विरोधांती तुकोबांचे भक्त झालेले श्री रामेश्वर भट्ट व तुकोबांचे परमभक्त श्री निळोबाराय यांचे अभंग.
श्री रामेश्वर भट्ट यांचे अभंग (अभंग संख्या ७)
४१३५.
तुकाराम तुकाराम । नाम घेतां कांपे यम ॥ १ ॥ धन्य तुकोबा समर्थ । जेणें
केला हा पुरुषार्थ ॥ २ ॥ जळीं दगडासहित वह्या । तारियल्या जैशा लाह्या ॥ ३ ॥
म्हणे रामेश्वरभट्ट द्विजा । तुका विष्णु नाहीं दुजा ॥ ४ ॥
४१३६.
पंडित वैदिक अथवा दशग्रंथीं । परि सरी न पवती तुकयाची ॥ धृ. ॥ शास्त्रेंहि
पुराणें गीता नित्य नेम । वाचिताती वर्म न कळे त्यांसी ॥ २ ॥ कर्मअभिमानें
वर्णअभिमानें । नाडले ब्राह्मण कलियुगीं ॥ ३ ॥ तैसा नव्हे तुका वाणी
व्यवसाई । भाव त्याचा पायीं विठोबाचें ॥ ४ ॥ अमृताची वाणी वरूषला शुद्ध ।
करी त्या अशुद्ध ऐसा कोण ॥ ५ ॥ चहूं वेदांचें हें केलें विवरण । अर्थही गहन
करूनियां ॥ ६ ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ वेगळे । करूनि निराळे ठेविले ते ॥ ७ ॥
भक्तिज्ञानें आणि वैराग्यें आगळा । ऐसा नाहीं डोळां देखियेला ॥ ८ ॥ जपतप
यज्ञ लाजविलीं दानें । हरिनाम कीर्तन करूनियां ॥ ९ ॥ मागें कवीश्वर झाले
थोर थोर । नेलें कलेवर कोणें सांगा ॥ १० ॥ म्हणे रामेश्वर सकळां पुसोनि ।
गेला तो विमानीं बैसोनिया ॥ ११ ॥
४१३७. माझी मज आली रोकडी प्रचीत ।
होऊनि फजित दुःख पावे ॥ धृ. ॥ कांहीं द्वेष त्याचा करितां अंतरीं । व्यथा
या शरीरीं बहुत झाली ॥ २ ॥ ज्ञानेश्वरें मज केला उपकार । स्वप्नीं सविस्तर
सांगितलें ॥ ३ ॥ तुका सर्वां श्रेष्ठ प्रिय आम्हां थोर । कां जो अवतार
नामयाचा ॥ ४ ॥ त्याची तुज कांहीं घडली रे निंदा । म्हणुनि हे बाधा जडली तुज
॥ ५ ॥ आतां एक करीं सांगेन तें तुला । शरण जाई त्याला निश्चयेंसी ॥ ६ ॥
दर्शनेंचि तुझ्या दोषा परिहार । होय तो विचार सांगितला ॥ ७ ॥ तोचि हा
विश्वास धरोनि मानसीं । जाय कीर्तनासी नित्यकाळ ॥ ८ ॥ म्हणे रामेश्वर
त्याच्या समागमें । झालें हें आराम देह माझें ॥ ९ ॥
४१३८.
वैष्णवांची याती वाणी जो आपण । भोगी तो पतन कुंभपाकीं ॥ १ ॥ ऐशी वेदश्रुति
बोलती पुराणें । नाहीं तीं दूषणें हरिभक्तां ॥ २ ॥ उंच नीच वर्ण न म्हणावा
कोणीं । जे कां नारायणीं प्रिय झालें ॥ ३ ॥ चहूं वर्णांसीही असे अधिकार ।
करितां नमस्कार दोष नाहीं ॥ ४ ॥ जैसा शालिग्राम न म्हणावा पाषाण । होय
पूज्यमान सर्वत्रांसी ॥ ५ ॥ गुरु परब्रह्म देवाचाहि देव । त्यासी तो मानव
म्हणू नये ॥ ६ ॥ म्हणे रामेश्वर नामीं जे रंगले । स्वयें तेचि झाले देवरूप ॥
७ ॥
४१३९. आरती तुकारामा । स्वामी सद्गुरु धामा । सच्चिदानंद
मूर्ति । पाय दाखवी आम्हां ॥ धृ. ॥ आरती. ॥ राघवें सागरांत । जड पाषाण
तारिलें । तैसे या तुकोबानें । अभंग रक्षियेले ॥ २ ॥ आरती. ॥ तुकितां
तुळणेसी । ब्रह्म तुकासी आलें । म्हणोनि रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ॥
३ ॥ आरती. ॥
४१४०. तूंचि आत्माराम नव्हे जी देहधारी । स्तुति जरी
होय झडो माझी वैखरी । पातकी मूढजन पडतील अघोरीं । यालागीं अवतार केला
महीवरी ॥ १ ॥ जय जय भक्तराया धर्ममूर्ति तुकया । आरती ओंवाळीं भावें तुझिया
पायां ॥ २ ॥ तुझे ठायीं असे भ्रम कोणा न कळे नेम । जन हें काय जाणे
अनुभवितों राम । टाकोनि अभिमान जीवीं धरिलें प्रेम । बोलोनि महिमा तुझा जना
दिला विश्राम ॥ ३ ॥ अदभुत महिमा तुझा काय वर्णूं दातारा । उदकेंविण अन्न
दिवस क्रमिलें तेरा । आतां हे ऐसी प्राप्ति काय घडेल येरा । उदकीं कागद दिन
रक्षिले आठरा ॥ ४ ॥ ऐकतां तुझें वचन मन होय उन्मन । सच्चिदानंद गाभा
तुजसाठीं पूर्ण । नित्य हें असो माझें तुझें ठायीं अनुसंधान । करूनि
कृपादान देई इतुकें दान ॥ ५ ॥ शास्त्र आणि वेदांत शिष्टाचार समस्त । आणिला
एक वाक्या जन लोक कृतार्थ । विशेष रामेश्वरा प्रेम दिलें बहुत । विनवितों
तुज आतां ठेवीं मस्तकीं हात ॥ ६ ॥
४१४१. भक्त भागवत जीवन्मुक्त संत ।
महिमा अत्यद्भुत चराचरीं ॥ धृ. ॥ ऐसिया अनंता माजी तूं अनंत । लीलावेश होत
जगत्राता ॥ २ ॥ ब्रह्मानंद तुकें तुळे आला तुका । तो हा विश्वसखा क्रीडे
जनीं ॥ ३ ॥ शास्त्रशिष्टाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली ॥ ४
॥ देऊनि तिळांजुळी काम्यनिषिद्धासी । विधिविनियोगेशीं ब्रम्हार्पण ॥ ५ ॥
संतग्रहमेळीं जगदांध्या गिळी । पैल उदयाचळीं भानु तुका ॥ ६ ॥ संतवृंदें
तीर्थें गौतमी हरिकथा । तुकया नरसिंहस्ता भेटों आली ॥ ७ ॥ शांतिपतिव्रतें
झालें परिणयन । कामसंतर्पण निष्कामता ॥ ८ ॥ क्षमा क्षमेपणें प्रसिद्ध प्रथा
जगीं । तें तो तुझ्या अंगीं मूर्तिमंत ॥ ९ ॥ दया दीनानाथा तुंवा जीवविली ।
विश्वीं विस्तारली कीर्ति तुझी ॥ १० ॥ वेदवाक्य बाहो उभारिला ध्वज ।
पूजिले देवद्विज सर्वभावें ॥ ११ ॥ अधर्मक्षयव्याधि धर्माशी स्पर्शला । तो
त्वां उपचारिला अनन्य भक्ति ॥ १२ ॥ ब्रह्म ऐक्य भावें भक्ति विस्तारिली ।
वाक्यें सफल केलीं वेदविहितें ॥ १३ ॥ देहबुद्धि जात्या अभिमानें वंचलों ।
तो मी उपेक्षिलों न पाहिजे ॥ १४ ॥ न घडो याचे पायीं बुद्धीचा व्यभिचार ।
मागे रामेश्वर रामचंद्रा ॥ १५ ॥
निळोबारायकृत तुकाराम महाराजांची आरती व त्यांचे इतर अभंग (अभंग संख्या ७)
४१४२.
प्रपंचरचना सर्वहि भोगुनि त्यागिली । अनुतापाचें ज्वाळीं देहबुद्धि हविली ।
वैराग्याची निष्ठा प्रगटूनि दाखविली । अहंता ममता दवडूनि निजशांति वरिलीं ॥
१ ॥ जयजयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा । तारक तूं सकळांचा जीवलग सोयरा ॥
धृ. ॥ हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला । विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला ।
जगदोद्धारालागीं उपाय सुचविला । निंदक दुर्जनांचा संदेह निरसला ॥ २ ॥ तेरा
दिवस वह्या रक्षुनियां उदकीं । कोरड्याचि काढूनि दाखविल्या शेखीं । अपार
कविता शक्ति मिरवूनि विधी अंकीं । कीर्तन श्रवणें तुमच्या तरिजे जन लोकीं ॥
३ ॥ बाळवेष घेऊनि श्रीहरि भेटला । विधीचा जनिता तूंचि आठव हा दिधला ।
तेणें ब्रह्मानंदें प्रेमा रुढविला । न तुके म्हणोनि तुका नामें गौरविला ॥ ४
॥ प्रयाणकाळीं देवें विमान पाठविलें । कलीच्या काळामाजीं अद्भुत वर्तलें ।
मानव देह घेऊनि निजधामा गेलें । निळा म्हणे सकळ संतां तोषविलें ॥ ५ ॥
४१४३.
शरण शरण एकनाथा । पायीं माथा ठेविला ॥ १ ॥ नका पाहूं गुणदोष । झालों दास
पायांचा ॥ २ ॥ उपेक्षितां मज । तरी लाज कवणासी ॥ ३ ॥ तुका म्हणे भागवत ।
केलें श्रुत सकळां ॥ ४ ॥
४१४४. चारितां गोधनें । माझें गुंतलें वचन
॥ १ ॥ आम्हां झालें येणें । एका तेलियाकारणें ॥ २ ॥ तीन मुष्टी मृत्तिका
देख । तेव्हां लोपविलें मुख ॥ ३ ॥ आम्हीं आलों मृत्युलोकीं । रामनामाचे
धारकी ॥ ४ ॥ आलों म्हणे तुका । संतु न्यावया विष्णुलोकां ॥ ५ ॥
४१४५.
आजिचा दिवस धन्य मज झाला । श्रीगुरु भेटला पत्रास्तव ॥ १ ॥ मजमाजीं प्राणी
स्नान जे करिती । त्यांचे दोष लागती माझे माथा ॥ २ ॥ माझिये मनींचा मळ
काढी कोण । सद्गुरुवांचूनि तुजविण ॥ ३ ॥ ऐसा रंगामूर्ति सांगावा निरोपा ।
नमस्कार बापा तुकोबासी ॥ ४ ॥
४१४६. ऐसें केव्हां करिसी देवा । गीता
यावी अनुभवा ॥ १ ॥ सकळ वैभव सांडावें । गीता भागवत पाहावे ॥ २ ॥ मागुनिया
मधुकरी । नित्य वाचावी ज्ञानेश्वरी ॥ ३ ॥ तुकया दासाचें जीवन । गीता भागवत
धन ॥ ४ ॥
४१४७. नाम वाचे श्रवणीं कीर्ति । पाउलें चित्तीं समान ॥ १ ॥
काळ सार्थक केला त्यांनीं । धरिला मनीं विठ्ठल ॥ २ ॥ कीर्तनाचा समारंभ ।
निर्दंभ सर्वदा ॥ ३ ॥ निळा म्हणे स्वरूपसिद्धी । नित्य समाधि हरिनामीं ॥ ४ ॥
४१४८.
संदेह गमला । रेडा कैसा बोलविला ॥ १ ॥ सांगा देव कां न होती । निर्जीव
चालविली भिंती ॥ २ ॥ कोरडे कागद । उदकीं लागों नेदी बुंद ॥ ३ ॥ निळा म्हणे
बरा । द्यावा संतापायीं थारा ॥ ४ ॥
।। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद् गुरु तुकाराम महाराज की जय ।।
No comments:
Post a Comment