श्री तुकोबाराय यांनी पांडुरंगाकडे केवळ भक्ती आणि प्रेमाची मागणी केली, त्याविषयीचे अभंग.
देवापाशीं मागणीचें अभंग (अभंग संख्या १४६)
१०६६.
अद्वैतीं तों नाहीं माझें समाधान । गोड हे चरण सेवा तुझी ॥ १ ॥ करूनी उचित
देईं हेंचि दान । आवडे कीर्तन नाम तुझें ॥ २ ॥ देवभक्तपण सुखाचा सोहळा ।
ठेवूनि निराळा दावी मज ॥ ३ ॥ तुका म्हणे आहे तुझें हें सकळ । कोण्या एका
काळें देई मज ॥ ४ ॥
१०६७. समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी
हरि वृत्ति राहो ॥ १ ॥ आणिक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझे आर्त नको देवा
॥ २ ॥ ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें चित्त झणीं जड़ों देसी ॥ ३ ॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥ ४ ॥
१०६८.
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्तीं । रखुमाईच्या पती सोयरिया ॥ १ ॥ गोड तुझें
रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्वकाळ ॥ २ ॥ विठो माउलिये हाचि वर
देई । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥ ३ ॥ तुका म्हणे कांहीं न मागे आणिक । तुझे
पायीं सुख सर्व आहे ॥ ४ ॥
१०६९. नामपाठ मुक्ताफळांच्या वोवणी । हें
सुख सगुणी अभीनव ॥ १ ॥ तरी आम्ही जालों उदास निर्गुणा । भक्तांचिया मना
मोक्ष नये ॥ २ ॥ द्यावें घ्यावें ऐसा येथें उरे भाव । काय ठाया ठाव
पुसोनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां अभयदान करा । म्हणा विश्वंभरा दिलें ऐसें ॥
४ ॥
१०७०. समर्थाचे सेवें कोठें नाहीं घात । पाहों नये अंत
पांडुरंगा ॥ १ ॥ आहे तैसी नीत विचारावी बरी । येऊनी भीतरी वास करा ॥ २ ॥
निढळ राखिलें तरी भयाभीत । हर्षामर्ष चित्त पावतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे तरी
कळेल निवाड । दर्शनाची चाड शुभकीर्ति ॥ ४ ॥
१०७१. वारंवार हाचि न
पडावा विसर । वसावें अंतर तुमच्या गुणीं ॥ १ ॥ इच्छेचा ये दाता तूं एक
समर्था । अगा कृपावंता मायबापा ॥ २ ॥ लाभाचिये वोढी उतावीळ मन । त्यापरि
चिंतन चरणाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवीं जीवन ओलावा । पांडुरंगे द्यावा शीघ्र
आतां ॥ ४ ॥
१०७२. पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव
होऊं देऊं ॥ १ ॥ जेथें तेथें देखें तुझींच पाउलें । त्रिभुवन संचलें
विठ्ठला गा ॥ २ ॥ भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशीं
देऊं ॥ ३ ॥ तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहुनि पाहीं वाड आहे ॥ ४ ॥
१०७३.
वाळूनियां जन सांडी मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं ॥ १ ॥ आठवीन पाय धरूनि
अनुताप । वाहे जळ झोप नाहीं डोळां ॥ २ ॥ नावडती जीवा आणीक प्रकार । आवडी
ते फार एकांताची ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसी धरितों वासना । होईं नारायणा साह्य
मज ॥ ४ ॥
१०७४. होईल तो भोग भोगीन आपुला । न घालीं विठ्ठला भार तुज ॥
१ ॥ तुम्हांपासाव हें इच्छीतसें दान । अंतरींचे ध्यान मुखीं नाम ॥ २ ॥
नयें काकुलती गर्भवासासाठीं । न धरीं हें पोटीं भय कांहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे
मज उदंड एवढें। नाचेन मी पुढें मायबापा ॥ ४ ॥
१०७५. कानडीनें केला
मर्हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका नये ॥ १ ॥ तैसें मज नको करूं कमळापती ।
देई या संगति सज्जनांची ॥ २ ॥ तिनें पाचारिलें इल बा म्हणोन । येरु पळे आण
झाली आतां ॥ ३ ॥ तुका म्हणे येरा येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे शीण
सुखा पोटी ॥ ४ ॥
१०७६. नाम आठवितां सद्गदित कंठीं । प्रेम वाढें
पोटीं ऐसें करीं ॥ १ ॥ रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्रीं । अष्टांग ही गात्रीं
प्रेम तुझें ॥२ ॥ सर्वही शरीर वेंचों या कीर्तनीं । गाऊं निशिदिनीं नाम
तुझें ॥ ३ ॥ तुका म्हणे दुजें न करीं कल्पांतीं । सर्वदा विश्रांति
संतांपायीं ॥ ४ ॥
१०७७. अनाथ परदेशी हीन दीन भोळें । उगलेंचि लोळे
तुझे रंगीं ॥ १ ॥ आपुलें म्हणावें मज नुपेक्षावें । प्रेमसुख द्यावें
मायबापा ॥ २ ॥ कासवीचे परी पाहे दृष्टीं मज । विज्ञानी उमज दावुनियां ॥ ३ ॥
तुका म्हणे तुझा झालों शरणागत । काया वाचा चित्त दुजें नाहीं ॥ ४ ॥
१०७८.
मागत्याची कोठें घडते निरास । लेंकरा उदास नाहीं होत ॥ १ ॥ कासया मी हौंऊं
उतावीळ जीवीं । जाणता गोसावी सर्व आहे ॥ २ ॥ झाला तरी वेळ कवतुकासाठीं ।
निर्दया तों पोटीं उपजेना ॥ ३ ॥ तुका म्हणे त्यासी ठाऊकें उचित । होईल
संकेत नेमियेला ॥ ४ ॥
१०७९. कां जी तुम्ही ऐसे नव्हा कृपावंत । निवे
माझें चित्त ठायींच्या ठायीं ॥ १ ॥ कांहीं शम नये विषम अंतरा । शांतीचा तो
बरा ऐसा योग ॥ २ ॥ दुःखी होतों पंचभूतांच्या विकारें । जडत्वें दातारें
दाखवीं तीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मोडा अहंकाराची मान । धरितों चरण म्हणऊनि ॥ ४ ॥
१०८०.
येतील अंतरी शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥ १ ॥ आतां माझा जीव
घेऊनियां बळी । बैसवावें ओळी संताचिये ॥ २ ॥ विस्तारिली वाचा फळेंविण वेल ।
कोरडेचि बोल फोस वांझे ॥ ३ ॥ तुका म्हणे आलों निर्वाणाचे वरी । राहों
नेदीं उरी नारायणा ॥ ४ ॥
१०८१. सांवळें सुंदर रूप मनोहर । राहो
निरंतर हृदयीं माझें ॥ १ ॥ आणिक कांहीं इच्छा आम्हां नाहीं चाड । तुझें नाम
गोड पांडुरंगा ॥ २ ॥ जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आम्हांसी सहज
द्यावें आतां ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज ऐसे जी दयाळ । धुंडितां सकळ नाहीं
आम्हां ॥ ४ ॥
१०८२. मोक्षाचें आम्हासी नाहीं अवघड । तो असे उघड
गांठोळीस ॥ १ ॥ भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशीं पुरवितां ॥ २ ॥
ज्याचें त्यासी देणे कोण तें उचित । मानूनियां हित घेतो सुखें ॥ ३ ॥ तुका
म्हणे सुखें देईं संवसार । आवडीसी थार करीं माझे ॥ ४ ॥
१०८३. पहा ते
पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥ १ ॥ प्रल्हादासी पिता करितो
जाचणी । परि तो स्मरे मनीं नारायण ॥ २ ॥ सुदामा ब्राह्मण दरिद्रे पीडिला ।
नाहीं विसरला पांडुरंगा ॥ ३ ॥ तुका म्हणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे
डोंगर झाले तरी ॥ ४ ॥ (धृ. नाही)
१०८४. नाही तुज कांहीं मागत
संपत्ती। आठवण चित्तीं असो द्यावी ॥ १ ॥ सरलिया भोग येईन सेवटीं । पायापें
या भेटी अनुसंधानें ॥ २ ॥ आतां मजसाठीं याल आकारास । रोकडी हे आस नाहीं
देवा ॥ ३ ॥ तुका म्हणे मुखीं असो तुझें नाम । देईल तो श्रम देवो काळ ॥ ४ ॥
१०८५.
डगमगी मन निराशेच्या गुणें । हें तों नारायणें शांतवीजे ॥ १ ॥ धीर तूं
गंभीर जीवन जगाचें । जळो विभागाचें अहाच ते ॥ २ ॥ भेईल जीव हें देखोनि कठिण
। केला जातो शीण तो तो वांयां ॥ ३ ॥ तुका म्हणे आवश्यक हें वचन ।
पाळावेंचि दान समयो आहे ॥ ४ ॥
१०८६. इच्छेपाशीं आलों फिरोनि मागुता ।
स्वामीसेवकता आवडीचे ॥ १ ॥ द्यावें लवकरी मागितलें दान । मुळींचें जतन
करुनी असें ॥ २ ॥ उपाय हे करी एकाचि वचना । दावूनिया खुणा ठाया येतों ॥ ३ ॥
तुका म्हणे गांठीं किती तुजपाशीं । जगाच्या तोडिसी चिंतनानें ॥ ४ ॥
१०८७.
काय करूं मज नागवलें आळसें । बहुत या सोसें पीडा केली ॥ १ ॥ हिरोनियां
नेला मुखींचा उच्चार । पाडिलें अंतर जवळीच ॥ २ ॥ द्वैताचिया कैसा सांपडलो
हातीं । बहूत करती ओढा ओढी ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां आपुलिया सवा । न्यावें मज
देवा सोडवूनी ॥ ४ ॥
१०८८. लडिवाळ म्हणोनी निष्ठुर न बोला । परी
सांभाळिला लागे घात ॥ १ ॥ बहु वागवीत आणिलें दुरूनी । दिसांची पोसणी बहु
आहे ॥ २ ॥ नाहीं लागों दिला आघाताचा वारा । निष्ठुर उत्तरा कोमेजेना ॥ ३ ॥
तुका म्हणे तुम्ही कृपावंत हरि । शांतवा उत्तरी अमृताच्या ॥ ४ ॥
१०८९.
जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देई प्रेमसुख ॥ १ ॥
देहभाव राखा दीन करूनियां। जनाचारी वांयां जाइ तैसा ॥ २ ॥ द्रव्य दारा नको
मानाची आवडी । कवणेविशीं गोडी प्रपंचाची ॥ ३ ॥ तुझें नाम माझें धरोनियां
चित्त । एकांत लोकांत संदा राहो ॥ ४ ॥ तुका म्हणे तुझे जडोनियां पायीं ।
झालों उतराई पांडुरंगा ॥ ५ ॥
१०९०. माझें हातीं आहे करावें चिंतन ।
तुम्हीं कृपादान प्रेम द्यावें ॥ १ ॥ मागतिया भांडवल आळवण । नामासी जतन
दातियासी ॥ २ ॥ बाळक धांवोनी आड रिघे स्तनीं । घालावा जननी प्रेमपान्हा ॥ ३
॥ तुका म्हणे करी कासवीचे परी । आहे सूत्रदोरी तुझे हातीं ॥ ४ ॥
१०९१.
समर्थ या नांवे दीनांचा कृपाळ । हें तव सकळ स्वामी अंगीं ॥ १ ॥ मज काय
लागे करणें विनवणी । विदित चरणीं सकळ आहे ॥ २ ॥ दयासिंधु तुम्हां भांडवल
दया । सिंचावें आतां या कृपामृतें ॥ ३ ॥ तुका म्हणे आहो पंढरीनिवासे ।
बहुजीव आसे लागतसे ॥ ४ ॥
१०९२. अमृताचीं फळें अमृताची वेली । तेचि
पुढें चाली बीजाचीही ॥ १ ॥ ऐसीयांचा संग देई नारायणा । बोलवा वचना जयाचिया ॥
२ ॥ उत्तम सेवन सीतळ कंठासी । पुष्ठ कांती तैसी दिसे वरी ॥ ३ ॥ तुका म्हणे
तैसे होईजेते संगें । वास लागे अंगे चंदनाच्या ॥ ४ ॥
१०९३. नर नारी
बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करी देवा ॥ १ ॥ नयो कामक्रोध द्वेष
निंदा द्वंद्व । अवघा गोविंद निःसंदेह ॥ २ ॥ असावें म्यां सदा विषयीं
विरक्त । काया वाचा चित्त तुझे पायीं ॥ ३ ॥ करोनिया साह्य पुरवी मनोरथ ।
व्हावें कृपावंत तुका म्हणे ॥ ४ ॥
१०९४. ऐसें सत्य माझें येईल अंतरा
। तरीच मज करा कृपा देवा ॥ १ ॥ वचनासारिखें तळमळें चित्त । बाहेरि तो आंत
होईल भाव ॥ २ ॥ तरीच मज ठाव द्यावा पायापाशीं । सत्यत्वें जाणसी दास खरा ॥ ३
॥ तुका म्हणे सत्य निकट सेवक । तरिच भातुकें प्रेम द्यावें ॥ ४ ॥
१०९५.
ऋणाच्या परिहारा जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥ १ ॥ जालों उतराई
शरीरसंकल्पें । चुकों द्यावीं पापें सकळहीं ॥ २ ॥ आजिवरी होतों धरूनि
जीवासी । व्याजें कांसाविसी बहु केलें ॥ ३ ॥ तुका म्हणे मना आणिला म्यां
भाव । तुमचा तेथें ठाव आहे देवा ॥ ४ ॥
१०९६. आवडी न पुरे सेवितां न
सरे । पडियेली धुरे सवें गांठीं ॥ १ ॥ न पुरे हा जन्म हें सुख साठितां ।
पुढतीही आतां हेंचि मागों ॥ २ ॥ मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं
उसंतितां कोस पेणी ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक
ताहान ॥ ४ ॥
१०९७. सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवांचे
न्हाणीं होईन किडा ॥ १ ॥ ऐसे जन्म आतां मज देई देवा । आवडी हे जीवा सर्वकाळ
॥ २ ॥ त्यांचें चरणरज येती अंगावरी । वंदिन तें शिरीं जाइन मागें ॥ ३ ॥
तुका म्हणे येथें राहिलासे भाव । सकळही वाव जाणोनियां ॥ ४ ॥
१०९८.
आतां काढाकाढी करी गा पंढरिराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥ धृ. ॥
जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा तो स्वभाव प्राण घ्यावा ॥ २ ॥ मनाचा
स्वभाव इंद्रियाची ओढी । पतनाचे जोडी वरी हांव ॥ ३ ॥ तुका म्हणे जाली
आंधळ्याचे परी । आतां मज हरी वाट दावी ॥ ४ ॥
१०९९. लाज वाटे पुढें
तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशीं ॥ १ ॥ चुकलियां कामा मागतों
मुशारा । लाज फजितखोरा नाहीं मज ॥ २ ॥ पाय सांडूनियां फिरतों बासर ।
स्वामिसेवा चोर होऊनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे मज पाहिजे दंडिलें । पुढें हें
घडलें न पाहिजे ॥ ४ ॥
११००. आम्हां वैष्णवांचा कुलधर्म कुळीचा ।
विश्वास नामाचा एका भावें ॥ १ ॥ तरीच हरिदास म्हणवितां श्लाघीजे ।
निर्वासना कीजे चित्त आधीं ॥ २ ॥ गाऊं नाचूं प्रेमें आनंदें कीर्तनीं ।
भुक्तिमुक्ति दोन्ही न मागों तुज ॥ ३ ॥ सगुण निर्गुण एकचि आवडी । चित्तें
दिली बुडी चिदानंदी ॥ ४ ॥ वृत्तिसहित मन रिघे प्रेमडोहीं । नाठविती देहीं
देहभाव ॥ ५ ॥ तुका म्हणे देवा ऐसीयांची सेवा । द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं
॥ ६ ॥
११०१. मातेची अवस्था काय जाणे बाळ । तिसीं तों सकळ चिंता
त्याची ॥ १ ॥ ऐसा परस्परें आहे जी विचार । भोपळ्याचा तार दगडासी ॥ २ ॥
भुजंग पोटाळी चंदनाचें अंग । निवें परी संगें नव्हे तैसा ॥ ३ ॥ तुका म्हणे
करा परिसाचे परी । मज ठेवा सरी लोखंडाचे ॥ ४ ॥
११०२. किती तुजपाशीं
देऊं परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥ १ ॥ आतां माझे हातीं देई माझें हित।
करीं माझें चित्त समाधान ॥ २ ॥ राग आला तरी कापूं नये मान । बाळा मायेविण
कोण दुजें ॥ ३ ॥ तुका म्हणे तैसा होईल लौकिक । मागे बाळ भीक समर्थाचें ॥ ४ ॥
११०३.
पोट धालें मग नलगे पंगती । झालिया निश्चिंती खेळ गोड ॥ १ ॥ आपुलिया हातें
देईं वो कवळ । विठ्ठला शीतळ जीवन वरी ॥ २ ॥ घराचा विसर होईल आनंदें । नाचेन
मी छंदे प्रेमाचिया ॥ ३ ॥ तुका म्हणे तोंचिवरी करकर। मग हें उत्तर खंडईल ॥
४ ॥
११०४. सारीन तें आतां एकाचि भोजनें । वारीन मागणे वेळोवेळां ॥ १
॥ शेवटींचा घास गोड करी माते । अगे कृपावंते पांडुरंगे ॥ २ ॥ वंचूं नये
आतां कांहींच प्रकार । धाकल्याचे थोर झाल्यावरी ॥ ३ ॥ तुका म्हणे पोटीं बहु
झाला वाव । कांहीं नेदी ठाव उरों मागें ॥ ४ ॥
११०५. नाहीं तुम्हां
कांहीं लाविलें मागणें । कांटाळ्याच्या भेणें त्रासलेती ॥ १ ॥ एखादिये परी
टाळावी करकर । हा नका विचार देखों कांहीं ॥ २ ॥ पायांच्या वियोगें
प्राणासंवसाठीं । नेघेवेसी तुटी झाली आतां ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हां मागणें
तें आतां । हेंचि कृपावंता चरणीं वास ॥ ४॥
११०६. नको देऊं देवा
पोटीं हें संतान । मायाजाळें जाण नाठविसी ॥ १ ॥ नको देऊं देवा द्रव्य आणि
भाग्य। तो एक उद्वेग होय जीवा ॥ २ ॥ तुका म्हणे करी फकिराचे परी ।
रात्रंदिवस हरी येईल वाचे ॥ ३ ॥ (धृ. नाही)
११०७. हरि तुझें नाम
गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥ १ ॥ अंतरीं विश्वास अखंड नामाचा ।
कायामनेंवाचा हेंचि देईं ॥ २ ॥ तुका म्हणे आतां देईं संतसंग । तुझे नामीं
रंग भरो मना ॥ ३ ॥
११०८. आतां तरी मज सांगा साच भावें । काय म्यां
करावें ऐसें देवा ॥ १ ॥ चुकलिया कर्म नोहे तें कारण । केला होय सीण अवघाचि ॥
२ ॥ कळे म्हणवुनी करीतसें वाद । दिसे भेदाभेद अंतरींच ॥ ३ ॥ तुका म्हणे
नको पाहूं तूं निर्वाण । देईं कृपादान याचकासी ॥ ४ ॥
११०९. हेंचि
सुख पुढती मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥ १ ॥ जन्मजन्मांतरीं
तुझाचि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ २ ॥ दुजा भाव आड येऊं नेदीं
चित्ता । करावा अनंता नास त्याचा ॥ ३ ॥ अभय देऊनि करावें सादर । क्षण तो
विसर पडों नेदीं ॥ ४ ॥ तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करूं । ते ते कल्पतरु
पुरविसी ॥ ५ ॥
१११०. एकांताचें सुख देई मज देवा । आघात या जीवा
चुकवूनी ॥ १ ॥ ध्यानीं रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडों नेदीं ॥ २ ॥
मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैसी मज गोडी देई देवा ॥ ३ ॥ कीर्ति ऐकोनियां
जालों शरणागत । दासाचें तूं हित करितोसी ॥ ४ ॥ तुका म्हणे मी तो दीन
पापराशी । घालावें पाठीशीं मायबापा ॥ ५ ॥
११११. येणें मुखें तुझें
वर्णी गुण नाम । तेंचि मज प्रेम देई देवा ॥ १ ॥ डोळे भरूनियां पाहेन तुझें
मुख । तेंचि मज सुख देई देवा ॥ २ ॥ कान भरोनियां ऐकेन तुझी कीर्ती । ते मज
विश्रांती देई देवा ॥ ३ ॥ वाहें रंगी टाळी नाचेन उदास । हें देई हातांस
पायां सुख ॥ ४ ॥ तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणिक नको ठाव चिंतूं यासी ॥ ५
॥
१११२. पांडुरंगा कांहीं आईकावी मात । न करावें मुक्त आतां मज ॥ १
॥ जन्मांतरें मज तैसीं देई देवा । जेणें चरणसेवा घडे तुझी ॥ २ ॥ वाखाणीन
कीर्ति आपुलिया मुखें । नाचेन मी सुखें तुजपुढें ॥ ३ ॥ करूनि कामारी दास
दीनाहुनी । आपुल्या अंगणीं ठाव मज ॥ ४ ॥ तुका म्हणे आम्ही मृत्युलोकीं भले ।
तुझेचि अंकिले पांडुरंगा ॥ ५ ॥
१११३. त्राहे त्राहे त्राहे सोडवीं
अनंता । लागों दे ममता तुझे पायीं ॥ १ ॥ एकचि मागणें देईं तुझी गोडी । नलवी
आवडी आणिकांची ॥ २ ॥ तुझें गुण नाम वर्णीन पवाडे । आवडीच्या कोडें नाचों
रंगीं ॥ ३ ॥ बापा विठ्ठलराया हेंचि देई दान । जोडती चरण जेणें तुझे ॥ ४ ॥
आवडीसारिखें मागितलें जरी । तुका म्हणे करी समाधान ॥ ५ ॥
१११४.
अभयदान मज देई वो दातारा । कृपेच्या सागरा मायबापा ॥ १ ॥ देहभाव तुझ्या
ठेवियेला पायीं । आणीक मी कांहीं दुजें नेणें ॥ २ ॥ सेवाभक्तिहीन नेणता
पतित । आतां माझें हित तुझ्या पायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तुझे नाम दीनानाथ ।
तें मज उचित करी आतां ॥ ४ ॥
१११५. काय देह घालूं करवती कर्मरी ।
टाकूं या भितरीं अग्नीमाजी ॥ १ ॥ काय सेवूं वन शीतउष्ण तहान । साहों की
मोहन धरुनी बैसों ॥ २ ॥ काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट
चारी ॥ ३ ॥ काय त्यजूं अन्न करूं मी उपवास । काय करूं नास जीवित्वाचा ॥ ४ ॥
तुका म्हणे काय करावा उपाव । ऐसा देई भाव पांडुरंगा ॥ ५ ॥
१११६.
आमची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥ १ ॥ प्रेमपान्हा
स्तनीं सदासर्वकाळ । दृष्टी हे निर्मळ अमृताची ॥ २ ॥ भूक तहान दुःख वाटो
नेदी शीण । अंतरीचा गुण जाणोनियां ॥ ३ ॥ आशा तृष्णा माया चिंता दवडी दुरी ।
ठाव आम्हां करी खेळावया ॥ ४ ॥ तुका म्हणे लावी संताचा सांगात । तेथें न
पवे हात कळिकाळाचा ॥ ५ ॥
१११७. मानावया जग व्हावी द्रव्यमाया ।
नाहीं हें माझिया जीवा चाड ॥ १ ॥ तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां
कांहीं एक नको दुजें ॥ २ ॥ करूनियां कृपा करीं अंगिकार । न लावी उशीर आतां
देवा ॥ ३ ॥ नव्हे साच कांहीं कळो आले मना । म्हणोनि वासना आवरिली ॥ ४ ॥
तुका म्हणे आतां मनोरथ सिद्धी । माझे कृपानिधी पाववावे ॥ ५ ॥
१११८.
तरि कां नेणते होते मागें ऋषी । तीही या जनासी दुराविले ॥ १ ॥ वोळगती जया
अष्टमहासिद्धी । ते या जनबुद्धी नातळती ॥ २ ॥ कंद मुळे पाला धातूच्या पोषणा
। खाती वास रानांतरीं केला ॥ ३ ॥ लावुनियां नेत्र उगेचि बैसले । न बोलत
ठेले मौन्यरूप ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसे करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन
दुरी ॥ ५ ॥
१११९. नलगे देवा तुझें आम्हांसी वैकुंठ । सायुज्यता
पट्ट नलगे मज ॥ १ ॥ देई तुझें नाम मज सर्वकाळीं । मागणें वनमाळी हेंचि तुज ॥
२ ॥ नारद तुंबर उद्धव प्रल्हाद । बळी रुक्मांगद नाम ध्याती ॥ ३ ॥ सिद्ध
मुनिगण गंधर्व किन्नर । करीताती गजर रामनामें ॥ ४ ॥ तुका म्हणे हरी देईं
तुझें नाम । अखंडित प्रेम हेंचि द्यावें ॥ ५ ॥
११२०. विश्वास धरूनि
राहिलों निवांत । ठेवूनियां चित्त तुझें पायीं ॥ १ ॥ तरावें बुडावें तुझिया
वचनें । निर्धार हा मनें केला माझ्या ॥ २ ॥ न कळें हें मज साच चाळविलें ।
देसी तें उगलें घेईन देवा ॥ ३ ॥ मागणें तें सरे ऐसें करी देवा । नाहीं तरी
सेवा सांग पुढें ॥ ४ ॥ करावें कांहीं कीं पाहावें उगलें । तुका म्हणे बोले
पांडुरंगा ॥ ५ ॥
११२१. कृपाळू म्हणोनि बोलती पुराणें । निर्धार
वचनें यांचीं मज ॥ १ ॥ आणीक उपाय नेणेंचि मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे
तैसें ॥ २ ॥ नये धड कांहीं बोलतां वचन । रिघालों शरण सर्व भावें ॥ ३ ॥
कृपा करिसी तरी थोडें तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज
दाखवी श्रीमुख । हरेल या भूक डोळियांची ॥ ५ ॥
११२२. भावबळें कैसा
जालासी लहान । मागें संतीं ध्यान वर्णियेलें ॥ १ ॥ तें मज उचित करूनियां
देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ २ ॥ पाहोनियां डोळा बोलेन मी गोष्टी ।
आलिंगूनि मिठी देईन पायीं ॥ ३ ॥ चरणीं दृष्टि उभा राहेन समोर । जोडोनियां
कर पुढें दोन्ही ॥ ४ ॥ तुका म्हणे उत्कंठित हे वास़ना । पुरवीं नारायणा
आर्त माझें ॥ ५ ॥
११२३. आत्मस्थिति मज नको हा विचार । देई निरंतर
चरणसेवा ॥ १ ॥ जन्मोजन्मीं तुझा दास पुरुषोत्तमा । हेचि गोडी आम्हां देईं
जीवा ॥ २ ॥ काय सायुज्यता मुक्तीची हे चाड । देव भक्त कोड तेथें नाहीं ॥ ३ ॥
काय तें निर्गुण पाहों कैशापरी । वर्णू तुझी हरी कीर्ति कैसी ॥ ४ ॥ गोड
चरणसेवा देवभक्तपणें । मज देवा झणें दुराविसी ॥ ५ ॥ जाणिवेपासूनि सोडवीं
सत्वर । देईं निरंतर चरणसेवा ॥ ६ ॥ तुका म्हणे गोडा गोड नलगे प्रीति ।
सेवेविण चित्तीं सार नाहीं ॥ ७ ॥
११२४. कुळींचें दैवत ज्याचें
पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे घरीं ॥ १ ॥ शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं ।
करी भलते ठायीं दास तुझा ॥ २ ॥ पंढरीस कोणी जाती वारकरी । होईन त्याचे
घरीं पशुयाति ॥ ३ ॥ विठ्ठल चिंतन दिवसारात्रीं ध्यान । होईन पायतन त्याचे
पायीं ॥ ४ ॥ तुळसीवृंदावन जयाचे अंगणीं । होईन केरसुणी त्याचें घरीं ॥ ५ ॥
तुका म्हणे हाचि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिका गती चाड मज ॥ ६ ॥
११२५.
पढिये तें आम्हीं तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावें हितगुज ॥ १ ॥
पाळशील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥ २ ॥ जीवभाव तुझ्या
ठेवियेला पायीं । तूंचि सर्वा ठायीं एक आम्हां ॥ ३ ॥ दुजियाचा संग लागों
नेदीं वारा । नाहीं जात घरा अणिकांच्या ॥ ४ ॥ सर्वसत्ता एकी आहे तुजपाशीं ।
ठावें आहे देसी मागेन तें ॥ ५ ॥ म्हणवुनि पुढें मांडियेलिं आळी ।
थुंकोनिया चोळी डोळे तुका ॥ ६ ॥
११२६. अगा करुणाकरा करितसें धांवा ।
या मज सोडवा लवकरी ॥ १ ॥ ऐकोनियां माझी करुणेची वचनें । व्हावें नारायणें
उतावीळ ॥ २ ॥ मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें
॥ ३ ॥ उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥ ४ ॥ उरलें
तें एक हेंचि मज आतां । अवघें विचारिता शून्य जालें ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां
करीं कृपादान । पाउलें समान दावीं डोळां ॥ ६ ॥
११२७. मागता भिकारी
जालों तुझें द्वारीं । देई मज हरी कृपादान ॥ १ ॥ प्रेम प्रीति नाम उचित
करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ २ ॥ सर्वभावें शरण आलों पांडुरंगा ।
कृपाळू तूं जगामाजी एक ॥ ३ ॥ तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया
पाय तुझे ॥ ४ ॥ संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें ॥
५॥ तुका म्हणे आतां तुझा शरणागत । करावें सनाथ मायबापा ॥ ६ ॥
११२८. न
म्हणे कोणा सिद्ध साधक गंव्हार । अवघा विश्वंभर वांचूनियां ॥ १ ॥ ऐसें
माझें बुद्धि काया वाचा मन । लावी तुझें ध्यान पांडुरंगा ॥ २ ॥ गातां
प्रेमगुण शंका माझ्या मनीं । नाचतां रंगणीं नाठवावी ॥ ३ ॥ देईं चरणसेवा
भूतांचें भजन । वर्णअभिमान सांडवूनि ॥ ४ ॥ आशापाश माझी तोडी माया चिंता ।
तुजविण व्यथा नको कांहीं ॥ ५ ॥ तुका म्हणे सर्वभाव तुझे पायीं । राहे ऐसें
देई प्रेम देवा ॥ ६ ॥
११२९. आतां केशीराजा हेचि विनवणी । मस्तक
चरणीं ठेवीतसे ॥ १ ॥ देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असों
द्यावें ॥ २ ॥ काळाचें खंडन घडावें चिंतन । तुझ्या पायीं तनमनधनविन्मुखता ॥
३ ॥ कफवातपित्त देहअवसानीं । ठेवावी वारूनि दुरितें हीं ॥ ४ ॥ सावध तो
माझीं इंद्रियें सकळ । दिली एक वेळ हाक आधीं ॥ ५ ॥ तुका म्हणे तूं या
सकळांचा जनिता । येथें ऐक्यता सकळांसी ॥ ६ ॥
११३०. देवा आतां ऐसा
करी उपकार । देहाचा विसर पाडी मज ॥ १ ॥ तरीच हा जीव सुख पावे माझा । बरें
केशीराजा कळों आलें ॥ २ ॥ ठाव देईं चित्ता राखें पायांपाशीं । सकळ वृत्तीसी
अखंडीत ॥ ३ ॥ आस भय चिंता लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा ॥ ४ ॥
मागणें तें एक हेंचि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देईं ॥ ५ ॥ तुका म्हणे
नको वरपंग देवा । घेईं माझी सेवा भावशुद्ध ॥ ६ ॥
११३१. आला भागासी
तो करीं वेवसाव । परि राहों भाव तुझ्या पायीं ॥ १ ॥ काय चाले तुम्हीं
बांधलें दातारा । वाहिलिया भारा उसंतितों ॥ २ ॥ शरीर तें करी शरीराचे धर्म ।
नको देऊं वर्म चुकों मना ॥ ३ ॥ चळण फिरवी ठाव बहुवस । न घडो आळस चिंतनाचा ॥
४ ॥ इंद्रियें करोत आपुले व्यापार । आवडीसी थार देई पायीं ॥ ५ ॥ तुका
म्हणे नको देऊं काळा हातीं । येतों काकुळती म्हणऊनी ॥ ६ ॥
११३२. चाल
घरा उभा राहें नारायणा । ठेवूं दे चरणांवरि माथा ॥ १ ॥ वेळोवेळा देई
क्षेमआलिंगन । करी अवलोकन कृपादृष्टी ॥ २ ॥ प्रक्षाळु दे पाय बैस माजघरीं ।
चित्त स्थिर करीं पांडुरंगा ॥ ३ ॥ आहे त्या संचितें करवीन भोजन । काय न
जेवून करिसी आतां ॥ ४ ॥ करुणाकरें नाहीं कळों दिलें वर्म । दूरी होतां भ्रम
कोण वारी ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां आवडीच्या सत्ता । बोलिलों अनंता करवीन तें
॥ ६ ॥
११३३. नको मज ताठा नको अभिमान । तुजविण क्षीण होतो जीव ॥ १ ॥
दुर्धर हे माया न होय सुटका । वैकुंठनायका सोडवीं मज ॥ २ ॥ तुका म्हणे
तुझें झालीया दरूषण । मग निवारण होईल सर्व ॥ ३ ॥
११३४.
नरस्तुति आणि कथेचा विकरा । हें नको दातारा घडों देऊं ॥ १ ॥ ऐसिये कृपेची
भाकितों करुणा । आहेसि तूं राणा उदाराचा ॥ २ ॥ पराविया नारी आणि परधना ।
नको देऊं मनावरी येऊं ॥ ३ ॥ भूतांचा मत्सर आणि संतनिंदा । हें नको गोविंदा
घडों देऊं ॥ ४ ॥ देहअभिमान नको देऊं शरीरीं । चढों कांहीं परी एक देऊं ॥ ५ ॥
तुका म्हणे तुझ्या पायांचा विसर । नको वारंवार पडों देऊं ॥ ६ ॥
११३५.
तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हां तेचि घडी झडो माझी ॥ १ ॥ हेंचि मज
देईं हेंचि मज देईं । आणिक दुजे कांहीं न मगे तुज ॥ २ ॥ बहिर कान तुझी
कीर्ति नाइकतां । पाय न देखतां जावोत डोळे ॥ ३ ॥ मना तुझें ध्यान नाहीं
नित्य काळ । धिग तें चांडाळ जळो जळो ॥ ४ ॥ हातपाय तेणें पंथें न चालतां ।
जावोत अनंतागळोनियां ॥ ५ ॥ तुजविण जिणे नाहीं मज चाड । तुका म्हणे गोड नाम
तुझें ॥ ६ ॥
११३६. अखंड जया तुझी प्रीति । मज दे तयाची संगति । मग
मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ॥ १ ॥ पडोन राहेन तये ठायीं । उगाचि
संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥ २ ॥ तुम्ही
आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत
दाराशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे
केला । अवघा माझा आव्हेर ॥ ४ ॥
११३७. तुझ्या रूपें माझी काया । भरों
द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया । एका रूपें भिन्नत्वें ॥ १ ॥ सुख
पडिलें सांठवणे । सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन । चारी मार्ग उगवले ॥
२ ॥ वसो डोळ्यांची बाहूली । कवळे भिन्न छाया आली । कृष्णांजन चाली । नव्हे
परती माघारी ॥ ३ ॥ जीव ठसावला शिवें । मना आलें तेथें जावें । फांटा पडिला
नांवें । तुका म्हणे खंडलें ॥ ४ ॥
११३८. होईन खडे गोटे । चरणरज
साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणीं लागेन ॥ १ ॥ आणिक दुजें कांहीं । मी
मागे न तुजपाशीं । आठवितां सुख । भय नास नाहीं ज्यासी ॥ २ ॥ होईन मोचे
वाहणा । पायीं सकळां संतजनां । मांजर सुकर सुणा । जवळी शेष घ्यावया ॥ ३ ॥
सांडोवा पायरी । वोहळ बावी गंगातिरी । होईन तयावरी । संतसज्जन चालती ॥ ४ ॥
लागें संतां पायीं । ऐसा ठेवीं भलते ठायीं । तुका म्हणे देई । धाक नाहीं
जन्माचा ॥ ५ ॥
११३९. हेचि माझे चित्तीं । राहो आतां भाव प्रीति ।
विठ्ठल सुषुप्तीं । जागृति स्वप्नासी ॥ १ ॥ आणिक नाहीं मागणें । राज्यचाड
संपत्ति धनें । जिव्हे सुख तेणें । घेतां देहीं नाम तुझें ॥ २ ॥ तुझें रूप
सर्वांठायीं । देखें ऐसें प्रेम देईं । ठेवावा हा पायीं । अनुभव चित्ताचा ॥
३ ॥ जन्ममरणाचा बाध । समूळूनि तुटो कंद । लागो हाचि छंद । हरि गोविंद
वाचेसी ॥ ४ ॥ काया पालटे दर्शनें । अवघें कोंदाटे चैतन्य । जीवशिवखंडण ।
होय तरे चिंतितां ॥ ५ ॥ तुका म्हणे याचि भावें । आम्ही धालों तुझ्या नांवें
। सुखें होत जन्में । भलते याती भलतैसीं ॥ ६ ॥
११४०. जळो माझी ऐसी
बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडी हे विधि । निषेधींच चांगली ॥ १ ॥ तूं
स्वामी मी सेवक । उंच पद नीच एक । ऐसें करावें कौतुक । नको करूं खंडणा ॥ २ ॥
जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता तो निराळा । तेणें गोडी
निवडिली ॥ ३ ॥ हिरा शोभला कोंदणें । अळंकारी मिरवे सोनें । एक असतां तेणें ।
काय दुजें जाणावें ॥ ४ ॥ उष्णें छाये सुख वाटे । बाळें माते पान्हा फुटे ।
एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥ ५ ॥ तुका म्हणे हित । हेंचि मानी माझें
चित्त । नव्हे आतां मुक्त । ऐसा जाला भरंवसा ॥ ६ ॥
११४१. माझें मज
आतां न देखें निरसतां । म्हणऊन आधार केला । संसाराची आस सांडूनि लौकिक ।
जीव भाव तुज दिला । नव्हतीं माझी कोणी मी कवणांचा । आर्त मोहो सांडवला ।
तारी मारीं करीं भलतें दातारा । होऊन आता तुझा ठेलो रे ॥ १ ॥ असों माझें
कोडें तुज हें सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप । बाळकासी चिंता काय
पोटव्यथा । जया शिरीं मायबाप ॥ २ ॥ पापपुण्य श्रुति आटल्या । शास्त्रांसी न
लगेचि ठाव । विधिनिषेधें गोविलीं पुराणें । वेदासी तो अहंभाव । ओंकाराचें
मूळ व्यापिलें माया । तेथें न धरीच भाव । म्हणऊन काबाड । सांडिलें उपसतां ।
धरिलें तुझेंचि नांव ॥ ३ ॥ तनमनइंद्रियें ठेवूनि राहिलों । सर्व आशा तुझे
पायीं । तप तीर्थ दान करवूं कवणा हातीं । अधीन तें मज काई । आहिक्य परत्र
चाड नाहीं सर्वथा । जन्म सदा मज देईं । मायामोहपाश करीं विष तैसें । तुका
म्हणे माझ्या ठायीं ॥ ४ ॥
११४२. संसारापासूनी कैसें सोडविशी । न कळे
हृषीकेशी काय जालों । करितां न सरे कांहीं आधीक वाढ पाहीं । तृष्णा देशधडी
केलों । भक्तिभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों । मागे पुढे
रीघ न पुरेचि पाहतां । अवघा अवघीं वेष्टिलों ॥ १ ॥ आतां माझी लाज राखें
नारायणा । हीन दीन लीन याचकाची । करितां न कळे कांहीं असतील गुण दोष । करी
होळी संचिताची ॥ २ ॥ इंद्रियद्वारें मन धांवे सैरें । नागवे करितांचि
कांहीं । हात पाय कान मुख लिंगस्थान । नेत्रद्वारें घ्राण पाहीं । जया जैसी
सोय तया तैसें होय । क्षण एक स्थिर नाहीं । करिती ताडातोडी ऐसी यांची खोडी
। न चले माझें यास कांहीं ॥ ३ ॥ शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु । धन लोभ
मायावंतें । जन लोकपाळ मैत्र हे सकळ । सोइरीं सज्जनें बहुते । नाना कर्म
डाय करिती उपाय । बुडावया घातपातें । तुका म्हणे हरी राखे भलत्यापरी ।
आम्ही तुझीं शरणागतें ॥ ४ ॥
१९४३. मागेन तें एक तुज । देईं
विचारोनि मज ॥ १ ॥ नको दुर्जनांचा संग । क्षणाक्षणा चित्तभंग ॥ २ ॥ जन्म
घेईन मी नाना । बहु सोसीन यातना ॥ ३ ॥ रंक होईन दीनांचा । घायें देहपात
साचा ॥ ४ ॥ तुका म्हणे हेंचि आतां । देईं देईं तूं सर्वथा ॥ ५ ॥
११४४.
दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥ १ ॥ ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं
तैशापरी ॥ २ ॥ आवतण्याची आस । जैसी लागे दुर्बळास ॥ ३ ॥ लोभ्या कळांतराची
आस । बोटें मोजी दिवस मास ॥ ४ ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । मजला आणिक नका
व्यथा ॥ ५ ॥
११४५. काय बोलों सांगा । याउपरी पांडुरंगा ॥ १ ॥ कांहीं
आधारावांचून । पुढें न चले वचन ॥ २ ॥ वाढे ऐसा रस । कांहीं करावा सौरस ॥ ३
॥ भक्तिभाग्यसीमा । द्यावा जोडोनियां प्रेमा ॥ ४ ॥ कोरड्या उत्तरीं । नका
गौरवूं वैखरी ॥ ५ ॥ करी विज्ञापना । तुका प्रसादाची दाना ॥ ६ ॥
१९४६.
विनवितो शेवटीं । आहे तैसें माझे पोटीं ॥ १ ॥ कंठीं राहावें राहावें ।
हेंचि मागतसें भावें ॥ २ ॥ पुरली वासना । येणें होईल नारायणा ॥ ३ ॥ तुका
म्हणे जो देहाडा । तोचि वर्णीन पवाडा ॥ ४ ॥
११४७. राहाणें तें
पायापाशीं । आणिका रसीं विटोनि ॥ १ ॥ ऐसा धीर देईं मना । नारायणा विनवितों ॥
२ ॥ अंतरीं तो तुझा वास । आणिका नास कारणां ॥ ३ ॥ तुका म्हणे शेवटींचें ।
वाटे साचें राखावें ॥ ४ ॥
११४८. चिंतनाची जोडी । हाचि लाभन घडोघडी ॥
१ ॥ तुम्ही वसूनि अंतरीं । मज जागवा निर्धारीं ॥ २ ॥ जेथें जेथें जाय मन ।
आड घाला सुदर्शन ॥ ३ ॥ तुका म्हणे भोजें । मग मी नाचेन निर्लज्ज ॥ ४ ॥
११४९.
आळस पाडी विषयकामीं । शक्ति देईं तुझ्या नामीं ॥ १ ॥ हेचि विनवणी विनवणी ।
विनविली धरा मनीं ॥ २ ॥ आणिक वचना मुकी वाणी । तुमच्या गर्जों द्यावी
गुणीं ॥ ३ ॥ तुका म्हणे पाय डोळां । पाहें एरवी अंधळा ॥ ४ ॥
११५०.
देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥ १ ॥ ऐसें आवडतें मना । देवा
पुरवावी वासना ॥ २ ॥ हरिजनासी भेटी । नहो अंगसंग तुटी ॥ ३ ॥ तुका म्हणे
जिणें । भलें संतसंघष्टणें ॥ ४ ॥
११५१. माप म्हणे मी मवितें । भरी
धणी ठेवी रितें ॥ १ ॥ देवा अभिमान नको । माझे ठायीं देऊं सकों ॥ २ ॥ देशीं
चाले सिक्का । रितें कोण लेखी रंका ॥ ३ ॥ हातीं सूत्रदोरी । तुका म्हणे
त्याची थोरीं ॥ ४ ॥
११५२. माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठल
डोळां ॥ १ ॥ आणीक नाहीं चाड । नलगे संसार हा गोड ॥ २ ॥ तरीच फळ जन्मा आलों ।
सरता पांडुरंगीं जालों ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । देईं चरणांची सेवा ॥ ४ ॥
११५३.
आतां द्यावें अभयदान । जीवन ये कृपेचें ॥ १ ॥ उभारोनि बाहो देवा । हात
ठेवा मस्तकीं ॥ २ ॥ नाभी नाभी या उत्तरें । करुणाकरें शांतवीजे ॥ ३ ॥ तुका
म्हणे केली आस । तो हा दिस फळाचा ॥ ४ ॥
११५४. शेवटींची हें विनंती ।
पाय चित्तीं रहावे ॥ १ ॥ ऐसे करा कृपादान । तुम्हां मन सन्निध ॥ २ ॥
भाग्येंवीण कैंची भेटी । नव्हे तुटी चिंतनें ॥ ३ ॥ तुका म्हणे कळसा आलें ।
हें विठ्ठलें परिसावें ॥ ४ ॥
११५५. वोढविलें अंग । आतां करूनि
घ्यावें सांग ॥ १ ॥ काय पूजा तें मी नेणें । जाणावें जी सर्वजाणें ॥ २ ॥
पोटा आलें बाळ ॥ त्याचें जाणावें सकळ ॥ ३ ॥ तुका म्हणे हरी । वाहावें जी
कडियेवरी ॥ ४ ॥
११५६. जिकडे पाहे तिकडे देव । ऐसा भाव दे कांहीं ॥ १
॥ काय केलों एकदेशी । गुणदोषीं संपन्न ॥ २ ॥ पडे तेथें तुझ्या पायां । करी
वांयां न वजेसें ॥ ३ ॥ तुका म्हणे विषमें सारी । ठाणें धरी जिवासी ॥ ४ ॥
११५७.
जिकडे जाय तिकडे सवें । आतां यावें यावरी ॥ १ ॥ माझ्या अवघ्या भांडवला ।
तूं एकला जालासी ॥ २ ॥ आतां दुजें धरा झणी । पायांहूनि वेगळें ॥ ३ ॥ तुका
म्हणे आतां देवा । नका गोवा यावरी ॥ ४ ॥
११५८. आतां बरें जालें ।
माझें मज कळों आलें ॥ १ ॥ खोटा ऐसा संसार । मज पायीं द्यावी थार ॥ २ ॥
उघडल्या डोळे । भोग देताकाळीं कळे ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवा । होता तडामोडी
देवा ॥ ४ ॥
११५९. केलियाचें दान । करा आपुलें जतन ॥ १ ॥ माझी बुद्धी
स्थिर देवा । नाहीं विषयाचा हेवा ॥ २ ॥ भावा अंतराय । अंतीं अंतरती पाय ॥ ३
॥ तुका म्हणे जोडी । आदि अंतीं राहो गोडी ॥ ४ ॥
११६०. पाहे तिकडे
दिशा ओस । अवघी आस पायांपें ॥ १ ॥ मनींचें साच होईल कईं । प्रेम देई भेटोनि
॥ २ ॥ सर्वापरी पांगुळ असे । न कळे कैसें हें तुम्हां ॥ ३ ॥ तुका म्हणे
कृपावंता । तूं तो दाता दीनाचा ॥ ४ ॥
१९६१. जेणें होय हित । तें तूं
जाणसी उचित ॥ १ ॥ मज नको लावूं तैसें । वांयां जाय ऐसें पिसें ॥ २ ॥
धरितोसी सत्ता । होसी सकळ जाणता ॥ ३ ॥ चतुराच्या राया । अंगीकारावे तुकया ॥
४ ॥
११६२. करूनि विनवणी । माथा ठेवितों चरणीं ॥ १ ॥ होतें तेंचि
असों द्यावें । रूप सौम्यचि बरवें ॥ २ ॥ भया भेणें तुमचा ठाव । तुमच्या
कोपें कोठें जावें ॥ ३ ॥ तुका पायां लागे । दान समुदाय मागे ॥ ४ ॥
११६३.
वर्ततां बासर । काय करावें शरीर ॥ १ ॥ ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे
पायीं मन ॥ २ ॥ नेदाविया वृत्ती । कोठें फांको जी श्रीपती ॥ ३ ॥ तुका म्हणे
भले । जन्मा येऊनियां ज्याले ॥ ४ ॥
११६४. दुर्बुद्धि ते मना । कदा
नुपजो नारायणा ॥ १ ॥ आतां मज ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥ २ ॥
उपजला भावो । तुझे कृपें सिद्धी जावो ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । लाभ नाहीं
यापरता ॥ ४ ॥
११६५. अहो कृपावंता । होय बुद्धीचा ये दाता ॥ १ ॥
जेणें पाविजे उद्धार । होय तुझे पायीं थार ॥ २ ॥ वदवीं हे वाचा । भाव
पांडुरंगीं साचा ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । माझें अंतर वसवा ॥ ४ ॥
१९६६.
निर्धाराचें अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥ १ ॥ बैसलिया भाव पायीं । बरा
तईं नाचेन ॥ २ ॥ स्वामी कळे सावधान । तरि मन उल्हासे ॥ ३ ॥ तुका म्हणे
आश्वासावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥ ४ ॥
११६७. माझे पाय तुझी डोई ।
ऐसें करिं गा भाक देई ॥ १ ॥ पाहतां दिसे उफराटें । घडे तईं भाग्य मोठें ॥ २
॥ बहु साधन मोलाचें । यासी जोडा दुजें कैंचें ॥ ३ ॥ नका अनुमानूं विठ्ठला ।
तुका म्हणे धडा जाला ॥ ४ ॥
११६८. तुजवरी ज्याचें मन । दर्शन दे
त्याचें ॥ १ ॥ कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥ २ ॥ अवघियांचा
करुनी मेळा । तुज डोळां रोखिलें ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज आड । लपोनी कोड दावी
देवा ॥ ४ ॥
११६९. आतां माझ्या मायबापा । तूं या पापा प्रायश्चित्ता ॥
१ ॥ फजित हे केले खळ । तो विटाळ निवारीं ॥ २ ॥ प्रेम आतां पाजीं रस । करीं
वास अंतरीं ॥ ३ ॥ तुका म्हणे पांडुरंगा । जिवलगा माझिया ॥ ४ ॥
११७०.
धर्माची तूं मूर्ति । पाप पुण्य तुझे हातीं ॥ १ ॥ मज सोडवीं दातारा ।
कर्मापासूनी दुस्तरा ॥ २ ॥ करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥ ३ ॥
जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥ ४ ॥
११७१. मज दास करी
त्याचा । संतदासाच्या दासाचा ॥ १ ॥ मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ २
॥ नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥ ३ ॥ तुका म्हणे सेवे । माझे
संकल्प वेचावे ॥ ४ ॥
११७२. बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥ १
॥ जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ २ ॥ जळों त्याचें तोंड । नको
दृष्टीपुढें भांड ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥ ४ ॥
११७३.
काय दिनकरा । कोंबड्यानें केला खरा ॥ १ ॥ कां हो ऐसा संत ठेवा । भार माझे
माथां देवा ॥ २ ॥ आडविलें दासी । तरी कां मरती उपवासी ॥ ३ ॥ तुका म्हणे
हातीं । कळा सकळ अनंतीं ॥ ४ ॥
११७४. अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥
१ ॥ विटे न लगतां क्षण । मोल जाय वांयांविण ॥ २ ॥ सर्पाचिया परी । विषें
भरला कल्हारीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥ ४ ॥
११७५.
काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥ १ ॥ आहे नाहीं हें न कळे । हातीं काय
कोण्या वेळे ॥ २ ॥ देखिलें तें दृष्टि । मागे घालूनियां मिठी ॥ ३ ॥ तुका
म्हणे भावें । माझ्या मज समजावें ॥ ४ ॥
११७६. नसे तरी मनीं नसो ।
परी वाचे तरी वसो ॥ १ ॥ देह पडो या चिंतनीं । विठ्ठलनामसंकीर्तनीं ॥ २ ॥
दंभस्फीति भलत्या भावें । मज हरिजन म्हणवावें ॥ ३ ॥ तुका म्हणे काळांतरीं ।
मज सांभाळील हरी ॥ ४ ॥
११७७. पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें
अंगीं ॥ १ ॥ संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ २ ॥ जेष्ठांची कां
आम्हां जोडी । परवडी न लभों ॥ ३ ॥ तुका म्हणे करी कोड । पुरवीं लाड आमुचा ॥
४ ॥
११७८. आळी सलगी पायांपाशीं । होईल तैसी करीन ॥ १ ॥ आणीक आम्हीं
कोठें जावें । येथें जीवें वेचलों ॥ २ ॥ अवघ्या निरोपणा भाव । हाचि ठाव
उरलासे ॥ ३ ॥ तुका म्हणे पाळी लळे । कृपाळुवे विठ्ठले ॥ ४ ॥
११७९.
ठाकलोंसें द्वारीं । उभा याचक भिकारी ॥ १ ॥ मज भीक कांहीं देवा । प्रेम
भातुकें पाठवा ॥ २ ॥ याचकाचा भार । घेऊं नये येरझार ॥ ३ ॥ तुका म्हणे दान
सेवा घेतल्या वांचून ॥ ४ ॥
११८०. लक्ष्मीवल्लभा । दीनानाथा पद्मनाभा
॥ १ ॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं तेंचि ठायीं ॥ २ ॥ माझी अल्प हे
वासना । तूं तो उदारांचा राणा ॥ ३ ॥ तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव
वेगें ॥ ४ ॥
११८१. तुज मागणें तें देवा । आम्हां तुझी चरणसेवा ॥ १ ॥
आन नेघों देसी तरी । रिद्धि सिद्धि मुक्ति चारी ॥ २ ॥ संतसंगति सर्वकाळ ।
थोर प्रेमाचा सुकाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे नाम । तेणें पुरे माझें काम ॥ ४ ॥
११८२.
काय नव्हे करितां तुज । आतां राखे माझी लाज ॥ १ ॥ मी तो अपराधाची रासी ।
शिखा अंगुष्ठतोंपाशीं ॥ २ ॥ त्राहे त्राहे त्राहे । मज कृपादृष्टि पाहे ॥ ३
॥ तुका म्हणे देवा । सत्य घ्यावी आतां सेवा ॥ ४ ॥
११८३. मी तों
दीनाहूनि दीन । माझा तुज अभिमान ॥ १ ॥ मी तों आलों शरणागत | माझें करावें
स्वहित ॥ २ ॥ दीनानाथा कृपाळुवा । सांभाळावें आपुल्या नांवा ॥ ३ ॥ तुका
म्हणे आतां । भलें नव्हे मोकलितां ॥ ४ ॥
११८४. न बोलेसी करा वाचा ।
उपाधीचा संबंध ॥ १ ॥ एका तुमच्या नामाविण । अवघा सीण कळतसे ॥ २ ॥
संकल्पाचे ओढी मन । पापपुण्य सवेंचि ॥ ३ ॥ तुका म्हणे नारायणीं । पावो वाणी
विसांवा ॥ ४ ॥
११८५. कृपा करूनि देवा । मज साच तें दाखवा ॥ १ ॥
तुम्ही दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी वसे ॥ २ ॥ पाहोनियां डोळां । हातीं
ओढवाल काळा ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । माझा करावा कुढावा ॥ ४ ॥
११८६.
तान्हेल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥ १ ॥ माझे मनोरथ सिद्धी । पाववावे
कृपानिधि ॥ २ ॥ तूं तों उदाराचा राणा । माझी अल्पचि वासना ॥ ३ ॥
कृपादृष्टीं पाहें । तुका म्हणे होई साहे ॥ ४ ॥
११८७. सद्गदित कंठ
दाटो । येणें फुटो हृदय ॥ १ ॥ चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥ २ ॥
नेत्रीं जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच ॥ ३ ॥ तुका म्हणे कृपादान । इच्छी
मन हे जोडी ॥ ४ ॥
११८८. लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥
धृ. ॥ ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥ २ ॥ ज्याचे अंगीं मोठेपण ।
तया यातना कठीण ॥ ३ ॥ तुका म्हणे जाण । व्हावें लहानाहुनि लहान ॥ ४ ॥
११८९.
पाहातोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥ १ ॥ वरि ठेवू दे मस्तक । ठेलों
जोडोनि हस्तक ॥ २ ॥ बरवें करीं सम । नको भंगों देऊं प्रेम ॥ ३ ॥ तुका म्हणे
चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥ ४ ॥
११९०. हेंचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥ १ ॥ गुण गाइन आवडी । हेंचि माझी सर्व जोडी ॥ २ ॥ नलगे
मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥ ३ ॥ तुका म्हणे गर्भवासी । सुखें
घालावें आम्हांसी ॥ ४ ॥
११९१. करूं जातां सन्निधान । क्षण जन पालटे ॥
१ ॥ आतां गोमटे ते पाय । तुझे माय विठ्ठले ॥ २ ॥ हरिदासांचा समागम । अंगीं
प्रेम विसावे ॥ ३ ॥ तुका म्हणे हेंचि मन । इच्छादान मागतसे ॥ ४ ॥
११९२.
आतां मज देवा । इचे हातींचें सोडवा ॥ १ ॥ पाठी लागलीसे लांसी । इच्छा जिते
जैसी तैसी ॥ २ ॥ फेडा आतां पांग । अंगीं लपवुनी अंग ॥ ३ ॥ दुजें नेणें
तुका । कांहीं तुम्हांसी ठाउका ॥ ४ ॥
११९३. तुझे पोटीं ठाव । व्हावा
ऐसा माझा भाव ॥ १ ॥ करी वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ २ ॥
अहंकार खोटे । वाटे श्वापदांची थाटे ॥ ३ ॥ तुका म्हणे आई । हातीं धरून संग
देई ॥ ४ ॥
११९४. करीन कोल्हाळ । आतां हाचि सर्वकाळ ॥ १ ॥ आतां ये वो
माझे आई । देईं भातुकें विठाई ॥ २ ॥ उपायासी नाम । दिले याचि पुढें क्षेम ॥
३ ॥ बीज आणि फळ । हेंचि तुका म्हणे मूळ ॥ ४ ॥
११९५. कथेची सामग्री ।
देह अवसानावरी ॥ १ ॥ नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझी पांडुरंगा ॥ २ ॥
आयुष्य करीं उणें । परि मज आवडो कीर्तन ॥ ३ ॥ तुका म्हणे हाणी । या वेगळी
मना नाणीं ॥ ४ ॥
१९९६. करावा वर्षाव । तृषाक्रांत झाला जीव ॥ १ ॥
पाहें आकाशाची वास । जाणता तूं जगदीश ॥ २ ॥ संयोगें विस्तार । वाढी लागतो
अंकूर ॥ ३ ॥ तुका म्हणे फळ । चरणांबुज तें सकळ ॥ ४ ॥
११९७. कंठीं
राहो नाम । अंगीं भरोनियां प्रेम ॥ १ ॥ ऐसें द्यावें कांहीं दान । आलों
पतित शरण ॥ २ ॥ संताचिये पायीं । वेळोवेळां ठेवीं डोई ॥ ३ ॥ तुका म्हणे तरे
। भवसिंधु एका सरें ॥ ४ ॥
१९९८. रणीं निघतां शूर न पाहे माघारें ।
ऐशा मज धीरें राखें आतां ॥ १ ॥ संसारा हातीं अंतरलों दुरी । आतां कृपा
करीं नारायणा ॥ २ ॥ वागवितों तुझिया नामाचें हत्यार । हाचि बडिवार मिरवितों
॥ ३ ॥ तुका म्हणे मज फिरतां माघारें । तेथें उणें पुरें तुम्ही जाणा ॥ ४ ॥
११९९.
नावडावे जन नावडावा मान । करूनि प्रमाण तूंचि होई ॥ १ ॥ सोडवूनि देहसंबंध
व्यसनें । ऐसी नारायणें कृपा कीजे ॥ २ ॥ नावडावें रूप नावडावा रस । अवघी
राहो आस पायांपाशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां आपुलिया सत्ता । करूनि अनंता
ठेवा ऐसें ॥ ४ ॥
१२००. तुजविण देवा । कोणा म्हणे माझी जिव्हा ॥ १ ॥
तरि हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ २ ॥ कांहीं इच्छेसाठीं । करिल वळवळ
करंटी ॥ ३ ॥ तुका म्हणे कर । कटीं तयाचा विसर ॥ ४ ॥
१२०१.
हरिदासाचिये घरीं । मज उपजवा जन्मांतरीं ॥ १ ॥ म्हणसी कांहीं मागा । हेंचि
देगा पांडुरंगा ॥ २ ॥ संता लोटांगणीं । जातां लाज नको मनीं ॥ ३ ॥ तुका
म्हणे अंगीं । शक्ति देईं नाचें रंगीं ॥ ४ ॥
१२०२. रंगी रंगें
नारायण । उभा करितों कीर्तन ॥ १ ॥ हातीं घेऊनियां वीणा । कंठीं राहें
नारायणा ॥ २ ॥ देखिलीसे मूर्ती । माझ्या हृदयाची विश्रांति ॥ ३ ॥ तुका
म्हणे देवा । देई कीर्तनाचा हेवा ॥ ४ ॥
१२०३. हेचि व्हावी माझी आस ।
जन्मोजन्मीं तुझा दास ॥ १ ॥ पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदी हरी ॥ २ ॥
संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा सुकाळ ॥ ३ ॥ चंद्रभागे स्नान । तुका मागे
हेंचि दान ॥ ४ ॥
१२०४. सरलियाचा सोस मनीं । लाजोनियां राहिलों ॥ १ ॥
आवडीनें बोलावितों । येथें तें तों लपावें ॥ २ ॥ माझें तेचि मज द्यावें ।
होतें भावें जोडिलें ॥ ३ ॥ तुका म्हणे विश्वंभरा । आळीकरा बुझावा ॥ ४ ॥
१२०५.
जाणों नेणों काय । चित्तीं धरूं तुझे पाय ॥ १ ॥ आतां हेंचि वर्म । गाऊं
धरूनियां प्रेम ॥ २ ॥ काय सांडूं मांडूं । भावें हृदयींच कोंडूं ॥ ३ ॥ तुका
म्हणे देवा । जन्मोजन्मीं मागें सेवा ॥ ४ ॥
१२०६. काय ऐसा सांगा ।
धर्म मज पांडुरंगा ॥ १ ॥ तुझे पायीं पावे ऐसा । जेणें उगवे हा फांसा ॥ २ ॥
करीं कृपादान । तैसें बोलवीं वचन ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । माझें हृदय वसवा
॥ ४ ॥
१२०७. आतां देवा मोकलिलें । तुम्हीं भलें दिसेना ॥ १ ॥ आतां
नाहीं जीवभाव । उरला ठाव वेगळा ॥ २ ॥ सांभाळून घ्यावें देवा । आपणासवा
यावरि ॥ ३ ॥ तुका म्हणे नग्न भाज । तरि ते लाज स्वामीसी ॥ ४ ॥
१२०८.
आतां पंढरिराया । माझ्या निरसावें भया ॥ १ ॥ मनीं राहिली आशंका ।
स्वामिभयाची सेवका ॥ २ ॥ ठेवा माथां हात । कांहीं बोला अभय मात ॥ ३ ॥ तुका
म्हणे लाडें । खेळें ऐसें करा पुढें ॥ ४ ॥
१२०९. आतां माझ्या भावा ।
अंतराय नको देवा ॥ १ ॥ आलें भागा तें करितों । तुझें नाम उच्चारितों ॥ २ ॥
दृढ माझें मन । येथें राखावें बांधोन ॥ ३ ॥ तुका म्हणे वाटे । नको फुटों
देऊं फांटे ॥ ४ ॥
१२१०. कैसे भले देवा अनुभवा कां नये । उशीर तो काय
तुम्हांपाशीं ॥ १ ॥ आहे तें मागतों दिसतें जवळी । केल्यामध्यें कळि कोण
साध्य ॥ २ ॥ नाहीं सांडीत मी सेवेची मर्यादा । लाविला तो धंदा नित्य करीं ॥
३ ॥ तुका म्हणे हात आवरिला गुंती । माझें तंव चित्तीं नाहीं दुजें ॥ ४ ॥
१२११.
हेंचि जतन करा दान । धरुनि चरण राहिलों ते ॥ १ ॥ घ्यावी माझ्या हातें सेवा
। हेंचि देवा विनवणी ॥ २ ॥ आणीक कांहीं न घालीं भार । बहुत फार सांकडे ॥ ३
॥ तुका तुमचा म्हणवी दास । त्याची आस पुरवावी ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment