Friday, 9 May 2025

लेख-३. तुकया केवळ पांडुरंग

- डॉ. सदानंद मोरे

स्त्रीवादी विचार आणि स्त्रीमुक्तीची चळवळ या तशा अलीकडील काळातल्या गोष्टी. पुरुषसत्ताक आणि पुरुषकेंद्रीत समाजव्यवस्थेत स्त्रियांना अनेक स्वाभाविक आणि वाजवी हक्क नाकारले गेले होते. या वस्तुस्थितीला पुराव्याची गरज नाही. भारतीय परंपरेत तर स्त्रीशूद्र हा द्वंद्वसमास प्रसिद्धच आहे, दोघांनाही वेदांच्या अध्ययनाचा अधिकार नाकारण्यात आलेला होता. त्यामुळे त्यांना स्वतंत्र असे धार्मिक जीवन जगता येत नव्हते आणि धर्म हा पूर्वी मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी असलेला घटक होता, हे एकदा ध्यानात घेतले, की स्त्रीशूद्रांना आपण पशुतुल्य कसे केले, हेदेखील समजून यावे. पशू आणि मानव यांना एकमेकांपासून बाजूला करणारा घटक म्हणजे धर्म. वेद हे धर्माचे प्रमाण आणि स्त्रीशूद्रांना वेदांचा अधिकार नाही, अशी ही परिस्थिती होती.

महाराष्ट्रापुरते बोलायचे म्हणजे वारकरी परंपरेने पहिल्यापासूनच स्त्रियांना स्थान दिले. हे स्थान केवळ वाती वळून श्रवणभक्ती करण्यापुरते मर्यादित नव्हते, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. जनाबाई, मुक्ताबाई, सोयरा इत्यादी अगदी वारकऱ्यांच्या आदिकालातील अभंगरचना करणाऱ्या स्त्रियांची नुसती नावे लक्षात घेतली तरी पुरेसे आहे. या स्त्रिया जेव्हा अभंगामधून आत्माविष्कार करत होत्या, याचा हिशेब मांडायला बसले, म्हणजे मराठीत काव्यरचना करणाऱ्या स्त्रियांबद्दलचा आदरभाव वाढेलच; परंतु ज्या परंपरेने त्यांना अभिव्यक्तीसाठी अवकाश देऊ केला त्या परंपरेच्या थोरपणाचाही विचार करावा लागेल.

बहिणाबाई या वारकरी परंपरेतील अखेरच्या कवयित्री, त्या तुकाराम महाराजांच्या समकालीन. मराठी इतिहासात बहिणाबाईंचे स्थान अनेक कारणांमुळे अनन्यसाधारण मानावे लागते. परमार्थाची वाटचाल करताना त्यांना स्त्री म्हणून जो संघर्ष करावा लागला, त्याची आदरयुक्त नोंद सध्या विद्युत भागवतांसारख्या स्त्रीवादी अभ्यासक घेत आहेतच. श्रीमती इंदुमती शेवड्यांच्या संत कवयित्रीवरील पुस्तकातील भागवतांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. बहिणाबाई या मराठीतील आद्य स्त्री आत्मचरित्रकार होत.

अर्थात, स्त्रीवादी दृष्टिकोन बाजूला ठेवला, तरीही बहिणाबाईंचे अनन्यसाधारणत्व टिकते. वारकरी परंपरेच्या इतिहासाची आत्मभान ठेवून बहिणाबाईंनी जी रूपकात्मक नोंद केलेली आहे ती फारच महत्त्वाची ठरते.

ज्ञानदेवे घातला पाया। उभारिले देवालया ॥
नामा तयाचा किंकर । तेणे रचिले आवार ॥
जनार्दन येकनाथ । खांब दिल्हा भागवत ॥ 
तुका झालासे कळस । भजन करा सावकास ॥ 
बहेणि फडकती ध्वजा । निरूपण केले वोजा ॥
 
या एकाच अभंगावरून बहिणाबाईंची योग्यता, आकलनशक्ती आणि आवाका या बाबी ध्यानात याव्यात.

बहिणाबाईंचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे बौद्ध तत्त्वचिंतक अश्वघोष यांच्या ब्राह्मणविध्वंसक वज्रसूचि या कृतीवर त्यांनी केलेले अभंगात्मक भाष्य. अश्वघोषांनी या कृतीत जन्माधिष्ठित ब्राह्मण्याला कडाडून विरोध केलेला आहे. ब्राह्मण कोणाला म्हणायचे, याचे विवेचन करणारी ही कृती एकोणिसाव्या शतकातील दादोबा पांडुरंग, तुकारामतात्या पडवळ, म. जोतीराव फुले अशा सुधारकांना मार्गदर्शक ठरली. जातिभेदविवेकसार या तुकारामतात्यांनी सिद्ध केलेल्या पुस्तकात वज्रसूचि अवतीर्ण होते. बहिणाबाईंचे काही अभंगही त्यांनी समाविष्ट केलेले आहेत. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती महात्मा फुले यांनी काढली आणि आपल्या दुकानी विकायलाही ठेवली. वज्रसूचि हे पुस्तक बहिणाबाईंना कोठून प्राप्त झाले असावे, याबाबत कै. वा. सि. बेंद्रे, डॉ. रा. चिं. ढेरे इत्यादी संशोधकांमध्ये विचारभिन्नता आहे. तुकोबांनी आपल्या स्वप्नात येऊन ‘दिधले पुस्तक मंत्रगीता’ असे बहिणाबाई सांगतात. त्याचा अर्थ बेंद्रे, तुकोबांनी बहिणाबाईंना आपले मंत्रगीता नामक गीतेवरील टीकेचे पुस्तक दिले असा लावतात. परंतु मंत्रगीता ही देहूकर तुकोबांची नसून, नगर जिल्ह्यातील खर्ड्याजवळील वेगळ्या तुकारामांची आहे, हे डॉ. भा. पं. बहरट, डॉ. रा. चिं. ढेरे यांनी सिद्ध केलेले आहे. माझ्या मते ‘दिधले पुस्तक मंत्रगीता’ या चरणाचा अन्वय नीट लावला, तर हे कोडे सरळपणाने सुटते. पुस्तक, मंत्र आणि गीता या तीन गोष्टी तुकोबांनी बहिणाबाईंना दिल्या. ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र, भगवद्गीता आणि वज्रसूचि हे पुस्तक. वज्रसूचि ही तत्कालीन वारकरी वर्तुळात मान्य असणारी कृती होती हे, निश्चित. 

तुकारामतात्यांनी १८६० च्या दरम्यान बहिणाबाईंचे काही अभंग प्रसिद्ध केले. बहिणाबाईंची गाथा प्रकाशित व्हायला मात्र विसावे शतक उजाडावे लागले. उमरखाने यांची आणि कोराळकर यांची, अशा दोन प्रती अगोदर प्रकाशित झाल्या; परंतु सायासपूर्वक अभंग मिळवून शास्त्रशुद्ध बहिणाबाईंची गाथा अतिशय साक्षेपाने संपादित करण्याचा मान बडोद्याच्या सौ. शालिनीताई जावडेकर यांच्याकडे जातो.

'कॉन्टिनेंटल' ने प्रकाशित केलेल्या या गाथेच्या दोन आवृत्त्या निघाल्या आहेत. खुद्द बहिणाबाईंच्या हस्ताक्षरातील अभंगाची संहिता ल. रा. पांगारकर (‘मुमुक्षु’कर्ते) यांनी बाईंच्या सिऊर गावी राहणाऱ्या वंशजांकडून मिळवली होती. बहिणाबाईंकडील तुकोबांचे अभंगही त्यांना मिळाले असावेत, असे त्यांच्या लिखाणावरून दिसते; परंतु या दोन्ही संहिता आपल्या संपादक, संशोधक, प्रवचनकार, उपदेशक अशा व्यापक कार्यक्षेत्रात संचार करताना पांगारकरांनी बहुधा गहाळ केल्या आणि त्या शोधून काढण्याचे आव्हान आपल्यानंतरच्या संशोधकांपुढे ठेवून त्यांना कायमचे उपकृत करून ठेवले.

बहिणाबाईंनी लिहिलेले आत्मचरित्र हे स्वतः त्यांचे चरित्र समजण्याचे महत्त्वाचे साधन तर आहेच; परंतु तुकोबांभोवती फिरत असल्यामुळे ते तुकारामचरित्राचेही अस्सल साधन आहे. तुकोबांच्या अन्य कोणीही समकालीनाने तुकोबांविषयक इतके चरित्रात्मक तपशील पुरवलेले नाहीत. विशेषतः तुकारामकालीन महाराष्ट्रात तुकोबांचे काय स्थान होते, तेव्हाचे लोक त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत, याचा विश्वसनीय वृत्तान्त बहिणाबाईंच्या अभंगांमधून मिळतो. बहिणाबाईंनी या नोंदी केल्या नसत्या, तर तुकाराम चरित्रातील महत्त्वाच्या भागाला आपण कायमचे मुकलो असतो.

वेरुळजवळील देवगावच्या आऊजी कुलकर्णी आणि त्यांची पत्नी जानकी यांचे बहिणाबाई हे अपत्य. वय वर्षे तीन पूर्ण झालेली असता गंगाधर पाठक या तीस वर्षांच्या बिजवराशी बहिणाबाईंचे लग्न झाले. त्यानंतर चार वर्षांनीच बहिणाबाईंच्या वडिलांच्या कुळात वृत्तीवरून कलह उत्पन्न झाला. भाऊबंदकीतून कायमची सुटका व्हावी म्हणून बहिणाबाईंच्या नवऱ्याने बहिणाबाईंचे सारे कुटुंब रातोरात परागंदा करण्याची योजना आखली आणि हिकमतीने यशस्वीही केली.

प्रवरासंगम, शिखर शिंगणापूर, नीरानरसिंहपूर, पंढरपूर या मार्गाने भिक्षावृत्तीने वाटचाल करत हे कुटुंब काही वर्षे रहिमतपुरात राहिले. तेथून कोल्हापूरला आले. कोल्हापूर येथे हिरंभट या विद्वान वेदान्ती ब्राह्मणाने त्याला आपल्या घरी आश्रय दिला. कोल्हापुरी तेव्हा जयरामस्वामी वडगावकर यांची कीर्तने होत असत. कीर्तनातून जयरामस्वामी तुकोबांचे अभंग म्हणत. या अभंगांनी बहिणाबाईंच्या मनाची पकड घेतली. त्यांनी तुकोबांना मनोमन गुरू मानले. तुकोबांच्या भेटीचा त्यांना ध्यास लागला. त्या म्हणतात


तुकोबांची पदे अद्वैत प्रसिद्धे । तयांच्या अनुवादे चित्त झुरे ॥
ऐसी ज्याची पदे तो मज भेटता । जीवास या होता तोष बहु ॥

तुकोबांचे त्यांनी केलेले वर्णन तुकोबाकालीन व्यक्तीने केलेले म्हणून महत्त्वाचे ठरते -

तेरा दिवस याने वह्या उदकात । घालोनिया सत्य वाचविल्या ॥
महाराष्ट्र शब्दांत वेदांताचे अर्थ । बोलिला लोकांत सर्वद्रष्टा ॥

बहिणाबाईने अशाप्रकारे तुकोबांच्या आणि हरिदासांच्या नादी लागणे, बहिणाबाईंच्या वैदिक नवऱ्याला पसंत पडणे शक्य नव्हते. दरम्यान हिरंभटाने दान केलेल्या गाईचे वासरू बहिणाबाईबरोबर कीर्तनाला जाऊन बसणे, त्याने मरताना संस्कृत श्लोकाचा अर्धचरण म्हणून प्राण सोडणे, असे काही चमत्कारही घडल्याचे बहिणाबाई सांगतात. त्यामुळे कुतूहलाने, कौतुकाने वा आदराने लोक त्यांना भेटायला, पाहायला येऊ लागले. साहजिकच गंगाधरपंतांचा पतिसुलभ मत्सर जागृत झाला. त्यांनी बहिणाबाईंना मारझोड केली. अशाच एका प्रसंगी शोक करत, मनात तुकोबांचा आठव करत असताना, तुकोबांनी बहिणाबाईंना स्वप्नात दर्शन दिले. तुकोबांच्या स्वप्नमूर्तीसंबंधी त्या म्हणतात-

जयाचियें पदे होतसे विश्रांती । त्याची देहाकृती विठ्ठलाची ॥
पांडुरंग तुका पांडुरंग तुका । वेगळिक देखा केवी होय ॥ 
कलियुगी बौद्धरुप धरी हरी । तुकोबा शरीरी प्रवेशाला ॥
तुकोबाची बुद्धि पांडुरंगरूप । मन ते स्वरूप तुकोबाचे ॥
तुकोबाची सर्व इंद्रियचालक । पांडुरंग देख सत्य आहे ॥
तुकोबाचे नेत्र तेही पांडुरंग । श्रोत्र ते अभंगरूप त्याचे ॥
तुकोबाचे हात लिहिताती जे जे । ते ते सहज पांडुरंग ॥
सर्वही व्यापार तुकोबांचे हरी । आपणाचि करी अद्वयत्वे ॥

बहिणाबाई या तुकोबांनी जणू पछाडल्या गेलेल्या असल्यामुळे त्यांना तुकोबा हे पांडुरंगच आहेत असे वाटणे स्वाभाविकच आहे, असे कोणी म्हणेल. परंतु हे केवळ बहिणाबाईंचे वाटणे नव्हते. महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोक तुकोबांकडे पांडुरंग म्हणूनच बघत होते - 

बहिणी म्हणे लोक बोलती सकळ । तुकया केवळ पांडुरंग ॥

बहिणाबाईंचे यजमान मात्र या सर्व प्रकाराने खूपच अस्वस्थ होत होते. त्यांच्या प्रतिक्रियेची नोंद बाई करतात -

भ्रतार म्हणतसे आम्ही की ब्राह्मण । वेदाचे पठण सदा करू ॥ 
कैचा शूद्र तुका स्वप्नीचे दर्शनी । बिघडली पत्नी काय करू ॥

त्याने बहिणाबाईंचा त्याग करायचे ठरवले कारण -

इस नमस्कार करतील जन । आम्ही इस तृण वाटो परी ॥
पुसतची येती ईस पाहा जन । आम्ही इस तृण वाटो परी ॥

अशाप्रकारे पत्नीत्यागाचा विचार करणाऱ्या गंगाधराला शरीरदाहाची व्यथा झाली. ती बरी होईना. तुकोबांची आपण निंदा केली म्हणून असे घडत आहे, असे वाटल्यामुळे त्याने पश्चात्ताप केला, तेव्हा ही व्यथा दूर होऊन त्याला आराम वाटू लागला. हे तुकोबांचेच सामर्थ्य, असे वाटून त्याला उपरती झाली व तो स्वतः सर्व कुटुंबीयांना घेऊन देहूला आला. तेथे बहिणाबाईंना तुकोबांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तेव्हा तुकोबा पांडुरंगाची आरती करत होते. विशेष म्हणजे तुकोबांचे जे दर्शन बाईंना स्वप्नात झाले होते, तसेच तुकोबांचे प्रत्यक्ष दर्शनही होते.

देहूगावी बहिणाबाईंना तुकोबांच्या कथा-कीर्तनाचा लाभ झाला. तुकोबांकडून कवित्वाचे वरदान मिळाले, हे खरे; पण तरीही हा सर्व प्रवास सर्वस्वी सुखाचा होता असे मात्र नव्हे. कोंडाजीपंत आणि महादजीपंत कुलकर्णी या तुकोबांच्या ब्राह्मण सुहृदांनी बहिणाबाईंच्या कुटुंबाला आश्रय दिला, मदत केली; परंतु मंबाजीने मात्र खूप पीडा केली. बहिणाबाईने सहकुटुंब सहपरिवार आपले शिष्यत्व पत्करावे, अशी त्याची इच्छा होती. आपण तुकोबांचे स्वप्नानुग्रहित आहोत, असे बहिणाबाईंनी सांगितल्यावर त्याचा तिळपापड झाला. त्याने ब्राह्मणाने शूद्र गुरू करावा का असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून पाहिला. बहिणाबाई ब्राह्मणच नाहीत, असा प्रचारही करून पाहिला.

स्वप्नीचा अनुग्रह गुरू केला शूद्र । तोही बळिभद्र ज्ञानहीन ॥ 

तुम्हास वाळीन ब्राह्मणांचे पंक्ती अशी धमकीही त्याने दिली. परंतु महादजीपंत कुलकर्णी, कोंडाजीपंत हे ब्राह्मणच तुकोबांचे चाहते असल्याने ही मात्रा लागू पडेना; तेव्हा त्याने पुणे येथे आपाजी गोसावी नामक राजयोगी होते, त्यांच्याकडे तक्रार नोंदवली - अर्थात, आपाजी गोसावी पुरेसे हुशार असल्याने ‘होय यथाकाल कार्यसिद्धी’ असे खास प्रशासकीय उत्तर त्यांनी मंबाजीला धाडले. हे आपाजी गोसावी म्हणजे पुणे-शिरवळप्रांतीचे देशपांडे, शिवाजीने नियुक्त केलेले. त्यांच्याकडे मंबाजी तक्रार करतो, आणि ते त्या तक्रारीची दखल घेतात, यावरून शिवाजी-तुकाराम संबंध काल्पनिक असल्याचा दावा (कै.) वा. सी. बेंद्रे यांनी केला होता. परंतु माझे वडील श्री. श्रीधरबुवा देहूकर (त्यांना आम्ही अण्णा म्हणतो) यांनी पुणे-शिरवळप्रांतीचा आपाजी देशपांडे हा वेगळा इसम असून, तो या प्रसंगाआधी भरभक्कम १५-२० वर्षे अगोदर निजधामास गेलेला होता, असे पुराव्यानिशी सिद्ध केले. असो.

आपाजीला केलेल्या अर्जाचा उपयोग होत नाही, असे उमजल्यावर मंबाजी अक्षरशः विकृत बनला. द्वेषांध होऊन त्याने बहिणाबाईंची गाय आपल्या मठात कोंडून ठेवली, तिचे चारापाणी तोडले. तिला मारहाण केली. गाईच्या पाठीवर उमटलेले वळ तिकडे तुकोबांच्या पाठीवर उमटले आणि तेही कळवळू लागले. परंतु तेवढ्यात मंबाजीच्या मठाला आग लागल्यामुळे लोक तिकडे धावले. गाईची सुटका झाली. तुकोबांच्या पाठीवरील वळांचे रहस्यही उलगडले. अशाप्रकारे तुकोबांच्या विश्वात्म आत्मदृष्टीचे दर्शनही बहिणाबाई घडवतात. 

तुकोरामोत्तर वारकरी संप्रदायाला बहिणाबाई पचनी पडली असे मात्र म्हणता येत नाही. यामागच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे. पुरुषकेंद्रित समाजरचना, बहिणाबाईंच्याच सिऊर या गावातील शंकरस्वामी यांजकडे निळोबारायांनंतर नेतृत्व जाणे, अशी काही संभाव्य कारणे दिसतात. काहीही असो, पण आजच्या वारकरी नेतृत्वाने तरी बाईंची उपेक्षा थांबवली पाहिजे.

(लेखक हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज असून त्यांच्या ‘तुकाराम दर्शन’ या ग्रंथातून हा लेख घेतला आहे.)

 

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...