श्री तुकोबाराय यांचे बंधू श्री कान्होबाराय यांचे अभंग
श्री संत कान्होबाराय यांचे अभंग
मंगलाचरण (अभंग संख्या २)
४०४४.
वचन ऐका कमळापती । मज रंकाची विनंती ॥ १ ॥ कर जोडितों कथेकाळीं । आपण
असावें जवळीं ॥ २ ॥ घेई घेईं माझी भाक । जरि कां मागेन आणिक ॥ ३ ॥
तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाची राखावा ॥ ४ ॥
४०४५. करूनि उचित
। प्रेम घाली हृदयांत ॥ १ ॥ आलों दान मागायास । थोर करूनियां आस ॥ २ ॥
चिंतनसमयीं । सेवा आपुलीच देई ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावें
देवा ॥ ४ ॥
गौळणी (अभंग संख्या ४)
४०४६. चुराचुराकर
माखन खाया । गौलनीका नंदकुमर कन्हैया ॥ १ ॥ काहे बराई दिखावत मोहि ।
जानतहुं प्रभुपना तेरा सबहि ॥ २ ॥ और बात सुन उखलसुं गला । बांधलिया आपना
तूं गोपाला ॥ ३ ॥ फेरत बनबन गाऊं धराबत । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥ ४ ॥
४०४७.
करूनि आइती सत्यभामा मंदिरीं । वाट पाहे तंव टळोनि गेली रात्री । न येचि
देव येती कामलहरी । पडिली दुश्चिती तंव तो कवाड टिमकारी वो ॥ १ ॥ सर परता
कळला तुझा भाव । कार्यापुरतें दाविसी लाघव । बोल बोलतोसी ते अवघी तुझी माव ।
जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥ २ ॥ मीच वेडी तुजलागी बोल नाहीं । दानावेळे
विटंबना झाली काई । मागुती रुद्रासी भेटी दिली तईं । विश्वास तो तुझ्या
बोला अजुनी तरी नाहीं रे ॥ ३ ॥ भ्रम होता तो अवघा कळों आला । मानवत होतें
मी भला भला । नष्टा क्रिया नाहीं मा तुझिया बोला । तुकयाबंधु स्वामी
कानड्या कौसाल्या रे ॥ ४
४०४८. तंव तो हरि म्हणे निजांगने वो । लइ
नीच कां देसील दोलहणे वो । मजपें दुजें आलें तें देव जाणे वो । शब्द काय हे
बोलसी ते उणे वो ॥ १ ॥ पाहा मनीं विचारूनि आधीं वो । सांडूनि देह भ्रांति
करीं स्थिर बुद्धि वो । तंट केलें हें माझें तुझें उपाधी वो । उघडीं डोळे
अझुनी तरी धरीं शुद्धि वो ॥ २ ॥ कोठें तरतुदुनियांत वर्तलें वो ।
स्त्रियांनीं भ्रतारा दानासी दिलें वो । कैसा मी भला नव्हे तें सोसिलें वो ।
रुससा तें तूं उफराटे नवल झालें वो ॥ ३ ॥ काय सांग म्यां दैन्य केली कैसी
वो । तुझ्या गर्वें आणिलें हनुमंतासी वो । कष्टी केलें मज गरुडा भीमकीसी वो
। तुकयाबंधु म्हणे खरें खोटें नव्हे यासी वो ॥ ४ ॥
४०४९. तंव ते
म्हणें ऐका हृषीकेशी वो । नावाजिलें तुम्ही म्हणा आपणांसी वो । तरी कां
वंचनुक सुमनासि वो । नट नाट्य बरें संपादू जाणसी वो ॥ १ ॥ सर परता आतां वो
हरी । म्हणे सत्राजिताची कुमरी । जाणतें मी या शब्दाच्या कुसरी । ऐसेंच
करून ठकविलें आजिवरी वो ॥ २ ॥ भावें गेलें म्हूण न व्हावा वियोग । मनींचे
आर्त जन्मांतरीं व्हावा संग । तंव त्वां केलें पाठमोरे हें जग । ऐसें काय
जाणें वो तुझे रंग ॥ ३ ॥ काय करूं मज या नागविलें कामें । लागलें तयास्तव
इतुकें सोसावें । नाहीं तरी कां नव्हतीं ठायीं तुझीं वर्में । परद्वारींसा
हाकलितां प्रसिद्ध नामें वो ॥ ४ ॥ काय किती सांगावे तुझे गुण । न फुटे वाणी
ऐसा निष्ठुर निर्गुण । आपपर न म्हणसी माय बहीण । सासुसुनांस लावूनी पाहासी
भांडण वो ॥ ५ ॥ इतुकियावरी म्हणे वैकुंठींचा राणा । होऊन गेलें तें नये
आणूं मना । आतां न करीं तैसें करी क्रिया आणा । भक्तवत्सल म्हणे तुकयाबंधु
कान्हा वो ॥ ६ ॥
वासुदेव (अभंग संख्या ३)
४०५०. मनु
राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासीं दोघी नारी । पुत्रपौत्र संपन्न भारी
। तेणें कृपा केली आम्हांवरी गा ॥ १ ॥ म्हणऊनि आलों या देशा । होतों नाहीं
तरी भुललों दिशा । दाता तो मज भेटला इच्छा । येउनी मारग दाविला सरिसा गा ॥
२ ॥ सवें घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण । कडे चुकवूनि कांटवण । ऐका
आणिलीं तीं कोण कोण गा ॥ ३ ॥ पुढें भक्तीनें धरिलें हातीं । मागें ज्ञान
वैराग्य धर्म येती । स्थिर केलीं जीं अचपळें होतीं । सिद्ध आणुनि लाविलीं
पंथी गा ॥ ४ ॥ केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय । धर्में
त्याच्या हे देखियेले पाय । दिलें अभय दान अक्षय गा ॥ ५ ॥ होतों पीडत
हिंडतां गांव । पोट भरे ना राहावया ठाव । तो येणें अवघा संदेह । म्हणे
फेडियेला तुकयाचा बांधव गा ॥ ६ ॥
४०५१. गातों वासुदेव मी ऐका ।
चित्त ठेवुनि ठायीं भावें एका । डोळे झांकुनी रात्र करूं नका । काळ करीत
बैसला लेखा गा ॥ १ ॥ राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदी ।
सांडा वाऊगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥ २ ॥ अल्प आयुष्य
मानवी देह । शत गणिलें तें अर्ध रात्र खाय । मध्यें बालत्व पीडा रोग क्षय ।
काय भजनासी उरलें तें पाहें गा ॥ ३ ॥ क्षणभंगुर नाहीं भरंवसा । व्हारे
सावध सोडा माया आशा । कांहीं न चले गळां मग पडेल फासा । पुढें हुशार थोर
आहे ओळसा गा ॥ ४ ॥ कांहीं थोडें बहुत लागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट । तन
मन ध्यान द्या लावुनियां नीट । जरी करणें असेल गोड शेवट गा ॥ ५ ॥ विनवितों
सकळां जनां । कर जोडुनि थोरां लहानां । दान इतुकेंचि द्या मज दीना । म्हणे
तुकयाबंधु राम म्हणा गा ॥ ६ ॥
४०५२. गेले टळले पहार तीन । काय
निदसुरा अझून । जागे होउनि कांहीं करा दान । नका ऐकों झांकुनी लोचन गा ॥ १ ॥
हरी रामकृष्णा । वासुदेव जाणवितसे जना । चिपळ्या टाळ हातीं विणा । मुखीं
घोष नारायणा गा ॥ २ ॥ जें ठाकेल कोणां कांहीं । फळ पुष्प अथवा तोयी । द्या
परी मीस घेऊं नका भाई । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥ ३ ॥
देवाकारणें भाव तस्मात । द्यावें न लगे फारसें वित्त । झालें एक चित्त तरी
बहुत । तेवढ्यासाठीं नका करूं वाताहात गा ॥ ४ ॥ आलों येथवरी बहु सायास ।
करितां दान हेंचि मागावयास । नका भार घेऊं करूं निरास । धर्म सारफळ संसारास
गा ॥ ५ ॥ आतां मागुतां येईल फेरा । हें तों न घडे या नगरा । म्हणे
तुकयाबंधु राम धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥ ६ ॥
नाटाचे अभंग (अभंग संख्या ७)
४०५३.
अगा ये वैकुंठनायका । अगा ये त्रैलोक्यतारका । अगा जनार्दना जगव्यापका ।
अगा पालका भक्तांचिया ॥ १ ॥ अगा ये वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा ।
अगा बळिबंधा वामना । अगा निधाना गुणनिधी ॥ २ ॥ अगा ये द्रौपदीबांधवा । अगा
ये सखया पांडवा । अगा जिवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना ॥ ३ ॥ अगा
महेश्वरा महाराजा । अगा श्रीहरी गरुडध्वजा । अगा सुंदरा सहस्रभुजा । पार मी
तुझा काय वर्णुं ॥ ४ ॥ अगा अंबऋषि परंपरा । निरालंबा निर्विकारा । अगा
गोवर्धनधरणीधरा । अगा माहेरा दीनाचिया ॥ ५ ॥ अगा धर्मराया धर्मशीळा । अगा
कृपासिंधु कृपाळा । अगा प्रेमाचिया कल्लोळा । सकळकळाप्रवीणा ॥ ६ ॥ अगा
चतुरा सुजाणा । मधुरगिरा सुलक्षणा । अगा उदारा असुरमर्दना । राखे शरणा
तुकयाबंधु ॥ ७ ॥
४०५४. देवा मी चांडाळ चांडाळ । म्हणतां लागताहे
वेळ । नसे पाहातां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥ १ ॥ जन्मा उपजलियापासूनी ।
असत्य कर्म ते अझूनि । सत्य आचरण नेणें स्वप्नीं । निखळ खाणी अवगुणांची ॥ २
॥ भक्ति दया अथवा कथा । कानीं न साहवे वार्ता । अखंड विषयांची वेथा । अधम
पुरता अधमाहुनीं ॥ ३ ॥ काम क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर । यांचें
तरी माहेरघर । परउपकार वैरी जैसा ॥ ४ ॥ निंदा द्वेष घात विश्वास । करितां
नाहीं केला आळस । करूं नये ते केले संतउपहास । अभक्ष तेंही भक्षिलें ॥ ५ ॥
पाळिलें नाहीं पितृवचन । सदा परद्वारीं परधनीं ध्यान । बोलो नये घडलें ऐसें
अन्योन्यविण । दासीगमन आदिकरूनि ॥ ६ ॥ काया मनें वाचा इंद्रियांशीं । सकळ
पापांचीच राशी । तुकयाबंधु म्हणे ऐसियासी । आलों हृषीकेशी तुज शरण ॥ ७ ॥
४०५५.
काय काय करितों या मना । परी नाइके नारायणा । करूं नये त्याची करी विवंचना
। पतना नेऊं आदरिलें ॥ १ ॥ भलतिया सवें धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट
। न विचारी कुडें कांहीं कपट । घात बळकट मांडियेला ॥ २ ॥ न पुरती भ्रमणा
दाही दिशा । सप्तही पाताळें आकाशा । घालीं उडी बळेचि देखोनि फांसा । केलों
या दोषा पाहुणा ॥ ३ ॥ चेतवूनी इंद्रियें सकळ । आशा तृष्णा कल्पना काम क्रोध
काळ । दुराविलीं शुद्ध बुद्धि केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हें ॥ ४ ॥
आतां काय ऐसें करावें यासी । बहु जाचिलों केलों कासाविसी । तुकयाबंधु म्हणे
हृषीकेशी । धांव मज ऐसी परी जाली ॥ ५ ॥
४०५६. एक मागणे हृषीकेशी ।
चित्त द्यावें सांगतो वचनासी । मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा
करीं ॥ १ ॥ नको दुजी बुद्धि आणीक । रिद्धिसिद्धि परलोक । तूं स्वामी मी
सेवक । खंडणा नको करूं ऐसी ॥ २ ॥ मना येईल तो जन्म देई । भलते कुळीं भलते
ठायीं । तें मी सांकडें घालीत नाहीं । हृदयींहुनी तुवां न वजावें ॥ ३ ॥
इतुकें करीं भलत्यापरी । भलत्याभावें तुझे द्वारीं । राहेन दास होऊनि
कामारी । वदो वैखरी नित्य नाम ॥ ४ ॥ नको विचारूं दुसरें आतां । शरण आलों जी
पंढरीनाथा । तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । आहेसि तूं दाता दानशूर ॥ ५ ॥
४०५७.
तूं बळिया शिरोमणी । आहेसी माजी ये त्रिभुवनीं । रिघालों पाठी तुझी
म्हणऊनि । आतां करीन मी असेल तें ॥ १ ॥ तूं देवा प्रतापदिनकर ।
सुराअसुरांचा सुर । महावीरा वीर धनुर्धर । मी तों पामर काय तेथें ॥ २ ॥
कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवांची बंदीशाळ । संहारूनि राक्षसदळ । शरणागत
राज्यीं स्थापिला ॥ ३ ॥ उपक्रम करावा बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत । उचित
काय तें अनुचित । राखें शरणागत आलों आतां ॥ ४ ॥ किती म्यां काय विनवावें ।
शरण आलों जीवेंभावें । तुकयाबंधु म्हणे करावें । क्षेम अवघें येणें काळें ॥
५ ॥
४०५८. उभा देखिला भीमातीरीं । कर मिरविले कटावरी । पाउलें तरी
समचि साजिरीं । नाम तरि अनंत अतिगोड ॥ १ ॥ शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा
चिद्रत्नें । पीतांबर उटी शोभे गोरेपणें । लोपली तेणें रवितेजें ॥ २ ॥
श्रवणीं कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुद्रिकामाळ । दंत ओळी हिरे झळाळ ।
मुख निर्मळ सुखरासी ॥ ३ ॥ कडीं कडदोरा वांकी वेळा । बाहीं बाहुवटे पदक गळां
। मृगनाभीं रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता ॥ ४ ॥ सुंदरपणाची
साम्यता । काय वर्णूं ते पावे आतां । तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । धन्य ते
माता पिता प्रसवली ॥ ५ ॥
४०५९. कईं देखता होईन डोळीं । सकळां भूतीं
मूर्ति सांवळी । जीवा नाव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥ १ ॥
ऐसी कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन । प्रेमसागरीं बुडईन । होईल स्नान
अनुतापीं ॥ २ ॥ ऐसा कईं येईन दैवास । दृश्य नासोनी जाईल आस । सदा संतचरणीं
देहाचा वास । सेवीन शेष धणीवरीं ॥ ३ ॥ कईं नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा
होईल पार । अमृत तें पृथ्वी जळ सागर । वाहाती पूर आनंदाचे ॥ ४ ॥ प्रसन्न
दया क्षमा शांति । कईं नवविधा होईल भक्ति । भोगीन वैराग्यसंपत्ति । मनोरथ
कळती तईं पुरले ॥ ५ ॥ तुकयाबंधु म्हणे सांग । नव्हे तुजविण निरसेना पांग ।
म्हणोनी घातलें साष्टांग । पांडुरंगा चरणावरी ॥ ६ ॥
लळीत (अभंग संख्या १)
४०६०.
आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥ १ ॥ लाहो करा वेगीं स्मरा । टाळी वाहोनि
विश्वंभरा ॥ २ ॥ जालिया अवसान । न संपडती चरण ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे थोडे ।
अवधि उरली आहे पुढें ॥ ४ ॥
दसरा (अभंग संख्या १)
४०६१.
पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा । गर्जा
जयजयकार हरि हृदयीं धरा । आळस नका करूं लहाना सांगतों थोरां ॥ १ ॥ या हो या
हो बाइयानो निघाले हरी । सिलंगणा वेगीं घेऊनि आरत्या करीं । ओवाळूं
श्रीमुख वंदूं पाऊलें शिरीं । आम्हां दैव आलें येथें घरीच्या घरीं ॥ २ ॥
अक्षय मुहूर्त औटामध्यें साधतें । मग येरी गर्जें जैसें तैसें होत जातें ।
म्हणोनि मागें पुढे कोणी न पाहावें येथें । सांडा परतें काम जाऊं हरी
सांगातें ॥ ३ ॥ बहुतां बहुतां रीतीं चित्तीं धरा हे मनीं । नका गई करूं
आइकाल ज्या कानीं । मग हें सुख तुम्ही कधीं न देखाल स्वप्नीं । उरेल हायहाय
मागें होईल काहाणी ॥ ४ ॥ ऐसियास वंचता त्याच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं
नाहीं सत्य जाणा निर्धार । मग हे वेळ घटिका न ये अजरामर । कळलें असों द्या
मग पडतील विचार ॥ ५ ॥ जयासाठीं ब्रह्मादिक झाले ते पिसे । उच्छिष्टाकारणें
देव जळीं झाले मासे । अर्धांगीं विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकयाबंधु
म्हणे आलें अनायासें ॥ ६ ॥
गोंधळ (अभंग संख्या १)
४०६२.
सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नागखोपा केशर कस्तुरी
मळवटीं वो । विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठीं वो । कास पितांबराची
चंदन सुगंध साजे उटी वो ॥ १ ॥ अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा वो ।
राजस तेजोराशी मिरवे शिरोमणी वेल्हाळा वो । कोटि रविशशिप्रभा तेजें लोपल्या
सकळा वो । न कळे ब्रह्मादिकां अनुपम्य इची लीळा वो ॥ २ ॥ सावळी सकुमार
गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ सुढाळ पदक झळके वरी वो । कटीं
क्षुद्र घंटिका शब्द करिताती माधुरी वो । गर्जती चरणीं वाकी अभिनव संगीत
नृत्य करी वो ॥ ३ ॥ अष्टांगीं मंडित काय वर्णावी रूपठेवणी वो । सोलिव शुद्ध
रसाची ओतिव लावण्याची खाणी वो । सर्वकळासंपन्न मंजुळ बोले हास्यवदनी वो ।
बहु रूपें नटली आदिशक्ति नारायणी वो ॥ ४ ॥ घटस्थापना केली पंढरपूरमहानगरीं
वो । अस्मानी मंडप दिला तिन्ही तालांवरी वो । आरंभिला गोंधळ इनें
चंद्रभागेतिरीं वो । आली भक्तिकाजा कृष्णाबाई योगेश्वरी वो ॥ ५ ॥ तेहतीस
कोटि देव चामुंडा अष्ट कोटि भैरव वो । आरत्या कुरवंड्या करिती पुष्पांचा
वरुषाव वो । नारद तुंबर गायन ब्रह्मानंद करिती गंधर्व वो । वंदी चरणरज
तेथें तुकयाचा बांधव वो ॥ ६ ॥
कान्होबारायांना तुकाराम महाराजांच्या वियोगाने झालेला विरह (अभंग संख्या ४)
४०६३.
दुःखें दुभागलें हृदयसंपुष्ट । गहिंवरें कंठ दाटताहे ॥ १ ॥ ऐसें काय केलें
सुमित्रा सखया । दिलें टाकोनियां वनामाजी ॥ २ ॥ आक्रंदती बाळें करुणावचनीं
। त्या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥ ३ ॥ काय हें सामर्थ्य नव्हतें तुजपाशीं ।
संगें न्यावयासी अंगभूतां ॥ ४ ॥ तुज ठावे आम्हां कोणी नाहीं सखा ।
उभयलोकीं तुका तुजविण ॥ ५ ॥ कान्हा म्हणे तुझ्या वियोगें पोरटीं । झालों दे
रे भेटी बंधुराया ॥ ६ ॥
४०६४. सख्यत्वासी गेलों करित सलगी । नेणेचि
अभागी महिमा तुझा ॥ १ ॥ पावलों आपुलें केलें लाहें रस । निर्दैवा परिस काय
होय ॥ २ ॥ कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं । अद्यापिवरी तरी उपदेशीं ॥ ३
॥ उचित अनुचित सांभाळिलें नाहीं । कान्हा म्हणे कांहीं बोलों आतां ॥ ४ ॥
४०६५.
असो आतां कांहीं करोनिया ग्लांती । कोणा काकुलती येईल येथें ॥ १ ॥ करूं
कांहीं दिस राहे तो सायास । झोंबों त्या लागास भावाचिये ॥ २ ॥ करितां रोदना
बापुडें म्हणती । परि नये अंतीं कामा कोणी ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे पडिलिया
वनीं । विचार तो मनीं बोलिला हें ॥ ४ ॥
४०६६. चरफडें चरफड शोकें शोक
होये । कार्यमूळ आहे धीरापाशीं ॥ १ ॥ कल्पतसे मज ऐसें हे पाहातां । करावी
ते चिंता मिथ्या खोटी ॥ २ ॥ न चुके होणार सांडिल्या शूरत्वा । फुकटचि सत्वा
होईल हानी ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे दिला बंद मना । वांचुनी निधाना न पवीजे ॥
४ ॥
कान्होबाचे तुकाराम महाराजांच्या वियोगामुळे देवाशीं कठोर भाषण (अभंग संख्या ४२)
४०६७.
नलगे चिंता आतां अनुमोदन हाता । आलें मूळ भ्राता गेला त्याचें ॥ १ ॥
घरभेद्या येथें आहे तें सुकानु । धरितों कवळून पाय दोन्ही ॥ २ ॥ त्याचें
त्याचिया मुखें पडियेलें ठावें । नलगे सारावें मागें पुढें ॥ ३ ॥ तुकयाबंधु
म्हणे करील भेटी भावा । सोडीन तेधवां या विठ्ठला ॥ ४ ॥
४०६८. मूळ
स्थल ज्याचें गोमतीचे तीरीं । तो हा सारी दोरी खेळवितो ॥ १ ॥ ऐसें हें
कळलें असावें सकळां । चोर त्या वेगळा नाहीं दुजा ॥ २ ॥ वैष्णव हे हेर तयाचे
पाळती । खूण हे निरूति सांगितली ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे आलें अनुभवास ।
तेणेंच आम्हांस नागविलें ॥ ४ ॥
४०६९. नये सोमसरी उपचाराची हरी ।
करकरेचें करीं काळें तोंड ॥ १ ॥ मागतों इतुकें जोडूनियां कर । ठेऊनियां शीर
पायावरी ॥ २ ॥ तुम्हां आम्हां एके ठायीं सहवास । येथें द्वैत द्वेष काय
खरा ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे बहुतां बहुतां रीती । अनंता विनंती परिसावी हे ॥
४ ॥
४०७०. बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥ १ ॥
एके घरीं कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरापरी केली आम्हां ॥ २ ॥ कान्हा म्हणे
कां रे निष्काम देखिलें । म्हणोनी मना आलें करितोसी ॥ ३ ॥
४०७१.
निनांव हें तुला । नांव साजे रे विठ्ठला । बरा शिरविला । फाटक्यामध्यें पाव
॥ १ ॥ कांहीं तरी विचारिलें । पापपुण्य ऐसें केलें । भुरळें घातलें ।
एकाएकीं भावासीं ॥ २ ॥ मुद्रा धारण माळा टिळे । बोल रसाळ कोंवळे । हातीं
फांशांचें गुंडाळें । कोण चाळे गृहस्था हे ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे मिस्किन ।
करितोसीं देखोन । पाहा दुरीवरी विच्छिन्न । केला परी संसार ॥ ४ ॥
४०७२.
लालुचाईसाठीं बळकाविसी भावा । परि मी जाण देवा जिरों नेदी ॥ १ ॥ असों द्या
निश्चय हा मनीं मानसीं । घातली येविशीं दृढ कास ॥ २ ॥ मज आहे बळ आळीचें
सबळ । फोडीन अंत्राळ हृदय तुझें ॥ ३ ॥ करुणारसें तुकयाबंधु म्हणे भुलवीन ।
काढूनि घेईन निज वस्तु ॥ ४ ॥
४०७३. भुक्ति मुक्ति तुझें जळो
ब्रह्मज्ञान । दे माझ्या आणोन भावा वेगीं ॥ १ ॥ रिद्धि सिद्धि मोक्ष ठेवीं
गुंडाळून । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥ २ ॥ नको आपुलिया नेऊं वैकुंठासी ।
दे माझ्या भावासी आणून वेगीं ॥ ३ ॥ नको होऊं कांहीं होसील प्रसन्न । दे
माझ्या आणून भावा वेगीं ॥ ४ ॥ तुकयाबंधु म्हणे पहा हो नाहीं तरी । हत्या
होईल शिरीं पांडुरंगा ॥ ५ ॥
४०७४. धींद धींद तुझ्या करीन चिंधड्या ।
ऐसें काय वेड्या जाणितलें ॥ १ ॥ केली तरी बरें मज भेटी भावास । नाहीं तरी
नास आरंभिला ॥ २ ॥ मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरे पांडुरंगा कळलें
सावें ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे तुझी माझी उरी । उडाली न धरीं भीड कांहीं ॥ ४ ॥
४०७५.
तुझीं वर्में आम्हां ठावीं नारायणा । परी तूं शाहणा होत नाहीं ॥ १ ॥ मग
कालाभुली हाका देते वेळें । होतोसी परि डोळे नुघडिसी ॥ २ ॥ जाणोनी अज्ञान
करावें मोहरे । खोटी खोडी हे रे तुझी देवा ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे कारण
प्रचिती । पाहातों वेळ किती तेच गुण ॥ ४ ॥
४०७६. मुख्य आहे आम्हां
मातेचा पठंगा । तुज पांडुरंगा कोण लेखी ॥ १ ॥ नको लावूं आम्हां सवे तूं
तोंवरी । पहा दूरवरी विचारूनि ॥ २ ॥ साहे संतजन केले महाराज । न घडें आतां
तुज भेईन मी ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे अईक्यें ऐक्यता । वाढतें अनंता दुःखे
दुःख ॥ ४ ॥
४०७७. नाहीं घटिका म्हणसी । लाग लागला तुजपाशीं । पडिला
हृषीकेशी । जाब सकळ करणें ॥ १ ॥ माझें नेलें पांघरुण । ठावें असोन दुर्बळ
दीन । माणसामधून । उठविलें खाणोऱ्या ॥ २ ॥ आम्हीं हे जगवूनि होतों पाणी ।
संदी देवदेव करूनि । जालासी कोठोनी । पैदा चोरा देहाच्या ॥ ३ ॥ तुकयाबंधु
म्हणे केलें । उघडें मजचि उमगिलें । ऐसें काय गेलें । होतें तुज न पुरतें ॥
४ ॥
४०७८. अवघीं तुज बाळें सारिखीं नाहीं तें । नवल वाटतें
पांडुरंगा ॥ १ ॥ म्हणतां लाज नाहीं सकळांची माउली । जवळीं धरिलीं एकें दूरी
॥ २ ॥ एका सुख द्यावें घेऊनि वोसंगा । एकें दारीं गळा श्रमविती ॥ ३ ॥ एकां
नवनीत पाजावें दाटून । एकें अन्न अन्न करितील ॥ ४ ॥ एकें वाटतील नवजावीं
दूर । एकांचा मत्सर जवळीं येतां ॥ ५ ॥ तुकयाबंधु म्हणे नावडती त्यांस ।
कासया व्यालास नारायणा ॥ ६ ॥
४०७९. कनवाळ कृपाळ । उदार दयाळ मायाळ ।
म्हणवितोसी परि केवळ । गळेकाटूं दिसतोसी ॥ १ ॥ काय केलें होतें आम्ही ।
सांग तुझें एक ये जन्मीं । झालासी जो स्वामी । एवढी सत्ता करावया ॥ २ ॥
भलेपणाचा पवाडा । बरा दाविला रोकडा । करूनि बंधु वेडा । जोडा माझा विखंडिला
॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे भला । कैसें म्हणताती तुजला । जीव आमुचा नेला । अंत
पाहिला कांहीं तरी ॥ ४ ॥
४०८०. आतां कळों आले गुण । अवघेचि वावरून ।
चोखट लक्षण । धरियेलें हें घरघेणें ॥ १ ॥ या नांवें कृपासिंधु ।
म्हणवितोसी दीनबंधु । मज तरी मैंदु । दिसतोसी पहातां ॥ २ ॥ अंमळ दया नाहीं
पोटीं । कठीण तैसाचि कपटी । आंधळ्याची काठी । माझी गुदरसीच ना ॥ ३ ॥
तुकयाबंधु म्हणे पुरता । नाहीं म्हण बरें अनंता । एरवीं असतां । तुझा घोंट
भरियेला ॥ ४ ॥
४०८१. काय सांगों हृषीकेशा । आहे अनुताप आला ऐसा ।
गिळायासी निमिषा । निमिष लागों नेदावे ॥ १ ॥ माझें बुडविलें घर । लेंकरें
बाळें दारोदार । लाविलीं काहार । तारातीर करोनि ॥ २ ॥ जीव घ्यावा किंवा
द्यावा । तुझा आपुला केशवा । इतुकें उरलें आहे देवा । भावाचिया निमित्यें ॥
३ ॥ तुकयाबंधु म्हणे जग । बरें वाईट म्हणो मग । याकारणें परि लाग । न
संडावा सर्वथा ॥ ४ ॥
४०८२. मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे
आभारीं । तोहि परि हरी । तुज जाला असमाई ॥ १ ॥ हें कां भक्तीचे उपकार ।
नांदतें विध्वंसिलें घर । प्रसन्नता व्यवहार । शेवटीं हे झालासी ॥ २ ॥ एका
जीवावरी । होतों दोनी कुटुंबारी । चाळवूं तो तरी । तुज येतो निर्लज्जा ॥ ३ ॥
तुकयाबंधु म्हणे भला । आणिक काय म्हणावें तुला । वेडा त्यानें केला ।
तुजसवे संबंधु ॥ ४ ॥
४०८३. पूर्वी पूर्वजांची गती । हेचि आइकिली
होती । सेवे लावूनी श्रीपती । निश्चिती केली तयांचि ॥ १ ॥ कारे पाठी
लागलासी । ऐसा सांग हृषीकेशी । अद्यापवरी न राहासी । अंत पाहासी किती म्हूण
॥ २ ॥ जन्मजन्मांतरीं दावा । आम्हां आपणां केशवा । निमित्य चालवा ।
काईसयास्तव हें ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे अदेखणा । किती होसी नारायणा । देखों
शकवेना । खातयासी न खात्या ॥ ४ ॥
४०८४. निसुर संसार करून । होतों
पोट भरून । केली विवसी निर्माण । देवपण दाखविलें ॥ १ ॥ ऐसा काढियेला नीस ।
काय म्हूण सहित वंश । आणिलें शेवटास । हाउस तरी न पुरे ॥ २ ॥ उरलों पालव्या
शेवटीं । तेंही न देखवे दृष्टी । दोघांमध्यें तुटी । रोकडीचि पाडिली ॥ ३ ॥
तुकयाबंधु म्हणे गोड । बहु जालें अति वाड । म्हणोनि का बुड । मुळ्यांसहित
खावें ॥ ४ ॥
४०८५. बरा जाणतोसी धर्मनीति । उचित अनुचित श्रीपति ।
करूं येते राती । ऐसी डोळे झांकूनी ॥ १ ॥ आतां जाब काय कैसा । देसी तो दे
जगदीशा । आणिला वोळसा । आपणाभोंवता ॥ २ ॥ सेवेचिया सुखास्तव । बळें धरिलें
अज्ञानत्व । येईल परि हा भाव । ज्याचा त्यासी कारणा ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे
नाहीं । आतां आम्हां बोल कांहीं । जडोनिया पायीं । तुझे त्वांचि घेतलें ॥ ४
॥
४०८६. कांहीं विपत्ति आपत्यां । आतां आमुचिया होतां । काय होईल
अनंता । पहा बोलों कासया ॥ १ ॥ बरें अनायासें जालें । सायासेंविण बोले चाले
। काबाड चुकले । केलें कष्टांवेगळें ॥ २ ॥ बरा सांपडलासी वोजा । वर्मावरी
केशीराजा । बोलायासी तुझा। उजुरचि नाहींसा ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे दगा । बरा
दिला होता बगा । झडकरी चला गा । चांग दैवें पावलों ॥ ४ ॥
४०८७.
देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ऋण । आहे तें कां नेदिसी अझून । अवगलासी
झोंडपणें । परि मी जाण जीवें जिरों नेदीं ॥ १ ॥ कळों येईल रोकडें । उभा
करीन संतांपुढें । तुझें काय एवढें । भय आपुलें मागतां ॥ २ ॥ आजीवरी होतों
नेणता । तों तुज फावलें रे अनंता । कवडीचा तों आतां । पडों नेदीन फेर ॥ ३ ॥
ठेविला ये जीवनीं जीव । म्हणे तुकयाचा बांधव । माझा गळा तुझा पाव । एके
ठायीं बांधीन ॥ ४ ॥
४०८८. मागें असतासी कळला । उमस घेऊं नसता दिला ।
तेणेंचि काळें केला । असता अवघा निवाडा ॥ १ ॥ इतका न लागता उशीर । न
धरितों भीडभार । सिद्धासी व्यवहार । कासयासी लागला ॥ २ ॥ असोनियां माल खरा ।
किती केल्या येरझारा । धरणेंही दिवस तेरा । माझ्या भावें घेतलें ॥ ३ ॥
अझून तरी इतक्यावरी । चुकवीं अनाचार हरी । तुकयाबंधु म्हणे उरी । नाहीं तरी
नुरे कांहीं ॥ ४ ॥
४०८९. आतां न राहे क्षण एक । तुझा कळला रे लौकिक
। नेदीं हालों एक । कांहीं केल्यावांचूनि ॥ १ ॥ संबंध पडिला कोणाशीं । काय
डोळे झांकितोसी । नेईन पांचांपाशीं । दे नाहीं तरी वोढूनि ॥ २ ॥ सुखें
नेदीस जाणवलें । नास केल्याविण उगलें । तरि तेंही विचारिलें । आम्ही आहे
तुज आधीं ॥ ३ ॥ असेंच करूनि किती । नागविली नाहीं नीति । तुकयाबंधु म्हणे
अंतीं । न सोडिसी ते खोडी ॥ ४ ॥
४०९०. तुज ते सवे आहे ठावें ।
घ्यावें त्याचें बुडवावें । परि तें आम्हांसवें । आतां न फावे कांहीं ॥ १ ॥
नव्हों सोडायाचे धणी । कष्टें मेळविलें करोनी । पाहा विचारोनी । आढी धरोनी
काम नाहीं ॥ २ ॥ अवघे राहिले प्रकार । झालों जिवासी उदार । असा हा निर्धार
। कळला असावा असेल ॥ ३ ॥ आतां निदसुर नसावें । गांठ पडली कुणब्यासवें ।
तुकयाबंधु म्हणे राखावें । देवा महत्व आपुलें ॥ ४ ॥
४०९१. बहू
बोलणें नये कामा । वाउगें तें पुरुषोत्तमा । एकाचि वचनें आम्हां । काय
सांगणें तें सांगा ॥ १ ॥ देणें आहे कीं भंडाई । करणें आहे सांग भाई । आतां
भीड कांहीं । कोणी न धरी सर्वथा ॥ २ ॥ मागें गेलें जें होऊनि । असो तें
धरित नाहीं मनीं । आतां पुढें येथूनी । कैसा काय विचार ॥ ३ ॥ सारखी नाहीं
अवघी वेळ । हें तों कळतें सकळ । तुकयाबंधु म्हणे खळखळ । करावी ते उरले ॥ ४ ॥
४०९२.
आतां हें न सुटे न चुके । बोल कां दवडिसी फिके । जन लोक पारिखें । अवघें
केलें म्यां यासाठीं ॥ १ ॥ नये सरतां नव्हे भलें । तुझें लक्षण कळलें ।
बैसलासी काढीलें । देहाचें मुळीं दिवाळें ॥ २ ॥ दिसतोसी बरा बोल कोंवळे ।
गुण मैंदाचे चाळे । दिसताती ये वेळे । काय करूं विसंबोनी ॥ ३ ॥ तुकयाबंधु
म्हणे देखतां । अंध बधिर ऐकतां । कैसें व्हावें आतां । इतुकिया उपरी ॥ ४ ॥
४०९३.
तिहीं ताळीं हेचि हाक । म्हणती पांढरा स्फटिक । अवघा बुडविला लौकिक ।
सुखेंचि भिके लाविली ॥ १ ॥ थोंटा नांव शिरोमणी । नाहीं जोडा त्रिभुवनीं ।
म्हणोनी शहाणे ते कोणी । तुझे दारीं बैसतीना ॥ २ ॥ निर्गुण निलाजिरा
निनांवा । लंड झोंड कुडा देवा । नागवणा या नांवा । वांचूनि दुजा नाइकों ॥ ३
॥ सर्वगुणें संपन्न । कळों आलासी संपूर्ण । तुकयाबंधु म्हणे चरण । आतां
जीवें न सोडीं ॥ ४ ॥
४०९४. तोचि प्रसंग आला सहज । गुज धरितां नव्हे
काज । न संडितां लाज । पुढें वोज न दिसे ॥ १ ॥ तूं तर न होसी शहाणा । नये
सांगतों तेंही मना । आपण आपणा । आतां प्रयत्न देखावा ॥ २ ॥ न पुरवी पाहातां
वाट । द्यावें प्रमाण चोखट । कास घालूनियां नीट । चौघाचार करावा ॥ ३ ॥
आतां श्रमाचें कारण । नव्हें व्हावें उदासीन । न पडे तयाविण । गांठी
तुकयाबंधु म्हणे ॥ ४ ॥
४०९५. हळूहळू जाड । होत चालिलें लिगाड ।
जाणवेल निवाड । न करिसी परि पुढें ॥ १ ॥ मी तो सांगून उतराई । झालों आतां
तुज काई । कळों येईल भाई । तैसा करीं विचार ॥ २ ॥ मागें युगे अठ्ठावीस ।
जाली दिवसांचा दिवस । मुदल व्याज कासावीस । होसी देवा ये कामें ॥ ३ ॥
तुकयाबंधु म्हणे राखें । आतां टाकीं तुझीं तीं सुखें । जगजाहिर ठाऊकें ।
झालें नाहीं खंडलेंसे ॥ ४ ॥
४०९६. पत्र उचटिलें प्रयत्नें । ग्वाही
करायाकारणें । नाहीं तरी पुण्यें । तुझ्या काय उणें आम्हां ॥ १ ॥ नांव
तुझेंचि करोनी । आहों सुखें पोट भरोनी । केली केली जाणवणी । म्हणऊनि नाहीं
म्हणसील ॥ २ ॥ आतां इतुकियाउपरी । दे नको भलतें करीं । म्हणती ऋणकरी ।
आमुचा इतकें उदंड ॥ ३ ॥ तुकयाबंधु जागा । आळवावया पांडुरंगा । केला कांहीं
मागा । याची नव्हती गरज ॥ ४ ॥
४०९७. माझ्या भावें केली जोडी । न
सरेसी कल्पकोडी । आणियेलें धाडीं । घालूनि अवघें वैकुंठ ॥ १ ॥ आतां नलगे
यावें जावें । कोठें कांहींच करावें । जन्मोजन्मीं सुखें खावें । बैसोनसें
जालें ॥ २ ॥ असंख्य संख्या नाहीं पार । आनंदें दाटलें अंबर । न माये अपार ।
त्रिभुवनीं सांठवितां ॥ ३ ॥ अवघें भरलें सदोदित । जाले सुखाचे पर्वत ।
तुकयाबंधु म्हणे परमार्थ । धन अद्भुत सांपडलें ॥ ४ ॥
४०९८. आतां
चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र । घरासी आगर । आला सकळ सिद्धींचा ॥ १
॥ जालों निधाई निधानें । लागलें अनंतगुणरत्न । जन्माचें विछिन्न । दुःख
झालें दारिद्र ॥ २ ॥ तारूं सागरींचें अवचितें । हेंदोवलें आलें येथें ।
ओढिलें संचितें । पूर्वदत्तें लाधलें ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे सीमा । नाहीं
आमुचिया दैवा । आतां पुरुषोत्तमा । ऐसा सौदागर सांपडला ॥ ४ ॥
४०९९.
सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें । केली नारायणें । कृपा पुण्यें
पूर्वीचिया ॥ १ ॥ सुखें आनंदरूप आतां । आम्हीं आहों याकरितां । निवारिली
चिंता । देणें घेणें चुकलें ॥ २ ॥ जालें भांडवल घरींचें । अमूप नाम
विठ्ठलाचें । सुकृत भावाचें । हें तयानें दाविलें ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे
फिटला । पांग नाहीं बोलायाला । चाड दुसरी विठ्ठला- । वांचूनियां आणिक ॥ ४ ॥
४१००.
कोठें गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥ १ ॥ दीनानाथ
ब्रीद सांभाळीं आपुलें । नकों पाहों केलें पापपुण्य ॥ २ ॥ पतितपावन ब्रीदें
चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे द्रौपदीचा धांवा ।
केला तैसा मला पावें आतां ॥ ४ ॥
४१०१. कामक्रोध अहंकार नको देहीं ।
आशा तृष्णा माया लज्जा चिंता कांहीं । वास पंढरीचा जन्म सदा देईं । आणीक
दुजें मागणें तुज नाहीं ॥ १ ॥ कृपा देईं दान । नाशीं तिमिर दाखवीं चरण ।
आर्त पुरवावें भेटी देऊन । नको उपेक्षूं आलिया शरण ॥ २ ॥ नाम अखंड हृदयीं
राहो वाणी । न पडो विसर क्षण जागृतीं स्वप्नीं । संतसमागम ऐसा दे लावूनी ।
आणीक दुजें कांहीं नेणें तुजवांचूनि ॥ ३ ॥ पंथपुरींचा रविसुत पुरे आतां ।
आड करावा भवसिंधु ऐसा नव्हता । नाहीं आडताळा त्रैलोक्यामाजी सरता । विनवी
तुकयाबंधु चरणीं ठेवुनि माथा ॥ ४ ॥
४१०२. आतां मागतों तें ऐक
नारायणा । भावपूर्वक मनापासूनिया ॥ धृ. ॥ असों दे मोकळी जिव्हा जरी गाईल
गुण । नाहीं तरी खिळुन टाकीं परती ॥ २ ॥ मातेचिया परि देखती परनारी । ठेवीं
नेत्र तरी नाहीं तरी नको ॥ ३ ॥ तरी बरें कांटाळा करिती निंदास्तुतीचा ।
नाहीं तरी कानांचाही देख प्रेत्न ॥ ४ ॥ सकळ इंद्रियांचा निग्रह करूनि एक ।
राखावीं पृथक तोडोनि भ्रम ॥ ५ ॥ तुकयाबंधु म्हणे तेचि वाट प्राणां । पडतां
नारायणा विसर तुझा ॥ ६ ॥
४१०३. नेणें गाऊं कांहीं धड बोलतां वचन ।
कायावाचामनेंसहित आलों शरण ॥ १ ॥ करी अंगीकार नको मोकलूं हरी । पतितपावन
ब्रीदें करावीं खरीं ॥ २ ॥ नेणें भक्तिभाव तुझा म्हणवितों दास । जरीं देसी
अंतर तरी लज्जा कोणास ॥ ३ ॥ म्हणे तुकयाबंधु तुझे धरियेले पाय । आतां कोण
दुजा ऐसा आम्हांसी आहे ॥ ४ ॥
४१०४. तूंच मायबाप बंधु सखा आमुचा ।
वित्त गोत जिवलग जीवाचा ॥ १ ॥ आणीक प्रमाण नाहीं दुसरें आतां । योगक्षेमभार
तुझे घातला माथां ॥ २ ॥ तूंच क्रियाकर्म धर्म देव तूं कुळ । तूंच तप तीर्थ
व्रत गुरु सकळ ॥ ३ ॥ म्हणे तुकयाबंधु करिता कारयिता देवा । तूंच भाव भक्ति
पूजा पुरस्कार आघवा ॥ ४ ॥
४१०५. गाऊं वाहूं टाळी रंगी नाचों उदास ।
सांडोनि भय लज्जा शंका आस निरास ॥ १ ॥ बळियाचा बळी तो कैवारी आमुचा ।
भक्तिमुक्तिदाता सकळांही सिद्धींचा ॥ २ ॥ मारूं शब्दशस्त्रें बाण निःशंक
अनिवार । कंटकांचा चूर शिर फोडूं काळाचे ॥ ३ ॥ म्हणे तुकयाबंधु नाहीं
जीवाची चाड । आपुलिया तेथें काय आणिकांची भीड ॥ ४ ॥
४१०६. सांडूनी
वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥ १ ॥ आला आला रे जगजेठी । भक्ता पुंडलिकाचे भेटी
॥ २ ॥ पैल चंद्रभागे तिरीं । कट धरूनियां करी ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे अंबर ।
गजर होतो जयजयकार ॥ ४ ॥
४१०७. कृपाळू भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा
॥ १ ॥ उभा न पाचारितां दारीं । न सांगतां काम करी ॥ २ ॥ भाव देखोनि निर्मळ
। रजां वोडवी कृपाळ ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे न भजा । कां रे ऐसा भोळा राजा ॥
४ ॥
४१०८. केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करितील काळ मशक
मानवें ॥ १ ॥ घातलीं बाहेर तीं भय होतें ज्यानें । बैसला आपण तेथें
घालुनियां ठाणें ॥ २ ॥ लागों नेदी वारा दुजियाचा अंगासी । हा पुरता निर्धार
कळों आला आम्हांसी ॥ ३ ॥ म्हणे तुकयाबंधु नलगे करावी चिंता । कोणेविशीं
आतां बैसलों हस्तीवरी माथां ॥ ४ ॥
कान्होबाराय देवाबरोबर बोलले ते अभंग (अभंग संख्या २६)
४१०९.
अगोचरीं बोलिलों आज्ञेविण आगळें । परी तें आतां न संडावें राउळें ॥ १ ॥
जाईल रोकडा बोल न पुसती आम्हां । तुझा तुझें म्हणविलें पहा पुरुषोत्तमा ॥ २
॥ न व्हावा न वजावा न कळता अन्याय । न धरावें तें मनीं भलता करा उपाय ॥ ३ ॥
म्हणे तुकयाबंधु हीन मी म्हणोनि लाजसी । वारा लागों पाहाताहे उंच्या
झाडासी ॥ ४ ॥
४११०. मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥ १ ॥ चुकविलीं दुःखें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ २ ॥ केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंता तळमळ नाहीं ऐसी ॥ ३ ॥ काळें तोंड काळ करूनि राहिलें । भूतमात्र झालें सज्जनसखें ॥ ४ ॥ तुकयाबंधु म्हणे अवघ्या दशदिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्यें ॥ ५ ॥
४१११. कोण या
पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहातीं । जाहाज पृथ्वीपति । केली ख्याति
अदभुत ॥ १ ॥ भला रे पुंडलिका भला । महिमा नव जाये वर्णिला । दगा देउनि
अवघियांला । सांठविलें अविनाश ॥ २ ॥ केलें एके घरीं केणें । भरलीं सदोदित
दुकानें । दुमदुमिलीं सुखानें । हे भाग्याची पंढरी ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे
किल्ल्या । संतांचे हातीं दिल्या । आंगावेगळे आपल्या । टाकुनि झाला महिमा ॥
४ ॥
४११२. चवदा भुवनें लोक तिन्ही दाढें जो कवळी । संपुष्ट तो
संबळिमध्यें देखा ॥ १ ॥ उत्पत्ति संहार करिता जो पाळण । तो नंदानंदन
म्हणवितसे ॥ २ ॥ असूर तोडरीं दैत्यांचा काळ । झाला द्वारपाळ बळीचा तो ॥ ३ ॥
लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उच्छिष्टकवळा पसरी मुख ॥ ४ ॥
तुकयाबंधु म्हणे चतुरांचा रावो । भावें तो पाहा हो केला वेडा ॥ ५ ॥
४११३.
चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥ १ ॥ नलगे गोड कांहीं आतां । आणीक
दुसरें सर्वथा ॥ २ ॥ हरपला द्वैत भाव । तेणें देह झाला वाव ॥ ३ ॥ तुकयाबंधु
म्हणे आम्ही । झालों निष्काम ये कामीं ॥ ४ ॥
४११४. व्यापिलें
सर्वत्र । बाहेरी भीतरी अंतर ॥ १ ॥ ऐसें गोविंदें गोविलें । बोलें नवजाये
बोलिलें ॥ २ ॥ संचिताची होळी । करूनि जीव घेतला बळी ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे
नाहीं । आतां संसारा उरी कांहीं ॥ ४ ॥
४११५. केली हार्णाळां अंघोळी ।
येऊनि बैसलों राउळीं ॥ १ ॥ आजिचें जालें भोजन । राम कृष्ण नारायण ॥ २ ॥
तुकयाबंधु म्हणे नास । नाहीं कल्पांतीं जयास ॥ ३ ॥
४११६. राम
म्हणतां कामक्रोधांचे दहन । होय अभिमान देशधडी ॥ १ ॥ राम म्हणतां कर्म
तुटेल भवबंधन । नये श्रम शीण स्वप्नामाजी ॥ २ ॥ राम म्हणतां जन्म नाहीं
गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥ ३ ॥ राम म्हणतां यम शरणागत बापुडें
। अढळपद पुढें काय तेथें ॥ ४ ॥ राम म्हणतां धर्म घडती सकळ । तिमिरपडळ नासे
हेळा ॥ ५ ॥ राम म्हणतां म्हणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥
६ ॥
४११७. तट्टाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लहान
नेणें ॥ १ ॥ परि त्या विशेष मनुष्य होऊनि । करि खंड मान वडिलांचा ॥ २ ॥
बेरसा गाढव माय ना बहिण । भुंके चवीविण भलतेंचि ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे बोकड
मातलें । न विचारी आपुलें तोंडीं मुते ॥ ४ ॥
४११८. मायझवा खर
गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥ १ ॥ अपमानिलें जेणें श्रेष्ठाचें
वचन । तेचि त्याची खूण ओळखावी ॥ २ ॥ मद्यपी तो पुरा अधम यातीचा । तया
उपदेशाचा राग वांयां ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे पिसाळलें सुनें । आप पर तेणें न
विचारावें ॥ ४ ॥
४११९. हम हुं दास तिन्हके सुनाहो लोकां । रावण मार
बिभीषण दिई लंका ॥ धृ. ॥ गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेहु
फत्तरका ॥ २ ॥ वैकुंठनायक काल कौंसासुरका । दैत डुबाय सब मंगाय गोपिका ॥ ३ ॥
स्तंभ फोड पेट चिरीया कश्यपका । प्रल्हादके लिये कहे भाई तुकयाका ॥ ४ ॥
४१२०.
मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथिवीचा भार वाहावया ॥ १ ॥ काय धाक आम्हां
कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ २ ॥ शंखचक्रगदा आयुधें अपार ।
वागवितो भार भक्तांसाठीं ॥ ३ ॥ पांडवा जोहरीं राखिलें कुसरी । तो हा बंधुचा
कैवारी तुकयाच्या ॥ ४ ॥
४१२१. नमस्कारी भूतें विसरोनि याती । तेणें
आत्मस्थिति जाणीतली ॥ १ ॥ परउपकारीं वेचियेल्या शक्ती । तेणें आत्मस्थिति
जाणीतली ॥ २ ॥ द्वैताद्वैतभाव नाहीं जया चित्तीं । तेणें आत्मस्थिति
जाणीतली ॥ ३ ॥ जयाचिये वाचे नये निंदास्तुति । तेणें आत्मस्थिति जाणीतली ॥ ४
॥ उचित अनुचित जाणे धर्मनीति । दृढ भावभक्ति मानव तो ॥ ५ ॥ तुकयाबंधु
म्हणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥ ६ ॥ (धृ. नाही)
४१२२.
उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा ॥ १ ॥ वाट पाहाते रुक्मिणी ।
उभी मंचक सावरूनि ॥ २ ॥ केली करा क्षमा । बडबड पुरुषोत्तमा ॥ ३ ॥ लागतो
चरणां । तुकयाबंधु नारायणा ॥ ४ ॥
४१२३. कंसरावें गर्भ वधियेले सात ।
म्हणोनि गोकुळासी आले अनंत । घ्यावया अवतार झालें हेंचि निमित्त । असुर
संहारूनि तारावे भक्त ॥ १ ॥ जय देव जय देव जय विश्वरूपा श्रीविश्वरूपा ।
ओवाळीन तुज देहदीपें बापा ॥ २ ॥ स्थूळरूप होऊनि धरितसे सानें । जैसा भाव
तैसा तयां कारणें । दैत्यांसी भासला सिंह गजानें । काळासी महाकाळ येशोदेसी
तान्हें ॥ ३ ॥ अनंत वर्णी कोणा न कळेचि पार । सगुण कीं निर्गुण हाही
निर्धार । पांगलीं साहीं अठरा करितां वेव्हार । तो वळितसे गौळियांचें
खिल्लार ॥ ४ ॥ तेहतीस कोटी तिहीं देवांसी श्रेष्ठ । पाउलें पाताळीं स्वर्गी
मुगुट । गिळिलीं चौदा भुवनें तरी न भरेचि पोट । तो खाऊन धाला गोपाळांचें
उच्छिष्ट ॥ ५ ॥ महिमा वर्णूं परि पांगलिया श्रुति । सिणला शेष चिरल्या
जिव्हा करितां स्तुति । भावेंविण कांहीं न चलेचि युक्ति । राखे शरण
तुकयाबंधु करी विनंति ॥ ६ ॥
४१२४. सकुमार मुखकमळ निजसार निर्मळ ।
सांवळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ । झळकती दिव्य तेजें दंत माज पातळ ।
मिरवलीं मयूरपत्रे मुगुट कुंडलें माळ ॥ १ ॥ जय देवा जगदीश्वरा । धन्य
रखुमाईवरा । आरती करीन काया । ओंवाळीन सुंदरा ॥ २ ॥ गोजिरें ठाणमान भुजा
मंडित चारी । शोभती शंख चक्र गदा पद्म मोहरी । हृदयीं विठुपद बाणलें
श्रृंगारीं । गर्जती चरणीं वांकी कंठ कोकिळस्वरीं ॥ ३ ॥ घवघवित उटी अंगीं
बावनचंदनाची । लल्लाटीं कस्तूरीचा कास पितांबराची । कटिसूत्र वरि साजिरें
प्रभा वर मोतियांची । संगीत सकळ मुद्रा पाउलें कुंकुमाचीं ॥ ४ ॥
सौभाग्यसुखसागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सल विश्व लाविलें ध्यानीं ।
आश्चर्य देव करिती ऋषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥ ५ ॥
वर्णितां ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न
रूळती । उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूर्ति । तुकयाबंधु म्हणे स्तवूं मी काय
किती ॥ ६ ॥
४१२५. परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरि
मेघश्यामा । अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापति न कळे महिमा ॥
१ ॥ जयदेव जयदेव जयश्रीपती । मंगळशुभदायका करीन आरती ॥ २ ॥ गोविंदा गोपाळा
गोकुळरक्षणा । गिरीधरकर भवसागरतारक दधिमथना । मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रम
हरणा । दीनवत्सल सकळां मूळजय निधाना ॥ ३ ॥ विश्वंभरा सर्वेश्वरा जगदाधारा ।
चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा । सुखसागर गुण आगर मुगुटमणी शूरा । कल्याण
कैवल्यमूर्ति मनोहरा ॥ ४ ॥ गरुडासना शेषशयना नरहरी । नारायणा ध्याना
सुरवरहरगौरी । नंदा नंदनवंदन त्रिभुवनाभीतरी । अनंतनामीं ठसा अवतारावरी ॥ ५
॥ सगुण निर्गुण साक्ष श्रीमंत संतां । भगवाना भगवंता कालकृतांता ।
उत्पत्तिपालनापासून संहारणसत्ता । शरण तुकयाबंधु तारीं रितीं बहुतां ॥ ६ ॥
४१२६.
म्हणसी दावीन अवस्था । तैसें नको रे अनंता ॥ १ ॥ होऊनियां सहाकार । रूप
दाखवीं सुंदर ॥ २ ॥ मृगजळाचियापरी । तैसें न करावें हरी ॥ ३ ॥ तुकयाबंधु
म्हणे हरी । कामा नये बाह्यात्कारीं ॥ ४ ॥
४१२७. उदार कृपाळ सांगसी
जना । तरी कां त्या रावणा मारियेलें । नित्य नित्य पूजा करी श्रीकमळीं ।
तेणें तुझें काय केलें ॥ १ ॥ काय बडिवार सांगसी वांयां । ठावा पंढरीराया
आहेसि आम्हां । एकलाचि जरी देऊं परिहार । आहे दुरिवरी सीमा ॥ २ ॥ कर्णाऐसा
वीर उदार झुंजार । तो तुवां जर्जर केला बाणीं । पडिला भूमी परी नयेची करुणा
। दांत पाडियेले दोन्ही ॥ ३ ॥ श्रियाळ बापुडें सात्विकवाणी । खादले कापूनि
त्याचे पोर । ऐसा कठिण कोण होईल दुसरा । उखळीं कांडविलें शिर ॥ ४ ॥ शिबी
चक्रवर्ती करितां यज्ञयाग । त्याचें चिरलें अंग ठायीं ठायीं । जाचऊनि प्राण
घेतला मागें । पुढें न पाहतां कांहीं ॥ ५ ॥ बळीचा अन्याय सांग होता काय ।
बुडविला तो पाय देऊनि माथां । कोंडिले दार हा काय कहार । सांगतोसी चित्र
कथा ॥ ६ ॥ हरिश्चंद्राचे राज्य घेऊनियां सर्व । विकविला जीव डोंबाघरीं ।
पाडिला विघड नळदमयंतीमधीं । ऐसी तुझी बुद्धि बुरि ॥ ७ ॥ आणिकही गुण सांगावे
किती । केलिया विपत्ति माउसीच्या । वधियेला मामा सखा पुरुषोत्तमा । म्हणे
बंधु तुकयाचा ॥ ८ ॥
४१२८. तुम्हां आम्हांसी दरुषण । जालें दुर्लभ
भाषण ॥ १ ॥ म्हणऊनि करितों आतां । दंडवत घ्या समस्तां ॥ २ ॥ भविष्याचें
माथां देह । कोण जाणे होईल काय ॥ ३ ॥ म्हणे तुकयाचा बांधव । आमचा तो झाला
भाव ॥ ४ ॥
४१२९. अनंतजन्में जरी केल्या तपराशी । तरी हा न पावसी
म्हणे देह ॥ १ ॥ ऐसें जें निधान लागलेंसे हातीं । त्याची केली माती
भाग्यहीना ॥ २ ॥ उत्तमाचें सार वेदाचें भांडार । ज्याच्यानें पवित्र
तीर्थें होतीं ॥ ३ ॥ म्हणे तुकयाबंधु आणिक उपमा । नाहीं या तों जन्मा
द्यावयासी ॥ ४ ॥
४१३०. न गमे न गमे न गमे हरीविण । न गमे न गमे न
गमे मेळवा शाम कोणी गे ॥ १ ॥ तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा । दिसती दिशा
ओसा वो ॥ २ ॥ नाठवे भूक तान विकळ जाले मन । घडिजाय प्राण जुगा एकी वो ॥ ३ ॥
जरी तुम्ही नोळखा सांगतों ऐका । तुकयाबंधूचा सखा जगजीवन ॥ ४ ॥
४१३१.
विठ्ठला रे तुझे वर्णिता गुणवाद । विठ्ठला रे दग्ध झाली पापें ॥ १ ॥
विठ्ठला रे तुझें पाहातां श्रीमुख । विठ्ठला रे सुख झालें नयना ॥ २ ॥
विठ्ठला रे तुज देतां आलिंगन । विठ्ठला तनमन निवल्या बाह्या ॥ ३ ॥ विठ्ठला
रे तुझी ऐकतां कीर्ति । विठ्ठला हे विश्रांती पावले स्मरणें ॥ ४ ॥ विठ्ठला
रे तुकयाबंधु म्हणे देहभाव । विठ्ठला जीवीं पाव धरितां गेला ॥ ५ ॥
४१३२.
आकारवंत मूर्ति । जेव्हां देखेन मी दृष्टीं ॥ १ ॥ मग मी राहेन निवांत ।
ठेवूनियां तेथें चित्त ॥ २ ॥ श्रुति वाखाणिती । तैसा येसील प्रचिती ॥ ३ ॥
म्हणे तुकयाचा सेवक । उभा देखेन सन्मुख ॥ ४ ॥
४१३३. बरवा बरवा बरवा
रे देवा तूं । जीवाहूनि आवडसी जीवा रे देवा तूं ॥ धृ. ॥ पाहतां वदन संतुष्ट
लोचन । झाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ २ ॥ अष्ट अंगें तनु त्रिविध ताप
गेला सीण । वर्णितां लक्षण रे देवा ॥ ३ ॥ मन जालें उन्मन अनुपम ग्रहण ।
तुकयाबंधु म्हणे महिमा नेणें रे ॥ ४ ॥
४१३४. पहा हो कलीचें महिमान ।
असत्यासी रिझलें जन । पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचें ॥ १ ॥ ऐसें
अधर्माचें बळ । लोक झकविलें सकळ । केलें धर्माचें निर्मुळ । प्रलयकाळ
आरंभला ॥ २ ॥ थोर या युगाचें आश्चर्य । ब्रह्मकर्म उत्तम सार । सांडुनियां
द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥ ३ ॥ ऐसें अनार्थाचें अनर्थ । झाला बुडाला
परमार्थ । नाहीं झाली ऐसी नीत । आहा भूत पातलें ॥ ४ ॥ शांती क्षमा दया ।
भावभक्ति सत्क्रिया । ठाव नाहीं सांगावया । सत्त्व धैर्य भंगिलें ॥ ५ ॥
राहिलें वर्णाश्रमधर्म । अन्योन्य विचरती कर्म । म्हणवितां रामराम । श्रम
महा मानिती ॥ ६ ॥ येर भोरपाचेविशी । धांवती भूतें आमिषा तैसीं । कथा पुराण
म्हणतां सिसी । तिडिक उठी नकऱ्याचे ॥ ७ ॥ विषयलोभासाठीं । सर्वार्थेसीं
प्राण साठी । परमार्थी पीठ मुठी । मागता उठीं खुनीसी ॥ ८ ॥ धनाढ्य देखोनि
अनामिक । तयातें मानिती आवश्यक । अपमानिलें वेदपाठक । सात्त्विक शास्त्रज्ञ
संपन्न ॥ ९ ॥ पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी । सुनांचिया
दासी । सासा झाल्या आंदण्या ॥ १० ॥ खोटें झालें आली विवसी । केली मर्यादा
नाहींसी । भार्या भ्रतारासी । रंक तैसीं मानिती ॥ ११ ॥ नमस्कारावया
हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा । पोटासाठीं खौसा । वंदिती
मलिंच्छाच्या ॥ १२ ॥ बहुत पाप जालें उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ । अभक्ष
भक्षिती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥ १३ ॥ कैसें झालें नष्ट वर्तमान ।
एकादशीस खाती अन्न । विडे घेऊनि ब्राह्मण । अविंदवाणी वदताती ॥ १४ ॥ कामिनी
विटंबिल्या कुळवंती । वदनें दासींची चुंबिती । सोवळ्याच्या स्फीती । जगीं
मिरविती पवित्रता ॥ १५ ॥ मद्यपानाची सुराणी । नवनिता न पुसें कोणी । केळवती
व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥ १६ ॥ केवढी दोषाची सबळता । झाली पहा
हो भगवंता । पुण्य धुडावोनि संता । तीर्था हारी आणिली ॥ १७ ॥ भेणें मंद
झाली मेघवृष्टी । आकांतली कांपे सृष्टी । देव रिगाले कपाटीं । आटाआटी
प्रवर्तली ॥ १८ ॥ अपीक धान्ये दिवसें दिवसें । गाई म्हैसी चेवल्या गोरसें ।
नगरें दिसती उध्वंसें । पिकली बहुवसें पाखांडें ॥ १९ ॥ होम हरपलीं हवनें ।
यज्ञयाग अनुष्ठानें । जपतपादि साधनें । आचरणें भ्रष्टलीं ॥ २० ॥ अठरा
यातींचा व्यापार । करिती तस्कराई विप्र । सांडोनिया शुद्ध शुभ्र । वस्त्रे
निळीं पांघरती ॥ २१ ॥ गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं ।
अश्वाचिये परी । कुमारी विकिती वेदवक्ते ॥ २२ ॥ वेदाध्ययनसंहितारुचि ।
भकांद्या करिती तयांची । आवड पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥ २३ ॥ मुख्य
सर्वोत्तम साधनें । ती उच्छेदुनि केलीं दीनें । कुडी कापट्यें महा मौन्यें ।
मिरविताती दुर्जनें ॥ २४ ॥ कळा कुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदेठायीं ।
विधिनिषेधाच्या वाही । एकहि ऐसीं नाडली ॥ २५ ॥ संन्यासी तापसी ब्रह्मचारी ।
होता दिगांबर निस्पृही वैराग्यकारी । कामक्रोधें व्यापिले भारी । इच्छेकरी
न सुटती ॥ २६ ॥ कैसें विनाशकाळाचें कौतुक । राजे झाले प्रजांचे अंतक ।
पिते पुत्र सहोदर एकाएक । शत्रुघातें वर्तती ॥ २७ ॥ केवढी ये रांडेची अंगवण
। भ्रमविले अवघें जन । याती अठरा चाऱ्ही वर्ण । कर्दम करूनि विटाळिले ॥ २८
॥ पूर्वी होतें भविष्य केलें । संतीं तें यथार्थ झालें । ऐकत होतों तें
देखिलें । प्रत्यक्ष लोचनी ॥ २९ ॥ आतां असो हें आघवें । मति नव्हे
कळीमध्यें वावरावें । देवासी भाकोनि करुणारवें । वेगें स्मरावें अंतरीं ॥
३० ॥ अगा ये वैकुंठनायका । काय पाहतोसि या कौतुकां । धांव कलीनें गांजिलें
लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥ ३१ ॥ (धृ. नाही)
No comments:
Post a Comment