साधक जीवनातील प्रतिकूलता (नुकसान, हानि) दाखविणारे अभंग.
नाटाचे अभंग : साधक जीवनातील प्रतिकूलता (नुकसान, हानि) दाखविणारे अभंग (अभंग संख्या ५४)
६८३. विठ्ठल आमचें जीवन । आगम निगमाचे स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥ १ ॥ विठ्ठल कुळींचें दैवत । विठ्ठल वित्त गोत चित्त । विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥ २ ॥ विठ्ठल विस्तारला जनीं । सप्तही पाताळें भरुनी । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मनि मानसीं ॥ ३ ॥ विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोवळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियला चाळा विश्व विठ्ठलें ॥ ४ ॥ विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका म्हणे आतां नाहीं दुसरें ॥ ५ ॥
६८४. बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिलाचि ठाव । दृढ पायीं
राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥ १ ॥ बरवा फळला शकुन । अवघा निवारिला
सीण । तुमचें झालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आतां ॥ २ ॥ बरवें झालें आलों या
ठाया । होतें संचित ठायींचें पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया
ब्रह्मींची ॥ ३ ॥ जोडिले हे न सरे धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूर्ति
मधुसूदन । समचरणी देखियला ॥ ४ ॥ जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें
ठेवणें । लोपलें होतें पारिखेपणें । ठाव चळणें चुकविला ॥ ५ ॥ आतां या
जीवाचियासाठीं । न सोडीं पडलिया मिठी । तुका म्हणे सीणलो जगजेठी । न लवीं
दिठी दुसऱ्याची ॥ ६ ॥
६८५. मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन
मतिमंदबुद्धि । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानिधि मायबापा ॥ १ ॥
नाहीं ऐकिलें गाइले गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत
। केली बहुत परनिंदा ॥ २ ॥ नाहीं केला करविला परोपकार । नाहीं दया आली
पीडितां पर । करूं नये तो केला व्यापार । वाहिला भार कुटुंबाचा ॥ ३ ॥ नाहीं
केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड कर चरण । नाहीं संतसेवा घडलें दान ।
पूजावलोकन मूर्तीचें ॥ ४ ॥ असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय । न कळे
हित करावें तें काय । नये बोलूं आठवू तें ॥ ५ ॥ आप आपण्या घातकर । शत्रु
झालों मी दावेदार । तूं तंव कृपेचा सागर । उतरीं पार तुका म्हणे ॥ ६ ॥
६८६.
आतां पावेन सकळ सुखें । खादलें कदा तें न देखें । अवघे सरलें पारिखें ।
सकळ देखें माहियेर ॥ १ ॥ जवळी विठ्ठल रखुमाई । बहिण बंधु बाप आई । सकळ
गोताचीच साई । पारिखें काई ऐसें नेणिजे ॥ २ ॥ जगदाकारीं झाली सत्ता ।
वारोनी गेली पराधीनता । अवघें आपुलेंचि आतां । लाज आणि चिंता दुरावली ॥ ३ ॥
वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं । करवी तैसें आपण करीं ।
भीड न धरीं चुकल्याची ॥ ४ ॥ सोसिला होता सासुरवास । बहुतांचा बहुत दिवस ।
बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥ ५ ॥ करिती कवतुक लाडें ।
मज बोलविती कोडें । मायबाप उत्तरें गोडें । बोले बोबडें पुढें तुका ॥ ६ ॥
६८७.
सर्व सुखाचिया आशा जन्म गेला । क्षण एक मुक्ती यत्न नाहीं केला । हिंडतां
दिशा सीण पावला । माया वेष्टिला जीव माझा ॥ १ ॥ माझें स्वहित नेणती कोणी ।
कांहींच न करिती मजवांचूनी । सज्जन तंव सुखाची मांडणी । नेणती कोणी आदि अंत
॥ २ ॥ काय सांगों गर्भाची यातना । मज भोगितां नारायणा । मांस मळ मूत्र
जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥ ३ ॥ मज चालतां प्रयाणकाळीं । असतां न
दिसती जवळी । मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळीं संचिताचे ॥ ४ ॥ आतां मज
ऐसें करीं गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा ।
चालवी दावा संसारें ॥ ५ ॥
६८८. अगा ए सांवळ्या सगुणा । गुणनिधिनाम
नारायणा । आमची परिसावी विज्ञापना । सांभाळीं दीना आपुलिया ॥ १ ॥ बहु या
उदराचे कष्ट । आम्हांसी केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करीं वटवट
या निमित्यें ॥ २ ॥ झालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न कळे
कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥ ३ ॥ येथें तों नये आठव कांहीं ।
विसावा तो क्षण एक नाहीं। पडिलों आणिके प्रवाहीं । हित तों कांहीं दिसेचि
ना ॥ ४ ॥ जीवित्व वेचिलें वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें । कांहीं व्याधि
पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥ ५ ॥ माझा मीच झालों शत्रु । कैंचे
पुत्र दारा कैंचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगद्गुरु तुका म्हणे ॥ ६
॥
६८९. आतां मज धरवावी शुद्धि । येथूनी परतवावी बुद्धि । घ्यावें
सोडवूनी कृपानिधि । सांपडलों संधी काळचक्रीं ॥ १ ॥ करिसील तरी नव्हे काई ।
राईचा डोंगर पर्वत राई । आपुले करुणेची साई । करीं वो आई मजवरी ॥ २ ॥ मागील
काळ अज्ञानपणें । सरला स्वभावें त्या गुणें । नेणे आयुष्य होतें उणें ।
पुढील पेणें अंतरलों ॥ ३ ॥ आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय ।
येथें म्यां येउनी केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥ ४ ॥ करूनी अपराध
क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा । आपुले नामी द्यावा प्रेमा । साेडवी
भ्रमापासूनियां ॥ ५ ॥ हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपे चरणीं ।
करूं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका म्हणे ॥ ६ ॥
६९०. जेणें
हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगज्जीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥
१ ॥ जो या भीवरेच्या तिरीं । कट धरुनियां करीं । पाउलें समचि साजिरीं ।
अंतरी धरोनी राहेन ॥ २ ॥ जो या असुरांचा काळ । भक्तजनप्रतिपाळ । खेळे हा
लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥ ३ ॥ जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु
खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥ ४ ॥ जो हा
लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा । जयाचे गळां वैजयंती माळा । तया
वेळोवेळां दंडवत ॥ ५ ॥ जयाचें नाम पाप नासी । लक्ष्मी ऐसी जयाची दासी । जो
हा तेज:पुंज रासी । सर्वभावें त्यासी तुका शरण ॥ ६ ॥
६९१. काय मी
उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसें तुम्ही सांगा संतजन । करा
समाधान चित्त माझें ॥ १ ॥ काय हें खंडईल कर्म । पारुषतील धर्माधर्म ।
कासयानें तें कळेल वर्म । म्हणउनी श्रम वाटतसे ॥ २ ॥ काय हे स्थिर राहेल
बुद्धि । कांहीं अरिष्ट न येल कीं मधीं । धरिलें जाईल तें सिद्धि । शेवट तो
कधीं मज न कळे ॥ ३ ॥ काय ऐसें पुण्य होईल गांठीं । घालीन पायीं देवाचे
मिठी । मज तो कुरवाळील जगजेठी । दाटईन कंठीं सद्गदित ॥ ४ ॥ काय हे निवतील
डोळे । सुख तें देखोनी सोहळे । संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे
वासनेसीं ॥ ५ ॥ ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रंदिवस हेचि तळमळ । तुका
म्हणे नाहीं आपुलें बळ । जेणे फळ पावेन निश्चयेंसी ॥ ६ ॥
६९२. तूंचि
अनाथाचा दाता । दुःख मोह नासावया चिंता । शरण आलों तुज आतां । तारी
कृपावंता मायबापा ॥ १ ॥ संतसंगति देई चरणसेवा । जेणें हा तुझा विसर न पडावा
। हाचि भाव माझिया जीवा । पुरवीं देवा मनोरथ ॥ २ ॥ मज भाव प्रेम देईं
प्रीति । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्ना सोडवूनी हातीं । विनंती माजी
परिसावी हे ॥ ३ ॥ आणिक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपत्तिराज्यचाड धनें ।
सांकडे न पडे तुज जेणें । दुजें भक्तीविणे मायबापा ॥ ४ ॥ जोडोनि कर पायीं
ठेवितो माथा । तुका विनवी पंढरीनाथा । रंगीं वोढवावी रंगकथा । पुरवीं
मनोरथा मायबापा ॥ ५ ॥
६९३. सेंदरीहेंदरी दैवतें । कोण तीं पूजी
भूतेंखेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥ १ ॥ आपुलें
इच्छे आणिकां पीडी । काय तें देईल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प
रोकडी बुद्धि अधिरा ॥ २ ॥ दासीचा पाहुणेर उखीतें । धणी देईल आपुल्या हातें ।
करुणाभाषण उचितें । हें तों रितें सतत शक्तिहीन ॥ ३ ॥ काय तें थिल्लरीचे
पाणी । ओठे न भिजे न फिटे धणी । सीण तरी आदीं अवसानीं । क्षोभे पुरश्चरणीं
दिले फळ ॥ ४ ॥ विलेपनें बुजविती तोंड । भार खोळ वाहाती उदंड । करविती
आपआपणया दंड । ऐसियास भांड म्हणे देव तो ॥ ५ ॥ तैसा नव्हे नारायण ।
जगव्यापक जनार्दन । तुका म्हणे त्याचे करा चिंतन । वंदूं चरण येती सकळ ॥ ६ ॥
६९४.
विषयओढी भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव ।
पावोनी ठाव नरदेह ॥ १ ॥ कोण सुख धरिलें संसारीं । पडोनी काळाचे आहारीं ।
माप या लागलें शरीरीं । झालियावरी सळे ओढती ॥ २ ॥ बापुडीं होतील शेवटीं ।
आयुष्यासवें झालिया तुटी । भोगिले मागें पुढे ही कोटी । होईल भेटी जन्मासी ॥
३ ॥ जुंतिले घाणां बांधोनी डोळे । मागें जोडी आर तेणेही पोळे । चालिलो
किती तें न कळे । दुःखें आरंबळे भूक तहान ॥ ४ ॥ एवढें जयाचें निमित्त ।
प्रारब्ध क्रियमाण संचित । तें हें देह मानूनी अनित्य । न करिती कां नित्य
नामस्मरण ॥ ५ ॥ तुका म्हणे न वेचतां मोल । तो हा यासी महाग विठ्ठल ।
वेंचितां फुकाचे बोल । केवढें खोल अभागियां ॥ ६ ॥
६९५. आले हो
संसारा तुम्ही एक करा । मुक्तिमारग हळूचि धरा । काळदंड कुंभयातना थोरा ।
कां रे अघोरा दचकसी ना ॥ १ ॥ नाहीं त्या यमासी करुणा । बाहेर काढितां कुडी
प्राणा । ओढाळ सांपडे जैसें धान्या । चोर यातना धरिजेतो ॥ २ ॥ नाहीं दिलें
पावईल कैसा । चालतां पंथें तेणें वळसा । नसेल ठाउकें ऐकतो कैसा । नेती बंद
जैसा धरोनियां ॥ ३ ॥ क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं ।
ओढिती कांठवणा सोई । अग्निस्तंभ बाहीं कवटाळविती ॥ ४ ॥ देखोनी अंगें कांपती
। तये नदीमाजी चालविती । लागे ठाव ना न चलवे बुडविती । वरी मारिती यमदंड ॥
५ ॥ तहानभूक न साहावे वेळ । तो राखिती किती एक काळ । पिंड पाळूनी कैसा
सीतळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥ ६ ॥ म्हणउनी करा कांहीं सायास ।
व्हावेल तरी व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तिरस तुका म्हणे
॥ ७ ॥
६९६. न बोलसी तेंही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा । तुज
मी घालीत नाहीं गोवा । भीड केशवा कासयाची ॥ १ ॥ उतरी आपुला हा भार । मजशीं
बोलोनी उत्तर । माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥ २ ॥ दात्या
आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बालिली ऐसी । यथानशक्ति ठाकेल तैसी । बाधी
दोघांसी विन्मुखता ॥ ३ ॥ म्हणोनी करितों मी आस । तुझिया वचनाची वास । धीर
हा करूनि सायास । न टळें नेमास आपुलिया ॥ ४ ॥ तुझें म्यां घेतल्यावांचून ।
येथूनी न वजें वचन । हाचि माझा नेम सत्य जाण । आहे नाहीं म्हण तुका म्हणे ॥
५ ॥
६९७. आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण
रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥ १ ॥ न कळे संचित होतें काय ।
कोण्या पुण्यें तुझे लाधती पाय। आतां मज न विसंबें वो माय । मोकलूनी धाय
विनवीतसें ॥ २ ॥ बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें । त्रिगुण
येताती लहरें । तेणें दु:खें थोर आक्रंदलों ॥ ३ ॥ आणीक दु:खें सांगों मी
किती । सकळ संसाराची स्थिति । न साहे पाषाण फुटती । भय कांप चित्तीं भरलासे
॥ ४ ॥ आतां मज न साहावे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । झालों वेडा
असोनी जाणता । पावे अनंता तुका म्हणे ॥ ५ ॥
६९८. आतां तुज कळेल तें
करीं । तारिसी तरी तारीं मारीं । जवळी अथवा दुरी धरीं । घालीं संसारीं अथवा
नको ॥ १ ॥ शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ति कांहींच नेणें । मतिमंद
सर्वज्ञानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥ २ ॥ मन स्थिर नाहीं माझिये हातीं ।
इंद्रियें धांवतां नावरती । सकळ खुंटलिया युक्ति । शांति निवृत्ति जवळी
नाहीं ॥ ३ ॥ सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव । आतां करीं कळे
तो उपाव । तूंचि सर्व ठाव माझा देवा ॥ ४ ॥ राहिलों धरूनी विश्वास । आधार
नेटीं तुझी कास । आणीक नेणें मी सायास । तुका म्हणे यास तुझें उचित ॥ ५ ॥
६९९.
देवा तूं कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु । जीवनसिद्धि साधनसिंधु ।
तोडिसी भवबंधु काळपाश ॥ १ ॥ शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार । सकळां
देवा तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥ २ ॥ भागलीं स्तुति करितां फार ।
तेथे मी काय तें गव्हार । जाणावया तुझा विचार । नको अंतर देऊं आतां ॥ ३ ॥
नेणें भाव परि म्हणवितों तुझा । नेणें भक्ति परि करितों पूजा । आपुल्या
नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धांवणें ॥ ४ ॥ तुझिया बळें पंढरीनाथा ।
झालों निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथां । न भीं सर्वथा तुका
म्हणे ॥ ५ ॥
७००. कोण सुख धरोनी संसारीं । राहों सांग मज बा हरी । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी तूंही अंतरसी ॥ १ ॥ प्रथम केला गर्भीवास । काय तें सांगावें सायास । दुःख भोगिलें नवही मास । आलों जन्मास येथवरी ॥ २ ॥ बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा । वृद्धपणीं प्रवर्तली चिंता । मरें मागुता जन्म धरीं ॥ ३ ॥ क्षण एक तोही नाहीं विसावा । लक्ष चौऱ्यांशीं घेतल्या धांवा । भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥ ४ ॥ आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनी राहेन द्वारीं । तुझा दास मी दीन कामारी । तुका म्हणे करीं कृपा आतां ॥ ५ ॥
७०१. सुख
या संतसमागमें । नित्य दुणावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में ।
सर्वकाळ प्रेमें डुल्लतसों ॥ १ ॥ म्हणोनी नाहीं कांहीं चिंता । तूंचि आमुचा
मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥ २ ॥ ऐसा हा
कळला निर्धार । माझा तुज न पडे विसर । अससी देऊनियां धीर । बाह्य अभ्यंतर
मजजवळी ॥ ३ ॥ दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुक्तिमुक्ति झाल्या कामारी
दासी । त्यांचें वर्म तूं आम्हांपाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥ ४ ॥
जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आम्हां
आनंदास । सेवूं ब्रह्मरस तुका म्हणे ॥ ५ ॥
७०२. न पवे सन्निध वाटते
चिंता । वरि या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता
सांपडलों ॥ १ ॥ बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी । उघड्या
नागविलों चोरीं । घरिंच्याघरीं जाणतजाणतां ॥ २ ॥ तुज मागणें इतुलें आतां ।
मज या निरवावें संतां । झाला कंटस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥ ३ ॥
अति हा निकट समय । मग म्यां करावें तें काय । दिवस गेलिया ठाकईल छाय । उरईल
हाय रातिकाळीं ॥ ४ ॥ होईल संचिताची सत्ता । अंगा येईल पराधीनता । ठाव तो न
दिसे लपतां । बहु चिंता प्रवर्तली ॥ ५ ॥ ऐसी या संकटाचे संधी । धांव
घालावी कृपानिधी । तुका म्हणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥ ६ ॥
७०३.
देवा तूं आमचा कृपाळ । भक्तप्रतिपाळ दीनवत्सल । माय तूं माउली स्नेहाळ ।
भार सकळ चालविसी ॥ १ ॥ तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां ।
पुढतीं निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥ २ ॥ आम्हां भय चिंता
नाहीं धाक । जन्ममरण कांहीं एक । झाला इहलोकी परलोक । आलें सकळिक वैकुंठ ॥ ३
॥ न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वर्णूं
मी किती तया सुखा ॥ ४ ॥ तुझिया नामाचीं भूषणें । तोयें मज लेवविलीं लेणें ।
तुका म्हणे तुझिया गुणें । काय तें उणें एक आम्हां ॥ ५ ॥
७०४. आतां
धर्माधर्मी कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित ।
शरणागत परि झालों ॥ १ ॥ येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न
तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें ॥ २ ॥ ऐसें
हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पडिल्या प्रसंगें ।
कीर्ति हें जगें वाखाणिजेती ॥ ३ ॥ घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला
लौकिक वेव्हार । आधीं हें विचारिली थार । अविनाशपर पद ऐसें ॥ ४ ॥ येथें एक
वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह हा नाशिवंत जाणार । धरिलें
सार नाम तुझें ॥ ५ ॥ केली आराणूक सकळां हातीं । धरावें तें धरिलें चित्तीं
। तुका म्हणे सांगितलें संतीं । देई अंतीं ठाव मज देवा ॥ ६ ॥
७०५.
बरवें झालें आलों या जन्मासी । जोड जोडिली मनुष्यदेहाऐसी । महालाभाची उत्तम
रासी । जेणें सर्व सुखासी पात्र होइजे ॥ १ ॥ दिलें इंद्रियें हात पाय कान ।
डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ २ ॥
तिळेंतिळें पुण्य सांचा पडे । तरी हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें
वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥ ३ ॥ ऐसिये पावविलों ठायीं । आतां मी
काय होऊं उतराई । येवढा जीव ठेवीन पायी । तूं वो माझे आई पांडुरंगे ॥ ४ ॥
फेडिला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनी स्तनीं केलों सीतळ ।
निजविलों बाळ निजस्थानीं ॥ ५ ॥ नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी
लागती गोडा । आलासी आकारा आमुच्या चाडा । तुका म्हणे भिडा भक्तीचिया ॥ ६ ॥
७०६.
अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोळिलों मूर्ती ।
अहो वेदमूर्ति परियेसा ॥ १ ॥ किती दोषा देऊं परिहार । गुणदोषें मळिलें
अंतर । आदि वर्तमान भविष्याकार । लागे अंतपार ऐसें नाहीं ॥ २ ॥ विविध कर्म
चौऱ्यांशीं फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पांजरा । जन्म जरा मरण
सांठवण ॥ ३ ॥ जीवा नाहीं कुडीचें लाहातें । ये भिन्न भिन्न पंचभूतें ।
रचतें खचतें संचितें । असार रिते फलकट ॥ ४ ॥ पुत्र पत्नी सहोदर । मायबाप
गोताचा पसर । मिळती काष्ठे लोटतां पूर । आदळे दूर होती खल्लाळीं ॥ ५ ॥
म्हणोनि नासावें अज्ञान । इतुकें करीं कृपादान । कृपाळू तूं जनार्दन ।
धरूनी चरण तुका विनवी ॥ ६ ॥
७०७. ऐसी हे गर्जवूं वैखरी । केशवा
मुकुंदा मुरारी । रामकृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ॥ धृ. ॥ जनार्दना
जगजीवना । विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥ २ ॥
चक्रपाणी गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा
जगदानिया ॥ ३ ॥ मदनमूर्ति मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाट्यकौशल्य
कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥ ४ ॥ गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी
सर्वजाणा । करोनी अकर्ता आपणा । नेदी अभिमाना आतळों ॥ ५ ॥ कासयानें घडे
याची सेवा । काय एक समर्पावें या देवा । वश्य तो नव्हे वांचूनी भावा । पाया
वेगळे जीवा न करी तुका ॥ ६ ॥
७०८. होतों तें चिंतित मानसीं । नवस
फळलें नवसीं । जोडी ते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥ १ ॥ धरिलें
जीवें न सोडी पाय । आलें या जीवित्वाचें काय । कैं हे पाविजेती ठाय ।
लाविली सोय संचितानें ॥ २ ॥ मज तों पडिली होती भुली । चित्ताची अपसव्य चाली
। होती मृगजळें गोवी केली । दृष्टि उघडली बरवें झालें ॥ ३ ॥ आतां हा
सिद्धि पावो भाव । मध्ये चांचल्य न व्हावा जीव । ऐसी तुम्हां भाकीतसे कींव ।
कृपाळुवा जगदानिया ॥ ४ ॥ कळों येतें आपुले बुद्धी । ऐसें तों न घडे कधीं ।
येवढे आघात ते मधीं । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥ ५ ॥ कृपा या केली
संतजनीं । माझी अळंकारिली वाणी । प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं
लोळतसें ॥ ६ ॥
७०९. मज ते हांसतील संत । जिहीं देखिलेती मूर्तिमंत ।
म्हणोनी उद्वेगलें चित्त । आहाच भक्त ऐसा दिसें ॥ १ ॥ ध्यानीं म्या
वर्णावेती कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे । येथूनी जीव निघत नसे ।
ऐसिये आसे लागलोंसें ॥ २ ॥ कासया पडिला जी धडा । उगाचि वेडा आणि वांकडा ।
आम्हां लेकरांसी पीडा । एका मागें जोडा दुसऱ्याचा ॥ ३ ॥ सांगा कोणाचा
अन्याय । ऐसें मी धरितों पाय । तूं तंव समचि सकळां माय । काय अन्याय एक
माझा ॥ ४ ॥ नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेती नारायणा । वचन द्यावें जी
वचना । मज अज्ञाना समजावी ॥ ५ ॥ बहुत दिवस केला बोभाट । पाहातां श्रमलों
वाट । तुका म्हणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामीया ॥ ६ ॥
७१०.
बरवें झालें आजीवरी । नाहीं पडिलों मृत्यूचे आहारीं । वांचोन आलों एथवरी ।
उरलें तें हरि तुम्हां समर्पण ॥ १ ॥ दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें
आयुष्या नाश। कार्याकारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ॥ २ ॥
बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं झाली ओढाओढी । नासली जागृती घडी । साच
जोडी शेवटीं गोड घास ॥ ३ ॥ तुम्हां पावविली हाक । तेणें निरसला धाक ।
तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥ ४ ॥ रवीच्या नांवें
निशीचा नाश । उदय होतांचि प्रकाश । आतां कैंचा आम्हां दोष । तूं जगदीश
कैवारी ॥ ५ ॥ आतां जळो देह सुख दंभ मान । न करी तयाचें साधन । तूं जगदीश
नारायण । आलों शरण तुका म्हणे ॥ ६ ॥
७११. आतां माझा नेणों परतों भाव
। विसावोनी ठायीं ठेविला जीव । सकळ लाभांचा हा ठाव । ऐसा वाव झाला
चित्ताठायीं ॥ १ ॥ भांडवल गांठीं तरि विश्वास । झालों तें झालों निश्चयें
दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचाचि ॥ २ ॥ आहे तें निवेदिलें
सर्व । माझा मोडियेला गर्व । अकाळीं काळ आघवें पर्व । झाला भरंवसा कृपें
लाभाचा ॥ ३ ॥ वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत । तरी हें
समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥ ४ ॥ करूनी नातळों संसारा । अंग
भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जीवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥ ५ ॥
बहु मतापासूनीं निराळा । होऊनि राहिलों सोंवळा । बैसला रूपाचा कळवळा । तुका
म्हणे डोळां लेइलों तें ॥ ६ ॥
७१२. बरवें झालें लागलों कारणीं ।
तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जईल गुणीं वैखरी ॥ १ ॥ न
वंचे शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । झालों संतांची आंदणी दासी ।
केला येविशीं निर्धार ॥ २ ॥ जीवनीं राखिला जिव्हाळा । झालों मी मजसीं
निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥ ३ ॥ जयाचें जया होईल ठावें
। लाहो या साधियेला भावें । ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनी देवें
भोवंडूनी ॥ ४ ॥ आस निरसली ये खेपे । अवघे पंथ झाले सोपे । तुमचे दीनबंधु
कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥ ५॥ अंकिलेपणें आनंदरूप । आतळों नये
पुण्यपाप । सारूनी ठेविले संकल्प । तुका म्हणे आपेंआप एकाएकीं ॥ ६ ॥
७१३.
अवघ्या दशा येणेंचि साधती । मुख्य उपासना सगुणभक्ति । प्रगटे हृदयींची
मूर्ति । भावशुद्धि जाणोनियां ॥ १ ॥ बीज आणि फळ हरीचें नाम । सकळ पुण्य सकळ
धर्म । सकळां कळांचें हें वर्म । निवारी श्रम सकळही ॥ २ ॥ जेथें कीर्तन
हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास । सकळ वोथंबले रस । तुटती पाश
भवबंधाचे ॥ ३ ॥ येती अंगा वसती लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणें ।
आपणचि येती तयाचे गुणें । जाणें येणें खुंटे ये वस्तीचें ॥ ४ ॥ न लगे
सांडावा आश्रम । उपजले कुळींचे धर्म । आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम
विठोबाचें ॥ ५ ॥ वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रह्म शून्य । मुक्त आत्मा
परिपूर्ण । तुका म्हणे सगुण भोळ्या आंम्हा ॥ ६ ॥
७१४. श्रीअनंता
मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥ १ ॥
सकळदेवाधिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महानंदा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥
२ ॥ चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा । सहस्रपादा सहस्रकरा ।
क्षीरसागरा शेषशयना ॥ ३ ॥ कमलनयना कमलापति । कामिनीमोहना मदनमूर्ति ।
भवतारका धरित्या क्षिती । वामनमूर्ति त्रिविक्रमा ॥ ४ ॥ अगा ये सगुणा
निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना । वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा
बाळकृष्णा ॥ ५ ॥ तुका आला लोटांगणीं । मज ठाव द्यावा जी चरणीं । हेंचि
करीतसे विनवणी । भवबंधनीं सोडवावें ॥ ६ ॥
७१५. माझा तंव खुंटला उपाव
। जेणें तुझे आतुडती पाव । करूं भक्ति तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव
कवणेविशीं ॥ १ ॥ धर्म करूं तरि नाहीं चित्त । दान देऊं तरि नाहीं वित्त ।
नेणें पुजों सज्जन अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥ २ ॥ नेणें गुरुदास्य
संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंद्रियांसी ॥
३ ॥ तीर्थ करूं तरि मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणें स्वभावें ।
देव जवळी आहे म्हणों मजसवें । तरी आपपरावे न वचे ॥ ४ ॥ म्हणोनी झालों
शरणागत । तुझा दास मी अंकित । यास न लगे संचित। झालों निश्चिंत तुका म्हणे ॥
५ ॥
७१६. तरी म्यां आळवावें कोणा । कोण हे पुरवील वासना ।
तुजवांचून नारायणा । लावीं स्तना कृपावंतें ॥ १ ॥ आपुला न विचारी सीण । न
धरी अंगसंगें भिन्न । अंगीकारिलें राखें दीन । देई जीवन आवडीचें ॥ २ ॥
माझिया मानसीं हे आस । नित्य सेवावा विठुरस । अखंड चरणींचा वास । पुरवी आस
याचकाची ॥ ३ ॥ माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा । एवढ्या
आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीचें ॥ ४ ॥ आळवीन करुणावचनीं । आणिक गोड
नलगे मनीं । निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रूप ॥ ५ ॥
आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारूनी पाहें । लागला झरा अखंड
आहे । तुका म्हणे साहे केलें अंतरीं ॥ ६ ॥
७१७. हेंचि भवरोगाचे औषध
। जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांही नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥ १ ॥
सावळें रूप ल्यावें डोळां । सहा चौ अठरांचा मेळा । पदर लागों नेदी खळा ।
नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥ २ ॥ भोजना न द्यावें आन । जेणें चुके अनुपान ।
तरीच घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥ ३ ॥ नये निघों आपुलिया घरा ।
बाहेर लागों नये वारा । बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥ ४ ॥
पासी तें एक द्यावें वरी । नवनीताची होईल परी । होईल घुसळिलें तें निवारी ।
सार भीतरी नाहीं तया ॥ ५ ॥ न्हायें अनुतापीं पांघरें दिशा । स्वेद निघों
दे अवघी आशा । होसील आधीं होतासी तैसा । तुका म्हणे दशा भोगीं वैराग्य ॥ ६ ॥
७१८.
मागुता हाचि जन्म पावसी । भोगिलें सुखदु:ख जाणसी । हें तों न घडे रे
सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥ १ ॥ लक्ष चौऱ्याशीं न चुके फेरा ।
गर्भवासीं यातना थोरा । येऊनी पडसी संदेहपुरा । वोळसा थोर मायाजाळीं ॥ २ ॥
पशु काय पाप पुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । काय एक उपजतां मरती ।
बहिरीं अंध होती पांगुळ मुकीं ॥ ३ ॥ नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार
उत्तम गती । देवचि होईन म्हणती ते होती । तरि कां चित्तीं न धरावें ॥ ४ ॥
क्षण एक मन स्थिर करूनी । सावध होईं डोळे उघडोनी । पाहें वेद बोलिले
पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥ ५ ॥
७१९. दास्य करी दासाचें । उणें न
साहे तयाचें । वाढिलें ठायीचें । भाणें टाकोनियां धांवे ॥ १ ॥ ऐसा कृपेचा
सागर । विटे उभा कटीं कर । सर्वस्वें उदार । भक्तांलागीं प्रगटे ॥ २ ॥
हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भक्तांचें भूषण । नाहीं तयाचा सीण । सुख
धरिलें लातेचें ॥ ३ ॥ सत्यभामा दान करी । उजुर नाहीं अंगीकारी । सेवकाच्या
शिरीं । धरूनी चाले पादुका ॥ ४ ॥ राखे दारवंटा बळीचा । सारथी झाला
अर्जुनाचा । दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥ ५ ॥ भिडा न बोले पुंडलीकाशीं ।
उभा मर्यादा पाठीशीं । तुका म्हणे ऐसी । कां रे न भजा माउली ॥ ६ ॥
७२०.
हरि तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस । होऊनी राहाती उदास ।
बळकट कांस भक्तीची ॥ १ ॥ धरूनी पाय त्यजिलें जन । न लगे मान मृत्तिका धन ।
कंठीं नामामृत पान । न लगे आन ऐसें झालें ॥ २ ॥ वाव तरी उदंडचि पोटीं । धीर
सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । गिऱ्हे तरी वेठीं राबविती ॥ ३
॥ बळ तरी नागवती काळा । लीन तरी सकळांच्या तळा । उदार तरी देहासी सकळां ।
जाणोनी कळा सर्व नेणते ॥ ४ ॥ संसार तो तयांचा दास । मोक्ष तो पाहातसे वास ।
रिद्धीसिद्धी देशवटा त्रास । न शिवती यास वैष्णवजन ॥ ५ ॥
जन्ममृत्युस्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें । तुका म्हणे अखंडित
सुखें । वाणी वदे मुखें प्रेमामृताची ॥ ६ ॥
७२१. बहुत जाचलों संसारीं
। वसें गर्भी मातेच्या उदरीं । लक्ष चौऱ्यांशीं योनिद्वारीं । झालों
भिकारी याचक ॥ १ ॥ जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बहु बांधलों
संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥ २ ॥ न भरे
पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा । नाहीं सत्ता न फिरे ऐसी
देवा । लाही जीवा खापरीं तडफडी ॥ ३ ॥ काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक
पुढेंही नेणों किती । खंडना नाहीं पुनरावृत्ति । मज कल्पांतीं तरी वेगळें ॥
४ ॥ ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुलें ओझें । भवसिंधुतारक
नाम तुझें । धांवसी काजें आडलिया ॥ ५ ॥ आतां धांव घालीं नारायणा ।
मजकारणें रंका दीना । गुण न विचारीं अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥ ६ ॥
७२२.
जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाय । तंव तूं आपुलें स्वहित पाहें ।
तीर्थयात्रे जाय चुकों नको ॥ १ ॥ जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण
गाय आइक वहिला । मनीं भाव धरूनी भला । न वंचें त्याला चुकों नको ॥ २ ॥
जोडोनी धन न घालीं माती । साधूसंते पूजन यती । सत्य आचरण दया भूतीं । करीं
सांगाती चुकों नको ॥ ३ ॥ दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हें विषयसंगीं ।
काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहें संतसंगी चुकों नको ॥ ४ ॥ मग तेथें न
चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं । पुढें संचित जाईल ग्वाही
। तुका म्हणे तईं यमआज्ञा ॥ ५ ॥
७२३. चांगलें नाम गोमटें रूप ।
निवती डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प अति सार ॥ १ ॥
शस्त्र हें निर्वाणींचा बाण । निकट समयो अवसान । कोठें योजेल दश दान । खंडी
नारायण दुःख चिंतनें ॥ २ ॥ सकळ श्रेष्ठांचें हें मत । पावे सिद्धी पाववी
अनंत । म्हणोनी व्हावें शरणागत । आहे उचित एवढेंचि ॥ ३ ॥ म्हणोनी रुसलों
संसारा । सर्प हा विखार पांढरा । तुजशीं अंतर रे दातारा । याचि
दावेदारानिमित्त ॥ ४ ॥ येणें मज भोगविल्या खाणी । नसता छंद लाविला मनीं ।
माजलों मी माझे भ्रमणीं । झाली बोडणी विटंबना ॥ ५ ॥ पावलों केलियाचा दंड ।
खाणी भोगिल्या याती उदंड । आतां केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥ ६
॥
७२४. तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा । भवतारका
जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥ १ ॥ काय जाणावें म्यां दीनें ।
तुझिये भक्तीचीं लक्षणें । धड तें तोंड धुऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं
॥ २ ॥ न लवीं आणीक कांहीं पिसें । माझिया मना वांयां जाय ऐसें । चालवीं
आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ॥ ३ ॥ तुज हे समर्पिली काया ।
जीवेंभावें पंढरीराया । सांभाळीं समविषम डाया । करीं छाया कृपेची ॥ ४ ॥
चतुर तरी चुतरां राव । जाणता तरी जीवांचा जीव । न्यून तो कोण एक ठाव । आरुष
भाव परी माझा ॥ ५ ॥ होतें तें माझें भांडवल । पायांपें निवेदिले बोल ।
आदरा ऐसें पाविजे मोल । तुका म्हणे साच फोल तूं जाणसी ॥ ६ ॥
७२५.
कां हो माझा मानियेला भार । ऐसा तंव दिसतसे फार । अनंत पावविलीं उद्धार ।
नव्हेचि थार मज शेवटीं ॥ १ ॥ पाप बळिवंत गाढें । तुजही राहों सकतें पुढें ।
मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥ २ ॥ काय मानिती संतजन ।
तुमचें हीनत्व वचन । कीं वृद्ध झाला नारायण । न चले पण आधील तो ॥ ३ ॥ आतां
न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी । पडदा काय घरच्या घरीं । धरिलें दुरी
तेव्हां धरिलें ॥ ४ ॥ नको चाळवूं अनंता । कासया होतोसी नेणता । काय तूं
नाहीं धरीत सत्ता । तुका म्हणे आतां होई प्रगट ॥ ५ ॥
७२६. तुळसी
माळा घालूनि कंठीं । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनी पुंडलीका दृष्टी । असे
भीमातटीं पंढरीये ॥ १ ॥ भुक्तिमुक्ति जयाच्या कामारी । रिद्धि सिद्धि
वोळगती द्वारीं । सुदर्शन घरटी करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥ २ ॥
जगज्जननी असे वामभागीं । भीमकी शोभली अर्धांगीं । जैसी विद्युल्लता झळके
मेघीं । दर्शनें भंगीं महा दोष ॥ ३ ॥ सुखसागर परमानंदु । गोपी गोपाळां
गोधनां छंदु । पक्षिश्वापदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥ ४ ॥
मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहन गरुडध्वजा । तुका म्हणे स्वामी माझा । पावे
भक्तकाजा लवलाहीं ॥ ५ ॥
७२७. हातींचें न संडावें देवें । शरण आलों
जीवें भावें । आपलें ऐसें म्हणावें । करितों जीवें निंबलोण ॥ १ ॥ बैसतां
संतांचे संगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणीच नव्हती । निश्चय चित्तीं
दृढ झाला ॥ २ ॥ येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठीं
रुचि ठेवूनि गोड । देखत नाड कळतसे ॥ ३ ॥ मरती मेलीं नेणों किती । हाचि लाभ
तयाचे संगती । म्हणोनि येतों काकुलती । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥ ४ ॥
सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण
तुमचे ते ॥ ५ ॥ आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी
नष्टचि पतित । तुका म्हणे मज संत हांसती ॥ ६ ॥
७२८. आतां येणें बळें
पंढरिनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहतां न कळे जयाचा अंत । तोचि हृदयांत
घालूं आतां ॥ १ ॥ विसरोनि आपला देहपणभाव । नामेंचि भुलविला पंढरीराव । न
विचारी याती कुळ ठाव । लागावया पाव संतांचे ॥ २ ॥ बरें वर्म आलें आमुचिया
हातां । हिंडावें धुंडावें न लगतां । होय अविनाश साहाकारी दाता । चतुर्भुज
सत्ता परि धाके ॥ ३ ॥ होय आवडी साना थोर । रूप सुंदर मनोहर । भक्तिप्रिय
लोभापर । करी आदर याचकपणें ॥ ४ ॥ तें वर्म आलें आमुच्या हाता । म्हणोनि शरण
रिघालों संतां । तुका म्हणे पंढरिनाथा । न सोडीं आतां जीवें भावें ॥ ५ ॥
७२९.
आइक पांडुरंगा एक मात । कांहीं बोलणें आहे एकांत । आम्हां जरी तारील संचित
। तरी उचित काय तुझें ॥ १ ॥ उसणें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल
जन । काय गा मिरवूनी भूषण । वांयां थोरपण जनामध्यें ॥ २ ॥ अन्न जरी न मिळे
तयासी देणें । अगांतुक पात्र उचित दान । उपकार तरी धन्वंतरीपणें । जरी
देणें घेणें नाहीं आशा ॥ ३ ॥ शूर तो तयासी बोलिजे जाणा । पाठीसी घालूनी
राखे दीना । पार पुण्या नाहीं त्या भूषणा । ऐक नारायणा वचन हें ॥ ४ ॥ आतां
पुढें बोलणें तें कांहीं । मज तारिसील तरीच सहि । वचन आपुलें सिद्धी नेई ।
तुका म्हणे तईं मज कळसी ॥ ५ ॥
७३०. चांगला तरी पूर्ण काम । गोड तरी
याचेंचि नाम । दयाळू तरी अवघा धर्म । भला तरी दासां श्रम होऊं नेदी ॥ १ ॥
उदार तरी लक्ष्मीयेसी । जुंझार तरी कळिकाळासी । चतुर तरी गुणांचीच रासी ।
जाणता तयासी तोचि एक ॥ २ ॥ जुनाट तरी बहुकाळा । न कळे जयाची लीळा । नेणता
गोवळीं गोवळा । लाघवी अबळा भुलवणा ॥ ३ ॥ गांढ्या तरी भावाचा अंकित । बराडी
तरी उच्छिष्टाची प्रीत । ओंगळ तरी कुब्जेशीं रत । भ्याड अनंत बहु पापा ॥ ४ ॥
खेळ तो येणेंचि खेळावा । नट तो येणेंचि आवगावा । लपोनि जीवीं न कळे जीवा ।
धरितां देवा नातुडसी ॥ ५ ॥ उंच तरी बहुतचि उंच । नीच तरी बहुतचि नीच ।
तुका म्हणे बोलिलों साच । नाहीं आहाच पूजा केली ॥ ६ ॥
७३१. काय आम्ही
भक्ति करणें कैसी । काय एक वाहावें तुम्हांसी । अवघा भरोनी उरलासी । वाणीं
खाणीं रसीं रूपीं गंधीं ॥ १ ॥ कैसें करूं इंद्रियां बंधन । पुण्यपापाचें
खंडण । काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥ २ ॥ काय डोळे
झांकुनियां पाहो । मंत्र जप काय ध्यावो । कवणे ठायीं धरूनि भाव । काय तें
वाव तुजविण ॥ ३ ॥ काय हिंडो कवण दिशा । कवणे ठायीं पाय ठेवू कैसा । काय तूं
नव्हेसी नकळे ऐसा । काय मी कैसा पाहों आतां ॥ ४ ॥ तुझिया नामाची सकळ ।
पूजा अर्चन मंत्र माळ । धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । वाहूं पुष्पांजुळ तुका
म्हणे ॥ ५ ॥
७३२. शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार ।
शरीर दुर्गंधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥ १ ॥ शरीर उत्तम चांगलें ।
शरीर सुखाचें घोसुलें । शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रह्म ॥
२ ॥ शरीर विटाळाचें आळें । मायामोहपाश जाळें । पतन शरीराच्या मुळें । शरीर
काळें व्यापिलें ॥ ३ ॥ शरीर सकळही शुद्ध । शरीर विधींचाही निध । शरीरें
तुटे भवबंध । वसे मध्यभागीं देव शरीरा ॥ ४ ॥ शरीर अविद्येचा बांधा । शरीर
अवगुणांचा रांधा । शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुधा एक शरीरीं ॥ ५ ॥
शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावें सुख न करीं त्याग । शरीर वोखटें ना चांग
। तुका म्हणे वेग करीं हरिभजनीं ॥ ६
७३३. इतुले करी भलत्या परी ।
परद्रव्य परनारी । सांडुनी अभिलाष अंतरीं । वर्ते व्यवहारीं सुखरूप ॥ १ ॥ न
करीं दंभाचा सायास । शांती राहे बहुवस । जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं
आळस रामनामीं ॥ २ ॥ जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा । संग न
धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥ ३ ॥ करिसी देवाविण आस । अवघी होईल
निरास । तृष्णा वाढविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥ ४ ॥ धरूनी विश्वास
करीं धीर । करितां देव हाचि निर्धार । तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर
तुका म्हणे ॥ ५ ॥
७३४. संसारसिंधु हा दुस्तर । नुल्लंघवे
उल्लंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगेचि तीर पैल थडी ॥ १ ॥ किती
जन्म झाला फेरा। गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवर्ती भोंवरा । बहु थोरा
वोळसिया ॥ २ ॥ वाढलों परि नेणती बुद्धि । नाहीं परतली धरिली शुद्धि । मग
म्यां विचारावें कधीं । ऐसी संधि सांडूनियां ॥ ३ ॥ अनेक खाणी आहार निद्रा ।
भयमैथुनाचाचि थारा । बालत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥ ४ ॥
ऐसीं उल्लंघूनी आलों स्थळें । बहु या भोवंडिलों काळें । आतां हें उगवावें
जाळें । उजेडावें बळें दिवसाच्या ॥ ५ ॥ सांडो या संसाराची वाट । बहु येणें
भोगविले कष्ट । दावी सत्या ऐसें नष्ट । तुका म्हणे भ्रष्ट झालों देवद्रोही ॥
६ ॥
७३५. विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल
पुंडलिकापासीं । कृपादानासीं उदार ॥ १ ॥ विठ्ठल स्मरणा कोंवळा । विठ्ठल
गौरवी आगळा । आधार ब्रह्मांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥ २ ॥ उभाचि परि न
मनी सीण । नाहीं उद्धरितां भिन्न । समर्थाचे घरीं एकचि अन्न । आर्तभूता
क्षणोक्षणा सांभाळी ॥ ३ ॥ रुचीचे प्रकार । आणिताती आदरें । कोठेंही न पडे
अंतर । थोरासी थोर धाकुट्या धाकुटा ॥ ४ ॥ करितां बळ धरितां नये । झोंबतां
डोळा मनच होय । आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥ ५ ॥ पान्हा तरी
आल्या अंतर तेथें । तों नाहीं भरिलें रितें । करितों सेवन आइतें । तुका
म्हणे चित्तें चित्त मेळवूनी ॥ ६ ॥
७३६. ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगाऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥ १ ॥ न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेचीच खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधि ॥ २ ॥ रामकृष्ण ध्यान वामननरसिंही । उग्र आणि सौम्य कांहींच नाहीं । सांपडे भरलीये बाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥ ३ ॥ गुणगंभीर चतुर सुजाण । शूर धीर उदार नारायण । व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहन लावण्य हें ॥ ४ ॥ ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार । अनंत आणि अपरंपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥ ५ ॥ जयाची वाणी सुमनमाळा । परमामृतजिव्हाळा । अनंता अंगी अनंत कळा । तुका जवळा चरणसेवक ॥ ६ ॥
No comments:
Post a Comment