Friday, 9 May 2025

लेख-५. तुकारामांची कविता : कांही विचार

-वा. ल. कुलकर्णी

येथे नुकत्याच येऊन गेलेल्या शेक्सपेरियन नाटक मंडळीनें करून दाखविलेले शेक्सपिअरच्या नाटकांतील कांहीं प्रवेश पाहिले; ते पाहत असतांना जे अनेक विचार मनांत आले त्यांतील एक असा होता कीं शेक्सपिअरनें आपली स्वतःची अशी भर इंग्रजी भाषेमध्ये किती म्हणून घातली आहे! ज्या नाटकांतील प्रवेश मी पाहिले त्यांतील कांहीं मी फार वर्षापूर्वी कां होईना परंतु काळजीपूर्वक वाचलीं होतीं; परंतु काहीं तर वाचलेलींही नव्हतीं; परंतु ह्या नाट्यप्रवेशांतील भाषणे ऐकतांना अशीं किती तरी वाक्ये, असे किती तरी शब्दप्रयोग, अशा किती तरी कल्पना कानावर येत होत्या, कीं त्यांच्याशीं आपला किती तरी दिवसांचा पूर्वपरिचय आहे ह्याची जाणीव मला होत होती. ज्याची मातृभाषा इंग्रजी नाहीं असा मी एक मनुष्य आहे; माझा जर हा अनुभव, तर ज्याची मातृभाषा इंग्रजी आहे अशा इंग्रज किंवा अमेरिकन गृहस्थाला काय अनुभव येत असेल? किती तरी अधिक पटीनें त्याला हाच अनुभव येत असणार. आपण जी भाषा बोलतों किंवा लिहितों, ती घडविण्यामध्ये तिच्यांतील शेक्सपिअरसारख्या लेखकांनीं किती म्हणून वांटा उचललेला असतो! जे भाषाप्रयोग, वाक्प्रचार किंवा शब्दप्रयोग आतां अगदीं रूढ झाल्यासारखे वाटतात, ते त्या समर्थ लेखकांनीं कांहीं शतकांपूर्वी नव्यानेंच निर्माण केलेले असतात. त्या लेखकांचे वाङ्मय जसजसें अधिकाधिक लोकमान्यता पावत जातें, तसतसे हे भाषाप्रयोग त्यांच्या वाङ्मयांतून लोकभाषेत अवतरूं लागतात, खेळूबागडूं लागतात; कांहीं दिवसांनीं स्वतंत्र घरें करून सुखानें नांदू लागतात. इतके कीं त्यांचा वापर करितांना त्यांच्या मूळ निर्मात्याचा विचार मग आपल्या मनाला चाटूनही जात नाहीं.

अशा रीतीनें आपलें वाङमयधन हें लोकधनाच्या पदवीला नेऊन पोंचविण्याचे भाग्य सगळ्याच लेखकांना लाभतें असें नाहीं. शेक्सपिअरसारख्या थोड्यांच्या कपाळीं हें भाग्य लिहिलेलें असतें. आपल्याकडे हें भाग्य माझ्या समुजतीप्रमाणें तुकारामांना विशेष लाभलेले आहे. तुकारामांची बरीचशी अभंगवाणी ही गेल्या तीनशे वर्षांच्या काळात महाराष्ट्रवाणीचा एक अविभाज्य घटक बनलेली आहे. गेल्या तीनशें वर्षाच्या काळांत महाराष्ट्रवाणीनें ह्या अभंग-वाणींतून किती तरी जीवनरस स्वबलसंवर्धनार्थ शोषून घेतलेला आहे. ज्ञानेश्वर हे तुकारामांपेक्षांही मोठा लेखक; परंतु हे भाग्य तुकारामांइतकें ज्ञानेश्वरांना लाभलेले नाहीं. ज्ञानेश्वरांचें नांव काढतांच मराठी मन आदरानें नम्र होतें; परंतु त्या आदराच्या पोटीं थोडी फार भीति असते. ज्ञानेश्वरांशीं मराठी वाचक बरोबरीच्या नात्यानें बोलूं बसू शकत नाहीं. ज्ञानेश्वरीचा रसास्वाद घेतांना देखील त्याला ज्ञानेश्वरांचे दूरत्व जाणवत असते. त्यामुळे ज्ञानेश्वरींतील ओव्या त्याच्या मननाचा, चिंतनाचा विषय होतात; परंतु तो कचित्च स्वतःशीं त्या गुणगुणतांना आढळतो. तुकारामांचा अभंग मात्र तो स्वतःशीं गुणगुणेल. त्या आपल्या आवडीच्या अभंगांतील चरण स्वतःशीं गुणगुणतांना त्याला कमालीचा आनंद होतो. तुकारामांबद्दल, काय असेल तें असो, पण दूरत्वाची, परकेपणाची भावना मराठी मनाला स्पर्शही करीत नाहीं. तें मन तुकारामांबरोबर नाचाबागडायला, हसायला आणि रडायला सदैव तयार असतें. तुकाराम हे आपल्यापैकींच एक आहेत, ते पुष्कळदा आपलेच विचार, विकार बोलून दाखवीत आहेत, आपल्याचसारखेच वैतागत आहेत, संतापत आहेत, मधूनच प्रसन्न होत आहेत, जे आपल्याला कांहीं केल्या साधत नाहीं तें त्यांनी साधलेलें असलें - अगदीं यशस्वीपणें साधलेले असले तरी ते साधतांना त्यांना आपल्यासारखेच अतोनात कष्ट पडलेले आहेत हें त्याला जाणवते व म्हणूनच तुकाराम त्याला जवळचे वाटतात. ज्ञानेश्वर हा मराठी वाचकासमोर ‘लहानाचा मोठा’ होत नाहीं. तो ‘मोठा’ होऊनच त्याच्यासमोर अवतरलेला आहे. तो कधीं तरी ‘लहान’ होता, हे कबूल करायला मराठी मन तयारच होत नाहीं. तेव्हां ज्ञानेश्वर त्याच्या नितांत आदराचा विषय झाला तरी तुकाराम हाच त्याच्या जिव्हाळ्याचा विषय बनतो. तुकोबांच्या अभंगवाणीनें हें जें मराठी मनाला स्वतःकडे आकषून घेतलें आहे त्याला इतर भाषांतील वाङ्मयांतही तोड सापडणें जरा कठीण आहे. त्यांचे एक गमक असे आहे, कीं तुकोबांच्या ह्या अभंगवाणीचें आकर्षण जसें सुशिक्षिताला आहे, तसेंच अशिक्षितालाही आहे, जसें शहरी मनाला आहे, तसेंच नव्हे, किती तरी पटीनें अधिक - खेडेगांवांतील मराठमोळ्या मनालाही आहे. असें भाग्य जगांतील किती लेखकांच्या वाट्याला येते? सामान्यांच्या आणि असामान्यांच्या प्रेमादराचा आणि कुतूहलाचा एकाच वेळीं विषय होण्याचें हें भाग्य! वारकऱ्यांच्या दिंडींतून ध्वजापताका हातांत घेऊन जाणारे लक्षावधि अशिक्षित स्त्रीपुरुष ज्याप्रमाणें ह्या अभंगवाणींत रंगून जातात, त्याचप्रमाणें भांडारकर, रानड्यांसारखे व्यासंगी व बुद्धिमान् विद्वानही त्या अभंगवाणीचा रसास्वाद घेऊं पाहतात, तिच्यावर भाष्य करितांना आढळतात. तुकारामांच्या अभंगवाणीला लाभलेले हें भाग्य खरोखरच अपूर्व आहे.

असे आहे म्हणूनच महाराष्ट्र-वाणीला ही अभंगावणी समृद्ध करूं शकली आहे. तुकारामांच्या अभंगांतील किती तरी चरण, अर्धचरण, शब्दप्रयोग, कल्पना व भाषाप्रयोग आपल्या हरघडीच्या बोली भाषेत अवतरलेले आहेत: त्यांतील कित्येकांना सुभाषितांची योग्यता प्राप्त झालेली आहे: ‘ कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति,’ ‘मोले घातलें रडाया, नाहीं आसूं आणि माया,’ ‘तुका म्हणे बरवें जाण । व्हावें लहानाहुनि लहान,’ ‘जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुलें । तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा’, ‘कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकारी मन’ असे तुकोबांच्या अभंगांतील किती तरी चरण ह्या ठिकाणीं माझ्या मनांत येतात. ‘ढेकणाच्या संगें हिरा तो भंगला’, ‘आंधळ्यासी जग अवघेचि आंधळे’, ‘दया, क्षमा, शांति । तेथें देवाची वसति’, ‘अवघे पोटासाठीं ढोंग । तेथें कैचा पांडुरंग’, ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति’, ‘साहोनिया टाकी घाये । पाषाण देवची झाला पाहें’, ‘ज्याचें जया ध्यान । तेंचि होय त्याचें मन’, ‘भयाचिये पोटीं दुःखाचिया राशी’, ‘निश्वयाचें बळ । तुका म्हणे तेंचि फळ’, - एकामागून एक आठवणाऱ्या ह्या तुकोबांच्या उक्ति आतां तुकोबांच्या राहिल्या नसून त्या तुमच्याआमच्या बनलेल्या आहेत. त्यांमधून जे विचार किंवा ज्या कल्पना व्यक्त झालेल्या आहेत व होत आहेत, त्या व्यक्त करितांना आतां आपणांस ह्या उक्तींचा उपयोग केलाच पाहिजे; आपण जर तो केला नाहीं किंवा करितांना चुकलों तर आपल्या अभिव्यक्तीमध्ये फार मोठी उणीव राहून गेली असेंच आपणांस वाटतें व पुष्कळदां ऐकणारालाही वाटतें. त्या कल्पनांचीं आणि विचारांचीं तीं तुकोबांनीं आपल्या शिक्क्याचीं पाडलेलीं नाणींच आहेत. तीं नाणीं वापरल्याशिवाय हा कल्पनाव्यापार किंवा विचारव्यापार चालावयाचाच नाहीं. ‘त्यानें संसार पाठमोरा केला आहे’, ‘सत्याला पाठपोट नसतें’, ‘जो जगाचे आघात सोसतो तोच संत’, ‘आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां’, ‘आम्ही ज्ञानाचे आंधळे भारवाही आहोंत’, ‘शुद्ध बीजापोटीं । फळे रसाळ गोमटीं’, ‘आम्ही आतां फक्त उपकारापुरते मागे उरलों आहोंत’, ‘अमुक गृहस्थ म्हणजे दारोदार भीक मागणारें लोभाचें मांजरच होत’, ‘टाकीचे घाव सोसल्याविना देवकळा येत नाहीं’, ‘आळशावर गंगा आली’ असे नाना प्रकारचे भाषाप्रयोग करितांना आपण तुकारामांचीच भाषा बोलत आहोत, ह्याची पुरेशी जाणीवही आपल्याला नसते; इतके हे भाषाप्रयोग मराठीशीं- म्हणजे आपल्या मायबोलीशीं - एकरूप झालेले आहेत.

परंतु तुकोबांच्या अभिव्यक्तींतच असे कांहीं तरी आहे कीं, ज्यामुळे तिला सुभाषितांची योग्यता स्वाभाविकच प्राप्त होते; थोडक्या आणि अत्यंत अर्थपूर्ण शब्दांत खूपसा अर्थ नव्हे, अनेक विश्वव्यापक अनुभव-सत्यें- व्यक्त करण्याची शक्ति तर तिच्यामध्यें आहेच, परंतु त्याशिवाय असें कीं ती छंदोबद्ध असल्यामुळे सुभाषिताला आवश्यक अशी अन्तर्बाह्य सुव्यवस्था आणि तालबद्धताही तिजमध्ये आहे; त्यामुळेच ती कानांवर पडतांच तेथे घर करून राहूं इच्छिते. त्यांच्या सर्वच अभंगांतील भाषेत हा व्यापक सत्याभिप्राय आणि ठसकेदारपणा आपणांस आढळतो. तात्यासाहेब केळकरांना तुकारामामध्ये terseness आढळला तो ह्यामुळेच. वास्तविक मौज अशी आहे कीं तुकोबांची अभंगरचना ऐसपैस आहे; अभंगांच्या लांबीरुंदीबद्दल, त्यांतील चरणसंख्येबद्दल तुकोबा फारशी कदर बाळगतांना कधींच दिसत नाहींत. ह्या बाबतींत ते मनःपूत रचना करितांना दिसतात. परंतु असे असूनही त्यांचा प्रत्येक अभंग जेथे संपावयाला पाहिजे, तेथेच संपतांना दिसतो. त्यांत अभिव्यक्त झालेल्या भावाला, विचाराला वा कल्पनेला तेवढ्या अभंगापुरती संपूर्णता व स्वयंपूर्णता आलेली असते. तुकोबांची प्रतिभा ही कितीही स्वैर सुटली, तरी भाव, विचार व कल्पना ह्यांतील सुसंगति ती कधींच नष्ट होऊं देत नाहीं. ती लक्षांत घेण्याइतका कलात्म औचित्यविचार तिच्या ठिकाणीं अंगभूतच दिसतो. प्रत्येक कलाकृति ही तिच्या मर्यादित क्षेत्रांत संपूर्ण आणि स्वयंपूर्ण असते; तुकारामांचा प्रत्येक अभंग ही अशीच कलाकृति आहे. परंतु तिच्यांत झालेल्या भावाभिव्यक्तीचे वैशिष्टयपूर्ण स्वरूप अधिक जवळून समजावून घेणें अगत्याचे आहे.

तुकारामांचे अभंग हे वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांचे ‘खडे बोल’ आहेत; त्यामुळे त्यातील अभिव्यक्तीमध्ये एक प्रकारचा रोखठोकपणा आहे, सरलत्व आहे. शब्दांची आणि कल्पनांची पिंजण तुकारामांनी कोठेंच केलेली नाहीं. भाव वाजवीपेक्षां अधिक कोठेही फुगविलेला नाहीं, शृंगारिलेला नाहीं किंवा त्याचा अकारण संकोचही केलेला नाहीं. तुकोबांची अभंगवाणी ही भावकविता खरी, परंतु ‘ज्यानें संसार जिंकला आहे’, जो ‘या देहाहूनि अतीत’ आहे, ‘चित्त ग्वाही तेथे लौकिकाचें काई’ असा ज्याचा बाणा आहे, ‘तुका म्हणे जें जें भेटे, तें तें वाटे मी ऐसें’ असा ज्याचा अनुभव आहे, ज्यानें ‘बैसोनि निवांत’ आपलें ‘चित्त शुद्ध’ केले आहे, ‘जेथे जेथे जासी। तेथें मजचि तूं पाहसी । ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव’ अशी ज्याची प्रतिज्ञा आहे, अशा एका थोर अनुभविकाची आणि विचारवंताची ती भाव-कविता आहे. तिच्यांत भाव हा विचारपूत झालेला आहे. विचारांच्या व अनुभवाच्या मुशीत शुद्ध झालेला भाव ह्या वाणींतून प्रगट होतो आहे. तो विचारगर्भ बनला आहे. तेव्हां कवित्वाची ऐट मिरविण्याची पुसटशी छटाही त्या वाणींत कोठें दिसत नाहीं; एवढेच नव्हे, तर कांहीं ठिकाणीं तिचें स्वरूप अगदींच उघडेंनागर्डे दिसतें. कांहीं ठिकाणीं तिच्यांत भावापेक्षां विचाराचाच जोर जास्त दिसतो. तुकोबांची पुष्कळशी कविता ही अशीच विचारप्रधान आहे; परंतु तिच्यांत व्यक्त झालेले विचार हे केवळ तत्त्वचर्चेतून किंवा तत्त्वचर्चेच्या आणि तत्त्वबोधाच्या हव्यासांतून बाहेर पडलेले विचार नाहींत. ते जर तसे असते, तर ती वामनपंडितांच्या 'यथार्थदीपिके 'सारखी रुक्ष, नीरस झाली असती. तिला आपण कविता म्हटलेंच नसतें व तिचा आपल्या मनावर जो हृद्य परिणाम होतो तोही मग झाला नसता. तुकोबांच्या अभंगांत अनेक ठिकाणीं विचारांचा जोर दिसत असला, तरी हे विचार प्रत्यक्ष जीवनानुभवांतून व अध्यात्मानुभवांतून स्फुरलेले विचार असल्यामुळे तेथे विचार व्यक्त झालेले नसून उत्कट विचारानुभव व्यक्त झाला आहे असाच प्रत्यय वाचणाराला येतो. ह्यामुळेच त्यांचे भावगर्भ स्वरूप कोठेंच नाहींसे होत नाहीं. 

तुकारामांची पुष्कळशी कविता उपदेशपर आहे. आपल्या अनुभवमार्गाचें दर्शन घडवितांनाच ती त्यांच्या हातून निर्माण झाली आहे. तुकारामांची ही कविता देखील आपल्या मनाला मोह घालते; एक तर मराठी मनाला असल्या प्रकारच्या कवितेचें वावडें नाहीं. मराठी मन अशा प्रकारच्या कवितेत झटकन् रंगून जाऊं शकतें. अध्यात्मविचारांतून स्फुरलेल्या मराठी वाङ्मयाचा आस्वाद ज्याने प्रत्यक्षाप्रत्यक्षपणें आज पिढ्यान्पिढ्या घेतलेला आहे, त्या मराठी मनाला अशा प्रकारच्या कवितेमध्येंच ओखळीचे सूर ऐकू येतात. परंतु त्याबरोबरच हेही खरे कीं, तुकारामांच्या त्या कवितेमधूनही त्याचा आत्मप्रत्यय ठिकठिकाणीं प्रगट होत असल्यामुळे तिचे स्वरूप नकली भासत नाहीं, ‘बुडतां है जन न देखवे डोळां, येतो कळवळा म्हणवुनि’ ह्याच भावनेनें तुकाराम हा उपदेश, हा कळकळीचा उपदेश करितांना दिसतात. तुकोबा जेव्हां

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती । व्याघ्रही न खाती सर्प तया ॥ 
विष तें अमृत, आघात ते हित । अकर्तव्य नीत होत त्यासी ॥ 
दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्निज्वाळा ॥ 
आवडेल जीवा जीवाचिये परी । सकळां अंतरीं एक भाव ॥

अशा प्रकारचे सहजोद्गार काढतांना दिसतात, तेव्हां त्यांचे ते उद्गार उपदेशपर असूनही अनुभवजन्यच वाटतात. तुकाराम उत्कट अनुभूतीशिवाय बोलतच नाहीत; त्यांचा अभंग म्हणजे त्या उत्कट अनुभूतीची अपरिहार्य अभिव्यक्ति असते. ह्याही अभंगाचा शेवट ‘जाणिजेतें येणें अनुभवें’ ह्याच शब्दांनीं करितांना तुकाराम दिसतात तें उगीच नव्हे. तुकारामांच्या उपदेशवाणीलाही काव्यात्मकता येते ती ह्यामुळेच.

तुकारामांच्या अभंगवाणीचा प्राण म्हणजे तिच्यामागील प्रबल आत्मनिष्ठा. ह्या आत्मनिष्ठेनेंच त्यांच्या वाणीला तिची काव्यात्मता व प्रत्ययकारकता प्राप्त करून दिली आहे. तुकारामांच्या अभंगवाणींतील शब्द कानांवर पडत असतांना तिच्यांतून व्यक्त होणाऱ्या भावविचारांचा प्रामाणिकपणा पटल्यावांचून राहत नाहीं. त्यामुळे त्या वाणीचे शब्द एकदम आपल्या हृदयाला जाऊन भिडतात. त्यांतील ring of sincerity आपल्या मनाला एकदम पटल्याखेरीज राहत नाहीं. तुकारामांचे अभंग हे खरोखरच आत्मप्रकटीकरणार्थ जन्मलेले आहेत. त्यांचे विविध स्वरूपाचे आत्मानुभवच त्या अभंगांतून अविकृतपणे प्रकट झालेले आहेत. ज्ञानेश्वर वा केशवसुत ह्यांच्याप्रमाणें तुकारामांनाही शब्दांचे महत्त्व पटलेले आहे :

आम्हां घरीं धन शब्दांचींच रत्नें । शब्दांचींच वस्त्र यत्न करूं ॥
शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वाटूं धन जनलोकां ॥ 
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव । शब्देंचि गौरव पूजा करूं ॥

ह्या शब्दांनीं तुकाराम आत्मप्रकटीकरणाच्या ह्या श्रेष्ठ दैवी साधनाचा मोठ्या साक्षेपानें उल्लेख करितांना आढळतात. परंतु शब्द हे शेवटीं तुकारामांच्या अभंगांत साधनच राहतात. ते साध्याच्या जागीं कधींच मिरवतांना दिसत नाहींत. तुकाराम हे शब्ददास नाहीत; एवढेच नव्हे तर शब्ददासांचा त्यांना मनापासून तिटकारा आहे. ‘बोलतसें जैसें बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा’, ‘आवडेल तैसें तुज आळवीन’, ‘आपुलिया बळें नाहीं मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची’ असे ते आपणांस वारंवार बजावून सांगतांना दिसतात. आपल्या लेखनाचें कर्तृत्व ते स्वतःकडे घेत नाहीत. ह्याचा अर्थच असा कीं आपण लेखन करीत आहोंत ह्याची कलाहीन जाणीव अशी त्यांना नाहीं. त्यांच्या अभंगांत अप्रस्तुताला, अलंकरणासाठीं केलेल्या अलंकरणाला, शब्दपांडित्याला स्थान नाहीं ह्याचें कारण हेच आहे. परंतु तुकारामांची आत्मनिष्ठा म्हणजे काय? तुकारामांच्या अभंगांतून ही आत्मनिष्ठा दिसून येते म्हणजे काय दिसून येतें? तुकाराम ज्या अनुभवविश्वाचें प्रकटीकरण करतात, त्या अनुभवविश्वाचे स्वरूप काय आहे? इत्यादि प्रश्न येथे एकामागून एक डोळ्यांपुढे येतात. तुकारामांच्या ह्या अनुभवविश्वाचा विचार करूं लागले कीं, हे लक्षांत येतें कीं, तुकाराम हे जसे खऱ्याखुऱ्या अर्थाने अंतर्मुख आहेत तसेच बहिर्मुखही आहेत. ते आत्मपरीक्षण करितात, अत्यंत कठोर असें आत्मपरीक्षण करितात. अशा रीतीने आत्मपरीक्षण करीत असतांना आढळलेलीं सर्व अनुभवसत्यें डोळे भरून न्याहाळतात व त्यांचे स्वरूप नीट दृष्टीसमोर यावें म्हणून जणूं तीं शब्दरूपानें अभिव्यक्त करितात. आत्मपरीक्षणांत, आत्मशोधनांत दंग झालेले तुकाराम आपणांस त्यांच्या कितीतरी अभंगांतून दिसतात. परंतु ते ज्याप्रमाणे आत्मशुद्धीसाठीं हें कठोर आत्मपरीक्षण करितांना दिसतात, त्याचप्रमाणें आपल्या भोंवतालच्या बहुढंगी व बहुरंगी जगाचेही परीक्षण करितांना आढळतात. हें परीक्षणही त्यांनी तितक्याच कठोर सत्यजिज्ञासेनें केलेले असते; व तेथेही जीं अनुभवसत्यें त्यांच्या हातीं लागलेलीं असतात त्यांना शब्दरूप देतांना ते अलंकरणाच्या फारशा भानगडींत पडत नाहींत. तेथेही त्यांच्या अभिव्यक्तींतील सरलत्व जाणवतें. तुकारामांच्या अभिव्यक्तींत जशी लाचारी नाहीं, तसाच उन्मत्तपणाही नाहीं ; जसें खोटे सौजन्य नाहीं, तसाच दर्पही नाहीं; जशी प्रौढी नाहीं, तशीच भीरुताही नाहीं. त्यांना सत्यजिज्ञासा आहे, परंतु ते संशयात्मा नाहीत. ‘मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदूं ऐसे’ असे जेव्हां ते म्हणता, तेव्हां ते स्वतःचें वास्तव चित्र रेखाटीत असतात. आपल्या अभंगांत आपल्या मनाची उद्विग्नता ते जितक्या प्रांजलपणें व्यक्त करितांना दिसतात, तितक्याच प्रांजलपणें ब्रह्मानंदानें झालेली आपल्या मनाची उत्फुल्ल वृत्तीही ते व्यक्त करितात. निष्ठुर आत्मपरीक्षण आणि तितकेच कठोर समाजपरीक्षण त्यांच्या अभंगांत आढळते. आत्मतत्त्व ओळखल्यामुळे त्यांच्या वाणींत एकाच वेळीं विलक्षण मृदुता आणि आत्मसामर्थ्यप्रतीति ह्या दोन्ही वृत्ति व्यक्त होतांना आढळतात. ह्या विविध वृत्तींचे दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या विविध अभंगांतून व्यक्त होणारे त्यांचें व्यक्तित्व मात्र मोठें एकसंध आहे; त्यांत जो सकृद्दर्शनीं वरवरचा विरोध दिसतो, त्या विरोधानेंच त्यांना स्वतःची अशी वेगळी रंगत आणलेली आहे. स्वतःवर चिडलेले आणि ‘ब्रह्मानंदीं लागली टाळी’ अशा अवस्थेप्रत पोंचलेले, ‘सर्वोभूती देव’ ह्या जाणिवेनें भूतमात्राकडे समदृष्टीने पाहणारे व त्याच ‘भूतां’ पैकीं कांहींवर आग पाखडणारे आणि संतापून त्यांचा दंभस्फोट करूं पाहणारे, मेणाहून मऊ मनानें विठोबा माउलीला आळविणारे आणि त्याच माउलीशीं कडकडून भांडणारे अशा तुकारामांच्या भावजीवनांतील विविध विरोधी छटा त्यांच्या अभंगांतून प्रकट होणारें त्यांचे व्यक्तिचित्र जिवंत व बोलकें करितात. हे एकच तुकाराम आहेत हे आपणांस पटतें. अध्यात्मक्षेत्रांतील अत्युच्च पदवीला पोंचलेले तुकाराम आपल्याला सदैव जवळचेच वाटतात ते ह्यामुळेच. 

तुकारामांची अभंगवाणी म्हणजे तुकारामांचे आध्यात्मिक आत्मचरित्र आहे. अध्यात्ममार्गाच्या बिकट प्रवासांत त्यांच्या अनुभवाला आलेले सगळे टप्पे तिच्यांत प्रतिबिंबित झालेले आहेत त्यांत अत्यंत क्षुद्र अनुभवांच्या जोडीला अत्यंत उदात्त अनुभव आहेत. क्वचित् मनाची दोलाचल वृत्ति आहे, तशीच मनाची खंबीरताही आहे. ‘रात्रंदिवस आम्हां, युद्धाचा प्रसंग’ असे म्हणतांना तुकाराम खरे तेच बोलत आहेत; आपल्या विकारांशी आणि भोंवतालच्या जगाशीं तुकाराम एकाच वेळीं लढत आहेत. आपण ‘विठ्ठलाचे गाढे वीर’ आहोंत ही अत्युक्ति नाहीं. तें एक भावसत्य आहे. ह्या सर्व युद्धाचा चित्रपट त्यांच्या अभंगवाणींतून जेव्हां आपल्यासमोर उलगडला जातो, तेव्हां त्यांचे कणखर व्यक्तित्व आपले मन मोहून टाकतें. त्यांच्या मुखांतून बाहेर पडणाऱ्या शब्दाशब्दांसाठीं आपले कान आतुर होतात. मग त्या शब्दपंक्तींत अलंकार किती आहेत ह्याचा विचार करायला आपल्याला वेळ नसतो. त्यांतून डोकावणारें विशाल मन आणि प्रांजल अंतःकरण आपलें मन स्वतःकडे झटकन् आकर्षून घेतें. कवित्वाच्या पुस्तकी कसोट्या येथे लटक्या पडतात. त्या आपल्याला फारशी मदत करीत नाहींत. एवढेच नव्हे, तर त्यांचा विचार करणेही त्या वेळीं आपणांस कसेंसें वाटतें. 

परंतु असे असले तरी तुकारामांच्या कवित्वशक्तीचें आणि त्यांच्या कल्पना- विश्वाचें स्वरूप लक्षांत घेणे आवश्यक आहे. तुकारामांच्या अभंगांत दृष्टान्त आणि रूपक ह्या दोन अलंकारांचाच भरणा विशेषत्वानें आढळतो. त्यांतल्या त्यांत दृष्टान्तावरच तुकारामांच्या कल्पनाशक्तीची भिस्त अधिक दिसते. परंतु तुकारामांच्या ह्या दृष्टान्तांनीं व्यापलेलें अनुभवविश्व लहान नाहीं : प्राणिसृष्टि, निर्जीव पदार्थसृष्टि, जीवसृष्टि, वनस्पतिसृष्टि ह्या सर्वच सृष्टींमध्ये त्याची प्रतिभा संचारतांना दिसून येते. माणसांच्या सांसारिक अनुभवांचे विश्व हें तर तिचें मोठें आवडतें विहारस्थल आहे. तेथे ती एकसारख्या भराऱ्या मारीत असते. तुकारामांचे कोणतेही पांच पंचवीस अभंग वाचले तरी ही गोष्ट लक्षांत येण्यासारखी आहे. आपल्या आवतीभोंवतींच्या जीवनांतील नानाविध अनुभव तुकारामांची प्रतिभा आपल्या भावाभिव्यक्तीसाठीं वेचीत असते. ह्या अनुभवाबरोबरच आपल्या वाणिज्य-व्यवसायांतील अनुभवांचाही तुकाराम स्वाभाविकच वारंवार उपयोग करितांना आढळतात. पुढील रूपकांसारखीं वाणिज्य- व्यवसायावर आधारलेलीं रूपकें तुकारामाच्या अभंगांत अनेक आढळतात :

भरणी आली मुक्त पेठा । करा लाटा व्यापार ॥ 
उधार घ्यारे उधार घ्यारे ।अवघे या रे जातीचे ॥ 
येथें पंक्तिभेद नाहीं । मोठें कांहीं लहान ॥
तुका म्हणे लाभ घ्यावा । मुद्दल भावा जतन ॥

आशाबद्ध वक्ता आणि आशाबद्ध श्रोता ह्यांच्याविषयीं बोलतांना तुकोबा म्हणतात, ‘माप आणि गोणी, तुका म्हणे रितीं दोन्ही’; आपल्या आयुष्याला ‘माप लागले’ आहे,

‘सांठविला वाण । पैस घातला दुकान ॥
जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्धचि जवळी ॥’

‘निवडिलें साचें । उत्तम मध्यम कनिष्ठाचे ॥
तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥’

‘बरवें दुकानीं बैसावे । श्रवण मनन असावे ॥
सारअसाराचीं पोतीं । ग्राहिक पाहोनि करा रितीं ॥
उगेचि फुगवूं नका गाल । पूर्ण सांठवाल माल ॥
सत्य तराजू पैं धरा । नका कृत्रिम विकरा ॥
तुका झाला वाणी । चुकवुनि चौंऱ्यांशींच्या खाणी ॥’

अशा किती तरी परीनें त्यांची प्रतिभा व्यवसायक्षेत्रांतील त्याच्या अनुभवांचा उपयोग करून घेतांना आढळते. युद्धाचें रूपक हें एक तुकारामांचें आवडतें रूपक आहे. आध्यात्मिक ध्येयसिद्धीच्या मार्गावरील आपले अनुभव तुकाराम पुष्कळ ठिकाणीं युद्धाच्याच परिभाषेत व्यक्त करितांना आढळतात. आपली आध्यात्मिक भूमिका व्यक्त करितांनाही तुकाराम वीरोचितच भाषा वापरतांना दिसतात. ‘मनपवनतुरंगा’वर आरूढ झालेले, ‘हातीं नामाची फिरंग’ घेतलेले, वारु चहूं खुरीं चालवून, ‘यमपुरीं घाला घालू’ पाहणारे, ज्यांचें ‘पेणें’ वैकुंठच आहे असे ‘आम्ही रामाचे राऊत, झुंझार वीर’ आहोत, ‘धर्माचे पाळण, करणे पाखांडखंडण, हेचि आम्हा करणें काम, बीज वाढवावें नाम’ या एवढ्यासाठीं ‘आपण तीक्ष्ण उत्तरें, हातीं घेऊनि बाण’ फिरत आहोंत,

भक्तिसुखें जे मातले । ते कळिकाळा शूर झाले ॥ 
हातीं बाण हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥ 
महादोषां झाला त्रास । जन्ममरणां केला नास ॥ 
सहस्रनामाची आरोळी । एक एकाहूनी बळी ॥
नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचें अंकित त्यावांचून ॥

असे आपण विठ्ठलाचे ‘गाढे वीर’ आहोंत, असें स्वतःचे व स्वतःसारख्या विष्णुदासांचें वर्णन तुकारामांनी आपल्या अभंगांत अनेक ठिकाणीं केलें आहे. ही सर्व रूपकें मोठीं नीटस आहेत. अभिप्रेत कल्पनाचित्र आपल्या डोळ्यांसमोर निर्माण करण्याचे त्यांत सामर्थ्य आहे. युद्धाप्रमाणेंच तुकाराम समुद्र, भरती तारूं, शिडें, तुफान, इत्यादींचा उपयोग करूनही अनेक रूपकें साधतांना दिसतात :

लागले भरतें । ब्रह्मानंदाचें वरतें ॥
झाला हरिनामाचा तारा । सीड लागलें फरारा ॥ 
बैसोनि सकळ । बाळ चालले गोपाळ ॥ 
तुका म्हणे वाट । बरवी सांपडली नीट ॥

विशेषतः ब्रह्मानंदाचें दर्शन घडवितांना तुकारामांची प्रतिभा ह्या रूपकांचा आश्रय घेतांना आढळते. युद्धरूपकांइतकीं जमीन, ती नांगरून वखरून तयार करणारा शेतकरी, तिच्यांतून येणारी विविध पिकें ह्या कल्पनाचित्रांवर आधारलेलीं अनेक रूपकेही तुकोबांच्या अभंगांत आढळतात. चित्तशुद्धीवर तुकोबांनीं आपल्या सर्व अभंगवाणींत जो भर दिलेला आहे तो लक्षांत घेतां हीं रूपकें कोणत्या संदर्भात उपयोजिलेलीं असावींत हें विशद करण्याची जरूरी नाहीं. 

 
तुकारामांच्या रूपकदृष्टान्तांतून अभिव्यक्त झालेल्या अनुभवविश्वांचे आपणांस ह्यापेक्षांही अधिक सुव्यवस्थित वर्गीकरण करितां येऊ शकेल. परंतु तुकारामांच्या कवित्वाचें स्वरूप समजावून घेण्याच्या दृष्टीनें त्याला इतकें महत्त्व नसून, त्या दृष्टान्तरूपकादींची अभिव्यक्ति कशी झाली आहे, ह्या अभिव्यक्तीचीं वैशिष्टयें काय आहेत, तिच्यांत कितपत नीटसपणा व रेखीवपणा आहे, ह्या प्रश्नांना महत्त्व आहे. तुकाराम कवि असले, म्हणजे ते आपले विविध स्वरूपाचे भावानुभव तुमच्या आमच्यासमोर शब्दद्वारां सगुण, साकार करूं शकत असले, तरी त्यांच्या लेखणींत किंवा वाणींत ज्ञानेश्वरांची अंगभूत कलात्मकता नाहीं. ज्ञानेश्वरांच्या कोणत्याही पांचपंचवीस ओव्या वाचल्या असतां त्यांतून अभिव्यक्त झालेला भावगर्भ विचार ज्याप्रमाणें आपल्या डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभा राहतो, त्याचें आपणांस जणूं प्रत्यक्ष दर्शनच होते, त्याचप्रमाणें तो ज्या शब्दच्छटांतून मूर्त रूप धारण करीत असतो त्या शब्दच्छटांचे औचित्य, त्यांचें सौंदर्य, त्यांचें विविध स्वरूपांच्या संगति (harmonies) निर्माण करण्याचे सामर्थ्य ह्याही गोष्टी आपणांस उत्कटत्वानें जाणवत असतात. ज्ञानेश्वरांची कल्पनाशक्ति जीं कल्पनाचित्रे किंवा ज्या प्रतिमा शब्दद्वारां आपल्यासमोर निर्माण करीत असते, त्या जशा बोलक्या असतात, अत्यंत सूचक असतात, भावगर्भ आणि विचारगर्भ असतात, त्याचप्रमाणे त्यांचें व्यक्तिगत रूपही अत्यंत सुंदर, गोंडस असतें. त्यांच्याकडे पाहतांच मनाला त्यांच्या रूपाचा मोह पडावा इतकें तें रूप प्रमाणबद्ध, सुसंगत व आकर्षक असते; म्हणूनच ज्ञानेश्वरी वाचतांना पुष्कळदा आपण ह्या सुबक कल्पनाचित्रांवरच रेंगाळत राहतों, त्यांतून ओसंडणाऱ्या सौंदर्याचेंच आकंठ पान करीत बसतों. ज्ञानेश्वरी वाचतांना  missing the wood for the trees हा अनुभव पुष्कळदा आपल्या वांट्यास येतो तो ह्यामुळेच. ‘बोलीं अरूपाचे रूप दावीन’ ही प्रतिज्ञा ज्ञानेश्वर खरोखरच सर्वार्थाने खरी करून दाखवितात. तुकारामांच्या वांट्याला असली प्रभावी कल्पना- शक्ति व तिच्याशीं संबद्ध असणारी नेटकी शब्दशक्ति आलेली नाहीं. ज्ञानेश्वरांच्या कल्पनाशक्तीइतकें तुकारामांच्या कल्पनाशक्तीला सौंदर्यबुद्धीचे बाळकडू मिळालेलें नाहीं; त्यामुळे तिचा विलास हा ज्ञानेशाच्या कल्पनाशक्तीच्या विलासाप्रमाणे अगदीं सहजगत्या आपल्याला आकषून घेऊं शकत नाही. तिच्या विलासांत एक प्रकारचा रांगडेपणा आहे; अवखळपणा आहे. तुकारामांच्या भाषेतील परखडपणा हा तिच्या सौंदर्याला पुष्कळदा बाधक ठरलेला आहे-परंतु येथेही तुकारामांच्या भाषेला दोष देण्यांत अर्थ नाहीं. कवि ह्या दृष्टीनें तुकारामांची जी भूमिका आहे ती भूमिकाच मुळीं

‘होईल तैसें बळ । फजीत करावें ते खळ ॥
तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥'
‘देव्हाऱ्यावरी विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ॥
तेथें पैजारेचें काम । अधमासी तों अधम ॥'

अशा प्रकारची पुष्कळ ठिकाणीं असल्यामुळे त्यांना शब्दांची निवड, कल्पनाचित्रांचे रेखीव चित्रण, इत्यादीची तितकीशी ओढ नाहीं. आत्मशुद्धी- साठीं आसुसलेलें मन आणि प्रांजळ अंतःकरण हेच तुकोबांचे खरेखुरें भांडवल आहे. ज्ञानेश्वरांना आपल्या कवित्वशक्तीची वाजवी जाणीव आहे. कलेच्या ठिकाणीं जी अंगभूत मोहकता असते ती कशाने निर्माण झालेली असते ह्याची ज्ञानेश्वरांना पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीचा सर्वच विलास गोंडस व सहजाकर्षक झाला आहे. तुकारामांना ही जाणीव नाहीं. तुकारामांची कल्पनाशक्ति उद्दाम खरी; तिची झेप मोठी व व्याप्तीही लहानसान नाहीं; अनेक लहानमोठ्या, स्थूल आणि अतिसूक्ष्म जीवनसत्यांचे ती आपणास दर्शन घडवून आणते; परंतु सत्याला ज्ञानेश्वर जितके सहजगत्या सुरूप देऊ शकतात, तितके सुरूप तुकाराम देऊ शकत नाहीत. त्यांच्या अभंगवाणींतून प्रगट होणारीं कल्पनाचित्रे आपल्या विविधतेनें आणि व्याप्तीनें आपले मन वेधून घेतात, त्यांतून सूचित झालेल्या सत्यांच्या दर्शनानें आपल्याला खराखुरा जाणिवेचा आनंद होतो, परंतु हा आनंद होत असतांना आपल्या पुष्कळदा हेही लक्षांत येत असतें, कीं ह्या कल्पनाचित्रांमध्यें तितकासा रेखीवपणा नाहीं; त्यांचे कोपरे नीटसे वळविलेले नाहींत; सफाईचा नाजूक हात त्यांवरून फिरलेला नाहीं ; ज्या स्वरूपांत तीं प्रगट झालीं त्याच स्वरूपांत त्यांना सोडून दिलेले आहे.

परंतु असे असूनही तुकारामांच्या अभंगवाणींत असें कांहीं तरी आहे, कीं तिचा मोह आपल्या मनाला पडतोच. वरच्या परिच्छेदांत वर्णिलेल्या तिच्या उणीवा आपणांस बोचक वाटत नाहींत, उलट त्यामुळेच तिला एक न्यारें सौंदर्य आलेलें आहे, असे आपणांस वाटूं लागतें. खरे म्हणजे आपणांस जे आकर्षण वाटतें तें त्या वाणीचें नसून त्या वाणीमागील मनाचें : तुकारामांच्या व्यक्तित्वाचें. ही वाणी म्हणजे तुकारामांच्या व्यक्तित्वाचा विमुक्त आविष्कार आहे. तुकारामांची अभिव्यक्ति ही नेहमींच दिलखुलास असते; तिच्यांत एक प्रकारचा बेछूट विमुक्तपणा (abandon) असतो; खुरटेपणा तिला ठाऊक नाहीं; भरघोसपणा हे तिचे वैशिष्ट्य आहे. It is a full-throated expression. तिच्यांतून व्यक्त होणारे भावानुभव हेही रसरसलेले असतात. त्यांत एक प्रकारची सजीवता व सामर्थ्य असतें. जीवनाची निशाणी ते बरोबर घेऊन येतांना दिसतात. तुकाराम ह्या भावानुभवांना गोंडस रूप देण्याच्या भानगडींत पडत नाहींत. ते विमुक्तपणें व्यक्त करणें हाच त्यांचा धर्म. भावानुभवांच्या विमुक्त अभिव्यक्तीला त्याची वर वर्णिलेली प्रतिभा किंवा कल्पनाशक्ति हातभार लावीत असते. त्यामुळे तुकारामांच्या अभिव्यक्तीमध्ये त्यांच्या ह्या भावानुभवांचें भरघोस रूप अगदीं जिवंतपणें प्रकट होतें. मला वाटतें, ह्याचाच मोह आपल्या मनाला विशेष पडतो. त्या वाणींत कलाकुसर नसली, तरी थरथरणारा जिवंतपणा व सामर्थ्य आहे ह्याचा आपल्याला प्रत्यय येतो आणि आपल्या हृदयाची ती पकड घेते.

तुकारामांच्या कवित्वशक्तीचा अत्युच्च विलास पाहावयाचा असेल, तर ज्या अभंगांत तो आपल्याला आलेल्या श्रेष्ठतम अध्यात्मानुभवांचें दर्शन घडवितो, ते अभंग वाचावेत. ह्या अभंगांत तुकोबांच्या वाणींतील खडबडीतपणा नाहींसा झालेला दिसेल. ह्या अभंगाचा कर्ता कधीं तरी ग्राम्य, शिवराळ भाषा वापरीत असेल, ह्यावर आपला विश्वासच बसणार नाहीं. आशय आणि अभिव्यक्ति ह्याचा इतका गोड मिलाफ ह्या अभंगांत दिसून येतो कीं, जो अनुभव तुकाराम चित्रित करीत असतात, तो साक्षात् डोळ्यांपुढें तरळू लागतो. खरोखरच येथें अरूपाला रूप येतें; अव्यक्त व्यक्त होतें; भाव मूर्तिमान बनतात. जो श्रेष्ठतम अतींद्रिय अनुभव तुकाराम व्यक्त करीत असतात, त्या अनुभवाचें चित्र तर डोळ्यांपुढे उभे राहतेंच, परंतु त्याबरोबरच त्या अनुभवाचा दिव्यानंद चाखणाऱ्या तुकोबांच्या मनाची ओळखही आपणांला होते. त्याच अभंगांत तुकारामांच्या कल्पनाशक्तीची आणि शब्दशक्तीची खरीखुरी झेप आपणांस दिसून येते. ‘परी हे वैखरी गोडावली सुखें’ ह्याचा अनुभव येतो. येथे कल्पनाशक्ति शब्दांच्या साह्यानें एक श्रेष्ठतम अनुभवसत्य साकार करूं पाहत असते :

‘लवण मेळवितां जळें । काय उरलें निराळे ॥
तैसा समरस झालों । तुजमाजीं हरपलों ॥ 
अग्निकर्पुराच्या मेळीं । काय उरली काजळी ॥
तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योती ॥’

‘अणुरणीया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥ 
गिळूनि सांडिले कळिवर । भवभ्रमाचा आकार ॥ 
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥
तुका म्हणे आतां । उरलों उपकारापुरता ॥ '

ह्या अभंगांतून डोळ्यांपुढें उभा राहणारे तुकाराम खरोखरच आकाशा- एवढे वाटू लागतात. केशवसुतांच्या शब्दांत बोलावयाचें म्हणजे ‘विभूति त्याची स्फुरत पसरली विश्वामाजी’ ह्याचा प्रत्यय येतो. ‘पैल आले हरी, शंखचक्र शोभे करीं’ ह्या अभंगांत ‘घरा आलेल्या वैकुंठपीठाचें’ ‘संतुष्ट’ झालेल्या तुकारामांनी रेखाटलेलें चित्र किती हृद्य आहे! तुकारामांचें उत्फुल्ल अंतःकरण त्यांतून डोकावत आहे. तुकारामांच्या भक्तीच्या ठिकाणीं खरोखरच ‘रूप नाहीं रेखा जयासी आकार, आम्ही तो साकार भक्तीं केला’ असें तुकारामांना आत्मविश्वासानें म्हणावयास लावण्याची शक्ति आहे. ह्याच भक्तीच्या जोरावर, ह्याच भावबलाच्या जोरावर

‘अवघ्या भूतांचे केले संतर्पण । अवघीच दान दिली भूमि ॥ ... 
अवघेचि फळ आलें आम्हां हातां । अवघेचि अनंता समर्पिलें ॥ 
तुका म्हणे आतां बोलों अबोलणें । कायावाचामनें उरलों नाहीं ॥’ 

ही सिद्धावस्था तुकाराम प्राप्त करून घेऊ शकतात.

देव झाले अवघेजन । गुण दोष हरपले ॥
बरवें झालें, बरवें झालें । चित्त धालें महालाभें ॥
दर्पणीचे दुसरें भासे । परि तें असे एक ते ॥
तुका म्हणे सिंधुभेटी । उद‌का तुटी वाहाळासी ॥’

‘हरीनामवेली पावली विस्तार । फळीं पुष्पी भार वोल्हावली ॥
तेथें माझ्या मना होई पक्षीराज । साधावया काज तृप्तीचें या ॥
मुळींचिया बीजे दाखविली गोडी । लवकरचि जोडी जालियाची ॥
तुका म्हणे क्षणक्षणा जातो काळ । गोडी ते रसाळ अंतरेल ॥’

ही आनंदावस्था उपभोगू शकतात; ‘तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाचि वाद आपणांसी’ हा श्रेष्ठ अनुभव घेऊं शकतात; व ह्या अनुभवाचीं अनेक सुखद चित्रे रेखाटू शकतात. तुकारामांची ही कविता खरोखरच प्रतीतिकारी ठरते; तिच्यांत व्यक्त झालेला आनंदानुभव हा अलौकिक, अपार्थिव आहे ह्याचा प्रत्यय येतो; ती खऱ्याखुऱ्या अर्थानें Mystic ठरते. तीं ज्या अनुभवाचीं विविध चित्रे रेखाटते, तो अनुभव गूढतम तर खराच; परंतु त्या श्रेष्ठतम आनंदमय अनुभवाचा साक्षात् प्रत्यय ती आपणांस घडविते. तुकाराम काय बोलत आहेत हे आपणांस आपली तेवढी योग्यता नसूनही कळू शकते. आपल्यासारख्या जडांना तुकाराम ह्या अंभगांच्या द्वारां थोडा वेळ कां होईना, परंतु एका अपार्थिव वातावरणांतून फिरवून आणतात. ते आपल्यासमोर जेव्हां

झाला प्रेतरूप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव स्मशानींचा ॥
रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया । म्हणती हायहाया यमधर्म ॥
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां जीवित्वेंसी ॥ 
फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्यध्वनीं बोंब झाली ॥ 
दिली तिळांजुली कुळनामरूपासी । शरीर ज्याचें त्यांसी समर्पिले ॥ 
तुका म्हणे रक्षा झाली आपोआप । उजळला दीप गुरुकृपा ॥

असें रूपक उभे करतात, तेव्हां त्या रूपकांतून सूचित झालेलें भव्योदात्त कल्पनाचित्र तर डोळ्यांपुढे उभे राहतेंच, परंतु शिवाय त्यांतील आत्मप्रत्ययही आपणास जाणवतो. हा अनुभव श्रेष्ठ आणि त्याची अभिव्यक्तीही श्रेष्ठ.

घरगुती दृष्टातांच्या द्वारां श्रेष्ठतम अनुभवसत्याचें दर्शन घडवावें संतकवींनींच. तुकारामांच्या दृष्टान्तांचा घरगुतीपणा आपणांस अनेकदा इतका जाणवतो कीं, कृत्रिम, मुद्दाम साधलेल्या, वैचित्र्यपूर्ण, आकर्षक कल्पनाचित्रांना आसुसलेलें आजचें आपलें ‘रसिक-मन’ ते दृष्टान्त पाहून गांगरतेंच; त्याला त्याची सहजता जशी जाणवते त्याचप्रमाणें परिणामकारकताही लक्षांत येते. आपली अर्वाचीन कविता असल्या दृष्टान्तापासून किती दूर आली आहे, हा विचार मनांत येतो व तो मनाला थोडाबहुत अन्तर्मुखही करितो. तुकारामांचे कोणतेही पाचसहा अभंग घेतले, तरी त्यांत आपणांस हे दृष्टान्त आढळून येतात :

गोडपणे जैसा गूळ । तैसा देव झाला सकळ ॥
आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥
उद‌कावेगळा । नव्हे तरंग निराळा ॥
हेम अळंकार नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥

संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनों ॥
हेंगड्याच्या आळां अवघीं चिपाडे । काय तेथें गोडें निवडावीं ॥
ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥
तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटीं विचार त्या ॥

हे दृष्टान्त आतां मराठी कवितेला जवळजवळ पारखे झाले आहेत. तुकाराम असले दृष्टान्त देतांना ग्राम्यतेचा वा सभ्यतेचा विचार करीत बसत नाहीं; सुंदर-असुंदराचा विचार करीत नाहीं : जो भावानुभव ते व्यक्त करू पाहत असतात, तो अभिव्यक्त होत असतांना ते आपोआप येतात : ते दृष्टान्त म्हणजेच कवि तुकाराम. ते दृष्टान्त म्हणजेच तुकारामांचें कल्पनाविश्व, त्यांची विचार- प्रक्रिया, त्यांच्या प्रतिभेच्या संचारासाठीं तयार झालेले त्यांचें अनुभवविश्व : ह्या विश्वांतील सर्व प्रकारचे सुंदर असुंदर, श्लील अश्लील, कोमल आणि राठ, स्थूल आणि सूक्ष्म अनुभव त्यांच्या प्रतिभेचें खाद्य ठरतात.

बोडिलें तें निघालें । काय पालटले सांग वहिले ॥ 
* * *

काय करिती काशी गंगा । भीतरि चांगा नाहीं तो ॥
अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासी ॥
तुका म्हणे प्रेमेंविण । बोले, भुंके, अवघा शीण ॥
* * *

वृंदावनफळ घोळिलें साकरा । भीतरील थारा मोडेचिना ॥
***

जेथें पाहे तेथें देखीचा पर्वत । पायावीण भिंत तातडीची ॥
***

आचार करणें देवाविण जो गा । सर्पाचिया अंगा मृदुपण ॥
***

प्रेम नये सांगतां, बोलतां, दावितां । अनुभव चित्ता चित्त जाण ॥
कासवीचें बाळ वाढे कृपादृष्टि । दुधा नाहीं भेटि अंगसंगें ॥
***

तुका म्हणे अवघे फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥
***

दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साकर अवघी गोड ॥
तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळेचिना ॥
*** 

तुका म्हणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥

***

अर्भकाचे साठीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥
तैसे संत जगीं । क्रिया करुनि दाविती अंगीं ॥
***

तैसें कुजनाचें जिणें अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥
कडु भोंपळ्याच्या उपचारें पाक । सेविल्या तिडीक कपाळासी ॥ 

तुका म्हणे विष सांडूं नेणें साप । आदरें तें पाप त्याचें ठायीं ॥

अशी किती तरी उदाहरणें एकामागून एक देतां येतील. इतर संतकवींप्रमाणे तुकारामांच्याही अभंगांत ह्या दृष्टान्तांच्या बाबतींत पुनरुक्ति आढळते; नाहीं असे नाहीं. पुनरुक्तीप्रमाणे सांकेतिकताही आढळते. परंतु मौज अशी आहे कीं, ह्या गोष्टी तुकोबांच्या अभंगांची गोडी चाखत असतांना बोंचत नाहींत. तुकारामांचे ग्राम्य परतु अत्यंत समर्पक दृष्टान्त जसे त्यांच्या अभंगांची गोडी फारशी कमी करूं शकत नाहींत, त्याचप्रमाणें त्यांच्या अभंगांत परत परत तेच दृष्टान्त आले, तरी त्यांची परिणामकारकता कमी होत नाहीं. ह्याचे कारण एकच व ते म्हणजे तुकारामांच्या व्यक्तित्वाचे आपल्या मनावर पडत असलेलें जबरदस्त आकर्षण. आपल्या माणसाचें जसें आपणांस सगळेच चांगलें वाटतें, तसेंच थोडेसे तुकारामांबाबत आपले होतें त्यांच्या प्रांजळ, निष्कपट, निर्मल, उदार, सत्याग्रही, ‘स्व’ला विसरलेल्या व ‘स्व’चा अतिविस्तार केलेल्या मनाचे आपणांस त्यांची अभंगवाणी वाचतांना एवढें विलोभन वाटू लागतें, कीं त्या मनाचे सर्व विचारतरंग आणि भावतरंग आपणांस सुंदर वाटू लागतात. हें सौंदर्य आगळे आहे; सौंदर्यमापनाच्या नेहमींच्या फूटपट्टयांनीं तें जोखतां येणे कठीण आहे ह्याची खात्री पटते, एवढेच नव्हे, तर त्याचें वैय्यर्थ्यही जाणवतें. 

 

(लेखक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (तत्कालिन ‘मराठवाडा विद्यापीठ’) मराठी विभागाचे पहिले विभागप्रमुख असून त्यांच्या ‘वाङ्मयीन टीपा आणि टिप्पणी’ या समीक्षा ग्रंथातून हा लेख घेतला आहे.)

 

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...