॥ गाऊं नाचूं करूं आनंदसोहळा । भावचि वेगळा नाहीं आतां
॥ ५ ॥ तुका म्हणे अवघें झालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥ ६ ॥
३५३३.
गावे म्हणउनि गीत । धरूनि राहे तैसें चित्त ॥ १ ॥ हेंचि थोर अवघड आहे ।
अन्न देखोनि भूक राहे ॥ २ ॥ ऐकावी म्हूण कथा । राहे तैसें धरूनि चित्ता ॥ ३
॥ तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावांचूनि ॥ ४ ॥
३५३४. चालावा पंथ
तो पाविजे त्या ठाया । ऐकिलिया वांयां वारता त्या ॥ १ ॥ ऐका जी वोजे पडतसें
पायां । भावाचि ते जाया वाट नव्हे ॥ २ ॥ व्याली कुमारीचा अनुभवें अनुभव ।
सांगतां तो भाव येत नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें पाहिजे आरालें । बिंबीं
निवळलें तरि भासे ॥ ४ ॥
३५३५. जन देव तरि पायाचि पडावें । त्याचिया
स्वभावें चाड नाहीं ॥ १ ॥ अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवी बांधोन नेतां
नये ॥ २ ॥ तुका म्हणे विंचू सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥ ३ ॥
(धृ. नाही)
३५३६. देव होसी जरी आणीकांतें करिसी । संदेह येविशीं
करणें न लगे ॥ १ ॥ दुष्ट होसी तरी आणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न
लगे ॥ २ ॥ तुका म्हणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणलें निश्चयेसीं ॥ ३
॥ (धृ. नाही )
३५३७. आर्तभूतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शक्ति ॥
१ ॥ फळ आणि समाधान । तेथें उत्तम कारण ॥ २ ॥ अल्पें तो संतोषी । स्थळीं
सांपडे उद्देशीं ॥ ३ ॥ सहज संगम । तुका म्हणे तो उत्तम ॥ ४ ॥
३५३८.
कोठें नाहीं अधिकार । गेले नर वांयां ते ॥ १ ॥ ऐका हें सोपें वर्म । नलगे
श्रम चिंतना ॥ २ ॥ मृत्याचिये अंगीं छाये । उपायचि खुंटता ॥ ३ ॥ तुका म्हणे
अवघे जन । येथें मन असों द्या ॥ ४ ॥
३५३९. गोड नांवें क्षीर । परी
साकरेचा धीर ॥ १ ॥ तैसें जाणा ब्रह्मज्ञान । बापुडें तें भक्तीविण ॥ २ ॥
रुची नेदी अन्न । ज्यांत नसतां लवण ॥ ३ ॥ अंधळ्याचे श्रम । शिकविल्याचेंचि
नाम ॥ ४ ॥ तुका म्हणे तारा । नांव तंबुऱ्याच्या सारा ॥ ५ ॥
३५४०.
उगविल्या गुंती । ऐशा मागें नेणों किती ॥ १ ॥ ख्याती केली अजामेळें । होतें
निघालें दिवाळें ॥ २ ॥ मोकलिला प्रायश्चित्तीं । कोणी न धरिती हातीं ॥ ३ ॥
तुका म्हणे मुक्त वाट । वैकुंठीची घडघडाट ॥ ४ ॥
३५४१. सुखें न मनी
अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण ॥ १ ॥ हें कां ठायींचें न कळे । राती करा
झांकुनी डोळे ॥ २ ॥ चालोनियां आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥ ३ ॥ तुका
म्हणे कोणा । बोल ठेवितो शहाणा ॥ ४ ॥
३५४२. उपेक्षिला येणें कोणी
शरणागत । ऐसी नाहीं मात आईकिली ॥ १ ॥ आतां काय ब्रीद सांडील आपुलें ।
ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ २ ॥ माझ्या दोषासाठी होईल पाठमोरा । ऐसा कोण
पुरा भोग बळी ॥ ३ ॥ तुका म्हणे रूप आमुच्या कैवारें । धरिलें गोजिरें
चतुर्भुज ॥ ४ ॥
३५४३. तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥ १ ॥ जेणें
खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥ २ ॥ दाविल्या सारिखें । मागें
नसावें पारिखें ॥ ३ ॥ मागें पुढें ऋण । तुका म्हणे फिटे हीण ॥ ४ ॥
३५४४.
जीवें व्हावें साटी । पडे संवसारें तुटी ॥ १ ॥ ऐशीं बोलीलों वचनें । सवें
घेऊनि नारायण ॥ २ ॥ येणें नाहीं जाणें । केलें कोणा न मागणें ॥ ३ ॥ नाहीं
जन्मा आलों । करील ऐसें नेदी बोलों ॥ ४ ॥ ठाव पुसी शेणें । तुका म्हणे
खुंटो येणें ॥ ५ ॥
३५४५. राहिलों निराळा । पाहों कवतुक डोळां ॥ १ ॥
करूं जगाचा विनोद । डोळां पाहोनियां छंद ॥ २ ॥ भुललिया संसारें । आलें
डोळ्यासी माजिरें ॥ ३ ॥ तुका म्हणे माथा । कोणी नुचली सर्वथा ॥ ४ ॥
३५४६.
क्षोभ आणि कृपा मातेचि समान । विभाग जतन करूनि ठेवी ॥ १ ॥ क्षणभंगुर ते
उपजली चिंता । खरी अखंडिता आवडीची ॥ २ ॥ शिकवूं जाणे ते गोमटियासाठीं ।
लोभें नाहीं तुटी निश्चयेंसी ॥ ३ ॥ अवघेंचि मिथ्या समया आरतें । देतां तें
उचितें काय जाणे ॥ ४ ॥ न करी अव्हेर गांजूं नेदी कोणा । भेडसावी तान्हा हाऊ
आला ॥ ५ ॥ तुका म्हणे करी जिवासी जतन । दचकुनि मन जवळी आणी ॥ ६ ॥
३५४७.
प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥ धृ. ॥
कासवीचें बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाहीं भेटी अंगसंगें ॥ २ ॥ पोटामध्यें
कोणें सांगितलें सर्पां । उपजत लपा म्हणऊनि ॥ ३ ॥ बोलों नेणें परी जाणे
गोड क्षार । अंतरी विचार त्यासी ठावा ॥ ४ ॥ तुका म्हणे बरें विचारावें मनीं
। आणिक भल्यांनीं पुसों नये ॥ ५ ॥
३५४८. काळाच सारिखीं वाहाती
नक्षत्रें । करितां दुसरें फळ नाहीं ॥ १ ॥ ऐसें करत्यानें ठेविलें करून ।
भरिलें भरून माप नेमें ॥ २ ॥ शीतउष्णकाळीं मेघा वरुषाव । वरुषतां वाव होय
शीण ॥ ३ ॥ तुका म्हणे विष अमृताचे किडे । पालट न घडे जिणें तया ॥ ४ ॥
३५४९.
कोरडिया ऐशा काय सारूं गोष्टी । करूं उठाउठीं हित आधीं ॥ १ ॥ खोळंबला राहे
आपुला मारग । पहावी ते मग तुटी कोठें ॥ २ ॥ लौकिकाचा आड येईल पसारा । मग
येरझारा दुःख देती ॥ ३ ॥ तुका म्हणे डांकलागे अळंकारें । मग नव्हे खरे
पुटेविण ॥ ४ ॥
३५५०. देवाच्या निरोपें पिटितों डांगोरा । लाजे नका
थारा देऊं कोणी ॥ धृ.॥ मोडिले रांडेनें सुपंथ मारग । चालविलें जग यमपंथें ॥
२ ॥ परिचारी केली आपुलीच रूढी । पोटींची ती कुडी ठावी नाहीं ॥ ३ ॥ तुका
म्हणे आणा राउळा धरून । फजित करून सोडूं मग ॥ ४ ॥
३५५१. लागपाठ केला
। आतां वांटा नीट त्याला ॥ १ ॥ करा जोडीचा हव्यास। आलें दुरील घरास ॥ २ ॥
फोडिलीं भांडारें । मोहोरलीं एकसरें ॥ ३ ॥ अवघियांपुरतें । तुका म्हणे
घ्यावें हातें ॥ ४ ॥
३५५२. आग्रहा नांवें पाप । योगीं सारावें
संकल्प ॥ १ ॥ सहज ऐसें भांडवल । असोनि कां सारा बोल ॥ २ ॥ तैं न भेटे तें
काय । मना अंगींचे उपाय ॥ ३ ॥ तुका म्हणे धरीं सोय । वासनेची फोडा डोय ॥ ४ ॥
३५५३.
ढेंकणाचें संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला साधु तैसा ॥ १ ॥ ओढाळाच्या
संगें सात्त्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ २ ॥ डांकाचे संगती
सोनें हीन झालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी ॥ ३ ॥ विषानें पक्वान्ने गोड
कडू झालीं । कुसंगानें केली तैसी परी ॥ ४ ॥ भावें तुका म्हणे सत्संग हा बरा
। कुसंग हा फेरा चौऱ्यांशीचा ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३५५४. देहबुद्धि वसे
जयाचिये अंगीं । पूज्यता ते जगीं सुख मानी ॥ १ ॥ थोर असे दगा झाला त्यासी
हाटीं । सोडोनियां गांठी चोरीं नेली ॥ २ ॥ गांठीचें जाऊनि नव्हे तो मोकळा ।
बांधविला गळा दंभलोभें ॥ ३ ॥ पुढिल्या उदिमा झालेंसें खंडण । दिसे नागवण
पडे गांठी ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसे बोलतील संत । जाणूनियां घात कोण करी ॥ ५ ॥
३५५५.
फटकाळ तो देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चाळविलें ॥ १ ॥ फटकाळ तो
देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥ २ ॥ तुका म्हणे अवघें फटकाळ
हें जिणें । अनुभवी ये खुणे जाणतील ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३५५६. निवडे
जेवण शेवटींच्या घांसें । होय त्याच्या ऐसें सकळही ॥ १ ॥ न पाहिजे झाला
बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वांयां ॥ २ ॥ संपादिलें व्हावें धरिलें तें
सोंग । विटंबना व्यंग पडिलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्म नेणतां जो रांधी ।
पाववी ते बुद्धि अवकळा ॥ ४ ॥
३५५७. यासी कोणी म्हणे निंदेचीं
उत्तरें । नागवला खरें तोचि एक ॥ १ ॥ आडवाटें जातां लावी नीट सोई ।
धर्मनीति तेही ऐसी आहे ॥ २ ॥ नाइकतां सुखें करावें ताडण । पाप नाहीं पुण्य
असे फार ॥ ३ ॥ जन्म व्याधि फार चुकतील दुःखें । खंडावा हा सुखें मान त्याचा
॥ ४ ॥ तुका म्हणे निंब दीधल्यावांचून । अंतरींचा शीण कैसा जाय ॥ ५ ॥
३५५८.
हित नाहीं ठावें जननीजनका । दाविला लौकिकाचार तिहीं ॥ धृ. ॥ अंधळ्याचे
काठीं लागले अंधळे । घात एके वेळे पुढें मागें ॥ २ ॥ न धरावी चाली करावा
विचार । वरील आहार गळी लावी ॥ ३ ॥ तुका म्हणे केला निवाड रोकडा । राऊत हा
घोडा हातोहातीं ॥ ४ ॥
३५५९. कैसा हो तो कृपावंत । बहु संत सांगती ॥ १
॥ पुसणें नाहीं याती कुळ । लागों वेळ नेदावी ॥ २ ॥ ऐसी काय जाणों किती ।
उतरती उतरलीं ॥ ३ ॥ दावी वैकुंठीच्या वाटा । पाहतां मोठा संपन्न ॥ ४ ॥
अभिमान तो नाहीं अंगीं । भक्तालागीं न बैसे ॥ ५ ॥ आलें घ्यावें भलत्या
काळें । विठ्ठल बळें आगळा ॥ ६ ॥ तुका म्हणे आळस निद्रा । नाहीं थारा ते
ठायीं ॥ ७ ॥
३५६०. मायबाप सवें नये धनवित्त । करावें संचित भोगावें
तें ॥ १ ॥ म्हणऊनि लाभ काय तो विचारीं । नको चालीवरी चित्त ठेवूं ॥ २ ॥
आयुष्य शेवटीं सांडूनि जाणार । नव्हेचि साचार शरीर हें ॥ ३ ॥ तुका म्हणे
काळें लावियेलें माप । जमा धरी पापपुण्याचीही ॥ ४ ॥
३५६१. आतां
हेंचि सार हेंचि सार । मूळबीज रे आइका ॥ १ ॥ आवडीनें आवडी उरे । जें ज्या
झुरे तें त्यासी ॥ २ ॥ प्रेमाचिया सूत्रदोरी । नाहीं उरी उरवी ॥ ३ ॥ तुका
म्हणे चिंतन बरें । आहे खरें खऱ्यापें ॥ ४ ॥
३५६२. मुख्य आधीं
विषयत्याग । विधि भाग पाळणें ॥ १ ॥ मन पावें समाधान । हेंचि दान देवाचें ॥ २
॥ उदासीन वृत्तीं देहीं । चाड नाहीं पाळणें ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं भय ।
सम सोय विषमाची ॥ ४ ॥
३५६३. काय करूं सांगतांही न कळे तें वर्म ।
उपस्थित भ्रम उपजवितो ॥ १ ॥ मन आधीं ज्याचें आलें होईल हातां । तयावरी
सत्ता केली चाले ॥ २ ॥ अभुकेचे अंगीं चवी ना संवाद । मिथ्या ऐसा वाद
दुराग्रह ॥ ३ ॥ तुका म्हणे आप राखावें आपणा । संकोचोचि कोणा नये आतां ॥ ४ ॥
३५६४.
उभा ऐल थडी । तेणें घालूं नये उडी ॥ १ ॥ पुढें गेल्याचे उपाय । करावे ते
केले काय ॥ २ ॥ दिसतें आहारीं । नये जाऊं ऐशावरी ॥ ३ ॥ आळसाची धाडी । तुका
म्हणे बहु नाडी ॥ ४ ॥
३५६५. शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें
मूळ ॥ १ ॥ ऐसा वारावा तो श्रम । अतिशयीं नाहीं काम ॥ २ ॥ सांभाळावें वर्म ।
उचिताच्या काळें धर्म ॥ ३ ॥ तुका म्हणे कळे । ऐसें कारणाचे वेळे ॥ ४ ॥
३५६६.
आवडीची सलगी पूजा । विषम दुजा भाव तो ॥ १ ॥ ऐसीं उफराटीं वर्में । कळों
भ्रमें न येती ॥ २ ॥ नलगे समाधाना मोल । रुचती बोल प्रीतीचे ॥ ३ ॥ तुका
म्हणे एका जीवें । सूत्र व्हावें गुंतलें ॥ ४ ॥
३५६७. भूक पोटापुरती
। तृष्णा भरवी वाखती । करवी फजिती । हांवें भार वाढला ॥ १ ॥ कुळिकेसी लांस
फांस । डोई दाढी बोडवी दोष । अविहित नाश । करवी वचन चुकतां ॥ २ ॥
विधिसेवनें विहितें । कार्य कारणापुरतें । न बाटे जो चित्तें । अधर्माचा तो
त्यागी ॥ ३ ॥ आज्ञा पाळणें ते सेवा । भय धरोनियां जीवा । तुका म्हणे ठेवा ।
ठेविला तो जतन ॥ ४ ॥
३५६८. भांडणचि झालें । मग जीवाचें काय आलें ॥ १
॥ येऊं नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥ २ ॥ करितां सरोबरी । कांहीं न
ठेवावी उरी ॥ ३ ॥ तुका म्हणे शूर । व्हावें धुरेसींच धूर ॥ ४ ॥
३५६९.
पाडावी ते बरी । गांठी धुरेसवें खरी ॥ १ ॥ नये मरों लंडीपणें । काय
बापुडें तें जिणें ॥ २ ॥ लुटावें भांडार । तरी जया नाहीं पार ॥ ३ ॥ तुका
म्हणे नांवें । कीर्ति आगळीनें ज्यावें ॥ ४ ॥
३५७०. अहंकार तो नासा
भेद । जगीं निंद्य ओवळा ॥ १ ॥ नातळे तो धन्य यासी । झाला वंशीं दीपक ॥ २ ॥
करवितो आत्महत्या । नेदी आप्ता आतळों ॥ ३ ॥ तुका म्हणे गुरुगुरी । माथां
थोरी धरोनि ॥ ४ ॥
३५७१. तीर्थाचिया असे पंथें तो निदैव । पाविजेतो
ठाव अंतराय ॥ १ ॥ म्हणऊनि भलें निश्चळचि स्थळीं । मनाचिये मुळीं बैसोनिया ॥
२ ॥ संकल्पारूढ तें पराधीन जिणें । कार्यचि कारणें वाढतसे ॥ ३ ॥ तुका
म्हणे कामा नाहीं एक मुख । जिरवितां सुख होत पोटीं ॥ ४ ॥
३५७२. आपणा
लागे काम वाण्याघरीं गूळ । त्याचें यातिकुळ काय कीजे ॥ १ ॥ उकरड्यावरी
वाढली तुळसी । टाकावी ते कैसी ठायागुणें ॥ २ ॥ गाईचा जो भक्ष अमंगळ खाय ।
तिचें दूध काय सेवूं नये ॥ ३ ॥ तुका म्हणे काय सालपटासी काज । फणसांतील बीज
काढुन घ्यावें ॥ ४ ॥ (धृ. नाही)
३५७३. आम्हा देणें धरा सांगतों तें
कानीं । चिंता पाय मनीं विठोबाचें ॥ १ ॥ तेणें माझें चित्ता होय समाधान ।
विलास मिष्टान्न नलगे सोनें ॥ २ ॥ व्रत एकादशी द्वारीं वृंदावन । कंठीं
ल्या रे लेणें तुळसीमाळा ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याचे घरींची उष्टावळी । मज ते
दिवाळी दसरा सण ॥ ४ ॥
३५७४. स्तुति अथवा निंदा करावी देवाची । अधम
तो वेचि व्यर्थ वाणी ॥ १ ॥ आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका
जाती ॥ २ ॥ इहलोकीं थुंका उडे तोंडावरी । करणें अघोरीं वास लागे ॥ ३ ॥ तुका
म्हणे माप वाचेऐसें निकें । भरलें नरकें निंदेसाठीं ॥ ४ ॥
३५७५.
मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाईं विव्हळत ॥ १ ॥ काय खर न धरी शुद्धी ।
गेली बुद्धी भ्रमलें ॥ २ ॥ अहंकारा उरलें काई । पांचांठायीं हें वाटे ॥ ३ ॥
तुका म्हणे कुंथें भारें । लटिकें खरें मानुनियां ॥ ४ ॥
३५७६. नका
दंतकथा येथें सांगों कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥ १ ॥ अनुभव येथें
पाहिजे साचार । न चलती चार आम्हांपुढें ॥ २ ॥ वरी कोण मानी रसाळ बोलणें ।
नाहीं झाली मनें वोळखी तों ॥ ३ ॥ निवडी वेगळें क्षीर आणि पाणी । राजहंस
दोन्ही वेगळालीं ॥ ४ ॥ तुका म्हणे येथें पाहिजे जातीचें । येर गाबाळाचें
काय काम ॥ ५ ॥
३५७७. पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥ १ ॥ पुरोनि
उरे खातां देतां । नव्हे खंडन मवितां ॥ २ ॥ खोलीं पडे ओलीं बीज । तरीच
हातीं लागे निज ॥ ३ ॥ तुका म्हणे धणी । विठ्ठल अक्षरें या तिन्ही ॥ ४ ॥
३५७८.
हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें ॥ १ ॥ नव्हे विनोदउत्तर । केले
रंजवाया चार ॥ २ ॥ केली अटाअटी । अक्षरांची देवासाठीं ॥ ३ ॥ तुका म्हणे
खिजों । नका जागा येथें निजों ॥ ४ ॥
३५७९. मांस चर्म हाड । देवा
अवघींच गोड ॥ १ ॥ जे जे हरिरंगी रंगले । कांहीं न वचे वांयां गेले ॥ २ ॥
वेद खाय शंखासुर । त्याचें वागवी कलेवर ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा । बराडी या
भक्तिरसा ॥ ४ ॥
३५८०. अग्नि हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें
तोचि तापें जाऊनियां ॥ १ ॥ उदक म्हणे काय या हो मज प्यावें । तृषित तो
धांवे सेवावया ॥ २ ॥ काय वस्त्र म्हणे या हो मज नेसा । आपुले स्वइच्छा जग
वेढी ॥ ३ ॥ तुकया स्वामी म्हणे काय मज स्मरा । आपुल्या उद्धारा लागूनियां ॥
४ ॥ (धृ. नाही)
३५८१. घ्या रे लुटी प्रेमसुख । फेडा आजि धणी ।
चुकला तो मुकला । झाली वेरझारें हाणी ॥ १ ॥ घाला घातला वैकुंठीं । करूनियां
जीवें साटी । पुरविली पाठी । वैष्णवीं काळाची ॥ २ ॥ अवघें आणिलें अंबर ।
विठोसहित तेथें धुर । भेदूनि जिव्हार । नामबाणीं धरियेला ॥ ३ ॥ संचित
प्रारब्ध क्रियमाण । अवघीं झालीं गहन । केलीं पापपुण्यें । देशधडी बापुडीं ॥
४ ॥ आनंदें गर्जती निर्भर । घोष करिती निरंतर । कांपती असुर । वीर कवणा
नागवती ॥ ५ ॥ जें दुर्लभ ब्रह्मादिकां । आजि सांपडलें फुका । घ्या रे म्हणे
तुका । सावचित्त होऊनि ॥ ६ ॥
३५८२. मढें झांकुनियां करिती पेरणी ।
कुणबियाची वाणी लवलाहें ॥ १ ॥ तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें
नरदेह ॥ २ ॥ ओटीच्या परिस मुठीचें तें वाढें । यापरी कैवाडें स्वहिताचें ॥ ३
॥ नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥ ४ ॥ तुका म्हणे
पाहें आपुली सूचना । करी तो शाहाणा मृत्युलोकीं ॥ ५ ॥
३५८३. दीप न
देखे अंधारा । आतां हेंचि जतन करा ॥ १ ॥ नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥ २
॥ चिंतामणीपाशीं चिंता । तत्त्वता ही न येल ॥ ३ ॥ तुका म्हणे उभयलोकीं ।
हेचि निकी सामग्री ॥ ४ ॥
३५८४. काळ सारावा चिंतनें । एकांतवासी
गंगास्नानें । देवाचे पूजनें । प्रदक्षणा तुळशीच्या ॥ १ ॥ युक्त आहार विहार
। नेम इंद्रियांसी सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥ २ ॥ परमार्थ
महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥ ३ ॥ देह
समर्पिजे देवा । भार कांहींच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥ ४ ॥
३५८५.
प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही । एकही निदानीं नव्हे त्यासी ॥ धृ. ॥ दोहीं
पेंवांवरी ठेऊं जातां हात । होय अपघात शरीराचा ॥ २ ॥ तुका म्हणे तया
दोहींकडे धक्का । शेवटीं तो नरकामाजी पडे ॥ ३ ॥
३५८६. लटिका तो
प्रपंच एक हरिनाम साच । हरिविण आहाच सर्व इंद्रियें ॥ १ ॥ लटिकें तें मौन
भ्रमाचें स्वप्न । हरिविण ध्यान नश्वर आहे ॥ २ ॥ लटिकिया वित्पत्ति हरिविण
करिती । हरि नाहीं चित्तीं तो शव जाणा ॥ ३ ॥ तुका म्हणे हरि हे धरिसी
निर्धारीं । तरी तूं झडकरी जासी वैकुंठासी ॥ ४ ॥ (धृ. नाही)
३५८७.
ब्रह्मचारी धर्म घोकावीं अक्षरें । आश्रमीं विचार षट्कर्मीं ॥ १ ॥
वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥ २ ॥ परमहंस
तरी जाणे सहज वर्म । तेथें याति धर्म कुळ नाहीं ॥ ३ ॥ बोले वर्म जो चाले
याविरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥ ४ ॥ तुका म्हणे कांहीं नाहीं
नेमाविण । मोकळा तो शीण दुःख पावे ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३५८८.
द्रव्याचिया कोटी । नये गांडीची लंगोटी ॥ १ ॥ अंतीं बोळवणेसाठीं । पांडुरंग
धरा कंठीं ॥ २ ॥ लोभाचीं लोभिकें । यांचें सन्निधान फिकें ॥ ३ ॥ तुका
म्हणे हितें । जग नहो पडो रितें ॥ ४ ॥
३५८९. भवसिंधूचें काय कोडें ।
दावी वाट चाले पुढें ॥ १ ॥ तारूं भला पांडुरंग । पाय भिजों नेदी अंग ॥ २ ॥
मागें उतरिले बहुत । पैल तिरीं साधुसंत ॥ ३ ॥ तुका म्हणे लागवेगें । जाऊं
तयाचिया मागें ॥ ४ ॥
३५९०. जैसें चित्त जयावरी । तैसें जवळी तें
दुरी ॥ १ ॥ नलगे द्यावा परिहार । या कोरडें उत्तर । असे अभ्यंतर । साक्षभूत
जवळी ॥ २ ॥ अवघें जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणेपरी ॥ ३ ॥ तुका म्हणे
बुद्धि । ज्याची तया तेच सिद्धि ॥ ४ ॥
३५९१. असत्य वचन होतां सर्व
जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥ १ ॥ जाईल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे
कांहीं सांगतों ते ॥ २ ॥ वदविलें मुखें नारायणें धर्मा । अंगुष्ठ त्या
कर्मासाठीं गेला ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां सांभाळा रे पुढें । अंतरींचें कुडें
देईल दुःख ॥ ४ ॥ (धृ. नाही)
३५९२. परस्त्रीतें म्हणतां माता ।
चित्त लाजवितें चित्ता ॥ १ ॥ काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ २
॥ धर्मधारिष्ट गोष्टी सांगे । उष्ट्या हातें नुडवी काग ॥ ३ ॥ जें जें कर्म
वसें अंगीं । तें तें आठवें प्रसंगीं ॥ ४ ॥ बोले तैसा चाले । तुका म्हणे
तो अमोल ॥ ५ ॥
३५९३. देवासाठीं जाणा तयासीच आटी । असेल ज्या गांठीं
पुण्यराशी ॥ धृ. ॥ निर्बळा पाठवी बळें वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध
पुण्य ॥ २ ॥ कथे निद्राभंग करावा भोजनीं । तया सुखा धणी पार नाहीं ॥ ३ ॥
यागीं ऋण घ्यावें द्यावें सुख लाहीं । बुडतां चिंता नाहीं उभयतां ॥ ४ ॥
तुका म्हणे वर्म जाणोनि करावें । एक न घालावें एकावरी ॥ ५ ॥
३५९४.
तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरिगुण वारूं नये ॥ १ ॥ कोटिकुळें त्याची
वाटुली पहाती । त्या तया घडती प्राणहत्या ॥ २ ॥ आपुलिया पापें न सुटे
सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥ ३ ॥ व्हावें साह्य तया न घालावें भय ।
फुकासाठीं पाहें लाभ घात ॥ ४ ॥ तुका म्हणे हित माना या वचना । सुख दुःख
जाणा साधे फुका ॥ ५ ॥
३५९५. कृपेचीं उत्तरें देवाचा प्रसाद । आनंदें
आनंद वाढवावा ॥ १ ॥ बहुतांच्या भाग्यें लागलें जहाज । येथें आतां काज
लवलाहो ॥ २ ॥ अलभ्य तें आलें दारावरी फुका । येथें आतां चुका न पाहिजे ॥ ३ ॥
तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्या द्वारें । माप भरा बरें शिगेवरी ॥ ४ ॥
३५९६.
चिंतनासी नलगे वेळ । सर्वकाळ करावें ॥ १ ॥ सदा वाचे नारायण । तें वदन मंगळ
॥ २ ॥ पढिये सर्वोत्तमा भाव । येर वाव पसारा ॥ ३ ॥ ऐसें उपदेशी तुका ।
अवघ्या लोकां सकळां ॥ ४ ॥
३५९७. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म ।
निर्धार हें वर्म चुकों नये ॥ १ ॥ निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों
नये वास आणिकाची ॥ २ ॥ तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा
कोणीं ॥ ३ ॥
३५९८. नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण
सर्व भोगीं ॥ १ ॥ मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न
मुंडाविया ॥ २ ॥ नको गुंफों भोगीं नको पडों त्यागीं । लावूनि सरे अंगीं
देवाचिया ॥ ३ ॥ तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥
४ ॥
३५९९. किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोवाठीं ॥ १
॥ लक्ष चौऱ्यांशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ २ ॥ उपजल्या
पिंडा मरण सांगातें । मरतें उपजतें सवेंचि तें ॥ ३ ॥ तुका म्हणे माळ गुंतली
राहाटीं । गाडग्याची सुटी फुटलिया ॥ ४ ॥
३६००. देव कैंचा तया दुरी ।
भाकी बरी करुणा ॥ १ ॥ आळवित्या नलगे घर । माय जाणे रे भातुकें ॥ २ ॥
नावेवरी ज्याचा भार । पैल पार जवळी त्या ॥ ३ ॥ आतां परदेशी तुका । झाला
लोकां वेगळा ॥ ४ ॥
३६०१. बीज पेरी सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥ १ ॥
वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ २ ॥ पाल्याची जतन । तरी
प्रत्यया येती कण ॥ ३ ॥ तुका म्हणे आळा । उदक देतां लाभे फळा ॥ ४ ॥
३६०२.
सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥ १ ॥
आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं ढळों नये ॥ २ ॥ समय सांभाळुनी
आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तयापरी ॥ ३ ॥ तुका म्हणे तरी म्हणवावें
सेवक । खादलें तें हाक अन्न होय ॥ ४ ॥
३६०३. घालीं भार देवा । नलगे
देश डोई घ्यावा ॥ १ ॥ देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे शीण ॥ २ ॥
व्यवसाय निमित्त । फळ देतसे संचित ॥ ३ ॥ तुका म्हणे फिरे । भोवंडीनें दम
जिरे ॥ ४ ॥
३६०४. भाग्यवंत म्हणों तयां । शरण गेले पंढरीराया ॥ १ ॥
तरले तरती हा भरंवसा । नामधारकाचा ठसा ॥ २ ॥ भुक्तिमुक्तीचें तें स्थळ ।
भोळेभाविकां निर्मळ ॥ ३ ॥ गाइलें पुराणीं । तुका म्हणे वेदवाणी ॥ ४ ॥
३६०५.
नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनीं कुडी बुद्धि ॥ १ ॥ ऐसें मागा अरे जना ।
नारायणा विनवूनि ॥ २ ॥ कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥ ३ ॥ तुका
म्हणे नाना छंदें । या विनोदें न पडावें ॥ ४ ॥
३६०६. सत्यकर्म आचरें
रे । बापा सत्यकर्म आचरें रे । सत्यकर्म आचरें होईल हित । वाढेल दुःख
असत्याचें ॥ धृ. ॥ ऊस वाढवितां वाढली गोडी । गूळ साकर हे त्याची परवडी ॥ १ ॥
साकरेच्या आळां लाविला कांदा । स्थूळ साना परी वाढे दुर्गंधा ॥ २ ॥ सत्य
असत्य हें ऐसिया परी । तुका म्हणे याचा विचार करीं ॥ ३ ॥
३६०७. पर
उपकारें कायावाचामन । वेची सुदर्शन रक्षी तया ॥ १ ॥ याजसाठीं असें योजिलें
श्रीपति । संकल्पाचे हातीं सर्व जोडी ॥ २ ॥ परपीडे ज्याची जिव्हा मुडताळे ।
यमदूत टाळे करिती पूजा ॥ ३ ॥ तुका म्हणे अंबऋषी दुर्योधना । काय झालें
नेणां दुर्वासया ॥ ४ ॥
३६०८. पंडित वाचक जरी झाला पुरता । तरी
कृष्णकथा ऐके भावें । क्षीर तुपा साकरे झालिया भेटी । तैसी पडे मिठी
गोडपणें ॥ १ ॥ जाणोनियां लाभ घेईं हा पदरीं । गोड गोडावरी सेवीं बापा ।
जाणिवेचें मूळ उपडोनी खोड । जरी तुज चाड आहे तुझी ॥ २ ॥ नाना
परिमळद्रव्यउपचार । अंगीं उटी सार चंदनाची । जेविलियाविण शून्य ते शृंगार ।
तैसी गोडी हरिकथेविण ॥ ३ ॥ ज्याकारणें वेदश्रुति हीं पुराणें । तेंचि
विठ्ठलनाणें तिष्ठे कथे । तुका म्हणे येर दगडाचीं पेवें । खळखळींचें अवघें
मूळ तेथें ॥ ४ ॥
३६०९. ऐका पंडितजन । तुमचे वंदितों चरण ॥ १ ॥ नका
करूं नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥ २ ॥ अन्न आच्छादन । हें तों
प्रारब्धा अधीन ॥ ३ ॥ तुका म्हणे वाणी । सुखें वेचा नारायणीं ॥ ४ ॥
३६१०.
भागल्याचें तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥ १ ॥ ऐसी
ही कृपाळू अनाथांची वेशी । सुखाचीच राशी पांडुरंग ॥ २ ॥ सकळां सन्मुख
कृपेचिया दृष्टी । पाहें बहु भेटी उतावीळ ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें आतां उरे
कैंचा । अनंतां जन्मींचा शीणभाग ॥ ४ ॥
३६११. घ्या रे भाई घ्या रे
भाई । कोणी कांहीं थोडें बहु ॥ १ ॥ येच हाटीं येच हाटीं । बांधा गांठी
पारखून ॥ २ ॥ वेच आहे वेच आहे । सरलें पाहें मग कोठें ॥ ३ ॥ उघडें दुकान
उघडें दुकान । रात्री झाली कोण सोडी मग ॥ ४ ॥ तुका म्हणे अंतकाळीं । जाती
टाळीं बैसोनी ॥ ५ ॥
३६१२. नका वाटूं मन विधिनिषेधासी । स्मरावा
मानसीं पांडुरंग ॥ १ ॥ खादलिया अन्ना माशी बोळों नये । अवघेंचि जाय एका
घांसें ॥ २ ॥ जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥ ३ ॥
तुका म्हणे येथें न मना विषाद । निंबेविण व्याध तुटों नये ॥ ४ ॥
३६१३.
मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥ १ ॥ सर्व सुख लागे
घेऊनियां पाठीं । आवडीचा कंठीं रस ओती ॥ २ ॥ पीतांबर छाया करी लोभापर ।
पाहे तें उत्तर आवडीचें ॥ ३ ॥ तुका म्हणे हेंचि करावें जीवन । वाचे नारायण
ताहान भूक ॥ ४ ॥
३६१४. मेघवृष्टीनें करावा उपदेश । परी गुरूनें न
करावा शिष्य । वाटां लाभे त्यास । केल्या अर्धकर्माचा ॥ १ ॥ द्रव्य वेचावें
अन्नछत्रीं । भूतीं द्यावें सर्वत्र । न घ्यावा हा पुत्र । उत्तम याती
पोसणा ॥ २ ॥ बीज न पेरावें खडकीं। ओल नाहीं ज्याचे बुडखीं । थीतां ठके
शेखीं । पाठी लागे दिवाण ॥ ३ ॥ गुज बोलावें संतांसीं । पत्नी राखावी जैसी
दासी । लाड देतां तयेसी । वांटा पावे कर्माचा ॥ ४ ॥ शुद्ध कसूनि पाहावें ।
वरिला रंगा न भुलावें । तुका म्हणे घ्यावें । जया नये तुटी तें ॥ ५ ॥ (धृ.
नाही)
३६१५. बहुतां पुरे ऐसा वाण । आलें धन घरासी ॥ १ ॥ घ्या रे
फुका मोलेंविण । नारायण न भुला ॥ २ ॥ ऐका निवळल्या मनें । बरव्या कानें
सादर ॥ ३ ॥ तुका म्हणे करूनि अंतीं । निश्चिंती हे ठेवावी ॥ ४ ॥
३६१६.
चालिलें न वाटे । गाऊनियां जातां वाटे ॥ १ ॥ बरवा वैष्णवांचा संग । येतो
सामोरा श्रीरंग ॥ २ ॥ नाहीं भय आड । कांहीं विषमाचें जड ॥ ३ ॥ तुका म्हणे
भक्ति । सुखरूप आंदी अंतीं ॥ ४ ॥
३६१७. देह तंव असे भोगाचे अधीन ।
याचें सुख शीण क्षणभंगुर ॥ १ ॥ अविनाश जोडी देवापायीं भाव । कल्याणाचा ठाव
सकळही ॥ २ ॥ क्षणभंगुर हा येथील पसारा । आलिया आकारा अवघें नासे ॥ ३ ॥ तुका
म्हणे येथें सकळ विश्रांति । आठवावा चित्तीं नारायण ॥ ४ ॥
३६१८.
सरलें आतां नाहीं । न म्हणे वेळकाळ कांहीं ॥ १ ॥ विठ्ठल कृपाळु माउली । सदा
प्रेमें पान्हायेली ॥ २ ॥ शीण न विचारी भाग । नव्हे निष्ठुर नाहीं राग ॥ ३
॥ भेदाभेद नाहीं । तुका म्हणे तिच्याठायीं ॥ ४ ॥
३६१९. जतन करा रे
जतन करां । घालूं पाहे घरावरी घाला चोरटें ॥ धृ. ॥ अवघेचि निजों नका अवघिये
ठायीं । वेळ अवेळ तरी सांभाळावी कांहीं ॥ २ ॥ सींतरिली फार खाती भोंवताले
फेरे । गेलें नये हाता शेखीं तळमळ उरे ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हीं करूं आपुलें
जतन । नलगे कांहीं कोणां द्यावें उघडारे कान ॥ ४ ॥
३६२०. कथनी पठणी
करूनि काय । वांचुनि रहणी वांयां जाय ॥ धृ. ॥ मुखीं वाणी अमृतगोडी ।
मिथ्या भुकें चरफडी ॥ २ ॥ पिळणीं पाक करितां दगडा । काय जडा होय तें ॥ ३ ॥
मधु मेळवूनि माशी । आणिकां सासी पारधिया ॥ ४ ॥ मेळवूनि धन मेळवी माती ।
लोभ्या हातीं तेंचि मुखीं ॥ ५ ॥ आपुलें केलें आपण खाय । तुका वंदी त्याचे
पाय ॥ ६ ॥
३६२१. मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचें कारण । मोक्ष
अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥ धृ. ॥ मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना
पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ २ ॥ मन गुरु आणि
शिष्य । करी आपुलेंची दास्य । प्रसन्न आपआपणांस । गति अथवा अधोगति ॥ ३ ॥
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आन दैवत । तुका
म्हणे दुसरें ॥ ४ ॥
३६२२. होऊं नको कांहीं या मना आधीन । नाइकें वचन
याचें कांहीं ॥ १ ॥ हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोई ही धरावी विठोबाची ॥
२ ॥ आपुलें आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरी जीवा घातक हें ॥ ३ ॥ तुका
म्हणे झाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥ ४ ॥
३६२३. हालवूनि
खुंट । आधीं करावा बळकट ॥ १ ॥ मग तयाच्या आधारें । करणें तें अवघें बरें ॥ २
॥ सुखदुःख साहे । हर्षामर्षीं भंगा नये ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवें । आधीं
मरोनि राहावें ॥ ४ ॥
३६२४. जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर ॥
१ ॥ येर काय तीं बापुडीं । कीर अहंकाराची घोडीं ॥ २ ॥ पण ऐशा नांवें । देव
धरिजेतो भावें ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्यावें । सत्कीर्तीनें बरवें ॥ ४ ॥
३६२५.
थोर ते गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥ १ ॥ व्यर्थ भरोवरी
केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ २ ॥ घोडें काय थोडें वागवितें
ओझें । भावेंविण तैसें पाठांतर ॥ ३ ॥ तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव । जरी
पंढरीराव पाहिजे तो ॥ ४ ॥
३६२६. निर्वैर व्हावें सर्वभूतांसवें ।
साधन बरवें हेंचि एक ॥ १ ॥ तरीच अंगीकार करील नारायण । बडबड तो शीण
येणेंविण ॥ २ ॥ सोईरें पिशुन समानचि घडे । चित्त पर ओढे उपकारी ॥ ३ ॥ तुका
म्हणे चित्त झालिया निर्मळ । तरिच सकळ केलें होय ॥ ४ ॥
३६२७. तरिच
जन्मा यावें । दास विठोबाचें व्हावें ॥ १ ॥ नाहीं तरि काय थोडीं ।
श्वानशूकरें बापुडीं ॥ २ ॥ ज्याल्याचें तें फळ । अंगीं लागों नेदी मळ ॥ ३ ॥
तुका म्हणे भले । ज्याच्या नांवें मानवलें ॥ ४ ॥
३६२८. आलियां
भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ॥ १ ॥ मग तो कृपासिंधु निवारी
सांकडें । येर तें बापुडें काय रंक ॥ २ ॥ भयाचिये पोटीं दुःखाचिया रासी ।
शरण देवासी जातां भले ॥ ३ ॥ तुका म्हणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो
आतां विश्वंभर ॥ ४ ॥
३६२९. भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त
॥ १ ॥ तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥ २ ॥ आणिकांचें कानीं । गुण
दोष मना नाणीं ॥ ३ ॥ मस्तक ठेंगणा । करीं संतांच्या चरणा ॥ ४ ॥ वेचीं तें
वचन । जेणें राहें समाधान ॥ ५ ॥ तुका म्हणे फार । थोडा तरी परउपकार ॥ ६ ॥
३६३०.
सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भक्तिभावें ॥ १ ॥ पाहुनियां
झाडें ओरबडुनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावें ॥ २ ॥ वेचूनियां चिंध्या
भरोनियां धागा । गुंडाळोनि ढुंगा आळवावें ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसें मांडिल्या
निर्वाण । तया नारायण उपेक्षिना ॥ ४ ॥ (धृ. नाही)
३६३१. शांतीपरतें
नाहीं सुख । येर अवघेंचि दुःख ॥ १ ॥ म्हणऊनि शांती धरा । उतराल पैल तीरा ॥ २
॥ खवळलिया कामक्रोधीं । अंगीं भरती आधिव्याधी ॥ ३ ॥ तुका म्हणे त्रिविध
ताप । मग जाती आपेंआप ॥ ४ ॥
३६३२. विटाळ तो परद्रव्य परनारी ।
येथुनि जो दुरी सोंवळा तो ॥ १ ॥ गद्य पद्य कांहीं न धरावी उपाधी ।
स्वाधीनचि बुद्धि करूनि ठेवा ॥ २ ॥ विचाराचें कांहीं करा रे स्वहित ।
पापपुण्यातीत भांडवल ॥ ३ ॥ तुका म्हणे न लगे जावें वनांतरा । विश्व
विश्वंभरा सारिखेंचि ॥ ४ ॥
३६३३. साधनें तरी हींच दोन्ही । जरी कोणी
साधील ॥ १ ॥ परद्रव्य परनारी । याचा धरी विटाळ ॥ २ ॥ देव भाग्य घरा येती ।
संपत्ती त्या सकळा ॥ ३ ॥ तुका म्हणे तें शरीर । घर भांडार देवाचें ॥ ४ ॥
३६३४.
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवे ॥ १ ॥ नाहीं तयाविण
भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ २ ॥ देवापाशीं मागें आवडीची
भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥ ३ ॥ तुका म्हणे मना सांगतों विचार ।
धरावा निर्धार दिसेंदिस ॥ ४ ॥
३६३५. सवंग झालें सवंग झालें । घरा
आलें बंदरींचें ॥ १ ॥ आतां हेवा करूं सोस । भक्तिरस बहु गोड ॥ २ ॥ पाउल
वेचे चिंता नाहीं । आड कांहीं मग नये ॥ ३ ॥ तुका म्हणे संचिताचें । नेणें
काचें राहे तें ॥ ४ ॥
३६३६. कृष्ण ध्यातां चित्तीं कृष्ण गातां
गीतीं । तेही कृष्ण होती कृष्णध्यानें ॥ १ ॥ आसनीं शयनीं भोजनीं जेवितां ।
म्हणा रे भोगितां नारायण ॥ २ ॥ ओविये दळणीं गावा नारायण । कांडितां कांडण
करितां काम ॥ ३ ॥ नर नारी याति हो कोणी भलतीं । भावें एका प्रती नारायण ॥ ४
॥ तुका म्हणे एका भावें भजा हरि । कांति ते दुसरी रूप एक ॥ ५ ॥
३६३७.
पोटापुरतें काम । परि अगत्य तो राम ॥ १ ॥ कारण तें हेंचि करीं । चित्तीं
पांडुरंग धरीं ॥ २ ॥ प्रारब्धीं हेवा । जोडी देवाची ते सेवा ॥ ३ ॥ तुका
म्हणे बळ । बुद्धि वेंचुनि सकळ ॥ ४ ॥
३६३८. कोणाशीं विचार करावा
शेवटीं । एवढ्या लाभें तुटी झाल्या तरें ॥ १ ॥ सांभाळितो शूर आला घावडाव ।
पुढें दिला पाव न करी मागें ॥ २ ॥ घात तो या नांवें येथें अंतराय ।
अंतरल्या पाय गोविंदाचे ॥ ३ ॥ तुका म्हणे गडसंदीचा हा ठाव । केला तो उपाव
कार्या येतो ॥ ४ ॥
३६३९. संवसारसांते आले हो आईका । तुटीचें तें नका
केणें भरूं ॥ १ ॥ लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साह्य येथें ॥
२ ॥ शृंगारिलें दिसे न कळे अंतर । गोविला पदर उगवेना ॥ ३ ॥ तुका म्हणे
खोटें गुंफता विसारें । हातिंचिया खरें हातीं घ्यावें ॥ ४ ॥
३६४०.
येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमार्गीं ॥ १ ॥ चंचळ
चित्तासी ठेवुनियां ठाईं । संताचिये पायीं लीन व्हावें ॥ २ ॥ भावाच्या पैं
हातें धरावा निश्चय । तेणें भवभय । देशधडी ॥ ३ ॥ नामापरतें जगीं साधन सोपें
नाहीं । आवडीनें गाई सर्वकाळ ॥ ४ ॥ तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा । ऐशा
निश्चयाचा मेरू झाला ॥ ५ ॥
३६४१. क्षणक्षणा हाचि करावा विचार ।
तरावया पार भवसिंधु ॥ १ ॥ नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥
२ ॥ संतसमागमीं धरूनि आवडी । करावी तांतडी परमार्थी ॥ ३ ॥ तुका म्हणे
इहलोकींच्या वेव्हारें । नये डोळे धुरें भरूनि राहों ॥ ४ ॥
३६४२.
सावधान ऐसें काय तें विचारा । आले हो संसारा सकळही ॥ १ ॥ अंतसमयाचा करणें
विचार । वेचती सादर घटिका पळें ॥ २ ॥ मंगळ हें नोहे कन्यापुत्रादिक ।
राहिला लौकिक अंतरपाट ॥ ३ ॥ तुका म्हणे देव अंतरला दुरी । डोळिया अंधारी
पडलीसे ॥ ४ ॥
३६४३. सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वताएवढें ॥ १ ॥
धरीं धरीं आठवण । मानीं संतांचें वचन ॥ २ ॥ नेलें रात्रीनें तें अर्ध ।
बाळपण जराव्याध ॥ ३ ॥ तुका म्हणे पुढा । घाणा जूंतीजसी मूढा ॥ ४ ॥
३६४४.
सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांयां हांवभरी होऊं नका ॥ १ ॥
दुःखबांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥ २ ॥ चौदा कल्पेंवरी
आयुष्य जयाला । परी तो राहिला ताटीखालीं ॥ ३ ॥ तुका म्हणे वेगीं जाय
सुटोनियां । धरूनि हृदयामाजी हरि ॥ ४ ॥
३६४५. चळलें तें काय न करी
बडबड । न म्हणे फिकें गोड भुकेलें तें ॥ १ ॥ उमजल्याविण न धरी सांभाळ । असो
खळखळ जनाची हे ॥ २ ॥ गरज्या न कळे आपुलिया चाडा । करावी ते पीडा कोणा काई ॥
३ ॥ तुका म्हणे भोग भोगितील भोगें । संचित तें जोगें नाहीं कोणा ॥ ४ ॥
(धृ. नाही)
३६४६. संसारा आलियां एक सुख आहे । आठवावे पाय विठोबाचे ॥ १
॥ येणें होय सर्व संसार सुखाचा । नलगे दुःखाचा लेश कांहीं ॥ २ ॥ घेतील
तयांसी सोपें आहे सुख । बोलियेलें मुखें नारायण ॥ ३ ॥ सांगितली सोय
करुणासागरें । तुम्हां कां हो बरें न वाटें तें ॥ ४ ॥ तुका म्हणे तेणें
उपकार केला । भोळ्याभाविकांला तरायासी ॥ ५ ॥
३६४७. मथनीचें नवनीत ।
सर्व हितकारक ॥ १ ॥ दंडवत दंडापरी । मागें उरी नुरावी ॥ २ ॥ वचनाचा तो पसरु
काई । तांतडी डोईपाशींच ॥ ३ ॥ तुका म्हणे जगजेठी । लावीं कंठीं उचलूनि ॥ ४
॥
३६४८. सुखाचे व्यवहारीं सुखलाभ झाला । आनंद कोंदला मागें पुढें ॥
१ ॥ संगती पंगतीं देवासवें घडे । नित्यानित्य पडे तेचि साचा ॥ २ ॥
समर्थाचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कदा कासयाची ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें
लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥ ४ ॥
३६४९. राजा करी तैसे
दाम । चाम तेही चालती ॥ १ ॥ कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ २ ॥
वाहिलें तें सुनें खांदी । चाले पदीं बैसविलें ॥ ३ ॥ तुका म्हणे विश्वंभरें
। करुणाकरें रक्षिलें ॥ ४ ॥
३६५०. त्रैलोक्य पाळितां उबगला नाहीं ।
आमुचें त्या काइ असेल ओझें ॥ धृ. ॥ पाषाणाचे पोटीं बैसला दर्दुर । तया
मुखीं चारा कोण घाली ॥ २ ॥ पक्षी अजगर न करी संचित । तयासी अनंत प्रतिपाळी ॥
३ ॥ तुका म्हणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥ ४ ॥
३६५१.
धन्य भावशीळ । ज्याचे हृदय निर्मळ ॥ १ ॥ पूजी प्रतिमेचे देव । संत म्हणती
तेथें भाव ॥ २ ॥ विधिनिषेध नेणती । एक निष्ठा धरूनि चित्तीं ॥ ३ ॥ तुका
म्हणे तैसें देवा । होणें लागे त्यांच्या भावा ॥ ४ ॥
३६५२. देवाच्या
संबंधें विश्वचि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥ १ ॥ आहाच हें नव्हे
विटायासारिखें । जीव जीवनीं देखें सामावलें ॥ २ ॥ आणिकाचें सुख दुःख उमटे
अंतरीं । येथील इतरीं तेणें न्यावें ॥ ३ ॥ तुका म्हणे ठसावलें शुद्ध जाती ।
शोभाचि पुढती विशेषता ॥ ४ ॥
३६५३. आम्हां घरीं एक गाय दुभताहे ।
पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥ १ ॥ वान तें सांवळी नांव तें श्रीधरा । चरे
वसुंधरा चौदा भुवनें ॥ २ ॥ वत्स नाहीं माय भलत्यासवें जाय । कुर्वाळी तो
लाहे भावभरणा ॥ ३ ॥ चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धालें सनकादिक सिद्ध
मुनी ॥ ४ ॥ तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोक ॥ ५ ॥
३६५४.
सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ॥ १ ॥ बाळ गोपाळांची वाट । सेव्य सेवकता नीट
॥ २ ॥ जरी झाला श्रम । तरी पडों नये भ्रम ॥ ३ ॥ तुका म्हणे दासां । देव
सरिसासरिसा ॥ ४ ॥
३६५५. नाहीं काष्ठाचा गुमान । गोवी भ्रमरा सुमन ॥ १
॥ प्रेम प्रीतीचें बांधलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ २ ॥ पदरीं घाली
पिळा । बाप निर्बळ साटी बाळा ॥ ३ ॥ तुका म्हणे भावें । भेणें देवें
आकारावें ॥ ४ ॥
३६५६. स्वामिकाज गुरुभक्ति । पितृवचन सेवा पति ॥ १ ॥
हेचि विष्णूची महापूजा । आनु भाव नाहीं दुजा ॥ २ ॥ सत्य बोले मुखें ।
दुखवें आणिकांच्या दुःखें ॥ ३ ॥ निश्चयाचें बळ । तुका म्हणे तेंच फळ ॥ ४ ॥
३६५७.
न करी त्याचें गांढेपण । नारायण सिद्ध उभा ॥ १ ॥ भवसिंधुचा थडवा केला ।
बोलाविला पाहिजे ॥ २ ॥ याचे सोई पाउल वेचे । मग कैचे अडथळे ॥ ३ ॥ तुका
म्हणे खरें खोटें । न म्हणे मोठें लहान ॥ ४ ॥
३६५८. सोवळा तो झाला ।
अंगीकार देवें केला ॥ १ ॥ येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥ २ ॥ चुकला
हा भार । तयाचीच येरझार ॥ ३ ॥ तुका म्हणे दास । झाला तया नाहीं नास ॥ ४ ॥
३६५९.
जिव्हा जाणे फिकें मधुर कीं क्षार । येर मांस पर हाता न कळे ॥ १ ॥ देखावें
नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदुःखें कळों येती ॥ २ ॥ परिमळासी घ्राण
ऐकती श्रवण । एकाचें कारण एका नव्हे ॥ ३ ॥ एके देहीं भिन्न ठेवियेल्या कळा
। नाचवी पुतळा सुत्रधारी ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता । कां तया
अनंता विसरलेती ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३६६०. जें जें केलें तें तें साहे ।
कैसे पाहें भाविक ॥ १ ॥ ओंवाळूनि माझी काया । सांडिली यावरूनि ॥ २ ॥ काय
होय नव्हे करूं । नेणें धरूं सत्ता ते ॥ ३ ॥ तुका म्हणे कटीं कर । उभें धीर
धरूनि ॥ ४ ॥
३६६१. सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥ १ ॥ आतां
आवडीच्या हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ २ ॥ मोकळीच पोतीं । नाहीं पुसायाची
गुंती ॥ ३ ॥ तुका म्हणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥ ४ ॥
३६६२.
वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ति मानवाची सांगों नये ॥ धृ. ॥ उदंडचि
झाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक ॥ २ ॥ त्यांचें नाम कोणी
नेघे चराचरीं । साही वेद चारी वर्णिताती ॥ ३ ॥ अक्षय अढळ चळेना ढळेना । तया
नारायणा ध्यात जावें ॥ ४ ॥ तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्तीं ध्यातां ।
जन्ममरणव्यथा दूर होती ॥ ५ ॥
३६६३. जैसा निर्मळ गंगाओघ । तैसा भाग
वोगरीं ॥ १ ॥ प्रेम वाढें ग्रासोग्रासीं । विठूरसीं भोजन ॥ २ ॥ तृप्तीवरी
आवडी उरे । ऐसे बरे प्रकार ॥ ३ ॥ तुका म्हणे पाख मन । नारायण तें भोगीं ॥ ४
॥
३६६४. बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देईल तो
अन्नवस्त्रदाता ॥ १ ॥ काय आम्हां करणें अधिक सांचुनी । देव झाला ऋणी
पुरविता ॥ २ ॥ दयाळ मायाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥ ३ ॥ नलगे
सांगणें मागणें तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥ ४ ॥ तुका म्हणे
लेईं अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूंचि होसी ॥ ५ ॥
३६६५. आवडीचें
दान देतो नारायण । बाहे उभारोन राहिलासे ॥ १ ॥ जें जया रुचे तें करी समोर ।
सर्वज्ञ उदार मायबाप ॥ २ ॥ ठायीं पडिलियां तेंचि लागे खावें । ठायींचेंचि
घ्यावें विचारूनि ॥ ३ ॥ बीज पेरूनियां तेंचि घ्यावें फळ । डोरलीस केळ कैचें
लागे ॥ ४ ॥ तुका म्हणे देवा कांहीं बोल नाहीं । तुझा तूंचि पाहीं शत्रू
सखा ॥ ५ ॥
३६६६. आपुलियां बळें नाहीं मी बोलत । सखा कृपावंत वाचा
त्याची ॥ १ ॥ साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ २ ॥ काय
म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥ ३ ॥ तुका
म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायांविण ॥ ४ ॥ (धृ. नाही)
३६६७.
उद्धाराचा संदेह नाहीं । याच्या कांहीं सेवकां ॥ १ ॥ पांडुरंग अभिमानी ।
जीवदानी कोंवसा ॥ २ ॥ बुडतां जळीं जळतां आगीं । ते प्रसंगीं राखावें ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्हांसाठीं । कृपा पोटीं वागवी ॥ ४ ॥
३६६८. भाविकाचें
काज अंगें देव करी । काढी धर्माघरीं उच्छिष्ट तें ॥ धृ. ॥ उच्छिष्ट तीं
फळें खाय भिल्लिणीचीं । आवडी तयांची मोठी देवा ॥ २ ॥ काय देवा घरीं न
मिळेची अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥ ३ ॥ अर्जुनाचीं घोडीं धुतलीं
अनंतें । संकटें बहुतें निवारिलीं ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसीं आवडती लडिवाळें ।
जाणीवेचें काळें तोंड देवा ॥ ५ ॥
३६६९. पाहातां रूप डोळां भरे ।
अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥ १ ॥ तो हा
नंदा नंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ २ ॥ दिसतो हा नोहे तैसा । असे दिशा
व्यापक । लाघव हा खेळासाटीं । होतां भेटी परतेना ॥ ३ ॥ म्हणोनि उभी
ठाकलीये । परतलीये या वाटा । आड करोनियां तुका । जो या लोकां दाखवितो ॥ ४ ॥
३६७०.
बोलिलों उत्कर्षें । प्रेमरसें दास्यत्वें ॥ १ ॥ साच करिता नारायण । जया
शरण गेलों तो ॥ २ ॥ समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवितो ॥ ३ ॥ तुका
म्हणे लडिवाळाचें । द्यावें साचें करूनियां ॥ ४ ॥
३६७१. सोडिला
संसार । माया तयावरी फार ॥ १ ॥ धांवें चाले मागें मागें । सुखदुःख साहे
अंगें ॥ २ ॥ यानें घ्यावें नाम । तीसी करणें त्याचें काम ॥ ३ ॥ तुका म्हणे
भोळी । विठ्ठलकृपेची कोंवळी ॥ ४ ॥
३६७२. शुकसनकादिकीं उभारिला बाहो
। परिक्षिती लाहो दिसां सातां ॥ १ ॥ उठाउठीं करी स्मरणाचा धांवा । धरवत
देवा नाहीं धीर ॥ २ ॥ त्वरा जाली गरुडा टाकियेले मागें । द्रौपदीच्या लागें
नारायणें ॥ ३ ॥ तुका म्हणे करी बहुच तांतडी । प्रेमाची आवडी लोभा पूर ॥ ४ ॥
३६७३.
गौळीयाचीं ताकपीरें । कोण पोरें चांगलीं ॥ १ ॥ येवढा त्यांचा छंद देवा ।
काय सेवा भक्ति ते ॥ २ ॥ काय उपास पडिले होते । कण्यांभोंवते विदुराच्या ॥ ३
॥ तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥ ४ ॥
३६७४. विश्वाचा
जनिता । म्हणे यशोदेसी माता ॥ १ ॥ ऐसा भक्ताचा अंकित । लागे तैसी लावी
प्रीत ॥ २ ॥ निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥ ३ ॥ तुका म्हणे आलें ।
रूपा अव्यक्त चांगलें ॥ ४ ॥
३६७५. तयास नेणतीं बहु आवडती । होय जया
चित्तीं एक भाव ॥ धृ. ॥ उपमन्यु धुरु हे काय जाणती । प्रल्हादाच्या
चित्तीं नारायण ॥ २ ॥ कोळी भिल्ल पशु श्वापदें अपारें । कृपेच्या सागरें
तारियेलीं ॥ ३ ॥ काय तीं गोपाळें चांगलीं शाहाणीं । तयां चक्रपाणि जेवी
सवें ॥ ४ ॥ तुका म्हणे भोळा भाविक हा देव । आम्ही त्याचे पाव धरूनि ठेलों ॥
५ ॥
३६७६. म्हणऊनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥ १ ॥ तो हा उतरील
पार । भवदुस्तर नदीचा ॥ २ ॥ बहु आहे करुणावंत । अनंत हें नाम ज्या ॥ ३ ॥
तुका म्हणे साक्षी आलें । तरी केलें प्रगट ॥ ४ ॥
३६७७. ऐका महिमा
आवडीची । बोरें खाय भिल्लिणीचीं ॥ १ ॥ थोर प्रेमाचा भुकेला । हाचि दुष्काळ
तयाला ॥ २ ॥ पोहे ऐसी सुदाम्याची । फके मारी कोरडेचि ॥ ३ ॥ न म्हणे
उच्छिष्ट अथवा थोडें । तुका म्हणे भक्तीपुढें ॥ ४ ॥
३६७८. अंगीकार
ज्याचा केला नारायणें । निंद्य तेंहि तेणें वंद्य केलें ॥ धृ. ॥ अजामेळ
भिल्ली तारिली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य केली ॥ २ ॥ ब्रह्महत्या
राशी पातकें अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें भजन
प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ॥ ४ ॥
३६७९. उंच नीच कांहीं नेणे
भगवंत । तिष्ठे भावभक्ती देखोनियां ॥ धृ. ॥ दासीपुत्र कण्या विदुराच्या
भक्षी । दैत्या घरीं रक्षी प्रल्हादासी ॥ २ ॥ चर्म रंगूं लागे
रोहिदासासंगें । कबिराचे मागें शेले विणी ॥ ३ ॥ सजन कसाया विकूं लागे मांस ।
माळ्या सांवत्यास खुरपूं लागे ॥ ४ ॥ नरहरी सोनरा घडूं फुंकुं लागे ।
चोख्यामेळ्यासंगें ढोरें ओढी ॥ ५ ॥ नामयाची जनीसवें वेची शेणीं । धर्मा
घरीं पाणी वाहे झाडी ॥ ६ ॥ नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियाची
भिंत अंगें ओढी ॥ ७ ॥ अर्जुनाचे रथीं होय हा सारथी । भक्षी पोहे प्रीतीं
सुदाम्याचे ॥ ८ ॥ गौळियांचे घरीं अंगें गाई वळी । द्वारपाळ बळीद्वारीं जाला
॥ ९ ॥ येकोबाचे ऋण फेडी हृषीकेशी । अंबऋषीचे सोशी गर्भवास ॥ १० ॥
मिराबाईसाठीं घेतों विषप्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥ ११ ॥ घडी माती
वाहे गोऱ्याकुंभाराची । हुंडी त्या मेहत्याची अंगें भरी ॥ १२ ॥
पुंडलिकासाठीं अझूनि तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची ॥ १३ ॥
३६८०.
कांहीं न मागती देवा । त्यांची करूं धांवें सेवा ॥ १ ॥ हळूहळू फेडी ऋण ।
होवोनियां रूपें दीन ॥ २ ॥ होऊं न शके वेगळा । क्षण त्या एक निराळा ॥ ३ ॥
तुका म्हणे भक्तिभाव । तोचि देवाचाही देव ॥ ४ ॥
३६८१. भक्तऋणी देव
बोलती पुराणें । निर्धार वचनें साच खरीं ॥ धृ. ॥ मागें काय जाणों आइकिली
वार्ता । कबिरा सातें जातां घड्या वांटी ॥ २ ॥ माघारिया धन आणिलें घरासी ।
ने घे केला त्यासी त्याग तेणें ॥ ३ ॥ नामदेवाचिया घरासी आणिलें । तेणें
लुटियेलें द्विजां हातीं ॥ ४ ॥ प्रत्यक्षासी काय द्यावें हें प्रमाण ।
येकोबाचे ऋण फेडियलें ॥ ५ ॥ बीज दळोनियां केली आराधना । लागे नारायणा
पेरणें तें ॥ ६ ॥ तुका म्हणे ऐसा नाहीं ज्या निर्धार । नाडेल साचार तोचि एक
॥ ७ ॥
३६८२. सांठविला हरि । जींहीं हृदयमंदिरीं ॥ १ ॥ त्यांची सरली
वेरझार । झाला सफळ व्यापार ॥ २ ॥ हरी आला हाता । मग कैंचीं भय चिंता ॥ ३ ॥
तुका म्हणे हरी । कांहीं उरो नेदी उरी ॥ ४ ॥
३६८३. हरिहरां भेद ।
नाहीं करूं नये वाद ॥ १ ॥ एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ २ ॥
भेदकासी नाड । एक वेलांटीच आड ॥ ३ ॥ उजवे वाम भाग । तुका म्हणे एकचि अंग ॥ ४
॥
३६८४. अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥ १ ॥ देव सोयरा
देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ २ ॥ आपुल्याच वैभवें । शृंगारावें निर्मळें
॥ ३ ॥ तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावे प्रीतीचें ॥ ४ ॥
३६८५.
देव बासर देव बासर । असे निरंतर जेथें तेथें ॥ १ ॥ देव खोळंबा देव खोळंबा ।
मज झळंबा म्हुण कोंडी ॥ २ ॥ देव लागट देव लागट । लाविलिया चट जीवीं जडे ॥ ३
॥ देव बावळा देव बावळा । भावें जवळा लुडबुडी ॥ ४ ॥ देव न व्हावा देव न
व्हावा । तुका म्हणे गोवा करी कामीं ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३६८६. देव
घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥ धृ.॥ देव नलगे देव नलगे ।
सांठवणीचें रुधले जागे ॥ २ ॥ देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥ ३
॥ देव घ्या फुका देव घ्या फुका । नलगे रुका मोल कांहीं ॥ ४ ॥ दुबळा तुका
भावेंवीण । उधारा देव घेतला ऋण ॥ ५ ॥
३६८७. देव निढळ देव निढळ । मूळ
नाहीं डाळ परदेशी ॥ १ ॥ देव अकुळी देव अकुळी । भलते स्थळीं सोयरीक ॥ २ ॥
देव लिगाड्या देव लिगाड्या । तुका म्हणे भाड्या दंभें ठकी ॥ ३ ॥ (धृ.
नाही)
३६८८. देव मजूर देव मजूर । नाहीं उजूर सेवेपुढें ॥ १ ॥ देव
गांढ्याळ देव गांढ्याळ । देखोनियां बळ लपतसे ॥ २ ॥ देव तर काई देव तर काई ।
तुका म्हणे राई तरी मोठी ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३६८९. देव बराडी देव
बराडी । घाली देंठासाठीं उडी ॥ १ ॥ देव भ्याड देव भ्याड । राखें बळीचे कवाड
॥ २ ॥ देव भाविक भाविक । होय दासांचा सेवक ॥ ३ ॥ देव होया देव होया । जैसा
म्हणे तैसा तया ॥ ४ ॥ देव लहान लहान । तुका म्हणे अणुरेणु ॥ ५ ॥ (धृ.
नाही)
३६९०. देव दयाळ देव दयाळ । साहे कोल्हाळ बहुतांचा ॥ १ ॥ देव
उदार देव उदार । थोड्यासाठीं फार देऊं जाणे ॥ २ ॥ देव चांगला देव चांगला ।
तुका लागला चरणीं ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३६९१. देव भला देव भला । मिळोनि
जाय जैसा त्याला ॥ १ ॥ देव उदार उदार । देतां नाहीं थोडें फार ॥ २ ॥ देव
बळी देव बळी । जोडा नाहीं भूमंडळीं ॥ ३ ॥ देव व्हावा देव व्हावा । आवडे तो
सर्वां जीवां ॥ ४ ॥ देव चांगला देव चांगला । तुका चरणीं लागला ॥ ५ ॥ (धृ.
नाही)
३६९२. देव पाहों देव पाहों । उंच ठायीं उभें राहों ॥ १ ॥ देव
देखिला देखिला । तो नाहीं कोणा भ्याला ॥ २ ॥ देवासी कांहीं मागों मागों ।
जीव भाव त्यासी सांगों ॥ ३ ॥ देव जाणे देव जाणे । पुरवी मनींचिये खुणे ॥ ४ ॥
देव कातर देव कातर । तुका म्हणे अभ्यंतर ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३६९३.
देव आमचा आमचा । जीव सकळ जीवांचा ॥ १ ॥ देव आहे देव आहे । जवळी आम्हां
अंतरबाहे ॥ २ ॥ देव गोड देव गोड । पुरवी कोडाचेंही कोड ॥ ३ ॥ देव आम्हां
राखे राखे । घाली कळिकाळासी काखे ॥ ४ ॥ देव दयाळ देव दयाळ । करी तुक्याचा
सांभाळ ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३६९४. देवाच्या प्रसादें करा रे भोजन ।
व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥ १ ॥ ब्रह्मादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट । नका
मानूं वीट विठुरसीं ॥ २ ॥ अवघियांपुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र
आहे येथें ॥ ३ ॥ इच्छादानी येथें ओळला समर्थ । अवघेंचि आर्त पुरवितो ॥ ४ ॥
सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥ ५ ॥ तुका
म्हणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारीं सांगातें निरुपम ॥ ६ ॥ (धृ. नाही)
३६९५.
देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याचे पडे चिरा संसारासी ॥ १ ॥ देवाची
ते खूण करावें वाटोळें । आपणावेगळें राहों नेदी ॥ २ ॥ देवाची ते खूण गुंतों
नेदी आशा । ममतेच्या पाशा शिवों नेदी ॥ ३ ॥ देवाची ते खूण करावें तोंडाळ ।
आणिक सकळ जग हरी ॥ ४ ॥ देवाची ते खूण झाला ज्यासी संग । त्याच्या झाला भंग
मनुष्यपणा ॥ ५ ॥ देवाची ते खूण गुंतों नेदी वाचा । लागों असत्याचा मळ नेदी
॥ ६ ॥ पहा देवें तेंची बळकाविलें स्थळ । तुक्यापें सकळ चिन्हें त्याचीं ॥ ७
॥ (धृ. नाही)
३६९६. प्रथमभेटी आळिंगण । मग चरण वंदावे ॥ १ ॥ ऐसा
माझा भोळा बाप । हरी ताप कवळोनि ॥ २ ॥ न सांगतां शीण भाग । पांडुरंग जाणतसे
॥ ३ ॥ तुका म्हणे कृपावंते । द्यावें भातें न मागतां ॥ ४ ॥
३६९७.
आवडीनें धरिलीं नांवे । प्रियभावें चिंतन ॥ १ ॥ वेडा झाला वेडा झाला ।
लांचावला भक्तीसी ॥ २ ॥ निचाड हा चाड धरी । तुळसीं करीं दळ मागें ॥ ३ ॥
धरिला मग न करी बळ । तुका म्हणे कळ पायीं ॥ ४ ॥
३६९८. देव राखे तया
मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥ धृ. ॥ न जळे न बुडे नव्हें कांहीं ।
विष तेंही अमृत पाहीं ॥ २ ॥ न चुके वाट न पडे फंदीं । नव्हे कधीं यमबाधा ॥
३ ॥ तुका म्हणे नारायण । येतां गोळ्या वारी बाण ॥ ४ ॥
३६९९. भक्त
देवाघरींचा सुना । देव भक्ताचा पोसणा ॥ १ ॥ येर येरां जडलें कैसें । जीवा
अंग जैसें तैसें ॥ २ ॥ देव भक्ताची कृपाळु माता । भक्त देवाचा जनिता ॥ ३ ॥
तुका म्हणे अंगें । एक एकाचिया संगें ॥ ४ ॥
३७००. भक्ताविण देवा ।
कैंचे रूप घडे सेवा ॥ १ ॥ शोभविलें येरयेरां । सोनें एके ठायीं हिरा ॥ २ ॥
देवाविण भक्ता । कोण देतें निष्कामता ॥ ३ ॥ तुका म्हणे बाळ । माता जैसें
स्नेहजाळ ॥ ४ ॥
३७०१. घेऊनियां चक्र गदा । हाचि धंदा करीतो ॥ १ ॥
भक्ता राखे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ २ ॥ अव्यक्त तें आकारलें । रूपा
आलें गुणवंत ॥ ३ ॥ तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥ ४ ॥
३७०२.
करितां कोणाचेंही काज । नाहीं लाज देवासी ॥ १ ॥ बरें करावें हें काम ।
धरिलें नाम दीनबंधु ॥ २ ॥ करूनि अराणूक पाहे । भलत्या साह्य व्हावया ॥ ३ ॥
बोले तैसी करणी करी । तुका म्हणे एक हरी ॥ ४ ॥
३७०३. कृपावंत किती ।
दीन बहु आवडती ॥ १ ॥ त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ २ ॥
भुलों नेदी वाट । करीं धरूनि दावी नीट ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवें । अनुसरल्या
एक भावें ॥ ४ ॥
३७०४. एवढा प्रभू भावें । तेणें संपुष्टीं रहावें ॥ १
॥ होय भक्ती केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ २ ॥ एवढा जगदानी । मागे
तुळसीदळ पाणी ॥ ३ ॥ आला नांवारूपा । तुका म्हणे झाला सोपा ॥ ४ ॥
३७०५.
अनंत ब्रह्मांडें । एकें रोमीं ऐसें धेंडें ॥ १ ॥ तो या गौळियांचे घरीं ।
उंबरा चढतां टेंका धरी ॥ २ ॥ मारिले दैत्य गाढे । ज्यांचे पुराणीं पवाडे ॥ ३
॥ तुका म्हणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥ ४ ॥
३७०६. लाभ पुढें करी ।
घात नारायण वारी ॥ १ ॥ ऐसी भक्तांची माउली । करी कृपेची साऊली ॥ २ ॥ माय
बाळकासी । जीव भाव वेची तैसी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाड । नाहीं शरणागता आड ॥ ४ ॥
३७०७.
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥ १ ॥ केला न संडी कैवाड । जीवेंसाठीं
तों हे होड ॥ २ ॥ धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥ ३ ॥ तुका म्हणे हरि ।
दासां रक्षितो निर्धारीं ॥ ४ ॥
३७०८. सत्य सत्य देतो फळ । नाहीं
लागतचि बळ ॥ १ ॥ ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ २ ॥ करावीच चिंता ।
नाहीं लागत तत्त्वता ॥ ३ ॥ तुका म्हणे भावें । होतें सकळ बरवें ॥ ४ ॥
३७०९.
भाविकां हें वर्म सांपडलें निकें । सेंविती कवतुकें धणीवरी ॥ १ ॥ इच्छितील
तैसा नाचे त्यांचे छंदें । वंदितील पदें सकुमारें ॥ २ ॥ विसरले मुक्ति
भक्तीच्या अभिळासें । ओढत सरिसें सुख आलें ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं मागायाची
आस । पांडुरंग त्यांस विसंबेना ॥ ४ ॥
३७१०. चित्तीं नाहीं आस ।
त्याचा पांडुरंग दास ॥ १ ॥ असे भक्तांचिये घरीं । काम न सांगतां करी ॥ २ ॥
अनाथाचा बंधु । अंगीं असे हा संबंधु ॥ ३ ॥ तुका म्हणे भावें । देवा सत्ता
राबवावें ॥ ४ ॥
३७११. वैद्य एक पंढरीराव । अंतर्भाव तो जाणे ॥ १ ॥
रोगा ऐशा द्याव्या वल्ली । जाणे झाली बाधा ते ॥ २ ॥ नेदी रुका वेचों मोल ।
पाहे बोल प्रीतीचे ॥ ३ ॥ तुका म्हणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥ ४ ॥
३७१२.
अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥ १ ॥ अनुसरा लवलाहीं । नका विचार
करूं कांहीं ॥ २ ॥ कोठें राहातील पापें । झालिया हो अनुतापें ॥ ३ ॥ तुका
म्हणे येचि घडी । उभ्या पावईल थडी ॥ ४ ॥
३७१३. भय हरिजनीं । कांहीं न
धरावें मनीं ॥ १ ॥ नारायणा ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥ २ ॥ चित्त वित्त
हेवा । समर्पून राहा देवा ॥ ३ ॥ तुका म्हणे मन । असों द्यावें समाधान ॥ ४ ॥
३७१४.
मधुरा उत्तरासवें नाहीं चाड । अंतरंगीं वाढ प्रेम असो ॥ १ ॥ प्राणावेगळा न
करी नारायण । मग नसो ज्ञान मूर्ख बरा ॥ २ ॥ जननिंदा होय तो बरा व्यापार ।
थोरवीचा भार कामा नये ॥ ३ ॥ तुका म्हणे भाव निष्ठावंत चित्तीं । दया क्षमा
शांती सर्वांभूतीं ॥ ४ ॥
३७१५. न करावी चिंता । भय न धरावें सर्वथा ॥
१ ॥ दासां साहे नारायण । होय रक्षिता आपण ॥ २ ॥ नलगे परिहार । कांहीं
योजावें उत्तर ॥ ३ ॥ न धरावी शंका । नये बोलों म्हणे तुका ॥ ४ ॥
३७१६.
पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥ १ ॥ त्यासी चिंतिलिया मनीं । चित्ता
करी गंवसणी ॥ २ ॥ पावावया फळ । अंगीं असावें हें बळ ॥ ३ ॥ तुका म्हणे तईं ।
सिद्धि वोळगती पायीं ॥ ४ ॥
३७१७. धीर नव्हे मनें । काय तयापाशीं
उणें ॥ १ ॥ भार घातलियावरी । दासां नुपेक्षील हरी ॥ २ ॥ याच्या ऐसी आटी ।
द्यावी द्रव्याचिये साटी ॥ ३ ॥ तुका म्हणे पोटें । देवा बहु केलें खोटें ॥ ४
॥
३७१८. वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥ १ ॥ विश्वासिया
घडे लाभ । देईल तरी पद्मनाभ ॥ २ ॥ भाव शुद्ध तरी । सांगितलें काम करी ॥ ३ ॥
तुका म्हणे भोळा देव । परि हा नागवी संदेह ॥ ४ ॥
३७१९. याचा तंव
हाचि मोळा । देखिला डोळा उदंड ॥ १ ॥ नेदी मग फिरों मागें । अंगा अंग संचरे ॥
२ ॥ कां गा याची नेणां खोडी । जीभा जोडी करितसे ॥ ३ ॥ पांघरे तें बहु
काळें । घोंगडें ही ठायींचें ॥ ४ ॥ अंगीं वसेचि ना लाज । न म्हणे भाज
कोणाची ॥ ५ ॥ सर्वसाक्षी अबोल्यानें । दुश्चित कोणे नसावें ॥ ६ ॥ तुका
म्हणे धरिला हातीं । मग निश्चिंती हरीनें ॥ ७ ॥
३७२०. पाचारितां
धावे । ऐसी ठायींची ही सवे ॥ १ ॥ बोले करुणावचनीं । करी कृपा लावी स्तनीं ॥
२ ॥ जाणे कळवळा । भावसिद्धींचा सोहळा ॥ ३ ॥ तुका म्हणे नाम । मागें मागें
धांवे प्रेम ॥ ४ ॥
३७२१. विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे ॥ १ ॥
जेथें असें तेथें देखें । मागितलें तें आईके ॥ २ ॥ जें जें वाटे गोड ।
तैसें पुरवितो कोड ॥ ३ ॥ तुका म्हणे भेटी । कांहीं पडो नेदी तुटी ॥ ४ ॥
३७२२.
देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥ धृ. ॥ भाग्य
द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥ २ ॥ स्त्री
द्यावी गुणवंती तीपें गुंते आशा । यालागीं कर्कशा करूनि ठेवी ॥ ३ ॥ तुका
म्हणे साक्ष मज आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥ ४ ॥
३७२३.
करीं ऐसीं धांवाधावी । चित्त लावीं चरणापें ॥ १ ॥ मग तो माझा मायबाप । घेईल
ताप हिरूनि ॥ २ ॥ बहुतांच्या मतें गोवा । होऊं जीवा नेदावा ॥ ३ ॥ तुका
म्हणे करुणा बोलें । धीर विठ्ठलें निघेना ॥ ४ ॥
३७२४. जाणे अंतरींचा
भाव । तोचि करितो उपाव ॥ १ ॥ नलगे सांगावें मागावें । जीवें भावें
अनुसरावें । अविनाश घ्यावें । फळ धीर धरोनि ॥ २ ॥ बाळा न मागतां भोजन ।
माता घाली पाचारून ॥ ३ ॥ तुका म्हणे तरी । एकीं लंघियेले गिरी ॥ ४ ॥
३७२५.
काळाचिये सत्ता ते नाहीं घटिका । पंढरीनायका आठवितां ॥ १ ॥ सदा काळ गणना
करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाहीं ॥ २ ॥ याकारणें माझ्या विठोबाची
कीर्ति । आहे हे त्रीजगतीं थोर वाट ॥ ३ ॥ तुका म्हणे जन्मा आलियाचें फळ ।
स्मरावा गोपाळ तेंचि खरें ॥ ४ ॥
३७२६. सत्य संकल्पाचा दाता नारायण ।
सर्व करी पूर्ण मनोरथ ॥ १ ॥ येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचें
तें ॥ २ ॥ अंतरींचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रह्मांडाचा ॥ ३ ॥
तुका म्हणे नाहीं चालत तांतडी । प्राप्त काळ घडी आल्याविण ॥ ४ ॥
३७२७.
मायबापें सांभाळिती । लोभाकारणें पाळिती ॥ १ ॥ तैसा नव्हे देवराव । त्याचा
कृपाळू स्वभाव ॥ २ ॥ मनासारिखें न होतां । बाळकासी मारी माता ॥ ३ ॥ तुका
म्हणे सांगूं किती । बाप लेकासी मारिती ॥ ४ ॥
३७२८. न मिळती एका एक ।
जये नगरींचे लोक ॥ १ ॥ भलीं तेथें राहूं नये । क्षणें होईल न कळे काय ॥ २ ॥
न करितां अन्याय । बळें करीती अपाय ॥ ३ ॥ नाहीं पुराणाची प्रीति । ठायीं
ठायीं पंचाइती ॥ ४ ॥ भल्या बुऱ्या मारी । होतां कोणी न विचारी ॥ ५ ॥
अविचाऱ्या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥ ६ ॥ तुका म्हणे दरी । सुखें
सेवावी ते बरी ॥ ७ ॥
३७२९. लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे
ओंगळा उपदेश ॥ १ ॥ वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसीं संघष्टनी अमंगळ ॥ २ ॥
समय न कळे वेडगळ बुद्धि । विजाती ते शुद्धि चांच चाट ॥ ३ ॥ तुका म्हणे याचा
धिक्कारचि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥ ४ ॥
३७३०. हेंदऱ्याचे भरितां
कान । हलवी मान भोंक रितें ॥ १ ॥ नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें
नष्ट घेत नाहीं ॥ २ ॥ अवगुणी बाटलें चित्त । तया हित आतळे ना ॥ ३ ॥ तुका
म्हणे फजितखोरा । म्हणतां बरा उगा रहा ॥ ४ ॥
३७३१. अतित्याई बुडे
गंगे । पाप लागे त्याचें त्या ॥ १ ॥ हें तों आपुलिया गुणें । असे जेणें
योजिलें ॥ २ ॥ अवचटें अग्नि जाळी । न सांभाळी तो दुःख पावे ॥ ३ ॥ जैसें
तैसें दावी आरसा । पारोसा कैसा पालटे ॥ ४ ॥
३७३२. गेला तरी जावो
सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥ १ ॥ रजस्वला करी वेलासी आघात ।
अंतर तों हित दुरी बरें ॥ २ ॥ उगीच कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें
कालवूनि ॥ ३ ॥ तुका म्हणे लोणी घालोनि शेणांत । उपेगाची मात काय असे ॥ ४ ॥
(धृ. नाही)
३७३३. जीवींचें जाणावें या नांवें आवडी । हेकड तें ओढी
अमंगळ ॥ १ ॥ चित्ताच्या संकोचें कांहींच न घडे । अतिशयें वेडे चार तेचि ॥ २
॥ काळाविण कांहीं नाहीं रुचों येत । करूनि संकेत ठेवियेला ॥ ३ ॥ तुका
म्हणे कळे वचनें चांचणी । काय बोलवूनि वेळोवेळां ॥ ४ ॥
३७३४. वेशा
नाहीं बोल अवगुणा दूषिलें । ऐशा बोला भले झणीं क्षोभा ॥ धृ. ॥ कोण नेणे
अन्न जीवाचें जीवन । विष मेळवण विष होय ॥ २ ॥ सोनें शुद्ध नेणे कोण हा
विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥ ३ ॥ याती शुद्ध परि अधम लक्षण ।
वांयां गेलें तेणें सोंग हित ॥ ४ ॥ तुका म्हणे शूर तोचि पावे मान । आणीक
मंडण भार वाही ॥ ५ ॥
३७३५. आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वतां भाव ॥ १ ॥
करवी आणिकांचे घात । खोडी काढूनि पंडित ॥ २ ॥ श्वानाचिया परी ।
मिष्टान्नासी विटाळ करी ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा । सटवेची ना पांचा दिसां ॥ ४ ॥
३७३६.
तेज्या इशारती । तट्टा फोकावरी घेती ॥ १ ॥ काय सांगावें त्याहुनि । ऐका रे
धरा मनीं ॥ २ ॥ नव्हे भांडखोर । धरूं ओढोनि पदर ॥ ३ ॥ तुका म्हणे तोंड ।
काळें करा खालीं मुंड ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment