भक्त आणि परमात्मा यांची एकरूपता हीच खरी भक्ती आहे, याविषयीचे वर्णन करणारे अभंग.
अद्वैतपर अभंग (अभंग संख्या ३०७)
३७३७.
हरिः ॐ तत्सदिति सूत्राचें जें सार । कृपेचा सागर पांडुरंग ॥ १ ॥ हरिः ॐ
दत्त उदात्त अनुदात्त । प्रचुररहित पांडुरंग ॥ २ ॥ सर्वस्व व्यापिलें
सर्वाही निराळें । वेदाचें जें मूळ तुका म्हणे ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३७३८.
पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥ १ ॥ ज्याचे त्याचे मिळणीं मिळे ।
तरी खेळे बहुरूपी ॥ २ ॥ जाणिवेचें नेदी अंग । दिसे रंग निवडेना ॥ ३ ॥ तुका
म्हणे हेंचि ठायीं । हें तों नाहीं सर्वत्र ॥ ४ ॥
३७३९. जीवाचें
जीवन अमृताची तनु । ब्रह्मांडभूषणु नारायण ॥ १ ॥ सुखाचा सांगात अंतकासी अंत
। निजाचा निवांत नारायण ॥ २ ॥ गोडाचेंही गोड हर्षाचेंही कोड । प्रीतीचाही
लाड नारायण ॥ ३ ॥ भावाचा निज भाव नांवाचाही नांव । अवघा पंढरीराव अवतरलासे ॥
४ ॥ तुका म्हणे जें हें साराचेंही सार । माझा अंगीकार तेणें केला ॥ ५ ॥
३७४०.
जयापासोनि सकळ । महीमंडळ हें झालें ॥ १ ॥ तो एक पंढरीचा राणा । नये
अनुमाना श्रुतीसी ॥ २ ॥ विवादती जयासाठीं । जगजेठी तो विठ्ठल ॥ ३ ॥ तुका
म्हणे आकळ । आहे सकळ व्यापक ॥ ४ ॥
३७४१. पाहा रे हें दैवत कैसें ।
भक्तिपिसें भाविका ॥ १ ॥ पाचारिल्यासरिसें पावे । ऐसी सवे बराडी ॥ २ ॥
शुष्ककाष्ठीं गुरगुरी । लाज हरि न धरितां ॥ ३ ॥ तुका म्हणे अर्धनारी । ऐसीं
धरीं रूपडीं हा ॥ ४ ॥
३७४२. देव जाणता देव जाणता । आपुलीया सत्ता
एकाएकीं ॥ १ ॥ देव चतुर देव चतुर । जाणोनि अंतर वर्ततसे ॥ २ ॥ देव निराळा
देव निराळा । अलिप्त विटाळा तुका म्हणे ॥ ३ ॥ (धृ. नाही)
३७४३.
ब्रह्म न लिंपे त्या मेळें । कर्मा अकर्मावेगळें ॥ १ ॥ तोचि एक तया जाणे ।
पावे अनुभविलें खुणें ॥ २ ॥ शौच अशौचाचे संधी । तन आळा तनामधीं ॥ ३ ॥
पापपुण्या नाहीं ठाव । तुका म्हणे सहज भाव ॥ ४ ॥
३७४४. लक्षूनियां
योगी पाहाती आभास । तें दिसे आम्हांस दृष्टीपुढें ॥ १ ॥ कर दोनी कटी
राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ २ ॥ व्यापूनि वेगळें राहिलेंसें
दुरी । सकळा अंतरीं निर्विकार ॥ ३ ॥ रूप नाहीं रेखा नामही जयासी । आपुल्या
मानसीं शिव ध्याय ॥ ४ ॥ अंत नाहीं पार वर्णा नाहीं थार । कुळ याति शिर
हस्त पाद ॥ ५ ॥ अचेत चेतलें भक्तीचिया सुखें । आपुल्या कौतुकें तुका म्हणे ॥
६ ॥
३७४५. तुझे वर्णू गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती
मौनपणें ॥ १ ॥ मौनपणें वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ २ ॥
रूप तुझें ऐसें डोळां न देखवे । जेथें हे झकवे ब्रह्मादिक ॥ ३ ॥
ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी । म्हणोनि आटाटी फार त्यांसी ॥ ४ ॥ तुका
म्हणे तुझें गुण नाम रूप । आहेसी अमुप वाणूं काई ॥ ५ ॥
३७४६. स्तुति
करूं तरी नव्हेचि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥ १ ॥ परी हे वैखरी
गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ २ ॥ रूप वर्णावया कोठें पुरे मती
। रोमीं होती जाती ब्रह्मांडें हीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तूंचि ऐसा एक साचा ।
ऐसी तंव वाचा झाली नाहीं ॥ ४ ॥
३७४७. ज्याचे गर्जतां पवाडे ।
श्रुतिशास्त्रां मौन पडे ॥ १ ॥ तेथें माझी वाचा किती । पुरे करावया स्तुति ॥
२ ॥ शिणलीं सहस्र तोंडें । शेष फणी ऐसें धेंडें ॥ ३ ॥ तुका म्हणे मही ।
पत्र सिंधु न पुरे शाई ॥ ४ ॥
३७४८. आवडीसारिखें संपादिलें सोंग ।
अनंत हीं मग झालीं नामें ॥ १ ॥ कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या
नभाचाही साक्षी ॥ २ ॥ हातें जेवी एक मुखें मागें घांस । माउली जयास तैसी
बाळा ॥ ३ ॥ तुका म्हणे माझें ध्यान विटेवरी । तैसीच गोजिरी दिसे मूर्ति ॥ ४
॥
३७४९. तुज वर्णी ऐसा तुजविण नाहीं । दुजा कोणी तीही त्रिभुवनीं ॥
धृ. ॥ सहस्रमुखें शेष शिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ २ ॥
अव्यक्ता अलक्षा अपारा आनंदा । निर्गुणा सच्चिदानंदा नारायणा ॥ ३ ॥ रूप नाम
घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें ॥ ४ ॥ तुका म्हणे जरी
दाविसी आपणा । तरिच नारायणा कळो येसी ॥ ५ ॥
३७५०. जाणोनि नेणतें करी
माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥ १ ॥ मग मी व्यवहारीं असेन वर्तत ।
जेवीं जळा आंत पद्मपत्र ॥ २ ॥ ऐकोनि नाइकें निंदास्तुती कानी । जैसा का
उन्मनीं योगिराज ॥ ३ ॥ देखोनि न देखें प्रपंच हा दृष्टी । स्वप्नींचिया
सृष्टि चेइल्या जेवीं ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसें जालियावांचून । करणें तो शीण
वाटतसें ॥ ५ ॥
३७५१. उपाधिवेगळे तुम्ही निर्विकार । कांहींच संसार
तुम्हां नाहीं ॥ १ ॥ ऐसें मज करूनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥ २ ॥
निःसंग तुम्हांसी राहणें एकट । नाहीं कटकट साहों येत ॥ ३ ॥ तुका म्हणे
नाहीं मिळों येत शिळा । रंगासी सकळा स्फटिकाची ॥ ४ ॥
३७५२. पडिला
प्रसंग कां मी ऐसा नेणें । संकल्प ते मनें जिरवले ॥ १ ॥ चेष्टविले तरी
सांगावें कारण । भक्ती ते जीवन करावया ॥ २ ॥ लावूनियां दृष्टी घातली सामोरी
। बैसली जिव्हारीं डसोन ते ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवा लाविला तो चाळा । करावें
गोपाळा शीघ्र दान ॥ ४ ॥
३७५३. गायनाचे रंगीं । शक्ति अद्भुत हे
अंगीं ॥ १ ॥ हें तों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥ २ ॥ अंगीं
प्रेमाचें भरतें । नेघे उतार चढतें ॥ ३ ॥ तुका म्हणे वाणी । प्रेम अमृताची
खाणी ॥ ४ ॥
३७५४. आम्ही तरी आस । झालों टाकोनि उदास ॥ १ ॥ आतां कोण
भय धरीं । पुढें मरणाचें हरी ॥ २ ॥ भलते ठायीं पडो । देह तुरंगीं हा चढो ॥ ३
॥ तुमचें तुम्हापाशीं । आम्ही आहों जैसीं तैसीं ॥ ४ ॥ गेले मानामान ।
सुखदुःखाचें खंडन ॥ ५ ॥ तुका म्हणे चित्तीं । नाहीं वागवीत खंती ॥ ६ ॥
३७५५.
आम्ही जाणों तुझा भाव । कैंचा भक्त कैंचा देव । बीजा नाहीं ठाव । कैचें फळ
शेवटीं ॥ १ ॥ संपादिलें बहु रूप । कैंचें पुण्य कैंचें पाप । नव्हतों
आम्ही आप । आपणासी देखिलें ॥ २ ॥ एके ठायीं घरीच्याघरीं । न कळतां झाली
चोरी । तेथेंचि तें दुरी । जाणें येणें खुंटलें ॥ ३ ॥ तुका म्हणे धरूनि
हातीं । उरी ठेविली मागुती । एकांतीं लोकांतीं । देवभक्त सोहळा ॥ ४ ॥
३७५६.
भोगावरी आम्हीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥ १ ॥ विश्व तूं व्यापक
काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ २ ॥ काय सारूनियां काढावें
बाहेरी । आणून भीतरी काय ठेवूं ॥ ३ ॥ केला तरी उरे वादच कोरडा । बळें
घ्यावी पीडा स्वप्नींची ते ॥ ४ ॥ अवघेचि वाण आले तुम्हां घरा । मजुरी मजुरा
रोजकीर्दी ॥ ५ ॥ तुका म्हणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो
वाडा ॥ ६ ॥
३७५७. तरुवर बीजापोटीं । बीज तरुवरा शेवटीं ॥ १ ॥ तैसें
तुम्हां आम्हां झाले । एकीं एक सामावलें ॥ २ ॥ उदकावरील तरंग । तरंग
उदकाचें अंग ॥ ३ ॥ तुका म्हणे बिंबछाया । ठायीं पावली विलया ॥ ४ ॥
३७५८.
क्षरला सागर गंगा ओघीं मिळे । आपणचि खेळे आपणाशीं ॥ १ ॥ मधील ते वाव अवघी
उपाधि । तुम्हां आम्हांमधीं तेचि परि ॥ २ ॥ घट मठ झाले आकाशाचे पोटीं ।
वचनेंचि तुटी तेथेंचि ते ॥ ३ ॥ तुका म्हणे बीजें बीज दाखविलें । पत्र पुष्प
आलें गेलें वांयां ॥ ४ ॥
३७५९. दूरि तोंचि होतो आपुले आशंके ।
नव्हते ठाऊके मूळ भेद ॥ १ ॥ आतां जेथें तेथें येईन सांगातें । लपायापुरतें
उरों नेदी ॥ २ ॥ मिथ्या मोहें मज लाविला उशीर । तरी हें अंतर झालें होतें ॥
३ ॥ तुका म्हणे कां रे दाखविसी भिन्न । लटिकाची शीण लपंडाईं ॥ ४ ॥
३७६०.
लवण मेळवितां जळें । काय उरलें निराळें ॥ १ ॥ तैसा समरस झालों । तुजमाजी
हरपलों ॥ २ ॥ अग्निकर्पूराच्या मेळीं । काय उरली काजळी ॥ ३ ॥ तुका म्हणे
होती । तुझी माझी एक ज्योती ॥ ४ ॥
३७६१. तुज मज नाहीं भेद । केला
सहज विनोद ॥ धृ. ॥ तूं माझा आकार । मी तों तूंची निर्धार ॥ २ ॥ मी तुजमाजी
देवा । घेसी माझ्या अंगें सेवा ॥ ३ ॥ मी तुजमाजी अचळ । मजमाजी तुझें बळ ॥ ४
॥ तूं बोलसी माझ्या मुखें । मी तो तुजमाजी सुखें ॥ ५ ॥ तुका म्हणे देवा ।
विपरीत ठायीं नांवा ॥ ६ ॥
३७६२. जें जें कांहीं करितों देवा । तें
तें सेवा समर्पें ॥ १ ॥ भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ २ ॥ आम्ही
दुजे नेणों कोणा । हेंचि मना मन साक्ष ॥ ३ ॥ तुका म्हणे जगन्नाथा । हें
अन्यथा नव्हे कीं ॥ ४ ॥
३७६३. रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं
नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी ॥ १ ॥
तुम्हांआम्हांमध्यें हरी । झाली होती तैसी परी । मृगजळाचे पुरीं । ठाव
पाहों तरावया ॥ २ ॥ सरी चितांक भोंवरी । अळंकाराचिया परी । नामें झालीं
दुरी । एक सोनें आटितां ॥ ३ ॥ पिसांची पारवीं । करोनि बाजेगिरी दावी । तुका
म्हणे तेवीं । मज नको चाळवूं ॥ ४ ॥
३७६४. खडा रवाळी साकर । झाला
नामाचाची फेर । न दिसे अंतर । गोडी ठायीं निवडतां ॥ १ ॥ तुम्ही आम्ही
पांडुरंगा । भिन्न ऐसें काय सांगा । चाळविलें जगा । मी हें माझें यासाठीं ॥
२ ॥ पायीं हातीं नाकीं शिरीं । हेम राहे अळंकारीं । मुसे आल्यावरी । काय
निवडे वेगळें ॥ ३ ॥ निजलिया लाभ हानी । तोंच खरी ते स्वप्नीं । तुका म्हणे
दोन्ही । निवारली जागतां ॥ ४ ॥
३७६५. अस्त नाहीं आतां एकचि मोहोरा ।
पासूनि अंधारा दुरी झालों ॥ १ ॥ साक्षत्वें या झालों गुणाचा देखणा । करीं
नारायणा तरी खरें ॥ २ ॥ आठवू विसरु पडियेला मागें । आलें तेचि भागें यत्न
केले ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा विनोद देवासी । आम्ही तुम्हां ऐसी दोन्ही
नव्हों ॥ ४ ॥
३७६६. धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत
तुझे नामीं ॥ १ ॥ धन्य झालों आतां यासि संदेह नाहीं । न पडे या वाहीं काळा
हातीं ॥ २ ॥ ब्रह्मरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥ ३ ॥ तुका
म्हणे पोट धालेंचि न धाय । खादलेंचि खाय आवडीनें ॥ ४ ॥
३७६७.
कासयानें पूजा करूं केशीराजा । हाचि संदेह माझा फेडी आतां ॥ धृ. ॥ उदकें
न्हाणूं तरी स्वरूप तें तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ २ ॥ गंधाचा
सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥ ३ ॥ फळदाता तूंच तांबोल
अक्षता । तेथें काय आतां वाहों तुज ॥ ४ ॥ वाहूं दक्षिणा तरी धातु नारायण ।
विठु तेंचि अन्न दुजें काई ॥ ५ ॥ गातां तूं ॐ कार टाळी नादेश्वर । नाचावया
थार नाहीं कोठें ॥ ६ ॥ तुका म्हणे मज अवघें तुझें नाम । धूप दीप
रामकृष्णहरि ॥ ७ ॥
३७६८. कवणाचें कारण नलगेचि कांहीं । सर्वीं
सर्वांठायीं तूं मज एक ॥ १ ॥ कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आतां उरलें
काई न दिसे देवा ॥ २ ॥ कवणा पाषाणासी धरूनिया भाव । कवणावरी पाव ठेवूं
आतां ॥ ३ ॥ म्हणऊनि निश्चिंत राहिलों मनीं । तूंचि सर्वां खाणीं देखोनियां ॥
४ ॥ जळे जळ काय धोविलें एक । कवण तें पातक हरलें तेथें ॥ ५ ॥ पापपुण्य हे
वासना सकळ । ते तुज समूळ समर्पिली ॥ ६ ॥ पितरस्वरूपी तूंचि जनार्दन । सव्य
तें कवण अपसव्य ॥ ७ ॥ तुका म्हणे जीत पिंड तुझे हातीं । देऊनि निश्चिंती
मानियेली ॥ ८ ॥
३७६९. जन्ममरणाची विसरलों चिंता । तूं माझा अनंता
मायबाप ॥ १ ॥ होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय आणि भार निरसलीं ॥ २ ॥
लिगाडाचे मुळें होती पंचभूतें । ज्याचें त्यापुरतें विभागिलें ॥ ३ ॥ तुका
म्हणे झाला प्रपंच पारिखा । जिवासी तूं सखा पांडुरंग ॥ ४ ॥
३७७०.
वंदीन मी भूतें । आतां अवघींचि समस्तें ॥ १ ॥ तुमची करीन भावना । पदोपदीं
नारायणा ॥ २ ॥ गाळूनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥ ३ ॥ तुका म्हणे मग ।
नव्हे दुजियाचा संग ॥ ४ ॥
३७७१. जेथें जेथें जासी । तेथें मजचि तूं
पाहासी ॥ १ ॥ ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव ॥ २ ॥ चित्त जडलें
पायीं । पाळतीं हें ठायीं ठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे पोटीं । देवा घालूनि
सांगे गोष्टी ॥ ४ ॥
३७७२. आम्ही न देखों अवगुणां । पापी पवित्र शहाणा
॥ १ ॥ अवघीं रूपें तुझीं देवा । वंदूं भावें करूं सेवा ॥ २ ॥ मज भक्तीसवें
चाड । नेणें पाषाण धातु वाड ॥ ३ ॥ तुका म्हणे घोटीं । विष अमृत तुजसाठीं ॥
४ ॥
३७७३. तुज करितां होते ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे ॥ १ ॥ परि
हें वर्म नेणती कोणी । पीडा खाणी भोगितील ॥ २ ॥ उल्लंघिती पांगुळ गिरी ।
मुकें करी अनुवाद ॥ ३ ॥ पापी होती पुण्यवंत । न करी घात दुर्जन ॥ ४ ॥ अवघें
हेळामात्रें हरि । मुक्त करी ब्रह्मांड ॥ ५ ॥ तुका म्हणे खेळे लीळा । पाहे
वेगळा व्यापुनि ॥ ६ ॥
३७७४. कडसणी धरितां अडचणीचा ठाव । म्हणऊनि
जीव त्रासलासे ॥ १ ॥ लौकिकाबाहेरी राहिलों निराळा । तुजविण वेगळा नाहीं
दुजा ॥ २ ॥ संकोचानें नाहीं होत धणीवरी । उरवूनि उरी काय काज ॥ ३ ॥ तुका
म्हणे केले इच्छेची सारिखें । नाहींसें पारिखें येथें कोणी ॥ ४ ॥
३७७५.
अंतरायें पडे गोविंदीं अंतर । जो जो घ्यावा भार तो तो बाधी ॥ १ ॥ बैसलिये
ठायीं आठवीन पाय । पाहीन तो ठाय तुझा देवा ॥ २ ॥ अखंड तें खंडें संकल्पीं
विकल्प । मनोजन्य पाप रज्जुसर्प ॥ ३ ॥ तुका म्हणे विश्वीं विश्वंभर वसे ।
राहों ऐसे दशे सुखरूप ॥ ४ ॥
३७७६. माझिया देहाची मज नाहीं चाड ।
कोठें करूं कोड आणिकांचें ॥ १ ॥ इच्छिताती मान मागा देवापाशीं । असा
संचितासी गुंतलें हो ॥ २ ॥ देह आम्हीं केला भोगाचे सांभाळीं । राहिलों
निराळीं मानामाना ॥ ३ ॥ तुका म्हणे कोणें वेंचावें वचन । नसतां तो शीण
वाढवावा ॥ ४ ॥
३७७७. बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं
भूतें विठुवाग्नीसीं ॥ १ ॥ एकवेळें झालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥ २
॥ अमृतसंजीवनी विजविली खाई । अंगें तये ठायीं हारपलीं ॥ ३ ॥ एकादशीविध
जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ॥ ४ ॥ अवघीं कर्में झालीं घटस्फोटापाशीं
। संबंध एकेसी उरला नामीं ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां आनंदी आनंदु । गोविंदें
गोविंदु विस्तारला ॥ ६ ॥
३७७८. नलगे मरावें । ऐसा ठाव दिला देवें ॥ १
॥ माझ्या उपकारासाठीं । वागविला म्हूण कंठीं ॥ २ ॥ घरीं दिला ठाव । अवघा
सकळही वाव ॥ ३ ॥ तुका म्हणे एके ठायीं । केलें माझें तुझें नाहीं ॥ ४ ॥
३७७९.
एकाएकीं आतां असावेंसें वाटें । तरिच हे खोटे चाळे केले ॥ १ ॥ वाजवूनि
तोंड घातलें बाहेरी । कुल्प करूनि दारीं माजी वसा ॥ २ ॥ उजेडाचा केला
दाटोनि अंधार । सवें हुद्देदार चेष्टविला ॥ ३ ॥ तुका म्हणे भय होतें तोंचि
वरी । होती कांहीं उरी स्वामिसेवा ॥ ४ ॥
३७८०. सोसोनि विपत्ती ।
जोडी दिली तुझे हातीं ॥ १ ॥ त्याचा हाचि उपकार । अंतीं आम्हाशीं वेव्हार ॥ २
॥ नामरूपा केला ठाव । तुज कोण म्हणते देव ॥ ३ ॥ तुका म्हणे हरी । तुज ठाव
दिला घरीं ॥ ४ ॥
३७८१. जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥
१ ॥ डोळां बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ २ ॥ सरसावलें मन । केले
सोज्वळ लोचन ॥ ३ ॥ तुका म्हणे सवें । आतां असिजेत देवें ॥ ४ ॥
३७८२.
हेचि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥ १ ॥ अवघीं तुझींच हीं पदें ।
नमस्कारीन अभेदें ॥ २ ॥ न वर्जित दिशा । जाय तेथेंचि सरिसा ॥ ३ ॥ नव्हे
एकदेशी । तुका म्हणे गुणदोषी ॥ ४ ॥
३७८३. वेठी ऐसा भाव । न करी आहाच
उपाव ॥ १ ॥ रूप डसवीन जीवा । अवघा येच ठायीं हेवा ॥ २ ॥ कृपणाचे परी ।
लेखा पळनिमेषवरी ॥ ३ ॥ तुका म्हणे असा । संनिधचि जगदीशा ॥ ४ ॥
३७८४.
नेलें सळेंबळें । चित्तावित्ताचें गांठोळें ॥ १ ॥ साह्य झालीं घरीच्या
घरीं । होतां ठायींच कुठोरी ॥ २ ॥ मी पातलों या भावा । कपट तें नेणें देवा ॥
३ ॥ तुका म्हणे उघडें केलें । माझें माझ्या हातें नेलें ॥ ४ ॥
३७८५.
एक वेळे केलें रितें कलेवर । आतां दिली थार पांडुरंगा ॥ १ ॥ पाळण पोषण
नलगे ते सोई । देहाचे ते काई सर्वभाव ॥ २ ॥ माझिया मरणें झाली हे वसती ।
लागली ते ज्योती अविनाश ॥ ३ ॥ झाला ऐसा एका घायें येथें नाहीं । तुका ऐसें
कांहीं बोलों नये ॥ ४ ॥
३७८६. नटनाट्य तुम्हीं केलें याचसाठीं ।
कवतुकें दृष्टी निववावी ॥ १ ॥ नाहीं तरी काय कळलेंचि आहे । वाघ आणि गाय
लांकडाची ॥ २ ॥ अभेदचि असे मांडियेलें खेळा । केल्या दीपकळा बहु एकी ॥ ३ ॥
तुका म्हणे रूप नाहीं दर्पणांत । संतोषाची मात दुसरें तें ॥ ४ ॥
३७८७.
मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग ॥ १ ॥ एकीं एक दृढ झालें । मुळा आपुलिया
आलें ॥ २ ॥ सागरीं थेंबुटा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥ ३ ॥ तुका म्हणे
नवें । नव्हे जाणावें हें देवें ॥ ४ ॥
३७८८. तुझे पाय माझे
राहियेलें चित्तीं । ते मज दाविती वर्म देवा ॥ १ ॥ आम्हां अंधा तुझ्या
पायांचा आधार । जाणसी विचार चालवितां ॥ २ ॥ मन स्थिर ठेलें इंद्रियें
निश्चळ । हें तों माझें बळ नव्हे देवा ॥ ३ ॥ पापपुण्य भेद नाशिलें तिमिर ।
त्रिगुणें शरीर सांडियेलें ॥ ४ ॥ तुका म्हणे तुझा प्रताप हा खरा । मी जाणें
दातारा शरणागत ॥ ५ ॥
७८९. जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ।
चालविसी हातीं धरूनियां ॥ १ ॥ चालों वाटे आम्ही तुझाचि आधार । चालविसी भार
सवें माझा ॥ २ ॥ बोलों जातां बरळ करिसी तें नीट । नेली लाज धीट केलों देवा ॥
३ ॥ अवघे जन मज झाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां
खेळतों कौतुकें । झालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥ ५ ॥
३७९०. रूपीं
जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन ॥ १ ॥ देहभाव हरपला । तुज पाहातां विठ्ठला
॥ २ ॥ कळों नये सुखदुःख । तहान हरपली भूक ॥ ३ ॥ तुका म्हणे नव्हे परती ।
तुझ्या दर्शनें मागुती ॥ ४ ॥
३७९१. तेव्हां होतों भोगाधीन । तुम्हां
भिन्न पासुनि ॥ १ ॥ आतां बोलों नये ऐसें । अनारिसे वेगळें ॥ २ ॥ सन्मुख
झालों स्वामीकडे । भव आंगडे निराळें ॥ ३ ॥ चिंतिलें तें चिंतामणी । फिटे
धणी तों द्यावें ॥ ४ ॥ सहज स्थिति आहे अंगीं । प्रसंगीं ते वंचेना ॥ ५ ॥
तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥ ६ ॥ तुका म्हणे जाणोनि वर्में ।
कर्माकर्में ठेविलीं ॥ ७ ॥
३७९२. देव सखा आतां केलें नव्हे काई ।
येणें सकळही सोइरींच ॥ १ ॥ भाग्यवंत झालों गोतें सपुरतीं । आतां पुण्या
नीति पार नाहीं ॥ २ ॥ पाहातां दिसती भरलिया दिशा । ठसावला ठसा लोकत्रयीं ॥ ३
॥ अविनाश जोडी आम्हां भाग्यवंता । झाली होती सत्ता संचिताची ॥ ४ ॥
पायांवरी डोई ठेवाया आरोथा । झाली द्यावी सत्ता क्षेम ऐसी ॥ ५ ॥ तुका म्हणे
जीव पावला विसावा । म्हणवितां देवा तुमचीसीं ॥ ६ ॥
३७९३. तेणें
सुखें माझें निवविलें अंग । विठ्ठल हें जग देखियेलें ॥ १ ॥ कवतुकें करुणा
भाकीतसें लाडें । आवडी बोबडें बोलोनियां ॥ २ ॥ मज नाहीं दशा अंतरीं दुःखाची
। भावना भेदाची सर्व गेली ॥ ३ ॥ तुका म्हणे सुख झालें माझ्या जीवा ।
रंगलों केशवा तुझ्या रंगें ॥ ४ ॥
३७९४. दिला जीवभाव । तेव्हां
सांडिला म्यां ठाव ॥ १ ॥ आतां वर्ते तुझी सत्ता । तेथें सकळ अनंता ॥ २ ॥
माझिया मरणें । तुम्हीं बैसविलें ठाणें ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं । मी हें
माझें येथें नाहीं ॥ ४ ॥
३७९५. आपुलिया काजा । आम्हीं सांडियेलें
लाजा ॥ १ ॥ तुम्हां असों जागवीत । आपुलिया हातीं हित ॥ २ ॥ तुम्हीं
देहशून्य । आम्हां कळे पापपुण्य ॥ ३ ॥ सांगायासी लोकां । उरउरीत उरला तुका ॥
४ ॥
३७९६. पदोपदीं दिलें अंग । झालें सांग कारण ॥ १ ॥ रुधवूनि
ठेलों ठाव । जागा वाव सकळ ॥ २ ॥ पुढती चाली मना लाहो । वाढे देहो संतोष ॥ ३
॥ तुका म्हणे क्षरभागीं । झालों जगीं व्यापक ॥ ४ ॥
३७९७. तुझें
अंगभूत । आम्ही जाणतों समस्त ॥ १ ॥ येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ २
॥ ठावा थारा मारा । घरचिया संवचोरा ॥ ३ ॥ तुका म्हणे भेदाभेद । करूनि
करितसे वाद ॥ ४ ॥
३७९८. नाहीं मज कोणी उरला दुर्जन । मायबापाविण
ब्रह्मांडांत ॥ १ ॥ कासया जिकीर करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता खंती ॥
२ ॥ विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । सत्तेनें ती चाली आपुलिये ॥ ३ ॥ तुका
म्हणे माझें पाळण पोषण । करितां आपण पांडुरंगा ॥ ४ ॥
३७९९. जो वितो
तो माझा पिता । उखता तो उखत्याचा ॥ १ ॥ जनार्दनीं सरती कर्में । बाधा
भ्रमे अन्यत्र ॥ २ ॥ अपसव्य सव्यामधीं । ऐसी शुद्धी न धरितां ॥ ३ ॥ तुका
म्हणे खांद्या पानें । सिंचितां भिन्न कोरडीं ॥ ४ ॥
३८००. चित्ताचा
चाळक । त्याचें उभय सूत्र एक ॥ १ ॥ नाचवितो नाचेछंदें । सुखें आपुल्या
विनोदें ॥ २ ॥ चंद्र कमळणी । नाहीं धाडीत सांगोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे उठी ।
लोह चुंबकाचे दृष्टी ॥ ४ ॥
३८०१. काय नाहीं माझे अंतरीं वसति ।
व्यापक हा भूतीं सकळां नांदे ॥ १ ॥ चित्तासी प्रसाद होईल चळण । तेंचि तें
वळण मनासही ॥ २ ॥ सर्व शक्ति जीवीं राहिल्या कुंठित । नाहीं केलें होत
आपुलें तें ॥ ३ ॥ तुका म्हणे दोरी खांब सूत्र्या हातीं । नाचवी नाचती जडें
तैसीं ॥ ४ ॥
३८०२. चित्त तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव
इंद्रियांची ॥ १ ॥ हात पाव दिसे शरीर चालतां । नांवें भेद सत्ता जीवाची ते
॥ २ ॥ रविचिये अंगीं प्रकाश सकळां । वचनें निराळा भेद दिला ॥ ३ ॥ तुका
म्हणे माप वचनाच्या अंगीं । मौन्य काय रंगीं निवडावें ॥ ४ ॥
३८०३.
परिसाचे अंगें सोनें झाला विळा । वाकणिया कळाहीन नव्हे ॥ १ ॥ अंतरीं पालट
घडला कारण । मग समाधान तेंचि गोड ॥ २ ॥ पिकलिया सेंद पूर्वकर्मा नये ।
अव्हेरू तो काय घडे मग ॥ ३ ॥ तुका म्हणे आणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले
पाकें ॥ ४ ॥
३८०४. शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मांस भिन्न
नाहीं ॥ १ ॥ कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥ २ ॥ उदक भिन्न
असे काई । वोहोळ बावी सरिता नई ॥ ३ ॥ सूर्य तेजें निवडे काय । रश्मी रसा
सकळा खाय ॥ ४ ॥ वर्णां भिन्न दुधा नाहीं । सकळा गाईं सारखें ॥ ५ ॥ करितां
भिन्न नाहीं माती । मडक्या गति भिन्न नांवें ॥ ६ ॥ वर्ते एकविध अग्नि ।
नाहीं मनीं शुद्धाशुद्ध ॥ ७ ॥ तुका म्हणे पात्र चाड । किंवा विष अमृत गोड ॥
८ ॥
३८०५. घालुनियां मापीं । देव भक्त बैसले जपीं ॥ १ ॥ तैसी होते
सांडउलंडी । निजनिजांची मुर्कंडी ॥ २ ॥ अमुपीं उखतें । आपण वोस आपणयातें ॥ ३
॥ देव आतां झाला । उगवी संकोच वहिला ॥ ४ ॥ अखंड नेलें वेठी । भार सत्याविण
गांठी ॥ ५ ॥ आडकिला झोंपा । रिता कलेवराचा खोंपा ॥ ६ ॥ गोदातीरीं आड ।
करिते करविते द्वाड ॥ ७ ॥ तुका म्हणे बळें । उपदेशाचें तोंड काळें ॥ ८ ॥
३८०६.
ब्रह्मरूपाचीं कर्में ब्रह्मरूप । विरहित संकल्प होती जाती ॥ धृ. ॥
ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ २ ॥ नानाभाषामतें
आळविता बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे माझें नमन
जाणतियां । लागतसें पायां वेळोवेळां ॥ ४ ॥
३८०७. स्वयें पाक करी ।
संशय तोचि धरी । संदेहसागरीं । आणिकां परी बुडविती ॥ १ ॥ जाणे विरळा एक ।
झालें तेथेंचि हें सुख । देखिलें बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ २ ॥ तोचि
जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें । नाचती पाल्हाळें । जे विटाळें
कोंडिले ॥ ३ ॥ तोचि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धि । संदेहाच्या संधी ।
वेठी आणीक धरियेले ॥ ४ ॥ अखंड तें ध्यान । समबुद्धि समाधान । सोंग
वांयांविण । तें झांकून बैसती ॥ ५ ॥ करणें जयासाठीं । जो नातुडे कवणे आटी ।
तुका म्हणे साटी । चित्तवित्तेंवाचूनि ॥ ६ ॥
३८०८. प्रसिद्ध हा असे
जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥ १ ॥ तरी वाटा न वजे कोणी । नारायणीं घरबुडीं ॥ २
॥ बहुतां ऐसें केलें मागें । लाग लागे लागेना ॥ ३ ॥ हो कां नर अथवा नारी ।
लहान थोरीं आदर ॥ ४ ॥ झालें वेगळें लोकीं पुरे । मग नुरे समूळ ॥ ५ ॥ कळेना
तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥ ६ ॥ तुका म्हणे दुसऱ्या भावें । छाया
नावें न देखवे ॥ ७ ॥
३८०९. नाहीं रूप नाहीं नांव । नाहीं ठाव धराया
॥ १ ॥ जेथें जावें तेथें आहे । विठ्ठल मायबहीण ॥ २ ॥ नाहीं आकार विकार ।
चराचर भरलेंसे ॥ ३ ॥ नव्हे निर्गुण सगुण । जाणे कोण तयासी ॥ ४ ॥ तुका म्हणे
भावाविण । त्याचें मन वोळेना ॥ ५ ॥
३८१०. अनुसरे तो अमर झाला ।
अंतरला संसारा ॥ १ ॥ न देखती गर्भवास । कधीं दास विष्णूचे ॥ २ ॥ विसंबेना
माता बाळा । तैसा लळा पाळावा ॥ ३ ॥ त्रिभुवनीं ज्याची सत्ता । तुकया
रक्षिता तो जाला ॥ ४ ॥
३८११. पंडित तोचि एक भला । नित्य भजे जो
विठ्ठला ॥ १ ॥ अवघें सम ब्रह्म पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ २ ॥ रिता
नाहीं कोणी ठाव । सर्वां भूतीं वासुदेव ॥ ३ ॥ तुका म्हणे तोचि दास । त्या
देखिल्या जाती दोष ॥ ४ ॥
३८१२. देवें देऊळ सेविलें । उदक कोरडेंचि
ठेविलें ॥ १ ॥ नव्हे मत गूढ उमान कांहीं । तूं आपआपणापें पाहीं ॥ २ ॥ पाटें
पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥ ३ ॥ वांझे घरीं बाळ तान्हा । एक
बाळी दो कांना ॥ ४ ॥ तुका म्हणे पैस । अनुभविया ठावा गोडी रस ॥ ५ ॥
३८१३.
सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अग्नि जैसा ॥ १ ॥
सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥ २ ॥ घडे ज्या उपकार
भूतांची ते दया । आत्मस्थिति तया अंगीं वसे ॥ ३ ॥ न बोले गुणदोष नाइके जो
कानीं । वर्तोनी तो जनीं जनार्दन ॥ ४ ॥ तुका म्हणे वर्म जाणितल्याविण ।
पावे करितां शीण सांडीमांडी ॥ ५ ॥
३८१४. आहे सकळां वेगळा । खेळे कळा
चोरोनि ॥ १ ॥ खांबसूत्राचिये परी । देव दोरी हालवितो ॥ २ ॥ आपण राहोनि
निराळा । कैसी कळा नाचवी ॥ ३ ॥ जेव्हां असुडितो दोरी । भुमीवरी पडे तेव्हां
॥ ४ ॥ तुका म्हणे तो जाणावा । सखा करावा आपला ॥ ५ ॥
३८१५. संवसार
तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्यदारा जया चित्तीं ॥ १ ॥ शुभाशुभ नाहीं
हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगीं होऊनि ठेला ॥ २ ॥ तुका म्हणे देह दिला
एकसरें । जयासि दुसरें नाहीं मग ॥ ३ ॥
३८१६. भक्तीचें तें वर्म
जयाचिये हातीं । तया घरीं शांति क्षमा दया ॥ धृ.॥ अष्ट महा सिद्धि वोळगती
द्वारीं । नवजती दूरी दवडितां ॥ २ ॥ तेथें दुष्ट गुण न मिळे निःशेष ।
चैतन्याचा वास झाला माजी ॥ ३ ॥ संतुष्ट हें चित्त सदा सर्वकाळ । तुटली हळहळ
त्रिगुणाची ॥ ४ ॥ तुका म्हणे त्याचा देव सर्व भार । चालवी कामार होऊनियां ॥
५ ॥
३८१७. देव तिहीं बळें धरिला सायासें । करूनियां नास उपाधीचा ॥ १
॥ पूर्वपक्षी धातु धिक्कारिलें जन । स्वयें जनार्दन तेचि झाले ॥ २ ॥ तुका
म्हणे यासी न चले तांतडी । अनुभवें गोडी येईल कळों ॥ ३ ॥
३८१८.
मुक्त तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥ १ ॥ सुख
पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकांत दंभ करी ॥ २ ॥ तुका म्हणे लागे
थोडाच विचार । परी हे प्रकार नागविती ॥ ३ ॥
३८१९. भूतांचिये नांदे
जीवीं । गोसावीच सकळां ॥ १ ॥ क्षणक्षणां जागा ठायीं । दृढ पायीं विश्वास ॥ २
॥ दावूनियां सोंग दुजें । अंतर बीजें वसतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे जाणें धर्म ।
धरी तें वर्म चिंतन ॥ ४ ॥
३८२०. अग्नीमाजी पडे धातु । लीन होऊनि
राहे आंतु । होय शुद्ध न पावे घातु । पटतंतुप्रमाणें ॥ १ ॥ बाह्यरंगाचें
कारण । मिथ्या अवघेंचि भूषण । गर्व ताठा हें अज्ञान । मरण सवें वाहातसे ॥ २
॥ पुरें मातलिया नदी । लव्हाळा नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी ।
परि तो कधीं भंगेना ॥ ३ ॥ हस्ती परदळ जो भंगी । तया पायीं न मरे मुंगी ।
कोण जाय संगीं । पाणोवाणी तयाच्या ॥ ४ ॥ पिटितां घणें वरी सैरा । तया पोटीं
राहे हिरा । तैशा काय तगती गारा । तया थोरा होऊनि ॥ ५ ॥ लीन दीन हेंचि सार
। भव उतरावया पार । बुडे माथां भार । तुका म्हणे वाहोनि ॥ ६ ॥
३८२१.
योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभयलोकीं कीर्ति सोहळा मान ॥ १ ॥
येरयेरांवरी जायांचें उसणें । भाग्यस्थळीं देणें झाडा वेसीं ॥ २ ॥ केलीया
फावला ठायींचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काहवितो ॥ ३ ॥ तुका म्हणे लाभ
अकर्तव्या नांवें । शिवपद जीवें भोगिजेल ॥ ४ ॥
३८२२. ओनाम्याच्या
काळें । खडे मांडविले बाळें ॥ १ ॥ तेंचि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥
२ ॥ रज्जु सर्प होता । तोंवरी न कळतां ॥ ३ ॥ तुका म्हणे साचें । भय नाहीं
बागुलाचें ॥ ४ ॥
३८२३. आहे तें सकळ कृष्णासि अर्पण । न कळतां मन
दुजें भावी ॥ १ ॥ म्हणऊनि पाठी लागतील भुतें । येती गिवसीत पांचजणें ॥ २ ॥
ज्याचें त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥ ३ ॥ तुका
म्हणे काळें चेपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥ ४ ॥
३८२४.
देवाच्या उद्देशें जेथें जेथें भाव । तो तो बसे ठाव विश्वंभर ॥ १ ॥ लोभाचे
संकल्प पळालियावरी । कैंची तेथे उरी पापपुण्या ॥ २ ॥ शुद्ध भक्ती मन झालिया
निर्मळ । कुश्चळी विटाळ वज्रलेप ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्याचें तयासीच कळे ।
प्रांत येतो फळें कळों मग ॥ ४ ॥
३८२५. चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें
काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥ १ ॥ मनासी विचार तोचि साच भाव । व्यापक
हा देव अंतर्बाहीं ॥ २ ॥ शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार
आणिके ठायीं ॥ ३ ॥ भोगित्यासी काज अंतरींचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं
रंगें ॥ ४ ॥ तुका म्हणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होईल त्याचा ॥ ५ ॥
३८२६.
कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता । राहे भाव चित्ता धरोनियां ॥ १ ॥ धन्य
तो जगीं धन्य तो जगीं । विठू तया अंगीं वसतसे ॥ २ ॥ न धोवी तोंड न करी
अंघोळी । जपे सदाकाळीं रामराम ॥ ३ ॥ जप तप ध्यान नेणे योग युक्ती । कृपाळु
जो भूतीं दयावंत ॥ ४ ॥ तुका म्हणे होय जाणोनि नेणता । आवडे अनंता जीवाहूनि ॥
५ ॥
३८२७. भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥ १ ॥ तैसे
वोसपले जीव । सांडी नसतां अंगीं घाव ॥ २ ॥ जीव अवघे देव । खोटा नागवी संदेह
॥ ३ ॥ तुका म्हणे शुद्ध । मग तुटलिया भेद ॥ ४ ॥
३८२८. निघालें
दिवाळें । झालें देवाचें वाटोळें ॥ १ ॥ आतां वेचूं नये वाणी । विचारावें
मनिंच्या मनीं ॥ २ ॥ गुंडाळिलीं पोतीं । भीतरी लावियेली वाती ॥ ३ ॥ तुका
म्हणे करा । ऐसा राहे माजी घरा ॥ ४ ॥
३८२९. भूतीं भगवद्भाव ।
मात्रासहित जीव । अद्वैत तो ठाव । निरंजन एकला ॥ १ ॥ ऐसीं गर्जती पुराणें ।
वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणें । अनुभवें निर्भर ॥ २ ॥ माझें तुझें
हा विकार । निरसतां एकंकार । नलगे कांहीं फार । विचारचि करणें ॥ ३ ॥ तुका
म्हणे दुजें । हें तों नाहींच सहजें । संकल्पाच्या काजें । आपेंआप वाढलें ॥
४ ॥
३८३०. मुक्त होता परि बळें झाला बद्ध । घेऊनियां छंद माझें
माझें ॥ १ ॥ पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणें कोण करिता तो ॥ २ ॥
तुका म्हणे गेलें व्यर्थ वायांविण । जैसा मृग शीण मृगजळीं ॥ ३ ॥
३८३१.
प्रगटलें ज्ञान । नारायण भूतीं तें ॥ १ ॥ अनुभवचि घेऊं हावा । विनंती देवा
करूनियां ॥ २ ॥ देखोवेखीं वदे वाणी । पडिल्या कानीं प्रमाण ॥ ३ ॥ तुका
म्हणे योगक्षेम । घडे तें वर्म साधावें ॥ ४ ॥
३८३२. देव आहे सुकाळ
देशीं । अभाग्यासी दुर्भिक्ष ॥ १ ॥ नेणती हा करूं सांटा । भरले फांटा
आडरानें ॥ २ ॥ वसवूनि असे घर । माग दूर घातला ॥ ३ ॥ तुका म्हणे मन मुरे ।
मग जें उरे तेंचि तूं ॥ ४ ॥
३८३३. आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं
ऐसा मनीं अनुभवावा ॥ १ ॥ आवडी आवडी कलेवरा कलेवरीं । वरिलें अंतरीं ताळा
पडे ॥ २ ॥ अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडे मागे तुटी हर्षयोगें ॥ ३ ॥
तुका म्हणे एकें कळतें दुसरें । बरियानें बरें आहाचें आहाच ॥ ४ ॥
३८३४.
होईल झाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥ १ ॥ येरांनीं
सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ २ ॥ धाला आणिकांची नेणे
तहानभूक । सुखें पाहे सुख आपुलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें पाहिजे अनुभव ।
शब्दांचें गौरव कामा नये ॥ ४ ॥
३८३५. तेंही नव्हे जें करितां कांहीं
। ध्याता ध्यायी तेंही नव्हे ॥ १ ॥ तेंही नव्हे जें जाणवी जना । वाटे मना
तेंही नव्हे ॥ २ ॥ त्रास मानिजे कांटाळा । अशुभ वाचाळा तेंही नव्हे ॥ ३ ॥
तेंही नव्हे जें भोंवतीं भोंवे । नागवें धावें तेंही नव्हे ॥ ४ ॥ तुका
म्हणे एकचि आहे । सहजिं पाहें सहज ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३८३६. पहिली
माझी ओवी ओवीन जगत्र । गाईन पवित्र पांडुरंग ॥ १ ॥ दुसरी माझी ओवी दुजें
नाहीं कोठें । जनीं वनीं भेटे पांडुरंग ॥ २ ॥ तिसरी माझी ओवी तिला नाहीं
ठाव । अवघाचि देव जनीं वनीं ॥ ३ ॥ चवथी माझी ओवी वैरिलें दळण । गाईन निधान
पांडुरंग ॥ ४ ॥ पांचवी माझी ओवी माझिया माहेरा । गाईन निरंतरा पांडुरंगा ॥ ५
॥ साहावी माझी ओवी साहाही आटली । गुरुमूर्ति भेटली पांडुरंग ॥ ६ ॥ सातवी
माझी ओवी आठवीं वेळोवेळां । बैसलासे डोळां पांडुरंग ॥ ७ ॥ आठवी माझी ओवी
अठ्ठावीस युगें । उभा चंद्रभागे पांडुरंग ॥ ८ ॥ नववी माझी ओवी सरले दळण ।
चुकलें मरण संसारींचें ॥ ९ ॥ दहावी माझी ओवी दहा अवतारा । न यावें संसारा
तुका म्हणे ॥ १० ॥ (धृ. नाही)
३८३७. क्षणक्षणां सांभाळितों । साक्षी
होतों आपुला ॥ १ ॥ न घडवी पायीं तुटी । मनें मिठी घातली ॥ २ ॥ विचार तो
वचना आधीं । धरूनि शुद्धी ठेविली ॥ ३ ॥ तुका म्हणे मागें भ्यालों । तरी
झालों जागृत ॥ ४ ॥
३८३८. भक्ति तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान
ब्रह्मीं भोग ब्रह्मतनु ॥ १ ॥ देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी
काया जंव नव्हे ॥ २ ॥ उदक अग्नि धान्य झाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये
॥ ३ ॥ तुका म्हणे मज कळते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥ ४ ॥
३८३९.
देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिऱ्याऐसी केवीं गारगोटी ॥ १ ॥ मर्यादा ते
जाणे अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ति ॥ २ ॥ काय पडिलासी लटिक्याचे
भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडी ॥ ३ ॥ तुका म्हणे पुढें दिसतसे घात ।
करितों फजित म्हणऊनि ॥ ४ ॥
३८४०. आधीं सोज्वळ करावा मारग । चालतां ते
मग गोवी नाहीं ॥ १ ॥ ऐसा चालोनियां आला शिष्टाचार । गाेवीचा वेव्हार
पापपुण्य ॥ २ ॥ पळणें ते पळा सांडूनि कांबळें । उपाधीच्या मुळें लाग पावे ॥
३ ॥ तुका म्हणे येथें शूर तो निवडे । पडिलें बापुडे काळचक्रीं ॥ ४ ॥
३८४१.
एकविध नारायण । तेथें विषमाचा शीण । पालटोंचि भिन्न । नये अणुप्रमाण ॥ १ ॥
अवघें सारावें गाबाळ । चुकवूनियां कोल्हाळ । आनंदाचें स्थळ । एकाएकीं
एकांत ॥ २ ॥ कायावाचामन । स्वरूपींच अनुसंधान । लक्ष भेदी बाण । येणेंपाडें
लवलाहो ॥ ३ ॥ तुका म्हणे आळस निद्रा । येथें देऊनियां चिरा । देऊनियां
धीरा । मिठी जाणा जागृती ॥ ४ ॥
३८४२. शुद्ध ऐसें आत्मज्ञान । करा मन
सादर ॥ १ ॥ रवि रसां सकळां शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ २ ॥ कोणासवें नाहीं
चोरी । सकळांवरी समत्व ॥ ३ ॥ सत्य तरी ऐसें आहे । तुका पाहे उपदेशीं ॥ ४ ॥
३८४३.
जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे ॥ १ ॥ सहज पूजा याचि नांवें ।
गळित अभिमान व्हावें ॥ २ ॥ अवघें भोगिता गोसावी । आदीं अवसानीं जीवीं ॥ ३ ॥
तुका म्हणे शीण । न धरितां नव्हे भिन्न ॥ ४ ॥
३८४४. अक्षरांचा श्रम
केला । फळा आला तेणें तो ॥ १ ॥ अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरवुनी ॥ २ ॥
फळलें तें लवे भारें । पिक खरें आलें तईं ॥ ३ ॥ तुका म्हणे हा गे देव ।
पुढें भाव सारावा ॥ ४ ॥
३८४५. संदेह बाधक आपआपणातें । रज्जुसर्पवत
भासतसे । भेऊनियां काय देखिलें येणें । मारें घायेंविण लोळतसे ॥ १ ॥ आपणचि
तारी आपणचि मारी । आपण उद्धरी आपणयां । शुकनळिकेन्यायें गुंतलासी काय ।
विचारूनि पाहें मोकळिया ॥ २ ॥ पापपुण्य कैसे भांजिले अंक । दशकाचा एक
उरविला । जाणोनियां काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाहीं नाहीं ॥ ३ ॥
दुरा दृष्टी पाहें न्याहाळूनि । मृगजळा पाणी न म्हणे चाडा । धांवतांचि फुटे
नव्हे समाधान । तुका म्हणे जाण पावे पीडा ॥ ४ ॥
३८४६. आशा ते
करविते बुद्धीचा तो लोप । संदेह तें पाप कैसें नव्हे ॥ १ ॥ आपुला आपण करावा
विचार । प्रसन्न तें सार मन ग्वाही ॥ २ ॥ नांवें रूपें अंगीं लाविला विटाळ
। होतें तें निर्मळ शुद्ध बुद्ध ॥ ३ ॥ अंधळ्यासी नये देखण्याची चाली ।
चाले ऐसी बोली तुका बोले ॥ ४ ॥
३८४७. साहोनियां टोले उरवावें सार ।
मग अंगीकार खऱ्या मोलें ॥ १ ॥ भोगाचे सांभाळीं द्यावें कलेवर । संचिताची
थार मोडूनियां ॥ २ ॥ महत्त्वाचे ठायीं भोगावी अप्रतिष्ठा । विटवावें नष्टां
पंचभूतां ॥ ३ ॥ तुका म्हणे मग कैंचा संवसार । जयाचा आदर तेंचि व्हावें ॥ ४
॥
३८४८. भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करूनि ठेवा ॥ १ ॥ शांती
धरणें जिवासाटीं । दशा उत्तम गोमटी ॥ २ ॥ देह लेखावा असार । सत्य परउपकार ॥
३ ॥ तुका म्हणे हे मिरासी । बुडी द्यावी विठुरसीं ॥ ४ ॥
३८४९.
नटनाट्य अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥ १ ॥ मांडियेला खेळ
कौतुकें बहुरूप । आपलें स्वरूप जाणतसों ॥ २ ॥ स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे ।
भाव दावी पिंवळे लाल संगें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि
निश्चिंत क्रीडा करूं ॥ ४ ॥
३८५०. काय नव्हेसी तूं एक । देखो कासया
पृथक ॥ १ ॥ मुंग्या कैचे मुंगळे । नटनाट्य तुझे चाळे ॥ २ ॥ जाली तरी
मर्यादा । किंवा त्रासावें गोविंदा ॥ ३ ॥ तुका म्हणे साचा । कोठें जासी
हृदयींचा ॥ ४ ॥
३८५१. मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ
दावीं देवा ॥ १ ॥ कोणाचा कोणासीं न धरें संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे
ठायीं ॥ २ ॥ काढा जी आपुलें मोह बुंथी जाळें । नका लावूं बळें वेड आम्हां ॥
३ ॥ जीव शिव कांहीं ठेवियेलीं नांवें । सत्य तुम्हां ठावें असोनियां ॥ ४ ॥
सेवेच्या अभिळासें न धराचि विचार । आम्हां दारोदार हिंडविलें ॥ ५ ॥ आहे
तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दूरी दुजेपण ॥ ६ ॥ तुका म्हणे काय
छायेच्या अभिळासें । हंस पावे नाश तारांगणी ॥ ७ ॥
३८५२. आपुलें आपण
जाणावें स्वहित । जेणें राहे चित्त समाधान ॥ १ ॥ बहुरंगें माया असे विखुरली
। कुंठितचि चाली होतां बरी ॥ २ ॥ पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारीं । भाव
विश्वंभरीं समर्पावा ॥ ३ ॥ तुका म्हणे गेला फिटोनियां भेव । मग होतो देव
मनाचाचि ॥ ४ ॥
३८५३. चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ
उदकासी ॥ १ ॥ सोपें वर्म परि मन नाहीं हातीं । हा हा भूत चित्तीं भ्रम गाढा
॥ २ ॥ रविबिंब नाहीं तुटत उदका । छायेची ते नका सरी धरूं ॥ ३ ॥ तुका म्हणे
भय धरी रज्जुसाठीं । नाहीं साच पोटीं कळलें तों ॥ ४ ॥
३८५४. दुजें
खंडे तरी । उरला तो अवघा हरि । आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥ १ ॥
इतुलें जाणावया जाणा । कोड तरी मनें मना । पारधीच्या खुणा । जाणतेणेचि
साधाव्या ॥ २ ॥ देह आधीं काय खरा । देहसंबंधपसारा । बुजगावणें चोरा ।
रक्षणसें भासतें ॥ ३ ॥ तुका करी जागा । नको वासपूं वाउगा । आहेसि तूं अंगा ।
अंगीं डोळे उघडी ॥ ४ ॥
३८५५. मृगजळा काय करावा उतार । पावावया पार
पैलथडी ॥ १ ॥ खापराचे होन खेळती लेंकुरें । काय त्या वेव्हारें लाभ हानी ॥ २
॥ मंगळदायकें करिती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥ ३ ॥ स्वप्नींचें
जें सुख दुःख झालें कांहीं । जागृतीं तो नाहीं साच भाव ॥ ४ ॥ सारी झाली
मेली लटिकें वचन । बद्ध मुक्त शीण तुका म्हणे ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३८५६.
माया तेंचि ब्रह्म ब्रह्म तेंचि माया । अंग आणि छाया जयापरी ॥ धृ. ॥
तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणतळीं हारपती ॥ २ ॥ दुजें नाहीं
तेथें बळ कोणासाठीं । आणीक ते आटी विचाराची ॥ ३ ॥ तुका म्हणे उंच वाढे
उंचपणें । ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥ ४ ॥
३८५७. सहज पावतां
भगवंतीं । परि हीं विकल्पें परतीं । फुकाची हे चित्तीं । आठवण न धरिती ॥ १ ॥
हरि व्यापक सर्वगत । हा तंव मुख्यत्वें वेदांत । चिंतनासी चित्त । असों
द्यावें सावध ॥ २ ॥ विरजाहोम याचि नांवें । देह नव्हे मी हें जाणावें । मग
कां जी यावें । वरी लागे संकल्पा ॥ ३ ॥ कामक्रोधें देह मळिण । स्वाहाकारी
कैंचें पुण्य । मंत्री पूजिलिया यज्ञानें । मुंडण नव्हेचि ॥ ४ ॥
अनन्यभक्तीचे उपाय । ते या विठोबाचे पाय । ध्याइल तो काय । चुकों जाणे मारग
॥ ५ ॥ आतां सांगे तुका । एक तुम्ही चुकों नका । सांडीमांडी धोका । शरण
रिघतां गोमटें ॥ ६ ॥
३८५८. हेचि याच्या ऐसें मागावें दान । वंदुनि
चरण नारायणा ॥ १ ॥ धीर उदारींव निर्मळ निर्मत्सर । येणें सर्वेश्वर ऐसें
नांव ॥ २ ॥ हाचि होईजेल याचिया विभागें । अनुभव अंगें अनुभवील्या ॥ ३ ॥
जोडे तयाचे कां न करावे सायास । झाला तरि आळस दीनपणें ॥ ४ ॥ फांवल्या मागें
का न घलावी धांव । धरिल्या तरि हांव बळ येतें ॥ ५ ॥ तुका म्हणे घालूं
खंडीमध्यें टाक । देवाचें हें एक करूनि घेऊं ॥ ६ ॥
३८५९. इच्छा चाड
नाहीं । न धरी संकोचही कांहीं ॥ १ ॥ उदका नेलें तिकडे जावें । केलें तैसें
सहज व्हावें ॥ २ ॥ मोहरी कांदा ऊस । एक वाफा भिन्न रस ॥ ३ ॥ तुका म्हणे सुख
। पीडा इच्छा पावे दुःख ॥ ४ ॥
३८६०. सर्वस्वाची साटी । तरिच
देवासवें गांठी ॥ १ ॥ नाहीं तरी जया तैसा । भोग भोगविल इच्छा ॥ २ ॥ द्यावें
तेंचि घ्यावें । म्हणऊनि ज्यावें जीवें ॥ ३ ॥ तुका म्हणे उरी । मागें
नुरवितां बरी ॥ ४ ॥
३८६१. अमर आहां अमर आहां । खरें कीं पहा खोटें
हे ॥ १ ॥ न म्हणा देह माझा ऐसा । मग भरंवसा कळेल ॥ २ ॥ कैंचा धाक कैंचा धाक
। सकळिक हें आपुलें ॥ ३ ॥ देवचि बरे देवचि बरे । तुका म्हणे खरे तुम्ही ॥ ४
॥
३८६२. सरतें माझें तुझें । तरि हें उतरतें ओझें ॥ १ ॥ नलगे
सांडावें मांडावें । आहे शुद्धचि स्वभावें ॥ २ ॥ घातला तो आशा । मोहोजाळें
गळां फासा ॥ ३ ॥ सुखाचा तो मान । नाहीं दुःखाचा ताे शीण ॥ ४ ॥ करितां
नारायण । एवढें वेचितां वचन ॥ ५ ॥ तैसा मान अपमान । लाभ हानि हे समान ॥ ६ ॥
तुका म्हणे याचें । नांव सांवळें हें साचें ॥ ७ ॥
३८६३. चित्ताचें
बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ ॥ १ ॥ अंतरीं वसावी उत्तम
ते भेटी । होऊं कांहीं तुटी न शकेची ॥ २ ॥ ब्रह्मांड कवळे आठवणेसाठीं ।
धरावा तो पोटीं वाव बरा ॥ ३ ॥ तुका म्हणे लाभ घरीचिया घरीं । प्रेमतंतु
दोरी न तुटतां ॥ ४ ॥
३८६४. नाहीं शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे
तंत्रीं मंत्रीं अनुभव तो ॥ १ ॥ हर्षामर्षा अंगीं आदळती लाटा । कामक्रोधें
तटा सांडियेलें ॥ २ ॥ न सरे ते भक्ति विठोबाचे पायीं । उपरति नाहीं जेथें
चित्ता ॥ ३ ॥ तुका म्हणे सुख देहनिरसनें । चिंतनें चिंतन तद्रूपता ॥ ४ ॥
३८६५.
देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुख येथें नाम आहे ॥ १ ॥ ब्रह्म जें
देखणें द्वैत जेव्हां गेलें । शरीर तें झालें ब्रह्मरूप ॥ २ ॥ यजन याजन तप
व्रतें करिती । विकल्पें नागवती शुद्ध पुण्या ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्व सुख
येथें आहे । भ्रांति दूर पाहें टाकुनियां ॥ ४ ॥
३८६६. साधावा तो देव
सर्वस्वाचे साटीं । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥ १ ॥ मग कासयानें पुन्हां
संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥ २ ॥ जिणें दिल्हें त्यासी द्यावा
पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावें ॥ ३ ॥ तुका म्हणे निज भोगईल निजतां ।
नाहीं होईल सत्ता दुजियाची ॥ ४ ॥
३८६७. विष्णुमय जग वैष्णवांचा
धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥ १ ॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित
सत्य करा ॥ २ ॥ कोणाही जीवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचें ॥ ३
॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥ ४ ॥
३८६८.
पुसावें तें ठाईं आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालुनियां ॥ १ ॥ येर
वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशीं थार अज्ञान ते ॥ २ ॥ फळ तेंचि बीज बीज
तेंचि फळ । उपनांवें मूळ न पालटे ॥ ३ ॥ तुका म्हणे अवघे गव्हांचे प्रकार ।
सोनें अळंकार मिथ्या नांव ॥ ४ ॥
३८६९. पंचभूतांचा गोंधळ । केला एके
ठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥ १ ॥ तेथें काय मी तें माझें ।
कोण वागवी तें ओझें । देहा केवीं रिझे । हे काळाचें भातुकें ॥ २ ॥ जीव न
देखें मरण । धरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोग शुभा अशुभासी ॥ ३ ॥
इच्छा वाढविते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकलें तों
पावेल ॥ ४ ॥
३८७०. मी हें ऐसें काय जाती । अवघड किती पाहातां ॥ १ ॥
नाहीं होत उल्लंघन । नसतां भिन्न दुसरें ॥ २ ॥ अंधारानें तेज नेलें ।
दृष्टीखालें अंतर ॥ ३ ॥ तुका म्हणे सवें देव । घेतां ठाव दावील ॥ ४ ॥
३८७१.
मुक्त कासया म्हणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥ १ ॥ सुखें करितों कीर्तन ।
भय विसरलें मन ॥ २ ॥ देखिजेना नास । घालूं कोणावरी कास ॥ ३ ॥ तुका म्हणे
साहे । देव आहे तैसा आहे ॥ ४ ॥
३८७२. रूप नांव माया बोलावया ठाव ।
भागा आले भाव तयावरी ॥ १ ॥ शींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवीं
समजती ॥ २ ॥ पोटा आलें तिच्या लोळे मांडीवरी । पारखी न करी खंती चित्तीं ॥ ३
॥ तुका म्हणे भक्तिसाठीं हरिहर । अरूपीच क्षरविभाग हे ॥ ४ ॥
३८७३.
सुख सुखा विरजण झालें । तें मथिलें नवनीत ॥ १ ॥ हाले डोले हरुषे काया ।
निवती बाह्या नयन ॥ २ ॥ प्रबळ तो नारायण । गुणें गुण वाढला ॥ ३ ॥ तुका
म्हणे भरली शीग । घरी मग वोसंडे ॥ ४ ॥
३८७४. कासया जी ऐसा माझे
माथां ठेवा । भार तुम्ही देवा संतजन ॥ १ ॥ विचित्र विंदानी नानाकळा खेळे ।
नाचवी पुतळे नारायण ॥ २ ॥ काय वानरांचे अंगीची ते शक्ति । उदका तरती वर
शिळा ॥ ३ ॥ तुका म्हणे करी निमित्यचि आड । चेष्टवूनि जड दावी पुढें ॥ ४ ॥
३८७५.
देवाची भांडारी । आदा विनियोग करी ॥ १ ॥ आतां नमाखे हातपाय । नेणों होतें
कैसें काय ॥ २ ॥ देवें नेली चिंता । झाला सकळ करिता ॥ ३ ॥ तुका म्हणे धणी ।
त्यासी अवधी पुरवणी ॥ ४ ॥
३८७६. आतां येणेंविण नाहीं मज चाड । कोण
बडबड करी वांयां ॥ १ ॥ सुख तेंचि दुःख पुण्य पाप खरें । हें तों आम्हां
बरें कळों आलें ॥ २ ॥ तुका म्हणे वाचा वाहिली अनंता । बोलायाचें आतां काम
नाहीं ॥ ३ ॥
३८७७. बहुतां जातीचा केला अंगीकार । बहुतही फार
सर्वोत्तमें ॥ १ ॥ सरलाचिं नाहीं कोणाचिये वेचें । अक्षोभ्य ठायीचें ठायीं
आहे ॥ २ ॥ लागतचि नाहीं घेतां अंतपार । वसवी अंतर अणूचेंही ॥ ३ ॥ तुका
म्हणे केला होय ठाकी ऐसा । पुरवावी इच्छा धरिली ते ॥ ४ ॥
३८७८.
नव्हे शब्द एक देशी । सांडी गिवशी कोणाला ॥ १ ॥ झाली माझी वैखरी ।
विश्वंभरी व्यापक ॥ २ ॥ मोकलिलें जावें बाणें । भाता जेणें वाहिला ॥ ३ ॥
आतां येथें कैंचा तुका । बोले शिक्का स्वामीचा ॥ ४ ॥
३८७९. आपुलें
तों कांहीं । येथें सांगिजेसें नाहीं ॥ १ ॥ परि हे वाणी वायचळे । छंद
करवितें बरळे ॥ २ ॥ पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वें निराळा ॥ ३ ॥ तुका
म्हणे भुली । इच्या उफराट्या चाली ॥ ४ ॥
३८८०. हीन शूर बुद्धीपासीं ।
आकृतीसी भेद नाहीं ॥ १ ॥ एक दांडी एक खांदी । पदोपदीं भोगणें ॥ २ ॥
एकाऐसें एक नाहीं । भिन्न पाहीं प्रकृती ॥ ३ ॥ तुका म्हणे भूमी खंडे । पीक
दंडे जेथें तें ॥ ४ ॥
३८८१. देवासी तो पुरे एकभाव गांठी । तोचि
त्याचे मिठी देईल पायीं ॥ १ ॥ पाहोनि राहीन कवतुकें निराळा । मी मजवेगळा
होऊनियां ॥ २ ॥ कांहीं नेघें शिरीं निमित्ताचा भार । नलगे उत्तर वेचावेंचि ॥
३ ॥ तुका म्हणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटों येत ॥ ४ ॥
३८८२.
जाय तिकडे लागे पाठी । नाहीं तुटी आठवाची ॥ १ ॥ हिरोनियां नेलें चित्त ।
माझें थीत भांडवल ॥ २ ॥ दावूनियां रूप डोळां । मन चाळा लावियलें ॥ ३ ॥ आणीक
तोंडा पडिली मिठी । कान गोठी नाइकती ॥ ४ ॥ बोलिल्याचा आठव न घडे । वाणी
ओढे ते सोई ॥ ५ ॥ तुका म्हणे प्रेमधगी । भरली अंगीं अखंड ॥ ६ ॥
३८८३.
देवाचे घरीं देवें केली चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ॥ १ ॥
धांवणियां धांवा धांवणियां धांवा । मागचि नाहीं जावें कवणिया गांवा ॥ २ ॥
सवेंचि होता चोर घरीचिया घरीं । अवघें केलें वाटोळें फांवलियावरी ॥ ३ ॥
तुका म्हणे येथें कोणीच नाहीं । नागवलें कोण गेलें कोणाचें काई ॥ ४ ॥
३८८४.
झालें आतां साठे । कासयाचें लहान मोठे ॥ १ ॥ एक एका पडिलों हातीं । झाली
तेव्हांची निश्चिंती ॥ २ ॥ नाहीं फिरों येत मागें । झालें साक्षीचिया अंगें
॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । आतां येथें नाहीं हेवा ॥ ४ ॥
३८८५. वचनें
ही नाड । न बोलतें मुकें खोड ॥ १ ॥ दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत
॥ २ ॥ अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥ ३ ॥ बीज पृथिवीच्या पोटीं ।
तुका म्हणे दावी दृष्टी ॥ ४ ॥
३८८६. वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥
१ ॥ संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ २ ॥ संकल्प विकल्प । मावळोनि
पुण्यपाप ॥ ३ ॥ तुका म्हणे काळ । अवघा गोविंदीं सुकाळ ॥ ४ ॥
३८८७.
याजसाठीं भक्ति । जगीं रूढवावया ख्याति ॥ १ ॥ नाहीं तरी कोठें दुजें । आहे
बोलावया सहजें ॥ २ ॥ गौरवावयासाठीं । स्वामिसेवेची कसोटी ॥ ३ ॥ तुका म्हणे
अळंकारा । देवभक्त लोकीं खरा ॥ ४ ॥
३८८८. निरंजनीं एकटवाणें । संग
नेणें दुसरा ॥ १ ॥ पाहा चाळविलें कैसें । लावूनि पिसें गोवळें ॥ २ ॥
लपविलें अंगें अंग । दिला संग होता तो ॥ ३ ॥ तुका म्हणे नव्हतें ठावें ।
झालें भावें वाटोळें ॥ ४ ॥
३८८९. जरी हा हो कृपा करिल नारायण । तरी
हेंचि ज्ञान ब्रह्म होय ॥ १ ॥ कोठोनियां कांहीं नलगे आणावें । नलगे कोठें
जावें तरावया ॥ २ ॥ जरी देव कांहीं धरिल पैं चित्तीं । तरि हेचि होती दिव्य
चक्षु ॥ ३ ॥ तुका म्हणे देव दावील आपणा । तरि जीवपणा ठाव नाहीं ॥ ४ ॥
३८९०.
अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥ १ ॥ याची झाली बोळवण । आतां न देखो तो शीण ॥
२ ॥ बहुतांची दासी । तये घरीं सासुरवासी ॥ ३ ॥ तुका म्हणे मुळें । खंड
झाला एक वेळे ॥ ४ ॥
३८९१. वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥ १ ॥
जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ २ ॥ काळा नाहीं वाव । पराश्रमा
कोठें ठाव ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥ ४ ॥
३८९२.
माझ्या मुखें मज बोलवितो हरि । सकळांच्या अंतरीं नारायण ॥ १ ॥ न करावा
द्वेष भूतांचा मत्सर । हा तंव विचार जाणों आम्हीं ॥ २ ॥ तुका म्हणे दोष
नाहीं या विचारें । हिताचीं उत्तरें शिकवितां ॥ ३ ॥
३८९३.
उंबरांतील कीटका । हेंचि ब्रह्मांड ऐसें लेखा ॥ १ ॥ ऐसीं उंबरें किती झाडीं
। ऐसीं झाडें किती नव खंडीं ॥ २ ॥ हेंचि ब्रह्मांड आम्हांसी । ऐसीं अगणित
अंडें केशीं ॥ ३ ॥ विराटाचे अंगीं तैसे। मोजूं जातां अगणित केश ॥ ४ ॥ ऐशा
विराटाच्या कोटी । सांठवल्या ज्याच्या पोटीं ॥ ५ ॥ तो हा नंदाचा बाळमुकुंद ।
तान्हा म्हणवी परमानंद ॥ ६ ॥ ऐशी अगम्य ईश्वरी लीला । ब्रह्मानंदीं गम्य
तुक्याला ॥ ७ ॥ (धृ. नाही)
३८९४. भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट ।
संचिताची वाट । वाटा होऊनि फांकती ॥ १ ॥ भोगा ऐसे ठायाठाव । कर्मा
त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथें देव । विरहित संकल्पा ॥ २ ॥ दिला पाडुनियां
धडा । पापपुण्याचा निवाडा । आचरती गोडा । आचरणें आपुलाल्या ॥ ३ ॥ तुका
म्हणे पराधीनें । झालीं ओढलीया ऋणें । तुटती बंधनें । जरि देवा आळविती ॥ ४ ॥
३८९५.
तोंचि हीं क्षुल्लकें सखीं सहोदरें । नाहीं विश्वंभरें वोळखी तों ॥ १ ॥
नारायण विश्वंभर विश्वपिता । प्रणाम तो होतां सकळ मिथ्या ॥ २ ॥ रवि नुगवें
तों दीपिकांचें काज । प्रकाशें तें तेज सहज लोपे ॥ ३ ॥ तुका म्हणे
देहसंबंधें संचितें । कारण निरूतें नारायणीं ॥ ४ ॥
३८९६. विठुरसगोडी
तयासी फावली । वासना निमाली समूळ ज्याची ॥ १ ॥ नाहीं त्या विटाळ अखंड
सोंवळा । उपाधीवेगळा जाणिवेच्या ॥ २ ॥ मन हें निश्चळ झालें एके ठायीं । तया
उणें काई निजसुखा ॥ ३ ॥ तेचि पुण्यवंत तेचि परउपकारी । प्रबोधी त्या
नारीनरलोकां ॥ ४ ॥ तुका म्हणे त्याचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन
तेथें ॥ ५ ॥
३८९७. नेसणें आलें होतें गळ्या । लोक रळ्या करिती ॥ १ ॥
आपणियां सावरिलें । जग भलें आपण ॥ २ ॥ संबंध तो तुटला येणें । जागेपणें
चेष्टांच्या ॥ ३ ॥ भलती सवा होती अंगें । वासर वेगें पडिलें ॥ ४ ॥ सावरिलें
नीट वोजा । दृष्टिलाजा पुढिलांच्या ॥ ५ ॥ बरे उघडिले डोळे । हळहळेपासूनि ॥
६ ॥ तुका म्हणे विटंबना । नारायणा चुकली ॥ ७ ॥
३८९८. पावे ऐसा नाश ।
अवघियां दिला त्रास ॥ १ ॥ अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ २ ॥
आइताच पाक । संयोगाचा सकळिक ॥ ३ ॥ तुका म्हणे धणी । सीमा राहिली होऊनि ॥ ४
॥
३८९९. इच्छावें तें जवळी आलें । काय बोलें कारण ॥ १ ॥ नामरूपीं
पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ २ ॥ मुकियाचे परी जीवीं । साकर जेवीं
खादली ॥ ३ ॥ तुका म्हणे काय बोलें । आतां भले मौन्यची ॥ ४ ॥
३९००.
देव आड आला । तो मी भोगितो उगला । अवघा निवारिला । शीण शुभअशुभाचा ॥ १ ॥
जीवशिवाचे भातुकें । केलें क्रिडाया कौतुकें । कैचीं येथें लोकें । हा आभास
अनित्य ॥ २ ॥ विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वाटिले विभाग ।
वर्णधर्म हा खेळ ॥ ३ ॥ अवघी एकाचीच वीण । तेथें कैचें भिन्नाभिन्न ।
वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ॥ ४ ॥ प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस
। पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा ॥ ५ ॥
३९०१. दाता नारायण ।
स्वयें भोगितां आपण ॥ १ ॥ आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ २ ॥
देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥ ३ ॥ तुका म्हणे नाद । झाला अवघा
गोविंद ॥ ४ ॥
३९०२. अक्षई तें झालें । आतां न मोडे रचिलें ॥ १ ॥
पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥ २ ॥ होतें विखुरलें ।
ताळा जमे झडतीं आलें ॥ ३ ॥ तुका म्हणे बोली । पुढें कुंठितचि झाली ॥ ४ ॥
३९०३.
मन वोळी मना । बुद्धि बुद्धि क्षणक्षणां ॥ १ ॥ मीच मज राखण झालों ।
ज्यानें तेथेंचि धरिलों ॥ २ ॥ जें जें जेथें उठीं । तें तें तया हातें
खुंटी ॥ ३ ॥ भांजणी खांजनी । तुका साक्ष उरला दोन्हीं ॥ ४ ॥
३९०४.
एकवेळ प्रायश्चित्त । केले चित्त मुंडण ॥ १ ॥ अहंकारा नांवें दोष । त्याचे
वोस पाडिले ॥ २ ॥ अनुतापें स्नानविधि । यज्ञ सिद्धि देहहोम ॥ ३ ॥ जीवशिवा
होता चुका । तेथें तुका विनटला ॥ ४ ॥
३९०५. उत्तम घालावें आमुचिये
मुखीं । निवारावें दुःखी होऊं नेदी ॥ १ ॥ न बैसे न वजे जवळूनि दूरी । मागें
पुढें वारी घातपात ॥ २ ॥ नाहीं शंका असो भलतिये ठायीं । मावळलें पाही
द्वैताद्वैत ॥ ३ ॥ तुका म्हणे भार घेतला विठ्ठलें । अंतरीं भरलें बाह्य रूप
॥ ४ ॥
३९०६. सांपडला हातीं । तरी झाली हे निश्चिंती ॥ १ ॥ नाहीं
धांवा घेत मन । इंद्रियांचें समाधान ॥ २ ॥ सांडियला हेवा । अवघा संचिताचा
ठेवा ॥ ३ ॥ तुका म्हणे काम । निरसुनियां घेतों नाम ॥ ४ ॥
३९०७.
ऐसिया संपत्ती आम्हां संवसारीं । भोगाचिया परि काय सांगों ॥ १ ॥ काम तो
कामना भोगीतसे देवा । आलिंगनें हेवा चरणचुंबी ॥ २ ॥ शांतीच्या संयोगें
निरसला ताप । दुसरें तें पाप भेदबुद्धि ॥ ३ ॥ तुका म्हणे पाहें तिकडे
सारिखें । आपुलें पारिखें निरसलें ॥ ४ ॥
३९०८. भक्तिचिया पोटीं
रत्नाचिया खाणी । ब्रह्मींची ठेवणी सकळ वस्तु ॥ धृ. ॥ माउलीचे मागें
बाळकांची हारी । एका सूत्रे दोरी ओढतसे ॥ २ ॥ जेथील जें मागें तें रायासमोर
। नाहींसें उत्तर येत नाहीं ॥ ३ ॥ सेवेचिये सत्ते धनीच सेवक । आपुलें तें
एक न वंची कांहीं ॥ ४ ॥ आदि अंत ठाव असे मध्यभाग । भोंवतें भासे जग
उच्चासनीं ॥ ५ ॥ भावारूढ तुका झाला एकाएकीं । देवचि लौकिकीं अवघा केला ॥ ६ ॥
३९०९.
जाणपण बरें देवाचे ते शिरीं । आम्ही ऐसीं बरीं नेणतींच ॥ १ ॥ देखणियापुढें
रुचें कवतुक । उभयतां सुख वाढतसे ॥ २ ॥ आशंकेची बाधा नाहीं लडिवाळां ।
चित्त वरि खेळा समबुद्धि ॥ ३ ॥ तुका म्हणे दिशा मोकळ्या सकळां । अवकाशीं
खेळा ठाव झाला ॥ ४ ॥
३९१०. जळों आतां नांव रूप । माझें पाप गांठीचें
॥ १ ॥ संताचिया चरणरजें । उतरूं ओझें मातीचें ॥ २ ॥ लटिक्याचा अभिमान ।
होता शीण पाववीत ॥ ३ ॥ तुका म्हणे अरूपींचें । सुख साचें निनांवें ॥ ४ ॥
३९११.
नव्हतियाचा सोस होता । झडों आतां पदर ॥ १ ॥ देखणें तें देखियेलें । आतां
भलें साक्षित्वें ॥ २ ॥ लाभ कळों आली हानि । राहों दोन्हीं निराळीं ॥ ३ ॥
तुका म्हणे एकाएकीं । हा कां लोकीं पसारा ॥ ४ ॥
३९१२. समर्पिली वाणी
। पांडुरंगीं घेते धणी ॥ १ ॥ पूजा होते मुक्ताफळीं । रस वोविया मंगळीं ॥ २
॥ धार अखंडीत । ओघ चालियेला नित्य ॥ ३ ॥ पूर्णाहुति जीव । तुका घेऊनि ठेला
भाव ॥ ४ ॥
३९१३. अवघाचि आकार ग्रासियेला काळें । एकचि निराळें
हरीचें नाम ॥ १ ॥ धरूनि राहिलों अविनाश कंठीं । जीवन हें पोटीं सांठविलें ॥
२ ॥ शरीरसंपत्ति मृगजळभान । जाईल नासोन खरें नव्हे ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां
उपाधीच्या नांवें । आणियेला देवें वीट मज ॥ ४ ॥
३९१४. बोलणेंचि
नाहीं । आतां देवाविण कांहीं ॥ १ ॥ एकसरें केला नेम । देवा दिले क्रोध काम ॥
२ ॥ पाहेन ते पाय । जोंवरि हे दृष्टि धाय ॥ ३ ॥ तुका म्हणे मनें । हेचि
संकल्प वाहाणें ॥ ४ ॥
३९१५. पट्टे ढाळूं आम्हीं विष्णुदास जगीं ।
लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥ १ ॥ निर्भर अंतरीं सदासर्वकाळ । घेतला सकळ
भार देवें ॥ २ ॥ बळिवंत जेणें रचिलें सकळ । आम्हां त्याचें बळ अंकितासी ॥ ३
॥ तुका म्हणे आम्ही देखतचि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥ ४ ॥
३९१६.
पाणिपात्र दिगंबरा । हस्त करा सारिखे ॥ १ ॥ आवश्यक देव मनीं । चिंतनींच
सादर ॥ २ ॥ भिक्षा कामधेनु ऐशी । अवकाशीं शयन ॥ ३ ॥ पांघरोनि तुका दिशा ।
केला वास अलक्षीं ॥ ४ ॥
३९१७. सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो
रोकडा अनुभव ॥ १ ॥ सुख झालें सुख झालें । नये बोले बोलतां ॥ २ ॥ अंतर तों
नये दिसों । आतां सोस कासया ॥ ३ ॥ तुका म्हणे जतन करूं । हेंचि धरूं
जीवेंसी ॥ ४ ॥
३९१८. आठवूंचि नेदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्हीं
राहे ॥ १ ॥ मन धांवे तेथें तिचेंचि दुभते । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ २ ॥
नलगे वळावीं इंद्रियें धांवतां । ठाव नाहीं रिता उरों दिला ॥ ३ ॥ तुका
म्हणे समपाउलाचा खुंट । केला बळकट हालों नेदी ॥ ४ ॥
३९१९. साधनें
आमुचीं आज्ञेचीं धारकें । प्रमाण सेवकें स्वामिसत्ता ॥ १ ॥ प्रकाशिलें जग
आपुल्या प्रकाशें । रवि कर्म रसें अलिप्त त्या ॥ २ ॥ सांगणें तें नाहीं
करणें आपण । मोलाही वचन वाढ झालें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां भांडवल हातीं ।
येरझार खाती केवढिये ॥ ४ ॥
३९२०. आमुचें जीवन हें कथाअमृत । आणिकही
संत समागम ॥ १ ॥ सारूं एके ठायीं भोजन परवडी । स्वादरसें गोडी पदोपदीं ॥ २ ॥
धालिया ढेंकर येती आनंदाचे । वोसंडलें वाचे प्रेमसुख ॥ ३ ॥ पिकलें स्वरूप
आलिया घुमरी । राशी ते अंबरी न समाये ॥ ४ ॥ मोजितां तयाचा अंत नाहीं पार ।
खुंटला व्यापार तुका म्हणे ॥ ५ ॥
३९२१. जोडिलें तें आतां न सरे
सारितां । जीव बळी देतां हाता आलें ॥ १ ॥ संचित सारूनि बांधिलें धरणें ।
तुंबिलें जीवन आक्षेपे हें ॥ २ ॥ शीत उष्ण तेथें सुखदुःख नाहीं । अंतर
सबाहीं एक झालें ॥ ३ ॥ बीज तो अंकुर पत्र शाखा फळ । प्राप्तबीज मूळ अवघें
नासे ॥ ४ ॥ तुका म्हणे नामीं राहिलीसे गोडी । बीजाच्या परवडी होती जाती ॥ ५
॥
३९२२. परमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥ १ ॥
सकळही तेथें वोळलीं मंगळें । वृष्टि केली जळें आनंदाच्या ॥ २ ॥ सकळ
इंद्रियें झालीं विठुरूप । ओतलें स्वरूप माजी तया ॥ ३ ॥ तुका म्हणे जेथें
वसे भक्तराव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥ ४ ॥
३९२३. तेणें वेशें
माझीं चोरिलीं अंगें । मानावया जग आप्तपणें । नाहीं चाड भीड संसाराचें कोड
। उदासीन सर्व गुणें । भय मोह लज्जा निरसली शंका । अवघियां एकचिपणें ।
विठ्ठलाच्या पायीं बैसोनि राहिलीं । भागलीं नुठित तेणें ॥ १ ॥ आतां
त्यांसीं काय चाले माझें बळ । झालोंसें दुर्बळ सत्त्वहीन । दग्ध पट दिसे
संगति बरवंट । काय त्याचें कारण ॥ २ ॥ आळस दृष्टी न पाहे आपुलें । एकचि
देखिलें सर्वरूप । मानामान तेथें खुंटोनि राहिलें । पिशुन तो कोण बाप ।
ज्योति ना अंधार अवघा एकंकार । तेथें काय पुण्यपाप । विठ्ठलावांचुनि
कांहींच नावडे । वेगळाल्या भावें रूप ॥ ३ ॥ बळबडिवार लौकिक वेव्हार । गेली
आशा तृष्णा माया । सुखदुःखाची वार्ता नाइके । अंतरलों दुरी तया । मीतूंपणा
निष्काम होऊनि । राहिलों आपुलिया ठाय ठायां । तुजविण आतां मज नाहीं कोणी ।
तुका म्हणे देवराया ॥ ४ ॥
३९२४. वेद जया गाती । आम्हां तयाची संगती ॥
१ ॥ नाम धरियेलें कंठीं । अवघा सांठविला पोटीं ॥ २ ॥ ॐकाराचें बीज । हातीं
आमुचें तें निज ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु मोठें । अणुरेणुयां धाकुटें ॥ ४ ॥
३९२५.
जेथें माझी दृष्टी जाय । तेथें पाय भावीन ॥ १ ॥ असेन या समाधानें । पूजा
मनें करीन ॥ २ ॥ अवघाच अवघे देशी । सुखराशी संपन्न ॥ ३ ॥ तुका म्हणे बंधन
नाहीं । ऐसें कांहीं तें करूं ॥ ४ ॥
३९२६. उपाधीचें बीज । जळोनि
राहिलें सहज ॥ १ ॥ आम्हां राहिली तें आतां । चाली देवाचिया सत्ता ॥ २ ॥
पराधीन तें जिणें । केलें सत्ता नारायणे ॥ ३ ॥ तुका म्हणे जाणें पाय ।
खुंटले आणीक उपाय ॥ ४ ॥
३९२७. नव्हती हीं माझीं जायाचीं भूषणें ।
ऐसें नारायणें उचित केलें ॥ १ ॥ शब्दाच्या वोवणीं रत्नाचिया माळा । मुळींचा
जिव्हाळा झरवणी ॥ २ ॥ अर्थांतरीं असे अनुभव सेवन । परिपाकीं मन साक्ष
येथें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज सरतें परतें । हें नाहीं अनंतें उरों दिलें ॥ ४ ॥
३९२८.
बहु नांवें ठेविलीं स्तुतीची आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥ १ ॥ बहु सोसें
सेवन केलें बहुवस । बहु झाला दिस गोमट्याचा ॥ २ ॥ बहुतां पुरला बहुतां
उरला । बहुतांचा केला बहु नट ॥ ३ ॥ बहु तुका झाला बहु निकट वृत्ती । बहु
काकुलती येऊनियां ॥ ४ ॥
३९२९. हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव ।
भलें पोटीं वाव राखिलिया ॥ १ ॥ विश्वंभरें विश्व सामाविलें पोटीं । तेथेंचि
शेवटीं आम्ही असों ॥ २ ॥ नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरीं
उमटेल ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा स्वामी अबोलणा । पुरवूं खुणे खुणा जाणतसों ॥ ४
॥
३९३०. न संडावा आतां ऐसा वाटे ठाव । भयासी उपाव रक्षणाचा ॥ १ ॥
म्हणऊनि मनें वळियेलें मन । कारियाकारण चाड नाहीं ॥ २ ॥ नाणावी उपाधि
करूनियां मूळ । राखतां विटाळ तेंचि व्हावें ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें न वेंचे
वचन । निजीं निजखूण सांपडली ॥ ४ ॥
३९३१. सत्तेचें भोजन समयीं आतुडे
। सेवनही घडे रुचिनेसी ॥ १ ॥ वर्में भ्रम नेला झाले एकमय । हृदयस्थीं सोय
संग झाला ॥ २ ॥ कोथळीस जमा पडिलें संचित । मापल्याचा वित्त नेम झाला ॥ ३ ॥
तुका म्हणे धणी ऐसा झालों आतां । करीन ते सत्ता माझी आहे ॥ ४ ॥
३९३२.
कोण होईल आतां संसारपांगिलें । आहे उगवलें सहजचि ॥ १ ॥ केला तो चालवीं
आपुला प्रपंच । काय कोणां वेच आदा घे दे ॥ २ ॥ सहजचि घडे आतां मोळ्याविण ।
येथें काय शीण आणि लाभ ॥ ३ ॥ तुका म्हणे झालों सहज देखणा । ज्याच्या
त्यानें खुणा दाखविल्या ॥ ४ ॥
३९३३. म्हणऊनि झालों क्षेत्रींचे
संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥ १ ॥ कदापिही नव्हे सीमा उल्लंघन ।
केलें विसर्जन आव्हानींच ॥ २ ॥ पारिखा तो आतां झाला दुजा ठाव । दृढ केला
भाव एकविध ॥ ३ ॥ तुका म्हणे कार्यकारणाचा हेवा । नाहीं जीव देवा समर्पिला ॥
४ ॥
३९३४. शुद्धारसें ओलावली । रसना धाली न धाये ॥ १ ॥ कळों नये
झाली धणी । नारायणीं पूर्णता ॥ २ ॥ आवडे ते तेचि यासी । विठुरसीं निरसें ॥ ३
॥ तुका म्हणे बहुतां परी । करूनि करीं सेवन ॥ ४ ॥
३९३५. मीच विखळ
मीच विखळ । येर सकळ बहु बरें ॥ १ ॥ पाहिजे हें क्षमा केलें । येणें बोलें
विनवणी ॥ २ ॥ मीच माझें मीच माझें । झालें ओझें अन्याय ॥ ३ ॥ आधीं आंचवला
आधीं आंचवला । तुका जाला निर्मनुष्य ॥ ४ ॥
३९३६. हेचि भेटी साच
रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपें ॥ १ ॥ सुखाचें भातुकें करावें जतन ।
सेविल्या तहान भूक जाय ॥ २ ॥ दूरील जवळी आपणचि होतें । कवळिलें चित्तें
जीवनासी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाम घेतां वेळोवेळां । होतील शीतळा सकळा नाडी ॥ ४
॥
३९३७. कां रे तुम्ही ठेवा बहुतां निमित्तें । माझिया संचितें
वोढवलें ॥ १ ॥ भक्तिप्रेमगोडी बैसली जिव्हारीं । आनंद अंतरीं येणें झाला ॥ २
॥ पुसिलें पडळ तिमिर विठ्ठलें । जगचि भरलें विठुवानंदें ॥ ३ ॥ तुका म्हणे
केलों कामनेवेगळा । आवडी गोपाळा असे वरी ॥ ४ ॥
३९३८. शरणागत झालों ।
तेणें मीपणा मुकलों ॥ १ ॥ आतां दिल्याचीच वाट । पाहों नाहीं खटपट ॥ २ ॥
नलगे उचित । कांहीं पाहावें संचित ॥ ३ ॥ तुका म्हणे सेवा । माने तैसी करूं
देवा ॥ ४ ॥
३९३९. आसन शयन भोजन गोविंदें । भरलें आनंदें त्रिभुवन ॥ १
॥ अवघिया केली काळें तडातोडी । अवसर घडी पुरो नये ॥ २ ॥ वांटणी घातले
शरीराचे भाग । दुजियाचा लाग खंडियला ॥ ३ ॥ आवडीच्या आलें आहारासी रूप ।
पृथक संकल्प मावळले ॥ ४ ॥ काम तरी क्रोध बुद्धि मन नासे । भ्रमाचे वोळसे
गिळिलें शांती ॥ ५ ॥ तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग । बैसला अभंग एकविध ॥ ६
॥
३९४०. आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंदचि अंग आनंदाचें ॥ धृ. ॥ काय
सांगों झालें कांहींचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥ २ ॥ गर्भाचे
आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥ ३ ॥ तुका म्हणे तैसा
ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥ ४ ॥
३९४१. नाहीं लाग माग । न
देखेंसें झालें जग ॥ १ ॥ आतां बैसोनियां खावें । दिलें आइतें या देवें ॥ २ ॥
निवारिलें भय । नाहीं दुसऱ्याची सोय ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं । बोलायाचें
काम नाहीं ॥ ४ ॥
३९४२. धवळलें जगदाकार । अंधार तो निरसला ॥ १ ॥ लपों
जातां ठाव नाहीं । प्रगट पाहीं पसारा ॥ २ ॥ खरियाचा दिवस आला । वाढी बोला न
पुरे ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवें साठीं । पडिली मिठी धुरेसी ॥ ४ ॥
३९४३.
रुसलों संसारा । आम्ही आप आणि परा ॥ १ ॥ म्हणऊनि केली सांडी । देऊनि
पडिलों मुरकुंडी ॥ २ ॥ परतेचि ना मागें । मोहो निष्ठुर झालों अंगें ॥ ३ ॥
सापडला देव । तुका म्हणे गेला भेव ॥ ४ ॥
३९४४. एकाचिये वेठी ।
सांपडलों फुकासाठीं ॥ १ ॥ घेतों काम सत्ताबळें । माझें करूनि भेंडोळें ॥ २ ॥
धांवे मागें मागें । जाय तिकडे चालत लागे ॥ ३ ॥ तुका म्हणे नेलें । माझें
सर्वस्व विठ्ठलें ॥ ४ ॥
३९४५. कोणापाशीं द्यावें माप । आपेआप
राहिलें ॥ १ ॥ कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥ २ ॥ एकें दाखविले दहा ।
फांटा पाहा पुसून ॥ ३ ॥ तुका म्हणे सरलें ओझें । आतां माझें सकळ ॥ ४ ॥
३९४६.
प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायन ॥ १ ॥
ज्ञानाग्निहुताशीं कडशिले वोजा । आत्मसिद्धिकाजा लागूनियां ॥ २ ॥ विठी
विठुरस सिद्ध झाला पाक । घेतला रुचक प्रतीतीमुखें ॥ ३ ॥ स्वानुभव अंगीं
झाला समरस । साधनीं निजध्यास ग्रासोग्रासीं ॥ ४ ॥ आरोग्यता तुका पावला
अष्टांगीं । मिरवला रंगीं निजात्मरंगें ॥ ५ ॥
३९४७. विचारिलें आधीं
आपुल्या मानसीं । वाचों येथें कैसी कोण्या द्वारें ॥ १ ॥ तंव साह्य झाला
हृदयनिवासी । बुद्धि दिली ऐसी नाश नाहीं ॥ २ ॥ उद्वेगाचे होतों पडिलों
समुद्रीं । कोणे रीती तीरीं पाविजेल ॥ ३ ॥ तुका म्हणे दुःखें आला आयुर्भाव ।
झाला बहु जीव कासावीस ॥ ४ ॥
३९४८. आतां नव्हे गोड करितां संसार ।
आणीक संचार झाला माजी ॥ १ ॥ विठुरसें गेलें भरूनियां अंग । आधील तो रंग
पालटला ॥ २ ॥ रसनेचिये रुची कंठीं नारायण । बैसोनियां मन निवविलें ॥ ३ ॥
तुका म्हणे आतां बैसलों ठाकणीं । इच्छेची ते धणी पुरईल ॥ ४ ॥
३९४९.
चुकलों या ऐशा वर्मा । तरी कर्मा सांपडलों ॥ १ ॥ पाठी लागे करी नास ।
गर्भवास भोगवी ॥ २ ॥ माझें तुझें भिन्नभावें । गळां दावें मोहाचें ॥ ३ ॥
तुका म्हणे पाठेळ केलों । नसत्या भ्यालों छंदासी ॥ ४ ॥
३९५०.
पाहातां हें बरवें झालें । कळों आलें यावरी ॥ १ ॥ मागिलांचा झाला झाडा ।
त्या निवाडास्तव हे ॥ २ ॥ विसांवलें अंग दिसे । सरिसे सरिसें अनुभवें ॥ ३ ॥
तुका म्हणे बरें झालें । देवें नेलें गवसूनि ॥ ४ ॥
३९५१. चक्रफेरी
गळीं गळा । होता गोवियेला माळा ॥ १ ॥ फुटोनियां गेला कुंभ । झालों निष्काम
स्वयंभ ॥ २ ॥ धरितचि नाहीं थारा । वेठी भ्रमण खोंकरा ॥ ३ ॥ तुका म्हणे
कोडें । आगी काय जाणे मढें ॥ ४ ॥
३९५२. माझिया मनाची बैसली आवडी ।
आवसान घडी एकी नेघे ॥ १ ॥ पाय चित्तीं रूप डोळांच बैसलें । चिंतनें गोविलें
मुख सदा ॥ २ ॥ अवघियांचा झाला विसरू हा मागें । वेध हा श्रीरंगें लावियेला
॥ ३ ॥ तुका म्हणे कानीं आइकिली मात । तोचि झाला घात जीवपणा ॥ ४ ॥
३९५३.
याची कोठें लागली चट । बहु तंट झालेंसे ॥ १ ॥ देवपिसी देवपिसी । मज ऐसी जग
म्हणे ॥ २ ॥ एकांताचें बाहेर आलें । लपविलें झांकेना ॥ ३ ॥ तुका म्हणे
याचे भेटी । झाली तुटी आपल्यासी ॥ ४ ॥
३९५४. पडिलिया ताळा । मग अवघा
निर्वाळा । तेथें कोणी बळा । नाहीं येत कोणासी ॥ १ ॥ जोडिलें तें लागे
हातीं । आपआपलीं निश्चिंती । हर्ष आणि खंती । तेथें दोनी नासलीं ॥ २ ॥ सहज
सरलिया कारण । मग एकला आपण । दिसेतरी भिन्न । वचनाचा प्रसंग ॥ ३ ॥ करूनि
झाडा पाडा । तुका वेगळा लिगाडा । निश्चिंतीच्या गोडा । गोष्टी म्हूण लागती ॥
४ ॥
३९५५. स्वामीचिया सत्ता । आधीं वर्में येती हाता । पुढती
विशेषता । लाभें लाभ आगळा ॥ १ ॥ करीं कवतुकाचे बोल । परि जिव्हाळ्याची ओल ।
आवडे रसाळ । मायबापा लाडाचें ॥ २ ॥ मन मेळविलें मना । नाहीं अभावी शहाणा ।
अंतरींच्या खुणा । वरि दिल्या उमटोनि ॥ ३ ॥ पराश्रमें काळा । अवघ्या
जागविल्या वेळा । देवासी निराळा । तुका क्षण न सोडी ॥ ४ ॥
३९५६. एके
ठायीं अन्नपाणी । ग्रासोग्रासीं चिंतनीं ॥ १ ॥ वेळोवेळां जागवितों । दुजें
येईल म्हूण भीतों ॥ २ ॥ नाहीं गुंतत उपचारीं । मानदंभाचे वेव्हारीं ॥ ३ ॥
तुका झालासे शहाणा । आड लपे नारायणा ॥ ४ ॥
३९५७. हारपोनि गेली निशी
। निद्रा कैसी न देखों ॥ १ ॥ नारायणी वसलें घर । निरंतर आनंद ॥ २ ॥ अवघा
रुधविला ठाव । नेला वाव मी माझें ॥ ३ ॥ तुका म्हणे एके ठायीं । असों नाहीं
क्षण भिन्न ॥ ४ ॥
३९५८. भय होतें आम्हीपणें । पाठी येणें घातलें ॥ १
॥ अवघा आपुलाचि देश । काळा लेश उरेचि ना ॥ २ ॥ समर्थाचें नाम घेतां । मग
चिंता काशाची ॥ ३ ॥ तुका म्हणे नारायणें । केलें जिणें सुखाचें ॥ ४ ॥
३९५९.
विश्वीं विश्वंभर । बोले वेदांताचें सार ॥ १ ॥ जगीं जगदीश । शास्त्रं वदती
सावकाश ॥ २ ॥ व्यापिलें हें नारायणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ ३ ॥ जनीं
जनार्दन । संत बोलती वचन ॥ ४ ॥ सूर्याचिया परी । तुका लोकीं क्रीडा करी ॥ ५
॥ (धृ. नाही)
३९६०. मागें पुढें नाहीं । दुजें यावेगळें कांहीं ॥ १
॥ नाहीं उरलें आणीक । केला झाडा सकळिक ॥ २ ॥ विश्वासावांचून । नांवें
दुजियाचें शून्य ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं । बोलायाची उरी नाहीं ॥ ४ ॥
३९६१.
म्हणऊनि झाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें ॥ १ ॥ दाखविलें देवें वर्म ।
अवघा भ्रम नासला ॥ २ ॥ हातें मुरगाळितां कान । नाहीं भिन्न वेदना ॥ ३ ॥
तुका म्हणे एकांतसुखें । अवघीं गोतें गुंतलीं ॥ ४ ॥
३९६२. तन मन धन
दिलें पंढरीराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥ १ ॥ आर्त चाड चिंता नाहीं
मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥ २ ॥ तुका म्हणे एक विठोबाचें नाम ।
आहे जवळी दाम नाहीं रुका ॥ ३ ॥
३९६३. उपचारासी वांझ झालों । नका
बोलों यावरी ॥ १ ॥ असेल तें असो तैसें । भेटीसरिसें नमन ॥ २ ॥
दुसऱ्यामध्यें कोण मिळे । छंद चाळे बहुमतें ॥ ३ ॥ एकाएकीं आतां तुका ।
लौकिका या बाहेरी ॥ ४ ॥
३९६४. मागें बहुत झाले खेळ । आतां बळ
वोसरलें ॥ १ ॥ हालों नयें चालों आतां । घट रिता पोकळ ॥ २ ॥ भाजल्याची दिसे
घडी । पट ओढी न साहे ॥ ३ ॥ तुका म्हणे पाहातां घडी । जगा जोडी अंगारा ॥ ४ ॥
३९६५.
शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥ १ ॥ म्हणविलें मागें
पुढें चाले कैसें । केला सामरस्य अभिषेक ॥ २ ॥ एकछत्र झळके उन्मनी निशाणी ।
अनुहात ध्वनी गगन गर्जें ॥ ३ ॥ तुकया स्वामी स्थापी निजपदीं दासा । करून
उल्हासा सप्रेमता ॥ ४ ॥
३९६६. मानूं कांहीं आम्ही आपुलिया इच्छा ।
ना तरी सरसा रंकरावो ॥ १ ॥ आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जा जीवीं
चाड नाहीं ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही खेळों सहज लीळे । म्हणोनि निराळे
सुखदुःखा ॥ ३ ॥
३९६७. लटिकें हासें लटिकें रडे । लटिकें उडें
लटिक्यापें ॥ १ ॥ लटिकें माझें लटिकें तुझें । लटिकें ओझें लटिक्याचें ॥ २ ॥
लटिकें गाय लटिकें ध्याय । लटिकें जाय लटिक्यापें ॥ ३ ॥ लटिका भोगी लटिका
त्यागी । लटिका जोगी जगमाया ॥ ४ ॥ लटिका तुका लटिक्या भावें । लटिकें बोले
लटिक्यासवें ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३९६८. ध्यानीं ध्यातां पंढरीराया ।
मनासहित पालटे काया ॥ १ ॥ तेथें बोला कैंची उरी । माझें मीपण झाला हरि ॥ २ ॥
चित्तचैतन्यीं पडतां मिठी । दिसे हरिरूप अवघी सृष्टि ॥ ३ ॥ तुका म्हणे
सांगों काय । एकाएकीं वृत्ति हरिमय ॥ ४ ॥
३९६९. देव झाले अवघे जन ।
दोष गुण हारपले ॥ १ ॥ बरवें झालें बरवें झालें । चित्त धालें महालाभें ॥ २ ॥
दर्पणीचें दुसरें भासें । परि तें असे एक तें ॥ ३ ॥ तुका म्हणे सिंधुभेटी ।
उदका तुटी वोहोळासी ॥ ४ ॥
३९७०. मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी
संकोचा ॥ १ ॥ भोगिलें तें आहे सुख । खातां मुख मोकळें ॥ २ ॥ उत्तम तें
बाळासाठीं । लावी ओठी माउली ॥ ३ ॥ तुका म्हणे झाली धणी । आनंद मनीं न समाये
॥ ४ ॥
३९७१. ज्यांच्या संगें होतों पडिलों भोवणीं । ते केली धोवनी
झाडोनियां ॥ १ ॥ आतां एकाएकीं मनासीं विचार । करूं नाहीं भार दुजियाचा ॥ २ ॥
प्रसादसेवनें आली उष्टावळी । उचित ते काळीं अवचित ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्म
सांपडलें हातीं । सांडिली ते खंती चिंता देवा ॥ ४ ॥
३९७२. गोडपणें
जैसा गुळ । तैसा देव झाला सकळ ॥ १ ॥ आतां भजों कवणें परी । देव सबाह्य
अंतरीं ॥ २ ॥ उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥ ३ ॥ हेम अळंकार नामीं ।
तुका म्हणे तैसे आम्ही ॥ ४ ॥
३९७३. येथूनियां ठाव । अवघे लक्षायाचे
भाव ॥ १ ॥ उंच देवाचे चरण । तेथें झालें अधिष्ठान ॥ २ ॥ आघातावेगळा । असे
ठाव हा निराळा ॥ ३ ॥ तुका म्हणे स्थळ । धरूनि राहिलों अचळ ॥ ४ ॥
३९७४
रंगलिया रंग पालट न धरी । खेवलें अंतरीं पालटेना ॥ १ ॥ सावळें निखळ
कृष्णनाम ठसे । अंगसंगें कैसे शोभा देती ॥ २ ॥ पवित्र झालें तें न लिंपे
विटाळा । नेदी बैसों मळा आडवरी ॥ ३ ॥ तुका म्हणे काळें काळें केलें तोंड ।
प्रकाश अभंड देखोनियां ॥ ४ ॥
३९७५. अनुहातीं गुंतला नेणे बाह्य रंग ।
वृत्ति येतां मग बळ लागे ॥ धृ. ॥ मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले अवयव
आवरितां ॥ २ ॥ आणिकांची वाणी वदे तेणें मुखें । उपचारदुःखें नाठवती ॥ ३ ॥
तें सुख बोलतां आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥ ४ ॥ तुका म्हणे बाह्य
रंग जो विटला । अंतरीं निवाला विठुरसें ॥ ५ ॥
३९७६. बोलों अबोलणें
मरोनियां जिणें । असोनि नसणें जनीं आम्हां ॥ १ ॥ भोगीं त्याग झाला संगींच
असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥ २ ॥ तुका म्हणे नव्हें दिसतों मी तैसा ।
पुसणें तें पुसा पांडुरंगा ॥ ३ ॥
३९७७. उपाधीच्या नांवें घेतला
शिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥ १ ॥ काशासाठी हात भरूनि धुवावे ।
चालतिया गोवे मारगासि ॥ २ ॥ कांहीं नाहीं देवें करूनि ठेविलें । असे ते
आपुलें ते ते ठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर
बोळविले ॥ ४ ॥
३९७८. चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तेंचि किती काळ
वाढवावें ॥ १ ॥ अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ २ ॥
करूं आला तो तो केला लवलाहो । उरोंचि संदेहो दिला नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे
मोहो परतेचि ना मागें । म्हणऊनि त्यागें त्याग झाला ॥ ४ ॥
३९७९.
कृष्णांजने झाले सोज्वळ लोचन । तेणें दिले वाण निवडुनी ॥ १ ॥ निरोपाच्या
मापें करी लडबड । त्याचें तेणें गोड नारायणें ॥ २ ॥ भाग्यवंताघरीं करितां
विश्वासें । कार्य त्यासरिसें होईजेतें ॥ ३ ॥ तुका म्हणे पोट भरे बऱ्या
वोजा । निज ठाव निजा निजस्थानीं ॥ ४ ॥
३९८०. अंतरींची ज्योती
प्रकाशली दीप्ति । मुळींची जे होती आच्छादिली ॥ १ ॥ तेथींचा आनंद
ब्रह्मांडीं न समाये । उपमेशीं काय देऊं सुखा ॥ २ ॥ भावाचें मथिलें निर्गुण
संचलें । तें हें उभें केलें विटेवरी ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां ब्रह्मांड
पंढरी । प्रेमाची जे थोरी सांठवण ॥ ४ ॥
३९८१. श्रमपरिहारा । मूळ
झालों दातारा ॥ १ ॥ देह निवेदूनि पायीं । झालों निष्काम उतराई ॥ २ ॥ आपली
ते सत्ता । येथें असों नेदी आतां ॥ ३ ॥ राहिला निराळा । तुका खटपटी वेगळा ॥
४ ॥
३९८२. मनाचिये साक्षी झाली सांगों मात । सकळ वृत्तांत आपला तो ॥
१ ॥ तुम्हां परामृष घेतां सत्ताबळें । धरितां निराळें कैसीं वांचों ॥ २ ॥
मी माझें सांडून यावया पसारा । आणीक दातारा काय काज ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही
तुजविण एका । निढळ लौकिका माजी असों ॥ ४ ॥
३९८३. पंचभूतांचें
सापडलों संदीं । घातलोंसें बंदी अहंकारें ॥ १ ॥ आपल्या आपण बांधविला गळा ।
नेणेंचि निराळा असतांही ॥ २ ॥ कासया हा सत्य मानिला संसार । कां हें केले
चार माझें माझें ॥ ३ ॥ कां नाहीं शरण गेलों नारायणा । कां नाहीं वासना
आवरिली ॥ ४ ॥ किंचित सुखाचा धरिला अभिळास । तेणें बहु नास केला पुढें ॥ ५ ॥
तुका म्हणे आतां देह देऊं बळी । करूनि सांडूं होळी संचिताची ॥ ६ ॥
३९८४.
देवासी लागे सकळांसी पोसावें । आम्हां नलगे खावें काय चिंता ॥ १ ॥ देवा
विचारावें लागे पापपुण्य । आम्हांसी हे जन अवघें भलें ॥ २ ॥ देवासी
उत्पत्ति लागला संहार । आम्हां नाहीं फार थोडें कांहीं ॥ ३ ॥ देवासी काम
लागला धंदा । आम्हांसी ते सदा रिकामीक ॥ ४ ॥ तुका म्हणे आम्ही भले देवाहून ।
विचारितां गुण सर्वभावें ॥ ५ ॥ (धृ. नाही)
३९८५. यज्ञ भूतांच्या
पाळणा । भेद कारिया कारणा । पावावया उपासना । विठुस्थानीं प्रस्थान ॥ १ ॥
एक परी पडिलें भागीं । फळ बीजाचिये अंगीं । धन्य तोचि जगीं । आदि अंत
सांभाळी ॥ २ ॥ आवश्यक तो शेवट । येर अवघी खटपट । चालों जाणें वाट । ऐसा
विरळा एखादा ॥ ३ ॥ तुका होवोनि निराळा । क्षराअक्षरा वेगळा । पाहे निगमकळा ।
बोले विठ्ठलप्रसादें ॥ ४ ॥
३९८६. थुंकोनियां मान । दंभ करितो
कीर्तन ॥ १ ॥ झालों उदासीन देहीं । एकाविण चाड नाहीं ॥ २ ॥ अर्थ
अनर्थासारिखा । करूनि ठेविला पारिखा ॥ ३ ॥ उपाधि वेगळा । तुका राहिला
सोंवळा ॥ ४ ॥
३९८७. अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघीच दान दिली
भूमि ॥ १ ॥ अवघाचि काळ दिनरात्रशुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥ २ ॥
अवघींच तीर्थें व्रतें केले याग । अवघेंचि सांग झालें कर्म ॥ ३ ॥ अवघेंचि
फळ आलें आम्हां हातां । अवघेंचि अनंता समर्पिलें ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां
बोलों अबोलणें । कायावाचामनें उरलों नाहीं ॥ ५ ॥
३९८८. मज अंगाच्या
अनुभवें । कांहीं वाईट बरें ठावें ॥ १ ॥ झालों दोहींचा देखणा । नये मागें
पुढेंही मना ॥ २ ॥ वोस वसती ठावी । परि हे चाली दुःख पावी ॥ ३ ॥ तुका म्हणे
घेऊं देवा । सवें करूनि बोळावा ॥ ४ ॥
३९८९. संचित प्रारब्ध
क्रियमाण । अवघा जाला नारायण ॥ १ ॥ नाही आम्हांसी संबंधु । जरा मरण कांहीं
बाधु ॥ २ ॥ द्वैताद्वैतभावें । अवघें व्यापियेलें देवें ॥ ३ ॥ तुका म्हणे
हरि । आम्हांमाजी क्रीडा करी ॥ ४ ॥
३९९०. पिंडदान पिंडें ठेविलें
करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं ॥ १ ॥ सारिलें संकल्प एकाचि वचनें । विठीं
विठियार्पणें शेवटींच्या ॥ २ ॥ सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म
एकोविष्णु ॥ ३ ॥ पित्यापुत्रत्वाचें झालें अवसान । जनीं जनार्दन अभेदेंसी ॥
४ ॥ आहे तैसी पूजा पावली सकळ । सहज तो काळ साधियेला ॥ ५ ॥ तुका म्हणे केला
अवघ्यांचा उद्धार । आतां नमस्कार शेवटींचा ॥ ६ ॥
३९९१. नभोमय झालें
जळ । एकीं सकळ हरपलें ॥ १ ॥ आतां काय सारासारी । त्याच्या लहरी तयांत ॥ २ ॥
कैचा तेथ यावा सांडी । आप कोंडी आपणा ॥ ३ ॥ तुका म्हणे कल्प झाला । अस्त
गेला उदय ॥ ४ ॥
३९९२. उद्योगाची धांव बैसली आसनीं । पडिलें नारायणीं
मोटळें हें ॥ १ ॥ सकळ निश्चिंती झाली हा भरंवसा । नाहीं गर्भवासा येणें
ऐसा ॥ २ ॥ आपुलिया सत्ते नाहीं आम्हां जिणें । अभिमान तेणें नेला देवें ॥ ३
॥ तुका म्हणे चळे एकाचिया सत्ते । आपुलें मी रितेपणें असें ॥ ४ ॥
३९९३.
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें झालें ॥ १ ॥ उपक्रमें वदे
निशब्दाची वाणी । जे कोठें बंधनीं गुंफों नेणें ॥ २ ॥ तमनासी परी वेव्हारा
वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें गेला अतिशय । आतां
पुन्हां नये तोंड दावूं ॥ ४ ॥
३९९४. भयाची तों आम्हां चित्तीं ।
राहों खंती शकेचिना ॥ १ ॥ समर्पिलों जीवेंभावें । काशा भ्यावें कारणें ॥ २ ॥
करीन तें कवतुकें । अवघें निकें शोभेल ॥ ३ ॥ तुका म्हणे माप भरूं । दिवस
सांरुं कवतुकें ॥ ४ ॥
३९९५. इहलोकीं आम्हां वस्तीचें तें पेणें ।
उदासीन तेणें देहभावीं ॥ १ ॥ कार्यापुरतें कारण मारगीं । उल्लंघूनि वेगीं
जावें स्थळा ॥ २ ॥ सोंगसंपादणी चालवितों वेव्हार । अत्यंतीं आदर नाहीं गोवा
॥ ३ ॥ तुका म्हणे वेंच लाविला संचिता । होईल घेतां देतां लाभ कोणा ॥ ४ ॥
३९९६.
नाहीं आम्हां शत्रु सोईरें पिशुन । दाटलें हें घन माहियेर ॥ १ ॥ पाहें
तेथें पांडुरंग रखुमाई । सत्यभामा राही जननिया ॥ २ ॥ लाज भय कांहीं आम्हां
चिंता नाहीं । सर्वसुखें पायीं वोळगती ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही सदैवाचीं
बाळें । झालों लडिवाळें सकळांचीं ॥ ४ ॥
३९९७. शुभ झाल्या दिशा
अवघाचि काळ । अशुभ मंगळ मंगळाचें ॥ १ ॥ हातींचिया दीपें दुराविली निशी । न
देखिजे कैसी आहे तेही ॥ २ ॥ सुखदुःखाहूनि नाहीं विपरीत । देतील आघात हित
फळें ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां आम्हांसी हे भले । अवघेंचि झाले जीव जंत ॥ ४ ॥
३९९८.
जालें पीक आम्हां अवघा सुकाळ । घेऊं अवघा काळ प्रेमसुख ॥ १ ॥ झाली आराणूक
अवघियांपासून । अवघा गेला शीणभाग आतां ॥ २ ॥ अवघा झाला आम्हां एक पांडुरंग ।
आतां नाहीं जग माझें तुझें ॥ ३ ॥ अवघेंचि आम्ही ल्यालों अळंकार । शोभलोंहि
फार अवघ्यांवरी ॥ ४ ॥ तुका म्हणे आम्ही सदैवाचे दास । करणें नलगे आस
आणिकांची ॥ ५ ॥
३९९९. संचितचि खावें । पुढें कोणाचें न घ्यावें ॥ १ ॥
आतां पुरे हे चाकरी । राहों बैसोनियां घरीं ॥ २ ॥ नाहीं कामा हातीं ।
आराणूक दिवसराती ॥ ३ ॥ तुका म्हणे सत्ता । आतां पुरे पराधीनता ॥ ४ ॥
४०००.
आतां बरें झालें । माझे माथांचें निघालें ॥ १ ॥ चुकली हे मरमर । भार
माथाचे डोंगर ॥ २ ॥ नसतां कांहीं जोडी । केली बहुतें तडातोडी ॥ ३ ॥ झाला
झाडापाडा । तुका म्हणे गेली पीडा ॥ ४ ॥
४००१. भावाचिया बळें । आम्ही
निर्भर दुबळें ॥ १ ॥ नाहीं आणिकांची सत्ता । सदा समाधान चित्ता ॥ २ ॥
तर्का नाहीं ठाव । येथें रिघावया वाव ॥ ३ ॥ एकछत्री राज्य । तुकया
पांडुरंगी काज ॥ ४ ॥
४००२. धालों सुखें ढेंकर देऊं । उमटे जेवूं
तोंवरी ॥ १ ॥ क्रीडा करूं निरंजनीं । न पुरे धणी हरिसवें ॥ २ ॥ अवघें खेळों
अवघ्यामधीं । डाईं न पडो ऐसी बुद्धि ॥ ३ ॥ तुका म्हणे वांचवितां । आम्हां
सत्ता समर्थ ॥ ४ ॥
४००३. आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥ १ ॥
मायबापाची लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ २ ॥ नाहीं निपराध । कोणां
आम्हांमध्यें भेद ॥ ३ ॥ तुका म्हणे नाम । अवघें आमचें हें धाम ॥ ४ ॥
४००४.
विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं विठुरस ठसावला ॥ १ ॥ माझी मज झाली अनावर
वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ २ ॥ लाभाचिया सोसें पुढें चाली मना ।
धनाचा कृपणा लोभ जैसा ॥ ३ ॥ तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या झाल्या
ऊर्मि एकमय ॥ ४ ॥
४००५. आनंदाच्या कोटी । सांठवल्या आम्हां पोटीं ॥ १
॥ प्रेमा चालिला प्रवाहो । नाम ओघ लवलाहो ॥ २ ॥ अखंड खंडेना जीवन । राम
कृष्ण नारायण ॥ ३ ॥ थडी अहिक्य परत्र । तुका म्हणे समतीर ॥ ४ ॥
४००६.
तान्हे तहान प्याली । भूक भुकेनें खादली ॥ १ ॥ जेथें तेंच नाहीं झालें ।
झाडा घेतला विठ्ठलें ॥ २ ॥ वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥ ३ ॥
शेष उरला तुका । जीवीं जीवा झाला चुका ॥ ४ ॥
४००७. घटीं अलिप्त असे
रवि । अग्नि काष्टामाजी जेवीं । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षी वर्तनें ॥ १
॥ भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें
रंगला गोसावी ॥ २ ॥ देह संकल्पासारिखें । एकएकांसी पारिखें । सुख आणि
दुःखें । अंगीं कर्में त्रिविध ॥ ३ ॥ तुका म्हणे कोडें । नकळे तयासी
सांकडें । त्याचिया निवाडें । उगवे केलें विंदान ॥ ४ ॥
४००८. आम्ही
क्षेत्रींचे संन्यासी । देह भरित हृषीकेशी । नाहीं केली ऐशी । आशाकामबाहेरी
॥ १ ॥ आलें अयाचित अंगा । सहज तें आम्हां भागा । दाता पांडुरंगा । ऐसा
करितां निश्चिती ॥ २ ॥ दंड धरिला दंडायमान । मुळीं मुंडिलें मुंडन । बंदी
बंदाची कौपीन । बहिरवास औटडें ॥ ३ ॥ काळें साधियेला काळ । मन करूनि निश्चळ ।
लौकिकीं विटाळ । धरूनि असों एकांत ॥ ४ ॥ कार्यकारणाची चाली ।
वाचावाच्यत्वें नेमिली । एका नेमें केली । स्वरूपींच वोळखी ॥ ५ ॥ नव्हे
वेषधारी । तुका आहाच वरिवरि । आहे तैसीं बरीं । खंडें निवडी वेदांचीं ॥ ६ ॥
४००९.
काम नाहीं काम नाहीं । झालों पाहीं रिकामा ॥ १ ॥ फावल्या त्या करूं चेष्टा
। निश्चळ द्रष्टा बैसोनि ॥ २ ॥ नसत्या छंदें नसत्या छंदें । जग विनोदें
विव्हळतसे ॥ ३ ॥ एकाएकीं एकाएकीं । तुका लोकीं निराळा ॥ ४ ॥
४०१०.
सर्वरसीं मीनलें चित्त । अखंडित आनंदु ॥ १ ॥ गोत पति विश्वंभरी । झाला हरि
सोयरा ॥ २ ॥ वोळखी ते एका नांवें । इतर भाव खंडणा ॥ ३ ॥ तुका म्हणे नांवें
रूपें । दुसरीं पापें हारपलीं ॥ ४ ॥
४०११. ज्या ज्या आम्हापाशीं
होतील ज्या शक्ति । तेणें हा श्रीपती अळंकारूं ॥ १ ॥ अवघा पायांपाशीं दिला
जीवभाव । जन्ममरणा ठाव पुसियेला ॥ २ ॥ ज्याचें देणें त्यासी घातला संकल्प ।
बंधनाचें पाप चुकविलें ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें उरला विठ्ठल । खाय बोले बोल
गाय नाचे ॥ ४ ॥
४०१२. याजसाठीं केला होता अट्टाहास । शेवटचा दिस
गोड व्हावा ॥ १ ॥ आतां निश्चिंतीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा
तृष्णेचिया ॥ २ ॥ कवतुक वाटे झालिया वेंचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥
३ ॥ तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥ ४ ॥
४०१३.
अनुभवें अनुभव अवघाचि साधिला । तरि स्थिरावला मन ठायीं ॥ १ ॥ पिटूनियां
मुसे आला अळंकार । दग्ध तें असार होऊनियां ॥ २ ॥ एकचि उरलें कायावाचामना ।
आनंद भुवनामाजी त्रयीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हीं जिंकिला संसार । होऊनि
किंकर विठोबाचे ॥ ४ ॥
४०१४. खादलेंच खावें वाटे । भेटलें भेटे आवडी ॥
१ ॥ वीट नाहीं पांडुरंगीं । वाढे अंगीं आर्त तें ॥ २ ॥ हृदयाची हांव पुरे ।
परि हें उरें चिंतन ॥ ३ ॥ तुका म्हणे पोट भरे । परि ते उरे भूक पुढें ॥ ४ ॥
४०१५.
आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥ १ ॥ माय रखुमाई
पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ २ ॥ बापुडा मी नव्हें दुर्बळ
ठेंगणा । पांगिला हा कोणा आणिकासी ॥ ३ ॥ दुष्ट नव्हों आम्ही अभागी अनाथ ।
आमुचा समर्थ कैवारी हा ॥ ४ ॥ संवसार आम्हां सरला सकळ । लपोनियां काळ ठेला
धाकें ॥ ५ ॥ तुका म्हणे झालों निर्भर मानसीं । जोडलिया रासी सुखाचिया ॥ ६ ॥
४०१६.
स्वप्नींचिया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । झालिया शेवटीं । जागे
लटिकें सकळ ॥ १ ॥ वायां भाकिली करुणा । मूळ पावावया शीणा । राव रंक राणा ।
कैचे स्थानावरी आहे ॥ २ ॥ सोशिलें तें अंगें । खरें होतें नव्हतां जागें ।
अनुभवही सांगें । दुःखें डोळे उघडीले ॥ ३ ॥ तुका म्हणे संतीं । सावचित
केलें अंतीं । नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥ ४ ॥
४०१७. न
देखोनि कांहीं । म्यां पाहिलें सकळही ॥ १ ॥ झालों अवघियांपरी । मी हें
माझें ठेलें दुरी ॥ २ ॥ न घेतां घेतलें । हात पाय उसंतिलें ॥ ३ ॥ खादलें न
खातां । रसना रस झाली घेतां ॥ ४ ॥ न बोलोनि बोलें । केलें प्रगट झांकिलें ॥
५ ॥ नाइकिलें कानीं । तुका म्हणे आलें मनीं ॥ ६ ॥
४०१८. निंदी कोणी
मारी । वंदी कोणी पूजा करी ॥ १ ॥ मज हेंही नाहीं तेंही नाहीं । वेगळा
दोहींपासुनी ॥ २ ॥ देहभोग भोगें घडे । जें जें जोडें तें तें बरें ॥ ३ ॥
अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुकयाचें ॥ ४ ॥
४०१९. जन विजन
झालें आम्हां । विठ्ठलनामाप्रमाणें ॥ १ ॥ पाहें तिकडे मायबाप । विठ्ठल आहे
रखुमाई ॥ २ ॥ वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता झाला ॥ ३ ॥ आठव नाहीं
सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥ ४ ॥
४०२०. माझिया मीपणा । झाला
यावरी उगाणा ॥ १ ॥ भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ २ ॥
टाळिलें निमित्त । फार थोडे घात हित ॥ ३ ॥ यावें कामावरी । तुका म्हणे
नाहीं उरी ॥ ४ ॥
४०२१. माझें माझ्या हाता आलें । आतां भलें सकळ ॥ १ ॥
काशासाठीं विषम थारा । तो अंतरा विटाळ ॥ २ ॥ झालीं तया दुःखें तुटी ।
मागिल पोटीं नसावें ॥ ३ ॥ तुका म्हणे शुद्ध कुळ । तेथें मळ काशाचा ॥ ४ ॥
४०२२.
निरंजनीं आम्हीं बांधियेलें घर । निराकारी निरंतर राहिलोंसे ॥ १ ॥
निराभासीं पूर्ण झालों समरस । अखंड ऐक्यास पावलों आम्ही ॥ २ ॥ तुका म्हणे
आतां नाहीं अहंकार । झालों तदाकार नित्य शुद्ध ॥ ३ ॥
४०२३.
पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुद्धिभेद ॥ १ ॥ जीवशिवा शेज
रचिली आनंदें । आउटाविये पदीं आरोहण ॥ २ ॥ निजीं निजरूपीं निजविला तुका ।
अनुहत बाळका हल्लरु गाती ॥ ३ ॥
४०२४. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा
भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥ १ ॥ तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि झाली ।
कल्पना निमाली द्वैताद्वैत ॥ २ ॥ देशकाळवस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला
विश्वाकार ॥ ३ ॥ न झाला प्रपंच आहे परब्रह्म । अहंसोहं ब्रह्म आकळलें ॥ ४ ॥
तत्त्वमसि विद्या ब्रह्मानंद सांग । तेचि झाला अंगें तुका आतां ॥ ५ ॥
४०२५.
बीज भाजुनि केली लाही । आम्हां जन्ममरण नाहीं ॥ १ ॥ आकारासी कैंचा ठाव ।
देह प्रत्यक्ष झाला देव ॥ २ ॥ साकरेचा नोहे ऊस । आम्हा कैंचा गर्भवास ॥ ३ ॥
तुका म्हणे अवघा जोग । सर्वाघटीं पांडुरंग ॥ ४ ॥
४०२६. पिकलिया
सेंद कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडुरंगें ॥ १ ॥ काम क्रोध लोभ
निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥ २ ॥ आठव नाठव गेले भावाभाव ।
झाला स्वयमेव पांडुरंग ॥ ३ ॥ तुका म्हणे भाग्य या नांवें म्हणीजे । संसारीं
जन्मीजे याचि लागीं ॥ ४ ॥
४०२७. सदा नामघोष करूं हरिकथा । तेणें
सदा चित्ता समाधान ॥ १ ॥ सर्वसुख ल्यालों सर्व अळंकार । आनंदें निर्भर
डुल्लतसों ॥ २ ॥ असों ऐसा कोठे आठवचि नाहीं । देहींच विदेही भोगूं दशा ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्ही झालों अग्निरूप । लागों नेदूं पापपुण्य अंगा ॥ ४ ॥
४०२८.
पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया ॥ १ ॥ जितां मरण आलें
आप पर गेलें । मूळ हें छेदिलें संसाराचें ॥ २ ॥ अधिकार जात वर्णधर्मयात ।
ठाव नाहीं सत्य असत्याशीं ॥ ३ ॥ जन वन भिन्न अचेत चळण । नाहीं दुजेपण ठाव
यासी ॥ ४ ॥ तुका म्हणे देह वाहिला विठ्ठलीं । तेव्हांच घडली सर्व पूजा ॥ ५ ॥
४०२९.
भोगीं झाला त्याग । गीतीं गातां पांडुरंग । इंद्रियांचा लाग । आम्हांवरूनि
चुकला ॥ १ ॥ करूनि ठेविलों निश्चळ । भय नाहीं तळमळ । घेतला सकळ । अवघा भार
विठ्ठलें ॥ २ ॥ तळीं पक्षिणीचे परी । नखें चोंची चारा धरी । आणुनियां घरीं
। मुखीं घाली बाळका ॥ ३ ॥ तुका म्हणे ये आवडी । आम्हीं पायीं दिली बुडी ।
आहे तेथें जोडी । जन्मांतरींचें ठेवणें ॥ ४ ॥
४०३०. बाहिर पडिलों
आपुल्या कर्तव्यें । संसारासी जीवें वेटाळिलों ॥ १ ॥ एकामध्यें एक नाहीं
मिळों येत । ताक नवनीत निवडिलें ॥ २ ॥ झालीं दोनीं नामें एकाचि मथनीं ।
दुसरिया गुणीं वेगळालीं ॥ ३ ॥ तुका म्हणे दाखविलीं मुक्ताफळीं । शिंपलेचि
स्वस्थळीं खुंटलिया ॥ ४ ॥
४०३१. बहुतां दिसांची आजि झाली भेटी ।
झाली होती तुटी काळगती ॥ १ ॥ येथें सावकाश घेईन ते धणी । गेली अडचणी उगवोनि
॥ २ ॥ बहु दुःख दिलें होतें घरीं कामें । वाढला हा श्रमें श्रम होता ॥ ३ ॥
बहु दिस होता सांडिला मारग । क्लेशाचा त्या त्याग आजि झाला ॥ ४ ॥ बहु होती
केली सोंगसंपादणी । लौकिकापासूनि निर्गमलें ॥ ५ ॥ तुका म्हणे येथें झालें
अवसान । परमानंदीं मन विसावलें ॥ ६ ॥
४०३२. न मनावी चिंता । कांहीं
माझेविशीं आतां ॥ १ ॥ ज्यानें लौकिक हा केला । तो हा निवारिता भला ॥ २ ॥
माझे इच्छे काय । होणार ते एके ठाय ॥ ३ ॥ सुखा आणि दुःखा । म्हणे वेगळा मी
तुका ॥ ४ ॥
४०३३. आम्ही मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं
सेवा कोणाची मी ॥ १ ॥ सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे
छंदें ॥ २ ॥ बोलतसें जैसें बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा ॥ ३ ॥ पाप
पुण्य ज्याचें तोचि जाणे कांहीं । संबंध हा नाहीं आम्हांसवें ॥ ४ ॥ तुका
म्हणे तुम्ही आइका हो मात । आम्ही या अतीत देहाहूनी ॥ ५ ॥
४०३४.
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो झाला सोहळा अनुपम्य ॥ १ ॥ आनंदें
दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग झाला ॥ २ ॥ एकदेशी होतों
अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें झाला सुकाळ हा ॥ ३ ॥ फिटलें सुतक
जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी झालों ॥ ४ ॥ नारायणें दिला वसतीस ठाव
। ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥ ५ ॥ तुका म्हणे दिलें उमटूनि जगीं । घेतलें
तें अंगीं लावूनियां ॥ ६ ॥
४०३५. मरण माझें मरोन गेलें । मज केलें
अमर ॥ १ ॥ ठाव पुसिलें बुड पुसिलें । वोस वोसलें देहभाव ॥ २ ॥ आला होता
गेला पूर । धरिला धीर जीवनीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बुनादीचें । झालें साचें
उजवणें ॥ ४ ॥
४०३६. जगा काळ खाय । आम्हीं माथां दिले पाय ॥ १ ॥
नाचों तेथें उभा राहे । जातां व्यंग करी साहे ॥ २ ॥ हरिच्या गुणें धाला ।
होता खातचि भुकेला ॥ ३ ॥ तुका म्हणे हळु । झाला कढत शितळु ॥ ४ ॥
४०३७.
हातीं घेऊनियां काठीं । तुका लागला कलेवरा पाठी ॥ १ ॥ नेऊनि निजविलें
स्मशानीं । माणसें जाळी तें ठिकाणीं ॥ २ ॥ काढिलें तें ओढें । मागील
उपचाराचें पुढें ॥ ३ ॥ नाहीं वाटों आला भेव । सुख दुःख भोगिता देव ॥ ४ ॥
याजसाठी हें निर्वाण । केलें कसियेलें मन ॥ ५ ॥ तुका म्हणे अनुभव बरा ।
नाहीं तरी हस्तपाय चोरा ॥ ६ ॥
४०३८. मरणा हातीं सुटली काया ।
विचारें या निश्चयें ॥ १ ॥ नासोनियां गेली खंती । सहजस्थिति भोगाची ॥ २ ॥ न
देखेंसें झाले श्रम । आलें वर्म हाता हें ॥ ३ ॥ तुका म्हणे कैंची कींव ।
कोठें जीव निराळा ॥ ४ ॥
४०३९. जाला प्रेतरूप शरीराचा भाव ।
लक्षियेला ठाव स्मशानींचा ॥ १ ॥ रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया । म्हणती
हायहाय यमधर्म ॥ २ ॥ वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि लागला
ब्रह्मत्वेंसी ॥ ३ ॥ फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य ध्वनि बोंब झाली ॥
४ ॥ दिली तिळांजुळी कुळनामरूपासी । शरीर ज्याचें त्यासी समर्पिलें ॥ ५ ॥
तुका म्हणे रक्षा झाली आपोआप । उजळला दीप गुरुकृपा ॥ ६ ॥
४०४०. कोण
आतां कळिकाळा । येऊं बळा देईल ॥ १ ॥ सत्ता झाली त्रिभुवनीं । चक्रपाणी
कोंवसा ॥ २ ॥ लडिवाळांचा भार वाहे । उभा आहे कुढावया ॥ ३ ॥ तुका म्हणे
घटिका दिस । निमिषही न विसंबे ॥ ४ ॥
४०४१. आम्हां शरणागतां । एवढी
काय करणें चिंता ॥ १ ॥ परि हे कौतुकाचे खेळ । अवघे पाहातों सकळ ॥ २ ॥
अभयदानवदें । आम्हां कैंचीं भयद्वंद्वें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही । हरिजन
साधनाचे स्वामी ॥ ४ ॥
४०४२. अणुरेणुया थोकडा । तुका आकाशा एवढा ॥ १ ॥
गिळुनी सांडिले कळिवर । भवभ्रमाचा आकार ॥ २ ॥ सांडिली त्रिपुटी । दीप
उजळला घटीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । उरलों उपकारापुरता ॥ ४ ॥
४०४३.
माझे मनोरथ पावले जैं सिद्धी । तईं पायीं बुद्धि स्थिरावली ॥ १ ॥ समाधान
जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरणें हे ॥ २ ॥ त्रिविध तापाचें झालेंसे
दहन । सुखावलें मन प्रेमसुखें ॥ ३ ॥ महालाभ वाचे वसे पांडुरंग । अंगोअंगीं
संग अखंडित ॥ ४ ॥ जीवनाचा झाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरीं मावळलें ॥ ५
॥ तुका म्हणे माप भरूं आलें सिगे । धारबोळ गंगे पूर वाहे ॥ ६ ॥
No comments:
Post a Comment