१. सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ॥ १ ॥ तुळसीहार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥२॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठी कौस्तुभमणि विराजित ॥३॥ तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥४॥
२. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशिकळा लोपलिया ॥१॥ कस्तुरी मळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठी वैजयंती ॥ २॥ मुकुट कुंडलें श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतले सकळही ॥३॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो ॥ ४॥ सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥५॥
३. गरुडाचे वारिकें कासे पितांबर । सांवळे मनोहर कैं देखेन ॥१॥ बरविया बरवंटा घनमेघसांवळा । वैजयंती माळा गळां शोभे ॥ २ ॥ मुगुट माथां कोटी सूर्याचा झल्लाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥३॥ ओतीव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगी वेल्हाळ रखुमादेवी ॥ ४ ॥ उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥ ५॥ तुका म्हणे नव्हे आणिकां सारिखा। तोचि माझा सखा पांडुरंग ॥ ६ ॥
४. धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टी न्याहाळितां ॥ १ ॥ बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ २॥ सकळ मंगळाचें सार । मुख सिद्धीचे भांडार ॥ ३ ॥ तुका म्हणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥ ४ ॥
५. राहों आतां हेचि ध्यान । डोळा मन लंपट ॥ १॥ कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ॥ २ ॥ होईल येणे कळसा आले । स्थिरावलें अंतरीं ॥ ३ ॥ तुका म्हणे गोजिरीया । विठोबा पायां पपडों द्या ॥ ४ ॥
६. आवडे हे रूप गोजिरें सगुण । पाहतां लोचन सुखावले ॥ १ ॥ आतां दृष्टीपुढे ऐसाचि तूं राहे । जो मी तुज पाहें पांडुरंगा ॥ २ ॥ लांचावलें मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडी ऐसें झालें ॥३॥ तुका म्हणे आम्ही मागावी लडिवाळी । पुरवावी आळी मायबापा ॥ ४ ॥
७. गुणा आला विटेवरी । पितांबरधारी सुंदर जो ॥ १ ॥ डोळे कान त्याच्या ठायीं । मन पायीं राहो हें ॥२॥ निवारोनि जाय माया । ऐसी छाया जयाची ॥ ३ ॥ तुका म्हणे समध्यान । ते हे चरण सुकुमार ॥ ४॥
८. स्वप्नीं तोही कैसा न पडसी डोळां । सुंदर सांवळा घवघवीत ॥ १ ॥ चतुर्भुज माळा रुळे येकावळी । कस्तुरी निढळीं रेखिलीसे ॥ २ ॥ शंखचक्रगदा रुळे वैजयंति । कुंडलें तळपति श्रवणीं दोन्हीं ॥ ३॥ तुका म्हणे स्वप्नीं दावीं आतां पाय । पांडुरंग माय कृपावंते ॥ ४ ॥
Subscribe to:
Post Comments (Atom)
लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण
-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...
-
पुराणांतील विविध देवता व प्रसंग यांविषयीचे अभंग
-
-इंद्रजित भालेराव १ खरं सांग तुकया । तुझा अनुभव तुला कधी देव । भेटला का? निश्चयाच्या बळा । मानिलेस फळ निश्चयाचा तळ । गाठलास पांड...
-
- श्यामसुंदर महाराज सोन्नर संत म्हणून तुकाराम महाराज यांचे कार्य जितके श्रेष्ठ आहे, तितकेच समाजसुधारक म्हणूनही तुकाराम महाराज यांच्या कार्य...
No comments:
Post a Comment