- डॉ. आ. ह. साळुंखे
वर्ण, जात वगैरेंच्या आधारे माणसामाणसांत भेद करणे, हे भारतीय परंपरेचे
एक विलक्षण वैशिष्ट्य आहे. या भेदभावाने, या विषमतेने आपल्या समाजव्यवस्थेत
अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. आपल्या समाजात एखाद्याला श्रेष्ठ वा हीन
ठरवण्याची कसोटी म्हणून त्याचे चारित्र्य, शील, वर्तन इत्यादींचा विचार
करण्याऐवजी त्याचा वर्ण वा जात पाहिली जाते. ही प्रथा मानवी प्रतिभेच्या
मुक्त विकासाच्या दृष्टीने अत्यंत बाधक ठरली आहे, घातक ठरली आहे. शेकडो
पिढ्यांमधील असंख्य लोकांना या प्रथेने अंधाराच्या खोल गर्तेत ढकलून दिले
आहे, त्यांचे माणूसपण हिरावून घेतले आहे, अनेक दृष्टींनी त्यांना कंगाल
बनवले आहे.
तुकारामांचे वेगळेपण असे, की त्यांनी आपल्या अभंगांतून
भेदभाव करण्याच्या या विघातक प्रवृत्तीवर जोरदार हल्ला केला. आपल्या
समाजव्यवस्थेतील या घृणास्पद प्रदूषणाची हकालपट्टी करण्याचा आग्रह धरला.
भेद करण्याची भावना ही अनैतिकता असून समतेचा आचार-विचार हीच खरी नीती व
धर्म आहे, अशी त्यांची भूमिका आहे. परंपरेला जोरदार धक्का देणारे त्यांचे
या बाबतीतील विचार आपण आता येथे संक्षेपाने पाहू या.
भेदाभेद भ्रम अमंगळ
माणसामाणसांत
भेद करू नये, सगळी माणसे समान आहेत, हा विचार तुकारामांनी अनेक अभंगांतून
विविध उदाहरणे देऊन वारंवार मांडला आहे. या संदर्भातील त्यांचे काही विचार
पुढीलप्रमाणे आहेत :
सर्व माणसे ही परमेश्वराचीच संताने असतील, तर
त्यांच्यात भेदभाव कशाच्या आधारे करता येईल? हे जग विष्णुमय असून तेथे
भेदभाव करणे हा अमंगळ भ्रम आहे आणि असे मानणे हाच वैष्णवांचा धर्म होय.
कोणाही जीवाचा मत्सर न करणे, हे सर्वेश्वराच्या पूजनाचे रहस्य आहे. एकाच
देहाच्या वेगवेगळ्या अवयवांना भोगावे लागणारे सुखदुःख जीवालाच अनुभवाला
येते. हे देवा, तू जर या प्राणिमात्रांच्या अंतर्यामी आहेस, तर हा भेद का
दाखविला आहेस ? भेदबुद्धी हे पाप आहे. जिकडे पहावे, तिकडे सगळे सारखे दिसत
आहेत. हा आपला, हा परका, ही भावना नष्ट झाली आहे. उठाउठी अभिमान निघून
जातो, असे पंढरीखेरीज दुसरे स्थळ नाही. अभेदाचा अशा प्रकारचा काला दुसरीकडे
कुठे दिसला आहे का? या काल्यामध्ये कोणी भेद मानला आणि विशिष्ट लोकांना
निवडून बाजूला केले, तर तसे करणारे लोक वेदविद्यासंपन्न श्रोत्रिय असले,
तरी ते अंत्यज मानले पाहिजेत. ईश्वराच्या घरी राजा व रंक समान असतात, तेथे
भेदभाव नसतो. अवघे विश्व हाच खरोखर देव आहे असा ज्याचा अनुभव असतो,
त्याच्याजवळ देव असतो. त्याचे कामक्रोध नष्ट झालेले असतात. सर्व
प्राण्यांविषयी त्याच्या मनात समता असते. त्याच्या ठिकाणचे भेदाभेद आणि वाद
नष्ट होऊन जातात. मी सगळे भेद गाळलेले असून वादावाद बाजूला सारले आहेत.
शरीराची त्वचा, मांस इ. बाबतीत जर माणसामाणसांमध्ये फरक नाही, तर एका
माणसाला शुद्ध आणि दुसऱ्याला अशुद्ध कशाच्या आधारे मानायचे ? एक माणूस
श्रेष्ठ आणि दुसरा हलका, असे मानायला देवाजवळ कोणतेही कारण नाही. ओहोळ,
विहीर, नदी इ. ठिकाणचे पाणी वेगळे असते काय ? सूर्याचे किरण सर्व
पदार्थांचे रस घेतात. तो ग्राह्य अग्राह्य अशी निवड करतो काय? गायींचे रंग
भिन्न असले, तरी त्या सगळ्यांचे दूध सारखेच असते. मडक्यांचे आकार आणि नावे
वेगवेगळी असली, तरी त्यांची माती एकच असते. अग्नी सर्वत्र एकरूपानेच
वावरतो. तो एका पदार्थाला शुद्ध आणि दुसऱ्याला अशुद्ध मानत नाही. भांड्याला
महत्त्व द्यायचे, की त्या भांड्यात विष आहे का गोड अमृत आहे, हे पहायचे?
जो
नित्य विठ्ठलाचे भजन करतो, अवघे समब्रह्म पाहतो आणि सर्व प्राणिमात्रांत
विठ्ठलाला पाहतो, तोच एक खरा पंडित होय. सर्व जग म्हणजे समब्रह्म आहे, हाच
सर्व वर्णांचा धर्म होय. मुंगी आणि राजा यांचे जीव आमच्या दृष्टीने सारखेच
आहेत. गंगा कुणाचाही विटाळ मानत नाही. सर्व वर्णांचे लोक पृथ्वीला
पायरीप्रमाणे मानून चालतात, म्हणून ती काही खंडून जात नाही. मला आपपर
उरलेले नाही. विठोबाच्या नामामुळे सर्व एकमय झाले आहे.
तुकारामांच्या या विचारांचे आता थोडे विश्लेषण करू या.
हा
श्रेष्ठ आहे आणि हा कनिष्ठ आहे, हा वेदादींचा अधिकारी आहे आणि हा
अनाधिकारी आहे, हा स्पृश्य आहे आणि हा अस्पृश्य आहे इ. प्रकारचा
वर्णजातींच्या आधारे केला जाणारा भेदभाव, हा आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा
अविभाज्य घटक बनला होता. तुकारामांनी मात्र या भेदभावाचे वर्णन करण्यासाठी
'भ्रम' व 'अमंगळ' हे शब्द वापरले आहेत. हे शब्द अत्यंत आशयघन आहेत. भेदभाव
हा भ्रम आहे, याचा अर्थ वर्ण, जात वगैरेंच्या आधारे भेदभाव करणाऱ्या
लोकांना सत्याचे ज्ञान झालेले नाही. सत्याविषयीच्या त्यांच्या धारणा भ्रांत
आहेत. अमंगळ हा शब्द असे सुचवतो, की या लोकांचे आचरणही खऱ्या अर्थाने
शुद्ध नाही, पवित्र नाही. भेदभाव मानणारी आपली अवघी परंपरा भ्रमयुक्त आणि
अपवित्र आहे, ही तुकारामांची भावना त्यांच्या या विधानातून व्यक्त होते.
परमेश्वरालाही जाब विचारला
ऋग्वेदातील
पुरुषसूक्तापासून इतर असंख्य पुराणकथा, व्रतवैकल्ये, कर्मकांडे इ. पर्यंत
परमेश्वराला सर्व माणसांचा पिता म्हटले जाते तसेच तो सर्वत्र असतो, असेही
मानले जाते. अशा स्थितीत माणसामाणसांमध्ये भेद करण्यास वाव कुठे उरतो, असा
तुकारामांचा प्रश्न आहे. ईश्वराला सर्वांचा सर्वव्यापी पिता आणि सर्व
माणसांना त्याची संतानेही मानायचे आणि माणसामाणसांत भेदही मानायचा, यामध्ये
आढळणाऱ्या विसंगतीवर तुकारामांनी अचूकपणे बोट ठेवले आहे. खरे तर त्यांनी
या संदर्भात स्वतः परमेश्वरालाही हडसून-खडसून जाब विचारला आहे. तू जर
सर्वांच्या अंतर्यामी आहेस, तर मग जगामध्ये तू हा भेद का दाखवत आहेस, असे
त्यांनी त्याला ठणकावून विचारले आहे. याचा अर्थ माणसांनीच काय पण देवाने
जरी विषमता निर्माण केली तरी ती ठोकरली पाहिजे, असा त्यांचा विश्वास आहे.
तुकारामांनी
भेदभाव नाकारण्यासाठी ईश्वराच्या आधारे युक्तिवाद केला, त्याच पद्धतीने
शरीराच्या आधारेही केला आहे. चर्म, मांस इ. अवयवांच्या बाबतीत जर फरक नाही,
तर एका माणसाला शुद्ध, श्रेष्ठ, स्पृश्य मानायचे आणि इतर कोणाला अशुद्ध,
हीन, अस्पृश्य मानायचे, याला आधार काय, असा बिनतोड सवाल त्यांनी विचारला
आहे. प्राण्यांच्या घोडा, बैल, कावळा, माणूस इ. अनेक जाती आहेत. पण सर्व
माणसे मिळून एकच जात होते. त्या माणसांच्या पुन्हा शुद्ध व अशुद्ध अशा
वेगवेगळ्या जाती मानाव्यात, असा फरक त्यांच्या शरीररचनेत नाही, हे त्यांनी
निदर्शनाला आणून दिले आहे. जलाशय, सूर्य, गायी, माती, अग्नी, गंगा, पृथ्वी
इ. अनेक पदार्थांची उदाहरणे देऊन त्यांनी लोकांच्या मनावर समतेचे संस्कार
करण्याचा प्रयत्न केला आहे. भांड्यापेक्षा भांड्यात असलेल्या पदार्थाला
महत्त्व असते, त्याप्रमाणे माणसाच्या बाबतीतही जात वगैरेंसारख्या बाह्य
उपाधींना महत्त्व नसून खरे महत्त्व माणसाच्या गुणांना असते, हे त्यांनी
सूचित केले आहे.
सर्वोच्च असूनही भेद केला तर सर्वांत हीन
श्रोत्रिय
म्हणजे वेदविद्यासंपन्न ब्राह्मण हा आपल्याकडच्या वर्णव्यवस्थेत अत्युच्च,
किंबहुना सर्वोच्च स्थानी मानला गेला आहे. याउलट, अंत्यज हा या व्यवस्थेत
सर्वांत खालच्या स्थानावर आहे. जातीच्या आधारे करण्यात आलेली ही व्यवस्था
तुकारामांनी उधळून लावली आहे. सर्वोच्च स्थानी असलेला श्रोत्रिय जर भेदभाव
करीत असेल, तर त्याला अंत्यज मानावे. याउलट, जो कोणी समता मानत असेल तो खरा
पंडित असल्याचे मानावे, असा एक वेगळा निकष त्यांनी सांगितला आहे. मुंगी
आणि राजा आम्हांला समान आहेत असे ते म्हणतात, तेव्हा मुंगी हे सर्वसामान्य,
दुबळ्या, अप्रतिष्ठित व्यक्तीचे प्रतीक असून अशा व्यक्तीलाही आम्ही अत्यंत
बलिष्ठ व प्रतिष्ठित व्यक्तीशी समान मानतो, असे त्यांना सुचवायचे आहे.
कोणाचाही
मत्सर न करणे, सर्वांना समान मानणे हाच खरा धर्म आहे, असे त्यांना वाटत
होते. मी सर्व भेद गाळलेले आहेत, मला सर्व लोक समान आहेत, असे म्हणण्याइतकी
समवृत्ती त्यांना प्राप्त झाली होती. भेदभावांनी अत्यंत कलुषित झालेल्या
आपल्या समाजाच्या दृष्टीने तुकारामांचा समतेचा हा आग्रह म्हणजे एका निर्मळ
निर्झराचा उद्गम म्हणायला हवा.
यातीशी कारण नाही देवा
माणसाची
श्रेष्ठता वा हीनता जातीच्या कसोटीवर ठरवणे हे आपल्या समाजाचे एक मोठे
वैशिष्ट्य होय. ज्याची जात जितकी उच्च तितका तोही उच्च; आणि ज्याची जात
जितकी हलकी तितका तोही हलका, असे आपल्या समाजात गृहीतच धरले जात असे. गुण,
आचरण वगैरेंच्या कसोट्या लावण्याऐवजी जातीची कसोटी लावणे तुकारामांना मात्र
मान्य नव्हते. एखादा माणूस कितीही उच्च जातीमधील असला आणि त्याचे आचरण अधम
असले, तर त्याला उच्च न मानता अधमच मानले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी
घेतली. एखाद्याचे कूळ उत्तम असेल पण त्याचा आचार चांगला नसेल, त्याचे वर्तन
परमेश्वराशी अंतर निर्माण करणारे असेल, तर असे उत्तम कूळ जळो, असे ते
म्हणतात. येथेही कूळ अथवा घराणे यावरून मोठेपण ठरवू नये, आचरणावरून ठरवावे,
हा विचार त्यांनी अत्यंत निर्धाराने मांडल्याचे दिसते. उच्च जातीमध्ये
अथवा उच्च कुळामध्ये जन्माला येऊन जे विषयामध्ये आसक्त होतात, त्यांची
फजिती होईल, असे ते म्हणतात. त्यांचे आचरण जर चांगले नसेल, तर त्यांच्या
उच्च जातीमुळे वा कुळामुळे त्यांचा बचाव होऊ शकत नाही. जात अथवा कूळ उच्च
असणे महत्त्वाचे नाही, तर आचारविचारांचे मूळ बीज शुद्ध असले पाहिजे. शेंडी
राखणे, जानवे घालणे अशा प्रकारची सोंगे करून आपल्या जातीचा उच्चपणा कितीही
दाखवला, तरी तो निष्फळ आहे. कारण, अशा प्रकारचे सोंग घेऊन प्रत्यक्षात
दुराचार करणाऱ्या माणसाला दंड होणेच योग्य होय, असे त्यांचे म्हणणे आहे.
हरिकथा
दूषित करणाऱ्या माणसाची अमंगळ वाणी आपल्या कानावर न पडो, त्याची जात,
त्याचा वर्ण जरी श्रेष्ठ असला तरी त्याला पापिष्ट चांडाळ समजावे, असे ते
म्हणतात. वेदांचे ज्ञान, यज्ञाचे कर्मकांड यांनीच माणसाचा उद्घार होतो,
विठ्ठलाच्या भक्तीने उद्धार होऊ शकत नाही, म्हणून तुम्ही तुकारामांचे
शिष्यत्व न पत्करता आमचे शिष्यत्व पत्करा, असे सांगणाऱ्या आणि प्रत्यक्षात
खरा धर्म न जाणणाऱ्या महंतांवर तुकारामांनी केलेला हा हल्ला योग्यच होता.
जो कन्या, गाय आणि कथा यांची विक्री करतो, तो खरा चांडाळ होय; मुलगी
वगैरेंची विक्री करणे हे दुराचरण आहे, असे तुकारामांनी वारंवार म्हटले आहे.
हे सांगत असताना माणसाच्या मोठेपणाची कसोटीही त्यांनी सांगितली आहे.
माणसाचे गुण आणि अवगुण कोणते आहेत, ते तपासून पहावे. गुणी माणसाला उच्च
समजावे, अवगुणी माणसाला हीन समजावे. पण ही तपासणी करताना जात आणि कूळ यांना
मात्र प्रमाण मानू नये, त्यांच्या आधारे निर्णय घेऊ नये. ज्याचे जसे आचरण
असेल, तसे फळ त्याला मिळेल. याचा अर्थ महत्त्व आहे ते आचरणाला, जातीला वा
कुळाला नव्हे. माणसाच्या अंगी असलेले गुण हेच मोठेपणाचे खरे कारण आहे. या
बाबतीत जात आणि कूळ या गोष्टी अप्रमाण होत, असे त्यांनी इतरही अनेक
अभंगांतून म्हटले आहे. उच्च जातीचा असूनही आचरण अधम असेल, तर तो मनुष्य अधम
ठरतो. याउलट, आचरण चांगले असेल तर त्याची जात भलतीच म्हणजे हलकी असली तरी
त्याला श्रेष्ठ मानावे, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
वर्ण-अभिमानें कोण झाले पावन ?
वर्णाचा
अभिमान हे आपल्या धार्मिक क्षेत्रात थैमान घालणाऱ्या अनाचारामागचे एक
महत्त्वाचे कारण आहे. धर्माचे स्वरूप शुद्ध असावे, यासाठी अखंडपणे
तळमळणाऱ्या तुकारामांनी या प्रकारच्या अभिमानाला विरोध केला, हे स्वाभाविकच
होय. वर्ण, जात, कूळ यांचा अभिमान काही खरा नसतो, तो मृगजळासारखा असतो,
असे त्यांना वाटत होते. म्हणूनच, वर्ण, कूळ आणि जात यांचा अभिमान सोडून
द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. जो वर्णाचा अभिमान बाळगेल तो नाडला जाईल,
त्याला इष्ट फळ मिळू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. इतरांनी
वर्णाचा अभिमान बाळगू नये हे ज्याप्रमाणे त्यांनी सांगितले, त्याचप्रमाणे
आपल्या स्वतःच्या ठिकाणी देखील अशा प्रकारचा अभिमान राहता कामा नये, असा
काही अंश आपल्या ठिकाणी असेल तर परमेश्वराने तो नष्ट करावा, अशी
प्रार्थनाही त्यांनी केली आहे. सर्व प्राण्यांमध्ये ईश्वर असेल, तर अभिमान
सोडून त्या सर्वांचे भजन करण्याची प्रेरणा ईश्वराने आपणांस द्यावी, असेही
त्यांनी म्हटले आहे. परंपरागत धार्मिक क्षेत्रात, अपवित्रतेचा धिक्कार
करून, पावित्र्याचा गौरव केला जातो. व्यवहारात वर्णाच्या श्रेष्ठत्वाबरोबर
पावित्र्य जणू काही आपोआपच येते, आचरणाशी त्याचा काही संबंध नाही, असे
वातावरण आढळते. तुकारामांना हे मान्य नव्हते. वर्णाच्या अभिमानाने कोण पावन
झाले आहे ते मला सांगा पाहू, असा प्रश्न त्यांनी एकदा उपस्थित केला आहे.
अभिमानाला पायांखालची पायरी बनवले
वर्णाच्या
अभिमानाचे विसर्जन केले असता किती उच्च कोटीचा आनंद मिळू शकतो, याचे
अत्यंत हृद्य चित्र त्यांनी एका अभंगात रेखाटले आहे. पंढरीच्या
वाळवंटामध्ये भक्तीचा खेळ मांडलेला आहे. या खेळामध्ये सहभागी झालेले वैष्णव
अभिमानाला आपल्या पायांखालची पायरी बनवून एकमेकांच्या पाया पडत आहेत. या
वैष्णवांमध्ये मूढजन, नराबरोबरच नारी, सामान्य लोक आहेत; त्याचप्रमाणे
पंडित, ज्ञानी, योगी, महानुभाव, सिद्ध आणि साधकही आहेत. ते वर्णांचा अभिमान
विसरले आहेत. आपली जात कोणती आहे ते विसरले आहेत आणि एकमेकांस लोटांगण
घालत आहेत. या वैष्णवांची निर्मळ चित्ते लोण्यासारखी झाली असून त्यांच्या
मनाची ही उत्कट अवस्था पाषाणालाही पाझर फोडेल, अशी आहे. वर्ण आणि जात
यांच्या अभिमानातून मुक्त होणारे लोक माणूसपणाच्या अत्युच्च शिखरावर पोचून
अलौकिक आनंदाचा अनुभव कसा घेऊ शकतात, याचे अत्यंत प्रसन्न चित्र
तुकारामांनी या अभंगात उभे केले आहे. अशाच प्रकारचे आणखी एक चित्र भक्तांचे
प्रतीक असलेल्या गोपींचे वर्णन करताना त्यांनी रेखाटले आहे. आम्ही कोणत्या
जातीच्या आहोत, ते आम्ही विसरलो आहोत, चारही वर्णांच्या आम्ही सगळ्या जणी
एक झालो आहोत, असे उद्गार त्यांनी काढले आहेत. पंढरीमध्ये येऊन वर्णाचा
अभिमान विसरलेले सर्व लोक जीवनमुक्त होतात, असे त्यांनी आणखी एका अभंगात
म्हटले आहे. तुम्ही उच्च जातीचे सर्व लोक मिळून गर्व करू नका, असे आवाहन
त्यांनी एकदा केले आहे. २०
वर्णाचा अभिमान बाळगणे हे मानव्याची हानी
करणारे असून अशा प्रकारच्या अभिमानाचे विसर्जन करणे हे मानव्याला उदात्त
बनवणारे आहे, हे तुकारामांनी आपल्या या सर्व अभंगांतून प्रभावी रीतीने
सूचित केले आहे.
वर्णाश्रमाने सर्वश्रेष्ठ कल्याण नाही
वर्णाश्रमांच्या
संदर्भात ते म्हणतात- वर्णाश्रमांच्या कर्तव्यांचे पालन करणे म्हणजे
व्यर्थ श्रम करणे होय. अशा प्रकारचे बाह्य सोंग म्हणजे पाश असून लोभाचा
त्याग करणे हेच हितकारक होय. तू वर्णाश्रमांचे चोख पालन केलेस, तर
शास्त्राच्या नियमानुसार तुला उत्तम लोक मिळेल. पण हे काही सर्वश्रेष्ठ
कल्याण नव्हे. कारण, आपल्या अंगानेच ब्रह्म कसे व्हावे, हे काही तुला कळत
नाही. याउलट, संत मात्र देही असून विदेही होतात.
चार वर्ण आणि चार
आश्रम यांच्या नियमांचे पालन करणे, हे वैदिक धर्माचे एक महत्त्वाचे
वैशिष्ट्य आहे. किंबहुना वैदिक धर्माला अनेकदा वर्णाश्रमधर्मच म्हटले जाते.
अशा स्थितीत तुकारामांनी वर्णाश्रमांच्या कर्मकांडाविषयी मांडलेले हे
विचार एका दृष्टीने वैदिक धर्मावर जोरदार आघात करतात, यात मुळीच शंका नाही.
वर्णाश्रमाच्या कर्तव्याचे पालन ही आनंदाची बाब नसून ते कष्ट आहेत, असे ते
सुचवतात आणि त्या कष्टानंतर इष्ट फळही मिळत नसल्यामुळे ते कष्ट निरर्थक
आहेत, निष्फळ आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. वर्णाश्रमांचे पालन करीत
असल्याचे दाखवणारे लोक खरेखुरे धार्मिक नसतात, ते नुसते धर्माचे बाह्य सोंग
करतात, धर्माचा बुरखा घेऊन आपला स्वार्थ साधतात, असे त्यांना वाटते.
धर्मशास्त्रांनी
घालून दिलेल्या चाकोरीतून एखाद्याने वर्णाश्रमांच्या कर्तव्यांचे पालन
केले, तरी फार तर त्याला धर्मशास्त्रांनी सांगितलेले विशिष्ट फळ मिळेल. ते
फळ हीच उत्तम गती वा उत्तम लोक होय, असे धर्मशास्त्रे खुशाल म्हणोत.
प्रत्यक्षात ते फळ हे काही मानवी जीवनाचे सर्वोत्तम कल्याण नव्हे.
अंतःकरणाच्या शुद्ध भावनेने केल्या जाणाऱ्या भक्तीचे फळ हेच सर्वोत्तम फळ
होय. त्याच्यापुढे वर्णाश्रमांचे फळ हे फिके आहे, निष्प्रभ आहे. तात्पर्य,
माणसाने वर्णाश्रमांच्या चाकोरीत आपली मान अडकवण्याऐवजी भक्तीच्या निरागस
मार्गाने जावे, हे उत्तम होय.
बरा देवा कुणबी केलो
आपण
कुणबी असल्याचा उल्लेख तुकारामांनी काही वेळा अगदी जाणीवपूर्वक केला आहे.
त्यांपैकी एका अभंगाचा आशय पुढीलप्रमाणे, "हे देवा, मला कुणबी केलेस, ते
बरे झाले. नाही तर मी दंभानेच मेलो असतो. हे देवराया, हे जे काही केलेस ते
भले केलेस, असे म्हणून तुका नाचत आहे, देवाच्या पाया पडत आहे. माझ्याकडे जर
काही विद्या असती तर मी अपायात अडकलो असतो, संतांच्या सेवेला मुकलो असतो
म्हणजे माझी उगाचच नागवण झाली असती, मला गर्व झाला असता, ताठा झाला असता
आणि मी यमाच्या वाटेने गेलो असतो. कारण, मोठेपणाच्या अभिमानामुळे नरकाची
प्राप्ती होते."
धर्मशास्त्रांमुळे आत्मतुच्छतेची भावना
तुकारामांचा
हा अभंग सामाजिक आशयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याकडच्या
कर्मसिद्धान्तानुसार एखाद्या व्यक्तीला विशिष्ट वर्णात जन्म मिळतो, तो
तिच्या आधीच्या जन्मातील विशिष्ट प्रकारच्या कर्मामुळे होय. याचा अर्थ
एखाद्याचे पुण्यकर्म जितके अधिक, तितका त्याला अधिक वरच्या वर्णामध्ये
जन्म, असे मानले जाते. अर्थात, हे पुण्यकर्म म्हणजे नैतिक धर्माचरण नसून
धर्मशास्त्रांनी सांगितलेले विशिष्ट कर्म होय, हेही आवर्जून ध्यानात घेतले
पाहिजे. ८४ लक्ष जीवयोनींमध्ये नरजन्म श्रेष्ठ आणि त्यातही ब्राह्मण
पुरुषाचा जन्म श्रेष्ठ, अशी मनोधारणा लोकांमध्ये रुजविण्याचे काम
धर्मशास्त्रांनी चांगलेच केले आहे. त्यामुळे आपण अधिकाधिक 'चांगले' कर्म
करीत जावे, म्हणजे आपल्याला अखेरीस ब्राह्मणाचा जन्म मिळेल आणि मग आपल्या
मोक्षाची वाट सोपी होईल, असे लोकांना वाटणे स्वाभाविक होते. तथाकथित हीन
जातींमध्ये जन्माला आलेल्या लोकांच्या मनात न्यूनगंडाची, आत्मतिरस्काराची
वा आत्मतुच्छतेची भावना निर्माण करण्याचे काम धर्मशास्त्रांनी उत्तम रीतीने
केले आहे.
ब्राह्मण्य ही अवांच्छनीय अवस्था
या
बाबतीत तुकारामांनी मात्र फार वेगळी भूमिका घेतली आहे. कारण, कुणबी म्हणून
जन्माला आलो, ही गोष्ट कोणत्याही प्रकारे कमीपणाची वा लांच्छनास्पद नाही;
उलट, अत्यंत समाधानाची आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. व्यवहारात
कुणब्यांपेक्षा ब्राह्मणांना श्रेष्ठ मानले जाते, त्यामुळे कुणबी म्हणून
जन्माला आल्यानंतर आपल्याला अजून सर्वोच्च पायरी गाठता आली नाही, याची खंत
वर्णव्यवस्था मानणाऱ्या माणसाच्या मनात निर्माण होऊ शकते. आपण कुणबी म्हणून
जन्माला येण्याच्या ऐवजी ब्राह्मण म्हणून जन्माला आलो असतो, तर अधिक
चांगले झाले असते, अशी रुखरुखही त्याच्या मनाला लागू शकते. याउलट, तुकाराम
मात्र या प्रकाराकडे अत्यंत वेगळ्या दृष्टिकोणाने पहात आहेत. ब्राह्मण्य ही
माणूसपणाची सर्वोच्च अवस्था तर नाहीच, उलट ती एक अशी अवस्था आहे, की
जिच्या प्राप्तीची अभिलाषा माणसाने धरू नये आणि ती अवस्था मिळाली नाही, तर
समाधान मानावे, आनंद व्यक्त करावा. स्वाभाविकच, ब्राह्मण म्हणून जन्माला
येण्याच्या ऐवजी कुणबी म्हणून जन्माला आल्यामुळे त्या अवांच्छनीय अवस्थेत
जाण्यापासून आपले रक्षण झाले, असे त्यांनी सुचवले आहे. ब्राह्मण ही अशा
प्रकारची अवस्था आहे, असे म्हणण्याचे कारणही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
ब्राह्मण बनणे म्हणजे दंभाने मरणे किंवा आत्यंतिक दांभिक बनणे होय.
ब्राह्मण म्हणून जन्माला आल्यानंतर थोडीबहुत पुस्तकी विद्या मिळते, पण त्या
विद्येमुळेच मनुष्य अपायात अडकतो, संकटात सापडतो. आपण कोणी तरी श्रेष्ठ
आहोत, याचा ब्राह्मणाच्या मनात गर्व असतो, ताठा असतो. त्याच्या मनात आपल्या
थोरपणाचा अभिमान असतो. या गर्वामुळे, घमेंडखोरपणामुळे माणूस संतांच्या
सेवेला मुकतो. म्हणजेच सद्गुणी लोकांच्या सहवासाला मुकतो. त्यामुळे त्याला
खरेखुरे माणूसपण लाभू शकत नाही. ही विनाकारण झालेली माणसाची नागवण होय, असे
तुकारामांना वाटते. येथे त्यांनी वापरलेला 'नागवण' हा शब्दही अत्यंत
मार्मिक आहे. माणसाला माणूसपणाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाणारे सद्गुण,
हे माणसाच्या दृष्टीने वस्त्रासारखे असतात. ब्राह्मण्याचा अहंकार, विद्येची
घमेंड इ. गोष्टींमुळे जणू काही माणसाचे हे वस्त्रच हिरावले जाते. माणसाला
अशा रीतीने नग्न बनवणाऱ्या ब्राह्मण्याची आपल्याला अजिबात अभिलाषा नाही,
परमेश्वराने आपल्याला ब्राह्मण करण्याऐवजी कुणबी केले, ही फार भली गोष्ट
केली, या जाणिवेने ते नाचू लागले आणि नाचता नाचता परमेश्वराने केलेल्या या
कृपेसाठी त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने ते त्याच्या
पाया पडू लागले, यावरून त्यांच्या मनातील समाधानाची उत्कटता स्पष्ट होते.
या सर्व चर्चेत त्यांनी ब्राह्मण हा शब्द प्रत्यक्षरीत्या न वापरता त्याचा
अर्थ मात्र सूचित केला आहे.
खालच्या म्हटल्या गेलेल्या जातीमध्ये
जन्माला आलेल्या लोकांना स्वत्वाची, अस्मितेची जाणीव करून देण्याच्या
दृष्टीने तुकारामांचा हा अभंग फार महत्त्वाचा आहे. आपण कोणत्याही जातीमध्ये
जन्माला आलेले असू, कोणत्याही कुळामध्ये - कुटुंबामध्ये जन्माला आलेले
असू, ती जात व ते कुळ इतरांकडून हिणवले गेलेले असो, कमी लेखलेले असो,
दरिद्री असो, अप्रतिष्ठित असो; यांपैकी कोणत्याही कारणाने आपण स्वतःला हीन
लेखता कामा नये; आपल्या मनात न्यूनत्वाची भावना बाळगता कामा नये; उलट,
श्रेष्ठत्वाचा गंड निर्माण करणाऱ्या आणि माणूसपणाला वंचित करणाऱ्या तथाकथित
उच्च जातीमध्ये जन्माला न आल्यामुळे निरागस, निरामय, निर्मळ मनुष्य म्हणून
जगण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली, ही समाधानाची, आनंदाची बाब आहे; अशा
भावात्मक दृष्टीने या घटनेकडे पहावे, असा संदेश तुकारामांनी या अभंगातून
दिला आहे. आपल्या न्याय-अन्यायाच्या भावना, आपल्या धर्म व नीती
यांच्याविषयीच्या धारणा, आपण उच्च जातीत जन्माला आलो नाही याविषयीच्या
वैफल्यातून निर्माण झालेल्या असता कामा नयेत, त्या नकारात्मक अथवा
प्रतिक्रियेच्या स्वरूपातील असता कामा नयेत, हेही त्यांनी यातून सूचित केले
आहे.
गाढवभर पोथ्यांची पाने उलथतोस !
ब्राह्मण
पंडित आणि कुणबी तुकाराम यांची तुलना करणारा त्यांचा आणखी एक अत्यंत
प्रभावी अभंग आहे. त्याचा अर्थ असा, "तू पंडित झाला आहेस. पुराणे सांगतोस.
पण 'मी कोण' हे तुला कळत नाही. गाढवभर पोथ्या घेऊन तू त्यांची पाने उलथतोस.
पण गुरूच्या मदतीने कळणारी खूण मात्र तुला कळत नाही. कुणब्याचा तुका मात्र
शास्त्रमत जाणत नाही. एका पंढरीनाथावर विसंबून राहतो." पुस्तकी
पांडित्याने खऱ्या आत्मज्ञानाची ओळख होत नाही. पुराण सांगण्याच्या रूपाने
पोपटपंची केल्यामुळेही आत्मज्ञान लाभत नाही. वरवरचे पांडित्य महत्त्वाचे
नसून अंतरंगाचा आशय महत्त्वाचा असतो. 'गाढवभरी पोथ्या उलथिशी पाने' हा
त्यानी केलेला शब्दप्रयोग लागट, झोंबणारा असला, तरी त्यातून पुस्तकी
पांडित्याचा पोकळपणा अचूकपणे व्यक्त होतो. आपल्याकडे खूप पोथ्या-पुस्तकांचा
साठा करायचा, सर्वसामान्य लोकांपुढे त्यांचे प्रदर्शन करायचे आणि आपल्या
पांडित्यापुढे त्यांनी दबून जावे असे नाटक करायचे, असा बहुतेक पंडितांचा
खाक्या असतो. पण या पुस्तकांचे मनापासून वाचन, त्यांतील आशयावर सखोल चिंतन
आणि त्यानंतर त्यांमधील विचारांची ग्राह्याग्राह्यता निश्चित करून चांगल्या
गोष्टींचे आचरण, हे मात्र त्या पंडितांकडून घडत नाही. गाढवाच्या पाठीवरील
ओझ्याचा जसा त्याला उपयोग नसतो, तसाच या पोथ्यांचा त्या तथाकथित पंडिताला
उपयोग नसतो. कारण, तो नुसती पाने उलटतो, पण आशयापर्यंत जात नाही.
स्वाभाविकच, गुरूच्या, ईश्वराच्या वा सदाचारी संताच्या, मार्गदर्शनाने
अंतिम सत्याची जी खूण समजू शकते, ती या पोथ्यांची पाने उलटल्यामुळे त्याला
समजू शकत नाही.
तृप्तीचा सूर
कुणब्याचा तुका मात्र
अशा प्रकारे पोथ्या वाचत नाही. धर्मशास्त्रांचे मत काय आहे, हे तो जाणत
नाही. तो फक्त पंढरीनाथावर विसंबून असतो. आपण शास्त्रमत जाणत नाही, हे
त्यांचे उद्गार न्यूनगंडातून वा आपले अज्ञान व्यक्त करण्याच्या भावनेतून
आलेले नाहीत. शास्त्रांची मते जाणून मिळू शकणार नाही, असे उच्च कोटीचे सत्य
मला गवसले आहे, असे सांगण्याचा त्यांचा हेतू आहे. त्याबरोबरच,
शास्त्रग्रंथांतून व्यक्त होणारी मते सत्याचे यथार्थ दर्शन घडवत नाहीत,
हेही त्यांनी स्पष्ट केले आहे, शास्त्रांपेक्षाही अधिक वरच्या दर्जाचे काही
तरी मी प्राप्त केले आहे, असा आत्मविश्वास, असा तृप्तीचा सूर त्यांच्या या
शब्दांतून प्रकट होत आहे. विठ्ठलाची भक्ती करा, असे कुणब्याचा तुका
तुम्हांला विनवीत आहे, असे आणखी एका अभंगात त्यांनी म्हटले आहे.
खऱ्याखुऱ्या धर्माविषयी काही सांगण्याचा अधिकार पोकळ पंडिताला नसून
प्रामाणिक कुणब्यासारख्या सामान्य लोकांना आहे, हे त्यांनी त्यातून सूचित
केले आहे. तथापि इतरांना तुच्छ लेखण्यासाठी आपल्या कुणबीपणाचा गैरवाजवी
अभिमान त्यांनी बाळगलेला नाही, हे मात्र आवर्जून ध्यानात घेतले पाहिजे.
शूद्रवंशी जन्मलो
आपण
यातिहीन म्हणजे जातीने हीन आहोत, असे उद्गार तुकारामांनी पुनःपुन्हा
काढले आहेत. अशा काही उद्गारांचा आशय असा :- मी शूद्र वंशात जन्मलो,
म्हणून दांभिक होण्यापासून वाचलो. मला वेदांचे काही अक्षर घोकण्याचा अधिकार
नाही. मी सर्वप्रकारे दीन आणि यातिहीन आहे. हे पांडुरंगा, तू लक्ष्मीचा
पती आहेस, तर मी हीन जातीचा आहे. भलत्या जातीत व भलत्या कुळात माझा जन्म
झाला, तरी मी भक्तीचा मार्ग सोडणार नाही. हे देवा, माझी जात व कूळ काय
शुद्ध आहे, की ज्यामुळे तुझे रहस्य माझ्या ध्यानी यावे? मी उगाचच भूमीला
भार असून माझे काय होणार आहे, हे कळत नाही. मी जातीचा हीन आहे. मला भजन कळत
नाही, म्हणून संतचरणांची इच्छा करीत आहे. मला ईश्वराने आपले म्हणावे. माझी
वाणी अथवा जात शुद्ध नाही. पण तुम्ही मला पायांजवळ स्थान द्या. माझी जात
हीन आहे. सर्व लज्जा सोडून तुला शरण आलो आहे. माझे स्थान शेवटचे असून
वृत्ती नीच आहे. तुमच्या आधारे मी विश्रांती प्राप्त करीन. माझी जात हीन
आहे. त्यातच संतांनी स्तुती केल्यामुळे गर्व येऊ पहात आहे. आपण जाणते आहोत,
असे चित्ताला वाटत आहे, तेव्हा माझे रक्षण कर. माझी बुद्धी हीन आणि जात
अधम आहे. अहंकार माझ्या चित्तात वसू पहात आहे. मला बिघडायला क्षण लागणार
नाही. तेव्हा मला वाचव. मी यातिहीन असूनही त्याने माझा अंगीकार केला. माझी
जात काय शुद्ध होती? परंतु हरीच्या नामामुळे माझी ख्याती थोर झाली. आम्ही
तुझ्या नावाने धन्य झालो आहोत. मग आमचा जन्म खुशाल भलत्या जातीत भलता
झालेला असो. मला शुद्ध जात, कूळ व वर्ण यांची इच्छा नाही. भलत्या जातीतही
तू मला दास कर.
आता मी काही जात आणि कूळ यांनी हीन असलेला दुबळा आणि
दैन्यवाणा अजिबात नाही. रखुमाई ही आई आणि पांडुरंग हा पिता असल्यामुळे मी
दोन्ही बाजूंनी शुद्ध आहे. मी बापुडा, दुर्बळ वा ठेंगणा नाही. मी दुसऱ्या
कोणाचा मिंधा नाही. आम्ही आता अभागी व अनाथ नाही. आम्हांला समर्थ असा
कैवारी मिळालेला आहे. आता मी मनामध्ये निश्चिंत झालो आहे. मला सुखाच्या
राशी लाभल्या आहेत.
ज्या अनन्यभावनेने देवाला शरण जातात, त्याच
उत्तम जाती होत. त्याच्याजवळ हा उत्तम, हा अधम असा काही दुजाभाव नसतो. अशा
लोकांच्या अंगी ब्रह्मप्राप्तीचे ठसे उमटतात. ज्या नारीनरांना गोविंदाची
संगत लाभते, त्यांची जात धन्य होय. ज्याला हरिनामांची आवड आहे, तोच एक
अत्यंत शुद्ध होय. ज्यांच्या मनात विठ्ठल असतो, ते शुद्ध होत; मग ते हलक्या
जातीचे का असेनात.
निमूट शरणागती नव्हे, जहरी उपरोध
आपण
कुणबी असल्याचा उल्लेख तुकारामांनी काही वेळा केल्याचे आपण पाहिले. आपण
यातिहीन म्हणजे हलक्या जातीमधील आहोत, असे तर त्यांनी वारंवार म्हटले आहे,
हेही त्यांच्या वरील उद्गारांवरून सहजपणे ध्यानात येते. तुकारामांचे अशा
प्रकारचे उद्गार आपल्या सोयीचे आहेत, अशी वैदिक परंपरेतील लेखकांची धारणा
झाल्याचे दिसते. आपल्या विशिष्ट उद्दिष्टासाठी त्यांनी या उद्गारांचा
कौशल्याने वापरही करून घेतला आहे. एका जातीला उच्च आणि दुसऱ्या जातीला हीन
मानण्याची वैदिक परंपरेमधील व्यवस्था तुकारामांनी निमूटपणे स्वीकारली होती,
त्यांची या व्यवस्थेविरुद्ध काही तक्रार नव्हती, असा त्यांच्या या
उद्गारांचा अर्थ या लेखकांनी लावला आहे. जणू काही तुकारामांनी स्वतः हीन
असल्याचे कबूल केले होते, विनातक्रार स्वीकारले होते, समाधानाने मान्य केले
होते, त्यांच्या मनात या व्यवस्थेविरुद्ध काहीही असंतोष नव्हता, असे
दाखवण्याचा प्रयत्न या लेखकांनी केला आहे.
तुकारामांच्या वरील
उद्गारांचा अर्थ अशा प्रकारचा होत नाही, हे आपण आवर्जून ध्यानात घेतले
पाहिजे. या उद्गारांतून त्यांनी आपले यातिहीनत्व कबूल केले, असे अजिबात
नाही. परंपरेने आपल्यावर कोणता शिक्का मारला आहे, हेच त्यांनी या
उद्गारांतून पुनः पुन्हा स्पष्ट केले आहे, त्यांच्या या उद्गारांतून
अत्यंत तिखट, जहरी उपरोध आहे. मी काय यातिहीन! मला काय कळणार? तुम्ही
पंडित! तुम्ही धर्मशास्त्र जाणणारे विद्वान! त्यांच्या या उद्गारांतील या
प्रकारचा व्यंग्यार्थ हा अत्यंत दाहक आहे. त्यांच्या या विधानांतून विलक्षण
डंख आहे. ही परंपरागत व्यवस्थेपुढे पत्करलेली निमूट शरणागती नाही, हा त्या
व्यवस्थेवर मारलेला जळजळीत आसूड आहे.
या बाबतीत तुकाराम अनेकदा कसे
उसळून उठतात, हे पाहण्यासारखे आहे. आता विठ्ठलाची कृपा झाली असल्यामुळे मी
जातीने हीन राहिलेलो नाही, असे ते म्हणतात. जे लोक स्वतःला श्रेष्ठ जातीचे
समजून आम्हांला हिणवतात, त्यांच्यापेक्षाही आम्ही अधिक श्रेष्ठ दर्जाची
अवस्था प्राप्त करून घेतली आहे, असे ते सुचवतात, याचा अन्वयार्थ आपण नीट
ध्यानात घेतला पाहिजे. आपले यातिहीनत्व त्यांनी निमूटपणे स्वीकारले असते,
तर अखेरपर्यंत ते यातिहीनत्व जपण्यातच त्यांनी समाधान मानले असते. तुम्ही
तुमच्या कसोट्या लावून आम्हांला हीन ठरवत असलात, तरी आम्ही खऱ्या अर्थाने
हीन नाही, हे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. एखाद्याची जात परंपरेने
श्रेष्ठ मानली असल्यामुळे तो श्रेष्ठ ठरत नाही. श्रेष्ठत्वाच्या,
शुद्धत्वाच्या कसोट्या जातीच्या आधारे नव्हे, तर अनन्यभक्तीच्या आधारे
ठरवायच्या असतात. वेदांच्या आणि कर्मकांडाच्या अधिकारामुळे जातीचे शुद्धत्व
ठरत नाही. तात्पर्य, वैदिक पंडित वगैरेंनी निर्माण केलेल्या
श्रेष्ठत्वाच्या कसोट्या आम्ही झुगारून देत आहोत. आम्ही आमच्या स्वतंत्र
कसोट्या निर्माण करीत आहोत. या कसोट्या लावल्या तर आम्ही यातिहीन ठरत नाही,
हेच या सर्व भूमिकेतून तुकारामांनी निःसंदिग्धपणे स्पष्ट केले आहे.
जोहार मायबाप जोहार
तुकारामांच्या
दृष्टीने परंपरागत जात महत्त्वाची नव्हती. आचार, विचार, भावना यांना खरे
महत्त्व होते. त्यामुळे त्यांनी स्वतःला केवळ कुणबीच नव्हे, तर महार देखील
म्हणवून घेतले आहे आणि असे करताना कसलाही कमीपणा मानलेला नाही. त्यांनी
जोहाराचे अभंग म्हणून दोन अभंग (१२७-१२८) लिहिलेले आहेत. महार जातीत
जन्माला आलेल्या लोकांकडून केल्या जाणाऱ्या नमस्काराला जोहार म्हटले जात
असे. तुकारामांनी या अभंगात स्वतःला वेसकर म्हणजेच महार मानले आहे. मी
वेसकर जोहार करीत आहे, असे ते म्हणतात. त्यांनी प्रतीकात्मक दृष्ट्या का
होईना स्वतःला महार मानणे आणि आपल्या बोलण्याला जोहार म्हणणे या घटनेला
सामाजिक दृष्ट्या बरेच महत्त्व आहे. प्रतीकांचा स्वीकार करतानाही माणसे
प्रतिष्ठित प्रतीकांबरोबर स्वतःचा संबंध जोडण्यासाठी धडपडतात, हे प्रसिद्धच
आहे. याउलट, तुकारामांनी अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीशी स्वतःची
एकरूपता दाखविणारा अभंग लिहिणे, म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठितपणाचे विसर्जन
करणे होय. जातिव्यवस्थेमध्ये आपल्यापेक्षा उच्चस्थानावर असलेल्या
लोकांविरुद्ध बंड करणाऱ्या व्यक्ती आपल्यापेक्षा हीन स्थानावर असलेल्या
व्यक्तीना समानतेची वागणूक देण्यास तयार नसतात, त्यांना तुच्छ मानतात,
हिणवतात, असे अनेकदा आढळते. तुकारामांची जात ही परंपरागत दृष्ट्या महार
व्यक्तीच्या तुलनेत उच्चस्थानी होती. या उच्चत्वामुळे त्यांना जी काही
प्रतिष्ठा मिळालेली असेल, त्या प्रतिष्ठेचे त्यांनी या अभंगांच्या द्वारे
स्वेच्छेने विसर्जन केले, असे म्हणता येते.
अस्पृश्यतेचे पाप देहान्त प्रायश्चित्तानेही फिटत नाही
तुकाराम
स्वतःला महार समजण्यात कमीपणा मानत नाहीत, हे आपण पाहिले. स्वाभाविकच,
महार व्यक्तीला अस्पृश्य मानणे, हा त्यांच्या दृष्टीने धर्म ठरू शकत नाही.
या दृष्टीने त्यांच्या एका अभंगाचा आशय पाहण्यासारखा आहे. ते म्हणतात,
"महार व्यक्तीला शिवल्यानंतर जो संतापतो, तो ब्राह्मणच नव्हे. त्याने
केलेल्या रागावण्याच्या या पापाला त्याने देहत्याग केला तरी प्रायश्चित्त
नाही. हा ब्राह्मण चांडाळाला स्पर्श करीत नाही. कारण, त्याच्या स्वतःच्याच
अंतःकरणाला विटाळ असतो. मनामध्ये ज्याचा विटाळ असतो, त्याचीच जात माणसाला
प्राप्त होते."
तुकारामांचा हा अभंग त्यांचे समाजविषयक चिंतन,
त्यांचे जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान, त्यांनी व्यवहारातील आचरणाबद्दल
बाळगलेल्या मनोधारणा इ. अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आहे. महार व्यक्तीचा
स्पर्श झाल्याबद्दल जो रागावतो, तो खरा ब्राह्मण नव्हे, असे ते म्हणतात,
याचा अर्थ अस्पृश्यता मानणे हे पाप आहे, अशीच त्यांची भूमिका असल्याचे
स्पष्ट होते.
आपली ही भूमिका मांडताना त्यांनी ब्राह्मण्याचा एक
महत्त्वाचा निकष सांगितला आहे. ब्राह्मण्य मानायचेच असेल, तर ते कोणाला तरी
शूद्र, अस्पृश्य वगैरे ठरवण्यासाठी मानू नये. 'ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण'
या अर्थाने मानावे. पण या बाबतीत तुकारामांनी एक गोष्ट वारंवार सांगितली
आहे आणि ती म्हणजे ब्रह्माचे नाते हे समतेशी असते. म्हणूनच 'सम ब्रह्म' जो
जाणतो तो ब्राह्मण, असे म्हणता येणे शक्य आहे. स्वाभाविकच, सम ब्रह्माच्या
संकल्पनेत कोणी स्पृश्य आणि कोणी अस्पृश्य, या भेदाला, या विषमतेला वावच
रहात नाही. तात्पर्य, जो कोणी अस्पृश्यता मानत असेल, त्याला सम ब्रह्माचे
ज्ञान झालेले असणे शक्य नाही आणि त्यामुळे त्याला ब्राह्मण म्हणता येणार
नाही.
ब्राह्मण्य मानायचेच झाले तर ते जन्म, जात, वर्ण यांच्या
आधारे मानू नये. सदाचार, समत्व, इंद्रियजय यांच्या आधारे मानावे. जन्माने
ब्राह्मण आहे म्हणून तो शुद्ध वा सोवळा आणि जन्माने अंत्यज आहे म्हणून तो
अशुद्ध वा विटाळ निर्माण करणारा, असे मानू नये. तुकारामांची ही भूमिका
त्यांच्या दोन अभंगांतून (१५५८, १२३५) फार उत्तम रीतीने व्यक्त झाली आहे.
ते म्हणतात, "ज्याला हरिनामाची आवड आहे, तोच फक्त अत्यंत शुद्ध होय. जो
हरिनामाचा बीजमंत्र जपतो, तोच वर्णांमध्ये द्विज वा ब्राह्मण होय. अवघे
विश्व म्हणजे सम ब्रह्म आहे असे पाहणे, हा सर्व वर्णांचा धर्म होय. जो
रामकृष्ण ही नामे निष्कपटपणे उच्चारतो, जो मनामध्ये विठ्ठलाचे सावळे रूप
आठवतो, ज्याच्या अंगी शांती, क्षमा व दया हे अलंकार आहेत, जो प्रसंगी अभंग
धैर्य दाखवतो, ज्याच्या अंगच्या कामक्रोधादी सहा विकारांच्या ऊर्मी नष्ट
झाल्या आहेत आणि हे सगळे घडल्यामुळे जो स्वतः ब्रह्मच बनला आहे, तो जातीने
अंत्यज असला तरी त्याला तत्त्वतः निश्चयपूर्वक ब्राह्मण मानावे."
ब्राह्मण होण्यासाठी स्वतः ब्रह्मरूप झाले पाहिजे
ब्राह्मण्य
मानायचेच झाले, तर त्याची कसोटी काय असावी, हे तुकारामांनी या दोन
अभंगांतून अत्यंत स्पष्टपणे मांडले आहे. ब्राह्मण होण्यासाठी स्वतः
ब्रह्मरूपच झाले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. मी ब्राह्मण जातीत
जन्माला आल्यामुळे शूद्राला शिवणार नाही असे मानणारा आणि त्याचा स्पर्श
झालाच तर संतापणारा मनुष्य हा तुकारामांनी लावलेल्या कसोटीनुसार ब्राह्मणच
ठरत नाही. पण तुकाराम एवढेच म्हणून थांबलेले नाहीत. महार व्यक्तीच्या
स्पर्शामुळे रागावणे हे त्यांनी महाभयंकर पाप मानले आहे. खरे तर विशिष्ट
मंत्र वगैरे म्हटले की ब्राह्मणांची कोणत्याही पापातून सुटका होते, असे
अनेक धर्मशास्त्रे सांगतात. पापातून सुटण्यासाठी मोठ्यात मोठे प्रायश्चित्त
म्हणजे देहान्त प्रायश्चित्त होय. देहाचा अंत करणे म्हणजेच पाणी, अग्नी
वगैरेंमध्ये प्रवेश करून मृत्यू पत्करणे हे देहान्त प्रायश्चित्त होय. महार
व्यक्तीचा स्पर्श झाल्यामुळे संताप येणे हे तुकारामांना इतके गंभीर, भयंकर
आणि तिरस्करणीय पाप वाटते, की देहाचा त्याग करणे हे देखील त्यासाठी पुरेसे
प्रायश्चित्त ठरत नाही. देहान्त प्रायश्चित्ताने देखील या पापातून सुटका
होत नाही.
स्पर्शाने नव्हे, तर संकुचित विचारांनी विटाळ
स्वतःला
ब्राह्मण समजणारा तो मनुष्य चांडाळ व्यक्तीचा स्पर्श टाळतो. चांडाळाच्या
स्पर्शामुळे होणारा विटाळ टाळल्यामुळे आपले शुद्धत्व टिकून राहते, असे
त्याला वाटते. पण वस्तुस्थिती अशी आहे, की त्याचे अंतःकरणच विटाळलेले आहे.
कारण, महार वा चांडाळ यांच्या स्पर्शाने विटाळ होत नसून संकुचित विचारांनी
विटाळ होतो, ही तुकारामांची भावना आहे. ज्याचे विचार जसे असतात, तशी त्याची
जात ठरते, असे त्यांना वाटते. समब्रह्माचा म्हणजेच पर्यायाने माणसा-
माणसातील समतेचा, सदाचाराचा विचार मनात असेल, तर त्याची जात उच्च, शुद्ध
ठरते. याउलट इतरांना हिणवणारा, विषमतेचा विचार मनात असेल, तर त्याची जात
हलकी ठरते.
त्याचे यातिकूळ काय कीजे ?
सामाजिक
व्यवहारातील जातिनिरपेक्षता स्पष्ट करताना तुकारामांनी एका अभंगात पुढील
विचार मांडला आहे. वाण्याच्या घरी असलेला गूळ मिळवण्याशी आपला संबंध असेल,
तर त्याची जात, कूळ पाहण्याची काय गरज आहे ? तुळस उकिरड्यावर वाढलेली असेल,
तर तिच्या ठिकाणाकडे पाहून ती टाकून द्यावी काय ? फणसाच्या कवचाशी
आपल्याला काय करायचे आहे ? त्याच्या आतील बी काढून खावेत, म्हणजे झाले.
तुकारामांनी
या अभंगात सार्वजनिक व्यवहार करण्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा सिद्धान्त
सांगितला आहे. हे व्यवहार करताना आपण त्या व्यवहारांवरच लक्ष केंद्रित
करावे; ते व्यवहार ज्या व्यक्तीशी करायचे असतील, त्या व्यक्तीच्या जातीचा
विचार करू नये, हा तो सिद्धान्त होय. हा सिद्धान्त पटवून देण्यासाठी
त्यांनी दिलेली उदाहरणे मार्मिक आहेत. तुम्हांला वाण्याच्या दुकानातून
गुळासारखा गोड पदार्थ हवा असेल, तर पैसे मोजा आणि गूळ खरेदी करा. पण त्या
दुकानदाराची जात कोणती आहे, याची चौकशी करू नका. त्याची जात आपल्या
जातीपेक्षा उच्च आहे की हीन आहे, याचा शोध घेण्याच्या फंदात पडू नका.
तात्पर्य, या प्रकारचे सामाजिक व्यवहार जातिनिरपेक्ष पद्धतीने करा, असे
तुकारामांचे म्हणणे आहे.
त्यांनी दिलेले तुळसीचे व फणसाचे उदाहरणही
लक्षणीय आहे. तुळसीचे 'तुळसपण', तिचे माहात्म्य हे तिच्या अंगी असलेल्या
गुणधर्मावर अवलंबून असते. ती कुठे उगवली आहे, यावर ते अवलंबून नसते. ती
उकिरड्यावर उगवली असली तरी स्वीकार्य असते, टाकाऊ नसते. त्याच पद्धतीने
गुणवान व्यक्ती तथाकथित हलक्या जातीत जन्माला आलेली असली, तरी तिला दूर
सारायचे नसते. तिला जवळ करायचे असते. वर्ण, जात वगैरे गोष्टी फणसाच्या
वरवरच्या सालीसारख्या असतात आणि आचार-विचार वगैरे गोष्टी त्याच्या
बियांसारख्या असतात. सालीकडे पाहून फणस नाकारणारा मनुष्य मूर्ख ठरेल.
त्याला फणसाच्या बियांचा रसाळ व स्वादिष्ट गाभा चाखायला मिळणार नाही. त्याच
पद्धतीने जातीसारख्या बाह्य, वरवरच्या गोष्टींकडे लक्ष देणारा मनुष्य गुणी
व्यक्तीच्या संगतीला मुकल्याशिवाय राहणार नाही. तिच्याबरोबर केल्या
जाणाऱ्या व्यवहारांचा आनंद गमावून बसल्याखेरीज राहणार नाही.
यातिहीन मोकाशाची आज्ञा पाळलीच पाहिजे
गावचा
मोकाशी हलक्या जातीमधील आहे, म्हणून काय त्याची आज्ञा मानायची नसते, असा
प्रश्न तुकारामांनी एका अभंगात विचारला आहे. तो हलक्या जातीमधील असला तरी
देखील त्याची आज्ञा मानलीच पाहिजे, हे आपले मत त्यांनी या प्रश्नातून
निःसंदिग्धपणे व्यक्त केले आहे.
त्यांच्या या प्रश्नातून त्यांच्या
या बाबतीतील भूमिकेचे दोन पैलू अगदी लख्खपणे प्रकट होतात. तथाकथित हलक्या
जातीमधील मनुष्य देखील गावचा मोकाशी वा प्रमुख होऊ शकतो, त्याला त्या पदावर
जाण्याचा अधिकार आहे, त्याची जात त्या पदावर जाण्याच्या बाबतीत त्याच्या
आडवी येऊ शकत नाही, हा त्यांच्या भूमिकेचा एक पैलू झाला. असा मनुष्य मोकाशी
झाल्यानंतर तथाकथित उच्च जातीमधील लोकांनी देखील त्याची आज्ञा पाळली
पाहिजे, आपण उच्च जातीमधील असताना हलक्या जातीमधील व्यक्तीची आज्ञा कशी
पाळायची असा विचार त्यांनी मनात आणता कामा नये, आपला प्रमुख म्हणून त्यांनी
त्याचा योग्य तो मान राखलाच पाहिजे, हा त्यांच्या भूमिकेचा दुसरा पैलू
होय.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी संत तुकाराम हयात
असते, तर राज्याभिषेकाला वैदिकांचा विरोध होत असताना त्यांच्या या भूमिकेचे
फार मोठे नैतिक बळ शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहिले असते, असे मला
वाटते.
हलक्या जातीमधील व्यक्तीने उच्च जातीमधील व्यक्तीला काही
उपदेश करणे वा आज्ञा देणे, हे आपल्याकडच्या धर्माने घालून दिलेल्या
व्यवस्थेमध्ये मान्य होण्यासारखे नव्हते. या पार्श्वभूमीवर तुकारामांनी
मांडलेले हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.
सकळांसी येथे आहे अधिकार
अधिकाराच्या
बाबतीत तुकारामांनी पुढील विचार मांडले आहेत :- स्वर्गामध्ये वा
वैकुंठामध्ये मिळणार नाही असा सुखाचा सोहळा हरिनामामुळे पृथ्वीवर लाभतो आणि
त्याचा अधिकार सर्वांना आहे. देवाच्या प्रसादाचे पात्र सर्वांसाठी ओसंडून
गेले असून या प्रसादाचा अधिकार सर्वांना आहे. नामस्मरणाचा अधिकार ब्राह्मण,
क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ, मुले, स्त्रीपुरुष, यांनाच नव्हे तर
वेश्यांनाही आहे. येथे उणीव नाही. सर्व वर्णांच्या लोकांनी तृप्ती मिळवावी.
समाजाने ज्यांना वेद वगैरेंचा अधिकार दिलेला नाही, अशा किती तरी लोकांना
नारायणाने पूर्वी आपल्या पायांजवळ जागा दिली आहे. पंढरीचे वारकरी मूढ वा
पापी असले, तरी ते मोक्षाचे अधिकारी होत. परीस ज्याप्रमाणे लोखंडाचे गुणदोष
न पाहता त्याचा उद्धार करतो, त्याप्रमाणे ईश्वर सर्वांचा उद्धार करतो.
गणिकेच्या जातीचा काही मोठा अधिकार नव्हता, पण विठ्ठलाने तिचा उद्धार केला.
ढग काही विशिष्ट जागेचा विचार करून वर्षाव करीत नाही तसेच विठ्ठलाचे आहे.
फळ मात्र ज्याची भावना जशी असेल, तसे त्याला मिळते. हरिकथा ही दीन आणि
दुबळ्या लोकांच्या दृष्टीने सुखाची रास आहे, भवसागर तरून जाण्याची नौका
आहे. उच्च आणि नीच अशा सर्वांना तिचा अधिकार आहे. जो मुखाने हरीचे नाम
उच्चारतो, तो सर्व सुखांचा अधिकारी आहे.
मी आत्म्याच्या बीजाचा
अधिकारी झालो असून माझ्या मर्जीप्रमाणे पाहिजे त्या वेळी, पाहिजे ते पेरू
शकतो. मी झडप घालून पंगतीला बसलो आहे. आता मला येथून उठविल्यास अन्न
देणाराची फजिती होईल. मला जे हवे असेल, ते सगळे मी मागून घेईन. मला नाही
म्हणण्याचा हा काळ नव्हे. मी आता योग्य त्या मानाचा अधिकारी झालो असून मी
त्या बाबतीत लोकलाज बाळगत नाही.
तुकारामांनी घेतलेली ही भूमिका
सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. वैदिक परंपरेने शूद्रांची अनेक
बाजूंनी कोंडी केली होती, नाना तऱ्हांनी त्यांना हिणवले होते.
ज्यांच्यामुळे प्रतिष्ठेचे व सुखाचे जीवन जगता येईल, अशा सर्व गोष्टींची
दारे त्यांच्यासाठी बंद केली होती. अशा गोष्टींचा अधिकार त्यांना नाही, अशा
अर्थाचे अत्यंत निर्दय नियम करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर
तुकारामांनी सांगितलेले भक्तीच्या विश्वातील निर्मळ नियम कसे उठून दिसतात,
ते पाहण्यासारखे आहे.
वैदिक परंपरेने ज्यांना ज्यांना अधिकार
नाकारला, त्यांना त्यांना अधिकार असल्याचे तुकारामांनी अत्यंत निर्धाराने
सांगितले. त्यांनी दुसरे टोक गाठून ब्राह्मणांचा अधिकार नाकारला, असे नाही,
तथापि ब्राह्मणांच्या बरोबरीने शूद्रांसह सर्व वर्णांच्या लोकांना अधिकार
असल्याचे सांगितले. शूद्रांनाच नव्हे तर त्यांच्याहूनही हीन मानलेल्या
चांडाळांनाही अधिकार असल्याचे सांगितले. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना
अधिकार देताना स्त्रियांतही अत्यंत हीनस्थानी असलेल्या अगदी वेश्यांनाही
अधिकार असल्याचे सांगितले.
अधिकार नाकारणारांच्या छाताडावरून अधिकाराची घोषणा
उत्थानाची,
उद्धाराची वाट सर्वांसाठी मोकळी हवी. उच्च अवस्थेकडे झेपावण्याची स्वप्ने
कोणालाही पाहता यावीत. जातीच्या वा वर्णाच्या कारणाने कोणाच्या मनुष्यपणाला
डाग लागू नये. अशा एका मुक्त, समताधिष्ठित समाजाचे स्वप्न तुकारामांनी
पाहिले आहे. ज्यांनी त्यांना वेद वगैरेंचा अधिकार नसल्याचे सांगून हिणवले,
त्यांच्याच जणू काही छाताडावर उभे राहून मी आत्म्याच्या बीजाचा अधिकारी
आहे, अशी घोषणा त्यांनी केली. तुम्ही वेदांचा अधिकार खुशाल नाकारा. त्या
वेदांच्याही मुळाशी असलेल्या सत्याचा अधिकार मला प्राप्त झालेला आहे, असे
आत्मविश्वासाचे उद्गार त्यांनी काढले आहेत. अधिकार नाकारू पाहणाऱ्या वैदिक
परंपरेला तुकारामांनी दिलेली ही एक जोरदार थप्पड आहे, असेच म्हटले
पाहिजे.
यातायाती धर्म नाही विष्णुदासा
तुकारामांच्या
मनात सर्व जातींच्या व भिन्न-भिन्न धर्मांच्या संतांविषयी विलक्षण आपलेपणा
होता. त्या दृष्टीने त्यांचे काही अभंग पाहण्यासारखे आहेत. पंढरी हे माझे
माहेर असून राही, रखुमाई व सत्यभामा या माता आहेत आणि पांडुरंग हा पिता
आहे, असे एका अभंगात त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर अनेक संतांविषयी त्यांनी
त्याच अभंगात जिव्हाळा कसा व्यक्त केला आहे, ते पाहण्यासारखे आहे :-
उद्धव, अक्रूर, व्यास, अंबरीष आणि नारद हे माझे भाऊ असून मी त्यांचा गौरव
करतो. गरुड हा बंधू आणि पुंडलीक हा माझा लडिवाळ आहे. मला त्यांचे कौतुक
वाटते. संत आणि महंत यांचा मला मोठा गोतावळा आहे. मी नेहमी ओव्यांमध्ये
त्यांचे स्मरण करतो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, चांगदेव आणि नामदेव हे
माझे जिवलग आहेत. नागोजन मित्रा, नरहरी सोनार, रोहिदास आणि कबीर हे माझे
सोयरे आहेत. परसो भागवत, सूरदास, सावता या सर्वांसाठी मी गीते गाईन. चोखा
मेळासारखे संत हे माझ्या जीवाचे सोयरे असून मला घडीभरही त्यांचा विसर पडत
नाही. एकनाथ, जनार्दन, कान्हया पाठक आणि मीराबाई हे संत माझ्या जीवाचे जीवन
आहेत. आणखीही संत आहेत. महानुभाव मुनी आहेत. त्या सर्वांच्या चरणी माझा
जीव आहे. मी या सगळ्यांसाठी आनंदाने ओव्या गाईन. या सर्वांच्या सहवासात
माझे बलवान आईवडील सुखाने नांदोत (१५६८).
याच स्वरूपाचा त्यांचा
आणखी एक अभंग आपण आवर्जून पाहिला पाहिजे, असे मला वाटते. त्याचा आशय असा,
"ज्या कुळात हरीचे दास जन्म घेतात, ते कूळ पवित्र होय; ज्या देशात हरीचे
दास जन्म घेतात, तो देश पावन होय..... वर्णाच्या अभिमानाने कोण पावन झाले
आहे, ते मला सांगा पाहू? हरीच्या भजनामुळे अंत्यज वगैरे योनीतील लोकही तरले
असून पुराणे त्यांची भाट झाली आहेत. त्यांच्यामध्ये तुळाधार हा वैश्य आहे.
गोरा हा कुंभार आहे. रोहिदास हा चपला शिवणारा चांभार आहे. कबीर हा विणकर
आहे. लतीफ हा मुसलमान आहे. विष्णुदास सेना हा नाभिक आहे. कान्होपात्रा,
खोदू हा हिजडा आणि दादू हा पिंजारी हे भजनामध्ये ईश्वराशी एकरूप झाले आहेत.
चोखामेळा आणि बंका हे जातीचे महार असून ईश्वराने त्यांच्याशी ऐक्य केले
आहे. जनाबाई ही नामदेवाची दासी असून पंढरीराव तिच्याबरोबर जेवत असल्यामुळे
तिचा केवढा भाव आहे. मैराळा जनकाचे कूळ कोणते, तेही ठाऊक नाही. पण त्याचे
महिमान किती वर्णन करावे ! तात्पर्य असे, की विष्णुदासांना यातायाती धर्म
नाही. (म्हणजेच जातीच्या आधारे भेदभाव नाही.) वेदशास्त्रांचाही हाच निर्णय
आहे. ईश्वराने किती पतित तारले आहेत, हे तुम्ही ग्रंथांना विचारून पहावे
(४२९९)."
या दोन अभंगांपैकी पहिल्या अभंगात त्यांनी केवळ
आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानल्या गेलेल्या जातीतीलच नव्हे, तर आपल्यापेक्षा
हीन मानल्या गेलेल्या जातीतील संतांच्या पायांवर आपला जीव ठेवण्याची तयारी
दर्शविली आहे. हे संत म्हणजे आपले भाऊ, गणगोत, जिवलग असून त्यांचा गौरव
करण्याची, त्यांचे कौतुक करण्याची आणि त्यांच्यासाठी गीते गाण्याची भावना
त्यांनी व्यक्त केली आहे. वर्णाच्या अभिमानाने कूळ आणि देश पवित्र होत
नाहीत, तर संतांच्या वास्तव्याने त्यांना पावित्र्य येते, अशा विचाराने
त्यांनी दुसऱ्या अभंगाची सुरुवात केली आहे. विष्णुदासांना यातायाती धर्म
नसतो, म्हणजेच जातीच्या आधारे केला जाणारा भेदभाव नसतो, असे सांगून त्यांनी
त्या अभंगाचा शेवट केला आहे. वेदशास्त्रांनी हे सांगितले आहे असे ते
म्हणतात, तेव्हा सर्वांचा आत्मा एक असतो वगैरेसारखे समतेचे तत्त्व मांडणारी
उपनिषदांसारखी शास्त्रे त्यांना अभिप्रेत आहेत, हे उघड आहे.
ते
आणखी म्हणतात -- ईश्वराला संतांचा धाक असतो. त्यामुळे संतांना शरण गेले, की
ईश्वर सहजपणे लाभतो आणि या संतांचे वैशिष्ट्य असे, की त्यांचे पाय
धरण्यासाठी त्यांची जात, कूळ वा नाव विचारावे लागत नाही. जे परलोकीचे
सांगाती असतात, त्यांची जात विचारायची नसते. पंढरीमध्ये सर्व प्राणी
विठ्ठलरूप होतात. सर्वांत उत्तम मानले गेलेले ब्राह्मण, सर्वांत हीन मानले
गेलेले चांडाळ, पुरुष, स्त्रिया, मुले हे सर्व जण तेथे ईश्वररूपच असतात.
जात, धर्म, कूळ यांचा भेद न मानणे, हेच परमहंस अवस्थेचे रहस्य होय. मी
जातीकडे पहात नाही, वैष्णव आहे एवढेच पाहून त्यांची पूजा करतो. संत भलत्या
जातीचे असले तरी ते प्रत्यक्ष विष्णुमूर्ती वा शाळिग्राम असून देवांना
बाजूला सारून या संतांची पूजा करावी. हरीच्या दासाचे कूळ भलते असले, तो
शुद्ध असला वा चांडाळ असला, तरी मी त्याला धन्य मानतो.
रामाचे नाव
घेतले, की हलक्या जातीतील आणि कुलहीन मनुष्यही तरून जातो. विठ्ठलाचे नाव
घेताना आपल्या जातीचा व कुळाचा विचार करावा लागत नाही. जात व कूळ हलके
असूनही नाम घेतल्यामुळे ईश्वराने कित्येकांचा उद्धार केला आहे. मला
कोणाच्याही जातीशी काही कर्तव्य नाही, ज्याच्या मुखात नाम असते, तोच धन्य
होय.
ईश्वराचे नाम घेणाराला वर्णावर्ण नसतात. म्हणजेच हा वर्ण
श्रेष्ठ, हा हीन अशी स्थिती नसते. लोखंडाचे शस्त्रे, गोळे आणि इतर प्रकार
होत असले, तरी परीस त्या सगळ्यांचे सोने करतो. फरक करीत नाही. पावसाचे
सगळीकडे पडलेले पाणी गंगेला मिळते आणि गंगाच होऊन जाते तसेच नामामध्ये
वर्णावर्ण नसतात. महापुरातून पैलतीराला जाताना नावेमध्ये बसलेले ब्राह्मण
तरतात आणि बाकीचे बुडतात, असे होते काय ? नाना प्रकारचे लाकूड अग्नीत पडले,
की एकरूप होऊन जाते. तो अग्नी सामान्य वृक्ष वा चंदन असा फरक करत नाही
तसेच नामामध्ये वर्णावर्ण नसतो. नामरूपी अमृत हे ईश्वरप्राप्तीचे सोपे साधन
होय.
तुकारामांचे हे विचार इतके स्पष्ट आहेत, की खरे तर
त्यांच्यावर काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही. सर्व जातींमधील संतांविषयी
त्यांच्या मनात समान पूज्यभाव आहे. नावेतून जाताना ब्राह्मण तेवढे तरतात
आणि बाकीचे बुडतात काय, हा त्यांनी विचारलेला प्रश्न अत्यंत मार्मिक असून
विषम समाजरचनेच्या मुळावर घाव घालणारा आहे. मला कुणाच्या जातीशी कर्तव्य
नाही, संत भलत्या जातीमधील असला तरी त्याच्या पूजेसाठी देवालाही बाजूला
सारावे, वर्णावर्ण असा भेद करू नये, संतांची जात विचारायची नसते इ.
विधानांतून तुकारामांनी मांडलेला विचार जात, वर्ण, कूळ इ. उपाधींच्या
पलीकडे जाऊन माणसाच्या आचरणाला, संतत्वाला महत्त्व द्यावे असे स्पष्टपणे
सांगणारा आहे.
उंचनीच काही नेणे भगवंत
तुकाराम
स्वतः संतांच्या जातकुळाचा विचार न करता त्यांच्याविषयी जिव्हाळा बाळगत,
तसाच ईश्वरही भक्तांच्या जातकुळाचा विचार न करता त्यांचा उद्धार करतो, अशी
त्यांची श्रद्धा होती. ईश्वराच्या स्वरूपातच कूळ, जात वा वर्ण यांना थारा
नसतो, असे त्यांना वाटत असे. ईश्वर जातीच्या क्रियाकर्मापासून भ्रष्ट झाला
आहे, असे त्यांनी याच अर्थाने म्हटले आहे.
ईश्वर जातीचा विचार करीत
नाही, याविषयी त्यांनी मांडलेले काही विचार पुढीलप्रमाणे आहेत :-
परमेश्वरासारख्या समर्थाच्या मनात वर्णावर्णभेद नसतो. तो भक्ताकडची शिदोरी
पहात नाही अथवा त्याची जात व कूळ विचारत नाही. तो कुळ शुद्ध आहे की हीन
आहे, हे पहात नाही; ज्याचे आचरण निर्मळ असेल त्याच्या ठिकाणी वास्तव्य
करतो. तो जात व कुळ विचारत नाही, की भक्तांच्या उद्धारासाठी वेळ लावत नाही.
कसल्या कसल्या लोकांचा त्याने सहजपणे उद्धार केला आहे. ईश्वराने संतांची
जात न विचारता त्यांना आपल्या पायांजवळ जागा दिली. हरी भक्तांच्या
वर्णधर्माचा विचार करीत नाही. जे जे समोर येतात, त्यांना त्यांना तो
आलिंगितो, आपलेसे करतो. पंढरीमध्ये अठरापगड जाती या सगळ्याच्या सगळ्या
वैष्णव असतात. तेथे दुजाभाव नसतो. चंद्रभागेमध्ये तथाकथित हलक्या जातीमधील
लोकही स्नान करतात. ईश्वराने अपराध, जात वा कूळ न पाहता अजामेळ, गणिका,
भिल्ल यांचा उद्धार केला. भगवंत उच्च- नीच असा भेद जाणत नाही. तो भक्ताची
भावना पाहूनच थांबतो. दासीपुत्र विदुर, सजन कसाई अशासारख्यांचाही त्याने
उद्धार केला. कृष्णाने श्रेष्ठ व कनिष्ठ अशा जातींना समानच केले. त्यांतील
विशिष्ट अशा कोणाची निवड केली नाही. स्त्रीपुरुष अगदी भलत्या जातीचे का
असेनात, नारायण त्यांच्या भावनेवर प्रेम करतो. ज्यांनी वेद ऐकायचा नसतो,
अशा यातिहीन लोकांना त्याने वैकुंठीचे पद दिले. ईश्वराचे सान्निध्य ही एक
मुक्त बाजारपेठ असून तेथे सर्व जातींच्या लोकांनी यावे. येथे कोणी मोठे,
कोणी लहान, असा काहीही पंक्तिभेद नाही. आमच्या या दुकानात येण्यासाठी मी
सर्व लोकांना समान रीतीने हाक मारली आहे. येथे ज्याला त्याला आपल्या
आवडीप्रमाणे माल मिळेल. येथे पंगतीला भेद केला जात नाही. सर्वांच्या पुढे
पोती मोकळी आहेत. त्यासाठी कुणाला विचारावे लागत नाही. हा व्यवहार एकूण सढळ
आहे.
ईश्वरावरचा डाग पुसला
चातुर्वण्याची
निर्मिती ईश्वराने केली आहे, असे वैदिक परंपरा मानते. स्वाभाविकच, वर्ण,
जाती वगैरेंच्या आधारावर केला जाणारा भेदभाव हा ईश्वराने निर्माण केला आहे,
असे लोकांच्या मनावर पक्के बिंबवण्यात आले आहे. ब्राह्मण हे स्वतः
पृथ्वीवरचे प्रत्यक्ष देव होत आणि शूद्रांना मात्र देवाच्या जवळ जाण्याचाही
मार्ग उपलब्ध नाही, ते देवाच्या मूर्तीलाही स्पर्श करू शकत नाहीत, अशा
प्रकारची एक पक्षपाती धार्मिक व्यवस्था आपल्या समाजात पक्की रुजली होती. या
प्रकारात स्वतःच्याच मुलांना पक्षपाती वागणूक देणारा, असे ईश्वराचे चित्र
उभे राहते. खरे तर त्यामुळे ईश्वराची प्रतिमा डागाळते. पण ज्यांना
ईश्वराच्या नावावर स्वतःचा ऐहिक स्वार्थ साधायचा असतो, ते लोक याची पर्वा
करीत नाहीत.
तुकारामांनी ईश्वराच्या प्रतिमेवरचा हा डाग पूर्णपणे
पुसून काढला आहे आणि समाजव्यवस्थेवरचा विषमतेचा कलंक पुसून तिलाही निकोप,
निर्मळ बनवले आहे. ईश्वराजवळ कोणी उच्च नाही आणि कोणी हीन नाही, हा विचार
त्यांनी इतक्या वेळा आणि इतक्या प्रकारांनी सांगितला आहे, की त्यांच्या या
बाबतीतील भूमिकेविषयी कोणताही संदेह रहात नाही. ब्राह्मणांनी ज्यांना
वेदांचा अधिकार नाकारला होता, जे समाजात अगदी खालच्या, हीन थरावर असल्याचे
मानण्यात आले होते, त्यांचाही परमेश्वराने उद्धार केल्याचे तुकारामांनी
मोठ्या अभिमानाने, मोठ्या समाधानाने नोंदवले आहे. समाजामध्ये समतेचे एक
प्रसन्न वातावरण पसरावे, ही त्यांची भावना आहे. एका उदात्त तत्त्वज्ञानाचा
सुगंध सगळीकडे दरवळावा, ही त्यांची धडपड आहे. आपल्या समाजाच्या धर्माला एका
अत्यंत घातक आणि बुरसटलेल्या दुष्प्रवृत्तीमधून मुक्त करण्याचे काम
त्यांनी केले आहे.
आक्षेपाचे विवेचन
येथे
तुकारामांवर, किंबहुना एकूण संतांवर, घेतल्या जाणाऱ्या एका आक्षेपाचे थोडे
विवेचन करणे योग्य ठरेल. तुकारामांवरील आक्षेपांचे खंडन करण्याला प्राधान्य
देणे, हे या पुस्तकाचे स्वरूप नाही. त्यामुळे हे विवेचन विचारांची दिशा
दाखवण्यापुरते आणि संक्षेपाने करायचे आहे तसेच हे विवेचन सर्व संतांच्या
संदर्भात न करता फक्त तुकारामांच्या पुरते मर्यादितही करायचे आहे.
तुकारामांनी
जी समता आणली ती अध्यात्माच्या वा भक्तीच्या क्षेत्रात आणली; सामाजिक
व्यवहारात आणली नाही आणि त्यामुळे या समतेला विशेष महत्त्व देण्याचे कारण
नाही, असे स्थूलमानाने या आक्षेपाचे आणि त्यातून निघणाऱ्या निष्कर्षाचे
स्वरूप आहे. खरे तर प्रस्तुत प्रकरणात आतापर्यंत मांडलेले तुकारामांचे या
संदर्भातील विचार पाहून वाचक स्वतःच या बाबतीत आपले मत बनवू शकतात. तरीही
काही मुद्यांकडे त्यांचे लक्ष वेधणे योग्य ठरेल, असे मला वाटते.
देहाच्या पातळीवरही समता मानली
तुकारामांनी
केवळ आत्म्याच्या पातळीवर समता मानली हे खरे नसून त्यांनी ती देहाच्या
पातळीवरही मानली होती, हे त्यांच्या अनेक अभंगांतून जाणवते. माणसांचे
चर्ममांस भिन्न नसताना त्यांपैकी काही जणांना शुद्ध व काही जणांना अशुद्ध
कशाच्या आधारे म्हणायचे, हा त्यांचा समतेचा विचार देहाच्या समतेचा आहे, हे
उघड आहे. वेगवेगळ्या जातींतील संत एकमेकांच्या पाया पडतात, तेव्हा त्यांना
एकमेकांचा स्पर्श होतोच. तुकारामांनी हा स्पर्श अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा
मानला आहे. आपल्यापेक्षा हलक्या मानलेल्या जातीतील संतांच्या पायांवर केवळ
डोकेच नव्हे, तर आपला जीवही ठेवण्याची तुकारामांची तयारी होती. ही तयारी
देहाच्या समतेशीच जोडलेली आहे. याउलट, वैदिक पंडितांनी मात्र ब्राह्मण
व्यक्ती तुकारामांच्या पाया पडल्याबद्दल तुकारामांना न्यायालयात खेचले आणि
शिक्षाही देवविली, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. तुकारामांनी लक्ष्यार्थाने
का होईना स्वतःला महार म्हणवून घेणे, ही गोष्ट केवळ आध्यात्मिक पातळीवरची
नसून अगदी गंभीरपणे सामाजिक आशयाची आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे
महार व्यक्तीला स्पर्श केल्याबद्दल राग आला असता लागणाऱ्या पापांतून
देहान्त प्रायश्चित्तानेही सुटका होत नाही, हा त्यांचा विचार म्हणजे
निःसंशयपणे सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल होय.
आपले हृदय तुकारामांच्या हृदयाशी जोडलेले
आता,
तुकारामांचे विचार आपल्या समतेच्या कसोटीवर टिकत नाहीत, ते आपल्या
अपेक्षेइतके पुरोगामी नाहीत, असे वादासाठी आपण मान्य करू या. हे मान्य
केल्यानंतर पुढील प्रश्नांचे उत्तर देण्याची जबाबदारी आपल्यावर येते.
तुकारामांचे हे विचार समतावाद्यांशी अधिक जुळणारे आहेत, की विषमतावाद्यांशी
? त्यांची भूमिका पुरोगामी व्यक्तीशी सुसंगत आहे, की प्रतिगामी व्यक्तीशी?
ते याच दिशेने चालत राहिले असते तर पुरोगाम्यांच्या पक्षात पोचले असते, की
प्रतिगाम्यांच्या गोटात पोचले असते? म्हणजेच, त्यांच्या पावलांची दिशा
न्यायाकडे जात होती की शोषणाकडे? समाजाने शंभर पावले टाकल्यावर आपल्याला
आदर्श वाटणारी समता प्रस्थापित होईल असे मानले असता, तो प्रवास केवळ
शंभराव्या पावलाने पूर्ण झाला म्हणायचे, की त्या शंभराव्या पावलाइतकेच
आधीच्या प्रत्येक पावलाला त्या ध्येयपूर्तीचे श्रेय द्यायचे? शंभर घाव
घातल्यावर एखादा विषवृक्ष तुटून पडत असेल, तर तो फक्त शंभराव्या घावाने
तुटला म्हणायचे, की आधीच्या प्रत्येक घावाचा त्या कामगिरीतील वाटा मान्य
करायचा? मला वाटते, या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हा एक नाजूक धागा असून तो
आपले हृदय तुकारामांच्या हृदयाशी हळुवारपणे जोडून टाकण्याचे काम करतो. हे
धागे आपल्याला तुकारामांपासून आणि तुकारामांना आपल्यापासून तुटू देणार
नाहीत.
त्यांचे विचार कमअस्सल? छे ! मुळीच नाही
वस्तुतः, तुकारामांचे शत्रू आणि समतेचे शत्रू एकच आहेत. वैदिक परंपरेनुसार सगळे श्रोत्रिय हे भेदभाव मानणारे होते आणि तुकारामांनी भेदभाव करणारे श्रोत्रिय हे समाजातील अंत्यज मानावेत, सर्वांत हीन मानावेत असे ठणकावले, तेव्हा त्यांनी वैदिक पंडितांचे केवढे विखारी वैर ओढवून घेतले. त्यांच्या या आणि अशाच प्रकारच्या इतर विद्रोही विचारांबद्दल वैदिकांनी त्यांच्या जीवनाच्या चिंध्या चिंध्या करण्याचे प्रयत्न केले, तरीही या बहाद्दर मानवाने आपल्या विचारांच्या बाबतीत तडजोड केली नाही. याच विचारांसाठी आणि याच विचारांमुळे त्यांच्या संसारावर निखारे पसरले गेले, कुटुंब देशोधडीला लागले आणि याच विचारांमुळे त्यांना प्राणही गमवावे लागले. ज्या महामानवाने हे सगळे निर्भयपणे आपल्या उरावर झेलले आणि एवढे मोठे बलिदान दिले, त्याचे विचार कमअस्सल होते, असे म्हणणे आपल्याला शोभणार नाही, तो कृतघ्नपणा होईल, अन्याय होईल, असे मला वाटते. शिवाय, तुकारामांचे शत्रू तुकारामांच्या प्रतिष्ठेचा आपल्याला फायदा घेता यावा म्हणून केवळ डावपेचाचा भाग म्हणून तुकारामांना आपलेसे करीत असल्याचे नाटक करीत असताना त्या शत्रूंनी तुकारामांची प्रतिमा छिन्न-विच्छिन्न करण्याच्या उद्देशाने लिहिलेले 'काहीच्या बाही' आपण खरे मानावे आणि तुकारामांना स्वतःच आपल्या आणि त्यांच्या शत्रूच्या गोटात ढकलावे, हे कृत्य आपल्या शहाणपणाचेही द्योतक ठरणार नाही, असे मला वाटते. या विषयावर सध्या इतके पुरे, असे मला वाटते.
(लेखक हे आधुनिक महाराष्ट्रातील एक क्रांतिकारक विचारवंत, इतिहासकार, प्रभावशाली व्याख्याते आणि संस्कृतचे सव्यसाची अभ्यासक असून त्यांच्या ‘विद्रोही तुकाराम’ या ग्रंथातून हा लेख घेतला आहे.)
*** *** ***
या लेखात आलेले तुकोबांचे अभंग
(अभंग क्रमांक सरकारी गाथेतील आहेत.)
भेदाभेदभ्रम अमंगळ
अवघी एकाचीच वीण । तेथे कैचे भिन्नाभिन्न? ॥ ३५४.४
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥
कोणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचे ॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥ ४६.१,३,४
वससी तू या भूतांचे अंतरीं । तरि का भेद हरी दावियेला? ॥ १३१७.४ ।
.....................दुसरे ते पाप भेदबुद्धि ॥
तुका म्हणे पाहे तिकडे सारिखे । आपुले पारिखे निरसले ॥ १३२५.३,४
तुका म्हणे काला । कोठे अभेद देखिला? ॥ १६३१.४
कालियापे भेद मानिता निवडे । श्रोत्रियांसी जोडे अंत्यजता ॥ २१८१.४
येथे राया रंका एकी सरी । नाही भिन्नाभिन्न तुमच्या घरीं ॥ ६३२.२
कामक्रोधा नाही चाली । भूतीं जाली समता ॥
तुका म्हणे भेदाभेद । गेले वाद खंडोनि ॥ १५३४.३,४
गाळियेले भेद । सारियेले वादावाद ॥ २१६१.३
शुद्धाशुद्ध निवडे कैसे । चर्ममास भिन्न नाही? ॥
काही अधिक नाही उणे । कवण्या गुणें देवासी ॥
तुका म्हणे पात्र चाड । किंवा विषें अमृत गोड ॥ ३४६१.१,२,८
पंडित तोचि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ।
अवघे समब्रह्म पाहे । सर्वांभूतीं विठ्ठल आहे ॥ १६२३.१,२
तुका म्हणे वर्णा धर्म । अवघे आहे सम ब्रह्म ॥ १५५८.३
मुंगी आणि राव । आम्हा सारखाचि जीव ॥ १८९५.१
गंगा न देखे विटाळ....।......॥
काय खंडिली भूमिका । वर्णा पायरिकां लोकां ॥ १३०५.१,३
नाही आता पर आप दोन्ही ॥ ३५१२.४
एकमय जाले विठोबाच्या नामें । ४१५२.४
यातीशी कारण नाही देवा
याती शुद्ध परि अधम लक्षण । वाया गेले तेणें सोंगें ही तें ॥ ९९२.४ ॥
जळो ते समूळ । धन संपत्ति उत्तम कुळ ॥ २२९६.३ ॥
न सरे येथे यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावे ॥ ४२५६.२ ॥
याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥ ३४९.३ ॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण। यातीशी कारण नाही देवा ॥ १२३.२ ॥
याति कुळ येथे असे अप्रमाण। गुणाचे कारण असे अंगीं ॥ ३३७.२ ॥
तुका म्हणे याती । हो का तयाची भलती ॥ ३६६.४ ॥
वर्ण-अभिमानें कोण जाले पावन ?
वर्ण कुळ जाति याचा अभिमान । त्यजावा सन्मान लौकिकाचा ॥ ४१७३.३ ॥
येथे धरी लाज । वर्णा अभिमान काज ।
नाडला सहज । तुका म्हणे तो येथे ॥ ४०४७.४ ॥
देई चरणसेवा भूतांचे भजन । वर्णा अभिमान सांडवूनि ॥ २०५०.४ ॥
वर्ण अभिमानें कोण जाले पावन । ऐसे द्या सांगून मजपाशी ॥ ४२९९.३
वर्णाभिमान विसरली याति। एकएकां लोटांगणी जाती ॥ १८९.५ ॥
विसरल्या आम्ही कोणीये जातीच्या । वर्णाही चहुंच्या एक जाल्या ॥ ४५२३.७
तुका म्हणे नाही वर्णा अभिमान। अवघे जीवन्मुक्त लोक ॥ ४११०.४
तुम्ही नका करू गर्व । उंच जाती मिळूनि सर्व ॥ (आजगावकरांचे पूर्वोक्त पुस्तक, पृ. २०९)
वर्णाश्रमाने सर्वश्रेष्ठ कल्याण नाही
वर्णाश्रमाचे धर्म । जाती श्रम जालिया । ७०९.५
वर्णाश्रम करिसी चोख । तरि तू पावसी उत्तम लोक ।
तुजला ते नाही ठावे । जेणें अंगेंचि ब्रह्म व्हावे ॥ ७८२.१,२
बरा देवा कुणबी केलो
बरा देवा कुणबी केलो । नाही तरी दंभेंचि असतो मेलो ॥ १ ॥
भले केले देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ २ ॥
विद्या असती काही । तरी पडतो अपायीं ॥ ३ ॥
सेवा चुकतो संतांची । नागवण हे फुकाची ॥ ४ ॥
गर्व होता ताठा । जातो यमपंथें वाटा ॥ ५ ॥
तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥ ६ ॥ ३२०
जालासि पंडित पुराण सांगसी। परि तू नेणसी मी हे कोण ॥ १ ॥
गाढवभरी पोथ्या उलथिशी पाने। परि गुरुगम्यखुणे नेणशी बापा ॥ २ ॥
तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ॥ ३ ॥ ४३९२
तुका विनवी कुणबियाचा ॥ ३७५२.५
जोहार
जोहार मायबाप जोहार । सारा साधावया आलो वेसकर ॥ १२७.१
शूद्रवंशीं जन्मलो
शूद्रवंशीं जन्मलो । म्हणोनि दंभें मोकलिलो ॥
घोकाया अक्षर । मज नाही अधिकार ॥
सर्वभावें दीन । तुका म्हणे यातिहीन ॥ २७६६.१,३,४
तू श्रीयेचा पति । माझी बहु हीन याती ॥ २०५५.१
हो का भलत्या ठायीं । कुळीं जन्म भलतैसा ॥ १७६२.५
काय याती शुद्ध आहे कुळ कर्म ? । तेणें पडे वर्म तुझे ठायीं ॥ १०१४.३
जातीचे मी हीन न कळे भजन । म्हणोनि संतचरण इच्छीतसे ॥ ४४८८.३
वाणी नाही शुद्ध याति एक ठाव । ४६०६.२
याती हीन मति हीन कर्म हीन माझे । २७५३.१
सेवटील स्थळ नीच माझी वृत्ति । १३२१.३
हीन माझी याति । २८५०.१
हीन बुद्धि माझी । अधम हे याती । ३६५४.४
याती मतिहीन रूपें लीन दीन । १२१९.१
तुका म्हणे काय शुद्ध माझी जाती । थोर केली ख्याती हरिनामें ॥ ४०४९.४
सुखें होत जन्मे । भलते याती भलतैसी ॥ ४२२७.६
शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाही । करी भलते ठायीं दास तुझा ॥ १७५६.२
आता मी सर्वथा नव्हे गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥
माय रखुमाई पांडुरंग पिता। शुद्ध उभयता पक्ष दोन्ही ॥ १६९२.१,२
उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥ २८९०.१
नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसि संगति गोविंदाची ॥ ४५९९.४
ज्यासी आवडी हरिनामांची । तोचि एक बहुशुचि ॥ १५५८.१
तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्तीं ते शुद्ध ॥ १५६०.४
अस्पृश्यतेचे पाप देहान्त प्रायश्चित्तानेही फिटत नाही
महारासि सिवे । कोपे, ब्राह्मण तो नव्हे ॥ १ ॥
तया प्रायश्चित्त काही । देहत्याग करिता नाही ॥ २ ॥
नातळे चांडाळ । त्याच्या अंतरी विटाळ ॥ ३ ॥
ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती ॥ ४ ॥ ५५
त्याचे यातिकुळ काय कीजे ?
आपणा लागे काम वाण्याघरी गूळ । त्याचे यातिकुळ काय कीजे ? ॥ १ ॥
उकिरड्यावरी वाढली तुळसी । टाकावी ते कैसी ठायागुणें ? ॥ २ ॥
तुका म्हणे काय सलपटासी काज ?। फणसातील बीज काढुनि घ्यावे ॥ ४ ॥ ३८६९.१,२,४
यातिहीन मोकाशाची आज्ञा पाळलीच पाहिजे
यातिहीन जाला गावींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानू नये ? ॥ ४११७.४
सकळांसी येथे आहे अधिकार
सकळांसी येथे आहे अधिकार । २८७४.४
अवघिया पुरते वोसंडले पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथे ॥ ४०.३
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार । बाळे नारीनर आदि करोनि वेश्याही ॥ ११४२.५
नाही येथे वाणी। सकळा वर्णी घ्यावी धणी ॥ १३४०.१
तुका म्हणे नाही अधिकार तैसी । सरती पायांपाशी केली मागे ॥ २३१८.५
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥ ३०४४.१
काय लोखंडाचे पाहे गुणदोष? । सिवोनि परिस सोने करी ॥ ३३०१.६
काय गणिकेच्या याती अधिकार मोटा? ॥ ३४६९.२
मेघवृष्टि काही न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव तैसा फळे ॥ ३३१४.२
दीन आणि दुर्बळासी । सुखरासी हरिकथा ॥
तारू भवसागरीचे । उंचनीच अधिकारी ॥ ३६४०.१,२
सर्वसुखा अधिकारी । मुखें उच्चारी हरिनाम ॥ ४३७४.१
निजबीजा येथे तुका अधिकारी । पाहिजे ते पेरी तये वेळी ॥ २७४६.४
झड मारोनिया बैसलो पंगती। उठविता फजिती दातयाची ॥
घेईन इच्छेचे मागोनि सकळ । नाही नव्हे काळ बोलायाचा ॥
तुका म्हणे जालो माना अधिकारी । नाही लोक परी लाज देवा ॥ २९८१.१,३,४
यातायाती धर्म नाही विष्णुदासा
यातायाती धर्म नाही विष्णुदासा ॥ ४२९९.११
न विचारी याती कुळ नाव । लागावया पाव संतांचे ॥ ६४७.२
परत्रीचे जे संगाती । त्यांची याती न विचारी ॥ ४८०.३
उत्तम चांडाळ नर नारी बाळ । अवघेचि सकळ चतुर्भुज ॥ ३८७९.३
परमहंस तरी जाणे सहज वर्म। तेथे याती धर्म कुळ नाही ॥ १४८४.३
तुका म्हणे मी न वजे यातीवरी । पूज्यमान करी वैष्णवांसी ॥ १७८८.३
शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥ ५९४.३
हो का भलते कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥
म्हणवी हरिचा दास । तुका म्हणे धन्य त्यास ॥ ७७३.५,६
राम म्हणता तरे जाणता नेणता । हो का यातिभलता कुळहीन ॥ ११००.१
न म्हणो यातीकुळ । १५४७.४
तारिली बहुते चुकवूनि घात । ... ॥
..। यातीकुळहीन नामासाटी ॥ २१२९.१,२
तुका म्हणे नाही जातीसवे काम । ज्याचे मुखीं नाम तोचि धन्य ॥ २९८४.५
नामधारकासी नाही वर्णावर्ण । ३८२७.१
तैसा वर्णावर्ण नाही नामीं । ३८२७.४
तये नावेसंगे ब्राह्मण तरती । केवी ते बुडती अनामिक? ॥ ३८२७.६
उंच नीच काही नेणे भगवंत
अंत नाही पार वर्णा नाही थार । कुळ याति शिर हस्त पाद ।। ७०४.५
कळलासी नष्टा । यातिक्रयाकर्मभ्रष्टा ॥ १६८१.३
समर्थासी नाही वर्णावर्णभेद । १०४०.१
न पाहे सिदोरी । जाती कुळ न विचारी ॥ ७५२.३
शुद्ध हीन काही न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥ ९२१.२
पुसणे नाही यातीकुळ । लागो वेळ नेदावा ॥ ३३४५.१
पाहा कैसे कैसे । देवें उद्धरिले अनयासें ॥ ३७३६.१
गुणदोष याती न विचारिता काही । ठाव दिला पायीं आपुलिया ॥ ४१४७.२
नेणे वर्णधर्म, जी आली सामोरी । अवघीच हरी आळिंगिली ॥ ४५५६.१
अठरापगड याती सकळहि वैष्णव । दुजा नाही भाव पंढरीसि ॥ ४४२७.३
चंद्रभागे न्हाती । तुका म्हणे भलते याती ॥ १६१०.४
पाहिले अपराध नाही याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ १०२३.२
उंच नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भाव भक्त देखोनिया ॥ २८२०.१
निवडीना याति समानचि केली । टणक धाकुली नारायणें ॥ ४५९८.७
नरनारी याति हो कोणी भलती । भावें एका प्रीती नारायणा ॥ १८३५.४
यातिहीन नये ऐको जयां वेद । तयां दिले पद वैकुंठीचे ॥ १८३१.३
भरणी आली मुक्त पेठा । ... ... ॥
... अवघे या रे जातीचे ॥
येथे पंक्तिभेद नाही । मोठे काही लहान ॥ ४५००.३
सादविले एका । सरे अवधियां लोकां ।
आता आवडीचे हातीं । भेद नाही ये पंगती ॥ १७४८.१,२
No comments:
Post a Comment