श्री तुकोबाराय यांच्या काळी प्रचलित विविध मागते आणि मनोरंजनकार यांच्यावरील रूपके
६. डांका (अभंग संख्या ८)
२७५. अवघ्या ज्येष्ठा देवी । कोण पूजनाचा ठाव । धरितांचि भाव । कोठें नाहींसें झालें ॥ १ ॥ दिसे सारिखें सारिखें । परि तें कारणी पारिखें । तळी गेलें देखें। वरी टोले न साहाती ॥ २ ॥ पट एका शिरीं । यथाविधीने त्या येरी । बसकोळ्या घागरी । डेरे रांझण गाडगीं ॥ ३ ॥ तुका म्हणे माना । येथें कोणी रुसावें ना । आपुलाल्या स्थानां । जेथें त्याचि शोभल्या ॥ ४ ॥
२७६. खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुरपाटणीं ॥ १ ॥ आतां करी कां रे हाकारा । सहस्रनामें एकसरा । दवडिते खेचरा | अंगसंगें धरूनी ॥ २ ॥ सीते झाली झडपणी । राहणें वासुगीच्या बनीं । पावली जननी । झोंटि मोकळीया केशी ॥ ३ ॥ लाविलें कावरें। प्रल्हादासी म्हैसासुरें। आली येकसरे । दांत खात रंगासी ॥ ४ ॥ वसुदेवाची बाळें । सात खादली ज्या काळें । आली भोगवेळे । तया कारणें तेथें ॥ ५ ॥ पांडवें बापुडीं । वांज केलीं फिरती वेडीं । धांवोनियां काढी । अंगसंगें त्राहाटविलीं ॥ ६ ॥ नामाचें चिंतन । तेथें धांवते आपण । न विचारितां हीण । भाव देखे जयाचा ॥ ७ ॥ कुळींची कुळदेवता । तुका म्हणे आम्हां माता । काय भय भूतां । काळ यमदूताचें ॥ ८ ॥
२७७. चौक भरियेला आसनीं । पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनी । ये धांवोनी झडकरी ॥ १ ॥ रंगा येईं वो विठाई । सांवळिये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें । ते मी केधवां देखेन ॥ २ ॥ रजतम धुपारती । पंचप्राणांची आरती । अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥ ३ ॥ मन मारोनि मेंढा मुठी। आशा मनसा तृष्णा सुटी । भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनी केला हाकारा ॥ ४ ॥ डाका अनुहात गजरें । येउनि अंगासी संचरे । आपुला घेऊनि पुरस्कार । आरोग्य करी तुकयासी ॥ ५ ॥
२७८. देवी देव झाले भोग सरले यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाही उरली ॥ १ ॥ हरिनाम देवनाम तुम्ही गाऊनियां जागा । पेंठवणी मागा नका ठेवूं लिगाड ॥ २ ॥ शेवटीं सुताळी बरवी वाजवावी डांक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥ ३ ॥ गुंडाळा देव्हारा मान नेती मानकरी । तुका म्हणे बरीं आजी कोडीं उगविलीं ॥ ४ ॥
२७९. पुढे येते देवी । तिची जती चालों द्यावी । मागील झाडावी । झाड मान आसडी ॥ १ ॥ एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा । माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥ २ ॥ मेंढा मारावा लोहाळ । पूजा पावली सकळ । तुम्हीं केले बळ । मग मी ठायीं न पडें ॥ ३ ॥ तुका म्हणे मुळीं । लागली ते आली कुळीं । चंदनी सकळी । जीवें भावें ओवाळा ॥ ४ ॥
२८०. माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा नलगे पुसावें ॥ १ ॥ या रे लोटांगणीं । कांहीं करा विनवणी । करील झाडणी । भूत काढील संसार ॥ २ ॥ पडिले विषयांचे गोंधळी । ते त्रिगुण आकळी । हरिनाम आरोळी । कानी पडतां ते उठी ॥ ३ ॥ घेतला अहंकारें । काम क्रोध या मत्सरें । पळती प्रेमभरें । अवघी ठाव सांडूनी ॥ ४ ॥ घेतलासे पुरा । माया ममता आसरा । अवघ्या एक सरा । पळती रंग देखोनीं ॥ ५ ॥ तुका म्हणे द्यावा भाव । फिटेल मनींचा संदेह । आणीक नलगे ठाव । कांहीं कोठे हिंडावें ॥ ६ ॥
२८१. विनंति घातली अवधारीं । मज देईं वो अभयकरीं । पीडिलो खेचरीं । आणिक वारी नांवांची ॥ १ ॥ रंगा येईं वो एकला । रंग वोढवला । हरिनामें उठिला । गजर केला हाकारा ॥ २ ॥ देवांचे दैवत । तुज नमिलें आदिनाथें । ये वो कृपावंतें । भोगा माझ्या धांवत ॥ ३ ॥ न लवीं आतां वेळ । आइती सारिली सकळ । तुका म्हणे कुळ । आमुचिये दैवते ॥ ४ ॥
२८२. साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणांचा फुलवरा । आणा विनंती सांगतों ॥ १ ॥ माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगी । भरलें मग अंगीं । निवाड करीं दोहींचा ॥ २ ॥ तुझें आहे तुजपाशीं । परि तूं जागा चुकलासी । चिवडूनियां नासी । तुझ्या घरिच्यांनी केली ॥ ३ ॥ आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवें । अंधकार व्हावें । नासु ठाव शोधावा ॥ ४ ॥ आंधळ्यासी डोळे । देते पांगुळासी पाय । वांजा पुत्र होय । नवस पुरविते विठाई ॥ ५ ॥ उगविलीं कोडीं । मागें कित्येकांची बापुडीं । तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधीं ॥ ६ ॥
गोंधळ (अभंग संख्या ३)
२८३. ऐक बाई तुज वो कांहीं सांगतें शकुन । निजलिया भुर हाेसी जागें म्हणऊन ॥ धृ. ॥ मान्य माझें केलें सांगते एका बोलें । न येतां हें भले कळों कोणा लोकांसी ॥ २ ॥ सांगतें गुण जीवींची खूण ऐक माझी मात । बैस एका भावें माझें हातीं दे वाे हात ॥ ३ ॥ बरवा घरचार तुज सांपडला ठाव । फळ नाहीं पोटीं येथें दिसे खोटा भाव ॥ ४ ॥ आहे तुझे हातीं एका नवसाचें फळ । भावा करी साह्य चहूं अठरांच्या बळें ॥ ५ ॥ करी लागपाठ चित्त वित्त नको पाहों । अखई तो चुडा तुज भोगईल नाहो ॥ ६ ॥ कुळींची हे मुळी तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाहीं ठावी ॥ ७॥ तुका म्हणे नांद सुखें धरी आठवण । माझे येती कोणी त्यांचा राखे बहु मान ॥ ८ ॥
२८४. राजस सुंदर बाळा पाहो आलिया सकळा वो । बिंबीं बिंबोनि ठेली माझी परब्रह्म वेल्हाळा वो । कोटि रविशशि जिच्या अंगींचिया किळा हो ॥ १ ॥ राजस विठाबाई माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजूनियां चौघासी लावी आपुलिये सोई वो ॥ २ ॥ सुकुमार साजिरी कैंसी पाउलें गोजिरी वो । कंठी तुळसीमाळा उभी भीवरेच्या तिरीं वो । दंत हिरया ज्योति शंखचक्र मिरवें करीं वो ॥ ३ ॥ निर्गुण निराकार वेदां न कळेचि आकार वो । शेषादिक श्रमले श्रुती न कळे तुझा पार वो । उभारोनी बाहे भक्तां देत अभयकर वो ॥ ४ ॥ येऊनी पंढरपुरा अवतरली सारंगधरा वो । देखोनी भक्ति भाव वोरसली अमृतधारा वो । देऊनी प्रेमपान्हा तुकयास्वामीनें किंकरा वो ॥५ ॥
२८५. सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो । पंच प्राण दिवटे दोनी नेत्रांचे हिल्लाळ वो ॥ १ ॥ पंढरपुरनिवासे तुझे रंगी नाचत असें वो । नवस पुरवीं माझा मनींची जाणोनियां इच्छा वो ॥ २ ॥ मांडिला देव्हारा तुझा त्रिभवनामाझारी वो । चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ॥ ३ ॥ बैसली देवता पुढें वैष्णवांचे गाणें वो । उद्गारें गर्जती कंठी तुळसीचीं भूषणें वो ॥ ४ ॥ स्वानंदाचे ताटीं धूप दीप पंचारती वो । ओवाळिली माता विठाबाई पंचभूतीं वो ॥ ५ ॥ तुझें तुज पावलें माझा नवस पुरवीं आतां वो । तुका म्हणे राखें आपुलिया शरणागता वो ॥ ६ ॥
सौऱ्या (अभंग संख्या ८)
२८६. आणिकां उपदेशू नेणें नाचों आपण । मुंडा वांयां मार गेली वांयां हांसे जन ॥ १ ॥ तैसा नव्हे चाळा आवरी मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ २ ॥ बाहिरल्या वेषें आंत जैसें तैसें । झांकलें तो बरें पोट भरें तेणें वेसें ॥ ३ ॥ तुका म्हणे केला तरी करी शुद्ध भाव । नाहीं तरी जासी वांयां हा ना तोसा ठाव ॥ ४ ॥
२८७. टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनी देतें सीवी ॥ १ ॥ आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ २ ॥ कोरडे ते बोल कां गे वेचितेसी वांयां । वर्ते करूनि दावीं तुझ्या मुळींचिया ठाया ॥ ३ ॥ याजसाठी डौर म्यां धरियेला हातीं । तुका म्हणे तुम्ही गांठी सोडायाची खंती ॥ ४ ॥
२८८. नहो नरनारी संवसारीं अंतरलों । निर्लज निष्काम जना वेगळेचि ठेलों ॥ १ ॥चाल रघुरामा ने आपल्या गांवा । तुजविण आम्हां कोण सोयरा सांगाती ॥ २ ॥ जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे । साहूं तुजसाठी अंतरली सहोदरें ॥ ३ ॥ बहुतां पाठी निरोप हाटीं पाठविला तुज । तुका म्हणे आतां सांडुनि लौकिकाची लाज ॥ ४ ॥
२८९. मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खाेडा घेतली आपुल्या भावें ॥ १ ॥ ऐका बाई लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानी उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ २ ॥ न बोलतां करी चिंता न मारितां पळे । दादला सेजे नावडे निज जगझोडीचे चाळे ॥ ३ ॥ देखत आंध बहिर कानीं बोल बोलतां मुके । तुका म्हणे पतन सोयरीं ऐसीं झाली एके ॥ ४ ॥
२९०. वेसन गेलें निष्काम झालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांच्या फेरी ॥ १॥ त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां । आपुलेमागे हांसत रागें सांवलें घालिती गळां ॥ २ ॥ जनवेषा भीतें तोंडा आमच्या भांडणा । कर कटीं भीमातटीं पंढरीचा राणा ॥ ३ ॥ वेगळ्या याति पडिलों खंती अवघ्या एका भावें । टाकियेली चाड देहभावें जीवें शिवें ॥ ४ ॥ सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा । वायां तुवां मुंडासवे भक्ती नाचों भावा ॥ ५ ॥ म्हणे तुका टाक रुका नाचों निर्लज्जा । बह झालें सुख कामें चुकलिया काजा ॥ ६ ॥
२९१. समसपाट वेसनकाट निःसंग झालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदी दुसरी ॥ १ ॥ गाऊं रघुरामा हेंचि उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्त गोतासहित ॥ २ ॥ ठाव झाला रिता झांकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजें पाहतां ॥ ३ ॥ सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग । भिन्न झालें सुख देहभाव पालटला रंग ॥ ४ ॥ लाज भय शंका जनीं नाहीं तजियेली दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचींच कोणी ॥ ५ ॥ तुका म्हणे हा वेष दिला आम्हां जेणें । जना प्रतीत सवें असो एकपणे ॥ ६ ॥
२९२. सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारी बैसले पारी नाचों फेर धरा ॥ १ ॥ या साहेबाचें झालें देणे वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटी कशासाठी हिंडों पाटी दुकानें ॥ २ ॥ अवघ्या जणी मुंडा धणी नाचों एके घाईं । सरसावलें सुख कैंसा चाळा एके ठायीं ॥ ३ ॥ म्हणे तुका वोळगें एका तोड चिंता माया । देउनियां उद्गार जाऊं मुळींचिया ठाया ॥ ४ ॥
२९३. सौरी सुर झालें दूर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीहीं लोकीं झालें सरती ॥ १ ॥ चाल विठाबाई अवघी पांच देहीं । न धरी गुज कांहीं वाळवंटी सांपडतां ॥ २ ॥ हिंडोनी चौऱ्यांशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठीं आंचवले संसारा ॥ ३ ॥ लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं । भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैंची उरी ॥ ४ ॥ झाले भांडी जगा सांडीं नाहीं भीड चाड । घालीन चरणीं मिठी पुरवीन जीवींचें तें कोड ॥ ५ ॥ तुका म्हणे रुका करी संसारतुटी । आतां तुम्हां आम्हां कैसी झाली जीवें साठीं ॥६ ॥
विराण्या (अभंग संख्या २५)
२९४. वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥ १ ॥ सांडूनी लौकिक झालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥ २ ॥ नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे झाले तुका हरिरत ॥ ३ ॥
२९५. आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनी व्यभिचारा टेकलियें ॥ १ ॥ रात्रंदिवस मज पाहिजे जवळी । क्षण त्या निराळी न गमे घडी ॥ २ ॥ नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातले अनंता तुका म्हणे ॥ ३ ॥
२९६. हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारी गोविंदाचे ॥ १ ॥ घररिघी झालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळे परब्रह्म ॥ २ ॥ बळियाचा अंगसंग झाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥ ३ ॥
२९७. नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥ १ ॥ व्यभिचार माझा पडिला ठाऊका । न सरती लोकांमाजी झालें ॥ २ ॥ न धरावा लोभ कांही माझेविशीं । झाले देवपिशी तुका म्हणे ॥ ३ ॥
२९८. विसरले कुळ आपुला आचार । पति भावे दीर घर सोय ॥ १ ॥ सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातले अनंता चित्त माझें ॥ २ ॥ मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिर झालें ॥ ३ ॥
२९९. न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥ १ ॥ सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥ २ ॥ आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥ ३ ॥
३००. दुजा ऐसा कोण बळी आहे आतां । हरी या अनंतापासूनियां ॥ १ ॥ बळियाच्या आम्ही झालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । झालों प्रीतिकरा गोविंदासी ॥ ३ ॥
३०१. क्षणभरी आम्हीं सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥ १ ॥ सांडीमांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥ २ ॥ तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥ ३ ॥
३०२. आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठी पोटीं कोणी दुजें ॥ १ ॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥ २ ॥ तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥ ३ ॥
३०३. सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ माेहपाश ॥ १ ॥ याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥२ ॥ तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥ ३ ॥
३०४. एका जीवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥ १ ॥ नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पूर्वील हे भाक सांभाळिली ॥ २ ॥ तुका म्हणे झाले सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥ ३ ॥
३०५. हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥ १ ॥ सेवा सुखें करूं विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकीं ।। २ ॥ तुका म्हणे आम्ही झालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥ ३ ॥
३०६. मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयांनो ॥ १ ॥ न साहावे तुम्हां या जनाची कूट । बोलता वाईट ओखटें तें ॥ २ ॥ तुका म्हणे झालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥ ३ ॥
३०७. शिकविलें तुम्ही तें राहें तोवरी । मज आणि हरी वियोग तो ॥ १ ॥ प्रसंगी या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥ २ ॥ तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥ ३ ॥
३०८. सांगतों तें तुम्ही आइकावें कानी । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥ १ ॥ जोंवरी या तुम्हां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥ २ ॥ तुका म्हणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥ ३ ॥
३०९. आजीवरी तुम्हां आम्हां नेणपणे । कौतुकें खेळणे संग हाेता ॥ १ ॥ आतां अनावर झालों अगुणाची । करूं नये तेंचि करू सुखें ॥ २ ॥ तुका म्हणे आतां बुडविलीं दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥ ३ ॥
३१०. सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावेचि ॥ १ ॥ सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥ २ ॥ न व्हावी ते झाली आमुची भंडाई । तुका म्हणे काई लाजों आतां ॥ ३ ॥
३११. मरणाही आधी राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥ १ ॥ आतां तुम्ही पहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी । कैसी संग सरी तुम्हां आम्हां ॥ ३ ॥
३१२. परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनी करीं घ्यावें सीस ॥ १ ॥ संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनी मागुते पाहूं नये ॥ २ ॥ तुका म्हणे व्हावे तयापरी धीट । पतंग हा नीट दीपा साेई ॥ ३ ॥
३१३. आइकाल परी ऐसें नव्हे बाई । न संडावी सोई भ्रताराची ॥ १ ॥ नव्हे आराणूक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविलें तें ॥ २ ॥ तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशीं ॥ ३ ॥
३१४. आहाच वाहाच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैश्या ॥ १ ॥ भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनी मना बंद द्यावा ॥ २ ॥ तुका म्हणे काहीं अभ्यासावांचूनी । नव्हे हे करणी भलतीची ॥ ३ ॥
३१५. बहुतांच्या आम्ही न मिळों मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥ १ ॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥ ३ ॥
३१६. त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा । कठीण हें जिवा तोंचिवरी ॥ १ ॥ मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा । अंतर हे सांगा नेदी पुढें ॥ २ ॥ तुका म्हणे सर्वविशी हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसें ॥ ३ ॥
३१७. न राहे रसनां बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥ १ ॥ मानेल त्या तुम्ही आइका स्वभावें । मी तों माझ्या भावें अनुसरलें ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्हीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गति झाली आतां ॥ ३ ॥
३१८. न बोलतां तुम्हां कळों न ये गुज । म्हणऊनि लाज सांडियेली ॥ १ ॥ आतां तुम्हां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारी । करील तें हरि पाहों आतां ॥ ३ ॥
जोगी (अभंग संख्या १)
३१९. जग जोगी जग जोगी। जागेजागे बोलती ॥धृ. ।। जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ २ ॥ अवघा क्षेत्रपाळ । पूजावा सकळ ॥ ३ ॥ पूजापत्र कांहीं । फल पुष्प तोय ॥ ४ ॥ बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥ ५ ॥ नका घेऊं भार । धर्म तोचि सार ॥ ६ ॥ तुका मागे दान । द्यावें जी अनन्य ॥ ७ ॥
सरवदा (अभंग संख्या १)
३२०. ऐका गा ए भाई । सरवदा सांगतो काई । येथें नाडेल माई । दोघां पुत्रांची ॥ धृ. ॥ ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसिद्ध जना । एक न मारितां शाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥ २ ॥ आणिक ऐका गाए । सरवदा सांगतो काय । खरें बोले तो जाय । नरकामध्यें अधोगती ॥ ३ ॥ हे चौघांच्या मुखें । मना आणावें सुखें । अवघीं चुकतील दुःखें । खोटें बोला नरनारी ॥ ४ ॥ आणीक नाडेल एक जाण । सरवदा बोलतो वचन । जागें माझे चित्त म्हणोन । पडिलें खान तया घरीं ॥ ५ ॥ म्हणोन न म्हणा माझें कांहीं । निजी निजा सुखें ठायीं । यत्न होईल तईं । चोराठायीं विश्वास ॥ ६ ॥ आणीक एकी परी । सरवदा सांगतो थोरी । दुःख पावेल नारी । पतिव्रता यामध्ये ॥ ७ ॥ पांचांनी दिधली हातीं । म्हणोनी न मनावी निश्चिंती । परपुरुषीं होय रती । सुखगती ते पावे ॥ ८ ॥ आणीक एकी परी । सरवदा सांगतो तें करी । दान देतां जो वारी । नव्हे भला भला तो ॥ ९ ॥ तुका म्हणे आई । येथे नांव काई । सांगसी तें ठायीं। मरो रांडेचें ॥ १० ॥
दरवेस - मलंग (अभंग संख्या २)
३२१. नजर करे सो हि जिंके बाबा दुरथी तमासा देख । लकडी फांसा लेकर बैठा आगले ठकण भेख ॥ १ ॥ काहे भुला एक देखत । आंखो मारतडांगो बाजार ॥ २ ॥ दमरी चमरी जो नर भुला । सोत आघो हिलत खाय ॥ ३ ॥ नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाय । कहे तुका उस असाके संग फिरफिर गोते खाये ॥ ४ ॥
३२२. अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाऊ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥ धृ. ॥ ख्याल मेरा साहेबका बाबा हुवा करतार । व्हांटे आघे चढे पीठ आपे हुवा असिवार ॥ २ ॥ जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्या अंदर भेस । कहे तुका जो नर बुझे सोहि भया दरवेस ॥ ३ ॥
डोईफोडा (अभंग संख्या १)
३२३. तम भज्याय ते बुरा जिकीर तै करे । सीर काटे ऊर कुटे ताहां झडकरे ॥ १ ॥ ताहां एक तु ही ताहां एक तु ही । ताहां एक तु ही रे बाबा हम तुम्ह नहीं ॥ २ ॥ दिदार देखो भले नहीं किसे पछाने कोय । सच्चा नहीं पकड़ सके झुटा झुटे राेय ॥ ३ ॥ किसे कहे मेरा किन्हे सती लिया भास । नहीं मेलों मिले जीवना झुटा किया नास ॥ ४ ॥ सुनो भाई कैसा तो ही होय तैसा होय । बाट खाना अल्ला कहना एकबारां तो हे ॥ ५ ॥ भला लिया भेक मुंढे आपना नफा देख । कहे तुका सो ही सखा हाक अल्ला एक ॥ ६ ॥
वैद्यगोळी (अभंग संख्या १)
३२४. अल्ला देवे अल्ला दिलावे । अल्ला दारू अल्ला खिलावे । अल्ला बिगर नहीं कोय । अल्ला करे सोहि होय ॥ धृ. ॥ मर्द होय वो खडा फीर । नामर्दकू नहीं धीर । आपने दिलकूं करना खुसी । तीन दामकी क्या खुमासी ॥ २ ॥ सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार। इमान तो सबहीं सखा । थोडी तोभी लेकर ज्या ॥ ३ ॥ जिन्हो पास नीत सोय । वो हि बसकर ते रोवे । सांतो पांचो मार लगावे । उतार सो पीछे खावे ॥ ४ ॥ सब ज्वानी निकल जावे । पीछे गधडी मटी खावे । गांवढाल सो क्या लेवे । हगवनी भरी नहीं धोवे ॥ ५ ॥ मेरी दारू जिन्हें खाया । दिदार दरगां सो हि पाया । तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥ ६ ॥ बजारका बुझे भाव । वो हि पुसत आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लेवा सखा ॥ ७ ॥
मुंढा (अभंग संख्या ३)
३२५. आवल्ल नाम आल्ला बडा लेते भूल न जाये । इलाम त्याकालजमुपरताही तुंब बजाये ॥ १ ॥ आल्ला एक तुं नबी एक तुं । काटतें सिर पावों हाते नहीं जीव डराये ॥ २ ॥ आगले देखो पिछले बुझो । आपे हजुर आय ॥ ३ ॥ सब सबरी नचाव म्याने खडा आपनी सात । हात पाव रखते जबाब नहीं आगली बात ॥ ४ ॥ सुनो भाई बजार नहीं सबहि नर चलावे । नन्हा बडा नहीं कोये एक ठोर मिलावे ॥ ५ ॥ एक तारी नहीं प्यार जीवतनकी आस । कहे तुका सोहि मुंढा राखलिये पायेनपास ॥ ६ ॥
३२६. सब संबाल म्याने लौंडे खडा केऊं गुंग । मदिरथी माता हुवा भुलि पाडी भंग ॥ १ ॥ आपसकुं संबाल आपसकुं संबाल मुंढे खुब राख ताल । मुथिवोहि बोला नहीं तो करूंगा हाल ॥ २ ॥ आवलका तो पीछें नहीं मुदल बिसर जाय । फिरते नहीं लाज रंडी गद्धी गोते खाय ॥ ३ ॥ जिन्हो खातिर इतना होता सो नहीं दुजे बेकाम । उचा जोरो लिया तुंबा तुंबा बुरा काम ॥ ४ ॥ निकल जावे चिकल जोरा मुंढे दिलदारी । जबानीकी छोड दे बात फिर एक तारी ॥ ५ ॥ कहे तुका पिसल रुका मेरेको तो दान देख । पक्कड धका गांडगुडघी मार चलाऊं आलेख ॥ ६ ॥
३२७. संबाल यारा उपर तले दोन्हों मारकी चोट । नजर करे सो ही राखे पश्वा जावे लुट ॥ १ ॥ प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई । प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई ॥ २ ॥ उडे कुदे ढुंग नचावे आगल भुलन प्यार । लडबड खडबड कांहे कांख चलावत भार ॥ ३ ॥ कहे तुका सुनो एका हम जिन्होंके सात । मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात ॥ ४ ॥ (धृ. नाही)
कोडें (अभंग संख्या २)
३२८. नुगवे तें उगवून सांगितलें भाई । घालूनियां ताळा आतां शुद्ध राखा घाई ॥ १ ॥ आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥ २ ॥ कमाईस मोल येथें नका रीस मानूं । निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥ ३ ॥ तुका म्हणे पदोपदी कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळीं ॥ ४ ॥
३२९. पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काई । रुसू नका नुगवे तो झवे आपुली आई ॥ धृ. ॥ कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनी फार राहे गुंफोनियां थोडें ॥ २ ॥ सांगतों हें मूळ कांहीं न धरावी खंती । ज्याले जीवो मेलें मरों प्रारब्धा हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे अभिमान सांडावा सकळीं । नये अंगावरी वायां येऊं देऊं कळी ॥ ४ ॥
जोहार (अभंग संख्या २)
३३०. जोहार जी मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥ धृ. ॥ मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ २ ॥ फांकू नका रुजू जालियावांचून । सांगा जी कोण धरती धन्या ॥ ३ ॥ आजी मायबाप करा तडामोडी । उद्यां कोण घडी राहेना हो ॥ ४ ॥ तुका म्हणे कांहीं न चले ते बोली । अखेर ते सालीं झाडा देती ॥ ५ ॥
३३१. येऊ द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥ धृ. ॥ जो यावें तों हातचि रिता नाहीं । कधी तरी कांहीं द्यावें घ्यावें ॥ २ ॥ तुका म्हणे उद्यां लावीन मनेरा । जे हे दारोदाराभोवती फिरा ॥ ३ ॥
कावड (अभंग संख्या ५)
३३२. आहा आहा रे भाई ॥ धृ. ॥ प्रथम नमूं तो विनायक । ठेवूनि गुरुचरणीं मस्तक । वदेल प्रासादिक । वाणी हरिहरांचे पवाडे ॥ १ ॥ माझी ऐसी ब्रीदावळी । दासें दासत्वें आगळी । पान्हेरीने मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडी हो ॥ २ ॥ जें सितळाहुनी सीतळ । पातळाहुनी पातळ । प्रेमामृत रसाळ । तें आधी सेवा हो भाग्याचे नु ॥ ३ ॥ जिंकाल तरी जिंका अभिमान । दवडालता दवडा लज्जा आणि मान । धराल ते धरा शंभूचें ध्यान । दावाल पण ऐसा दावा तो ॥ ४ ॥ काळ घेऊं नेदीं वाव । आला तो राखें घावडाव । शुद्ध सत्वीं राखोनी भाव । म्हणा महादेव हरहर वाणी गर्जों द्या ॥ ५ ॥ पराविया नारी माउलीसमान । परधनीं बाटों नेदीं मन । जीवित्व तें तृणासमान । स्वामीकाजीं जाण शूर म्हणों तया आम्ही ॥ ६ ॥ शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा । सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथें आले हो सांगतों ॥ ७ ॥ व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर । पुण्य तें असे गातां नाचतां फार । पुन्हां बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥ ८ ॥ संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा । पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ॥ ९ ॥ तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोखडी । पुढती पुढती अधिक गोडी । भरूनि कळस भजन आवडी । केशवदास नटतसे ॥ १० ॥
३३३. आहा आहा रे भाई ॥ धृ. ॥ हें अन्नदानाचें सत्र । पव्हे घातली सर्वत्र । पंथीं अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचें आर्त पुरवावया ॥ १ ॥ यावें तेणे घ्यावें । न सरेसें केलें सदाशिवें । पात्र शुद्ध पाहिजे बरवें । मंगळभावें सकळ हर म्हणा रे ॥ २ ॥ नव्हे हें कांहीं मोकळें । साक्षीं चौघांचिया वेगळें । नेदी नाचों मताचिया बळें । अणु अणोरणीया आगळें । महदि महदा साक्षित्वें हर म्हणा रे ॥३ ॥ हे हरि नामाची आंबिली । जगा पोटभरी केली । विश्रांति कल्पतरूची साउली । सकळां वर्णां सेवितां भली । म्हणा हर हर महादेव ॥ ४ ॥ तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ । या रे वंदू शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शनें ॥ ५ ॥
३३४. आहा आहा रे भाई ॥ धृ. ॥ तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कली क्रियाहीन ॥ १ ॥ धुंका का धुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ २ ॥ बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा ॥ ३ ॥ विद्याबळें वाद करूनियां छळी । आणिकांसी फळी मांडोनियां ॥ ४ ॥ गांवींचिया देवा नाहीं दंडवत । सज्जन अतीत घडेचि ना ॥ ५ ॥ सर्वकाळ करी संतांचिया निंदा । स्वप्नींही गोविंदा आठवीना ॥ ६ ॥ खाचेमध्ये धन पोटासी बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं ॥ ७ ॥ तुका म्हणे नटें दावूनियां सोंग । लवों नेदीं अंग भक्तिभावें ॥ ८ ॥
३३५. आहा आहा रे भाई ॥ धृ. ॥ नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥ १ ॥ नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती बोळवित त्यांसी नमो ॥ २ ॥ नमो तया संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरूचें त्या ॥ ३ ॥ नमो तया मातापित्यांचे पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥ ४ ॥ नमो तया जाणे आणिकांचे सुखदुःख । राखे तहान भूक तया नमो ॥ ५ ॥ परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसी ॥ ६ ॥ तुका म्हणे नमाे हरीचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥ ७ ॥
३३६. आहा आहा रे भाई ॥ धृ. ॥ गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥ १ ॥ समुद्र नदी नव्हे पै गा । पाषाण म्हणो नये लिंगा । संत नव्हती जगा । माणसा त्या सारिखे ॥ २ ॥ काठी म्हणों नये वेतु । अन्न म्हणों नये सातु । राम राम हे मातु । नये म्हणों हे शब्द ॥ ३ ॥ चंद्र सूर्य नव्हती तारांगणे । मेरु तो नव्हे पर्वतासमान । शेष वासुकी सर्प नव्हे जाण । विखाराच्या सारिखे ॥ ४ ॥ गरुड नव्हे पाखरूं । ढोर नव्हे नंदिकेश्वरू । झाड नव्हे कल्पतरूं । कामधेनु गाय न म्हणावी ॥ ५ ॥ कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह । ब्रह्मा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥ ६ ॥ गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड । परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वराचे ॥ ७ ॥ सोनें नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु । नाहीं नाहीं चर्मांआतु । कृष्णाजिन व्याघ्रांबर ॥ ८ ॥ मुक्ताफळें नव्हेती गारा । खड्याऐसा नव्हे हिरा । जीव नव्हे सोईरा । बोळवीजे स्वईच्छेनें ॥ ९ ॥ गांव नव्हे द्वारावती । रणछोड नव्हे मूर्ति । तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥ १० ॥ कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी । तुका पांडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥ ११ ॥
वासुदेव (अभंग संख्या ३)
३३७. राम राम दोनी अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिलें पहारें । सेवटिचे गोड तेंचि खरें गा ॥ १ ॥ रामकृष्ण वासुदेवा । जाणवीतसे जनासी वाजवी चिपळिया । टाळ घागऱ्याघोषें गा ॥ २ ॥ गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिकां नांवा । दान जाणोनियां करी हावा । न ठेवीं उरी कांहीं ठेवा गा ॥ ३ ॥ नीज घेउनीयां फिरती । एक वेळां जाणविती । धरूनियां राहा चित्तीं । नेघे भार सांडी कामा हातीं गा ॥ ४ ॥ सुपात्रीं सर्व भाव । मी तो सर्व वासुदेव । जाणती कृपाळू संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठावा गा ॥ ५ ॥ शूर दान जीवें उदार । नाहीं वासुदेवी विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥ ६ ॥
३३८. बोल अबोलणें बोले । जागें बाहेर आंत निजेलें । कैसे घरांत घरकुल केलें । नेणों अंधार ना उजेडलें गा ॥ १ ॥ वासुदेव करितो फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी कांही तरी दान पुण्य करा । जाब नेदा तरी जातों माघारा गा ॥ २ ॥ हाती टाळ दिंडी मुखीं नाम गाणें । गजर होतो बहु मोठ्यानें । नाहीं निवडिली थोर लहानें । नका निजों भिकेच्या भेणें गा ॥ ३ ॥ मी वासुदेव तत्वतां । कळाें येईल विचारितां । आहे ठाउका सभाग्य संतां । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥ ४ ॥ कांहीं जागा कीं निजलासी । सुनें जागवूनि दारापासीं । तुझ्या हितापाठीं करी वसवसी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥ ५ ॥ ऐसें जागविलें अवघे जन । होतें संचित तिहीं केलें दान । तुका म्हणे दुबळी कोणकोण । गेलीं वासुदेवासी विसरून गा ॥ ६ ॥
३३९. राम कृष्ण गीतीं गात । टाळ चिपळ्या वाजवीत । छंदे आपुलिया नाचत । नीज घेऊनी फिरत गा ॥ १ ॥ जनीं वनीं अवघा देव । वासनेचा पुसावा ठाव । मग वोळगा तो वासुदेव । ऐसा मनीं वसूं द्या भाव गा ॥ २ ॥ निज दानाची थोर आवडी । वासुदेवासी लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडीं । ऐसी करा वासुदेवीं जोडी गा ॥ ३ ॥ अवघा सारूनि सेवट झाला । प्रयत्न न चले कांहीं केला । जागा होईं सांडुनि झोपेला । दान देई वासुदेवाला गा ॥ ४ ॥ तुका म्हणे धन्य त्याचें जिणें । जिहीं वासुदेवीं घातलें दान । त्या न लगे येणें जाणें । झालें वासुदेवीं राहणे गा ॥ ५ ॥
पांगुळ (अभंग संख्या २)
३४०. पांगुळ झालों देवा नाही हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय । खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज । कोणी बाप ना माय ॥ १ ॥ दाते हो दान करा जाते पंढरपुरा । न्या मज तेथवरी अखमाचा सोयरा ॥ २ ॥ हिंडता गव्हानें गा शिणलों येरझारी । न मिळेचि दाता कोणी जन्मदुःख निवारी । कीर्ति हे संतां मुखीं तोचि दाखवा हरि । पांगुळा पाय देतो नांदे पढरपुरी ॥ ३ ॥ या पोटाकारणें गा झालों पांगिला जना । न सरेचि मायबाप भीक नाहीं खंडणा । पुढारा म्हणती एक तया नाहीं करुणा । श्वान हे लागे पाठी आशा बहु दारुणा ॥ ४ ॥ काय मी चुकलों गा मागें नेणवेचि कांहीं । न कळेचि पापपुण्य येथें आठव नाहीं । मी माजी भुललों गा दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान संत महानुभाव कांहीं ॥ ५ ॥ दुरोनी आलों मी गा दुःख झालें दारुण । यावया येथवरी होतें हेंचि कारण । दुर्लभ भेटी तुम्हां पायीं झालें दरुषण । विनवितो तुका संतां दोन्ही कर जोडून ॥ ६ ॥
३४१. देश वेष नव्हें माझा सहज फिरत आलो । करूं सत्ता कवणावरी कोठे स्थिर राहिलों । पाय डोळे म्हणतां माझे तिहीं कैसा मोकलिलों । परदेशीं नाहीं कोणी अंध पांगुळ झालों ॥ १ ॥ आतां माझी करी चिंता दान देईं भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी निरवीं सज्जन संतां ॥ २ ॥ चालतां वाट पुढे भय वाटतें चित्तीं । बहुत जन गेले नाहीं आले मागुती । न देखों काय झालें कान तरी ऐकती । बैसलों संधिभागीं तुज धरूनी चित्तीं ॥ ३ ॥ भाकितों करुणा गा जैसा सांडिला ठाव । न भरेचि पोट कधीं नाहीं निश्चळ पाव । हिंडतां भागलों गा लक्ष चौऱ्यांशीं गांव । धरूनी राहिलों गा हाचि वसतां ठाव ॥ ४ ॥ भरंवसा काय आतां कोण आणी अवचिता । तैसीच झाली कीर्ति तया मज बहुतां । म्हणऊनी मारी हाका सोयी पावें पुण्यवंता । लागली भूक थोरी तूंचि कृपाळू दाता ॥ ५ ॥ संचित सांडवलें कांहीं होतें तें जवळीं । वित्त गोत पुत माया तुटली हे लागावळी । निष्काम झालों देवा होतें माझे कपाळीं । तुका म्हणे तूंचि आतां माझा सर्वस्वें बळी ॥ ६ ॥
आंधळा (अभंग संख्या ४)
३४२. देखत होतों आधी मागें पढें सकळ । मग हे दृष्टि गेली वरी आलें पडळ । तिमिर कोंदलेंसे वाढे वाढतां प्रबळ । भीत मी झालों देवा काय ज्याल्याचें फळ ॥ १ ॥ आतां मज दृष्टि देई पांडुरंगा मायबापा । शरण मी आलों तुज निवारूनियां पापा । अंजन लेववूनी करीं मारग सोपा । जाईन सिद्धपंथें अवघ्या चुकतील खेपा ॥ २ ॥ होतसे खेद चित्ता कांहीं नाठवे विचार । जात होतो जनामागें तोहि सांडिला आधार । हा ना तो ठाव झाला अवघा पडिला अंधार । फिरलीं माझी मज कोणी न देती आधार ॥ ३ ॥ जोंवरी चळण गा तोंवरीं म्हणती माझा । मानिती लहान थोर देहसुखाचीया काजा । इंद्रियें मावळलीं आला बागुल आजा । कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा ॥ ४ ॥ गुंतलों या संवसारें कैसा झालोंसे अंध । मी माझें वाढवूनी मायातृष्णेचा बाध । स्वहित न दिसेचि केला आपुला वध । लागले काळ पाठीं सवें काम हे क्रोध ॥ ५ ॥ लागती चालतां गा गुणदोषाच्या ठेसा । सांडिली वाट मार्ग झालों निराळा कैसा । पाहातों वास तुझी थोर करूनी आशा । तुका म्हणे वैद्यराजा पंढरीच्या निवासा ॥ ६ ॥
३४३. आंधळ्यापांगळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तोंचि सर्व होय जाणता । घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता । भवदु:ख कोण वारी तुजवांचुनी चिंता ॥ १ ॥ धर्म गा जागो तुझा तूंचि कृपाळू राजा । जाणसी जीवींचें गा न सांगतां सहजा ॥ २ ॥ घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटी । पंढरी पुण्य ठाव नीरे भींवरे तटीं । न देखें दुसरें गा झाली अदृश्यदृष्टि । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टि ॥ ३ ॥ आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें। न देखे न चलवे जना चालते वाटे । घातली लोळणीं गा हरिनाम बोभाटे । पावला त्याकारणें धांव घातली नेटें ॥ ४ ॥ बैसोनी खोळी शुक राह गर्भीं आंधळा । शीणला येरझारी दःख आठवी वेळा । मागील सोसिलें तें ना भीं म्हणे गोपाळा । पावला त्या कारणे लाज राखिली कळा ॥ ५ ॥ न देखे जों या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो नाठवी धना । आपपर तेंही नाहीं बंधुवर्ग सज्जना । तुकया तेचि परी झाली पावें नारायणा ॥ ६ ॥
३४४. सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति झाली जन न दिसे तेथें । मी माझें हारपलें ठायीं जेथींच्या तेथें । अदृश्य तेंचि झाले कांही दृश्य जें होतें ॥ १ ॥ सुखें मी निजलों गा शून्य सारूनी तेथें । त्रिकुटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ २ ॥ टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणांचा वोळसा । न मागें भीक आतां हाचि झाला भरंवसा । वोळली सत्रावी गा तिणे पुरविली इच्छा ॥ ३ ॥ उर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनी छंद । घेऊनी आला दान निजतत्त्व निजबोध । स्वरूपीं मेळविलें नांव ठेवियला भेद ॥ ४ ॥ शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मागें येतील त्यांसी । मागोनी आली वाट सिद्ध ओळीची तैसी । तरले तरती गा आणीकही विश्वासी ॥ ५ ॥ वर्म तें एक आहे दृढ धरावा भाव । जाणीव नागवण नेदी लागो ते ठाव । म्हणोनि संग टाकीं सेवीं अद्वैत भाव । तुका म्हणे हाचि संती मागें केला उपाव ॥ ६ ॥
३४५. भगवंता तुजकारणें मेलों जीताचि कैसी । निष्काम बुद्धि ठेली चळण नाहीं तयेसी । न चलती हात पाय दृष्टि फिरली कैसी। जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥ १ ॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥ २ ॥ भुक्ति मुक्ति तूंचि एक होसि सिद्धीचा दाता । म्हणोनि सांडवली शाेक भय लज्जा चिंता । सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां । कृपादान देईं देवा येउनि सामोरा आतां ॥ ३ ॥ संसारसागरु गा भवदुःखाचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ । इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ॥ ४ ॥ तिहि लोकीं तुझें नाम वृक्ष पलव शाखा । वेंघलो वरि खोडा भाव धरुनी टेंका । जाणवी नरनारी जागो धर्म लोकां । पावती पुण्यवंत साेई आमुचिय हाका ॥ ५ ॥ नाठवे आपपर आतां काय बा करूं । सारिखा दोहीसवा हारपला विचारु । घातला याेगक्षम तुज आपुला भारु । तुकया शरणागता देईं अभयकरु ॥ ६ ॥
एकाखडी (अभंग संख्या १)
३४६. करावा कैवाड । नाहीं तरी आला नाड ॥ १ ॥ स्मरा पंढरीचा देव । मनी धरोनियां भाव ॥ २ ॥ खचविले काळे । उगवा लवलाहें जाळे ॥ ३ ॥ गजर नामाचा । करा लवलाहें वाचा ॥ ४ ॥ घरटी चक्रफेरा । जन्ममृत्यूचा भोंवरा ॥ ५ ॥ नानाहव्यासांची जोडी । तृष्णा करी देशधडी ॥ ६ ॥ चरणी ठेवा चित्त । म्हणवा देवाचे अंकित ॥ ७ ॥ छंदें नानापरी । कळा न पविजे हरी ॥ ८ ॥ जगाचा जनिता । भुक्तिमुक्तींचाही दाता ॥ ९ ॥ झणीं माझें माझें । भार वागविसी ओझें ॥ १० ॥ यांची कां रे गेली बुद्धि । नाहीं तरायाची शुद्धि ॥ ११ ॥ टणक धाकुलीं । अवघी सरती विठ्ठली ॥ १२ ॥ ठसा त्रिभुवनीं । उदार हा शिरोमणि ॥ १३ ॥ डगमगी तो वांयां जाय । धीर नाहीं गोता खाय ॥ १४ ॥ ढळों नये जरी । लाभ घरींचिया घरीं ॥ १५ ॥ नाहीं ऐसें राहे । कांहीं नासिवंत देहे ॥ १६ ॥ तरणा भाग्यवंत । नटे हरिकीर्तनांत ॥ १७ ॥ थडी टाकी पैलतीर । बाहे ठाेके होय वीर ॥ १८ ॥ दया तिचें नांवें । अहंकार जाय जिवें ॥ १९ ॥ धनधान्य हेवा । नाड कुटुंबाची सेवा ॥ २० ॥ नाम गाविंदाचें । घ्या रे हेंचि भाग्य साचें ॥ २१ ॥ परउपकारा वेंचा शक्ति निंदा वारा ॥ २२ ॥ फळ भोग इच्छा । देव आहे जैसा तैसा ॥ २३ ॥ बरवा ऐसा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥ २४ ॥ भविष्याचे माथां । भजन नेदावें सर्वथा ॥ २५ ॥ माग लागला न संडीं । आळस माती घालीं तोंडी ॥ २६ ॥ यश कीर्ति मान । तरी जोडे नारायण ॥ २७ ॥ रवि लोपे तेजें । जरी हारपे हे दुजें ॥ २८ ॥ लकार लाविला । असतांनसतांचि उगला ॥ २९ ॥ वासनेची धाडी । बंद खोड्या नाड्या बेडी ॥ ३० ॥ सार तें न कळे । काय झांकियेले डोळे ॥ ३१ ॥ खंती ते न धरा । होणे गाढव कुतरा ॥ ३२ ॥ सायासाची जोडी । पिकें काढिलिया पडी ॥ ३३ ॥ हातीं हित आहे । परि न करिसी पाहें ॥ ३४ ॥ अळंकार लेणें । तुळसी - मुद्रांची भूषणें ॥ ३५ ॥ ख्याति केली विष्णुदासीं । तुका म्हणे पाहा कैसी ॥ ३६ ॥
ओव्या (अभंग संख्या २)
३४७. पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरे चरणा संतांचिया ॥ १ ॥ त्यांच्या कृपादानें कथेचा विस्तारु । बाबाजीसद्गुरुदास तुका ॥ २ ॥ काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवूं चित्तासी आपुलिया ॥ ३ ॥ या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥ शीण झाला मज संसारसंभ्रमें । सीतळ या नामें झाली काया ॥ ५ ॥ या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आला आकारासी निर्विकार ॥ ६ ॥ नित्य धांवे तेथें नामाचा गजर । घोष जयजयकार आइकतां ॥ ७ ॥ तांतडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥ ८ ॥ मूळ नरकाचें राज्य मदें मातें । अंतरे बहुत देव दुरी ॥ ९ ॥ दुरी अंतरला नामनिंदकांसी । जैसें गोचिडासी क्षीर राहे ॥ १० ॥ हे वाट गोमटी वकुंठासी जातां । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥ ११ ॥ जाणते तयांनीं सांगितलें करा । अहंतेसी वारा आडूनियां ॥ १२ ॥ यांसी आहे ठावें । परी अंध होती । विषयांची खंती वाटे जना ॥ १३ ॥ नाहीं त्या सुटलीं द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥ १४ ॥ चित्त ज्याचें पुत्रपत्नीबंधूवरी । सुटेल हा परि कैसें जाणा ॥ १५ ॥ जाणते नेणते करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥ १६ ॥ माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥ १७ ॥ कोणी तरी कांहीं केलें आचरणें । मज या कीर्तनेंविण नाहीं ॥ १८ ॥ नाहीं भक्ता भय तराया पोटाचें । देवासी तयाचें करणें लागे ॥ १९ ॥ लागे पाठोवाटी पाहे पायांकडे । पीतांबरें खडे वाट झाडी ॥ २० ॥ डिंकोनियां काय राहिले हे लोक । हेंचि कवतुक वाटे मज ॥ २१ ॥ जयाने तारिले पाषाण सागरीं । तो ध्या रे अंतरीं स्वामी माझा ॥ २२ ॥ माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळू हा ॥ २३ ॥ हाचि माझा नेम हाचि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचें ॥ २४ ॥ चेतवला अग्नि तापत्रयजाळ । तो करी शीतळ रामनाम ॥ २५ ॥ मना एक करी चित्तीं दृढ धरीं । तारील श्रीहरि मायबाप ॥ २६ ॥ बाप हा कृपाळू भक्तां भाविकांसी । घरीं हाेय दासीं कामारी त्या ॥ २७ ॥ त्याचा भार माथां चालवी आपुला । जिहीं त्या दिधला सर्व भाव ॥ २८ ॥ भावेंविण नाहीं तयाची ते प्राप्ति । पुराणें बोलती ऐसी मात ॥ २९ ॥ मात त्याची सदा आवडे जयासी । तया गर्भवासी नाहीं येणें ॥ ३० ॥ यावें विष्णुदासीं तरीच गर्भवासीं । उद्धार लोकांसी पूज्य होती ॥ ३१ ॥ होती आवडते जीवाचे ताईत । त्यां घडी अच्युत न विसंबे ॥ ३२ ॥ भेदाभेद कांही चिंता दुःख नाहीं । वैकुंठ त्या ठायीं सदा वसे ॥ ३३ ॥ वसे तेथें देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥ ३४ ॥ संपदा तयांची न सरे कल्पांतीं । मेळविला भक्तीं देवलाभ ॥ ३५ ॥ लाभ तयां झाला संसारा येऊनी । भगवंत ऋणी भक्ती केला ॥ ३६ ॥ लागलेसे पिसें काय मूढ जनां । काय नारायणा विसरलीं ॥ ३७ ॥ विसरलीं तयां थोर झाली हाणी । पचतील खाणी चौन्यांशीच्या ॥ ३८ ॥ शिकवितां तरी नाहीं कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥ ३९ ॥ गोड एक आहे अविट गोविंद । आणीक ते छंद नाशिवंत ॥ ४० ॥ तळमळ त्याची कांही तरी करा । कां रे निदसुरा बुडावया ॥ ४१ ॥ या जनासी भय यमाचें कां नाहीं । सांडियेली तिहीं एकी राज्य ॥ ४२ ॥ जेणे अग्निमाजी घातलासे पाव । नेणतां तो राव जनक होता ॥ ४३ ॥ तहान भूक जिहीं साहिले आघात । तयां पाय हात काय नाहीं ॥ ४४ ॥ नाहीं ऐसा तिहीं केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥ ४५ ॥ याच जन्में घडे देवाचें भजन । आणीक हे ज्ञान नाहीं कोठें ॥ ४६ ॥ नाहीं पुढें कोठे घ्यावया विसांवा । फिरोनी या गांवा आल्याविण ॥ ४७ ॥ विनवितां दिवस बहुत लागती । म्हणऊनी चित्तीं देव धरा ॥ ४८ ॥ धरा पाय तुम्ही संतांचे जीवेंसी । वियोग देवासी तयां नाहीं ॥ ४९ ॥ नाहीं चाड देवा आणीका सुखाची । आवडी तयाची त्याची तया ॥ ५० ॥ त्याचींच उच्छिष्ट बोलतों उत्तरे । सांगितलें खरें व्यासादिकीं ॥ ५१ ॥ व्यासें सांगितलें भक्ति हेंचि सार । भवसिंधु पार तरावया ॥ ५२ ॥ तरावया जना केलें भागवत । गोवळे गोपी भक्त माता पिता ॥ ५३ ॥ तारूनियां खरें नेली एकसरें। निमित्तें उत्तरें ऋषीचिया ॥ ५४ ॥ यासी वर्म ठावें भक्त तरावया । जननी बाळ माया राखे तान्हें ॥ ५५ ॥ तान्हेलें भुकेलें म्हणे वेळोवेळां । न मागतां कळा जाणोनियां ॥ ५६ ॥ जाणोनियां वर्म देठ लावियला । द्रौपदीच्या बोलासवें धांवें ॥ ५७ ॥ धांवें सवें तान्ही धेनु जैसी वत्सा । भक्तालागीं तैसा नारायण ॥ ५८ ॥ नारायण व्हावा हे हांव जया जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाहीं ॥ ५९ ॥ नाहीं पार सुखा तें दिले तयासी । अखंड वाचेसी रामराम ॥ ६० ॥ रामराम दोनी उत्तम अक्षरें । भवानी शंकरें उपदेशिलीं ॥ ६१ ॥ उपदेश करी विश्वनाथ कानीं । वाराणसी प्राणी मध्ये मरे ॥ ६२ ॥ मरणाचे अंतीं राम म्हणे जरी । नलगे यमपुरी जावें तया ॥ ६३ ॥ तयासी उत्तम ठाव पैं वैकुंठीं । वसे नाम कंठीं सर्वकाळ ॥ ६४ ॥ सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरीं । नसे क्षणभरी स्थिर कोठें ॥ ६५ ॥ कोठें नका पाहों करा हरिकथा । तेथें अवचिता सांपडेल ॥ ६६ ॥ सांपडे हा देव भाविकांचे हातीं । शाहाणे मरती तरी नाहीं ॥ ६७ ॥ नाहीं भक्ति भली केलियांवांचूनी । अहंता पापिणी नागवण ॥ ६८ ॥ नागवला म्हणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकला तो ॥ ६९ ॥ तोचि देव येर नव्हे ऐसें कांहीं । जनार्दन ठायीं चहूं खाणी ॥ ७० ॥ खाणी भरूनियां राहिलासे आंत । बोलावया मात ठाव नाहीं ॥ ७१ ॥ ठाव नाहीं रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥ ७२ ॥ वाणी बोलोनियां एक गेले पुढें । तयासी वांकुडे जातां ठके ॥ ७३ ॥ ठकला नाहीं अर्थ ठाउका वेदांचा । होऊनी भेदाचा दास ठेला ॥ ७९ ॥ दास ठेला पोट अर्थ दंभासाठीं। म्हणउनि तुटी देवासवें ॥ ७५ ॥ सवें देव द्विजातीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥ ७६ ॥ पाड करूनियां नागविली फार । पंडित वेव्हार खळवादी ॥ ७७ ॥ वादका निंदका देवाचे दर्शन । नव्हे झाल्या पूर्ण षडकर्मी ॥ ७८ ॥ षडकर्म हीन रामनाम कंठी । तयासवें भेटी सत्य देवा ॥ ७९ ॥ देवासी आवडे भाविक जो भोळा । शुद्ध त्या चांडाळा करुनि मानी ॥ ८० ॥ मानियेला नाहीं उधार या बोला । नाम घेतां मला युक्ति थोडी ॥ ८१ ॥ युक्ति थोडी माझी दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥ ८२ ॥ बोलतां पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युक्ति पुढे त्याच्या ॥ ८३ ॥ त्याचा पार पुढें न कळेचि जातां । पाऊलें देखतां ब्रह्मादिकां ॥ ८४ ॥ काय भक्ति पिसे लागलें देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय ॥ ८५ ॥ होय हा सगुण निर्गुण आवडी । भक्तिप्रिय गोडी फडावया ॥ ८६ ॥ माय बापापाशीं बाळ बोले लाडें । करूनी वाकुडें मुख तैसें ॥ ८७ ॥ तैसें याचकाचे समाधानदाता । होय हा राखतां सत्त्वकाळीं ॥ ८८ ॥ सत्त्वकाळीं कामा न येती आयुधें । सोयरीं संबंधें सैन्य लोक ॥ ८९ ॥ सैन्य लोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥ ९० ॥ कोपा मरण नाहीं शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्त्वगुण ॥ ९१ ॥ सत्त्वरजतम आपण नासती । करितां या भक्ति विठोबाची ॥ ९२ ॥ चित्त रंगलिया चैतन्यचि होय । तेथें उणें काय निजसुखा ॥ ९३ ॥ सुखाचा सागरू आहे विटेवरी । कृपादान करी तोचि एक ॥ ९४ ॥ एक चित्त करूं विठोबाचे पायीं । तेथें उणें कांहीं एक आम्हां ॥ ९५ ॥ आम्हांसी विश्वास त्याचिया नामाचा । म्हणऊनि वाचा घोष करूं ॥ ९६ ॥ करूं हरिकथा सुखाची समाधि । आणिकाची बुद्धि दुष्ट नासे ॥ ९७ ॥ नासे संवसार लोभमोहो माया । शरण जातां या विठोबासी ॥ ९८ ॥ सिकविलें मज मूढा संतजनीं । दृढ या वचनीं राहिलोंसें ॥ ९९ ॥ राहिलोंसें दृढ विठोबाचे पायीं । तुका म्हणे कांहीं न लगे आतां ॥ १०० ॥
३४८. गाईन ओविया पंढरीचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥ १ ॥ रंगले हे चित्त माझें तया पायीं । म्हणऊनि घेईं हाचि लाहो ॥ २ ॥ लाहो करीन मी हाचि संवसारी । राम कृष्ण हरि नारायण ॥ ३ ॥ नारायण नाम घालितां तुकासी । न येती या रासी तप तीर्थें ॥ ४ ॥ तीर्थें माथां रज वंदिती संतांचे । जे गाती हरीचे गुणवाद ॥ ५ ॥ गुणवाद ज्याचे गातां पूज्य झाले । बडिवार बोले काेण त्यांचा ॥ ६ ॥ त्याचा नाहीं पार कळला वेदांसी । आणीकही ऋषि विचारितां ॥ ७ ॥ विचारितां तैसा होय त्यांच्या भावें । निजरूप ठावें नाहीं कोणा ॥ ८ ॥ कोणा कवतुक न कळे हे माव । निजलिया जीव करी धंदा ॥ ९ ॥ करूनि कवतुक खेळे हाचि लिळा । व्यापूनी वेगळा पाहतसे ॥ १० ॥ सेवटीं आपण वेगळाचि खरा । सोंग हा पसारा नट केला ॥ ११ ॥ लावियेलें चाळा मीपणें हे जन । भोग तया कोण भोगवितो ॥ १२ ॥ विषयीं गुंतली विसरलीं तुज । कन्या पुत्र भाज धनलोभें ॥ १३ ॥ लोभे गिळी फांसा आमिषाच्या आशा । सांपडोनी मासा तळमळी ॥ १४ ॥ तळमळ त्यांची तरीच शमेल । जरी हा विठ्ठल आठविती ॥ १५ ॥ आठवे तरी देव संतांच्या सांगातें । किंवा हे संचित जन्मांतर ॥ १६ ॥ जन्मांतरें तीन भोगितां कळती । केलें तें पावती करितां पुढें ॥ १७ ॥ पुढे जाणोनियां करावें संचित । पूजावें अतीत देव संत ॥ १८ ॥ जन्म तुटे ऐसें नव्हे तुम्हां जनां । पुढिल्या पावना धर्म करा ॥ १९ ॥ करा जप तप अनुष्ठान याग । संती जे मारग स्थापियेले ॥ २० ॥ लावियेलीं कर्मी शुद्ध आचरणीं । कोणा एका जन्मीं केलें पावें ॥ २१ ॥ पावले सत्त्वर निष्काम उद्धार । जिंकिली अपार वासना हे ॥ २२ ॥ वासनेचे मूळ छेदिल्यावांचूनी । तरलोंसे कोणी न म्हणावें ॥ २३ ॥ न म्हणावें झालों पंडित वाचक । करूनि मंत्रघोष अक्षरांचा ॥ २४ ॥ चाळविली एकें तेचि आवडीनें । लोक दंभमानें देहसुखें ॥ २५ ॥ सुख तरीच घडे भजनाचें सार । वाचे निरंतर रामनाम ॥ २६ ॥राम हा उच्चार तरिच बैसे वाचे । अनंता जन्माचे होईल पुण्य ॥ २७ ॥ पुण्य ऐसें काय रामनामापुढें । काय ते बापुडे यागयज्ञ ॥ २८ ॥ यागयज्ञ तप संसारदायकें । न सुटे एक नामेंविण ॥ २९ ॥ नामेंविण भवसिंधु पावे पार । ऐसा हा विचार नाहीं दुजा ॥ ३० ॥ जाणती हे भक्तराज महामुनि । नाम सुखधणी अमृताची ॥ ३१ ॥ अमृताचें सार निजतत्त्व बीज । गुह्याचें तें गुज रामनाम ॥ ३२ ॥ नामें असंख्यात तारिले अपार । पुराणी हें सार प्रसिद्ध हे ॥ ३३ ॥ हेंचि सुख आम्हीं घेऊं सर्वकाळ । करूं हे निर्मळ हरिकथा ॥ ३४ ॥ कथाकाळीं लागे सकळा समाधि । तात्काळ हे बुद्धि दुष्ट नासे ॥ ३५ ॥ नासे लाभ मोहो आशा तृष्णा माया । गातां गुण तया विठोबाचे ॥ ३६ ॥ विठोबाचे गुण मज आवडती । आणिक हे चित्तीं नलगे कांहीं ॥ ३७ ॥ कांहीं कोणी नका सांगों हा उपाव । माझ्या मनीं भाव नाही दुजा ॥ ३८ ॥ जाणोनियां आम्हीं दिला जीवभाव । दृढ याचे पाव धरियेले ॥ ३९ ॥ धरियेले आतां न सोडी जीवेसीं । केला हा सेवेसीं निरधार ॥ ४० ॥ निरधारे आम्ही राहिलों ये नेटीं । संवसारतुटी करूनियां ॥ ४१ ॥ येणे अंगीकार केला पांडुरंगें । रंगविलें रंगे आपुलिया ॥ ४२ ॥ आपुली पाखर घालूनियां वरी । आम्हांसी तो करी यत्नदेव ॥ ४३ ॥ देव राखे तया आणिकांचे काय । करितां उपाय चाले तेथें ॥ ४४ ॥ तेथें नाहीं रिघ कळिकाळासी येतां । दास म्हणवितां विठोबाचे ॥ ४५ ॥ विठोबाचे आम्ही लाडिके डिंगर । कांपती असुर काळ धाकें ॥ ४६ ॥ धाक तिहीं लोकीं जयाचा दरारा । स्मरण हें करा त्याचे तुम्ही ॥ ४७ ।। तुम्ही निदसुरे नका राहूं कोणी । चुकवा जाचणी गर्भवास ॥ ४८ ॥ गर्भवासीं दु:ख यमाचें दंडण । थोर होय शीण येतां जातां ॥ ४९ ॥ तहान भूक पीडा जीतां हे आघात । मेल्या यमदूत जाच करिती ॥ ५० ॥ जाच करिती हें म्हणसी कोणा ठावें । नरकीं कौरवें बुडी दिली ॥ ५१ ॥ बुडी दिली कुंभपाकीं दुर्योधनें । दाविना लाजेनें मुख धर्मा ॥ ५२ ॥ धर्म हा कृपाळू आलासे जवळी । बैसला पाताळीं वरी नये ॥ ५३ ॥ न ये वरीं कांहीं करितां उपाव । भोगवितो देव तेंचि त्यासी ॥ ५४ ॥ त्यासी अभिमान गर्व या देहाचा । नुच्चारिती वाचा नारायण ॥ ५५ ॥ नारायण जे विसरलीं संवसारी । तयांसी अघोरी वास सत्य ॥ ५६ ॥ सत्य मानूनियां संतांच्या वचना । जा रे नारायणा शरण तुम्ही ॥ ५७ ॥ तुम्ही मानूं नका कोणी हा विश्वास । पुत्र पत्नी आस धन वित्त ॥ ५८ ॥ धन वित्त लोभ माया मोहपाश । मांडियेले फांसे यमदूतीं ॥ ५९ ॥ दूतीं याच्या मुखा केलेसे कुडण । वाचे नारायण येऊ नेदी ॥ ६० ॥ नेदी शुद्धबुद्धि आतळों चित्तासी । नाना कर्में त्यासी दुरावती ॥ ६१ ॥ दुराविली एकें जाणतींच फार । निंदा अहंकार वादभेद ॥ ६२ ॥ वादभेद निंदा हे फंद काळाचे । गोवितील वाचे रिकामिकें ॥ ६३ ॥ रिकामिक देहा होय नव्हे मना । चिंतेचिये घाणा जुंपिजेसी ॥ ६४ ॥ सेवटीं हे गळा लावूनियां दोरी । सांभाळ ये करीं वासनेचा ॥ ६५ ॥ वासनेचा संग होय अंतकाळीं । तरी तपोबळी जन्म धरी ॥ ६६ ॥ धरूनियां देव राहतील चित्तीं । आधींलिया गती आठवावा ॥ ६७ ॥ आठवावा देव मरणाचे काळीं । म्हणऊनी बळी जीव दिले ॥ ६८ ॥ दिले टाकूनियां भोग ऋषेश्वरीं । खाती वनांतरी कंदमूळे ॥ ६९ ॥ मुळें सुखाचिया देव अंतरला । अल्पासाठीं गेला अधोगती ॥ ७० ॥ गति हे उत्तम व्हावया उपाव । आहे धरा पाव विठोबाचे ॥ ७१ ॥ विठोबाचे पायीं राहिलिया भावें । न लगे कोठें जावें वनांतरा ॥ ७२ ॥ तरती दुबळीं विठोबाच्या नावें । संचित ज्या सवें नाहीं शुद्ध ॥ ७३ ॥ शुद्ध तरायाचें काय तें नवल । म्हणतां विठ्ठल वेळोवेळां ॥ ७४ ॥ वेळकाळ नाहीं कवणाचे हातीं । न कळे हे गति भविष्याची ॥ ७५ ॥ भविष्य न सुटे भोगिल्यावांचूनि । संचित जाणोनि शुद्ध करा ॥ ७६ ॥ करावे सायास आपुल्या हिताचे । येथें आलियाचें मनुष्यपण ॥ ७७ ॥ मनुष्यपण तरी साधी नारायण । नाहीं तरी हीन पशुहूनी ॥ ७८ ॥ पशु पाप पुण्य काय हे जाणती । मनुष्या या रीति ठाउकिया ॥ ७९ ॥ ठाउकें हें असें पाप पुण्य लोकां । देखतील एकां भोगितिया ॥ ८० ॥ भोगतील एक दुःख संवसारीं । काय सांगों परी वेगळाल्या ॥ ८१ ॥ ल्यावें खावें बरें असावें सदैव । हेचि करी हांव संवसारीं ॥ ८२ ॥ संवसारे जन गिळिले सकळ । भोगितील फळें गर्भवास ॥ ८३ ॥ वासनेचें मूळ छेदिल्यावांचून । नव्हे या खंडण गर्भवासा ॥ ८४ ॥ सायास केलियावाचूंनी तें नाहीं । भविष्यावरी कांहीं घालूं नये ॥ ८५ ॥ नये बळें धड घालू कांट्यावरी । जाय जीवें धरी सर्प हातीं ॥ ८६ ॥ हातीं आहे हित करील तयासी । म्हणउनी ऋषीं सांगितलें ॥ ८७ ॥ सांगितले लोकां फजित करूनी । आपण जे कोणी तरले ते ॥ ८८ ॥ तेणें वाळवंटी उभारिला कर । कृपेचा सागर पांडुरंग ॥ ८९ ॥ गंगाचरणीं करी पातकांची धुनी । पाउलें तीं मनीं चिंतिलियां ॥ ९० ॥ चिंतनें जयाच्या तरती पाषाण । उद्धरी चरण लावूनियां ॥ ९१ ॥ लावूनियां टाळी नलगे बैसावें । प्रेमसुख घ्यावें संतसंगें ॥ ९२ ॥ संतसंगें कथा करावें किर्तन । सुखाचे साधन रामनाम ॥ ९३ ॥ मग कोठे देव जाऊं न सके दुरी । बैसोनी भीतरी कंठी राहे ॥ २४ ॥ राहे व्यापुनियां सकळ शरीर । आपुला विसर पडों नेदी ॥ ९५ ॥ नेदी दुःख देखों आपुलिया दासा । वारी गर्भवासा यमदूता ॥ २६ ॥ तहान भुक त्यासी वाहों नेदी चिंता । दुश्चित हे घेतां नाम होती ॥ ९७ ॥ होती जीव त्याचे सकळही जंत । परि ते अंकित संचिताचे ॥ ९८ ॥ चेवले जे कोणी देह अभिमानें । त्यांसी नारायणे कृपा केली ॥ २९ ॥ कृपाळू हा देव अनाथा कोंवसा । आम्ही त्याच्या आशा लागलोंसो ॥ १०० ॥ लावियेलें आसे येणें पांडुरंगें । तुका म्हणे संगे भक्तांचिया ॥ १०१॥
शेतावरील अभंग (अभंग संख्या ३)
३४९. वोणव्या सोंकरीं । सेत खादले पाखरीं ॥ १ ॥ तैसा खाऊं नका दगा । निदसुरा राहूनी जागा ॥ २ ॥ चोरासवें वाट । चालोनि केलें तळपट ॥ ३ ॥ डोळे झांकूनी राती । कूपीं पडे दिवसा जाेती ॥ ४ ॥ पोसी वांझ गाय । तेथें कैंची दूध साय ॥ ५ ॥ फुटकी सांगडी । तुका म्हणे न पवे थडी ॥ ६ ॥
३५०. सेत आलें सुगी सांभाळावे चारी काेन । पीक आलें परी केले पाहिजे जतन ॥ १ ॥ सोंकरी सोंकरी साेहंकरी । विसावा तोंवरीं नको उभें आहें तों ॥ २ ॥ गोफणीसी गुंडा घालीं पागोऱ्याच्या नेटें । पळती आहाकारे अवघीं पाखरांची थाटें ॥ ३ ॥ पेटवूनी आगटी राहें जागा पालटूनी । पडिलिया मानी बळ बुद्धि व्हावी दोनी ॥ ४ ॥ खळे दातें विश्वसुखी करी होतां रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग देईं त्यासी ॥ ५ ॥ तुका म्हणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिले निकण ॥ ६ ॥
३५१. सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥ १ ॥ नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाही म्हणियारा । सरिक नाहीं दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ २ ॥ जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥ ३ ॥ कर्म कुळवणी । न लगे धर्मपाळी दोन्ही ॥ ४ ॥ ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥ ५ ॥ बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचें ॥ ६ ॥ नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागोऱ्याच्या नेटें ॥ ७ ॥ पीक न वजे हा भरवंसा । करी उद्वेग तो पिसा ॥ ८ ॥ सराई सर्व काळ । वायां न वजे घटिकापळ ॥ ९ ॥ प्रेम पिकलें अपार । नाहीं सांठवावया थार ॥ १० ॥ ऐसिये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥ ११ ॥
घोंगडीचे अभंग (अभंग संख्या १२ )
३५२. ठकिले काळा मारिली दडी । दिली कूडी टाकोनि ॥ १ ॥ पांघरलों बहु काळें । घोंगडे बळें सांडवलें ॥ २ ॥ नये ऐसा लाग वरी । परतें दुरी लपालें ॥ ३ ॥ तुका म्हणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥ ४ ॥
३५३. घोगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यांत ॥ १ ॥ कान्होबा तो मीच दिसें । लाविलें पिसें संवगडियां ॥ २ ॥ तो बोले मी उगाच बैसें । अनारिसें न दिसे ॥ ३ ॥ तुका म्हणे दिलें सोंग । नेदी व्यंग जाऊं देऊ॥४ ॥
३५४. खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥ १ ॥ कान्होबाचे पडिलों गळा । घेईं गोपाळा देई झाडा ॥ २ ॥ मी तों हागे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥ २ ॥ तुका म्हणे बुद्धि काची । नाहीं ठायींची मजपाशीं ॥ ४ ॥
३५५. घोंगडियांची एकी राशी । त्याजपाशीं तेहीं होतें ॥ १ ॥ माझियाचा माग दावा । केला गोवा उगवूं द्या ॥ २ ॥ व्हावें ऐसें निसंतान । घेईन आण तुजपाशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे लहान मोठा । सांडा ताठा हा देवा ॥ ४ ॥
३५६. नाहीं तुझें उगां पडत गळां । पुढे गोपाळा जाऊं नको ॥ १ ॥ चाहाड तुझे दाविन घरीं । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ २ ॥ तुम्हां आम्हां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥ ३ ॥ तुका म्हणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥ ४ ॥
३५७. तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी आहे तैसी ॥ १ ॥ माझें घोंगडे टाकुन देई । एके ठायीं मग असों ॥ २ ॥ विरोधानें पडे तुटीं । कपट पोटीं नसावें ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥ ४ ॥
३५८. मुळींचा तुम्हां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥ १ ॥ घ्यावें त्याचें देणेंचि नाहीं । येचि वाहीं देखतसों ॥ २ ॥ माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिशी ना ॥३ ॥ तुका म्हणे म्यां सांडिली आशा । हुंगिला फांसा येथुनियां ॥ ४ ॥
३५९. घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें ॥ १ ॥ हा गे चोर धरा धांवा कोणी । घरांत राहाटे चहूं कोनी ॥ २ ॥ नोळखवे म्यां धरिला हातीं । देहा दीप माया लाविली वाती ॥ ३ ॥ न पवे धांवणें मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥ ४ ॥
३६०. आतां मी देवा पांघरों काई । भिकेचें तेंही उरेचिना ॥ १ ॥ सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ २ ॥ नाहीं मजपाशीं फुटकी कवडी । पांचांनी घोंगडी दिली होती ॥ ३ ॥ तुका म्हणे जना वेगळे झालें । एकचि नेले एकल्याचें ॥ ४ ॥
३६१. मी माझें करीत होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतले खान ॥ १ ॥ मज आल्याविण आधींच तो होता । मज न कळतां मजमाजी ॥ २ ॥ घोंगडे नेलें घोंगडे नेलें । उघडे केले उघडेंचि ॥ ३ ॥ तुका म्हणे चोरटाचि झाला साव । सहज न्याय नाहीं तेथें ॥ ४ ॥
३६२. घोंगडे नेलें सांगों मी कोणा । दुबळे माझें नाणीती मना ॥ १ ॥ पुढे तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥ २ ॥ शेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥ ३ ॥ घोंगडियाचा करा बोभाट । तुका म्हणे जंव भरला हाट ॥ ४ ॥
३६३. माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥ १ ॥ चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ २ ॥ चोर कुठोरी एकेचि ठायीं । वेगळे पाहावें न लगे कांहीं ॥ ३ ॥ आणिकांची चोरलीं आधी । माझें तयामधीं मेळविलें ॥ ४ ॥ आपल्या आपण शोधिलें तिहीं । करीन मीही तेचि परी ॥ ५ ॥ तुका म्हणे माझें हितचि झालें । फाटकें जाऊन धडके आले ॥ ६ ॥
पाईक (अभंग संख्या ११ )
३६४. पाईकपणें जोतिला सिद्धांत । शूर धरी मात वचन चित्तीं ॥ १ ॥ पाईकीवांचून नव्हें कधी सुख । प्रजांमध्ये दुःख न सरे पीडा ॥ २ ॥ तरि व्हावें पाईक जिवाचे उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥ ३ ॥ पाईकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनी ज्यावें वांयांविण ॥ ४ ॥ तुका म्हणे एका क्षणाचा करार । पाईक अपार सुख भोगी ॥ ५ ॥
३६५. पाईकीचें सुख पाईकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटी ॥ १ ॥ येतां गोळ्या बाण साहिले भडिमार । वर्षतां अपार वृष्टि वरी ॥ २ ॥ स्वामीपुढे व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडण शोभा दावी ॥ ३ ॥ पाईकांनी सुख भोगिलें अपार । शूर आणि धीर अंतर्बाहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे याही सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शहाणा करी तो भोगी ॥ ५ ॥
३६६. पाईक तो जाणे पाईकीचा भाव । लगबग ठाव चोरवाट ॥ १ ॥ आपणां राखोनी ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हिरूनियां ॥ २ ॥ येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाईका त्या जग स्वामी मानी ॥ ३ ॥ ऐसें जन केले पाईकें पाईक । जया कोणी भीक न घालिती ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक । बळिया तो नाईक त्रैलोकींचा ॥ ५ ॥
३६७. पाईकांनी पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांठा माेडोनियां ॥ १ ॥ पारखिये ठायीं घेऊनियां खाण । आपलें तें जन राखियेलें ॥ २ ॥ आधारेंविण जे बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥ ३ ॥ सांडितां मारग मारिती पाईक । आणिकांसी शीक लागावया ॥ ४ ॥ तुका म्हणे विश्वा घेऊनी विश्वास । पाईक तयास सुख देती ॥ ५ ॥
३६८. पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥ १ ॥ तो एक पाईक पाईकां नाईक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ २ ॥ तृणवत तनु साेनें ज्या पाषाण । पाईका त्या भित्र नाहीं स्वामी ॥ ३ ॥ विश्वासावांचूनी पाईकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोललिया ॥ ४ ॥ तुका म्हण नये स्वामी उणेपण । पाईक जतन करी त्यासी ॥ ५ ॥
३६९. धनी ज्या पाईका मानितो आपण । तया भितें जन सकळिक ॥ १ ॥ जिवाचे उदार शोभती पाईक । मिरवती नाईक मुगुटमणी ॥ २ ॥ आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळसुख ॥ ३ ॥ कमाईचीं हीणें पडिली उदंड । नाहीं तया खंड येती जाती ॥ ४ ॥ तुका म्हणे तरी पाईकीच भली । थोडीबहु केली स्वामिसेवा ॥ ५ ॥
३७०. पाईकपणें खरा मुशारा । पाईक तो खरा पाईकीनें ॥ १ ॥ पाईक तों जाणे मारितें अंग । पाईकासी भंग नाहीं तया ॥ २ ॥ एके दाेहीं घरीं घेतली खाणें । पाईक तो पणें निवडला ॥ ३ ॥ करूनी कारण स्वामी यश द्यावें । पाईका त्या नांवें खरेपण ॥ ४ ॥ तुका म्हणे ठाव पाईका निराळा । नाहीं स्वामिस्थळा गेल्याविण ॥ ५ ॥
३७१. उंच नीच कैसी पाईकाची ओळी । कोण गांढ्या बळी निवडला ॥ १ ॥ स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ २ ॥ प्रसंगावांचूनी आणिती आविर्भाव । पाईक तो नांव मिरवी बायां ॥ ३ ॥ गणतीचे एक उंच नीच फार । तयांमध्ये शूर विरळा थाेडा ॥ ४ ॥ तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाइक पाहोन मोल करी ॥ ५ ॥
३७२. एकाच स्वामीचे पाईक सकळ । जैसें तैसें बळ मोल तया ॥ ४ ॥ स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळी जवळी दुरी ॥ २ ॥ हीन कमाईचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥ ३ ॥ पाईकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढ्या वाव ॥ ४ ॥ तुका म्हणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥ ५ ॥
३७३. प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाठीं एक जैसें तैसें ॥ १ ॥ आगळे पाऊल आणिकासी तारी । पळतीं माघारीं तोडिजेती ॥ २ ॥ पाठीवरी घाय म्हणती फट मर । निधडा अंगें शूर मान पावे ॥ ३ ॥ घेईल दरवडा देहा तो पाईक । मारी सकळिक सर्व हरी ॥ ४ ॥ तुका म्हणे नव्हे बोलाचें कारण । कमाईचा पण सिद्धी पावे ॥ ५ ॥
३७४. जातीचा पाईक ओळखे पाईका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥ १ ॥ धरितील पोटासाठी हतियारें । कळती ती खरें वेठीचींसीं ॥ २ ॥ जातीचें तें असें खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥ ३ ॥ तुका म्हणे नमूं देव म्हूण जना । झालियांच्या खुणा जाणतसों ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment