- डॉ. बालाजी जाधव
छत्रपती शिवाजी
महाराजांना स्वराज्य संस्थापक म्हणायचे असेल तर माँ साहेब जिजाऊ आणि राजे
शहाजी यांना स्वराज्यसंकल्पक म्हणावे लागते. कारण बंगलोर येथे सुमारे दोन
वर्षे राजमाता जिजाऊ व राजे शहाजी यांच्या मार्गदर्शनाखाली बाल शिवबांवर
स्वराज्य स्थापनेचे संस्कार झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या
बाराव्या वर्षी शहाजी राजांनी शिवरायांस माँ साहेबांसोबत भगवा झेंडा आणि
संस्कृत भाषेतील राजमुद्रा देऊन पुणे येथील जहागिरीत स्वराज्य
संस्थापनेसाठी पाठवले. सोबत थोडेच पण निवडक आणि विश्वासू अधिकारीही दिले.
परिसरात आल्यानंतर बालशिवबा माँ साहेबांच्या देखरेखीखाली स्वराज्य
निर्मितीच्या कार्याला लागले. ज्या ज्या मातब्बर मराठा घराण्यावर शहाजी
राजांचे वजन होते त्या त्या लोकांनी शिवरायांना स्वराज्य उभारणीत मोलाची
मदत केली. तुकोबांचे देहू हे गाव प्रत्यक्ष शिवरायांच्या जहागिरीत मोडत
होते. त्याकाळी पुणे परिसरात निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगल
यांचा सत्ता संघर्ष चालू होता. तेव्हा त्या परिसरात लुटमार, जाळपोळ, आक्रमण
हे कायम ठरलेलेच असायचे. त्यामुळे लोकांचा आकांत, त्यांचे दुःख
तुकोबांसारख्या संवेदनशील संताला अस्वस्थ करून गेले. या परकीय आक्रमणाबद्दल
भालचंद्र नेमाडे लिहितात- ‘मोगलांच्या उत्तरेकडील स्वाऱ्यांनी आणि बहामनी
राज्यांच्या परस्परांतील लढायांनी तीनशे वर्ष सबंध दख्खन म्हणजे रणभुमी
करून टाकली होती. तुकाराम जन्मला त्या सुमारास मोगलांनी उत्तरेकडील
तापीपर्यंत आपले साम्राज्य वाढवत आणले होते आणि दक्षिणेतील आदिलशाही,
निजामशाही व कुतुबशाही यांच्याशी सतत युद्धे होतच असत. या
वर्षानुवर्षांच्या धुमश्चक्रीत तुकारामाचा भीमा आणि नीरा नद्यांमधला
भूप्रदेश नेहमीच भरडला जात होता.’
या धुमश्चक्रीचा अनुभव तुकोबा
सुद्धा घेत होते. कित्येकदा त्यांच्या कीर्तनात यामुळे व्यत्यय आलेला होता.
एका अभंगात तर त्यांनी या धामधूमीबद्दल स्पष्टपणे म्हटले,
न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होते ॥
काय तुम्ही येथे नसालसे जाले । आम्ही न देखिले पाहिजे हे ॥
परचक्र कोठे हरिदासाच्या वासे । न देखिजेत देशे राहतिया ॥
हे
पांडुरंगा आता माझ्या डोळ्यांना सामान्य जनांचा हा आकांत पाहवत नाही,
त्यांना परकीयांकडून होणाऱ्या पिडेने माझे चित्त दुःखी होत आहे. मला तर
वाटते की येथे तुझा वासच नाही. कारण तसे असते तर हे परचक्र आले असते का?
पांडुरंगा येथे तुझे भक्त नांदत असताना हे परचक्र येतेच कसे? खरे तर हा
परचक्राचा फेरा तू आमच्या मागे लावून मी तुझी आजपर्यंत केलेली सेवा
लाजवलेली आहेस. यामुळे माझे जगणे हीन झालेले आहे. जेथे प्रत्यक्ष हरीचे दास
वास करतात तेथे सुद्धा हा परचक्राचा त्रास व्हावा काय? आणि मग असे असेल तर
देव आहे तरी कुठे? असा खडा सवाल तुकोबांनी पांडुरंगाला केलेला आहे. अजून
एका अभंगात ते म्हणतात
काय म्यां मानावे हरिकथेचे फळ । तरिजे सकळ जनी ऐसे ॥ १ ॥
उच्छेद तो असे हा गें आरंभला । रोकडे विठ्ठला परचक्र ॥ २ ॥
पापाविण नाही पाप येत पुढे । साक्षीसी रोकडे साक्ष आले ॥ ३ ॥
तुका म्हणे जेथे वसतील दास । तेथे तुझा वास कैसा आता ॥ ४ ॥
(अ.क्र.५५८)
बा
विठ्ठला परचक्रामुळे, परकियांच्या आक्रमणामुळे जणू काही जीवनाच्या
उच्छेदाला सुरुवात झाली आहे, परचक्राच्या रूपाने पापच पुढे येत आहे. मी
आजपर्यंत केलेल्या हरिकथेचे फळ मला अशा स्वरूपात मिळालेले आहे; तेव्हा जेथे
हरीचे दास, हरीचे भक्त वास करत असतात तेथे तुझा वास असतो असे मी कसे समजू?
परकीय आक्रमणाने भरडून निघालेला समाज पाहून तुकोबांनी देवाच्या
अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
अशा विपरीत परिस्थितीत
शिवरायांसारखा एक एतद्देशीय व्यक्ती आपल्या लोकांचे राज्य निर्माण करण्याचे
प्रयत्न करतो याचे तुकोबांना निश्चितच कौतुक वाटले आणि शिवराय जर हे परकीय
आक्रमकांचे चक्र परतवून लावून स्वकियांचे राज्य निर्माण करत असतील तर मग
त्यांच्या या कार्याला समाजातून हातभार लागलाच पाहिजे अशी तुकोबांसारख्या
डोळस व्यक्तीची भावना होणे साहजिकच होते. मग त्यासाठी सामान्य समाजातून
लढवय्ये लोक निर्माण झाले पाहिजेत, त्यांनी शिवरायांच्या सैन्यात भरती झाले
पाहिजे आणि भरती झालेल्या लोकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वराज्य
निर्मितीच्या कार्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे, असे तुकोबांना वाटू
लागले.
तुकोबा शिवराय भेट
तुकाबांचे
देहू गाव हे शिवरायांच्या जहागिरीत असल्यामुळे तुकोबांची किर्ती
शिवरायांच्या कानावर पडत होती. माँ जिजाऊ तुकोबांची कीर्तने ऐकून
शिवरायांना मार्गदर्शन करत होत्या. त्यामुळे शिवरायांना तुकोबांचे विचार
ऐकण्याची ओढ निर्माण झाली.
तुकोबा आणि शिवरायांच्या भेटीबद्दल
तुकोबांचे वर्तमान वारस सदानंद मोरे लिहितात, ‘देहू हे शिवरायांच्या
जहागिरीत प्रत्यक्षपणे मोडणारे गाव असल्याने पुणे आणि देहू यांचा नित्याचा
संबंध होता. अशा परिस्थितीत शिवाजी राजांचे बालपणापासून देहूला जाणे-येणे
असल्यास आश्चर्य काहीच नाही. तसेच त्यांनी तुकाराम महाराजांची कीर्तने ऐकणे
त्यांना सन्मानाचे प्रतिक म्हणून दिवट्या, छत्री, घोडे देऊ करणे हेही
शिवाजीच्या मनातील सत्पुरुषाबद्दल वसत असणाऱ्या आदरभावनेशी व भोसले
घराण्याच्या पंरपरेशी सुसंगतच म्हटले पाहिजे.’ (तुकाराम दर्शन, पृ.६४, ६५)
मोरे
यांच्या म्हणण्यानुसार संतांचा सन्मान करणे ही भोसले घराण्याची परंपराच
होती आणि या परंपरेला जागत शिवाजी राजांनी तुकोबांना नजराणा म्हणून
दिवट्या, छत्री, घोडे हे पाठवले होते. परंतु ‘नाही मठपती । नाही चाहुराची
वृत्ती ॥’ अशी अंगभूत वृत्ती आणि ‘जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे
॥’ असा रोकडा बाणा असणाऱ्या तुकोबांनी हा नजराणा नम्रपणे नाकारला. वरून
त्यांनी शिवाजी राजांना उपदेशपर असे काही अभंग ऐकवले. तुकोबांच्याच एका
अभंगातून हे स्पष्ट होईल -
दिवट्या छत्री घोडे । हे तो बऱ्यात न पडे ॥
आता मज कासया । यात गोविसी पंढरीराया ॥
मान दंभ चेष्टा । हे तो सुकराची विष्ठा ॥
तुका म्हणे देवा । माझे सोडवणे धावा ॥
(अ.क्र. १८७८)
शिवरायांनी
पाठविलेला नजराणा पाहून तुकोबा म्हणतात की ‘दिवट्या, छत्री, घोडे, या बाबी
आमच्यासारख्या संतांसाठी काही बऱ्या नाहीत. आमचा मार्ग वेगळा असताना आम्ही
या लौकिक गोष्टींमध्ये का बरे गुंतून पडावे? पांडूरंगा, आता तूच मला यातून
सोडव रे बाबा. मान, दंभ, लोकांनी दिलेले दान हे आम्हा संतांसाठी डुकराच्या
विष्ठेप्रमाणे नकोसे आहेत.’
अन्य एका अभंगात तुकोबा म्हणतात की,
‘सोने आणि माती । आम्हा समानची चित्ती ॥ परक्यांचे धन हे संतांसाठी
गोमांसासमान असते अशी तुकोबांची समजूत होती. कारण संतांसाठी मुंगी आणि राव
हे सारखेच जीव असतात. म्हणून शिवरायांनी देऊ केलेला नजराणा तुकोबांनी
अत्यंत नम्रपणे नाकारला. या संदर्भात ‘श्री संत तुकाराम महाराज संस्थान,
देहू’ या संस्थानने प्रकाशित केलेल्या गाथेत ‘शिवाजी राजे यांनी स्वामीस
अबदागिरी घोडा कारकून असे न्यावयास पाठवले ते अभंग’ या मथळ्याखाली एकूण नऊ
अभंग दिलेले आहेत. उपरोक्त अभंग हा त्यापैकीच एक आहे. बाकीच्या आठ अभंगाची
चर्चा पुढे करण्यात आलेली आहे.
तुकोबा आणि शिवराय यांच्या भेटी
संदर्भात महाराष्ट्रात एक कथा फार प्रसिद्ध आहे- ‘एकदा लोहगाव येथे तुकोबा
कीर्तन करत असता शिवाजीराजेही तुकोबांच्या कीर्तनाला हजर होते.
शिवरायांच्या या उपस्थितीची बातमी चाकणच्या तत्कालीन सुभेदाराला लागली आणि
त्याने हजारभर सैनिक शिवरायांना पकडण्यासाठी पाठवले. सैनिकांनी जेथे कीर्तन
चालू होते त्या ठिकाणाला वेढा घातला. सैनिक शिवाजी राजांना शोधू लागले.
इकडे तुकोबाराय कीर्तनात दंग तर शिवराय किर्तन ऐकण्यात दंग. आणि काय
आश्चर्य सैनिकांना प्रत्येक वारकरी हा शिवाजी राजांसारखाच दिसू लागला.
सैनिक भांबावून गेले की नेमके पकडायचे कोणाला? आणि खरा शिवाजी आहे तरी
कोणता? अर्थात त्यांची ही संमोहित अवस्था पाहून खरे शिवराय सुखरूप पसार
झाले आणि इकडे चाकणच्या सुभेदाराचे सैन्य हात हलवत परत गेले.’
याबद्दल
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये फार सुंदर उल्लेख केलेला
आहे- ‘आपले वारकरी भाविक। तेचि वारकर्ते पाईक। करोनी दुष्टांसी लाविला धाक ।
शिवाजीच जणू सर्वही ॥’
खरे पाहता या कथेमध्ये चमत्कार भरलेला आहे
आणि खुद्द तुकोबांनाही चमत्कार मान्य नव्हते. ‘दाऊ नेणे जडीबुटी । चमत्कार
उठाउठी ॥’ असे सांगून त्यांनी चमत्काराला उडवून लावलेले आहे. परंतू
चमत्काराचा भाग जरी सोडला तरी वरील कथेतून एका गोष्टीला मात्र पुष्टी मिळते
ती म्हणजे शिवाजी महाराज तुकोबांची कीर्तने ऐकायला जात होते.
तुकोबा
आणि शिवराय यांच्या भेटीबद्दल भाऊ राहीरकर यांनी काढलेले पुढील उद्गार हे
यथोचितच आहेत. ते लिहितात, ‘महाराष्ट्राच्या या दोन परमोच्च विभूतींची भेट
हा सूर्यचंद्र, गंगायमुना, मेरूमंदार यांच्या मीलनाचा, श्रेष्ठ तत्वांचा
संगम होता.’
तुकोबा शिवराय भेटीचा काळ
तुकोबांचा
जन्म इ.स. १६०८ मध्ये झाला. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९
फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. याचाच अर्थ असा की तुकोबा
हे शिवाजी महाराजांपेक्षा २०-२१ वर्षांनी मोठे होते. म्हणून तुकोबांच्या
निर्याणावेळी म्हणजे इ.स. १६४९-५० मध्ये शिवाजी महाराज हे नुकतेच विशीत
प्रवेश करते झाले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी केवळ तोरणा किल्ला
जिंकून स्वराज्य स्थापनेचे पहिले पाऊल उचलले होते.
या संबंधी ल.
रा. पांगरकर लिहितात, ‘शिवछत्रपतींचा जन्म शक १५४९ मध्ये झाला अशी आजवर
समजूत होती, पण इतिहास संशोधनाच्या नवीन प्रकारामुळे तो शके १५५१ च्या
फाल्गुनात म्हणजे तुकोबांच्या वयाच्या २१ वे वर्षी जो घोर दुष्काळ पडला
त्या दुष्काळाचे वर्षी झाला असे ठरत आहे. शिवाजी राजे यांनी आपल्या वयाच्या
१७ वे वर्षी तोरणा किल्ला घेऊन त्यावर स्वराज्याचे तोरण बांधले व यानंतर
तीनच वर्षांनी (शक १५७१) तुकोबांचे प्रयाण झाले, म्हणजे शिवराय २० वर्षांचे
असताच तुकोबांचे प्रयाण झाले...’
यावरून ल. रा. पांगारकर असा
निष्कर्ष काढतात की, तुकोबा आणि शिवाजी महाराजांची भेट ही शेवटच्या तीन
वर्षांत झालेली असावी आणि शिवरायांनी तुकोबांची कीर्तनेही याच तीन वर्षात
ऐकलेली असावीत. ल.रा. पांगारकर यांच्याप्रमाणे भाऊ राहिरकर यांचेही मत
शिवाजी व तुकोबा यांची भेट साधारणतः शके १५६५ ते १५७०-७१ याच दरम्यान झाली
असल्याचे आहे. अर्थात शिवरायांचा जन्म सन १६३० चा असल्यामुळे तुकोबांच्या
निर्याणप्रसंगी शिवाजी महाराज हे फक्त एकोणीस ते वीस वर्षाचे होते हे
स्पष्ट आहे. पुढे भाऊ राहिरकर लिहितात, ‘तेव्हा तुकोबांची व शिवरायांची
भेट, वह्या तरल्यानंतर जी तुकोबांची प्रसिध्दी झाली त्या सुमारास व शिवराय
स्वराज्याकरिता चळवळ करू लागले त्या त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षानंतर
झाली आहे.’ यावरून आपल्या असे लक्षात येते की शिवरायांनी स्वराज्य
निर्मितीच्या हालचाली केल्यानंतर तुकोबांची आणि शिवरायांची भेट झाली.
यावेळी तुकोबाही प्रसिद्धीच्या ऐन शिखरावर होते. एवढे की बहीणाबाई पाठक
यांनी तुकोबांची महती ही जयरामस्वामी वडगावकर यांचेकडून कोल्हापूर येथे
ऐकली. स्वराज्यनिर्मितीसाठी साधुसंतांचा आशीर्वाद घेणे हे भोसले
घराण्याच्या परंपरेला अनुसरूनच होते. म्हणून स्वराज्य निर्मितीसाठी मुस्लिम
फकिरांकडूनही आशीर्वाद घेणाऱ्या शिवरायांनी तुकोबांकडून आशीर्वाद घेतलेच
असणार यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.
तुकोबांचा शिवरायांवरील प्रभाव
खरे तर तुकोबांना गुरु शिष्य परंपराच मान्य नव्हती. उभ्या आयुष्यात त्यांनी कुणालाही आपला शिष्य म्हणून कसली दिक्षा दिलेली नाही. किंबहुना गुरु-शिष्य नातेसंबंधावर तुकोबांनी जीवनभर अतिशय कठोर प्रहार केलेले आहेत. तुकोबांची उपदेश करण्याची पद्धती ही ‘नाही विचारीत । मेघ हागणदारी सेत ॥ अशी मेघवृष्टी सारखी होती. म्हणून ते म्हणतात, ‘मेघवृष्टीने करावा उपदेश । परी गुरुने न करावा शिष्य ॥ अर्थात ज्याला गुरु-शिष्य असे आज स्वरूप आलेले आहे तसे तुकोबा आणि शिवराय यांचे संबंध नव्हते. परंतु तुकोबांच्या विचारांचा आणि त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा फार मोठा प्रभाव छ. शिवाजी महाराजांवर पडलेला होता. तुकोबांच्या कीर्तनाला हजेरी लावता लावता आणि त्यांच्या अभंगांची अवीट गोडी अनुभवताना शिवरायांची अवस्था ही बहिणाबाई सारखीच ‘तुकोबांची पदे अद्वैत प्रसिद्ध । तयाचा अनुवाद चित्त झुरवी ॥’ अशी होऊन गेली. आणि मग शिवरायांनाही तुकोबांसारखे जनप्रबोधन करावेसे वाटू लागले. तुकोबांच्या सान्निध्यात राहून शिवाजी महाराजांनाही अभंग स्फुरु लागले. शिवरायांचा असाच एक अभंग तंजावर येथील सरस्वती महाल येथे उपलब्ध असल्याचे मत आनंद घोरपडे यांनी त्यांच्या ‘शिवछत्रपती समज अपसमज’ या ग्रंथात नोंदवलेले आहे. (पृ.८१) विशेष बाब म्हणजे हा अभंग खुद्द शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातला असून घोरपडे यांनी तो पूर्ण अभंगच वाचकांना उपलब्ध करून दिलेला आहे. शिवरायांच्या हस्ताक्षरातील तो अभंग असा :
नाशिवंत सुखासाठी । अंतरला जगजेठी ॥
नाही नाही यात गोडी । लक्ष चौऱ्यांशीची जोडी ॥
मनुष्य जन्म गेल्यावारे । काय करशील बा रे ॥
शिवराजे सांगे जना । म्या तो सोडिली वासना ॥
आनंद
घोरपडे यांनी या अभंगाचा दिलेला भावार्थ असा - ‘या नाशवंत सुखाच्या मागे
लागून आपण जगजेठीला मात्र अंतरले जातो. खरे पाहिले तर या सुखात गोडी नाही.
कारण सुखाच्या भोगानंतर पुन्हा चौऱ्यांशी लक्ष फेरे घ्यावेच लागतात. बा
मनुष्या, आता तरी तू जागा हो. कारण एकदाच मिळालेला हा मनुष्यजन्म गेल्यावर
तू काय करशील ? म्हणून शिवाजी राजे लोकांना उद्देशून सांगतात की नाशवंत
सुखासाठी कारणीभूत ठरलेल्या वासनांचा मी त्याग केला आहे.’ (शिवछत्रपती समज
अपसमज पृ. ८).
तुकोबांच्या अभंगांच्या शेवटी जशी ‘तुका म्हणे’ अशी
नाममुद्रा असते तशी शिवरायांनी सुद्धा आपल्या अभंगाच्या शेवटी आपल्या
नावाची ‘शिवराजे सांगे जना’ अशी नाममुद्राही वापरलेली आहे. वरील अभंगाचे
अवलोकन केले असता आपल्या लक्षात येते की, शिवाजी महाराजांवर तुकोबांच्या
विचारांचा किती पगडा बसला होता. तुकोबांच्या कार्याने शिवराय एवढे प्रभावित
झाले होते की त्यांनी आपला स्वराज्य निर्मितीचा उद्योग आवरून कीर्तन
प्रबोधनात मन घातल्याचे उल्लेखही इतिहासात आलेले आहेत. शिवरायांना
तुकोबांचा मार्ग अनुसरण्याची तीव्र इच्छा होऊ लागली. परंतु माँ जिजाऊंनी
शिवरायांना वेळीच तुकोबांकडे नेऊन योग्य मार्गदर्शन घडवून आणले. या
कथेसंदर्भात डॉ. किशोर सानप लिहितात, ‘निवृत्तीमार्गाकडे त्यांचा कल पाहून
आणि स्वराज्यकार्याकडे होणारे दुर्लक्ष बघून जिजामातेनेही देहूला जाऊन
तुकोबांची भेट घेतली आणि शिवाजींना राजकार्याला प्रवृत्त करण्याबाबत विनंती
केली. तुकोबांनी जिजामातेच्या विनंतीला मान देऊन शिवरायांना पुन्हा
राज्यकारभार करण्यासाठी प्रवृत्त केले. स्वराज्यस्थापनेसाठी प्रवृत्त केले.
क्षात्रधर्माची जाणीव करून दिली आणि आपला स्वधर्म सोडून कार्य करू नये असे
सांगितले. शिवाजींनी तुकोबांचा उपदेश ग्रहण करून पुन्हा जोमाने
स्वराज्यनिर्मितीचे कार्य सुरु केले. अशी एक कथा प्रचलित आहे.’ (समग्र
तुकाराम दर्शन, पृ. ३६८) तुकोबांचा जीवन मार्ग पाहून छत्रपती शिवराय किती
प्रभावित झाले होते हे सांगताना वृंदावन दास आपल्या तुकाराम चरित्राच्या
प्रस्तावनेत लिहितात, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजही तुकारामांची विठ्ठलभक्ती
आणि वैराग्य पाहून प्रभावित झाले आणि त्यांनी स्वतः राज्यकारभार सोडून
वैरागी जीवन जगण्याचा निश्चयही केला होता. पण तुकारामांनी त्यांना ‘आम्ही
जगाला उपदेश करावा । तुम्ही क्षात्रधर्म सांभाळावा ॥’ असे समजावून हिंदवी
स्वराज्य स्थापना करण्याची प्रेरणा दिली. पण क्षात्रधर्माचे पालन करताना
‘कंठी मिरवा तुळशी । व्रत करा एकादशी ॥ म्हणवा हरीचे दास । तुका म्हणे मज
हे आस ॥’ हा भगवद्प्राप्तीचा मार्गही सांगितला” (प्रस्तावना, संत तुकाराम :
हरिभक्तीपरायण जीवन चरित्र)
यावरून शिवरायांवर तुकोबांचा किती प्रभाव होता आणि त्यांचे संबंध किती घनिष्ठ होते हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
तुकोबांच्या घराण्याचा लढाऊ बाणा
जगतगुरु
तुकोबांचे अवघे आयुष्य म्हणजे एकप्रकारचे युद्ध होते. ‘रात्री दिवस आम्हा
युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥’ अशा शब्दांमध्ये तुकोबांनी ते
स्पष्टही केले आहे. धर्माच्या क्षेत्रात शोषित आणि वंचितांना न्याय मिळवून
देणारे तुकोबा हे शब्दांचे बाण हाती घेऊन फिरणारे ‘विठ्ठलाचे वीर’ होते.
‘आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडू कळीकाळाचे शीर’ असा त्यांचा लढवय्या बाणा
होता. समाजातील चुकीच्या बाबींवर प्रहार करणारे, तीक्ष्ण शब्दबाण हाती घेऊन
फिरणारे ते एक समाजयोद्धे होते. ‘होता पहिला अभ्यास । समयी घालावया कास ॥’
अशी त्यांच्या मनाची तयारी होती. त्यांचा हा लढवय्या बाणा जसा अनुभवाने
विकसित झाला होता. तसाच या क्षात्रवृत्तीचा वारसा त्यांना घरातूनही लाभलेला
होता. तुकोबांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा आणि त्यांची पत्नी आमाबाई यांना
हरी आणि मुकुंदा अशी दोन मुले होती. या दोन भावांनी आपल्या घराण्यातील
विठ्ठल भक्तीच्या परंपरेचा अभिमान बाळगत वेगळा मार्ग चोखाळला. त्यांनी
देवगिरीच्या यादव राजाच्या पदरी सैनिक म्हणून राहणे पसंत केले. पुढे
देवगिरीचे यादव आणि परकिय आक्रमक यांच्यात झालेल्या लढाईत विश्वंभरबुवांचे
हे दोन्ही पुत्र रणांगणावर लढता लढता धारातीर्थी पडले. विश्वंभरबुवांचा
ज्येष्ठ पुत्र हरी यांची बायको यावेळी गरोदर होती. तिचा सांभाळ आमाबाईंनी
मोठ्या लाडाने केला. हरीच्या बायकोला पुढे एक गोंडस बाळ झाले. त्याचे नाव
आमाबाई यांनी आपल्या घराण्यातील विठ्ठल परंपरेला अनुसरून विठोबा असे ठेवले.
पुढे या विठोबाला जो मुलगा झाला त्याचे नाव पदाजी असे ठेवण्यात आले.
पदाजीला पुढे शंकर नावाचा मुलगा झाला. मग शंकरला कान्होबा, कान्होबाला
बोल्होबा आणि बोल्होबाच्या पोटी तुकोबांचा जन्म झाला. अशा प्रकारे
तुकोबांच्या अंगात मातृभुमीसाठी प्राण गमावणाऱ्या वीरांचे रक्त खेळत होते
आणि वेळप्रसंगी हे रक्त त्यांच्या धमन्यांतून उसळ्याही मारत होते.
तुकोबांच्या रक्तातील कठीण वज्राला भेदणारी वीरवृत्ती वेळोवेळी उफाळूनही
येत होती.
अशा वीरवृत्तीच्या तुकोबांच्या हातून लोकांना शिपाईगिरीची
शिकवण देणाऱ्या पाइकीच्या अभंगांची निर्मिती होणे साहजिक आणि नैसर्गिकच
आहे. फरक फक्त एवढाच की, तुकोबांच्या पूर्वजांनी हातात खरोखरीची शस्त्रे
धारण करून रणमैदान गाजवले होते तर तुकोबांनी अतिशय प्रयत्नपुर्वक
‘शब्दांचीच शस्त्रे’ करून इथल्या व्यवस्थेवर कठोर आघात केले होते.
या
संदर्भात प्रा. किशोर सानप लिहितात, ‘तुकोबांच्या वंशजांच्या
क्षात्रतेजाचा वारसा परंपरेने तुकोबांनीही लाक्षणिक अर्थाने पार पाडला
होता. त्यांनीही पाइकीचे अभंग लिहून आणि शिवाजीला राजकारणाची दीक्षा देऊन
मुसलमानी राजवटीचा कर्दनकाळ ठरलेला मराठा राजा निर्माण केला. तुकोबा
क्षत्रियांची पिढी निर्माण करणारे क्षात्र पुरुष होते, हा इतिहासही आता
नाकारता येणार नाही.’ (समग्र तुकाराम दर्शन, पृ.७६)
याचाच अर्थ
क्षात्रवृत्ती ही तुकोबांच्या घराण्यात पूर्वापार चालत आलेली होती म्हणूनच
सदानंद मोरे म्हणतात त्याप्रमाणे, ‘तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून
ज्याप्रमाणे व्यापार, सावकारी, शेतकी या व्यवहारांमधील बारकावे येतात तसेच
लढाई आणि रणमैदान यांचे बारीकसारीक तपशीलही भरपूर सापडतात. रात्रंदिवस
आम्हा युद्धाचा प्रसंग असे म्हणणाऱ्या तुकोबांचे जीवन हीच एक युद्धभुमी
झालेली होती.’ (तुकाराम दर्शन, पृ.७२) तेव्हा तुकोबांनी शिवरायांना गनिमी
काव्यासंदर्भात जे काही मार्गदर्शन केलेले आहे ते त्यांच्या ‘अनुभवेविण
बोलो नये’ या वृत्तीला अनुसरूनच होते.
तुकोबांनी बऱ्याच अभंगात काही
पारमार्थिक उपदेश करण्यासाठी युद्ध विषयक आणि युद्धाला लागणाऱ्या
शस्त्रास्त्रांची जी वर्णने केलेली आहेत ती सुद्धा त्यांच्या घराण्यातील
क्षात्रवृत्तीला साजेशीच आहेत. रणांगणात जीव गेल्यानंतर दुहेरी लाभ होतो
अशा आशयाचा तुकोबांचा एक अभंग प्रसिद्धच आहे. तुकोबा लिहितात -
एका बिजा केला नास । मग भोगिले कणीस ॥ १ ॥
कळे सकळा हा भाव । लहान थोरांवरी जीव ॥ २ ॥
लाभ नाही फुकासाठी । केल्याविण जीवासाठी ॥ ३ ॥
तुका म्हणे रणी । जीव देता लाभ दुणी ॥ ४ ॥
(अ.क्र.७६१)
आपण
जेव्हा शेतामध्ये एखादे बीज टाकतो तेव्हा एका अर्थाने त्या बीजाचा नाश
होतो. कारण जेव्हा त्या बीजातून अंकुर बाहेर येतो तेव्हा आपल्याला ते मूळ
बीज पुन्हा सापडत नाही. ते स्वतःचे अस्तित्व गमावून बसते. परंतु त्याच्या
या नाश पावण्याने, स्वतःचे अस्तित्व गमावण्याने आपल्याला हजारो दाणे अर्थात
बीज असलेले कणीस भोगायला मिळते. म्हणजे एका बीजाचा नाश केल्याशिवाय
आपल्याला कणीस मिळू शकत नाही हा निसर्ग नियम आहे. हा निसर्ग नियम सर्वांनाच
लागू असतो. सहजासहजी आणि फुकटात कोणत्याही गोष्टीची प्राप्ती होत नाही.
त्यासाठी आपल्याला सर्व काही झोकून देऊन कार्य करावे लागते. प्रयत्न करावे
लागतात. प्रसंगी बरेच काही गमवावेही लागते. युद्धात नाही का जीव
दिल्याशिवाय कीर्ती प्राप्त होत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात : ‘शूर मिरवे
रणांगणी । मरणीच संतोष॥’ रणांगणात जर लढता लढता जीव गेला तर त्या
योद्ध्याला दुहेरी असा लाभ होतो. फुकटात कोणतीही गोष्ट मिळत नाही हे पटवून
देण्यासाठी तुकोबांनी वापरलेले रणांगणातील जीव देण्याचे उदाहरण हे
त्यांच्या घराण्यातील क्षात्रवृत्तीला अनुसरूनच आहे. हरी आणि मुकुंदा यांना
रणांगणात आलेले मरण हे निश्चितच तुकोबांच्या अभिमानाला पात्र ठरले असेल.
वर्णाश्रमाद्वारे येणारे क्षत्रियत्व अमान्य
वर्णाश्रमधर्माप्रमाणे येणारे क्षत्रियत्व तुकोबांना मान्य नव्हते. नव्हे तुकोबांना ही वर्णव्यवस्थाच मान्य नव्हती. वर्ण आणि जातीपेक्षा तुकोबा गुणांना महत्व देणारे होते. म्हणूनच ते कर्मभ्रष्ट आणि अभक्त अशा ब्राह्मणालाही ब्राह्मण मानायला तयार नव्हते. याउलट वैष्णव असणाऱ्या चांभाराला मात्र ते शुद्ध यातीचा असे म्हणत. याच्याही पुढे जाऊन तुकोबांनी ‘वर्ण अभिमानाने कोण जाला पावन । ऐसे द्या सांगून मजपाशी ॥’ असा रोकडा सवालच विचारलेला आहे. म्हणून वर्ण आणि जातीपेक्षा गुणांना महत्व देणाऱ्या तुकोबांनी ज्याच्याकडे शूरपणा आहे तोच खरा शिपाई आहे असे सांगायला सुरुवात केली. तुकोबा म्हणतात, ‘युद्ध करावया सामार्थ्य आणावे । तरीच म्हणावे क्षत्रीय त्यासी ॥’ ज्याच्या अंगात युद्ध करण्याचे सामर्थ्य आहे असा जो कोणीही असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही वर्णाचा असो तो खरा क्षत्रिय आहे. भलेही मग धर्मग्रंथांच्या म्हणण्यानुसार तो शूद्र जातीचा असला तरी चालेल.
शिपाईगिरीचा उपदेश
युद्ध
करण्याचे सामर्थ्य नसताना एखाद्याने आपल्या हातात शस्त्रे धारण केली तर
केवळ एवढ्याने ती व्यक्ती शिपाई होत नाही. ती शस्त्रे कशी चालवायची,
कोणत्या वेळी कोणत्या शस्त्राचा वापर करायचा, शत्रूला कसे चकवायचे, आपले व
आपल्या राजाचे प्राण वाचवून शत्रूला कशी धूळ चारावयाची याची शास्त्रशुद्ध
माहिती ज्याला असते त्यालाच सैनिक म्हटले पाहिजे. ‘शूरपणा नाही । कैचा तो
शिपाई?’ असे तुकोबांनी म्हटले आहे. म्हणजेच हातातील शस्त्रांसोबतच
ज्याच्याकडे शूरपणा आहे, युद्ध करण्याचे सामर्थ्य आहे तोच खरा शिपाई.
पुर्वज्ञानाशिवाय आणि पूर्व तयारीशिवाय कसलेही डावपेच माहित नसताना जर
एखाद्याने शस्त्रे उचलली तर त्याची अवस्था कशी होते हे तुकोबांनी त्यांच्या
पुढील अभंगात सांगितलेले आहे -
ढालतलवारें गुंतले हे कर । म्हणे मी झुंजार कैसा झुंजो ॥ १ ॥
पेटी पडदळे सिले टोप ओझे । हे तो जाले दुजे मरणमूळ ॥ २॥
बैसविले मला येणे अश्वावरी । धावू पळू तरी कैसा आता ॥ ३ ॥
असोनि उपाय म्हणे हे अपाय । म्हणे हाय हाय काय करू ॥ ५ ॥
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म । मुर्ख नेणे वर्म संतचरण ॥ ५ ॥
(अ.क्र.४३२५)
कसल्याही
पूर्वानुभवाशिवाय आणि शूरपणाशिवाय जर एखादा सैनिक शस्त्रे धारण करेल आणि
रणांगणात उतरेल तर त्याला त्याच्याकडील असणारे उपाय हे अपायासारखे वाटतील.
त्याच्या हातात लढण्यासाठी उपयुक्त अशी जी ढाल तलवार असते, त्याचे रक्षण
करण्यासाठी पेटी, पडदळे, सिले, टोप असते, वेगवान हालचाली करण्यासाठी अश्व
असतो; पण त्याला या सर्व गोष्टी म्हणजे लढण्यांच्या कामी असणारे अडथळे
वाटतात. युद्धासाठी मारक वाटतात. कारण ही शस्त्रे हाताळण्याचे त्याच्याजवळ
नसलेले सामर्थ्य, त्याच्या अंगी नसलेला शूरपणा. युद्धासाठी उपयुक्त अशी
सर्व सामग्री असूनही त्या व्यक्तीला ती कशी वापरायची याचे ज्ञान नसेल आणि
त्याच्याकडे तेवढे सामर्थ्यही नसेल तर ती उपयुक्त साधने त्याला आपल्या
यशाच्या मार्गातील अडथळे वाटू लागतात. घोड्यावर बसणे म्हणजे त्याला वेगाने
पळण्यातला अडथळा वाटतो. म्हणून सैनिकाला (तुकोबांच्या शब्दांत पाईकाला)
युद्धातले सर्व खाचखळगे माहित असले पाहिजेत असे तुकोबांना वाटत होते.
नाहीतर ‘शूरा साजती हथीयारे । गांढ्या हसतील पोरे ॥’ अशी त्याची अवस्था
झाल्यावाचून राहणार नाही.
पण हाती शस्त्रे आले, ते चालवण्याचे
सामर्थ्यही आले म्हणून एखाद्या सैनिकाने ते कुठेही चालवण्याची गरज नाही हे
सुद्धा तुकोबा सांगायला विसरत नाहीत. जे काम सुईने होऊ शकते तिथे तलवार
वापरण्याची गरज नाही असे तुकोबांना वाटते. तलवार ही रणांगणात चालवायची
असते. उठसुठ कुणाबरोबरही तिचा वापर करावयाचा नसतो हे तुकोबांनी खालील
अभंगात सांगितलेले आहे,
वाखर घेऊनि आले । त्यासी तलवारेने हाले ॥ १ ॥
नव्हे आपुले उचित । करूनि टाकावे फजित ॥ धृ ॥
अंगुळीया मोडी । त्यासी काय सिले घोडी ॥ २ ॥
नपुंसकासाठी । तुका म्हणे न लगे जेठी ॥ ३ ॥
(अ.क्र.७७५)
एखादी
व्यक्ती जर वाखर (वस्तरा) घेऊन आपल्या अंगावर घावून आली तर तिचा बंदोबस्त
करण्यासाठी तलवार उपसणे उचित नसते. अशावेळी आपल्याला आपले युद्धातील
सामर्थ्य वापरण्याची गरज नसते. केवळ त्याची फजिती जरी केली तरी तेवढ्याने
तो खजील होऊन जाऊ शकतो. आपल्या नावाने जर कुणी हिम्मत नसल्यामुळे दुरुनच
बोटे मोडत असेल तर तिथे शिपाई, घोडे इत्यादी लवाजमा घेऊन जायची गरज काय?
हिम्मत नसणाऱ्या नपुंसक अशा व्यक्तीसाठी फार जास्त काही आटापिटा करण्याची
गरज नाही. त्याला थोडे जरी दरडावले तरी तो गर्भगळीत होऊन जाऊ शकतो असे
तुकोबा म्हणतात. थोडक्यात काय तर शिपायाने सदसद्विवेकबुद्धीचा वापर करूनच
लढाई करावी. थातुरमातुर लोकांसाठी आपल्या अंगचे शौर्य पणाला लावण्याची गरज
नाही असे तुकोबा सांगतात.
म्हणून तुकोबांनी मावळ खोऱ्यातील लोकांना
शिपाईगिरी करण्यासाठी, त्यांना उच्चकोटीचे सैनिक बनविण्यासाठी आपल्या काही
अभंगातून मार्गदर्शन केलेले आहे. सैनिकालाच पाईक असेही म्हटले जाते. म्हणून
तुकोबांच्या या अभंगाला पाइकीचे अभंग असे म्हणतात.
प्रसिद्ध
इतिहासकार चंद्रशेखर शिखरे लिहितात, ‘छत्रपतींवरील तुकोबांचा प्रभाव फक्त
व्यक्तिगत संबंधापुरताच मर्यादित नाही तर तुकारामांच्या गाथेमधील जे
पाइकीचे अभंग आहेत ते सर्व शिपाईगिरी करण्यासाठीचे आहेत. याशिवाय वीरवृत्ती
धारण करण्याचा उपदेशही अनेक अभंगांमधून त्यांनी दिलेला आहे. या अभंगांमधून
प्रेरित होऊन हजारो वारकरी तरुण शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या चळवळीत
मावळे म्हणून लढले. हे तुकारामांचे कर्तृत्व खरोखरच उल्लेखनीय आहे.’
(प्रतिइतिहास, पृ. ९०)
छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मोठ्या
प्रमाणात लोहगाव आणि परिसरातील लोकांचा भरणा होता. याचे कारण स्पष्ट करताना
बा.र. सुंठणकर लिहितात, ‘तुकारामांनी लोहगाव हेच आपले प्रचाराचे केंद्र
केले होते. तेथे नेहमी त्यांच्या कीर्तनांच्या आणि भजनांच्या फैरी झडत असत
आणि गावोगावचे लोक त्यांना हजर राहत असत. याच लोहगावच्या आसपासच्या
प्रदेशातून शिवाजीच्या सैन्यात मावळ्यांची भरती झाली होती.’
विशेष
बाब म्हणजे लोहगाव हे तुकोबांचे आजोळही होते. इतर कोणत्याही संताने छत्रपती
शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेला प्रेरणा दिली असे म्हणण्यापेक्षा
तुकोबारायांनी शिवरायांच्या कार्याची वाट तयार करून ठेवल्याचे सांगताना
बां.र. सुंठणकर लिहितात... ‘कारण संतसंप्रदायाचा कळस चढवीत असतानाच
तुकारामांनी समाजातील जी धर्मजागृतीची लाट उसळून दिली तिचा उपयोग शिवाजीला
आपल्या कार्याकडे करून घेता आला. जमिनीत मिळणारा ऐहिक मोक्ष आणि भक्तीने
मिळणारा परमार्थिक मोक्ष ही शिवकालीन शेतकऱ्यांपुढे दोन उद्दिष्टे होती.
पारमार्थिक मोक्षाच्या जोडीला ऐहिक मोक्षाचे साधन शिवाजीने शेतकऱ्यांपुढे
ठेवले हेच त्याचे कौशल्य. त्यामुळे मराठा मुलुखातला सारा मावळा त्याच्या
झेंड्याखाली गोळा झाला. या मावळ्यांच्या जोरावर वर्षानुवर्ष निरनिराळ्या
शत्रूशी टक्कर देऊन त्याला आपली सत्ता प्रस्थापित करता आली.’
या
संदर्भात जागतिक पातळीचे प्राच्यविद्या संशोधक कॉ. शरद पाटील यांनीही
‘शिवाजीने गनिमी काव्याने स्वराज्य मिळवावे असा उपदेश तुकोबा पाइकीच्या
अभंगांमध्ये करतात.’ असे आपले मत मांडले आहे.
म्हणजेच तुकोबांनी
पाइकीच्या अभंगातून एक प्रकारे शिवरायांना आणि तत्कालीन मावळ्यांना गनिमी
काव्याची शिकवण दिली होती हे स्पष्ट होते. तुकोबांच्या या शिकवणुकीचा
शिवरायांना नेमका कोणता आणि कसा फायदा झाला हे विषद करताना गं. बा. सरदार
आपल्या ‘संत वाङमयाची सामाजिक फलश्रुती’ या ग्रंथात लिहितात,
‘शिवाजीराजांपाशी संख्याबळ आणि शस्त्रबळ खूपच कमी होते; तरीही त्यांच्या
सैनिकांनी अद्भुत पराक्रम गाजविला, कारण ते जातिवंत पाईक होते; भाडोत्री
नोकर नव्हे. त्यांच्यापाशी इमान होते, सत्यप्रियता होती धर्मनिष्ठा होती.
तानाजी, बाजीप्रभू, जिऊ महाला यांच्या कर्तृत्वात जिवंत प्रेरणेचा नैतिक
बळाचाच अविष्कार अधिक आहे. तुकोबांचे पाईकीचे अभंग पाहिले म्हणजे मध्ययुगीन
नैतिक मुल्यांची बरोबर कल्पना येते.’
पाईकीचे अभंग
कलियुगात
फक्त ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण शिल्लक आहेत असा अपप्रचार
केल्यामुळे या देशातील लोकांची क्षात्रवृत्ती लोप पावली होती. एखाद्या
परकीय शक्तीचे आक्रमण झाले की हाती शस्त्रे घेऊन लढण्यापेक्षा आपल्या
मदतीला देव येईल असे म्हणून देव पाण्यात घालून बसणाऱ्यांचीच संख्या वाढली
होती. म्हणूनच मध्ययुगीन कालखंडात परकीय आक्रमणाला छेद देण्यासाठी काळाला
आणि देशाला शिवाजी महाराजांची वाट पहावी लागली.
शहाजी राजे आणि
जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे सुरु
केलेले कार्य पाहून तुकोबा भारावून गेले आणि त्यांनी या मातीतील लोकांना
त्यांच्यातील क्षात्रवृत्तीची जाणीव करून देणारी अभंग रचना केली. या
अभंगाच्या माध्यमातून तुकोबा वारकऱ्यांना सांगू लागले की ज्याच्यात युद्ध
करावयाचे सामर्थ्य आहे असा कोणत्याही जातीचा व्यक्ती क्षत्रिय आहे. तुमचे
कूळ कोणते आणि तुमची जात कोणती याला काडीचीही किंमत नाही. तुमच्याकडे
लढण्याचे सामर्थ्य आहे ना? बस्स मग तुम्ही क्षत्रिय. तुकोबांच्या या
आवाहनाने इथल्या अठरा पगड जातीतील लोकांना प्रेरणा मिळाली आणि धर्माच्या
नावाखाली झाकून ठेवलेले त्यांचे क्षत्रियत्व उसळ्या मारु लागले. किर्तनात
जे हात टाळ, चिपळ्या आणि वीणा घ्यायचे तेच हात ढाल-तलवार हाती घेऊन रणमैदान
मारण्यासाठी फुरफुरु लागले. वेगवेगळ्या जातीधर्मातील लोक शिवरायांच्या
सैन्यात मोठ्या प्रमाणात सामील होऊ लागले. ज्यांच्या हाती इथल्या
व्यवस्थेने केवळ पाणी आणि वस्तरा दिला होता अशा नाभिक बांधवांच्या हाती
सुद्धा शिवरायांनी या व्यवस्थेला लाथाडून ढाल-तलवार दिली. ज्यांचे हात केवळ
दगड फोडण्यासाठी घण घालायचे अशा वडारांच्या हाती शिवरायांनी शस्त्र दिले.
ज्याच्या कपाळी हाती घुंगराची काठी घेऊन येसकरकी लिहिली होती त्यांनाही
शिवरायांनी आपल्या सैन्यात सामावून घेतले. तुकोबांच्या मार्गदर्शनामुळे
शिवरायांनी शास्त्राला लाथाडून शस्त्रांची पुजा केली आणि आपल्या रक्ताचे
पाणी करून स्वकीयांचे राज्य उभे केले.
ज्या अभंगातून तुकोबांनी
शिपाईगिरीचा उपदेश केला त्या अभंगांना पाईकीचे अभंग असे म्हणतात. पाईकीचे
अभंग नेमके कसे तयार झाले हे सांगताना बा.ग. परांजपे लिहितात, ‘अगदी
बालपणातच शिवछत्रपती त्यांच्या वक्तृत्वाच्या प्रभावांत सापडले. त्यांनी
इतर उपदेशकांनी सांगितल्याप्रमाणे सर्वसंग परित्याग करून भजन पूजन
कीर्तनांत आयुष्य वेचावें असें मनांत आणलें व तसा क्रम सुरु केला. तुकोबांस
ही गोष्ट कळली तेव्हां तुम्ही स्वराज्यस्थापनेच्या कामावर रहा आम्ही भजन
कीर्तन द्वारां लोकांची अवनत स्थिती सुधारण्याच्या, त्यांच्या अंतरांत
रवीचा प्रकाश पाडण्याच्या, त्यांच्या हातून पाप कृत्य होणार नाहीं, अशा
तऱ्हेने त्यांच्या विचारांची दिशा बदलविण्याच्या कामावर राहू. असे आपण
एकमेकांस सहाय्य करूं व सर्व जण सुपंथ धरतील असें वागू असें म्हणून तुमच्या
कार्याच्या पाठींशी मी आहें याची खूण म्हणून तुमच्या सहकाऱ्यांना प्रसाद
म्हणून अभंग देतों, असे हे पाइकीचे अभंग आहेत.’
तुकोबांचे पाईकीचे
अभंग हे विरवृत्तीची जोपासना करण्यासाठी लिहिलेले आहेत असे सांगताना
प्रसिद्ध विचारवंत प्रा. अशोक राणा लिहितात, ‘अन्यायाविरुद्ध पेटून
उठण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्याची तयारी तुकारामांची आहे. त्याचप्रमाणे जे
या बाबत अग्रेसर आहेत त्यांच्याप्रती आदर व्यक्त करून ते वीरवृत्तीची
जोपासना करण्याचा उपदेश करतात. छत्रपती शिवरायांच्या सैनिकांमध्ये बहुतांश
लोक शेतकरी होते. त्याचप्रमाणे ते तुकोबारायांचेही अनुयायी होते. त्यांना
सैनिकांच्या कर्तव्याप्रती जागरूक करण्यासाठी जे अभंग तुकोबांनी लिहिले
त्यांना पाईकीचे अभंग म्हणतात.’
तर अशा या पाइकीच्या अभंगांची एकूण
संख्या अकरा अशी आहे. देहू संस्थानच्या गाथ्यात हे अभंग १०५६ ते १०६६ या
क्रमाने दिलेले आहेत. आपण एका क्रमाने त्या त्या अभंगाचे विश्लेषण पाहूया.
पाइकपणे जोतिला सिद्धांत । शूर धरी मात वचन चित्ती ॥
पाइकावाचून नव्हे कधी सुख । प्रजांमध्ये दुःख न सरे पिडा ॥ धृ ॥
तरि व्हावे पाईक जीवाचे उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥
पाईकीचे सुख जया नाही ठावे । धिग त्यांनी ज्यावे वायांविण ॥
तुका म्हणे एक क्षणाचा करार । पाईक अपार सुख भोगी ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०५६, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३६४)
तुकोबाराय
या अभंगाच्या माध्यमातून पाइकीचे काही सिद्धांत सांगत आहेत. पण हे
सिद्धांत ढाल तलवार हातात असूनही मी कसा लढू? असे विचारणाऱ्या गांढ्या
व्यक्तीसाठी नसून जो शूर वीर असा पाईक आहे त्यालाच हे पाइकीचे सिद्धांत
समजू शकतील.
त्यालाच तुकोबांच्या या सिद्धांताचे महत्व पटू शकेल.
अशा शूर वीर पाइकाशिवाय प्रजेला, जनतेला किंवा रयतेला कधीही सुख लाभू शकत
नाही. सामान्य रयतेचे कधीही दुःख निवारण होऊ शकणार नाही असे तुकोबा
म्हणतात. प्रसंगी जे लोक आपल्या जीवावर उदार होतात तेच खरे पाईक होऊ शकतात
आणि अशा जीवावर उदार होणाऱ्या पाइकाचा सर्व भार त्याचा स्वामी म्हणजेच
‘राजा’ उचलतो. ज्या लोकांना पाईक होण्याचे सुख माहित नाही अशा लोकांचे जगणे
व्यर्थ असते. खरे तर पाईक होणे हा एका क्षणाचा करार असतो परंतु पाइकी
पत्करल्यानंतर मिळणारे सुख मात्र अपार असते. त्याला आपण केलेल्या
कर्तव्यप्राप्तीमुळे प्रचंड समाधान लाभते.
छत्रपती शिवरायांच्या
सैन्यात जे लोक होते त्यांनी सुद्धा आपल्या जीवावर उदार होऊन हा सैनिकी
पेशा पत्करलेला होता आणि याच लोकांनी तुकोबांना अभिप्रेत असणारे खरे अपार
सुख भोगलेले आहे याला इतिहास साक्षी आहे.
पाईकीचें सुख पाईकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटी ॥ १ ॥
येतां गोळ्या बाण साहिले भडिमार । वर्षतां अपार वृष्टि वरी ॥ २ ॥
स्वामीपुढे व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडण शोभा दावी ॥ ३ ॥
पाईकांनी सुख भोगिलें अपार । शूर आणि धीर अंतर्बाहीं ॥ ४ ॥
तुका म्हणे याही सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शहाणा करी तो भोगी ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. .१०५७, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३६५)
पाइकीचे,
सैनिकी पेशाचे, युद्धावर रणांगणात लढण्याचे सुख काय असते हे पाइकालाच
माहित असते. म्हणूनच ते आपल्या पाइकीचा धर्म रक्षण्यासाठी स्वतःचे प्राणही
पणाला लावतात. या अपार सुखासाठी ते शत्रूकडून होणारा तोफगोळ्यांचा, बाणांचा
अथवा कोणत्याही शस्त्रांचा भडीमार एकदम निडरपणे सहन करतात. खरा पाईक हा
आपल्या स्वामीवर, राजावर संकट कोसळले असता, त्यांच्यावर हल्ला झाला असता
मध्ये पडून ते संकट आपल्या अंगावर घेतो आणि आपल्या राजाचे रक्षण करतो,
प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदानही देतो परंतु आपल्या राजाला साधे खरचटू
देखील देत नाही अशा पाइकाचा जगामध्ये लौकिक होतो. तो शूरवीर म्हणून नावाजला
जातो. अशा धैर्यवान आणि खऱ्या पाइकांनी अपार सुख भोगलेले असते. जो कोणी
पाईक वर सांगितलेले सिद्धांत जाणतो तो खऱ्या अर्थाने शहाणा असतो आणि जो वर
सांगितल्या प्रमाणे प्रत्यक्ष आचरण करतो त्यालाच हे अपार सुख भोगावयास
मिळते.
छत्रपती शिवरायांच्या सैनिकांमध्ये कितीतरी सैनिक असे होते की
जे शिवरायांच्या प्राण रक्षणासाठी सदैव तत्पर असायचे. ज्या लोकांसाठी
शिवरायांनी घाम गाळला त्या लोकांनी प्रसंगी शिवरायांसाठी आपले रक्त
सांडल्याचा इतिहास आहे. उदा. जिवाजी महाले. अफझलखान जेव्हा शिवरायांची भेट
घेण्यास आला होता तेव्हा भेट घेणे हे नाटक असून त्याचा मूळ हेतू हा
शिवरायांना काहीही करून संपवणे हाच होता. म्हणून यावेळी शिवरायांनी अत्यंत
विश्वासू आणि जीवास जीव देणारे लोक सोबत घेतले होते. त्यापैकी एक म्हणजे
जीवाजी महाले. भेटीच्या वेळेस शिवरायांनी खानाला जखमी केल्यानंतर खान
शामियान्यातून पळाला. शिवरायांनी जखमी केलेल्या खानाचे संभाजी कावजी
कोंढाळकरांनी डोके धडावेगळे केले. तेवढ्यात दांडपट्टा चालविण्यात पटाईत
असणारा सैय्यद बंडा शिवरायांवर वार करण्यासाठी धावून आला. सैय्यद बंडाने
केलेले चार वार शिवरायांनी चुकविले; परंतु बंडाचा पाचवा वार शिवरायांना
मर्मभेदक होणार असे दिसताच जिवाजी महाले यांनी सैय्यद बंडावर वार करून
त्याचा हात हत्यारासमवेत खांद्यापासून वेगळा केला. तुकोबांनी सांगितले होते
‘स्वामीपुढे व्हावे पडता भांडण । मग त्या मंडण शोभा दावी ॥’. अशा रीतीने
जिवाजी महाले यांनी आपल्या प्राणाची बाजी लाऊन शिवरायांचे प्राण रक्षण
केल्यामुळे ‘होते जिवाजी म्हणून, वाचले शिवाजी’ ही म्हण इतिहासात रूढ झाली.
असे कितीतरी मावळे शिवरायांसाठी आपल्या प्राणाचे बलिदान द्यायला सदैव तयार
होते.
१६८२ च्या डिसेंबर महिन्यात मोगलांनी जेव्हा स्वराज्यावर
हल्ला चढवला तेव्हा एकीकडे बोलणी करण्याचे नाटक करत दुसरीकडे पोर्तुगीजांनी
मोगलांना मराठ्यांवर हल्ला करण्यासाठी आपल्या प्रदेशातून वाट दिली. याचा
बदला घेण्यासाठी संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांवर हल्ला चढविला. जुवे
बेटावर लढत असताना मराठ्यांनी पोर्तुगीजांवर असा काही हल्ला चढविला की
व्हॉईसरायसह सर्वांनी धूम ठोकली. व्हॉईसरायचा पाठलाग करताना संभाजी राजेंनी
अगदी बेभानपणे आपला घोडा भर खाडीत घातला. समुद्राला भरती असल्यामुळे
राजांचा घोडा पोहणीला लागला होता. बाका प्रसंग लक्षात घेऊन खंडो बल्लाळ
पुढे गेले त्यांनी उडी टाकून घोड्याची लगाम धरून राजेंना परिस्थितीची जाणीव
करून दिली.
जिवाजी महाले, खंडो बल्लाळ हे तुकोबांना अभिप्रेत असणारे शहाणे पाईक होत.
पाईक तो जाणे पाईकीचा भाव । लगबग ठाव चोरवाट ॥ १ ॥
आपणां राखोनी ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हिरूनियां ॥ २ ॥
येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाईका त्या जग स्वामी मानी ॥ ३ ॥
ऐसें जन केले पाईकें पाईक । जया कोणी भीक न घालिती ॥ ४ ॥
तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक । बळिया तो नाईक त्रैलोकींचा ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०५८, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३६६)
खरा
पाईकच पाईकीचे रहस्य जाणून असतो. उदाहरणार्थ त्याला सगळ्या चोरवाटा ठाऊक
असतात. शत्रूचा माग कसा काढायचा हे ही माहित असते. परंतु हे सर्व करत
असताना तो आपला माग मात्र कुणालाही लागू देत नाही. स्वतःचे रक्षण करत करत
तो शत्रूला ठकवण्यात आणि त्याचे सर्वस्व हरण करून घेण्यात अत्यंत पटाईत
असतो. जो पाईक आपल्या मनातील मनसुब्यांचा कसलाही माग शत्रूला लागू देत
नाही, स्वतःचाही माग इतरांना लागू देत नाही अशा पाईकाला त्याचा राजाच काय
त्याला सर्व जग मानते. साऱ्या जगात त्याची वाहवा होते. अशा शूर आणि धाडसी
पाइकापासून प्रेरणा घेऊन ज्यांना कोणी भीकही घालत नाही असे लोक म्हणजेच
सामान्य लोक सुद्धा पाईक होतात आणि असे पाईक ज्या नेत्याच्या अथवा राजाच्या
पदरी असतात असा राजा तिन्ही लोकांचा बलवान स्वामी होऊ शकतो. जिवाजी महाले,
बाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंह जाधव, मानाजी मोरे, शिवा काशीद, मदारी मेहतर
आदी शूर व धाडसी मावळ्यांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात सामान्य शेतकरी,
कष्टकरी, श्रमकरी इ. सामान्य वर्गातून असामान्य पराक्रम गाजवणारे वीर तयार
झाले.
छत्रपती शिवरायांचा आणि त्यांच्या युद्धनीतीचा जो जगभर बोलबाला झालेला आहे त्याला तुकोबांनी वर्णिलेले असे पाईकच कारणीभूत आहेत.
पाईकांनी पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांठा माेडोनियां ॥ १ ॥
पारखिये ठायीं घेऊनियां खाण । आपलें तें जन राखियेलें ॥ २ ॥
आधारेंविण जे बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥ ३ ॥
सांडितां मारग मारिती पाईक । आणिकांसी शीक लागावया ॥ ४ ॥
तुका म्हणे विश्वा घेऊनी विश्वास । पाईक तयास सुख देती ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०५९, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३६७)
पारखे
म्हणजे परके अर्थात शत्रू. खरा पाईक हा शत्रूनी साठविलेला खजिना शोधून
काढून तो लुटून घेतो. शत्रूच्या प्रदेशात खणती लावून ते आपल्या लोकांचे
रक्षण करतात. पाईकांना सदैव डोळ्यात तेल घालून जागरूक राहावे लागते. अन्यथा
शत्रूकडून घातपात होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा शत्रूकडील लोक
मित्रत्वाचे सोंग घेऊन आपल्यात मिसळतात आणि आपल्याला दगा फटका करण्यासाठी
प्रयत्न करतात. खरा पाईक हा अशा लोकांना त्यांच्या बोलण्यावरून ओळखतो.
त्याच्यात आपले लोक कोण आणि परके लोक कोण यात फरक करण्याची बुद्धी असते.
आपल्या पक्षातील लोक सुद्धा जर स्वतःचा मार्ग सोडून वागायला लागले तर असा
पाईक हा स्वकीयांना सुद्धा बिनदिक्कतपणे मारतो. ज्यामुळे इतरांना असे मार्ग
सोडून वागण्याचे धैर्य होणार नाही. त्यांना समजून येते की आपण जर काही
भलते सलते आचरण केले तर आपली गत सुद्धा अशीच होऊ शकते. अवघ्या विश्वाला
विश्वासात घेऊन सुखी करणे हेच पाईकाचे ध्येय असते.
पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥ १ ॥
तो एक पाईक पाईकां नाईक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ २ ॥
तृणवत तनु साेनें ज्या पाषाण । पाईका त्या भित्र नाहीं स्वामी ॥ ३ ॥
विश्वासावांचूनी पाईकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोललिया ॥ ४ ॥
तुका म्हण नये स्वामी उणेपण । पाईक जतन करी त्यासी ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६०, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३६८)
पारखे
म्हणजे परके हे आपण पूर्वी पहिलेच आहे. तुकोबा म्हणतात खरा पाईक तो आहे जो
परकीयांचा, शत्रूचा समूळ नाश करतो आणि आपल्या प्रजेचे, कुळाचे रक्षण करतो.
ज्या पाइकाचा सर्व भाव आपल्या स्वामीवर, राजावर असतो, जो पाईक आपल्या
राजाशी एकनिष्ठ असतो त्याला आपोआप नाईक पदी बढती मिळते. पाईक हा साधा सैनिक
होय तर नाईक म्हणजे त्यांचा नेता होय येथे हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.
अर्थात तुकोबा येथे पाइकाच्या बढतीचे सूत्र सांगत आहेत. अशा पाइकाला आपले
शरीरच काय पण आपले जीवनसुद्धा तृणवत वाटते. गवताप्रमाणे तुच्छ वाटते. सोने
सुद्धा त्याला पाषाणासारखे वाटते. म्हणजे तो कोणाच्याही प्रलोभनाला बळी
पडून स्वामी निष्ठा सोडत नाही. फितूर होत नाही. पाईक हा आपल्या कृतीने
स्वामीच्या मनात विश्वासपात्र बनत असतो. विश्वासाशिवाय पाईकाला कसलेच मोल
नसते, त्याची कवडीचीही किंमत नसते. खऱ्या पाईकाने कधीही आपल्या स्वामीला
उणेपण येणार नाही असेच वागावे. स्वामीच्या कीर्तीला आणि पाईकावरील
विश्वासाला कधीही धक्का पोचणार नाही याची काळजी पाईकाने सदैव बाळगली
पाहिजे. तरच तो विश्वासपात्र बनतो. म्हणजेच तुकोबांनी पाईकाने आपल्या
स्वामीशी कसे वागावे याची नीतीच सांगितली आहे. अर्थातच स्वामीने सुद्धा
पाईकाशी कसे वागावे याचेही संकेत तुकोबांनी आपल्या अभंगातून सांगितलेले
आहेत.
छ. शिवरायांच्या जीवन कार्याकडे पाहत असताना आपल्याला
शत्रूच्या प्रलोभनाला बळी न पडणारे मुरारबाजी आणि येसाजी कंक आठवल्याशिवाय
राहत नाहीत. एप्रिल १६६५ मध्ये दिलेरखान याने पाच हजार सैन्यासह पुरंदर
किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळी केवळ ७०० मावळे दिमतीला घेऊन मुरारबाजी
मोठ्या हिम्मतीने किल्ल्याबाहेर पडले. शत्रूच्या सैन्याच्या संख्येला न
घाबरता मुरारबाजींनी आपला मोर्चा थेट दिलेरखानाकडे वळवला. चौथीच्या
इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात या प्रसंगाचे वर्णन पुढील प्रमाणे आलेले आहे,
‘दिलेरखानाला बघून मुरारबाजी चवताळला. 'कापा, तोडा, मुडदे पाडा’ असे ओरडून
तो शत्रूवर धावला. त्याची समशेर जोराने फिरू लागली. जो आड आला, तो ठार
झाला. या एकट्या विराला मुघलांनी चोहोकडून घेरले. इतक्यात दिलेरखान
अंबारीतून ओरडला, ‘थांबा!’ मुघल थांबले. क्षणभर मागे सरले. खान मुरारबाजीला
म्हणाला, ‘मुरारबाजी तुझ्यासारखा समशेरबहाद्दर मी आजवर पाहिला नाही. तू
आमच्या बाजूला ये, कौल घे, बादशहा तुला सरदार करतील. जहागिरी देतील, बक्षीस
देतील.’ मुरारबाजीने दिलेरखानाचे शब्द ऐकले. रागाने त्याचे डोळे लाल झाले.
तो चवताळून म्हणाला, ‘अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे! तुझा कौल घेतो
की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला?’
मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला.
दिलेरखानाने अंबारीतून बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला.
तो जमिनीवर कोसळला..” खरे तर मुरारबाजींचे शौर्य पाहून खान प्रभावित झाला
होता. खानाने मुरारबाजींना बादशहाची चाकरी स्वीकारण्याची विनंती केली होती.
मुरारबाजींनी खानाचे म्हणणे ऐकले असते तर त्यांना जीवनदान तर मिळालेच असते
परंतु त्यांना सरदारकी देण्याचेही दिलेरखानाने सांगितले होते. पण
स्वाभिमानी मुरारबाजींनी मरण पत्करले पण दिलेरखानासारख्या शत्रूची बक्षिसी
स्वीकारली नाही.
दक्षिण दिग्विजायावर असताना शिवाजी राजे भागानगर
येथील बादशहास भेटावयास गेले. शिवरायांसारखा राजा आपल्या भेटीला आलेला
पाहून बादशाहाने त्यांचे फार मोठे आदारतिथ्य केले. एके दिवशी हत्तींची झुंज
चालू असताना बादशहाने शिवरायांना स्वराज्यात किती हत्ती आहेत? अशी विचारणा
केली. अर्थात डोंगरदऱ्या, कड्याकपारींमध्ये हत्तीसारख्या प्राण्याचे काम
नसते. पण हजरजबाबी शिवरायांनी ‘माझ्याकडे हत्ती नाहीत पण हत्तीशी झुंजणारे
पराक्रमी मावळे आहेत’ असे उत्तर दिले. तेव्हा बादशहाने ‘तुमचा एखादा मावळा
हत्तीशी झुंजेल काय?’ अशी विचारणा केली. तेव्हा येसाजी कंक क्षणाचाही विलंब
न लावता मैदानात उतरले. मदाने उन्मत्त झालेल्या हत्तीला येसाजींनी अवघ्या
काही क्षणातच लोळविले. येसाजींचा हा पराक्रम पाहून बादशहा आनंदित झाला आणि
त्याने येसाजींना इनाम जाहीर केले. पण स्वाभिमानी असणाऱ्या येसाजींनी आमचे
राजे आम्हाला बक्षिसी द्यायला समर्थ आहेत असे म्हणत नम्रपणे बादशहाची
बक्षिसी नाकारली. खरे तर भागानगरचा बादशहा आणि शिवाजी राजे यांचे संबंध
मैत्रीचे होते तरीही येसाजींनी त्यांची बक्षिसी नाकारून ते हाडाचे पाईक
आहेत हेच सिद्ध केले.
शिवरायांनी अशा पद्धतीचे अत्यंत विश्वासू मावळे आपल्या पदरी बाळगले होते. म्हणूनच त्यांचा त्रैलोक्यात गाजावाजा झाला.
धनी ज्या पाईका मानितो आपण । तया भितें जन सकळिक ॥ १ ॥
जिवाचे उदार शोभती पाईक । मिरवती नाईक मुगुटमणी ॥ २ ॥
आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळसुख ॥ ३ ॥
कमाईचीं हीणें पडिली उदंड । नाहीं तया खंड येती जाती ॥ ४ ॥
तुका म्हणे तरी पाईकीच भली । थोडीबहु केली स्वामिसेवा ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६१, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३६९)
ज्या
पाइकांना स्वतः स्वामी मानतो, आपल्या पाइकावर विश्वास ठेऊन त्यांचा
यथायोग्य सन्मान करून त्यांना योग्य ती जबाबदारी देतो अशा पाइकांना सगळे
लोक भितात. ते सुद्धा त्या पाइकांशी आदराने वागतात. आपल्या जीवावर उदार
होऊन लढा देणाऱ्या पाइकांना त्यांचे नाईक त्यांना आपल्या मुकुटातील
मण्यासारखे जपतात. वेळोवेळी त्यांचा गौरव करतात. त्यांच्या वाट्याला सर्व
प्रकारचे वैभव येते. पोटभरण्यासाठी या राजाकडून त्या राजाकडे आणि त्या
राजाकडून या राजाकडे सतत ये जा करणारे पाईकही असतात. या विष्ठेवरून त्या
विष्ठेवर जाऊन बसणाऱ्या माशीपेक्षाही चटकन आपली निष्ठा बदलणारे पोटभरू पाईक
आपल्याला ढीगभर भेटतात. पण असली पाइकी काय कामाची? पाईक होऊन थोडी बहुत का
होईना स्वामिसेवा करणे केव्हाही चांगले. या संदर्भात सदानंद मोरे म्हणतात,
‘तुकोबांना अभिप्रेत असणारा पाईक केवळ उदरनिर्वाहासाठी सैनिकी पेश
पत्करलेला भाडोत्री सैनिक नाही. असे भाडोत्री सैनिक उदंड आहेत, ते येतात
आणि जातात. आज ते एका स्वामीच्या पदरी असतील तर उद्या त्याच्यापेक्षाही
अधिक वेतन देणाऱ्या दुसऱ्या कोणाच्या चाकरीत.’
केवळ पोट भरण्यासाठी पाइकी स्वीकारणे हे तुकोबांना मान्य नव्हते. तर वेळ प्रसंगी स्वतःचे पोट फेकून देणारे पाइकच खरे पाईक होत.
पाईकपणें खरा मुशारा । पाईक तो खरा पाईकीनें ॥ १ ॥
पाईक तों जाणे मारितें अंग । पाईकासी भंग नाहीं तया ॥ २ ॥
एके दाेहीं घरीं घेतली खाणें । पाईक तो पणें निवडला ॥ ३ ॥
करूनी कारण स्वामी यश द्यावें । पाईका त्या नांवें खरेपण ॥ ४ ॥
तुका म्हणे ठाव पाईका निराळा । नाहीं स्वामिस्थळा गेल्याविण ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६२, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३७०)
या
अभंगाचा अर्थ विषद करताना सदानंद मोरे लिहितात, ‘स्वतःचा बचाव करणे ही
आवश्यक बाब खरीच; परंतु पाइकाला चढाईही करता आली पाहिजे. किंबहुना पुष्कळ
वेळा हल्ला हाच बचावाचा श्रेष्ठ मार्ग ठरतो. ज्या पाइकाला युद्धशास्त्रातील
मारण्याचे अंग, चढाईचा मार्ग अवगत असतो त्याचा पराभव होत नाही. जोपर्यंत
स्वामी सुरक्षित नियोजित ठिकाणी पोहचत नाही तोपर्यंत पाईक आपली जागा सोडत
नाही. तसेच पाय रोवून तो शत्रूची वाट रोखतो.’ अर्थात सर्वच पाईक सारख्याच
प्रतीचे नसतात व त्यामुळे स्वामीला त्यांच्यात श्रेष्ठ कनिष्ठ ठरवावे
लागते. या वस्तुस्थितीचेही तुकोबांना भान आहे.
जेव्हा शत्रूच्या
प्रदेशात खणती लागायचा प्रसंग येतो तेव्हा पाइकाचा कस लागतो. अशावेळी पण
करून पुढे येतो तो खरा पाईक. खरा पाईक स्वामीसाठी लढून जिंकून स्वामीला
यशस्वी करतो. स्वामी सुरक्षित ठिकाणी पोचल्याशिवाय पाईक जागा सोडत नाही.
या
प्रसंगी आपणास बाजीप्रभू देशपांडे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. इ.स.
१६३० मध्ये सिद्दी जोहर आणि अफझल खानाचा मुलगा फाजल खान यांनी प्रचंड
फौजफाटा घेऊन पन्हाळगडास वेढा घातला. शिवरायांचा अंदाज होता की काही काळ
गेल्यानंतर वेढा सैल होईल आणि आपल्याला येथून निसटता येईल. परंतु पावसाळा
सुरु झाला तरी वेढ्यात थोडीशीही ढील पडली नाही. हा वेढा उठवण्यासाठी प्रती
शिवाजी म्हणून नावलौकिक असणारे नेताजी पालकर यांनी सिद्दी हिलालच्या मदतीने
हल्ला केला होता; परंतु त्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळाल्यामुळे ते अपयशी
ठरले. तेव्हा शिवरायांनी स्वतःच एक गुप्त बेत आखला आणि विशाळगडाकडे पळून
जाण्याची योजना बनवली. याच गुप्त योजनेचा एक भाग म्हणून शिवा काशीद यांना
खोटे शिवाजी महाराज बनवून बोलणी करण्यासाठी सिद्दीकडे पाठवण्यात आले आणि
निवडक मावळे घेऊन शिवाजी महाराज वेगाने विशाळगडाकडे निघाले; परंतु ही बातमी
सिद्दीला समजली आणि तो वाऱ्याच्या वेगाने महाराजांचा पाठलाग करू लागला.
वाटेत घोडखिंड होती. या खिंडीत सिद्दीच्या सैन्याने मावळ्यांना गाठले.
तेव्हा खिंडीमध्ये बाजीप्रभू यांच्या सोबत निवडक मावळे ठेऊन शिवाजी महाराज
स्वतः विशाळगडावर चढू लागले. जोपर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोचल्याची
खूण होणार नाही तोपर्यंत बाजी प्रभू आणि मावळ्यांनी आपल्या प्राणांची
शिकस्त केली आणि शत्रूला खिंडीतच थोपवून धरले. काही वेळाने महाराज गडावर
पोचले. त्यांच्या पोचल्याची खूण म्हणून तोफांचे आवाज काढण्यात आले आणि इकडे
बाजीप्रभू आणि पुष्कळ मावळ्यांनी आपला प्राण सोडला.
प्रसिद्ध
इतिहासकार गोविंद पानसरे लिहितात, ‘बाजीप्रभू अन ते बेनाम मुठभर मावळे का
लढले? पुन्हा तीच भावना आपण मेलो तरी चालेल पण जे कार्य आरंभले होते ते
पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा. ते कार्य पूर्ण व्हायला हवे. ज्याच्यासाठी
हसत हसत मरण पत्करावे असे ते कार्य होते. अशीच त्यांची भावना होती.’
तुकोबांनी
सांगितले होते की, ‘तुका म्हणे ठाव पाईका निराळा । नाहीं स्वामिस्थळा
गेल्याविण ॥’ म्हणजे जोपर्यंत आपला राजा सुरक्षितपणे नियोजित ठिकाणी पोहचत
नाही तोपर्यंत हाडाचा पाईक हा आपली जागा सोडत नाही. बाजीप्रभू आणि
त्यांच्या मावळ्यांनी सुद्धा जोपर्यंत शिवाजी राजे विशाळगडावर पोचत नाहीत
तोपर्यंत घोडखिंडीमध्ये आपल्या प्राणाची बाजी लाऊन शत्रूशी मुकाबला केला
आणि जेव्हा तोफांची इशारत झाली, राजे गडावर पोचले तेव्हाच त्यांनी आपल्या
शरीरातील प्राणाला मोकळी वाट करून दिली.
उंच नीच कैसी पाईकाची ओळी । कोण गांढ्या बळी निवडला ॥ १ ॥
स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ २ ॥
प्रसंगावांचूनी आणिती आविर्भाव । पाईक तो नांव मिरवी बायां ॥ ३ ॥
गणतीचे एक उंच नीच फार । तयांमध्ये शूर विरळा थाेडा ॥ ४ ॥
तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाइक पाहोन मोल करी ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६३, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३७१)
पाईक
हे अनेक प्रकारचे असतात. कोणी त्याच्या कर्तृत्वामुळे उच्च असतात तर कोणी
कर्तृत्वहीन असल्यामुळे नीच असतात. पण स्वामी मात्र योग्य पाईक बरोबर
निवडतो. कोण गांढ्या आहे, कोण बलवान आहे हे स्वामीला बरोबर समजते. कारण
बलवान आणि शूर अशा पाइकाच्या हातातच शस्त्रांची आभूषणे शोभून दिसतात.
गांढ्या लोकांच्या हातातील शस्त्रे तर निव्वळ पोरासोरांचे करमणूक करण्याचे
साधनच असते हे स्वामीला ठाऊक असते. म्हणून पाइकांची निवड करताना स्वामीने
खूप सजग असले पाहिजे. जागरूक असले पाहिजे. काही पाईक हे स्वामीची सेवा
करण्यासाठी सदैव तत्पर असतात, त्यांना या बदल्यात कोणत्याच मोबदल्याची
अपेक्षा नसते. पण काही बोलघेवडे लोक सुद्धा मनामध्ये कसल्यातरी लोभाची
अपेक्षा ठेऊन स्वामीच्या पुढेपुढे करण्यात पटाईत असतात. असे लोक भाटगिरी
करून आपल्याला अपेक्षित लाभ आपल्या पदरात पाडून घेण्याच्या खटपटीत असतात.
खरे तर लाभासाठी पाईक झालेले पाईक हे पाइकाच्या नावाला कलंक आहेत असे
तुकोबांना वाटते. उच्च नीच असे गणतीचे बरेच पाईक स्वामीच्या हाताखाली
कार्यरत असतात पण त्यामध्ये शूर वीर असणारे पाईक कोणते, सामान्य पाईक कोणते
हे स्वामीला बरोबर माहित असते. आणि ज्या स्वामीला हा फरक माहिती असतो
त्याची निवड कधीच चुकत नाही. असा स्वामी योग्य प्रसंगी योग्य पाइकाची निवड
करू शकतो आणि त्यांचा योग्य तो मानसन्मानही करतो.
शिवरायांच्या
समग्र जीवनचरित्रावरून नजर फिरवली की आपल्याला शिवरायांना माणसे निवडीचे
किती अचूक आकलन होते हे पाहून आपण अचंबित झाल्याशिवाय राहत नाही.
शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील काही प्रसंगी त्यांनी निवडलेली माणसे
पाहिली, त्यांच्यावर सोपलेली जबाबदारी पाहिली आणि त्यांनी अचूकपणे यशस्वी
केलेली कामगिरी पाहिली की त्या त्या प्रसंगासाठीच त्यांचा जन्म झाला होता
की काय असे आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. अर्थातच शिवराय हे तुकोबांना
अभिप्रेत असणारे स्वामी आहेत यात वाद नाही.
एकाच स्वामीचे पाईक सकळ । जैसें तैसें बळ मोल तया ॥ ४ ॥
स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळी जवळी दुरी ॥ २ ॥
हीन कमाईचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥ ३ ॥
पाईकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढ्या वाव ॥ ४ ॥
तुका म्हणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६४, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३७२)
स्वामीच्या
हाताखाली बरेच पाईक असतात. परंतु जसे ज्याचे बळ असते, जसे त्याचे कर्तृत्व
असते त्या पद्धतीनेच स्वामी त्या सर्वांचे मोल करत असतो. त्यांची योग्यता
पाहून कुणाला स्वामी उच्च पद देतो तर कुणाला सामान्य पदावर ठेवतो. कुणाला
जवळ करतो तर कुणाला दूर लोटतो. अर्थात स्वामी हा भेद का करतो? तर जे
कर्तृत्वहीन लोक आहेत त्यांना त्यांच्या योग्यतेचेच पद मिळणार आणि कर्तृत्व
गाजवणाऱ्या, उच्च गुणवत्ता असणाऱ्याला त्याच्या गुणवत्तेप्रमाणेच उच्च असे
पद मिळणार. येथे तुकोबांच्या ‘अधिकार तैसा । करू उपदेश ॥’ या वचनाची आठवण
झाल्याशिवाय राहत नाही. पोटासाठी पाईकी करणाऱ्याला केवळ पोटापुरतेच पद
मिळते. अशा पाईकांना जास्त विश्वासाची कामगिरी सोपवता येत नाही. त्यांना
जबाबदारीची कामे देता येत नाहीत. कारण जर एखाद्याने जास्त मोबदला दिला तर
असे पोटार्थी पाईक ऐन वेळी बदलू शकतात. म्हणून अशा पाईकांना त्यांच्या
योग्यतेची कामगिरी दिली जाते. पाईक असणे म्हणजेच आपापल्या योग्यतेची पदे
मिळविण्याची संधी प्राप्त होणे होय. म्हणून चांगल्या पाईकाला वरची तर
दुर्बल पाईकाला खालची जागा प्राप्त होते. तुकोबा म्हणतात, अहो मृत्यु
कोणाला चुकलाय? जन्माला आला तो आज ना उद्या मरणारच ना? पण जो मरणाला न
घाबरता पाईकी स्वीकारतो त्याचेच जगात मोल होते, त्याचीच जगात वाहवा होते
आणि जे मरणाला घाबरतात त्यांची अवकळा होते, फजिती होते. तुकोबांनी एके
ठिकाणी सांगितलेलेच आहे ‘तुका म्हणे रणी । जीव देता लाभ दुणी ॥’ रणांगणात
लढत लढत जे मरतात त्यांची कीर्ती होते, त्यांना दुहेरी लाभ मिळतो. जे
मरणाला घाबरून रणांगणाला पाठ दाखवतात त्यांच्या अवकळेला मात्र तोड नसते.
प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाठीं एक जैसें तैसें ॥ १ ॥
आगळे पाऊल आणिकासी तारी । पळतीं माघारीं तोडिजेती ॥ २ ॥
पाठीवरी घाय म्हणती फट मर । निधडा अंगें शूर मान पावे ॥ ३ ॥
घेईल दरवडा देहा तो पाईक । मारी सकळिक सर्व हरी ॥ ४ ॥
तुका म्हणे नव्हे बोलाचें कारण । कमाईचा पण सिद्धी पावे ॥ ५ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६५, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३७३)
प्रजेमधून
पाईकी करणारी बरीच मंडळी ही केवळ पोटासाठी हा पेशा स्वीकारतात. असे लोक
कधीच उच्च पद बळकाऊ शकत नाहीत. खरा पाईक हा आपल्या शौर्याने बढती मिळवून
नाईक म्हणजे नेता होतो. युद्धप्रसंगी एखाद्या पाइकाचे आगळे पाऊल पडले आणि
तो रणांगण सोडून पळायला लागला तर खरा पाईक हा अशा मरणाला घाबरणाऱ्या
गांढ्या व्यक्तीचे पाय तोडून टाकतो. अशा पळकाढू गांढ्या पाईकामुळे इतर
पाईकांचे सुद्धा मनोधैर्य खच्ची होऊ शकते. म्हणून अशांचे पाय तोडून त्यांना
माघार घेणे अशक्य करणेच योग्य असते. जो पाईक पाठ दाखवून पळतो आणि शत्रूचे
वार आपल्या छाताडावर न घेता तो पाठमोऱ्या पाठीवर झेलतो तो पाईक भित्रा
असतो. त्याची जगात छी थू होते. त्याच्या अवकळेला मर्यादा नसते. पण जो पाईक
स्वतः सुरक्षित राहून शत्रूचे सर्वस्व हरण करतो, शत्रूचा समूळ नायनाट करतो
त्याचा मात्र अंगाने खरा शूर वीर असल्याचा सर्वत्र बोलबाला होतो. पाईकी
म्हणजे केवळ ‘बोलाचा भात अन बोलाचिच कढी’ नव्हे, तर आपल्या कृतीतून त्याला
त्याच्या पाईकीचा पण सिद्धीस न्यावा लागतो. अन्यथा ‘बोल बोलता वाटे सोपे ।
करणी करिता टीर कापे ॥’ अशी त्याची अवस्था होऊन जाते.
कोंढाणा
किल्ला घेण्याप्रसंगी सूर्याजी मालुसरे यांनी परतीचे दोर कसे कापून टाकले
होते याची येथे आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोंढाण्याच्या पश्चिमेला
असणाऱ्या कड्यावर पहारा नसल्यामुळे तानाजींनी निवडक तीनशे मावळ्यांसह गड
चढून जाण्याचा आणि गडावर पोचून दरवाजे उघडण्याचा निर्धार केला. दुसऱ्या
बाजूने तानाजी मालुसरे यांचे भाऊ सूर्याजी पाचशे मावळ्यांसह गडाच्या
दरवाज्या जवळ जाऊन गडाचे दार उघडण्याची वाट पाहत थांबले. तानाजी मालुसरे
आणि त्यांचे सोबती एका दोराच्या साहाय्याने कोंढाणा गड चढण्यात यशस्वी
झाले. गडाचे दरवाजेही उघडण्यात आले. पण उदयभानूला तानाजींच्या आगमनाची खबर
लागली आणि युद्धाला सुरुवात झाली. मावळे त्वेषाने लढत होते. उदयभानूने थेट
तानाजींशीच लढायला सुरुवात केली. कुणीही माघार घेईना. कारण दोघेही शूर
होते. परंतु अचानक तानाजींची ढाल तुटली. तानाजींनी न डगमगता आपला शेला
हाताला गुंडाळला आणि शेल्याची ढाल करून ते उदयभानाशी लढू लागले. या लढाईत
तानाजींना प्रचंड जखमा झाल्या होत्या. शेवटी तानाजी मालुसरे धारातीर्थी
पडले. सिंहासारखा लढणारा तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मावळ्यांचा धीर खचला
आणि काही मावळ्यांचे आगळे पाऊल पडून ते पळायला लागले. इतक्यात तानाजीचे
बंधू सूर्याजी आपल्या मावळ्यांसह दरवाज्यातून आत आले. आपला भाऊ युद्धात
कामी आलेला असून मावळे मात्र रणांगणातून पळ काढत आहेत हे त्यांच्या लक्षात
आले. तेव्हा सूर्याजी मालुसरे या हतवीर्य मावळ्यांना सामोरे गेले आणि
त्यांनी सांगितले की मी परतून जाण्याचे दोर केव्हाच कापून टाकलेले आहेत. एक
तर गडावरून उड्या टाकून मरा किंवा शत्रूशी लढत लढत मरा. सूर्याजींच्या या
आवेशपूर्ण बोलण्याने पळणारे सैनिक मागे फिरले आणि ते शत्रूवर सर्व
ताकतीनिशी तुटून पडले. शेवटी कोंढाणा किल्ला हा स्वराज्यात सामील झाला.
येथे
सूर्याजींनी पळणाऱ्या सैनिकांचे प्रत्यक्ष पाय जरी कापून टाकले नसले तरी
त्यांनी पळणाऱ्या सैनिकांचे गडावरून सुरक्षित उतरण्याचे सर्व मार्गच बंद
करून टाकले. त्यांच्या समोर गडावरून उड्या मारून मरण्याशिवाय दुसरा कोणता
पर्यायच सुर्याजींनी शिल्लक ठेवला नाही. तेव्हा या सैन्यासमोर शत्रूशी
लढण्याशिवाय पर्याय राहिला नाही. स्वतः सुरक्षित राहून शत्रूचे सर्वस्व हरण
करत, शत्रूचा समूळ नायनाट करत जिवंत राहणे एवढेच त्यांच्या हाती राहिले
आणि पळणाऱ्या मावळ्यांनी हा पर्याय निवडत कोंढाणा किल्ला जिंकून दिला. येथे
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे लग्न होते.
पण ते बाजूला सारून ते कोंढाण्याच्या मोहिमेवर गेले आणि शिवरायांना कोंढाणा
जिंकून दिला. याला जातीचा पाईक म्हणतात.
जातीचा पाईक ओळखे पाईका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥ १ ॥
धरितील पोटासाठी हतियारें । कळती ती खरें वेठीचींसीं ॥ २ ॥
जातीचें तें असें खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥ ३ ॥
तुका म्हणे नमूं देव म्हूण जना । झालियांच्या खुणा जाणतसों ॥ ४ ॥
(देहू संस्थान गाथा -अ.क्र. १०६६, तुकोबा डॉट कॉम - अ.क्र. ३७४)
राजाच्या
हाताखाली काम करत असताना राजाला जशी योग्य पाईकांची कदर असते तशीच खऱ्या
पाईकाला सुद्धा आपल्या सारख्याच गुणवान आणि शौर्यवान पाईकांची कदर असते. तो
अशा पाईकाला बरोबर ओळखतो. त्याचा योग्य असा मान सन्मानही ठेवतो. कारण
त्याला त्याची पाईक म्हणून असलेली गुणवत्ता माहित असते. पोटासाठी हथियार
धरणारे मतलबी आणि स्वार्थी लोकही खऱ्या पाईकाला तेव्हाच लक्षात येतात.
पोटासाठी हातात शस्त्रे घेणारे पाईक जातिवंत शूराला परिचयाचे असतात.
जातिवंत शूराला खऱ्या पाइकाचे घाव आणि डाव माहित असतात. म्हणून
त्यांच्यापुढे खरे शूर तेवढेच टिकतात आणि बाकीच्यांचा टिकाव लागत नाही.
जातीच्या पाईकाच्या खऱ्या खाणाखुणा पारखी नजर असणाऱ्या पाईकापासून लपत
नाहीत. तुकोबा म्हणतात की आम्ही सर्व लोकांनाच देव मानून नमन करतो पण
त्यांच्यातही खरे पाईक कोण आहेत हे आम्ही बरोबर जाणतो. अर्थात अशा पाईकांचा
सुद्धा आम्ही आदरच करतो.
समारोप
तुकोबा आणि
शिवाजी महाराज हे नुसते समकालीनच नव्हते तर त्यांचे कार्य हे एकमेकांना
पूरक होते. तुकोबासुद्धा एका अर्थाने योद्धेच होते फरक एवढाच की त्यांनी
शब्दांची शस्त्रे आपल्या हाती धारण केलेली होती. पण दोघांचाही उद्देश मात्र
एकच होता तो म्हणजे ‘कंटकाचे निर्दाळन’ तुकोबा-शिवराय संबंध हा केवळ या
दोघांपुरताच मर्यादित राहिला नाही; तर शिवरायांच्या पुढील वारसदारांनीही
तुकोबांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. या दोन्ही घराण्याचे संबंध
पुढे चालतच राहिले. तुकोबारायांचे अचानक हे जग सोडून जाणे शिवरायांना
धक्का देणारे ठरले. याबद्दल सदानंद मोरे लिहितात, ‘देहुकरांचा एका घराण्यात
असलेल्या फारकतनाम्यानुसार तुकाराम महाराज वैकुंठाला गेले हे वर्तमान ऐकून
शिवाजीराजे विस्मय पावले. त्यांनी हुद्देदार जानोजी भोसले यांजकडे
महाराजांच्या कुटुंबियाची विचारपूस केली व तुकोबांचे चिरंजीव महादेवबुवा
यांना भेटीस घेऊन येण्याची आज्ञा केली. भेटीनंतर वर्षासन, एक खंडी धान्य व
एक होनाची मोईन करून दिली. शिवाजी राजांच्या पश्चात छत्रपती संभाजी राजे
यांनी हे वर्षासन पुढे चालू ठेवले.’
यावरून स्पष्ट दिसते की शिवाजी
राजे यांना तुकोबांची काळजी होती. तुकोबांचे वय हे काही असे अचानक निर्याण
होण्यासारखे नसल्यामुळे त्यांच्या जाण्याने शिवाजी राजे यांना आश्चर्य
वाटले. तुकोबांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची वाताहत होऊ नये म्हणून
त्यांनी महादेवबुवा यांना बोलावून एक खंडी धान्य व एक होणाची मोईन करून
दिली. शिवाजी महाराजांनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे छत्रपती झाले.
‘आबासाहेबांचे जे संकल्पित तैसे चालवावे’ हा त्यांचा निश्चयच असल्यामुळे
त्यांनी शिवाजी महाराजांनी तुकोबांच्या कुटुंबियांना सुरु केलेली मोईन पुढे
तशीच चालू ठेवली.
(लेखक हे प्रसिद्ध कीर्तनकार, वक्ते, इतिहास संशोधक व प्रकाशक आहेत.)
No comments:
Post a Comment