Friday, 9 May 2025

लेख-२. तुकाराम गाथेचा इतिहास

 -पुरुषोत्तम मंगेश लाड

१. मराठी भाषेत ज्यांना वेदवाणीप्रमाणें पूज्य मानतात, जे व्युत्पन्न पंडितांच्या तसेंच भोळ्या भाविकांच्या मुखीं सारखेच खेळत असतात, समकालीन बहिणाबाईपासून तों आज तीनशें वर्षे ज्यांच्या 'अनुवादा' नें देशी-परदेशी लोकांचें चित्त नित्य झुरविलें१, त्या तुकारामांच्या अभंगांची ही गाथा मुंबई सरकारतर्फे मराठी वाचकांस सादर केली जात आहे.

२. तुकारामांनी आपले अभंग लिहून ठेविले होते यांत कांहीं शंका नाहीं; पण जनवाद चुकविण्यासाठीं अभंगांच्या ज्या वह्यांचे कागद देवानें उदकीं तारिले असें खुद्द तुकारामांनीच लिहून ठेविलें आहे, त्या वह्यांचें पुढे काय झालें हे सांगणें कठिण आहे. "कोरड्या वह्या निघाल्या उदकी । त्या तरी लुटूनि नेल्या भाविकी । प्रख्यात लोकी व्हावया ।" अशी माहिती महिपतीनें दिली आहे.२ या "निवाड्याच्या" दिवसानंतर तों निर्याणापर्यंत भक्तीच्या व काव्याच्या माधुरीचा ज्यांत परिपाक उतरला होता असे अनेक अभंग तुकारामांनी स्वहस्तें लिहून ठेविले असले पाहिजेत. त्या हस्तलिखितांचाही अद्यापि पत्ता लागला नाहीं. खुद्द तुकारामांच्या घराण्यांत देहूस पूजेंत ठेविलेली अशी त्यांच्या हातची म्हणून जी वही दाखवितांत तींत फक्त २४८ अभंगच आहेत. सारांश, तुकारामांच्या हातचें समग्र लिखाण गेल्या शंभर वर्षांत तपास करून सुद्धां मिळालें नाहीं; व नजीकच्या भविष्यकाळांत तें सांपडेल असा संभव दिसत नाहीं.

३. तुकारामांच्या हयातीतच त्याच्या टाळकरी अनुयायांनी व तसेंच इतर अनेक लोकांनी त्याच्या अभंगांच्या प्रती तयार केल्या होत्या. तुकारामांच्या निर्याणानंतर थोडक्याच वर्षांनीं कचेश्वराला खेटकग्रामी (म्हणजे 'खेड' गांवीं) अशी माहिती मिळाली की "अंबाजीचे घर । तेथें जावें ॥ सर्वही संग्रह तुकोबाच्या वह्या । जावें लवलाहे तुम्ही तेथे३ ॥." हा संग्रह अद्यापि कोणाच्या हाती लागला नाहीं. टाळकऱ्यांत दोन प्रमुख लेखक होते; एक कडूसचा ब्राह्मण गंगाधर मवाळ, व दुसरा चाकणचा संताजी तेली जगनाडे. गंगाधर मवाळ हा "तुकयाचा लेखक निरंतर । प्रासादिक उत्तर लिहितसे ।"; आणि "संताजी तेली बहुत प्रेमळ । अभंग लिहित बैसे जवळ ।" असें त्या दोघांचें महिपतीनें वर्णन केले आहे.४ कडूसास मवाळ घराण्यांतील मंदिरांत ६९९ पानांचें एक हस्तलिखित आहे. तें गंगाधर मवाळाच्या परंपरेवर आधारलेलें आहे. "हस्तअक्षर संताजी तेली जगनाडे, कसबे चाकण" अशी तीन स्थळी नोंद असलेली एक वहीं उपलब्ध झाली आहे; व जिला हस्ताक्षराच्या साम्यावरून त्याच लेखकाच्या हातची म्हणतां येईल अशी दुसरी एक वहीं मिळाली आहे.५ महिपतीनें वार्णिल्याप्रमाणें इतरांनी ज्या प्रती प्रेमानें उतरल्या होत्या त्या ठिकठिकाणीं महाराष्ट्रांत विखुरल्या आहेत. अनेक बाडांत फुटकळ अभंग किंवा प्रकरणें आहेत. समग्र गाथेसारखे संग्रह फार थोडे आहेत.

४. याप्रमाणें लोकांच्या मनावर ज्यांची कायमची छाप बसली होती व जे त्यांच्या मुखांत घोळत होते ते तुकारामांचे अभंग जेव्हां शिळा खिळ्यांनीं छापावयास सुमारे शंभर वर्षांपूर्वी प्रारंभ झाला तेव्हां साहजिकच हाती लागलेल्या बाडांतील कांहीं प्रकरणांनी सुरुवात केली गेली. पांडुरंग बापू जोशी पावसकर यांनी मुंबईत सुरू केलेल्या 'ज्ञानचंद्रोदय' या मासिकांत शके १७६६ म्हणजे इ. स. १८४४ मध्ये (ग्रंथ ५, कागद ३६, ३७), ६५ "अभंग पत्रिकेचे तुकोबाचे" प्रसिद्ध झाले. तत्पूर्वी त्याच पांडुरंग जोशी पावसकर यांनी १८४१-४२ साली ज्ञानचंद्रोदयांतूनच 'गीतार्थबोधिनी' नामक पुस्तक क्रमशः प्रसिद्ध करून ते १८४२ साली संपूर्ण निराळे प्रसिद्ध केलें. या पुस्तकांत तुकारामांचे भगवद्गीतेच्या भाषांतराचे अभंग प्रसिद्ध केले होते; याचें मुख्य कारण हे असावें की, या भाषांतराची स्वतंत्र पोथी त्यावेळीं सहज उपलब्ध होती.६ 'ज्ञानचंद्रोदय' मासिकांत १८४५ साली वस्त्रहरणाच्या २५ अभंगांचे प्रकरण प्रसिद्ध झालें. १८४२ ते १८६२ या वीस वर्षांत तुकारामांचे कांहीं निवडक, कांहीं फुटकळ, कांहीं लोकप्रिय प्रकरणात्मक, असे स्फुट अभंग निरनिराळ्या लोकांनी प्रसिद्ध केलेले आढळतात. तुकारामांचे बरेचसे अभंग अलीकडे मुंबईत छापले आहेत अशी नोंद विल्सनसाहेबाने मोल्स्वर्थच्या कोशाच्या आरंभीं जोडलेल्या जून १८९७ सालीं लिहिलेल्या आपल्या निबंधांत केली आहे.

५. परंतु जिला समग्र गाथा म्हणतां येईल ती छापण्याचा पहिला उपक्रम माधव चंद्रोबा यांनी केला. ही ३३२९ अभंगांची गाथा त्यांच्या 'सर्वसंग्रह' मासिकांत क्रमशः प्रसिद्ध झाली. पहिला भाग १८६२ सालीं, दुसरा १८६४ सालीं, तिसरा १८६६ सालीं व त्यानंतर पुढील दोन भाग मिळून पांच भागांत संपादिलेली गाथा १८६८ साली स्वतंत्र पुस्तकरूपानें प्रसिद्ध झाली. कोपात्या हस्तलिखितांवर ही गाथा आधारलेली आहे याची माहिती मिळाली नाहीं. तथापि प्रस्तुत गाथेतील पाठभेदांशी तुलना करून पाहतां या "सर्वसंग्रही" गाथेचे मूळ हस्तलिखित पंढरपूर परंपरेतील होते असे दिसते. याच सुमारास राबसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्या प्रेरणेनें पंढरपूरच्याच हस्तलिखितांवरून मुंबईतच गणपत कृष्णाजी यांच्या छापखान्यांत दुसरी एक गाथा छापली गेली. ही गाथा दोन भागांत शके १७८९ च्या (इ. स. १८६७) आषाढांत प्रसिद्ध झाली. प्रत्येक भागाच्या आरंभी खालील माहिती दिली आहे- "शके १७८६-८७ [इ. स. १८६४-६५] मध्ये क्षेत्र पंढरपुर एये एका स्नेह्यानें उद्योग करून तुकारामबाबाच्या गाथेची एक प्रत तयार करून पाठविली, व ती सुवाच्य अक्षरानें व चांगल्या शाईनें छापली असतां पुष्कळ वारकरी आदिकरून भाविक लोकांस तिचा उपयोग होईल असें कळविलें. नंतर दुसऱ्या प्रती मिळवून त्यांच्या आधारानें ग्रंथ साद्यंत पाहून, जेथें लेखकाने चुक्या केल्या होत्या असें दिसलें, त्या नीट करून सांप्रत हा ग्रंथ अत्यादरें सादर केला आहे." या दुसऱ्या प्रती कोठून मिळविल्या होत्या, व चुका कोणत्या तत्त्वांप्रमाणें नीट केल्या, याचा कांहींच खुलासा केला नाहीं. तथापि इतके स्पष्ट दिसतें की गणपत कृष्णाजीची ही खिळ्यांनीं छापलेली आवृत्ति सुद्धां पंढरपूर परंपरेंतीलच होती. प्रस्तुत गाथेत पं (छापी प्रत) म्हणून जिचा निर्देश केलेला आहे ती प्रत गणपत कृष्णाजीची आवृत्ति होय.

६. दरम्यान इंग्रजी मिशनऱ्यांचे व सुसंस्कृत इंग्रजी अधिकाऱ्यांचे लक्ष तुकारामांकडे वेधलें होतें; व त्यांनी तुकारामांचा चांगला अभ्याही केला होता. लोकांना "तुकारामनिर्मित सेतूवरुनी" "खिस्तचरणीं" नेतां येईल असा पुढें रे. नारायण वामन टिळकांप्रमाणें त्याकाळींही मिशनऱ्यांचा समज झाला होता. काहींची अंतर्यामी अशी खात्री होती की तुकारामांत रंगलेल्या मनाला खिस्ताकडे वळण्याची जरूरच भासणार नाहीं. कसेंही असो, इंग्रजांनी तुकारामांच्या अभंगांची व त्यांच्या चरित्राची देखील भाषांतरे छापावयास सुरुवात केली होती. मरे मिचेल या महाराष्ट्रात मुरलेल्या मिशनऱ्यानें महिपतीच्या तुकारामचरित्राचा इंग्रजी गोषवारा आपल्या प्रस्तावनेसह १८४९ साली मुंबईच्या रॉयल एशिआटिक सोसायटीच्या 'जर्नल'मध्ये छापिला. या मिशनऱ्याचा तुकारामांचा व्यासंग इतका गाढ होता की त्याला स्वतः मराठींत अभंग रचितां येऊ लागले. त्यानंतर त्यावेळचे डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन सर अलेक्झांडर ग्रँट या साहेबानें, जानेवारी १८६७ च्या 'फॉर्टनाइटलि रिव्ह्यू'मध्ये तुकारामांवर एक निबंध प्रसिद्ध केला. इंग्रजांना तुकारामाची यथायोग्य ओळख करून द्यावी हा त्या निबंधाचा हेतु होता. निबंधांत ग्रँटसाहेबानें तुकारामांच्या कांहीं निवडक अभंगांची पद्यात्मक भाषांतरें दिली होती. ग्रँटसाहेबाची तुकारामांवर किती भक्ति होती हे त्या निबंधांतील खाली दिलेल्या एक दोन (भाषांतरित) वाक्यांवरून स्पष्ट होतें. "तुकारामाच्या अभंगांची डेव्हिडच्या गीतांशी (Psalms) तुलना टाळतां येणें शक्य नाहीं. हे अभंग म्हणजे देवाच्या सतत सांनिध्यांत असलेल्या हृदयाचे निरनिराळ्या प्रसंगी आणि वेगवेगळ्या भावनांच्या आवेशात, पक्ष्यांच्या कूजिताप्रमाणें सहज गाइलेले उद्गार होत..... ज्यांच्या मुखी तुकारामांची वाणी वसत आहे त्यांनां नैतिकदृष्टया ख्रिस्तीधर्म श्रेष्ठ आहे हें पटवून देणें दुरापास्त आहे."

७. सर बार्टल फ्रिअर हे मुंबईचे गव्हर्नर असतांना याच ग्रँटसाहेबाच्या प्रेरणेनें त्या वेळच्या मुंबई सरकारनें तुकारामांची संशोधित आवृत्ति तयार करून प्रसिद्ध करण्याचे ठरविलें. संपादनाचे काम संस्कृत व मराठी भाषांत पारंगत असलेले वे. शा. सं. विष्णु परशुराम शास्त्री पंडित७ यांजवर सोपविण्यांत आलें व संस्कृत-प्राकृत भाषांचे तज्ज्ञ, वैदिक विद्वान्, सुप्रसिद्ध पंडित, शंकर पांडुरंग पंडित, त्या वेळचे दक्षिणा प्राइझ कमिटीचे चिटणीस, ह्यांची त्या संपादनावर देखरेख होती. ही गाथा इंदुप्रकाश छापखान्याच्या मालकांनीं मुंबई सरकारच्या आश्रयानें छापून दोन भागांत प्रसिद्ध केली. पहिला भाग १८६९ साली व दुसरा भाग १८७३ साली प्रसिद्ध झाला. या कार्याकरितां. मुंबई सरकारने त्यावेळीं चोवीस हजार रुपये खर्च केले होते व त्याचा फार बोलबालाही झाला. त्याचा मासला म्हणून निबंधमालेतील विष्णुशास्त्री चिपळुणकरांच्या लिखाणांतील खालील उतारा मोठा मनोरंजक वाटेल. " असे होतां होतां कांही काळानें....... जो बिचारा शूद्रकवि आपल्या लंगोटेबहादर व घोंगडीवाल्या भक्तमंडळीतच काय तो रमायाचा, किंवा फार झालें तर हरदासांच्या कथाप्रसंगीं सत्कार पावायाचा, त्यास एकाएकी आरबी गोष्टींतील अबू हसनासारखें मोठे ऐश्वर्य प्राप्त झालें ! इंदुप्रकाश मुद्रणयंत्रालयांतील मुक्ताफळे आंगभर उधळलेलीं, महावस्त्रांत शरीर लपेटलेलें, व युनिव्हर्सिटीचे शानदार झगे घातलेले तरुण विद्वान् डोक्यावर मोर्चेलें उडवताहेत व चवऱ्या ढाळताहेत अशा थाटानें तुकाराम महाराज फारा दिवसांनीं आपल्या अभिधानाची सार्थता पावून विराजमान झाले. महाराष्ट्र देशाच्या पहिल्या अधिपतीनें पाठविलेलें ऐश्वर्य परत लावून वरील कवींनें जी आपली हानि करून घेतली होती, तिची भरपाई दोन शतकांनंतर त्याच देशाच्या परद्वीपस्थ प्रभूनें करण्याचें मनांत आणिलें की काय कोण जाणे! असाे झाली ती गोष्ट बरीच झाली."८

८. ही गाथा "शंकरपांडुरंगी", "पंडितांची", "इंदुप्रकाश" किंवा "सरकारी " या नांवांनी ओळखिली जाते. यापूर्वी प्रसिद्ध झालेले अभंग व गाथा ह्या मुख्यत्वें पंढरपुरांतील प्रचलित पाठाच्या परंपरेवर आधारलेल्या होत्या. पंडितांच्या गाथेत प्रथमच तुकारामांच्या प्रदेशांतील म्हणजे देहूच्या परिसरांतील हस्तलिखितें तपासून संख्या, पाठ व क्रम ठरविण्यांत आले. देहू भागांतील व पंढरपूर परंपरेंतील असे दोन्ही पाठ तपासून गाथेचे संपादन केलें हेंच ह्या गाथेचे खरें वैशिष्ट्य होय. आजतागायत हा असा एकच प्रयत्न झाला की संपादकांनीं महत्त्वाच्या सर्व उपलब्ध हस्तलिखितांतील पाठक्रमादि तपासून संशोधित संहिता तयार केली. संपादकांनीं कोणतीं हस्तलिखितें तपासलीं, व कोणत्या पद्धतीला अनुसरून काम केलें, याचा थोडक्यांत गोषवारा९ येथे दिला पाहिजे.

९. संपादकांपाशीं चार हस्तलिखितें होतीं. तीं येणेंप्रमाणे: (१) देहू प्रत; हिचा निर्देश "दे" या अक्षरानें केला आहे. ही प्रत खुद्द तुकारामांच्या घराण्यांतून मिळविली होती, व त्या घराण्यांत वंशाचें धन म्हणून ती जतन करून ठेविली होती. तुकारामांचा ज्येष्ठ पुत्र महादेवबावा याच्या हातची ही प्रत होती असें संपादकांस सांगण्यांत आलें होतें व म्हणून (त्या वेळीं) ती दोनशें वर्षांपूर्वीची असावी असें त्यांस वाटलें. (२) तळेगांव प्रत; हिचा निर्देश "त" या अक्षरानें केला आहे. ही त्रिंबक कासार याच्या हातची होती. या त्रिंबक कासारानें तुकारामांचे व इतर विठ्ठलभक्तांचे अभंग गोळा करून ते सुव्यवस्थित रीतीनें लिहून काढण्यांत आपल्या आयुष्याचीं चाळीस वर्षे खर्ची घातलीं होतीं. या प्रतींत १७०९ शकेची (इ. स. १७८७) नोंद होती. (३) पंढरपूर प्रत; हिचा "पं" या अक्षरानें निर्देश केला आहे. पंढरपुरांतील एका मठाचे अधिपति गंगूतात्या यांनीं ही प्रत स्वतः शुद्ध केली होती व इतर मठाधिपतींकडून ती आणखी शुद्ध करून घेतली होती. ही गाथेची आधुनिक प्रत होती. (४) कडूस प्रत; हिचा निर्देश "क" या अक्षरानें केला आहे. कडूसचें ब्राह्मण घराणें मवाळ यांजकडून ही प्रत मिळविली होती, पण संपादकांना ती फार वेळ ठेवतां आली नाहीं. वर परिच्छेद ३ मध्यें उल्लेखिलेला तुकारामांचा टाळकरी लेखक गंगाधर मवाळ याच्या हातची ही प्रत होती असें संपादकांस सांगण्यांत आलें होतें.

१०. देहू आणि तळेगांव या प्रतींची मूळपीठिका एकच असें संपादकांस आढळून आलें. दोन्ही प्रतींत अभंगांचा क्रम एकच होता; व ज्या स्थळीं तो मूळांत भिन्न होता त्या स्थळीं देहू प्रतींत दुरुस्ती करून तळेगांव प्रतींतील क्रम स्वीकारिला होता. असें असलें तरी देहू प्रत किंवा तळेगांव प्रत ह्या एकमेकींच्या नकला मात्र नव्हत्या. कडूस प्रतींतील क्रम आणि शुद्धलेखन इत्यादि देहू प्रतीप्रमाणेंच होतें. ज्या हस्ताक्षरांत कडूस प्रत बहुतांशी लिहिलेली होती, तेंच हस्ताक्षर कधींकधीं देहू प्रतीत आढळलें; तर ज्या हस्ताक्षरांत देहू प्रत बहुतांशी लिहिलेली होती तें हस्ताक्षर कधींकधीं कडूस प्रतींत आढळलें. या कारणांमुळे संपादकांस असें दिसून आलें की देहू व कडूस प्रतींचे लेखक समकालीन असले पाहिजेत; व या प्रती अनुक्रमें महादेवबावा व गंगाधर मवाळ - जे दोघे समकालीन होते- यांनी लिहिल्या होत्या ह्या परंपरागत माहितीला पुष्टि मिळाली. पंढरपूरच्या प्रतीची मूळपीठिका अगदी भिन्न होती. देहू व तळेगांव प्रतीतील क्रमापेक्षां पंढरपूर प्रतींतील अभंगांचा क्रम बराच भिन्न होता; व तिच्या पाठांतही पुष्कळ फेरफार आढळले, ती प्रत अगदी अलीकडील होती; व मधूनमधून मूळच्या अभंगांना आधुनिक स्वरूप दिलें होतें. एकंदरीत देहू व तळेगांव प्रतींपेक्षां पंढरपूर प्रत कमी शुद्ध होती.

११. संपादकांनी तळेगांव प्रतीचा अभंगक्रम स्वीकारिला; कारण तो त्यांना अस्सल वाटला व देहू प्रतींत सुद्धां दुरुस्त्या करून तोच क्रम आदरिला होता. कडूस प्रतींतील क्रम देखील देहू प्रतीसारखाच होता. पाठाचा निर्णय करितांना देहू, तळेगांव व पंढरपूर या तीन प्रतींपैकी अधिक प्रतींत जो पाठ मिळाला तो शक्य तोंवर संपादकांनी स्वीकारिला; व जो स्वीकारिला नाहीं तो तळटीपेंत नमूद करून ठेविला. जोंवर कडूस प्रत उपलब्ध होती तोंवर पाठनिर्णयाकरितां तीही प्रत वापरण्यांत आली होती. कचित् स्थळी एकाच प्रतींतला पाठ संपादकांना ग्राह्य वाटला; कारण इतर पाठ एक तर अर्थशून्य होते, किंवा ते लेखकाच्या हस्तदोषामुळे उद्भवले होते. तथापि हे न स्वीकारिलेले पाठ सुद्धां तळटीपांत नमूद करून ठेविले आहेत. वादग्रस्त स्थळीं निर्णय करतांना देहू प्रतीला जास्त महत्त्व देण्यांत आलें; कारण पाठ आणि शुद्धलेखनाच्या बाबतींत ती सर्वांत अधिक शुद्ध होती. संपादकांनी असा शेरा मारिला आहे की, जुनीं मराठी हस्तलिखितें एकंदरीत जीं अशुद्ध लिहिलेली असतात त्या मानानें देहूची प्रत बरीच शुद्ध होती. कित्येक स्थळी पंढरपूर प्रतीचे पाठ अर्थशून्य होते किंवा भलताच अर्थ प्रतीत करीत, तर देहू प्रतींतील पाठ अगदीं अन्वर्थक होते.

१२. शब्द तोडून व शुद्धलेखनाच्या सर्वमान्य नियमांना अनुसरून संपादकांनीं गाथा छापिली. देहू प्रत, व अभंग म्हणण्याची वारकऱ्यांत मान्य झालेली "संहिता" पद्धति, ह्यांची शुद्धलेखनाला अनुकूलता होतीच असें संपादकांचें म्हणणें आहे. तरी पण तुकारामांचे विशिष्ट प्राकृत शब्द व संस्कृत शब्दांचे अपभ्रंश त्यांनीं जसेच्या तसेच ठेविले. सरतेशेवटी संपादकांनीं असे नमूद केलें आहे कीं, शब्द किंवा अभंग जरी अश्लील भासला तरी तो न गाळतां तुकारामांचे लिखाण मूळाबरहुकूम छापावयाचे ठरलें होतें; व या बाबतींत डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन यांची सल्ला घेतली जात असे, कारण शेवटचा निर्णय सरकारनें त्यांजवर सोंपविला होता.

१३. येणेंप्रमाणें उपलब्ध हस्तलिखितांवरून तारतम्यानें, पण तुकारामांच्या मूळ लिखाणांत ढवळाढवळ न करतां, गाथेची ही आवृत्ति तयार करण्यांत आली. अभंगांचा क्रम-ज्याला "ओळ" म्हणतात तो- देहू, तळेगांव व कडूस ह्या प्रतीत सारखाच होता, व म्हणून तो स्वीकारण्यांत आला. मूळाप्रमाणें अभंगांचे जेथें गट होते तेथे त्या गटांतील संख्या गटाच्या शेवटीं आंकडे घालून दर्शविली आहे. क्रम फिरवून विषयवारीप्रमाणें, कांही आधुनिक छापील गाथ्यांत केलें आहे त्याप्रमाणे, वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला नाहीं. प्रतींच्या बहुमतानें, किंवा कांहीं स्थळी सरस म्हणून, पाठ निवडलेले असले तरी यच्चयावत् पाठांची तळटीपांत नोंद आहे; म्हणजे अभ्यासकाला स्वतःची निवड करण्यास वाव ठेविला आहे. सर्व सांप्रदायिक परंपरांचा या गाथेत समावेश झाला आहे. वारकऱ्यांतील विशिष्ट फडाच्या किंवा सांप्रदायाच्या सर्वच अभिमान्यांना ही शंभर टक्के मान्य होणें अर्थातच शक्य नव्हतें; तथापि त्या काळी वारकऱ्यांत प्रमुख मानले जाणारे भाऊ रामचंद्र काटकर सोलापुरकर यांनी ही गाथा देहू मुक्कामी पाहून ती शुद्ध आहे व सर्वांनी घेण्यास योग्य आहे असें स्वदस्तुरचे प्रमाणपत्र दिलें होतें.१०

१४. अनाग्रही अभ्यासकांनी या गाथेचा आजवर गौरवच केला आहे. वानगीदाखल तीन-चार प्रातिनिधिक अवतरणे या ठिकाणी उद्धृत करणें अप्रस्तुत होणार नाहीं. सुप्रसिद्ध संशोधक श्री. दत्तो वामन पोतदार यांच्या मतें "आज बाजारांत शंकरपांडुरंगी उर्फ जुनी इंदुप्रकाशी, नवी इंदुप्रकाशी, आवटी, सांप्रदायिक आर्यभूषणी, जोगी, माडगांवकरी, निर्णयसागरी वगैरे संहिता मिळतात. त्यांत शंकरपांडुरंगी प्रत सर्वांत वाखाणण्यासारखी आहे, व बाकीच्या संहिता या जुन्या इंदुप्रकाशी गाथ्याच्याच बहंशीं नकला आहेत व राहिलेल्या कांहीं मात्र सांप्रदायिक आहेत.११" पांगारकरांनी आपल्या तुकारामचरित्राच्या प्रस्तावनेत "छापील गाथ्यांत हाच गाथा सर्वोत्तम आहे" असें म्हटलें आहे. तुकारामांच्या इंग्रज अभ्यासकांनी हीच गाथा प्रमाणभूत मानून तिचेंच भाषांतर केलें. तुकारामांचा इंग्रजी चरित्रकार एड्वर्ड्ससाहेब यानें या गाथेचे "सर्वजनमान्य" असे वर्णन केलें आहे.१२ सरतेशेवटी ज्यांनी परिच्छेद ३ मध्यें वर्णिलेल्या संताजी तेली जगनाड्यांच्या वही बरहुकूम "तुकारामबुवांचा अस्सल गाथा" छापिला त्या साक्षेपी संशोधक श्री. विनायक लक्ष्मण भांवे यांना या गाथेवर कठोर टीका करतांना सुद्धां असे कबूल करावे लागले की, एकंदरीच्या मानानें फार मेहनतीनें, काळजीपूर्वक निरनिराळे पाठभेद देऊन ही गाथा तयार केली आहे.१३

१५. स्वतः छापिलेल्या गाथेच्या "अस्सलपणाच्या" अभिनिवेशाच्या भरांत भाव्यांनी प्रस्तुत गाथेवर जी निराधार व बह्वंशी विपर्यस्त टीका केली आहे तिचें येथे निराकरण करणें क्रमप्राप्त आहे. कारण या गाथेविषयी त्यांनी निर्माण केलेले गैरसमज अवश्य दूर केले पाहिजेत. भाव्यांचे असें म्हणणे आहे की "प्रस्तावनेंत शेवटच्या वाक्यांत उल्लेखिलेल्या सरकारी सूचनेची म्हणजे faithfully to reproduce the text of Tukáráma and not to leave out any word or verse, even where it appeared indecent या इषारतीची खोंच या संपादकांच्या मुळींच लक्षांत आलेली दिसत नाहीं. शक्य तो यत्न करून तुकारामांच्या कवनाचे अस्सल वळण, तें कसेंहि असले तरी, तसेच कायम ठेवावयाचें ही महत्त्वाची बाब लक्षांत न घेतां, हाती आलेल्या प्रती आपल्या अकलेप्रमाणें मखलाशी लढवून "शुद्ध करण्याच्या" भानगडींत हे संपादक पडले आहेत. या कारणानें अस्सलपणाच्या दृष्टीने हा ग्रंथ किती कवडीमोल झाला आहे हे ज्याला शिवकालीन मराठी हस्तलेखांचा थोडासा तरी परिचय आहे त्याच्या सहज लक्षांत येईल." तसेंच भावे पुढें म्हणतात की, "आतां ही गाथा ज्या रूपांत छापली गेली आहे त्याबद्दल इतकेंच म्हणावयाचे आहे की, यांतील शब्द व शब्दांची रूपें पार पालटून अर्वाचीन केलीं गेलीं आहेत. तसेंच या प्रतीच्या प्रकाशकांनी मूळ अभंगांचे लेखनहि आपले समजुतीप्रमाणें सुधारून व दुरुस्त करून शुद्ध केले आहे." भावे जिला सरकारी सूचना किंवा इषारत म्हणतात ती तशी नसून सरकारनें ज्यांच्यावर निर्णय सोपविला होता त्या डायरेक्टरांच्या सल्ल्यानें संपादकांनींच ठरविलेलें धोरण होतें हे मूळ वाक्यावरून स्पष्ट होतें. या धोरणाची खरी "खोंच" अश्लील समजल्या जाणाऱ्या भागाविषयीं होतीं. शंकर पांडुरंग पंडित हे कांहीं साधेसुधे पदवीधर नव्हते. हस्तलिखितांवरून संहिता कशी तयार करावयाची याची शास्त्रशुद्ध पद्धति त्या काळीं त्यांच्या इतकी फारच थोड्या विद्वानांना अवगत असेल हे त्यांनीं संस्कृत, प्राकृत, वैदिक ग्रंथांच्या ज्या अनेक संहिता तयार केल्या त्यांवरून जगजाहीर झालें आहे. शिवाय ग्रँटसाहेबासारख्या तुकारामप्रेमी व्यासंगी अधिकाऱ्यानें सरकारी "सूचनेचा" अनादर होऊ दिला नसता. हस्तलिखितांतले शब्द व रूपें पालटलीं, किंवा मूळ अभंगाचें लेखन आपल्या अकलेप्रमाणें मखलाशी लढवून सुधारून व दुरुस्त करून "शुद्ध" केलें असें संपाद‌कांनी कोठेंच म्हटलें नाहीं; व मूळचीं हस्तलिखितें समोर नसल्यामुळे भाव्यांच्या ह्या विधानाला संपादकांच्या म्हणण्याखेरीज दुसरा आधार असणें शक्य नाहीं. मराठी मुखपृष्ठावरील "विष्णु परशुराम शास्त्री पंडित यांनीं शंकर पांडुरंग पंडित यांच्या साह्यानें शुद्ध करून छापण्याकरितां तयार केली" या मजकुरांतील "शुद्ध करून" या शब्दप्रयोगानें भाव्यांनी आपला निष्कारण गैरसमज करून घेतला आहे. "शुद्ध करून छापण्याकरितां तयार केली" हा शब्दप्रयोग इंग्रजी मुखपृष्ठावरील "edited" या शब्दाचा समानार्थक म्हणून वापरिला आहे हें उघड आहे.१ ह्याचा अर्थ असा नव्हे की भाव्यांना वाटलें त्या तऱ्हेच्या दुरुस्त्या, सुधारणा, फेरफारादि उलटापालटी संपादकांनीं केल्या. शब्द तोडले व सर्वमान्य शुद्धलेखनाचे नियम पाळले हे संपादकांनी जाहीर केलें आहे; व त्याचे कारणही त्यांनी दिलें आहे ते हे की, देहू प्रत व वारकऱ्यांतील प्रमुखांनीं मान्य केलेली अभंग म्हणण्याची 'संहिता' पद्धति हीं दोनही शुद्धलेखनाच्या नियमांना अनुकूलच होतीं. तरी पण संपादकांनी स्पष्ट खुलासा केला आहे की तुकारामांचे विशिष्ट प्राकृत शब्द व संस्कृत शब्दांचे अपभ्रंश जसेच्या तसेच ठेविले आहेत. तळटीपांकडे लक्ष दिलें असतां हे सहज कळेल की संपादकांनीं बारीकसारीक सुद्धां फेरफार करण्याचे टाळलें आहे. संताजीच्या वहींतलें शुद्धलेखन म्हणजेच तुकारामांचे शुद्धलेखन, व तें शिवरकालीन आदर्शलेखन, हीं समीकरणेंच आधी चुकीची आहेत; व तसल्या लेखनांच्या अभावी संहिता कवडीमोल ठरवावयाची असेल तर आज प्रचलित असलेले एकनाथी भागवत, वामनी ग्रंथ, व बह्वंशी रामदासी ग्रंथ हातांतच धरावयास नकोत. तुकाराम हे अडाणी होते व त्यांना शुद्ध लिहितां येत नसे म्हणून त्याचें अस्सल लिखाण शुद्धलेखनाला अनुसरून असणेंच असंभवनीय असें जर भाव्यांना सुचवारावयाचे असेल तर गोष्ट निराळी. "घे गे बाइले लिहिलें" इत्यादि अभंग व "बालबोध अक्षरें लिहावीं पाहीं । हा मागें अभ्यास नव्हता कांहीं । कोऱ्या कागदांची करूनि वहीं । स्वमती लिही आपुल्या ।" हे महिपतीचें अवतरण तळटीपांत देऊन सुद्धां "तुकारामांस लिहितां येत होतें हे अगदीं निःसंशय आहे, परंतु स्वतःचेंच कवित्व तो लिहून ठेवीत असेल असें वाटत नाहीं," ह्या भाव्यांनीं काढिलेल्या निष्कर्षाएवढाच तुकारामांच्या शुद्धलेखनाविषयींचा त्यांचा तर्क अप्रतिष्ठ आहे. अंब्रुत, नारायेण, काये, दरुषण इत्यादि रूपें तशींच न छापल्यामुळे शिवकालीन सोवळ्या पंक्तित भ्रष्टाकार होतो असें वाटत नाहीं. परमाणूचा पर्वत करण्यासारखे हे कांहीं- पांगारकरांचा शब्द योजावयाचा म्हणजे- "डोंगराएवढे" फेरफार नाहींत. शिवाय हें ध्यानांत ठेविलें पाहिजे की तुकारामांचे अभंग कांही पढिक विद्वानांकरितां बंदिस्त पुस्तकांत बंदींत घालून ठेविलेले नव्हते. ते पाठ म्हणण्याची वारकऱ्यांत अखंड परंपरा होती. ह्या "संहिता" परंपरेचें महत्त्व ओळखून तिला अनुसरून शुद्धलेखन छापिले यांत संपादकांनी संशोधनाचा अपराध केला असें म्हणतां येणार नाहीं. सारांश, प्रस्तुत गाथेत संपादकांनी तुकारामांचीं अस्सल शब्द-रूपें अबाधित राखिलीं आहेत; व त्यांनीं मूळ अभंगांचे लेखन सुधारिलें किंवा दुरुस्त केलें हा भाव्यांचा अवास्तव आरोप सर्वस्वीं निराधार आहे.

१६. भाव्यांनीं असेंही भासवावयाचा उठावदार प्रयत्न केला आहे की ज्या देहू, तळेगांव, व कडूस प्रतींवर ही गाथा आधारिली आहे त्या प्रतीच मुळीं अलीकडल्या होत्या. आपला नाहक गैरसमज करून घेतल्यामुळे त्यांना हा आभास झाला. देहू आणि तळेगांव या दोनही प्रती दुर्दैवानें आज उपलब्ध नसल्यामुळे त्या स्वतः तपासून अनुमानें काढणें अशक्य झालें आहे. "असें सांगतात, " "असें दिसतें, " इत्यादि सावधगिरीचे शब्द योजून शंकर पांडुरंग पंडितासारख्या संशोधकानें या प्रतींचें जें वर्णन केलें आहे तें यथातथ्य मानून आपण परमार्थानेंच घेतलें पाहिजे. भाव्यांच्या तर्कालाही त्या व्यतिरिक्त दुसरा आधार नव्हता. देहू प्रत ही तुकारामांच्या हयातीतच लिहिली होती असें विधान संपादकांनीं कोठेच केलें नाहीं. महादेवबाबांचें वय लक्षांत घेतां ती प्रत तुकारामांच्या निर्याणानंतरच केली असली पाहिजे हें उघड आहे. ती महादेवबाबांच्या हातची नसून अगदी अलीकडील व फार कमी दर्जाची होती हें शाबीत करण्याकरितां भाव्यांनी खालील कारणें दिलीं आहेत (१) "महादेवबाबाचा विशेष ओढा भक्तिमार्गाकडे होता असें दिसत नाहीं." (२) "महादेवबावानें तुकोबाचे अभंग लिहिलेले असते तर महिपतीला ही गोष्ट खास कळली असती, व तो तसा उल्लेख आपल्या ग्रंथांत अवश्य करता.” (३) "या देहू प्रतीसंबंधी संपादक आणखी असे लिहितात की, ही प्रत एकाच हस्ताक्षरानें लिहिलेली नसून हींत एकापेक्षां जास्त अशी भिन्न भिन्न हस्ताक्षरे आढळतात. शिवाय या प्रतींतील शब्द तोडलेले आहेत (words have been separated by spaces) आणि हिचे लिखाण शुद्धलेखनाच्या (इ. स. १८६९ मधील ) सर्वमान्य नियमांप्रमाणें बिनचूक आहे. मला वाटतें की, या वर लिहिलेल्या बाबी ही वही अगदी अलीकडली आहे हें निभ्रांतपणें सिद्ध करण्यास पुरेशा आहेत." (४) "एकंदरीत ही देहूची हस्तलिखित प्रत एक-हातानें लिहिलेली नसून तींत एकापेक्षां जास्त वळणे आहेत, असें संपादक लिहितात. शिवाय या प्रतींत दुरुस्त्याहि केलेल्या आहेत. म्हणजे मूळ प्रत अगदी निर्भेळ अस्सल व शुद्ध नसून तींत दुरुस्ती करणें हे त्या लेखकास अवश्य वाटलें होतें. या अशा अंतःस्थ बाबीवरून या गाथेच्या संपादकांस देहू येथे मिळालेली प्रत बावनकशी नसून फार कमी दर्जाची होती हें उघड दिसते."

१७. या चार मुद्यांपैकी दोन केवळ वादाकरितां उपस्थित केलेले अतएव फोल, आणि दोन केवळ विपर्यस्त समजामुळे उद्भवलेले म्हणून गैरलागू आहेत. तुकारामांनी मुलांना संपत्तीचा वारसा कांहीं ठेविला नव्हता. पण ज्या अमोलिक काव्यसंपत्तीची कीर्ति सगळ्या महाराष्ट्रभर पसरली होती तिचा "ज्येष्ठभाग" म्हणून तरी महादेवबाबांनी स्वतःची प्रत तयार करणे यांत अस्वाभाविक असें कांहींच नाहीं. भगवद्भक्तीपेक्षां पितृभक्तीच्याच प्रेरणेनें हे कार्य कोणाही सुपुत्रानें केलें असतें. या गोष्टीचा महिपतीने उल्लेख करावा अशी भाव्यांची अपेक्षा कां होती हें कळत नाहीं. तुकारामांच्या हयातींत टाळकरी व लेखक म्हणून जे त्यांची सेवा करीत त्यांचाच महिपतीनें उल्लेख केला आहे. महादेवबाबा हे तुकारामांचे लेखकु होते असे संपादकांचे, नव्हे कोणाचेंच, म्हणणें नाहीं. तुकारामांच्या निर्याणानंतर त्यांच्या लिखाणाच्या प्रती कोणी उतरून काढिल्या या विषयाकडे महिपतीला लक्ष देण्याचें प्रयोजनच नव्हते. भाव्यांनीं वर दिलेल्या तिसऱ्या मुद्याची उभारणी संपादकांच्या इंग्रजी निवेदनाच्या विपरीत समजावर केली आहे. देहू प्रतींत शब्द तोडलेले आहेत व तिचे लिखाण (संपादनकाळांतील ) प्रचलित शुद्धलेखनाच्या सर्वमान्य नियमांप्रमाणें बिनचूक आहे हें वर्णन संपादकांच्या अंगी चिकटविण्यांत भाव्यांनी केवळ अन्याय केला असे म्हणण्यापेक्षां इंग्रजी वाक्यप्रणालीचा अर्थ त्यांच्या ध्यानीं आला नाहीं असें म्हणणें कदाचित् अधिक न्याय्य होईल. हें वर्णन गाथेच्या छपाईचे आहे, देहू प्रतीचे नव्हे, हे उघड आहे; व "देहू प्रत व अभंग म्हणण्याची वारकऱ्यांची 'संहिता' पद्धति ह्या दोहोंची शुद्धलेखनाला अनुकूलती होती" या लगेच पुढें आलेल्या वाक्यानें ते आणखी स्पष्ट केलें आहे. तसेच एकापेक्षां जास्त अशीं भिन्न भिन्न अक्षरें देहू प्रतींत आढळतात हें विधान अतिव्याप्तीनें दूषित झाले आहे. संपादकांनी एवढेच नमूद केले आहे की, देहू प्रतीच्या लेखकाचें हस्ताक्षर कर्धीकधी कडूस प्रतीत व कडूस प्रतीच्या लेखकाचे हस्ताक्षर कधीकधी देहू प्रतींत आढळतें. हस्ताक्षरांचा हा अन्योन्यसंबंध लेखकांचे समकालीनत्व दाखविण्यासाठी सांगितला आहे. देहू प्रतीत अभंगांच्या क्रमांत दुरुस्त्या केल्या आहेत त्या मूळ लेखकाच्या हस्ताक्षरांत आहेत किंवा कसें हे संपादकांनी सांगितलें नाहीं. कदाचित् तळेगांव प्रतीला अनुसरून त्या मागाहून केल्या असें जरी गृहीत धरलें तरी तेवढ्यानें मूळ लिखाणाच्या प्राचीनत्वाला बाध येत नाहीं. त्रिंबक कासारानें संशोधनाचे परिश्रम करून ठरविलेला अभंगक्रम देहू प्रत ज्यांनीं जतन करून ठेविली होती त्यांना अधिक ग्राह्य वाटला असेल. आपण तळेगांव प्रतीचा क्रम स्वीकारिला, व तो देहू प्रतीच्या मूळच्या क्रमापेक्षां कांहीं स्थळीं भिन्न होता, हे संपादकांनी स्पष्ट केलें आहे. पण त्यामुळे देहू प्रतीचा अस्सलपणा गौण कसा होतो व तिचा दर्जा कमी कसा ठरतो हें समजत नाही. असो. संपादकांनीं ही प्रत नक्की महादेवबावांच्या हातचीच होती असा दावा छातीठोकपणे मांडला नाहीं. तुकारामांच्या वंशांत ती जतन करून ठेविली होती या गोष्टीचें महत्त्व आपण विसरतां कामा नये. निजधनाचा अभिमान धरणाऱ्यांनी सुद्धां ती तुकारामांच्या नांवावर खपविण्याचा प्रयत्न केला नाहीं. संपादकांना गंगाधर मवाळाच्या प्रतीशीं ती समकालीन दिसली. अशा परिस्थितींत कुळांत चालत आलेली परंपरा खोटी म्हणून दूर सारण्यास प्रबळ प्रमाणें पाहिजेत.

१८. कडूस प्रतीविषयी सुद्धां भाव्यांनी वरील प्रकारचींच चुकीचीं व संशयग्रस्त विधानें केलीं आहेत. ती प्रत गंगाधर मवाळाच्या हातची समजली जात असे. हें पुरें माहीत असून सुद्धां "कडूस येथील कोणा मवाळ नांवाच्या ब्राह्मण कुटुंबांतील" असें आरंभींच तिचें वर्णन करून पहिल्या भेटीलाच ओळख न दाखवून तिची प्रतिष्ठा कमी करण्याचा भाव्यांनी प्रयत्न केला आहे. पुढें त्या प्रतीचा विस्तारानें विचार करतांना जी संशयखोर आणि मोठीं चमत्कारिक विधानें भाव्यांनी केलीं आहेत, त्यांचा मुख्य हेतु हाच दिसतो की स्वतः पुरस्कृत केलेल्या संताजीपेक्षां तुकारामाचा लेखक म्हणून श्रेष्ठ मानला गेलेला जो गंगाधर मवाळ त्याच्या लिखाणाचा प्रस्तुत गाथेनें थोडासा घेतलेला आधारही हिरावून घ्यावा. भावे म्हणतात "चौथी म्हणजे कडूस येथील प्रत. ही चौदा टाळकऱ्यांपैकी गंगारामबुवा मवाळ यांचे येथील प्रत होय. प्रत म्हणण्यापेक्षां "एक वही" असें म्हणणें सत्याला जास्त धरून होईल. कारण संपादकांना सर्व वह्या न मिळतां मवाळाकडून एकच वही, आणि तीहि कांहीं दिवस, मिळालेली दिसते. हिचा भाग १ पृ. ७४२ अभंग २२४७ या छापील गाध्याच्या दोन्ही भागांत मिळून पृ. १२९ ते पृ. ३२४ म्हणजे सुमारें दोनशें पृष्ठांपुरताच अधून मधून कांहीं पाठभेद दाखल करण्यापुरता उपयोग केलेला दिसतो.१५ पण संपादकांच्या म्हणण्याप्रमाणें त्यांना मिळालेल्या कडूस येथील वहींतील अक्षराचे वळण सर्वभर येथून तेथून एक नसून कांहीं ठिकाणी मिन्न भिन्न आहे. म्हणजे हीहि प्रत गंगाधरबुवा मवाळ यांचेच हातची अस्सल असेल असे दिसत नाहीं. मवाळांच्या येथे असलेल्या वहीला अजूनहि ते ओंवळ्यानें शिवू देत नाहींत. तेव्हां त्यावेळीं तरी त्यांनी त्यांच्या येथील अस्सल प्रत या संपादकांचे स्वाधीन केली असेल असें मुळींच वाटत नाहीं. फार तर एखादी नक्कल त्यांनी कांही दिवस दिली असावी. कोणी सरकारी नोकरामार्फत हस्तलेख मिळविण्याचा यत्न केला असतां महाराष्ट्रांत काय काय प्रकार घडतात् याचा अनुभव संशोधकांना आहेच. मवाळांच्या प्रतीसंबंधे पुढे थोडें लिहावयाचें आहेच. तेव्हां तूर्त इतकेंच म्हणून ठेवतों की, मवाळांकडील अस्सल प्रत या गाथेच्या संपादकांस मिळालेली दिसत नाहीं; आणि कदाचित ती मिळाली असली तरी तिचे महत्त्व त्यांचे मनांत नीटसे उतरलें नाहीं, व तिचा योग्य उपयोग त्यांनी करूनहि घेतला नाहीं."


१९. सत्यदुष्ट आणि तर्कदुष्ट वादाचा असला दुसरा नमुना क्वचितच पाहावयास मिळेल. संपादकांना गंगाधर मवाळाची समग्र प्रत मिळाली नसून एकच वही मिळाली होती हें अजब "सत्य" भाव्यांना कोठें गवसलें कोण जाणे! मवाळ मंडळी पूजेतील प्रत बाहेर द्यावयास नाखूष असतात ही गोष्ट खरी; म्हणूनच संपादकांस ती अधिक वेळ जवळ ठेवितां आली नाहीं. भावे सुचवितात त्याप्रमाणे जर संपादकांकडे नकलच दिली होती तर ती बेमुदत ठेवण्यास कांहींच हरकत नव्हती. पंढरपूरच्या गाथेची नक्कल मिळाली असे ज्यांनीं प्रांजळपणें लिहिले त्यांनी मवाळाच्या प्रतीचीहि नक्कलच होती हें लपवून कां ठेवावे? व असली सत्याची छपवेगिरी त्यांच्या पदरी बांधावयास आधार काय? विष्णुशास्त्री पंडित हे त्या काळीं सरकारी नोकर नव्हते हें भावे विसरलेले दिसतात. व सरकारी नोकरांनी हस्तलिखितें मिळविण्याकरितां केलेल्या प्रयत्नांविषयीच्या वक्रोक्तीने या बाबतींत मवाळ घराण्याच्या सत्यनिष्ठेची व पंडितद्वयाच्या सुज्ञतेची विनाकारण टवाळी झाली आहे. संपादकांना या प्रतीचे महत्व नीटसे कळले नव्हतें, व त्यांनीं तिचा योग्य उपयोग करून घेतला नाहीं ही टीका अगदी असमर्थनीय आहे. गंगाधर मवाळाच्या हस्तलेखाचें महत्त्व संपादकांनी पूर्णपणें जाणिलें होतें; त्यांनीं ती प्रत काळजीपूर्वक तपासून अभंगांचा क्रम, लेखनपद्धति, हस्ताक्षर इत्यादि बाबींबद्दल आपली खात्री करून घेतली; पण अधिक वेळ ती वापरावयास मिळाली नाहीं म्हणून त्यांचा निरुपाय झाला. दोनशे पृष्ठांत कडूस प्रतीतील पाठ किती ठिकाणी दिले आहेत हे वाचकांनी स्वतः पहावें; म्हणजे "अधून मधून कांहीं पाठभेद" देण्यापुरताच त्या प्रतीचा उपयोग केला हें भाव्यांचे विधान येथवर परामर्श घेतलेल्या त्यांच्या इतर कित्येक विधानांप्रमाणेंच शब्दलाघवी आहे याची त्यांस खात्री पटेल.

२०. कडूस प्रतीच्या अस्सलपणाची व गुणावगुणांची चर्चा अन्यत्र विस्तारानें - केली जाईल.१६ या ठिकाणीं एवढेच सांगितलें म्हणजे पुरे की खुद्द भाव्यांनी या प्रतीतले कांहीं कांहीं पाठ चांगले आहेत हें कबूल केलें आहे. आज उपलब्ध असलेली कडूस प्रत जुन्या एखाद्या वहीवरून नकललेली असावी असें जरी त्यांचे मत असलें तरी असल्या सर्व जुन्या नकला तुकारामबाबांनी अभंग कोणत्या क्रमानें रचिले असावेत त्या क्रमासंबंधी तर्क बांधण्यास फार उपयोगी आहेत हेही त्यांना मान्य आहे. कडूस प्रतीचा क्रम देहू प्रतीप्रमाणेंच होता. तेव्हां क्रमाच्या बाबतीत तरी सर्वसाधारण जुनी परंपरा प्रस्तुत गाधेनें स्वीकारिली आहे असें म्हणावयास हरकत नाहीं.

२१. तळेगांव प्रतींत देखील बहुशः तोच क्रम सांपडला. "ती नीटनेटकी लिहिली असल्यामुळे तिचाच मुख्यत्वें उपयोग करणें संपादकांस फार सोयीचे, कमी मेहनतीचे, व साधारणपणे सोपे असे वाटलें" हें भाव्यांचे निदान पंडितद्वयासारख्या विद्वज्जनांविषयी ऋजुता दर्शवीत नाही. त्रिंबक कासार हा तुकारामानंतर सुमारें शंभर वर्षांनी (इ. सन १७५० च्या पुढे) साक्षेपी संशोधक म्हणून प्रसिद्धि पावलेला लेखक होता असें दिसते. तो तळेगांवचा असल्यामुळे, देहू व आसमंतांतील प्रदेशांत उपलब्ध असलेलीं हस्तलिखितें त्याच्या अवलोकनांत आलीं असली पाहिजेत. ज्याने अभंग गोळा करण्यांत चाळीस वर्षे घालविलीं त्यानें तुकारामांच्या लेखकांनीं तयार केलेल्या प्रती किंवा अंबाजी सारख्याकडे असलेला संग्रह हे तपासून पाहिले नसतील हें संभवत नाहीं. " अर्थात्, अभंग मिळाले तसे उतरून न घेतां त्रिंबकानें आपल्यास योग्य वाटली तशी ढवळाढवळ करून (तळेगांव) प्रत तयार केली" या भाव्यांच्या अनुमानाला दोषान्वेषणाशिवाय दुसरा आधार दिसत नाहीं. देहू भागांत त्रिंबक कासाराची प्रतिष्ठा मोठी होती असें दिसतें. त्रिंबक कासारानें शके १७११ मध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायाची एक प्रत देहूचे श्रीधर नथुराम गोसावी यांजपाशी आहे. "यथा प्रत्यय तथा लिख्यते" अशी प्रतिज्ञा त्यानें लिहून ठेविली आहे. तेव्हां त्यानें अभंगांच्या मूळच्या क्रमांत किंवा पाठांत मनमानेल तशी ढवळाढवळ केली असेल हें सहसा संभवत नाहीं. देहू प्रतींत त्याचा क्रम मागाहून स्वीकारण्यांत आला. देहू प्रत जर पुढेंमागें उपलब्ध झाली तर 'अस्सल क्रम ठरविण्यांत तिच्या मूळच्या क्रमाचा उपयोग करतां येईल. पाठनिर्णयाच्या वादग्रस्त स्थळीं देहू प्रतीलाच संपादकांनीं प्राधान्य दिलें होतें.

२२. संपादकांचे निवेदन व भाव्यांनी त्यावर घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण यांतून निघणारा तात्पर्यार्थ आतां थोडक्यांत सांगतां येईल. जोंवर (१) तुकारामांनी स्वहस्ते लिहिलेली समग्र गाथा, किंवा (२) तुकारामांनी स्वमुखें सांगितलेल्या काव्याची त्याच्या समक्ष लिहिलेली प्रत, किंवा (३) तुकारामांनी पसंत करून मान्य केली होती असें लेखादि पुराव्यावरून निःसंशय शाबीत झालेली प्रत, या तिहींपैकी कोणतेच साधन उपलब्ध नाहीं, तोंवर जी हस्तलिखितें तुकारामांच्या अधिकाधिक नजीक जाऊन पोचतात, व ज्यांचे लेखक अस्सलाशीं प्रतारणा करण्याचा कमीतकमी संभव, अशा हस्तलिखितांवरच संशोधकांस विसंबून राहावें लागणार. प्रस्तुत गाथेला ज्यांचा आधार घेतला तीं तीन देहू, तळेगांव व कडूसची हस्तलिखितें या प्रकारच्या हस्तलिखितांतील सर्वोत्कृष्ट होतीं. पंढरपूर परंपरेच्या पाठादिकांचाहि या गाथेत परिपूर्ण अंतर्भाव केला आहे. तेव्हां या गाथेनें तुकारामसंशोधनाचा भरभक्कम पाया घातला असेंच म्हटलें पाहिजे; पुढील संशोधनाची उभारणी याच पायावर करतां येईल. अभ्यासक्रमाला या गाथेवांचून कार्याचा आरंभच करतां यावयाचा नाही. विशेषतः देहू आणि तळेगांव या मूळ प्रती आज तरी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा उपयोग या गाथेमार्फतच काय तो करून घेतां येईल.


२३. पंडितांच्या या गाथेनंतर प्रसिद्ध झालेल्या गाथांत मूळ हस्तलिखितांवरून छापलेल्या अशा फक्त तीनच आढळतात. बाकी बहुतेक या गाथेवरच आधारलेल्या दिसतात. माडगांवकरांनी मुंबईत १८८६ साली प्रसिद्ध केलेली गाथा यांपैकीच होय. सप्तऋषी व मोतीवाले (१८९६) यांनीं "माडगांवकर व इंदुप्रकाशचे मालक यांच्या गाथेच्या प्रतीचा वेळोवेळी उपयोग घडला" असे, व निर्णयसागर (१९०३) गाथेच्या संपादकांनी "इंदुप्रकाशगाथेचा हे पुस्तक तपासतांना फार उपयोग झाला" असे मान्य केलें आहे. दामोदर सावळाराम आणि मंडळीने १९०२-३ साली याच इंदुप्रकाश गाथेत दुबार झालेले अभंग कमी करून व त्यांत नसलेले इतर ठिकाण'चे मिळवून एक गाथा दोन भागांत छापिली. तुकाराम तात्यांनी १८८९ साली मुंबईत दोन भागांत ८४४१ अभंगांची जी बृहत्-गाथा प्रसिद्ध केळी तिला कोणत्या हस्तलिखिताचा आधार घेतला होता ते कळण्यास मार्ग नाहीं. प्रस्तावनेत त्यांनी जे खालीलप्रमाणें निवेदन केलें आहे ते सारे मोघमच आहे: "प्रस्तुत, पुष्कळ परिश्रम व शोध करून आम्हांस मिळालेल्या व पूर्वी कितीएक उहानमोठ्या पुस्तकांतून छापून प्रसिद्ध झालेल्या अभंगांचा या पुस्तकांत संग्रह केला आहे. अभंगांच्या जितक्या हस्तलिखित प्रती आम्हांस मिळाल्या त्यांत व वर लिहिल्याप्रमाणें पूर्वी छापून प्रसिद्ध झालेल्या अभंगसंग्रहांत विषयाप्रमाणें निरनिराळी प्रकरणे पाडलेलीं नाहींत ........" आवटे यांनीं गाथापंचकांत छापिलेली गाथा "श्री नानामहाराज साखरे यांच्या संग्रहांतील पुरातन हस्तलिखित वह्यांवरून पाठ दुरुस्त करून तयार केली" असे दिसतें : पण ह्या पुरातन हस्तलिखितांचे वर्णन सांपडत नाहीं. विष्णुबोवा जोगांनी १९०१ साली तयार केलेली व आवटे यांनीं छापिलेली गाथा गणपत कृष्णाजीच्या गाथेवर आधारलेली दिसते. विष्णुबोवांनी पुढे तयार केलेल्या आवृत्तींत सांप्रदायिक पाठांसंबंधाच्या राहिलेल्या चुका दुरुस्त केल्या; त्या अस्सल हस्तलिखितांच्या आधारे केल्या किंवा कसें याचा खुलासा सांपडत नाहीं.

२४. ज्या तीन गाथा मूळ हस्तलिखितावरून छापिल्या त्यांतील एक आर्यभूषण छापखान्यानें १९१३ साली पुण्यांत प्रसिद्ध केली. ही आवृत्ति हरिभक्तिपरायण बाबुराव हरि देवडीकर यांचे साहाय्यानें पंढरपूर येथील गंगूकाका शिरवळकर यांच्यापाशीं असलेल्या प्रासादिक पोथीवरून तयार केलेली आहे. ही वही श्रीक्षेत्र पंढरपूर येथे प्रल्हाद‌भाऊ बडवे यांच्याकडे होती. देवानें बडव्यांच्या स्वप्नांत येऊन सांगितल्याप्रमाणें गंगूकाका शिरवळकरांस मिळाली. (१९१३ साली) या गोष्टीस ८०-८५ वर्षे झाली असे संपादकांनी निवेदन केलें आहे. याच गंगूतात्यांनी स्वतः शुद्ध केलेली व पंढरपूरच्या इतर मठाधिपतींकडून शुद्ध करून घेतलेली प्रत पंडितानी वापरिली होती, व त्या प्रतींतील न स्वीकारिलेले सर्व पाठ तळटीपांत दिले आहेत, व अधिक अभंग शेवटीं छापिले आहेत. तेव्हां एका अर्थी आर्यभूषण गाथेचा प्रस्तुत गाथेत सर्वस्वी अंतर्भाव झाला आहे असें म्हणतां येईल. देशमुख व दांडेकर यांनीं संपादिलेल्या चित्रशाळेच्या गाथेत गंगूकाकांच्या पोथीचेच पाठ घेतलेले आहेत; पण अनुक्रमणिकेंत माळ्यांच्या वहीवरून घेतलेले पाठही दिले आहेत. या माळ्यांच्या वहीवरून छापिलेली गाथा ही दुसरी सांप्रदायिक गाथा होय. ही १९१३ सालीं गोडबोले यांनीं "ह. भ. प. देहूकर महाराज, भागवतबुवा बेलापुरकर, व वासकर यांच्या फडांतील वारकरी सांप्रदायिक ओळीची गाथा" या नांवानें प्रसिद्ध केली. तुकारामांचे पंढरपूर येथील वंशज ह. भ. प. सोपानकाका देहूकर यांचेकडे हिचें मूळ आहे असे समजतें. अर्थात् तें हस्तलिखित देहू परंपरेतील असले पाहिजे; व त्या परंपरेतील सर्वांत जुनें हस्तलिखित हा तर पंडितांच्या गाथेचा मुख्य आधार होता.

२५. तिसरी गाथा "तुकारामबुवांची अस्सल गाथा" या नांवानें विनायक लक्ष्मण भावे यांनी शके १८४१-४२ (इ. स. १९१९-२०) साली दोन भागांत छापिली. तुकाराममहाराजांचे दाळकरी व लेखक संताजी तेली जगनाडे यांचे वहीबरहुकूम ही गाथा छापित्री असे श्री.. भावे यांनीं मुखपृष्ठावर नमूद केले आहे. या वह्या कशा लिहिल्या गेल्या असाव्यात याविषयी भाव्यांनीं कांही तर्क सुचविले; पण निष्कर्ष असा काढला की "केव्हां तरी एकदम, थोडेच दिवसांचे मुदतींत, आणि तुकारामबुवांच्या मरणापूर्वी सुमारें तीन चार वर्षेंच अगोदर, ह्या वह्या संताजीनें लिहिल्या असाव्यात." ते पुढे म्हणतात की, "संताजी हा तुकारामांच्या प्रीतींतला, त्यांचा आवडता टाळकरी, नेहमीं त्यांचे जवळ निकट सहवासांत असणारा, यामुळे या वह्या तुकारामबुवांच्या नजरेखालूनहि गेल्या असल्या पाहिजेत हे उघड आहे. इतर टाळकऱ्यांनींहि त्या निःसंशय पाहिल्या असल्या पाहिजेत. आणि म्हणूनच तुकोबांच्या स्वदस्तुरच्या लेखाच्या अभावी या प्रतीस मी 'तुकारामबुवांची अस्सल गाथा' असे म्हटलें आहे......" संताजीच्या शुद्धलेखनापेक्षां तुकारामांचे लिखाण कांहीं निराळे असेल असें भाव्यांना वाटत नव्हते. त्यांच्या मतें, तुकाराम स्वमुखें बोलत असतां संताजीनें या वह्या तयार केल्या असण्याचा संभव आहे.

२६. भाव्यांच्या या गाथेत कांहीं दुबार अभंग, कांहीं तुकयाबंधूचे इत्यादि अभंग जमेला धरून एकंदरींत १३२३ अभंग आहेत. अर्थात् ही गाथा समग्र नाहीं हे सांगणें नकोच. संताजीच्या वह्यांची विस्तारानें चर्चा अन्यत्र केली जाईल. त्या चर्चेचा निष्कर्ष स्थूलमानानें सांगावयाचा तो असा :- (१) तुकारामांच्या मुखांतून निघत असलेली अभंगवाणी संताजीच्या या वह्यांत टिपून ठेविली असेल हें अगदीं असंभवनीय आहे; (२) या दोनही वह्या तुकारामांच्या हयातीत समग्र लिहिल्या नसून त्यांच्या निर्याणानंतर लिहिल्या गेल्या आहेत हेंच अधिक संभवतें. परिच्छेद २२ मध्यें वर्णिलेल्या अस्सल साधनांत ह्या वह्यांचा समावेश करतां येणार नाहीं. पंडितांच्या प्रस्तुत गाथेस आधार मानिलेल्या साधनांप्रमाणें संताजीच्या वह्या हें एक दुय्यम साधन होय. शकाची नाेंद असल्यामुळे इतर दुय्यम साधनांपेक्षां त्या वह्या तुकारामांच्या काळाला व परंपरेला जास्त जवळच्या असतील व म्हणून तुकारामांची शुद्ध संहिता निश्चित करतांना या वह्यांतील क्रम व पाठ यांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. या वह्यांप्रमाणें, तुकारामांच्या घराण्यांत पूजेंत असलेली २४८ अभंगांची वही, पंढरपूरचे श्री. सख्या हरि वैकुंठे यांजपाशीं असलेली वही, कडूसास मवाळ घराण्याच्या मंदिरांत असलेलें हस्तलिखित, इत्यादि सर्व खासगी व सार्वजनिक संग्रहांत असलेलीं हस्तलिखितें तपासून, संख्या, क्रम व पाठ निश्चित करून पांगारकरांनी अपेक्षा केल्याप्रमाणें "सर्वजनमान्य होईल असा एक नवीन गाथा परंपरेच्या व संशोधनाच्या अशा दुहेरी दृष्टीनें तयार झाला पाहिजे.१७"

२७. अशी शुद्ध संहितेची गाथा सिद्ध करण्यासाठीं प्रस्तुत पंडितांची गाथा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक होते. कारण, ती आज कैक वर्षे दुर्मिळ झाली होती, व जुन्या पुस्तकांच्या बाजारांत भारी किंमत देऊन सुद्धां मिळत नसे. तुकारामांच्या निर्याणाला तीनशे वर्षे पुरी झाली त्या प्रसंगी ती पुनः छापून प्रसिद्ध करावी असे स्वराज्यांतील लोकशाही मुंबई सरकारने ठरविले. हें "बुनादीचे साचे उजवणे" करण्याचे श्रेय मुंबईचे पंतप्रधान व शिक्षणमंत्री नामदार श्री. बाळ गंगाधर खेर यांस सर्वस्वी दिलें पाहिजे.


२८. हें पुनर्मुद्रण मूळ गाथेबरहुकूम पानास पान या पद्धतीनें केलें आहे; याचें कारण हें की अनेक ग्रंथांत पानांचे उल्लेख दिले आहेत, ते पाहणें अभ्यासकांस सोपें जावें. मूळ गाथेत दिलेल्या अभंगांत ज्या केवळ छपाईच्या उघड दिसणाऱ्या चुका होत्या तेवढ्याच दुरुस्त केल्या आहेत; संहितेंत बाकी कोणतेही फेरफार केले नाहींत. कठीण शब्दांच्या कोशांत मूळांत अर्थ दिले नव्हते अशा कांहीं स्थळी अर्थ दिले आहेत. अनुक्रमणिका अकारविल्ह्याप्रमाणें, मूळ गाथेत अभंगांचे आंकडे देण्यांत पुष्कळ चुका झाल्या होत्या त्या सर्व नीट करून, संख्या निश्चित करून बिनचूक बनविली आहे. गाथेच्या या पुनर्मुद्रित आवृत्तीतील अभंगांचा हिशेब येणेंप्रमाणें :- ४६०७ पर्यंत अभंगांचे आंकडे छापिले आहेत. शुद्धिपत्रांत दर्शविल्याप्रमाणें २२३१-अ आणि ४१५४-अ असे दोन आणखी अभंग जमेला धरले असतां एकंदर संख्या ४६०९ होते. देहू व तळेगांव या प्रतींत ज्यांचा आरंभ सारखा झालेला नाहीं असे पंढरपूरच्या प्रतीतील (दुसऱ्या भागाच्या शेवटीं छापलेले) अभंग ३७, आणि पहिल्या भागांत पान ३८० व पान ५४० वर दिलेले रामेश्वरभंटाचे एकूण अभंग ५, हे आणखी जमेला धरले म्हणजे अनुक्रमणिकेत प्रविष्ट झालेल्या अभंगांची एकूण संख्या (४६०९+३७+५) ४६५१ भरते. दुबार अभंग २० सांपडले१८; ते उणे करतां बाकी ४६३१ अभंग उरतात. यांतील रामेश्वरभटाचे ५, तुकयाबंधूचे (कान्होबाचे) ९२, ब्रह्मानंद तुक्याचे ३ (?), एकाजनार्दनाचा १, व वामनाचा १ इतके उणे करतां, देहू, तळेगांव व पंढरपूर या तीनही प्रतींतील मिळून तुकारामांचे असे ४५२९ अभंग या गाथेत छापिले आहेत. शुद्धिपत्राशिवाय गाथा छापतां आली पाहिजे होती. पण शुद्धिपत्र देतांना शुद्धाशुद्धाद्वैतवाद न स्वीकारितां अगदीं बारीकसारीक अशुद्धे सुद्धां सूक्ष्मदृष्टीनें शोधून दिली आहेत; हेतु हा की तुकारामांच्या वाणीत वाचकांपुढें अपपाठ ठेवण्याच्या पापापासून पूर्णपणें अलिप्त राहावें.

२९. जनार्दन सखाराम गाडगीळ यांनी लिहिलेले तुकारामांचे इंग्रजी चरित्र व बहुधा त्यांनींच लिहिलेलें एक मराठी चरित्र अशीं दोन चरित्रे मूळ गाथेला आरंभीं जोडिलीं होती. गेल्या ऐशीं वर्षांत तुकारामांच्या चरित्राला उपयुक्त असे बरेंच लिखाण झालें आहे. त्याचा परामर्श घेऊन तुकारामांचें चरित्र, काव्य, शिकवणूक व अभ्यास यांची सांगोपांग चर्चा करणारा एक प्रबंध पहिल्या भागांत द्यावयाची मनीषा होती. पण विस्तार व विलंब फार होऊ नये म्हणून ते तुकारामचरित्र स्वतंत्र छापून या गाथेच्या ग्राहकांस गाथेचाच भाग म्हणून, निराळी किंमत न घेतां, द्यावयाचे ठरविलें आहे. त्याप्रमाणें तें लवकरच प्रकाशित होईल. तुकारामांनी दिलेली सुविचाराची, सदाचाराची व समतेची शिकवण लोकांस सहज मिळावी म्हणून (चरित्रासुद्धां) गाथेची किंमत स्वस्त ठेविली आहे. लोकशिक्षणाचा हा प्रयोग उपयुक्त होवो अशी प्रार्थना करून ही प्रस्तावना संपवितों.
 

(लेखक स्वातंत्र्यपूर्व काळातील सनदी अधिकारी, न्यायाधीश होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे समग्र चरित्र लिहिण्याचा त्यांचा संकल्प त्यांच्या अकाली निधनामुळे अपूर्णावस्थेत राहिला. हा लेख १९५० साली तत्कालिन मुंबई सरकारने प्रसिद्ध केलेल्या ‘तुकाराम गाथे’ला त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश होय.)

***    ***    ***
 

संदर्भ

१ "तुकोबाचीं पदें अद्वैत प्रसिद्ध । त्यांचा अनुवाद चित्त झुरणी ॥" संत बहिणाबाईंची गाथा (कोल्हारकर) पान ८, अभंग २१, चरण ६.

२ भक्तलीलामृत, अध्याय ३५, ओवी १६७,

३ कचेश्वरकृत आत्मचरित्र, भा. इ. सं. मं. वार्षिक इतिवृत्त शके १८३५, पान २४१.

४ भक्तलीलामृत, अध्याय ३३, ओवी १२१; अध्याय ३६, ओवी ५१.

५ पहा- तुकारामबांचा अस्सल गाथा, भाग १-२. विनायक लक्ष्मण भावे.

६ धुळ्याच्या समर्थवाग्देवतामंदिरांतील संग्रहांतील शके १७३४ (इ.स. १८१२) ची नोंद असलेली या भाषांतराची एक हस्तलिखित स्वतंत्र प्रत आहे. 

७ विधवाविवाहाचे पुरस्कर्ते सुधारक म्हणून या शास्त्रीबोवांची थोर कीर्ति होती. तुकारामांच्या अभंगांत तल्लीन होणाऱ्या न्यायमूर्ति रानड्यांचे ते मित्र होते. त्यांनी संस्कृत-मराठी धातुकोश व इंग्रजी-मराठी कोश असे दोन कोशही प्रसिद्ध केले होते. शास्त्रीबोवा त्या काळी इंदुप्रकाश वर्तमानपत्राच्या संपादकमंडळांत होते, व इंदुप्रकाश छापखान्याचे भागीदार होते; पुढे ते छापखान्याचे मालकही झाले. त्यामुळे गाथा त्या छापखान्यांत छापिली गेली असावी. शास्त्रीबोवाच्या विशेष माहितीकरितां श्रीधर सखाराम पंडित यांनी लिहिलेले 'विष्णु परशुराम शास्त्री पंडित यांचे चरित्र' (१९३६) हे पुस्तक पहावें.

८ निबंधमाला, अंक ४९५

९ मूळ इंग्रजी प्रस्तावनेचा ("Critical Preface "चा) हा गोषवारा आहे; ती संपूर्ण Preface प्रकाशलेखन पद्धतीनें पुनर्मुद्रित करून दुसऱ्या भागाच्या परिशिष्टांत दिली आहे.

१० हे प्रमाणपत्रही दुसऱ्या भागाच्या परिशिष्टांत दिलें आहे. 

११ "तुकारामाची जगनाडी संहिता" द. बा. पोतदार. भा. इ. सं. मं. पंचम संमेलनवृत्त, शके १८३९, पान ७४, ७६.

१२ तुकारामबोवांचा सेतु-जे. एस्. एड्वर्डस् (१९३२), पान २१.

१३ तुकारामबुवांचा अस्सल गाथा, भाग १-२. विनायक लक्ष्मण भावे. प्रस्तावना, पान ३. यापुढें भाव्यांच्या नांवानें उद्धृत केलेला मजकूर याच प्रस्तावनेतील आहे.

१४ मूळची दोन्ही मुखपृष्ठे दुसऱ्या भागाच्या परिशिष्टांत दिली आहेत.

१५ मूळांत हे वाक्य असेंच छापलेले आहे.

१६ पुढे परिच्छेद २९ मध्ये उल्लेखिलेल्या तुकारामचरित्रांत.

१७ श्रीतुकारामचरित्र, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर (१९२०), प्रस्तावना, पान ५.

१८ यांतील १९ अभंग अनुक्रमणिकेंत त्या त्या अभंगापुढें दाखविले आहेत. शिवाय ३७५२ हा अनंग ३९५६ अभंगाचा दुबार आहे.

 

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...