पहाटेच्या प्रहरी देवाची आळवणी करणाऱ्या भुपाळ्या आणि देवाचे गुणवर्णन करणाऱ्या आरत्या.
भूपाळ्यांचे अभंग (अभंग संख्या २७)
४४३. करूनि विनवणी पायीं ठेवितो माथा । परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ॥ १ ॥ अखंडित असावेसे वाटतें पायीं । साहोनी संकोच ठाव थोडासा देईं ॥ २ ॥ असो नसो भाव आलों तुझिया ठाया । कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया ॥ ३ ॥ तुका म्हणे तुझीं आम्ही वेडी वाकुडी । नामें भवपाश हातें आपुल्या तोडी ॥ ४ ॥
४४४. माझे चित्त तुझे पायीं । राहे ऐसें करीं कांहीं । धरोनियां बाही । भव हा तारीं दातारा ॥ १ ॥ चतुरा तूं शिरोमणि । गुणलावण्याची खाणी । मुगुट सकळां मणि । धन्य तूंचि विठोबा ॥ २ ॥ करीं तिमिरांचा नाश । उदयो होऊनि प्रकाश । तोडीं आशापाश । करीं वास हृदयीं ॥ ३ ॥ पाहे गुंतलो नेणतां । माझी असाे तुम्हा चिंता । तुका ठेवी माथा । पायीं आतां राखावें ॥ ४ ॥
४४५. ऐसी वाट पाहें कांहीं निरोप कां मूळ । कांहो कळवळा तुम्हां उमटेचि ना ॥ १ ॥ आहो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनियां आसे चाळवूनी ठेविलें ॥ २ ॥ काय जन्मा येऊनियां केली म्या जोडी । ऐसें घडोघडी चित्ता येते आठवू ॥ ३ ॥ तुका म्हणे खरा न पवेचि विभाग । धिक्कारितें जग हेंचि लाहें हिशोबें ॥ ४ ॥
४४६. बालोनियां दाऊं कां तुम्हीं नेणा जी देवा । ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेन ॥ १ ॥ पांगुळलें मन कांहीं नाठवे उपाय । म्हणऊनी पाय जीवीं धरूनी राहिलों ॥ २ ॥ त्याग भोग दुःख काय सांडावें मांडावें । ऐसी धरियेली जीवें माझ्या थोर आशंका ॥ ३ ॥ तुका म्हणे माता बाळ चुकलिया वनीं । न पवतां जननी दुःख पावे विठ्ठले ॥ ४ ॥
४४७. कां गा किविलवाणा केलों दीनाचा दीन । काय तुझी हीन शक्ति जालीसे दिसे ॥ १॥ लाज येते मना तुझा म्हणवितां दास । गोडी नाहीं रस बोलिलीयासारिखी ॥ २ ॥ लाजविलीं मागें संतांची ही उत्तरें । कळों येते खरें दुजें एकावरूनी ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी कोणीं वदविली वाणी । प्रसादावांचूनी तुमचिया विठ्ठला ॥ ४ ॥
४४८. जळो माझें कर्म वायां केली कटकट । झाले तैसें तंट नाहीं आले अनुभवा ॥ १ ॥ आतां पुढें धीर काय देऊं या मना । ऐसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥ २ ॥ गुणवंत केलों दोष जाणायासाठीं । माझें माझें पोटीं बळकट दूषण ॥ ३ ॥ तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटीं ॥ ४ ॥
४४९. जळोत ती येथें उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥ १ ॥ आतां मज साह्य येथे करावें देवा । तुझी घेईं सेवा सकळ गोवा उगवूनी ॥ २ ॥ भीगें रोगा जोडोनियां दिले आणिकां । अरुचि ते हो कां आतां सकळांपासूनी ॥ ३ ॥ तुका म्हणे असो तुझें तुझे मस्तकीं । नाहीं ये लौकिकीं आतां मज वर्तणें ॥ ४ ॥
४५०. न सांगता तुम्हां कळों येतें अंतर । विश्वीं विश्वंभर परिहारचि नलगे ॥ १ ॥ परि हे अनावर आवरितां आवडी । अवसान ते घडी पुरों एकी देत नाहीं ॥ २ ॥ काय उणे मज येथें ठेविलिये ठायीं । पोटा आलों तईंपासूनियां समर्थे ॥ ३ ॥ तुका म्हणे अवघी आवरिली वासना । आतां नारायणा दुसरियापासूनी ॥ ४ ॥
४५१. तुजसवें आम्ही अनुसरलों अबळा । नको अंगी कळा राहों हरी हीन देऊं ॥ १ ॥ सासुरवासा भीतो जीव ओढे तुजपाशीं । आतां दोहींविशीं लज्जा राखें आमुची ॥ २ ॥ न कळतां संग झाला सहज खेळतां । प्रवर्तली चिंता मागिलाचि यावरी ॥ ३ ॥ तुका म्हणे असतां जैसे तैसें बरवें । वचन या भावें वेचूनिया विनटलों ॥ ४ ॥
४५२. कामें नेले चित्त नेदी अवलोकू मुख । बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय ॥ १ ॥ कां गा सासुरवासी मज केलें भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥ २ ॥ प्रभातेसी वाटे तुमच्या यावें दर्शना । येथें न चले चोरी उरली राहे वासना ॥ ३ ॥ येथे अवघे वांयां गेले दिसती सायास । तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा ॥ ४ ॥
४५३. तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् झालें जिणे माझे पंढरीराया ॥ १ ॥ काय गा विठोबा तुज आतां म्हणावें । शुभाशुभ गोड तुम्हां थोरांच्या दैवें ॥ २ ॥ संसाराचा धाक निरंतर आम्हांसी । मरण भलें परि काय अवकळा ऐसी ॥ ३ ॥ तुझा शरणागत शरण जाऊं आणिकांसी । तुका म्हणे लाज कवणा हे कां नेणसीं ॥ ४ ॥
४५४. झाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापलें डेरां चीकसा मर्दूद्या पाई ॥ १ ॥ उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनीं । उभ्या आंचवणा गोपिका कळस घेउनी ॥ २ ॥ अवघ्या सावचित्त सेवेलागीं सकळा । उद्धव अक्रूर आले पाचारूं मूळा ॥ ३ ॥ सावरिली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटी वाळा विडिया विनोदा ॥ ४ ॥ तुका विनंति करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळ जनां ॥ ५ ॥
४५५. उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥ १ ॥ करा जयजयकार वाद्यांचे गजर । मृदंग अपार टाळ घोळ ॥ २ ॥ जोडोनियां कर मुख पाहा सादर । पायांवरी शिर ठेवूनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे काय पढियें तें तें मागा । आपुलाले सांगा सुख दुःख ॥ ४ ॥
४५६. घडिया घालुनी तळीं चालती वनमाळी । उमटती कोवळीं कुंकुमाची ॥ १ ॥ वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेणें ॥ २ ॥ पैस धरूनी चाला ठाकत ठायी ठायीं । मौन्य धरूनी काही न बोलावें ॥ ३ ॥ तुका अवसरु जाणवितो पुढें । उघडली कवाडें महाल मंदिरें ॥ ४ ॥
४५७. भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होइल फळ धींर करावा ॥ १ ॥ न करी त्वरा ऐकें मात । क्षण एक निवांत बैसावें ॥ २ ॥ करूनियां मर्दन सारिलें पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥ ३ ॥ नेसला सोनसळा विनवी रखुमाई । वाढिलें आतां ठायीं चलावें जी ॥ ४ ॥ करूनियां भोजन घातलें आंचवण । आनंदें नारायण पहुडले ॥ ५ ॥ तुका मात जाणवी आतां । सकळां बहुतां होती चित्तीं ॥ ६ ॥
४५८. द्या जी आम्हां कांही सांगा जी रखुमाई । शेष उरलें तें ठायीं सनकादिकां ॥ १ ॥ टोकत बाहेरी बैसलों आशा । पुराया ग्रासा एकमेकां ॥ २ ॥ येथवरी आलों तुझिया नांवें । आस करूनी आम्ही दातारा ॥ ३ ॥ प्रेम देउनि बहुडा दिला । तुका म्हणे आतां विठ्ठल बोला ॥ ४ ॥
४५९. बहुडविले जन मन झाले निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥ १ ॥ पर्यंकी निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥ २ ॥ घेउनिया आलों हाती टाळ वीणा । सेवेसी चरणा स्वामीचिया ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां परिसावीं सादरें। बोबडी उत्तरें पांडुरंगा ॥ ४ ॥
४६०. नाचे गाणे माझा जवळील ठाव । निरोपीन भाव होईल तो ॥ १ ॥ तुम्हां निद्रा मज आज्ञा ते स्वभावें । उतरूनी जिवे जाइन लोण ॥ २ ॥ एकाएकीं बहु करीन सुस्वरें । मधुर उत्तरें आवडीने ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं जगदानी उदार । फेडशील भार एक वेळे ॥ ४ ॥
४६१. पावला प्रसाद आतां उठोनी जावें । आपुलाले श्रम कळों येताती भावें ॥ १ ॥ आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ २ ॥ तुम्हांसी जागवू आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा ॥ ३ ॥ तुका म्हणे दिलें उच्छिष्टाचें भोजन । नाहीं निवडिलें आम्हां आपणा भिन्न ॥ ४ ॥
४६२. शब्दांचीया रत्ने करूनी अलंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥ १ ॥ भावाच्या उपचारे करूनी भोजन । तेणें नारायण जेवविला ॥ २ ॥ संवसारा हाती दिले आंचवण । मुखशुद्धी मन समर्पिलें ॥ ३ ॥ रंगली इंद्रिये सुरंग तांबुलें । माथां तुळसीदळ समर्पिलें ॥ ४ ॥ एकभावदीप करूनी निरांजन । देऊनी आसन देहाचें या ॥ ५ ॥ न बोलोनी तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥ ६ ॥
४६३. उठोनियां तुका गेला निजस्थळा । उरले राउळामाजी देव ॥ १ ॥ नेउल झालें सेवका स्वामीचें । आज्ञे करूनी चित्त समाधान ॥ २ ॥ पहुडले हरी अनंतशयनावरी । तेथें नाहीं उरी कांहीं काम ॥ ३ ॥ अवघियां बाहेर घालूनि गेला तुका । सांगितलें लोकां निजले देव ॥ ४ ॥
४६४. तुम्हीं जावे निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥ १ ॥ विठोबा लोभ असों देईं । आम्ही असों तुमचे पाईं ॥ २ ॥ चित्त करी सेवा । आम्ही जातों आपुल्या गांवा ॥ ३ ॥ तुका म्हणे दिशा भुललों । फिरोन पायापाशी आलों ॥ ४ ॥
४६५. पाहें प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥ १ ॥ शेष घेउनीं जाईन । तुमचे झालिया भोजन ॥ २ ॥ झालों एकसवा । तुम्हां आडूनियां देवा ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्त । करूनी राहिलों निश्चिंत ॥ ४ ॥
४६६. केली कटकट गाऊं नाचों नेणतां । लाज नाहीं भय आम्हां पोटाची चिंता ॥ १ ॥ बैसा सिणलेती पाय रगडूं दातारा । जाणवू द्या वारा उब झाली शरीरा ॥ २ ॥ उशीरा उशीर किती काय म्हणावा । जननिये बाळका कोप कांहीं न धरावा ॥ ३ ॥ तुझिये संगती आम्ही करूं कोल्हाळ । तुका म्हणे बाळें अवघे मिळोन गोपाळ ॥ ४ ॥
४६७. आरुष शब्द बोलों मनीं न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूंचि आमुची आई ॥ १ ॥ देईं गे विठाबाई प्रेमभातुकें । अवघियां कवतुकें लहानां थोरां सकळां ॥ २ ॥ सांनिया भीड धीटपणातें वाणी । घेतले पाहिजे केलें लेकुरें तें कानीं ॥ ३ ॥ तुका म्हणे थोड्यासाठीं काशाची अटी । झाली असे भेटी धुरेसंवसाटी ॥ ४ ॥
४६८. आड केलें देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥ १ ॥ आतां चला जाऊं घरा । नका करूं उजगरा ॥ २ ॥ देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥ ३ ॥ राग येतो देवा । तुका म्हणे नेघे सेवा ॥ ४ ॥
४६९. गाऊं नाचूं विठो तुझा करूं अनुवाद । जिकडे पाहें तिकडे सर्वमय गोविंद ॥ १ ॥ आनंद रे विठोबा झाला माझे मनीं । देखिलीं लोचनीं विटेसहित पाउलें ॥ २ ॥ न करी तपसाधन मुक्तीचे सायास । हाचि जन्मोजन्मीं गोड भक्तीचा रस ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां प्रेमा उणें तें काई । पंढरीचा राणा सांठविला हृदयीं ॥ ४ ॥
आरत्यांचे अभंग (अभंग संख्या ९)
४७०. कनकाच्या परियेळी उजळुनी आरती । रत्नदीपप्रभा कैशा पाजळल्या ज्योती ॥ १ ॥ ओंवाळूं गे माये सबाह्य साजिरा । राहिरखुमाई सत्यभामेच्या वरा ॥ २ ॥ मंडितचतुभुज दिव्य कानी कुंडले । श्रीमुखाची शोभा पाहता तेज फांकले ॥ ३ ॥ वैजयंती माळ गळां शाेभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधे शोभत ॥ ४ ॥ सांवळा सुकुमार जैसा कर्दळीगाभा । चरणींची नेपुरें वांकी गर्जती नभा ॥ ५ ॥ ओवाळितां मन हें उभें ठाकलें ठायीं । समदृष्टि समान तुकया लागला पायीं ॥ ६ ॥
४७१. जगदीश जगदीश तुज म्हणती । परि या जनामाजी असशील युक्ति । पुण्यपापाविरहित सकळां अधिपती । द्रष्टा परी नळणी अलिप्त गति ॥ १ ॥ जय देव जय देव जय पंढरीनाथा, श्रीपंढरीनाथा । नुरे पाप विठ्ठल म्हणतां सर्वथा ॥ २ ॥ आगम निगम तुज नेणती कोणी । परि तूं भाव भक्ति जवळीच दोन्ही। नेणतां विधियुक्त ईश्वरातें पूजनीं । न माये ब्रह्मांडीं तो संपुष्टासनीं ॥ ३ ॥ असुरां काळ भासे विक्राळ पुढें । पसरीं मुख एक चावितो धुडें । भक्ता शरणागता चालतो पुढें । दावी वाट जाऊं नेदी वांकुडें ॥ ४ ॥ एकाएकी बहु विस्तारला सुखें । खेळे त्याची लीला तोचि कवतुकें । तेथें हे नरनारी कवण बाळकें । काय पापपुण्य कवण सुखदुःखें ॥ ५ ॥ सकळ वर्मा तूंचि जाणशी एक । बद्ध मोक्ष प्राप्त आणि सुखदुःख । जाणों म्हणतां तुज ठकली बहुतेक । तुका म्हणे शरण आलों मज राख ॥ ६ ॥
४७२. दैत्यभारें पीडिली पृथ्वी बाळा । म्हणोनि तुज येणें झालें गोपाळा । भक्तिप्रतिपाळक उत्साव सोहळा । मंगळे तुज गाती अबळा बाळा ॥ १ ॥ जय देव जय देव जय गरुडध्वजा । आरती ओंवाळू तुज भक्तिकाजा ॥ २ ॥ गुण रूप नाम नाहीं जयासी । चिंतितांचि तैसा होसी तयांसी । मत्स्य कूर्म वराह नरसिंह झालासी । असुरां काळ मुनी ठाके ध्यानासी ॥ ३ ॥ सहस्र रूपें नाम सांवळा ना गोरा । श्रुति नेति म्हणती तुज विश्वंभरा । जीवना जीवन तूंचि होसी दातारा । न कळे पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥ ४ ॥ संतां महंतां घरी म्हणवी म्हणियारा । शंख चक्रगदाआयुधांचा भारा । सुदर्शन घरटीं फिरे अवसरा । सुकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥ ५ ॥ भावेंविण तुझें न घडे पूजन । सकळही गंगा झाल्या तुजपासून । उत्पत्ति प्रलय तूंचि करिसी पालन । धरूनि राहिला तुका निश्चयें चरण ॥ ६ ॥
४७३. काय तुझा महिमा वर्णूं मी किती । नाममात्रें भवपाश तुटती । पाहातां पाउलें हे विष्णुमूर्ती । कोटिकुळांसहित जडजीव उद्धरती ॥ १ ॥ जय देव जय देव जय पंढरिराया, श्रीपंढरिराया । करूनियां कुरुवंडी सांडीन काया ॥ २ ॥ मंगळआरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाहीं उपमा । श्रीमुखासहित देखे जा कर्मा - । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥ ३ ॥ धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी । विष्णूचे पूजन एकभावेंसी । नित्यमुक्त पूज्य तिहीं लोकांसी ॥ ४ ॥ न वजे वायां काळ जे तुज ध्याती । अखंड तुझा वास तयांच्या चित्तीं। धाले सुखें सदा प्रेमें डुल्लती । तीर्थे मलीन वास तयांचा पाहाती ॥ ५ ॥ देव भक्त तूंचि झालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ति हे जनीं । जड जीवां उद्धार व्हावया लागोनी । शरण तुका वंदी पाउले दोन्ही ॥ ६ ॥
४७४. पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिणवाहिनी । तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी । उतरलें वैकुंठमहासुख मेदिनी ॥ १ ॥ जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा । आरती ओवाळीन तुम्हां लक्ष्मीकांता ॥ २ ॥ नित्य नवा सोहळा हो महावाद्यांचे गजर । सन्मुख गरुडपारी उभा जोडुनियां कर । मंडितचतुर्भुज कटीं मिरवती कर ॥ ३ ॥ हरिनामकीर्तन हो आनंद महाद्वारीं । नाचती प्रेमसुखें नर तेथींच्या नारी । जीवन्मुक्त लोक नित्य पाहाती हरी ॥ ४ ॥ आषाढी कार्तिकी हो गरुडटकयांचे भार । गर्जती नामघोषें महावैष्णववीर । पापासी रीग नाहीं असुर कांपती सुर ॥ ५ ॥ हे सुख पुंडलिकें कैसें आणिलें बापें । निर्गुण साकारलें आम्हांलागी हें सोपें । म्हणोनि चरण धरोनी तुका राहिला सुखें ॥ ६ ॥
४७५. अवतार गोकुळीं हो जन तारावयासी । लावण्यरूपडें हे तेज:पुंजाळरासी। उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरां मही थोर मानसीं ॥ १ ॥ जय देवा कृष्णनाथा जय रुक्मिणीकांता । आरती ओवाळीन तुम्हां देवकीसुता । जय देवा कृष्णनाथा ॥ २ ॥ वसुदेवदेवकीची बंद फोडिली शाळ । होउनी विश्वजनिता तया पोटींचे बाळ । दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ । राज्यया उग्रसेना केला मथुरापाळ ॥ ३ ॥ राखतां गोधनें हो इंद्र कोपला भारी । मेघ जो कडाडिला शिळां वर्षतां धारी । राखिलें गोकुळ हें नखीं धरूनियां गिरी । निर्भय लोकपाळ अवतरले हरी ॥ ४ ॥ कवतुक पहावया माव ब्रह्मयानें केली । वत्सेहीं चाेरूनियां सत्यलोकासी नेलीं । गोपाळ गाईवत्से दोन्हीं ठायीं राखीली । सुखाचा प्रेमसिंधु अनाथांची माउली ॥ ५ ॥ तारिलें भक्तजना दैत्य निर्दाळूनि । पांडवां साहाकारी आडल्या निर्वाणीं । गुण मी काय वर्णूं मती येवढी वाणी । विनवितो दास तुका ठाव मागे चरणीं ॥ ६ ॥
४७६. सुंदर अंगकांती मुख भाळ सुरेख । बाणली उटी अंगी टिळा साजिरा रेख । मस्तकीं मुगुट कानीं कुंडलें तेज फांके । आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥ १ ॥ जय देवा चतुर्भुजा जय लावण्य तेजा । आरती ओंवाळीन भवतारि हा वोजा । जय० ॥ २ ॥ उदार जुंझार हा जया वाणिती श्रुति । परतल्या नेति म्हणती तयां न कळे गति । भाट हा चतुर्मुखें अनुवाद करिती । पांगली साही अठरा रूप न कळे गति ॥ ३ ॥ ऐकोनी रूप ऐसें तुजलागीं धुंडिती । बोडके नग्न एक निराहार यति । साधनें योग नाना तपें दारूण किती । सांडिले सुख दिले संसाराची त्या शांति ॥ ४ ॥ भरूनि माजी लोकां तिहीं नांदसी एक । कामिनीमनमोहना रूप नाम अनेक । नासती नाममात्रें भवपातकें शोक । पाउले वंदिताती सिद्ध आणि साधक ॥ ५ ॥ उपमा द्यावयासी दुजें काय हें तुज । तत्त्वासी तत्त्वसार मूळ झालासी बीज । खेळसी बाळलीला अवतार सहज । विनवितो दास तुका कर जोडुनी तुज ॥ ६ ॥
४७७. मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥ १ ॥ या संतासी निरवीं हेचि मज देईं। आणिक दुजें कांहीं न मागें तुज ॥ २ ॥ तुका म्हणे आतां उदार तूं होई । मज ठेवीं पायीं संतांचिया ॥ ३ ॥
४७८. करूनी आरती । आतां ओंवाळू श्रीपती ॥ १ ॥ आजी पुरले नवस । धन्य काळ हा दिवस ॥ २ ॥ पाहा वो सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा ॥ ३ ॥ तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment