Friday, 9 May 2025

लेख-१. संपादकांचे निवेदन

 -सूर्यकांत पळसकर, संपादक, तुकोबा डॉट कॉम

संत तुकाराम महाराज यांच्यावरील लेख

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर देश-विदेशात विपूल लेखन झाले आहे. हे लेखन करणाऱ्यांत जनसामान्यांपासून महान साहित्यिक, विद्वान विश्लेषक, तत्त्ववेत्ते व साक्षात्कारी महापुरुषांपर्यंत सर्व स्तरातील लोकांचा समावेश आहे. या लिखाणाची ओळख ‘तुकाेबा डॉट कॉम’च्या वाचकांना व्हावी, यासाठी काही निवडक लेख येथे देत आहोत.

 

१. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण अभंग गाथा ‘तुकाेबा डॉट कॉम’ या वेबसाईटच्या रूपाने ऑनलाईन उपलब्ध करून देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. इ.स. २०११ पासून आम्ही या प्रकल्पावर काम करीत आहोत. मराठी देवनागरी फॉन्टच्या उपलब्धतेसारख्या तांत्रिक समस्येसह अनंत अडचणींचा सामना या काळात करावा लागला. कधी वैयक्तिक समस्या आडव्या आल्या; तर कधी आर्थिक समस्यांनी कोंडी केली. अडचणींचे सारे डोंगर पार करून अखेर हा प्रकल्प मार्गी लागला असून ‘तुकोबा डॉट कॉम’ ही वेबसाईट जगभरातील तुकोबांप्रेमींच्या सेवेत सादर होत आहे. याप्रसंगी ‘याजसाठी केला होता अट्टाहास’ असे कृतकृत्य भाव आमच्या मनात दाटून आले आहेत.

२. तुकोबांनी आपल्या अभंगांतून मांडलेला धर्मविचार वैश्विक आहे. मुळात 'खरा धर्मविचार' हाच जगातील सर्व संस्कृतींमध्ये एकसमान आहे. त्यामुळे जगभरातील सर्व प्रमुख धर्माचे महापुरुष एका सुरात बोलताना दिसतात. तुकोबांचा आवाजही याच कारणामुळे जगातील महापुरुषांच्या आवाजात मिसळून गेलेला आपल्याला दिसतो. तुकोबा अभंगांतून जे सांगतात तेच येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये सांगितले. तेच भगवान बुद्धांनी धम्मपदातून सांगितले. तेच भगवान महावीरांनीही सांगितले. तुकोबांचे ‘देवभक्तपण । तुका म्हणे नाहीं भिन्न ॥ (अभंग क्र. २३२९.) हे वचन येशूच्या ‘I and the Father are one.’ ( Bible - John 10:30) या वचनाशी तंतोतंत जुळणारे आहे. हे साम्य खूप व्यापक आहे. जे. नेल्सन फ्रेझर आणि रेव्ह. जे. एफ. एडवर्ड्स या विदेशी विद्वानांनी १९२२ साली प्रसिद्ध केलेल्या ‘द लाईफ अँड टिचिंग ऑफ तुकाराम’ या ग्रंथात तुकोबा आणि येशू यांच्या शिकवणीतील साम्य शोधणारे एक स्वतंत्र प्रकरणच दिले आहे. तुकोबा आणि येशूच्या समान वचनांची सूची त्यांनी त्यात दिली आहे.

भगवान बुद्धांच्या अनेक वचनांशी तुकोबांच्या अभंगपंक्ती अशाच जुळतात. तुकोबांचे पुढील वचन पाहा-

तुका म्हणे गुरें राखोनि गोंवारी । माझी म्हणे परी लाभ नाहीं ॥ ७ ॥ (अभंग क्र. २१४८)

कोणी तरी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, आध्यात्मिक अनुभव स्वत:चेच असले पाहिजेत, हे सांगताना तुकोबांनी येथे दुसऱ्याच्या गायी राखोळीने वळणाऱ्या गोवळ्याचे उदाहरण दिले आहे. पूर्वी सगळ्या गावाच्या गायी एकत्र करून रानात चारायला नेण्याची प्रथा होती. या एकत्रित गायींना गायीगवारा किंवा गायीगोवारा म्हणत आणि त्यांना सांभाळणाऱ्यास गवारी किंवा गोवारी म्हणत. तुकोबा म्हणतात, ‘गोवाऱ्याने राखोळीच्या दुसऱ्यांच्या गायींना कितीही आपले म्हणून मिरवले तरी त्याचा काहीच लाभ नाही. त्या गायी त्याच्या होऊ शकत नाहीत. तद्वतच, दुसऱ्यांचे आध्यात्मिक अनुभव आपले होऊ शकत नाहीत.’

तुकोबांनी वापरलेली गोवाऱ्याची प्रतिमा मुळात भगवान बुद्धांची आहे. धम्मपदाच्या यमकवर्गात ती आली आहे. बुद्धांचे मूळ पाली वचन पाहा-  

बहुम्पि चे संहितं भासमानो, न तक्करो होति नरो पमत्तो ।
गोपो'व गावो गणयं परेसं, न भागवा सामञ्ञस्स होति ॥ १६ ॥

बुद्ध म्हणतात, ‘एखादा व्यक्ती धर्मग्रंथांचे खूप पाठांतर करीत असेल, मात्र प्रमादवश त्याचे आचरण करीत नसेल, तर तो दुसऱ्यांच्या गायी आपल्या म्हणून मोजणाऱ्या गवळ्यासारखा आहे आणि तो श्रामण्याचा अधिकारी होत नाही.’

भगवान महावीरांनी ‘मुनी कोण’ याची व्याख्या करताना ‘असुत्ता मुनी: सुत्ता अमुनी:’ असे म्हटले आहे. म्हणजेच, ‘जो जागा आहे तो मुनी आणि जो निद्राधीन आहे तो अमुनी.’ तुकोबांनीही याच अनुषंगाने जागे राहण्याचे केले आहे. ते म्हणतात, ‘ वोणव्या सोंकरीं । सेत खादले पाखरीं ॥ १ ॥ तैसा खाऊं नका दगा । निदसुरा राहूनी जागा ॥ २ ॥’ (अभंग क्र. ३४९)

३. गाथा पूर्णत: निर्दोष व शुद्ध असावी, यावर आमचा कटाक्ष राहिला. त्यासाठी गाथेचे काम एकहाती ठेवण्यावर आम्ही भर दिला. त्यामुळे हा प्रकल्प बराच रेंगाळला. ‘कामामध्ये काम । काही म्हणा रामराम ॥’ या तुकोबांच्या उक्तीनुसार नियमित जबाबदाऱ्या सांभाळून वेळ मिळेल तसे आम्ही गाथेचे काम केले. तेही प्रकल्प रेंगाळण्यामागील एक कारण आहे. शुद्ध गाथा वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध झाल्यामुळे ही सगळी यातायात सुफळ संपूर्ण झाली आहे, असे वाटते.

४. गाथेसोबतच तुकोबा समजून घेण्यास मदत होईल, असे लेख ‘तुकोबा डॉट कॉम’वर देण्यात आले आहेत. तुकोबांचे १० वे वंशज तथा सांप्रत महाराष्ट्राला वैचारिक दिशा देणारे विद्वान डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र ऋषी म्हणून ज्यांना गौरविण्यात येते ते थोर विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्यासह, पु. म. लाड, वा. ल. कुलकर्णी यांसारख्या अनेक मान्यवरांच्या लेखांचा समावेश वेबसाईटमध्ये करण्यात आला आहे. डॉ. सदानंद मोरे व डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आपले लेख वेबसाईटवर घेण्यास दिलेली परवानगी आमच्यासाठी प्रेमळ आशीर्वाद व प्रसाद आहे. त्यांचे ऋण व्यक्त केल्यास प्रसादास उणेपणा येईल. इतरही मान्यवर लेखक अथवा कॉपीराईटचे हक्कदार यांच्या ऋणात राहणे आम्हाला आवडेल. 

५. भाविक भक्त आणि जिज्ञासू वाचकांनी आमची ही सेवा गोड मानून घ्यावी व ‘तुकोबा डॉट कॉम’ला आशीर्वाद द्यावेत, ही विज्ञापना यानिमित्ताने करतो आणि आमचे निवेदन संपवतो.

-सूर्यकांत पळसकर,
संपादक, तुकोबा डॉट कॉम

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...