Tuesday, 25 March 2025

२. बाळक्रीडेचे अभंग (अभंग संख्या १००)

भगवान श्रीकृष्णाच्या बाळलीला वर्णन करणारे अभंग 

(टीप : बाळक्रीडेच्या सर्व अभंगांस ‘माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ।’ हे धृ. म्हणणे)

९. देवा आदिदेवा जगत्रयाजीवा । परियेसी केशवा विनंति माझी ॥ १ ॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम काही कळा ॥ २ ॥ कळा तुजपाशी आमुचे जीवन । उचित करून देई आम्हां ॥ ३ ॥ आम्हां शरणागतां तुझाचि आधार । तूं तंव सागर कृपासिंधु ॥ ४ ॥ सिंधु पायवाट होय तुझ्या नामें । जळतील कर्में दुस्तरें तीं ॥ ५ ॥ तें फळ उत्तम तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥ ६ ॥ सेविलिया रामकृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥ ७ ॥ संसार तो काय तृणवतमय । अग्नि त्यासी खाय क्षणमात्रे ॥ ८ ॥ क्षणमात्रे जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥ ९ ॥ करी ब्रीद साचें आपलें आपण । पतितपावन दीनानाथ ॥ १० ॥ नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तींचा मनोरथ ॥ ११ ॥ चित्तीं जें धरावें तुका म्हणे दासीं । पुरविता होशी मनोरथ ॥ १२ ॥

१०. मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥ १ ॥ ऋण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥ २ ॥ सीण झाला वसुदेव देवकीस । वधी बाळे कंस दुराचारी ॥ ३ ॥ दुराचारियासी नाहीं भूतदया । आपपर तया पापपुण्य ॥ ४ ॥ पुण्यकाळ त्यांचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥ ५ ॥ गर्भासी तयांच्या आले नारायण । तुटली बंधनें आपोआप ॥ ६ ॥ आपोआप बेड्या तुटल्या श्रृंखळा । बंदाच्या आर्गळा कुलपे कोंडे ॥ ७ ॥ कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष न लगतां ॥ ८ ॥ न कळे तो तया सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥ ९ ॥ नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं जाला गोवा सवें देव ॥ १० ॥ सवें देव तया आड नये कांहीं । तुका म्हणे नाहीं भय चिंता ॥ ११ ॥


११. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥ १ ॥ देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥ २ ॥ आलें अविनाश धरूनि आकार । दैत्यांचा संहार करावया ॥ ३ ॥ करावया भक्तजनांचें पाळण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥ ४ ॥ गोकुळीं आनंद प्रगटलें सुख । निर्भर ते लोक घरोघरीं ॥ ५ ॥ घरोघरीं जाला लक्षुमीचा वास । दैन्यदारिद्य्रास त्रास आला ॥ ६ ॥ आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरां नारीलोकां ॥ ७ ॥ लोकां गोकुळींच्या झालें ब्रह्मज्ञान । केलियावांचून जपतपें ॥ ८ ॥ जपतप काय करावीं साधनें । जे त्या नारायणें कृपा केली ॥ ९ ॥ केलीं नारायणें आपुलीं अंकित । तोचि त्यांचें हित सर्व जाणे ॥ १० ॥ सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाहीं नाहीं ॥ ११ ॥ नाहीं भक्ता दुजें तिहीं त्रिभुवनीं । एका चक्रपाणीवांचूनि त्या ॥ १२ ॥ त्याच्या सुखासंगें घेती गर्भवास । तुका म्हणे आस त्यजूनियां ॥ १३ ॥

१२. त्यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिहीं तो मुरारी खेळविला ॥ १ ॥ खेळविला जिही अंतर्बाह्य सुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥ २ ॥ दिलें सुख त्यांसी अंतरींचें देवें । जिहीं एका भावें जाणितला ॥ ३ ॥ जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥ ४ ॥ ज्यांचें कृष्णीं तन मन जालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥ ५ ॥ विष तयां जालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥ ६ ॥ एकांतीं त्या जाती हरिसी घेवूनि । भोगइच्छा धणी फेडावया ॥७॥ वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणे इच्छाभोग ॥ ८॥ भोग त्याग नाही दोन्ही जयापासीं । तुका म्हणे जैसी स्फटिक शिळा ॥ ९ ॥

१३. शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाऊनियां छंदें जैसी तैसी ॥ १॥ जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥ फेडावया आला अवधियांची धणी । गोपाळ गौळणी मायबाप ॥ ३॥ मायबापा सोडविलें बंदीहुनी। चाणूर मर्दनी कंसादिक ॥४॥ दिक नाही देणे अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥ ५॥ मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥ पाप कोठे राहे हरि आठवितां । भक्ति द्वेषें चिंता जैसा तैसा ॥ ७ ॥ साक्षी तयापाशी पूर्वींल कर्माच्या । बांधला सेवेच्या ऋणी देव ॥ ८ ॥ देव भोळा धांवे भक्ता पाठोवाठीं। उचारिता कंठी मागे मागें ॥९॥ मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी । धांवतो घरासी भाविकांच्या ॥ १०॥

१४. चारी वेद ज्याची कीर्ति वाखाणिती। बांधवी तो हाती गौळणीच्या ॥१॥ गौळणी त्या गळां बांधिती धारणीं। पायां चक्रपाणि लागे तया ॥ २॥ तयाघरी रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनी शिरे माजी ॥ ३॥ माजी शिरोनियां नवनीत खाय । कवाड ते आहे जैसे तैसें ॥ ४ ॥ जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात्कारीं। म्हणऊनि चोरी नसंपडे ॥ ५ ॥ नसंपडे तया करितां खटपट । वाउगें बोभाट वर्माविण ॥ ६ ॥ वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ।। ७ ।। निवांत राहिल्या नि:संग होऊनी । निश्चळ त्या ध्यानी कृष्णध्यानें ॥ ८ ॥ न ये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । धरिती गौळणी भाविका त्या ॥ ९ ॥ भाविका तयांसी येतो काकुलती। शहाण्या मरती नसंपडे ॥ १० ॥ नलगे वेंचावी टोली धनानांवें । तुका म्हणे भावें चाड एका ॥ ११ ॥

१५. चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका॥१॥ रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणें बरी नाही म्हूण ॥ २ ॥ न संपडे इंद्रचंद्रब्रह्मादिकां । अभिमानें एका तिळमात्रे ॥ ३ ॥ तिळमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥ ४॥ भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥ ५ ॥ दुष्ट अभक्त जे निष्ठुर मानसीं। केली हे तयांसी यमपुरी ॥ ६ ॥ यमदूत त्यांसी करिती यातना । नाहीं नारायणा भजले जे ॥ ७ ॥ जे नाहीं भजले एका भावें हरी । तया दंड करी यमधर्म ॥ ८॥ यमधर्म म्हणे तया दोषियांसी । कां रे केशवासी चुकलेती ॥ ९ ॥ चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुम्हां कान डोळे मुख ॥ १० ॥ कान डोळे मुख संतांची संगति । न धराच चित्तीं सांगितलें ॥ ११ ॥ सांगितलें संती तुम्हां उगवुनी । गर्भासी येऊनी यमदंड ॥ १२ ॥ दंडूं आम्ही रागें म्हणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनांचा ॥ १३ ॥ दुर्जनांचा येणे करूनि संहार । पूर्ण अवतार रामकृष्ण ॥ १४ ॥ रामकृष्णनामें रंगले जे नर । तुका म्हणे घर वैकुंठ त्या ॥ १५॥

१६. वैकुंठींच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥ १ ॥ समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चित्तवित्ते समर्पिलीं ॥ २ ॥ समर्थ ते गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥ ३ ॥ रामकृष्णें केलें कवतुक गोकुळीं। गोपाळांचे मेळी गाई चारी ॥ ४ ॥ गाईचारी मोहोरी पावां वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळी ते ॥५ ॥ काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या म्हैसी गाई पशु ॥ ६ ॥ सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका गोपाळीं धणीवरी ।। ७ ।। धणीवरी त्यांसी सांगितली मात । ज्याचे जैसे आर्त तयापरी ॥ ८ ॥ परी याचे तम्ही आइका नवल । दुर्गम जो खोल साधनासी ॥ ९ ॥ शिक लावूनियां घालिती बाहेरी। पाहाती भीतरी सवेंचि तो ॥ १० ॥ तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें। शिव्या देतां सुखें हांसतसे ॥ १७ ॥ हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥ १२ ॥ तो जें जें करी ते दिसे उत्तम । तुका म्हणे वर्म दावी सोपें ॥ १३ ॥

१७. वर्म दावी सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥ १ ॥ मान देती आधी मागतील डाव । देव तें गौरव सुखें मानी ॥ २ ॥ मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरी स्नान तेणें ॥ ३ ॥ वस्त्रे घोंगडिया घालूनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥ ४ ॥ तिहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना वळतियां ॥ ५॥ त्यांच्या वचनाची पुष्पें वाहे शिरीं । नैवेद्य त्यांकरीं कवळ मागे ॥ ६ ॥ त्यांचिये मुखींचें हरोनियां घ्यावें । उच्छिष्ट तें खावें धणीवरी ॥ ७॥ वरी माथां गुंफे मोरपिसां वेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदें ॥ ८ ॥ छंदें नाचतील जयासवें हरी । देहभाव वरी विसरलीं ॥ ९ ॥ विसरली वरी देहाची भावना । तेचि नारायणा सर्वपूजा ॥ १० ॥ पूजा भाविकांची न कळतां घ्यावी । न मागतां दावी निज ठाव ॥ ११ ॥ ठाव पाहावया हिंडे मागे मागें । तुका म्हणे संगे भक्तांचिया ॥ १२ ॥

१८. भक्तजनां दिले निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥ २ ॥ आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरी हरि ऋणी ॥ २ ॥ रुसलिया त्यांचें करी समाधान । करविता आपण क्रिया करी ॥ ३ ॥ क्रिया करी तुम्हां न वजे पासुनी। अवधिया जणी गोपिकांसी ॥ ४ ॥ गोपिकांसी म्हणे वैकुंठीचा पति । तुम्ही माझ्या चित्ती सर्व भावें ॥ ५ ॥ भाव जैसा माझ्या ठायीं तुम्ही धरा । तैसाचि मी खरा तुम्हांलागीं ॥ ६ ॥ तुम्हासी कळो द्या माझा साच भाव । तुमचाचि जीव तुम्हा ग्वाही ॥ ७ ॥ ग्वाही तुम्हां आम्हां असे नारायण । आपुलीच आण वाहतसे ॥ ८ ॥ सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभव सरसा आणूनिया ॥ ९ ॥ त्यासी बुझावितो वेगळाल्या भावें । एकीचें तें ठावें नाहीं एकी ॥ १० ॥ एक क्रिया नाही अवघियांचा भाव । पृथक ते देव देतो तैसें ॥ ११ ॥ तैसें कळों नेदी जो मी कोठे नाहीं । अवघियांचे ठायीं जैसा तैसा ॥ १२ ॥ जैसा मनोरथ जया चित्तीं काम । तैसा मेघश्याम पुरवितो ॥ १३ ॥ पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणिक लोकांचे गोकुळींच्या ॥ १४ ॥ गोकुळींच्या लोकां लावियेला छंद । बैसला गोविंद त्यांचे चित्तीं ॥ १५ ॥ चित्तें चोरूनीयां घेतलीं सकळां । आवडी गोपाळांवरी तयां ॥ १६ ॥ तयांसि आवडे वैकुंठनायक । गेली सकळीक विसरोनी ॥ १७ ॥ निंदा स्तुति कोणी न करी कोणाची। नाहीं या देहाची शुद्धि कोणा ॥ १८ ॥ कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव म्हणूनिया चुंबन देती ॥ १९ ॥ देती टाकूनियां भ्रतारांसी घरीं । लाज ते अंतरीं आथींच ना ॥ २० ॥ नाहीं कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका म्हणे वाचा काया मनें ॥ २१ ॥

१९. मनें हरिरूपी गुंतल्या वासना । उदास त्या सुना गौळियांच्या ॥ १ ॥ त्यांच्या भ्रतारांची धरूनियां रूपें। त्यांच्या घरी त्यांपे भोग करी ॥ २ ॥ करी कवतुक त्यांचे तयापरी । एका दिसे हरि एका लेंक ॥ ३ ॥ एक भाव नाहीं सकळांच्या चित्तीं । म्हणवूनि प्रीति तैसें रूप ॥ ४ ॥ रूप याचे आहे अवघेचि एक । परि कवतुक दाखविलें ॥ ५ ॥ लेंकरूं न कळे स्थूळ की लहान । खेळे नारायण कवतुकें ॥ ६ ॥ कवतुक केलें सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥ ७॥

२०. जगाचा हा बाप दाखविले मायें । माती खातां जाय मारावया ॥ १ ॥ मारावया तिने उगारिली काठी । भुवनें त्या पोटी चौदा देखे ॥ २ ॥ देखे भयानक झांकियेलें डोळे । मागुता तो खेळे तियेपुढे ॥ ३ ॥ पुढे रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी भाव मायावंत ॥ ४ ॥ मायावंत हरिरूप काय जाणे । माझें माझें म्हणे देवा बाळ ॥ ५ ॥ बाळपणीं रिठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥ ६ ॥ गळा बांधूनियां उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जून ॥ ७॥ न कळे जुनाट जगाचा जीवन । घातले मोहन गौळियांसी ॥ ८ ॥ शिंकी उतरूनी खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥ ९ ॥ तरी दूध डेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥ १० ॥ दुणी झाले त्याचा मानिती संतोष । दुभत्याची आस धरूनियां ॥ ११ ॥ आशाबद्धा देव असोनी जवळी । नेणती ते काळी स्वार्थामुळे ॥ १२ ॥ मुळ यांचा देव न कळे तयासी । चित्त आशापाशी गोवियेलें ॥ १३ ॥ लेंकरूं आमचे म्हणे दसवंती । नंदाचिये चित्तीं तोचि भाव ॥ १४ ॥ भाव दावावया चरित्र दाखवी । घुसळितां रवी डेरियांत ॥ १५ ॥ डेरियांत लोणी खादलें रिघोनी । पाहे तो गौळणी हाती लागे ॥ १६ ॥ हातीं धरूनियां काढिला बाहेरी । देखोनियां करी चोज त्यासी ॥ १७ ॥ सिकवी विचार नेणें त्याची गती । होता कोणे रीतीं डेरियांत ॥ १८ ॥ त्यांसी पुत्रलोभे न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यांसी ॥ १९ ॥ त्यांसी मायामोहजाळ घालीत फांसा । देव आपणसा कळों नेदी ॥ २० ॥ नेदी भाव राहों लोभिकांचे चित्तीं। जाणतांचि होती आंधळी तीं ॥ २१ ॥ आंधळी ती तुका म्हणे संसारीं । जिंहीं नाहीं हरी ओळखिला ॥ २२ ॥

२१. ओळखी तयांसी होय एकाभावें । दुसरिया देवें न पविजे ॥ १ ॥ न पविजे कदा उन्मत्त झालिया । दंभ तोचि वायां नागवण ॥ २ ॥ वनवास देवा कारणे एकांत । करावी हीं व्रततपें याग ॥ ३ ॥ व्रत याग यांसी फळलीं बहुतें । होती या संचितें गौळियांचीं ॥ ४ ॥ यांसी देवेंतारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होतें ॥ ५ ॥ होतें तें द्यावया आला नारायण । मायबापां ऋण गौळियाचें ॥ ६ ॥ गौळियाचे सुख दुर्लभ आणिकां । नाहीं ब्रह्मादिकां तुका म्हणे ॥ ७॥

२२. नेणतियांसाठी नेणता लहान । थिंकोनी भोजन मागे माये ॥ १ ॥ माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तयावरी ॥२॥ तयावरी त्याचा समचित्त भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥ ३ ॥ घेऊनियां एके ठायीं अवतार । एकी केला थोर वाढवूनी ॥४॥ उणा पुरा यासी नाहीं कोणी ठाव । सारिखाचि देव अवघियांसी ॥५॥ यासी दोनी ठाव सारिखे अनंता । आधील मागुता वाढला तो ॥ ६ ॥ वाढला तो सेवाभक्तिचिया गुणें । उपचार मिष्टान्ने करूनियां ॥ ७ ॥ करूनी सायास मेळविलें धन । तेंही कृष्णार्पण केलें तिहीं ॥ ८ ॥ कृष्णासी सकळ गाई घोडे म्हैसी । समर्पिलें दासी जीवें भावें॥ ९ ॥ जीवें भावें त्याची करतील सेवा । न विसंबती नांवा क्षणभरी ॥ १० ॥ क्षणभरी होतां वेगळां तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥ ११ ॥ त्यांचे ध्यानीं मनीं सर्वभावें हरि । देह काम करी चित्त त्यापें ॥ १२ ॥ त्याचेंचि चिंतन कृष्ण कोठे गेला । कृष्ण हा जेविला नाहीं कृष्ण ॥ १३ ॥ कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयिरा भेटों कृष्ण ॥ १४ ॥ कृष्ण गाती ओंव्या दळणी कांडणीं । कृष्ण हा भोजनी पाचारिती ॥ १५ ॥ कृष्ण तया ध्यानी आसनीं शयनीं । देखती त्या स्वप्नी कृष्णरूप ॥ १६ ॥ कृष्ण त्यांस दिसे आभास दुश्चिता । धन्य माता पिता तुका म्हणे ॥ १७॥

२३. कृष्ण हा परिचारी कृष्ण हा व्यवहारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे ॥ १ ॥ म्हणे कृष्णाविण कैसे तुम्हां गमे । वेळ हा करमे वायांविण ॥ २ ॥ वायांविण तुम्ही पिटितां चावटी । घ्यागे जगजेठी क्षणभरी ॥ ३ ॥ क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पाहा एक वेळां घेऊनियां ॥ ४ ॥ याचे सुख तम्हां कळलियावरी । मग दारोदारी न फिराल ॥ ५ ॥ लटिके हे तुम्हां वाटेल खेळणें । एका कृष्णाविणे अवघेंचि ॥ ६ ॥ अवघ्याच तम्ही टाकाल सांगात । घेऊनी अनंत जाल राना ॥ ७ ॥ नावडे हे तुम्हां आणिक बोलिलें । मग हे लागलें हरिध्यान ॥ ८ ॥ न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिक हीं ॥ ९ ॥ आणिक ही तुम्हां येती काकुलती। जवळी इच्छिती क्षण बैसों ॥ १० ॥ बैसों चला पाहों गोपाळाचें मुख । एकी एक सुख सांगतील ॥ ११ ॥ सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव त्या धरिती चित्तीं बाळा ॥ १२ ॥ बाळा येती घरा घेऊनिया जाती । नाहीं त्या परती तुका म्हणे ॥ १३॥

२४. तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासी खेळतां दिवस गमे ॥ १ ॥ दिवस राती कांहीं नाठवें तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥ २ ॥ याच्या मुखें नये डोळ्यासी वीट । राहिले हे नीट तटस्थचि ॥ ३ ॥ तटस्थ राहिलें सकळ शरीर । इंद्रियें व्यापार विसरलीं ॥ ४॥ विसरल्या तहान भूक घरदार । नाहीं हा विचार असों कोठें ॥ ५ ॥ कोठे असो कोण झाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥ ६ ॥ विसरल्या आम्ही कोणी ये जातीच्या । वर्णाही चहूंच्या एक झाल्या ॥ ७ ॥ एक झाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । निःशंक भातुकें खेळतील ॥ ८ ॥ खेळती भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित चित्त त्यांचें ॥ ९ ॥ चित्तीं तो गोविंद लटिकें दळण । करिती हे जन करिती तैसें ॥ १० ॥ जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनियां ॥ ११ ॥ करूनी आपला अवघा गोविंद । जना साच छंद लटिका त्यां ॥ १२ ॥ त्यांनी केला हरि सासुरें माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥ १३ ॥ भावना राहिली एकाचिया ठायीं । तुका म्हणे पायीं गोविंदाचे ॥ १४ ॥

२५. गोविंद भ्रतार गोविंद मूळहारी । नामें भेद परि एकचि तो ॥ १ ॥ एकाचींच नामें ठेवियेली दोनी । कल्पितील मनी यावें जावें ॥ २ ॥ जावें यावें तिहीं घरींचिया घरीं । येथींची शिदोरी तेथें न्यावी ॥ ३ ॥ विचारितां दिसे येणे जाणे खोटें । दाविती गोमटें लोकां ऐसें ॥ ४ ॥ लोक करूनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥ ५ ॥ लटिकें करिती मंगळदायकें । लटिकींच एके एकां व्याही ॥ ६ ॥ व्याही भाई हरि सोयरा जावई । अवघियांच्या ठायीं केला एक ॥ ७ ॥ एकाशींच पावें जें कांहीं करिती । उपचार संपत्ती नाना भोग ॥ ८ ॥ भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाई ॥ ९ ॥ लटिकाची त्यांनी केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥ १० ॥ त्यांनी मृत्तिकेचे करूनी अवघे । खेळतील दोघे पुरुषनारी ॥ ११ ॥ पुरुषनारी त्यांनी ठेवियेली नांवें। कवतुक भावें विचरती ॥ १२ ॥ विचरती जैसें साच भावें लोक । तैसें नाहीं सुख खेळती त्या ॥ १३ ॥ त्यांनी जाणितलें आपआपणया । लटिकें हें वायां खेळतो तें ॥ १४ ॥ खेळतो ते आम्ही नव्हो नारीनर । म्हणोनी विकार नाहीं तयां ॥ १५ ॥ तयां ठावें आहे आम्ही अवघीं एक । म्हणोनी निःशंक खेळतील ॥ १६ ॥ तयां ठावे नाही हरिचिया गुणें । आम्ही कोणकोण काय खेळों ॥ १७ ॥ काय खातों आम्ही कासया सांगातें । कैसे लागतें नेणों मुखीं ॥ १८ ॥ मुखीं चवी नाहीं तोंवरी अंगी लाज । वर्ण यातीकाज न धरिती ।। १९ ॥ न धरिती कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती ॥ २० ॥ नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरि ध्यानीं मनीं बैसलासे ॥ २१ ॥ बैसलासे हरि जयांचिया चित्तीं । तया नावडती मायबापें ॥ २२ ॥ मायबापें त्यांची नेती पाचारूनी । बळें परी मनी हरि वसे ॥ २३ ।। वसतील बाळा आपलाले घरीं। ध्यान त्या अंतरी गोविंदाचें ॥ २४ ॥ गोविंदाचें ध्यान निजलीया जाग्या । आणिक वाउग्या न बोलती ॥ २५ ॥ न बोलती निजलिया हरिविण । जागृति स्वप्न एक जालें ॥ २६ ॥ एकविध सुख घेती त्या बाळा । भ्रमर परिमळा लागी जैसा ॥ २७॥ जैसा ज्याचा भाव घेतला त्यांपरी। तुका म्हणे हरि बाळलीला ॥ २८ ॥

२६. लीलाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥ १ ॥ मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनियां करी स्तनपान ।। २ ॥ नभाचाही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हातें त्यासी ॥ ३ ॥ हातें कुर्वाळूनी मुखीं घाली घास । पुरे म्हणे तीस पोट धालें ॥ ४ ॥ पोट धालें मग देतसे ढेंकर । भक्तीचें तें फार तुळसीदळ ॥ ५ ॥ तुळसीदळ भावें सहित देवा पाणी । फार तें त्याहुनी क्षीरसागर ॥ ६ ॥ क्षीराचा कांटाळा असे एक वेळ । भक्तीचें तें जळ गोड देवा ॥ ७ ॥ देवा भक्त जीवांहुनी आवडती । सकळही प्रीति त्यांच्याठायीं ॥ ८ ॥ त्यांचा हा अंकित सर्व भावें हरि । तुका म्हणे करी सर्व काज ॥ ९ ॥

२७. जियेवेळी चोरूनियां नेली वत्सें । तयालागीं तैसें होणे लागे ॥ १ ॥ लागे दोहों ठायीं करावें पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥ २ ॥ माय झाला हरी अवघ्या वत्सांची । घरी वत्सें जीचीं तैसा झाला ॥ ३ ॥ झाला तैसा जैसें घरींचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पांवे ॥ ४ ॥ मोहरी पांवे सिंगें वाहिल्या काहाळा । देखिला सोहळा ब्रह्मादिकीं ॥ ५ ॥ ब्रह्मादिकां सुख स्वप्नीं तेंहि नाहीं । तैसें दोही ठायीं वोसंडलें ॥ ६ ॥ वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी। जैसी ज्याची आई तैसा जाला ॥ ७ ॥ लाघव कळलें ब्रह्मयासी याचें । परब्रह्म साचें अवतरलें ॥ ८ ॥ तरले हे जन सकळही आतां । ऐसें तो विधाता बोलियेला ॥ ९ ॥ लागला हे स्तुति करूं अनंताची । चतुर्मुखें वाची भक्तिस्तोत्रं ॥ १० ॥ भक्तिकाजें देवें केला अवतार । पृथिवीचा भार फेडावया ॥ ११ ॥ पृथिवी दाटिली होती या असुरीं । न साहावे वरी भार तये ॥ १२ ॥ तया काकुळती आपल्या दासांची । तयांलागीं वेंची सर्वस्वही ॥ १३ ॥ स्वहित दासांचे करावया लागीं । अव्यक्त हे जगी व्यक्ती आलें ॥ १४ ॥ लेखा कोण करी त्यांचिया पुण्याचा । जयांसवें वाचा बोले हरी ॥ १५ ॥ हरी नाममात्रे पातकांच्या रासी । तो आला घरासी गौळियांच्या ॥ १६ ॥ गौळियें अवघीं झालीं कृष्णमय । नामें लोकत्रय तरतील ।। १७ ।। तरतील नामें कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यापाशी होईल पाप ॥ १८ ॥ पाप ऐसें नाहीं कृष्णनामें राहे । धन्य तोचि पाहे कृष्णमुख ॥ १९ ॥ मुख माझें काय जो मी वर्णूं पार । मग नमस्कार घाली ब्रह्मा ॥ २० ॥ ब्रह्मा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासी हाचि देव ॥ २१ ॥ देवचि अवघा जालासे सकळ । गाई हा गोपाळ वत्सें तेथें ॥ २२ ॥ तेथें जें पाहाणे आणिक दुसरें। मूर्ख त्या नंतरें दुजा नाहीं ॥ २३ ॥ दुजा भाव तुका म्हणे जया चित्तीं । रवरव भोगिती कुंभपाक ॥ २४ ॥

२८. कुंभपाक लागे तयासी भोगणें । अवघाचि नेणे देव ऐसा ॥ १ ॥ देव ऐसा ठावा नाहीं जया जना। तयासी यातना यम करी ॥ २ ॥ कळला हा देव तयासींच खरा । गाई वत्सें घरा धाडी ब्रह्मा ॥ ३ ॥ ब्रह्मांदिकां देव ऐसा अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥ ४ ॥ जाणवेल देव गौळियांच्या भावें । तुका म्हणे व्हावें संचित हें ॥ ५ ॥

२९. संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेदी वायां पेरिल्याचें ॥ १ ॥ त्याचिया पिकासी आलिया घुमरी । आल्या गाईवरी आणिक गाई ॥ २ ॥ गाई दवडूनि घालिती बाहेरी । तंव म्हणे हरी बांधा त्याही ॥ ३ ॥ त्याही तुम्ही बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाड्यांतूनि ॥ ४ ॥ पारिख्या न येति कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥ ५ ॥ नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥ ६ ॥ मेली ही शहाणीं करितां सायास । नाहीं सुखलेश तुका म्हणे ॥ ७ ॥

३०. तुका म्हणे सुख घेतले गोपाळीं । नाचती कांबळी करूनी ध्वजा ॥ १ ॥ करूनियां टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥ २ ॥ दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद । गीतीं गातां छंद ताल नाहीं ॥ ३ ॥ ताल नाहीं गातां नाचतां गोपाळां । घननीळ सांवळा तयांमध्ये ॥ ४ ॥ मध्ये जयां हरी तें सुख आगळें । देहभाव काळें नाहीं तयां ॥ ५ ॥ तयांसी आळंगी आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणी ॥ ६ ॥ निजभाव देखे जयांचिये अंगीं। तुका म्हणे संगी क्रीडे तया ॥ ७ ॥

३१. तयांसवें करी काला दहीभात । शिदोऱ्या अनंत मेळवूनी ॥ १॥ मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागे पुढे कांहीं उरों नेदी ॥ २ ॥ नेदी चोरी करूं जाणे अंतरींचें । आपलें ही साचे द्यावें तेथें ॥ ३ ॥ द्यावा दहीं भात आपला प्रकार । तयांचा व्यवहार सांडवावा ॥ ४ ॥ वांटी सकळांसी हातें आपुलिया। जैसे मागे तया तैसें द्यावें ॥ ५ ॥ द्यावें सांभाळूनी समतुक भावें । आपणहि खावें त्यांचे तुके ॥ ६॥ तुक सकळांचे गोविंदाचे हातीं। कोण कोणें गति भला बुरा ॥ ७ ॥ राखी त्यास तैसें आपुलाल्या भावें । विचारूनी द्यावें जैसे तैसें ॥ ८ ॥ तैसें सुख नाहीं वैकुंठींच्या लोकां । तें दिले भाविकां गोपाळांसी ॥ ९ ॥ गोपाळांचे मुखीं देउनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥ १० ॥ त्यांचिये मुखींचे हिरोनियां घांस । झोंबती हातांस खाय बळें ॥ ११ ॥ बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तयांतें गोपाळ पाडितील ॥ १२ ।। पाठी उचलूनी वाहातील खांदीं। नाचतील मांदी मेळवूनी ॥ १३ ॥ मांदी मेळवूनी धणी दिली आम्हां । तुका म्हणे जमा केल्या गाई ॥ १४ ॥

३२. केला पुढे हरि अस्तमाना दिसे । मागे त्यासरीसे थाट चाले ॥ १ ॥ थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥ २ ॥ सोयी लागलिया देवाची आवर्ती । न बोलवितां येती मागें तया ॥ ३ ॥ तयांचिये चित्तीं बैसला अनंत । घेती नित्यनित्य तेंचि सुख ॥ ४ ॥ सुख नाहीं कोणा हरीच्या वियोगें। तुका म्हणे जुगें घडी जाय ॥ ५ ॥

३३. जाय फांकोनियां निवडोनि गाई । आपलाले सोयी घराचिये ॥ १ ॥ घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचा जीव गोविंदापें ॥ २ ॥ गोविंदें वेधिले तुका म्हणे मन । वियोगें ही ध्यान संयोगाचें ॥ ३ ॥

३४. संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥ १ ॥ गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण मायें उतरिलें ॥ २ ॥ उतरूनी हातें धरी हनुवटी । ओंवाळुनी दिठी सांडियेली ॥ ३ ॥ दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तीचिया सुखा गोडावला ॥ ४ ॥ लहान हा थोर जीवजंतु भूतें । आपण दैवतें जाला देवी ॥ ५ ॥ देवी म्हैसासुर मुंजिया खेचर । लहान हा थोर देव हरि ॥ ६ ॥ हरि तुका म्हणे अवघा एकला । परि हा धाकुल भक्तीसाठीं ॥ ७ ॥

३५. भक्तीसाठीं करी यशोदेशी आळी । थिंकोनियां चोळी डोळे देव ॥ १ ॥ देव गिळूनियां धरियेले मौन । माय म्हणे कोण येथें दुजें ॥ २ ॥ दुजें येथे कोणी नाहीं कृष्णाविण । निरुतें जाणोन पुसे देवा ॥ ३ ॥ देवापाशी पुसे देव काय झाला । हांसें आलें बोला याचे हरि ॥ ४ ॥ यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिकें मानिती साच खरें ॥ ५ ॥ लटिकें तें साच साच तें लटिकें । नेणती लोभिकें आशाबद्ध ॥ ६ ॥सांग म्हणे माय येरू वासी तोंड । तंव तें ब्रह्मांड देखें माजी ॥ ७ ॥ माजी जया चंद्र सूर्य तारांगणे । तो भक्तांकारणे बाळलीळा ॥ ८ ॥ लीळा कोण जाणे याचें महिमान । जगाचे जीवन देवा देव ॥ ९ ॥ देवें कवतुक दाखविलें तयां । लागती ते पायां मायबाप ॥ १० ॥ मायबाप म्हणे हाचि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥ ११ ॥ तोहि त्यांचा देव दिला नारायणे । माझें हें करणें तोहि मीच ॥ १२ ॥ मीच म्हणउनी जें जें जेथें ध्याती। तेथें मी श्रीपति भोगिता तें ॥ १३ ॥ तें मज वेगळे मी तया निराळा । नाहीं या सकळा ब्रह्मांडांत ॥ १४ ॥ तद्भावना इच्छा भावितसे त्यांचें। फळ देता साचें मीच एक ॥ १५ ॥ मीच एक खरा बोले नारायण । दाविले निर्वाण निजदासां ॥ १६ ॥ निजदासां खूण दाविली निरूती । तुका म्हणे भूती नारायण ॥ १७ ॥

३६. नारायण भूतीं न कळे जयासी । तया गर्भवासी येणे जाणे ॥ १ ॥ येणे जाणे होय भूतांच्या मत्सरें। न कळतां खरें देव ऐसा ॥ २ ॥ देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुद्धी ॥ ३ ॥ बुद्धीचा पालट नव्हे कदा काळीं । हरि जळी स्थळी तयां चित्तीं ॥ ४ ॥ चित्त तें निर्मळ जैसें नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥ ५ ॥ तयामाजी हरि जाणिजे त्या भावें । आपुलें परावें सारिखेचि ॥ ६ ॥ चिंतने जयाच्या तरती अनेक । जो हे सकळीक देव देखे ॥ ७ ॥ देव देखे तोही देव कैसा नव्हे । उरला संदेह काय त्यासी ॥ ८ ॥ काया वाचा मनें पूजावे वैष्णव । म्हणऊनी भाव धरूनियां ॥ ९ ॥ यांसी कवतुक दाखविलें रानीं । वोणवा गिळुनी गोपाळांसी ॥ १० ॥ गोपाळांचे डोळे झांकविले हातें । धरिलें अनंते विश्वरूप ॥ ११ ॥ पसरूनी मुख गिळियेले ज्वाळ । पाहाती गोपाळ बोटां सांदी ॥ १२ ॥ संधि सारूनियां पाहिले अनंता । म्हणती ते आतां कळलासी ॥ १३ ॥ कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥ १४ ॥ तो तयां कळला आरुष गोपाळां । दुर्गम सकळां साधनांसी ॥ १५ ॥ सीण उरे तुका म्हणे साधनाचा । भाविकांसी साचा भाव दावी ॥ १६ ॥

३७. भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥ १ ॥ सांगे गोपाळांसी काय पुण्य होतें । वांचलों जळते आगीहातीं ॥ २ ॥ आजी आम्हां येथें वांचविलें देवें । नाहीं तरी जीवें न वांचतों ॥ ३ ॥ न वांचत्या गाई जळतों सकळें । पूर्वपुण्यबळें वांचविलें ॥ ४ ॥ पूर्वपुण्य होतें तुमचिया गांठीं। बोले जगजेठी गोपाळांसी ॥ ५ ॥ गोपाळांसी म्हणे वैकुंठनायक । भले तुम्ही एक पुण्यवंत ॥ ६ ॥ करी तुका म्हणे करवी आपण । द्यावें थोरपण सेवकांसी ॥ ७ ॥

३८. काय आम्हां चाळविसी वायांविण । म्हणती दुरून देखिलासी ।। १ ।। लावूनियां डोळें नव्हतो दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥ २ ॥ होती दृष्टी आंत उघडी आमची । बाहेरी ते वायांचि कुची झांकू ॥ ३ ॥ जालासी थोरला थोरल्या तोंडाचा । गिळियेला वाचा धूर आगी ॥ ४॥ आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदें नाचती भोंवतालीं ॥ ५ ॥ भोंवती आपणा मिळविली देवें । तुका म्हणे ठावें नाहीं ज्ञान ॥ ६ ॥

३९. नाही त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥ १ ॥ जाणतियां सवें येऊं नेदी हरि । तर्कवादी दुरी दुरावले ॥ २ ॥ वादियांसी भेद निंदा अहंकार । देऊनियां दूर दुराविले ॥ ३ ॥ दुराविले दूर आशाबद्ध देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥ ४ ॥ चित्तीं द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ति । समान ते होती पशु नर ॥ ५ ॥ नरक साधिला विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥ ६ ॥ जिहीं हरिसंग केला संवसारीं । तुका म्हणे खरी खेप त्यांची ॥७ ॥

४०. खेळीमेळी आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥ १ ॥ मातेपाशी एक नवल सांगती। जाली तैसी ख्याति वोणव्याची ॥ २ ॥ ओवाळिलें तिने करूनी आरती । पुसे दसवंती गोपाळासी ॥ ३ ॥ पुसे पडताळूनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतूक ॥ ४ ॥ कवतूक कानी आइकतां त्यांचें । बोलतां ये वाचे वीट नये ॥ ५ ॥ नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥ ६ ॥ तेव्हां कवतूक कळों आलें कांहीं । हळूहळू दोहीं मायबापां ॥ ७ ॥ हळूहळू त्यांचे पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें ॥ ८ ॥ तिमिर हे येथें राहों शके कैसें । जालिया प्रकाशें गोविंदाच्या ॥ ९ ॥ दावी तुका म्हणे देव ज्या आपणा । पालटे तो क्षणामाजी एका ॥ १० ॥

४१. काय आतां यासी म्हणावें लेकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥ १ ॥ माय याची यासी राहिली लपून । कळों नये क्षण एक होतां ॥ २ ॥ क्षण एक होतां विसरली त्यासी । माझें माझें ऐसे करी बाळा ॥ ३ ॥ करूनि कवतुक कळों नेदी कोणा । योजूनी कारणा तेंचि खेळे ॥ ४ ॥ तें सुख लुटिलें घरींचिया घरीं । तुका म्हणे परी आपुलाल्या ॥ ५ ॥

४२. आपलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनी ॥ १ ॥ खेळ मांडियेला यमुने पाबळीं । यारे चेंडूफळी खेळूं आतां ॥ २ ॥ आणविल्या डांगा चवगुणांतु काठी । बैसोनियां वांटी गडिया गडी ॥ ३ ॥ गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण म्हणे दुजा ॥ ४ ॥ जाणोनी गोविंदें सकळांचा भाव । तयांसी उपाय तोचि सांगे ॥ ५ ॥ सांगे सकळांसी व्हारे एके ठाई। चेंडू राखा भाई तुम्ही माझा ॥ ६ ॥ मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुती हाल माझी ॥ ७ ॥ माझे हाके हाक मेळवा सकळ । नवजा बरळ एकमेकां ॥ ८ ॥ एका समतुकें अवघेचि रहा । जाईल तो पहा धरा चेंडू ॥ ९ ॥ चेंडू धरा ऐसें सांगतो सकळां । आपण निराळा एकलाची ॥ १० ॥ चिंतूनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकळीक पाहतचि ॥ ११ ॥ पाहतचि ठेलीं न चलतां कांहीं । यारे लवलाही म्हणे धरा ॥ १२ ॥ धरावा तयाने त्याचें बळ ज्यासी । येरां आणकासी लाग नव्हे ॥ १३॥ नव्हे काम बळ बद्धि नाहीं त्याचे । न धरावे निचे उंचाविण ॥ १४ ॥ विचारी पडले देखोनी गोपाळ । या म्हणे सकळ माझ्यामागें ॥ १५ ॥ मार्ग देवावीण न दिसे आणिकां । चतूर होत कां बहुत जन ॥ १६ ॥ चतूर चिंतिती बहुत मारग । हरि जाय माग पाहोनियां ॥ १७ ॥ यामागे जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथें ठाया ॥ १८ ॥ पंथ जे चुकले आपले मतीचे । तयामागे त्यांचे तेचि हाल ॥ १९ ॥ हाल दोघां एका मोहरे मागिलां । चालतां चुकला वाट पंथ ॥ २० ॥ पंथ पुढिलासी चालतां न कळे । मागिलांनी डोळे उघडावे ॥ २१ ॥ वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाहीं। समान तो देहीं बाळकांसी ॥ २२ ॥ शिकविले हित नाइके जो कानीं । त्यामागे भल्यांनी जाऊं नये ॥ २३ ॥ नये तेंचि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तोचि खरा ॥ २४ ॥ रानभरी झाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ।। २५ ।। लाज सांडूनियां मारितील हाका । कळले नायका वैकुंठींच्या ॥ २६ ।। चारी वेद ज्याची कीर्ति वाखाणिती । तया अति प्रीती गोपाळांची ॥ २७ ॥ गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पावविलें ॥ २८ ॥ सोयी धरूनियां आले हरिपाशीं । लहान थोरांशी सांभाळिलें ॥ २९ ॥ सांभाळिलें तुका म्हणे सकळांही । सुखी जाले तेही हरिमुखें ॥ ३०॥

४३. मुखें सांगे त्यांसी पैल चेंडू पहा । उदकांत डोहाचिये माथां ॥ १ ॥ माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥ २ ॥ जळांत पाहतां आडतीया दृष्टि । म्हणे जगजेठी ऐसें नव्हे ॥ ३ ॥ नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चित्त लावा वरी ॥ ४ ॥ वरी देखियेला अवघ्यांनी डोळां । म्हणती गोपाळा आतां कैसें ॥ ५ ॥ कैसें करूनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्याली अवघीं डोहो ॥ ६ ॥ डोहो बहु खोल काळ्या भीतरीं । सरलीं माघारी अवघी जणें ॥ ७ ॥ जयाचे कारण तयासीच ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरि ॥ ८ ॥ त्यासी नारायण म्हणे राहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥ ९ ॥ वरी जातां हरि पाहाती सकळ । म्हणती गोपाळ आम्ही नेणों ॥ १० ॥ नेणों म्हणती हे करितोसी काई । आम्हां तुझी आई देईल शिव्या ॥ ११ ॥ आपुलिया कानां ठेवूनियां हात । सकळी निमित्त टाळियेलें ॥ १२ ॥ निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥ १३ ॥ खांदिवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडू तळीं ॥ १४ ॥ तळील नेणती तुका म्हणे भाव । अंतरींचें देव कळों नेदी ॥ १५॥


४४. नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥ १ ॥ न पुरेसा हात घाली चेंडूकडे । म्हणितलें गडें सांभाळावें ॥ २ ॥ सांभाळ करिता सकळां जीवांचा । गोपाळांसी वाचा म्हणे बरें ॥ ३ ॥ बरें विचारूनी करावें कारण । म्हणे नारायण बऱ्या बरें ॥ ४ ॥ बरें म्हणऊनी तयांकडे पाहे । सांडविला जाय चेंडू तळा ॥ ५॥ तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडत येती घरा ॥ ६ ॥ येतां त्यांचा लोकी देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥ ७ ॥ पुसती ते मात तया गोपाळांसी । हरि दुःखें त्यांसी न बोलवे ॥ ८ ॥ न बोलवे हरि बुडालासें मुखें । कुटितील दुःखें ऊर माथे ॥ ९ ॥ मायबापे तुका म्हणे न देखती । तैसें दुःख चित्तीं गोपाळांच्या ॥ १० ॥

४५. गोपाळा उभडु नावरे दु:खाचा । कुंठित हे वाचा जाली त्यांची ॥ १ ॥ जालें काय ऐसे न कळे कोणासी । म्हणती तुम्हांपाशी देव होता ॥ २ ॥ देवासवें दु:ख न पवतें ऐसें । कांहीं अनारिसें दिसे आजी ।। ३ ।। आजी दिसे हरि फांकला यांपाशीं । म्हणऊनी ऐशी परी जाली ॥ ४ ॥ जाणविल्याविण कैसें कळे त्यांसी । शाहाणे तयासी कळों आलें ॥ ५ ॥ कळों आलें तिहीं स्फुंद शांत केला । ठायींचाच त्याला थोडा होता ॥ ६ ॥ होता तो विचार सांगितला जनां । गोपाळ शहाणा होता त्याने ॥ ७॥ सांगे आतां हरि तुम्हां आम्हां नाहीं । बुडालासे डोहीं यमुनेच्या ॥ ८॥ यासी अवकाश नव्हेचि पुसतां । जालिया अनंता कोण परी ॥ ९ ॥ परी त्या दुःखाची काय सांगों आतां । तुका म्हणे माता लोकपाळा ।। १० ।।

४६. पाषाण फुटती तें दुःख देखोनी । करितां गौळणी शोक लोकां ॥ १ ॥ काय ऐसें पाप होतें आम्हांपाशीं । बोलती एकाशी एक एकां ॥ २ ॥ एकाचिये डोळां आसूं बाह्यात्कारी । नाही तीं अंतरी जळतील ॥ ३ ॥ जळतील एकें अंतर्बाह्यात्कारें । टाकिली लेकुरें कडियेहूनी ॥ ४ ॥ निवांतचि एकें राहिलीं निश्चिंत । बाहेरी ना आंत जीव त्याचे ॥ ५ ॥ त्याचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळावांचूनियां ॥ ६ ॥ वांचणें तें आतां खोटें संवसारी । नव्हे भेटी जरी हरीसवें ॥ ७ ॥ सवें घेऊनियां चाललीं गोपाळां । अवघींच बाळा नर नारी ॥ ८ ॥ नर नारी नाहीं मनुष्याचें नांव । गोकुळ हे गांव सांडियेलें ॥ ९ ॥ सांडियेलीं अन्नें संपदा सकळ । चित्तीं तो गोपाळ धरूनी जाती ॥ १० ॥ तिरी माना घालूनियां उभ्या गाई । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥ ११ ॥ यमुनेच्या तिरी झाडें वृक्ष वल्ली । दुःखें कोमाइली कृष्णाचिया ॥ १२ ॥ यांचे त्यांचे दुःख एक जालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥ १३ ॥ मायबाप तुका म्हणे सहोदर । तोवरीच तीर न पवतां ।। १४ ॥

४७. तीर देखोनियां यमुनेचे जळ । कांठींच कोल्हाळ करिताती ॥ १ ॥ कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासी ओढी भय मागें ।। २ ॥ मागें सरे माय पाऊलापाऊलीं । आपलेंच घाली धाकें अंग ॥ ३ ॥ अंग राखोनियां माय खेद करी । अंतरी हे हरि जाणवलें ॥ ४ ॥ जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ॥ ५ ॥

४८. भावनेच्या मुळे अंतरला देव । शिरला संदेह भय पोटीं ॥ १ ॥ पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥ २ ॥ न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥ ३ ॥ अंतरला बहु बोलतां वाउगें। अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥ ४ ॥ गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोण्याभावें रडतीं तीं ॥ ५ ॥ ती गेली घरासी आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥ ६॥ मायाबापांची तो ऐसी जाली गति । तुका म्हणे अंती कळों आलें ॥ ७ ॥

४९. आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरी कारणासाठी होता ॥ १ ॥ होता भाव त्यांचा पाहोनी निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥ २ ॥ आधी पाठीमोरी झाली ती सकळें । मग या गोपाळे बुडी दिली ॥ ३ ॥ दिली हाक त्याने जाऊनी पाताळा । जागविले काळा भुजंगासी ॥ ४ ॥ भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥ ५ ॥ गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचें ॥ ६ ॥ चेंडुवाचे मिसें काळया नाथावा । तुका म्हणे देवा कारण हे ।। ७ ।।

५०. काळयाचे मागे चेंडू पत्नीपाशीं । तेज:पुंजराशी देखियेला ॥ १ ॥ लावण्यपुतळा मुखप्रभाराशी । कोटी रवि शशी उगवले ॥ २ ॥ उगवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदें वांकी नभा देखे पायीं ॥ ३ ॥ पाहिला सकळ तिने न्याहाळूनी । कोण या जननी विसरली ॥ ४ ॥ विसरु हा तीस कैसा याचा जाला । जीवाहूनी वाल्हा दिसतसे ॥ ५ ॥ दिसतसे रूप गोजिरें लहान । पाहतां लोचन सुखावले ।। ६ ।। पाहिलें परतोनी काळा दुष्टाकडे । मग म्हणे कुडें जालें आतां ॥ ७ ॥ आतां उठोनियां खाईल या बाळा । देईल वेल्हाळा माय जीव ॥ ८ ॥ जीव याचा कैसा वांचे म्हणे नारी । मोहिली अंतरी हरिरूपें ।। ९ ।। रूपें अनंताची अनंत अपार । नकळे साचार तुका म्हणे ॥ १० ॥

५१. म्हणे चेंडू कोणे आणिला या ठाया । आलों पुरवाया कोड त्याचें ॥ १ ॥ त्याचें आइकोन निष्ठुर वचन । भयभीत मन झाले तिचें ॥ २ ॥ तिची चित्तवृत्ति होती देवावरी । आधीं तें माघारी फिरली वेगीं ॥ ३ ॥ वेगीं मन गेलें भ्रताराचे सोयी । विघ्न आले कांहीं आम्हांवरी ॥ ४ ॥ वरी उदकासी नाहीं अंत पार । अक्षोभ सागर भरलासे ॥ ५ ॥ संचार करूनी कोण्या वाटें आला । ठायींच देखिला अवचितां ॥ ६ ॥ अवचितां नेणो येथे उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥ ७ ॥ मोठ्याने बोलतो भय नाहीं मनीं । केला उठवूनी काळ जागा ॥ ८ ॥ जागविलें काळसर्पा तये वेळीं। उठिला कल्लोळी विषाचिये ॥ ९ ॥ यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काळया कृतांत धुधुकारें ॥ १० ॥ कारणे ज्या येथें आला नारायण । जालें दरुषण दोघांमध्ये ॥ ११ ॥ दोघांमध्ये झाले बोल परस्परें । प्रसंग उत्तरें युद्धाचिया ॥ १२ ॥ चिंतावला चित्तीं तोंडे बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥ १३ ॥ झाला सावकाश झेंप घाली वरी । तंव हाणे हरि मुष्टिघातें ॥ १४ ॥ तेणें काळें त्यासी दिसे काळ तैसा । हरावया जैसा जीव आला ॥ १५ ॥ आठवले काळा हाकारिलें गोत । मिळालीं बहुत नागकुळें ॥ १६ ॥ कल्हारी संघांनी वेष्टियेला हरी । अवघा विखारी व्यापियेला ॥ १७ ॥ यास तुका म्हणे नाहीं भक्ताविण । गरुडाचे चिंतन केलें मनीं ॥ १८ ॥

५२. निजदास उभा तात्काळ पायापें । स्वामी देखे सर्पें वेष्टियेला ॥ १ ॥ लहानथोरें होती मिळाली अपारें । त्याच्या धुधुकारें निवारलीं ॥ २ ॥ निघातें आपटी धरूनी घांवांमधीं । एकाचेंचि वधी माथां पाय ॥ ३ ॥ एकीं जीव दिले येतांच त्या धाकें । येतील ती एकें काकूलती ॥ ४ ॥ यथेष्ट भक्षिलें पोट धायेवरी । तंव म्हणे हरि पुरे आतां ॥५॥ आतां करूं काम आलों जयासाठीं । हरि घाली मिठी काळयासी ॥ ६ ॥ यासी नाथूनियां नाकी दिली दोरी । चेंडू भार शिरी कमळांचा ॥ ७ ॥ चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगूनी बहुडविलें ॥ ८ ॥ विसरू न पडे संवगड्या गाई । यमुनेच्या डोहीं लक्ष त्यांचे ॥ ९ ॥ त्यांच्या गोष्टी कांठीं बैसोनी सांगती । बडाला दाविती येथे हरि ॥ १० ॥ हरीचें चिंतन करितां आठव । तुका म्हणे देव आला वरी ॥ ११ ॥

५३. अवचिता त्यांनी देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥ १ ॥ आला घेऊनियां यमुने बाहेरी । पालवितो हरि गडियांसी ॥ २ ॥ गडियांसी म्हणे वैकुंठनायक । या रे सकळीक मजपाशीं ॥ ३ ॥ मजपाशीं तुम्हां भय काय करी । जवळी या दुरी जाऊ नका ॥ ४ ॥ कानी आइकिले गोविंदाचे बोल । म्हणती नवल चला पाहों ॥ ५ ॥ पाहों आले हरी जवळ सकळ । गोधने गोपाळ आलिंगिले ॥ ६ ॥ आल्या गाई वरी घालितील माना । वोरसलें स्तना क्षीर लोटें ॥ ७ ।। लोटती सकळें एकावरी एक । होऊनी पृथक कुर्वाळली ॥ ८ ॥ कुर्वाळली आनंदें घेती चारापाणी । तिहीं चक्रपाणि देखियेला ॥ ९ ॥ त्यांचपाशी होता परी केली माव । न कळे संदेह पडलिया ॥ १० ॥ याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया। त्यांसी कृष्णें काया दिव्य दिली ॥ ११ ॥ दिले गोविंदें त्या पदा नाहीं नाश । तुका म्हणे आस निरसली ॥ १२ ॥

५४. आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलीया ॥ १ ॥ पुढे पाठविलें गोविंदें गोपाळ । देऊनी चपळ हाती गुढी ॥ २ ॥ हाका आरोळिया देऊनी नाचती। एक सादाविती हरि आला ॥ ३ ॥ आरंभी पडिली होती तया घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥ ४ ॥ लोकां भूक तान नाहीं निद्रा डोळां । रूप वेळोवेळा आठविती ॥ ५ ॥ आहाकटा मग करिती गेलिया । आधी ठावा तयां नाहीं कोणा ॥ ६ ॥ आधीं चुकी मग घडे आठवण । तुका म्हणे जन परिचयें ॥ ७ ॥

५५. जननी हे म्हणे आहा काय जालें । शरीर रक्षिलें काय काजें ॥ १ ॥ काय काज आतां हरिविण जिणें । नित्य दु:ख कोणे सोसावें हें ॥ २ ॥ हें दु:ख न सरे हरि न भेंटे तों । त्यामागेंचि जाताें एका वेळे ॥ ३ ॥ एक वेळ जरी देखतें मी आतां । तरी जीवापरता न करितें ॥ ४ ॥ करितां हे मात हरीचें चिंतन । शुभ तो शकून तुका म्हणे ॥ ५ ॥



५६. शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनी आले ॥ १ ॥ आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढे हरुषे मात ॥ २ ॥ हरुषली माता केलें निंबलोण । गोपाळांवरून कुरवंडी ॥ ३ ॥ गोपाळां भोंवतें मिळलें गोकूळ । अवघीं सकळ लहान थोर ॥ ४ ॥ थोर सुख झाले ते काळी आनंद । सांगती गोविंद वरी आला ॥५॥ आले वरी बैसोनियां नारायण । काळया नाथून वहन केलें ॥ ६ ॥ नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥ ७ ॥ नारायणापुढे गोपाळ चालती । आनंदें नाचती गाती गीत ॥ ८ ॥ तंव तो देखिला वैकुंठींचा पति । लोटांगणी येती सकळही ॥ ९ ॥ सकळही एका भावें आलिंगिले । अवधियां झाले अवघे हरि ॥ १० ॥ हरि आळिंगुनी हरिरूप झालीं । आप विसरली आपणास ॥ ११ ॥ सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबाप भावें लोकपाळा ॥ १२ ॥ मायबापा देवा नाहीं लोकपाळ । सारिखीं सकळ तुका म्हणे ॥ १३ ॥

५७. नेणें वर्ण धर्म जी आली सामोरी । अवघींच हरि आलिंगिली ॥ १ ॥ हरि लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥ २ ॥ पारणे तयांचें जालें एक वेळे । देखिलें सांवळे परब्रह्म ॥ ३ ॥ ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरीं ॥ ४ ॥ घरोघरीं सुख आनंद सोहळा । सडे रंगमाळा चौक दारी ॥ ५ ॥ दारी वृंदावनें तुळसीची बनें । रामकृष्ण गाणे नारायण ॥ ६ ॥ नारायण तिहीं पूजिला बहुती । नाना पुष्पयाती करूनियां ॥ ७॥ यांचे ऋण नाहीं फिटले मागील । पुढे भांडवल जोडिती हीं ॥ ८ ॥ ही नव्हतीं कधीं या देवावेगळीं । केला वनमाळी सेवाऋणी ॥ ९ ॥ सेवाऋणें तुका म्हणे रूपधरी । भक्तांचा कैवारी नारायण ॥ १० ॥

५८. नारायण आले निजमंदिरांसी । जावया लोकासी बहुडविले ॥ १ ॥ बहुडविले बहु केलें समाधान । विसरूं हा क्षण नका माझा ॥ २ ॥ मात सांगितली सकळ वृत्तांत । केलें दंडवत सकळांनीं ॥ ३ ॥ सकळां भातुकें वांटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥ ४ ॥ लोक गेले कामा गाईपें गोपाळ । वारली सकळ लोभासाठीं ॥ ५ ॥ लोभ दावूनियां आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥ ६ ॥ आशेचे बांधले तुका म्हणे जन । काय नारायण ऐसा जाणे ॥ ७ ॥

५९. झाला कवतुक करितां रोकडें । आणीकही पुढें नारायण ॥ १ ॥ येऊनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रयाजीं ॥ २ ॥ इंद्रा दहीं दूध तूप नेतां लोणी । घेतले हिरोनी वाटे त्यांचें ॥ ३ ॥ हिरोनी घेतल्या कावडी सकळा । म्हणती गोपाळा बरें नव्हे ॥ ४ ॥ नव्हे तेचि करी न भे कळिकाळा । तुका म्हणे लीळा खेळे देव ॥ ५ ॥

६०. खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तया भीऊं नका ॥ १ ॥ नका धरूं भय धाक कांहीं मनी । बोले चक्रपाणि गौळियांसी ॥ २ ॥ गौळियांसी धीर नाही या वचनें । आशंकित मनें वेडावलीं ॥ ३ ॥ वेडावली त्यांस न कळतां माव । देवाआदिदेव नोळखतां ॥ ४ ॥ नोळखतां दुःखें वाहतील शिरीं । तुका म्हणे वरी भारवाही ॥ ५ ॥



६१. भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥ १ ॥ अंगसंगें तयां न कळे हा देव । कळोनी संदेह मागुताला ॥ २ ॥ मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुद्धि स्थिर ॥ ३ ॥ बुद्धि स्थिर राहों नेदी नारायण । आशाबद्ध जन लोभिकांची ॥ ४ ॥ लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका म्हणे तेणें दुःखी होती ॥ ५ ॥

६२. दुःखी होती लोभी करावें तें काई । बुडतील गाई म्हैसी आतां ॥ १ ॥ आणिकही कांहीं होईल अरिष्ट । नाइके हा धीट सांगितलें ॥ २ ॥ सांगो चला याच्या मायबापांपाशीं । निघाली घरासी देवा रागें ॥ ३ ॥ रागें काला देतां न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियांसी ॥ ४ ॥ क्रोध देवावरी धरियेला राग । तुका म्हणे भाग न लाभती ॥ ५ ॥

६३. भाग त्या सुखाचे वांकड्या बोबड्या । आपुलिया गड्यां भाविकांसी ॥ १ ॥ भारवाही गेले टाकूनी कावडी । नवनीत गोडी भाविकांसी ॥ २ ॥ काला करूनियां वांटिती सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥ ३ ॥ खेळी मेळी दहीं दूध लोणी खाती । भय नाहीं चित्तीं कवणाचें ॥ ४ ॥ कवणाचे चाले तुका म्हणे बळ । जयासी गोपाळ साह्य झाले ॥ ५ ॥

६४. जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥ १ ॥ तातडीने मेघां आज्ञा करी राव । गोकुळींचा ठाव उरों नेदा ॥ २ ॥ नेदाविया गाई म्हैसी वांचों लोक । पुरावे सकळीक सिळाधारीं ॥ ३ ॥ धाक नाही माझा गौळियांच्या पोरां । सकळीक मारा म्हणे मेघां ॥ ४ ॥ म्हणविती देव आपणां तोंवरी । नाहीं जंववरी कोपलों मी ॥५ ॥ मीपणे हा देव न कळेचि त्यांसी । अभिमान रासी गर्वाचिया ॥ ६ ॥ अभिमानराशि जयाचिये ठायीं। तुका म्हणे तईं देव दुरी ॥ ७ ॥

६५. देव त्यां फावला भाविकां गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान ॥ १ ॥ नाडली आपल्या आपणचि एकें । संदेहदायकें बहु फार ॥ २ ॥ फार चाळविली कळों नेदी माव । देवाआदिदेव विश्वंभर ॥ ३ ॥ विश्वासावांचूनी कळों नये खरा । अभक्तां अधिरां जैसा तैसा ॥ ४ ॥ जैसा भाव तैसा जवळी त्या दुरी । तुका म्हणे हरि देतो घेतो ॥ ५ ॥


६६. तो या साच भाव न कळेचि इंद्रा । म्हणउनी धारा घाली मेघा ॥ १ ॥ घाली मेघ धारी कडाडिल्या माथा । वरी अवचिता देखियेला ॥ २ ॥ देखिती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥ ३ ॥ विचारी पडली विसरली खेळ । अन्याय गोपाळ म्हणती केला ॥ ४ ॥ लागलेंसे गोड न कळे त्या काळी । भेणें वनमाळी आठविती ॥ ५ ॥ आतां काय कैसा करावा विचार । गोधनासी थार आपणिया ॥ ६ ॥ यांचिया विचारें होणार तें काईं । तुका म्हणे ठायीं वेडावलीं ॥ ७ ॥

६७. वेडावली काय करावें या काळीं । म्हणे बनमाळी गोपाळांसी ॥ १ ॥ गोवर्धन धरूं शिरीं उचलूनी । म्हणे तुम्ही कोणी भिऊ नका ॥ २॥ नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाका आरोळीया ॥ ३ ॥ आशंकित चित्तें न वाटे त्यां खरें । धाकेंच ते बरें म्हणती चला ॥ ४ ॥ चित्तीं धाक परि जवळी अनंत । तुका म्हणे घात होऊं नेदी ॥ ५ ॥

६८. नेदी दुःख देखों दासां नारायण । ठेवी निवारून आल्या आधीं ॥ १ ॥ आधी पुढें शुद्ध करावा मारग । दासांमागे मागे सुखरूप ॥ २ ॥ पर्वतासी हात लाविला अनंतें । तो जाय वरतें आपआप ॥ ३ ॥ आपल्याआपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासी ॥ ४ ॥ निमित्य करूनी करावें कारण । करितां आपण कळों नेदी ॥ ५ ॥ दीनाचा कृपाळू पतितपावन । हे करी वचन साच खरें ॥ ६ ॥ सांगणे नलगे सुखदुःख दासा । तुका म्हणे ऐसा कृपावंत ॥ ७ ॥

६९. कृपावंतें हाक दिली सकळिकां । माजि या रे नका राहों कोणी ॥ १ ॥ निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवर्धन उचलिला ॥ २ ॥ लाविले गोपाळ फेरी चहूंकडे । हांसे फुंदे रडे कोणी धाकें ॥ ३ ॥ धाकें हीं सकळ निघालीं भीतरीं । उचलिला गिरी तयाखालीं ॥ ४ ॥ तयाखाली गाई वत्सें आली लोक । पक्षी सकळीक जीवजाति ॥ ५ ॥ जिहीं म्हणविलें हरीचे अंकित । जातीचे ते होत कोणी तरी ॥ ६ ॥ जाति कुळ नाहीं तयासी प्रमाण । अनन्या अनन्य तुका म्हणे ॥ ७ ॥

७०. म्हणविती भक्त हरीचे अंकित । करितो अनंत हित त्यांचें ॥ १ ॥ त्यांसी राखे बळें आपुले जे दास । कळिकाळासी वास पाहों नेदी ॥ २ ॥ पाऊस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग ॥ ३ ॥ येऊनी दगड बैसतील गिरी। वरुषला धारी शिळांचिये ॥ ४ ॥ शिळांचिया धारी वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥ ५ ॥ एकसरें गिरी धरिला गोपाळीं । होता भाव बळी आम्हीं ऐसा ॥ ६ ॥ ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । म्हणे तुम्हीं आतां हात सोडा ॥ ७ ॥ हांसती गोपाळ करूनी नवल । ऐकोनीयां बोल गोविंदाचे ॥ ८ ॥ दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥ ९ ॥ भार आम्हांवरी घालूनी निराळा । राहिलासी डोळा चुकवूनी ॥ १० ॥ निमित्य अंगुळी लावियेली वरी । पाहों कैसा गिरी धरितोसी ॥ ११ ॥ सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकेंचि खरें मानूनियां ॥ १२ ॥ यांनी अंत पाहों आदरिला याचा । तुका म्हणे वाचा वाचाळ ते ॥ १३ ॥

७१. वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखाणावें ॥ १ ॥ बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥ २ ॥ आसुडिल्या माना हात पाय नेटें । तंव भार बोटें उचलिला ॥ ३ ॥ लटिकाचि आम्हीं सीण केला देवा । कळों आलें तेव्हां सकळांसी ॥ ४ ॥ आलें कळों तुका म्हणे अनुभवें । मग अहंभावें सांडवले ॥ ५ ॥

७२. सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं ॥ १ ॥ लोटांगणी आले होऊनियां दीन । मग नारायण म्हणे भलें ॥ २ ॥ भला आजी तुम्हीं केला साच पण । गिरी गोवर्धन उचलिला ॥ ३ ॥ लागती चरणा सकळ ते काळीं । आम्हांमध्ये बळी तूचि एक ॥ ४ ॥ एका तुजविण न यों आम्ही कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥ ५ ॥ आजिवरी आम्हां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥ ६ ॥ तुझा पार आम्हीं नेणों नारायणा । नखीं गोवर्धना राखियेलें ॥ ७ ॥ राखियेलें गोकुळ आम्हां सकळांसी । दगडांच्या रासी वरुषतां ॥ ८ ॥ वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकळही ॥ ९ ॥ सकळही तहान विसरली भूक । सकळही सुख दिले त्यांसी ॥ १० ॥ त्यांसी कळों आला वैकुंठनायक। तुका म्हणे लोक निर्भर ते ॥ ११ ॥

७३. लोकां कळों आला देव आम्हांमधीं। टाकिली उपाधि तिहीं शंका ॥ १ ॥ शंका नाहीं थोरां लहानां जीवांसी । कळला हृषीकेशी तेव्हां मग ॥ २ ॥ मग मनी झाले निर्भर सकळ । संगें लोकपाळ कृष्णाचिया ॥ ३ ॥ कृष्णाचिया ओंव्या गाणे गाती गीत । कृष्णमय चित्त झाले त्यांचें ॥ ४ ॥ त्यांसी ठावा नाहीं बाहेरील भाव । अंतरींच वाव सुख झालें ॥ ५ ॥ सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योति गोविंदाची ॥ ६ ॥ चिंतनेंचि धालीं नलगे अन्नपाणी । तुका म्हणे मनीं समाधान ॥ ७ ॥

७४. समाधान त्यांची इंद्रियें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥ १ ॥ गोविंदाचा जाला प्रकाश भीतरी । मग त्या बाहेरी काय काम ॥ २ ॥ काज काम त्यांचे सरले व्यापार । नाहीं आपपर माझें तुझें ॥ ३ ॥ माया सकळांची सकळांही वरी । विषम तें हरि दिसों नेदी ॥ ४ ॥ दिसे तया आपपरावें सारिखें । तुका म्हणे सुखें कृष्णाचिया ॥ ५ ॥

७५. कृष्णाचिया सुखें भूक नाहीं तान । सदा समाधान सकळांचें ॥ १ ॥ कळलेंचि नाही झाले किती दीस । बाहेरील वास विसरलीं ॥ २ ॥ विसरु कामाचा तुका म्हणे झाला । उद्वेग राहिला जावें यावें ॥ ३ ॥

७६. जावें बाहेरी हा नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥ १ ॥ कांहीं न कळे ते कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥ २ ॥ कवतुकासाठी भक्त देहावरी । आणिताहे हरि बोलावया ॥ ३ ॥ यासी नांव रूप नाहीं हा आकार । कळला साचार भक्तांमखें ॥ ४ ॥ मखे भक्ताचिया बोलतो आपण । अंगसंगें भिन्न नाहीं दोघा ॥ ५ ॥ दोघे वेगळाले लेखील जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥ ६ ॥ तयासी घडलीं सहळही पापें । भक्तांचिया कोपें निंदा द्वेषें ॥ ७ ॥ द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेंवीं प्राणा नाश करी ॥ ८ ॥ करितां जो आइके निंदा या संतांची । तया होती तेचि अधःपात ॥ ९ ॥ पतन उद्धार संगाचा महिमा । त्यजावें अधमा संत सेवीं ॥ १० ॥ सेवीं संत जोडे महालाभरासी । तुका म्हणे यासी नाश नाहीं ॥ ११ ॥

७७. नाहीं नाश हरि आठवितां मुखें । जोडतील सुखें सकळही ॥ १ ॥ सकळही सुखें वोळलीं अंतरीं । मग त्या बाहेरी काय काज ॥ २ ॥ येऊं विसरलीं बाहेरी गोपाळें । तल्लीन सकळ कृष्णसुखें ॥ ३ ॥ सुख तें योगियां नाहीं समाधीस । दिले गाई वत्स पशू जीवां ॥ ४ ॥ वारला पाऊस कोणा नाहीं ठावा । तुका म्हणे देवावांचूनीयां ॥ ५ ॥

७८. यांसी समाचार सांगतों सकळां । चलावें गोपाळा म्हणे देव ॥ १ ॥ देव राखे तयां आडलिया काळे । देव सुखफळे देतो दासां ॥२ ॥ दासां दुःख देखों नेदी आपुलिया। निवारी आलिया न कळतां ॥ ३ ॥ नाहीं मेघ येतां जातां देखियला । धारी वरुषला शिळांचिये ॥ ४ ॥ एवढे भक्तांचें सांकडे अनंता । होय निवारिता तुका म्हणे ॥ ५ ॥

७९. काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया म्हणें हरि वोसरला ॥ १ ॥ वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥ २ ॥ कवतुक झाले ते काळी आनंद । कळला गोविंद साच भावें ॥ ३ ॥ भावें तयापुढें नाचती सकळें । गातील मंगळे ओव्या गीत ॥ ४ ॥ गीत गाती ओव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहरी वाहाती पांवे ॥ ५ ॥ वत्सें गाई पशु नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाच्या ॥ ६ ॥ चित्त वेधियेलें गोविंदें जयाचें। कोण ते दैवाचे तयाहूनी ॥ ७ ॥ तयाहूनी कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥ ८ ॥ गोविंदाचा संग तुका म्हणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळीचे ॥ ९ ॥

८०. गोकुळीची गति कोण झाली परी । पाहों आला वरी इंद्रराव ॥ १ ॥ इंद्रापाशीं मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करूनी आलों ॥ २ ॥ आतां जीव नाहीं सांगाया त्या रानी । पुरिलें पाषाणी शिळाधारी ॥ ३ ॥ रिता कोठें नाहीं उरों दिला ठाव । जल्पती तो भाव न कळतां ॥ ४ ॥ न कळतां देव बळें हुंबरती । साच ते पावती अपमान ॥ ५ ॥ माव न कळतां केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पहावया ॥६॥ पाहातां तें आहे जैसें होतें तैसें । नाचती विशेषें तुका म्हणे ॥ ७ ॥

८१. नाचतां देखिली गाई वत्सें जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥ १ ॥ लागला पाऊस शिळांचिये धारी । वांचली ही परी कैसी येथें ॥ २ ॥ येथे आहे नारायण संदेह नाहीं । विघ्न केलें ठायीं निर्विघ्न तें ॥ ३ ॥ विचारितां उचलिला गोवर्धन । अवतार पूर्ण कळों आला ॥ ४ ॥ आला गौळियांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचे ॥ ५ ॥ त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । नोहे चतुर्मुखा ब्रह्मयासी ॥ ६ ॥ सीणतां जो ध्याना नये एकवेळा । तो तयां गोपाळां समागमे ॥ ७ ॥ समागमें गाई वत्स पुण्यवंता । देह कुर्वाळितां अंगसंग ॥ ८ ॥ संग जाला मायबापां लोकपाळां । आळिंगितां गळा कंठाकंठ ॥ ९ ॥ करिते हे झाले स्तुति सकळिक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥ १० ॥ करितील वृष्टि पुष्पवरुषाव । देवाआदिदेव पूजियेला ॥ ११ ॥ पुष्पांजुळी मंत्रघोष जयजयकार । दुमदुमी अंबर तेणें नादें ॥ १२ ॥ नामाचा गजर गंधर्वांची गाणीं । आनंद त्रिभुवनी न समाये ॥ १३ ॥ तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळी देवासी दोन्ही ठायीं ॥ १४ ॥ दोही ठायीं सुख दिले नारायणे । गेला दरुषणे वैरभाव ॥ १५ ॥ भावना भेदाची जाय उठाउठी । तुका म्हणे भेटी गोविंदाचे ॥ १६ ॥

८२. गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें राहे कइंचे वैरभाव ॥ १ ॥ भावे नमस्कार घातला सकळी । लोटांगणे तळी महीवरी ॥ २ ॥ वरी हातबाहे उभारिली देवें । कळलीया भावे सकळांच्या ॥ ३ ॥ सकळही वरी बहुडविलें स्थळा । चलावें गोपाळां म्हणे घरा ॥ ४ ॥ राहिली ही नाचों गोविंदाच्या बोलें । पडलीया डोल छंदें होतीं ॥ ५ ॥ छंद तो नावरे आपणां आपला । आनंदाचा आला होता त्यांसी ॥ ६ ॥ त्यांसी तुका म्हणे आनंद सकळां । ठेंगण्या गोपाळा समागमें ॥ ७ ॥

८३. समागमें असे हरि नेणतिया । नेदी जाऊं वायां अंकितासी ॥ १ ॥ अंकिता सावध केलें नारायणे । गोपाळ गोधनें सकळही ॥ २ ॥ सकळही जन आले गोकुळासी । आनंद मनासी सकळांच्या ॥ ३ ॥ सकळांचा केला अंगीकार देवें। न कळतां भावें वांचवी त्यां ॥ ४ ॥ त्यां झाला निर्धार हरि आम्हापासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥ ५ ॥ निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकळीक नारायणें ॥ ६ ॥ नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका म्हणे नांवा अनुसरे त्यां ॥ ७ ॥

८४. अनुसरे तया फिरों नेदी मागें । राहे अंगसंगें समागमें ॥ १ ॥ अंगसंगें असे कर्मसाक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसें फळ ॥ २ ॥ फळपाकी भोग देतील प्राणीये । तुका म्हणे नये सवें कांहीं ॥ ३ ॥

८५. ये दशे चरित्र केले नारायणे । रांगतां गोधनें राखिताहे ॥ १ ॥ हे सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढेंही बहुतें करणें आहे ॥ २ ॥ आहे तुका म्हणे धर्मसंस्थापणें । केला नारायणें अवतार ॥ ३ ॥

८६. अवतार केला संहाराया दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा ॥ १ ॥ परपीडा करी दैत्य कंसराव । पुढें तोही भाव आरंभिला ॥ २ ॥ लाविलें लाघव पाहोनियां संधि । सकळांही वधी दुष्टजन ॥ ३ ॥ दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणि न साहती ॥ ४ ॥ न साहावे दुःख भक्तांचें या देवा । अवतार घ्यावा लागे रूप ॥ ५ ॥ रूप हे चांगले राम कृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारितां ॥ ६ ॥ उच्चारितां नाम कंस वैरभावें । हरोनियां जीवें कृष्ण केला ॥ ७ ॥ कृष्णरूप त्यासी दिसे अवघे जन । पाहे तो आपण कृष्ण झाला ॥ ८ ॥ पाहिले दर्पणी आधिल्या मुखासी । चतुर्भुज त्यासी तोचि झाला ॥ ९ ॥ झाली कृष्णरूप कन्या पुत्र भाज। तुका म्हणे राज्य सैन्य जन ॥ १० ॥

८७. सैन्य जन हांसे राया जालें काई । वासपे तो ठायीं आपणासी ॥ १ ॥ आपणा आपण जाय सती जैसी । वैरभाव ज्यांसी भक्ति नाहीं ॥ २ ॥ नाही याचा त्याचा भाव एकविध । म्हणऊनी छंद वेगळाले ॥ ३ ॥ वेगळाल्या भावें ते तया हांसती । तयास दिसती अवघीं हरि ॥ ४ ॥ हरिला कंसाचा जीवभाव देवें । द्वेषाचिया भावें तुका म्हणे ॥ ५ ॥

८८. द्वेषाचिया भावें हरिरूप झालें । भाव हरपले देहादिक ॥ १ ॥ देहादिक कर्में अभिमान वाढे । तया कैसा जोडें नारायण ॥ २ ॥ नारायण जोडे एकविध भावें । तुका म्हणे जीवें जाणे लागे ॥ ३ ॥

८९. जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनी जन हांसे कंसा ॥ १ ॥ सावध करितां नये देहावरी । देखोनिया हरि पळे जन ॥ २ ॥ जन वन हरि झालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥ ३ ॥ झांकुनी लोचन मौन्येंचि राहिला । नाहीं आतां बोलायाचें काम ॥ ४ ॥ बोलायासी दुजें नाहीं हे राहिलें । जन कृष्ण झाले स्वयें रूप ॥ ५ ॥ रूप पालटलें गुण नाम याति । तुका म्हणे भूती देव झाला ॥ ६ ॥

९०. झालों स्वयें कृष्ण आठव हा चित्तीं । भेद भयवृत्ति उरली आहे ॥ १ ॥ उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि कृष्ण आठवतो ॥ २ ॥ तोवरी हा देव नाहीं तयापासीं । आला दिसे त्यासी तोचि देव ॥ ३ ॥ देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरीं तो भयाभीत भेदें ॥ ४ ॥ भेदें तुका म्हणे अंतरे गोविंद । साचविण छंद वांयां जाय ॥ ५ ॥

९१. वायां तैसे बोल हरिसी अंतर । केले होते चार भयभेदें ॥ १ ॥ भेदभय गेलें नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा झाली ॥ २ ॥ झाली भेटी कंसा हरीशी निकट । सन्मुखची नीट येरयेरां ॥ ३ ॥ येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगी । त्याचे शस्त्र अंगी हाणितलें ॥ ४ ॥ त्याचे वर्म होतें ठावें या अनंता । तुका म्हणे सत्तानायक हा ॥ ५ ॥

९२. नारायणे कंस चाणूर मर्दिले । राज्यीं स्थापीयेलें उग्रसेना ॥ १ ॥ उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविला अंत अभक्तांचा ॥ २ ॥ अवघेंचि केलें कारण अनंतें । आपुलिया हातें सकळही ॥ ३ ॥ सकळही केली आपुली अंकित । राहे गोपीनाथ मथुरेसी ॥ ४ ॥ मथुरेसी आला वैकुंठनायक । झालें सकळीक एक राज्य ॥ ५ ॥ राज्य दिले उग्रसेना शरणागता । सोडविलीं मातापिता दोन्हीं ॥ ६ ॥ सोडवणे धांवे भक्तांच्या कैवारें। तुका म्हणे करें शस्त्र धरी ॥ ७ ॥

९३. धरी दोही ठायीं सारखाची भाव । देवकी वसूदेव नंद दोघे ॥ १ ॥ दोघे एके ठायीं केली नारायणें । वाढविला तिणें आणि व्याली ॥ २ ॥ व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणे मायबाप ॥ ३ ॥ माय हा जगाची बाप नारायण । दुजा करी कोण यत्न यासी ॥ ४ ॥ कोण जाणे याचे अंतरीचा भाव । तुका म्हणे माव कळों नेदी ॥ ५ ॥

९४. दीनाचा कृपाळू दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥ १ ॥ हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये प्राकृत म्हणाें यासी ॥ २ ॥ यासी कळावया एक भक्तीभाव । दुजा नाहीं ठाव धांडोळितां ॥ ३ ॥ धांडोळितां श्रुति राहिल्या निश्चिंत । तो करी संकेत गोपींसवें ॥ ४ ॥ गोपीकांची वाट पाहे द्रुमातळीं । मागुता न्याहाळी न देखतां ॥ ५ ॥ न देखतां त्यांसी उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळी ॥ ६ ॥ वेळोवेळां पाहे पंथ गोपिकांचा । तुका म्हणे वाचा नातुडे तो ॥ ७ ॥

९५. तो बोले कोमळ निष्ठुर साहोनी । कोपतां गौळणी हास्य करी ॥ १ ॥ करावया दास्य भक्तांचे निर्लज्ज । कवतुकें रज माथां वंदी ॥ २ ॥ दिले उग्रसेना मथुरेचे राज्य । सांगितलं काज करी त्याचें ॥ ३ ॥ त्यासी होतां कांहीं अरिष्ट निर्माण । निवारी आपण शरणागतां ॥ ४ ॥ शरणागतां राखे सर्वभावें हरि । अवतार धरी तयांसाठी ॥ ५ ॥ तयांसाठी वाहे सुदर्शन गदा । उभा असे सदा सांभाळीत ॥ ६ ॥ तळमळ नाहीं तुका म्हणे चित्ता । भक्तांचा अनंता भार माथां ॥ ७ ॥

९६. मारिले असुर वाढल्या मेदिनी । होते कोणा कोणी पीडित ते ॥ १ ॥ तया नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥ २ ॥ वारिले ते दूतीं यमाचिये दंडीं । नुच्चारितां तोंडी नारायण ॥ ३ ॥ नारायणनाम नावडे जयांसी । ते झाले मिरासी कुंभपाकीं ॥ ४॥ कुंभपाकी सेलमान तो तयांचा । तुका म्हणे वाचा संतनिंदा ॥ ५ ॥

९७. वास नारायणे केला मथुरेसी । वधूनी दुष्टांसी तये ठायीं ॥ १ ॥ ठायीं पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळी जनांसहित लोकां ॥ २ ॥ लोकां दुःख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांनीं ॥ ३ ॥ देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥ ४ ॥ येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥ ५ ॥ काया वाचा मनें कृष्णीं रत झालें । सकळां लागले कृष्णध्यान ॥ ६ ॥ ध्यान गोविंदाचे लागलेंसे लोकां । निर्भर हे तुका म्हणे चित्तीं ॥ ७ ॥

९८. चिंतिले पावलीं जया कृष्णभेटी । एरवी ते आटी वायांविण ॥ १ ॥ वासना धरिती कृष्णाविणें कांहीं। सीण केला तिहीं साधनांचा ॥ २ ॥ चाळविली दंभे एक अहंकारें। भोग जन्मांतरें न चुकती ॥ ३ ॥ न चुकती भोग तपें दानें व्रतें । एका त्या अनंतें वांचूनियां ॥ ८ ॥ चुकवूनी जन्म दाखवी आपणा । भजा नारायणा तुका म्हणे ॥ ५॥

९९. भजल्या गोपिका सर्वभावें देवा । नाहीं चित्ती हेवा दुजा कांहीं ॥ १ ॥ दुजा छंद नाहीं तयांचियें मनी । जागृति स्वप्नी कृष्णध्यान ॥ २ ॥ ध्यान ज्यां हरीचें हरीसी तयांचें । चित्त ग्वाही ज्याचें तैशा भावें ॥ ३ ॥ भाग्यें पूर्वपुण्यें आठविती लोक । अवघे सकळीक मथुरेचे ॥ ४ ॥ मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथे नारायण राज्य करी ॥ ५ ॥ राज्य करी गोपीयादवांसहित । कर्मिले बहुत काळ तेथें ॥ ६ ॥ तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका म्हणे ॥ ७ ॥

१००. रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनी गोमटीं नानारत्नें ॥ १ ॥ रत्ने खणोखणीं सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योती नानाकळा ॥ २ ॥ कळा सकळही गोविंदाचे हातीं । मंदिर निगुती उभारिली ॥ ३ ॥ उभारिली दुर्गे दारवंटे फांजी । कोटि चर्या माजी शोभलिया ॥ ४ ॥ शोभलें उत्तम गांव सागरांत । सकळांसहित आले हरि ॥ ५ ॥ आले नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणी ॥ ६॥ निवडीना याति समानचि केली । टणक धाकुली नारायणें ॥ ७ ॥ नारायणे दिली अक्षई मंदिरे । अभंग साचारें सकळांसी ॥ ८ ॥ सकळही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥ ९ ॥ रचिलें तें देवें न मोडे कवणा । बळियांचा राणा नारायण ॥ १० ॥ बळबुद्धिनिती देवाचसारिखीं । तुका म्हणे मुखी गाती ओंव्या ॥ ११ ॥

१०१. गाती ओंव्या कामें करितां सकळ । हलवितां बाळें देवावरी ॥ १ ॥ ऋद्धिसिद्धि दासी दारी ओळंगती । सकळ संपत्ति सर्वां घरीं ॥ २ ॥ घरी बैसलिया जोडलें निधान । करिती कीर्तन नारीनर ॥ ३ ॥ नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसी संगति गोविंदाची ॥ ४ ॥ गोविंदें गोविंद केले लोकपाळ । चिंतनें सकळ तुका म्हणे ॥ ५ ॥

१०२. कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसी राज्य देव ॥ १ ॥ द्वारकेसी राज्य करी नारायण । दुष्ट संहारून धर्म पाळी ॥ २ ॥ पाळी देव आज्ञा संतजना मान । अतीतपूजन वैष्णवांचें ॥ ३ ॥ अतीत अलिप्त अवघियां वेगळा । नाहीं या गोपाळा अभिमान ॥ ४ ॥ अभिमान नाहीं तुका म्हणे त्यासी । नेदी आणिकासी धरूं देव ॥ ५ ॥

१०३. धरियेलें रूप कृष्ण नाम बुंथी । परब्रह्म क्षिती उतरलें ॥ १ ॥ उत्तम हे नाम राम कृष्ण जगीं । तरावयालागी भवनदी ॥ २ ॥ दीनानाथ ब्रिदें रुळती चरणीं । वंदितील मुनी देव ऋषि ॥ ३ ॥ ऋषी मुनी भेटी दिली नारायणें । आणीक कारणे बह केलीं ॥ ४ ॥ बहु कासावीस झाला भक्तांसाठीं । तुका म्हणे आटी सोसियेली ॥ ५ ॥

१०४. सोसियेली आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥ १ ॥ वाहोनी सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥ २ ॥ नेदी काळाचिये हाती सेवकांसी । तुका म्हणे ऐसी ब्रीदावळी ॥ ३ ॥

१०५. ब्रीदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या ॥ १ ॥ सुखावे मेदिनी कृष्णाचिये चालीं। कुंकुमे शोभली होय रेखा ॥ २ ॥ होऊनी भ्रमर पाऊलांचे सुख । घेती भक्त मुख लावूनियां ॥ ३ ॥ याचसाठी धरियेला अवतार । सुख दिले फार निजदासां ॥ ४ ॥ निजसुख तुका म्हणे भक्तां ठावें । तिहींच जाणावें भोगूं त्यासी ॥ ५ ॥

१०६. भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणी गोपाळां गाईवत्सां ॥ १ ॥ गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरी ॥ २ ॥ भक्ति नवविधा तयांसी घडली । अवघींच झालीं कृष्णरूप ॥ ३ ॥ रूप दाखविलें हातां भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाहीं ॥ ४ ॥ नाही राहों दिले जातां निजधामा । तुका म्हणे आम्हांसहित गेला ॥ ५ ॥

१०७. गेला कोठे होता कोठूनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥ १ ॥ आहे साच भावें सकळ व्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥ २ ॥ कोठे नाहीं ऐसा नाहीं रिता ठाव । अनुभवी देव स्वयें झाले ॥ ३ ॥ जातों येतों आम्ही देवाचे सांगात । तुका म्हण गात देवनाम ॥ ४ ॥

१०८. मना वाटे तैसी बोलिलों वचनें । केली धीटपणे सलगी देवा ॥ १ ॥ वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भक्ति नेणे भाव नाही मनीं ॥ २ ॥ नाहीं झालें ज्ञान पाहिली अक्षरें । मानीजेसी थोर थोरी नाहीं ॥ ३ ॥ नाहीं मनी लाज धरिली आशंका । नाहीं भ्यालों लोकां चतुरांसी ॥ ४ ॥ चतुरांच्या राया मी तुझे अंकित । जालों शरणागत देवदेवा ॥ ५ ॥ देवा आतां करी सरती ही वचनें । तुझ्या कृपादाने बोलिलों ती ॥ ६ ॥ तुझें देणें तुझ्या समर्पूनी पायीं । झालाें उतराई पाडुरंगा ॥ ७ ॥ रंकाहूनी रंक दास मी दासांचें । सामर्थ्य मज कैचें बोलावया ॥ ८ ॥ बोलावया पुरे माझी वाचा कायी । तुका म्हण पायीं ठाव द्यावा ॥ ९ ॥

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...