श्री तुकोबाराय यांनी साधना काळात विविध तापांमुळे कष्टी होऊन देवाची करुणा भाकली, त्याविषयीचे अभंग.
करुणापर अभंग (अभंग संख्या २८३)
१५००. संसाराच्या तापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥ १ ॥ म्हणऊनि तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ २ ॥ बहुतां जन्मींचा जालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ॥ ३ ॥ वेढियलों चोरीं अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करी कोणी माझी ॥ ४ ॥ बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दीस झालों कासाविस ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीनानाथ ॥ ६ ॥
१५०१. सर्प भुलोन गुंतला नादा ।
गारुडियें फांदा घातलासे । हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी
असे रया ॥ १ ॥ तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडवी आतां ।
माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा हे तुज न करितां ॥ २ ॥ आविसें मीन
लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणूनियां । काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे ।
तेथें बाप माये कवण रया ॥ ३ ॥ पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा
गुंते बळें । मरण सायासें नेणें धांवोनि वोरसे । जीवित्वा नास जालीं बाळें ॥
४ ॥ गोडपणें मासी लिगाडीं गुंतली । सांपडे फडफडी अधिकाधिक । तुका म्हणे
प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धांव घाली ॥ ५ ॥
१५०२. सुटायाचा
कांहीं करितों उपाय । तों हें देखे पाय गोवियेले ॥ १ ॥ ऐसिया दुःखाचे
सांपडलों संदी । हारपली बुद्धि बळ माझें ॥ २ ॥ प्रारब्ध क्रियमाण संचिताचे ।
वोढत ठायींचे आले साचे ॥ ३ ॥ विधिनिषेधाचे सांपडलों चेपे । एकएका लोपे
निवडेना ॥ ४ ॥ सारावें तें वाढे त्याचियाची अंगें । तृष्णेचिया संगें दुःखी
जालों ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां करीं सोडवण । सर्वशक्तिहीन जालों देवा ॥ ६ ॥
१५०३.
भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥ १ ॥ ऐसा पडिलों काचणी । करीं धांवा
म्हणऊनि ॥ २ ॥ विचारितां कांहीं । तों हें मन हातीं नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे
देवा । येथें न पुरे रिघावा ॥ ४ ॥
१५०४. अंतरींचा भाव जाणोनियां
गुज । तैसें केलें काज पांडुरंगा ॥ १ ॥ घातलें वचन न पडेचि खालीं । तूं
आम्हां माउली अनाथांची ॥ २ ॥ मज याचकाची पुरविली आशा । पंढरीनिवासा मायबापा
॥ ३ ॥ नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती कांहीं ॥ ४ ॥ तुका
म्हणे आतां केलों मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥ ५ ॥
१५०५.
बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥ धृ. ॥ मिठेंविण काय
करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिलें ॥ २ ॥ संपादणीविण विटंबिलें
सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥ ३ ॥ कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें
हे फिकें द्रव्य तरी ॥ ४ ॥ तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखें अंतरीं
प्रेमभाव ॥ ५ ॥
१५०६. श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोवे ॥ १ ॥
तैसी जाली मज परी । वसें निकट सेजारीं ॥ २ ॥ जेवितां जवळी । येऊनियां पुस
घोळी ॥ ३ ॥ कोपेल तो धनी । तुका म्हणे नेणें मनी ॥ ४ ॥
१५०७. मुखें
बोलावें तें जीविंचे जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे ॥ १ ॥ आतां हेंचि
भलें भाकावी करुणा । विनियोग तो जाणां तुम्ही याचा ॥ २ ॥ आपलें तो येथें
केलें नव्हे कांहीं । साधनाच्या वाहीं पडो नयें ॥ ३ ॥ तुका म्हणे देह दिला
पिंडदान । वेळोवेळां कोण चिंता करी ॥ ४ ॥
१५०८. कवतुकवाणें । बोलों
बोबड्या वचनें ॥ १ ॥ हें तो नसावें अंतरीं । आम्हां धरायाचें दुरी ॥ २ ॥
स्तुति तैसी निंदा । माना समची गोविंदा ॥ ३ ॥ तुका म्हणे बोले । मज तुम्हीं
शिकविलें ॥ ४ ॥
१५०९. जन पूजी याचा मज कां आभार । हा तुम्ही विचार
जाणां देवा ॥ १ ॥ पत्र कोण मानी वंदितील सिक्का । गौरव सेवका त्याचि मुळें ॥
२ ॥ मी मीपणें होतों जनामधीं आधीं । कोणें दिलें कधीं काय तेव्हां ॥ ३ ॥
आतां तूं भोगितां सर्व नारायणा । नको आम्हां दीना पीडा करूं ॥ ४ ॥ आपुलिया
हातें देसील मुशारा । तुका म्हणे खरा तोचि आम्हां ॥ ५ ॥
१५१०.
पाळिलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥ १ ॥ आतां काय
माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ २ ॥ नेदी वारा अंगीं लागों
आघाताचा । घेतला ठायींचा भार माथां ॥ ३ ॥ तुका म्हणे बोल करितों आवडी ।
अविट तेचि गोडी अंतरींची ॥ ४ ॥
१५११. मजपुढें नाहीं आणीक बोलतां ।
ऐसे कांहीं चित्ता वाटतसे ॥ १ ॥ याचा कांहीं तुम्हीं देखावा परिहार ।
सर्वज्ञ उदार पांडुरंगा ॥ २ ॥ कामक्रोधें नाहीं सांडिलें आसन । राहिले वसोन
देहामध्यें ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां जालों उतराई । कळों यावें पायीं
निरोपिलें ॥ ४ ॥
१५१२. काळावरी घालूं तरि तो सरिसा । न पुरतां इच्छा
दास कैसे ॥ १ ॥ आतां नाहीं कांहीं उसिराचें काम । न खंडावें प्रेम नारायणा
॥ २ ॥ देणें लागे मग विलंब कां आड । गोड तरि गोड आदि अंत ॥ ३ ॥ तुका म्हणे
होईल दर्शनें निश्चिंती । गाईन तें गीतीं ध्यान मग ॥ ४ ॥
१५१३. काय
माझा पण होईल लटिका । ब्रिदावळी लोकां दाविली ते ॥ १ ॥ खरी करूनियां देई
माझी आळी । येऊनि कुरवाळी पांडुरंगे ॥ २ ॥ आणीक म्यां कोणा म्हणवावें हातीं
। नये काकुलती दुजियासी ॥ ३ ॥ तुका म्हणे मज येथेंचि ओळखी । होईन तो सुखी
पायांनींच ॥ ४ ॥
१५१४. नको माझे मानूं आहाच ते शब्द । कळवळ्याचा वाद
करीतसें ॥ १ ॥ कासयानें बळ करू पायांपासीं । भाकावी ते दासी करुणा आम्हीं ॥
२ ॥ काय मज चाड असे या लौकिकें । परी असे निकें अनुभवाचें ॥ ३ ॥
लांचावल्यासाठीं वचनाची आळी । टकळ्यानें घोळी जवळी मन ॥ ४ ॥ वाटतसे आस
पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें लावियेलें ॥ ५ ॥ तुका म्हणे माझी येथेंचि
आवडी । श्रीमुखाची जोडी इच्छीतसें ॥ ६ ॥
१५१५. तातडीने आम्हां धीरचि
न कळे । पाळावे हे लळे लवलाहे ॥ १ ॥ नका कांहीं पाहों सावकाशीं देवा । करा
एक हेवा तुमचा माझा ॥ २ ॥ वोरसाचा यावा सांभाळावी प्रीत । नाहीं राहो येत
अंगीं धंदा ॥ ३ ॥ तुका म्हणे मज नका गोवूं खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥ ४
॥
१५१६. इच्छिती तयांसी व्हावें जी अरूप । आम्हांसी स्वरूप स्थिती
चाड ॥ १ ॥ आतां नव्हे माझा भाव अनारिसा । पाउलांनीं इच्छा गोवियेली ॥ २ ॥
लेंकरासी कोठें जाणत्याची परी । करूं येते दुरी धरावया ॥ ३ ॥ लागली न सुटे
नामाची आवडी । माझी भावजोडी भंगूं नका ॥ ४ ॥ घेसी आढेवेढे मुक्तीच्या
अभिळासें । चाळवीं जा पिसे ब्रह्मज्ञानी ॥ ५ ॥ तुका म्हणे माझा कोठें
भक्तिरस । पाडावया ओस चाळविसी ॥ ६ ॥
१५१७. झालिया दर्शन करीन मी
सेवा । आणिक कांहीं देवा नलगें दुजें ॥ १ ॥ प्रारब्धा आधीन अन्न आच्छादन ।
स्थिर करोनि मन ठेवी पायीं ॥ २ ॥ येगा येगा येगा कृपाळुवा हरी । निववीं
अभ्यंतरी देऊनि भेटी ॥ धृ. ॥ आसावलें मन जीवनाचे ओढी । नामीं रूपीं गोडी
लावियेली ॥ ४ ॥ काय तुम्हांपाशीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसें
॥ ५ ॥ काय लोखंडाचे पाहे गुणदोष । शिवोनि परिस सोनें करी ॥ ६ ॥ तुका म्हणे
माझे अवघें असों द्यावें । आपुलें करावें ब्रीद साच ॥ ७ ॥
१५१८.
तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर ॥ १ ॥ हेंचि आतां लागे
करावें जतन । तुझें थोरपण तुज देवा ॥ २ ॥ होउनी निर्भर राहिलों निश्चिंत ।
पावनपतित नाम तुझें ॥ ३ ॥ करितां तुज होय डोंगराची राई । न लगतां कांहीं
पात्या पातें ॥ ४ ॥ तुका म्हणे तुज काय तें अशक्य । तारितां मशक मज दीना ॥ ५
॥
१५१९. भलते जन्मीं मज घालिसील तरी । न सोडीं मी हरी नाम तुझें ॥ १
॥ सुख दुःख तुज देईन भोगितां । मग मज चिंता कासयाची ॥ २ ॥ तुझा दास
म्हणवीन मी अंकिला । भोगितां विठ्ठला गर्भवास ॥ ३ ॥ कासया मी तुज भाकितों
करुणा । तारी नारायणा म्हणऊनि ॥ ४ ॥ तुका म्हणे तुज येऊं पाहे उणें ।
तारिसील तेणें आम्हां तया ॥ ५ ॥
१५२०. आणीक पाखांडें असती उदंडें ।
तळमळिती पिंडें आपुलिया ॥ १ ॥ त्याचिया बोलाचा नाहीं हा विश्वास । घातलीसे
कास तुझ्या नामीं ॥ २ ॥ दृढ एक चित्तें झालों या जीवासी । लाज सर्वविशीं
तुम्हांसी ते ॥ ३ ॥ पीडों नेदी पशु आपुले अंकित । आहे जें उचित तैसें करा ॥
४ ॥ तुका म्हणे किती भाकावी करुणा । कोप नारायणा येईल तुम्हां ॥ ५ ॥
१५२१.
जेथें जातों तेथें पडतों मतोळा । न देखिजे डोळां लाभ कांहीं ॥ १ ॥
कपाळींची रेखा असती उत्तम । तरि कां हा श्रम पावतों मी ॥ २ ॥ नव्हेचि
तुम्हांस माझा अंगिकार । थीता संवसार अंतरला ॥ ३ ॥ भोग तंव झाला खरा भोगावा
तो । भांडवल नेतो आयुष्य काळ ॥ ४ ॥ कोठें तुझी कीर्ति आइकिली देवा ।
मुकतों कां जीवा तुका म्हणे ॥ ५ ॥
१५२२. न घडे मायबापा बाळकाचा घात ।
आपणांदेखत होऊं नेदी ॥ १ ॥ कां मी मनीं चिंता वाहूं भय धाक । काय नव्हे एक
करितां तुज ॥ २ ॥ वर्म जाणें त्याच्या हिताचे उपाय । तहान भूक वाहे कडिये
खांदीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं गा कृपावंत भारी । ऐसें मज हरि कळों आलें ॥ ४ ॥
१५२३.
नलगे मायेसी बाळ निरवावें । आपल्या स्वभावें ओढे त्यासी ॥ १ ॥ मज कां
लागला करणें विचार । ज्याचा जार भार त्याचे माथां ॥ २ ॥ गोड धोड त्यासी
ठेवी न मागतां । समाधान खातां नेदी मना ॥ ३ ॥ खेळतां गुंतलें उमगूनी आणी ।
बैसोनिया स्तनीं लावी बळें ॥ ४ ॥ त्याच्या दुःखें पडे आपण खापरीं । लाही
तळी वरी होय जैसी ॥ ५ ॥ तुका म्हणे देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागों
नेदी ॥ ६ ॥
१५२४. आम्हासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥ १ ॥
मोहें धावें घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ २ ॥ कोठें न दिसे पाहतां
। उडी घाली अवचिता ॥ ३ ॥ सुख ठेवी आम्हासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥ ४ ॥
आम्हां घाली पाठीकडे । आपण कळिकाळाशीं भिडे ॥ ५ ॥ तुका म्हणे कृपानिधी ।
आम्हां उतरीं नावेमधीं ॥ ६ ॥
१५२५. देह तंव आहे प्रारब्धा अधीन ।
याचा मी कां सीण वाहूं भार ॥ १ ॥ सरो माझा काळ तुझिया चिंतनें । काया वाचा
मनें इच्छीतसें ॥ २ ॥ लाभ तो न दिसे याहूनि दुसरा । आणीक दातारा येणें
जन्में ॥ ३ ॥ तुका म्हणे आलों सोसीत संकटें । मी माझें वोखटें आहे देवा ॥ ४
॥
१५२६. तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवभाव वाचाकायामन ॥ १ ॥
भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ २ ॥ नेणतां सोसिली
तयाची आटणी । नव्हतांही कोणी कांहीं माझी ॥ ३ ॥ वर्म नेणें दिशा हिंडती
मोकाट । इंद्रियें सुनाट दाही दिशा ॥ ४ ॥ येरझारी फेरा सिणलों सायासीं ।
आतां हृषीकेशी अंगीकारीं ॥ ५ ॥ तुका म्हणे मन इंद्रियांचे सोई । धांवे यासी
काई करूं आतां ॥ ६ ॥
१५२७. नेणें गति काय कवण अधोगति । मानिली
निश्चिंती तुझ्या पायीं ॥ १ ॥ कर्म धर्म कोण नेणें हा उपाव । तुझ्या पायीं
भाव ठेवियेला ॥ २ ॥ नेणें निरसूं पापपुण्य नेणें काय । म्हणऊनि पाय धरिले
तुझे ॥ ३ ॥ वेडा मी अविचारी न कळे विचार । तुज माझा भार पांडुरंगा ॥ ४ ॥
तुका म्हणे तुज करितां नव्हे काय । माझा तो उपाय कवण तेथें ॥ ५ ॥
१५२८.
भक्तिसुख आलें नाहीं अनुभवा । तों मी ज्ञान देवा काय करूं ॥ १ ॥ नसावें जी
तुम्हीं कांहीं निश्चिंतीनें । माझिया वचनें अभेदाच्या ॥ २ ॥ एकाएकी मन
नेदी समाधान । देखिल्या चरण वांचूनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे वाचा गुणीं
लांचावली । न राहे उगली मौन्य मज ॥ ४ ॥
१५२९. न कळे तो काय करावा
उपाव । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥ १ ॥ येऊनियां वास करिसी हृदयीं ।
ऐसें घडे कई कासयानें ॥ २ ॥ साच भावें तुझें चिंतन मानसीं । राहे हें करिसी
कैं गा देवा ॥ ३ ॥ लटिकें हें माझें करूनियां दुरी । साच तूं अंतरीं येऊनि
राहें ॥ ४ ॥ तुका म्हणे मज राखावें पतिता । आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥ ५ ॥
१५३०.
नाहीं जप तप जीवासी आटणी । मनासी दाटणी नाहीं केली ॥ १ ॥ निजलिया ठायीं
फोकारिला धांवा । सांकडें तें देवा तुज माझें ॥ २ ॥ नाहीं आणूनियां
समर्पिलें जळ । सेवा ते केवळ चिंतनाची ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हीं वेंचिलीं
उत्तरें । घेतलीं उदारें मायबापें ॥ ४ ॥
१५३१. पुढलियां सुखें निंब
देता भले । बहुत वारलें होय दुःख ॥ १ ॥ हें तों वर्म असे माऊलीच्या हातीं ।
हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ २ ॥ खेळतां विसरे भूक तहान घर । धरूनियां कर
आणी बळें ॥ ३ ॥ तुका म्हणे पाळी तोंडीचिया घांसे । उदार सर्वस्वें सर्वकाळ
॥ ४ ॥
१५३२. मार्ग चुकले विदेशी एकले । तयावरी झाले दिशाभुली ॥ १ ॥
हातीं धरूनियां पावविले घरा । त्याच्या उपकारा काय द्यावें ॥ २ ॥ तैसा मी
कुडकुडा होतों केशीराजा । सेवा न घडे लाजा म्हणऊनि ॥ धृ. ॥ सांडियेला गर्भ
उबगोनि माऊली । नाहीं सांभाळिली भूमि शुद्ध ॥ ४ ॥ उष्ण तहान भूक एवढे
आकांतीं । वोसंगा लाविती काय म्हूण ॥ ५ ॥ खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे ।
अन्यायहि मोठे साच केले ॥ ६ ॥ हातींचा हिरोनि घातला पाठीसी । तुका म्हणे
ऐसी परि जाली ॥ ७ ॥
१५३३. ऐसें भाग्य कईं लाहता होईन । अवघें देखें
जन ब्रह्मरूप ॥ १ ॥ मग तया सुखा अंत नाहीं पार । आनंदें सागर हेलावती ॥ २ ॥
शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगीं । परावृत्त संगी कामादिकां ॥ ३ ॥
विवेकासहित वैराग्याचें बळ । धगधगित ज्वाळ अग्नि जैसा ॥ ४ ॥ भक्ति नवविधा
भाव शुद्ध वरी । अळंकारावरी मुगुटमणी ॥ ५ ॥ तुका म्हणे माझी पुरवी वासना ।
कोण नारायणा तुजविण ॥ ६ ॥
१५३४. आळिकरा कोठें साहातें कठीण । आपुला
तें प्राण देऊं पाहे ॥ १ ॥ सांभाळावें मायबापें कृपादृष्टी । पीडितां तें
दृष्टी देखों नये ॥ २ ॥ अंतरलों मागें संवसारा हातीं । पायांपें सरती झालों
नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हीं विचारा जी देवा । ठेवाल तें ठेवा कोणे परी
॥ ४ ॥
१५३५. न पाहें माघारें आतां परतोनि । संसारापासूनि विटला जीव
॥ १ ॥ सामोरा येऊनि कवळीं दातारा । काळाचा हाकारा न साहावे ॥ २ ॥ सावधान
चित्त होईल आधारें । खेळताही बरें वाटईल ॥ ३ ॥ तुका म्हणे कंठ दाटला या
सोसें । न पवेचि कैसें जवळी हे ॥ ४ ॥
१५३६. करितां विचार । तो हा
दृढ संसार । ब्रह्मादिकां पार । नुल्लंघवे सामर्थ्यें ॥ १ ॥ शरण शरण
नारायणा । मज अंगीकारा दीना । आलें तें वचना - । पाशीं माझ्या सामर्थ्य ॥ २
॥ पाठीवरी मोळी । तोचि कळवा पायीं तळीं । सांपडला जाळीं । मत्स्य जाला तो
न्याय ॥ ३ ॥ आतां करीन तांतडी । लाभाची ते याच जोडी । तुका म्हणे ओढी ।
पायां सोई मनाची ॥ ४ ॥
१५३७. सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां
सोडवी संसारापासोनियां ॥ १ ॥ न सुटेचि बाकी नव्हें झाडापाडा । घातलोंसें
खोडा हाडांचिया ॥ २ ॥ मायबापें माझीं जीवांची सांगाती । तीं देतील हातीं
काळाचिया ॥ ३ ॥ पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनियां ॥ ४ ॥
पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां ॥ ५ ॥ जन साह्यभूत
असे या सकळा । मी एक निराळा परदेशी ॥ ६ ॥ कोणा काकुलती नाहीं कोणे परी ।
तुजविण हरी कृपाळुवा ॥ ७ ॥ तुका म्हणे मज तुझाची भरंवसा । म्हणऊनि आशा
मोकलिली ॥ ८ ॥
१५३८. स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर
अतिशय ॥ १ ॥ आतां सोडवणें धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ २ ॥
येऊनियां आड ठाके लोकलाज । तों हें दिसे काज अंतरलें ॥ ३ ॥ तुका म्हणे
आम्हां जेथें जेथें गोवा । तेथें तुम्हीं देवा सांभाळावें ॥ ४ ॥
१५३९.
बहु या प्रपंचें भोगविल्या खाणी । ठाकोनियां मनीं आला सीण ॥ १ ॥ आतां
पायांपाशीं लपवावें देवा । नको पाहूं सेवाभक्ती माझी ॥ २ ॥ बहु भय वाटे
एकाच्या बोभाटें । आलीं घायवटें फिरोनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे सिगे भरूं आलें
माप । वियोग संताप झाला तुझा ॥ ४ ॥
१५४०. आजिवरी होतों संसाराच्या
हातीं । आतां ऐसें चित्तीं उपजलें ॥ १ ॥ तुम्हां शरणागता व्हावें नारायणा ।
अंगीकारा दीना आपुलिया ॥ २ ॥ विसरलों काम याजसाठीं धंदा । सकळ गोविंदा
माझें तुझें ॥ ३ ॥ तुका म्हणे विज्ञापना परिसावी । आवडी हे जीवीं झाली तैसी
॥ ४ ॥
१५४१. कैसा तूं देखिला होसील गोपाळीं । पुण्यवंता डोळीं
नारायणा ॥ १ ॥ तेणें लोभें जीव जालासे बराडी । आम्ही ऐसी जोडी कईं लाभों ॥ २
॥ असेल तें कैसें दर्शनाचें सुख । अनुभवें श्रीमुख अनुभवितां ॥ ३ ॥ तुका
म्हणे वाटे देसी आळिंगन । अवस्था ते क्षणक्षणा होते ॥ ४ ॥
१५४२.
आतां मी अनन्य येथें अनधिकारी । होईन कोणे परी नेणों देवा ॥ १ ॥ पुराणींचा
अर्थ आणितां मनास । होय कासावीस जीव माझा ॥ २ ॥ इंद्रियांची आम्ही पांगिलों
अंकित । त्यांचे रंगीं चित्त रंगलेंसें ॥ ३ ॥ येकाचेंही मज न घडे दमन ।
अवघीं नेमून कैसीं राखों ॥ ४ ॥ तुका म्हणे जरी मोकलिसी आतां । तरी मी अनंता
वायां गेलों ॥ ५ ॥
१५४३. अवघ्या पातकांची मीचि एक रासी । अवघा तूं
होसी सर्वोत्तम ॥ १ ॥ जैसा तैसा करणें लागे अंगीकार । माझा सर्व भार
चालविणें ॥ २ ॥ अवघेंचि मज गिळियेलें काळें । अवघींच बळें तुझें अंगीं ॥ ३ ॥
तुका म्हणे आतां खुंटला उपाय । अवघेचि पाय तुझें मज ॥ ४ ॥
१५४४.
ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥ १ ॥ म्हणोनि
अवघे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥ २ ॥ वेदपरायण पंडित वाचक । न
मिळती एक एकामधीं ॥ ३ ॥ पाहों गेलों भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथें देखें
चेष्टा विपरीत ॥ ४ ॥ आपुलिया नाहीं निवाले जे अंगें । योगी करती रागें
गुरगुरु ॥ ५ ॥ तुका म्हणे मज कोणाचा पांगिला । नको बा विठ्ठला करूं आतां ॥ ६
॥
१५४५. मेल्यावर मोक्ष संसारसंबंध । आरालिया बद्ध ठेवा आम्हां ॥ १
॥ वागवीत संदेह राहों कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥ २ ॥ गाणें गीत
आम्हां नाचणें आनंदें । प्रेम कोठें भेदे अंगा येतें ॥ ३ ॥ तुका म्हणे किती
सांगावे दृष्टांत । नसतां तूं अनंत सानुकूळ ॥ ४ ॥
१५४६. साकरेचें
नाम घेतां कळे गोडी । तैसी आम्हां जोडी वैष्णवांची ॥ १ ॥ मोक्ष गांठी असे
ठेविला बांधोनि । सोस तो भजनीं आवडीचा ॥ २ ॥ भोजनाची चिंता माय वाहे बाळा ।
आम्हां तरी खेळावरी चित्त ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हीं देहउपकारें । गाऊं
निरंतर नाचों लागों ॥ ४ ॥
१५४७. किती विवंचना करीतसें जीवीं । मन
धांवडवी दाही दिशा ॥ १ ॥ कोणा एका भावें तुम्हीं अंगीकार । करावा विचार याच
साठीं ॥ २ ॥ इतर ते आतां लाभ तुच्छ जाले । अनुभवा आले गुणागुण ॥ ३ ॥ तुका
म्हणे लागो अखंड समाधि । जावें प्रेमबोधीं बुडोनियां ॥ ४ ॥
१५४८.
मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥ १ ॥ उगवूं आलेति
तुम्ही नारायणा । परिहार या सिणा निमिषांत ॥ २ ॥ लिगाडाचे मासी न्यायें
जाली परी । उरली ते उरी नाहीं कांहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे लाहों साधीं
वाचाबळें । ओढियेलों काळें धांव घाली ॥ ४ ॥
१५४९. नव्हे मी स्वतंत्र
अंगाचा पाईक । जे हे सकळिक सत्ता वारूं ॥ १ ॥ तुम्हां आळवावें पाऊलापाऊली ।
कृपेची साऊली करीं मज ॥ २ ॥ शक्तिहीन तरी जालों शरणागत । आपुला वृत्तांत
जाणोनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे भवाभेणें धरिले पाय । आणीक उपाय नेणें कांहीं ॥
४ ॥
१५५०. ओस जाल्या दिशा मज भिंगुळवाणें । जीवलग नेणें मज कोणी ॥ १
॥ भय वाटे देखें श्वापदांचे भार । नव्हे मज धीर पांडुरंगा ॥ २ ॥ अंधकार
पुढें न चलवे वाट । लागतील खुंट कांटे अंगा ॥ ३ ॥ एकला निःसंग फांकती मारग ।
भितों नव्हे लाग चालावया ॥ ४ ॥ तुका म्हणे वाट दावूनि सद्गुरु । राहिलासे
दुरु पांडुरंग ॥ ५ ॥
१५५१. एका एक वर्में लावूनियां अंगीं । ठेवितों
प्रसंगीं सांभाळीत ॥ १ ॥ नेघावा जी आम्हीं वाव बहु फार । धरूनि अंतर
ठायाठाव ॥ २ ॥ वेव्हारें आलें तें समानचि होतें । बळ नाहीं येथें चालों येत
॥ ३ ॥ तुका म्हणे आतां निवाड्याच साटीं । संसारें तुटी करुनि ठेलों ॥ ४ ॥
१५५२.
कांहीं एक तरी असावा आधार । कासयानें धीर उपजावा ॥ १ ॥ म्हणविल्यासाठीं
कैसें पडे रुजू । धणी नाहीं उजू सन्मुख तो ॥ २ ॥ वेचल्या दिसांचा कोणावरी
लेखा । घालावा हा सुखासुखें आम्हीं ॥ ३ ॥ नाहीं मनोगत तोंवरि हे देवा ।
तुका म्हणे सेवा नेघेजेतो ॥ ४ ॥
१५५३. शिकल्या शब्दांचे उत्पादितों
ज्ञान । दर्पणींचें धन उपर वायां ॥ १ ॥ अनुभव कईं होईन भोगितां । सांकडें
तें आतां हेंचि आलें ॥ २ ॥ गायें नाचें करीं शरीराचें धर्म । बीजनाम वर्म
तुझें दान ।।३।। तुका म्हणे केला उशीर न साहे । द्याल तरी आहे सर्व सिद्ध ॥
४ ॥
१५५४. नाहीं गुणदोष लिंपों देत अंगीं । झाडितां प्रसंगीं
वरावरी ॥ १ ॥ निकटवासिया आळवितों धांवा । येथूनियां देवा सोडवूनि ॥ २ ॥
उमटे अंतरीं तें करूं प्रगट । कळोनी बोभाट धांव घाली ॥ ३ ॥ तुका म्हणे तरी
वांचलों या काळें । समर्थाचें बळें सुखी असों ॥ ४ ॥
१५५५. तुम्ही
माझा देवा करा अंगीकार । हा नाहीं विचार मजपाशीं ॥ १ ॥ आतां दोहीं पक्षीं
लागलें लांछन । देवभक्तपण लाजविलें ॥ २ ॥ एकांतीं एकलें न राहे निश्चळ । न
राहेचि पळ मन ठायीं ॥ ३ ॥ पायीं महत्त्वाची पडिली श्रृंखळा । बांधविला गळा
स्नेहा हातीं ॥ ४ ॥ शरीर सोकलें देखिलिया सुखा । कदान्न हें मुखा मान्य
नाहीं ॥ ५ ॥ तुका म्हणे झाला अवगुणांचां थारा । वाढली हे निद्रा आळस बहू ॥ ६
॥
१५५६. अवघा वेंचलों इंद्रियांचे ओढी । जालें ते ते घडी निरोपिलें
॥ १ ॥ असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ २ ॥
कायावाचा मनें तोचि निजध्यास । येथें जालों ओस भक्तिभावें ॥ ३ ॥ तुका म्हणे
करूं येईल धांवणें । तरि नारायणें सांभाळावें ॥ ४ ॥
१५५७. काम
क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥ १ ॥ कैसा मी सरता
जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ २ ॥ पुराणींची ग्वाही
वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध झालें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज आणुनि
अनुभवा । दाखवीं हें देवा साच खरें ॥ ४ ॥
१५५८. मन माझें चपळ न राहे
निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥ १ ॥ आतां तूं उदास नव्हें नारायणा ।
धांवें मज दीना गांजियेलें ॥ २ ॥ धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी । केलें
तडातोडी चित्त माझें ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा नचले सायास । राहिलों हे आस
धरूनि तुझी ॥ ४ ॥
१५५९. नित्य या मनासी करितों विचार । तों हें
अनावर विषयलोभी ॥ १ ॥ आतां मज राखें आपुलिया बळें । न देखें हें जाळें
उगवतां ॥ २ ॥ सांपडला गळीं नाहीं त्याची सत्ता । उगळी मागुता घेतला तो ॥ ३ ॥
तुका म्हणे मी तों अज्ञानचि आहें । परि तुझी पाहें वास देवा ॥ ४ ॥
१५६०.
तुमचे स्तुतियोग्य कोठें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवितसे ॥ १ ॥
भक्तिभाग्य तरी नेदीं तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असे ॥ २ ॥ कैचें भाग्य
ऐसें पाविजे संनिध । नेणें पाळूं विध करुणा भाकीं ॥ ३ ॥ संतांचे शेवटीं
उच्छिष्टाची आस । करूनियां वास पाहातसें ॥ ४ ॥ करीं इच्छा मज म्हणोत आपुलें
। एखादिया बोलें निमित्याच्या ॥ ५ ॥ तुका म्हणे शरण आलों हें साधन ।
करितों चिंतन रात्रंदिवस ॥ ६ ॥
१५६१. वारंवार तुज द्यावया आठव । आईक
तो भाव माझा कैसा ॥ १ ॥ गेला मग नये फिरोन दिवस । पुढिलांची आस गणित नाहीं
॥ २ ॥ गुणांअवगुणांचे पडती आघात । तेणें होय चित्त कासावीस ॥ ३ ॥ कांहीं
एक तुझा न देखों आधार । म्हणऊनि धीर नाहीं जीवा ॥ ४ ॥ तुका म्हणे तूं या
ब्रह्मांडाचा जीव । तरी कां आम्ही कींव भाकीतसों ॥ ५ ॥
१५६२. माझे
मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥ १ ॥ आतां आड उभा राहें नारायणा ।
दयासिंधुपणा साच करीं ॥ २ ॥ वाचा वदे परी करणें कठिण । इंद्रियां अधीन
जालों देवा ॥ ३ ॥ तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥ ४
॥ (धृ. नाही)
१५६३. काय पुण्य ऐसें आहे मजपाशीं । तांतडी धांवसी
पांडुरंगा ॥ १ ॥ काय ऐसा भक्त वांयां गेलों थोर । तूं मज समोर होसी वेगा ॥ २
॥ काय कष्ट माझी देखिली चाकरी । तो तूं झडकरी पाचारिसी ॥ ३ ॥ कोण मी
नांवाचा थोर गेलों मोठा । अपराधी करंटा नारायणा ॥ ४ ॥ तुका म्हणे नाहीं
ठाऊकें संचित । येणें जन्में हित नाहीं केलें ॥ ५॥
१५६४. जन्मांतरीं
शुद्ध नाहीं आचरण । यालागीं चरण अंतरलें ॥ १ ॥ वोढवले संचित येणें जन्में
पाहतां । आतां पंढरिनाथा कृपा करी ॥ २ ॥ पतितपावन ब्रिद साच करी देवा ।
यालागीं कुढावा करी माझा ॥ धृ. ॥ अपराधी पातकी दुष्ट दुराचारी । आहाळलों
भारी संवसारें ॥ ४ ॥ कामक्रोध आधि कल्पनेच्या त्रासें । तुज न पवें ऐसें
झालें देवा ॥ ५ ॥ हा ना तो ठाव झाला पांडुरंगा । नयेचि उपेगा काय करूं ॥ ६ ॥
आपुलिया नांवा धांवणियां धांवे । लवकरी यावें तुका म्हणे ॥ ७ ॥
१५६५.
कनवाळू कृपाळू भक्तालागीं मोही । गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाई ॥ १ ॥
पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जीवलगे ये वो पांडुरंगे ॥ २ ॥
भक्तांच्या कैवारें कष्टलीस विठ्ठलें । अंबऋषीकारणें जन्म दहा घेतले ॥ ३ ॥
प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥
४ ॥ उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा
क्षीरसागराठायीं ॥ ५ ॥ कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्र
कैसी जाली माऊली ॥ ६ ॥ दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं
शाखादेठ घेऊनि ॥ ७ ॥ कृपाळू माऊली भुक्तिमुक्ति - भांडार । करीं माझा
अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ॥ ८ ॥
१५६६. तुजकरितां होते आनाचें आन ।
तारिले पाषाण उदकीं देवा ॥ १ ॥ कां नये कैवार करूं अंगीकार । माझा बहु भार
जड जाला ॥ २ ॥ चुकलासी म्हणों तरी जीवांचाही जीव । रिता नाहीं ठाव उरों
दिला ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसें काय सत्ताबळ । माझें परी कृपाळ आहां तुम्ही ॥
४॥
१५६७. येईं वो येईं वो येईं धांवोनियां । विलंब कां वांयां
लावियला कृपाळे ॥ धृ. ॥ विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके । कोठें गुंतलीस माये
विश्वव्यापके ॥ २ ॥ न करीं न करीं आतां आळस अव्हेरु । व्हावया प्रगट कैंचें
दूरी अंतरु ॥ ३ ॥ नेघें नेघें नेघें माझी वाचा विसांवा । तुका म्हणे हांवा
हांवा हांवां साधावा ॥ ४ ॥
१५६८. संताचा उपदेश आमुचे मस्तकीं ।
नाहीं मृत्युलोकीं राहाणेसा ॥ १ ॥ म्हणऊनि बहु तळमळी चित्त । येईं वो धांवत
पांडुरंगे ॥ २ ॥ उपजली चिंता लागला उशीर । होत नाहीं धीर निढळ वाटे ॥ ३ ॥
तुका म्हणे पोटीं रिघालेंसे भय । करूं आतां काय ऐसें जालें ॥ ४ ॥
१५६९.
मायें मोकलिलें कोठें जावें बाळें । आपुलिया बळें न वांचें तें ॥ १ ॥
रुसोनियां पळे सांडुनियां ताट । मागें पाहे वाट यावी ऐसी ॥ २ ॥ भांडवल
आम्हां आळी करावी हे । आपणची धाये धांवशील ॥ ३ ॥ तुका म्हणे आळी करूनियां
निकी । देसील भातुकीं बुझाऊनि ॥ ४ ॥
१५७०. क्षणाक्षणां जीवा वाटतसे
खंती । आठवती चित्तीं पाय देवा ॥ १ ॥ येईं वो येईं वो येईं लवलाही ।
आळिंगूनि बाहीं क्षेम देईं ॥ २ ॥ उताविळ मन पंथ अवलोकी । आठवे ते चुकी काय
जाली ॥ ३ ॥ तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना । घाला नारायणा उडी वेगीं ॥ ४
॥
१५७१. धरुनियां सोई परतलें मन । अनुलक्षीं चरण करूनियां ॥ १ ॥
येईं पांडुरंगे नेईं सांभाळूनी । करुणावचनीं आळवितों ॥ २ ॥ बुद्धि जाली
साह्य परि नाहीं बळ । अवलोकितों जळ वाहे नेत्रीं ॥ ३ ॥ न चलती पाय गळित
जाली काया । म्हणऊनि दया येऊं द्यावी ॥ ४ ॥ दिशेच्या करितों वारियासीं मात ।
जोडुनियां हात वाट पाहे ॥ ५ ॥ तुका म्हणे वेग करावा सत्वर । पावावया तीर
भवनदीचें ॥ ६ ॥
१५७२. उदार तूं हरी । ऐसी कीर्ति चराचरी । अनंत हे
थोरी । गर्जताती पवाडे ॥ १ ॥ तुझे पायीं माझा भाव । पुसी जन्ममरण ठाव ।
देवाचा तूं देव । स्वामी सकळां ब्रह्मांडा ॥ २ ॥ मागणें तें तुज मागों ।
जीवभाव तुज सांगों । लागों तरी लागों । पायां तुमच्या दातारा ॥ ३ ॥ दिसों
देसी कीविलवाणें । तरी तुजचि हें उणें । तुका म्हणे जिणें । माझें तुज अधीन
॥ ४ ॥
१५७३. धांव धांव गरुडध्वजा । आम्हां अनाथांच्या काजा ॥ १ ॥
बहु झालों कासावीस । म्हणोनि पाहें तुझी वास ॥ २ ॥ पाहें त्या मारगें ।
कोणी येतें माझ्या लागें ॥ ३ ॥ असोनियां ऐसा । तुज सारिखा कोंवसा ॥ ४ ॥ न
लवा उशीर । नेणों कां हो केला धीर ॥ ५ ॥ तुका म्हणे चाली । नको चालूं धांव
घालीं ॥ ६ ॥
१५७४. स्वामित्वाचीं वर्में असोनि जवळी । वाहों जावें
मोळी गुणांसवें ॥ १ ॥ काबाडापासूनि सोडवा दातारा । कांहीं नका भारा पात्र
करूं ॥ २ ॥ धनवंत्र्याचिये अंगीं सत्ताबळ । व्याधि ते सकळ तोडावया ॥ ३ ॥
तुका म्हणे आलें मोड्यासी कोंपट । सांडोव्याची वाट विसरावी ॥ ४ ॥
१५७५.
सुकलिया कोंभा अत्यंत जळधरें । तेणेंचि प्रकारें न्याय असे ॥ १ ॥ न चले
पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचें हो मन त्वरेलागीं ॥ २ ॥ तुका म्हणे भूक न
साहावे बाळा । जीवनाची कळा ओढलीसे ॥ ३ ॥
१५७६. आरुषा वचनीं मातेची
आवडी । म्हणऊनि तांतडी घेत नाहीं ॥ १ ॥ काय होईल माझें मांडिलें कवतुक ।
आदराची भूक रडारोवी ॥ २ ॥ लपोनियां करी चुकुर माउली । नाहीं होत केली
निष्ठा सांडी ॥ ३ ॥ तुका म्हणे करी पारखीं वचनें । भेवउनि तान्हें आळवावें ॥
४ ॥
१५७७. बाप करी जोडी लेंकराचे ओढी । आपुली करवंडी वाळवूनी ॥ १ ॥
एकाएकीं केला मिरासींचा धनी । कडिये वागवूनी भार खांदीं ॥ २ ॥ घालूनियां
पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करूनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे नेदी गांजूं
आणिकांसी ॥ उदार जीवासी आपुलिया ॥ ४ ॥
१५७८. असोनि न कीजे अलिप्त
अहंकारें । उगीच या भारें कुंथाकुंथी ॥ १ ॥ धांवा सोडवणें वेगी लवकरी । मी
तो जालों हरी शक्तिहीन ॥ २ ॥ भ्रमल्यानें दिसें बांधल्याचेपरी । माझें
मजवरी वाहोनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे धांव घेतलीसे सोई । आतां पुढें येईं
लवकरी ॥ ४ ॥
१५७९. मायबापापुढें लाडिके लेंकरूं । तैसे बोल करूं
कवतुकें ॥ १ ॥ कृपावंता घाली प्रेमपान्हारस । वोळवी वोरस पांडुरंगे ॥ २ ॥
नाहीं धीर खुंटीं जवळी हुंबरे । ठायींच पाखरे कवळते ॥ ३ ॥ तुका म्हणे मज
होऊं नेदी सीण । कळों नेदी भिन्न आहे तैसें ॥ ४ ॥
१५८०. कृपावंता
दुजें नाहीं तुम्हां पोटीं । लाडें बोलें गोठी सुख मातें ॥ १ ॥ घेउनि
भातुकें लागसील पाठी । लाविसील ओठीं ब्रह्मरस ॥ २ ॥ आपुलिया पांखें घालिसी
पाखर । उदार मजवर कृपाळू तूं ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हांकारणें गोविंदा ।
वागविसी गदा सुदर्शन ॥ ४ ॥
१५८१. आतां नये बोलों अव्हेराची मात ।
बाळावरी चित्त असों द्यावें ॥ १ ॥ तुज कां सांगणें लागे हा प्रकार । परी
हें उत्तर आवडीचें ॥ २ ॥ न वंची वो कांहीं एकहि प्रकार । आपणां अंतर नका मज
॥ ३ ॥ तुका म्हणे मोहो राखावा सतत । नये पाहों अंत पांडुरंगा ॥ ४ ॥
१५८२.
मायबापापुढें लेंकराची आळी। आणीक हे पाळी कोण लळे ॥ १ ॥ सांभाळा जी माझीं
विषमें अनंता । जवळी असतां अव्हेरू कां ॥ २ ॥ आणिकांची चाले सत्ता आम्हावरी
। तुमची ते थोरी काय मग ॥ ३ ॥ तुका म्हणे आलों दुरोनि जवळी । आतां
टाळाटाळी करूं नये ॥ ४ ॥
१५८३. तुझा विसर नको माझिया हो जीवा । क्षण
एक केशवा मायबापा ॥ १ ॥ जावो राहो देह आतां येचि घडी । कायसी आवडी याची मज
॥ २ ॥ कुश्चीळ इंद्रियें आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥ ३ ॥
पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥ ४ ॥ पिंड हा
उसना आणिला पांचाचा । सेखीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥ ५ ॥ तुका म्हणे
नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥ ६ ॥
१५८४. कृपावंता
कोप न धरावा चित्तीं । छळूं वक्रोक्ति स्तुती करूं ॥ १ ॥ आम्ही तुझा पार
काय जाणों देवा । नेणों कैसी सेवा करावी ते ॥ २ ॥ अनंता अरूपा अलक्षा
अच्युता । निर्गुणा सच्चिता सर्वोत्तमा ॥ ३ ॥ चांगलीं हीं नामें घेतली
ठेवून । जालासी लहान भक्तिकाजा ॥ ४ ॥ तुका म्हणे तुझ्या पायांवरी सदा ।
मस्तक गोविंदा असो माझा ॥ ५ ॥
१५८५. आम्हीं जाणावें तें काई । तुझें
वर्म कोणे ठायीं । अंतपार नाहीं । ऐसें श्रुति बोलती ॥ १ ॥ होई मज तैसा मज
तैसा । साना सुकुमार हृषीकेशा । पुरवी माझी आशा । भुजा चारी दाखवीं ॥ २ ॥
खालता सप्तही पाताळा । वरता स्वर्गाहूनि ढिसाळा । तो मी मशक डोळां । कैसा
पाहों आपुल्या ॥ ३ ॥ मज असें हा भरंवसा । पढीयें होसी तयां तैसा ।
पंढरीनिवासा । तुका म्हणे गा विठोबा ॥ ४ ॥
१५८६. तुम्हां आम्हां जंव
जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥ १ ॥ उरी तों राहिलें गोमटें गौरव ।
ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ २ ॥ नेणपणें आम्ही आळवूं वोरसें । बोलावितों
रसें शब्दरत्नें ॥ ३ ॥ तुका म्हणे लळे पाळीं वो विठ्ठले । कां हे उरविले
भेदाभेद ॥ ४ ॥
१५८७. तुज घालोनियां पूजितों संपुटीं । परी तुझ्या
पोटीं चौदा भुवनें ॥ १ ॥ तुज नाचूनि दाखवूं कौतुका । परी रूपरेखा नाहीं तुज
॥ २ ॥ तुजलागीं आम्ही गात असों गीत । परी तूं अतीत शब्दाहूनि ॥ ३ ॥
तुजलागीं आम्ही घातियेल्या माळा । परी तूं वेगळा कर्तृत्वासी ॥ ४ ॥ तुका
म्हणे आतां होऊनि परमित । माझें कांहीं हित विचारावें ॥ ५ ॥ (धृ. नाही)
१५८८.
कई ऐसी दशा येईल माझ्या अंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥ १ ॥ नाठवुनि देह
पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मधीं ॥ २ ॥ कईं ऐसा पात्र होईन
लाभासी । नेणों हृषीकेशी तुष्टईल ॥ ३ ॥ तुका म्हणे धन्य मानीन संचित । घेईन
तें नित्य प्रेमसुख ॥ ४ ॥
१५८९. कां जी आम्हां होतें दोषाचें दर्शन
। तुज समर्पून देहभाव ॥ १ ॥ पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरसील सत्ता
सकळही ॥ २ ॥ कां जी आम्हांवरी आणिकांची सत्ता । तुम्हांसी असतां जवळिकें ॥ ३
॥ तुका म्हणे पायीं केलें निवेदन । उचित तें दान करीं सत्ता ॥ ४॥
१५९०.
निश्चिंतीनें होतों करूनियां सेवा । कां जी मन देवा उद्वेगलें ॥ १ ॥ अनंत
उठती चित्ताचे तरंग । करावा हा त्याग वाटतसे ॥ २॥ कोण तुम्हांविण मनाचा
चाळक । दुजे सांगा एक नारायणा ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा मांडिला विनोद । करवूं
नेणें छंद कराल काई ॥ ४ ॥
१५९१. मौन कां धरिलें विश्वाच्या जीवना ।
उत्तर वचना देईं माझ्या ॥ १ ॥ तूं माझें संचित तूंचि पूर्वपुण्य । तूं
माझे प्राचीन पांडुरंगा ॥ २ ॥ तूं माझें सत्कर्म तूं माझा स्वधर्म । तूंचि
नित्यनेम नारायणा ॥ ३ ॥ कृपावचनाची वास पाहातसें । करुणा बोरसें बोला
कांहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा । बोला सर्वोत्तमा मजसवें
॥ ५ ॥
१५९२. पेणावलें ढोर मार खाय पाठी । बैसलें तें नुठी
तेथूनियां ॥ १ ॥ तैसी माझ्या मना परी झाली देवा । धांवे अहंभावा सांडवलों ॥
२ ॥ कडां घालीं उडी मागिलांच्या भेणें । पडणें मरणें न कळेचि ॥ ३ ॥ तुका
म्हणे झालों त्यापरी दुःखित । असें बोलावीत पांडुरंगा ॥ ४ ॥
१५९३.
कोठें गुंतलासी कोणाच्या धांवया । आली देवराया निद्रा तुज ॥ १ ॥ कोठें
गुंतलासी भक्तिप्रेमसुखें । न सुटती मुखें गोपिकांचीं ॥ २ ॥ काय पडिलें तुज
कोणाचें संकट । दुरी पंथ वाट न चलवे ॥ ३ ॥ काय माझे तुज गुणदोष दिसती ।
म्हणोनि श्रीपती कोपलासी ॥ ४ ॥ काय जालें सांग माझिया कपाळा । उरला जीव
डोळां तुका म्हणे ॥ ५ ॥
१५९४. विठ्ठला रे तूं उदारांचा राव ।
विठ्ठला तूं जीव जगाचा या ॥ १ ॥ विठ्ठला रे तूं उदाराचा राशी । विठ्ठला
तुजपाशीं सकळ सिद्धी ॥ २ ॥ विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड । विठ्ठला तूं कोड
पुरविसी ॥ ३ ॥ विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागलें ध्यान
मनीं ॥ ४ ॥ विठ्ठला रे वाचे बोल बहुरस । विठ्ठला रे सोस घेतला जीवें ॥ ५ ॥
विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तूं ये का झडकरी ॥ ६ ॥
१५९५.
लटिकेचि साच दाविलें अचळ । पीडीतसें काळ किती म्हूण ॥ १ ॥ सत्य तूं सत्य
तूं सत्य तूं विठ्ठला । कांगा हा दाविला जगदाकार ॥ २ ॥ सांभाळीं सांभाळीं
आपुली हे माया । आम्हांसी कां भयाभीत केलें ॥ ३ ॥ रूप नाहीं त्यासी
ठेवियलें नाम । लटिकाचि भ्रम वाढविला ॥ ४ ॥ तुका म्हणे कांगा झालासी चतुर ।
होतासी निसूर निर्विकार ॥ ५ ॥
१५९६. पाहें मजकडे भरोनियां दृष्टी ।
बहुत हिंपुटी जालों माते ॥ १ ॥ करावेंसें वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें
वचन शृंगारिक ॥ २ ॥ सत्यासाठीं माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें
नव्हे ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी कळवळ्याची कींव । भागलासे जीव कर्तव्यानें ॥ ४
॥
१५९७. काय करूं जीव होतो कासावीस । कोंडिले दिस गमेचिना ॥ १ ॥
पडिलें हें दिसे ब्रह्मांडचि वोस । दाटोनि उच्छवास राहातसे ॥ २ ॥ तुका
म्हणे अगा सर्व जाणतिया । विश्वंभरे काया निववावी ॥ ३ ॥
१५९८. जीव
जायवरी सांडी करी माता । हें तों आश्चर्यता बाळकाची ॥ १ ॥ दुर्बळ कीं नाहीं
आइकत कानीं । काय नारायणी न्यून जालें ॥ २ ॥ क्षणक्षणा माझा नेघावा सांभाळ
। अभाग्याचा काळ ऐसा आला ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं वचनासी रुचि । फलकट वेंचि
तें तें होय ॥ ४॥
१५९९. तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि कां केला
धीर पांडुरंगा ॥ १ ॥ अझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ २
॥ आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तहानभूकें ॥ ३ ॥
प्रेमरसपान्हा पाजीं माझे आई । धांवें वो विठाई वोरसोनि ॥ ४ ॥ तुका म्हणे
माझें कोण हरिल दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥ ५ ॥
१६००. पडियेलों
वनीं थोर चिंतवनीं । उशीर का अझूनि लावियेला ॥ १ ॥ येईं गा विठ्ठला येईं गा
विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥ २ ॥ काय तुज नाहीं लौकिकाची शंका ।
आपुल्या बाळका मोकलितां ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें
देवा दुरी दिसे ॥ ४ ॥
१६०१. तरी आम्ही तुझी धरियेली कास । नाहीं
कोणी दास वायां गेला ॥ १ ॥ अगा पंढरीशा उभा विटेवरी । येई लवकरी धांव नेटें
॥ २ ॥ पालवितों तुज उभारोनि बाहे । कृपावंता पाहें मजकडे ॥ ३ ॥ तुका म्हणे
तुज बहु कान डोळे । कां हे माझे वेळे ऐसी परी ॥ ४ ॥
१६०२. मज नाहीं
तुझ्या ज्ञानाची ते चाड । घेतां वाटे गोड नाम तुझें ॥ १ ॥ नेणतें लेंकरूं
आवडीचें तान्हें । बोलतों वचनें आवडीनें ॥ २ ॥ भक्ती नेणें कांहीं वैराग्य
तें नाहीं । घातला विठाई भार तुज ॥ ३ ॥ तुका म्हणे नाचें निर्लज्ज होऊनि ।
नाहीं माझे मनीं दुजा भाव ॥ ४ ॥
१६०३. आवडेल तैसें तुज आळवीन । वाटे
समाधान जीवा तैसें ॥ १ ॥ नाहीं येथें कांहीं लौकिकाची चाड । तुजविण गोड
देवराया ॥ २ ॥ पुरवीं मनोरथ अंतरींचें आर्त । धाये वरि गीत गाय तुझें ॥ ३ ॥
तुका म्हणे लेकीं आळवी माहेरा । गाऊं या संसारा तुज तैसें ॥ ४ ॥
१६०४.
माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ रामकृष्ण ॥ १ ॥ अबद्ध
चांगलें गाऊं भलतैसें । बाळ वदे जैसें मायबापा ॥ २ ॥ तुका म्हणे मज न लावी
वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥ ३ ॥
१६०५. क्षुधार्थी
दुष्काळें अन्नं पीडियेलें । मिष्टान्न देखिलें तेणें जैसें ॥ १ ॥ तैसें
तुझें पायीं लांचावलें मन । झुरे माझा प्राण भेटावया ॥ २ ॥ मांजरें देखिला
लोणियाचा गोळा । लावूनियां डोळा बैसलेंसे ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां झडी घालूं
पाहें । पांडुरंगे माये तुझे पायीं ॥ ४ ॥
१६०६. जेणें माझें हित
होईल तो उपाव । करिसील भाव जाणोनियां ॥ १ ॥ मज नाहीं सुख दुःख तया खंती ।
भावना हे चित्तीं नाना छंदें ॥ २ ॥ तोडीं हे संबंध तोडीं आशापाश । मज हो
सायास न करितां ॥ ३ ॥ तुका म्हणे मी तो राहिलों निश्चिंत । कवळोनि एकांतसुख
तुझें ॥ ४ ॥
१६०७. जे जे कांहीं मज होईल वासना । ते ते नारायणा
व्हावें तुम्हीं ॥ १ ॥ काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींची ॥
२ ॥ तुजविण मज कोण आहे सखा । जें सांगों आणिकां जीवभाव ॥ ३ ॥ अवघें पिशुन
झालें असे जन । आपपर कोण नाठवें हें ॥ ४ ॥ तुका म्हणे तूंचि जीवांचें जीवन ।
माझें समाधान तुझे हातीं ॥ ५ ॥
१६०८. तुझा म्हणवूनि दिसतों गा दीन ।
हाचि अभिमान सरे तुझा ॥ धृ. ॥ अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं
कोण पावे ॥ २ ॥ तैसा विठो तुजविण परदेशी । नको या दुःखासी गोवूं मज ॥ ३ ॥
तुका म्हणे मज सर्व तुझी आशा । अगा जगदीशा पांडुरंगा ॥ ४ ॥
१६०९.
आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावेचि ना ॥ १ ॥ काय
विधात्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होयचि ॥ २ ॥ तुका म्हणे माझी
विसरूं नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगीं ॥ ३ ॥
१६१०. पावलों हा
देह कागटाळी न्यायें । न घडे उपायें घडों आलें ॥ १ ॥ आतां माझीं खंडीं देह
देहांतरें । अभय दातारें देऊनियां ॥ २ ॥ अंधळ्याचे पायीं धनाची चरवी ।
अघटीत तेंवी घडों आलें ॥ ३ ॥ तुका म्हणे योग घडला बरवा । आतां कास देवा न
सोडीं मी ॥ ४ ॥
१६११. कांगा कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलाविते
पाहीं चाल नेटें ॥ १ ॥ तेव्हां माझ्या मना होय समाधान । जाय सर्व सीण
जन्मांतरिंचा ॥ २ ॥ तुका म्हणे माझी होईल माउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा
॥ ३ ॥
१६१२. संतांचा पढियावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे
॥ १ ॥ हेचि थोर चिंता लागली मानसीं । निजतां निद्रेसी नलगे डोळा ॥ २ ॥
जेवितां जेवणीं नलगे गोड धड । वाटतें काबाड विषयसुख ॥ ३ ॥ ऐसिया संकटीं
पावें कृपानिधी । लावीं संतपदीं प्रेमभावें ॥ ४ ॥ तुका म्हणे आम्हीं नेणों
कांहीं हित । तुजविण अनाथ पांडुरंगा ॥ ५ ॥
१६१३. आतां हे शेवटीं असो
पायांवरी । वदती वैखरी वागपुष्पें ॥ १ ॥ नुपेक्षावें आम्हां दीनां
पांडुरंगा । कृपादानी जगामाजी तुम्हीं ॥ २ ॥ बोळवुनी देह सांडियेली शुद्ध ।
तोडियेले भेद जीवशिव ॥ ३ ॥ तुका म्हणे मन तुमचें चरणीं । एवढीं आयणी
पुरवावी ॥ ४ ॥
१६१४. स्वमुखेंचि तुम्हीं सांगा मज सेवा । ऐसे माझे
देवा मनोरथ ॥ १ ॥ नेघों आम्ही कांहीं आपल्या उदारें । चित्तवित्त घरें
जीवावरी ॥ २ ॥ बोलें परस्परें वाढवावें सुख । पाहावें श्रीमुख डोळेभरी ॥ ३ ॥
तुका म्हणे सत्य बोलतों वचन । करुनी चरण साक्ष तुझे ॥ ४ ॥
१६१५.
काय तुज कैसें जाणावेगा देवा । आणावें अनुभवा कैशा परी ॥ १ ॥ सगुण निर्गुण
स्थूळ कीं लहान । न कळे अनुमान मज तुझें ॥ २ ॥ कोण तो निर्धार करूं हा
विचार । भवसिंधु पार तरावया ॥ ३ ॥ तुका म्हणे कैसे पाय आतुडती । न पडे
श्रीपती वर्म ठावें ॥ ४ ॥
१६१६. माझ्या इंद्रियांसी लागलें भांडण ।
म्हणतील कान रसना धाली ॥ १ ॥ करिती तळमळ हस्त पाद भाळ । नेत्रांसी दुकाळ
पडिला थोर ॥ २ ॥ गुण गाय मुख आइकती कान । आमचें कारण तैसें नव्हे ॥ ३ ॥
दरुषणें फिटे नेत्रांचा तो पांग । जेथें ज्याचा भाग घेतील तें ॥ ४ ॥ तुका
म्हणे ऐसें करी नारायणा । माझी ही वासना ऐसी आहे ॥ ५ ॥
१६१७.
व्हावया भिकारी हेंचि आम्हां कारण । अंतरोनि जन जावें दुरी ॥ १ ॥ संबंध
तुटावा शब्दाचाही स्पर्श । म्हणउनि आस मोकलिली ॥ २ ॥ तुका म्हणे दुःखें
उबगला जीव । म्हणउनी कींव भाकीं देवा ॥ ३ ॥
१६१८. थोडे तुम्हीं
मागें होते उद्धरिले । मज ऐसे गेले वांयां जीव ॥ १ ॥ आतां याचा कांहीं न
मनावा भार । कृपेचा सागर आहेसी तूं ॥ २ ॥ तुज आळवितां पापाची वसती । राहे
अंगीं किती बळ त्याचें ॥ ३ ॥ तुका म्हणे जैसे तारिले दगड । तैसा मीहि जड एक
देवा ॥ ४ ॥
१६१९. कोठें आम्ही आतां वेचावी हे वाणी । कोण मना आणी
जाणोनियां ॥ १ ॥ न करावी सांडी आतां टाळाटाळी । दैन हे कळी होईल माझी ॥ २ ॥
घरोघरीं झाल्या ज्ञानाचिया गोष्टी । सत्यासवें गांठी न पडावी ॥ ३ ॥ तुका
म्हणे आम्हां भाकितां करुणा । भलताचि शाहाणा शोध काढी ॥ ४ ॥
१६२०.
अनंतां जीवांचीं तोडिलीं बंधनें । मज काळें येणें कृपा कीजे ॥ १ ॥ अनंत
पवाडे तुझें विश्वंभरा । भक्तकरुणाकरा नारायणा ॥ २ ॥ अंतरीचें कळों देईं
गुह्य गुज । अंतरींचें बीज राखेन मी ॥ ३ ॥ समदृष्टी तुझीं पाहीन पाउलें ।
धरीन संचले हृदयांत ॥ ४ ॥ तेणें या चित्ताची राहील तळमळ । होतील शीतळ सकळ
गात्रें ॥ ५ ॥ तुका म्हणे शांति करील प्रवेश । मग नव्हे नाश अखंड तो ॥ ६ ॥
१६२१.
कोणाचें चिंतन करूं ऐशा काळे । पायांचिया बळें कंठींतसें ॥ १ ॥ पाहातसें
वाट येईं गा विठ्ठला । मज कां हा केला परदेश ॥ २ ॥ बहुतांचे सत्ते झालों
कासावीस । जाय रात्रंदिवस वैरियांचा ॥ ३ ॥ तुका म्हणे बैसे मनाचिये मुळीं ।
तरीच हीं जाळीं उगवतीं ॥ ४ ॥
१६२२. कईं तो दिवस देखेन मी डोळा ।
कल्याण मंगळामंगळाचें ॥ १ ॥ आयुष्या शेवटीं पायांसवें भेटी । काळवेळ तुटी
झाल्या तरें ॥ २ ॥ सरो हें संचित पदरींचा गोवा । उताविळ देवा मन झालें ॥ ३ ॥
पाउलापाउलीं करितां विचार । अनंत विकार चित्ता अंगी ॥ ४ ॥ म्हणउनि भयाभीत
होतो जीव । भाकितसे कींव अट्टाहासें ॥ ५ ॥ दुःखाच्या उत्तरीं आळविले पाय ।
पाहणें तो काय अजून अंत ॥ ६ ॥ तुका म्हणे होईल आइकिलें कानी । तरी चक्रपाणि
धांव घाला ॥ ७ ॥
१६२३. आइकावीं माझीं कवतुक उत्तरें । देऊनी सादरें
चित्त देवा ॥ १ ॥ वोरसें आवडी आलों पायापाशीं । होय तें मनेंसीं सुख किजे ॥
२ ॥ तुमचें न भंगे सर्वोत्तमपण । करितां समाधान लेंकराचें ॥ ३ ॥ तुका
म्हणे जरी बोलतों बोबडें । तरी लाडे कोडें कवतुकें ॥ ४ ॥
१६२४.
आशाबद्ध आम्ही भाकितसों कींव । तत्पर हा जीव कार्यापाशीं ॥ १ ॥
प्रतिउत्तराची पाहातसें वाट । करूनि बोभाट महाद्वारीं ॥ २ ॥ आपुल्या उचितें
करूनियां ठेवीं । संबंध गोसावी तोडोनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे एक झालिया
निवाड । कोण बडबड करी मग ॥ ४ ॥
१६२५. तुझिया दासांचा हीन झालों दास ।
न धरीं उदास मायबापा ॥ १ ॥ तुजविण प्राण कैसा राहों पाहे । वियोग न साहे
क्षणभरी ॥ २ ॥ आणिक माझ्या जीवें मोकलिली आस । पाहें तुझी वास पांडुरंगा ॥ ३
॥ सर्वभावें तुज आणिला उचित । राहिलों निश्चिंत तुझे पायीं ॥ ४ ॥ तुका
म्हणे तुज असे माझा भार । बोलतों मी फार काय जाणें ॥ ५ ॥
१६२६. कां
हो पांडुरंगा न करा धांवणें । तरी मज कोणें सोडवावें ॥ १ ॥ तुझा म्हणऊनि
आणिकापें उभा । राहों हे तों शोभा नेदी आतां ॥ २ ॥ काळें पुरविली पाठी
दूरवर । पुढें पाय स्थिर राहों नेदी ॥ ३ ॥ नको आणूं माझें संचित मनासी
। पावन आहेसी पतित तूं ॥ ४ ॥ तुका म्हणे चाले आणिकांची सत्ता । तुज आठवितां
नवल हें ॥ ५ ॥
१६२७. आतां पाहाशील काय माझा अंत । आलों शरणागत तुज
देवा ॥ १ ॥ करीं अंगीकार राखें पायांपाशीं । झणी दिसों देसी कीविलवाणें ॥ २
॥ नाहीं आइकिली मागें ऐसी मात । जे त्वां शरणागत उपेक्षिले ॥ ३ ॥ तुका
म्हणे आतां धरी अभिमान । आहेसी तूं दानशूर दाता ॥ ४ ॥
१६२८. सकळ
तुझे पायीं मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज ॥ १ ॥ वाचे गातां गोड
आइकतां कानीं । पाहातां लोचनीं मूर्ती तुझी ॥ २ ॥ मन स्थिर माझें झालेंसे
निश्चळ । वारिले सकळ आशापाश ॥ ३ ॥ जन्मजराव्याधि निवारलें दुःख । वोसंडलें
सुख प्रेमधारी ॥ ४ ॥ तुका म्हणे मज झाला हा निर्धार । आतां वायां फार काय
बोलों ॥ ५ ॥
१६२९. भागलों मी आतां आपुल्या स्वभावें । कृपा करोनि
देवें आश्वासीजे ॥ १ ॥ देऊनि आळिंगन प्रीतीच्या पडिभरें । अंगें हीं
दातारें निववावीं ॥ २ ॥ अमृताची दृष्टी घालूनियां वरी । शीतळ हा करीं जीव
माझा ॥ ३ ॥ घेईं उचलूनि पुसें तहानभूक । पुसीं माझें मुख पीतांबरें ॥ ४ ॥
बैसोनियां माझी धरीं हनुवटी । ओवाळूनी दिठीं करूनी सांडीं ॥ ५ ॥ तुका म्हणे
बाप्पा अहो विश्वंभरा । आतां कृपा करा ऐसी कांहीं ॥ ६ ॥
१६३०.
पूर्वीहूनि बहु भक्त सांभाळिले । नाहीं अव्हेरिले दास कोणी ॥ १ ॥ जे जे शरण
आले ते ते आपंगिले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे ॥ २ ॥ मिरवे चरणीं ब्रीद
ऐसीये गोष्टीचें । भक्तसांभाळाचें प्रेम ऐसें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हांसाठीं
येणें रूपा । माझ्या मायबापा पांडुरंगा ॥ ४ ॥
१६३१. येउनी जाउनी
पाहें तुजकडे । पडिल्या सांकडे नारायणा ॥ १ ॥ आणीक कोणाचा मज नाहीं आधार ।
तुजवरी भार जीवें भावें ॥ २ ॥ निष्ठुर अथवा होईं तूं कृपाळ । तुज सर्वकाळ
विसरेना ॥ ३ ॥ आपुलें वचन राहे सांभाळून । तुम्हां आम्हां जाण पडिपाडु ॥ ४ ॥
ज्याच्या वचनासी अंतर पडेल । बोल तो येईल तयाकडे ॥ ५ ॥ तुम्हां आम्हां
तैसें नाहीं म्हणे तुका । होशील तूं सखा जीवलग ॥ ६ ॥
१६३२. तेव्हां
धालें पोट बैसलों पंगती । आतां आम्हां मुक्तिपांग काई ॥ १ ॥ धांवा केला
आतां येईल धांवोन । येथें काईं करणें लागे संदेह ॥ २ ॥ गायनाचा आतां कोठें
उरला काळ । आनंद सकळ भरी आलें ॥ ३ ॥ देवाच्या सख्यत्वें विषमासी ठाव ।
मध्यें कोठें वाव राहों शके ॥ ४ ॥ तेव्हां जाली अवघी बाधा वाताहात । प्रेम
हृदयांत प्रवेशले ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्हीं जिंतिलें भरंवसा । देव कोठें
दासां मोकलितो ॥ ६ ॥
१६३३. शरण आले त्यासी नेदावी जी पाठी । ऐका
जगजेठी विज्ञापना ॥ १ ॥ आळवी तयासी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी
विज्ञापना ॥ २ ॥ गांजिलियाचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे
॥ ३ ॥ भागलियाचा होईं रे विसावा । परिसावी केशवा विज्ञापना ॥ ४ ॥ अंकिताचा
भार वागवावा माथां । परिसावी अनंता विज्ञापना ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्हां
विसरावें ना देवा । परिसावी केशवा विज्ञापना ॥ ६ ॥ (धृ. नाही)
१६३४.
जीवनावांचूनी तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतों जीवा ॥ १ ॥ न संपडे झालें
भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ २ ॥ मातेचा वियोग झालिया हो बाळा । हा तो
कळवळा जाणा देवा ॥ ३ ॥ सांगावे ते किती तुम्हांसी प्रकार । सकळांचे सार पाय
दावीं ॥ ४ ॥ येचि चिंते माझा करपला भीतर । कां नेणो विसर पडिला माझा ॥ ५ ॥
तुका म्हणे तूं हें जाणसी सकळ । यावरी कृपाळ होईं देवा ॥ ६ ॥ (धृ. नाही)
१६३५.
बाळ मातेपाशीं सांगे तहानभूक । उपायांचे दुःख काय जाणे ॥ १ ॥ तयापरीं करीं
पाळण हें माझें । घेऊनियां ओझें सकळ भार ॥ २ ॥ कासया गुणदोष आणिसील मना ।
सर्व नारायणा अपराधी ॥ ३ ॥ सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय
ऐसें ॥ ४ ॥ जेणें काळें पायीं अनुसरले चित्त । निर्धार हें हित झालें ऐसें ॥
५ ॥ तुका म्हणे तुम्हीं तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असो द्यावी ॥ ६
॥
१६३६. मागें शरणागत तारिले बहुत । म्हणती दीनानाथ तुज देवा ॥ धृ.
॥ पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ २ ॥
अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरू उपमन्या ॥ ३ ॥ गजेंद्रपशु
नाडिला जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥ ४ ॥ प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत ।
विषांचे अमृत तुझ्या नामें ॥ ५ ॥ पांडवां संकट पडतां जडभारी । त्यांचा तूं
कैवारी नारायणा ॥ ६ ॥ तुका म्हणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनियां मात शरण
आलों ॥ ७ ॥
१६३७. ऐसा माझा कोण आहे भीडभार । नांवाचा मी फार वायां
गेलों ॥ १ ॥ काय सेवा रुजू आहे सत्ताबळ । तें मज राऊळ कृपा करी ॥ २ ॥ काय
याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणें पडे वर्म तुझे ठायीं ॥ ३ ॥ कोण तपोनिधी
दानधर्मशीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥ ४ ॥ तुका म्हणे वांयां झालों भूमीभार
। होईल विचार काय नेणों ॥ ५ ॥
१६३८. साच मज काय कळों नये देवा ।
काय तुझी सेवा काय नव्हे ॥ १ ॥ करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें
वन न बोलावें ॥ २ ॥ शुद्ध माझा भाव होईल तुझे पायीं । तरीच हें देईं
निवडूनी ॥ ३ ॥ उचित अनुचित कळों आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥ ४
॥ तुका म्हणे मज पायांसवें चाड । सांगसी तें गोड आहे मज ॥ ५ ॥
१६३९.
करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥ १ ॥ देसी कीं न
देसी पायांचें दर्शन । म्हणऊनी मन स्थिर नाहीं ॥ २ ॥ बोलसी कीं न बोलसी
मजसवें देवा । म्हणोनियां जीवा भय वाटे ॥ ३ ॥ होईल कीं न होय तुज माझा आठव ।
पडिला संदेह हाचि मज ॥ ४ ॥ तुका म्हणे मी तों कमाईचा हीण । म्हणऊनी सीण
करीं देवा ॥ ५ ॥ (धृ. नाही)
१६४०. तुझा शरणागत जालों मी अंकित ।
करीं माझें हित पांडुरंगा ॥ १ ॥ पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळी
मायबापा । २ । अनाथाचा नाथ बोलतील संत । ऐकोनियां मात विश्वासलों ॥ 3 ॥ न
करावी निरास न धरावें उदास । देईं याचकास कृपादान ॥ ४ ॥ तुका म्हणे मी तों
पातकांची रासी । देई पायापासीं ठाव देवा ॥ ५ ॥
१६४१. नको
ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव । मी भक्त तूं देव ऐसें करीं ॥ १ ॥ दावी रूप मज
गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥ २ ॥ पाहोनी श्रीमुख देईन आलिंगन ।
जीवें निंबलोण उतरीन ॥ ३ ॥ पुसतां सांगेन हितगुज मात । बैसोनी एकांत
सुखगोष्टी ॥ ४ ॥ तुका म्हणे यासी न लावी उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥ ५
॥
१६४२. तुझा दास ऐसें म्हणती लोकपाळ । म्हणऊनी सांभाळ करी माझा ॥ १
॥ अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करी नाम ॥ २ ॥ माझे गुणदोष पाहातां
न लगे अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥ ३ ॥ नेणें तुझी कैसी करावी हे
सेवा । जाणसी तूं देवा अंतरीचें ॥ ४ ॥ तुका म्हणे तूं या कृपेचा सिंधु ।
तोडी भवबंधु माझा देवा ॥ ५ ॥
१६४३. इतुले करी देवा ऐकें हें वचन ।
समूळ अभिमान जाळी माझा ॥ १ ॥ इतुले करी देवा ऐकें हे गोष्टी । सर्व
समदृष्टीं तुज देखें ॥ २ ॥ इतुले करीं देवा विनवितों तुज । संतचरणरज वंदीं
माथां ॥ ३ ॥ इतुले करी देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥ ४
॥ भलतिया भावें तारी पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥ ५ ॥ (धृ.
नाही)
१६४४. कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें
पांडुरंगा ॥ १ ॥ कोणापाशीं आम्हीं सांगावें सुखदुःख । कोण तहानभूक निवारील ॥
२ ॥ कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥ ३ ॥ कोणापें
इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥ ४ ॥ कोणावरी आम्हीं
करावी हे सत्ता । होईल साहाता कोण दुजा ॥ ५ ॥ तुका म्हणे अगा स्वामी सर्व
जाणा । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥ ६ ॥ (धृ. नाही)
१६४५. काय कीर्ति
करूं लोक दंभ मान । दाखवी चरण तुझे मज ॥ १ ॥ मज आतां ऐसें नको करू देवा ।
तुझा दास जावा वांयांविण ॥ २ ॥ होईल थोरपणें जाणीवेचा भार । दुरावेन दूर
तुझ्या पायीं ॥ ३ ॥ अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एका देखोवेखीं ॥ ४
॥ तुका म्हणे तुझे पाय आतुडती । त्या मज विपत्ति गोड देवा ॥ ५ ॥ (धृ.
नाही)
१६४६. जाळा तुम्ही माझें जाणते मीपण । येणें माझा खून
मांडियेला ॥ धृ. ॥ खादलें पचे तरिच तें हित । ओकलिया थीत पिंड पीडी ॥ २ ॥
तरी भलें भोगें जोडिलें तें धन । पडिलिया खानें जीवनासी ॥ ३ ॥ तुका म्हणे
मज तारीं गा विठ्ठला । नेणताचि भला दास तुझा ॥ ४ ॥
१६४७. वेदपुरुष
तरी 'नेति' कां वचन । निवडूनि भिन्न दाखविलें ॥ १ ॥ तुझीं वर्में तूंचि
दावूनि अनंता । होतोसी नेणता कोण्या गुणें ॥ २ ॥ यज्ञाचा भोक्ता तरी कां
नव्हे सांग । उणें पडतां अंग क्षोभ घडे ॥ ३ ॥ वससील तूं या भूतांचे अंतरीं ।
तरी कां भेद हरी दावियेला ॥ ४ ॥ तपतीर्थाटणें तुझी मूर्तिदान । तरी कां
अभिमान आड येतो ॥ ५ ॥ आतां क्षमा कीजे विनवितो तुका । देऊनियां हाका उभा
द्वारीं ॥ ६ ॥
१६४८. लेंकराची आळी न पुरवी कैसी । काय तयापाशीं उणें
जालें ॥ १ ॥ आम्हां लडिवाळां नाहीं तें प्रमाण । कांहीं ब्रह्मज्ञान
आत्मस्थिति ॥ २ ॥ वचनाचा घेईन अनुभव पदरीं । जें हें जनाचारी मिरविलें ॥ ३ ॥
तुका म्हणे माझी भोळिवेची आटी । दावीन शेवटीं कौतुक हें ॥ ४ ॥
१६४९.
आमची कां नये तुम्हांसी करुणा । किती नारायणा आळवावें ॥ १ ॥ काय जाणां
तुम्ही दुर्बळाचें जिणें । वैभवाच्या गुणें आपुलिया ॥ २ ॥ देती घेती करिती
खटपटा आणिकें । निराळा कौतुकें पाहोनियां ॥ ३ ॥ दिवस बोटीं आम्हीं धरियेलें
माप । वाहातों संकल्प स्वहिताचा ॥ ४ ॥ तुका म्हणे मग देसी कोण्या काळें ।
चुकुर दुर्बळें होतों आम्ही ॥ ५ ॥
१६५०. आळवितां कंठ शोकला भीतर ।
आयुष्य वेंचे धीर नाहीं मना ॥ १ ॥ अझून कां नये हें तुझ्या अंतरा ।
दीनाच्या माहेरा पांडुरंगा ॥ २ ॥ धन दिसे डोळा दगडाचे परी । भोग ते शरीरीं
विष जाले ॥ ३ ॥ चुकलों काय तें मज क्षमा करी । आळिंगूनी हरी प्रेम द्यावें ॥
४ ॥ अवस्था राहिली रूपाची अंतरीं । बाहेर भीतरी सर्वकाळ ॥ ५ ॥ तुका म्हणे
माझे सकळ उपाय । पांडुरंगा पाय तुझे आतां ॥ ६ ॥
१६५१. तुज न करितां
काय नव्हे एक । हे तों सकळिक संतवाणी ॥ १ ॥ घेईं माझा भार करी कइवार ।
उतरी हा पार भवसिंधु ॥ २ ॥ उचित अनुचित पापपुण्यकाला । हा तों नये मला
निवडितां ॥ ३ ॥ कुंठित राहिली बोलतां बोलतां । पार न पवतां वाणी पुढें ॥ ४ ॥
पुसतांही कोणा न कळे हें गुज । राखे आतां लाज पांडुरंगा ॥ ५ ॥ तुका म्हणे
बहु पाहिलें या जीवें । वर्म जालें ठावें नाम तुझें ॥ ६ ॥
१६५२.
आतां होई माझे बुद्धीचा जनिता । आवरावें चित्ता पांडुरंगा ॥ १ ॥ येथूनियां
कोठें न वजे बाहेरी । ऐसें मज धरी सत्ताबळें ॥ २ ॥ अनावर गुण बहुतां
जातींचे । न बोलावें वाचे ऐसें करी ॥ ३ ॥ तुका म्हणे हित कोणिये जातीचें ।
तुज ठावें साचें मायबापा ॥ ४ ॥
१६५३. पोटीं शूळ अंगीं उटी चंदनाची ।
आवडी सुखाची कोण तया ॥ १ ॥ तैसें मज कांगा केलें पंढरिराया । लौकिक हा
वांयां वाढविला ॥ २ ॥ ज्वरिलियापुढें वाढिलीं मिष्टान्नें । काय चवी तेणें
घ्यावी त्यांची ॥ ३ ॥ तुका म्हणे मढें शृंगारिलें वरी । तेचि जाली परी मज
देवा ॥ ४ ॥
१६५४. तळमळी चित्त दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली
॥ १ ॥ वचनींच संत पावले स्वरूप । माझें नेदी पाप योगा येऊं ॥ २ ॥ वेठीऐसा
करी भक्तिवेवसाव । न पवेचि जीव समाधान ॥ ३ ॥ तुका म्हणे कईं देसील विसांवा ।
पांडुरंगीं धांवा घेतें मन ॥ ४ ॥
१६५५. दाटे कंठ लागे डोळियां पाझर
। गुणाची अपार वृष्टि वरी ॥ १ ॥ तेणें सुखें छंदें घेईन सोहळा । होऊनि
निराळा पापपुण्यां ॥ २ ॥ तुझ्या मोहें पडो मागील विसर । अलाप सुस्वर करीन
कंठ ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें पाहिजे सौरस । तुम्हांविण रस गोड नव्हे ॥ ४ ॥
१६५६.
कासया या लोभें केलें आर्तभूत । सांगा माझे चित्त नारायणा ॥ १ ॥ चातकाचे
परी एकचि निर्धार । लक्षभेदी तीर फिरों नेणे ॥ २ ॥ सांवळें रूपडें चतुर्भुज
मूर्ति । कृष्णनाम चित्तीं संकल्प हा ॥ ३ ॥ तुका म्हणे करी आवडीसी ठाव ।
नको माझा भाव भंगों देऊं ॥ ४ ॥
१६५७. शृंगारिक माझीं नव्हतीं
उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥ १ ॥ न घलावा मधीं कामाचा विलंब ।
तुम्ही तों स्वयंभ करुणामूर्ति ॥ २ ॥ तुका म्हणे केलें सन्मुख वदन । देखतां
चरण पोटाळीन ॥ ३ ॥
१६५८. कां हो देवा कांहीं न बोलाचि गोष्टी । कां
मज हिंपुटी करीतसा ॥ १ ॥ कंठीं प्राण पाहें वचनाची वास । तों दिसे उदास
धरिलें ऐसें ॥ २ ॥ येणें काळें बुंथीं घेतलीसे खोळ । कां नये विटाळ होऊं
माझा ॥ ३ ॥ लाज वाटे मज म्हणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥ ४ ॥
१६५९.
प्रीतिचिया बोला नाहीं पेचपाड । भलतैसें गोड करूनि घेई ॥ १ ॥ तैसें
विठ्ठलराया तुज मज आहे । आवडीनें गाय नाम तुझें ॥ २ ॥ वेडे वांकडे बाळकाचे
बोल । करिती नवल मायबाप ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज येवो माझी दया । जीवींच्या
सखया जिवलगा ॥ ४ ॥
१६६०. मोल वेंचूनियां धुंडिती सेवका । आम्ही तरी
फुका मागों बळें ॥ १ ॥ नसतां जवळी हित फार करूं । जीवभाव धरूं तुझ्या पायीं
॥ २ ॥ नेदूं भोग आम्ही आपुल्या शरीरा । तुम्हांसी दातारा व्हावें म्हूण ॥ ३
॥ कीर्ति तुझी करूं आमुचे सायास । तूं कां रे उदास पांडुरंगा ॥ ४ ॥ तुका
म्हणे तुज काय मागों आम्ही । फुकाचे का "ना भी" म्हणसीना ॥ ५ ॥
१६६१.
पतित मिराशी शरण आलों तुज । राखीं माझी लाज पांडुरंगा ॥ धृ. ॥ तारियले भक्त
न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ २ ॥ द्रौपदी बहिणी वैरीं
गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥ ३ ॥ प्रल्हादाकारणें स्तंभी अवतार ।
माझा कां विसर पांडुरंगा ॥ ४ ॥ सुदामा ब्राह्मण दरिद्रे पीडिला । आपणाऐसा
केला पांडुरंगा ॥ ५ ॥ तुका म्हणे तुज शरण निजभावें । पाप निर्दाळावें
पांडुरंगा ॥ ६ ॥
१६६२. तुजलागीं माझा जीव झाला पिसा । अवलोकितों
दिशा पांडुरंगा ॥ १ ॥ सांडिला व्यवहार माया लोकाचार । छंद निरंतर हाचि मनीं
॥ २ ॥ आइकिलें कानीं तें रूप लोचन । देखावया सीण करिताती ॥ ३ ॥ प्राण हा
विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां कोणता
उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥ ५ ॥
१६६३. मागें बहुतां जनां
राखिलें आडणी । धांवसी निर्वाणीं नाम घेतां ॥ १ ॥ ऐसें ठावें झालें मज
बरव्या परी । म्हणऊनि करीं धांवा तुझा ॥ २ ॥ माझेविशीं तुज पडिला विसरू ।
आतां काय करूं पांडुरंगा ॥ ३ ॥ अझुनि कां नये तुम्हांसी करुणा । दुरी
नारायणा धरिलें मज ॥ ४ ॥ तुका म्हणे जीव जाऊं पाहे माझा । आतां केशीराजा
घाली उडी ॥ ५ ॥
१६६४. एक वेळ करी या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें
उगवूनि ॥ १ ॥ आठवीन पाय हा माझा नवस । रात्रींही दिवस पांडुरंगा ॥ २ ॥ बहु
दूरवरी भोगविलें भोगा । आतां पांडुरंगा सोडवावें ॥ ३ ॥ तुका म्हणे काया
करीन कुरवंडी । ओंवाळूनि सांडी मस्तक हें ॥ ४ ॥
१६६५. आणीक म्यां
कोणा यावें काकुलती । कोण कामा येती अंतकाळीं ॥ १ ॥ तूं वो माझी सखी होसी
पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहें ॥ २ ॥ काया वाचा मनें हेंचि आस करी ।
पाउलें गोजिरीं चिंतीतसें ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी पुरवी हे आस । घालीं
ब्रह्मरस भोजन हें ॥ ४ ॥
१६६६. कराल तें काय नव्हे जी विठ्ठला ।
चित्त द्यावें बोला बोबडिया ॥ १ ॥ सोडवूनि न्यावें काळचक्राहातीं । बहुत
विपत्ती भोगविल्या ॥ २ ॥ ज्यालें जीवों नेदी मारिलेंचि मरे । प्रारब्ध तें
उरे मागुतालें ॥ ३ ॥ तुका म्हणे दुजा खुंटला उपाय । म्हणवूनि पाय आठविले ॥ ४
॥
१६६७. तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलों विसरोन आपणासी ॥ १ ॥ लागेल
पालटें फेडावें उसणें । येणेंचिप्रमाणें पांडुरंगा ॥ २ ॥ तुमचे आवडी
संबंधाचा त्याग । घेतलासे लाग जगनिंदा ॥ ३ ॥ तुका म्हणे जैसा माझा जीव ओढे ।
तैसेंचि तिकडे पाहिजेल ॥ ४ ॥
१६६८. जन्म मृत्यु फार झाले माझ्या
जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥ १ ॥ सिणलों बहुत करितां येरझारा ।
रखुमाईच्या वरा पावें वेगीं ॥ २ ॥ तुका म्हणे तूं गा पतितपावन । घेई माझा
शीण जन्मांतर ॥ ३ ॥
१६६९. प्रीति नाहीं राया वर्जिली ते कांता । परी
तिची सत्ता जगावरी ॥ १ ॥ तैसे दंभें जालो तरी तुझें भक्त । वास यमदूत न
पाहाती ॥ २ ॥ राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणिकां दंडवेल ॥ ३ ॥
बाहात्तर खोडी परी देवमण कंठीं । तैसा मी जगजेठी म्हणे तुका ४ ॥
१६७०.
जैसी तैसी तरी वाणी । मना आणी माउली ॥ १ ॥ लेकरांच्या स्नेहें गोड । करी
कोड त्या गुणे ॥ २ ॥ मागें पुढें रिघे पोटीं । साहे खेटी करी तें ॥ ३ ॥
तुका विनवी पांडुरंगा । ऐसें पैंगा आहे हें ॥ ४ ॥
१६७१. म्हणऊनि
धरिले पाय । अवो माय विठ्ठले ॥ १ ॥ आपुलेंचि करूनी घ्यावें । आश्वासावें
"ना भी" सें ॥ २ ॥ वाढली ते तळमळ चित्ता । शम आतां करावी ॥ ३ ॥ तुका म्हणे
जीवीं वसे । मज नसे वेगळा ॥ ४ ॥
१६७२. बाळ माते लातेवरी । मारी
तेणें संतोषे ॥ १ ॥ सुख वसे चित्ता अंगीं । तें हें रंगी मिळालें ॥ २ ॥
भक्षी त्याचा जिवमाग । आला भाग तो बरा ॥ ३ ॥ तुका म्हणे ऋणानुबंधें । सांगे
सुधें सकळांसी ॥ ४ ॥
१६७३. पांडुरंगे पांडुरंगे । माझे गंगे
माउलिये ॥ १ ॥ पान्हा घालीं प्रेमधारा । पूर क्षीरा लोटों दे ॥ २ ॥ अंगे
अंग मेळउनी । करी धणी फेडावया ॥ ३ ॥ तुका म्हणे घेईन उड्या । सांडिन कुड्या
भावना ॥ ४ ॥
१६७४. जाणतें लेंकरूं । माता लागे दूर धरूं ॥ १ ॥
तैसें न करीं कृपावंते । पांडुरंगे माझे माते ॥ २ ॥ नाहीं मुक्ताफळा । भेटी
मागुती त्या जळा ॥ ३ ॥ तुका म्हणे लोणी । ताक सांडी निवडूनी ॥ ४ ॥
१६७५.
बाळाचें जीवन । माता जाणें भूक ताहान ॥ १ ॥ काय करूं विनवणी । असो मस्तक
चरणीं ॥ २ ॥ ठेविलिये ठायीं । चित्त ठेवूनि असे पायीं ॥ ३ ॥ करितों हे सेवा
। चिंतन सर्वां ठायीं देवा ॥ ४ ॥ न्यून तेंचि पुरें । घ्यावें करोनि
दातारें ॥ ५ ॥ तुका म्हणे बुद्धि । अल्प असे अपराधी ॥ ६ ॥
१६७६.
बैसों पाठिमोरी । मना वाटे तैसें करीं ॥ १ ॥ परी तूं जाणसी आवडी । बाळा
बहुतांची परवडी ॥ २ ॥ आपुलाल्या इच्छा । मागों जया व्हावें तैसा ॥ ३ ॥ तुका
म्हणे आई । नव्हसी उदास विठाई ॥ ४ ॥
१६७७. गंगा गेली सिंधुपाशीं ।
जरी तो ठाव नेदी तिशी ॥ १ ॥ तिणें जावें कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥
२ ॥ जळ क्षोभलें जळचरां । माता बाळा नेदी थारा ॥ ३ ॥ तुका म्हणे आलों शरण ।
देवा त्वां कां धरिलें मौन ॥ ४ ॥
१६७८. आळस आला अंगा । धांव घाली
पांडुरंगा ॥ धृ. ॥ सोसूं शरीराचे भाव । पडती अवगुणांचे घाव ॥ २ ॥ करावीं
व्यसनें । दुरी येऊनि नारायणें ॥ ३ ॥ जवळील दुरी । झालों देवा धरीं करीं ॥ ४
॥ म्हणऊनि देवा । वेळोवेळां करी धांवा ॥ ५ ॥ तुका म्हणे पांडुरंगा । दुरी
धरूं नको अंगा ॥ ६ ॥
१६७९. आश्वासावे दास । तरी घडतो विश्वास ॥ १ ॥
नाहीं चुकत चाकरी । पुढें लाडेशाची थोरी ॥ २ ॥ स्वामीच्या उत्तरें । सुख
वाटे अभयकरें ॥ ३ ॥ न मगें परी भातें । तुका म्हणे निढळ रितें ॥ ४ ॥
१६८०.
आतां पाविजेल घरा । या दातारा संगती ॥ १ ॥ पायावरी ठेवूनि माथा । सर्वथा
हा नुपेक्षी ॥ २ ॥ येथून तेथवरी आतां । नाहीं सत्ता आणिकांची ॥ ३ ॥ तुका
म्हणे चक्रपाणि । शिरोमणी बळियांचा ॥ ४ ॥
१६८१. हेंचि वारंवार ।
पडताळुनी उत्तर ॥ १ ॥ करितों पायांसी विनंती । नुपेक्षावें कमळापती ॥ २ ॥
गंगोदक गंगे । अर्घ्य द्यावें पांडुरंगे ॥ ३ ॥ जोडोनियां हात । तुका करी
प्रणिपात ॥ ४ ॥
१६८२. आपण तों असा । समर्थ जी हृषीकेशा ॥ १ ॥ करा
करा बुझावणी । काय विलंब वचनीं ॥ २ ॥ हें घे ऐसें म्हणा । उठूनि लागेन चरणा
॥ ३ ॥ घेउनियां सुखें । नाचे तुका कवतुकें ॥ ४ ॥
१६८३. तुझे
दारींचा कुतरा । नको मोकलूं दातारा ॥ १ ॥ धरणें घेतलें द्वारांत । नको
धरूनी उठवूं हात ॥ २ ॥ घातली मुरकुंड । झालों शिरोमणी लंड ॥ ३ ॥ तुका म्हणे
जगजीवना । ब्रीद पाहें नारायणा ॥ ४ ॥
१६८४. सांडियेली काया । वरी
ओंवाळूनी पायां ॥ १ ॥ शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना ॥ २ ॥ आलों
लोटांगणीं । रुळें तुमचे चरणीं ॥ ३ ॥ तुका म्हणे शिर । ठेवियेलें पायांवर ॥
४ ॥
१६८५. यावें माहेरास । हेंच सर्वकाळ आस ॥ १ ॥ घ्यावी
उच्छिष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ २ ॥ भोग उभा आड । आहे तोंवरीच नाड ॥
३ ॥ तुका म्हणे देवें । माझें सिद्धी पाववावें ॥ ४ ॥
१६८६. असो
खटपट । आतां वाऊगे बोभाट ॥ १ ॥ परिसा हे विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ २ ॥
अपराध करा । क्षमा घडले दातारा ॥ ३ ॥ तुका म्हणे व्यथा । तुम्हां कळे
पंढरीनाथा ॥ ४ ॥
१६८७. बहु जन्मांतरें फेरे । केले ये रे सोडवी ॥ १ ॥
आळवितों करुणाकरे । विश्वंभरे दयाळे ॥ २ ॥ वहावतों मायापुरीं । येथें करी
कुडावा ॥ ३ ॥ तुका म्हणे दुजा कोण । ऐसा सीण निवारी ॥ ४ ॥
१६८८.
द्वारपाळ विनंती करी । उभे द्वारीं राउळा ॥ १ ॥ आपुलिया शरणागता । वाहों
चिंता नेदावी ॥ २ ॥ वचना या चित्त द्यावें । असो ठावें तुम्हांसी ॥ ३ ॥
तुका म्हणे कृपासिंधु । दीनबंधू केशवा ॥ ४ ॥
१६८९. उशीर कां केला ।
कृपाळुवा जी विठ्ठला ॥ १ ॥ मज दिलें कोणा हातीं । काय मानिली निश्चिंती ॥ २
॥ कोठवरी धरूं धीर । आतां मन करूं स्थिर ॥ ३ ॥ तुका म्हणे जीव । ऐसी
भाकितसे कींव ॥ ४ ॥
१६९०. कोण दुजें हरी सीण । शरण दीन आल्याचा ॥ १ ॥
तुम्हांविण जगदिशा । उदार ठसा त्रिभुवनीं ॥ २ ॥ कोण ऐसें वारी पाप । हरी
ताप जन्माचा ॥ ३ ॥ तुका म्हणे धांव घाली । कोण चाली मनाची ॥ ४ ॥
१६९१.
धांवा शीघ्रवत । किंवा घ्यावें दंडवत ॥ १ ॥ तुमचा जातो बडिवार । आम्ही
होतों हीनवर ॥ २ ॥ न धरावा धीर । धांवा नका चालों स्थिर ॥ ३ ॥ तुका म्हणे
वाणी । माझी लाजली जी गुणीं ॥ ४ ॥
१६९२. न करीं उदास । माझी पुरवावी
आस ॥ १ ॥ ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥ २ ॥ मायबाप बंधुजन ।
तूंचि सोयरा सज्जन ॥ ३ ॥ तुका म्हणे तुजविरहित । कोण करिल माझें हित ॥ ४ ॥
१६९३.
आतां काशासाठीं दुरी । अंतर उरी राखिली ॥ १ ॥ करीं लवकरी मूळा । लहान तळा
मुळीचिया ॥ २ ॥ दोहीं ठायीं उद्वेगवाणें । दरुषणें निश्चिंती ॥ ३ ॥ तुका
म्हणे वेग व्हावा । ऐसी जीवा उत्कंठा ॥ ४ ॥
१६९४. उसंतिल्या
कर्मवाटा । बहु मोठा आघात ॥ १ ॥ शीघ्र यावें शीघ्र यावें । हातीं न्यावें
धरूनि ॥ २ ॥ भागलों या खटपटें । घटपटें करितां ॥ ३ ॥ तुका म्हणे कृपावंता ।
माझी चिंता खंडावी ॥ ४ ॥
१६९५. मज अनाथाकारणें । करीं येणें केशवा ॥
१ ॥ जीव झुरे तुजसाठीं । वाट पोटीं पहातुसें ॥ २ ॥ चित्त रंगलें चरणीं ।
तुजवांचूनि न राहे ॥ ३ ॥ तुका म्हणे कृपावंता । माझी चिंता असावी ॥ ४ ॥
१६९६.
जोडिलें अंजुळ । असें दाना उताविळ ॥ १ ॥ पहा पहा कृपादृष्टी । आणा अनुभवा
गोष्टी ॥ २ ॥ तूं स्वामी मी सेवक । आइक्य तें एका एक ॥ ३ ॥ करितों विनंती ।
तुका सन्मुख पुढती ॥ ४ ॥
१६९७. पदोपदीं पायां पडणें । करुणा जाण
भाकावी ॥ १ ॥ ये गा ये गा विसांविया । करुणा दयासागरा ॥ २ ॥ जोडोनियां
करकमळ । नेत्रीं जळ भरोनि ॥ ३ ॥ तुका उभा दानपात्र । पुरवी आर्त विठोबा ॥ ४
॥
१६९८. आम्ही उतराई । भाव निरोपोनि पायीं ॥ १ ॥ तुम्ही पुरवावी
आळी । करावी ते लडिवाळीं ॥ २ ॥ आमचा हा नेम । तुम्हां उचित हा धर्म ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । जाणों सांगितली सेवा ॥ ४ ॥
१६९९. आतां दुसरें
नाहीं मनीं । निरंजनीं पडिलों ॥ १ ॥ तुमचीच पाहें वास । अवघी आस निरसली ॥ २
॥ मागिलांचा मोडला माग । घडला त्याग अरुची ॥ ३ ॥ तुका म्हणे करुणाकरा ।
तूं सोयरा दीनांचा ॥ ४ ॥
१७००. आतां आहे नाहीं । न कळे आळीकरा
कांहीं ॥ १ ॥ देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरीनिवासा ॥ २ ॥ नेणें भाग सीण ।
दुजें कोणी तुम्हांविण ॥ ३ ॥ आतां नव्हे दुरी । तुका पायी मिठी मारी ॥ ४ ॥
१७०१.
समर्थाची धरिली कास । आतां नाश काशाचा ॥ १ ॥ धांवें पावें करीन लाहो ।
तुमचा आहों विठ्ठला ॥ २ ॥ नलगे मज पाहाणें दिशा । हाकेसरिसा ओढसी ॥ ३ ॥
तुका म्हणे नव्हे धीर । तुम्हां स्थिर दयेनें ॥ ४ ॥
१७०२. येणें
पांगें पायांपाशीं । निश्चयेसी राहेन ॥ १ ॥ सांगितली करीन सेवा । सकळ देवा
दास्यत्व ॥ २ ॥ बंधनाची तुटली बेडी । हेचि जोडी मग आम्हां ॥ ३ ॥ तुका म्हणे
नव्हे क्षण । पायांविण वेगळा ॥ ४ ॥
१७०३. माझें जड भारी । आतां
अवघें तुम्हांवरी ॥ १ ॥ जालों अंकित अंकिला । तुमचा मुकलों मागिला ॥ २ ॥
करितों जें काम । माझी सेवा तुझें नाम ॥ ३ ॥ तुका पायां लागे । कांहीं नेदी
ना न मागें ॥ ४ ॥
१७०४. जालों तंव साचें । दास राहवणें काचें ॥ १ ॥
हें कां मिळतें उचित । तुम्ही नेणां कृपावंत ॥ २ ॥ सिंहाचें तें पिलें ।
जाय घेऊनिया कोल्हें ॥ ३ ॥ तुका म्हणे नास । आम्हां म्हणविल्या दास ॥ ४ ॥
१७०५.
इंद्रियांचीं दीनें । आम्ही केलो नारायणें ॥ १ ॥ म्हणऊनि ऐसे सोसी । काय
सांगों कोणापाशीं ॥ २ ॥ नाहीं अंगीं बळ । त्याग करिजेसा सकळ ॥ ३ ॥ तुका
म्हणे मोठें । प्रारब्ध हें होतें खोटें ॥ ४ ॥
१७०६. पसरूनि राहिलों
बाहो । सोयी अहो तुमचिये ॥ १ ॥ आतां यावें लागवेगें । पांडुरंगें धांवत ॥ २
॥ बैसायाची इच्छा कडे । चाली खडे रुपताती ॥ ३ ॥ तुका म्हणे कृपाळूवा ।
करणें सेवा लागली ॥ ४ ॥
१७०७. दर्शनाचें आर्त जीवा । बहु देवा
राहिलें ॥ १ ॥ आतां जाणसी तें करीं । विश्वंभरीं काय उणें ॥ २ ॥ येथें जरी
उरे चिंता । कोण दाता याहूनी ॥ ३ ॥ तुका म्हणे जाणवलें । आम्हा भलें
एवढेंचि ॥ ४ ॥
१७०८. बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं ॥ १ ॥
परिसावी हे विज्ञापना । आम्हां दीनां दासांची ॥ २ ॥ चिंतूनियां आले पाय ।
त्यांसी काय वंचना ॥ ३ ॥ तुका म्हणे पुरुषोत्तमा । करा क्षमा अपराध ॥ ४ ॥
१७०९.
बहु वाटे भय । माझे उडी घाला दये ॥ १ ॥ फांसा गुंतलों लिगाडीं । न चले बळ
चरफडी ॥ २ ॥ कुंठितचि युक्ति । माझ्या जाल्या सर्व शक्ति ॥ ३ ॥ तुका म्हणे
देवा । काममोहें केला गोवा ॥ ४ ॥
१७१०. आणीक कांहीं नेणें । असें
पायांच्या चिंतनें ॥ १ ॥ माझा न व्हावा विसर । नाहीं आणीक आधार ॥ २ ॥
भांडवल सेवा । हाचि ठेवियला ठेवा ॥ ३ ॥ करीं मान भावा । तुका विनंती करी
देवा ॥ ४ ॥
१७११. काय जाणों वेद । आम्ही आगमाचे भेद ॥ १ ॥ एक रूप
तुझें मनीं । धरूनि राहिलों चिंतनीं ॥ २ ॥ कोठें अधिकार । नाहीं रानट विचार
॥ ३ ॥ तुका म्हणे दीना । नुपेक्षावें नारायणा ॥ ४ ॥
१७१२.
जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥ १ ॥ हेंचि माझें भांडवल । जाणे कारण
विठ्ठल ॥ २ ॥ भाकितों करुणा । आतां नुपेक्षावें दीना ॥ ३ ॥ तुका म्हणे डोई ।
ठेवीं वेळोवेळां पायीं ॥ ४ ॥
१७१३. उमटे तें ठायीं । तुझे
निरोपावें पायीं ॥ १ ॥ आम्ही करावें चिंतन । तुझें नामसंकीर्तन ॥ २ ॥ भोजन
भोजनाच्या काळीं । मागों करूनियां आळी ॥ ३ ॥ तुका म्हणे माथां । भार तुझ्या
पंढरीनाथा ॥ ४ ॥
१७१४. जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे ॥ १
॥ कंठ कंठा मिळों देईं । माझा वोरस तूं घेईं ॥ २ ॥ नको पीतांबर । सांवरूं
हे अळंकार ॥ ३ ॥ टाकीं वो भातुके । लौकिकाचें कवतुकें ॥ ४ ॥ हातां पायां
नको । कांहीं वेगळालें राखों ॥ ५ ॥ तुका म्हणे यावरी । मग सुखें अळंकारीं ॥
६ ॥
१७१५. क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥ १ ॥ आतां झडझडां
चालें । देईं उचलोनी पाउलें ॥ २ ॥ सांडी हंसगती । बहु उत्कंठा हे चित्तीं ॥
३ ॥ तुका म्हणे आई । श्रीरंगे विठाबाई ॥ ४ ॥
१७१६. मथुरेच्या राया ।
माझें दंडवत पायां ॥ १ ॥ तुमचे कृपेचें पोसणें । माझा समाचार घेणें ॥ २ ॥
नाम धरिलें कंठीं । असें आर्तभूत पोटीं ॥ ३ ॥ जीवींचें ते जाणां । तुका
म्हणे नारायणा ॥ ४ ॥
१७१७. पतितपावना । दीनानाथा नारायणा ॥ १ ॥
तुझें रूप माझे मनीं । राहो नाम जपो वाणी ॥ २ ॥ ब्रह्मांडनायका ।
विश्वजनाच्या पाळका ॥ ३ ॥ जीवींचिया जीवा । तुका म्हणे देवदेवा ॥ ४ ॥
१७१८.
धेनु चरे वनांतरीं । चित्त बाळकापें घरीं ॥ १ ॥ तैसें करीं वो माझे आई ।
ठाव देऊनि राखें पायीं ॥ २ ॥ काढितां तळमळी । जिवनाबाहेरी मासोळी ॥ ३ ॥
तुका म्हणे कुडी जीवाप्राणांची आवडी ॥ ४ ॥
१७१९. आळवीन स्वरें ।
कैशा मधुरा उत्तरें ॥ १ ॥ ये वो ये वो पांडुरंगे । प्रेमपान्हा मज दे गे ॥ २
॥ पसरूनि चोंची । वचनें हीं करुणेचीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बळी । आम्ही
लडिवाळें आळीं ॥ ४ ॥
१७२०. सकळिकांचे समाधान । नव्हे देखिल्यावांचून
॥ १ ॥ रूप दाखवीं रे आतां । सहस्रभुजांच्या मंडिता ॥ २ ॥ शंखचक्रपद्मगदा ।
गरुडासहित ये गोविंदा ॥ ३ ॥ तुका म्हणे कान्हा । भूक लागलीं नयनां ॥ ४ ॥
१७२१.
येगा येगा पांडुरंगा । घेईं उचलुनि वोसंगा ॥ १ ॥ ऐसी असोनियां वेसी ।
दिसतों मी परदेशी ॥ २ ॥ उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥ ३ ॥ तुज आड
कांहीं । बळ करी ऐसे नाहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे हृषीकेशी । काय उशीर लाविलासी ॥
५ ॥
१७२२. अल्प माझी मती । म्हणोनि येतों काकुलती ॥ १ ॥ आतां दाखवा
दाखवा । तुमचीं पाउलें केशवा ॥ २ ॥ धीर माझ्या मना । नाहीं नाहीं नारायणा ॥
३ ॥ तुका म्हणे दया । मज करा अभागिया ॥ ४ ॥
१७२३. कोणें साक्षीविण ।
केलें उधारा भजन ॥ १ ॥ ऐसें सांगा जी दातारा । माझी भक्ति परंपरा ॥ २ ॥
कोणें केली नाहीं आळी । ब्रह्मज्ञानाहुनि वेगळी ॥ ३ ॥ कोणाचें त्वां कोड ।
नाहीं पुरविला लाड ॥ ४ ॥ कोणाच्या उद्धारा । केला विलंब माघारा ॥ ५ ॥ तुका
म्हणे भिन्न । कां हे बोला साक्षीविण ॥ ६ ॥
१७२४. माझें जीवन तुझे
पाय । कृपाळू तूं माझी माय ॥ १ ॥ नेदीं दिसों किविलवाणें । पांडुरंगा तुझें
तान्हें ॥ २ ॥ जन्ममरण तुजसाठीं । आणीक नेणें दुजी गोठी ॥ ३ ॥ तुका म्हणे
तुजविण । कोण हरिल माझा सीण ॥ ४ ॥
१७२५. काय आम्ही केलें ऐसें ।
नुद्धरीजेसें सांगावें ॥ धृ. ॥ हरण कोल्हें वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार
॥ २ ॥ गजा नाड्या सरोवरीं । नाहीं हरी विचारिलें ॥ ३ ॥ तुका म्हणे गणिका
नष्ट । माझे कष्ट त्याहून ॥ ४ ॥
१७२६. काय न्यून आहे सांगा ।
पांडुरंगा तुम्हांपें ॥ १ ॥ आमुची तों न पुरे इच्छा । पिता ऐसा मस्तकीं ॥ २
॥ कैसी तुम्हां होते सांडी । करुणा तोंडीं उच्चारें ॥ ३ ॥ आश्चर्यचि करी
तुका । हे नायका वैकुंठीच्या ॥ ४ ॥
१७२७. न पवीजे तया ठाया । आलों
कायाक्लेशेसीं ॥ १ ॥ आतां माझें आणी मना । नारायणा ओजेचें ॥ २ ॥ बहु रिणें
पिडिलों फार । परिहार करावा ॥ ३ ॥ तुका म्हणे निर्बळशक्ति । काकुलती म्हूण
येतों ॥ ४ ॥
१७२८. कळों येतें वर्म । तरी न पवतों श्रम ॥ १ ॥
तुम्हां शिरीं होता भार । आम्हां कैंचा संसार ॥ २ ॥ होतें अभयदान । तरी
स्थिर होतें मन ॥ ३ ॥ तुका म्हणे पाहें । ऐसी वाट उभा आहे ॥ ४ ॥
१७२९.
तुम्ही तों सदैव । अधीरपणें माझी हांव ॥ १ ॥ जळो आशेचें तें जिणें ।
टोंकतसावें दीनपणें ॥ २ ॥ येथूनि सोडवा । आतां अनुभवें देवा ॥ ३ ॥ तुका
म्हणे झालें । एक मग हें निमालें ॥ ४ ॥
१७३०. धांवा केला धांवा ।
श्रम होऊं नेदी जीवा ॥ १ ॥ वर्षे अमृताच्या धारा । घेईं वोसंगा लेंकुरा ॥ २
॥ उशीर तो आतां । न करावा हेचि चिंता ॥ ३ ॥ तुका म्हणे त्वरें । वेग करीं
विश्वंभरे ॥ ४ ॥
१७३१. घालिती पव्हया । वाटे अनाथाच्या दया ॥ १ ॥
तैसें कां हो नये करूं । पांडुरंगा मज तारूं ॥ २ ॥ रोगियासि काढा । देऊनि
वारिताती पीडा ॥ ३ ॥ बुडत्यासाठीं उडी । घालिताती काय जोडी ॥ ४ ॥ झाडिताती
कांटें । पुढें मागिलांचे वाटे ॥ ५ ॥ तुका म्हणे भार । घेती भागल्यांचा फार
॥ ६ ॥
१७३२. शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ॥ १ ॥ त्याग करूं
नये खरें । ऐसें विचारावें बरें ॥ २ ॥ तुमचिया तोंडें । धर्मा धर्माचींच
खंडें ॥ ३ ॥ मजसाठीं देवा । कांहो लपविला हेवा ॥ ४ ॥ जाला सावधान । त्यासी
घालावें भोजन ॥ ५ ॥ तुका म्हणे पिता । वरी बाळाच्या तो हिता ॥ ६ ॥
१७३३.
कां जी माझे जीवीं । आळस ठेविला गोसावी ॥ १ ॥ येवढा घात आणीक काय ।
चिंतनासी अंतराय ॥ २ ॥ देहआत्मवादी । केला घात कुबुद्धी ॥ ३ ॥ तुका म्हणे
मन । कळवळी वाटे सीण ॥ ४ ॥
१७३४. आतां घेईं माझें । भार सकळही ओझें ॥
१ ॥ काय करिसी होई वाड । आलों पोटासीं दगड ॥ २ ॥ तूंचि डोळे वाती । होईं
दीपक सांगातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं । विचाराया चाड नाहीं ॥ ४ ॥
१७३५.
वाहावतों पुरीं । आतां उचित तें करीं ॥ १ ॥ माझी शक्ति नारायणा । कींव
भाकावी करुणा ॥ २ ॥ आम्हां ओढी काळ । तुझें क्षीण झालें बळ ॥ ३ ॥ तुका
म्हणे गोडी । जीवा मातेचिया ओढी ॥ ४ ॥
१७३६. तुम्ही तरी हो श्रीपती ।
माझी बहु हीन याती ॥ १ ॥ दोघे असों एके ठायीं । माझा माथा तुझे पायीं ॥ २ ॥
माझ्या दीनपणां पार । नाहीं बहु तूं उदार ॥ ३ ॥ तुका म्हणे पांडुरंगा । मी
ओहोळ तूं गंगा ॥ ४ ॥
१७३७. नाहीं तुम्हीं केला । अंगीकार तो
विठ्ठला ॥ १ ॥ सोंगें न पविजे थडी । माजी फुटकी सांगडी ॥ २ ॥ प्रेम नाहीं
अंगीं । भले म्हणविलें जगीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । मज वांयां कां चाळवा ॥
४ ॥
१७३८. संत मानितील मज । तेणें वाटतसे लाज ॥ १ ॥ तुम्ही कृपा
केली नाहीं । चित्त माझें मज ग्वाही ॥ २ ॥ गोविलों थाेरिवा । दुःख वाटतसे
जीवा ॥ ३ ॥ तुका म्हणे माया । आवरा हे पंढरीराया ॥ ४ ॥
१७३९. संत
पंढरीसी जाती । निरोप धाडी तया हातीं ॥ १ ॥ माझा न पडावा विसर । तुका
विनवितों किंकर ॥ २ ॥ केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥ ३ ॥
तुमचे पायीं पायतन । मोचे माझे तन मन ॥ ४ ॥ तांबुलाची पिकधरणी । ते मी असें
मुख पसरूनी ॥ ५ ॥ तुमची विष्ठा पंढरीराया । ते सारसुवी माझी काया ॥ ६ ॥
लागती पादुका । ते मी तळील मृत्तिका ॥ ७ ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । दुजें न
धरावें सर्वथा ॥ ८ ॥
१७४०. केला तैसा अंगीकार । माझा भार चालवीं ॥ १
॥ होऊं अंतराय बुद्धी । कृपानिधी नेदावी ॥ २ ॥ आम्ही तरी जडजीव । कैंचा
भाव पुरता ॥ ३ ॥ अनन्यभावें घ्यावी सेवा । आम्हां देवा घडेसी ॥ ४ ॥ तुझीं
आम्ही शरणागतें । कृपावंतें रक्षीजे ॥ ५ ॥ तुका म्हणे भाकूं कींव । असों
जीव जड आम्ही ॥ ६ ॥
१७४१. स्मरणाचे वेळें । व्हावें सावध न कळे ॥ १ ॥
पडिलों विषयांचे ओढी । कोणी न दिसेसें काढी ॥ २ ॥ भांडवल माझें । वेंच
झालें भूमि ओझें ॥ ३ ॥ तुका म्हणे कळे । तूंचि धांवें ऐसे वेळे ॥ ४ ॥
१७४२.
नेणें करूं सेवा । पांडुरंगा कृपाळुवा ॥ १ ॥ धांवे बुडतों मी काढीं ।
सत्ता आपुलिया ओढीं ॥ २ ॥ क्रियाकर्महीन । जालों इंद्रियां अधीन ॥ ३ ॥ तुका
विनंती करी । वेळोवेळां पाय धरी ॥ ४ ॥
१७४३. पापाची मी राशी ।
सेवाचोर पायांपाशीं ॥ १ ॥ करा दंड नारायणा । माझ्या मानाची खंडणा ॥ २ ॥ जना
हातीं सेवा । घेतों लंडपणें देवा ॥ ३ ॥ देव ना संसार । तुका दोहींकडे चोर ॥
४ ॥
१७४४. हातीं धरूं जावें । तेणें परतेंचि व्हावें ॥ १ ॥ ऐसा कां
हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ २ ॥ देव ना संसार । दोहीं ठायीं
नाहीं थार ॥ ३ ॥ तुका म्हणे पीक । भूमि नेदी न मिळे भीक ॥ ४ ॥
१७४५.
जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश ॥ १ ॥ ठाव द्यावा पायांपाशीं । मी तो
पातकांची राशी ॥ २ ॥ सकळही गोवा । माझा उगवूनि देवा ॥ ३ ॥ तुका म्हणे भय ।
करा जवळी तें नये ॥ ४ ॥
१७४६. विठोबा विसांविया विसांविया । पडों
देईं पायां ॥ धृ. ॥ बहु खेद क्षीण । आलों सोसुनियां वन ॥ २ ॥ बहुतां
काकुलती । आलों सोसिली फजिती ॥ ३ ॥ केली तुजसाठीं । तुका म्हणे येवढी आटी ॥
४ ॥
१७४७. गातों भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥ १ ॥ परी तूं
पतितपावन । करीं साच हें वचन ॥ २ ॥ मुखें म्हणवितों दास । चित्तीं माया
लोभ आस ॥ ३ ॥ तुका म्हणे दावीं वेष । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥ ४ ॥
१७४८.
करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥ १ ॥ वृत्ति राखा पायांपाशीं । वस्ती
धरूनि मानसीं ॥ २ ॥ पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥ ३ ॥ तुका म्हणे
दीन । त्याचा हरतिया सीण ॥ ४ ॥
१७४९. क्रियामतिहीन । एक मी गा तुझें
दीन ॥ १ ॥ देवा करावा सांभाळ । वारीं माझी तळमळ ॥ २ ॥ नको माझे ठायीं ।
गुणदोष घालूं कांहीं ॥ ३ ॥ अपराधाच्या कोटी । तुका म्हणे घाला पोटीं ॥ ४ ॥
१७५०
तुझे थोर थोर । भक्त करिती विचार ॥ १ ॥ जपतपादि साधनें । मज चिंतवेना मनें
॥ २ ॥ करुणावचनें । म्यां भाकावीं तुम्हां दीनें ॥ ३ ॥ तुका म्हणे घेईं ।
माझें थोडें फार ठायीं ॥ ४ ॥
१७५१. न संडवे अन्न । मज न सेंववे वन ॥
१ ॥ म्हणउनी नारायणा । कींव भाकितों करुणा ॥ २ ॥ नाहीं अधिकार । कांहीं
घोकाया अक्षर ॥ ३ ॥ तुका म्हणे थोडें । आयुष्य अवघेंचि कोडें ॥ ४ ॥
१७५२.
आयुष्य गेलें वायांविण । थोर झाली नागवण ॥ १ ॥ आतां धांवाधांव करी । काय
पाहातोसि हरी ॥ २ ॥ माझे तुझे याचि गती । दिवस गेले तोंडी माती ॥ ३ ॥ मन
वाव घेऊं नेदी । बुडवू पाहे भवनदी ॥ ४ ॥ पडिला विषयाचा घाला । तेणें
नागविलें मला ॥ ५ ॥ शरण आलों आतां धावें । तुका म्हणे मज पावें ॥ ६ ॥
१७५३.
जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥ १ ॥ नव्हों कोणाचीच कांहीं । तुझे
भरलिया वाहीं ॥ २ ॥ पारुषला संवसार । मोडली बैसण्याची थार ॥ ३ ॥ आतां म्हणे
तुका । देवा अंतरें राखों नका ॥ ४ ॥
१७५४. सांगों देवा नेणा काय ।
बोलाची ये आवडी ॥ १ ॥ वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ २ ॥
आवडीच्या करा ऐसें । अंतर्वासें जाणतसा ॥ ३ ॥ तुका म्हणे समाधानें । होईन
मनें मोकळा ॥ ४ ॥
१७५५. देह प्रारब्धाचे शिरीं । असोनि करी उद्वेग ॥
१ ॥ धांव घालीं नारायणा । माझ्या मना जागवीं ॥ २ ॥ ऐसीं चुकोनियां वर्मे ।
पीडा भ्रमे पावलों ॥ ३ ॥ तुका म्हणे कैंचा भोग । नव्हे रोग अंगींचा ॥ ४ ॥
१७५६.
आतां न म्हणें मी माझें । नेघें भार कांहीं ओझें ॥ १ ॥ तूंचि तारिता
मारिता । कळों आलासी निरुता ॥ २ ॥ अवघा तूंचि जर्नादन । संत बोलती वचन ॥ ३ ॥
तुका म्हणे कांहीं । माझें तिळभरी नाहीं ॥ ४ ॥
१७५७. विठ्ठल माझी
माय । आम्हां सुखा उणें काय ॥ १ ॥ घेतों अमृताची धणी । प्रेम वोसंडलें
स्तनीं ॥ २ ॥ क्रीडों वैष्णवांच्या मेळीं । करूं आनंदाच्या जळीं ॥ ३ ॥ तुका
म्हणे कृपावंत । ठेवीं आम्हांपाशीं चित्त ॥ ४ ॥
१७५८. हेंचि माझें
धन । तुमचे वंदावे चरण ॥ १ ॥ येणें भाग्यें असो जीत । एवढे समर्पूनी चित्त ॥
२ ॥ सांभाळिलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥ ३ ॥ जोडुनियां कर । तुका
विनवितों किंकर ॥ ४ ॥
१७५९. कोड आवडीचें । पुरविना बाळकाचें ॥ १ ॥
तेव्हां कैसी ते माउली । जाणा काशासाठीं व्याली ॥ २ ॥ वत्साचिये आसे । धेनु
धांवेना वोरसें ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं । बाळ टाकिलें वानरी ॥ ४ ॥
१७६०.
मायलेकरांत भिन्न । नाहीं उत्तरांचा सीण ॥ १ ॥ धाडीं धाडीं वो भातुकें ।
रंजविल्याचें कौतुकें ॥ २ ॥ करूनि नवल । याचें बोलिलों ते बोल ॥ ३ ॥ तुका
म्हणे माते । पांडुरंगे कृपावंते ॥ ४ ॥
१७६१. प्रीतीचा तो कळवळा ।
जिव्हाळाचि वेगळा ॥ १ ॥ बहु नेदी रडों माता । दुश्चित होतां धीर नव्हे ॥ २ ॥
वरी वरी तोंडापुरतें । मोहोरिते कळतसे ॥ ३ ॥ जाणोनियां नेणता तुका । नव्हे
लोकांसारिखा ॥ ४ ॥
१७६२. मागितल्यास आस करा । उरी धरा कांहींबाहीं ॥
१ ॥ म्हणऊनि सारिली आस । होती यास मूळ ते ॥ २ ॥ माझ्या मोहें तुज पान्हा ।
लोटे स्तना वोरसे ॥ ३ ॥ तुका म्हणे आळवणें । माझ्या देणें उत्तरा ॥ ४ ॥
१७६३.
चाळवणें काय । ऐसें अगे माझे माय ॥ १ ॥ धांव पाव लवलाहें । कंठीं प्राण
वाट पाहे ॥ २ ॥ पसरूनि कर । तुज चालिलों समोर ॥ ३ ॥ देशील विसांवा । तुका
म्हणे ऐशा हांवा ॥ ४ ॥
१७६४. आपुल्या महिमानें । धातु परिसें केलें
सोनें ॥ १ ॥ तैसे न मनीं माझे आतां । गुणदोष पंढरिनाथा ॥ २ ॥ गांवामागील
वोहोळ । गंगा न मनी अमंगळ ॥ ३ ॥ तुका म्हणे माती । केली कस्तुरीनें सरती ॥ ४
॥
१७६५. उपजलें मनीं । हें तों स्वामीची करणी ॥ १ ॥ होईल
प्रसादाचें दान । तरी हें कवतुक पाहेन ॥ २ ॥ येईल अभय जरी । तरी हे आज्ञा
वंदीन शिरीं ॥ ३ ॥ भक्तिप्रयोजना । प्रयोजावें बंदीजना ॥ ४ ॥ यश स्वामिचिये
शिरीं । दास्य करावें किंकरीं ॥ ५ ॥ तुका म्हणे आळीकरा । त्यासी योजावें
उत्तरा ॥ ६ ॥
१७६६. गातों नाचतों आनंदें । टाळघागरियाच्या छंदें ॥ १
॥ तुझीं तुजपुढें देवा । नेणों भाव कैसी सेवा ॥ २ ॥ नेणों ताल घात मात ।
भलते सवां पाय हात ॥ ३ ॥ लाज नाहीं शंका । प्रेमें धालों म्हणे तुका ॥ ४ ॥
१७६७.
बुद्धिहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥ १ ॥ हुंगों नये गोऱ्हवाडी ।
तेथें जोडी विटाळ ॥ २ ॥ अळसियाचें अंतर कुडें । जैसे मढें निष्काम ॥ ३ ॥
तुका म्हणे ऐशा हातीं । मज श्रीपती वांचवा ॥ ४ ॥
१७६८. आपुलें आम्ही
पुसिलें नाहीं । तुज कांहीं कारणें ॥ १ ॥ मागें मागें धांवत आलों । कांहीं
बोलों यासाठीं ॥ २ ॥ बहुत दिस होतें मनीं । घ्यावी धणी एकांतीं ॥ ३ ॥ तुका
म्हणे उभा राहें । कान्हो पाहें मजकडे ॥ ४ ॥
१७६९. अवघिया चाडा
कुंठित करूनि । लावीं आपुलीच गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना । करूनियां
देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों मिथ्या । संकल्प तो माझा तोडीं । तुझिये
चरणी माझे दोन्ही पक्ष । अवघी करूनि दाखवी पिंडी रे रे ॥ १ ॥ माझें साच काय
केलें मृगजळें । वर्ण याती कुळ अभिमान । कुमारी भातुकें खेळती कवतुकें ।
काय त्यांचें साचपण ॥ २ ॥ वेगळाल्या भावें चित्ता तडातोडी । केलों देशधडी
मायाजाळें । गोत वित्त माय बाप बहिणी सुत । बंधुवर्ग माझीं बाळें । एका एक न
धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळें । जाणोनियां त्याग सर्वस्वें केला
। सांभाळीं आपुलें जाळें ॥ ३ ॥ एका जवळी धरी आणिकां अंतरीं । तीं काय
सोयरीं नव्हतीं माझीं । एकाचें पाळण एकासी भांडण । चाड कवणिये काजीं । अधिक
असे उणें कवण कवण्या गुणें । हे माव न कळेचि तुझी । म्हणोनि चिंतनीं
राहिलों श्रीपती । तुका म्हणे भाक माझी ॥ ४ ॥
१७७०. कांहीं बोलिलों
बोबडें । मायबापा तुम्हांपुढें । सलगी लाडें कोडें । मज क्षमा करावी ॥ १ ॥
काय जाणावा महिमा । तुमचा म्या पुरुषोत्तमा । आवडीनें सीमा । सांडविली मज
हातीं ॥ २ ॥ घडे अवज्ञा सख्यत्वें । बाळें बापासी न भ्यावें । काय म्या
सांगावें । आहे ठावें तुम्हांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । प्रेम लोभ न
सांडावा । पाळिला पाळावा । लळा पुढती आगळा ॥ ४ ॥
१७७१. म्हणउनि
काकुलती । येतों पुढत पुढती । तुमचिया असे हातीं । कमळापती भांडार ॥ १ ॥
फेडूं आलेती दरिद्र । तरी नलगेचि उशीर । पुरे अभयकर । ठाया ठाव रंकासी ॥ २ ॥
कोठें न घली धांव । याजसाठीं त्यजिली हांव । घेऊं नेदी वाव । मना केला
विरोध ॥ ३ ॥ कारणांच्या गुणें । वेळ काळ तोही नेणें । तुमच्या कीर्तनें ।
तुका तुम्हां जागवी ॥ ४ ॥
१७७२. जों जों घ्यावा सोस । माझे वारीं
गर्भवास । लटिक्याचा दोष । अधिक जडे अंगासीं ॥ १ ॥ आतां आहे तैसें असो ।
अनुताप अंगीं वसो । येवढेंचि नसो । माझें आणि परावें ॥ २ ॥ जागा झालेपणें ।
काय असावें स्वप्ने । शब्दाचिया शिणें । कष्ट मिथ्या मानावें ॥ ३ ॥ छाये
माकड विटे । धांवे कूपीं काय भेटे । तुका म्हणे फुटे । डोई गुडघे कोंपर ॥ ४
॥
१७७३. काय करूं आतां या मना । न संडी विषयाची वासना ।
प्रार्थितांही राहेना । आदरें पतना नेऊं पाहे ॥ १ ॥ आतां धांवें धांवें गा
श्रीहरी । गेलों वायां नाहीं तरी । न दिसे कोणी आवरी । आणीक दुजा तयासी ॥ २
॥ न राहे एके ठायीं एक घडी । चित्त तडतडा तोडी । भरलें विषयभोवंडीं ।
घालूं पाहे उडी भवडोहीं ॥ ३ ॥ आशा तृष्णा कल्पना पापिणी । घात मांडला माझा
यांनीं । तुका म्हणे चक्रपाणी । काय अजोनि पाहातोसि ॥ ४ ॥
१७७४.
येईं गा तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण शीण वाटे क्षीण जाली काया ॥
धृ. ॥ याती हीन मती हीन कर्म हीन माझें । सर्व लज्जा सांडोनियां शरण आलों
तुज ॥ २ ॥ दीनानाथ दीनबंधु नाम तुज साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे
॥ ३ ॥ विटेवरी उभा नीट कटावरी कर । तुका म्हण हेचि आम्हां ध्यान निरंतर ॥ ४
॥
१७७५. काय करूं या मना आतां । कां विसरतें पंढरीनाथा । करि
संसाराची चिंता । वेळोवळां मागुती ॥ धृ. ॥ अधिक कोंडिता चरफडी । भलतीकडे
घाली उडी ॥ २ ॥ भजन नावडे श्रवण । धांवे विषय अवलोकून ॥ ३ ॥ बहुत चंचळ चपळ ।
जातां येतां नलगे वेळ ॥ ४ ॥ किती राखों दोनी काळ । निजलिया जागे वेळ ॥ ५ ॥
मज राखें आतां । तुका म्हणे पंढरीनाथा ॥ ६ ॥
१७७६. काय करूं जी
दातारा । कांहीं न पुरे संसारा ॥ १ ॥ जाली माकडाची परी । जातो तळा येतो वरी
॥ २ ॥ घालीं भलते ठायीं हात । होती शिव्या बैसे लात ॥ ३ ॥ आदि अंतीं तुका ।
सांगे न कळे झाला चुका ॥ ४ ॥
१७७७. प्रपंच वोसरो । चित्त तुझे
पायीं मुरो ॥ १ ॥ ऐसें करीं गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा ॥ २ ॥ पुरे
पुरे आतां । नको दुजियाची सत्ता ॥ ३ ॥ लटिकें तें फेडा । तुका म्हणे जाय
पीडा ॥ ४ ॥
१७७८. आधार तो व्हावा । ऐसी आस करी देवा ॥ १ ॥
तुम्हांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥ २ ॥ सेवेच्या अभिळासें । मन
बहु जालें पिसें ॥ ३ ॥ अरे भक्तपराधीना । तुका म्हणे नारायणा ॥ ४॥
१७७९.
जन्मा आलियाचा लाभ । पद्मनाभ दरुषणें ॥ १ ॥ म्हणवूनि लवलाहें । पाय आहे
चिंतित ॥ २ ॥ पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळू माउली ॥ ३ ॥ बहु उसंतीत आलों ।
तया भ्यालों स्थळासी ॥ ४ ॥ कोण्या उपायें हें घडे । भव आंगडें सुटकेचें ॥ ५
॥ तुका म्हणे तूं जननी । ये निर्वाणीं विठ्ठले ॥ ६ ॥
१७८०. पतित
पतित । परि मी त्रिवाचा पतित ॥ १ ॥ परि तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता
॥ २ ॥ नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायापाशीं बुद्धि ॥ ३ ॥ अपराधाचा केलों ।
तुका म्हणे किती बोलों ॥ ४ ॥
१७८१. वांयां जातों देवा । नेणें
भक्ती करूं सेवा ॥ १ ॥ आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ २ ॥
करावें तें काय । न कळे अवलोकितो पाय ॥ ३ ॥ तुका म्हणे दान । दिलें पदरीं
घेईन ॥ ४ ॥
१७८२. पुरली धांव कडिये घेईं । पुढें पायीं न चलवीं ॥ १
कृपाळुवे पांडुरंगे । अंगसंगे जिवलगे ॥ २ ॥ अवघी निवारावी भूक । अवघ्या
दुःख जन्माचें ॥ ३ ॥ तुका म्हणे बोलवेना । लावीं स्तना ईश्वरे ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment