Saturday, 3 May 2025

८. शाक्तनिषेध व श्लोकरूपी बोध

 तत्कालिन शाक्तपंथातील कुप्रथांचा निषेध करून आत्मस्वरूपपर बोध देणारे अभंग.

शाक्तनिषेध (अभंग संख्या १५)

४००. टवकारूनी दृष्टि लावूनियां रग । दावी झगमग डोळ्यापुढें ॥ १ ॥ म्हणती शिष्यासी लागली समाधि । लटकीच उपाधि झकविती ॥ २ ॥ दीपाचिया ज्योती कोंडियेलें तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥ ३ ॥ रांगोळिया चौक श्रृंगारूनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥ ४ ॥ पडदा लावोनिया दीप चहूं कोनीं । बैसोनी आसनीं मुद्रा दावी ॥ ५ ॥ नैवेद्यासी म्हणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥ ६ ॥ झाला उपदेश कवळ घ्या रे मुखीं । आपोशन शेखीं बुडविलें ॥ ७ ॥ पाषांड करोनी मांडिली जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रति ॥ ८ ॥ कायावाचामनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥ ९ ॥ शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भग भोगी ॥ १० ॥ विधीचाही लोप बुडविला वेद । शास्त्रांचाही बोध हरविला ॥ ११ ॥ योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥ १२ ॥ वैराग्याचा लोप हरिभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंडें ॥ १३ ॥ तुका म्हणे गेलें गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नरकवासा ॥ १४ ॥ (धृ. नाही)

४०१. गुरुमार्गामुळें भ्रष्ट झाले सकळ । म्हणती यातीकुळ नाहीं ब्रह्मीं ॥ धृ. ॥ पवित्राला म्हणती नको हा कंटक । मानिती आत्मिक अनामिका ॥ २ ॥ डोहोर लोहार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरें ॥ ३ ॥ कांहीं टाण्या टोण्या विप्रशिष्य होती । उघडी फजिती स्वधर्माची ॥ ४ ॥ नसता करूनी होम खाती एके ठायीं । म्हणती पाप नाहीं मोक्ष येणें ॥५ ॥ इंद्रियांचे पेटे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥ ६ ॥ नाहीं शास्राधार पात्रापात्र नेणें । उपदेशून घेणें द्रव्य कांहीं ॥ ७ ॥ तुका म्हणे ऐसे गुरुशिष्य जाण । विठोबाची आण नरका जाती ॥ ८ ॥

४०२. शाक्त गधडा जये देशीं । तेथे राशीं पापाच्या ॥ १ ॥ सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंद्रियें ॥ २ ॥ क्रोधरूपें वसे काम । तिचें नाम जपतसें ॥ ३ ॥ मद्यभक्षण मांगिणजाती। विटाळ चित्तीं सांठविला ॥ ४ ॥ स्तवूनियां पुजी रांड । न लगे भांड दाढीसी ॥ ५ ॥ तुका म्हणे भगवती । नेईल अंती आपणापें ॥ ६ ॥

४०३. राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करिती तो ॥ १ ॥ अधर्माचें उघड पीक । धर्म रंक ते गांवीं ॥ २ ॥ न पिके भूमि कांपे भारें । मेघ वारें पीतील ॥ ३ ॥ तुका म्हणे अवघीं दुःखें । येती सुखे वस्तीसी ॥ ४ ॥

४०४. ऐका कलींचे हें फळ । पुढे होईल ब्रह्मघोळ ॥ धृ. ॥ चारों वर्ण अठरा याती । भोजन करिती एके पंक्ती ॥ २ ॥ पूजिती असुरा रांडा । मद्य प्राशितील पेंडा ॥ ३ ॥ वाम कवळ मार्जन । जन जाईल अधःपतन ॥ ४ ॥ तुका हरिभक्ती करी । शक्ति पाणी वाहे घरीं ॥ ५ ॥

४०५. ऐसें कलियुगाच्या मुळें । झाले धर्माचे वाटोळें ॥ धृ. ॥ सांडूनियां रामराम । ब्राह्मण म्हणती दोम दोम ॥ २ ॥ शिवो नये ती निळीं । वस्त्रे पांघरती काळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥ ४ ॥

४०६. अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा । त्याचा विटाळ नका अंगा । पांडुरंगा माझिया ॥ २ ॥ काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥ ३ ॥ करितां पाप न धरी शंका । म्हणे तुका कोणीही ॥ ४ ॥

४०७. वारितां बळें धरितां हातीं । जुलुमें जाती नरकामधीं ॥ १ ॥ रंडीदासाप्रति कांहीं । उपदेश तोही चालेना ॥ २ ॥ जन्म गेला वाताहात । थोर घात ते ठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥ ४ ॥

४०८. शाक्ताची शुकरी माय । विष्ठा खाय बिदीची ॥ १ ॥ तिची त्या पडली सवे । मागें धांवे म्हणोनि ॥ २ ॥ शाक्ताची गाढवी माय । भुंकत जाय वेसदारा ॥ ३ ॥ तुका म्हणे सिंदळीचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥ ४ ॥

४०९. हरिहर सांडूनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥ १ ॥ ऐका त्याची विटंबना । देवपणा भक्तांची ॥ २ ॥ अंगी कवडे घाली गळां । परडी कळाहीन हातीं ॥ ३ ॥ गळा गाठा हिंडे द्वारी । मनुष्य परी कुतरीं ती ॥ ४ ॥ माथां सेंदुर दांत खाती । जेंगट हाती सटवीचे ॥ ५ ॥ पूजिती विकट दोंद । पशु सोंड गजाची ॥ ६ ॥ ऐशा छंदे चुकलीं वाटा । भाव खोटा भजन ॥ ७ ॥ तुका म्हणे विष्णु शिवा । वांचुनि देवा भजती ते ॥ ८ ॥

४१०. कांद्यासाठी झालें ज्ञान । तेणें जन नाडिलें ॥ १ ॥ कामक्रोध बुचबुची । भुंके पुची व्यालीची ॥ २ ॥ पुजेलागीं द्रव्य मागे । काय सांगे शिष्यातें ॥ ३ ॥ तुका म्हणे कैंचें ब्रह्म । अवघा भ्रम विषयांचा ॥ ४ ॥ (धृ. नाही)

४११. सांडूनिया पंढरीराव । कवणातें म्हणों देव ॥ १ ॥ बहु लाज वाटे चित्ता । आणीकांतें देव म्हणतां ॥ २ ॥ सांडूनियां हिरा । कोणे वेचाव्या त्या गारा ॥ ३ ॥ तका म्हणे हरिहर । ऐसी सांडूनिया धुर ॥ ४ ॥

४१२. बहुत गेली वायां । न भजतां पंढरीराया ॥ १ ॥ करिती कामिकांची सेवा । लागोन मागोन खात्या देवा ॥ २ ॥ अवघियांचा धनी । त्यासी गेली विसरोनी ॥ ३ ॥ तुका म्हणे अंतीं । यमाचिया हातीं ॥ ४ ॥

४१३. असो आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवू ॥ १ ॥ रक्षिता तूं होसी जरी । तरि काय येरी करावे ॥ २ ॥ काया वाच मन पायीं । राहे ठायीं करूं तें ॥ ३ ॥ तुका म्हणे गाइन गीतीं । रूप चित्तीं धरूनियां ॥ ४ ॥

४१४. नाहीं आम्ही विष्णुदास । करीत आस कोणाची ॥ १ ॥ हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥ २ ॥ असों भलते ठायी मनें । समाधानें आपुल्या ॥ ३ ॥ तुका म्हणे करूं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥ ४ ॥

 

श्लोकरूपी बोध (अभंग संख्या ६)

४१५. तुजवांचुनी मागणें काय कोणा । महीमंडळी व्यापक विश्व जाणा । जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत का रावराणे ॥ १ ॥ नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तुजवांचूनि एका । मनीं मानसीं चिंतितां रूपनाम । पळे पाप ताप भयें नासे काम ॥ २ ॥ हरि नाम हें साच तुझें पुराणीं । हरि हातिचे काळगर्भादियोनी । करूं मुखवाणी कसी देशधाडी । तुजवांचुनी वर्णितां व्यर्थ गोडी ॥ ३ ॥ भवभंजना व्यापका लोक तिन्ही । तुज वर्णितां शीणला शेषफणी । असो जीव भाव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणिक व्यर्थ काईं ॥ ४ ॥ दीनानाथ हें साक्ष तुझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी । तुका राहिला पायीं तो राख देवा । असें मागतो तुमची पादसेवा ॥ ५ ॥ (धृ. नाही)

४१६. उभा भीवरेच्या तिरीं राहिलाहे । असे सन्मुख दक्षिणे मुख वाहे । पळे पाप महा सुटे कांप थोर । कसे गर्जती घोष हे नामवीर ॥ १ ॥ गुणगंभीर धीर हा हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख । मुनि लागिं लागे बहू गोड चित्तीं । देहभावना तुटलियाचि खंती ॥ २ ॥ ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादान तें द्यावयासी उदार । सिद्धि वोळंगती जया सर्वठायीं । तुझें नाम हें चांगलें गे विठाई ॥ ३ ॥ असे उघडा हा विटेवरि उभा । धरूनी कटसूत्र हें भक्तिलोभा । पुढें वाट दावी भवसागराची । विठो माउली सिद्ध हे साधकांची ॥ ४ ॥ करा वेगु होता धरा पंथ आधीं । जया पार नाहीं सुखा तेंच साधी । म्हणे तुका पंढरीये सर्व आले । असे विश्व हे जीवनें त्याच ज्यालें ॥ ५ ॥ (धृ. नाही)

४१७. धना गुंतलें चित्त माझें मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारी । मन हिंडतां न पुरे यासि कांहीं । मही ठेंगणी परि तें तृप्ति नाहीं ॥ १ ॥ पाहतां न दिसे निज शुद्ध मती । पुढें पडिलों इंद्रियां थोर घाती । जिवा नास त्या संगती दंड बेडी । हरि शीघ्र या दुष्टसंगासि तोडी ॥ २ ॥ असीं आणिकें काय सांगों अनंता । मोहो पापिणी दुष्टमायाममता । काम क्रोधही यातना थोर करी । तुजवांचुनी सोडवी कोण हरि ॥ ३ ॥ निजदेखतां निज हे दूरि जाये । निज आळस दंभ या भीत आहे । तयां वस्ति देहीं नको देऊं देवा । तुजवांचुनि आणिक नास्ति हेवा ॥ ४ ॥ करीं घातपात भय लाज थोरी । असे सत्य भाव बहू भक्ति दूरी । नको मोकलूं दीनबंधु अनाथा । तुका विनवी ठेवूनी पायीं माथा ॥ ५ ॥ (धृ. नाही)

४१८. पैल सांवळे तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुर्बिलीं साजिरीं मारपीसें । हरे त्यासि देखतां ताप माया । भजा रे भजा यादवा याेगिराजा ॥ १ ॥ जया कामिनी लुब्धल्या सहस्र सोळा । सुकुमार त्या गोपिका दिव्य बाळा । शोभे मध्यभागी कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळ कंठीं ॥ २ ॥ तया यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही । महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रूप हें पापनासीं ॥ ३ ॥ कसीं पाउलें साजिरी कूंकुमाची । कसी वीट हे लागली दैवाची । जया चिंतितां अग्नि हा शांति नीवे । धरावा मानसीं आपल्या दृढभावे ॥ ४ ॥ मुनी देखतां मुख हें चित्त माये । देह मांडला भाव हा बाप माय । तुकया लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सावळे रूप कैसे ॥ ५ ॥ (धृ. नाही)

४१९. असे नांदतु हा हरि सर्वजीवीं । असे व्यापुनी अग्नि काष्ठांत तेवीं । घटीं बिंबलें बिंब हे ठायिंठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥ १ ॥ तृण वाटितां क्षीर हे होत नाहीं । पशू भक्षितां पालटे तेंचि देहीं । तया वर्म तों जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥ २ ॥ फळ कर्दळीं सेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये । धीर नाहीं तें वाउगें धीग झालें । फळ पुष्प ना यत्न तें व्यर्थ गेलें ॥ ३ ॥ असें नाम हें दर्पणें सिद्ध केलें। असें बिंब तें या मळाआड ठेलें । कसें शुद्ध नाही दिसे माजि रूप । नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥ ४ ॥ करा वर्म ठावें नका सोंग वांयां । तुका विनवीताे पडों काय पायां । त्यजी पुत्र दारा धन वासना हे । मग उरलें शेवटीं काय पाहें ॥ ५ ॥ (धृ. नाही)

४२०. मना सांडी हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हें व्यर्थ गोडी । असे हीत माझें तुज कांहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हें पायीं सुख ॥ १ ॥ असा सर्वभावें तुज शरण आलों । देहदुःख हे भोगितां फार भ्यालों । भवतारितें दूसरें नाहीं कोणी । गुरु होत कां देव आणीक तिन्हीं ॥ २ ॥ जना वासना हे धना थोरी आहे । तुज लागली संगती तेचि साेये । करी सर्व संगी परित्यागु ठायीं । तुका विनवी ठेवूनि शीर पायीं ॥ ३ ॥ (धृ. नाही)

 

गति आणि अधोगतीचे मार्ग (अभंग संख्या १)

४२१. ऐका संतजन उत्तर माझे बोबडे बोल । करी लाड तुम्हांपुढे हो कोणी झणी कोपाल ॥ १ ॥ उपाय साधन ऐका काेण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुम्हीं धरावें चित्तीं ॥ २ ॥ धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज । कर्म तयासी जोडे रे भीत नाहीं लाज ॥ ३ ॥ पुण्य तें जाणा रे भाइनों परोपकाराचें । परपीडा परनिंदा रे खरें पाप तयाचें ॥ ४ ॥ लाभ तयासीच झाला रे मुखीं देव उच्चारी । प्रपंचा पाठीं गुंतला रे हानी तयासी थोरी ॥ ५ ॥ सुख तें जाणा रे भाइनों संतसमागम । दुःख तें जाणा रे भाइनों सम तेथें विषम ॥ ६ ॥ साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धि । पराधीना आहे घात रे थोर जाण संबंधी ॥ ७ ॥ मान पावे तो आगळा मुख्य इंद्रियें राखे । अपमानी तो अधररसस्वाद चाखे ॥ ८ ॥ जाणता तयासी बोलती जाणे सारलक्षण । नेणता तया बोलिजे वाद करी भूषण ॥ ९ ॥ भला तोचि एक जाणा रे गयावर्जन करी । बुरा नष्ट धन मेळवी परद्वार जो करी ॥ १० ॥ आचारी अन्न काढी रे गाई अतितविभाग । अनाचारी करी भोजन ग्वाही नसतां संग ॥ ११ ॥ स्वहित तेणेचि केलें रे भूतीं देखिला देव । अनहित तयाचें झालें रे आणी अहंभाव ॥ १२ ॥ धन्य तेचि जन्मा आले रे एक हरीचे दास । धिग ते विषयीं गुंतलें केला आयुष्या नाश ॥ १३ ॥ जोहरी तोचि एक जाणा रे जाणे सिद्धलक्षणें । वेडसरु तो भुले रे वरदळभूषणें ॥ १४ ॥ बळियाढा तोचि जाणा रे भक्ति दृढ शरीरीं । गांढ्या तयासी बोलिजे एक भाव न धरी ॥ १५ ॥ खोल तो वचन गुरुचें जो गिळूनी बैसे । उथळ धीर नाहीं अंगीं रे म्हणे होईल कैसें ॥ १६ ॥ उदार तोचि जीवभाव रे ठेवी देवाचे पायीं । कृपण तयासी बोलिजे पडे उपाधिठाईं ॥ १७ ॥ चांगलेपण तेंचि रे ज्याचें अंतर शुद्ध । ओंगळ मळीन अंतरीं वाणी वाहे दुर्गंध ॥ १८ ॥ गोड तेंचि एक आहे रे सार विठ्ठलनाम । कडु तो संसार रे लक्षचौऱ्यांशी जन्म ॥ १९ ॥ तुका म्हणे मना धरीं रे संतसंगतिसोई । नलगे कांहीं करावें राहें विठ्ठलपायीं ॥ २० ॥

No comments:

Post a Comment

लेख-१२. तुकोबांची गुरुपरंपरा : वाद विश्लेषण

-प्रा. डाॅ. दत्तात्रय प्र. डुंबरे ॥१॥ वारकरी पंथात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गुरु हा 'संतकुळीचा राजा' मान...