श्री तुकोबाराय यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन करणारे अभंग
श्री तुकोबारायांवर सद्गुरू कृपा (अभंग संख्या ४)
४७९.
सत्यगुरुरायें कृपा मज केली । परि नाहीं घडली सेवा कांहीं ॥ १ ॥ सांपडविलें
वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥ २ ॥ भोजना मागती तूप
पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥ ३ ॥ काय कळे उपजला अंतराय । म्हणोनियां
काय त्वरा झाली ॥ ४ ॥ राघवचैतन्य कैशवचैतन्य । सांगितली खूण माळिकेची ॥ ५ ॥
बाबाजी आपुलें सांगितले नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥ ६ ॥ माहो शुद्ध
दशमी पाहुनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥ ७ ॥
४८०. माझिये
मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुरावो ॥ १ ॥ आवडीचा मंत्र सांगितला
सोपा । जेणें नोहे गुंफा कांहीं कोठे ॥ २ ॥ जाती पुढें एक उतरले पार । हा
भवसागर साधुसंत ॥ ३ ॥ जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे
पेटे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरु पांडुरंग ॥ ५ ॥
४८१.
घालूनियां भार राहिलों निश्चिंती । निरविलें संतीं विठोबासी ॥ १ ॥
लावूनियां हात कुरवाळिली माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ २ ॥ कटीं कर
समचरण साजिरे । राहिला भीवरेतीरीं उभा ॥ ३ ॥ खुंटले सायास आणीक या जीवा ।
धरिले केशवा पाय तुझे ॥ ४ ॥ तुज वाटे आतां तें करीं अनंता । तुका म्हणे
संतां लाज माझी ॥ ५ ॥
४८२. माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासी
उदार झालों आता ॥ १ ॥ तुजविण दुजें न धरी आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥
२ ॥ ठायींचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संतीं ॥ ३ ॥ जीवभाव
तुझ्या ठेवियेला पायीं । हेचि आतां नाहीं लाज तुम्हां ॥ ४ ॥ तुका म्हणे
संती घातला हवाला । न सोडीं विठ्ठला पाय तुझे ॥५ ॥
श्री तुकोबाराय यांस कवित्व करण्याविषयीं दृष्टांत (अभंग संख्या २)
४८३.
नामदेवें केले स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥ १ ॥
सांगितले काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ २ ॥ माप टाकी सळे
धरिली विठ्ठलें । थापटोनी केलें सावधान ॥ ३ ॥ प्रमाणाची संख्या सांगे शत
कोटी । उरले ते शेवटी लावी तुका ॥ ४ ॥
४८४. द्याल ठाव तरी राहेन
संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥ १ ॥ आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां
उदासीन न धरावें ॥ २ ॥ शेवटील स्थळ नीच माझी वृत्ति । आधारे विश्रांती
पावईन ॥ ३ ॥ नामदेवापायीं तुकया स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥
४ ॥
कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार (अभंग संख्या १९)
४८५. भूतबाधा आम्हां घरीं । हे तो आश्चर्य गा हरी ॥ १ ॥ झाला भक्तीचा कळस । आले वसतीस दोष ॥ २ ॥ जागरणाचें फळ । दिली जोडोनी तळमळ ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । आहाच कळों आली सेवा ॥ ४ ॥
४८६. करूं कवित्व आतां काय नाहीं लाज । मज
भक्तराज हांसतील ॥ १ ॥ आतां आला एका निवाड्याचा दिस । सत्याविण रस विरसला ॥
२ ॥ अनुभवाविण कोण करी पाप । रितेचि संकल्प लाज लावी ॥ ३ ॥ तुका म्हणे
आतां न धरवे धीर । नव्हे जीव स्थिर माझा मज ॥ ४ ॥
४८७. पावावे संतोष
। तुम्हीं यासाठीं सायास ॥ १ ॥ करीं आवडीची वचनें । पालटूनी क्षणक्षणे ॥ २
॥ द्यावें अभयदान । भमी न पडावें वचन ॥ ३ ॥ तुका म्हणे परस्परें । कांहीं
वाढवीं उत्तरें ॥ ४ ॥
४८८. कांहींच न लगे आदि अवसान । बहुत कठिण
दिसतसां ॥ १ ॥ अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ति । न चलेसी यक्ति झाली पुढें ॥
२ ॥ बोलिलें वचन हारपले नभीं । उरलों तो उभीं आहों तैसीं ॥ ३ ॥ तुका म्हणे
कांहीं न करावेंसें झालें । थकितची ठेलें चित्त उगें ॥ ४ ॥
४८९.
केल्यापुरती आळी । कांहीं होते टाळाटाळी ॥ १ ॥ सत्यसंकल्पाचें फळ । होतां न
दिसेचि बळ ॥ २ ॥ दळणाच्या ओव्या । रित्या खड्या मापें घ्याव्या ॥ ३ ॥
जातीं उखळे चाटूं । तुका म्हणे राज्य घाटूं ॥ ४ ॥
४९०. स्तुति तरी
काय करूं कोणापाशीं । कीर्ति तरी कैसी वाखाणावी ॥ १ ॥ खोट्या तंव नाहीं
अनुवादाचें काम । उरला तो भ्रम वरी बरा ॥ २ ॥ म्हणवावें त्याची खूण नाहीं
हातीं । अवकळा फजिती सावकाश ॥ ३ ॥ तुका म्हणे हें गे तुमचे माझें तोंड ।
होऊनियां लंड आळवितों ॥ ४ ॥
४९१. मागितल्यास पसरी कर । पळतां भरी
वाखती ॥ १ ॥ काय आम्हीं नेणों वर्म । केला श्रम नेणतां ॥ २ ॥ बोलतां बरें
येतां रागा । कठीणा लागा मागे मागें ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें बोली । असे
चाली उफराटी ॥ ४ ॥
४९२. कशासाठी बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट
डांगोरा हा ॥ १ ॥ काय आलें एका जीवाच्या उद्धारें। पावशी उच्चारें काय हो
तें ॥ २ ॥ नेदी पट्ट परी अन्नें तो न मारी । आपुलिये थोरीसाठीं राजा ॥ ३ ॥
तुका म्हणे आतां अव्हेरिलें तरी । मग कोण करी दुकान हा ॥ ४ ॥
४९३.
सांगा दास नोहें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनी ॥ १ ॥ कोणासाठीं
केली प्रपंचाची होळी । या पायां वेगळी मायबापा ॥ २ ॥ नसेल तों द्यावा
सत्यत्वासी धीर । नये भाजूं हीर उफराटे ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां आहिक्य
परत्रीं । नाहीं कुळगोत्रीं तुजविण ॥ ४ ॥
४९४. असो तुझें तुजपाशीं ।
आम्हां त्यासी काय चाड ॥ १ ॥ विरोधें कां कोंडूं मन । समाधान असोनी ॥ २ ॥
करावा तो उरे आट । खटपट वाढतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे येउनि रागा । कां मी
विभागा मुकेन ॥ ४ ॥
४९५. अनन्यासी ठाव एक सर्वकाज । एकाविण दुजें
नेणें चित्त ॥ १ ॥ न पुरतां आळी देशधडी व्हावें । हे काय बरवें दिसतसे ॥ २ ॥
लेंकराचा भार माउलीचें शिरीं । निढळ तें दुरी धरिलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे
किती घातली लांबणी । समर्थ होऊनि केवढ्यासाठीं ॥ ४ ॥
४९६. आहे तेंचि
पुढे पाहों । बरें आहों येथेंचि ॥ १ ॥ काय वाढवूनी काम । उगाच श्रम
तृष्णेचा ॥ २ ॥ स्थिरावतां ओघीं बरें। चाली पुरें पडेना ॥ ३ ॥ तुका म्हणे
वळितां मन । आम्हां क्षण न लगे ॥ ४ ॥
४९७. नाहीं जों वेचलों
जिवाचिया त्यागें । तोवरी वाउगें काय बोलों ॥ १ ॥ जाणवलें आतां करीं ये
उद्देश । जोडी किंवा नाश तुमची जीवें ॥ २ ॥ ठायींचेंचि आलें होतें ऐसें मना
। जावें ऐसें वना दृढ झालें ॥ ३ ॥ तुका म्हणे मग वेचीन उत्तरें ।
उद्देशिलें खरें झाल्यावरी ॥ ४ ॥
४९८. कांही मागणे हे आम्हां अनुचित
। वडिलांची रीत जाणतसों ॥ १ ॥ देह तुच्छ झालें सकळ उपाधी । सेवेपाशीं
बुद्धि राहिलीसे ॥ २ ॥ शब्द ताे उपाधि अचळ निश्चय । अनुभव हा काय नाहीं
अंगीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देह फांकिला विभागीं । उपकार अंगी उरविला ॥ ४ ॥
४९९.
माझा मज नाहीं । आला उबग तो काहीं ॥ १ ॥ तुमच्या नामाचें जतन । नव्हतां
थोर वाटे सीण ॥ २ ॥ न पडावी निंदा । कानीं स्वामीची गोविंदा ॥ ३ ॥ तुका
म्हणे लाज । आम्हां स्वामीचे तें काज ॥ ४ ॥
५००. बोलतां वचन असा
पाठमोरे । मज भाव बरे कळों आले ॥ १ ॥ मागितलें नये अरुचीनें हातां । नाहीं
वरी सत्ता आदराची ॥ २ ॥ समाधानासाठीं लाविलासे कान । चोरलेंसे मन दिसतसां ॥
३ ॥ तुका म्हणे आम्हां तुमचेचि फंद । वरदळ छंद कळों येती ॥ ४ ॥
५०१.
रूपीं गोवियेलें चित्त । पायीं राहिलें निश्चिंत ॥ १ ॥ तुम्ही देवा अवघेचि
गोमटे । मुख देखतां दुःख न भेटे ॥ २ ॥ झाली इंद्रियां विश्रांति । भ्रमतां
पीडित होती ॥ ३ ॥ तुका म्हणे भेटी । सुटली भवबंदाची गांठीं ॥ ४ ॥
५०२.
नोहे तुम्हां जरी । येवढे कारण मुरारी ॥ १ ॥ मग जैसा तसा काळ । दाट सारावा
पातळ ॥ २ ॥ स्वामीचें तें सांडे । पुत्र होतां काळतोंडें ॥ ३ ॥ शब्दा
नाहीं रुची । मग कोठे तुका वेंची ॥ ४ ॥
५०३. नाहीं आइकत तुम्ही माझे
बोल । कासया हे फोल उपणूं भूस ॥ १ ॥ येसी ते करीन बैसलिया ठाया । तूंचि
बुझावया जवळी देवा ॥ २ ॥ करावे ते केले सकळ उपाय । आतां पाहो काय अझुनी ॥ ३
॥ तुका म्हणे आला आज्ञेसी शेवट । होऊनियां नीट पायां पडें ॥ ४ ॥
इंद्रायणीच्या उदकांतून अभंग कोरडे काढले त्याबद्दल देवास दिलेल्या श्रमाची क्षमा-याचना व परिहार (अभंग संख्या ८)
५०४.
थोर अन्याय केला । तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोला । साठीं चित्त
क्षोभविलें ॥ १ ॥ भागविलासी केला सीण । अधम मी यातीहीन । झांकूनी लोचन ।
दिवस तेरा राहिलों ॥ २ ॥ अवघें घालूनियां कोडें । तहानभुकेचें सांकडें ।
योगक्षेम पुढें । तुज करणें लागलें ॥ ३ ॥ उदकीं राखिलें कागद । चुकविला
जनवाद । तुका म्हणे ब्रीद । साच केलें आपुलें ॥ ४ ॥
५०५. तेरा दिवस
झाले निश्चक्र करितां । न पवसी अनंता मायबापा ॥ १ ॥ पाषाणाची खोळ घेउनि
बैसलासी । काय हृषीकेशी झालें तुज ॥ २ ॥ तुजवरी आतां प्राण मी त्यजीन ।
हत्या मी घालीन पांडुरंगा ॥ ३ ॥ फार विठाबाई धरिली तुझी आस । करिन जीवा नाश
पांडुरंगा ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां मांडिले निर्वाण । प्राण हा सांडीन
तुजवरी ॥ ५ ॥
५०६. नव्हती आली सीसा सुरी । अथवा घाय पाठीवरी । तों
म्या केला हरी । एवढा तुम्हां आकांत ॥ १ ॥ वांटिलासी दोहीं ठायीं । मजपाशीं
आणि डोहीं । लागों दिला नाहीं । येथें तेथें आघात ॥ २ ॥ जीव घेती मायबापें
। थोड्या अन्यायाच्या कोपें । हें तो नव्हे सोपें । साहों त्वांचि
जाणितलें ॥ ३ ॥ तुका म्हणे कृपावंता। तुज ऐसा नाही दाता । काय वाणूं आतां ।
वाणी माझी खुंटली ॥ ४ ॥
५०७. कापो कोणी माझी मान । सुखें पीडोत
दुर्जन । तुज हाेय सीण । तें मी न करीं सर्वथा ॥ १ ॥ चुकी झाली एकवेळा ।
मजपासूनी चांडाळा । उभे करोनियां जळा । माजी वह्या राखविल्या ॥ २ ॥ नाही
केला हा विचार । माझा कोण अधिकार । समर्थासी भार । न कळे कैसा घालावा ॥ ३ ॥
गेलें होऊनियां मागें । नये बोलों तें वाउगें । पुढिलिया प्रसंगें । तुका
म्हणे जाणावें ॥ ४ ॥
५०८. तूं कृपाळू माउली । आम्हां दीनाची साउली ।
न संवरित आली । बाळवेषें जवळी ॥ १ ॥ माझें केलें समाधान । रूप गोजिरें
सगुण। निवविलें मन । आलिंगन देऊनी ॥ २ ॥ कृपा केली जना हातीं । पायीं ठाव
दिला संतीं । कळों नये चित्तीं । दुःख कैसें आहे तें ॥ ३ ॥ तुका म्हणे मी
अन्यायी । क्षमा करी वो माझे आई। आतां पुढे काई । तुज घालू सांकडें ॥ ४ ॥
५०९.
काय जाणे मी पामर । पांडुरंगा तुझा पार । धरिलीया धीर । काय एक न करिसी ॥ १
॥ उतावीळ झालों आधीं । मतिमंद हीन बुद्धि । परि तूं कृपानिधि । नाहीं केला
अव्हेर ॥ २ ॥ तूं देवाचाही देव । अवघ्या ब्रह्मांडाचा जीव । आम्हां दासा
कींव । कां भाकणें लागली ॥ ३ ॥ तुका म्हणे विश्वंभरा । मी तों पतितचि खरा ।
अन्याय दुसरा । दारी धरणे बैसलों ॥ ४ ॥
५१०. तूं माउलीहून मायाळ ।
चंद्राहूनी शीतळ । पाणियाहूनी पातळ । कल्लोळ प्रेमाचा ॥ १ ॥ देऊं काशाची
उपमा । दुजी तुज पुरुषोत्तमा । ओंवाळूनी नामा । तुझ्यावरूनी टाकिलों ॥२ ॥
तुवां केलें रे अमृता । गोड त्याही तूं परता। पांचां तत्त्वांचा जनिता ।
सकळ सत्तानायक ॥३ ॥ कांहीं न बोलोनी आतां । उगाच चरणी ठवितों माथा । तुका
म्हणे पंढरिनाथा । क्षमा करी अपराध ॥ ४ ॥
५११. मी अवगुणी अन्यायी । किती म्हणोन सांगों काई । आतां मज पायीं । ठाव देईं विठ्ठले ॥ १ ॥ पुरे पुरे हा संसार । कर्म बळिवंत दुस्तर । राहों नेदी स्थिर । एके ठायीं निश्चळ ॥ २ ॥ अनेक बुद्धीचे तरंग । क्षणक्षणा पालटती रंग । धरूं जातां संग । तंव तो होतो साधक ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । अवघी तोडी माझी चिंता । येऊनी पंढरीनाथा । वास करी हृदयीं ॥ ४ ॥
श्री ज्ञानेश्वर महाराजांनी एका ब्राह्मण धरणेकऱ्यास श्री तुकोबारायांकडे पाठविले त्याविषयींचे अभंग (अभंग संख्या २)
५१२.
काय ज्ञानेश्वरीं उणें । तिहीं पाठविले धरणे ॥ ऐकोनियां लिखित । म्हूण
जाणविली हे मात ॥ २ ॥ जरी जाणे धणी । वदे सेवकाची वाणी ॥ ३ ॥ तुका म्हणे
ठेवा । होतां सांभाळावा देवा ॥ ४ ॥
५१३. ठेवूनियां डोई । पायीं
झालों उतराई ॥ १ ॥ कारण तें तम्ही जाणां । मी तराळ नारायणा ॥ २ ॥ प्रसंगी
वचन । दिले तेंचि खावें अन्न ॥ ३ ॥ तुका म्हणे भार । तुम्ही जाणां थोडा फार
॥ ४ ॥
धरणेकऱ्यास उपदेश (अभंग संख्या २९)
५१४. श्रीपंढरीशा
पतितपावना । एक विज्ञापना पायांपाशीं ॥ १ ॥ अनाथां जीवांचा तूं काजकैवारी ।
ऐसी चराचरी ब्रीदावळी ॥ २ ॥ न सांगतां कळे अंतरींचे गुज । आतां तुझी लाज
तुज देवा ॥ ३ ॥ आळिकर त्याचें करिसी समाधान । अभयाचे दान देऊनियां ॥ ४ ॥
तुका म्हणे तूंचि खेळे दोही ठायीं । नसेल तो देईं धीर मना ॥ ५ ॥
५१५.
अगा ये उदारा अगा विश्वंभरा । रखुमाईच्या वरा पांडुरंगा ॥ १ ॥ अगा
सर्वोत्तमा अगा कृष्णा रामा । अगा मेघश्यामा विश्वजनित्या ॥ २ ॥ अगा
कृपावंता जीवदान तूं दाता । अगा सर्वसत्ता धरतिया ॥ ३ ॥ अगा सर्वजाणा अगा
नारायणा । करुणावचना चित्त द्यावें ॥ ४ ॥ तुका म्हणे नाहीं अधिकार तैसी ।
सरती पायांपाशी केली मागें ॥ ५ ॥
५१६. नोहे दास खरा । परि हा झालासे
डांगोरा ॥ १ ॥ यासी काय करूं आतां । तूं हें सकळ जाणता ॥ २ ॥ नाहीं पुण्य
गाठी । जें हें वेचूं कोणासाठी ॥ ३ ॥ तुका म्हणे कां उपाधि । वाढाविली
कृपानिधि ॥ ४ ॥
५१७. तुजविण सत्ता । नाहीं वाचा वदविता ॥ १ ॥ ऐसे
आम्ही जाणों दास । म्हणोनी जालों उदास ॥ २ ॥ तुम्ही दिला धीर । तेणें मन
झाले स्थिर ॥ ३ ॥ तुका म्हणे आड । केले मी हे तुझें कोड ॥ ४ ॥
५१८.
काय मी जाणता । तुम्हाहूनी जी अनंता ॥ १ ॥ जो हा करूं अतिशय । कांहो
तुम्हां दया नये ॥ २ ॥ काय तुज नाहीं कृपा । विश्वाचिया मायबापा ॥ ३ ॥ तुका
म्हणे वाणी । माझी वदे तुम्हांहूनी ॥ ४ ॥
५१९. नको कांहीं पडो
ग्रंथाचिये भरी । शीघ्रवत करीं हेंचि एक ॥ १ ॥ देवाचिये चाडे आळवावे देवा ।
ओस देहभावा पाडोनियां ॥ २ ॥ साधने घालिती काळाचिये मुखीं । गर्भवास सेखीं न
चुकती ॥ ३ ॥ उधाराचा मोक्ष होय नोहे ऐसा । पतनाची इच्छा आवश्यक ॥ ४ ॥
रोकडी पातली अंगसंगें जरा । आतां उजगरा कोठवरी ॥ ५ ॥ तुका म्हणे घाली
नामासाठीं उडी । पांडुरंग थडी पाववील ॥ ६ ॥
५२०. नाहीं देवापाशी
मोक्षाचे गाठोळे । आणूनी निराळे द्यावें हातीं ॥ १ ॥ इंद्रियांचा जय
साधूनियां मन । निर्विषय कारण असे तेथें ॥ २ ॥ उपवास पारणी अक्षरांची आटी ।
सत्कर्मां शेवटी असे फळ ॥ ३ ॥ आदरें संकल्प वारी अतिशय । सहज तें काय दुःख
जाणे ॥ ४ ॥ स्वप्नींचिया घायें विवळसी वांयां । रडे रडतियासवें मिथ्या ॥ ५
॥ तुका म्हणे फळ आहे मूळापाशीं । शरण देवासी जाय वेगीं ॥ ६ ॥
५२१.
त्यजिलें भेटवी आणुनी वासना । दाविल्याचें जना काय काज ॥ १ ॥ आळवावें देवा
भाकूनी करुणा । आपुलिया मना साक्ष करी ॥ २ ॥ नाहीं यावें जावें दुरूनी लागत
। आहे साक्षभूत अंतरीचा ॥ ३ ॥ तुका म्हणे हा तो आहे कृपासिंधु । तोडी
भवबंधु तात्काळिक ॥ ४ ॥
५२२. गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥ १ ॥
मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ २॥ आनंदलें मन । प्रेमें पाझरती
लोचन ॥ ३ ॥ तुका म्हणे आळी । जीवें नुरेचि वेगळी ॥४ ॥
५२३. ज्याचें
जया ध्यान । तेंचि हाेय त्याचें मन ॥ १ ॥ म्हणऊनी अवघें सारा । पांडुरंग
दृढ धरा ॥ २ ॥ सम खुण ज्याचे पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥ ३ ॥ तुका म्हणे
नभा । परता आणूचाही गाभा ॥ ४ ॥
५२४. पाहूनियां ग्रंथ करावे कीर्तन ।
तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥ १ ॥ नाहीं तरी वांयां केली तोंडपिटी । उरी
ते शेवटी उरलीसे ॥ २ ॥ पढोनियां वेद हरिगुण गावे । ठावें तें जाणावें
तेव्हां जालें ॥ ३ ॥ तपतीर्थाटणे तेव्हां कार्यसिद्धि । स्थिर राहे बुद्धि
हरिच्या नामीं ॥ ४ ॥ यागयज्ञादिक काय दानधर्म । तरी फल नाम कंठीं राहे ॥ ५ ॥
तुका म्हणे नको काबाडाचे भरी । पडों सार धरी हेंचि एक ॥ ६ ॥
५२५.
सुखें खावें अन्न । त्याचे करावें चिंतन ॥ १ ॥ त्याचें दिलें त्यासी । पावे
फळ आपणासी ॥ २ ॥ आहे हा आधार । नाम त्याचे विश्वंभर ॥ ३ ॥ नाहीं रिता ठाव ।
तुका म्हणे पसरी भाव ॥ ४ ॥
५२६. संकोचोनी काय झालासी लहान । घेई
आपोशन ब्रह्मांडाचें ॥ १ ॥ करोनी पारणें आंचवू संसारा । उशीर उशीरा लावूं
नको ॥ २ ॥ घरकुलीने होता पडिला अंधार । तेणें केलें फार कासावीस ॥ ३ ॥
झुगारूनी दुरी लपविलें काखे । तुका म्हणे वाखें कौतुकाचें ॥ ४ ॥
५२७.
माझ्या बापें मज दिधले भातुकें । म्हणोनी कवतुकें क्रीडा करीं ॥ १ ॥ केली
आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हे गुण आले त्याचे ॥ २॥ घेऊनी विभाग जावें
लवलाह्या । आलेती त्या ठाया आपुलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्ञानदेवीं समुदाय ।
करावा मी पाय येईन वंदू ॥ ४ ॥
५२८. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ।
म्हणती ज्ञानदेव तुम्हांऐसें ॥ १ ॥ मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण
पायीं बरी ॥ २ ॥ ब्रह्मादिक जेथें तुम्हां वोळगणे । इतर तुळणे काय पुढे ॥ ३
॥ तुका म्हणे नेणें युक्तीची ते खोली । म्हणोनी ठेविली पायीं डोईं ॥ ४ ॥
५२९.
बोलिली लेकुरें । वेडी वांकुडी उत्तरें ॥ १ ॥ करा क्षमा अपराध । महाराज
तुम्ही सिद्ध ॥ २ ॥ नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥ ३ ॥ तुका म्हणे
ज्ञानेश्वरा । राखा पायापें किंकरा ॥ ४ ॥
५३०. काय तुम्ही जाणा ।
करूं अव्हेर नारायणा ॥ १ ॥ तरी या लटिक्याची ग्वाही । निवडिली दुसरे ठायीं ॥
२ ॥ कळों अंतरींचा गुण । नये फुटल्यावांचून ॥ ३ ॥ आणिलें अनुभवा । जनाच्या
हे ज्ञानदेवा ॥ ४ ॥ आणीक कोणी भिती । त्यांच्या चिंतने विश्रांति ॥ ५ ॥
तुका म्हणे बीज पोटीं । फळ तैसेंचि शेवटीं ॥ ६ ॥
५३१. अविश्वासीयाचे
शरीर सुतकी । विटाळ पातकी भेदवाहे ॥ १ ॥ काय त्याचा वेल जाईल मांडवा । होता
तैसा ठेवा आला पुढें ॥ २ ॥ मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळींचा
धाेंडा उभा ठाके ॥ ३ ॥ तुका म्हणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकीं जाणा खोटा
तैसा ॥ ४ ॥
५३२. तामसाची तपें पापाची शिदोरी । तमोगुणे भरी घातलेसे ॥
१ ॥ राज्यपदा आड सुखाची संपत्ति । उलंघूनि जाती निरयगांवा ॥ २ ॥ इंद्रिये
दमलीं इच्छा जीती जीवीं । नागविती ठावीं नाही पुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे
हरिभजनावांचून । करिती तो सीण पाहों नये ॥ ४ ॥
५३३. हरिकथेविण
इच्छिती स्वहित । हरिजन चित्त न घला तेथें ॥ १ ॥ जाईल भंगोन आपुला विश्वास ।
अवघिया नास कारणांचा ॥ २ ॥ ज्याचिया बैसावें भोजना पंगती । त्याचिया संगती
तैसें खावें ॥ ३ ॥ तुका म्हणे काय झालेती जाणते । देवाही परते थोर तुम्ही ॥
४ ॥
५३४. सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हूंतूपण कामा नये ॥
१ ॥ घेईल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्तें सांदीजेना ॥ २ ॥ खद्योतें
दावावी रवी केवीं वाट । आपुलें तें नीट उसंतावें ॥ ३ ॥ तुका म्हणे तो आहे
ज्ञानाचा सागर । परि नेदी अगर भिजों भेदें ॥४ ॥
५३५. जयाचिये द्वारी
सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥ १ ॥ करील तें काय नव्हे
महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥ २ ॥ जयाने घातली मुक्तीची गवांदी ।
मेळविली मांदी वैष्णवांची ॥ ३ ॥ तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे
समाधानें चित्ताचिया ॥ ४ ॥
५३६. बहुतां छंदांचे बहु असें जन । नये
वांटू मन त्यांच्या संगें ॥ १ ॥ करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस
आवडीचा ॥ २ ॥ सुखाची समाधि हरिकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥ ३ ॥
तुका म्हणे बुडे बांधोनी दगड । तेथ काय कोड धांवायाचें ॥ ४ ॥
५३७.
हरिकथे नाहीं । विश्वास ज्याचे ठायीं ॥ १ ॥ त्याची वाणी अमंगळ । कान
उंदराचें बीळ ॥ २ ॥ सांडूनी हा रस । कारिती आणीक सायास ॥ ३ ॥ तुका म्हणे
पिसीं । वांयां गेली किती ऐसीं ॥ ४ ॥
५३८. प्रेम अमृताची धार । वाहे
देवाचे समोर ॥ १ ॥ उर्ध्ववाहिनी हरिकथा । मुकुटमणि सकळां तीर्थां ॥ २ ॥
शिवाचे जीवन । जाळी महादोष कीर्तन ॥ ३ ॥ तुका म्हणे हरि । इची स्तुति वाणी
थोरी ॥ ४ ॥
५३९. आतां माझ्या मना । ईची घडो उपासना ॥ १ ॥ ऐसें करी
गा पांडुरंगा । प्रेम वोसंडेसें अंगा ॥ २ ॥ सर्व काळ नये । वाचे वीट आड भये
॥ ३ ॥ तुका वैष्णवांसंगती। हेंचि भोजनपंगती ॥ ४ ॥
५४०. उपास कराडी ।
तिहीं करावी बापुडी ॥ १ ॥ आम्ही विठोचे दास । चिंता झुगारिली आस ॥ २ ॥
भक्तिच्या उत्कर्षें । नाहीं मुक्तीचें तें पिसें ॥ ३ ॥ तुका म्हणे बळ ।
अंगी आमुच्या सकळ ॥ ४ ॥
५४१. करविली तैसी केली कटकट । वांकडें की
नीट देव जाणे ॥ १ ॥ कोणाकारणे हे झालेंसे निर्माण । देवाचे कारण देव जाणे ॥
२ ॥ तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा । घालुनी गोपाळा भार असें ॥ ३ ॥
५४२.
तुम्हीं येथें पाठविला धरणेकरी । त्याची झाली परी आइका ते ॥ १ ॥ आतां काय
पुढें वाढवूं विस्तार । झाला समाचार आइका तो ॥ २ ॥ देवाचें उचित एकादश अभंग
। महाफळ त्याग करूनी गेला ॥ ३ ॥ तुका म्हणे सेवा समर्पूनी पायीं । झालों
उतराई ठावें असो ॥ ४ ॥
काशी, गया इ. यात्रेस चाललेल्या यात्रिकांजवळ दिलेली पत्रे (अभंग संख्या ३)-
१) भागीरथीस पत्र
५४३. परिसे वाे माते माझी विनवणी । मस्तक चरणी ठेवितसें ॥ १ ॥ भागीरथीमहादोषनिवारणी । सकळां स्वामिणी तीर्थाचिये ॥ २ ॥ जितां भुक्ति मोक्ष मरणे तुझ्या तीरीं । अहिक्यपरत्रीं सुखरूप ॥ ३ ॥ तुका विष्णुदास संतांचें पोसणें । वाग्पुष्प तेणें पाठविलें ॥ ४ ॥
२) विश्वनाथांस पत्र
५४४. तुम्ही विश्वनाथ । दीन रंक मी अनाथ ॥ १ ॥ कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ २ ॥ काय उणे तुम्हांपाशीं । मी तो अल्पचि संतोषी ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥ ४ ॥
३) गयेस पत्र
५४५. पिंड पदावरी । दिला आपुलिये करीं ॥ १ ॥ माझें जाले गयावर्जन । फिटलें पितरांचे ऋण ॥ २ ॥ केलें कर्मांतर । बोंब मारिली हरिहर ॥ ३॥ तुका म्हणे माझें । भार उतरले ओझें ॥ ४ ॥
वारकरी पंढरीस चालले त्यावेळी देवास दिलेलें पत्र (अभंग संख्या ३६)
पत्रिकेचे अभंग
५४६.
तुम्ही संतजनीं । माझी करा विनवणी ॥ १ ॥ काय तुकयाचा अन्याय । त्यासी
अंतरले पाय ॥ २ ॥ भाका बहुतां रीती । माझी कींव काकुलती ॥ ३ ॥ न देखें
पंढरी । तुका चरण विटेवरी ॥ ४ ॥
५४७. येती वारकरी । वाट पाहातों
तोंवरी ॥ १ ॥ घालूनिया दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥ २ ॥ पत्र हातीं दिलें ।
तया तेथें पाठविलें ॥ ३ ॥ तुका म्हणे येती । जाईन सामोरा पुढती ॥ ४ ॥
५४८.
रुळे महाद्वारीं । पायांखालील पायरी ॥ १ ॥ तैसें माझें दंडवत । निरोप
सांगतील संत ॥ २ ॥ पडे दंडकाठी । देह भलतीसवा लोटी ॥ ३ ॥ तुका म्हणे बाळ ।
लोळे न धरितां सांभाळ ॥ ४ ॥
५४९. होईल कृपा दान । तरी मी येईन
धांवोन ॥ १ ॥ होतिल संतांचिया भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥ २ ॥ रिघेन
मातेपुढे । स्तनपान करीन कोडें ॥ ३ ॥ तुका म्हणे ताप । हरती देखोनियां बाप ॥
४ ॥
५५०. परिसोनी उत्तर । जाब देईजे सत्वर ॥ १ ॥ जरी तूं होसी
कृपावंत । तरी हा बोलावीं पतित ॥ २ ॥ नाणीं कांहीं मना । करूनी पापाचा
उगाणा ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं । काय शक्ति तुझे पायीं ॥ ४ ॥
५५१.
कोणा मुखें ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरिनाथ बोलावितो ॥ १ ॥ मग मी न
धरीं आस मागील बोभाट । वेगीं धरीन वाट माहेराची ॥ २ ॥ निलाजिरें चित्त करी
तळमळ । केधवां देखती मूळ आले डोळे ॥ ३ ॥ तुका म्हणे कई भाग्याची उजरी ।
होईल पंढरी देखावया ॥ ४ ॥
५५२. समर्पक वाणी । नाहीं ऐकिजेसी कानीं ॥
१ ॥ आतां भावें करूनी साचा । पायां पडिलों विठोबाच्या ॥ २ ॥ न कळे उचित ।
करूं समाधान चित्त ॥ ३ ॥ तुका म्हणे विनंती । विनविली धरा चित्तीं ॥ ४ ॥
५५३.
कैंचा मज धीर । कोठे बुद्धि माझी स्थिर ॥ १ ॥ जें या मनासीं आवरूं । आंत
पोटीं वाव धरूं ॥ २ ॥ कैंची शुद्ध मति । भांडवल असे हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे
अंगा । कोण दशा आली सांगा ॥ ४ ॥
५५४. पुढे तरी चित्ता । काय येईल
तें आतां ॥ १ ॥ मज सांगोनियां धाडी । वाट पहातों बराडी ॥ २ ॥ कंठी धरिला
प्राण । पायांपाशी आले मन ॥ ३ ॥ तुका म्हणे चिंता । बहु वाटतसे आतां ॥ ४ ॥
५५५.
धरितों वासना परि नये फळ । प्राप्तीचा ताे काळ नाही आला ॥ १ ॥ तळमळीं
चित्त घातलें खापरीं । फुटतसे परी लाहीचिया ॥ २ ॥ प्रकार ते काही नावडती
जिवा । नाहीं पुढे ठावा काळ हातीं ॥ ३ ॥ जातो तळा येतो मागुता लवकरी ।
वोळशाचे फेरी सांपडलों ॥४ ॥ तुका म्हणे बहु करितो विचार । उतरें डोंगर एक
चढें ॥ ५ ॥
५५६. कां माझे पंढरी न देखती डोळे । काय हें न कळे पाप
यांचें ॥ १ ॥ पाय पंथ कां हे न चलती वाट । कोण हें अदृष्ट कर्म बळी ॥ २ ॥
कां हें पायांवरी न पडे मस्तक । क्षेम कां हस्तक न पवती ॥ ३ ॥ कां या
इंद्रियांची न पुरे वासना । पवित्र होईना जिव्हां कीर्ति ॥ ४ ॥ तुका म्हणे
कईं जाऊनि मोटळे । पडेन हा लोळे महाद्वारीं ॥ ५ ॥
५५७. कीती करूं
शोक । पुढे वाढे दुःखें दुःख ॥ १ ॥ आतां जाणसी तें करीं । माझें कोण मनीं
धरी ॥ २ ॥ पुण्य होतें गांठी । तरी कां लागती हे आटी ॥ ३ ॥ तुका म्हणे बळ ।
माझी राहिली तळमळ ॥ ४ ॥
५५८. कां माझा विसर पडिला मायबापा ।
सांडियेली कृपा कोण्या गुणें ॥ १ ॥ कैसा कंठूनियां राहों संवसार । काय एक
धीर देऊं मना ॥ २ ॥ नाहीं निरोपाची पावली वारता । न करावी ते चिंता ऐसी
कांहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे एक वेंचूनि वचन । नाहीं समाधान केलें माझें ॥ ४ ॥
५५९.
कांहीं माझे कळों आले गुणदोष । म्हणऊनी उदास धरिलें ऐसें ॥ १ ॥ नाहीं तरी
येथे न घडे अनुचित । नाहीं ऐसी रीत तया घरी ॥ २ ॥ कळावें तें मना आपुलिया
सवें । ठायींचे हे घ्यावें विचारूनी ॥ ३ ॥ तुका म्हणे मज अव्हेरिलें देवें।
माझिया कर्तव्ये बुद्धीचिया ॥ ४ ॥
५६०. आतां पंथ पाहें माहेराची
वाट । कामाचा बोभाट पडो सुखें ॥ १ ॥ काय करूं आतां न गमेसें झालें । बहुत
सोसिलें बहु दिस ॥ २ ॥ घर लागे पाठी चित्ता उभे वारें । आपुलें तें झुरे
पहावया ॥ ३ ॥ तुका म्हणे जीव गेला तरी जावो । धरिला तो देव भाव शुद्ध ॥ ४ ॥
५६१.
विनविजे ऐसें भाग्य नाहीं देवा । पायांशी केशवा सलगी केली ॥ १ ॥ धीटपणे
पत्र लिहिले आवडी । पार नेणें थोडी मति माझी ॥ २ ॥ जेथें वेदा तुझा न कळेचि
पार । तेथें मी पामर काय वाणूं ॥ ३ ॥ जैसे तैसे माझे बोल अंगीकारी ।
बोबड्या उत्तरीं गौरवितों ॥ ४ ॥ तुका म्हणे विटेवरी जीं पाउलें । तेथें
म्यां ठेविलें मस्तक हें ॥ ५ ॥
५६२. देवाचिया देवा गोपिकांच्या पति ।
उदार हे ख्याति त्रिभुवनीं ॥ १ ॥ पातकांच्या रासी नासितोसी नामें । जळतील
कर्मे महादोष ॥ २ ॥ सर्व सुखें तुझ्या वोळगती पायीं । रिद्धि सिद्धि ठायीं
मुक्ति चारी ॥ ३ ॥ इंद्रासी दुर्लभ पाविजे तें पद । गीतीं गातां छंद वाहतां
टाळी ॥ ४ ॥ तुका म्हणे जड जीव शक्तिहीन । त्यांचे तूं जीवन पांडुरंगा ॥ ५ ॥
५६३.
काय झाले नेणों माझिया कपाळा । न देखिजे डोळां मूळ येतां ॥ १ ॥ बहु दिस
पाहें वचनाची वास । धरिलें उदास पांडुरंगा ॥ २ ॥ नाहीं निरोपाचे पावले
उत्तर । ऐसें तों निष्ठुर न पाहिजे ॥ ३ ॥ पडिला विसर किंवा कांहीं धंदा ।
याहूनी गोविंदा जरूरसा ॥ ४ ॥ तुका म्हणे आलें वेचाचें सांकडें । देणे घेणे
पुढे तोही धाक ॥ ५ ॥
५६४. कांहीं चिंतेविण । नाहीं उपजत सीण ॥ १ ॥
तरी हा पडिला विसर । माझा तुम्हां झाला भार ॥ २ ॥ आली कांहीं तुटी । गेली
सुटोनियां गांठी ॥ ३ ॥ तुका म्हणे घरी । बहु बैसले रिणकरी ॥ ४ ॥
५६५.
एवढा संकोच तरी कां व्यालासी । आम्ही कोणापाशीं तोंड वासूं ॥ १ ॥ कोण मज
पुसे सिणलें भागलें । जरी मोकलिलें तुम्ही देवा ॥ २ ॥ कवणाची वास पाहों
कोणीकडे । कोण मज ओढे जीवलग ॥ ३ ॥ कोण जाणे माझे जीवींचे सांकडें । उगवील
कोडें संकटाचें ॥ ४ ॥ तुका म्हणे तुम्ही देखिली निश्चिंती । काय माझे
चित्ती पांडुरंगा ॥ ५ ॥
५६६. काय पोरें झालीं फार । किंवा न साहे
करकर ॥ १ ॥ म्हणऊनी केली सांडी । घांस घेऊं न लाहे तोंडी ॥ २ ॥ करूं कलागती
। तुज भांडणें भोवतीं ॥ ३ ॥ तुका म्हणे टांचें । घरी झालेसे वरोचें ॥ ४ ॥
५६७.
जोडी कोणासाठीं । एवढी करितोसी आटी ॥ १ ॥ जरी हे आम्हां नाहीं सुख । रडों
पाेरें पोटीं भूक ॥ २ ॥ करूनी जतन । कोणा देसील हे धन ॥ ३ ॥ आमचे तळमळें ।
तुझें होईल वाटोळें ॥ ४ ॥ घेसील हा शाप । माझा होऊनिया बाप ॥ ५ ॥ तुका
म्हणे उरी । आतां न ठेवी यावरी ॥ ६ ॥
५६८. समर्थाचे पोटीं। आम्ही
जन्मलो करंटीं ॥ १ ॥ ऐसी झाली जगीं कीर्ति । तुझ्या नामाची फजिती ॥ २ ॥
येथें नाहीं खाया । न ये कोणी मूळ न्याया ॥ ३ ॥ तुका म्हणे जिणें । आतां
खाेटें जीवपणें ॥ ४ ॥
५६९. देईं डोळे भेटी न धरीं संकोच । न घालीं
कांहीं वेच तुजवरी ॥ १ ॥ तुज बुडवावे ऐसा कोण धर्म । अहर्निशीं नाम घेता
थोडें ॥ २ ॥ फार थोडें काहीं करूनी पातळ । त्याजमध्यें काळ कडे लावूं ॥ ३ ॥
आहे माझी तेचि सारीन शिदोरी । भार तुजवरी नेदीं माझा ॥ ४ ॥ तुका म्हणे
आम्हां लेकराची जाती । भेटावया खंती वाटतसे ॥ ५ ॥
५७०. करील आबाळी ।
माझ्या दांताची कसाळी ॥ १ ॥ जासी एखादा मरोन । पाठी लागेल हें जन ॥ २ ॥
घरीं लागें कळ । नाहीं जात तो शीतळ ॥ ३ ॥ तुका म्हणे पोरवडे । मज येतील
रोकडे ॥ ४ ॥
५७१. जोडीच्या हव्यासें । लागे धनाचेंचि पिसें ॥ १ ॥ मग
आणीक दुसरें । लोभ्या नावडती पोरें ॥ २ ॥ पाहे रुक्याकडे । मग अवघें ओस
पडे ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । तुला बहुताचा हेवा ॥ ४ ॥
५७२. शीण भाग
हरे तेथींच्या निरोपें । देखिलीया रूप उरी नुरे ॥ १ ॥ इंद्रियांची धांव
होईल कुंठित । पावेल हे चित्त समाधान ॥ २ ॥ माहेर आहेसें लौकिकीं कळावें ।
निढळ बरवें शोभा नेदी ॥ ३ ॥ आस नाहीं परि उरी बरी वाटे । आपलें तें भेटे
आपणासी ॥ ४ ॥ तुका म्हणे माझी अवीट आवडी । खंडणा तांतडी होऊं नेदी ॥ ५ ॥
५७३.
ऐकोनियां कीर्ति । ऐसी वाटती विश्रांति ॥ १ ॥ मातें सुख डोळां पडे । तेथें
कोण लाभ जोडे ॥ २ ॥ बोलतां ये वाचें । वीट नये जिव्हा नाचे ॥ ३ ॥ तुका
म्हणे धांवे । वासना ते रस घ्यावे ॥ ४ ॥
५७४. न बैससी खाली । सम
उभाच पाउलीं ॥ १ ॥ ऐसे झाले बहुत दिस । झाली युगे अठ्ठावीस ॥ २ ॥ नाहीं भाग
सीण । अराणूक एक क्षण ॥ ३ ॥ तुका म्हणे किती । मापें केलीं देती घेती ॥ ४ ॥
५७५.
मविलें मविती । नेणों रासी पडिल्या किती ॥ १ ॥ परि तूं धालाचि न धासी ।
आलें उभाउभीं घेसी ॥ २ ॥ अवघ्या अवघा काळ । वाटा वाहाती सकळ ॥ ३ ॥ तुका
म्हणे नाहीं । अराणूक तुज कांहीं ॥ ४ ॥
५७६. करूनी चाहाडी । अवघी
बुडवीन जोडी ॥ १ ॥ जरी तूं होऊनी उदास । माझी बुडविसी आस ॥ २ ॥ येथें न करी
काम । मुखें ने घें तुझे नाम ॥ ३ ॥ तुका म्हण कुळ । तुझें बुडवीन समूळ ॥ ४
॥
५७७. निरोपासी वेचें । काय बोलतां फुकाचें ॥ १ ॥ परि हें न
घेवेचि यश । भिऊं नको सुखी आस ॥ २ ॥ सुख समाधानें । कोण पाहे देणें घेणें ॥
३ ॥ न लगे निरोपासी मोल । तुका म्हणे वेचे बोल ॥ ४ ॥
५७८. नव्हे
धीर कांहीं पाठवूं निरोप । आला तरी कोप येऊं सुखें ॥ १ ॥ कोपोनियां तरी
देईल उत्तर । जैसे तैसें पर फिरावूनी ॥ २ ॥ नाही तया तरी काय एक पोर । मज
तों माहेर आणीक नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे असे तयामध्यें हित। आपण निवांत असों
नये ॥ ४ ॥
५७९. आतां आशीर्वाद । माझा असो सुखें नांद ॥ १ ॥ म्हणसी
कोणे तरी काळें । आहेतसी माझी बाळें ॥ २ ॥ दुरी दूरांतर । तरी घेसी समाचार ॥
३ ॥ नेसी कधी तरी । तुका म्हणे लाजे हरी ॥ ४ ॥
५८०. आतां हे शेवटीं
। माझी आईकावी गोष्टी ॥ १ ॥ आतां द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥ २ ॥
आतां करकर । पुढें न करीं उत्तर ॥ ३ ॥ तुका म्हणे ठसा । तुझा आहे राखें
तैसा ॥ ४ ॥
५८१. बोलिलों तें आतां । कांही जाणतां नेणतां ॥ १॥ क्षमा
करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥ २ ॥ स्तुति निंदा केली । लागे पाहिजे
साहिली ॥ ३ ॥ तुका म्हणे लाड । दिला तैसें पुरवा कोड ॥ ४ ॥
वारकरी परत येईपर्यंत मनाची स्थिति (अभंग संख्या १९)
५८२.
माहेरीचा काय येईल निरोप । म्हणऊनी झोप नाही डोळां ॥ १ ॥ वाट पाहें आस
धरूनियां जीवीं । निढळा हे ठेवीं वरी बाहे ॥ २ ॥ बोटावरी माप लेखितों दिवस ।
होतों कासावीस धीर नाहीं ॥ ३ ॥ काय नेणों संतां पडिला विसर । की नव्हे
सादर मायबाप ॥ ४ ॥ तुका म्हणे तेथें होईल दाटणी । कोण माझे आणी मना तेथें ॥
५ ॥
५८३. परि तो आहे कृपेचा सागर । तोंवरी अंतर पडों नेदी ॥ १ ॥
बहु कान दृष्टी आइके देखणा । पुरोनियां जना उरलासे ॥ २ ॥ सांगितल्याविणें
जाणें अंतरींचें । पुरवावें ज्याचें तैसें कोड ॥ ३ ॥ बहुमुखें कीर्ति
आइकिली कानीं । विश्वासही मनी आहे माझ्या ॥ ४ ॥ तुका म्हणे नाहीं जात
वायांविण । पाळितों वचन बोलिलों तें ॥ ५ ॥
५८४. यावरी न कळे संचित
आपुलें । कैसें वोढवले होईल पुढे ॥ १ ॥ करील विक्षेप धाडितां मुळासी ।
किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥ २ ॥ जोंवरी हे डोळा देखें वारकरी । तों हें
भरोवरी करी चित्त ॥ ३ ॥ आस वाढविते बुद्धीचे तरंग । चित्ताचे ते वेग वावडती
॥ ४ ॥ तुका म्हणे तेव्हां होतील निश्चळ । इंद्रियें सकळ निरोपानें ॥ ५ ॥
५८५.
होईल निरोप घेतला यावरी । राऊळाभीतरी जाऊनियां ॥ १ ॥ करूनियां दधिमंगळभोजन
। प्रयाण शकुन सुमुहूर्ते ॥ २ ॥ होतील दाटले सद्गदीत कंठीं । भरतें त्या
पोटीं वियोगाचें ॥ ३ ॥ येरयेरां भेटी क्षेम आळिंगनें । केली समाधानें होतीं
संतीं ॥ ४ ॥ तुका म्हणे चाली न साहे मनास । पाहाती ते कळस परतोनी ॥ ५ ॥
५८६.
ऐसी ते सांडिली होईल पंढरी । येत वारकरी होते वाटे ॥ १ ॥ देखिले सोहळे
होती आठवत । चालती ते मात करूनियां ॥ २ ॥ केली आइकिली होईल जे कथा ।
राहिलें तें चित्ता होईल प्रेम ॥ ३ ॥ गरुडटके टाळ मृदंग पताका । सांगताती
एकांएक सुख ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां येती लवलाहीं । आळिंगुनी बाहीं देईन
क्षेम ॥ ५ ॥
५८७. क्षेम मायबाप पुसेन हें आधी । न घाली हे मधीं सुख
दुःख ॥ १ ॥ न करी तांतडी आपणापासूनी । आइकेन कानीं सांगती ते ॥ २ ॥
अंतरींचें संत जाणतील गुज । निरोप तो मज सांगतील ॥ ३ ॥ पायांवरी डोई ठेवीन
आदरें । प्रीतिपडिभरें आळिंगून ॥ ४ ॥ तुका म्हणे काया करीन कुरवंडी ।
ओवाळून सांडी त्यांवरून ॥ ५ ॥
५८८. होईल माझी संती भाकिली करुणा ।
जे त्या नारायणा मनीं बैसे ॥ १ ॥ शृंगारूनी माझीं बोबडी उत्तरें । होतील
विस्तारें सांगितलीं ॥ २ ॥ क्षेम आहे ऐसें होईल सांगितलें । पाहिजे धाडिलें
शीघ्र मूळ ॥ ३ ॥ अवस्था जे माझी ठावी आहे संता । होईल कृपावंता निरोपिली ॥
४ ॥ तुका म्हणे सवें येईल मुऱ्हाळी । किंवा कांहीं उरी राखतील ॥५ ॥
५८९.
दोहींमध्ये एक घडेल विश्वासें । भातुके सरिसें मूळ तरी ॥ १ ॥ करिती निरास
निःशेष न घडे । कांहीं तरी ओढे चित्त माये ॥ २ ॥ लौकिकाची तरी धरितील लाज ।
काय माझ्या काज आचरणें ॥ ३ ॥ अथवा कोणाचें घेणे लागे रीण । नाहीं तरी हीन
कर्मीं कांहीं ॥ ४ ॥ व्यालीचिये अंगी असती वेदना । तुका म्हणे मना मन साक्ष
॥ ५ ॥
५९०. बैसतां कोणापें नाहीं समाधान । विवरे हें मन तेचि सोई ॥
१ ॥ घडीघडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥ २ ॥ न बोलावें ऐसा
करितों विचार । पडितो विसर प्रसंगी तो ॥ ३ ॥ इंद्रियांसी वाहो पडिली ते
चाली । होती विसांवली येचि ठायीं ॥ ४ ॥ एकसरें सोस माहेरासी जावें । तुका
म्हणे जीवें घेतलासे ॥ ५ ॥
५९१. नाहीं हानि परि न राहावे निसुर । न
पडे विसर काय करूं ॥ १ ॥ पुसाविसी वाटे मात कापडियां । पाठविती न्याया मूळ
मज ॥ २ ॥ आणीक या मना नावडे सोहळा । करिते टकळा माहेरीचा ॥ ३ ॥ बहु कामें
केलें बहु कासावीस । बहु झालें दिस भेटी नाहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे त्याचे न
कळे अंतर । अवस्था ते फार होते मज ॥ ५ ॥
५९२. तोवरी म्यां त्यास
कैसें निषेधावें । जो नाहीं बरवें कळों आलें ॥ १ ॥ कोणाचिया मुखें तंट
नाहीं मागें । वचन वाउगें बोलों नये ॥ २ ॥ दिसे हानि परी निरास न घडे । हे
तंव रोकडे अनुभव ॥ ३ ॥ आपुलिया भोगें होईल उशीर । तोंवरी कां धीर केला
नाहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे गोड करील शेवट । पाहिली ते वाट ठावी आहे ॥ ५ ॥
५९३.
माहेरींचें आलें तें मज माहेर । सुखाचे उत्तर करीन त्यासी ॥ १ ॥ पायांवरी
माथा आळिंगीन बाहीं । घेईन लवलाहीं पायवणी ॥ २ ॥ सुख समाचार पुसेन सकळ ।
कैसा पर्वकाळ आहे त्यास ॥ ३ ॥ आपुले जीवींचें सुखदुःख भावें । सांगेन आघवें
आहे तैसें ॥ ४ ॥ तुका म्हणे वीट नेघे आवडीचा । बोलिलीच वाचा बोलवीन ॥ ५ ॥
५९४.
वियोग न घडे सन्निध वसलें । अखंड राहिलें होय चित्तीं ॥ १ ॥ विसर न पडे
विकल्प न घडे । आलें तें आवडे तया पंथें ॥ २ ॥ कामाचा विसर नाठवे शरीर ।
रसना मधुर नेणे फिकें ॥ ३ ॥ निरोपासी काज असो अनामिक । निवडितां एक नये मज ॥
४ ॥ तुका म्हणे हित चित्तें ओढियेलें । जेथें तें उगलें जावें येणें ॥ ५ ॥
५९५.
आतां माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागलीसे ॥ १ ॥ सांगतील माझ्या
निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरीचा ॥ २ ॥ काय लाभ झाला काय हाेतें केणें
। काय काय कोणें सांठविले ॥ ३ ॥ मागणें तें काय धाडिलें भातुकें । पुसेन
तें सुखें आहेतसीं ॥ ४ ॥ तुका म्हणे काय सांगती ते कानीं । एकोनियां मनी
धरुनी राहें ॥ ५ ॥
५९६. काय करावें म्यां केले तें विचार । घडेल
साचार काय पाहों ॥ १ ॥ काय मन नाहीं धरीत आवडी । प्रारब्धे जोडी तेचि खरी ॥
२ ॥ काय म्यां तेथींचे रांधिले चाखोनी । तें हें करी मनी विवंचना ॥ ३ ॥
आणीकही त्यासी बहुत कारणें । बहु असे जिणे ओढीचेही ॥ ४ ॥ तुका म्हणे आम्हां
बोळविल्यावरी । परती माघारी केली नाहीं ॥ ५ ॥
५९७. आम्हां अराणूक
संवसारा हातीं । पडिली नव्हती आजीवरी ॥ १ ॥ पुत्रादाराधन होता मनीं धंदा |
गोवियेलों सदा होतों कामें ॥ २ ॥ वोढवलें ऐसे दिसतें कपाळ । राहिलें सकळ
आवरोनी ॥ ३ ॥ मागे पुढे कांहीं न दिसें पाहातां । येथूनियां चिंता उपजली ॥ ४
॥ तुका म्हणे वाट पाह्याचे कारण । येथींचिया हीन झाले भाग्य ॥ ५ ॥
५९८.
बहु दिस नाहीं माहेरीची भेटी । झाली होती तुटी व्यवसायें ॥ १ ॥ आपुलाल्या
होतो गुंतलों व्यासंगें। नाहीं त्या प्रसंगें आठवलें ॥ २ ॥ तोडिलें तुटतें
जडीतें जडलें । आहे तें आपुलें आपणापें ॥ ३ ॥ बहु निरोपाचे पावले उत्तर ।
जवळीच फार एक तेंही ॥ ४ ॥ काय जाणों मोह होईल सांडिला । बहु दिस तुटला तुका
म्हणे ॥ ५ ॥
५९९. होती नेणों झाली कठिणे कठीण । जवळीच मनें मन
ग्वाही ॥ १ ॥ आम्ही होतों सोई सांडिला मारग । घडिलें तें मग तिकूनही ॥ २ ॥
निश्चिंतीने होते पुढिलांची सांडी । न चले ते कोंडी मायबापा ॥ ३ ॥ आम्हां
नाही त्याचा घडला आठव । त्याचा बहु जीव विखुरला ॥ ४ ॥ तुका म्हणे झालें
धर्माचें माहेर । पडिलें अंतर आम्हांकूनी ॥ ५॥
६००. आतां करावा कां
सोस वायांविण । लटिकाचि सीण मनासी हा ॥ १ ॥ असेल तें कळों येईल लवकरी ।
आतां वारकरी आल्यापाठीं ॥ २ ॥ बहु विलंबाचें सन्निध पातले । धीराचें
राहिलें फळ पोटीं ॥ ३ ॥ चालिलें तें ठाव पावेल सेवटीं । पुरलिया तुटी
पाउलांची ॥ ४ ॥ तुका म्हणे आसे लागलासे जीव । म्हणऊनी कींव भाकीतसे ॥ ५ ॥
वारकरी परत आल्यानंतरचे अभंग (अभंग संख्या ११)
६०१.
भागलेती देवा । माझा नमस्कार घ्यावा ॥ १ ॥ तुम्ही क्षेम कीं सकळ । बाळ
अवघे गोपाळ ॥ २ ॥ मारगीं चालतां । श्रमलेती येतां जातां ॥ ३ ॥ तुका म्हणे
कांहीं । कृपा आहे माझ्या ठायीं ॥ ४ ॥
६०२. घालूनियां ज्योती । वाट
पाहें दिवसराती ॥ १ ॥ बहु उताविळ मन । तुमचें व्हावें दरुषण ॥ २ ॥ आलों
बोळवीत । तैसें याचि पंथें चित्त ॥ ३ ॥ तुका म्हणे पेणी । येतां जातां दिवस
गणीं ॥ ४ ॥
६०३. आजी दिवस धन्य । तुमचें झालें दर्शन ॥ १ ॥ सांगा
माहेरीची मात । अवघा विस्तारें वृत्तांत ॥ २ ॥ आइकतों मनें । करूनी सादर
श्रवण ॥ ३ ॥ तुका म्हणे नाम । माझा सकळ संभ्रम ॥ ४ ॥
६०४. बोलिलेती
काय । माझा बाप आणि माय ॥ १ ॥ ऐसें सांगा जी झडकरी । तुम्ही सखे वारकरी ॥ २
॥ पत्राचे वचन । काय दिलें फिरावून ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं । मना आणिलें
कीं नाहीं ॥ ४ ॥
६०५. काय पाठविलें । सांगा भातुकें विठ्ठलें ॥ १ ॥
आसे लागलासे जीव । काय केली माझी कीव ॥ २ ॥ फेडिलें मुडतर । किंवा कांहीं
जरजर ॥ ३ ॥ तुका म्हणे सांगा । कैसें आर्त पांडुरंगा ॥ ४ ॥
६०६.
आजीचिया लाभें ब्रह्मांड ठेंगणें । सुखी झालें मन कल्पवेना ॥ १ ॥ आर्तभूत
माझा जीव जयांसाठी । त्यांच्या झाल्या भेटी पायांसवें ॥ २ ॥ वाटुली पाहतां
सिणले नयन । बहु होतें मन आर्तभूत ॥ ३ ॥ माझ्या निरोपाचें आणिलें उत्तर ।
होईल समाचार सांगती तो ॥ ४ ॥ तुका म्हणे भेटी निवारला ताप । फळले संकल्प
संत आले ॥ ५ ॥
६०७. आजी बरवें झालें । माझें माहेर भेटले ॥ १ ॥
डोळां देखिले सज्जन । निवारला भाग सीण ॥ २ ॥ धन्य झालों आतां । क्षेम
देऊनियां संता ॥ ३ ॥ इच्छेचे पावलों । तुका म्हणे धन्य झालों ॥ ४ ॥
६०८.
वोरसोनि येती । वत्स धेनुवेचे चित्तीं ॥ १ ॥ माझा करावा सांभाळ ।
वोरसोनियां कृपाळ ॥ २ ॥ स्नेह भूक ताहान । विसरती झाले शीण ॥ ३ ॥ तुका
म्हणे कवतुकें । दिले प्रेमाचें भातुकें ॥ ४ ॥
६०९. आलें तें आधी
खाईन भातुकें । मग कवतुकें गाईन ओंव्या ॥ १ ॥ सांगितला आधीं आइको निरोप ।
होईल माझा बाप पुसे तो तें ॥ २ ॥ तुका म्हणे माझे सखे वारकरी । आलें हे
माहेरीहून आजि ॥ ३ ॥
६१० अमूप जोडल्या सुखाचिया रासी । पार त्या
भाग्यासी नाहीं आतां ॥ १ ॥ काय सांगों सुख झालें आलिंगनें । निवाली दर्शनें
कांति माझी ॥ २ ॥ तुका म्हणे यांच्या उपकारासाठी । नाहीं माझे गाठीं
कांहीं एक ॥ ३ ॥
६११. पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणीं
मस्तक हें ॥ १ ॥ जोडोनी हस्तक करीन विनवणी । घेईन पायवणी धोवोनियां ॥ २ ॥
तुका म्हणे माझे भांडवल सुचें । संतां हें ठायींचें ठावें आहे ॥ ३ ॥
अनघडसिद्धाच्या शब्देंकरून रामेश्वरभट्टास झालेला दाह ज्याने शमला तो अभंग (अभंग संख्या १)
६१२. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्रहि न खाती सर्प तया ॥ धृ. ॥ विष तें अमृत आघात तें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ २ ॥ दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्निज्वाळा ॥ ३ ॥ आवडेल जीवां जीवाचिये परी । सकळां अंतरीं एक भाव ॥ ४ ॥ तुका म्हणे कृपा केली नारायणें । जाणिजेते येणें अनुभवें ॥ ५ ॥
श्री तुकोबारायांच्या अभंगांतील त्यांचे नांव काढून सालोमालो यांनी आपले नांव घातले त्याबद्दल केलेला त्यांचा निषेध (अभंग संख्या ८)
६१३.
नाहीं घाटावें लागत । एका सितें कळे भात ॥ १ ॥ क्षीर निवडितें पाणी ।
चोंची हंसाचिये आणी ॥ २ ॥ आंगडे फाडुनि घोंगडे करीं । अवकळा तयापरी ॥ ३ ॥
तुका म्हणे कण । भुसीं निवडे कैंचा शीण ॥ ४ ॥
६१४. सालोमालो हरिचे
दास । म्हणउन केला अवघा नास ॥ १ ॥ अवघें बचमंगळ केलें । म्हणती एकाचें
आपुलें ॥ २ ॥ मोडूनी संतांची वचनें । करिती आपणां भूषणें ॥ ३ ॥ तुका म्हणे
कवी । जगामधीं रूढी दावी ॥ ४ ॥
६१५. कालवूनी विष । केला अमृताचा नास
॥ १ ॥ ऐशी अभाग्याची बुद्धि । सत्य लोपी नाहीं शुद्धि ॥ २ ॥ नाक कापुनि
लावी सोनें । कोण अळंकार लेणें ॥ ३ ॥ तुका म्हणे बावी । मोडूनि मदार
बांधावी ॥ ४ ॥
६१६. कण भुसाच्या आधारें । परि तें निवाडितां बरें ॥ १
॥ काय घोंगाणी पाधाणी । ताकामध्यें घाटी लोणी ॥ २ ॥ सुइणीपुढें चेटा । काय
लपविसी चाटा ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्ञान । दिमाखाची भणभण ॥ ४ ॥
६१७.
जायाचे अळंकार । बुडवूनी होती चोर ॥ १ ॥ त्यांसी ताडणाची पूजा । योग घडे
बऱ्या वोजा ॥ २ ॥ अभिळासाच्या सुखें । अंती होती काळी मुखें ॥ ३ ॥ तुका
म्हणे चोरा । होय भूषण मातेरा ॥ ४ ॥
६१८. विकाल तेथें विका । माती
नांव ठेवूनि बुका ॥ १ ॥ हा तो निवाड्याचा ठाव । खरा खोटा निवडे भाव ॥ २ ॥
गऱ्हवारे हा विधि । पोट वाढविलें चिंधीं ॥ ३ ॥ लावू जाणे विल्हे । तुका साच
आणि कल्हे ॥ ४ ॥
६१९. विषयी अद्वये । त्यासी आम्हां सिवों नये ॥ १ ॥
देव तेथूनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥ २ ॥ वासनेची बुंथी । तेथें कैंची
ब्रह्मस्थिति ॥ ३ ॥ तुका म्हणे असतां देहीं । तेथें नाहीं जमती ॥ ४ ॥
६२०.
नमितों या देवा । माझी एके ठायीं सेवा ॥ १ ॥ गुण अवगुण निवाडा । म्हैस
म्हैस रेडा रेडा ॥ २ ॥ जनीं जनार्दन । साक्ष त्यासी लोटांगण ॥ ३ ॥ तुका
म्हणे खडे । निवडूं दळणीं घडघडे ॥ ४ ॥
श्री तुकोबाराय यांचे चिंचवडचें मोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणिदेव यांचेबरोबर अनुभूतीदर्शक भाषण (अभंग संख्या ५)
६२१.
चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥ १ ॥ देव म्हणती
तुकया एवढी कैंची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ २ ॥ वाड वेळ जाला शिळें
जालें अन्न । तटस्थ ब्राह्मण बैसलेती ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा तुमच्या
सुकृतें । आणीन त्वरिते मोरयासी ॥ ४ ॥ (धृ. नाही)
६२२. वांझा गाई
दुभती । देवा ऐसी तुझी ख्याती ॥ १ ॥ ऐसें मागत नाहीं तुज । चरण दाखवावे मज ॥
२ ॥ चातक पाखरूं । त्यासी वर्षे मेघधारू ॥ ३ ॥ पक्षी राजहंस । अमोलिक
मोतीं त्यास ॥ ४ ॥ तुका म्हणे देवा । कां गा खोंचलासी जीवा ॥ ५ ॥
६२३.
भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुति घेतलिया ॥ १ ॥ भर्ता
आणि भोक्ता कर्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ २ ॥ विश्वंभर
कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत संतजणांची ॥ ३ ॥ कवळोकवळीं नाम
घ्यावें गोविंदाचें । भोजन भक्तांचें तुका म्हणे ॥ ४ ॥ (ध्र. नाही)
६२४.
माझा स्वामी भक्ताची वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥ १ ॥ तीर्थे
संत चरणी जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥ २ ॥ तुका म्हणे संत
देवादिका वंद्य । मी तों काय निंद्य हीन याती ॥ ३ ॥ (धृ.नाही)
६२५.
परतें मी आहे सहजचि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥ १ ॥ नलगे रुसावें
धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ २ ॥ पडिलिये ठायीं उच्छिष्ट सेवावें
। आर्त तेंचि देवें केलें ऐसें ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही आम्हां जी वेगळे ।
केले ते निराळे संत देवा ॥ ४ ॥
श्री तुकोबारायांचा धर्मपत्नीस उपदेश (अभंग संख्या ४)
६२६.
कोण येतें घरा आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥ १ ॥
देवासाठीं जालें ब्रह्मांड सोइरें । कोवळ्या उत्तरें काय वेंचे ॥ २ ॥ मानें
पाचारितां नव्हे अराणूक । ऐसे येति लोक प्रीतीसाठीं ॥ ३ ॥ तुका म्हणे
रांडे नावडे भूषण । कातेलें तें श्वान लागे पाठीं ॥ ४ ॥
६२७. देव
पहावया करीं वो सायास । न धरीं हे आस नाशिवंत ॥ धृ. ॥ दिन शुद्ध सोम सकाळीं
पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥ २ ॥ संता पाचारूनी शुद्ध करीं मन । देई वो
हें दान यथाविध ॥ ३ ॥ नको चिंता करूं वस्त्रा या पोटाची । माउली आमुची
पांडुरंग ॥ ४ ॥ तुका म्हणे दुरी सांगतों पाल्हाळीं । परी तो जवळी आहे
आम्हां ॥ ५ ॥
६२८. सुख हे नावडे आम्हां कोण्या बळें । नेणसी अंधळे
झालीशी तूं ॥ १ ॥ भूक ताहान कैसी राहिली निश्चळ । खुंटलें चपळ मन ठायीं ॥ २
॥ द्रव्य जीवाहूनी आवडे या जना । आम्हांसी पाषाणाहूनी हीन ॥ ३ ॥ सोइरे
सज्जन जन आणि वन । अवघें समान काय गुणें ॥ ४ ॥ तुका म्हणे आम्हां जवळीच आहे
। सुख दुःख साहे पांडुरंग ॥ ५ ॥
६२९. गुरुकृपे मज बोलविलें देवें ।
होईल हें घ्यावे हित कांहीं ॥ १ ॥ सत्य देवें माझा केला अंगीकार । आणिक
विचार नाही दुजा ॥ २ ॥ होई बळकट घालुनियां कास । हाचि उपदेश तुज आतां ॥ ३ ॥
सडा समार्जन तुळसी वृंदावन । अतीतपूजन वैष्णवांचें ॥ ४ ॥ वैष्णवांची दासी
होईं सर्वभावें । मुखीं नाम घ्यावें विठोबाचें ॥ ५ ॥ पूर्णबोध
स्त्रीभ्रतारसंवाद । धन्य जिहीं वाद आईकिला ॥ ६ ॥ तुका म्हणे आहे
पांडुरंगकथा । तरेल जो चित्ता धरील कोणी ॥ ७ ॥
छत्रपती शिवाजीराजे यांनी श्री तुकोबाराय यांच्यासाठी अबदागिरी, घोडा व नजराणा घेऊन कारकून पाठविले त्यावेळचे अभंग (अभंग संख्या ९)
६३०.
दिवट्या छत्री घोडे । हें तों बऱ्यांत न पडे ॥ १ ॥ आतां येथें पंढरिराया ।
मज गोविसी कासया ॥ २ ॥ मान दंभ चेष्टा । हे तो शूकराची विष्टा ॥ ३ ॥ तुका
म्हणे देवा । माझे सोडवणे धांवा ॥ ४ ॥
६३१. नावडे जें चित्ता ।
तेंचि होसी पुरविता ॥ १ ॥ कां रे पुरविली पाठी । माझी केली जीवें साठी ॥ २ ॥
न करावा संग । वाटे दुरवावें जग ॥ ३ ॥ सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ॥
४ ॥ जन तन धन । वाटे लेखावें वमन ॥ ५ ॥ तुका म्हणे सत्ता । हाती तुझ्या
पंढरिनाथा ॥ ६ ॥
६३२. काय दिला ठेवा । आम्हां विठ्ठलचि व्हावा ॥ १ ॥
तुम्ही कळलेती उदार । साटीं परिसाची गार ॥ २ ॥ जीव देतां तरी । वचना नये
येका सरी ॥ ३ ॥ गोमांसासमान । तुका म्हणे आम्हां धन ॥ ४ ॥
६३३.
मुंगी आणि राव । आम्हां सारखाची जीव ॥ १ ॥ गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा
फांसा ॥ २ ॥ सोने आणि माती । आम्हां समान हें चित्तीं ॥ ३ ॥ तुका म्हणे
आलें। घरा वैकुंठ सांवळे ॥ ४ ॥
६३४. जाणोनि अंतर । टाळिसील करकर ॥ १
॥ तुज लागली हे खोडी । पांडुरंगा बहु कुडी ॥ २ ॥ उठविसी दारी । धरणें
एखादिये परी ॥ ३ ॥ तुका म्हणे पाय । कैसे सोडीन तें पाहे ॥ ४ ॥
६३५.
नाहीं विचारीत । मेघ हगणदारी सेत ॥ १ ॥ नये पाहों त्याचा अंत । ठेवी
कारणापें चित्त ॥ २ ॥ वर्जीत गंगा । नाहीं उत्तम अधम जगा ॥ ३ ॥ तुका म्हणे
मळ । नाहीं अग्नीसी विटाळ ॥ ४ ॥
६३६. सोन्याचे पर्वत करवती पाषाण ।
अवघे रानोरान कल्पतरू ॥ १ ॥ परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न
सरती ॥ २ ॥ अमृतें सागर भरवती गंगा । म्हणवेल उगा राहे काळा ॥ ३ ॥
भूतभविष्य कळों येईल वर्तमान । करवती प्रसन्न ऋद्धिसिद्धी ॥ ४ ॥ ठानमान
कळों येती योग मुद्रा । नेववेल वारा ब्रह्मांडासी ॥ ५ ॥ तुका म्हणे मोक्ष
राहे ऐलीकडे । येर तें बापुडे काय तेथें ॥ ६ ॥
६३७. तिहीं
त्रिभुवनीं । आम्ही वैभवाचे धनी ॥ १ ॥ हातां आला घाव डाव । आमुचा मायबाप
देव ॥ २ ॥ काय त्रिभुवनीं बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥ ३ ॥ तुका म्हण सत्ता ।
अवघी आमुचीच आतां ॥ ४ ॥
६३८. आम्ही तेणें सुखी । म्हणा विठ्ठल
विठ्ठल मुखीं ॥ १ ॥ तुमचें येर वित्त धन । तें मज मृत्तिकेसमान ॥ २ ॥ कंठीं
मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ॥ ३ ॥ म्हणवा हरीचे दास । तुका म्हणे मज हे
आस ॥ ४ ॥
कीर्तनप्रसंगी परचक्रवेढा पडला त्यावेळचे अभंग (अभंग संख्या ३)
६३९.
न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होतें ॥ १ ॥ काय तुम्ही
येथें नसालसें जालें । आम्हीं न देखिलें पाहिजे हें ॥ २ ॥ परचक्र कोठें
हरिदासांच्या वासे । न देखिजे तद्देशे राहातिया ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी
लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणे जालें ॥४ ॥
६४०. काय म्यां
मानावें हरिकथेचें फळ । तरिजे सकळ जनी ऐसें ॥ १ ॥ उच्छेद तो असे हा गे
आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ॥ २ ॥ पापाविण नाहीं पाप येत पुढें ।
साक्षीसी रोकडें साक्ष आलें ॥ ३ ॥ तुका म्हणे जेथें वसतील दास । तेथें तुझा
वास कैसा आतां ॥ ४ ॥
६४१. भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःख होतें जनां न देखवे ॥ १ ॥ आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुम्ही दातारा नेणां ऐसी ॥ २ ॥ भजनीं विक्षेप तेंचि पैं मरण । न वजावा तो क्षण एक वायां ॥ ३ ॥ तुका म्हणे नाही आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ॥ ४ ॥
लोहगांवीं कीर्तनात मेलेले मूल जिवंत होण्याविषयी देवापाशीं करुणा (अभंग संख्या १)
६४२. अशक्य तें तुम्हां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥ १ ॥ मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥ २॥ थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे । म्हणवितों दास काय थोडे ॥ ३ ॥ तुका म्हणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे समर्थाचे ॥ ४ ॥
लोहगांवीं तुकोबारायांच्या अंगावर ऊन पाणी घातलें त्यावेळीं देवापाशीं करुणा (अभंग संख्या १)
६४३. जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा ॥ १ ॥ पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें ॥ २ ॥ फुटोनियां दोन्ही भाग होऊ पाहे । पाहातोसी काय हृदय माझें ॥ ३ ॥ घेऊनी जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें कांहीं न चले येथें ॥ ४ ॥ तुका म्हणे माझी तूं होसी जननी । आणीक निर्वाणीं कोण राखे ॥ ५ ॥
विषयसुखप्राप्त्यर्थ एक स्त्री तुकोबारायांकडे पाठविली गेली त्यावेळचे अभंग (अभंग संख्या २)
६४४.
पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचेंचि ॥ १ ॥ जाईं वो तूं
माते न करी सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥ २ ॥ न साहावे मज तुझें
हे पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी
काय नर थोडे जाले ॥ ४ ॥
६४५. स्त्रियांचा तो संग नको नारायणा ।
काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥ १ ॥ नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन
आवरेना ॥ २ ॥ दृष्टिमुखें मरण इंद्रियांच्या द्वारें । लावण्य तें खरे
दुःखमूळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु । तरी पडे बाधूं संघष्टणें ॥
४ ॥
आपणांस वैराग्य कसे झाले याविषयी तुकोबारायांचे संतांशी व देवाशी भाषण (अभंग संख्या ३)
६४६. याती शूद्र वैश्य केला वेवसाव । आधीं तो हा देव कुळपूज्य ॥ १ ॥ नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुम्हीं संतीं ॥ २ ॥ संवसारें जालों अतिदुःखें दुःखी । मायबापें सेखीं क्रमिलिया ॥ ३ ॥ दुष्काळें आटिलें द्रव्य नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥ ४ ॥ लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाव देखें तुटी येतां ॥ ५ ॥ देवाचे देऊळ होतें जें भंगलें । चित्तासी तें आलें करावेंसें ॥ ६ ॥ आरंभीं कीर्तन करी एकादशीं । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥ ७ ॥ कांहीं पाठ केलीं संतांची उत्तरें। विश्वास आदरें करोनियां ॥ ८ ॥ गाती पुढें त्याचें धरावें ध्रुपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥ ९ ॥ संतांचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥ १० ॥ ठाकला तो कांहीं केला परउपकार । केले हें शरीर कष्टवूनी ॥ ११ ॥ वचनें मानिलीं नाहीं सुहृदांचीं । समूळ प्रपंचीं वीट आला ॥ १२ ॥ सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥ १३ ॥ मानियेला स्वप्नीं गुरुचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥ १४ ॥ यावरी या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिलें चित्तीं विठोबाचे ॥ १५ ॥ निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखवलें ॥ १६ ॥ बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणे समाधान ॥ १७ ॥ विस्तारी सांगतां बहुत प्रकार । हाईल उशीर आतां पुरे ॥ १८ ॥ आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥ १९ ॥ भक्तां नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥ २० ॥ तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ॥ २१ ॥
६४७.
ऐका वचन हें संत । मी तो आगळा पतित । काय काजें प्रीत । करीतसां आदरें ॥ १
॥ माझें चित्त मज ग्वाही । सत्य तरलों मी नाहीं । एकाचिये वाहीं। एक देखीं
मानिती ॥ २ ॥ बहु पीडिलों संसारें । मोडी पिसें पिटीं ढोरें। न पडतां
पुरें । या विचारें राहिलों ॥ ३ ॥ सहज सरलें होतें कांहीं । द्रव्य थोडें
बहु तेंही। त्याग केला नाहीं । दिलें संता याचकां ॥ ४ ॥ प्रियापुत्रबंधु ।
यांचा तोडिला संबंधु । सहज जालों मंदु । भाग्यहीन करंटा ॥ ५ ॥ तोंड न
दाखवावें जना । शिरें सांदी भरें राना । एकांत तो जाणा । तयासाठी लागला ॥ ६
॥ पोटें पिटीले काहारें । दया नाहीं या विचारें । बोलावितां बरें। सहज
म्हणें यासाठीं ॥ ७ ॥ सहज वडिलां होती सेवा । म्हणोनि पूजितों या देवा ।
तुका म्हणे भावा - । साठी झणी घ्या कोणी ॥ ८ ॥
६४८. बरें जालें देवा
निघाले दिवाळे । बरी या दुष्काळें पीडा केली ॥ १ ॥ अनुतापें तुझें राहिलें
चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ २ ॥ बरें जालें देवा बाईल कर्कशा । बरी हे
दुर्दशा जनामध्यें ॥ ३ ॥ बरें जालें जगी पावलों अपमान । बरें गेलें धन
ढोरें गुरें ॥ ४ ॥ बरें जालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा ॥
५ ॥ बरें जालें तुझें केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं ॥ ६ ॥ तुका
म्हणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासीं जागरण ॥ ७ ॥
पक्षी दाणे टिपीत असतां आपणास पाहून उडाले, त्यामुळे श्री तुकोबाराय यांना खेद झाला, तो अभंग (अभंग संख्या १)
६४९. अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं ॥ १ ॥ विश्वास तो खरा मग । पांडुरंग कृपेचा ॥ २ ॥ माझी कोणी न धरूं शंका । ऐसें हो कां निर्द्वद्व ॥ ३ ॥ तुका म्हण जें जें भेटें । तें तें वाटे मी ऐसें ॥ ४ ॥
एका ब्रह्मचाऱ्याचा निषेध (अभंग संख्या ४)
६५०. काखे कडासन आड पडे । खडबड खडबड हुसकलें ॥ १ ॥ दाद करा दाद करा । फजितखोरा लाज नाहीं ॥ २ ॥ अवघा झाला राम राम । कोणी कर्म आचरेना ॥ ३ ॥ हरिदासांच्या पडती पायां । म्हणती तया नागवावें ॥ ४ ॥ दोहीं ठायीं फजित झाले । पारणे केलें अवकळा ॥ ५ ॥ तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जेणें ॥ ६ ॥ (धृ. नाही)
६५१. कुटुंबाचा केला त्याग । नाही राग जंव गेला ॥ १ ॥ भजन तें वोंगळवाणे । नरका जाणे चुकेना ॥ २ ॥ अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥ ३ ॥ तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्थळासी ॥ ४ ॥
६५२.
तारतिम वरि तोंडाच पुरतें । अंतरा हें येतें अंतरींचें ॥ १ ॥ ऐसी काय बरी
दिसे ठखाठकी । दिसतें लौकिकी सत्य ऐसें ॥ २ ॥ भोजनांत द्यावें विष कालवूनि ।
मोह चाळवणी मारावया ॥ ३ ॥ तुका म्हणे मैंद देखों नेदी कुडें । आदराचे पुढे
सोंग दावी ॥ ४ ॥
६५३. ब्रह्मनिष्ठ काडी । जरी जीवांनांवें मोडी ॥ १
॥ तया घडली गुरुहत्या । गेला उपदेश तो मिथ्या ॥ २ ॥ सांगितलें कानीं । रूप
आपुलें वाखाणी ॥ ३ ॥ भूतांच्या मत्सरें। ब्रह्मज्ञान नेलें चोरें ॥ ४ ॥
शिकल्या सांगे गोष्टी । भेद क्रोध वाहे पोटीं ॥ ५ ॥ निंदास्तुति स्तवनीं ।
तुका म्हणे वेंची वाणी ॥ ६ ॥
श्री तुकोबारायांस मंबाजी गोसावी याने मारले, त्याबद्दल देवाजवळ परिहार (अभंग संख्या ६)
६५४.
न सोडी न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥ धृ. ॥ भलतें जड पडो भारी । जीवावरी
आगोज ॥ २ ॥ शतखंड देह शस्त्रधारी । करितां परी न भीयें ॥ ३ ॥ तुका म्हणे
केली आधीं । दृढ बुद्धि सावध ॥ ४ ॥
६५५. बरवें बरवें । केलें विठोबा
बरवें ॥ धृ. ॥ पाहोनिया अंत क्षमा । अंगीं कांटी वरी मारविलें ॥ २ ॥
शिव्या गाळी नीत नाहीं । बहु फार विटंबिलें ॥ ३ ॥ तुका म्हणे क्रोधा हातीं ।
सोडवूनी घेतले रे ॥ ४ ॥
६५६. पावलों पावलों । देवा पावलों रे ॥ धृ. ॥
बरवें संचित होतें तैसें झालें रे । आतां काय बोलो रे ॥ २ ॥ सोज्वळ
कंटकवाटा । भावें करूं गेलों रे । तुका म्हणे करुनी वेगळा केलों रे ॥ ३ ॥
६५७.
कां होती कां होती । देवा एवढी फजिती ॥ धृ. ॥ मुळीं वर्म नसतों चुकलों ।
तो मी ऐसें चित्तीं ॥ २ ॥ होणार तें होऊनी गेलें। मिथ्या आतां खंती रे ॥ ३ ॥
तुका म्हणे पुरे आतां । दुर्जनाची संगती रे ॥ ४ ॥
६५८. सोडवा
सोडवा सोडवा अनंता । तुजविण ऐसा कोण दुजा प्राणदाता ॥ धृ. ॥ कोणा लाज नेणां
ऐसें । आणिका शरण आम्ही जातां ॥ २ ॥ तुका म्हणे सखया । माझ्या रखुमाईच्या
कांता ॥ ३ ॥
६५९. पुत्राची वार्ता । शुभ ऐके जेवीं माता ॥ १ ॥ तैसें
राहो माझें मन । गातां ऐकतां हरिगुण ॥ २ ॥ नादें लुब्ध झाला मृग । देह
विसरला अंग ॥ ३ ॥ तुका म्हणे पाहे । कासवीचे पिले माय ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment