Saturday, 3 May 2025

२१. स्थितीपर अभंग : लोकांशी बोलणे

श्री तुकोबाराय यांनी आपल्या आत्मस्थितीभावाविषयी लोकांशी संवाद साधला, त्याविषयीचे अभंग.

स्थितीपर अभंग :  लोकांशी बोलणे (अभंग संख्या २३१) 

१९४३. अचळ न चळे ऐसें झालें मन । धरूनि निज खूण राहीलों तें ॥ १ ॥ आवडी बैसली गुणांची अंतरीं । करूं धणीवरी सेवन तें ॥ २ ॥ एकविध भाव नव्हे अभावना । आणिक या गुणां न मिळवे ॥ ३ ॥ तुका म्हणे माझे पडिलें आहारीं । ध्यान विटेवरी ठाकलें तें ॥ ४ ॥

१९४४. अनुभवाचे रस देऊं आर्तभूतां । सोडूं चोजवितां पुढें पोतीं ॥ १ ॥ देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणी आपुलिया ॥ २ ॥ आधीं भाव सार शुद्ध हे भूमिका । बीज आणि पिका चिंता नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्याचें नाम गुणवंत । तें नाहीं लागत पसरावें ॥ ४ ॥

१९४५. अनुभवा आलें । माझें चित्तींचें क्षरलें ॥ १ ॥ असे जवळी अंतरे । फिरे आवडीच्या फेरें ॥ २ ॥ खादलेंचि वाटे । खावें भेटलेंचि भेटे ॥ ३ ॥ तुका म्हणे उभें । आम्ही राखियेलें लोभें ॥ ४ ॥

१९४६. अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥ १ ॥ तरी धरिला विश्वास । ठेलों होऊनियां दास ॥ २ ॥ पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥ ३ ॥ तुका म्हणे कंठीं नाम । अंगीं भरलेंसें प्रेम ॥ ४ ॥ 

१९४७. असो खळ ऐसे फार । आम्हां तयांचें उपकार ॥ १ ॥ करिती पातकांची धुणीं । मोल न घेतां साबणीं ॥ २ ॥ फुकाचे मजूर । ओझें वागविती भार ॥ ३ ॥ पार उतरुन म्हणे तुका । आम्हां आपण जाती नरका ॥ ४ ॥

१९४८. असोत लोकांचे बोल शिरावरी । माझी मज बरी विठाबाई ॥ १ ॥ आपंगिलें मज आहे ते कृपाळू । बहुत कनवाळू अंतरींची ॥ २ ॥ वेदशास्त्रे जिसीं वर्णिती पुराणें । तिचें मी पोसणें लडिवाळ ॥ ३ ॥ जिचे नाम कामधेनु कल्पतरू । तिचें मी लेंकरूं तुका म्हणे ॥ ४ ॥

१९४९. अवचिताचि हातीं ठेवा । दिला सेवा न करितां ॥ १ ॥ भाग्य फळलें जाली भेटी । नेघें तुटी यावरी ॥ २ ॥ दैन्य गेलें हरली चिंता । सदैव आतां यावरी ॥ ३ ॥ तुका म्हणे वांटा जाला । बोलों बोला देवासी ॥ ४ ॥

१९५०. आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा ॥ १ ॥ अवघियांचें वंदिन पाय । ठायाठाय न देखें ॥ २ ॥ नेदीं तुटों समाधान । थांबों जन सकळ ॥ ३ ॥ तुका म्हणे झाडा होय । तों हे सोय न संडीं ॥ ४ ॥

१९५१. काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत रहावें कोण्या बळें ॥ १ ॥ कोपला पाटील गांवींचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ २ ॥ आतां येणें चवी सांडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणांत ॥ ३ ॥ भले लोकीं याची सांगितलीं मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥ ४ ॥ तुका म्हणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥ ५ ॥

१९५२. आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हेंचि दृढ ॥ १ ॥ जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ २ ॥ जोडीन ते आतां देवाचें चरण । अविनाश धन परमार्थ ॥ ३ ॥ तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणें इहलोकां आलों ॥ ४ ॥

१९५३. आतां चुकलें बंधन । गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण । सावकाश विकावे ॥ १ ॥ लाभ जोडला अनंत । घरीं सांपडलें वित्त । हातोहातीं थीत । उरों तळ नल्हाची ॥ २ ॥ होतें गोविलें विसारें । माप जालें एकसरें । होतें होरें वारें । तोंचि लाहो साधिला ॥ ३ ॥ कराया जतन । तुका म्हणे निजधन । केला नारायण । साह्य नेदी विसंबों ॥ ४ ॥

१९५४. आतां देह अवसान । हें जतन तोंवरी ॥ १ ॥ गाऊं नाचूं गदारोळें । जिंकों बळें संसार ॥ २ ॥ याचि जाऊं अभिमानें । सेवाधनें बळकट ॥ ३ ॥ तुका म्हणे न सरें मागें । होईन लागे आगळा ॥ ४ ॥

१९५५. आतां वाटों नेदीं आपुलें हें मन । न सोडीं चरण विठोबाचे ॥ १ ॥ दुजियाचा संग लागों नेदीं वारा । आपुल्या शरीरावरूनियां ॥ २ ॥ यावें जावें आम्हीं देवाचे सांगातें । मागूनि करित हेंचि आलों ॥ ३ ॥ काय वायां गेलों करूं तों उद्वेग । उभा पांडुरंग मागें पुढें ॥ ४ ॥ तुका म्हणे प्रेम मागतों आगळें । येथे भोगूं फळें वैकुंठींचीं ॥ ५ ॥

१९५६. आतां पुढें मना । चाली जाली नारायणा ॥ १ ॥ येथें राहिलें राहिलें । कैसें गुंतोनि उगलें ॥ २ ॥ भोंवतें भोंवणीं । आलियाची जाली धणी ॥ ३ ॥ तुका म्हणे रंगें । रंगी रंगलें श्रीपांडुरंगे ॥ ४ ॥ 

१९५७. आतां होईन धरणेकरी । भीतरीच कोंडीन ॥ १ ॥ नाहीं केली जीवेंसाटीं । तों कां गोष्टी रुचे ते ॥ २ ॥ आधीं निर्धार तो सार । मग भार सोसेना ॥ ३ ॥ तुका म्हणे खाऊं जेऊं । नेदूं होऊं वेगळा ॥ ४ ॥

१९५८. आधीं नाहीं कळों आला हा उपाय । नाहीं तरी काय चुकी होती ॥ १ ॥ घालितों पायांसी मिठी एकसरें । नेदी तो दुसरें आड येऊं ॥ २ ॥ कासया पडतों लटिक्याचे भरी । नव्हता कां शिरीं भार घेतों ॥ ३ ॥ संसाराचा हाट फिरतों दुकानें । भरोवरी धन मेळवितों ॥ ४ ॥ तुका म्हणे कां हे घेतों गर्भवास । कां या होतों दास कुटुंबाचा ॥ ५ ॥

१९५९. आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख ॥ १ ॥ गौप्य धन नये वारा लागों यास । पाहों नेदूं वास दुर्जनासी ॥ २ ॥ झणी दृष्टि लागे आवडीच्या रसा । सेवूं जिरे तैसा आपणासी ॥ ३ ॥ तुका म्हणे हें बहु सुकुमार । न साहावे भार वचनाचा ॥ ४ ॥

१९६०. आपुला तो देह आम्हां उपेक्षीत । कोठें जाऊं हित सांगों कोणा ॥ १ ॥ कोण नाहीं दक्ष करितां संसार । आम्हीं हा विचार वमन केला ॥ २ ॥ नाहीं या धरीत जीवित्वाची चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥ ३ ॥ तुका म्हणे असों चिंतोनियां देवा । मी माझें हा हेवा सारूनियां ॥ ४ ॥

१९६१. आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल ॥ १ ॥ भाग्यें पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ २ ॥ पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥ ३ ॥ तुका म्हणे जाली जोडी । चरण घडी न विसंबें ॥ ४ ॥

१९६२. आजि शिवला मांग । माझें विटाळलें आंग ॥ १ ॥ यासी घेऊं प्रायश्चित्त । विठ्ठल विठ्ठल हृदयांत ॥ २ ॥ झाली क्रोधासवें भेटी । तोंडावाटे नर्क लोटी ॥ ३ ॥ अनुतापीं न्हाऊं । तुका म्हणे रवी पाहूं ॥ ४ ॥

१९६३. आपुला विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥ १ ॥ आपलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ २ ॥ आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥ ३ ॥ माझी कोण बोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लागे ॥ ४ ॥ तुका म्हणे भाकू आपुली करुणा । जयाची वासना तया फळें ॥ ५ ॥

१९६४. आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥ १ ॥ लागेल तरी कोणी घ्यावें धणीवरी । अमुपचि परी आवडीच्या ॥ २ ॥ उभारिला कर प्रसिद्ध या जग । करूं केला त्याग मागें पुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे होय दरिद्र विच्छिन्न । ऐसें देऊं दान एक वेळां ॥ ४ ॥

१९६५. आवडी भोजन प्रकार परवडी । भिन्नभिन्न गोडी एका रसा ॥ १ ॥ भोगित्या पंगती लाधलों प्रसाद । तिहीं नाहीं भेद राखियेला ॥ २ ॥ पाकसिद्धि स्वहस्तकें विनियोग । आवडीचे भाग सिद्ध केले ॥ ३ ॥ तुका म्हणे आला उच्छिष्ट प्रसाद । तेणें हा आनंद माझ्या जीवा ॥ ४ ॥

१९६६. आम्हां अळंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वांहों कंठीं ॥ १ ॥ लाडिके डिंगर पंढरीरायाचे । निरंतर वाचे नामघोष ॥ २ ॥ आम्हां आणिकांची चाड चित्तीं नाहीं । सर्व सुख पायीं विठोबाच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही नेघोंचि या मुक्ति । एकाविण चित्तीं दुजें नाहीं ॥ ४ ॥

१९६७. आम्हां आवडे नाम घेतां । तोही पिता संतोषे ॥ १ ॥ उभयतां एकचित्त । तरी प्रीत वाढली ॥ २ ॥ आम्ही शोभों निकटवासें । अनारिसें न दिसों ॥ ३ ॥ तुका म्हणे पांडुरंगे । अवघीं अंगें निवालीं ॥ ४ ॥

१९६८. आम्हां कथा आवश्यक । येर संपादूं लौकिक ॥ १ ॥ जैसी तैसी माय बरी । मानिल्या त्या माना येरी ॥ २ ॥ व्यालीचा कळवळा । जीव बहुत कोंवळा ॥ ३ ॥ कवतुकें वावरें । तुका म्हणे त्या आधारें ॥ ४ ॥

१९६९. आम्हां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे ॥ १ ॥ आम्हांसी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥ २ ॥ काय करावी हे कोणाची मान्यता । करितां अनंता कोण वारी ॥ ३ ॥ नाहीं शीण आम्हां झालें कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥ ४ ॥ तुका म्हणे खातों आनंदाचे लाडू । नका चरफडूं घ्या रे तुम्ही ॥ ५ ॥

१९७०. आम्हां वैष्णवांचा । नेम काया मनें वाचा ॥ १ ॥ धीर धरूं जिवासाठीं । येऊं नेदूं लाभा तुटी ॥ २ ॥ उचित समय । लाज निवारावें भय ॥ ३ ॥ तुका म्हणे कळा । जाणों नेम नाहीं बाळा ॥ ४ ॥

१९७१. आम्हां हरीच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रयलोकीं ॥ १ ॥ देव उभा मागें पुढें । उगवी कोडें संकट ॥ २ ॥ जैसा केला तैसा होय । धांवे सोय धरोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे असों सुखें । गाऊं मुखें विठोबा ॥ ४ ॥

१९७२. आम्ही आइते जेवणार । नलगे सोसावें डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणेंचि वाढेल ॥ १ ॥ ठेवा जोडला मिरासी । ठाव झाला पायांपाशीं । नव्हे आणिकांसी । रीघ तेथें यावया ॥ २ ॥ बळी दिला जीवभाव । नेणें आणिकांचें नांव । धरिला एकभाव । तो विश्वास फळला ॥ ३ ॥ तुका म्हणे झालों बळीं । आम्ही निकट जवळी । बोलिलों तें पाळी । वचन स्वामी आमुचें ॥ ४ ॥

१९७३. आम्ही वीर झुंझार । करूं जमदाढे मार । थापटिले भार । मोड जाला दोषांचा ॥ १ ॥ जाला हाहाकार । आले अंकित जुंझार । शंखचक्राचे शृंगार । कंठीं हार तुळसीचे ॥ २ ॥ रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन । झळकती निशाण । गरुडटके पताका ॥ ३ ॥ तुका म्हणे काळ । जालों जिंकोनि निश्चळ । पावला सकळ । भोग आम्हां आमुचा ॥ ४ ॥

१९७४. आम्ही सदैव सुडके । जवळी येतां चोर धाके । जाऊं पुढें भिके । कुतरीं घर राखती ॥ १ ॥ नांदणूक ऐसें सांगा । नाहीं तरी वायां भागा । थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ २ ॥ अक्षई साचार । केलें सायासांनीं घर । एरंडासीहार । दुजा भार न साहती ॥ ३ ॥ धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी । जतन तीं करी । कोण गुरें वासरें ॥ ४ ॥ जाली सकळ निश्चिंती । भांडवल शेण माती । झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ॥ ५ ॥ तुका म्हणे देवा । अवघा निरविला हेवा । कुटुंबाची सेवा । तोचि करी आमुच्या ॥ ६ ॥

१९७५. आम्ही हरीचे संवगडे । जुने ठायींचे वेडे बागडे । हातीं धरूनि कडे । पाठींसवें वागविलों ॥ १ ॥ म्हणोनि भिन्न भेद नाहीं । देवा आम्हां एक देहीं । नाहीं जालों कई । एका एक वेगळे ॥ २ ॥ निद्रा करितां होतों पायीं । सवेंचि लंका घेतली तईं । वानर गोवळ गाई । सवें चारित फिरतसों ॥ ३ ॥ आम्हां नामाचें चिंतन । राम कृष्ण नारायण । तुका म्हणे क्षण । खातां जेवितां न विसंबों ॥ ४ ॥ 

१९७६. इहलोकीं आम्हां भूषण अवकळा । भोपळा वाकळा अन्न भिक्षा ॥ १ ॥ निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥ २ ॥ छिद्राचा आश्रम उंदीरकुळवाडी । धन नाम जोड़ी देवाची ते ॥ ३ ॥ तुका म्हणे एके सेवटीं राहणें । वर्ततां या जनाविरहित ॥ ४ ॥

१९७७. इहलोकींचा हा देहे । देव इच्छिताती पाहें ॥ १ ॥ धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे झालों ॥ २ ॥ आयुष्याच्या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥ ३ ॥ तुका म्हणे पावटणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥ ४ ॥

१९७८. उखतें आयुष्य जायाचें कलेवर । अवघें वोडंबर विषयांचें ॥ १ ॥ कोणासी हा लागे पुसणें विचार । मनचि सादर करूं आतां ॥ २ ॥ उत्पत्ति प्रळय पडिलें दळण । पाकाचें भोजन बीज वाढे ॥ ३ ॥ तुका म्हणे जाऊं अभयाच्या ठायां । रिघों देवराया शरण वेगीं ॥ ४ ॥

१९७९. उभे चंद्रभागे तीरीं । कट धरोनियां करीं । पाउलें गोजिरीं । विटेवरी शोभलीं ॥ १ ॥ त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचा मनें हेवा । संचिताचा ठेवा । जोडी हातीं लागली ॥ २ ॥ रूप डोळियां आवडे । कीर्ति श्रवणीं पवाडे । मस्तका नावडे । उठों पायांवरोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे नाम । ज्याचें नासी क्रोध काम । हरी भवश्रम । उच्चारितां वाचेसी ॥ ४ ॥

१९८०. उपजोनि मरें । परी हेंचि वाटे बरें ॥ १ ॥ नाहीं आवडीसी पार । न म्हणवे झालें फार ॥ २ ॥ अमृताची खाणी । उघडली नव्हे धणी ॥ ३ ॥ तुका म्हणे पचे । विठ्ठल हें मुखा रुचे ॥ ४ ॥

१९८१. उल्लंघिली लाज । तेणें साधियेलें काज ॥ १ ॥ सुखें नाचों पैलतीरीं । गेलों भवाचे सागरीं ॥ २ नामाची सांगडी । सुखें बांधली आवडी ॥ ३ ॥ तुका म्हणे लोकां । उरली वाचा मारीं हाका ॥ ४ ॥

१९८२. एक भाव चित्तीं । तरी न लगे कांहीं युक्ति ॥ १ ॥ कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ २ ॥ आठवचि पुरे । सुख अवघें मोहरें ॥ ३ ॥ तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ॥ ४ ॥ 

१९८३. एका ऐसें एक होतें कोणा काळें । समर्थाच्या बळें काय नव्हे ॥ १ ॥ घालूनि बैसलों मिरासीस पाया । जिंकों देवराया संदेह नाहीं ॥ २ ॥ केला तो न संडीं आतां कइवाड । वारीन हे आड कामक्रोध ॥ ३ ॥ तुका म्हणे जाली आळसाची धाडी । नव्हती आली जोडी कळों साच ॥ ४ ॥

१९८४. एकांती लोकांतीं करूं गदारोळ । लेश तोही मळ नाहीं येथें ॥ १ ॥ घ्यावें द्यावें आम्हीं आपुलिया सत्ता । न देखों पुसता दुजा कोणी ॥ २ ॥ भांडाराची किल्ली माझे हातीं आहे । पाहिजे तो पाहें वाण येथें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां विश्वासाच्या बळें । ठेविलें मोकळें देवें येथें ॥ ४ ॥

१९८५. एकविध वृत्ति न राहे अंतरीं । स्मरणींच हरि विस्मृति हे ॥ १ ॥ कैसा हा नवलाव वाटतो अनुभवें । मज माझ्या जीवें साक्षित्वेंसी ॥ २ ॥ न राहे निश्चळ जागवितां मना । किती क्षणक्षणा सावरावें ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु केले वेवसाव । तेणें रंगें जीव रंगलासे ॥ ४ ॥

१९८६. ऐसा दुस्तर भवसागर । नेणों कैसा उतरूं पार ॥ धृ. ॥ कामक्रोधादि सावजें थोर । दिसताती भयंकर ॥ २ ॥ मायाममतेचे भोंवरे । घेती भयानक फेरे ॥ ३ ॥ वासनेच्या लहरी येती । उद्योगहेलकावे बैसती ॥ ४ ॥ तरावया एक युक्ति असे । तुका नामनावेमधें बैसे ॥ ५ ॥

१९८७. ऐसी वर्में आम्हां असोनियां हातीं । कां होऊं नेणतीं दिशाभुली ॥ १ ॥ पोटाळुनी पाय कवळीन उभा । कृपे पद्मनाभा हालों नेदीं ॥ २ ॥ आपुले इच्छेचे घालोनी संपुटी । श्रीमुख तें दृष्टी न्याहाळीन ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु सांडियेलीं मतें । आपुल्या पुरतें धरूनि ठेलों ॥ ४ ॥

१९८८. ऐसीं ठावीं वर्मे । तरी सांडवलों भ्रमें ॥ १ ॥ सुखें नाचतों कीर्तनीं । नाहीं आशंकित मनीं ॥ २ ॥ ऐसें आलें हाता । बळ तरी गेली चिंता ॥ ३ ॥ सुख येथें आलें तरी । नाहीं आणिकांची उरी ॥ ४ ॥ ऐसें केलें देवें । पुढें कांहींच न व्हावें ॥ ५ ॥ तुका म्हणे मन । आतां झालें समाधान ॥ ६ ॥

१९८९. कईं मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं ॥ १ ॥ केला पांडुरंगें तुझा अंगीकार । मग होईल धीर माझ्या जीवा ॥ २ ॥ म्हणऊनि मुख अवलोकितों पाय । हेचि मज आहे थोरी आशा ॥ ३ ॥ माझिया मनाचा हाचि पैं विश्वास । न करीं सायास साधनांचे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज होईल भरंवसा । तरलों मी ऐसा साच भावें ॥ ५ ॥

१९९०. करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींचि ॥ १ ॥ माझीये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ २ ॥ काय मी पामर जाणें अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदें ॥ ३ ॥ निमित्त मापासी बैसविलों आहे । मी तो कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥ ४ ॥ तुका म्हणे आहे पाईकचि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥ ५ ॥

१९९१. करूं तैसें पाठांतर । करुणापर भाषण ॥ १ ॥ जिहीं केला मूर्तिमंत । ऐसा संतप्रसाद ॥ २ ॥ सोज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटा मागीलां ॥ ३ ॥ तुका म्हणे घेऊं धांवा । करूं हांवा तें जोडी ॥ ४ ॥

१९९२. करूं याची कथा नामाचा गजर । आम्हां संवसार काय करी ॥ १ ॥ म्हणवूं हरीचे दास लेऊं तीं भूषणें । कांपे तया भेणें कळिकाळ ॥ २ ॥ आशा भय लाज आड नये चिंता । ऐसी तया सत्ता समर्थाची ॥ ३ ॥ तुका म्हणे करूं ऐसियाचा संग । जेणें नव्हे भंग चिंतनाचा ॥ ४ ॥ 

१९९३. कल्याण या आशीर्वादें । जाती द्वंद्वे नासोनि ॥ १ ॥ आश्वासिले नारायणें । प्रेमदानें अंतरींच्या ॥ २ ॥ गेली निवारोनि आतां । सकळ चिंता यावरी ॥ ३ ॥ तुका म्हणे गातां गीत । आलें हित सामाेरे ॥ ४ ॥

१९९४. काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥ १ ॥ तो मज दावा तो मज दावा । नंदानंदन जीवा आवडे तो ॥ २ ॥ गोवर्धन गिरी उचलिला करीं । गोकुळ भीतरीं राखियेलें ॥ ३ ॥ वधुनि भौमासुरा आणिल्या गोपांगना । राज्य उग्रसेना मथुरेचे ॥ ४ ॥ पांडव जोहरीं राखिले कुसरी । विवराभीतरीं चालविले ॥ ५ ॥ तुका म्हणे तो हा भक्तांचा कृपाळ । दुष्ट जना काळ नारायण ॥ ६ ॥

१९९५. काय उणें मज पांडुरंगा पायीं । रिद्धिसिद्धि ठायीं वोळंगती ॥ १ ॥ कोण पाहे सुखा नाशिवंताकडे । तृष्णेचीं बापुडें नव्हों आम्ही ॥ २ ॥ सर्व सुखें आम्हीं केलीं पावटणी । पापपुण्यें दोन्ही उडविलीं ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं आणिलें वैकुंठ । वसविली पेठ वैष्णवांची ॥ ४ ॥

१९९६. काय कृपेविण घालावें सांकडें । निश्चिंती निवाडें कोण्या एका ॥ १ ॥ आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेची ॥ २ ॥ धरूनि भय आतां काय वाहो चिंता । काय करूं आता आप्तपण ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणऊनि देव दुरे दुरे ॥ ४ ॥

१९९७. काय शरीराचें काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करूं ॥ १ ॥ देईन हाक नारायणा । ते तों नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धांवेल ॥ २ ॥ सांतांपांचांचे गोठले । प्रारब्धे आकारलें । आतां हें संचलें । असो भोगा सांभाळीं ॥ ३ ॥ फावली तें बरवी संधि । सावधान करूं बुद्धी । तुका म्हणे मधी । कोठें नेघें विसावा ॥ ४ ॥

१९९८. काळाचेही काळ । आम्ही विठोबाचे लडिवाळ ॥ १ ॥ करूं सत्ता सर्वांठायीं । वसों निकटवासें पायीं ॥ २ ॥ ऐसी कोणाची वैखरी । वदे आमुचे सामोरी ॥ ३ ॥ तुका म्हणे बाण । हातीं हरिनाम तीक्षण ॥ ४ ॥

१९९९. किती वेळां जन्मा यावें । नित्य व्हावें फजीत ॥ १ ॥ म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोसी ॥ २ ॥ प्रारब्ध हें पाठीं गाढें । न सरे पुढें चालतां ॥ ३ ॥ तुका म्हणे रोकडी हे । होती पाहें फजिती ॥ ४ ॥

२०००. कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥ १ ॥ जालें वाऱ्या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ २ ॥ कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदविता ॥ ३ ॥ तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसलें भय ॥ ४ ॥

२००१. कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटपट सरेल हे ॥ १ ॥ कोणा आराणूक होईल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ २ ॥ माझा येणें दुःखें फुटतसे प्राण । न कळतां जन सुखी असे ॥ ३ ॥ भोगा आधीं मनें मानिलासे त्रास । पाहे लपायास ठाव कोठें ॥ ४ ॥ तुका म्हणे देतों देवाचें गाऱ्हाणें । माझें ऋण येणें सोसियेलें ॥ ५ ॥

२००२. कोणे गांवीं आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुम्हां कोणा ॥ १ ॥ लागतसें पायां येतों लोटांगणीं । मात तरी कोणी सांगा याची ॥ २ ॥ गुण रूप याचे वाणितां या संतां । मज क्षेम देतां सुख वाटे ॥ ३ ॥ सर्वस्वें हा जीव ठेवीन चरणीं । पांडुरंग कोणी दावी तया ॥ ४ ॥ तुका म्हणे गाईवत्सा तडातोडी । तैसी जाते घडी एकी मज ॥ ५ ॥ 

२००३. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥ १ ॥ कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारुं । उतरी पैलतीरू भवनदीचा ॥ २ ॥ कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसांवा । वाटे न करावा परता जीवा ॥ ४ ॥

२००४. कृपेचे सागर हेचि साधुजन । तिंहीं कृपादान केलें मज ॥ १ ॥ बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणें माझा स्थिर केला जीव ॥ २ ॥ तेणें सुखें मन स्थिर झालें ठायीं । संतीं दिला पायीं ठाव मज ॥ ३ ॥ नाभी नाभी ऐसें बोलिले वचन । तें माझें कल्याण सर्वस्वही ॥ ४ ॥ तुका म्हणे झालों आनंदें निर्भर । नाम निरंतर घोष करूं ॥ ५ ॥

२००५. खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥ १ ॥ मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तों येथें फोल सत्ता त्याची ॥ २ ॥ कुल्लाळाच्या हातें घटाच्या उत्पत्ति । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवन तें नारायणीं । प्रभा ते किरणीं प्रकाशाची ॥ ४ ॥

२००६. खेळतों ते खेळ पायांच्या प्रसादें । नव्हती हीं छंदें नासिवंतें ॥ १ ॥ माझा मायबाप उभा विटेवरी । कवतुकें करी कृपादान ॥ २ ॥ प्रसादाची वाणी वदती उत्तरें । नाहीं मतांतरें जोडियेलीं ॥ ३ ॥ तुका म्हणे रस वाढतीया अंगें । छाया पांडुरंगें केली वरी ॥ ४ ॥

२००७. खेळों मनासवें जीवाच्या संवादें । कौतुकें विनोदें निरंजनीं ॥ १ ॥ पचीं पडिलें तें रुचे वेळोवेळां । होतसे डोहळा आवडीसी ॥ २ ॥ एकांताचें सुख जडलें जिव्हारीं । वीट परिचारीं बरा आला ॥ ३ ॥ जगा ऐसी बुद्धि नव्हे आतां कदा । लंपट गोविंदा झालों पायीं ॥ ४ ॥ आणिक ते चिंता नलगे करावी । नित्य नित्य नवी आवडी हे ॥ ५ ॥ तुका म्हणे धडा राहिला पडोन । पांडुरंगीं मन विसांवलें ॥ ६ ॥

२००८. गाऊं नेणें परी मी कांहीं गाईन । शरण जाईन पांडुरंगा ॥ १ ॥ ब्रह्मांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ ॥ २ ॥ वेश्या ज्याच्या नामें तारिली गणिकां । अजामेळासारिखा पापरासी ॥ ३ ॥ चरणींच्या रजें अहिल्या तारिली । रूपवंत केली कुब्जा दासी ॥ ४ ॥ पृथिवी तारिली पाताळासी जातां । तुका म्हणे आतां आम्ही किती ॥ ५ ॥

२००९. गुणांची आवडी वाचेचा पसरु । पडिला विसरु सर्व रसां ॥ १ ॥ आदि मध्य अंतीं नाहीं अवसान । जीवनीं जीवन मिळोनि गेलें ॥ २ ॥ रामकृष्ण नाममाळा हे साजिरी । ओविली गोजिरी कंठाजोगी ॥ ३ ॥ तुका म्हणे तनु झालीसे शीतळ । अवघी सकळ ब्रह्मानंदें ॥ ४ ॥

२०१०. गाढवाचे घोडें । आम्ही करूं दृष्टीपुढें ॥ १ ॥ चघळी वाहाणा । माघारीया बांडासुणा ॥ २ ॥ सोंग संपादणी । तरी करूं शुद्ध वाणी ॥ ३ ॥ तुका म्हणे खळ । करूं समयीं निर्मळ ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२०११. घालूनी लोळणी पडलों अंगणीं । सिंचा सिंचवणी तीर्थवरी ॥ १ ॥ वोल्हावेल तनु होईल शीतळ । झाली हळहळ बहु तापें ॥ २ ॥ पावेन या ठाया कईं झालें होतें । आलों अवचितें उष्ट्यावरी ॥ ३ ॥ तुका म्हणे कोणी जाणवा राउळीं । येईल जवळीं पांडुरंग ॥ ४ ॥

२०१२. चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता स्फुंद अंगीं ॥ १ ॥ आतां पुढें वांयां जावें हें तें काई । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ २ ॥ गुणदोष आले जगाचे अंतरा । भूतांच्या मत्सरावरी बुद्धि ॥ ३ ॥ तुका म्हणे करूं उपेदश लोकां । नाहीं जालों एका परता दोषा ॥ ४ ॥

२०१३. चित्तीं धरीन मी पाउलें सुकुमार । सकळ बिढार संपत्तीचे ॥ १ ॥ कंठीं धरीन नाम अमृताची वल्ली । होईल राहिली शीतळ तनु ॥ २ ॥ पाहेन श्रीमुख साजिरे सुंदर । सकळां आगर लावण्याचें ॥ ३ ॥ करीन अंगसंग बाळकाचें परी । बैसेन तो वरी नुतरें कडिये ॥ ४ ॥ तुका म्हणे हा केला तैसा होय । धरिली मनें सोय विठोबाची ॥ ५ ॥

२०१४. चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तोचि आम्हीं कंठीं सांठविला ॥ १ ॥ काय एक उणें आमुचिये घरीं । वोळंगती द्वारीं रिद्धिसिद्धि ॥ २ ॥ असुर जयानें घातले तोडरीं । आम्हांसि तो जोडी कर दोन्ही ॥ ३ ॥ रूप रेखा नाहीं जयासी आकार । आम्हीं तो साकार भक्ती केला ॥ ४ ॥ अनंत ब्रह्मांडें जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आम्हांसाठीं ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्ही देवाहूनी बळी । जालों हे निराळी ठेवुनि आशा ॥ ६ ॥ (धृ. नाही)

२०१५. जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुःख धर्म जें जें कांहीं ॥ १ ॥ अंधापुढें जेणें दिधला आधार । त्याचा हा विचार तोचि जाणे ॥ २ ॥ शरणागता जेणें घातलें पाठीशीं । तो जाणे तेविशीं राखों तया ॥ ३ ॥ कासे लागे तया न लगती सायास । पोहोणार त्यास पार पावी ॥ ४ ॥ तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हातीं । दिला त्याची गति तोचि जाणे ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२०१६. जरि आड येती लाज । कैसें काज साधतें ॥ १ ॥ करणें केलें उठाउठी । पायीं मिठीं घातली ॥ २ ॥ समर्पिला जीव भाव । धरिला भाव अखंड ॥ ३ ॥ तुका म्हणे आड कांहीं । काळ नाहीं घातला ॥ ४ ॥

२०१७. जाऊं देवाचिया गांवां । देव देईल विसांवा ॥ १ ॥ देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥ २ ॥ घालूं देवासीच भार । देव सुखाचा सागर ॥ ३ ॥ राहों जवळी देवापाशीं । आतां जडोनि पायांसी ॥ ४ ॥ तुका म्हणे आम्ही बाळें । या देवाचीं लडिवाळें ॥ ५ ॥ (धृ. नाही)

२०१८. जालें भांडवल । अवघा पिकला विठ्ठल ॥ १ ॥ आतां वाणी काशासाठीं । धीर धरावाच पोटीं ॥ २ ॥ आपुल्या संकोचें । म्हणऊनि तेथें टांचे ॥ ३ ॥ घेतों खऱ्या मापें । तुका देखोनियां सोपें ॥ ४ ॥

२०१९. जाळी महाकर्में । दावी निजसुखवर्में ॥ १ ॥ ऐसें कळलें आम्हां एक । झालों नामाचे धारक ॥ २ ॥ तपाचे सायास । नलगे घ्यावा वनवास ॥ ३ ॥ तुका म्हणे येणें । कळिकाळ हें ठेंगणें ॥ ४ ॥

२०२०. जिव्हे जाला चळ । नाहीं अवसान तें पळ ॥ १ ॥ हेंचि वोसणावोनी उठी । देव सांठविला पोटीं ॥ २ ॥ नाहीं ओढा वारा । पडिला प्रसंग तो बरा ॥ ३ ॥ तुका म्हणे जाली । मज हे अनावर बोली ॥ ४ ॥

२०२१. जे गाती अखंड विठ्ठलाचें गीत । त्यांचे पायीं चित्त ठेवीन मी ॥ १ ॥ जयांसी आवडे विठ्ठलाचें नाम । ते माझे परम प्राणसखे ॥ २ ॥ जयांसी विठ्ठल आवडे लोचनीं । त्यांचें पायवणी स्वीकारीन ॥ ३ ॥ विठ्ठलासी जिहीं दिला सर्वभाव । त्यांच्या पायीं जीव ठेवीन मी ॥ ४ ॥ तुका म्हणे रज होईन चरणींचा । म्हणविती त्यांच्या हरीचे दास ॥ ५ ॥

२०२२. जेथें लक्ष्मीचा वास । गंगा आली पापा नाश ॥ १ ॥ तुझीं पाउलें सुकुमार । तेथें मन माझें भ्रमर ॥ २ ॥ ठाव धरिला संतजनीं । सुखें राहिले लपोनी ॥ ३ ॥ तुका म्हणे वांकी । भाट झाली तिन्हीं लोकीं ॥ ४ ॥

२०२३. जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करूनि झाडा ॥ १ ॥ सोंवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां अवघ्या दुरीं ॥ २ ॥ परें परतें मज न लगे सांगावें । हें तों बरें देवें शिकविलें ॥ ३ ॥ दुसऱ्याते आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥ ४ ॥ येथें कांहीं कोणी न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥ ५ ॥ लांचावला तुका मारितसे झड । पुरविलें कोड नारायणें ॥ ६ ॥

२०२४. ज्यानें आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां ॥ १ ॥ मन येथें साह्य जालें । हरीच्या धालें गुणवादीं ॥ २ ॥ चुकुर तो गेला काळ । जालें बळ संगाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे धरूं सत्ता । होईल आतां करूं तें ॥ ४ ॥

२०२५. डोळां भरिलें रूप । चित्तीं पायांचा संकल्प ॥ १ ॥ अवघी घातली वांटणी । प्रेम राहिले कीर्तनी ॥ २ ॥ जिव्हा केली माप । रासी हरिनाम अमुप ॥ ३ ॥ भरूनियां भाग । तुका बैसला पांडुरंग ॥ ४ ॥

२०२६. तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंद्रियांचा ॥ १ ॥ म्हणोनि कीर्तन मज । सांडोनियां लाज हेंचि करीं ॥ २ ॥ पहातां आगमनिगमाचे ठाव । तेथें नाहीं भाव एकविध ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें नाहीं वो विकार । नाम एक सार विठोबाचें ॥ ४ ॥

२०२७. तीर्थींची अपेक्षा स्थळीं वाढे धर्म । जाणावे तें वर्म बहु पुण्य ॥ १ ॥ बहु बरी ऐसी भाविकाची जोडी । काळ नाहीं घडी जात वांयां ॥ २ ॥ करूनि चिंतन करवावें आणिकां । तो या जाला लोकां नाव जगीं ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसे परउपकारी । त्यांच्या पायांवरी डोई माझी ॥ ४ ॥

२०२८. जोंवरि तोंवरि शोभतील गारा । जंव नाहीं हिरा प्रकाशला ॥ १ ॥ जोंवरि तोंवरि शोभती दीपिका । नुगवतां एका भास्करासी ॥ २ ॥ जोंवरि तोंवरि सांगती संतपणाचिया गोष्टी । जंव नाहीं भेटी तुकयासवें ॥ ३ ॥ (धृ. नाही)

२०२९. दिनरजनीं हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥ १ ॥ संकल्पिला देह देवा । सकळ हेवा ते ठायीं ॥ २ ॥ नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंद्रिया ॥ ३ ॥ कीर्ति मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥ ४ ॥

२०३०. देवकीनंदनें । केलें आपुल्या चिंतनें ॥ १ ॥ मज आपुलिया ऐसें । मना लावूनियां पिसें ॥ २ ॥ गोवळे गोपाळां । केलें लावूनियां चाळा ॥ ३ ॥ तुका म्हणे संग । केला दूरी नव्हे मग ॥ ४ ॥

२०३१. देव तिळीं आला । गोडें गोड जीव धाला ॥ १ ॥ साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ २ ॥ पापपुण्य गेलें । एका स्नानेंचि खुंटलें ॥ ३ ॥ तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनीं ॥ ४ ॥

२०३२. देवाचें निर्माल्य कोण शिवे हातीं । संकल्पासी होती विकल्प ते ॥ १ ॥ वाहिले देह हें देवा एकसरें । होईल तें बरें तेणें द्वारें ॥ २ ॥ होता भार त्याची निवारली खंती । येथें आतां रिती साठवण ॥ ३ ॥ तुका म्हणे इच्छे पावविले कष्ट । म्हणऊनि नष्ट दुरावली ॥ ४ ॥

२०३३. देवा वरील भार । काढूं नये कांहीं पर ॥ १ ॥ तहान भुके आठवण । घडे तें बरें चिंतन ॥ २ ॥ देखावी निश्चिंती । तेंचि अंतर श्रीपती ॥ ३ ॥ वैभव सकळ । तुका मानितो विटाळ ॥ ४ ॥

२०३४. देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥ १ ॥ तेचि येताती ढेंकर । आनंदाचे हरिहर ॥ २ ॥ वेधी आणिकांस । ऐसा जया अंगीं कस ॥ ३ ॥ तुका म्हणे भूक । येणें न लगे आणीक ॥ ४ ॥

२०३५. देहभाव आम्ही राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥ १ ॥ आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तोचि पुढें देव करीतसे ॥ २ ॥ म्हणऊनि नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥ ३ ॥ जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥ ४ ॥ तुका म्हणे जालों जयाचे अंकित । तोचि माझें हित सर्व जाणे ॥ ५ ॥

२०३६. दैन्य दुःख आम्हां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥ १ ॥ सर्व सुखें येती मानें लोटांगणीं । कोण यांसी आणी दृष्टीपुढें ॥ २ ॥ आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचें ॥ ३ ॥ आमुचें मागणें मागों त्याची सेवा । मोक्षाची निर्दैवा कोणा चाड ॥ ४ ॥ तुका म्हणे पोटीं सांठविला देव । न्यून तो हा भाव कोण आम्हां ॥ ५ ॥

२०३७. दोहीं बाहीं आम्हां वास । असो कास घालूनि ॥ १ ॥ बोल बोलों उभयतां । स्वामीसत्ता सेवेची ॥ २ ॥ एकसरें आज्ञा केली । असों चाली ते निती ॥ ३ ॥ तुका म्हणे जोहारितों । आहे होतों ते ठायीं ॥ ४ ॥

२०३८. द्रव्याचा तों आम्ही धरितों विटाळ । तया पाठीं काळ लाग करी ॥ १ ॥ करोनियां हेंचि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥ २ ॥ तुका म्हणे हेंचि करूनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥ ३ ॥

२०३९. धर्म रक्षावयासाठीं । करणें आटी आम्हांसि ॥ १ ॥ वाचा बोलों वेदनीति । करूं संतीं केलें तें ॥ २ ॥ न बाणतां स्थिति अंगीं । कर्म त्यागी लंड तो ॥ ३ ॥ तुका म्हणे अधर्म त्यासी । भक्ति दूषी हरीची ॥ ४ ॥

२०४०. धर्माचें पाळण । करणें पाखांड खंडण ॥ १ ॥ हेंचि आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥ २ ॥ तीक्षण उत्तरें । हातीं घेऊनि बाण फिरे ॥ ३ ॥ नाहीं भीड भार । तुका म्हणे साना थोर ॥ ४ ॥

२०४१. धरावें तें भय । जाती अंतरोनि पाय ॥ १ ॥ झाल्या तुटी देवासवें । काय वांचोनि करावें ॥ २ ॥ कोणासी पारिखें । लेखूं आपणासारिखें ॥ ३ ॥ तुका म्हणे असो । अथवा हे आतां नसो ॥ ४ ॥

२०४२. धरिलीं जीं होतीं चित्तीं । डोळां तेचि दिसती ॥ १ ॥ आलें आवडीसी फळ । झालें कारण सकळ ॥ २ ॥ घेईन भातुकें । मागोनियां कवतुकें ॥ ३ ॥ तुका म्हणे लाड । विठोबा पुरवील कोड ॥ ४ ॥

२०४३. धरोनि दोन्हीं रूपें पाळणें संहार । करी कोप रुद्र दयाळ विष्णु ॥ धृ. ॥ जटाजूट एका मुगुट माथां शिरीं । कमळापति गौरीहर एक ॥ २ ॥ भस्मउद्धळण लक्ष्मीचा भोग । शंकर श्रीरंग उभयरूपीं ॥ ३ ॥ वैजयंती माळ वासुकीचा हार । लेणें अळंकार हरिहरा ॥ ४ ॥ कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ॥ ५ ॥ तुका म्हणे मज उभयरूपीं एक । सारोनि संकल्प शरण आलों ॥ ६ ॥

२०४४. नका मजपाशीं । वदों प्रपंचाचें विशीं ॥ १ ॥ आतां नाइकवे कानीं । मज देवाविण वाणी ॥ २ ॥ येऊनियां रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥ ३ ॥ मागें आजिवरी । जालें माप नेलें चोरी ॥ ४ ॥ सांडियेलीं पानें । पुढें पिका अवलोकनें ॥ ५ ॥ पडों नेदी तुका । आड गुंफूं कांहीं चुका ॥ ६ ॥

२०४५. नको ऐसें जालें अन्न । भूक ताहान ते गेली ॥ १ ॥ गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ २ ॥ राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहींचे ॥ ३ ॥ देह धरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥ ४ ॥ जाऊं नेदी करितां सोस । क्षमा दोष करवीन ॥ ५ ॥ तुका म्हणे याचे पाठी । आतां साटी जीवाची ॥ ६ ॥ 

२०४६. न पडो आतां हाडीं घाव । मध्यें कींव नासक ॥ १ ॥ करविली आत्महत्या । जीवा कां त्या द्वंद्वाच्या ॥ २ ॥ आशापाशीं गुंतला गळा । तेणें कळाहीन झालों ॥ ३ ॥ तुका म्हणे लावू मुळी । जीवकुळीं थारेसी ॥ ४ ॥

२०४७. नये पुसों आज्ञा केली एकसरें । आम्हांसी दुसरें नाहीं आतां ॥ १ ॥ ज्याचा तो बळिवंत सर्व निवारता । आम्हां काय चिंता करणें लागे ॥ २ ॥ बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक । काय नाहीं एक अंगीं तया ॥ ३ ॥ तुका म्हणे मज होईल वारिता । तरी काय सत्ता नाहीं हातीं ॥ ४ ॥

२०४८. नव्हता भेटी तोंचि बरें । होतां चोरें नाडिलें ॥ १ ॥ अवघियांचा केला झाडा । रिता वाडा खोंकर ॥ २ ॥ चिंतनाचें मूळ चित्त । नेलें वित्त हरुनि ॥ ३ ॥ तुका म्हणे मूळा आलें । होतें केलें तैसेंचि ॥ ४ ॥

२०४९. नव्हतों सावचित्त । तेणें अंतरलें हित ॥ १ ॥ पडिला नामाचा विसर । वाढविला संवसार ॥ २ ॥ लटिक्याचे पुरीं । गेलों वाहोनियां दुरीं ॥ ३ ॥ तुका म्हणे नाव । आम्हां सांपडला भाव ॥ ४ ॥

२०५०. न संडावा ठाव । ऐसा निश्चयाचा भाव ॥ १ ॥ आतां पुरे पुन्हां यात्रा । हेचि सारूनि सर्वत्रा ॥ २ ॥ सन्निधचि सेवा । असों करूनियां देवा ॥ ३ ॥ आज्ञेच्या पाळणें । असें तुका संतां म्हणे ॥ ४ ॥

२०५१. नाचावेंसें वाटे मना । छंद गुणा अधीन ॥ १ ॥ चेष्टविलीं माझीं गात्रें । सत्तासूत्रें हालतीं ॥ २ ॥ नामरूपें रंगा आलीं । तेचि चाली स्वभावें ॥ ३ ॥ तुका म्हणे पांडुरंगे । अंग संगें कवळिलें ॥ ४ ॥

२०५२. नाहीं दिलें कधीं कठिण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥ १ ॥ म्हणऊनि आतां वियोग न साहे । लांचावलें देहे संघष्टणें ॥ २ ॥ वेळोवेळां वाचे आठवितां नाम । अधिकचि प्रेम चढे घेतां ॥ ३ ॥ तुका म्हणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविलें ॥ ४ ॥

२०५३. नाहीं मज कृपा केली पांडुरंगे । संतांचिया संगें पोट भरीं ॥ १ ॥ चतुराचे सभे पंडित कुशळ । मी काय दुर्बळ विष्णुदास ॥ २ ॥ तुका म्हणे नेणें करूं समाधान । धरिले चरण विठोबाचे ॥ ३ ॥

२०५४. नाहीं म्यां वंचिला मंत्र कोणापाशीं । राहिलों जीवासीं धरूनि तो ॥ १ ॥ विटेवरी भावें ठेवियेलें मन । पाउलें समान चिंतीतसे ॥ २ ॥ पावविलों पार धरिला विश्वास । घालूनियां कास बळकट ॥ ३ ॥ तुका म्हणे मागें पावले उद्धार । तिहीं हा आधार ठेविलासे ॥ ४ ॥

२०५५. नाहीं त्रिभुवनीं सुख या समान । म्हणऊनि मन स्थिरावलें ॥ १ ॥ धरियेली जीवीं पाउलें कोवळीं । कंठीं एकावळी नाममाळा ॥ २ ॥ शीतळ होऊनि पावलों विश्रांति । न साहे पुढती चाली चित्ता ॥ ३ ॥ तुका म्हणे जाले सकळ सोहळे । पुरविलें डोहळे पांडुरंगे ॥ ४ ॥

२०५६. विरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासावीस ॥ १ ॥ म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ २ ॥ देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥ ३ ॥ तुका म्हणे देव अंतरे यामुळें । आशामोहजाळें दुःख वाढे ॥ ४ ॥ 

२०५७. नेणें अर्थ कांहीं नव्हती माझे बोल । विनवितों कोपाल संत झणीं ॥ १ ॥ नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगें व्यापूनियां ॥ २ ॥ मज मूढा शक्ति कैंचा हा विचार । निगमादिकां पार बोलावया ॥ ३ ॥ राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारी । बोबड्या उत्तरीं हेंचि ध्यान ॥ ४ ॥ तुका म्हणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगें भार घेतला माझा ॥ ५ ॥

२०५८. नेणें जप तप अनुष्ठान याग । काळें तंव लाग घेतलासे ॥ १ ॥ रिघालों या भेणें देवाचे पाठीसी । लागे ज्याचें त्यासी सांभाळणें ॥ २ ॥ मापें माप सळे चालिली चढती । जाली मग राती काय चाले ॥ ३ ॥ तुका म्हणे चोरा हातीं जें वांचले । लाभावरी आलें वारिलेशु ॥ ४ ॥

२०५९. न्यावयासी मूळ पाठवील कधीं । मज कृपानिधी पांडुरंग ॥ १ ॥ प्राण फुटे माझा त्याचिया वियोगें । घडी जाय युगें येकीयेकी ॥ २ ॥ त्याचिये गांवींची आवड ती जीवा । जीव हा सांडावा वोवाळूनी ॥ ३ ॥ दिनो दिन चिंता वाटते बहुत । नावडे संचित करावेंसें ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां आहे तेंचि सरो । कोण करी भरोवरी मग ॥ ५ ॥

२०६०. पडिलें भोवणी । होतों बहु चिंतवणी ॥ १ ॥ होतों चुकलों मारग । लाहो केला लागवेग ॥ २ ॥ इंद्रियांचे संदी । होतों सांपडलों बंदी ॥ ३ ॥ तुका म्हणे बरें जालें । विठ्ठलसे वाचे आलें ॥ ४ ॥

२०६१. पढिये तें मागा पांडुरंगापाशीं । मज दुर्बळासी काय पीडा ॥ १ ॥ याचसाठीं दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥ २ ॥ कांहीं करितां कोठें नव्हे समाधान । विचारीतां पुण्य तेंचि पाप ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां निश्चळचि भलें । तुज आठविलें पांडुरंगा ॥ ४ ॥

२०६२. पापपुण्य दोन्ही वाहाती मारग । स्वर्गनर्कभोग यांची पेणीं ॥ १ ॥ एका आड एक नलगे पुसावें । जेविल्या देखावें मागें भूक ॥ २ ॥ राहाटीं पडिली भरोनियां रितीं । होतील मागुतीं येतीं जातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही खेळतों या मधीं । नाहीं केलें बुद्धि स्थिर पाहों ॥ ४ ॥

२०६३. पाववावें ठाया । असे सवें बोलों तया ॥ १ ॥ भावा ऐसी क्रिया राखे । खोट्या खोटेपणें वाखे ॥ २ ॥ न ठेवूं अंतर । कांहीं भेदाचा पदर ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवें भावें । सत्या मानविजे देवें ॥ ४ ॥

२०६४. पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । झालें या चित्तासी समाधान ॥ १ ॥ मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजें ॥ २ ॥ सांभाळासी येऊं नेदीतां उणीव । अधिकार गौरव राखे तैसा ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे । जया तैसा राहे कवळूनी ॥ ४ ॥

२०६५. पाहतां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या ॥ १ ॥ जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ २ ॥ श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद निवारोनी ॥ ३ ॥ महामळें मन होतें जें गादलें । शुद्ध चोखाळलें स्फटिक जैसें ॥ ४ ॥ तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥ ५ ॥

२०६६. पाळियेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥ १ ॥ बहुजन्माचें पोसणें । सरतें पायांपाशीं तेणें ॥ २ ॥ सवे दिली लागों । भातें आवडीचें मागों ॥ ३ ॥ तुका म्हणे भिन्न । नाहीं दिसों दिलें क्षण ॥ ४ ॥

२०६७. पाळिला विध तो आजि फळा आला । ऐसा हा कळला साच भाव ॥ १ ॥ नामाची आवडी लागलीसं चित्ता । पाय आठवितां सुख वाटे ॥ २ ॥ धरील्या देहाचें साधलें कारण । पुढिल्या खंडण गर्भवासा ॥ ३ ॥ तुका म्हणे लाभ झाला एकसरें । आणिक दुसरें नाहीं आतां ॥ ४ ॥

२०६८. पाळोनियां मोठें केलें । त्यासी बोलें ओळखी ॥ १ ॥ जवळोनि नवजे दुरी । लाड करी कौतुकें ॥ २ ॥ खूण उभा विटेवर । कटी कर ठेऊनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे घातली वरी । झुलीं थोरी मोलाची ॥ ४ ॥

२०६९. पुसावेंसें हेंचि वाटे । जें जें भेटे तयासी ॥ १ ॥ देव कृपा करील मज । काय लाज राहींल ॥ २ ॥ अवघियांचा विसर जाला । हा राहिला उद्योग ॥ ३ ॥ तुका म्हणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसा ॥ ४ ॥

२०७०. पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहळे श्रीरंगीं ॥ १ ॥ अंतर्बाही विलेपन । हें भूषण मिरवूं ॥ २ ॥ इच्छेऐसी आवडी पुरे । विश्वंभरे जवळीं ॥ ३ ॥ तुका करी नारायण । या सेवन नामाचें ॥ ४ ॥

२०७१. पोट धालें आतां जीवनीं आवडी । पुरवावी परवडी बहुतांची ॥ १ ॥ काय आंचवणा तांतडीचें काम । मागील ते श्रम न पवाची ॥ २ ॥ वाढितिया पोटीं बहु असे वाव । सांभाळितां ठाव काय वेचे ॥ ३ ॥ दाविल्यावांचूनि नाहीं कळों येत । तेथेंही दुश्चित एकपण ॥ ४ ॥ नावेचा भार तो उदकाचे शिरीं । काय हळू भारी तये ठायीं ॥ ५ ॥ तुका म्हणे गीतीं गाऊनि गोविंदू । करूं ब्रह्मानंदू एकसरें ॥ ६ ॥

२०७२. प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातो हरी ॥ १ ॥ मनेंसहित वाचा काया । अवघे दिले पंढरीराया ॥ २ ॥ सत्ता सकळ तया हातीं । माझी कींव काकुळती ॥ ३ ॥ तुका म्हणे ठेवी तैसें । आम्ही राहों त्याचे इच्छे ॥ ४ ॥

२०७३. बरवयांबरवंट । विटे चरण सम नीट ॥ १ ॥ तें म्यां हृदयीं धरिले । तापशमन पाउलें ॥ २ ॥ सकळ तीर्थां अधिष्ठान । करी लक्ष्मी संवाहन ॥ ३ ॥ तुका म्हणे अंतीं । ठाव मागितल संतीं ॥ ४ ॥

२०७४. बरें जालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा । चुकला पान्हेरा ओढाळांचा ॥ १ ॥ बहु केलें दुःखी त्याचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ २ ॥ त्याचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळही लाग घ्यावा लागे ॥ ३ ॥ नाहीं कोठें स्थिर राहों दिलें क्षण । आजिवरी सिण पावलों तो ॥ ४ ॥ वेगळाल्या खोडी केली तडातोडी । सांगावया घडी नाहीं सुख ॥ ५ ॥ निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥ ६ ॥

२०७५. बळिवंत आम्ही समर्थाचे दास । घातली या कास कळिकाळासी ॥ १ ॥ तेथे माणसाचा कोण आला पाड । उल्लंघोनि जड गेलों आधीं ॥ २ ॥ संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥ ३ ॥ तुका म्हणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥ ४ ॥

२०७६. बळियाचे अंकित । आम्ही जालों बळिवंत ॥ १ ॥ लाताळिला संसार । केला षडउर्मींचा मार ॥ २ ॥ जन तन धन । केलें तृणाही समान ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । आम्ही मुक्तीचिया माथां ॥ ४ ॥

२०७७. बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥ १ ॥ ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ २ ॥ जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातों विसरूनि सकळही ॥ ३ ॥ प्रपंचाबाहेरी नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाव ॥ ४ ॥ तुका म्हणे मज बहुरुप्याचि परी । जालें सोंग वरी आंत तैसें ॥ ५ ॥ 

२०७८. बहु कृपावंतें माझीं मायबापें । मी माझ्या संकल्पे अंतरलों ॥ १ ॥ संचितानें नाहीं चुकों दिली वाट । लाविलें अदट मजसवें ॥ २ ॥ आतां मी रुसतों न कळतां वर्म । परी ठावे धर्म सर्व देवा ॥ ३ ॥ तुका म्हणे उभा राहिला न बैसे । आमुचिया आसे उद्वेग त्या ॥ ४ ॥

२०७९. बहुजन्मीं केला लाग । तो हा भाग लाधलों ॥ १ ॥ जीव देईन हा बळी । करीन होळी संसारा ॥ २ ॥ गेलें मग नये हातां । पुढती चिंता वाटतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे तांतड करूं । पाय धरूं बळकट ॥ ४ ॥

२०८०. बहु बरें एकाएकीं । संग चुकी करावा ॥ १ ॥ ऐसें बरें जालें ठावें । अनुभवें आपुल्या ॥ २ ॥ सांगावें तें काम मना । सलगी जना नेदावी ॥ ३ ॥ तुका म्हणे निघे आगी । दुजे संगी आतळतां ॥ ४ ॥

२०८१. बाळ काय जाणे जीवन उपाय । वाहे बापमाय सर्व चिंता ॥ १ ॥ आइते भोजन खेळणे अंतरीं । अंकिताच्या शिरीं भार नाहीं ॥ २ ॥ आपुलें शरीर रक्षितां न कळे । सांभाळूनि लळे पाळी माय ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता । आमुची ते सत्ता तयावरी ॥ ४ ॥

२०८२. बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठवितां चित्तीं काय नव्हे ॥ १ ॥ आणिकां उपाया कोण वांटी मन । सुखाचें निधान पांडुरंग ॥ २ ॥ गीती गावों नाचों छंदें वाहों टाळी । वैष्णवांचे मेळीं सुखरूप ॥ ३ ॥ अनंत ब्रह्मांडें एके रोमावळी । आम्ही केला भोळीं भावें उभा ॥ ४ ॥ लटिका हा केला संसारसिंधु । मोक्ष खरा बंधु नाहीं पुढें ॥ ५ ॥ तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलों निश्चिंत त्याच्या बळें ॥ ६ ॥ 

२०८३. बैसोनियां खाऊं जोडी । ओढाओढी चुकवूनि ॥ १ ॥ ऐसें केलें नारायणें । बरवें जिणें सुखाचें ॥ २ ॥ घरींच्या घरीं भांडवल । नलगे बोल वेचावे ॥ ३ ॥ तुका म्हणे आटाआटी । चुकली दाटी सकळ ॥ ४ ॥

२०८४. बोलणें तें आम्ही बोलों उपयोगीं । पडिलें प्रसंगीं काळा ऐसे ॥ १ ॥ जयामध्ये देव आदि मध्यें अंतीं । खोल पाया भिंती न खचेची ॥ २ ॥ करणें तें आम्ही करूं एकवेळे । पुढलिया बळें वाढी खुंटे ॥ ३ ॥ तुका म्हणे असो आज्ञेचीं धारकें । म्हणऊनि एकें बोलें सारूं ॥ ४ ॥

२०८५. बोलविलें जेणें | तोचि त्याचे गुह्य जाणे ॥ १ ॥ मी तो काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ २ ॥ मजुराच्या हातें । माप जालें गेलें रितें ॥ ३ ॥ जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता ॥ ४ ॥ मायबापासवें । बाळें कौतुकें खेळावें ॥ ५ ॥ जैसा करिती धंदा । तैसा पडोनियां छंदा ॥ ६ ॥ त्याच्या साच गाई म्हैसी । येणें खेळावें मातीशीं ॥ ७ ॥ तुका म्हणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥ ८ ॥

२०८६. बोलाल या आतां आपुल्या पुरतें । मज या अनंतें गोवियेलें ॥ १ ॥ झाडिला न सोडी हातींचा पालव । वेधी वेधें जीव वेधियेला ॥ २ ॥ तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी । मज सवें मिठी अंगसंगें ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हां होईल ये परी । अनुभवावरीं येईल मग ॥ ४ ॥

२०८७. बोलावें म्हूण बोलतों उपाय । प्रवाहें जाय गंगाजळ ॥ १ ॥ भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैचे येथें जन अधिकारी ॥ २ ॥ मुखी देतां घांस पळवितां तोंड । अंगींचिया भांड असुखानें ॥ ३ ॥ तुका म्हणे पूजा करितों देवाची । आपुलिया रुची मनाचिये ॥ ४ ॥

२०८८. बोलावें तें आम्ही आतां अबोलणें । एकाचि वचनें सकळासि ॥ १ ॥ मेघवृष्टि कांहीं न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळें ॥ २ ॥ तुका म्हणे नाहीं समाधानें चाड । आपणाही नाड पुढिलासी ॥ ३ ॥

२०८९. बंधनाचा तोडूं फांसा । देऊं आशा टाकोनि ॥ १ ॥ नाहीं तेंच घेतां शिरी । होईल दुरी निजपंथ ॥ २ ॥ नाथिलेंचि माझे तुझें । कोण ओझें वागवी ॥ ३ ॥ तुका म्हणे अंतराय । देवीं काय जिणें तें ॥ ४ ॥

२०९०. व्यापक हा विश्वंभर । चराचर ज्याचेनी ॥ १ ॥ पंढरीराय विटेवरी । त्याचीं धरीं पाउलें ॥ २ ॥ अवघियांचा हाचि ठाव । देवीं देव सकळ ॥ ३ ॥ तुका म्हणे न करी सोस । भेदें दोष उफराटे ॥ ४ ॥

२०९१. साधनाच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचे ॥ १ ॥ पक्षियासी नाहीं मारगीं आडताळा । अंतरिक्षीं फळासीचि पावें ॥ २ ॥ भक्तीची जोडी ते उखत्याचि साठीं । उणें पुरें तुटी तेथें नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आलें सांचत सांचणी । आजी जाली धणी एकसरें ॥ ४ ॥

२०९२. येणें बोधें आम्ही असों सर्वकाळ । करूं हे निर्मळ हरिकथा ॥ १ ॥ आम्ही भूमीवरी एक पै दैवाचें । निधान हें वाचें सांपडलें ॥ २ ॥ तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥ ३ ॥ न चळे हा मंत्र न म्हणें यातीकुळ । नलगे काळ वेळ विचारावी ॥ ४ ॥ तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । सांठवीन हांवा हृदयांत ॥ ५ ॥

२०९३. रुसलों या आम्हीं आपुल्या संसारा । तेथें जनाचारा कोण पाड ॥ १ ॥ आम्हां इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाहीं या दुसरें देवाविण ॥ २ ॥ दुराविले बंधु सखे सहोदर । आणिक विचार काय तेथें ॥ ३ ॥ उपाधिवचन नाइकती कान । त्रासलें हें मन बहु माझें ॥ ४ ॥ तुका म्हणे करा ठाकेल ते दया । सुख दुःख वांयां न धरावें ॥ ५ ॥

२०९४. सुनियाचा हाचि भाव । आपुला ठाव राखावा ॥ १ ॥ दुजियाचा येऊं वारा । नेदूं घरावरी देऊं ॥ २ ॥ केली याची फाडाफाडी । तडामोडी क्षेत्राची ॥ ३ ॥ पातेजत नाहीं लोकां । देव तुका वांचूनीं ॥ ४ ॥

२०९५. सुनियाची आवडी देवा । घेत सेवा नाहीं कांहीं ॥ १ ॥ शिकविलें जवळी बैसों । जेथें असों तेथेंचि ॥ २ ॥ नेदी दुजें बोल करूं । गुरुगुरु न साहे ॥ ३ ॥ तुका म्हणे कुर्वाळितां । अंग सत्ता संगाची ॥ ४ ॥

२०९६. ब्रह्मादिक जया लाभासि ठेंगणें । बळिये आम्ही भले शरणागत ॥ १ ॥ कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । झाला पद्मनाभ सेवाऋणी ॥ २ ॥ कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाही वरुषावें ॥ ३ ॥ बैसलिये ठायीं लागलें भरतें । त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥ ४ ॥ हारी नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसावला ॥ ५ ॥ तुका म्हणे बहु लाठे हें भोजन । नाहीं रिता कोण रहात राहों ॥ ६ ॥

२०९७. भक्ति आम्ही केली सांडूनि उद्वेग । पावलों हें संगसुख याचें ॥ १ ॥ सुख आम्हां झालें धरितां याचा संग । पळालें उद्वेग सांडूनियां ॥ २ ॥ तुका म्हणे बहु सुख झालें जीवा । घडली या सेवा विठोबाची ॥ ३ ॥

२०९८. भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगीं । अभंग प्रसंगी धैर्यवंत ॥ १ ॥ नाहीं ते पुरवीत आणुनि जवळी । गाऊनि माउली गीत सुखें ॥ २ ॥ प्रीति अंगीं असे सदा सर्वकाळ । वोळली सकळ सुखें ठायीं ॥ ३ ॥ आपुल्या स्वभावें जैसे जेथें असों । तैसे तेथें दिसों साजिरेचि ॥ ४ ॥ वासनेचा कंद उपडिलें मूळ । दुरितें सकळ निवारिलीं ॥ ५ ॥ तुका म्हणे भक्तजनांची माउली । करील साउली विठ्ठल आम्हां ॥ ६ ॥

२०९९. भूतीं देव म्हणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी ॥ १ ॥ जाणे भाव पांडुरंग अंतरींचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥ २ ॥ दयेसाठीं केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नाव कथा ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं पडत उपवास । फिरतसे आस धरोनियां ॥ ४ ॥

२१००. भोळे भाविक हे जुनाट चांगले । होय तैसे केलें भक्तिभावें ॥ १ ॥ म्हणऊनि चिंता नाहीं आम्हां दासां । न भ्यों गर्भवासा जन्म घेतां ॥ २ ॥ आपुलिया इच्छा करूं गदारोळ । भोगूं सर्वकाळ सर्व सुखें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां देवाचा सांगात । नाहीं विसंबत येरयेरां ॥ ४ ॥

२१०१. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदू ऐसे ॥ १ ॥ मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥ २ ॥ भले तरी देऊं गांडीची लंगोटी । नाठ्याळाचे काठी देऊं माथां ॥ ३ ॥ मायबापाहूनि बहु मायावंत । करूं घातपात शत्रुहूनि ॥ ४ ॥ अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरी ॥ ६ ॥

२१०२. मन झालें भाट । कीर्ति मुखें घडघडाट । पडियेली वाट । येचि चाली स्वभावें ॥ १ ॥ बोलें देवाचे पवाडे । नित्य नवेचि रोकडें । ज्यापरी आवडे । तैसा तैसा करूनि ॥ २ ॥ रोखीं राहावें समोर । पुढें मागें चाले भार । करावें उत्तर । सेवा रुजू करूनि ॥ ३ ॥ पुरविला देकारें । संतोषाच्या अभय करें । अंगींच्या उतारें । तुकया स्वामी शृंगारी ॥ ४ ॥

२१०३. मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥ १ ॥ ऐसें ग्वाही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ २ ॥ पुढिलांचे मना आणी गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥ ३ ॥ तुका म्हणे जाली कोंबड्याची परी । पुढेंचि उकरी लाभ नेणे ॥ ४ ॥

२१०४. मागणें तें मागों देवा । करूं भक्ती त्याची सेवा ॥ १ ॥ काय उणें तयापाशीं । रिद्धीसिद्धी ज्याच्या दासी ॥ २ ॥ कायावाचामन । करूं देवा हें अर्पण ॥ ३ ॥ तुका म्हणे विश्वंभर । ज्याच्यानें हें चराचर ॥ ४ ॥

२१०५. भूत भविष्य कळों यावें वर्तमान । हें तों भाग्यहीन त्याची जोडी ॥ १ ॥ आम्हीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धेंचि ॥ २ ॥ जगरूढीसाठीं घातले दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धिसिद्धि ॥ ४ ॥

२१०६. मागें बहुतां जन्मीं । हेंचि करीत आलों आम्ही । भवतापश्रमीं । दुःखें पीडिले निववूं त्यां ॥ १ ॥ गर्जो हरीचे पवाडे । मेळवूं वैष्णव बागडे । पाझर रोकडे । काढूं पाषाणामध्यें ॥ २ ॥ भाव शुद्ध नामावळी । हर्षें नाचों पिटूं टाळी । घालूं पायां तळी । कळिकाळ या बळें ॥ ३ ॥ कामक्रोध बंदी खाणी । तुका म्हणे दिले दोन्ही । इंद्रियांचें धनी । आम्ही जालों गोसावी ॥ ४ ॥

२१०७. माझिये बुद्धीचा खुंटला उपाय । करिसील काय पाहणें तें ॥ १ ॥ सूत्रधारी तूं हें सकळचाळिता । कासया अनंता भार वाहो ॥ २ ॥ वाहिले संकल्प न पवती सिद्धी । येऊं देहबुद्धीवरी नये ॥ ३ ॥ तुका म्हणे दुःखीं करिती तरंग । चिंतूं पांडुरंग आवरूनि ॥ ४ ॥ 

२१०८. माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें हें संतान द्रव्य कोणा ॥ १ ॥ फुकाचा विभाग पतन दुःखासी । दोहींमुळे त्यासी तेंचि साधे ॥ २ ॥ नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनिया ॥ ३ ॥ तुका म्हणे देव असाध्य यामुळें । आशा मोह जाळीं गुंतलिया ॥ ४ ॥

२१०९. मायामोहजाळीं होतों सांपडला । परी या विठ्ठला कृपा आली ॥ १ ॥ काढूनि बाहेर ठेविलों निराळा । कवतुक डोळां दाखविलें ॥ २ ॥ नाचे उडे माया करी कवतुक । नाशवंत सुखें साच केलीं ॥ ३ ॥ रडे फुंदे दुःखें कुटितील माथा । एकासी रडतां तेंही मरे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज वाटतें नवल । मी हे माझे बोल ऐकोनियां ॥ ५ ॥

२११०. माया साक्षी आम्ही नेणों भीड भार । आप आणि पर नाहीं दोन्ही ॥ १ ॥ सत्याचियेसाठी अवघाचि भर । नावडे व्यापार तुटीचा तो ॥ २ ॥ पोभाळितां चरे अंतरीचें दुःख । लांसें फांसें मुख उघडावें ॥ ३ ॥ तुका म्हणे नव्हे स्फीतीचा हा ठाव । निवाड्यासी देव साक्षी केला ॥ ४ ॥

२१११. मुखीं विठ्ठलाचें नाम । मग कैंचा भवभ्रम ॥ धृ. ॥ चालतां बोलतां खातां । जेवितां निद्रा करितां ॥ २ ॥ सुखें असों संसारीं । मग जवळीच हरि ॥ ३ ॥ मुक्ति वरील भक्ति जाण । अखंड मुखीं नारायण ॥ ४ ॥ मग देवभक्त झाला । तुका तुकी उतरला ॥ ५ ॥

२११२. मुनि मुक्त जाले भेणें गर्भवासा । आम्हां विष्णुदासां सुलभ तो ॥ १ ॥ अवघाची संसार केला ब्रह्मरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनियां ॥ २ ॥ पुराणीं उपदेश साधन उद्भट । आम्हां सोपी वाट वैकुंठींची ॥ ३ ॥ तुका म्हणे जनां सकळांसहित । घेऊं अखंडित प्रेमसुख ॥ ४ ॥

२११३. मोक्षपद तुच्छ केलें याकरणें । आम्हां जन्म घेणें युगायुगीं ॥ १ ॥ विटे ऐसें सुख नव्हे भक्तिरस । पुढतापुढती आस सेवावें हें ॥ २ ॥ देवा हातीं रूप धरविला आकार । नेदूं निराकार होऊं त्यासी ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्त निवांत राहिलें । ध्याईं तीं पाउलें विटेवरी ॥ ४ ॥

२११४. म्हणउनि खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयली ॥ १ ॥ माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ २ ॥ करूनि ओळखी दिली एकसरें । न देखों दुसरें विषमासी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं काळापाशीं गोवा । स्थिति मति देवावांचूनियां ॥ ४ ॥

२११५. मृत्युलोकीं आम्हां आवडती परी । नाहीं एका हरिनामेंविण ॥ १ ॥ विटलें हें चित्त प्रपंचापासूनि । वमन तें मनीं बैसलेंसें ॥ २ ॥ सोनें रूपें आम्हां मृत्तिकेसमान । माणिक पाषाण खडे जैसे ॥ ३ ॥ तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हां पुढें ॥ ४ ॥

२११६. याचिया आधारें राहिलो निश्चिंत । ठेवूनियां चित्त पायीं सुखें ॥ १ ॥ माझें सुख दुःख जाणे हित फार । घातलासे भार पांडुरंगा ॥ २ ॥ कृपेचीं पोसणीं ठायींचीं अंकिलीं । म्हणऊनि लागली त्यास चिंता ॥ ३ ॥ मन राखे हातीं घेउनियां काठी । इंद्रियें थापटी फांकों नेदी ॥ ४ ॥ तुका म्हणे यासी अवघड नाहीं । शरणागता कांहीं रक्षावया ॥ ५ ॥

२११७. याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥ १ ॥ परते न सरवे दुरी । क्षण हरीपासूनि ॥ २ ॥ जाले तरी काय तंट । आतां चट न सांडे ॥ ३ ॥ तुका म्हणे चक्रचाळे । वेड बळें लाविलें ॥ ४ ॥ 

२११८. याती मतिहीन रूपें लीन दीन । आणीक अवगुण जाणोनियां ॥ १ ॥ केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ २ ॥ जें कांहीं करतों तें माझें स्वहित । आली हे प्रचित कळों चित्ता ॥ ३ ॥ जालें सुख जीवा आनंद अपार । परमानंदें भार घेतला माझा ॥ ४ ॥ तुका म्हणे यासी नामाचा अभिमान । म्हणोनि शरण तारी बळें ॥ ५ ॥

२११९. येणें जाणें तरी । राहे देव कृपा करी ॥ १ ॥ ऐसें तंव पुण्य नाहीं । पाहातां माझे गांठीं कांहीं ॥ २ ॥ भय निवारिता । कोण वेगळा अनंता ॥ ३ ॥ तुका म्हणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥ ४ ॥

२१२०. राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एकचि सकळ दुजें नाहीं ॥ १ ॥ मंगळावांचूनि उमटेना वाणी । अखंडचि खाणी एकी रासी ॥ २ ॥ मोडलें हें स्वामी ठायाठाव सेवा । वाढवावा हेवा कोणा अंगें ॥ ३ ॥ तुका म्हणे अवघे दुमदुमिलें देवें । उरलें तें गावें हेंचि आतां ॥ ४ ॥

२१२१. रिद्धिसिद्धि दासी कामधेनु घरीं । परी नाहीं भाकरी भक्षावया ॥ १ ॥ लोडें बालिस्तें पलंग सुपत्ति । परी नाहीं लंगोटी नेसावया ॥ २ ॥ पुसाल तरी आम्हां वैकुंठीचा वास । परी नाहीं राह्यास ठाव कोठें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे । परी नाहीं कोणाचें उणें पुरें ॥ ४ ॥ (धृ. नाही)

२१२२. लटिकियाच्या आशा । होतों पडिलों वोळसा । होऊनियां दोषां । पात्र मिथ्या अभिमानें ॥ १ ॥ बरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । अक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ २ ॥ मरणाची नाहीं शुद्धि । लोभीं प्रवर्तली बुद्धि । परती तों कधीं । घडेचि ना माघारी ॥ ३ ॥ सांचवूनि मरे धन । लावी पोरांसी भांडण । नाहीं नारायण । तुका म्हणे स्मरला ॥ ४ ॥

२१२३. लावूनि काहाळा । सुखें करितों सोहळा ॥ १ ॥ सादावीत गेलों जना । भय नाहीं सत्य जाणा ॥ २ ॥ गातां नाचतां विनोदें । टाळघागरियांच्या छंदें ॥ ३ ॥ तुका म्हणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥ ४ ॥

२१२४. लेंकरा आइतें पित्याचें जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥ १ ॥ त्यापरी आमुचा जालासे सांभाळ । देखिलाची काळ नाहीं आड ॥ २ ॥ भुकेचे सन्निध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥ ३ ॥ आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगे ॥ ४ ॥

२१२५. वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज ॥ १ ॥ परी हें न कळे अभाविकां । जडलोकां जीवासी ॥ २ ॥ अनुश्रुत हे प्रासादिक । कृपा भीक स्वामीची ॥ ३ ॥ तुका म्हणे वरावरी । जातों तरी सांगत ॥ ४ ॥

२१२६. वचना फिरती अधम जन । नारायण तो नव्हे ॥ १ ॥ केला असतां अंगीकार । न मनीं भार समर्थ ॥ २ ॥ संसाराचा नाहीं पांग | देवें सांग सकळ ॥ ३ ॥ तुका म्हणे कीर्ति वाणूं । मध्यें नाणूं संकल्प ॥ ४ ॥

२१२७. वारकरी पायांपाशीं । आले त्यांसी विनविलें ॥ १ ॥ काय काय तें आइका । विसरों नका रंकासी ॥ २ ॥ चिंतावोनि चिंता केली । हे राहिली अवस्था ॥ ३ ॥ तुका म्हणे संवसारा । रुसलीं खरा यासाठीं ॥ ४ ॥

२१२८. विठो सांपडावया हातीं । ठावी झाली गती । न धरी भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥ १ ॥ लागे आपणचि हातीं । कींव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ २ ॥ एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवाच्या मेळें । उभा ठाके हांकेसी ॥ ३ ॥ बांधा माझिया जीवासी । तुका म्हणे प्रेमपाशीं । न सोडी तयासी । सर्वस्वासी उदार ॥ ४ ॥

२१२९. विश्वास तो देव । म्हूण धरियेला भाव ॥ १ ॥ माझी वदवितो वाणी । जेणें धरिली धरणी ॥ २ ॥ जोडिली अक्षरें । नव्हती बुद्धीच्या विचारें ॥ ३ ॥ नाहीं केली आटी । कांहीं मानदंभासाठी ॥ ४ ॥ कोणी भाग्यवंत । तया कळे हें उचित ॥ ५ ॥ तुका म्हणे झरा । आहे मुळींचाचि खरा ॥ ६ ॥

२१३०. वेद अनंत बोलिला । अर्थ इतुलाचि शोधिला ॥ १ ॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठा नाम गावें ॥ २ ॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतुलाचि निर्धार ॥ ३ ॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥ ४ ॥

२१३१. वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा । येरांनी वाहवा भार माथां ॥ धृ. ॥ खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं । भार धन वाही मजुरीचें ॥ २ ॥ उत्पत्तिपाळणसंहाराचें निज । जेणे नेलें बीज त्याचे हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां सांपडलें मूळ । आपणचि फळ आलें हाता ॥ ४ ॥

२१३२. वोखटा तरी मी विटलों देहासी । पुरे आतां ऐसी जोडी पुन्हां ॥ १ ॥ किती मरमर सोसावी पुढती । राहिलों संगती विठोबाचे ॥ २ ॥ आतां कोण याचा करील आदर । जावो कलेवर विटंबोनी ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां सांडी तेचि सांडीं । कोण फिरे लंडी यासी मागें ॥ ४ ॥

२१३३. वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें । पक्षीही सुस्वरें आळविती ॥ १ ॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ २ ॥ आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करूं ॥ ३ ॥ कंथाकमंडलू देहउपचारा । जाणवितो वारा अवसरूं ॥ ४ ॥ हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥ ५ ॥ तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥ ६ ॥

२१३४. शास्त्रांचें जें सार वेदांची जो मूर्ती । तो आम्हा सांगाती प्राणसखा ॥ १ ॥ म्हणउनि नाहीं आणिकांचा पांग । सर्व झालें सांग नामें एका ॥ २ ॥ सगुण निर्गुण जयाचिये अंगें । तोचि आम्हांसंगें क्रीडा करी ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभ आइते केले नव्हो ॥ ४ ॥

२१३५. शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल ॥ १ ॥ आपणियां रंजविलें । बापें माझिया विठ्ठलें ॥ २ ॥ हातीं प्रेमाचें भातुकें । आम्हां देऊनियां निकें ॥ ३ ॥ तुका करी टाहो । पाहे रखुमाईचा नाहो ॥ ४ ॥

२१३६. शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥ १ ॥ जाउनि वोसंगा रिघेन वोरस । लागेल तें इच्छे पीइनवरी ॥ २ ॥ कृपा तनु माझी सांभाळी दुभोनि । अमृतसंजीवनी लोटलीसे ॥ ३ ॥ आनंदाचा ठाव नाहीं माझें चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥ ४ ॥ सैर जाय पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आसे ॥ ५ ॥ तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाईचें ॥ ६ ॥

२१३७. सर्वकाळ डोळां बैसो नारायण । नयो अभिमान आड पुढें ॥ १ ॥ धाड पडो माझ्या थोरपणावरी । वाचे हरि हरि उच्चारीन ॥ २ ॥ जळो अंतरींचें सर्व जाणपण । विवादवचन अहंतेचें ॥ ३ ॥ सकळां चरणीं गळित माझा जीव । तुका म्हणे भाव एकविध ॥ ४ ॥

२१३८. सर्व काळ माझे चित्तीं । हेचि खंती राहिली ॥ १ ॥ बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ २ ॥ वेव्हाराची सरली मात । अखंडीत अनुसंधान ॥ ३ ॥ तुका म्हणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥ ४ ॥ 

२१३९. सर्वविशीं आम्ही हेचि जोडी केली । स्वामीची साधिली चरणसेवा ॥ १ ॥ पाहिलेंचि नाहीं मागें परतोनी । जिंकिला तो क्षणोक्षणीं काळ ॥ २ ॥ नाहीं पडों दिला विचाराचा गोवा । नाहीं पोटीं हेवा येऊं दिला ॥ ३ ॥ केली लागवेगीं अवघी तांतडी । भावना ते कुडी दुराविली ॥ ४ ॥ कोठें मग ऐसें होतें सावकाश । जळो तया आस वेव्हाराची ॥ ५ ॥ तुका म्हणे लाभ घेतला पालवीं । आतां नाहीं गोवी कासयाची ॥ ६ ॥

२१४०. सत्ता वर्ते मन । पाळी विठ्ठलाची आण ॥ १ ॥ आज्ञा वाहोनियां शिरीं । सांगितलें तेंचि करीं ॥ २ ॥ सरलीसे धांव । नलगे वाढवावी हांव ॥ ३ ॥ आहे नाहीं त्याचें । तुका म्हणे कळे साचे ॥ ४ ॥

२१४१. संतांची उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गंव्हारें जाणावें हें ॥ १॥ विठ्ठलाचें नाम घेतां नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ २ ॥ करितों कवित्व बोबड्या उत्तरीं । झणी मजवरी कोप धरा ॥ ३ ॥ काय माझी याती नेणा हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥ ४ ॥ तुका म्हणें मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥ ५ ॥

२१४२. संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य धर्म केला ॥ १ ॥ हरिभजनें हें धवळिलें जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥ २ ॥ कोणाहि नलगे साधनांचा पांग । करणें केला त्याग देहबुद्धि ॥ ३ ॥ तुका म्हणे सुख समाधि हरिकथा । नेणें भवव्यथा गाईल तो ॥ ४ ॥

२१४३. संसार तो कोण लेखे । आम्हां सखे हरिजन ॥ १ ॥ काळ ब्रह्मानंदें सरे । आवडी उरे संचली ॥ २ ॥ स्वप्नीं तेही नाहीं चिंता । रात्रीं जाता दिवस ॥ ३ ॥ तुका म्हणे ब्रह्मरसें । होय सरिसें भोजन ॥ ४ ॥

२१४४. साकरेच्या योगें वर्ख । राजा कागदातें देखे ॥ १ ॥ तैसें आम्हां माणुसपण । रामनाम केण्यागुणें ॥ २ ॥ फिरंगीच्या योगें करी । राजा काष्ठ हातीं धरी ॥ ३ ॥ रत्नकनका योगें लाख । कंठीं धरिती श्रीमंत लोक ॥ ४ ॥ देवा देवपाट । देव्हाऱ्यावरी बैसे स्पष्ट ॥ ५ ॥ ब्रह्मानंदयोगें तुका । पढीयंता जनलोकां ॥ ६ ॥

२१४५. सांगों जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥ १ ॥ त्यांचा आम्हांसी कांटाळा । पाहों नावडती डोळां ॥ २ ॥ रिद्धिसिद्धीचें साधक । वाचासिद्ध होती एक ॥ ३ ॥ तुका म्हणे जाती । पुण्यक्षयें अधोगती ॥ ४ ॥

२१४६. सावध झालों सावध झालों । हरीच्या आलों जागरणा ॥ १ ॥ जेथें वैष्णवांचें भार । जयजयकार गर्जतसे ॥ २ ॥ पळोनियां गेली झोंप । होतें पापआड तें ॥ ३ ॥ तुका म्हणे तया ठाया । वोल छाया कृपेची ॥ ४ ॥

२१४७. सोसें सोसें मारूं हाका । होईल चुका म्हणऊनि ॥ १ ॥ मागें पुढें क्षणभरी । नव्हे दुरी अंतर ॥ २ ॥ नाम मुखीं बैसला चाळा । वेळोवेळां पडताळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सुखी केलें । या विठ्ठलें बहुतांसी ॥ ४ ॥

२१४८. शिकविले तैसा पढों जाणे पुंसा । कैंची साच दशा तैसी अंगीं ॥ १ ॥ स्वप्नींचिया सुखें नाहीं होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥ २ ॥ कासया हा केला जिव्हे अळंकार । पायांसीं अंतर दिसतसे ॥ धृ. ॥ दर्पणीचें धन हातीं ना पदरीं । डोळा दिसे परी सत्याचिये ॥ ४ ॥ आस केली तरी लाळचि घोंटावी । ठकाठकी तेवीं दिसतसे ॥ ५ ॥ कवित्व रसाळ वदविली वाणी । साक्षही पुराणीं घडे ऐसी ॥ ६ ॥ तुका म्हणे गुरें राखोनि गोंवारी । माझी म्हणे परी लाभ नाहीं ॥ ७ ॥

 २१४९. सुकाळ हा दिवसरजनी । नित्य धणी नवीच ॥ १ ॥ करूनि सेवूं नाना परी । राहे उरी गोडीनें ॥ २ ॥ सरे ऐसा नाहीं झरा । पंक्तीकरा समवेत ॥ ३ ॥ तुका म्हणे बरवा पान्हा । कान्हाबाई माउलीचा ॥ ४ ॥

२१५०. सुखें होतों कोठें घेतली सुती । बांधविला गळा आपुलें हातीं ॥ १ ॥ काय करूं बहू गुंतलों आतां । नयेचि सरतां मागें पुढें ॥ २ ॥ होतें गाठीं तें सरलें आतां । आणिक माथां ऋण झालें ॥ ३ ॥ सोंकरिलियाविण गमाविलीं पिकें । रांडापोरें भिकें लावियेलीं ॥ ४ ॥ बहुतांचीं बहु घेतलीं घरें । न पडे पुरे कांहीं केल्या ॥ ५ ॥ तुका म्हणे कांहीं न धरावी आस । जावें हें सर्वस्व टाकोनिया ॥ ६ ॥

२१५१. स्मरतां कां घडे नास । विष्णुदास यावरी ॥ १ ॥ ऐसी सीमा जाली जगीं । तरी मी वेगीं अनुसरलों ॥ २ ॥ धरिलें तें निवडे आतां । न घडे चित्ता वेगळें ॥ ३ ॥ तुका म्हणे नाश नाहीं । पुराणेंहि गर्जती ॥ ४ ॥

२१५२. हरिनामाचें करूनि तारूं । भवसिंधु पार उतरलों ॥ १ ॥ फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ २ ॥ हरिनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥ ३ ॥ हरिनामाचें धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें कळिकाळ ॥ ४ ॥ येणेंचि बळें सरिते आम्ही । हरीचे नामें लोकीं तिहीं ॥ ५ ॥ तुका म्हणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥ ६ ॥

२१५३. हा गे माझा अनुभव । भक्तिभाव भाग्याचा ॥ १ ॥ केला ऋणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥ २ ॥ घालोनियां भार माथां । अवघी चिंता वारली ॥ ३ ॥ तुका म्हणे वचनासाठीं । नाम कंठीं धरियेलें ॥ ४ ॥

२१५४. हाचि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥ १ ॥ बोलायासि मात मन निवे हर्षे चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ २ ॥ जनांत भूषण वैकुंठीं सरतां । फांवलें स्वहिता सर्वभावें ॥ ३ ॥ तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥ ४ ॥ तुका म्हणे तो हा विठ्ठलचि व्हावा । आणिक या जीवा चाड नाहीं ॥ ५ ॥

२१५५. हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरि ॥ १ ॥ ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ २ ॥ ज्यांचें अंतर निर्मळ । त्यांचे सबाह्य कोमळ ॥ ३ ॥ त्यांचा संग सर्वकाळ । घडी मज हे मंगळ ॥ ४ ॥ तुका म्हणे प्राण । काया कुरवंडी करीन ॥ ५ ॥

२१५६. होतों सांपडलों वेठी । जातां भेटी संसारा ॥ १ ॥ तो या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोसी ॥ २ ॥ होता भार माथां माझे । बहु ओझें अमुप ॥ ३ ॥ तुका म्हणे केली चिंता । कोण दाता भेटेल ॥ ४ ॥

२१५७. रवि रश्मिकळा । नये काढितां निराळा ॥ १ ॥ तैसा आम्हां जाला भाव । अंगीं जडोनि ठेला देव ॥ २ ॥ गोडी साकरेपासुनि । कैसी निवडिती दोन्हीं ॥ ३ ॥ तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥ ४ ॥

२१५८. कांहींच मी नव्हें कोणिये गांवींचा । एकटा ठायींचा ठायीं एक ॥ १ ॥ नाहीं जात कोठे येत फिरोनियां । अवघेचि वायांविण बोल ॥ २ ॥ नाहीं मज कोणी आपुलें दुसरें । कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥ ३ ॥ नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत । आहों अखंडित जैसे तैसे ॥ ४ ॥ तुका म्हणे नाम रूप नाहीं आम्हां । वेगळा या कर्मा अकर्मासी ॥ ५ ॥

२१५९. ठेविलें जतन । करूनियां निज धन ॥ १ ॥ जयापासाव उत्पत्ति । तें हें बीज धरिलें हातीं ॥ २ ॥ निवडिलें वरळा भूस । सार आइन जिन्नस ॥ ३ ॥ तुका म्हणे नारायण । भाग संचिताचा गुण ॥ ४ ॥

२१६०. नाहीं येथें वाणी । सकळां वर्णीं घ्यावी धणी ॥ १ ॥ जालें दर्पणाचें अंग । ज्याचा त्यासीं दावी रंग ॥ २ ॥ एका भावाचा एकांत । पीक पिकला अनंत ॥ ३ ॥ तुका खळे दाणीं । करी बैसोनि वांटणी ॥ ४ ॥

२१६१. मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥ १ ॥ आतां पुरलें नवस । निरसोनी गेली आस ॥ २ ॥ जालों बारा बळी । गेलों मरोनि तें काळीं ॥ ३ ॥ दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥ ४ ॥

२१६२. अद्वयचि द्वय झालेंचि कारण । धरिलें नारायणें भक्तिसुख ॥ १ ॥ अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज । एकतत्वीं बीज भिन्न नाहीं ॥ २ ॥ शून्य निरसूनि राहिलें निर्मळ । तें दिसे केवळ विटेवरी ॥ ३ ॥ सुखें घ्यावें नाम वदना ही चाड । सरिता वापी आड एक पाणी ॥ ४ ॥ तुका म्हणे मीच आहे तेणें सुखें । भेद नाहीं मुखें नाम गातां ॥ ५ ॥

२१६३. अनंताच्या ऐकों कीर्ति । ज्याच्या चित्तीं हरिनाम ॥ १ ॥ उल्लंघूनि गेले सिंधु । हा भवबंधु तोडोनियां ॥ २ ॥ हळुहळू तेचि वाहीं । चालों कांहीं अधिकारें ॥ ३ ॥ खुंटुनियां गेले नावा । नाहीं हेवा खोळंबा ॥ ४ ॥ नलगे मोल द्यावा रुका । भाव एका कारणें ॥ ५ ॥ भीमातिरीं थडवा केला । उठा चला लवलाहें ॥ ६ ॥ तुका म्हणे पाहतों वाट । उभा नीट पाउलीं ॥ ७ ॥ 

२१६४. आवडीच्या ऐसें झालें । मुखा आलें हरिनाम ॥ १ ॥ आतां घेऊं धणीवरी । मागें उरीं नुरेतो ॥ २ ॥ सांठवण मना ऐसी । पुढें रासी अमुप ॥ ३ ॥ तुका म्हणे कारण झालें । विठ्ठल या तीं अक्षरीं ॥ ४ ॥

२१६५. काय माझें नेती वाईट म्हणोन । करूं समाधान काशासाठीं ॥ १ ॥ काय मज लोक नेतील परलोका । जातां कोणी एक निवारील ॥ २ ॥ न म्हणे कोणासी उत्तम वाईट । सुखें माझी कूट खावो मागें ॥ ३ ॥ सर्व माझा भार असे पांडुरंगा । काय माझें जगासवें काज ॥ ४ ॥ तुका म्हणे माझें सर्वही साधन । नामसंकीर्तन विठोबाचें ॥ ५ ॥

२१६६. तुका वेडा अविचार । करी बडबड फार ॥ १ ॥ नित्य वाचे हाचि छंद । राम कृष्ण हरि गोविंद ॥ २ ॥ धरी पांडुरंगी भाव । आणीक नेणें दुजा देव ॥ ३ ॥ गुरुज्ञान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥ ४ ॥ बोल नाइकें कोणाचे । कथे नागवाचि नाचे ॥ ५ ॥ संग उपचारें कांटाळे । सुखें भलते ठायीं लोळे ॥ ६ ॥ कांहीं उपदेशिलें नेणें । वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे ॥ ७ ॥ केला बहुतीं फजित । तरी हेंचि करी नित्य ॥ ८ ॥ अहो पंडित जन । तुका टाकावा थुंकोन ॥ ९ ॥

२१६७. दूध दही ताक पशूचें पाळण । त्यामध्यें कारण घृत सार ॥ १ ॥ हेंचि वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ २ ॥ लोह कफ गारा अग्नीचिया काजें । येऱ्हवीं तें ओझें कोण वाहे ॥ ३ ॥ तुका म्हणे खोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥ ४॥

२१६८. न मिळो खावया न वाढो संतान । परी हा नारायण कृपा करो ॥ १ ॥ ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हेंचि सांगे ॥ २ ॥ विटंबो शरीर होत कां विपत्ती । परि राहो चित्तीं नारायण ॥ ३ ॥ तुका म्हणे नाशिवंत हें सकळ । आठवी गोपाळ तेंचि हित ॥ ४ ॥

२१६९. पुरविली आळी । जे जे केली तें तें काळी ॥ १ ॥ माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ २ ॥ घेतलें नुतरी । उचलोनी कडियेवरी ॥ ३ ॥ तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥ ४ ॥

२१७०. विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाईन त्याच्या गांवा भेटावया ॥ १ ॥ सीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे ॥ २ ॥ माय माउलीया बंधुवर्ग जाणा । भाकीन करुणा सकळिकांसी ॥ ३ ॥ संत महंत सिद्ध महानुभाव मुनि । जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥ ४ ॥ माझिये माहेरी सुखा काय उणें । नलगे येणें जाणें तुका म्हणे ॥ ५ ॥

२१७१. सुखाचें ओतलें । दिसे श्रीमुख चांगलें ॥ १ ॥ मनें धरिला अभिलाष । मिठी घातली पायांस ॥ २ ॥ होतां दृष्टादृष्टीं । ताप गेला उठाउठी ॥ ३ ॥ तुका म्हणे जाला । लाभें लाभ दुणावलां ॥ ४ ॥

२१७२. लाडकी लेक मी संताची । मजवरी कृपा बहुतांची ॥ धृ. ॥ अखई चुडा हातीं आला । आंकण मोती नाकाला ॥ २ ॥ बोध मुराळी श्रृंगारिला । चवऱ्यायशीचा सिक्का केला ॥ ३ ॥ तुका तुकीं उतरला । साहानकेचा कौल दिला ॥ ४ ॥

२१७३. उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाडा ॥ १ ॥ बोलविले बोलें बोल । धनी विठ्ठल सन्निध ॥ २ ॥ तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गाबाळ ॥ ४ ॥

 

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...