Tuesday, 25 March 2025

५. खेळ

श्री. तुकाराम महाराज यांच्या काळी प्रचलित असलेल्या विविध खेळांवरील रूपकात्मक अभंग

 

टिपरी (अभंग संख्या ६)

२३९. एके घाईं खेळतां न पडसी डाईं । दूचाळ्यानें ठकसील भाई रे । त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघांची तरी धरीं सोई रे ॥ १ ॥ खेळ खेळोनियां निराळाचि राहीं । सांडी या विषयाची घाई रे । येणेंचि खेळे बसवंत होसी । ऐसें सत्य जाण माझ्या भाई रे ॥ २ ॥ सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे । आपुल्या संवगडिया सिकवूनी घाईं । तेणे सतत फड जागविला रे । एक घाईं खेळतां न चुकेचि कोठे । तया संतजन मानवले रे ॥ ३ ॥ ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे । कान्हो गोवारी त्यांनी बसवंत केला । आपण भोंवतीं नाचती रे । सकळिकां मिळोनी एकचि घाईं । त्याच्या ब्रह्मादिक लागती पायीं रे ॥ ४ ॥ रामा बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे । पांचा संवगडियां एकचि घाईं । तेथें नाद बरवा उमटला रे । ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनीं । तो ही खेळिया निवाडला रे ॥ ५ ॥ ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला । तेणें जन खेळकर केला रे । जनार्दन बसवंत करूनियां तेणें । वैष्णवांचा मेळ मेळविला रे । एकचि घाई खेळतां खेळतां । आपणचि बसवंत जाला रे ॥ ६ ॥ आणीक खेळिये होऊनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे । तुका म्हणे गडे हो हुशारूनी खेळा । पुढिलांची धरूनियां सोई रे । एकचि घाईं खेळतां जो चुकला । तो पडे संसारडाईं रे ॥ ७ ॥


२४०. खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥ १ ॥ नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी रे । कळिकाळावरि घातली कास । एक एकाहुनी बळी रे ॥ २ ॥ गोपीचंदनउटी तुळशीच्या माळा । हार मिरवती गळां रे । टाळ मृदंग घाईं पुष्पांचा वरुषाव । अनुपम्य सुखसोहळा रे ॥ ३ ॥ लुब्धलीं नादी लागली समाधि । मूढ जन नर नारी लोका रे । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ॥ ४ ॥ वर्णाभिमान विसरली याति । एक एकां लोटांगणी जाती रे । निर्मळ चित्तें झाली नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥ ५ ॥ होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ॥ ६ ॥

२४१. दोन्हीं टिपरीं एकचि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे । कुसरीं अंगें मोडितील परी । मेळविती एकएका छंदें रे ॥ १ ॥ कांहीच न वजे वांयां रे खेळिया । एकचि बसवंत अवघियां रे । सम विषम तेथें होऊंच नेदी । जाणऊनि आगळिया रे ॥ २ ॥ संत महंत सिद्ध खेळतील घाईं । तेच सांभाळी माझ्या भाई रे । हात राखोन हाणिती टिपऱ्या टिपरी । मिळोनि जाय त्याची सोई रे ॥ २ ॥ वितालाचें अवघें जाईल वांयां । काय ते शृंगारूनि काया रे । निवडूनि बाहेर काढिती निराळा । जो न मिळे संतांचियां घाई रे ॥ ४ ॥ प्रकाराचें काज नाहीं सोडीं लाज । नि:शंक होऊनियां खेळे रे । नेणतीं नेणतींच एकें पावलीं मान । विठ्ठल नामाचिया बळें रे ॥ ५ ॥ रोमांच गुडिया डोलविती अंगें । भावबळें खेळविती सोंगें रे । तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे । या विठोबाच्या अंगसंगें रे ॥ ६

२४२. बाराही सोळा गडियांचा मेळ । सतरावा बसवंत खेळिया रे । जतिस्पद राखों जाणे टिपरिया घाईं । अनुहात वाय मांदळा रे ॥ १ ॥ नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहूं रे ॥ २ ॥ सा चहूं वेगळा अठरा निराळा । गाऊं वाजवू एक चाळा रे । विसरती पक्षी चारा नेघे पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥ ३ ॥ आनंद तेथींचा मुकियासी वाचा । बहिरे ऐकती कानीं रे । आंधळ्यांसी डोळे पांगुळांसी पाय । तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे ॥ ४ ॥

२४३. भीमातीरीं एक वसविलें नगर । त्याचें नांव पंढरपूर रे । तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥ १ ॥ नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसावा रे । पुढें गेले ते निधाई झाले । वाणितील त्याची सीमा रे ॥ २ ॥ बळियां आगळा पाळी लोकपाळां । रिघ नाहीं कळिकाळा रे । पुंडलिक पाटील केली कुळवाडी । तो झाला भवदुःखा वेगळा रे ॥ ३ ॥ संतसज्जनीं मांडिलीं दुकानें । जे जया पाहिजे तें आहे रे । भुक्ति मुक्ति फुकाच साठीं। कोणी तयाकडे न पाहे रे ॥ ४ ॥ दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे । न वजों म्हणती आम्ही वैकुंठा । जिहीं देखिली पंढरी रे ॥ ५ ॥ बहुत दिस होती मज आस । आजी घडलें सायासी रे । तुका म्हणे होय तुमचेनी पुण्यें । भेटी तया पायांसी रे ॥ ६ ॥

२४४. या रे गडे हो धरूं घाई जाणतांही नेणतां । नाम गाऊं टाळी वाहूं आपुलिया हिता ॥ १ ॥ फावलें तें घ्यारे आतां प्रेमदाता पांडुरंग । आजी दिवस सोनियाचा वोडवला रंग ॥ २ ॥ हिंडती रानोरान भुजंग ते कांट्यावन । सुख तयांहून आम्हां गातां नाचतां रे ॥ ३ ॥ तुका म्हणे ब्रह्मादिकां सांवळें दुर्लभ सुखा । आजी येथें आलें फुका नाम मुखा कीर्तनीं ॥ ४ ॥


विटीदांडू (अभंग संख्या १)

२४५. सारा विटीदांडू । आणीक कांहीं खेळ मांडूं ॥ १ ॥ बहुअंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठे पाव ॥ २ ॥ कोली हाणे टोला । झेली तेणे तो गोविला ॥ ३ ॥ एकमेकां हाका मारी । शेल जाळी एक धरी ॥ ४ ॥ राजी आलें नांव । फेरा न चुकेचि धांव ॥ ५ ॥ पुढे एक पाठी । एक एका दोघां आटी ॥ ६ ॥ एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥ ७ ॥ तुका म्हणे आतां । खेळ मोडावा परता ॥ ८ ॥
मृदंगपाट्या (अभंग संख्या ३)

२४६. डाईं घालूनियां पोरें । त्यांची गुरें चुकविलीं ॥ १ ॥ खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ २ ॥ मारिती माया घेती जीव । नाहीं कींव अन्याया ॥ ३ ॥ तुका कान्होबा मागें । तया अंगें कळों आलें ॥ ४ ॥

२४७. पाहा रे तमासा तुमचा नव्हे येथे लाग । देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥ १ ॥ जागा रे गोपाळांनों ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनी ॥ २ ॥ न रिघतां ठाव आम्हां ठावा पाळतियां । भयाभीत वांयां तेथें काय चांचपाल ॥ ३ ॥ तुका म्हण हातां चढे जीवाचिये साटीं । मिटक्या देतां गोड मग लागतें शेवटीं ॥ ४ ॥

२४८. मागें पुढें पाहें सांभाळूनी दोनी ठाय । चुकावनी जाय गडी राखें गडियांसी ॥ १ ॥ मुरडे दंडा दोहीं तोंडां गडियां सावध करी । भेडतियासंगें तया हाल तुजवरी ॥ २ ॥ गडियां गडी वांटुनी देईं ज्याचा सोडी तेचि ठायीं । आगळ्या बळें करील काय तुज देणें लागे डाय ॥ ३ ॥ नवां घरीं पाऊला करीं सांपडे तो तेथें धरीं। जिंकोनी डाव करीं ठाव सत्ता आणिकांवरी ॥ ४ ॥ सांपडोनी डाईं बहु काळ गुंतलासी । बळिया गडी फळी फोडी न धरितां त्यांसी ॥ ५ ॥ चुकांडी जो खाय मिळोनी अंगी जाय । गुंतलासी काय तुका म्हणे अझूनी ॥ ६ ॥
हुतुतु - हाल (अभंग संख्या २)

२४९. बळें डाईं न पडे हरी । बुद्धि करी शाहाणा तो ॥ १ ॥ मोकळे देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडावया ॥ २ ॥ येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥ ३ ॥ तुका म्हणे धरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवें पायीं घालूनियां ॥ ४ ॥

२५०. यमुनेतटीं मांडियेला खेळ । म्हणे गोपाळ गडियांसी ॥ १ ॥ हाल मांडा हाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ २ ॥ नांवें ठेवूनि वांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥ ३ ॥ तुका म्हणे कान्हो तिळ्या-तांदळ्या । जिंके तो करी आपुला खेळ्या ॥ ४ ॥
हुंबरी - हमामा (अभंग संख्या ३)

२५१. तुशीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी । सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥ धृ. ॥ चेंडुवासवें घातली उडी । नाथिला काळिया देऊनी बुडी ॥ २ ॥ अशुद्ध पीतां करुणा नाहीं । तुवां आपली माऊशीही मारियेली ॥ ३ ॥ रावणाचें घर बुडविलें सारें । त्याची रांडापोरें मारियेलीं ॥ ४ ॥ जाण तूं ठावा आहेसी आम्हां । तुवां आपुला मामा मारियेला ॥ ५ ॥ याशीं खेळतां नाश थोरू । तुकया स्वामी सारंगधरू ॥ ६ ॥

२५२. मशीं पोरा घे रे बार । तुझे बुजीन खालील द्वार ॥ धृ. ॥ पोरा हमामा रे हमामा रे ॥ २ ॥ मशी हमामा तूं घाली । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥ ३ ॥ तरीच मशीं बोल । पोरा जिव्हाळ्याची ओल ॥ ४ ॥ मशीं घेतां भाष । जीवा मीतूंपणा नास ॥ ५ ॥ मजसवें खरा । पण जाऊं नेदी घरां ॥ ६ ॥ आमुचिये रंगीं । दुजें तगेना ये संगीं ॥ ७ ॥ तुकयासवें भास । हरी जीवा करी नास ॥ ८ ॥

२५३. हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलीं पोरें । करी येरझार चौऱ्याशींची ॥ धृ. ॥ पहिले पहारा रंगासी आलें । सोहं सोहं सें बार घेतलें । देखोनि गडीं तें विसरलें । डाईं पडिलें आपणचि ॥ २ ॥ दुसऱ्या पहारा महाआनंदें । हमामा घाली छंदेछंदें । दिसे वाढे तों गोड वाटे । परि पुढें नेणें पोर काय होतें तें ॥ ३ ॥ तिसऱ्या पहारा घेतला बार । अहंपणे पाय न राहे स्थिर । सोसे सोस करितां डाईं पडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥४ ॥ चौथ्या पहारा हमामा घालिसी । कांपविसी हातपाय । सुऱ्यापाटिलाचा पोर यम्या । त्याचे पडसील डाईं रे ॥ ५ ॥ हमामा घालितां भ्याला तुका । त्याने सांडिली गड्याची सोई । यादवाचा मूल एक विठोबा । त्यासवें चारितो गाई रे ॥ ६ ॥
फुगडी (अभंग संख्या २)

२५४. फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनी एकएकी पाहे ॥ धृ. ॥ फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ २ ॥ मागें जें शिकलीस होती पोटीं । तेंचि विचारूनी आतां उच्चारी ओठीं ॥ ३ ॥ त्रिगुणांची वेणी तुझे उडतें पाठीं । सावरूनी धरी घाली मूळबंदी गांठी ॥ ४ ॥ आगळें पाऊल जिंकी एकाएक । पावसी मान हें मानवती तिन्ही लोक ॥ ५ ॥ तुका म्हणे तुजमजमध्यें एक भाव । सम तुकें बार घेऊं पावों उंच ठाव ॥ ६ ॥

२५५. फुगडी फू सवती माझे तूं । हागुनी भरलें धूं तुझ्या ढुंगा तोंडावरी थू ॥ धृ. ॥ फुगडी घेतां आली हरी । उठ जा वो जगनोवरी ॥ २ ॥ हात पाय बेंबळ जाती । ढुंगण घोळितां लागे माती ॥ ३ ॥ सात पांच आणिल्या हरी । वांचूनी काय तगसी पोरी ॥ ४ ॥ सरला दम पांगले पाय । अझुनी तरी घोळिसी काय ॥ ५ ॥ तुका म्हणे अझुन तरी । सांगितलें तें गधडी करी ॥ ६ ॥
लखोटा (अभंग संख्या १)

२५६. लये लये लखोटा । मूळबंदी कासोटा । भावा केलें साहें । आतां माझें पाहें ॥ धृ. ॥ हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली। धीर माझा निका । सांडी बोला फिका ॥ २ ॥ अंगीकारी हरि । नको पड़ों फेरी । लाज धरीं भांडे । जगझोडी रांडे ॥ ३ ॥ बैस भावापाठीं । ऐक माझ्या गोष्टी । केला सांडी गोहो । धरी येथें मोहो ॥ ४ ॥ पाठिमोरा डोल । आवरी ते बोल । पांगलीस बाळा । पुढे अवकळा ॥ ५ ॥ आतां उभी ठायीं । उभाउभीं पाहीं । नको होऊ डुकरी । पुढें गाढव कुतरी ॥ ६ ॥ नाम केलें खरें । आपुलें म्यां बरें। तुका म्हणे येरी । पांगविल्या पोरी ॥ ७ ॥
अडसण (अभंग संख्या १)

२५७. शुद्धीचें सारोनी भरियेली पाळी । भरडोनी वोंगळी नाश केला ॥ १ ॥ आडसोनी शुद्ध करीं वो साजणी । सिद्ध कां पापिणी नासियेलें ॥ २ ॥ सुपीं तोचि पाहें धड उगटिलें । नव्हता नासिलें जग झोडी ॥ ३ ॥ सूपीं तोंचि आहे तुज तें आधीन । दळिल्या जेवण जैसें तैसें ॥ ४ ॥ सुपीं तोंचि संग घेईं धडफुडी । एकसा गधडी नास कला ॥ ५ ॥ दळितां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥ ६ ॥ सुपीं तोंचि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका म्हणे ॥ ७ ॥ 

दळण (अभंग संख्या १)

२५८. शुद्ध दळणाचें सुख सांगों काईं । मानवत असे सईबाई ॥ धृ. ॥ शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ २ ॥ शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥ ३ ॥ शुद्ध त्याचा पाक शुद्धचित्त चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥ ५ ॥
कांडण (अभंग संख्या २)

२५९. सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥ धृ. ॥ मुसळ आधारीं आवरूनी धरीं । सांवरोनी थोरी घाव घालीं ॥ २ ॥ वाजती कांकणें अनुहात गजरें । छंद माहियेरे गाऊं गीतीं ॥ ३ ॥ कांडितां कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तो ॥ ४ ॥ तुका म्हणे रूप उमटे आरिसा । पाक त्यासरिसा सिद्ध झाला ॥ ५ ॥

२६०. सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥ धृ. ॥ आठव हा धरीं मज जागें करी । मागिले पहारीं सेवटींचा गे ॥ २ ॥ सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुज मिळणी जिवें मिळें ॥ ३ ॥ एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष ते सडी ओज करी ॥ ४ ॥ सरले कांडण पाकसिद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचें ॥ ५ ॥ उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥ ६ ॥ तुका म्हणे मज माहेरीं आवडी । म्हणोनी तांतडी मूळ केलें ॥ ७ ॥

पाळणा (अभंग संख्या १)

२६१. जननिया बाळका रे घातलें पाळणा । पंचतत्त्वीं जडियेल्या वारतिया चहूं कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनी हातीं भाव दावी खेळणा ॥ १ ॥ निजीं रे निजीं आतां । म्हणोनि परिये दे माता । खेळतां कष्टलासी बाळा तूं रे नेणतां ॥ २ ॥ खेळतां बाहेरी रे मुला लोकांच्या सवें । बागुल काळतोंडा नाहीं नेतों तें ठावें । खेळतां दुश्चिता रे देखोनी तें न्यावें । म्हणोनि सांगे तुज शीघ्र वचन पाळावें ॥ ३ ॥ संचित मागें शुद्ध तुज होतें सांगाती । तेणें तुज वांचविलें वेरझारिया हातीं । आणीक नेलीं मागे काय जाणों तीं किती । आलासी येथवरी थोर पुण्यें बहूतीं ॥ ४ ॥ खेळतां शुक देवा खोरे लागला पाठीं । लपाला वरुषे बारा तिये मातेचे पोटीं । रिघतां बाहेरी रे पळे घेऊनि कासोटी । तेचि परी जाली स्वामी भेणें रिघें कपाटीं ॥ ५ ॥ खेळतां चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिलासे अग्निमाजी पाव जळत एक । भरलासे कांप अंगीं सुख नाठवे दुःख । आप पर तें ही नाहीं देहभाव सकळीक ॥ ६ ॥ सिबीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो नभे तया मांस कापिलें हातीं । टाकिलें तयावरी खुणें गोविला अंती । पावला मायबाप हिरोन घेतला हातीं ॥ ७ ॥ बांधलें अजामेळा वेश्यागणिका कैसीं । मारिली हाक धाकें कळलें मायबापासी । घातली धांव नेटें वेगीं पावला त्यासी । हिरोनि नेलीं दोघें आपणयां तीं पासीं ॥ ८ ॥ धरूनी आठवू रे बाळा राहे निश्चळ । खेळतां दुश्चिता रे नको जाऊं बरळ । टोंकताहे तुजलागीं दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवूं रे नेत्रीं घालीं पडळ ॥ ९ ॥ ऐसी तीं कृपावंतें बाळा मोहिलें चित्त । सुस्वरे कंठ गाये मधुर आणि संगीत । तेणें तें चित्त राहे होऊनियां निवांत । पावती तुका म्हणे नाहीं विश्वास ते घात ॥ १० ॥

आशीर्वाद (अभंग संख्या ५)

२६२. अभय उत्तरी संतीं केलें दान । झाले समाधान चित्त तेणें ॥ १ ॥ आतां प्रेमरसें न घडे खंडण । द्यावें कृपादान नारायणा ॥ २ ॥ आलें जें उचित देहविभागासीं । तेणें पायांपासीं उभीं असों ॥ ३ ॥ तुका म्हणे करी पुजन वैखरी । बोबड्या उत्तरीं गातों गीत ॥ ४ ॥

२६३. असो मंत्रहीन क्रिया | नका चर्या विचारूं ॥ १ ॥ सेवेमधीं जमा धरा । कृपा करा शेवटीं ॥ २ ॥ विचारूनीं ठायाठाव । येथें भाव राहिला ॥ ३ ॥ आतां तुकयापाशीं हेवा । नाहीं देवा तांतडी ॥ ४ ॥

२६४. आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥ १ ॥ कल्याण तीं असो क्षेम । वाढो प्रेम आगळें ॥ २ ॥ भक्तिभाग्य गांठी धन । त्या नमन जीवासी ॥ ३ ॥ तुका म्हणे हरिचे दास । तेथें आस सकळ ॥ ४ ॥

२६५. जीवेंसाठीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥ १ ॥ पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥ २ ॥ विश्वासाची धन्य जाती । तेथें वस्ती देवाची ॥ ३ ॥ तुका म्हणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥ ४ ॥

२६६. तयासाठीं वेचूं वाणी । आइकों कानीं वार्ता त्या ॥ १ ॥ क्षेम माझे हरिजन । समाधान पुसतां त्यां ॥ २ ॥ परत्रीचे जे सांगाती । त्यांची याती न विचारीं ॥ ३ ॥ तुका म्हणे धैर्यवंतें । निर्मळ चित्तें सखीं तीं ॥ ४ ॥
लळित (अभंग संख्या ८)

२६७. आजी आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥ धृ. ॥ विठोबाचीं वेडी आम्हां आनंदू सदा ॥ गाऊं नाचूं वाहूं टाळी रंजवू गोविंदा ॥ २ ॥ सदा सण सांत आम्हां नित्य दिवाळी । आनंदें निर्भय आमचा कैवारी बळी ॥ ३ ॥ तुका। म्हणे नाहीं जन्ममरणाचा धाक । संत सनकादिक हे तों आमचे कवतुक ॥ ४ ॥

२६८. आजी दिवस झाला । धन्य सोनियाचा भला ॥ १ ॥ झालें संतांचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥ २ ॥ रामकृष्णनामें । बरवीं मोहियेलीं प्रेमें ॥ ३ ॥ तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला ॥ ४ ॥

२६९. उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥ १ ॥ देव बैसले सिंहासनीं । आल्या याचकासी पुरे धनी ॥ २ ॥ एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥ ३ ॥ दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देंत चुका ॥ ४ ॥

२७०. गळित झाली काया । हेंचि लळित पंढरीराया ॥ १ ॥ आलें अवसानापासीं । रूप राहिलें मानसीं ॥ २ ॥ वाहिला कळस । तेथें स्थिरावला रस ॥ ३ ॥ तुका म्हणे गोड झालें । नारायणीं पोट धालें ॥ ४ ॥

२७१. तुम्ही ये तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥ १ ॥ काही उरलें तें ठायीं । वेगीं पाठवूनी देईं ॥ २ ॥ टोंकत बैसलों देखा। इच्छीतसे ग्रासा एका ॥ ३ ॥ प्रेम देउनि बहुडा झाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥ ४ ॥

२७२. न कळे हो माव मुनि मागें एकी अंतुरीं । साठी संवत्सरा जन्म तया उदरीं ॥ १ ॥ कैसा आकळ वो माय चपळ वो । त्रिभुवनव्यापक हरि सकळ वो ॥ २ ॥ हनुमंता भेटी गर्व हरिला दोहींचा । गरुडा विटंबना रूपा सत्यभामेचा ॥ ३ ॥ द्रौपदीचा भेद पुरविला समयीं । ऋषि फळ वनीं देंठीं लावितां ठायीं ॥ ४ ॥ अर्जुनाच्या रथीं कपिध्वज स्तंभीं ठेविला । दोही पैज तेथें गर्व हरी हा दादुला ॥ ५ ॥ भावभक्ति सत्त्वगुण झाला दुर्जना । तुका म्हणे सकळां छंदें खेळे आपणा ॥ ६ ॥

२७३. रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥ १ ॥ कुंचे ढळती दोहीं बाहीं । जवळी राही रखुमाई ॥ २ ॥ नाना उपचारीं । सिद्धि वोळगती कामारी ॥ ३ ॥ हातीं घेउनी पादुका । उभा बंदिजन तुका ॥ ४ ॥

२७४. हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥ १ ॥ तैसा दिसे नारायण । मुख सुखाचें मंडण ॥ २ ॥ कोटि चंद्रलीळा । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥ ३ ॥ तुका म्हणे दृष्टि धाये । परतोनी माघारी ते न ये ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...