- विंदा करंदीकर
तुकोबांच्या भेटी शेक्स्पीअर आला ।
तो झाला सोहळा दुकानात ॥
जाहली दोघांची उराउरी भेट ।
उरातले थेट उरामध्ये ॥
तुका म्हणे "विल्या, तुझे कर्म थोर ।
अवघाची संसार उभा केला" ॥
शेक्स्पीअर म्हणे, "एक ते राहिले ।
तुवा जे पाहिले विटेवरी" ॥
तुका म्हणे, "बाबा, ते त्वा बरे केले ।
त्याने तडे गेले संसाराला ॥
विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी ।
माझी पाटी कोरी लिहोनिया" ॥
शेक्स्पीअर म्हणे, "तुझ्या शब्दांमुळे ।
मातीत खेळले शब्दातीत" ॥
तुका म्हणे, "गड्या, वृथा शब्दपीट ।
प्रत्येकाची वाट वेगळाली ॥
वेगळीये वाटे वेगळाले काटे ।
काट्यासंगे भेटे पुन्हा तोच ॥
ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी ।
कजागीण घरी वाट पाहे" ॥
दोघे निघोनिया गेले दोन दिशा ।
कवतिक आकाशा आवरेना ॥
(विंदा करंदीकर हे मराठी भाषेला समृद्धी देणारे कवी असून त्यांना भारत सरकारने ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे.)
No comments:
Post a Comment