Saturday, 3 May 2025

२०. स्थितीपर अभंग : देवाशी बोलणे

श्री तुकोबाराय यांनी आपल्या आत्मस्थितीभावाविषयी देवाशी संवाद साधून मन मोकळे केले, त्याविषयीचे अभंग. 

स्थितीपर अभंग : देवाशी बोलणे (अभंग संख्या १६०)

१७८३. असां जी सोंवळे । अहां तैसेचि निराळे ॥ १ ॥ आम्ही नयों तुमच्या वांटा । काय लटिकाची ताठा ॥ २ ॥ चिंतनचि पुरे । काय सलगीसवें धुरे ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । नका नावडे ते सेवा ॥ ४ ॥

१७८४. अपराधी म्हणोन येतों काकुलती । नाहीं तरी होती काय चाड ॥ १ ॥ येईल तारूं तरी तारी जो जी देवा । नाहीं तरी सेवा घ्यावी भार ॥ २ ॥ कासया मी आतां वंचूं हे शरीर । आहे बारगीर जायजणें ॥ ३ ॥ तुका म्हणे मन करूनि मोकळें । आहे साळेंढाळें उदार तें ॥ ४ ॥

१७८५. अनुभव ऐसा । मज लागला सरिसा ॥ १ ॥ पाठी बैसलीसे जारी । नव्हे शांत कोणे परी ॥ २ ॥ कोठें नलगे जावें । कांहीं घालावया ठावें ॥ ३ ॥ तुका म्हणे कोटि । दुःखाच्याच तये पोटीं ॥ ४ ॥

१७८६. अनुभवें कळों येतें पांडुरंगा । रुसावें तें कां गा तुम्हांवरी ॥ १ ॥ आवरितां चित्त नावरे दुर्जन । घात करी मन माझें मज ॥ २ ॥ अंतरीं संसार भक्ति बाह्यात्कार । म्हणोनि अंतर तुझ्या पायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे काय करूं नेणें वर्म । आलें तैसें कर्म सोसूं पुढें ॥ ४ ॥

१७८७. अनाथां जीवन । आम्हां तुमचें चरण । करूनि सांठवण । ते धरिले हृदयीं ॥ १ ॥ पुष्ट झाली अंगकांति । आनंद न समाये चित्तीं । कवतुकें प्रीति । गाऊं नाचों उल्हासें ॥ २ ॥ करुणाउत्तरीं । करूं आळवण हरी । जाऊं नेदूं दूरी । प्रेमप्रीतिपडिभरें ॥ ३ ॥ मोहे ममता करी गोवा । ऐसें आहे जी केशवा । तुका म्हणे सेवा । आणीक नाहीं जाणत ॥ ४ ॥

१७८८. असोत हे तुझे प्रकार सकळ । काय खळबळ करावी हे ॥ १ ॥ आमुचें स्वहित जाणतसों आम्ही । तुझें वर्म नामीं आहे तुझ्या ॥ २ ॥ विचारितां आयुष्य जातें वांयांविण । रोज नागवण पडतसें ॥ ३ ॥ राहेन मी तुझे पाय आठवूनी । आणीक तें मनीं येऊ नेदीं ॥ ४ ॥ तुका म्हणे येथें येसी अनायासें । थोर तुज पिसें कीर्तनाचें ॥ ५ ॥

१७८९. अवचित या तुमच्या पायां । देवराया पावलों ॥ १ ॥ बरवें झालें देशाउर । आल्या दूर सारिखें ॥ २ ॥ राहोनियां जातों ठाया । आलियाची निशाणी ॥ ३ ॥ तुका म्हणे चरणसेवा । जोडी हेवा लाधली ॥ ४ ॥

१७९०. आतां येणें पडिपाडें । रस सेवूं हा निवाडें । मुंगी नेली गोडें । ठेविलिये अडचणी ॥ १ ॥ तैसें होय माझ्याजीवा । चरण न सोडीं केशवा । विषयबुद्धि हेवा । वोस पडो सकळ ॥ २ ॥ भुकेलिया श्वाना । गांठ पडे सवे अन्ना । मुकों पाहें प्राणा । परी तोंडीचें न सोडी ॥ ३ ॥ काय जिंकियलें मन । जिवित्व कामातुरा तृण । मागे व्यभिचारीण । भक्ती तुका ये जाती ॥ ४ ॥

१७९१. आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥ १ ॥ भाग गेला सीण गेला । अवघा झाला आनंदु ॥ २ ॥ प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप ॥ ४ ॥

१७९२. आहे ऐसा आतां आहे ठायी बरा । ठेविलों दातारा उचितें त्या ॥ १ ॥ वचनाचा भार पडिलीया शिरीं । झालें मग भारी उतरेना ॥ २ ॥ अबोल्याची सवे लावूनियां मना । फांकों नेदी गुणा निजठेवा ॥ २ ॥ आतां हा आळस असो परता दुरी । नेदावी ते उरी उरों कांहीं ॥ ३ ॥ आतां याचा मज न व्हावा विसर । भरोनी अंतर राहो रूप ॥ ४ ॥ आतां लोकलाज नयो येथें आड । बहु झाला गोड ब्रह्मरस ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां जन्म हा सफळ । अंतरीं गोपाळ स्थिरावला ॥ ६ ॥

१७९८. आम्ही सर्वकाळ कैंचीं सावधान । व्यवसायें मन अभ्यासलें ॥ १ ॥ तरी म्हणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ २ ॥ याच कानसुलीं मारीतसे हाका । मज घाटूं नका मधीं आतां ॥ ३ ॥ तुका म्हणे निद्रा जागृती सुषुप्ति । तुम्ही हो श्रीपती साक्षी येथें ॥ ४ ॥

१७९९. आम्ही असों निश्चिंतीनें । एका गुणें तुमचिया ॥ १ ॥ दुराचारी तरले नामें । घेतों प्रेमें म्हणोनि ॥ २ ॥ नाहीं तुम्हां धांव घेतां । कृपावंता आळस ॥ ३ ॥ तुका म्हणे विसरुं काईं । तुज वो आई विठ्ठले ॥ ४ ॥

१८००. आम्हांसी सांगाती । होतीं अराले ते होती ॥ १ ॥ येती आइकतां हाक । दोनी मिळोन म्हणती एक ॥ २ ॥ आणिकां उत्तरीं । नसे गोविली वैखरी ॥ ३ ॥ तुका म्हणे बोला । खूण पहाती विठ्ठला ॥ ४ ॥

१८०१. आम्हां घरीं धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥ १ ॥ शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन । शब्द वांटू धन जनलोकां ॥ २ ॥ तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देचि गौरव पूजा करूं ॥ ३ ॥ (धृ. नाही)

१८०२. आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरी तूं भीतोसि पांडुरंगा ॥ १ ॥ पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आम्ही धालों नांवें तुझ्या एका ॥ २ ॥ ऋद्धिसिद्धी तुझे मुख्य भांडवल । हें तो आम्हां फोल भक्तीपुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निवांत सुख भोगूं ॥ ४ ॥

१८०३. उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥ १ ॥ तुझें नाम धरिलें कंठीं । केली संसाराची तुटी ॥ २ ॥ आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥ ४ ॥

१८०४. आतां गाऊं तुज ओविया मंगळी । करूं गदारोळी हरिकथा ॥ १ ॥ होसी निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ २ ॥ भोगलें ते भोग लावूं तुझें अंगीं । अलिप्त या जगीं होऊनि राहों ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही लाडिकीं लेंकरें । न राहों अंतरें पायांविण ॥ ४ ॥

१८०५. आतां आम्हां हेंचि काम । वाचे गाऊं तुझें नाम । वाहुनियां टाळी प्रेम । सुखें आनंदें नाचावें ॥ १ ॥ अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकळिक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिले ॥ २ ॥ गोदातटें निर्मळें । देव देवांची देउळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥ ४ ॥

१८०६. उपासा सेवटीं अन्नासवें भेटी । तैसी माझी मिठी पडो पायीं ॥ १ ॥ पुरवीं वासना साच सर्व जाणा । आम्हां नारायणा अंकिताची ॥ २ ॥ बहु दिसां पुत्रामातेसवें भेटी । तैसा दाटो पोटीं प्रीति उभड ॥ ३ ॥ तुका म्हणे धन कृपणा सोईरें । यापरी दुसरें नहो आतां ॥ ४ ॥

१८०७. एकी केली हातोफळी । ठाया बळी पावले ॥ १ ॥ आम्ही देवा शक्तीहीनें । भाकूं तेणें करुणा ॥ २ ॥ पावटणी केला काळ । जया बळ होतें तें ॥ ३ ॥ तुका म्हणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ॥ ४ ॥

१८०८. करीं ऐसें जागें । वेळोवेळां पाया लागें ॥ १ ॥ प्रेम झोंबे कंठीं । देह धरणिये लोटीं ॥ २ ॥ राहो लोकाचार । पडो अवघा विसर ॥ ३ ॥ तुका म्हणे ध्यावें । तुज व्यभिचारभावें ॥ ४ ॥

१८०९. कपट कांहीं एक । नेणें भुलवावयाचे लोक ॥ १ ॥ तुमचें करितों कीर्तन । गातों उत्तम ते गुण ॥ २ ॥ दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥ ३ ॥ नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥ ४ ॥ नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ॥ ५ ॥ नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥ ६ ॥ नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाणखूण ॥ ७ ॥ नव्हे पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥ ८ ॥ नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदी ॥ ९ ॥ नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥ १० ॥ नाहीं हालवीत माळ । भोंवतें मेळवूनि गबाळ ॥ ११ ॥ आगमीचें कुडें नेणें । स्तंभन मोहन उच्चाटण ॥ १२ ॥ नोहे यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥ १३ ॥

१८१०. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥ १ ॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥ २ ॥ माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥ ३ ॥ तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥ ४ ॥

१८११. कराल तें करा । हातें आपुल्या दातारा ॥ १ ॥ बळियाची आम्हीं बाळें । असो निर्भर या सळे ॥ २ ॥ आतां कोठें काळ । मध्यें रिघेल ओंगळ ॥ ३ ॥ तुका म्हणे पंढरीराया । थापटितों ठोकबाह्या ॥ ४ ॥

१८१२. करीं धंदा परी आवडती पाय । प्रीति सांगों काय नेणां देवा ॥ १ ॥ रूप डोळां देखें सदा सर्वकाळ । संपादितों आळ प्रपंचाचा ॥ २ ॥ नेमून ठेविली कारया कारणीं । आमुची ते वाणी गुण वदे ॥ ३ ॥ मनासीं उत्कंठा दर्शनाचा हेवा । नाहीं लोभ जीवा धनधान्य ॥ ४ ॥ उसंतितो पंथ वेठीचिया परी । जीवनसूत्र दोरीपाशीं ओढे ॥ ५ ॥ तुका म्हणे ऐसें करितों निर्वाण । जीव तुम्हां भिन्न नाहीं माझा ॥ ६ ॥

१८१३. करूनि राहों जरी आत्माचि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करूं ॥ १ ॥ जेविलीयाविण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्दचि ते ॥ २ ॥ पुरे पुरे आतां तुमचें ब्रह्मज्ञान । आम्हांसी चरण न सोडवे ॥ धृ. ॥ विरोधें विरोध वाढे पुढतोपुढती । वासनेचे हातीं गर्भवास ॥ ४ ॥ सांडीमांडीअंगीं वसे पुण्यपाप । बंधन संकल्प याचि नांवें ॥ ५ ॥ तुका म्हणे नाहीं मुक्तता मोकळी । ऐसा कोण बळी निरसी देह ॥ ६ ॥

१८१४. कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करी ॥ १ ॥ पीक पिकलें पिकलें । घन दाटोनियां आलें ॥ २ ॥ शेवटचें दान । भागा आला नारायण ॥ ३ ॥ तुका म्हणे पोट । भरलें वारला बोभाट ॥ ४ ॥

१८१५. कळेल हें तैसें गाईन मी तुज । जनासवे काज काय माझें ॥ १ ॥ करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥ २ ॥ होऊनि निर्भर नाचेन मी छंदे । आपुल्या आनंदें करूनियां ॥ ३ ॥ काय करूं कळा युक्ती या कुसरी । जाणिवेच्या परी सकळिका ॥ ४ ॥ तुका म्हणे माझें जयासवें काज । भोळा तो सहज पांडुरंग ॥ ५ ॥

१८१६. काय मागावें कवणासी । ज्यासी मागों तो मजपाशीं ॥ धृ. ॥ जरी मागों पद इंद्राचें । तरी शाश्वत नाहीं त्याचें ॥ २ ॥ जरी मागों धुव्र पद । तरी त्यासी येथील छंद ॥ ३ ॥ स्वर्गभोग मागों पूर्ण । पुण्य सरल्या मागुती येणें ॥ ४ ॥ मागों जरी पद वैकुंठ । तें तव येकदेशी करंटें ॥ ५ ॥ आयुष्य मागों चिरंजीव । जीवा मरण नाहीं स्वभावें ॥ ६ ॥ तुका म्हणे एक मागें । एकपणा नाहीं भंग ॥ ७ ॥

१८१७. काय ऐसी वेळ । वोढवली अमंगळ ॥१ ॥ आजि दुखवलें मन । कथाकाळीं जाला सीण ॥ २ ॥ पापाचिया गुणें । त्याचिये वेळे दर्शनें ॥ ३ ॥ तुका म्हणे कानीं । घालूं आले दुष्ट वाणी ॥ ४ ॥

१८१८. काय मज एवढा भार । हे वेव्हार चालवाया ॥ १ ॥ उकल तो जाणे धनी । मज भोजनीं कारण ॥ २ ॥ चिंता ज्याची तया शिरीं । लेंकरीं तें खेळावें ॥ ३ ॥ तुका म्हणे शेवट झाला । देव या बोला भोगिता ॥ ४॥

१८१९. काय सांगों तुझ्या चरणीच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥ १ ॥ बोलतां हें कैसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ २ ॥ आम्ही एकएका ग्वाही मायपुतें । जाणो तें निरुते सुख दोघें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां मोक्षाचा कांटाळा । कां तुम्ही गोपाळा नेणां ऐसें ॥ ४ ॥

१८२०. काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥ १ ॥ तुम्ही जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ २ ॥ काय वोळलें संचित । ऐसें नेणों अगणित ॥ ३ ॥ तुका म्हणे नेणें । काय केलें नारायणें ॥ ४ ॥

१८२१. काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ऋण असो माथां ॥ १ ॥ कोणे तरी काळें होईल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ २ ॥ शता एका तरी जन्माच्या शेवटीं । कृपाळुवा पोटीं येईल दया ॥ ३ ॥ तुका म्हणे तरी नाहीं फांकों देत । सर्वांचे उचित सांपडलें ॥ ४ ॥

१८२२. काय करूं न करी धंदा । चित्त गोविंदा तुझे पायीं ॥ १ ॥ ऐशा संकल्पाचे संधी । माझे बुद्धी धीर द्यावा ॥ २ ॥ कुटुंबाचा तुम्हां भार । मज व्यवहार निमित्त ॥ ३ ॥ तुका म्हणे करितां काम । हृदयीं नाम धरीन ॥ ४ ॥ 

१८२३. कांहीं जडभारी । पडतां ते अवसरीं ॥ १ ॥ तुझे आठवावे पाय । आम्ही मोकलूनि धाय ॥ २ ॥ तहान पीडी भूक । शीत उष्ण वाटे दुःख ॥ ३ ॥ तुका म्हणे देहयोगें । वारंवार पिडितां भोगें ॥ ४ ॥

१८२४. कोठें भोग उरला आतां । आठवितां तुज मज ॥ १ ॥ आड कांहीं नये दुजें । फळ बीजें आणिलें ॥ २ ॥ उद्वेग तो वांयांविण । कैंचा सीण चिंतनें ॥ ३ ॥ तुका म्हणे गेला भ्रम । तुमच्या धर्म पायाचा ॥ ४ ॥

१८२५. कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरी ॥ १ ॥ साधन ते सेवा संताची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ २ ॥ न पुसतें कोणी कोठेही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥ ३ ॥ तुका म्हणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभाळिता ॥ ४ ॥

१८२६. खावें ल्यावें द्यावें । जमाखर्च तुझ्या नांवें ॥ १ ॥ आतां चुकली खटपट । झाड्यापाड्याचा बोभाट ॥ २ ॥ आहे नाहीं त्याचें । आम्हां काम सांगायाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे चिंता । भार वाहे तुझ्या माथां ॥ ४ ॥

१८२७. गाऊं नेणें कळा कुसरी । कान धरोनि म्हणे हरी ॥ १ ॥ माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ॥ २ ॥ मज हंसतील लोक । परी मी गाईन निःशंक ॥ ३ ॥ तुझे नामीं मी निर्लज्ज । काय जनासवें काज ॥ ४ ॥ तुका म्हणे माझी विनंती । तुम्ही परिसा कमळापती ॥ ५ ॥

१८२८. घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥ १ ॥ हरिनामकीर्तन संतांचें पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ २ ॥ आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःखा नाहीं चाड आम्हां ॥ ३ ॥ आणीक सायास न करीं न धरीं आस । होईन उदास सर्व भावें ॥ ४ ॥ मोक्ष आम्हां घरीं कामारी ते दासी । होय सांगों ऐसी तुका म्हणे ॥ ५ ॥

१८२९. चंदनाच्या वासे धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥ १ ॥ साकरेची गोडी सारिखी सकळां । थोरां मोठ्यां बाळां धाकुटियां ॥ २ ॥ तुका म्हणे माझें चित्त शुद्ध होतें । तरी कां निंदितें जन मज ॥ ३ ॥ (धृ. नाही)

१८३०. चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम तुमचे वर्णावे गुण ॥ १ ॥ हेंचि एक तुम्हां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि खरा ॥ २ ॥ खुंटलें जाणीव माझें बोलणें आतां । कळों यावी तैसी करा बाळाची चिंता ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां नको देऊं अंतर । न कळे पुढें काय बोलूं विचार ॥ ४ ॥

१८३१. जाणावें तें काय नेणावें तें काय । ध्यावे तुझे पाय हेंचि सार ॥ १ ॥ करावें तें काय न करावें ते काय । ध्यावे तुझे पाय हेंचि सार ॥ २ ॥ बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हेंचि सार ॥ ३ ॥ जावें तें कोठें नव जावें तें आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥ ४ ॥ तुका म्हणे तूं करिसी तें सोपें । पुण्यें होतीं पापें आमुच्या मतें ॥ ५ ॥ (धृ. नाही)

१८३२. झाला हा डांगोरा । मुखीं लहानही थोरा ॥ १ ॥ नागविलों जनाचारीं । कोणीं बैसों नेदी दारीं ॥ २ ॥ संचिताचा ठेवा । आतां आला तैसा घ्यावा ॥ ३ ॥ तुका म्हणे देवें । केलें आतां हें बरवें ॥ ४ ॥

१८३३. जालों बळिवंत । होऊनियां शरणागत ॥ १ ॥ केला घरांत रिघावा । ठायीं पाडियेला ठेवा ॥ २ ॥ हातां चढे धन । ऐसें रचिलें कारण ॥ ३ ॥ तुका म्हणे मिठी । पायीं देउनि केली सुटी ॥ ४ ॥

१८३४. जालों निर्भर मानसीं । म्हणऊनि कळलासी ॥ १ ॥ तुझे म्हणविती त्यांस । भय चिंता नाहीं आस । चुकविसी पाश । गर्भवासयातना ॥ २ ॥ तुझें जाणोनियां वर्म । कंठीं धरियेलें नाम ॥ ३ ॥ तुका म्हणे तेणें सुखें । निरसलीं जन्मदुःखें ॥ ४ ॥

१८३५. जीवन उपाय । वैद्यवाणी तुझे पाय ॥ १ ॥ ते मी नाठवीं घडिघडी । म्हणोनियां चरफडीं ॥ २ ॥ तुटे भवरोग । जेथें सर्व सुख भोग ॥ ३ ॥ तुका म्हणे विटे । धरियेलें जें गोमटें ॥ ४ ॥

१८३६. जेथें देखें तेथें तुझींच पाउलें । विश्व अवघें कोंदाटलें । रूप गुण नाम अवघा मेघश्याम । वेगळें तें काय उरलें । जातां लोटांगणीं अवघीच मेदिनी । सकळ देवपाट जालें । सदा सर्वकाळ सुदिन सुवेळ । चित्त प्रेमें असे धालें ॥ १ ॥ अवघा आम्हां तूंच जालासी देवा । संसार हेवा काम धंदा । नलगे जाणें कोठें कांहींच करणे । मुखीं नाम ध्यान सदा ॥ २ ॥ वाचा बोले ते तुझेचि गुणवाद । मंत्रजप कथा स्तुति । भोजन सारूं ठायीं फल तांबूल कांहीं । पूजा नैवेद्य तुज होती । चालता प्रदक्षिणा निद्रा लोटांगण । दंडवत तुजप्रति । देखोन दृष्टी परस्परें गोष्टी । अवघ्या तुझ्या मूर्ति ॥ ३ ॥ जाल्या तीर्थरूप बावी नदी कूप । अवघें गंगाजळ जालें । महाल मंदिरें माड्या तनघरें । झोंपड्या अवघीं देव देवाइले । ऐकें कानीं त्या हरिनामध्वनी । नाना शब्द होत जाले । तुका म्हणे आम्ही या विठोबाचे दास । सदा प्रेमसुखें धालों रे ॥ ४ ॥

१८३७. जो मानी तो देईल काई । न मानी तो नेईल काई ॥ १ ॥ आम्हां विठ्ठल सर्वभूतीं । राहो चित्तीं भलतैसा ॥ २ ॥ साध्य न तें जना काईं । जल्पे वांयांविण ठायीं ॥ ३ ॥ वंदी निंदी तुज तो गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥ ४ ॥

१८३८. तरी हांव केली अमुप व्यापारें । व्हावें एक सरें धनवंत ॥ १ ॥ जालों हरिदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांचीं ॥ २ ॥ जना वेगळे हे असे अभिनव । बळी दिला जीव म्हणऊनि ॥ ३ ॥ तुका म्हणे तरी लागलों विल्हेसी । चालतिया दिवसीं स्वामी ऋणी ॥ ४ ॥

१८३९. तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥ १ ॥ ऐसा न देखें मी कोणी । दुजा तिहीं त्रिभुवनीं ॥ २ ॥ पाहिलीं पुराणें । धांडोळिलीं दरुषणें ॥ ३ ॥ तुका म्हणे ठायीं । जडून ठेलों तुझ्या पायीं ॥ ४ ॥ 

१८४०. तुजविण कांहीं । स्थिर राहे ऐसें नाहीं ॥ १ ॥ कळों आलें बहुतां रीती । पांडुरंगा माझ्या चित्तीं ॥ २ ॥ मोकलोनि आस । सर्वभावें झालों दास ॥ ३ ॥ तुका म्हणे तूंचि खरा । येर वाउगा पसारा ॥ ४ ॥

१८४१. तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥ १ ॥ ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ २ ॥ बोलतों जें तोंडें । नाहीं अनुभविलें लंडें ॥ ३ ॥ दंड लाहे केला । तुका म्हणे जी विठ्ठला ॥ ४ ॥

१८४२. तुज पाहावें हे धरितों वासना । परी आचरणा ठाव नाहीं ॥ १ ॥ करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरीच देखता होईन पाय ॥ २ ॥ बाहिरल्या वेषें उत्तम दंडिलें । भीतरी मुंडलें नाहीं तैसें ॥ ३ ॥ तुका म्हणे वांयां गेलोंच मी आहे । जरी तुम्ही साह्य न व्हा देवा ॥ ४ ॥

१८४३. तुझें वर्म ठावें । माझ्या पडियेलें भावें ॥ १ ॥ रूप कासवीचे परी । धरूनि राहिलों अंतरीं ॥ २ ॥ नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । चिंतन हे तुझी सेवा ॥ ४ ॥

१८४४. तुझें वर्म हातीं । दिलें सांगोनियां संतीं ॥ १ ॥ मुखीं नाम धरीन कंठीं । अवघा सांठवीन पोटीं ॥ २ ॥ नवविधा वेढीन आधी । सांपडलासी भावासंधीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बळिये गाढे । कळिकाळ पायां पडे ॥ ४ ॥

१८४५. तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगी नाचों था था ॥ १ ॥ तुझ्या नामाचा विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास ॥ २ ॥ तुझे नामीं विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥ ३ ॥ नाम घ्या रे कोणी फुका । भावें सांगतसे तुका ॥ ४ ॥

१८४६. तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे ॥ १ ॥ तूं मज एकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥ २ ॥ तुका म्हणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें ओस सर्व दिशा ॥ ३ ॥

१८४७. तैसे नव्हों आम्ही विठ्ठलाचे दास । यावें आणिकांस काकुलती ॥ १ ॥ स्वामिचिया सत्ता ठेंगणें सकळ । आला कळिकाळ हाताखालीं ॥ २ ॥ अंकिताचा असे अभिमान देवा । समर्पूनि हेवा असों पायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां इच्छेचें खेळणें । कोड नारायणे पुरवावें ॥ ४ ॥

१८४८. त्याग तंव मज न वजतां केला । कांहींच विठ्ठला मनांतूनि ॥ १ ॥ भागलिया आला उबग सहज । न धरितां काज जालें मनीं ॥ २ ॥ देह जड जालें ऋणाच्या आभारें । केलें संवसारें कासावीस ॥ ३ ॥ तुका म्हणे गेला आळस किळस । अकर्तव्य दोष निवारले ॥ ४ ॥

१८४९. त्यागें भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करूं ॥ १ ॥ आतां असो तुझे पायीं हें मोटळें । इंद्रियें सकळ काया मन ॥ २ ॥ सांडीमांडी विधिनिषेधाचा ठाव । न कळतां भाव जाईल वांयां ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां नको उजगरा । लपवीं दातारा अंगीं मज ॥ ४ ॥ 

१८५०. दुष्ट आचरण ग्वाही माझें मन । मज ठावे गुण दोष माझे ॥ १ ॥ आतां तुम्ही सर्व जाणा पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसें केलें ॥ २ ॥ व्याह्याजावयाचे पंगती दुर्बळ । वंचिजे तो काळ नव्हे कांहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां झालों शरणागत । पुढील उचित तुम्हां हातीं ॥ ४ ॥

१८५१. दुःखाची संगति । तिच्या ठायीं कोण प्रीति ॥ १ ॥ अवघें असों हें निराळें । करूं सोइरें सावळें ॥ २ ॥ क्षणभंगुर ते ठाव । करूनि सांडावेचि वाव ॥ ३ ॥ तुका म्हणे बरा । ठाव पावलों हा थारा ॥ ४ ॥

१८५२. देखोनियां तुझा रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥ १ ॥ तेणें माझ्या चित्ता होय समाधान । वाटतें चरण न सोडावें ॥ २ ॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज तुझ्या नामापुढें । तुच्छ हें बापुडें सकळही ॥ ४ ॥

१८५३. देखिलें तें धरिन मनें । समाधानें राहेन ॥ १ ॥ भाव माझी सांठवण । जगजीवन कळावया ॥ २ ॥ आळवीन एकसरें । उत्तरें या करुणेच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे नयोन रूपा । काय बापा करिसील ॥ ४ ॥

१८५४. देह तुझ्या पायीं । ठेवूनि जालों उतराई ॥ १ ॥ आतां माझ्या जीवा । करणें तें करीं देवा ॥ २ ॥ बहुत अपराधी । मतिमंद हीनबुद्धि ॥ ३ ॥ तुका म्हणे नेणें । भावभक्तीचीं लक्षणें ॥ ४ ॥

१८५५. द्याल माळ तरी पडेन मी पायां । दंडवत वांयां कोण वेंची ॥ १ ॥ आलें तें हिशोबें अवघिया प्रमाण । द्याल तरी दान मान होतो ॥ २ ॥ मोकळिया मनें घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही झालिया कृपण । नामाचें जतन मग कैंचें ॥ ४ ॥

१८५६. धनासींच धन । करी आपणा जतन ॥ १ ॥ तुज आळवितां गोडी । पांडुरंगा खरी जोडी ॥ २ ॥ जेविल्याचे खरें । वरी उमटे ढेंकरें ॥ ३ ॥ तुका म्हणे धाय । तेथें कोठें उरे हाय ॥ ४ ॥

१८५७. धरूनियां चाली हांवा । येईन गांवा धांवत ॥ १ ॥ पाठविसी मूळ तरी । लवकरी विठ्ठले ॥ २ ॥ नाचेन त्या प्रेमसुखें । कीर्ति मुखें गाईन ॥ ३ ॥ तुका म्हणे संतमेळीं । पायधुळी वंदीन ॥ ४ ॥

१८५८. न कळे तत्त्वज्ञान मूढ माझी मति । परी ध्यातों चित्तीं चरणकमळ ॥ १ ॥ आगमाचे भेद मी तो काय जाणें । काळ तो चिंतनें सारीतसे ॥ २ ॥ कांहीं नेणें परी म्हणवितों दास । होईल त्याचा त्यास अभिमान ॥ ३ ॥ संसाराची सोय सांडिला मारग । दुराविलें जग एका घायें ॥ ४ ॥ मागील लागाचें केलेंसें खंडन । एकाएकीं मन राखियेलें ॥ ५ ॥ तुका म्हणे अगा रखुमादेवीवरा । भक्तकरुणाकरा सांभाळावें ॥ ६ ॥

१८५९. नलगे पाहावे अबद्ध वांकडें । उच्चारावें कोडें नाम तुझें ॥ १ ॥ नाहीं वेळ काळ पंडितांचा धाक । होत कां वाचक वेदवक्ते ॥ २ ॥ वेदीं जें प्रतिपाद्य न कळे पाहातां । तैशीं या अनंता ठेवूं नामें ॥ ३ ॥ आपुलिया मना उपजे आनंद । तैसें करूं छंद कथेकाळीं ॥ ४॥ तुका म्हणे आम्ही आनंदेचि धालों । आनंदचि ल्यालों अळंकार ॥ ५ ॥

१८६०. नव्हे कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥ १ ॥ म्हणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ २ ॥ शरीर जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥ ३ ॥ तुका म्हणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥ ४ ॥

१८६१. नव्हतें तें कळों आलें । तरी बोलें अबोला ॥ १ ॥ तुज मज घातली तुटी । एका भेटींपासूनि ॥ २ ॥ आतां याची न धरीं चाड । कांहीं कोड कवतुकें ॥ ३ ॥ तुका म्हणे यावें जावें । एका भावें खंडलें ॥ ४ ॥

१८६२. न व्हावें तें जालें देखियेलें पाय । आतां फिरूं काय मागें देवा ॥ १ ॥ बहुत दिस होतों करीत हे आस । तें आलें सायासें फळ आजि ॥ २ ॥ कोठवरी जिणें संसाराची आशा । उगवूं हा फांसा एथूनियां ॥ ३ ॥ बुडाले तयांचा मूळ ना मारग । लागला तो लाग सांडूनियां ॥ ४ ॥ पुढें उल्लंघितां दुःखाचे डोंगर । नाहीं अंतपार गर्भवासा ॥ ५ ॥ तुका म्हणे कास धरीन पीतांबरीं । तूं भवसागरीं तारूं देवां ॥ ६ ॥

१८६३. नसताचि दाउनि भेव । केला जीव हिंपुटी ॥ १ ॥ जालों तेव्हां कळलें जागा । वाउगा हा आकांत ॥ २ ॥ गंवसिलों पुढें मागें । लागलागे पावला ॥ ३ ॥ तुका म्हणे केली आयणी । सलगीच्यांनी सन्मुख ॥ ४ ॥

१८६४. न होय निग्रह देहासी दंडण । न वजे भूकतहान सहावली ॥ १ ॥ तरी नित्य नित्य करीं आळवण । माझा अभिमान असों द्यावा ॥ २ ॥ नाहीं विटाळीलें कायावाचामन । संकल्पानें भिन्न आशेचिया ॥ ३ ॥ तुका म्हणे भवसागरीं उतार । करावया आधार इच्छीतसे ॥ ४ ॥

१८६५. नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥ १ ॥ नेणें राग वेळ काळ घात मात । तुझें पायीं चित्त ठेवी देवा ॥ २ ॥ तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनियां ॥ ३ ॥

१८६६. नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृतचि स्रवे । होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥ १ ॥ मन रंगले रंगलें । तुझ्या चरणीं स्थिरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥ २ ॥ जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें । अंगा येती उद्गार ॥ ३ ॥ सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा । तुका म्हणे लेखा । आतां नाहीं आनंदा ॥ ४ ॥

१८६७. निरोधितों परी न मोडे विकार । बहु हीं दुस्तर विषयद्वारें ॥ १ ॥ राहातेति तुम्ही भरोनि अंतरीं । होतों तदाकारी निर्विषयची ॥ २ ॥ कृपेचिया साक्षी असती जवळी । वचनें मोकळीं सरत नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे ताळा मेळवणीपाशीं । विनंती पायांशीं हेचि करीं ॥ ४ ॥

१८६८. नाहीं कांटाळलों परी वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥ १ ॥ जन वन आम्हां समानचि झालें । कामक्रोध केले पावटणी ॥ २ ॥ षड्उर्मी शत्रु जिंकिले अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥ ३ ॥ मुख्य धर्म आम्हां सेवकांचा ऐसा । स्वामी करील शिरसा पाळावें तें ॥ ४ ॥ म्हणऊनी तुका अवलोकूनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥ ५ ॥

१८६९. नेणती वेद श्रुति कोणी । आम्हां भाविकावांचुनी ॥ १ ॥ रूप आवडे आम्हांसी । तैसे जोडी हृषीकेशी ॥ २ ॥ आम्हीं भावें बळिवंत । तुज घालूं हृदयांत ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज धाक । देतां पावसील हाक ॥ ४ ॥

१८७०. परी आतां माझी परिसावी विनंती । रखुमाईच्या पती पांडुरंगा ॥ १ ॥ चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥ २ ॥ तुका म्हणे तुझा म्हणताती मज । आतां आहे लाज हेचि तुम्हां ॥ ३ ॥

१८७१. पवित्र होईन चरित्र उच्चारें । रूपाच्या आधारें गोजरिया ॥ १ ॥ अपुरती बुद्धि पुण्य नाहीं गांठीं । पायीं घालीं मिठी पाहे डोळां ॥ २ ॥ गाईन ओवीया शिष्टांच्या आधारें । सारिन विचारें आयुष्या या ॥ ३ ॥ तुका म्हणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥ ४ ॥

१८७२. पाठीलागा काळ येतसे या लागें । मी माझें वाउगें मध्यें असे ॥ १ ॥ आतां आगी लागो ऐसिया वेव्हारा । तूं माझा सोइरा पांडुरंगा ॥ २ ॥ वागविला माथां नसताचि भार । नव्हतें साचार देखिलें तों ॥ ३ ॥ तुका म्हणे केलें जवळील दुरी । मृगजळ वरी आड आलें ॥ ४ ॥

१८७३. प्रारब्धा हातीं जन । सुख शीण पावतसे ॥ १ ॥ करितां घायाळाचा संग । अंगे अंग माखावें ॥ २ ॥ आविसा अंगीं पीडा वसे । त्यागें असे बहु सुख ॥ ३ ॥ तुका म्हणे जीव भ्याला । अवघ्या आला बाहेरी ॥ ४ ॥

१८७४. बरवें ऐसें आले मना । नारायणा या काळें ॥ १ ॥ देव आम्हां प्राणसखा । झालें दुःखा खंडण ॥ २ ॥ जन्मांतरींच्या पुण्यरासी । होत्या त्यांसी फळ आलें ॥ ३ ॥ तुका म्हणे निजठेवा । होईल देवा लाधलों ॥ ४ ॥

१८७५. बरें देवा कुणबी केलों । नाहीं तरी दंभे असतों मेलों ॥ १ ॥ भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ २ ॥ विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥ ३ ॥ सेवा चुकतों संतांची । हेचि नागवण फुकाची ॥ ४ ॥ गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥ ५ ॥ तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥ ६ ॥

१८७६. बराडियाची आवडी पुरीं । जया झुरे साठीं ते ॥ १ ॥ तैसें झाले माझ्या मना । नुठी चरणावरूनि ॥ २ ॥ भागलिया पेणें पावे । विसांवे तें टाकणी ॥ ३ ॥ तुका म्हणे छाया भेटे । बरें वाटे तापे त्या ॥ ४ ॥

१८७७. बहु उतावीळ भक्ताचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥ १ ॥ तुझ्या पायीं मज झालासे विश्वास । म्हणोनियां आस मोकलिली ॥ २ ॥ ऋषि मुनि सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥ ३ ॥ नाहीं नाश तें सुख दिलें तयांस । झाले जे उदास सर्वभावें ॥ ४ ॥ तुका म्हणे सुख न माये मानसी । धरिलें जीवेंसी पाय तुझे ॥ ५ ॥

१८७८. बळीवंत कर्म । करी आपुला तो धर्म ॥ १ ॥ पुढें घालूनियां सत्ता । न्यावें पतना पतिता ॥ २ ॥ आचरणें खोटीं । केलीं सलताती पोटीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । नाहीं भजन केली सेवा ॥ ४ ॥

१८७९. बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥ १ ॥ आतां उतरला भार । तुम्हीं केला अंगीकार ॥ २ ॥ बहु काकुलती । आलों असें मागें किती ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । आजि सफळ झाली सेवा ॥ ४ ॥

१८८०. बहुजन्में सोस केला । त्याचा झाला परिणाम ॥ १ ॥ विठ्ठलसें नाम कंठीं । आवडी पोटीं संचितें ॥ २ ॥ येथुन तेथवरी आतां । नलगे चिंता करावी ॥ ३ ॥ तुका म्हणे धालें मन । हेंचि दान शकुनाचें ॥ ४ ॥

१८८१. बाळ माते निष्ठुर होय । परी ते स्नेह करीत आहे ॥ १ ॥ तैसा तूं गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आम्हां ॥ २ ॥ नेणती भागली । कडे घेतां अंग घाली ॥ ३ ॥ भूक साहे ताहान । त्याचें राखे समाधान ॥ ४ ॥ त्याच्या दुःखें धाये । आपला जीव देऊं पाहें ॥ ५ ॥ नांवें घाली उडी । तुका म्हणे प्राण काढी ॥ ६ ॥

१८८२. बाप मेला न कळतां । नव्हती संसाराची चिंता ॥ १ ॥ विठो तुझे माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचें काज ॥ २ ॥ बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥ ३ ॥ पोर मेलें बरें झालें । देवें मायेविरहित केलें ॥ ४ ॥ माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥ ५ ॥

१८८३. बैसूं खेळूं जेवूं । तेथें नाम तुझें गाऊं ॥ १ ॥ रामकृष्णनाममाळा । घालूं ओवूनियां गळा ॥ २ ॥ विश्वास हा धरूं । नाम बळकट करूं ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । आम्हां जीवन शरणागतां ॥ ४ ॥

१८८४. रामकृष्ण ऐसीं उच्चारीन नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें ॥ १ ॥ काय घडेल तें घडो या सेवटीं । लाभ आणि तुटी देव जाणे ॥ २ ॥ चिंता मोह आशा ठेवीन निराळीं । देईन हा बळी जीव पायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं उरो नेदी उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनी ॥ ४ ॥

१८८५. रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥ १ ॥ जीवाही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य वारुं ॥ २ ॥ तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळें । अवघीयांचें काळें केलें तोंड ॥ ३ ॥

१८८६. राहो येचि ठायीं । माझा भाव तुझे पायीं ॥ १ ॥ करीन नामाचें चिंतन । जाऊं नेदी कोठें मन ॥ २ ॥ देईन ये रसीं । आतां बुडी सर्वविशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । साटी करोनियां जीवा ॥ ४ ॥

१८८७. रोजकीर्दी जमा धरूनी सकळ । खताविला काळ वरावरी ॥ १ ॥ नाहीं होत झाड्यापाड्याचें लिगाड । हुजराती गोड सेवा रूजू ॥ २ ॥ चोरासाठीं रदबदल अट्टाहास्य । जळो जिणें दास्य बहुतांचें ॥ ३ ॥ सावधान तुका निर्भर मानसीं । सालझाड्यापाशीं गुंफों नेणे ॥ ४ ॥

१८८८. लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगीं ॥ १ ॥ मोजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ २ ॥ कोमळ कंटक तीक्षण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥ ३ ॥ चित्रींचें ते लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप त्याचें ॥ ४ ॥ तुका म्हणे दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥ ५ ॥

१८८९. लोक म्हणती मज देव । हा तो अधर्म उपाव ॥ १ ॥ आतां कळेल तें करीं । सीस तुझे हातीं सुरी ॥ २ ॥ अधिकार नाहीं । पूजा करिती तैसा कांहीं ॥ ३ ॥ मन जाणे पापा । तुका म्हणे माय बापा ॥ ४ ॥

१८९०. वाचा चापल्यें बहु जालों कुशल । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥ १ ॥ म्हणोनि पंढरीराया दुःखी होतें मन । अंतरीचें कोण जाणे माझें ॥ २ ॥ पूज्य झालों अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबलें ॥ ३ ॥ तुका म्हणे खूण न कळेचि निरुती । सांपडलों हातीं अहंकाराचे ॥ ४ ॥

१८९१. वांयाविण हा वाढविला लौकिक । आणिला लटिका वाद दोघां ॥ १ ॥ नाहीं ऐसा झाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ २ ॥ शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरी बिंबेची ना ॥ ३ ॥ झालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥ ४ ॥ तुका म्हणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥ ५ ॥

१८९२. विभ्रंशिली बुद्धि देहांतीं जवळी । काळाची अवकाळीं वायचाळा ॥ १ ॥ पालटलें जैसें देंठ सांडी पान । पिकलें आपण तयापरी ॥ २ ॥ न मारितां हीन बुद्धि दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥ ३ ॥ तुका म्हणे गळ लागलिया मत्स्य । तळमळीचा तैसा लवलाहो ॥ ४ ॥

१८९३. शिणलेती सेवकां देऊनी इच्छादान । केला अभिमानें अंगीकार ॥ १ ॥ अहो दीनानाथ आनंदमूर्ती । तुम्हांसी शोभती ब्रीदें ऐसीं ॥ २ ॥ बहुतांनीं विनविलें बहुता प्रकारीं । सकळां ठायीं हरी पुरलेती ॥ ३ ॥ तुका म्हणे अगा कुटुंबवत्सला । कोण तुझी लीळा जाणे ऐसी ॥ ४ ॥

१८९४. शूद्रवंशीं जन्मलों । म्हणोनि दंभें मोकलिलों ॥ १ ॥ अरे तूंच माझा आतां । मायबाप पंढरीनाथा ॥ २ ॥ घोकाया अक्षर । मज नाहीं अधिकार ॥ ३ ॥ सर्वभावें दीन । तुका म्हणे यातिहीन ॥ ४ ॥

१८९५. सकळ सत्ताधारी । व्हावें ऐसें काय हरी ॥ १ ॥ परी या कृपेच्या वोरसें । कुढावयाचेंचि पिसें ॥ २ ॥ अंगें सर्वोत्तम । अवघाचि पूर्णकाम ॥ ३ ॥ तुका म्हणे दाता । तरी हा जीवदान देता ॥ ४ ॥

१८९६. संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥ १ ॥ जैसीं तैसीं असो पुढीलांचे सोई । धरिती हातीं पायीं आचारिये ॥ २ ॥ उपकारी नाहीं देखत आपदा । पुढीलाची सदा दया चित्तीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तरी सज्जनाची कीर्ति । पुरवावी आर्ति निर्बळाची ॥ ४ ॥

१८९७. संगें वाढे शीण संगें वाढे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥ १ ॥ याचिमुळें आला संगाचा कंटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ २ ॥ एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥ ३ ॥ शब्दज्ञानी हित नेणती आपुले । आणिक देखिलें नावडे त्यां ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां एकलेंचि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥ ५ ॥

१८९८. सत्ताबळें येतो मागतां विभाग । लावावया लाग निमित्य करूं ॥ १ ॥ तुझें ऐसें मुखें करूं उच्चारण । बोलें नारायण सांपडवूं ॥ २ ॥ आसेविण नाही उपजत मोहो । तरिच हा गोहो न पडे फंदीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां व्हावे याजऐसें । सरिसें सरिसें समागमें ॥ ४ ॥

१८९९. बोलोनियां काय दावूं । तुम्ही जीऊ जगाचे ॥ १ ॥ हेच आतां माझी सेवा । चिंतन देवा करितों ॥ २ ॥ विरक्तासी देह तुच्छ । नाहीं आस देहाची ॥ ३ ॥ तुका म्हणे पायापाशीं । येईन ऐसी वासना ॥ ४ ॥
१९००. मज कोणी कांहीं करी । उमटे तुमचे अंतरीं ॥ १ ॥ व्याला वाढविलें म्हूण । मज सुख तुज सीण ॥ २ ॥ माझें पोट धालें । तुझें अंगीं उमटलें ॥ ३ ॥ तुका म्हणे खेळें । तेथें तुमचिया बळें ॥ ४ ॥ 

१९०१. मज माझा उपदेश । आणिकां नये याची रीस ॥ १ ॥ तुम्ही अवघें पांडुरंग । मीच दुष्ट सकळ चांग ॥ २ ॥ तुमचा मी शरणागत । कांहीं करा माझें हित ॥ ३ ॥ तुका पाय धरी । मी हे माझें दूर करीं ॥ ४ ॥

१९०२. मतिविण काय वर्णूं तुझें ध्यान । जेथें पडे मौन वेदश्रुती ॥ १ ॥ करूनि गोजिरा आपुलिये मती । धरिलें चित्तीं चरणकमळ ॥ २ ॥ सुखाचें ओतिलें पाहों तें श्रीमुख । तेणें हरे भूक ताहान माझी ॥ ३ ॥ रसना गोडावली ओव्या गातां गीत । पावलेंसे चित्त समाधान ॥ ४ ॥ तुका म्हणे माझी दृष्टि चरणांवरी । पाउलें गोजिरीं कुंकुमाची ॥ ५ ॥

१९०३. माझिया जीवासी हेचि पैं विश्रांति । तुझे पाय चित्तीं पांडुरंगा ॥ १ ॥ भांडवल गांठीं झालेंसें पुरतें । समाधान चित्तें मानीयलें ॥ २ ॥ उदंड उच्चारें घातला पसरु । रूपावरी भरु आवडीचा ॥ ३ ॥ तुका म्हणे मज भक्तीची आवडी । अभेदीं तांतडी नाहीं म्हूण ॥ ४ ॥

१९०४. माझे तों फुकाचे काय वेचे कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुम्हां ऐसा ॥ १ ॥ कांहींच न वंचीं आजिच्या प्रसंगीं । सकळही अंगी करीन पूजा ॥ २ ॥ द्यावें तुम्हीं कांहीं हे तों नाहीं आस । असों या उदास देहभावें ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी मावळली खंती । समाधान चित्तीं सर्वकाळ ॥ ४ ॥

१९०५. माझें मन पाहे कसून । चित्त न ढळे तुजपासून ॥ १ ॥ कापुनी देईन शिर । पहा कृपण कीं उदार ॥ २ ॥ मजवरी घालीं घण । परी मी न सोडी चरण ॥ ३ ॥ तुका म्हणे अंतीं । तुजवांचूनि नाहीं गति ॥ ४ ॥

१९०६. दाता लक्षुमीचा पति । माझें मागणें तें किती ॥ १ ॥ जाणे तान्हेल्याची ताहान । पीतां गंगा नव्हे न्यून ॥ २ ॥ कल्पतरु झाला देता । तेथें पोटाचा मागता ॥ ३ ॥ तुका म्हणे संतां ध्यातां । परब्रह्मची आलें हातां ॥ ४ ॥

१९०७ म्हणवितों दास ते नाहीं करणी । आंत वरी दोन्ही भिन्न भाव ॥ १ ॥ गातों नाचतों तें दाखवितों जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ २ ॥ पाविजे तें वर्म न कळेचि कांहीं । बुडालों या डोहीं दंभाचिया ॥ ३ ॥ भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासि ॥ ४ ॥ तुका म्हणे वायां गेलों ऐसा दिसें । होईल या हांसें लौकिकाचें ॥ ५ ॥

१९०८. याजसाठी वनांतरा । जातों सांडुनिया घरा ॥ १ ॥ माझें दिठावेल प्रेम । बुद्धि होईल निष्काम ॥ २ ॥ अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥ ३ ॥ तुका म्हणे अहंब्रह्म । आड येऊ नेदीं भ्रम ॥ ४ ॥

१९०९. यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥ १ ॥ काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ २ ॥ द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जयामधीं होता गांठीं ॥ ३ ॥ तुका म्हणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥ ४ ॥

१९१०. सत्य तो आवडे । विकल्पानें भाव उडे ॥ १ ॥ आम्ही तुमच्या कृपादानें । जाणों शुद्ध मंद सोनें ॥ २ ॥ आला भोग अंगा । न लावूं उशीर त्या त्यागा ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥ ४ ॥

१९११. सर्वात्मकपण । माझें हिरोनि नेतो कोण ॥ १ ॥ मनीं भक्तीची आवडी । हेवा व्हावी ऐशी जोडी ॥ २ ॥ घेईन जन्मांतरें । हेंचि करावया खरें ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । ऋणी करूनि ठेवूं सेवा ॥ ४ ॥

१९१२. सांखळिलों प्रीती गळां । भुंके वेळा जाणोनियां ॥ १ ॥ तुमचें मी केशीराजा । सुनें या काजा पाळिलों ॥ २ ॥ आलें गेलें कळे वाटा । कोण निटा वांकुडिया ॥ ३ ॥ तुका म्हणे आलें वारी । दुरीतें दुरी नातळतां ॥ ४ ॥

१९१३. सांडोनियां दों अक्षरां । काय करूं हा पसारा । विधिनिषेधाचा भारा । तेणें दातारा नातुडसी ॥ १ ॥ म्हणोनि बोबड्या उत्तरीं । वाचे जपें निरंतरीं । नाम तुझें हरी । भवसागरीं तारूं तें ॥ २ ॥ सर्वमय ऐसें वेदाचें वचन । श्रुति गर्जती पुराणें । नाहीं आणीक ध्यान । साधनीं मज चाड ॥ ३ ॥ शेवटी हे ब्रह्मार्पण । याचि मंत्राचें कारण । काना मात्रा वांयांविण । तुका म्हणे बिंदुलीं ॥ ४ ॥

१९१४. स्त्रिया पुत्र कलत्र हे तंव मायावंत । शेवटींचा अंत नपवे कोणी ॥ १ ॥ यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणेंहि घेती काढूंनियां ॥ २ ॥ ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका म्हणे ॥ ३ ॥ (धृ. नाही)

१९१५. सुख सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे ॥ १ ॥ रवि रश्मिकळा । नये घालितां पैं डोळां ॥ २ ॥ दुरी तें जवळी । स्नेहें आकाशा कवळी ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्त । माझें पायीं अखंडित ॥ ४ ॥

१९१६. सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥ १ ॥ आलों निजाच्या माहेरा । भेटी रखुमाईच्या वरा ॥ २ ॥ परिहार जाला । अवघ्या दुःखाचा मागिला ॥ ३ ॥ तुका म्हणे वाणी । गेली आतां घेऊं धणी ॥ ४ ॥
१९१७. स्मशानींच आम्हां न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा ॥ १ ॥ नाहीं तरी वांयां अवघेंचि निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥ २ ॥ झाडें झुडें जीव सोईरें पाषाण । होती तईं दान तुम्हीं केलें ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां पाहें अनुभव । घेऊनि हातीं जीव पांडुरंगा ॥ ४ ॥

१९१८. स्वामीचें हें देणें । येथें पावलों दर्शनें ॥ १ ॥ करूं आवडीनें वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥ २ ॥ कळावया वर्म । हा तों पायांचाचि धर्म ॥ ३ ॥ तुका म्हणे सिद्धी । हेचि पावविली बुद्धी ॥ ४ ॥

१९१९. हागतांही खोडी । चळण मोडवितें काडी ॥ १ ॥ ऐसे अनावर गुण । आवरावे काय म्हूण ॥ २ ॥ नाहीं जरी संग । तरी बडबडविती रंग ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । तुमची न घडेचि सेवा ॥ ४ ॥

१९२०. हीन माझी याति । वरी स्तुति केली संतीं ॥ १ ॥ अंगीं वसूं पाहे गर्व । माझें हरावया सर्व ॥ २ ॥ मी एक जाणता । ऐसें वाटतसे चित्ता ॥ ३ ॥ राख राख गेलों वांयां । तुका म्हणे पंढरीराया ॥ ४ ॥

१९२१. होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥ १ ॥ हाचि माझा नेम धर्म । मुखीं विठोबाचें नाम ॥ २ ॥ हेचि माझी उपासना । लागेन संतांच्या चरणा ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । हेचि माझी भोळी सेवा ॥ ४ ॥

१९२२. आतां मी पतित ऐसा साच भावें । कळों अनुभवें आलें देवा ॥ १ ॥ काय करावें तें रोकडेंचि करीं । राहिली हे उरी नाहीं दोघां ॥ २ ॥ येर येरा दृष्टी द्यावया उत्तरा । यासी काय करा ग्वाही आतां ॥ ३ ॥ तुका म्हणे मेलों सांगतसांगतां । तेंचि आलें आतां कळों तुम्हां ॥ ४ ॥

१९२३. आपुलिये ठाकीं । करीन कांहीं तरी एकी ॥ १ ॥ करीन पायांशीं वोळखी । करिसी तें करीं सुखी ॥ २ ॥ कायाक्लेश गंगाजळ । समर्पीन तुळसीदळ ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । कर जोडीन ते सेवा ॥ ४ ॥

१९२४. आम्हां सर्वभावें हेचि काम । न विसंबावें तुझें नाम ॥ १ ॥ नलगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां ॥ २ ॥ आसनीं भोजनीं शयनीं । दुजें नाहीं ध्यानीं मनीं ॥ ३ ॥ तुका म्हणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥ ४ ॥

१९२५. उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥ १ ॥ तुझें नाम धरिले कंठीं । केली संसारासी तुटी ॥ २ ॥ आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥ ४ ॥

१९२६. कासया गा मज घातलें संसारीं । चित्त पायांवरी नाहीं तुझ्या ॥ १ ॥ कासया गा मज घातलें या जन्मा । नाहीं तुझा प्रेमा नित्य नवा ॥ २ ॥ नामाविण माझी वाचा अमंगळ । ऐसा कां चांडाळ निर्मियेलों ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी जळो जळो काया । विठ्ठल सखया वांचूनियां ॥ ४ ॥

१९२७. झालें समाधान । तुमचे धरिले चरण ॥ १ ॥ आतां उठावेंसें मना । येत नाहीं नारायणा ॥ २ ॥ सुरखाडिकपणें । येथें सांपडलें केणें ॥ ३ ॥ तुका म्हणे भोग । गेला निवारला लाग ॥ ४ ॥

१९२८. तरिच हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुम्हां सोई ॥ १ ॥ एके जातीविण नाहीं कळवळा । ओढिली गोपाळा सूत्रदोरी ॥ २ ॥ फुटतसे प्राण क्षणाच्या विसरें । हें तों परस्परें सारिखेंचि ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्तीं राखिला अनुभव । तेणें हा संदेह निवारला ॥ ४ ॥ 

१९२९. असे येथेंचि या दीनें । भाग्यहीनें सकळा ॥ १ ॥ भांडवल एवढे गांठीं । नाम कंठीं धरियेलें ॥ २ ॥ आणिक तें दुजें कांहीं । मज नाहीं यावरी ॥ ३ ॥ तुका म्हणे केला कोणें । एवढा नेणें लौकिक ॥ ४ ॥

१९३०. नाहीं सुख मज नलगे हा मान । न राहे हे जन काय करूं ॥ १ ॥ देह उपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ २ ॥ नाइकवे स्तुती वाणीतां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥ ३ ॥ तुज पावे ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां करी माझें हित । काढावें जळत आगींतुनीं ॥ ५ ॥

१९३१. झाली होती काया । बहु मळीन देवराया ॥ १ ॥ तुझ्या उजळली नामें । चित्त प्रक्षाळिलें प्रेमें ॥ २ ॥ अनुतापें झाला झाडा । प्रारब्धाचा नितोडा ॥ ३ ॥ तुका म्हणे देह पायीं । ठेवुनि झालों उतराई ॥ ४ ॥

१९३२. नोहे आजिकालिचे ऐसे । अनारिसें पालटे ॥ १ ॥ आतां लागवेग करा । ज्याचें धरा ठाके ते ॥ २ ॥ नका सांगों वाउग्या गोष्टी । चाहूल खोटी ये ठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मोडा माग । आपुला लाग वरूनी ॥ ४ ॥

१९३३. खाणोरियांचीं पुसों घरें । जींहीं बरे पाळती ॥ १ ॥ सांगती त्या जावें वाटा । धरोनी पोटामध्यें गोष्टी ॥ २ ॥ आली गेली होती ठाया । सत्य छाया कळली ॥ ३ ॥ तुका म्हणे आपुलें बळ । युक्ति काळ कारण ॥ ४ ॥

१९३४. बैसो आतां मनीं । आलें तैसेंचि वदनीं ॥ १ ॥ मग अवघेंचि गोड । पुरे सकळहि कोड ॥ २ ॥ बाहेरील भाव । तैसा अंतरीहि वाव ॥ ३ ॥ तुका म्हणे मणी । शोभा दाविली कोंदणीं ॥ ४ ॥ 

१९३५. यत्न आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें ॥ १ ॥ विश्वास तो पायांवरी । ठेवुनि हरी राहिलों ॥ २ ॥ जाणतचि दुजे नाहीं । आणिक कांहीं प्रकार ॥ ३ ॥ तुका म्हणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥ ४ ॥

१९३६. बहु फिरलो ठायाठाव । कोठें भाव पुरेचि ना ॥ १ ॥ समाधान तों पावलों । उरलों बोलों यावरी ॥ २ ॥ घे गा देवा आशीर्वाद । आमुच्या नांद भाग्यानें ॥ ३ ॥ तुका म्हणे जेवूं आधीं । खवखव मधीं सारावी ॥ ४ ॥

१९३७. मज नष्टा माया मोह नाहीं लोभ । अधिक तो क्षोभ आदराचा ॥ १ ॥ धिग हें शरीर अनउपकारें । न मनीं आभार उपकाराचा ॥ २ ॥ मजहून नष्ट आहे ऐसा कोण । नावडे मिष्टान्न बहु बोल ॥ ३ ॥ न दिसती मज आपलेसे गुण । संचित तें कोण जाणें मागें ॥ ४ ॥ तुका म्हणे माझें देखोनियां काई । पांडुरंगें पायीं राखियेलें ॥ ५ ॥

१९३८. कैसीं दिसों बरीं । आम्ही आळवितां हरि ॥ १ ॥ नाहीं सोंग अळंकार । दास झाला संवसार ॥ २ ॥ दुःख आम्हां नाहीं चिंता । हरीचें दास म्हणवितां ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । ऐसी झालों करितां सेवा ॥ ४ ॥

१९३९. तरीच म्यां देवा । साटी करूनियां जीवा ॥ १ ॥ येथें बैसलों धरणें । दृढ कायावाचामनें ॥ २ ॥ आवरिल्या वृत्ति । मन घेऊनियां हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे जरा । बाहेर येऊं नेदीं घरा ॥ ४ ॥

१९४०. कुरुवंडी करीन काया । वरोनि पायां गोजिरियां ॥ १ ॥ बैसलें तें रूप डोळां । मन चाळा लागलें ॥ २ ॥ परतें न सरवे दुरी । आवडी पुरी बैसली ॥ ३ ॥ तुका म्हणे विसावलों । येथें धालों धणीवरी ॥ ४ ॥ 

१९४१. केलें शकुनें प्रयाण । आतां मागे फिरे कोण ॥ १ ॥ होय तैसें हो आतां । देह बळी काय चिंता ॥ २ ॥ पडिलें पालवीं । त्याचा धाक वाहे जीवीं ॥ ३ ॥ तुका म्हणे जीणें । देवा काय हीनपणें ॥ ४ ॥ 

१९४२. कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असें ॥ १ ॥ काय पापपुण्य पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे ॥ २ ॥ नष्टदुष्टपण कवणाचें वाणूं । तयाहून अणु अधिक माझें ॥ ३ ॥ कुचर खोटा मज कोण असे आगळा । तो मी पाहों डोळां आपुलिये ॥ ४ ॥ तुका म्हणे मी या भांडवलें पुरता । तुजसी पंढरीनाथा लावियेलें ॥ ५ ॥ (धृ. नाही)


No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...