Saturday, 3 May 2025

१२. निर्याणाचे अभंग

 श्री तुकोबाराय वैकुंठास गेले त्यावेळचे अभंग

 

निर्याणाचे (श्री तुकोबाराय वैकुंठास गेले त्यावेळचे) अभंग (अभंग संख्या २३) 

६६०. शोधितांचि नये । म्हणोनि वोळगतों पाय ॥ १ ॥ आतां दिसाे नये जना । ऐसें करा नारायणा ॥ २ ॥ परतोनी मन । गेलें ठायींचि मुरोन ॥ ३ ॥ विसरला तुका । बोलों चालों झाला मुका ॥ ४ ॥

६६१. रज्जुसर्पाकार । भासयले जगडंबर ॥ १ ॥ म्हणोनी आवडती पाय । घेतों आलाय बलाय ॥ २ ॥ दृश्य द्रुमाकार लाणी । केलों सर्वस्वासी धनी ॥ ३ ॥ तुकीं तुकला तुका । विश्वी भरोनी उरला लोकां ॥ ४ ॥

६६२. म्हणवितों दास । परि मी असें उदास ॥१ ॥ हाचि निश्चय माझा । परी मी निश्चयाहुनि दुजा ॥ २ ॥ सरतें कर्तृत्व माझ्याने । परि मी त्याहून असें भिन्न ॥ ३ ॥ तुका तुकासी तुकला । तुका तुकाहूनी निराळा ॥ ४ ॥

६६३. घोंटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हातीं । मुक्तां आत्मस्थिती सांडवीन ॥ १ ॥ ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनीं । भाग्य तरी ऋणी देव ऐसा ॥ २ ॥ तीर्थभ्रामकासी आणीन आळस । कडू स्वर्गवास करीन भोग ॥ ३ ॥ सांडवीन तपोनिधा अभिमान । यज्ञ आणि दान लाजवीन ॥ ४ ॥ भक्तिभाग्यसीमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मींचा जो अर्थ निजठेवा ॥ ५ ॥ धन्य म्हणवीन येह लोकी लोकां । भाग्य आम्ही तुका देखियेला ॥ ६ ॥

६६४. संसाराचे अंगी अवघींच व्यसनें । आम्ही या कीर्तनें शुद्ध झालों ॥ १ ॥ आतां हे सोंवळे झाले त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ २ ॥ ब्रह्मपुरी वास करणे अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां एकांताचा वास । ब्रह्मीं ब्रह्मरस सेवू सदा ॥ ४ ॥

६६५. या गरुडाचे पायीं । ठेवीं वेळोवेळां डोई ॥ १ ॥ वेगीं आणावा तो हरी । मज दीनातें उद्धरीं ॥ २ ॥ पाय लक्ष्मीच्या हातीं । म्हणाेन येतो काकुलती ॥ ३ ॥ तुका म्हणे शेषा । जागें करा हृषीकेशा ॥ ४ ॥

६६६. तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृपावंत ॥ १ ॥ एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥ २ ॥ भाकावी करुणा । विनवा वैकुंठीचा राणा ॥ ३ ॥ तुका म्हणे मज आठवा । मूळ लौकरी पाठवा ॥ ४ ॥

६६७. आपुल्या माहेरा जाईन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥ १ ॥ सुख दुःख माझें आइकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ २ ॥ करूनी सिद्ध मूळ साउले भातुके । येती दिसे एकें न्यावयासी ॥ ३॥ त्याचि पंथें माझें लागलेंसे चित्त । वाट पाहे नित्य माहेराची ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया मायबाप ॥ ५ ॥

६६८. चिन्हें उमटती अंगीं । शकुनाजोगी उत्तम ॥ १ ॥ आठवला बापमाय । येईल काय मूळ नेणों ॥ २ ॥ उत्कंठित झालें मन । हीच खूण तेथींचि ॥ ३॥ तुका म्हणे कामा वारी' । आळस घरी करमेना ॥ ४ ॥

६६९. आरोनियां पाहें वाट । कटकट सोसेना ॥ १ ॥ आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥ २ ॥ दळी कांडी लोकां ऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें पिसे । तेथें तैसें असेल ॥ ४ ॥

६७०. येथीलिया अनुभवें । कळों जीवें येतसे ॥ १ ॥ दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ २ ॥ भुकें भूकची खाउनि धाय । नाहीं हाय अन्नाची ॥ ३ ॥ तुका म्हणे सुख झालें । अंतर धालें त्यागुणें ॥ ४ ॥ 

६७१. पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥ १ ॥ गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी म्हणे त्वरें॥ २ ॥ मुगुट कुंडलांच्या दीप्ति । तेजें लोपला गभस्ति ॥ ३ ॥ मेघश्यामवर्ण हरि । मूर्ति डोळस साजिरी ॥ ४ ॥ चतुर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥ ५ ॥ पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥ ६ ॥ तुका झालासे संतुष्ट । घरा आले वैकुंठपीठ ॥ ७ ॥

६७२. शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषाेत्तम ॥ १ ॥ ना भी ना भी भक्तराया । वेगीं पावलो सखया ॥ २ ॥ दुरुनि येतां दिसे दृष्टी । धाकें दोष पळती सृष्टी ॥ ३ ॥ तुका देखोनि एकला । वैकुंठीहुनि हरि आला ॥ ४ ॥

६७३. पैल दिसतील भार । दिंड्या पताका अपार ॥ १ ॥ आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा । सुख वाट मना । डोळे बाह्या स्फुरती ॥ २ ॥ उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥ ३ ॥ तुका करी रिता ठाव । त्यासी बैसावया वाव ॥ ४ ॥

६७४. चला जाऊं रे सामोरे । पुढें भेटों विठ्ठल धुरे ॥ १ ॥ तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं । फेडावया धणी । प्रेमसुखाची आजी ॥ २ ॥ पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥ ३ ॥ तुका आळंगिला बाहीं । ठेविला विठोबाचे पायीं ॥ ४ ॥

६७५. पाहुणे घरासी । आजी आले हृषीकेशी ॥ १ ॥ काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥ २ ॥ दरदरीत पाण्या- । माजी रांधियेल्या कण्या ॥ ३ ॥ घरीं मोडकीया बाजा । वरी वाकळांच्या शेजा ॥ ४ ॥ मुखशुद्धि तुळसीदळ । तुका म्हणे मी दुर्बळ ॥ ५ ॥

६७६. संती केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥ १ ॥ कांहीं ठेविलें चरणीं । घेती तेंचि पुरवूनी । तुका पायवणी । घेऊनिया निराळा ॥ २ ॥ नसतां कांहीं संचित । भेटी झाली अवचित ॥ ३ ॥ देव मिळोनिया भक्त । तुका केलासे सनाथ ॥ ४ ॥

६७७. अवघियांच्या आलों मूळ । एक वेळ न्यावया ॥ १ ॥ सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधी ठावें करितों ॥ २ ॥ जोंवरी ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥ ३ ॥ मंगळाचे वेळे उभे । असा शाेभे सावध ॥ ४ ॥ अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥ ५ ॥ तुका म्हणे पाहें वाट । बहु आट करूनी ॥ ६ ॥

६७८. सकळही माझी बोळवण करा । परतोनी घरा जावें तुम्हीं ॥ १ ॥ कर्मधर्मे तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ २ ॥ वाढवूनी दिलें एकाचिये हातीं । सकळ निश्चिंती झाली तेथें ॥ ३ ॥ आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । मी माझिया भावें अनुसरलों ॥ ४ ॥ वाढवितां लोभ होईल उशीर । अवघींच स्थिर करा ठायीं ॥ ५ ॥ धर्म अर्थ काम झाला एके ठायीं । मेळविला जिहीं हाताहात ॥ ६ ॥ तुका म्हणे तुम्हां आम्हां हेची भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥ ७ ॥

६७९. बोलिलों तें आतां पाळावे वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठीं ॥ १ ॥ जातों आतां आज्ञा घेऊनियां स्वामी । काळक्षेप आम्ही करूं कोठें ॥ २ ॥ न घडे यावरी न धरवे धीर । पीडतां हे राष्ट्र देखोनी जग ॥ ३ ॥ हाती धरोनियां देवें नेला तुका । जेथें नाहीं लोकां पराश्रम ॥ ४ ॥

६८०. करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥ १ ॥ अवघें एकमय । राज्य बोलों चालों नये ॥ २ ॥ दुजीयाची सत्ता । नचलेसी झाली आतां ॥ ३ ॥ आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला या लोकां ॥ ४ ॥

६८१. आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी । सकळां सांगावी विनंती माझी ॥ १ ॥ वाड वेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बालावितो ॥ २ ॥ अंतकाळी विठो आम्हांसी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका ॥ ३ ॥

६८२. न देखिजे ऐसें केलें । या विठ्ठलें दुःखासी ॥ १ ॥ कृपेचिये सिंहासनीं । अधिष्ठानीं बसविलें ॥ २ ॥ वाजता तो नलगे वारा । क्षीरसागरा शयनीं ॥ ३ ॥ तुका म्हणे अवघे ठायीं । मज पायीं राखिलें ॥ ४ ॥

 

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...