रानात गायी चारत असताना भगवान श्रीकृष्णाने गोपाळांसोबत दहीकाला करून आनंदाने खाल्ला, त्याविषयीचे अभंग
काला (अभंग संख्या ८०)
१५९. अझुनि कां थीर पोरा न म्हणसी कीर । धरूनियां धीर लाजे बुर निघाला ॥ १ ॥ मोकळा होतासी कां रे पडलासी डाईं । वरिलांचा भार आतां उतरेसा नाहीं ॥ २ ॥ मेळवूनी मेळा एकएकी दिली मिठी । कवळिलें एक बहु बैसविलीं पाठीं ॥ ३ ॥ तळील तें वरी वरील तें येतें तळा । न सुटें तोवरी येथें गुंतलियां खेळा ॥ ४ ॥ सांडितां ठाव पुढें सईल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥ ५ ॥ तुका म्हणे किती आवरावे हात पाय । न खेळावें तोंच बरे वरी न ये डाय ॥ ६ ॥
१६०. अंतरली खुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । म्हणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं ॥ १ ॥ बाप बळिया शिरोमणी । उताविळ या वचनीं। पडलिया कानीं। धांवा न करी आळस ॥ २ ॥ बळ दुनी शरणागता । स्वामी वाहों नेदी चिंता । आइतेंचि दाता । पंगतीस बैसवी ॥ ३ ॥ वाहे खांदी पाववी घरा । त्याच्या करी येरझारा । बोबड्या उत्तरा । स्वामी तुकया मानवें ॥ ४ ॥
१६१. अधिकाचा मज कांटाळा । तुम्हां गोपाळा संगती ॥ १ ॥ काय नाहीं तुम्हांपाशीं । सकळांविशीं संपन्न ॥ २ ॥ उद्वेगाचा नेघे भार । भागल्या सार पुरतें ॥ ३ ॥ तुका म्हणे अधीर जिणें । नारायणें न करावें ॥ ४ ॥
१६२. अनंत ब्रह्मांडें उदरीं । हरि हा बाळक नंदाघरीं ॥ १ ॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळें कान्होबाचे कोडें ॥ २ ॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासी यशोदा भोजन घाली ॥ ३ ॥ विश्वव्यापक कमळापती । त्यासी गौळणी कडिये घेती ॥ ४ ॥ तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रह्मचारी ॥ ५ ॥
१६३. "अवघियां दिला गोर । मजकरे पाहीना" ॥ १ ॥ फुंदे गोपाळ डोळे चोळी । ढुंगा थापली हाणे तोंडा ॥ २ ॥ आवडती थोर मोटे । मी रे पोरटें दैन्यवाणे ॥ ३ ॥ तुका म्हणे जाणों भाव । जीवींचा देव बुझावूं ॥ ४ ॥
१६४. अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता म्हणती गेला ॥ १ ॥ आपुल्याला रडती भावें । जयासवें जयापरी ॥ २ ॥ चुकलों आम्ही खेळतां खेळ । गेला गोपाळ हातींचा ॥३ ॥ तुका म्हणे धांवती थडी । न घली उडी आतां कोणी ॥ ४ ॥
१६५. अवघें अवघीकडे । दिलें पाहें मजकडे । अशा संवगडे । सहित थोरी लागली ॥ १ ॥ कां रे धरिला अबोला । माझा वांटा देई मला । शिदोरीचा केला । झाडा आतां निवडेना ॥ २ ॥ भूक लागली अनंता । कां रे नेणसी जाणतां । भागलों वळितां । गाई सैरा ओढाळा ॥ ३ ॥ तुका करुणा भाकी । हरि पाहे गोळा टाकी । घेता झाला सुखी । भीतरीं वांटी आणिकां ॥ ४ ॥
१६६. अवघे गोपाळ म्हणती या रे करूं काला । काय कोणाची शिदोरी ते पाहों द्या मला । नका कांहीं मागे पुढे ठेवू रे तुम्ही खरेंच बोला । वंची वंचला तोचि रे येथें भोवंडा त्याला ॥ धृ. ॥ घेतल्यावांचून झाडा रे नेदी आपुलें कांहीं । एकां एक ग्वाही बहुत देती मोकळे नाहीं । ताक सांडी येक रे येक रे काला भात भाकरी दहीं । आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीत तें ही ॥ २ ॥ एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनी मोटा । एक सोडितील गांठी रे एक चालती वाटा । एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा । एक ते करूनि आराले आतां ऐसेंचि घाटा ॥ ३ ॥ एकीं स्थिराविल्या गाई रे एक वळत्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोंवतीं घेती । एक चाराबोरा गुंतले नाहीं जीवन चित्तीं । एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती ॥ ४ ॥ एकीं एकें वाटा लाविलीं भोळी नेणती मुलें । आपण घरींच गुंतले माळा नासिलीं फुलें । गांठींचें तें सोडूं नावडे खाय आइतें दिलें । सांपडलें वेठी वोढी रे भार वाहतां मेलें ॥ ५ ॥ एक ते माया गुंतले घरी बहुत कामें । वार्ता ही नाहीं तयाची तया कांहींच ठावें । जैसें होतें शिळे संचित तैसें लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचूनी मग पडिलें ठावें ॥ ६ ॥ एका हाती पायीं पट्टे रे अंगीं लाविल्या राखा । एक ते सोलिव बोडके सपाट केल्या शिखा । एक ते आळशी तळीं रे वरी वाढिल्या काखा । शिदोरी वांचून बुद्धि रे केल्या अवघ्यां वाखा ॥ ७ ॥ तुका म्हणे आतां कान्होबा आम्हां वांटोनी द्यावें । आहे नाहीं आम्हांपाशीं तें तुज अवघेंचि ठावें । मोकलितां तुम्हीं शरण आम्हीं कवणासी जावें । कृपावंतें कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥ ८ ॥
१६७. अवघेंचि गोड झालें । मागीलिये भरी आलें ॥ १ ॥ साह्य झाला पांडुरंग । दिला अभ्यंतरी संग ॥ २ ॥ थडिये पावतां तो वाव । मागें पाहतां तो ठाव ॥ ३ ॥ तुका म्हणे गेलें । स्वप्नीचें जागे झालें ॥ ४ ॥
१६८. आचरती कर्मे । ते ते काळें धर्माधर्मे ॥ १ ॥ खेळे गोवळियांसवें । करिती तें त्यांचे साहावें ॥ २ ॥ यज्ञमुखें घांस । मंत्रपूजेसी उदास ॥ ३ ॥ तुका म्हणे चोरी । योगियांही सवें करी ॥ ४ ॥
१६९. आजी ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥ १ ॥ आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी। तटस्थ त्या ध्यानीं । गाई जाल्या श्वापदें ॥ २ ॥ जें देवांचे दैवत । उभे आहे या रंगांत । गोपाळांसहित । क्रीडा करी कान्होबा ॥ ३ ॥ जया सुखाची शिराणी । तींच पाउलें मेदिनी । तुका म्हणे मुनी । धुंडितांही न लभती ॥ ४ ॥
१७०. आणिकें काय थोडीं । परि तीं फार खोटीं कुडीं ॥ १ ॥ सदा मोकळींच गुरें । होतीं फजीत तीं पोरें ॥ २ ॥ सदा घालिती हुंबरी । एक एकाचें न करी ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं । माय वेळोवेळां मारी ॥ ४ ॥
१७१. आतां ऐसें करूं । दोघां धरूनियां मारूं ॥ १ ॥ मग टाकितील हे खोडी । तोंडी लागली ते गोडी ॥ २ ॥ कोंडु घरामधीं। न बोलोनी जागो बुद्धी ॥ ३ ॥ बोलावितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥ ४ ॥
१७२. आतां हेंचि जेऊं । सवें घेऊं शिदोरी ॥ १ ॥ हरिनामाचा खिचडी काला । प्रेमें मोहिला साधनें ॥ २ ॥ चवीं चवीं घेऊं घास । ब्रह्मरस आवडी ॥ ३ ॥ तुका म्हणे गोड लागे । तों तों मागे रसना ॥ ४ ॥
२७३. आम्हां निकट वासें । कळों आलें जैसें तैसें । नाहीं अनारिसें । कान्होबाचे अंतरीं ॥ १ ॥ पीडती आपुल्याला भावना । जैसी जयाची वासना । कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥ २ ॥ खेळ खेळे न पडे डाईं । ज्याचा भार त्याच्या ठायीं । कोणी पडतील डाईं । कोणी कोडी उगविती ॥ ३ ॥ तुका म्हणे कवळ । हातीं घेऊनी गोपाळ । देतों ज्याचें बळ । त्यासी तैसा विभाग ॥ ४ ॥
१७४. आम्ही गोवळीं रानटें । नव्हों जनांतील धीटें ॥ १ ॥ शिदोरीचा करूं काला । एक वांटितो एकाला ॥ २ ॥ खेळों आपआपणाशीं । आमचीं ती आम्हांपाशीं ॥ ३ ॥ म्हणे मिळालें नेणतें । तुका कान्होबा भोंवते ॥ ४ ॥
१७५. उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥ १ ॥ वैकुंठी तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचे ॥ २ ॥ एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालू हुंबरी ॥ ३ ॥ तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥ ४ ॥
१७६. एकाचिया घाट्या टोके । एका फिके उपचार ॥ १ ॥ ऐसी सवे गोवळिया । भाव तया पढियंता ॥ २ ॥ एकाचें तें उष्टें खाय । एका जाय ठकूनि ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु सोपें । बहु रूपें अनंता ॥ ४ ॥
१७७. कवळाचिया सुखें । परब्रह्म झालें गोरखें । हात गोवूनि खाय मुखें । बोटांसांदी लोणचीं ॥ १ ॥ कोण जाणे तेथे कोण लाभ । कां तें ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ २ ॥ घाली हमामा हुंबरी । पांवा वाजवी मोहरी । गोपाळांचे फेरी । हरि छंदें नाचतसे ॥ ३ ॥ काय नव्हतें त्या घरी खावया । रिघे लोणी चोराया । तुका म्हणे सवें तया । आम्हीही सोंकलों ॥ ४ ॥
१७८. कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥ १ ॥ काला वांटुं एकमेकां । वैष्णव निका संभ्रम ॥ २ ॥ वांकुलिया ब्रह्मादिकां । उत्तम लोकां दाखवू ॥ ३ ॥ तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाढे ॥ ४ ॥
१७९. काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडितां ॥ १ ॥ तुमची मज लागली सवे । ठायींचे नवे नव्हों गडी ॥ २ ॥ आणीक बोलाविती फार । बहु थोर नावडती ॥ ३ ॥ भाविकें त्यांची आवडी मोठी । तुका म्हणे मिठी घाली जिवें ॥४ ॥
१८०. कान्होबा आतां तुम्ही आम्हीच गडे । कोणाकडे जाऊं नेदूं ॥ १ ॥ वाहीन तुझी भारशिदोरी । वळतीवरी येऊं नेदूं ॥ २ ॥ ढवळे गाईचे दुध काढूं । एकल्या एक ठोंबे मारूं ॥ ३ ॥ तुका म्हणे टोकवूं त्याला । जे तुझ्या बोला मानिती ना ॥ ४ ॥
१८१. कान्होबा तूं आलगट । नाहीं लाज बहु धीट । पाहिलें वाईट । बोलोनियां वोखटें ॥ १ ॥ परि तूं न संडिसी खोडी । करिसी केली घडीघडी । पाडिसी रोकडी । तुटी माये आम्हांसी ॥ २ ॥ तूं ठायींचा गोवळ । अविचारी अनर्गळ । चोरटा शिंदळ । ऐसा पिटूं डांगोरा ॥ ३ ॥ जरी तुझी आई। आम्ही घालूं सर्वा ठायीं । तुका म्हणे तेंही । तुज वाटे भूषण ॥ ४ ॥
१८२. काम सारूनी सकळ । आले अवघे गोपाळ । झाली आतां वेळ । म्हणती आणा शिदोऱ्या ॥ १ ॥ देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां । दोंदिल बोबडा । वांकड्याचा हरि मेळीं ॥ २ ॥ आपुलाली ये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनि गोडी । हरि मेळवी त्यांत तें ॥ ३ ॥ भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली तों मांदी । सकळांचे संधी । ओझीं अवघीं उतरलीं ॥ ४ ॥ मागे जो तांतडी । त्यासी रागा येती गडी। तुझी कां रे कुडी । येथें मिथ्या भावना ॥ ५ ॥ एक एकाच्या संवादें । कैसे धाले ब्रह्मानंदें । तुका म्हणे पदें । या रे वंदं हरीची ॥ ६ ॥
१८३. कामें पीडिलों माया । बहू मारी नाहीं दया ॥ १ ॥ तुझ्या राहिलों आधारें । झालें अवघेंचि बरें ॥ २ ॥ तुझे लागलों संगती । आतां येतों काकुलती ॥ ३ ॥ तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥ ४ ॥
१८४. कां रे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई । मागें झालें काई । एका तें कां नेणसी ॥ १ ॥ केलासी फजित । मागें पुढेंही बहुत । लाज नाहीं नित्य । नित्य दंड पावतां ॥ २ ॥ वोला खोडा खिळ गाढी । ऐसा कोण तया काढी । धांवले कापडी । तुझी आधीं ओढाळा ॥ ३ ॥ चाले चाल धांवें । मीही येतों तुजसवें । तुका म्हणे जंव । तेथें नाहीं पावली ॥ ४ ॥
१८५. काल्याचिये आसें । देव जळी जालें मासे । पुसोनियां हांसें । टिरी सांगातें हात ॥ १ ॥ लाजे त्यासी वांटा नाहीं । जाणे अंतरींचें तें ही । दीन होतां कांहीं। होऊं नेदी वेगळें ॥ २ ॥ उपाय अपाय यापुढें । खोटे निवडितो कुडे । जोडूनियां पुढें । हात उभे नुपेक्षी ॥ ३ ॥ तें घ्या रे सावकाशें । जया फावेल तें तैसें । तुका म्हणे रसें । प्रेमाचिया आनंदें ॥ ४ ॥
१८६. काळिया नाथूनी आला वरी । पैल हरी दाखविती ॥ १ ॥ दुसरिया भावें न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥ २॥ रूपा भिन्न पालट झाला । गोरें सांवळेसा पैं देखिला ॥ ३ ॥ आश्वासीत आला करें । तुका खरें म्हणे देवा ॥ ४ ॥
१८७. कृष्ण गोकुळी जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥ १ ॥ होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ २ ॥ सदा नाम वाचे गाती । प्रेमें आनंदें नाचती ॥ ३ ॥ तुका म्हणे हरती दोष । आनंदानें करिती घोष ॥ ४ ॥
१८८. गडी गेले रडी । कान्हो नेदीच तूं चढी ॥ १ ॥ आम्ही न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ २ ॥ न साहावें भार। बहु लागतो उशीर ॥ ३ ॥ तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥ ४ ॥
१८९. गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाई ॥ ध्रु. ॥ चोरिलें नवनीत बांधविला गळा । जे तुम्हीं गोपाळा छंद केले ॥ २ ॥ मोहिल्या गोपिका पांवयाच्या छंदें । केली ते गोविंदें क्रीडा गांऊ ॥ ३ ॥ मायबापा लाडें दाविलें कौतुक । तें या आणूं सुख अंतरासी ॥ ४ ॥ निर्दाळिले दुष्ट भक्तां प्रतिपाळी । ऐसा म्हणों बळी आमुचा स्वामी ॥ ५ ॥ तुका म्हणे सरसी असों येणें बोधे । जाणोनी संबंध सर्वकाळ ॥ ६ ॥
१९०. गोकुळींच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥ १ ॥ बाळकृष्ण नंदा घरीं । आनंदल्या नरनारी ॥ २ ॥ गुढिया तोरणें । करिती कथा गाती गाणें ॥ ३ ॥ तुका म्हणे छंदें । येणें वेधिली गोविंदें ॥ ४ ॥
१९१. गोपाळ म्हणती कान्होबा या रे कांहीं मागों । आपुलाले आम्ही जीवींचें तया आवडी सांगों । एक म्हणती उगे रे उगे रे उगे मागेंचि लागों । निजों नका कोणी घरी रे आजी अवघेचि जागों ॥ १ ॥ जाणोनि नेणता हरि रे मध्ये उगाचि बसे । नाइकोनी बोल आइके कोण कोणाचें कैसे । एक एकाच्या संवादें जाणे न मिळती ऐसें । पोटांतील होटा आणवी देतो तयांसी तैसें ॥ २ ॥ एक म्हणती बहु रे आम्ही पीडियलों माया । नेदी दहीभातशिदोरी ताक घालिती पिया । तापलों वळितां गोधनें नाहीं जीवन छाया । आतां मागों पोटभरी रे याच्या लागोनि पायां ॥ ३ ॥ एक म्हणती तुमचें अरे पोट तें किती । मागों गाई म्हैसी घोडे रे धन संपत्ति । हातीं देव गडी कान्होबा आमुचा आम्हां काय विपत्ति । कन्याकुमरें दासी रे बाजावरी सुपती ॥ ४ ॥ एक म्हणती बेटे हो कोण करी जतन । गाढव तैसैंचि घोडें रे कोण तयाचा मान । लागे भवरोग खांदीं वाहता चवघे जण । हांती काठ्या डोया बोडक्या हिंडो मोकळें रान ॥ ५ ॥ एक म्हणती रानीं रे बहु सावजें फार । फाडफाडूं खाती डोळे रे पाय नेतील कर । राखोनि राखें आपणां ऐसा कइचा शर । बैसोनि राहों घरीं रे कोण करी हे चार ॥ ६ ॥ घरीं बैसलिया बहुतें बहु सांगती कामें । रिकामें कोणासि नावडे ऐसें आम्हांसी ठावें । चौघांमध्ये बरें दिसें तेथें नेमक व्हावें । लपोनी खेळतां सहज भलें गडियासवें ॥ ७ ॥ एक म्हणती गडी ते भले मिळती मता । केली तयावरी चाले रे बरी आपुली सत्ता । नसावे तेथें तैसे रे खेळ हाणिती लाता । रडी एकाएकीं गेलिया गोंधळ उडती लाता ॥ ८ ॥ एक म्हणे खेळतां उगी राहती पोरें । ऐसें घडों शके रे कोणी लहान थोरें । अवघीं येती रागा एक म्हणती बरें । संगें वाढे कलह करावा एकाएकींच खरें ॥ ९ ॥ एक म्हणती एकाला रे तूं जासील कोठें। सांडी मांडी हे वाउगें तुझें बोलचि खोटें । ठायीं राहा उगे ठायींच का रे सिणसी वाटे । अवघियांची शिदोरी तुझी बरी भरियेली मोट ॥ १० ॥ तुका म्हणे अरे काहण्या काय सांगाल गोष्टी । चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटीं । जागा करूं या रे कान्होबा मागों कवळ ताटीं । धाले गडी तुका ढेकर देतो विठ्ठल कंठीं ॥ ११ ॥
१९२. गौळणी बांधिती धारणासी गळा । खेळे त्या गोपाळामाजी ब्रह्म ॥ १ ॥ धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठीं ॥ २ ॥ तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगीं । भोळेपणा लागीं भीक मागे ॥ ३ ॥
१९३. घेती पाण्यासी हुंबरी । त्यांचे समाधान करी ॥ १ ॥ ऐशी गोपाळांची सवे । जाती तिकडे मागें धांवे ॥ २ ॥ स्थिरावली गगा । पांगविली म्हणे उगा ॥ ३ ॥ मोहरी पांवा काठी । तुका म्हणे याजसांठीं ॥ ४ ॥
१९४. घ्या रे भोंकरें भाकरी । दहींभाताची सिदोरी । ताक सांडा दरी । असेल तें तयापें ॥ १ ॥ येथें द्यावें तैसें घ्यावें । थोडे परि निरें व्हावें । सांगतों हें ठावें । असों द्या रे सकळां ॥ २ ॥ माझें आहे तैसें पाहे । नाहीं तरी घरा जाये । चोरोनियां माये । नवनीत आणावें ॥ ३ ॥ तुका म्हणे घरी । माझें कोणी नाही हरी । नका करूं दुरी। मज पायां वेगळे ॥ ४ ॥
१९५. चला बाई पांडुरंग पाहूं वाळवंटीं । मांडियेला काला भोंवतीं गोपाळांची दाटीं ॥ धृ. ॥ आनंदें कवळ देती एकामुखी एक । न म्हणती सान थोर अवघीं सकळिक ॥ २ ॥ हमामा हुंबरी पावा वाजविती मोहरी । घेतलासे फेरा माजी घालूनियां हरी ॥ ३ ॥ लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती । विसरल्या देहभाव शंका नाहीं चित्तीं ॥ ४ ॥ पुष्पांचा वरुषाव झाली आरतियांची दाटी । तुळसी गुंफोनियां माळा घालितील कंठीं ॥ ५ ॥ यादवांचा राणा गोपी मनोहर कान्हा । तुका म्हणे सुख वाटे देखोनियां मना ॥ ६ ॥
१९६. चला वळू गाई । बैसो जेऊं एके ठायीं ॥ १ ॥ बहु केली वणवण । पायपिटी झाला सीण ॥ २ ॥ खांदी भार पोटीं भूक । काय खेळायाचें सुख ॥ ३ ॥ तुका म्हणे धांवें । मग अवघें बरवें ॥ ४ ॥
१९७. झाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये ॥ १ ॥ मज उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ २ ॥ नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी कांहीं आतां ॥ ३ ॥ तुका म्हणे कळों आलें वर्तमान । माझें तो वचन आच्छादलें ॥ ४ ॥
१९८. झालों आतां एके ठायीं । न वंचूं कांही एकमेकां ॥ १ ॥ सरलाें हेंगे देउनि मोट । कटकट काशाची ॥ २ ॥ सोडोनियां गांठी पाहें । काय आहे त्यांत तें ॥ ३ ॥ तुका म्हणे झालों निराळा । आतां गोपाळा देऊं बोभा ॥ ४ ॥
१९९. झेला रे झेला वरचेवरी झेला । हातिचें गमावी तो पाठीसी खाय टोला ॥ धृ. ॥ त्रिगुणांचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरिलियां मुखें मन लावी तेथें डोळां ॥ २ ॥ आगळा होऊनि धरी वरिचिया वरी । चपळ तो जिंके गांढ्या ठके येरझारीं ॥ ३ ॥ हातीं सांपडले उभें बैसों नेदी कोणी । सोरीमागे सोरी घेती ओणवें करूनी ॥ ४ ॥ डाईं पडिलिया सोसी दु:खाचे डोंगर । पाठीवरी भार उभा भोंवताही फेर ॥ ५ ॥ तुका म्हणे सुख पाहे तयाचें आगळें । जिंकी तो हरीसी कोणी एका तरी काळें ॥ ६ ॥
२००. तुजसवे येतां हरी । आम्हां लाज नाहीं तरी । उचलिला गिरी । चांग तई वांचलों ॥ १ ॥ मोडा आतां खेळ । गाई गेल्या झाला वेळ । फांकल्या ओढाळ । नाहीं तोचि आवरा ॥ २ ॥ चांग दैवें यमुनेसी । वांचलों बुडतां । निलाजिरी आम्ही नाहीं । भय धाक या अनंता ॥ ३ ॥ खातों आगी माती । आतां पुरे हा सांगाती । भोंवतां भोवेल । आम्हां वाटतें हें चित्तीं ॥ ४ ॥ तुका म्हणे उरी । नाहीं तुजसवें । शाहाणिया दुरी । छंद भोळियां भावें ॥ ५ ॥
२०१. तुझिये संगती । झाली आमुची निश्चिंती ॥ १ ॥ नाहीं देखिलें तें मिळे । भोग सुखाचे सोहळे ॥ २ ॥ घरीं ताकाचें सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । आम्ही न वजाें दवडितां ॥ ४ ॥
२०२. त्यांनीं धणीवरी संग केला हरीसवें । देऊनी आपुलें ताेचि देईल तें खावें ॥ १ ॥ न ठेवी आभार प्रेमाचा भकेला। बहु दिस संग हाचि निर्धार त्याला ॥ २ ॥ कान्होबा तूं जेवीं घासाेघासीं । आरुष गोपाळे त्यांची बहु देवा प्रीति ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां जाऊं आपुलिया घरा । तोये वांचविलें ऐंसें सांगा रें दातारा ॥ ४ ॥
२०३. देखिलासी माती खातां । दावियाने बांधी माता ॥ १ ॥ जाळी घेउनि कांबळी काठी । गाई वळी वेणू पाठीं ॥ २ ॥ मोठें भावार्थाचें बळ । देव झाला त्याचें बाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे भक्तासाठीं । देव धांवें पाठोवाटीं ॥ ४ ॥
२०४. धन्य तीं गोधनें कांबळी काष्ठिका । मोहरी पांवा निका ब्रीद वांकी ॥ १ ॥ धन्य तें गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य झाल्या ॥ २ ॥ धन्य तें देवकी जसवंती दोहींचें । वसुदेवनंदाचें भाग्य झालें ॥ ३ ॥ धन्य त्या गोपिका सोळा सहस्र बाळा । यादवां सकळां धन्य झालें ॥ ४ ॥ म्हणे तुका जन्मा तींचि आली । हरिरंगी रंगली सर्वभावें ॥ ५ ॥
२०५. धालें मग पोट । केला गड्यांनी बोभाट ॥ १ ॥ ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥ २ ॥ खांद्यावरी भार । तीं शिणती बहु फार ॥ ३ ॥ तुकयाच्या दातारें । नेली सुखी केली पोरें ॥ ४ ॥
२०६. धांव कान्होबा गेल्या गाई । न म्हणें मी कोणा काई ॥ १ ॥ आपुलियांचें वचन देवा । गोड सेवा करीतसे ॥ २ ॥ मागतां आधीं द्यावा डाव । बळिया मी तो नाहीं भाव ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐशा सवें । अनुसरावें जीवें भावें ॥ ४ ॥
२०७. नको आम्हांसवें गोपाळा । येऊं ओढाळा तुझ्या गाई ॥ १ ॥ कोण धांवें त्यांच्या लागें। मागें मागें येरझारी ॥ २ ॥ न बैसती एके ठायीं । धांवती दाही दाहा वाटां ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं राख मनेरी । मग त्या येरी आम्ही जाणाें ॥ ४ ॥
२०८. नेणती तयांसी साच भाव दावी हरी । लाज नाहीं नाचे पांवा वाजवी मोहरी ॥ १ ॥ चला रे याच्या पायां लागो आतां । राखिले जळतां महा आगीपासूनी ॥ २ ॥ कैसीरे कान्होबा एवढी गिळियेली आगी । न देखों पोळला तुज तोंडीं कोठें अंगीं ॥ ३ ॥ तुका म्हणे कां रे तुम्ही करितां नवल । आमची शिदोरी खातो त्याचें आलें बळ ॥ ४ ॥
२०९. नेणों वेळ काळ । धालों तुझ्यानें सकळ ॥ १ ॥ नाहीं नाहीं रे कान्होबा भय आम्हांपाशीं । वळूनी पुरविसी गाई पोटा खावया ॥ २ ॥ तुजपाशीं भय । हें तों बोलों परी नये ॥ ३ ॥ तुका म्हणे बोल । आम्हां अनुभवें फोल ॥ ४ ॥
२१०. पळाले ते भ्याड । त्यांसी येथें झाला नाड ॥ १ ॥ धीट घेती धणीवरी । शिंकीं उतरितो हरी ॥ २ ॥ आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥ ३ ॥ तुका म्हणे घ्या रे पया । कैं पावाल या ठाया ॥ ४ ॥
२११. पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥ १ ॥ करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥ २ ॥ आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥ ३ ॥ एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥ ४ ॥
२१२. पाहती गौळणी । तंव ती पालथी दुधाणी ॥ १ ॥ म्हणती नंदाचिया पोरें । आजी चोरी केली खरें ॥ २ ॥ त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥ ३ ॥ सवें तुकया मेला । त्याणे अगुणा आणिला ॥ ४ ॥
२१३. पैल आली आगी कान्हो कायरे करावें । नकळे तें कैसें आजी वांचों आम्ही जीवें ॥ १ ॥ धांव रे हरि सांपडलों संधी । वोणव्याचे मधीं बुद्धि काय करावी ॥ २ ॥ अवचितां ज्वाळा येतां देखिल्या वरी । परतोनि पाहतां अवघे होतों पाठमोरी ॥ ३ ॥ सभोंवतां फेर रीघ न होय पळतां । तुका म्हणे जाणसी तें करावें अनंता ॥ ४ ॥
२१४. फिरविली दोनी । कन्या आणि चक्रपाणी ॥ १ ॥ जाला आनंदी आनंद । अवतरले गोविंद ॥ २ ॥ तुटलीं बंधनें । वसुदेवदेवकीचीं दर्शनें ॥ ३ ॥ गोकुळासी आलें । ब्रह्म अव्यक्त चांगलें ॥ ४ ॥ नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥ ५ ॥ निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥ ६ ॥ आनंदली मही । भार गेला सकळही ॥ ७ ॥ तुका म्हणे कंसा । आठ भोविला वळसा ॥ ८ ॥
२१५. बहु काळीं बहु काळीं । आम्ही देवाचीं गोवळीं ॥ १ ॥ नाहीं विट देतो भाते । जेवूं बैसवूं सांगातें ॥ २ ॥ बहु काळें बहु काळें । माझें पांघरे कांबळें ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं नाहीं । त्याचें आमचेंसें कांहीं ॥ ४ ॥
२१६. बहुतांचे संगती । बहू पावलों फजिती ॥ १ ॥ बरें केलें नंदबाळें । मागिलांचें तोंड काळें ॥ २ ॥ माझा करितील तंटा । लपती आलिया बोभाटा ॥ ३ ॥ तुका म्हणे काई । किती म्हणों बाप आई ॥ ४ ॥
२१७. बहु बरा बहु बरा । या सांगातें मिळे चारा ॥ १ ॥ म्हणोनि जीवेंसाठीं । घेतली कान्होबाची पाठी ॥ २ ॥ बरवा बरवा दिसे । समागम याचा निमिषें ॥ ३ ॥ पुढती पुढती तुका । सोकला सोकवितो लोकां ॥ ४ ॥
२१८. बैसवूनी फेरी । गडिया मध्यभागीं हरी । अवघियांचें करी । समाधान सारिखें ॥ १ ॥ पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हुरुपें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥ २ ॥ बोले बोलतिया सवें । देतील तें त्यांचे घ्यावें । एक एका ठावें । येर येरा अदृश्य ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । बहु आवडीचा हेवा । कोणाचिया जीवा । वाटों नेदी विषम ॥ ४ ॥
२१९. ब्रह्मादिकां न कळे खोळ । ते हे आकळ धरियेली ॥ १ ॥ मोहरी पांवा वाहे काठी । धांवे पाठीं गाईचे ॥ २॥ उच्छिष्ट जें न लभें देवा । तें हें सदैवां गोवळ्यां ॥ ३ ॥ तुका म्हणे जोडी झाली । ते हे माउली आमुची ॥ ४ ॥
२२०. भिऊं नका बोले झांकुनियां राहा डोळे । वांचविल देव धाक नाहीं येणे वेळे ॥ १ ॥ बापरे हा देवांचाही देव । कळों नेदी माव काय करी करवितो ॥ २ ॥ पसरूनि मुख विश्वरूप खाय ज्वाळ । सारुनियां संधि अवघे पाहाती गोपाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही मागें भ्यालों वांयांविण । कळों आलें आतां या सांगातें नाहीं शीण ॥ ४ ॥
२२१. भ्यालीं जिवा चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळी तो ॥ १॥ आहाकटा करिती हाय । हात डोकीं पिटिती पाय ॥२ ॥ जवळी होतां न कळे आम्हां । गेल्या सीमा नाहीं दुःखा ॥ ३ ॥ तुका म्हणे हा लाघवी मोटा । पाहे खोटा खरा भाव ॥ ४ ॥
२२२. मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायेघरीं गांजियेलों ॥ १ ॥ तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ २ ॥ वांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां वेगळा । राहे गोपाळा म्हणउनी ॥ ४ ॥
२२३. माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥ १ ॥ आपआपणामध्यें मिळों । एक खेळों एकाशीं ॥ २ ॥ घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भ्याडां वळतियां ॥ ३ ॥ तुका म्हणे देवापाशीं । भिती ऐशी नसावी ॥ ४ ॥
२२४. मेळवूनि सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार ॥ १ ॥ जाऊं चोरूं लोणी । आजी घेऊं चंद्रधणी । चला वेळु लाविला अझुनि । काय करितां गडे हो ॥ २ ॥ वाट काढिली गोविंदी । मागे गोपाळांची मांदी ॥ ३ ॥ अवघाचि वावरे । कळों नेदी कोणां खरें ॥ ४ ॥ घर पाहोनि एकांताचें । नवविधा नवनीताचें ॥ ५ ॥ रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाचां हरी ॥ ६ ॥ बोलों नेदी म्हणे स्थीर । खुण दावी खा रे क्षीर ॥ ७ ॥ जोगावल्यावरी । तुका करिताें चाकरी ॥ ८ ॥
२२५. म्हणती धालों धणीवरी । आतां नलगे शिदोरी । नयें क्षणभरी । आतां यास विसंबों ॥ १ ॥ चाल चाल रे कान्होबा । खेळ मांडूं रानीं । बैसवूं गोठणी । गाई जमा करूनी ॥ २ ॥ न लगे जावें घरा । चुकलिया येरझारा । सज्जन सोयरा । मायबाप तूं आम्हां ॥ ३ ॥ तुका म्हणे धालें पोट । आतां काशाचा बोभाट । पाहाणें ते वाट । मागें पुढें राहिली ॥ ४ ॥
२२६. यमुने पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोऱ्या सकळी । काला करूंआजी ॥ १ ॥ अवघें एके ठायीं । करूनी स्वाद त्याचा पाहीं । मजपाशी आहे तेंही । तुम्हांमाजी देतो ॥ २ ॥ म्हणती बरवें गोपाळ । म्हणती बरवें गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पांवे आनंदे ॥ धृ. ॥ खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करूनियां वांटा । गडियां देतो हरि ॥ ४ ॥ एकापुढे एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिकची वाटे ॥ ५ ॥ म्हणती गोड झालें । म्हणती गोड झालें । आणिक देईं धालें । नाहीं पोट आमुचें ॥ ६ ॥ हात नेता मुखापाशीं । येर आशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया ॥ ७ ॥ देऊनियां मिठी । पळे लागतील पाठीं । धरूनी काढितील ओठीं । मुखामाजी खाती ॥ ८ ॥ म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांस भरी राना । दुम करि तो शाहणा । पाठोवाठी तयाच्या ॥ ९ ॥ अवघियांचे खाय । कवळ कृष्ण माझी माय । सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥ १० ॥ एक एका मारी । ढुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहावे हरि । म्हणे पुरें आतां ॥ ११ ॥ येतो काकुलती । गोळा न साहावे श्रीपती । म्हणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥ १२ ॥ आनंदाचे फेरी । माजी घालूनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगें पांवें ॥ १३ ॥ वांकडे बोबडें । खुडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडलीं पुढें । बहु भाविक तीं ॥ १४ ॥ करी कवतुक । त्यांचे देखोनियां मुख । हरीसी वाटतें सुख । खदखदां हांसे ॥ १५ ॥ एक एकाचे उच्छिष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतांही धीट । आपुलिया संगें ॥ १६ ॥ नाहीं गेली ज्याची भूक । त्याचें पसरवितो मुख । अवधियां देतो सुख । सारिखें हरी ॥ १७ ॥ म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥ १८ ॥ गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । झालें यमुनेचें स्थिर । जळ वाहों ठेलें ॥ १९ ॥ देव पाहाती सकळ । मुखें घोटूनियां लाळ । धन्य म्हणती गोपाळ । धिग झालों आम्ही ॥ २० ॥ म्हणती कैसें करावें । म्हणती कैसे करावें । यमुनाजळीं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया ॥ २१ ॥ सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचे तट । तंव अधिकचि होंट । मटमटां वाजती ॥ २२ ॥ आनंदें गोपांसहित । क्रीडा करी गोपीनाथ । म्हणे यमुनेंत हात । नका धुऊं कोणी ॥ २३ ॥ म्हणती जाणे जीवींचें । लाजे त्यास येथें कैंचें । शेष या कृष्णाचें । लाभे थोरिवे ॥ २४ ॥ धन्य दिवस काळ । आजी फावला गोपाळ । म्हणती धालों रे सकळ । तुझियानी हातें ॥ २५ ॥ मानवले गडी । एक एकांचे आवडी । दहीं खादलें परवडी । धणीवरी आजी ॥ २६ ॥ तुझा संग बरवा । नित्य आम्हांसी द्यावा । ऐसें करूनियां जीवा । नित्य देवा चालावें ॥ २७ ॥ तंव म्हणे वनमाळी । घ्या रे काठिया कांबळी । आतां जाऊं खेळीमेळी । गाई चारावया ॥ २८ ॥ आजी झाला आनंदू । न वर्णवे ब्रह्मानंदू । चाले परमानंदू । सवें आम्हांसहित ॥ २९ ॥ तुका म्हणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसी केली । आपणयांसरी ॥ ३० ॥
२२७. या रे करूं गाई । जमा निजलेति काई । बोभाट्यानें आई । घरा गेल्या मारील ॥ १ ॥ घाला घाला रे कुकारे । ज्याची तेणेंचि मोहरे । एवढेंचि पुरे । केलियानें सावध ॥ २ ॥ नेणोनियां खेळा । समय समयाच्या वेळा । दुश्चिताजवळा । मिळाले ते दुश्चित ॥ ३ ॥ तुका म्हणे शीक । न धरितां लागे भीक । धरा सकळिक । मनेरी धांवा वळतियां ॥ ४ ॥
२२८. याल तरी या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥ १ ॥ आजी देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥ २ ॥ हळूहळू चाला । कोणी कोणाशीं न बोला ॥ ३ ॥ तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥ ४ ॥
२२९. येईल तें घेईन भागा । नव्हे जोगा दुसरिया ॥ १ ॥ आवडी ते तुम्ही जाणा । बहु गुणांसारिखी ॥ २ ॥ मज घेती डांगवरी । सवें हरि नसलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥ ४ ॥
२३०. वरता वेंघोनी घातली उडी । कळंबाबुडी यमुनेसी ॥ १ ॥ हरि बुडाला बोंब घाला । घरचीं त्याला ठावा नाहीं ॥ २ ॥ भवनदीचा न कळे पार । काळिया माजी थोर विखार ॥ ३ ॥ तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातींचा गमावुनि थिंका ॥ ४ ॥
२३१. वळी गाई धांवे घरा । आमच्या करी येरझारा ॥ १ ॥ नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ २ ॥ नेदी पडों उणे पुरें । म्हणे अवघेंचि बरें ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥ ४ ॥
२३२. विटंबिले भट । दिला पाठीवरी पाट ॥ १ ॥ खोटें जाणोनी अंतर । न साहेचि विश्वंभर ॥ २ ॥ तेंचि करी दान । जैसें आइके वचन ॥ ३ ॥ तुका म्हणे देवें । पूतना शोषियेली जीवें ॥ ४ ॥
२३३. वोळलीचा दोहूं पान्हां । मज कान्हा सांगितलें ॥ १ ॥ घ्या जी हेंगे क्षीर हातीं। निगुतीनें वाढावें ॥ २ ॥ केलें सांगितलें काम । नव्हे धर्म सत्तेचा ॥ ३ ॥ तुका म्हणे नवें जुनें । ऐसें कोणें सोसावें ॥ ४ ॥
२३४. शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥ १ ॥ तुम्ही व्हा रे दोहींकडे । मुख पसरूनी गडे ॥ २ ॥ वाहाती त्या धारा । घ्या रे दोहींच्या कोपरा ॥ ३ ॥ तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥ ४ ॥
२३५. हरि गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥ १ ॥ भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीवींचिया ॥ २ ॥ योगीयांच्या ध्याना नये । भाकरी त्यांच्या मागोनी खाय ॥ ३ ॥ तुका म्हणे असे शाहाणियां दुरी । बोबडिया दासां हाका मारी ॥४ ॥
२३६. हा गे माझे हातीं । पाहा कवळ सांगती ॥ १ ॥ देवें दिला खातों भाग । कराल तरी करा लाग ॥ २ ॥ धालें ऐसें पोट । वरा करूनियां बोभाट ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं । मग कैंच्या या परी ॥ ४ ॥
२३७. हुंबरती गाय तयांकडे कान । कैवल्यनिधान देऊनी ठाके ॥ १ ॥ गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ २ ॥ चोरोनियां खाय दूध दहीं लोणी । भावें चक्रपाणि गोविला तो ॥ ३ ॥ निष्काम तो झाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥ ४ ॥ जगदानी इच्छी तुळसी एक दळ । भावाचा सकळ विकिला तो ॥ ५ ॥ तुका म्हणे हेंचि चैतन्य सांवळे । व्यापूनी निराळें राहिलेंसे ॥ ६ ॥ (धृ. नाही)
२३८. हेंचि अनुवाद सदा सर्वकाळ । करूनि गोपाळकाला सेवूं ॥ १ ॥ वोरसलें कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आइतें गगनभरीं ॥ २ ॥ संत सनकादिक गोमट्या परवडी । विभाग आवडी इच्छेचिये ॥ ३ ॥ तुका म्हणे मधीं घालूं नारायण । मग नव्हे सीण कोणा खेळे ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment